davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

‘सवाष्ण’ नावाची गोष्ट

आज एका वेगळ्या विषयावर लिहिते आहे. विषय खरं तर नेहमीचाच…आपल्याही नकळत आपल्या आजूबाजूला घडत राहणारा…वर्षानुवर्षं हे असं चालत आलं आहे त्यामुळे ते असंच चालत राहणार असं म्हणून नकळत आपणही त्याकडे डोळेझाक केलेला…पण केवळ वर्षानुवर्षं पाळली गेल्यामुळे ती गोष्ट योग्य ठरते का?

मी जे लिहिलं आहे, त्या गोष्टी मला कायमच खटकत असत. ” हे असं का?” हा प्रश्न कायमच पडत राहायचा. पण ह्याआधी त्याची झळ चटका बसण्याएवढी मोठी नव्हती. आयुष्यात घडलेल्या काही घटनांनंतर मात्र ह्या सगळ्याबद्दल लिहिण्याची मनापासून इच्छा झाली. समाजपरिवर्तन करण्याची ताकद माझ्यात नक्कीच नाही पण तरीही हा लेख वाचून माझ्याप्रमाणे आणखी काही पावलं ह्या दिशेने पडली तर मला समाधानच वाटेल.

खरं तर आजच्या जगासाठी, मुख्यत्वे करून मुंबई आणि इतर मेट्रो- सिटीज मध्ये राहणाऱ्या आपल्या आजच्या पिढीसाठी “सवाष्ण” ह्या संकल्पनेला आणि ह्या शब्दाला फारसं महत्व राहिलेलं नाही. खरं तर शहरी भागात ही संकल्पना आणि ती जपण्यासाठी आपण पाळत असलेल्या नको त्या चालीरीती हे सगळंच हळूहळू संपुष्टात येऊ लागलंय. तरीही इतर भागातील आणि आपल्या जुन्या पिढीतील काही लोकांबाबत आपण असं ठामपणे म्हणू नाही शकत. माझा हा लेख मुख्यत्वे ह्या लोकांसाठी आहे. जे हा विचार आधीपासूनच करत आहेत, त्या सर्वांतर्फे मी फक्त व्यक्त होतेय.

बरंच काही बदलायला हवंय, पण सुरुवात सुरुवातीपासूनच व्हायला हवी, म्हणून हा लेख-प्रपंच. माझ्यासाठी हा फक्त एक लेख नसून तो एक विचार म्हणून मला पुढे न्यावासा वाटतो. त्यामुळे हा लेख आवडला आणि त्यातले मुद्दे पटले किंवा नाही पटले तरीही तुमच्या “comments ” ची अपेक्षा करते. ह्यासंबंधित एखादा लेख किवा विचार कुणाला शेअर करावासा वाटला तर तो ह्या ब्लॉग मार्फत शेअर करायला मला नक्कीच आवडेल.

————————————————-

सवाष्ण’ नावाची गोष्ट

आपल्या समाजात अतिशय उच्च वर्गात मोडली जाणारी स्त्रियांची एक जात म्हणजे ‘ सवाष्ण’ बाई. म्हणजे जिचं लग्न झालेले आहे आणि जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री. काय आहे आजच्या आपल्या समाजाची या सवाष्ण बायकांकडे बघण्याची मानसिकता? त्याहीपेक्षा कुठे कमी पडतो आहे आपला समाज ‘सवाष्ण नसलेल्या’ बायकांना जाणून घायला? आपल्या प्रगतिशील देशात आणि पुराणकाळापासून आजपर्यंतच्या इतिहासात घडून आलेल्या स्त्रीजीवनाबद्दलच्या अनेक सुधारणांमुळे वरील प्रश्नाची तीव्रता नक्कीच कमी झालेली आहे पण हे प्रश्न आजही आहेत. समाजाच्या सर्व स्तरात कमी अधिक फरकाने तरी नक्कीच आहेत.

सवाष्ण स्त्रीला आपल्या समाजात देवीस्वरुप समजतात. प्रत्येक मंगल कार्यात सवाष्ण बाईचं असणं आणि तिचं सहभागी होणं हे मांगल्याचं , पावित्र्याचं आणि शुभशकुनाचं समजलं जातं. सवाष्ण बाईने दुसर्‍या सवाशीणीला हळदी-कुंकू लावणं, तिची ओटी भरणं हे सगळं देवीचा आशीर्वाद मिळाल्यासारखंच पवित्र मानतात.

समाजाचा उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि खालचा वर्ग हे सर्वच वर्ग आपापल्या परीने, आपापल्या कुवतीनुसार त्यांचे रीतीरीवाज, प्रथा आणि परंपरा पाळत असतात आणि पुढच्या पिढीला हा वारसा जतन करण्याची शिकवण देत असतात. परंतु स्त्रीच्या ‘सवाष्ण’ असण्याला मात्र बहुतेक प्रथांमधे नको तितके आणि अकारण महत्व दिलेले दिसून येते.
‘सवाष्ण’ ही संकल्पना भारतात वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या प्रथांमधे जपली गेलेली आहे. लग्न करून घरात आलेल्या नववधूला “अखंड सौभाग्यवती भव” किंवा “सदा सुहागन रहो” असा आशीर्वाद दिला जातो. वरवर मंगल आणि पवित्र वाटणारी ही वचने खरं तर किती मोठा शाप किंवा अमंगल विचार पोटात दडवून असतात ह्याचा आपण कधी विचार करतो का? ‘सौभाग्य’ ह्या शब्दाचा अर्थ ‘चांगले भाग्य’. आणि आपल्या शास्त्रानुसार पतीच्या असण्यामुळेच स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते त्यामुळे ‘सौभाग्यवती’ म्हणजे ‘पती जिवंत असल्यामुळे जिला चांगले भाग्य प्राप्त झाले आहे अशी स्त्री’. आपल्या आशीर्वादात आपण त्या नववधूला “कायम सौभाग्यवती रहा” असे म्हणतो. परंतु निसर्गचक्रानुसार पतीचे कायम जिवंत राहणे हे केवळ अशक्य असते. म्हणजेच आपल्या आशीर्वादात “पतीच्या आधी तुझे निधन होऊ देत” असा शापच आपण तिला देत असतो, हे किती भयानक आहे. विवाह करून नवीन घरात, नवीन आयुष्यात प्रवेश करताक्षणीच “आता पत्नी म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही तुझे स्थान नवर्‍यापेक्षा कसे खालच्याच पातळीवर आहे” हे नकळत पण किती सहजपणे आपल्या शापित आशीर्वादातून म्हणून जातो आणि यापुढील आयुष्याच्या प्रत्येक पर्वात हे दुय्यमतेचे ओझे कायम वाहत राहण्याच्या अपेक्षाही त्याला जोडुन टाकतो. भारतीय स्त्री च्या बाबतीत तिचे सवाष्ण असणे हे तिला एक वेगळा मान मिळवून देत असेलही परंतु दुसर्‍या बाजूने विचार केल्यास सवाष्ण असल्याने हा मान मिळणे हे तिच्या दुय्यमतेचेच प्रतीक नाही का?

आपल्या मराठमोळ्या घरात आपण वर्षभर निरनिराळे सण उत्साहाने साजरे करतो. तसंच प्रसंगानुरूप करावयाचे विधी, उत्सव, समारंभ ह्यात देखील सहभागी होत असतो. म्हणजे कुणाचे डोहाळेजेवण, कुणाचे बारसे, कुणाची मंगळागौर, कुणाच्या घरी पूजा वगैरे.

ह्या सगळ्या समारंभात सवाष्ण स्त्रियांना विशेष स्थान असते. सोहळ्यातल्या महत्वाच्या गोष्टी जसे हळदी-कुंकू लावणे, गजरा देणे, ओटी भरणे, औक्षण करणे, वाण देणे वगैरे ह्यात सवाष्ण बाईशिवाय पान हलत नाही कारण ह्या फक्त एका सवाष्ण बाईनेच करावयाच्या गोष्टी आहेत.

म्हणजे तिने केलेल्या ह्या सर्व गोष्टीतील मांगल्याचा, त्यातून मिळालेल्या पवित्र आशीर्वादाचा आणि संस्कारांचा संबंध आपण तिच्या नवर्‍याच्या जिवंत असण्याशी जोडत असतो. हे कितपत योग्य आहे? मग जर नंतर तिचा नवरा मरण पावला तर तिच्यातला हा पावित्र्याचा, देवत्वाचा अंशही त्याच्याबरोबर निघून जाणार का? तर्कशुद्ध विचार केल्यास खरंच हे पटण्यासारखे आहे का? त्याहीपेक्षा त्या स्त्री च्या बाबतीत हे माणुसकीला धरून आहे का? तिच्या नवर्‍याची उणीव तिला प्रकर्षाने जाणवू देण्याची यापेक्षा वाईट पद्धत नसेल.

‘सवाष्ण’ ह्या शब्दाची व्याख्या आजच्या काळात पुन्हा एकदा तपासून बघण्याची वेळ आली आहे.

जर एखादी स्त्री स्वत:च पापी असेल आणि अशाच एखाद्या समारंभात ती सहभागी झाली तर केवळ ती सवाष्ण आहे म्हणून तिने दिलेले आशीर्वाद पवित्र कसे मानायचे? मग ती सवाष्ण आहे म्हणून तिने केलेली पापे धुतली जातील का?

हेच आपण स्त्रीच्या पतिबद्दल सुद्धा म्हणू शकतो. वाईट चालीरितीच्या एखाद्या व्यसनाधीन झालेल्या नवर्‍यामुळे त्या स्त्रीस कसले एवढे मोठे सौभाग्य प्राप्त होते ज्यात इतरांना आशीर्वाद देण्याची शक्ती असते? मग हीच शक्ती त्या स्त्रीच्या नवर्‍याला चांगले वळण का नाही लावू शकत?

नवर्‍यापासून वेगळं राहत असलेली स्त्री, जी फक्त समाजाच्या नजरेत सवाष्ण आहे, तिला खरंच सवाष्ण म्हणता येईल का? जर तिचा नवरा जिवंत आहे, तर आपल्या व्याख्येप्रमाणे नवर्‍याच्या असण्यामुळे तिला  जोडलं  गेलेलं  देवत्व, पावित्र्य नवर्‍याबरोबर राहत नसतानाही तिच्या बरोबर राहील का?

आपल्यासाठी खरंच स्त्रीचे सवाष्ण असणे इतके महत्वाचे आहे, तर मग प्रत्येक वेळी एखाद्या समारंभात सहभागी करून घेण्याआधी ती स्त्री खर्‍या अर्थाने ‘सवाष्ण’ आहे का, हे आपण कधीच का नाही तपासून पाहत?

या उलट एखादी अतिशय संस्कारी स्त्री, आपले संस्कार, चालीरिती पाळणारी, जीचा नवरा हयात नाही पण आपल्या आठवणीत, संस्कारात जिने त्याला जिवंत ठेवले आहे अशी स्त्री. तिने एखाद्या समारंभात इतर स्त्रियांना हळदी-कुंकू लावले तर त्यातून अशुभ असे काय होणार आहे? तिच्या चांगुलपणामुळे तिच्यामध्ये आलेल्या देवत्वाचे संस्कारच ती इतर स्त्रियांना वाटणार आहे असा ह्याचा अर्थ होत नाही का?

एखाद्या प्रेमळ, लेकुरवाळ्या, विधवा म्हातार्‍या आजीने एखाद्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात गर्भवती स्त्री ची ओटी भरली तर त्याचा अर्थ तिने आपल्या सूरकुतलेल्या हातांनी अनुभवाचा, प्रेमाचा आणि मुलाबाळांवरील आशीर्वादाच्या छ्त्रछायेचा वारसाच तिच्या ओटीत टाकला असा अर्थ का नाही काढत आपण?

तिच्यातल्या मातृत्वाची, प्रेमळपणाची, चांगुलपणाची, संस्कारांची आणि तिच्या आशीर्वादाची किंमत आपण केवळ तिच्या नवर्‍याच्या न असण्यामुळे शून्य ठरवतो. खरंच हे योग्य आहे का? नवर्‍याबरोबर अनेक वर्षे संसार करताना ह्या सर्व विधींमध्ये मनापासून उत्साहाने सहभागी होणार्‍या स्त्रियांना, नवरा मरण पावताच आपण ह्या सर्व गोष्टींपासून वंचित ठेऊ लागतो, तेव्हा आपली परंपरा, शास्त्र ह्या पेक्षा पुढे जाऊन त्या स्त्री च्या मनाचा आणि भावनांचा विचार का नाही करत आपण?

आजही कित्येक घरात देवाचा नैवेद्याचा स्वयंपाक बनवण्याची परवानगी फक्त सवाष्ण स्त्री लाच असते. आजही समाजातल्या काही वर्गात विधवा स्त्रीला पांढरा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे वापरण्यास परवानगी नसते, केसात फूल, गजरे माळण्याचे स्वातंत्र्य नसते.

एखाद्या पुरुषाची पत्नी मरण पावली, तर त्याच्या घरगुती, सामाजिक सहभागात काहीच फरक पडत नाही. मग स्त्रीच्या च बाबतीत, तिच्या आयुष्यात, सामाजिक सहभागात एवढा मोठा बदल होणे हे आपण अपरिहार्य का करून ठेवतो?

हे खरं  तर कुणीही हेतुपुरस्सर वागत नाही. ‘त्या’ स्त्रीचं  अशा समारंभातून  वगळलं जाणं सर्वांसाठीच दु:खद असत. पण आपल्या शास्त्रानुसार आपण सर्व काही पाळतो आहोत ही जाणीव त्या दु:खापेक्षाही वरचढ असते.

आपल्या शास्त्रात ह्या गोष्टीवर समाधानकारक विश्लेषणे असतीलही. परंतु ही शास्त्रे असंख्य वर्षांपूर्वी लिहिली गेली आहेत. ज्या काळात स्त्री चे अस्तित्वच पुरुषांवर अवलंबुन होते त्या काळातील ही शास्त्रे, परंपरा आहेत. तो काळ सोडून आज आपण बरेच पुढे निघून आलो आहोत. पुढे निघून येताना आपण विधवा स्त्रियांच्या बाबतीत बरेच उदारमतवादी होत केशवपन, सती, विधवा पुनर्विवाह ह्या सारख्या अनेक प्रथा बदलल्या. त्या वेळीही आपण आपल्या शास्त्रात बदल केलेच की. परंतु विधवा स्त्रियांचा आपल्या सामाजिक समारंभातील, विधींमधील सहभाग हा विषय कधीच हाताळला गेला नाही. त्या वेळच्या विधवांच्या समस्यांपेक्षा ही समस्या नक्कीच मोठी नाही. पण अतिशय वेगाने बदलत जाणार्‍या, स्त्री-पुरूष समानतावादी आपल्या जगात, समाजात प्रगतीचे आणखी एक पाऊल उचलण्याची आता गरज आहे.

तसं पाहायला गेलं तर या बाबतीत आपण थोडे-फार जागरूक झाले आहोत. नवीन विचारांच्या स्त्रियाच या बाबतीत पुढाकार घेताना दिसतात. पण तरीही जेव्हा हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात विधवा स्त्रियांना निमंत्रण दिले जाते आणि हळदी-कुंकू, वाण देऊन झाल्यावर त्यांच्याचसमोर आपण कसे हे जुने विचार मानत नाही ह्याची इतर स्त्रियांबरोबर चर्चा केली जाते तेव्हा ह्याच स्त्रियांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यांनी उचललेले पाऊल हे जरी स्वागतार्ह असले तरीही त्यात एक उपकाराची, श्रेष्ठत्वाची भावना दिसून येतेच. तसच बदललेला हा दृष्टिकोन मुख्यत्वे करून फक्त हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमापुरताच मर्यादित असलेला दिसून येतो. काही अपवादात्मक उदाहरणे वगळली तर आजही मंगळागौर, लग्न, डोहाळेजेवण, साखरपुडा आणि इतर महत्वाच्या सोहळ्यांतील ओटी भरण्याच्या विधींमधे कुणी आवर्जून विधवा स्त्री ला सामावून घेतल्याचे दिसत नाही. तेथेही नकळत आपण या सवाष्ण बायकांनाच झुकत माप देतो आणि हा श्रेष्ठ – कनिष्ठ भेदभाव कायम ठेवतो.

ही प्रक्रिया आपण अगदी सहजपणे, नैसर्गिकरीत्या का नाही अंगिकारू शकत? “इतर स्त्रियांप्रमाणे मी देखील एक स्त्री आहे आणि म्हणूनच ह्या सोहळ्यात सहभागी होण्याचा माझा मान आहे” असा विचार जर सर्वच स्त्रियांनी केला आणि त्याला पुरुषांचीही साथ लाभली तरच विधवा स्त्रीचं असं मान्यता मिळणं सहज होईल, स्वाभाविक होईल, त्यात कोणतीही उपकाराची, उदारमतवादाची भावना असणार नाही आणि आपल्या घरातील मुलांना सुद्धा आपण नकळत योग्य विचार आणि दृष्टिकोन देऊन जाऊ.

आजची आपली पुढची किंवा मधली पिढी. म्हणजेच साधारण तिशी ते चाळिशीच्या मधल्या स्त्रिया. करियर करताना, उच्च शिक्षण घेताना जुन्या विचारांना, परंपरांना आपल्या बुद्धीच्या आणि तर्कशास्त्राच्या जोरावर तोलुन पाहणार्‍या पण त्याच वेळी वर्षानुवर्ष घरात आणि समाजात चालत आलेल्या सगळ्या रूढी, परंपराही जवळून पहिल्याने त्यांचाही मनात आदर बाळगणार्‍या स्त्रियांची ही पिढी. त्यांना लग्नसंस्थेबद्दल आदर असतो, विश्वास असतो पण त्यांना मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या ह्या सौभाग्यलक्षणांची आवश्यकता वाटत नाही. जोडीदाराशी मित्रत्वाचं नातं आधी निर्माण करून एकमेकांना समजून घेत लग्न टिकवण्यावर आणि आपलं नातं समृद्ध करण्यावर त्यांचा विश्वास असतो. त्यासाठी कोणतीही सौभाग्यलक्षणं बाळगायची जरूरी नाही असा सरळ विचार ते करतात. पण वर्षानुवर्ष घरात चालत आलेल्या संस्कारांना स्मरून सणासुदीला, पुजेला वगैरे मात्र आवर्जून सगळी सौभाग्यालंकार घालून नटून- सजून तयारही होतात.

आज परदेशात राहणार्‍या कितीतरी मराठी मुली हळदी-कुंकू, डोहाळेजेवण असे सोहळे करतात. पण त्यात आपल्या “सौभाग्या”पेक्षा परक्या देशात एकमेकांना धरून राहून आपली संस्कृती टिकविणे हा हेतू असतो. नवीन पिढी हे असे सोहळे ‘सौभाग्य’, ‘ ‘सवाष्ण’ या संकल्पनांच्या खूप पुढे जाऊन ‘संस्कृती’, ‘संस्कार’ आणि ‘नातेसंबंध’ या संकल्पना जपण्यासाठी करताना दिसते. एखादी स्त्री सवाष्ण आहे ह्यापेक्षा एक चांगली व्यक्ती, एक समजून घेणारी मैत्रीण आपल्या संपर्कात रहावी आणि तिच्याबरोबर आपले नाते आणखी घट्ट व्हावे ह्या विचारांनी तिला अशा सोहळ्यांमध्ये सहभागी केले जाते.

आपली नवीन आणि जुनी पिढी कायम हातात हात घालून पुढे चालत असते. प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत असते. जुनी पिढी नव्या पिढीला अनुभव, परंपरा आणि संस्कारांचा वारसा देत असते आणि नवी पिढी नव्या तंत्रज्ञानाबरोबरच नवे विचार आणि नवा दृष्टिकोन जुन्या पिढीला देते. ह्या देवाणघेवाणीमुळेच भारतीय संस्कृती पाश्चात्य संस्कृती पेक्षा वेगळी ठरते.

आज खरंच वेळ आली आहे जुन्या पिढीने नव्या पिढीचा नवा दृष्टिकोन धारण करण्याची. ‘सवाष्ण’ ह्या संकल्पनेची व्याख्या आणि गरज यांना या नव्या दृष्टीकोनातून तपासून पाहण्याची. कुठेतरी वाचलं होतं, ” समाज हा परिवर्तनशील असतो”. हे परिवर्तन आपणच घडवून आणायचं असतं.

पती आपल्यापासून कायमचा दुरावल्याचं दु:ख खूप मोठं असतं. पण आपल्या जुन्या पिढीतल्या स्त्रियांसाठी तेवढंच मोठं दु:ख असतं  ते पुर्वी बाळगलेल्या सौभाग्यालंकारांना गमावण्याचं , कोणत्याही समारंभात कधीही आपली ओटी भरली न जाण्याचं आणि आपल्यालाही कुणाची ओटी न भरता येण्याचं, एखादा सुंदर गजरा केसात माळता न येण्याचं, नटून-सजुन सुंदर दिसण्याचा हक्क गमावण्याचं…

ही स्त्री आपल्यापैकीच कुणाची आई असु शकते, कुणाची बहीण, कुणाची वहिनी, कुणाची सासू…पण शेवटी ‘आपलं’च माणूस. आजच्या वेगाने धावत असलेल्या जगात जुनाट प्रथा कुरवाळत बसण्यापेक्षा खरी गरज आहे ती ‘आपलं’ माणूस जपण्याची. त्यांना हवं तसं दिसण्याचं, राहण्याचं आणि स्त्रियांच्या आनंदसोहळ्यात पूर्वीप्रमाणे मानाने सहभागी होण्याचं स्वातंत्र्य देण्याची….गरज आहे फक्त आपला दृष्टीकोन बदलण्याची… कारण पुढे टाकलेलं हे एक पाऊल कदाचित पुढच्या अनेक पावलांच्या दृष्टीने एक नवी सुरुवात असू शकेल …नाही का?

4 comments on “‘सवाष्ण’ नावाची गोष्ट

 1. Anonymous
  October 2, 2015

  farach chan vichar

  Like

 2. Ranjita
  September 9, 2016

  khup chan vichar aahe, mala he mazya kahi relatives barobar share karayache aahe, whatsupp varun. Mi karu shakate ka? tumache naav ani blog che naavhi dein shevati chalel ka?

  Liked by 1 person

  • rutusara
   September 9, 2016

   Dhanyawaad !! tumhi nakkich share karu shakta. haa ek vichar mhanun pudhe nyayla ani jastit jasta lokanparyant jayla havach aahe. Thanks. Tumhi whats app var tya page chi link pathavali tar te sopa honar nahi ka?

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on September 26, 2015 by in Traditions and tagged .
%d bloggers like this: