अज्ञाताची चाहूल (भाग : 4)

तिने पुन्हा ईशाला हाक मारली तिच्या खोलीचं दार उघडच होतं. मोबाईल चा लाईट ही चालू होता. सायली तिच्या खोलीत शिरली.

इशा, अगं आहेस का…” पण काहीच प्रत्युत्तर नव्हतं.

तेवढ्यात मोबाईल च्या प्रकाशात काहीतरी दिसलंसायली भीतीने दारातच खिळून राहिली……

ईशा समोरच तिच्या बेडवर बसली होती..पाठमोरी

मी इतक्या हाका मारतेय तरी ही उत्तर का देत नाहीये? आणि अशी अंधारात काय करतेय?”

सायली हळूहळू तिच्या दिशेने पुढे जाताना विचार करत होती

————-(भाग ३ पासून पुढे )——————-

(भाग ३ येथे वाचा –  http://wp.me/p6JiYc-2w)

 

“अरे ह्या दोघी करतायत तरी काय इतका वेळ? अंधारात लपाछपी खेळतायत वाटतं….” अनि.

“खरंच रे, जेवणाची तयारी झालीये. तिच्या मैत्रिणी जेवून परत जाणार आहेत. किती उशीर करायचा? जा रे, जरा जाऊन बघ तरी….” आई.

अनि टॉर्च घेऊन आत वळला.

“ताई, कुठे आहेस?” त्याने अंधारात हाक मारली.

“अनि, इकडे ये जरा, माझ्या खोलीत” सायलीचा आवाज.

“हीचा आवाज असा जड का येतोय? घाबरलीये का? काहीतरी झालंय नक्की…”

अनि जवळजवळ धावतच सायलीच्या खोलीत शिरला.
बेडवर ईशा पाठमोरी बसली होती. सायली कुठेच दिसत नव्हती.

“ईशा?..काय करतेयस इकडे?”

अनि तिच्या दिशेने जायला वळला तेवढ्यात त्याच्या खांद्यावर त्याला एक स्पर्श जाणवला.

“ताई? काय यार भुतासारखी अंधारातून पुढे येतेस? घाबरलो ना एकदम. ईशा अशी काय बसलीये?”

अनि मागे वळता वळताच बोलत होता. पण मागे कोणीच नव्हतं. पुन्हा त्याच्या खांद्यावर तो तसाच स्पर्श झाला. या वेळी त्याने मागे वळण्याऐवजी स्वतःचा हात खांद्यावर ठेवला. काहीतरी थंडगार लागत होतं.
तो पुन्हा वळला आणि बघतो तर….मगाशी पाठमोरी बसलेली ईशा आता तिथे नव्हतीच.

“काहीतरी विचित्र आहे इकडे. हाक मारुया का सगळ्यांना…?”

तो हाक मारणार तेवढ्यात त्याच्या सुदैवाने लाईट्स आले. त्याचा अर्धा जीव भांड्यात पडला. तेवढ्यात त्याला समोर पडद्यामागे काहीतरी हालचाल जाणवली. मग मात्र त्याने काय झालं ते ओळखलं.

“ए चला, बाहेर या लवकर…मला कळलंय माझी खेचत होतात ना तुम्ही… बाहेर या मग बघतो दोघींना…”

त्याचा घाबरलेला आवाज एकदम वैतागल्यासारखा व्हायला लागला. पडद्यामागून ईशा आणि सायली जोरजोरात हसत बाहेर आल्या.

“अरे यार नेमके लाईट्स आत्ताच आले, आपला पुढचा प्लॅन तर अजून सॉलिड होता यार, तेवढतरी  करायला मिळालं असतं तर धमाल आली असती.” ईशा

“अरे काय? बहिणी आहात का हडळी? माझं हार्ट-फेल वगैरे झालं असतं म्हणजे? ” अनि अजूनही वैतागलेलाच होता.

“सॉरी, सॉरी…मी मगाशी आत आले ना तेव्हाच आमचा प्लॅन झाला की आपल्याला शोधायला जो कोणी पहिले आत येईल त्याला बकरा बनवायचं…अर्थात तूच येण्याचे चान्सेस जास्त होते त्यामुळे जरा जास्त भारी प्लॅन बनवला, लाडक्या भावासाठी खास…”

सायली त्याचे गाल ओढायला पुढे गेली तर तो तिचा हात झटकून निघून गेला.

“चिडला…आता जाऊन भाऊरायांना मनवायला पाहिजे. ए, मला कसंतरीच होतंय गं, उगीच असली मस्करी केली.”सायली.

“तू त्याच्या जागी असतीस तर तुलापण राग आलाच असता ना? आपण समजावू त्याला, डोन्ट वरी” ईशा.

“हो गं पण जरा अतीच झालं, उगीच ऐकलं तुझं. मघाचची तुझी स्टोरी तरी खरी होती का, की मलाही बनवत होतीस?” सायली.

“हे बघ, बनवायचं असतं तर मी स्टोरी सांगून झाल्यावरच तुला सांगून नसतं का टाकलं खरं? ज्याला बनवलंय, त्याला आपण बनवले गेलोय हे कळल्याशिवाय मजा असते काय, सांग बरं. आय नो, मी नेहेमी टाईमपास करत असते म्हणून तू विश्वास नाही ठेवणार माझ्यावर कदाचित… पण तेच खरं होतं. मला दिसलं की भास झाला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा आठवून बघितलं तरी मला जसंच्या तसं सगळं आठवतंय. भास झाला तर आपण तो भास किती वेळ लक्षात ठेवू शकतो, किती वेळ तसंच्या तसं सगळं आठवतं आपल्याला? पण हीच जर एखादी गोष्टं आपण खरीच बघितलेली असेल तर मात्र आपण ती बराच काळ लक्षात ठेवू शकतो असं मला वाटतं…जाऊदे, नको बोलूया यार त्याबद्दल आपण. मला कसंतरीच होतं. भीती पण वाटते आणि घुसमटल्यासारखं पण होतं. ..” ईशा.

सायली तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती. मघाची अनि ची गंमत करणारी ईशा, आत्ता बोलत असलेली ईशा, आणि मगाशी आपण खोलीत आल्यावर दिसलेली ईशा ह्यात काहीच साम्य नव्हतं. ती नक्कीच खोटं बोलत नाहीये.

“हो जाऊदेत, चल जेवायला जाऊ आपण…”

जेवणं झाल्यावर सायलीच्या मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या. खरं तर सगळेच त्यांना राहण्याचा आग्रह करत होते पण काहीजणींना शनिवारची सुट्टी नव्हती. ईशा आणि निशा अर्थात सायलीच्या खोलीत झोपणार होत्या.

 

दोघींमध्ये निशा मोठी होती आणि सायलीपेक्षा सहा महिन्यांनीच मोठी होती. तिचंही लग्न ठरलेलं होतं. खरं तर तिचं तिनेच ठरवलेलं होतं. आशय आणि ती पुण्याला एकाच ऑफिस मध्ये जॉब करत होते, तिथेच त्याचं जुळलं. दोन्ही घरातल्यांनाही सगळं पसंत पडलं आणि त्यांचा साखरपुडाही झाला. त्यानंतर आशयला कंपनीतर्फे एक वर्षासाठी युएसला जाण्याची संधी मिळाली. तो परत आल्यावरच लग्न करूया असा निशाचाच हट्ट होता. त्याला युएस ला जाऊन आताशी एकच महिना झाला होता त्यामुळे लग्नाची धावपळ एवढ्यात नव्हती.

 

ईशा निशापेक्षा ३ वर्षांनी लहान होती. आठ महिन्यांपूर्वीच एका मोठ्या कंपनीत मॅनेजमेण्ट ट्रेनी म्हणून लागली होती. वयाने निशाच्या जास्त जवळ असूनही सायलीचं ईशा बरोबर जास्त जमायचं. निशा समजूतदार, काहीशी अबोल, आपलं काम बरं आणि आपण बरं अशी होती आणि ईशा मात्र अगदी तिच्या विरुद्ध. बडबडी, समोरच्या अबोल माणसालाही घडाघडा बोलायला लावेल अशी, प्रचंड आत्मविश्वास असलेली. निशावर तर तिचा जीव होताच पण सायलीबरोबर जिवाभावाची मैत्री होती तिची. दर पंधरा दिवसांनी ती खास सायलीला भेटण्यासाठी पुण्याहून मुंबईला यायची. शनिवारी रात्री येउन रविवारी रात्री परत जायची. शनिवार रात्र दोघीजणी गप्पा मारत अक्षरशः जागवून काढायच्या. आईच्या “काय एवढं बोलत असता तुम्ही” ह्यावर दोघींकडे कधीच उत्तर नसायचं कारण त्या कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकायच्या, सगळं काही एकमेकींशी शेअर करू शकायच्या.

 

आजही दोघींचं रात्री २ वाजेपर्यंत कुजबुजत बोलणं चालूच होतं. पण तेवढ्यात निशा कुरकुरली,

“काय गं चाललंय तुमचं..किती आवाज येतोय…झोपा ना प्लीज…मला आवाजाने जाग येते…”

दोघीजणी शांत झाल्या.

“काय यार निशा बोअरिंग आहे, …जाऊदेत चल झोपूया..ह्या मॅडम आपल्याला गप्पा मारू नाही देणार…” ईशा.

“हो, चल, गुड नाईट..” सायली.

सायली दुसऱ्या कुशीवर वळली. तिला खरं तर झोपच येत नव्हती. खूप अस्वस्थ वाटत होतं तिला. अनिकेतला कसं-बसं समजावलं होतं तिने. तरीही तो थोडासा नाराजच होता. त्यामुळेही तिला थोडं अपराध्यासारखं वाटत होतंच. पण तिच्या अस्वस्थ वाटण्यामागचं कारण वेगळं होतं. मगाशी आपण ईशाला शोधायला खोलीत आलो त्यानंतर जे, जे झालं, ते सगळं तिच्या डोळ्यांसमोर यायला लागलं. सगळी चित्रं डोळ्यांसमोर जिवंत व्हायला लागली, थोडी तिनेच पाहिलेली आणि बरीचशी ईशाच्या नजरेतून पाहिलेली…..आता डोळे मिटून ती सगळा प्रसंग पुन्हा पाहत होती…एखादा सिनेमा पाहावा तसा…

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

….ती तिच्या खोलीत आली. मोबाईलच्या प्रकाशात तिला दिसलं कि ईशा तिच्या बेडवर पाठमोरी बसली होती…पण अंधारात काय करत होती ती ? आणि इतक्या हाका मारूनही तिने उत्तर का नाही दिलं? तिच्या दिशेने जाता जाता असे सगळे विचार सायलीच्या मनात येत होते…तिच्या जवळ गेल्यावर सायलीने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

“इशी, ए हॅलो, कुठे हरवलीयेस ?”

तिचं काहीच उत्तर नव्हतं. तिने कुठली हालचालही केली नाही. सायलीला हे खूप विचित्र वाटत होतं. आधीच अंधारामुळे तिच्या सगळ्या नको त्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. तिला मनातून खूप भीती वाटत होती पण ईशा ची काळजीही वाटत होती. धीर करून ती पलंगावर चढली आणि ईशाच्या समोर जाऊन तिने तिच्याकडे पाहीलं. ईशाच्या चेहऱ्याकडे बघताच तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या नजरेत कुठलेच भाव दिसत नव्हते. थोडे केस डोळ्यांवर येत होते ते दूर करण्याचंही तिला भान नव्हतं. ती नजर रोखून एकटक कुठेतरी बघत होती. सायलीने तिच्या नजरेच्या दिशेने बघितलं तर ती समोरच्या खिडकीकडे बघत होती. खिडकी बंद होती. मग ती नक्की कुठे बघत होती? काय बघत होती? सायलीने तिला पुन्हा हाका मारल्या. हात लावला. पण तिला ते काही जाणवतही नसावं, ती तशीच एकटक खिडकीकडे बघत होती. शेवटी न राहवून सायलीने तिला गदागदा हलवायला सुरुवात केली आणि काही क्षणातच ती एकदम सायलीच्या अंगावर कोसळली.

“ईशा, कसं वाटतंय आता..बरं वाटतंय का? काय झालं तुला? थांब मी आईला वगैरे हाक मारते आधी. तू पाणी पी.”

त्यानंतर दोन मिनिटांतच ईशा भानावर आली होती. सायली आईला हाक मारायला म्हणून उठली तेवढ्यात ईशाने तिचा हात पकडला.

“थांब. सगळ्यांना बोलावू नकोस उगीच. मी बरी आहे आता.”

 

“अगं, पण मगाशी तुझं काय झालं होतं ते मी बघितलंय. मी आधी सगळ्यांना बोलावते. डॉक्टरकडे जायचं की नाही ते ठरवू नंतर.”

 

“मी म्हटलं ना मी ठीक आहे. कशाला उगीच?”

 

“ओके, मग मला तरी सगळं सांगावं लागेल तुला. काय झालं होतं तुला ? तू बाथरूम मध्ये होतीस ना ? मग इथे अंधारात येउन काय करत होतीस ?”

ईशा थोडा वेळ थांबली. सगळं सांगावं की नाही ह्याचा विचार करत होती.

“सायली, आय रिअली डोन्ट नो, तू विश्वास ठेवशील की नाही माझ्यावर, पण तरी सांगते. ऐक.”

 

**********     पुढचं वर्णन सायलीच्या नजरेतून        **** *****

ईशा बाथरूम मध्ये गेली आणि पुढच्याच मिनिटाला लाईट्स गेले. ईशा तेव्हा बेसिनपाशी उभी राहून चेहऱ्यावर थंड पाणी मारत होती. लाईट गेले तरी बाथरूम मध्ये पूर्ण अंधार झालाच नव्हता. बाहेरच्या रस्त्यावरचा लाईट चालू असणार तो उजेड आत येत होता .

 

तोंड  धुताना तिचं सहज आरशाकडे लक्ष गेलं तर …..क्षणभर तिच्या पायाखालची जमिनच सरकली.   तिच्या मागे कोणीतरी उभं होतं. हे कोणीतरी म्हणजे ‘ती’ होती एवढं मात्र कळत होतं.   चेहरा दिसत नव्हता. ईशाला आरशात ‘ती’चे लांब पसरलेले केस तेवढे दिसले. ‘ती’चा  जवळजवळ सगळाच  चेहरा केसांनी झाकला गेलेला होता. चेहरा दिसत नव्हता तरी ईशा ला ‘ती’ची रोखून तिच्याकडे पाहणारी नजर जाणवत होती. दुसऱ्याच क्षणी तिने डोळे घट्ट मिटून घेतले. हृदयातली धडधड वाढत चालल्याचं तिला जाणवलं. “हे काय होतंय नक्की? कोण उभं आहे माझ्यामागे ?”क्षणभर तिला वाटलं की अनि किंवा बाकी लोकांपैकी कुणीतरी तिची मस्करी करत असेल. पण दुसऱ्याच क्षणी तिला जाणवलं की ते शक्य नव्हतं कारण बाथरूमचं दार आतून बंद होतं. तिनेच लावून घेतलं होतं ना.

 

धीर करून तिने डोळे उघडले आणि मान वर करून पुन्हा आरशात बघितलं. ‘ती’ होती, आणि ईशाच्या अजून जवळ आलेली होती. आजूबाजूला अंधुकसा उजेड होता. एखाद्याचा चेहरा कदाचित नीट दिसला  नसता पण उभं असलेलं कोणीतरी दिसणार नाही एवढाही अंधार नव्हता.

 

त्याही परिस्थितीत ईशाला स्वतःच्या भीती वाटण्याची लाज वाटली. ती कशालाच घाबरायची नाही, अंधाराला, एकटी राहण्याला, अगदी चोर डाकू लोक समोर आले तरीही आपण घाबरून नाही जाणार याबद्दल तिला स्वतःचीच खात्री होती.. पण जे आरशात दिसत होतं, ते काहीतरी विचित्र होतं, अमानवी वाटत होतं आणि ‘ती’ ईशाच्या जवळ आलेली होती. ईशाला घुसमटल्यासारखं व्हायला लागलं. बाहेरच्या सगळ्यांना हाक मारावी म्हणून तिने तोंड उघडलं पण तिचा आवाजच फुटला नाही.. बंद बाथरूममधून मारलेली हाक सगळ्यांना ऐकू तरी गेली असती की नाही काय माहित. तिने पुन्हा धीर केला. तिच्यातली सगळी शक्ती एकवटून तिने आरशात बघतच ‘ती’ला विचारलं,

“कोण आहेस तू? “

पण काहीच उत्तर आलं नाही. फक्त ‘ती’ आणखी एक पाऊल आपल्या जवळ आल्याचं ईशाला जाणवलं. मग मात्र तिला कळून चुकलं , काहीतरी विचित्र, भयंकर होतंय आणि आपण काहीतरी करायला हवं …आत्ताच… इथून बाहेर जायला हवं….ती खूप धीर करून मागे वळली. पण…पण… मागे ती नव्हतीच…कोणीच नव्हतं.

“म्हणजे तो भास होता का..असेलही…पण भास एखाद्या वेळी होतो…मी २ मिनिटात ३ वेळा तिला पाहिलं..तो भास असेल? “

ईशा विचार करत होती. मागे कुणीच नसल्यामुळे तिला थोडं हायसं वाटलेलं होतं. तेवढ्यात अचानक बाथरूमचं दार जोरजोरात कुणीतरी वाजवायला लागलं. तिला खूप आनंद झाला. तिला वाटलं की नक्कीच बाहेरच्या खोलीतून कुणीतरी आलं असणार.  दरवाजा उघडण्यासाठी तिने कडीच्या दिशेने हात पुढे सरकवला.

पण अचानक बाथरूममध्ये खूपच अंधार झाल्यासारखं जाणवायला लागलं. तिला काहीच दिसेना. दाराची कडी ती चाचपून पाहत होती पण ती कडीच हाताला लागत नव्हती. दोन क्षण गेले आणि तिच्या लक्षात आलं की बाहेर कुणीच नाहीये आणि तरीही दार वाजतंय. दरवाजावर हाताने वाजवतो आपण, तसं वाजत नव्हतं ते दार. अक्षरशः थडथडत होतं. अचानक एकदमच तो आवाज थांबला. आणि तेवढ्यात तिच्या हाताला ती कडी लागली.  ती घाईघाईने दार उघडायला गेली पण ते आधीच उघडलेलं होतं.

 

बाहेर पॅस्सेज मध्ये पण अंधार होता. बाहेर आल्यावर दोन क्षण तिला गरगरल्यासारखंच झालं. हॉलमध्ये जायला कुठल्या दिशेने जायचं त्याचा गोंधळच उडाला. हे घर काही नवीन नव्हतं तिच्यासाठी. ती लहानपणापासून इथे येत होती. पण तरीही तिला पटकन आठवलंच नाही, हॉलकडे कसं जायचं ते. ती फिरून सायलीच्याच खोलीत आली.

 

इथेही अंधारच होता पण कुठूनतरी अगदी थोडा उजेड आल्यासारखा वाटत होता, रस्त्यावरच्या दिव्यांचाच असेल. आत आल्यावर ती एकदम भानावर आली. आपल्याला हॉल मध्ये जायचंय हे लक्षात आल्यावर मागे वळली  पण..पण…

तिच्यासमोर ‘ती’ होती …दरवाजातच होती.तशीच लांब केस चेहऱ्यावर घेतलेली …ईशाचे एकदम हातपायच गळाले…’ती’ हळूहळू जवळ आली. ईशाला कळतच नव्हतं, आत्ता या क्षणी नेमकं काय चाललंय, काय होतंय, काहीच कळत नव्हतं. ..तिचे ओठ कोरडे पडले होते, शब्द फुटत नव्हते. ती जमिनीला खिळल्यासारखी उभी राहिली होती आणि आता पुढे काय होणार या भीतीने तिने डोळे घट्ट मिटून घेतले. काही वेळ काहीच जाणवलं नाही. मग परत धीर एकवटून डोळे उघडले तर ती समोर नव्हतीच ईशा मागे वळली. तर …’ती’ तिच्या मागे होती. खिडकीच्या दिशेने तोंड करून उभी होती. 

 

त्याच वेळेला ईशाला कोणाचातरी आवाज ऐकू आला.
“इशी, मी आहे गं बाहेर उभी …” सायलीचा आवाज. सायली बाथरूमच्या बाहेर उभी होती म्हणजे तिच्या बेडरूमच्याही अगदी बाहेरच होती. पण का, कुणास ठावूक तिचा आवाज खूप लांबून आल्यासारखा वाटत होता.  

 

सायलीचा आवाज कानावर पडत होता पण ईशाची नजर मात्र ‘ती’च्या वर खिळून राहिली होती….ती खिडकीच्या दिशेने गेली…आणि खिडकीतून बाहेर गेली..खिडकीला गज होते तरीही ती बाहेर गेली…. ‘ती’च्यामागे चालत ईशा बेड पर्यंत गेली. ‘ती’ खिडकीतून बाहेर गेली आणि ईशाचं  भानच हरपल्यासारखं झालं….

************************************************************

सायलीला हे सगळं सांगून झाल्यावर ईशा म्हणाली,

“पुढचं काहीच आठवत नाही मला…मग एकदम तुलाच बघितल्याचं आठवतंय….सांगायला लागला त्यापेक्षा अर्धा वेळ ही नाही लागला हे सगळं व्हायला. ५ मिनिटच फक्त….ते काय होतं सायली? मी त्या वेळी आयुष्यात पहिल्यांदा इतकं एकट फील केलं..कोणी नव्हतं माझ्याबरोबर.. आणि आजूबाजूला काहीतरी भयंकर घडत होतं….मी खूप घाबरले सायली…आयुष्यात पहिल्यांदा इतकी घाबरले…”

बोलता- बोलताच ईशा सायलीला मिठी मारून ओक्साबोक्शी रडायला लागली. सायलीला एकदम काहीतरी आठवलं. पण ईशा कडे पाहून तिने तिला ते सांगायचं टाळलं..पुढच्या पाच मिनिटातच ईशा पुन्हा पहिल्यासारखी नॉर्मल झाली. सायलीने बाहेर हॉल मध्ये जाऊ असं म्हणताच ईशा ने तिला अडवलं.

“थांब ना जाऊ, एवढी काय घाई आहे..माझ्या डोक्यातला प्लॅन सांगू का? हे बघ, अनायसे लाईट्स गेले आहेत सो थोडा भीतीदायक माहौल तर आहेच ना…आपण थोडा वेळ बाहेर जायचंच नाही. कोणीतरी आपल्याला शोधायला येईल तेव्हा त्याला घाबरवायचं”

“अगं, वेडी आहेस का? आत्ता एवढी भयानक स्टोरी सांगून रडत होतीस आणि आता पाचव्या मिनिटाला मला सांगतेस की कोणाला तरी घाबरवायचा प्लॅन करूया? कशी आहेस तू…”

“अगं झालं ना ते आता, मला भीती वाटली, मी रडले, झालं…जे होतं ते नक्की काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न मी करणारच आहे, यु नो मी…पण म्हणून किती वेळ रडत बसू? चल ना थोडा टीपी करुया…”

“ए बाई, काय प्लॅन आहे तुझा नक्की? आणि हे बघ, आई-बाबा, मावशी ह्यांच्यापैकी कोणाशीही असली मस्ती करायची नाहीये..आणि दुसरं म्हणजे हे आत्ता तू जे काही सांगितलस ते घरी नको सांगुया कोणाला. आपण पुन्हा बोलू त्यावर. आई आणि मावशी त्यावर कशा रीएक्ट होतील माहित नाही. खरं तर सगळेचजण.”

“हो गं, तेवढं कळतं मला…आणि बकरा म्हणशील तर बाकीचे आहेत ना, निशा, अनिकेत, तुझ्या सगळ्या मैत्रिणी, ह्यातलं कोणीही चालेल, नाही का…”

मग दोघींनी ठरवलं की जो पहिले आत येईल त्याला घाबरवायचं. आणि बिचारा आनि त्यांच्या तावडीत सापडला……

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

निशाच्या कुरकुरीमुळे सायली आणि ईशाने गप्पा बाजूला ठेवून झोपायचं ठरवलं खरं, पण सायलीला अजून झोप लागत नव्हती. ईशाने सांगितलेलं हे सगळं तिच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हतं.

“ईशा ला हा जो अनुभव आला तो किती विचित्र आणि भयानक होता. काय अर्थ असेल त्या सगळ्याचा? मागे मलाही असे अनुभव आलेच ना काही वेळा…ते स्वप्न, उघडी खिडकी, अंधारात दिसलेला तो चेहरा…ह्या सगळ्याचा एकमेकांशी काही संबंध असेल का?”

सायलीने डोळे मिटलेले असले तरीही तिचं विचारचक्र चालूच होतं. हवेतला गारवा खूप वाढला होता. तिने नकळतच पांघरूण वर स्वतःच्या मानेपर्यंत ओढून घेतलं. तेवढ्यात चेहऱ्यावर कुठूनतरी थोडासा उजेड येतोय असं वाटलं आणि तिने डोळे उघडले. ईशा तिच्या बाजूला नव्हती. ती खिडकीपाशी उभी होती. तिने खिडकी उघडली होती त्यामुळे रस्त्यावरच्या दिव्यांचा उजेड आत येत होता.

“ही काय करतेय खिडकीच्या जवळ?पुन्हा काही…?”

ती उठून ईशाच्या मागे जावून उभी राहिली.

“ईशा….”

ईशा दचकली.

“अगं काय हे…घाबरलेच मी.” ईशा

“काय करतेयस इकडे?” सायली

“मला झोप येत नाहीये…सारखे विचार चाललेत डोक्यात.” ईशा

“मी पण जागीच आहे.” सायली

“ए, चल आपण हॉलमध्ये जाऊया. तिकडे बसून बोलता तरी येईल.” ईशा

“ओके, चल मी कॉफी करते…गप्पा मारू जरा वेळ…” सायली

कॉफी घेतानाही दोघी गप्पच होत्या. आपापल्या विचारात होत्या. सायलीने हळूच ईशाकडे पाहिलं, तिला ईशाशी काहीतरी बोलायचं होतं पण बोलू की नको ह्यावर ती विचार करत होती. शेवटी न राहवून तिने सुरुवात केली.

“एक सांगू इशी, मगाशी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती पण तू रडत होतीस म्हणून मुद्दाम मी विषय नाही वाढवला. तू दोन वेळा म्हणालीस ना, म्हणजे एकदा बाथरूम मध्ये आणि एकदा माझ्या बेडरूम मध्ये असताना अंधार होता पण थोडासा लाईट येत होता, कदाचित बाहेरच्या दिव्यांचा असेल असं तू म्हणालीस…”

 

“हो मग..?” ईशा

 

“अगं पण लाईट सगळेच गेले होते. म्हणजे लाईट गेल्यावर आनि लगेच बाहेर डोकावून आला होता. आपल्या एरियातले सगळे अगदी रस्त्यावरचे पण लाईट्स गेलेत असं म्हणाला. बाहेर एकदम काळोख झाला होता. ज्या घरात इमर्जन्सी लाईट होते तिथूनच थोडा उजेड रस्त्यावर येत होता. पण बाथरूमची खिडकी येते त्या बाजूला तर कोणतीच घरं नाहीयेत..म्हणजे पूर्ण अंधार असायला हवा ना आतमध्ये..उजेड कुठला आणि कुठून येणार ..तोही एवढा की तुला कोणीतरी उभं आहे, तुझ्या जवळ येतंय हेही सगळं दिसलं…?” सायली

 

“म्हणजे माझ्यावर विश्वास नाहीये ना तुझा, मी सगळी स्टोरी रचून सांगतेय असं वाटतंय का तुला ?” ईशा

 

 

“अगं नाही, अजिबात नाही. मला असं म्हणायचं आहे की हे सगळं किती विचित्र आहे. सगळीकडे पूर्ण काळोख असताना, तुला हे सगळं दिसेल एवढा उजेड फक्त बाथरूम मध्ये आणि बेडरूम मधेच कसा असेल ? मी तुला शोधायला आले होते, तेव्हा बाथरूम मध्ये पूर्ण अंधार होता. बेडरूम मध्ये तू बसली होतीस ते मला हातात मोबाईल होता म्हणून दिसलं नाहीतर कळलंच नसतं, एवढा अंधार होता. मग तेव्हाच एवढा उजेड कुठून आला? हे खूप विचित्र आहे, पण कुठेतरी असं अनुभवलंय मी, याआधी. ” सायली

 

 

“म्हणजे ? मला कळत नाहीये …” ईशा

 

“काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडलं होतं मला. भयानकच होतं आणि विचित्र होतं, त्यात पण असंच होतं…मी एका रस्त्यावरून चालले होते…संध्याकाळ टळून गेली होती. रस्त्यावर कुठेच दिवे दिसत नव्हते. खरं तर अंधार असायला हवा ना, पण तरीही मला पुढचा रस्ता दिसत होता आणि मागे बघितल्यावर मागचा रस्ता पण दिसत होता…रस्ता दिसण्यापुरता उजेड कुठून येत होता? तीच आठवण झाली मला तू बोलत असताना…” सायली

 

“विचित्र तर आहेच. कारण लॉजिकली विचार केला तर ह्या गोष्टी पटण्यासारख्या नाहीच आहेत. मगाशी मी खिडकीशी उभं राहून तोच विचार करत होते. आपण अगदी असं धरलं की कोणीतरी मुद्दामहून मला घाबरवायला हे सगळं करत होतं, पण मग खिडकी चं काय ? एखादं माणूस गज असलेल्या खिडकीतून बाहेर कसं जाईल? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ते जे काही होतं ते बाहेर जाताना….कसं शक्य आहे?” ईशा

 

त्याच वेळी आणखी एक गोष्ट सायलीला आठवली.

“पण मी आले तेव्हा बेडरूमची खिडकी लावलेली होती. तू बंद खिडकीकडे पाहत होतीस. खिडकी कोणी बंद केली मग?”

ईशाने तिच्याकडे बघितलं.

“आपोआप.”

“काय ? काय बोलतेयस तू?” सायली जवळजवळ किंचाळलीच.

“मगाशी मुद्दामच नाही सांगितलं. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त विचित्र तेच आहे. ‘ती’ बाहेर गेली आणि मग माझ्या डोळ्यांनी मी खिडकी आपोआप बंद होताना बघितली. एवढंच नाही, दोन्ही कड्या पण आपोआप लागल्या. मी बघितलं. ” ईशा

सायली अस्वस्थ झाली.

“खरं तर दोन-तीन वेळा तर मला पण असलेच अनुभव आले. पण मी खूप डोक्यापर्यंत नेलं नाही ते. एकदा तर ते स्वप्नंच होतं. पण खूप रिअल वाटत होतं त्यातलं सगळं. जागी झाल्यावर पण असंच वाटत होतं की ते सगळं मी खरंच अनुभवलंय. आता इतके दिवस झाले तरी मला ते स्वप्न जसंच्या तसं अगदी सगळं आठवतंय. आणि त्यानंतरचा तो दुसरा अनुभव. ते आठवलं  तर अजूनही शहारा येतो अंगावर..”सायली.

 

“एक मिनिट, काय बोलतेयस तू? कशाबद्दल ? आधी बोलली नाहीस कधी? ” ईशा

 

“अगं मीच खूप लाईटली घेतलं सगळं. पण आज तू सांगितलेलं ऐकताना वाटलं की मी जे अनुभवलं त्याच्याशीच हे सगळं रिलेटेड नसेल ना? ह्या सगळ्याकडे “असं काही झालंच नाही” असंच का बघतेय मी ?” हे सगळं खरं असेल तर” असा विचार का नाही करत मी ? कदाचित हे सगळं खरं सुद्धा असेल…..” सायली.

 

“अगं बाई, सांगशील का आता काय ते…आणि प्लीज सगळं सांग मला…कधी, कुठे , कसं, का , सगळं म्हणजे सगळं …कळलं? ” ईशा

सायली सगळं सांगण्यासाठी अधीर झालीच होती. तिने बोलण्याआधी एक क्षण विचार केला आणि म्हणाली

“सगळं सांगते. पण मला आणखीही काही बोलायचंय इशी तुझ्याशी. सुजयबद्दल. हे सगळं सध्यातरी आपल्यातच राहील, तुला माहीतच आहे. “

अर्ध्या तासानंतर सायली बोलायची थांबली. तिने आपलं मन ईशाकडे मोकळं केलं आणि तिलाच खूप हलकं वाटायला लागलं. तिने ईशाला सगळं सांगितलं. तिची आणि सुजयची भेट, त्याचं फोन न करणं, कामवाली बाई, खरेदीलाही तो न येणं, आल्यावर एकदम जुना मित्र असल्यासारखं बोलणं, अगदी आज त्याच्या घरी भेट होईपर्यंत सगळं काही….तसंच ते स्वप्न, त्यातला अगदी बारीक-सारीक तपशील, उघडी खिडकी, रात्रीचा तो चेहरा समोर येण्याचा अनुभव…अगदी सगळंच.

“चल आता झोपूया. साडे-तीन वाजलेत. झोपलो की लगेच उठायची वेळ होईल आता. पण इशी, मला खरंच खूप बरं वाटतंय सगळं तुझ्याशी शेअर केल्यावर. आय जस्ट होप की असले विचित्र अनुभव आपल्याला परत येणार नाहीत. आणि सुजयच्या बाबतीत सुद्धा माझे सगळे गैरसमजच झालेले असुदेत. मग लाईफ मध्ये काही टेन्शन नाही बघ. मग आपण तुझ्यासाठी मुलं बघायला मोकळे….”

स्वतःच्याच विनोदावर हसत सायली कॉफीचे कप घेऊन किचन मध्ये गेली. ईशा नुसती वरवर हसली. खरं तर तिचं लक्षच नव्हतं. सायलीने सांगितलेलं सगळं तिच्या डोक्यात घोळत होतं. त्या सगळ्यात एक विचित्र योगायोग होता. ती विचार करत होती ,

“जे घडत आहे किंवा घडलं आहे तो नक्की फक्त योगायोग असेल? सायलीशी बोलावं का हे सगळं? आत्ता नकोच. परवा साखरपुडा आहे तिचा, तिला जरा टेन्शन-फ्री राहूदेत. आणि नुसतं योगायोगाच्या जोरावर हे बोलणं बरोबरही नाही. बघूया, पुढे अजून काही होतंय का, काय होतंय, कधी होतंय, सगळं नुसतं बघायचं आधी. खात्री पटली तरच सायलीशी बोलूया.”

दोघीजणी झोपायला गेल्या. दहा-पंधरा मिनिटांनंतर सायलीचा डोळा लागला पण ईशा ला काही केल्या झोप येईना. थोड्या वेळाने ती सायलीला म्हणाली,

“सायली, ए, झोपलीस का गं?”

 

“काय झालं? ” सायली

 

“एक विचारायचं होतं. तुम्ही सुजयची माहिती काढली आहे ना?” ईशा

 

“म्हणजे ?” सायली

 

“अगं अरेंज्ड मॅरेज मध्ये थोडीफार माहिती काढतातच ना. त्यांनी पण तुझी माहिती कुठूनतरी काढलीच असणार, म्हणजे घर, त्यातली माणसं सगळं चांगलं आहे ना, मुलगा किंवा मुलगी चांगले आहेत ना हे कळतं ना….” ईशा

 

“हो हो गं, माहित आहे ते सगळं. बाबा म्हणाले होते त्याबद्दल काहीतरी पण त्यांनी माहिती काढली की नाही ते काही कळलं नाही. मीच बिझी होते गं या विक मध्ये. आई-बाबांशी बोलायला पण नाही झालं. उद्या विचारते त्यांना.” सायली

 

“हमम….” ईशा

 

“अगं झोप आता. एवढा विचार नको करूस. चल गुड नाईट “सायली

 

“गुड नाईट “

शनिवारी सकाळी नऊ वाजून गेले तरी दोघींचा उठायचा पत्ता नव्हता. आई-बाबा, मावशी तिघेही आज खरेदीला जाणार होते. बाकी सगळी खरेदी आणि तयारी झाली होती पण सुजयकडच्या जवळच्या लोकांसाठी गिफ्ट्स आणायचे तेवढं राहिलेलं होतं. घरातलं सगळं लवकर आवरावं म्हणून आईने आज भीमाबाईंनाही कामासाठी जरा लवकरच बोलावलं होतं.

 

भीमाबाईंचे सगळ्या घरातले कचरे काढून झाले आणि त्या सायलीच्या खोलीत आल्या. ईशा कशी-बशी उठून बाथरूम मध्ये जाऊन ब्रश करत होती. सायली मात्र अजून अंथरुणातच होती. डोळे जड झालेले होते. चुकून डोळे मिटले तर आपण पुन्हा गाढ झोपून जाऊ ह्याची तिला खात्री होती त्यामुळे खूप प्रयत्नपूर्वक ती डोळे मिटू नयेत ह्याची काळजी घेत होती.

“ओ ताई, हे बघा काय आहे…”

भीमाबाईंच्या खणखणीत आवाजामुळे सायली पूर्ण जागी झाली. भीमाबाई  बोटाने खुण करून पलंगाच्या खाली काहीतरी दाखवत होत्या.

“काय आहे ?”
“बघा ना ताई तुम्हीच…मी बाहेर काढते बघा …”

पलंगाखालून बाहेर आलेली ती वस्तू पाहून सायली विचारात गढून गेली….

(क्रमशः )

 

2 Comments Add yours

  1. purvatarang says:

    खूपच भारी

    Liked by 1 person

Leave a comment