davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )

खिड़कीत एकटीच बसली होती ती. ख़ालून जाणार्‍या वाहनांकडे बघत. अजून खरंच वाटत नव्हतं. आपलं लग्न ठरलंय.

परवाच तर ती भेटली होती त्याला..’सुजय साने’. पहिल्यांदा बघितल्यावर फारसा मनात भरला नव्हता खरा तर तिच्या. पण त्याच्याशी बोलायला लागल्यावर तिचं मत बदलायला लागलं. अरेंज्ड मॅरेज होतं त्यामुळे अर्थात शिक्षण, करियर , पगार हे सगळं तिच्या अपेक्षांशी मॅच होणारच होतं. म्हणजे स्थळं शॉर्टलिस्ट करताना तिच्या बाबांनी तशीच स्थळं निवडली होती. तिच्या प्रमाणेच तो सुद्धा एका मल्टिनॅशनल कंपनी मधे कामाला होता, ऑल इंडिया हेड – मार्केटिंग डिवीजन. त्याचे आई वडील दोघेही उच्च शिक्षीत. वडील नुकतेच एका खाजगी कंपनीतून उच्च पदावरून निवृत्त झालेले आणि आई उच्च शिक्षीत असूनही गृहिणी. काही वर्षे ती कॉलेज मधे प्राध्यापक म्हणून काम करत होती पण नंतर तिने नोकरी सोडून घरीच ट्युशन्स घ्यायला सुरूवात केली आणि आज तिच्याकडे १० वी ते १२ वी  मधले जवळपास तीस विद्यार्थी शिकायला येत होते. एक धाकटी बहीण. ती इंजिनियरिंग साठी नाशिक ला होती. मुंबई मधे जुहु सारख्या ठिकाणी ३ बेडरूम्स चा फ्लॅट होता त्याचा.

त्याच्या घराबद्दल आणि घरातल्यांबद्दल ऐकताना तिचं मत हळूहळू अनुकूल होत गेलं. घरची पार्श्वभूमी तर चांगलीच होती. त्याच्याशी जसजसं ती बोलत गेली तसतसा त्याचा स्वभावही उलगडत गेला हळूहळू. खूप मनमोकळा वाटला तो, म्हणजे कुणाशीही पटकन मैत्री करू शकेल असा आणि पुढे जाऊन बायकोला समानतेने वागवेल असा..सीसीडी मधे त्याला भेटून आल्यावर ती विचारात गढून गेली..

रविवार दुपार होती त्यामुळे तिचे आई, बाबा आणि भाऊ सगळेच आराम करण्याच्या मूड मधे होते. त्याने सीसीडी मधून बाहेर पडताच सांगून टाकलं होतं…

“सो, होपिंग टू मीट यू अगेन सायली. लेट मी बी व्हेरी फ्रँक. मला तू बघितल्यावरच आवडली होतीस. पण आता तुला ठरवायचं आहे…तुला डिसीजन घेण्यासाठी मला परत भेटायचं असेल तर मी नक्की तयार आहे. पण माझ्या बाजूने तरी निर्णय झालाय. सो जस्ट लेट मी नो युवर डिसीजन. अँड टेक युवर टाइम. “

त्याचा होकार तिने मुद्दामच घरी सांगितला नाही नाहीतर त्यांनी तिच्या मागे भुणभुण लावली असती होकार देण्यासाठी. आणि आता सगळे आराम करत होते त्यामुळे तिला विचार करायला वेळ मिळाला. सुजयचं फेसबुक प्रोफाइल तिने त्याला भेटायला जाण्या आधीच बघितलं होतं, पण आता तिने ते परत बघायचं ठरवलं. त्याचे फेसबुक मधले फोटोज, वीडियो, मित्रांचे मेसेजेस बघून त्याने सांगितलेल्या बर्‍याच गोष्टींचे संदर्भ लागत होते, त्याचं प्रवासाचं वेड, फोटोग्राफीचं वेड सगळं दिसून येत होतं…

संध्याकाळी चहाच्या वेळेपर्यंत तिचाही निर्णय झालेला होता.

पुढचं सगळं खूपच पटापट झालं. त्याच दिवशी रात्री तिच्या घरून सुजयच्या घरी होकार कळवला गेला. मग लगेच दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सुजयच्या घरी दोघाच्या घरच्यांनी भेटायचं ठरलं. तसे दोन्ही घरचे या निर्णयाच्या विरुद्ध जाण्याची शक्यताच नव्हती. पण अरेंज्ड मॅरेज मधली ही एक महत्वाची पायरी असल्याने आणि पुढे दोघांच्या नातेवाईकांना कळविण्यासाठी एक ठाम निर्णय आणि पुढचं सगळं काही ठरलेलं चांगलं म्हणून अर्थात ही भेट आवश्यकच होती. सायलीला ऑफीस मधून संध्याकाळी येणं शक्य होतं आणि सुजय तर अर्ध्या दिवसासाठी ऑफीस मधे जाऊन मग ‘वर्क फ्रॉम होम’ करणार होता.

ही भेटही छानच झाली आणि सायली-सुजय ने घेतलेल्या निर्णयाला घरच्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. १५ दिवसांनी त्यांचा साखरपुडा ठरला तर ६ महिन्यांनंतर लग्न.
——————————————–
खूप अंधार होता आजूबाजूला. सायली एकटीच रस्त्यावरून चालली होती. रस्त्यावर दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नव्हतं. मागे वळून बघितलं तर मागेही काहीच दिसत नव्हतं. वार्‍याने होणारी पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. अचानक सायली थांबली.

“आपण हे कुठे आहोत? कुठे चाललो आहोत? आपण तर ऑफीस मधून घरी जायला निघालो होतो. ह्या रस्त्यावर कसे आलो? आणि…आणि हो…बरोबर…गीता होती बरोबर ऑफीस मधून निघालो तेव्हा…ती कुठे गेली?”

हवा अचानक खूप थंड झाली होती. अंग शहारत होतं. मुंबईतल्या उन्हाळ्यात एकदम एवढी थंडी कशी पडली? एक विचित्र शांतता होती आजूबाजूला.. आपल्याला काहीच कसं आठवत नाही या विचाराने ती कासावीस झाली. अचानक तिच्या लक्षात आलं, आपण फोन करू शकतो….घरी किंवा भावाला किंवा मग सुजय ला तरी…असा विचार करतच तिने पर्स मधे हात घातला. मोबाइल कुठे आहे? पर्स होती तिच्याकडे पण ती पूर्णपणे रिकामी होती..काहीही नव्हतं त्यात..आता मात्र ती पुरती घाबरली..घामघूम झाली…

“.हे काय होत आहे? ही कुठली भयानक जागा आहे? मला काहीच कसं आठवत नाही? आता मी काय करू?”

तिला रडू फुटलं आता…तशीच घाबरत घाबरत ती पुढे चालायला लागली. पुढे कदाचित काहीतरी दिसेल, एखादं घर, एखादं दुकान, बस स्टॉप वगैरे..काहीतरी दिसेल, कुणीतरी भेटेल..पण रस्ता दूरदूर पर्यंत अगदी शांत होता. रस्त्यावर तर एकही दिवा दिसत नाही मग तर पूर्ण अंधार असायला हवा..पण सायलीला समोरचा रस्ता दिसत होता..मागे बघितल्यावर मागचाही रस्ता दिसत होता..अंधारात मला कसं काय दिसतंय? सगळे प्रश्नच प्रश्न…असं किती वेळ चालायचं?

इतक्यात बाजूची पाने सळसळली…..इतक्या मोठ्याने आवाज आला त्यांचा की सायली घाबरून ओरडायचीच बाकी होती..पण वार्‍याची एक मोठी थंडगार झुळुक नुसती चेहर्‍यावर आली. त्यामुळे सायलीने डोळे मिटून घेतले आणि अगदी २ सेकंदात सगळं परत पूर्ववत झालं. पुन्हा तीच शांतता. डोळे परत उघडता उघडता सायलीने बघितलं की बाजूची गर्द झाडी जिथून ती वार्‍याची झुळुक आली होती ती हळूहळू हलायची थांबत होती. खालचे बुंधे आता हलत नव्हते पण पाने हळूहळू हलत पूर्ववत होत होती…पण …पण…त्या पानांच्या मागे काहीतरी होतं..काय? काय होतं तिकडे? कुणीतरी तिकडे उभं राहून आपल्याकडे बघत आहे अशी तीव्र जाणीव तिला झाली…कोण असेल? माणूस की जनावर?…घाबरून ती अक्षरश: पळत सुटली..दोन मिनिटे धावून झाली आणि ती थांबली…

मागे खरंच कोणी आहे का? धीर करून तिने मागे वळून बघितल…पुन्हा एकदा तशीच मोठी गार वार्‍याची झुळुक तिच्या अंगावरून गेली. तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. परत तशीच शांतता. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली. थोडं शांत झाल्यावर तिने विचार केला, “आपण उगीच तिथून धावत पुढे आलो. तिथे झाडीमागे खरंच कुणी माणूस उभं असेल तर? निदान विचारता तरी येईल ना की आपण आत्ता कुठे आहोत, घरी कसं जायचं वगैरे”..असा विचार आल्यावर तिला जरा आशा वाटू लागली. ती परत मागे फिरली आणि आधी जिथे वार्‍याची झुळुक आली होती त्या जागेपाशी आली. हृदयातली धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. एवढ्या थंडीमधेही ती घामाने पूर्ण भिजली होती. त्या झुडुपापाशी येऊन तिने सगळा धीर एकवटून हाताने त्याची पाने बाजूला सारली.

मागे काहीच नव्हतं.
तेवढ्यात झझझझझझझ……लख्ख प्रकाशाचा झोत तिच्या डोळ्यांवर पडला. तिने डोळ्यांवर हात ठेवला…..
————————————–

“ताई, ए ताई , अगं उठ ना आता…काय झालं? स्वप्न पडलं का? अशी काय घाबरलेली दिसतेयस? कधी पासून तुझी उठायची वाट बघतोय आम्ही मॅडम..ही काय वेळ आहे का झोपायची? बघ जरा..८.३० वाजलेत रात्रीचे. मी असं केलं तर मला फाडून खाल तुम्ही सगळे..पण तुझं काय बाबा आता लग्न ठरलंय ना? काय पण लाड…आई म्हणाली झोपुदे जरा वेळ…दमली असेल..लाइट लावू नको नाहीतर जागी होईल ती…मज्जा आहे बाबा..पण तू उठल्याशिवाय जेवायला नाही मिळणार ना…आणि मला खूप भूक लागलीये हा. म्हणून मी लाईटच लावले..मला माहीत आहे कितीही गाढ झोपलेली असलीस तरी लाइट लावले की तू लगेच उठून बसणार…चल आता….लवकर ये..सुजयला सांगायला पाहिजे आमची ताई अशी कुठल्याही वेळेला झोपते. सांभाळून घ्या हा….”

शेवटच्या वाक्यावर स्वत:वरच खुश होत अनिकेत जोरात हसला. सायलीने आपली उशी त्याला फेकून मारली…

“गप्प बस रे ..किती बडबड करतोयस…जा आईला पानं घायला मदत कर. मी आलेच…”

अनि गेल्यावर सायली तशीच बसून होती..हे काय स्वप्न पडलं मला? असं विचित्र? किती भयानक होतं ..पुन्हा स्वप्नातला तो सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून गेला. मग तिला आठवलं आज ऑफीस मधून आल्यावर चहा घेता घेता ती खिडकीत बसून लग्न ठरल्याचा विचार करत होती..मग कधीतरी डोकं जड झालं म्हणून आई ला सांगून १५ मिनिटं पडायला म्हणून गेली ती जवळपास दीड तास झोपलेली होती. आणि ते स्वप्न पडलं …
“आई पण ना. काय झालं १५ मिनिटांनी उठवायला मला? अस काहीतरी स्वप्न तरी पडलं नसतं. ” असा विचार करत ती बाथरूम मधे शिरली…थंड पाणी चेहर्‍यावर मारल्यावर तिला जरा बरं वाटलं. सुजयचा विचार तिच्या मनात आला. आज ऑफीस मधे गीताला लग्न ठरल्याचं सांगितल्यावर ती चिडवत होती,

“काय मग आज काय फुल्ल २ व्हॉटस अप मेसेजेस आणि कॉल्स चालू असतील ना? ए, काल मग लग्न ठरल्यावर रात्री त्याचा फोन आलाच असेल ना?”

पण खरं तर काल रात्री आणि आजही दिवसभरात त्याचा फोन, मेसेज काहीच आलं नव्हतं. “जाऊदे, जेवण झाल्यावर मीच करते त्याला फोन. कदाचित दिवसभरात मीटिंग्ज असतील त्याला. वेळ नसेल मिळाला.”
जेवण झाल्यावर सायलीने सुजयला फोन लावला. उगीचच धडधडल्यासारखं होत होतं तिला. परवाच तर एकदूम बिनधास्तपणे भेटायला गेलो होतो की त्याला. त्यानंतर त्याच्या घरीही भेटलो. पण तेव्हा असं उगीचच लाजल्यासारखं झालं नाही. मग आजच का एवढी हूरहुर लागली आहे? नुसतं लग्न ठरलं कि एवढं बदलतं का सगळं ?रोज असा कोणाचाही फोन येत नाही, मग आजच त्याचा फोन आला नाही तर मी एवढी अस्वस्थ का होतेय? त्याच्या फोनची मला एवढी सवय थोडीच आहे की आज फोन नाही आला तर त्याचा एवढा राग यावा? पण त्याच वेळी आपण केला तर काय बिघडलं असंही वाटावं? तिला स्वत:ची आणि स्वत:च्या बदललेल्या पवित्र्याची गंमत वाटली. आधी फोन ची , मेसेज ची वाट बघणं, मग त्याचा राग येणं, मग तो कदाचित बिझी असेल म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं, आणि मग जाउदेत मीच फोन करते अस घायकुतीला येऊन स्वतःच त्याला फोन लावणं…आपण आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वागतोय, हे तिच्या लक्षात आलं..

आजच ऑफीस मधे तिला रिपोर्ट करणार्‍या सिद्धार्थला त्याने वेळेत मेल करून आपल्याला लास्ट इयर च्या मॅन्यूफॅक्चरिंग आणि सेल्स ओवरहेड्स चा डेटा दिला नाही म्हणून चांगलंच सुनावलं होतं. तिच्या अपेक्षेप्रमाणे किंवा तिने गृहीत धरलेल्या वेळेत समोरच्या माणसाने एखादी गोष्ट केली नाही की तिची खूप चिडचिड व्हायची. सिद्धार्थ बिझी असेल म्हणून त्याने डेटा उशिरा दिला असेल असं आपण त्याला नाही समजून घेतलं, किवा जाउदेत आपणच फोन करून त्याला डेटा बद्दल आठवण करून द्यावी असंही नाही वाटलं आपल्याला. खरं म्हणजे त्याच्यावर एवढं रागवायची काहीच गरज नव्हती. तो डेटा खरंच २ दिवसांनी मिळाला असता तरी नक्कीच चालणार होतं. मागची चार वर्ष आपण एकत्र काम करतोय सिद्धार्थबरोबर. तो त्याच्या कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण सायलीने त्याला सुनावण्यामागे आणखी एक कारण होतं. तिला अंदाज  होता की सिद्धार्थला आपण आवडतो. गीतानेही तसं संगितलं होतं तिला. आणि मग आपल्याही मनात त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असा त्याचा उगीच गैरसमज होऊ नये म्हणून सायलीने असं वागायला सुरूवात केली. मित्र म्हणून, कलीग म्हणून तो खरंच खूप चांगला होता. पण त्याच्या मनातल्या तिच्याविषयीच्या भावना समजल्यावर तो समोर आल्यावर तिला उगीचच अवघडल्यासारखं वाटायला लागायचं. आता आपलं लग्न ठरल्याचं त्याला कळेल आणि मग नकळतच हा गुंता सुटेल आणि त्याच्याशी आपण पूर्वीसारखं वागू शकू, हा विचार मनात आल्यावर तिला जरा बरं वाटलं.

“द नंबर यू आर कॉलिंग इज करेंट्ली स्विच्ड ऑफ”….फोन वरच्या मेसेज मुळे सायली आपल्या विचार चक्रातुन बाहेर आली. सुजयचा फोन बंद होता. कदाचित बॅटरी गेली असेल. मग तिने त्याचा घरचा नंबर डायल केला. त्याची आई होती फोन वर. त्यांच्याशी हाय, हॅलो करून झाल्यावर तिने सुजयला फोन देता का म्हणून विचारलं. त्यावर त्या तिला चिडवत म्हणाल्या ,

“तरीच मी म्हटलं सुजय घरी नसताना तू आमच्याशी बोलायला फोन कसा बरं केलास? अग, तो बोलला नाही का तुला? आज दुपारीच ऑफीस च्या कामासाठी त्याला अचानक दिल्लीला जावं लागलं. त्यांच हेड-ऑफीस आहे ना तिथे. मधे मधे जावं लागतं त्याला. पण असं अचानक ..? बरं ह्याने तरी विचार करायला नको का, की माझा साखरपुडा आहे पंधरा दिवसांनी. त्याची तयारी, खरेदी करायची आहे, तर ह्या वेळी दुसर्‍या कोणाला तरी पाठवू. आता हा गेला की ४ दिवसांनतर येणार. म्हणजे त्याची खरेदी, त्याच्या पाहुण्यांची यादी, मेन्यु, फोटो आणि वीडियो शूटिंग हे सगळं तो आल्यावर ठरवता येणार. उगीच दिवस वाया जातात गं, आणि मग ऐन वेळेला घाई होते. पण मुलांना एवढा पुढचा विचार कधी करताच येत नाही बघ. लग्न झाल्यावर तूच बदल त्याच्या सवयी आता. आम्ही तर हात टेकले बाई.”

सुजयच्या आईचं बोलणं संपता संपत नव्हतं.

१० मिनिटांनी फोन ठेवल्यावर सायलीने विचार केला ,

“असा काय हा? त्याला मला साधा एक मेसेज करून काळवावसं पण नाही वाटलं का? मला त्याच्याशी बोलायची ओढ वाटली तशी त्याला नाही वाटली का? आणि फोन स्विच्ड ऑफ? त्याची आई म्हणाली की तो दुपारी गेलाय म्हणजे २ तासात पोहोचला असणार. म्हणजे फ्लाइट मधे आहे म्हणून फोन बंद आहे अशी तर शक्यताच नाही. मग फोन बंद का ठेवलाय त्याने? की खरंच बॅटरी गेली असेल फोनची? आपण असा त्याच्या बाजूने सारखा विचार का करतोय? आई म्हणते ना, वेळ काढायचा असेल की कसाही काढता येतो. आणि मोबाइल बंद असला तरी दुसर्‍या कोणत्याही फोन वरुन तो फोन करू शकतोच ना?” ती हिरमुसली. “गीताचं सुद्धा आत्ताच २ महिन्यांपुर्वीच लग्न झालं आहे. त्याच्या आधी ४ महिने तीचं लग्न ठरलं आणि त्यानंतर ती सतत फोन वरच दिसायची. कधी मेसेज, कधी कॉल्स, ब्रेक मधे आपण बोलायला गेलो की ही आपली तिच्याच जगात असायची. लग्न ठरल्यावर पहिल्याच दिवशी आम्ही दोघं रात्री २ वाजेपर्यंत फोन वर गप्पा मारत होतो. फोन ठेवावासाच वाटत नव्हता. असं म्हणाली होती गीता. त्यानंतर रोज सांगायची काल आम्ही इतक्या इतक्या वाजेपर्यंत बोलत होतो वगैरे. शुक्रवारी संध्याकाळी तर ती ऑफीस अवर्स संपण्यचीच वाट बघायची आणि मग ते फिरायला जायचे, मूवी ला जायचे, डिनर ला जायचे. आणि प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी तो तिला काहीतरी छानसं गिफ्ट द्यायचा.”

ही एकत्र फिरण्याची, बोलण्याची, एकमेकांबरोबर पुढचं आयुष्य प्लॅन करण्याची ओढ किती मस्त असते. असंच काहीसं तिच्या बाकीच्या लग्न झालेल्या आणि लग्न ठरलेल्या मैत्रीणीही सांगायच्या. सायलीचं सुद्धा असंच झालं होतं. त्याच्याशी बोलायची, त्याला जाणून घायची, आपल्याबद्दल त्याला सांगायची आतून ओढ वाटत होती. पण त्याच्या अशा निरस वागण्यामुळे ती गोंधळून गेली होती.

“काय करत असेल तो आत्ता? माझ्याबद्दल विचार करत असेल का?”

विचारांच्या तन्द्रितच तिने लॅपटॉप उघडला. झोपण्याच्या आधी १५-२० मिनिटं तिच्या कॉलेज मधल्या सगळ्या मैत्रिणी चॅटिंगसाठी ऑनलाइन येत. त्यांचे दिवसही ठरलेले होते. मंगळवार आणि शुक्रवार. रात्री १०.३० ची वेळही ठरलेली होती. आपापल्या बिझी रुटीन मधून वेळ काढून एकमेकींशी संपर्कात राहण्याचा हाच सोप्पा उपाय होता. तिने स्काईप वर लॉग इन केलं. तिला ५ मिनिटं उशिरच झाला होता खरं तर. मग सगळ्या मैत्रिणिंची बडबड सुरू झाली. सायली खरं तर आज सगळ्यांना सांगणार होती लग्न ठरल्याचं. आपण हे सांगितल्यावर कोण कोण काय काय म्हणेल आणि सुजयचा फोटो दाखवण्यासाठी सगळ्याजणी कशा मागे लागतील हे सगळं सायलीला माहीत होतं. पण का, कोण जाणे तिला इच्छाच झाली नाही हे मैत्रिणींना सांगण्याची. बोलता बोलता सहज ब्राऊझर उघडून तिने फेसबुक वर लॉग इन केलं. उजव्या बाजूला ऑनलाइन फ्रेण्ड्स च्या लिस्ट मधे सुजयही होता. म्हणजे सुजय आत्ता ऑनलाइन होता? सायली खुश झाली. त्याच्यावरचा राग विसरून तिने त्याला मेसेज केला “हाय, आर यु देयर?” पण पुढच्याच क्षणाला तिची भयंकर निराशा झाली कारण तिचा मेसेज गेल्या गेल्या त्याने साइन आउट केलं होतं.

” हे काय आहे? हा जाणून-बुजून मला अव्होईड करतोय का? “

” चला बाय, बाय, बाय, बाय…..” सगळ्याजणी जोरात ओरडल्या तसं सायलिनेसुद्धा बाय म्हणून लॅपटॉप बंद केला.

थोडीशी अस्वस्थच होत ती झोपायला गेली. ‘उद्या तरी त्याच्याशी बोलणं होईल का?’ मनात उलट सुलट विचार येत असतानाच तिचा डोळा लागला. पण ती गाढ झोपली नव्हती. अर्धवट झोपेत असतानाच तिला अचानक संध्याकाळी पडलेलं ते स्वप्न आठवलं. ती झुडुपामागे कोण होतं ते पाहायला तिकडे गेली आणि तिने हाताने त्या झुडूपाची पाने बाजूला सारली. मागे कोणीच नव्हतं. तेवढ्यात प्रकाशाचा एक लख्ख झोत तिच्या डोळ्यांवर पडला. तिने आपले हात डोळ्यांवर ठेवले……..आणि मग ती जागी झाली होती. आता तिला आठवलं, हात डोळ्यांवर घेताना आपण त्या झुडूपाची बाजूला केलेली पाने हळूहळू एकत्र येत होती आणि राहिलेल्या त्या छोट्याश्या फटीतून कुणाचा तरी चेहरा अर्धवट तोही पुसटसाच दिसला होता. पण तेवद्यात ती जागी झाली होती आणि त्यामुळे अगदी शेवटी दिसलेली ही गोष्ट तिच्या तेव्हा लक्षात आली नाही. कोण? कोण होतं तिकडे? नीट दिसलं नव्हतं तरीही नुसता तो विचार केल्यावरही तिला जाणवत होतं की ते जे कुणी होतं ते तिच्याकडे रोखून बघत होतं. हा विचार मनात येताच तिचा नुसता थरकाप उडाला. तिने डोळे मिटलेले होते.

“डोळे उघडू का मी? अंधारात माझ्या शेजारी कुणी उभं असेल तर?”

कधी नव्हे ते तिला एकटेपणाची भीती वाटली. ‘हे स्वप्नातलं का आठवतंय मला सारखं?’ तिला झोपही येईना आणि एकटेपणाची भीती पण जाईना. मग तिला आठवलं अनिकेत कधी कधी जागून अभ्यास करत असतो. तोही इंजिनियरिंगलाच होता. बरेचदा प्रॉजेक्ट सबमिशनच्या वेळेला तो रात्री उशिरा पर्यंत जागून त्याचं काम करत असायचा.

“आजही जागा असेल का तो? त्याच्याच खोलीत जाऊन बसू का जरा वेळ?”

तिने धीर करून डोळे उघडले. खोलीत कुणीच नव्हतं. तिने सगळीकडे नजर फिरवली. तीचं ड्रेसिंग टेबल, त्याला लागून असलेल तीचं कॉंप्यूटर टेबल. आणि त्याच्या शेजारची अर्धवट उघडी खिडकी. खिडकीच्या दुसर्‍या बाजूला असलेलं तीचं बुक शेल्फ आणि वॉर्डरोब. आणि त्याच्या बाजूने तिच्या खोलीचा दरवाजा…..तोच ती चमकली….तिची नजर भराभर मागे फिरली….खिडकी? अर्धवट उघडलेली?

“कसं शक्य आहे? झोपायच्या आधी आपण लावली होती की ती खिडकी…रोजच लावतो. आज नक्की लावली ना पण?”

तिला नीट काही आठवेचना.

“आपण आज इतके विचारात होतो की कदाचित विसरलो असू. आणि जर लावली असती तर मग आपोआप खिडकी उघडेलच कशी?”

शेवटचा विचार मनात येताच ती पुन्हा घाबरली. पुन्हा ते स्वप्न आठवलं, तो चेहरा, ती थंड वार्‍याची झुळुक, ती शांतता, तो निर्जन रस्ता..तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. ती तशीच भराभर तिच्या खोलीच्या बाहेर पडली. आता एक क्षणही तिला तिच्या खोलीत राहायच नव्हतं. अनि ची खोली तिच्या खोलीला लागूनच होती. तिने हळूच त्याच्या खोलीचं दार उघडलं. आत अंधार होता.

“अनि झोपलाय वाटतं. आता काय करू?” ती तशीच विचार करत उभी राहिली.”आई-बाबा पण झोपलेले दिसतायत.”

तोच तिला मागे कुणाची तरी चाहूल लागली. कुणीतरी होतं तिच्या मागे. एक हळूच विचित्र असा आवाज आला आणि तेवढ्यात एक थंड हवेचा झोत तिच्या मानेवर आला. ती भीतीने अर्धमेली झाली. अनिला हाक मारायला पाहिजे. पण तिच्या तोंडून शब्दच फुटेना. धीर करून ती मागे वळली. तिकडे अंधारात….
(क्रमशः)

<<  भाग -२ येथे वाचा >>  http://wp.me/p6JiYc-2t

3 comments on “अज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )

 1. j33tradha
  November 8, 2015

  Hi.. Keep up the good work.. I am new to WordPress and started following your work.. Also I was wondering how do you write in Marathi? I mean I tried using the Marathi keypad but its confusing.. Me pan prayatna karat aahe Marathi literature explore karaycha 🙂

  Like

  • rutusara
   November 8, 2015

   Hi, Thanks for liking my writing and following my blog. I use http://marathi.indiatyping.com/ for marathi typing. There are a few other sites for marathi typing, u can just google it and check. All the best ..:)

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on October 23, 2015 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: