davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल (भाग : 5)

भीमाबाईंचे सगळ्या घरातले कचरे काढून झाले आणि त्या सायलीच्या खोलीत आल्या. ईशा कशी-बशी उठून बाथरूम मध्ये जाऊन ब्रश करत होती. सायली मात्र अजून अंथरुणातच होती. डोळे जड झालेले होते. चुकून डोळे मिटले तर आपण पुन्हा गाढ झोपून जाऊ ह्याची तिला खात्री होती त्यामुळे खूप प्रयत्नपूर्वक ती डोळे मिटू नयेत ह्याची काळजी घेत होती.

“ओ ताई, हे बघा काय आहे…”

भीमाबाईंच्या खणखणीत आवाजामुळे सायली पूर्ण जागी झाली. भीमाबाई  बोटाने खुण करून पलंगाच्या खाली काहीतरी दाखवत होत्या.

“काय आहे ?”
“बघा ना ताई तुम्हीच…मी बाहेर काढते बघा …”

पलंगाखालून बाहेर आलेली ती वस्तू पाहून सायली विचारात गढून गेली….

—————-(भाग ४ पासून पुढे …)—————

भाग ४ येथे वाचा- http://wp.me/p6JiYc-4V

 

हे कुणाचं असेल? काल घरात बरेच लोक होते, पण सगळे बाहेरच होते बराचसा वेळइथे कोणाची वस्तू कशी काय येईल? कदाचित निशा किंवा ईशा चं असू शकतं हेईशा ला विचारून बघू….ईशी….ए ईशी………”

पण ईशा आधीच ब्रश करून बाहेर चहा घायला पळाली होती.

जाऊदेत, सध्या कपाटात ठेवतेनंतर विचारेन त्यांना..”

ती वस्तू तिने स्वतःच्या कपाटात ठेवली आणि ती जांभई देत बाथरूम मध्ये शिरली.

—————————————————————————–

थोड्या वेळाने आई आणि मावशी बाहेर जाण्याची तयारी करायला लागल्या. बाबा देवघरात पूजा करत होते. सायली देवाला नमस्कार करायला आत आली.

सायली, उशिरा उठून अंघोळ लवकर झाली म्हणायची तुझी…” बाबा.

मी आरामातच करणार होते, पण आईनामक माझी सासू आहे ना घरात, तिने फर्मान सोडलं, पटापटा अंघोळी आवरून घ्या म्हणूनमग काय..केली अंघोळ…” सायली.

ह्यावर बाबा खोखो हसायला लागले.

तुझीच काय, ती माझीही सासू आहेकाय एवढी अंघोळीच्या मागे लागते सगळ्यांच्या तिचं तिलाच माहीतपण ती अशी सासुरवास करते म्हणून आपल्या घरातली शिस्त थोडीफार टिकून आहेएवढा मोठं घर साफ, नेटकं ठेवायचं, तेही अनिच्या राज्यातसोपं नाहीये…” बाबा

ते आहेच हो..सवय झालीये ना आपल्याला असं सगळं असण्याचीएखादा दिवस आई म्हणाली की आरामात अंघोळ करा, मग मस्त मुव्ही बघत बसा, आपण बाहेरून पिझ्झा ऑर्डर करू असं काहीतरी, तर आपल्याला कोणाला झेपणारच नाही तेबट शी इज द बेस्टबरं जाऊदेत, तुमची पूजा चालूदेत. मी जातेसायली.

सायली जाण्यासाठी म्हणून वळली आणि तिला काहीतरी आठवलं. ती मागे वळली.

बाबा अक्चुअलि मला जरा बोलायचं होतं. बोलू का आत्ताच? ” सायली

 

हो बोल ना, माझी पूजा झालीच आहेकाय झालं?” बाबा

 

 

या आठवड्यात मी खूपच बिझी होते त्यामुळे माझ्या डोक्यातूनच गेलं होतं. तुम्ही सुजयची चौकशी करणार असं म्हणाला होतात ना, झालं का तुमचं बोलणं कुणाशी?” सायली

 

हो दोन ठिकाणाहून ओळख निघाली सान्यांची. एक त्यांच्या कॉम्प्लेक्स मधेच राहतात. कामत म्हणून. दोन वर्षांपूर्वी मी सायनच्या ब्रॅंचला होतो ना, तिथे होते ते. तीनेक महिने आम्ही एकत्र काम केलं. नंतर त्यांची ट्रान्स्फर झाली. आमची डिपार्टमेंट्स वेगवेगळी होती. ते लॉजिस्टिक्स ला होते. पण तरी एका ऑफिस मध्ये होतो त्यामुळे चांगले ओळखायचो एकमेकांना.

त्या दिवशी साने म्हणाले मला, नरेन कामत म्हणून आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये एकजण आहेत, ते सुद्धा तुमच्याच कंपनी मध्ये होते. गोव्याचे आहेत ते. नंतर घरी आल्यावर मला आठवलं, हा तोच कामत. त्यांची ट्रान्स्फर झाल्यावर नंतर कामासाठी म्हणा किंवा बाकी काही कारणाने त्यांच्या संपर्कात राहण्याचा तसा प्रश्न नव्हता. माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता आत्ता. त्या ब्रॅंचला गोखले म्हणून एकजण होते, ते त्यांचे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून त्या कामतांचा नंबर मिळवला मी आणि आत्ता तीनचार दिवसांपूर्वीच त्यांच्याशी बोलणं झालं.

त्यांनी सांगितलं, की अगदी चांगली माणसं आहेत. श्रीमंत असले तरीही वागायला अगदी साधे, कुठेही बडेजाव नाही. सुजय तर चांगलाच आहे, प्रश्नच नाही त्याबद्दल. ते म्हणाले तशी आमची ओळख २ वर्षापासूनच आहे कारण साने तिकडे राहायला येउन दोन वर्ष झाली ना, त्याआधी सुजयची ट्रान्स्फर इंदौर ला होती त्यामुळे ते सगळेच तिकडे होते, साने म्हणाले ना आपल्याला तसं. पण तरीही मी जेवढा ओळखतो त्याप्रमाणे अगदी योग्य स्थळ आहे असं म्हणाले. तेही दोन महिन्यांपासून पनवेलला येउन राहिलेत, मुलीकडे. मध्ये जमेल तेव्हा येउन जातात इकडे. मी म्हटलं त्यांना, आलात की घरी येउन जा म्हणून. लग्नाला पण त्यांना बोलवायला हवं. माहिती देऊन महत्वाचं काम केलंय त्यांनी आपलं….”

सायलीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं.

आणि दुसऱ्या कोणाशी बोललात?”

 

दुसरी ओळख सुजयच्या ऑफिस मधेच निघाली. सुजयच्या आई त्या दिवशी त्यांच्या नातेवाईकांबद्दल सांगत होत्या ना, तेव्हा त्यांच्या बोलण्यात आलं होतं त्यांचं कोणीतरी दिल्लीला असतं म्हणून, त्यावरून मला आठवलं की मोहितेची मुलगी आणि जावई दिल्लीला असतात आणि मागे त्याच्या जावयाने जॉब बदलला तो त्याला दिल्लीला एका चांगल्या कंपनीमध्ये खूप मोठ्या पोझिशनची ऑफर मिळाली म्हणून, ते आठवलं मला. ती कंपनी म्हणजे सुजय आत्ता आहे ती कंपनी. ”

 

अच्छा…”

मोहितेकाका बाबांचे खूप जवळचे आणि फार पूर्वीपासूनचे मित्र होते.

त्याच्या जावयाशी बोललो मी. मुंबईला सुजयच्या ब्रॅंचमध्ये दोनतीन महिन्यातून एकदा जावं लागतं त्याला. तो डायरेक्टली त्याला ओळखत नसला तरी सुजयच्या मॅनेजरला चांगलंच ओळखतो. कालच फोन आला होता. सुजयबद्दल पण सगळी माहिती चांगलीच आहे, इन फॅक्ट उत्तम आहे. सुजयचा बॉस म्हणजे मार्केटिंग डिरेक्टर एशिया पॅसिफिक रिजन. आता एवढ्या मोठ्या कॅलीबरचा आणि एवढ्या मोठ्या पोझिशनला बसलेला माणूस सुजयचं एवढं कौतुक करतो म्हणजे आपण कल्पना करू शकतो. त्याने सांगितलं की प्रचंड सिन्सिअर मुलगा आहे, प्रचंड मेहनती, जिद्दी. एवढ्या लहान वयात त्याने बरंच काही मिळवलंय. एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स, एक्सलंट मार्केटिंग नॉलेज अँड अप्प्रोचत्याचं कंपनी मधलं फ्युचर अतिशय ब्राईट आहे म्हणाले. एकच प्रोब्लेम आहे त्याचा..तो प्रचंड वर्कोहोलिक आहे. कामापुढे बाकी काही सुचत नाही त्याला. ते म्हणाले, कितीतरी वेळा रात्री मिटिंग संपल्यावर जबरदस्तीने घरी पाठवलंय मी त्याला.

 

आणि तसं मोहितेंचा जावई पण चांगल्याच पोझिशनला आहे त्यामुळे कंपनी मधले चांगले पर्फॉर्मर्स त्यालाही माहित असतातच ना. सुजयचं नाव ऐकलंय त्यानेही बरेचदा.”

 

अरे वा, मला कल्पना नव्हती त्याच्या करिअर रिलेटेड गोष्टींबद्दल. ग्रेट. ” सायली.

 

हो ना, मलाही. माणूस घरी असतो ना त्यापेक्षा त्याच्या कामाच्या ठिकाणी खूप वेगळा असतो. आणि आजकाल तर काय घरापेक्षा तुम्ही लोक ऑफिस मधेच जास्त असता. त्यामुळे ऑफिस मधल्या लोकांकडून इतकं चांगलं ऐकायला मिळालं त्यामुळे मी पण आता निर्धास्त झालोय. बरं चल, मलापण आवरायचं आहे. नाहीतर तुझी ती सासूमलाही तिची सासुगिरी दाखवेल…”

बाबा तयार व्हायला आत निघून गेले.

त्यांचं बोलणं ऐकताना सायलीला नुसतं समाधानच वाटत नव्हतं तर सुजयचा अभिमान वाटत होता. आपण त्याच्याबद्दल काय विचार करत होतो, शंका घेत होतो हे आठवून सायलीला शरमल्यासारखं झालं.

नंतर सायलीने ही गोष्ट ईशालाही सांगितली. ईशालाही आपण उगीच नको तो विचार केला असं वाटायला लागलं. पण तरीही एक विचार, एक प्रश्न तिला अजूनही सतावत होताच.

मी त्या विचित्र योगायोगाबद्दल जो विचार केला होता, त्याचं काय मग? कदाचित ह्या सगळ्याचा एकत्र असा काहीच संबंध नसेल. तो खरंच योगायोग असेल. तरीही माझं पूर्ण समाधान होत नाहीये. पण एक बरं झालं, सायलीला उगीच काही सांगत बसले नाही मी. ही गोष्ट माझ्यापर्यंतच राहिली तेच बरं झालं. आणखी काही दिवस नुसतं ऑबझर्व करायला हवं सगळं….”

——————————————————————————————————–

त्याच दिवशीची संध्याकाळ. सुजय त्याच्या खोलीत एकटाच बसला होता

अंधारून आलं होतं तरीही दिवे लावण्याचंही भान नव्हतं त्याला. तो एकटक त्याच्या मोबाईल मध्ये बघत होता.

आय एम सो सॉरी. मला खरंच असं नाही वागायचंय तुझ्याशी. पण माझाही इलाज नाहीये. मला परत सगळं विस्कटू द्यायचं नाहीये. मागे दोन वेळा जी चूक केली तीच पुन्हा करून आपलं नातं सुरु होण्याच्या आधीच संपवायचं नाहीये. मी ठरवलंय त्याप्रमाणे सगळं झालं की मग नंतर मी तुला सगळं सांगेन. तक्रार करण्याची दुसरी कुठलीच संधी देणार नाही मी तुला. माझ्याशी लग्न केल्याचा कायम अभिमानच वाटेल तुला, आय प्रॉमिस.”

त्याच्या डोळ्यांतून आलेलं पाणी मोबाईल मधल्या सायलीच्या फोटोवर पडलं तसं त्याने घाईघाईने ते पुसून टाकलं.

नाही, तुझ्या डोळ्यांतून असं पाणी नाही येऊ देणार मी. तुझा फोटो आणि तुझं प्रोफाईल जेव्हा मी त्या विवाह मंडळात बघितलं तेव्हाच खूप आवडलीस मला. तेव्हाच ठरवलं, हीच माझी लाईफ-पार्टनर होणार. पण तुला मी का आवडावं? पण त्याही बाबतीत दैवाने साथ दिली. सगळं काही जुळून आलं. सगळी पावलं मी सावधपणे उचलली आहेत. तुला कल्पनाही नसेल ना, की तुझ्या बाबांना स्थळासंबंधी फोन करायच्या निदान महिनाभर तरी आधी मी तुझं प्रोफाईल बघितलेलं होतं. तुमची सगळी माहिती काढली. अगदी जवळच्या मित्रपरिवारापासून ते जवळच्या नातेवाईकांबद्दल सगळी. अरेंज्ड मॅरेज म्हटल्यावर मुलीकडचे लोक माझी माहिती काढणार हे पण अपेक्षितच होतं. मग ती माहिती तुम्ही कोणाकडून काढायची हे पण मीच ठरवलं. नरेन कामत आणि त्या मोहितेंचा जावई हे दोघेही माझी आणि साने कुटुंबाची माहिती देऊ शकतात हे लक्षात आल्यावर, त्यादिवशी तुम्ही आमच्या घरी आलात तेव्हा बोलताबोलता सहज म्हणून नरेन कामत पण तुझ्या बाबांच्या ऑफिस मध्ये आहेत हे सांगून टाकलं. आणि बोलताबोलता दिल्लीचाही उल्लेख केला जेणेकरून दिल्लीमध्ये आपलं कोण कोण आहे ह्याचा समोरचा माणूस विचार करेल आणि थोड्या वेळात त्याला मोहिते आणि त्यांचे जावई ह्यांची आठवण होईल. अर्थात तसं झालं नसतं तरीही दुसरे काही ऑबशन्स होते आमच्याकडे,तुम्हाला मोहितेंच्या जावयाची आठवण करून देण्याचे. ह्याबाबतीत मात्र आमचे पुज्य मातापिता ग्रेट आहेत. त्यांनी इतकं सफाईदार पणे हे सहजसांगितल्याचं नाटक केलं, की त्याला तोड नाही.”

शेवटच्या वाक्यावर सुजय गडगडाटी हसला. इतका, की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. पुन्हा त्याने मोबाईलमधल्या फोटो कडे बघितलं.

सॉरी मला माहित आहे हे हसण्यासारखं नाहीये. तुम्हाला हे कळेल तेव्हा तुमची काय अवस्था होईल मला कल्पना आहे.मी आत्ता हसलो ते माझ्या परिस्थितीवर. बघ ना काय, काय करावं लागतंय मला लग्न करण्यासाठी.पण प्लीज मला समजून घे. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. माझा हेतूही वाईट नाहीये.”

तेवढ्यात त्याच्या मोबाईल वर कॉल आला. सायलीचाच फोन होता.

आय एम शुअर आपलं लग्न व्हावं असं देवाच्याच मनात आहे. मी माझ्या मनातलं तुझ्याशी बोलताना तुही माझाच विचार करत होतीस तर…”

त्याने एक दीर्घ श्वास घेतला.

कुल डाऊन सुजय. एवढा एक्साईट होऊ नकोस…”

त्याने फोन घेतला.

हाय सायली. कशी आहेस ?”

हाय जीजू ..मी ईशा, सायलीची मावस बहिण. ”

“….”

हलो, आर यु देअर ? ” ईशा

येस, येस , सॉरी म्हणजे एकदम दुसऱ्या कोणाचा तरी आवाज आला म्हणून थोडा गडबडून गेलो.” सुजय

सॉरी हा जीजू, राग नाही ना आला तुम्हाला, सायलीऐवजी मी बोलतेय म्हणूनईशा त्याला चिडवण्याच्या सुरात म्हणाली.

सुजयने ओळखलं, ही सायलीवरून आपल्याला चिडवतेय. तो त्या कल्पनेनेच सुखावला.

राग कशाला येईल? पण प्लीज जीजू नको म्हणूस, जरा ऐकायला ऑड वाटतं.”

ओके, मग काय म्हणू? तुम्हाला नावाने हाक मारायला मला काहीच प्रोब्लेम नाही, पण माझी आई लेक्चर देईल मला लगेच ….मी तशी पाचसात वर्षांनी लहान आहे तुमच्याहून ..” ईशा

.”आय नो, तू आत्ता आठ महिन्यांपूर्वीच जॉबला लागली आहेस ना, पुण्याला ? “

सुजय हे बोलला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने कपाळावर हात मारला.

हो, तुम्हाला कसं माहित? सायली बोलली का? ” ईशा

सायली ?” सुजयने एक क्षण डोळे मिटून विचार केला. “नाही , अक्चुअलि त्या दिवशी सायलीच्या आई म्हणाल्या होत्या. सायलीची कोणतीतरी बहिण आत्ताच आठेक महिन्यांपूर्वी जॉब ला लागलीये , असं. तू आत्ता म्हणालीस ना तू माझ्याहून पाच सहा वर्षांनी लहान आहेस म्हणून पटकन अंदाज बांधला मी. ”

अच्छा..” ईशा थोडी विचारात पडली होती.

एक मिनिट हा, सायलीशी बोला…”

हाय सुजय, कसा आहेस ?” सायली

हाय , मी मजेत ..तू कशी आहेस ?”

मी पण मजेत. ही ईशी मागे लागली होती, सुजयला फोन कर म्हणून.”

बरं झालं ना मग, तू फोन केलास ना ती मागे लागली म्हणून

सायली सुजयशी बोलायला लागल्यावर ईशा तिथून उठून खिडकीपाशी आली. सुजयच्या बोलण्यातलं काहीतरी खटकलं होतं तिला. त्यांचं ते चार ओळींचं संभाषण तिने पुन्हा पुन्हा आठवून बघितलं. तसं खूप काही संशय येईल असं नव्हतंच काही त्यात. पण तरीही

त्याने किती पटकन सांगितलं मला आठ महिन्यांपूर्वी जॉब लागलाय ते. आठ महिने? एवढं परफेक्ट? आणि तेही आजिबात न आठवता, अगदी पटकन माझ्या नावावरूनच कळल्यासारखं. किंवा माझ्याबद्दल माहिती असल्यासारखं? सायलीला विचारलं तर ती सुद्धा एवढं परफेक्ट नाही सांगू शकणार. आपण ओळखत नसलेल्या माणसाबद्दल एवढी माहिती तेव्हाच लक्षात राहू शकते जेव्हा दोघांच्या कॉमन ओळखणाऱ्या माणसाकडून पुन्हा पुन्हा त्याचं नाव घेतलं जातं किंवा पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल सांगितलं जातं. पण सायली तर म्हणाली की ते फारसे भेटले किंवा फोन वर पण फार वेळा किंवा फार वेळ बोलले नाहीयेत. मग माझा विषय त्यांच्यात कसा आणि कधी निघणार?

तो म्हणाला की मावशी म्हणाली ते त्याला आठवलं आणि मी त्याच्यापेक्षा पाचसहा वर्षांनी लहान आहे म्हणून त्याने तसा अंदाज बांधला. पण त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून तसं वाटलं नाही. असं असतं तर त्याची रीएक्शन काहीशी अशी असायला हवी होती,

हो का, अच्छा, म्हणजे मागे सायलीच्या आई म्हणाल्या होत्या सायलीची कोणतीतरी बहिण आठेक महिन्यांपूर्वी जॉबला लागलीये असं, ती तूच का मग?”

पण तो म्हणाला,

आय नो, तू आठ महिन्यांपूर्वीच जॉबला लागली आहेस ना, पुण्याला ?”

हे अगदी त्याला माहीतच असल्यासारखं तो बोलला, असंच वाटतंय. “

तिने मागे सायलीकडे वळून बघितलं. ती सुजय बरोबर बोलण्यात गुंतली होती. कुठल्याश्या विनोदावर खळखळून हसत होती. तिला एवढं खुश पाहून ईशाला कसंतरीच झालं.

मी का एवढा विचार करतेय? खरंच सायलीकडून सगळं कळल्यावर मीच खूप निगेटिव्ह विचार करायला लागलेय का सुजयबद्दल? कदाचित खरंच सायलीच पुन्हा माझ्याबद्दल बोलली असेल त्याला म्हणून त्याच्या लक्षात राहिलं असेल. किंवा फेसबुक वगैरे आहेच ना, त्याने कदाचित माझं प्रोफाईल बघितलं असेल त्यावरून त्याला आधीच कळलं असेल. काकांनी सुजयची इतकी व्यवस्थित माहिती काढली आहे. सगळं एवढं छान आहे. मग मी त्याच्या त्या एका वाक्यावरून का संशय घेऊ? नकोच तो विचार करायला. आपण एखाद्याबद्दल विचार करतो, तोच त्याच्याशी बोलतानाही आपल्या वागण्यात येतो. उद्या माझ्या नकळत सुजयशी बोलताना माझ्या बोलण्यात कडवटपणा आला तर, किती वाईट दिसेल ते….आणि तसंही जे घडलं तो फक्त योगायोगच होता की नाही हे बघण्यासाठीच आज मी सायलीला त्याला फोन करायला लावलाय ना. कळेलच काय ते नंतर. तोपर्यंत मन साफ ठेवलेलं चांगलं.”

दहा मिनिटांनंतर सायलीशी बोलून झाल्यावर सुजयने मोबाईल खाली ठेवला. आणि तेवढ्यात बेल वाजली. सुजयने दार उघडलं. बाहेर एक पुरुष आणि एक स्त्री असे दोघे उभे होते. सुजयने दार उघडताच ते आत आले.

अरे काय हे सुजय, अंधार झालाय. लाईट का नाही लावलेस?” त्या स्त्रीने जाऊन लाईट लावले.

सायलीशी बोलत होतोकळलंच नाही अंधार झालाय ते.” सुजय .

सायलीशी बोललास ना, अरे पण मग चेहऱ्यावर थोडं हसू आण ना.” तो दुसरा पुरुष हसत हसत म्हणाला.

एक घोळ होताहोता कसा बसा वाचलो आत्ता. त्याचाच विचार करतोय.” सुजय.

कोणता ?” त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरून काळजी ओसंडून वाहत होती.

आत्ता सायलीच्या फोन वरून तिच्या मावसबहिणीने फोन केला होता. मी पटकन तिला बोलून गेलो, तू पुण्याला आठ महिन्यांपूर्वीच जॉबला लागली आहेस ना, म्हणून. तिने विचारलं मला, तुम्हाला कसं माहीत असं. मग डोळे मिटून पटकन विचार केला आणि सांगून टाकलं काय सुचेल ते. आय जस्ट होप, तिला काही डाउट आला नसुदेत.” सुजय.

अच्छा, पण हे बघ, मला खरंच नाही वाटत एवढं मोठं काहीतरी झालंय असं. तुमचं लग्न ठरलंय, सो तुमच्या नातेवाईकांची माहिती बोलता बोलता तुम्ही किंवा घरचे लोक एकमेकांना देणारच. त्यात शंका येण्यासारखं काहीच नाही. डोन्ट वरी. “

त्या पुरुषाने एखादा मित्र असल्यासारखं त्याच्या खांद्यावर थोपटलं.

तसंच व्हावं, असं मलाही वाटतंय. तशी बाकी पूर्ण काळजी आपण घेतलेलीच आहे. सगळ्यांची सगळी माहिती मी लिहून काढलीये आणि पुन्हा पुन्हा नजरेखालून घातलीये. सायलीकडच्या सगळ्या नातेवाईक आणि मित्र ह्याची माहिती आपण एवढ्याच साठी काढलीये की आपल्या कुठल्या नातेवाईकांबद्दल त्यांच्याकडे बोलायचं ते ठरवायला हवं ना. दोघांकडचे नातेवाईक एका गावातले निघाले तर प्रॉब्लेम होईल.” सुजय

पण सुजय, हे सगळं चित्र कशाला रंगवायचं? आपण जेवढी आपली नातेवाईक आणि मित्र ह्याच्याबद्दल जास्त माहिती देऊ तेवढं आपणच जास्त अडकत जाऊ. तुला कळतंय का?” स्त्री.

तसं नाहीये. त्यांना अक्चुअलि कोणी भेटणार नाहीये पण आपल्या बोलण्यातून तर असं दिसलंच पाहिजे ना की आपला गोतावळा खूप आहे, आपण माणसात राहणारी आणि माणसं जोडणारी लोक आहोत. एक चांगलं, आदर्श घर आणि त्यातली माणसं अशीच असतात. त्यामुळे निदान बोलण्यातून तरी त्यांना आपल्या नातेवाईकांबद्दल माहिती देत राहिली पाहिजे.

आणि तसंही एक लक्षात घ्या. आपण आपल्या ज्या काका, मावशी, मामा बद्दल त्यांना सांगणार आहोत, ते खोटे आहेत का? नाही. ते नातेवाईक तर खरे आहेत ना? त्यांनी माहिती काढली तरी काहीच बिघडणार नाहीये. आणि राहिलो मी. माझ्याही बाबतीत तो प्रश्न येणार नाही. ऑफिस, शेजारीपाजारी कुठूनही निगेटिव्ह माहिती जाणार नाही. का ते तुम्हालाही माहितीये.” सुजय.

ते सगळं ठीक आहे. पण नातेवाईक एकमेकांना भेटणार नाहीत असं कसं म्हणतोस तू? उद्या साखरपुड्यात ……” सुजयने हाताने इशारा करून त्या पुरुषाला थांबवलं.

तेच बोलायचंय मला तुमच्याशी. म्हणून तर तुम्हाला बोलावलं. मी समजावून सांगतो तुम्हाला.” सुजय

पुढच्या पंधरा मिनिटांच्या संभाषणानंतर दोन मिनिटं सगळेच शांत झाले.

पण आपण असं अगदी साखरपुड्याच्या तोंडावर का करतोय? थोडं आधीही असं सांगता आलं असतं ना त्यांना?” स्त्री

आधी सांगितलं की माणूस त्या सिच्युएशन वर काहीतरी तोडगा शोधू शकतो. आत्ता इतक्या आयत्या वेळी ते सगळ्या गोष्टी पुढे नाही ढकलू शकणार. साखरपुडा होईल आणि तोही आपले नातेवाईक न येता.”

ठीक आहे. मग आता ठरलंय तसं करायचं ना?”

हो, हो. आणि हवं तर पाच मिनिटं घ्या अजून. काय बोलायचं ते सगळं आठवून ठेवा.आणि मुख्य म्हणजे तुमची ओळख काय सांगायची ते लक्षात ठेवा.” सुजय

नाही, गरज नाही. माझ्या लक्षात आहे सगळं.” असं म्हणून त्या गृहस्थाने मोबाईल हातात घेतला.

समोरून फोन उचलला गेला.

हॅलो

“हॅलो, मि. देशपांडेच बोलताय ना? मी साने, सुजयचे बाबा.”

——————————————————————————————————

अहो काय करायचं आता? त्यांचं म्हणणं काय आहे?”

सायलीच्या आईचा स्वर काळजीने भरलेला होता.

हे बघ, तू आधी टेन्शन घेणं थांबव. साखरपुडा कॅन्सल करू किंवा पुढे ढकलू असं ते म्हणतायत का? साखरपुडा ठरलाय तसा होणारच आहे ना, आता या गोष्टीला कोणाचा इलाज आहे का, सांग. थोडेफार बदल करावे लागतील आपल्याला ते आपण करू. तू बोलाव सगळ्यांना. आपण सगळ्यांबरोबर बोलूया.” बाबा.

पाच मिनिटात आईने सगळ्यांना हातातलं काम टाकून हॉल मध्ये यायला सांगितलं.

बाबा, काय झालं? असं काय सगळ्यांना एकदम बोलावून घेतलंय? ते टीव्ही सिरिअल्स मध्ये दाखवतात ना, घरातलं कोणीतरी मोठं सगळ्यांना एकत्र जमायला सांगतं आणि मग बाबूजी ने आपको बुलाया हैअसा निरोप सगळ्यांना पाठवला जातो,तसं वाटतंय.” अनिकेत.

 

गप्प बस रे अनि. काकांना काहीतरी इंपॉर्टेंट बोलायचं असणार. काका काय झालं?” निशा.

 

सांगतो. आत्ता सुजयच्या बाबांचा फोन आला होता. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये नाही, पण त्यांच्या गावी एक वाईट घटना घडलेली आहे. जोशीअण्णा म्हणून एक खूप वयस्कर गृहस्थ होते त्यांच्या गावात, ते आत्ता काही वेळापूर्वी अचानक गेले. सान्यांच्या म्हणण्याप्रमाणे, हे जोशीअण्णा अगदी त्यांच्या घरातल्यासारखेच होते. अगदी त्यांच्या वडिलांसारखेच. आणि सगळ्या गावात ते मोठे. सगळ्यांच्या घरी अगदी हक्काने येणंजाणं असायचं त्यांचं. सगळ्यांना अगदी आपल्या घरातलंच कोणी गेलंय असं झालंय. त्यामुळे काय झालंय की, गावातून येणारे त्यांचे सगळे नातेवाईक उद्या साखरपुड्याला येऊ शकणार नाहीत.”

बोलताबोलता एका बाजूला बाबांचं विचारचक्रही चालू होतं.

अरे पण ह्याला काय अर्थ आहे? असं आयत्या वेळी काय कळवतात हे?” अनिकेत

 

आनि, तू ऐकलंस ना बाबा काय म्हणाले. ते अचानक गेले म्हणून. आधी माहित होतं का असं काही होणार आहे म्हणून? आणि बाळा, असं बोलू नये. त्यांच्याकडे वाईट प्रसंग घडलाय.” मावशी.

 

साने म्हणाले मला, ते आजारी असते किंवा अचानक तब्येत बिघडली असं काही झालं असतं तर आधीच त्यांनी साखरपुडा पुढे ढकलला असता. त्यांच्या वडिलांसारखे आहेत ते. एरव्ही अशा परिस्थितीत त्यांनी साखरपुडा केलाच नसता. साने म्हणाले, की आता इतक्या आयत्या वेळी उद्याचा साखरपुडा कॅन्सल केला तर सगळ्यांचीच गैरसोय होईल. म्हणजे मुख्यत्वे आपल्या पाहुण्यांची. काही जण ट्रेन मध्ये बसलेही असतील आणि काही जण ट्रेन पकडायला उभे असतील. अश्या वेळेला त्यांना कसं सांगणार की साखरपुडा कॅन्सल झालाय म्हणून. हॉल पण बुक केलेला आहे, त्याचे पण पैसे वाया जातील. म्हणून ते म्हणाले की साखरपुडा ठरलाय तसा करून घेऊ. तुमचे पाहुणे असतीलच. आमच्या घरच्या प्रॉब्लेम मुळे तुमची हौस राहायला नको.” बाबा

 

पण मग त्यांच्या कडचे कोणीच पाहुणे येणार नाहीत का?” सायली

 

सुजयच्या आईकडचे फार नातेवाईक नाहीच आहेत. तिच्या मावशीची फॅमिली येईल. नागपूरहून. ते ट्रेन मध्ये बसलेही असतील. त्याच्या बाबांकडचे बरेचसे नातेवाईक गावातलेच आहेत ना, त्यातलं कोणीच नाही येऊ शकणार. ते म्हणाले की आम्ही आमच्या सगळ्याच नातेवाईकांना कळवतो आहोत की साखरपुडा होतोय मात्र अशा कारणामुळे आम्ही तो छोट्या प्रमाणावर करतोय असं. त्यामुळे मला वाटतं, की त्याची मावशी सोडली तर कोणीच येणार नाही.” बाबा.

 

पण मग आता आपण काय करायचं? ” आई

 

आपण तसं तर काहीच नाही करायचंय. फक्त केटररला कळवायला हवं आयत्या वेळी एवढी माणसं कमी होतायत म्हणून. त्यांच्याकडच्या जवळच्या लोकांना गिफ्ट्स आणलेत ते सान्यांकडेच देऊन टाकू उद्या. बाकी कार्यक्रम ठरला होता तसाच होईल.” बाबा.

 

पण मगाशीच मी सुजयशी बोलले बाबा. तो काहीच बोलला नाही तेव्हा.” सायली

 

अगं, तुम्ही बोलत होतात तेव्हाच त्याच्या बाबांनी गावाकडचा फोन ठेवला. तुमचं बोलणं झाल्यावरच ते सुजयशी बोलले असणार आणि मग त्यांनी ठरवून आपल्याला फोन केला असणार. बरं चला, आता जेवून घेऊया का..?” बाबा

 

हो, हो चला. आणि अहो. त्या केटरर ला लगेच कळवून टाका विसरायच्या आत.”

आई आणि मावशी लगबगीने किचन मध्ये पळाल्या.

—————————————-

ईशा ला काही केल्या झोपच येत नव्हती. काहीतरी तिला खटकत होतं. पण ते नक्की काय हे तिचं तिलाच कळत नव्हतं. सायलीकडून आत्तापर्यंत कळलेली सगळी माहिती तिच्या मनात पुन्हा,पुन्हा घोळत होती. खरंच तो फक्त योगायोग असेल? की आणखी काही? नंतर सुजयशी झालेलं बोलणं आठवलं. तिला खटकलेली त्यातली आणखी एक गोष्ट. सुजयचं तिच्याबद्दल सगळी माहिती असल्यासारखं कॉन्फिडन्सनी बोलणं. आणि आता अचानक त्यांच्या कडच्या वाईट घटनेमुळे त्यांचे नातेवाईक येणार नसल्याची माहिती. एरव्ही तिने याबद्दल विचारही केला नसता. कारण एवढा विचार करण्यासारखं त्यात खरंच काही नव्हतं. पण मग तो विचित्र योगायोग काही वेगळंच सांगतोय. काय असेल हे नक्की?

तिने शेजारी झोपलेल्या सायलीकडे बघितलं. तिला उठवून तिच्याशीच सगळं बोलावं अशी तिला खूप इच्छा झाली. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला आवरलं.

काय यार सायली, सगळं म्हणजे सगळं तुझ्याशीच शेअर करते. आता काय करू? तुझं बरं आहे. तू त्या सुजयची स्वप्न बघत मस्त झोपलीयेस. पण त्याच सुजयने माझी झोप उडवलीये. तुला त्याला फोन करायला सांगून मला जे चेक करायचं होतं ते मी केलं. आता उद्याही तेच काम करायचं मला. पण आत्ता मी पुढे काय करू?”

तिने बाजूच्या टेबलवर पाण्याची बाटली उचलण्यासाठी हात पुढे नेला. पण आज झोपायच्या आधी पाणी आणायचंच राहिलं होतं. ती कंटाळून उठली. आता किचन पर्यंत जाऊन पाणी आणावं लागणार. ती पॅस्सेजमधून चालत जाऊन हॉल पर्यंत पोहोचली तेवढ्यात हॉल मधून तिची मावशी आणि काकांचा आवाज तिच्या कानावर पडला ….

(क्रमशः )

2 comments on “अज्ञाताची चाहूल (भाग : 5)

 1. Anonymous
  December 17, 2015

  nice….waiting for next story

  Liked by 1 person

  • rutusara
   December 17, 2015

   Thanks …:)I will be posting the next part soon…

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on December 15, 2015 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: