davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल (भाग : 7)

अगं मी पण त्याला तेच सांगतोय, एक तर त्याला यायला पण खूप लेट झाला. आपल्या अंगठी घालण्याच्या आधी २ मिनिट्स पोहोचला असेल आणि आता लगेच निघतोय. कोणाशी ओळखही नाही करून देता आलीपण ठीक आहे, काहीतरी तसंच महत्वाचं असणार. ठीक आहे, निघ तू कौस्तुभ. फोन वर बोलूच नंतर. बाय.” सुजय सायलीबरोबर जाण्यासाठी उठला.

त्याच्या शेवटच्या वाक्यावर कौस्तुभचा चेहरा जरा विचारात पडल्यासारखा झाला आणि मग तो हॉलच्या बाहेर पडला.

त्याला जाताना पाहून मागच्या दोन रांगा सोडून एका खुर्चीत बसलेली एक व्यक्ती उठली. ईशाव्यतिरिक्त या हॉलमध्ये ही अजून एक व्यक्ती अशी होती की जिला सुजयबद्दल शंका आली होती. पण आत्ता त्यांच्या अर्धवट कानावर पडलेल्या संभाषणातून नीटसा अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात सायलीची हाक ऐकू आली त्यामुळे ती व्यक्ती आपल्या विचारातून बाहेर पडून घाईघाईने सायलीच्या दिशेने गेली.

 

——————भाग ६ पासून पुढे चालू ….———————-
भाग ६ येथे वाचा —  http://wp.me/p6JiYc-aR

 

साखरपुड्याचा सोहळा एकूण फारच छान झाला. येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना सायलीसुजयची जोडी अगदी दृष्ट लागण्यासारखी वाटत होती आणि हे ऐकताना ते दोघेही सुखावत होते.

——————————————–

सायलीच्या साखरपुड्याहून आल्यावर दुपारी तो आळसावून पलंगावर पडला होता. आई शेजारच्या काकूबरोबर कुणाकडेतरी बारशाला गेली होती, त्यामुळे तो घरात एकटाच होता. एकीकडे मनातून प्रचंड दुःखी झालेला असतानाही तो आत्ता कुठल्यातरी वेगळ्याच गोष्टीचा विचार करत होता. सुजयचा

साखरपुड्याच्या समारंभातलं सुजयचं इतर कुणीही न ऐकलेलं बोलणं त्याने ऐकलं होतं. आधी चुकून कानावर पडलं होतं आणि दुसऱ्यांदा त्याने अगदी ठरवून ऐकलं होतं. त्याला बरेच प्रश्न पडले होते, त्याची उत्तरं त्याला शोधावीशी वाटत होती. सायलीसाठी. हो, एरव्ही त्याने सगळं स्वीकारायचंच ठरवलेलं होतं. सायली त्याची खूप चांगली मैत्रीण होती आणि ते नातं तरी त्याला हवं होतं. म्हणूनच मनाला मोठ्या शिकस्तीने प्रसन्न ठेवत तो साखरपुड्याला गेला. सायली आणि सुजयला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या आणि पुढे आपल्या वाटेवर आपण चालू लागायचं ह्यासाठी त्याने मनाची तयारी केली होती. पण तिथे सुजयचं बोलणं कानावर पडलं आणि तो गोंधळून गेला. त्याच्याबद्दल त्याच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले. ह्या सगळ्यात मधेच त्याला सायलीची आठवण झाली.

किती सुरेख दिसत होती आज..तिच्याकडे बघताना असं वाटत होतं की जगात ह्यापेक्षा सुंदर, निर्मळ काही असूच शकत नाही….”

क्षणभर तो थांबला.

मला थांबायला हवं. इथेच. आत्ताच. एखादी गोष्ट आपल्याला न मिळाल्याबद्दल आपण सारखं दुःख करत बसलो तर हळूहळू आपण त्या शिवाय इतर काहीच विचार करू शकत नाही आणि मग कदाचित ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या मनातला राक्षस जागा होऊ शकतो. मला माझ्या आणि सायलीच्या बाबतीत असं काहीही व्हायला नकोय. ती सुखात असणं माझ्यासाठी पुरेसं आहे. आमच्यातलं मैत्रीचं नातं मात्र मला कायम हवंय. आज गडबडीत तिच्याशी दोन शब्दही नीट बोलता आले नाहीत. फोन करूया का तिला?”

तो आळस झटकून उठला. खिडकीपाशी जाऊन त्याने मोबाईलवरून सायलीचा नंबर डायल केला. सायलीने फोन उचलला.

बोल सिद्धार्थ. अरे तू आज होतास कुठे? ऑफिस मधल्या सगळ्यांशी ओळख करून दिली मी सुजयची पण तू कुठे गायब झाला होतास तेव्हा? ”

 

अगं हो, हो. म्हणूनच फोन केला मी. म्हटलं बोलता पण नाही आलं नीट, फोन वर तरी बोलावं. बाय द वे, छान झाली एन्गेज्मेन्ट. हॉल, जेवण, सगळीच अरेंजमेन्ट एकदम भारी होती. आणि तुमच्याबद्दल काय बोलणारतू आणि सुजय तर एकदम मेड फॉर इच अदर..” सिद्धार्थ.

 

बास हातू कुठे होतास ते सांग आधी का कोणी भेटली तुला साखरपुड्यात, आणि तिच्या मागे होतास?? “

सायली आता मोकळेपणाने त्याच्याशी बोलत होती. अगदी पूर्वीसारखी. सिद्धार्थ ला आपण आवडतो, अशी शंका आल्यावर सायली मुद्दामहूनच त्याच्याशी अंतर ठेवून, काहीशी अगदी फक्त ऑफिसमधले कलिग्ज्सशी वागतो, तसंच त्याच्याशी वागायला लागली होती. तिलाही त्याच्याशी असं वागताना अवघडल्यासारखंच वाटायचं. आपण असं तुटक का वागतोय हे त्यालाही कळत असेल कदाचित, असं वाटून तिलाही कसं तरीच व्हायचं. पण आता मात्र साखरपुडा झाल्यावर तिला त्या भावनेतून बाहेर पडल्यासारखं वाटत होतं आणि सिद्धार्थ चं मोकळं बोलणं ऐकून तो आता तसला काही विचार करत नाहीये, ह्याबद्दलही तिची खात्री पटली. खूप दिवसांनंतर त्यांनी पूर्वीसारख्या गप्पा मारल्या.

सायलीशी बोलून झाल्यावर सिद्धार्थ दोन मिनिटं तसाच खिडकीत उभा राहिला. सायलीशी इतक्या छान गप्पा मारल्यानंतर बाहेरची प्रदूषणयुक्त हवाही त्याला मोकळी आणि ताजी वाटत होती. पुन्हा सुजयचा विचार डोक्यात आला.

साखरपुड्यात घडलेल्या आणि त्याला खटकलेल्या काही गोष्टींवर त्याने पुन्हा विचार करायला सुरुवात केली.

<<<<<<<<<<<<<<

घटना क्रमांक १ :

साखरपुड्याचा अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरु व्हायच्या अगदी पाचच मिनिट्स आधी सुजयला कुणाचातरी फोन आला. फोनवर बोलायला म्हणून तो सगळ्यांपासून जरासा लांब आला खरा, पण त्याच वेळेला सिद्धार्थ आणि गीता तिकडे भांडत उभे होते. म्हणजे, ऑफिस च्या कोणत्यातरी कामासंदर्भात त्यांच्यात १००० रु ची बेट लागली होती, त्यावरून त्यांचा काहीतरी मोठ्ठा वाद चालला होता. आता त्यांचे बॉस तिकडे बसलेले असताना, त्यांच्यासमोर हे बेट वगैरे कसं बोलणार, म्हणून ते दोघे उठून जरा लांब आले आणि त्यांनी आपापला मुद्दा ठामपणे मांडायला सुरुवात केली. पुढच्या दोनच मिनिटात त्याला जवळजवळ भांडणाचंच स्वरूप आलं होतं. सुजय तिथे आला, तेव्हा त्याने बघितलं की कुणीतरी दोघे इथे काहीतरी वाद घालतायत. कोण दोघे ते बघायलाही त्याला वेळ नव्हता, कारण त्याच्यासाठी ते अनोळखी असणं आणि आपापल्या भांडणात बिझी असणं हे पथ्थ्यावरच पडलं होतं. त्याने फोन वर बोलायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला गीताला कुणाचातरी फोन आला म्हणून ती फोनवर बोलण्यात बिझी झाली. सिद्धार्थ तिथून निघून जाणार तेवढ्यात थोड्या दबक्या आवाजात बोललेलं सुजयचं बोलणं त्याच्या कानावर पडलं.

सुजय : हो अरे, जमलंय सगळं ठीक. आत्तापर्यंत तरी ओके आहे सगळं.

फोनवरील व्यक्ती: …………….

सुजय: हे बघ, माझी कुठे ओळख आहे त्याच्याशी? आय मीन, तुझ्या ऑफिस मध्ये एकदाच भेटलो असेन.

फोनवरील व्यक्ती:……………..

सुजय: नाही रे, रिलेटीव्स मॅनेज झाले. मित्र पण हवा ना एखादा जवळचा…(ह्यापुढे त्यांचं आणखी काहीतरी बोलणं झालं, ते मात्र सिद्धार्थ च्या लक्षात राहू शकलं नाही. त्याला फक्त त्याचं शेवटचं वाक्य लक्षात होतं)

……..

………

सुजय: येणार आहे ना तो नक्की?

फोनवरील व्यक्ती:…….

तेवढ्यात सुजयने समोर बघितलं आणि समोरून हॉलच्या एनट्रन्स मध्ये येउन गोंधळून उभ्या असलेल्या एका तरुणाकडे त्याची नजर गेली आणि त्याला हायसं वाटल्यासारखं त्याच्या चेहऱ्यावरून जाणवलं.

सुजय : हा काय आलाच. थॅंक्स यार माझं मोठं काम केलंस. बर चल मी ठेवतो फोन. बाकी कोणी त्याला गाठायच्या आत मी त्याच्याशी बोलतो.

त्यानंतर सुजय जवळजवळ पळतच त्या तरुणापाशी गेला. सुजयला बघितल्यावर गर्दीत ओळखीच्या माणसाला बघितल्यावर वाटतो तसा दिलासा त्याला वाटल्यासारखं  सिद्धार्थला वाटलं. सुजयने एकदम त्याला मिठीच मारली. एखादा जवळचा मित्र असल्यासारखी. आणि त्याला घेऊन तो आत आला आणि त्याने त्याला एका खुर्चीवर बसायला सांगितलं. बरीचशी माणसं पुढच्या रांगेत होती पण सुजयने मात्र त्याला एकदम मागच्या रिकाम्या रांगेतल्या खुर्चीवर बसायला सांगितलं.

<<<<<>>>

हा प्रसंग आठवल्यावर आता सिद्धार्थ त्यावर विचार करत होता. सुजयचं एकूण जे बोलणं त्याच्या कानावर पडलं त्यावरून तरी असं वाटत होतं की तो जो कुणी आत आला होता, तो सुजयला फक्त ओळखत होता. पण सुजय मात्र त्याच्याशी अगदी जवळचा, जिवलग मित्र असल्यासारखं वागत होता. तो तरुणही त्यामुळे जरासा गोंधळून गेल्यासारखा वाटत होता.

सुजय म्हणाला होता, रिलेटीव्स मॅनेज झाले. मित्र पण हवा ना एखादा…..म्हणजे काय? तो नक्की कुणाशी फोनवर बोलत होता? बाकी कुणी त्याला गाठायच्या आत मी जातो, असं का म्हणाला तो? म्हणजे त्याला बाकी कुणी भेटू नये अशी सुजयची ईच्छा होती का?

<<<<<<<<<<<<

घटना क्रमांक २ :

तो तरुण पाणी प्यायला म्हणून सिद्धार्थ उभा होता तिथेच आला. आधीच्या प्रसंगातली त्याची आणि सुजयची मैत्री(?) ह्याबद्दल सिद्धार्थ च्या मनात प्रश्न होतेच. खरं तर, सुजयचं फोन वरचं बोलणं ऐकल्यापासून तो त्याच बद्दल विचार करत होता, तेवढ्यात त्याला त्या तरुणाचा धक्का लागला आणि त्याने सिद्धार्थ ला सॉरी म्हटलं. हीच त्याच्याशी बोलण्याची संधी आहे हे जाणवून सिद्धार्थ ने ही पुढे बोलायला सुरुवात केली.

सिद्धार्थ : नो, नो इट्स ओके. अक्चुअलि मीच वाटेत उभा आहे. तुम्ही सायलीचे कुणी …..?

तो तरुण : नाही, नाही. मी सुजयचा मित्र आहे.

सिद्धार्थ : , ओके. म्हणजे ऑफिसमधले वगैरे ……??

ह्यावर तो एक क्षण थांबला.आणि हलकसं हसून म्हणाला,

हा म्हणजे तशी आमची ओळख ऑफिसमधेच झाली. ….मागे एकदा ….”

पण तेवढ्यात सुजयकडचे कुणीतरी त्याला पुढे काहीच बोलू न देता जवळजवळ ओढतच स्टेजवर घेऊन गेले. सुजयने बोलावलंय असं म्हणाले.

<<<<<<<<<<<<<<<

आधी सुजय म्हणाला होता, बाकी कोणी त्याला गाठायच्या आधी मी गाठतो. त्याने त्याला शक्य तितकं बाकी लोकांपासून लांबच बसवलं होतं. तो मुलगा अगदी अंगठी घालण्याच्याच वेळेला आत आला होता मग सुजयने तेव्हाच त्याला स्वतःबरोबर स्टेजवर का नाही नेलं? तो माझ्याशी बोलत होता, तेव्हा घाईघाईने त्याला सुजयने बोलावलंय म्हणून का नेलं? सुजयने बोलावलंय असं त्यांनी म्हणताच सिद्धार्थ ने पटकन सुजयकडे बघितलं होतं आणि त्याच्या लक्षात आलं की तो इकडेच बघतोय. त्याच्यासाठी त्या तरुणाने तिकडून निघून स्टेजवर येणं खरंच इतकं महत्वाचं होतं? पण मग ते त्या तरुणाकडे बघून तर वाटत नव्हतं. तो जरासा गोंधळून, थोडा नाखुशीनेच त्यांच्याबरोबर गेल्यासारखा वाटला. हे सगळं काय होतं??

<<<<<<<<<<<<<<<<<<

घटना क्रमांक ३:

आधीच्या दोन प्रसंगात सिद्धार्थला सुजयचा थोडा संशय आलाच होता, म्हणजे त्याला त्याच्याबद्दल बरेच प्रश्न पडले होते. अंगठी घालण्याचा सोहळा झाला आणि सुजय लगेच कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर जाऊन बसला. फोटोग्राफर फोटोसाठी त्याच्या मागे लागला होता पण त्याने त्याला थोडावेळ थांबायला सांगितलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आलेल्या लोकांचा खोळंबा करण्यापेक्षा आधी जेवणं होऊदेत, मग पाहुणे गेले की आपण आरामात फोटोज काढू. सायलीच्या बाबांना अर्थातच हे पटलं. त्यामुळे साखरपुड्याचे विधी झाल्यावर लगेच बुफेची गडबड सुरु झाली. सुजय एका खुर्चीवर आरामात जाऊन बसला. तो तरुण तिथे जाताना पाहून सिद्धार्थ हळूच सुजयच्या मागे २ रांगा सोडून एका खुर्चीत बसला. बरीचशी लोकं जेवायला गेली होती त्यामुळे आजूबाजूच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. सिद्धार्थने मोबाईल कानाला लावला आणि फोनवर बोलण्याचं नाटक करायला लागला. अर्थात सुजयची त्याच्याकडे पाठ होती त्यामुळे त्याने सिद्धार्थला बघितलंच नव्हतं. तो तरुण त्याच्यापाशी गेल्यावर मात्र त्याने झटकन आजूबाजूला मन फिरवून एक नजर टाकली. २ रांगा सोडून मागे कुणीतरी फोनवर बोलत होता, बाकी सगळ्यांनी बुफेसाठी गर्दी केली होती. सायली लांब कुणाशीतरी बोलत होती. त्या पुढचं त्यांचं बोलणं सिद्धार्थ ला ऐकू आलं, ते असं

तो तरुण : सुजय, अक्चुअलि मला निघावं लागणार आहे. जरा ऑफिस मधून फोन आलाय. अर्जंट आहे.

सुजय : अरे एवढ्यात कुठे जातोस? जेवला पण नाहीयेस. ५ मिनिट्स थांब. ते बघ बुफे सुरूच होईल आता. तू पटकन जेव आणि जा ना.

तो तरुण : (सुरुवातीचं नीटसं ऐकू आलं नाही सिद्धार्थला. अर्धवट काहीतरी कळलं ) साखरपुड्याला बोलावल्याबद्दल…… ओळख फार थोडे दिवसांचीच आहे त्यामुळे………. ऑकवर्ड होत होतं, त्यात परत एकटा जायचंय …. …….”

समोरून सायली येत होती. सुजयच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव काही सिद्धार्थला दिसले नाहीत मात्र त्याचं पुढचं वाक्य मात्र त्याने तो दुसरा तरुण बोलत असताना मधेच बोलल्यासारखं वाटलं, घाईघाईने.

अरे ठीक आहे रे. मी चांगला मित्र मानतो तुला.”

त्यानंतर त्याने सायलीची आणि त्याची ओळख करून दिली. त्याचं नाव कौस्तुभ होतं, एवढं ऐकू आलं. त्याचं आडनाव मात्र नीटसं लक्षात राहिलं नाही.

<<<<<<<<<<<<<<<

एकूण तिन्ही प्रसंग आत्ता पुन्हा पुन्हा आठवून सिद्धार्थला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे सुजयने आपला अगदी जवळचा मित्र म्हणून ज्याची ओळख करून दिली होती, तो अगदी त्यांची नुकतीच ओळख झाल्यासारखा वाटत होता. पण मग सुजयने त्याची अशी ओळख का करून दिली? आणि जिथे त्याची कोणतीही नातेवाईक मंडळी साखरपुड्याला आली नाहीत, तिथे फारशी मैत्री नसलेल्या त्या कौस्तुभ ला त्याने का निमंत्रण दिलं? आणि तो त्याला खूप जवळचा आहे असं तो का दाखवत होता?

<<<<<<<<<<<<<<<<

————————————————————–

असं दाखवण्याचं कारण का, हे तू विचारूच कसं शकतोस ? मी म्हटलं ना फोनवर तुला, मित्र म्हणून कोणीतरी आणायला नको होता का? “सुजय फोनवर पुन्हा त्याच व्यक्तीशी बोलत होता.

 

अरे पण तो काही बोलला असता म्हणजे? तुमची फक्त ओळख आहे. तू असं एकदम त्याला जिवलग मित्र असल्यासारखी मिठी मारलीस, बाकी कोणालाही न बोलावता त्याला बोलावलंस, त्याला गडबड वाटणार नाही का ह्यात?” फोनवरील व्यक्ती.

 

थोडी गडबड वाटली तरी तू सांगितलं आहेस ना त्याला त्याचं कारण. आणि ऑड वाटलं तरी तो काय करणार आहे? एखादा दिवस विचार करेल आणि सोडून देईल. पण तू त्याला काय सांगितलं नक्की ?” सुजय.

 

तो तर साखरपुड्याला यायला तयारच नव्हता. मी येणार म्हणून कसाबसा तयार झाला तो. आपल्या प्लान प्रमाणे मी अगदी निघताना त्याला फोन करून, काहीतरी अडचण सांगून, मी येणार नाही सांगितलं मग मात्र तो नाहीच म्हणायला लागला. त्याचंही बरोबरच आहे म्हणा, एकदा भेटलाय फक्त तुम्ही आणि मी त्याला सांगितलं की तू एकटा साखरपुड्याला जा. कसा जाणार तो असा? मी खूप सांगितलं त्याला, सुजयला तू यायला हवा आहेस. तुझ्यात त्याला त्याच्या एका जुन्या मित्राचा भास होतो वगैरे. अक्षरशः विनवण्या केल्या त्याच्या. तू गेला नाहीस तर सुजयला वाईट वाटेल आजच्या दिवशी असं सांगितलं. आणि मग अगदी शेवटचा उपाय म्हणून त्याला तू म्हणाला होतास तेच सांगितलं, त्याला म्हटलं, की तू एकदम उशिरा जा, जवळपास ११ वाजताच आणि साखरपुडा झाला की लगेच मी तुला फोन करेन. अर्जंट काम आहे म्हणून बोलवून घेईन. तुला फार वेळ थांबायलाच लागणार नाही. आणि सुजयच्या निमंत्रणाचा पण मान ठेवल्यासारखा होईल. हे एवढं ऐकल्यावर तो तयार झाला एकदाचा.” फोनवरील व्यक्ती

 

तसा हुशार आहेसच तू. बघ ना, पण काम झालं ना आपलं. सायलीला असं वाटायला नको की अगदी कोणी म्हणजे कोणीच कसं आलं नाही. मित्र वगैरे सुद्धा? तिला असंच सांगितलं मी की फक्त माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राला बोलावलं होतं म्हणून. बाकी खूप मोठं फ्रेंड सर्कल आहे. त्यांना सगळ्यांना लग्नात बोलवेन आणि नेक्स्ट विक मध्ये सगळ्यांना बोलवून पार्टी देणार आहे.” सुजय खुशीत येउन सांगत होता.

——————————————

रात्रीचे ११ वाजून गेले असतील. सायली आणि ईशा दोघीही दमल्या होत्या पण त्यांच्या गप्पा काही संपत नव्हत्या. मावशी, निशा, अनि, आईबाबा सगळेच झोपायला गेलेही होते. सायली आणि ईशा मात्र टीव्हीवर कुठलातरी मुव्ही लावून गप्पा मारत बसल्या होत्या. मावशी आणि ईशानिशा तिघीही उद्या परत जाणार होत्या.

काय मग मॅडम? कसं वाटतंय आज? माझ्याशी बोलायचा मूड आहे ना, की सुजयशी बोलल्याशिवाय करमत नाहीये?” ईशाने मुद्दामच सुजयचा विषय काढला होता.

 

गप्प बस गं. असं काही नाहीये….”

सायली तिच्या बोटातली एंगेजमेन्ट रिंग निरखून बघत होती. ती कसल्याशा विचारात होती, असं ईशाला जाणवलं.

काय गं, काय झालं? दमली आहेस का? ” ईशा

 

दमले नाहीये गं. विचार करतेय. तुला माहितीये इशी, सुजयला रिंग घालताना, का कुणास ठावूक, एका क्षणासाठी मला वाटून गेलं, की मी काही चुकीचं करतेय का? पण मान वर करून समोर बघितलं. साखरपुड्यासाठी सगळे लोक आले होते, नटूनथटून, सगळे खुश होते. ते सगळं बघितल्यावर तो विचार निघून गेला मनातून….” सायली

 

आरन्ट यु हॅपी? अजून तुला असंच वाटतंय का? ” सायलीला आत्ताच आपल्या मनातलं सगळं सांगून टाकावं असं ईशाच्या मनात आलं.

 

आय डोन्ट नो, इशी. बघ ना, म्हणजे आत्ता मी खुश असायला हवंय ना, पण मी खुश नाहीये अगं. आत्ता मी सुजयचा विचार करायला हवाय, पण माझ्या डोक्यात नाहीयेत त्याचे विचार. आय रिअली डोन्ट नो व्हाय, पण मी काहीतरी चुकीचं केलंय असा विचार आहेच कुठेतरी मनात. म्हणजे असं खूप स्ट्रॉंगली वाटत नाहीये मला, पण मनात कुठेतरी असं येउन जातंय मधेच.” सायली

 

साखरपुड्यात असं काही घडलं का? “

ईशाने खूप अपेक्षेने हा प्रश्न विचारला होता. जे तिला जाणवलं होतं, तेच सायलीला जाणवलं असेल तर, सायलीला तिच्या मनातलं सांगण्याचं तिचं काम सोप्पं होणार होतं.

असं खूप काहीच नाही गं. खरं तर तुला विचित्र वाटेल. पण आत्ता विचार केला तर मला सगळंच थोडं थोडं खटकतंय. त्यांचे कोणी म्हणजे कोणीच नातेवाईक न येणं. नातेवाईक एक वेळ ठीक आहे, पण आपण जवळच्या मित्रमैत्रिणींना तर बोलावातोच ना गं. त्याचा तो कोणीतरी एकच मित्र आला होता. तो पण जरा विचित्र वाटला मला. एकदम फॉर्मली बोलत होता तो सुजयशी असं वाटलं मला. आणि तो आला कधी, गेला कधी हे पण कळलं नाही. मला कळत नाहीये मी असा या सगळ्याबद्दल अचानक निगेटिव्ह विचार का करायला लागलेय. मला त्या वेळी हे काहीच वाटलं नव्हतं. मग आत्ताच असे विचार का येतायत मनात?” सायली

सायलीला खटकलेल्या या गोष्टी अर्थात ईशाच्या नजरेतून सुटल्या नव्हत्याच. सायलीला स्वतःलाच हे जाणवलंय, ह्यामुळे तिला थोडं बरं वाटलं होतं. पण ती इतक्यात तिला तिच्या मनातलं सांगणार नव्हती. आणखी काही व्हायची ती वाट बघत होती. जर ती गोष्ट घडली, तर तिच्या मनातला संशय पक्का होणार होता, आणि तरच ती सायलीला सगळं सांगणार होती. तिने विषय बदलायचं ठरवलं.

काहीही काय गं, उगीच काहीतरी विचार करतेयस तू. जाऊदेत, हे बघ हा फोटो बघ. ह्यातले हे तिघे कोण कोण आहेत? ” ईशाने तिच्या मोबाईल मधला फोटो तिला दाखवला.

 

इशी, तू हे असले मुलांचे फोटो काढत फिरत होतीस साखरपुड्यात? सांगू का मावशीला? ” सायली

 

ए बाई, अगं त्यातला एक बाबाकाका कॅटेगरीतला आहे. कळतंय ना? आणि मी काही मुलांचे फोटोबिटो काढत नसते. एकजण तरी धड होता का आज आलेल्यांपैकी? अगं हे सुजयकडचे कोणीतरी ह्या मधल्या मुलाला जवळपास ओढतच स्टेजवर घेऊन गेले, ते एवढं फनी दिसत होतं, म्हणून पटकन फोटो क्लिक केला. सांग ना.” ईशा

 

हा लेफ्ट साईडचा आमच्या ऑफिस मधला आहे सिद्धार्थ. हा मधला तोच तोसुजयचा मित्र. काय बरं नाव त्याचं…..हाकौस्तुभ. आणि त्याला ओढून नेणारे ते सुजयच्या मावशीचे मिस्टर.” सायली

 

ओकेईशाला हवी ती माहिती मिळाली होती.” , ती सुजयची बहिण नेहा, ती बोलली का गं तुझ्याशी? माझ्याशी तर एवढी काही बोलली नाही. स्वतःच्याच नादात होती. ”

 

बोलली गं तशी. बरी आहे. पण एवढी मोकळी नाही वाटली बोलायला. जेवढ्यास तेवढं बोलत होती. अर्थात फार वेळ मिळालाच नाही बोलायला.” सायली

 

हम्म आणि सायली, तो त्याचा तो कझिन नाही आला का गं, तो राज ? तुला त्याच्या घरी भेटला होता नासाखरपुड्यासाठी नागपूरहून आला होता तो? ” ईशा

 

हो ना, त्याचे आईबाबा नागपूरहून आले होते. आणि मग तो का नाही आला, मी विचारलं सुजयला. तर म्हणाला की कालच त्याचा पाय जोरात मुरगळला आणि डॉक्टरकडे गेल्यावर कळलं की फ्रॅक्चरच आहे. प्लास्टर घालावं लागलं त्याला लगेच.” सायली

 

हम्म…” ईशा विचारात बुडाली होती

 

बरं चल, झोपूया का आता? ईशा, मी तुला आत्ता जे काही बोलले ते आईबाबांना , म्हणजे अक्चुअलि कुणालाच कळायला नको. त्यांना उगीच वाटेल मी काय विचार करतेय असं आणि त्यांना टेन्शन येईल.” सायली जागेवरून उठता उठता म्हणाली

आत जाताना सायलीला अचानक आठवलं की वरच्या मजल्यावरची लांब, मोठी खिडकी बंद करायची राहिली होती. त्या खिडकीला गज नव्हते त्यामुळे वरच्या मजल्यावर असली तरीही रोज रात्री ती लक्षात ठेवून बंद करावी लागत होती. संध्याकाळी ईशानिशा आणि सायली तिथे चहा घेत गप्पा मारत बसल्या आणि आईने बोलावलं म्हणून घाईघाईने खिडकी बंद न करताच खाली आल्या.

 

सायली ईशाला सांगून वरच्या मजल्याकडे निघाली. ईशा मात्र बेडरुममध्ये झोपायला गेली. वरच्या मजल्यावर जाताना जिन्यात एक दिवा होता तो सायलीने लावला आणि ती वर आली. खोलीत अंधारच होता पण जिन्यातल्या दिव्याचा उजेड होता. खिडकीतूनही बाहेरचा उजेड आत येत होता. त्यामुळे ती खोलीतला दिवा न लावताच खिडकीपाशी आली. खिडकीतून छान गार वारा आत येत होता. त्या मोकळ्या हवेवर उभं राहताच सायलीला खूप बरं वाटलं. ही खिडकी रस्त्याच्या बाजूला होती त्यामुळे इथे उभं राहिल्यावर शांतता अशी कधीच नसायची, पण गर्दीत राहूनही जो एकटेपणा किंवा प्रायव्हसी प्रत्येक जण शोधत असतो, ती मात्र इथे आल्यावर नक्कीच मिळायची. सायली तशीच एकटक त्या खालच्या रस्त्यावरच्या वाहनांकडे, बंद होणाऱ्या दुकानांकडे, आजचा दिवस ढकलून घरच्या ओढीने घराकडे परत जाणाऱ्या सगळ्या माणसांकडे बघत होती. तिच्या डोक्यात मात्र सुजयबद्दलचेच विचार घोळत होते. तिने ईशाकडे मन मोकळं केलं होतं खरं, पण तरीही मनातली घालमेल कमी झाली नव्हती. काहीतरी खटकत होतं, चुकल्यासारखं वाटत होतं, पण काय ते तिचं तिलाच कळत नव्हतं.

 

तेवढ्यात तिच्या मागच्या बाजूने एक आवाज आला. कुणीतरी दबक्या पावलांनी आपल्यामागे चालत आलंय, अशी तीव्र जाणीव तिला झाली. तिने मागे बघितलं. कुणीच नव्हतं. मग तिला आठवलं, आपण खिडकी बंद करायला आलोय. खिडकी बंद करण्यासाठी ती पुन्हा मागे वळली.

 

….खसर………खसर ……..पाय घासत चालल्यासारखा तो आवाज होता आणि तो ही तिच्या मागच्या बाजूनेच आल्यासारखा वाटला. बाहेरच्या गाड्यांच्या आवाजात नक्की कळतच नव्हतं, हा आवाज बाहेरून येतोय की आतूनच येतोय. पण बाहेरून आलेला आवाज नव्हता तो. तिच्या अगदी जवळून येत होता. ती एक क्षण तशीच थिजल्यासारखी उभी राहिली. तिला त्यारात्री ऐकलेला तो आवाज आठवला, आणि त्या पाठोपाठ रात्रीच्या अंधारात समोर आलेला तो भयानक चेहरा. तिला वळून मागे बघण्याचीही भीती वाटत होती.

 

खसर….खसर….…..अचानक आवाज बंद झाला. सायली अजून तशीच उभी होती, खिडकीकडे तोंड करून आणि मागच्या अंधाराकडे पाठ करून. तिचं मन तिला सांगत होतं. इथे काहीतरी आहे. ती इथे आली तेव्हा ही खोली अशी नव्हती. या दोनतीन मिनिटात काहीतरी बदललं होतं. ही खोली तिला अचानक अनोळखी वाटायला लागली होती, जणू काही ती नव्यानेच या खोलीत आली होती.

 

मागे वळून बघितलं तर लांब मागच्या भिंतीला लागून ठेवलेला बेड आणि साईड टेबल तिकडे नक्की असेल का? की तिथे भिंतीला टेकून कुणीतरी, काहीतरी वेगळंच उभं असेल? माझ्या अगदी मागे समोरच्या भिंतीला असलेल्या आरशात आत्ता नक्की काय प्रतिबिंब दिसत असेल? मी एकटीच असेन की माझ्या बाजूला काही…………….?? हे असे विचार का येतायत माझ्या मनात? मी खरंच माझ्या डोळ्यांनी बघतेय का हे सगळं, की फक्त विचारच करतेय? आणि रस्त्यावरून गाड्या तर जातायत पण मग सगळे आवाज का बंद झालेतगाड्यांचे आवाज का येत नाहीयेत ……आणि मी अशी विचार करत असताना माझ्यामागून काहीतरी माझ्या खूप जवळ येतंय का? एखादी काळी सावली….अंधाराचाच भाग असलेली? खूप जवळ आली असेल का ती माझ्या? आणि ती मला आता काय करणार…………..

 

क क क ….ट ट…..……………” तिच्या कानात अगदी जवळून असा आवाज आला …..कोण बोललं असेल हे? वारा जोरात वाहताना जसा घुंघुं असा आवाज येतो तसाच आवाज होता तो पण त्यात घोगऱ्या, भसाड्या, घाणेरड्या आवाजातले हे शब्द मिसळलेले होते.

 

आणि अचानक सगळं शांत झालं. एकदम शांत. पण पूर्ववत नाही.

 

समोरच्या गाड्यांचे आवाज अजून कानात पोहोचत नव्हते, पण सायलीला आता एकदम आठवलं,

आपण खिडकी बंद करायला आलोय, ती बंद करून पटकन खाली जायला हवं. इथे थांबायला नको. की लाईट लावूया आधी? नकोच वेळ घालवायला. इथून पटकन बाहेर जायला हवं. जिन्यातला उजेड येतोय इकडे.

असा विचार करून तिने जिन्याच्या दिशेने बघितलं. तिथे तर सगळा अंधार होता. तरीपण खिडकी लावायला हवी आणि लगेच खाली जायला हवं. ती मान तिरकी करून जिन्याच्या दिशेने बघतच खिडकीच्या दिशेने पुढे सरकली.”जिन्यात अंधार कसा झाला?” विचार करत आणि त्या दिशेने पाहतच तिने खिडकी लावली. समोर न बघताच खिडकीच्या कड्याही बरोबर आत सरकवल्या आणि ती मागे वळली.

 

जिन्याच्या दिशेने तिने एक पाऊल टाकलं आणि तेवढ्यात मागे खटकड ..खटअसा आवाज झाला. ती पुन्हा मागे वळली. तिने नुकतीच कड्या लावून बंद केलेली खिडकी आपोआप उघडत होती. समोर विचित्र, भीतीदायक असं काहीतरी घडत होतं.तिला जाणवत होतं, मागे फिरायला हवं , आत्ताच जिन्याकडे…. असं म्हणून ती अंधारात जायला म्हणून पुन्हा वळली पण तिचा मार्ग बंद झाला होता.

 

अंधारातून एक आकृती तिच्या समोर येत होती. समोर नक्की काय आहे, हे सायलीला नीट दिसतच नव्हतं. हळूहळू ती आकृती तिच्या आणखी जवळ आली. आजूबाजूची हवा गारठत चालली होती. सायलीचा घसा कोरडा पडला होता. “आपल्याला आत्ता या क्षणी काय वाटतंय?”  तिला काहीच वाटत नव्हतं. काहीतरी विचित्र घडतंय एवढं तिच्या मेंदूला कळत होतं पण गोष्टींचं नीट आकलनच होत नव्हतं. समोरची आकृती अंधारात होती तरीही सायलीने ओळखलं. लांब केस चेहऱ्यावर ओढून घेतलेली एक बाई होती ती. केसांच्या आडून तिचे डोळे सायलीवर रोखलेले होते. दिसत नसलं तरी जाणवत होतं. सायलीने आजूबाजूला बघितलं.

ही नक्की माझ्या घरातली, माझ्या आवडीचीच खोली आहे की कोणती नवीन जागा आहे? मला इथे सगळं अनोळखी का वाटतंय?

तिथे कोपऱ्यात एक जुनं कपाट होतं, ते मात्र तसंच नेहमीचं, ओळखीचं असल्या सारखं वाटत होतं. अंधारात दिसत नसलं तरी ते आहे एवढं सायलीला कळत होतं. पण बाकी खोली, वस्तू सगळ्या अंधारात नाहीशा झाल्यात किंवा बदलल्या आहेत असंच चित्र तिला दिसत होतं. पुन्हा एक आवाज झाला. तिच्या डोळ्यांसमोर ती खिडकी पुन्हा बंद झालीकड्या जागच्या जागी लागल्याआपोआपईशाने वर्णन केलं होतं तसंच…. समोरची तीआता कुठेच दिसत नव्हती. सायली गोंधळली. जिन्याकडे जायला म्हणून ती वळली. अंधारात चालायला लागली. तेवढ्यात तिच्या खांद्यावर एक हात पडला.

सायली…….” ईशाचा आवाज

सायली एका क्षणात भानावर आली.

सायली आर यु ओके? कुठे चालली होतीस तू? तिकडे सगळा अंधार आहे, समोर चालत गेलीस तर भिंतीवर आपटशील., जिना तुझ्या मागच्या बाजूला आहे

ईशाच्या आवाजात काळजी होती.

ईशा, तू आलीयेस?”

सायलीने तिला मिठीच मारली. ती अजूनही सैरभैर होती.

ईशाने जाऊन लाईट्स लावले.

तू वर आलीस तेव्हा तुझ्याच मागून मी पण वर आले होते. तू इथे खिडकीशी विचार करत उभी होतीस तेव्हा मी इथे मागे या जुन्या कपाटात लपले होते.”

सायलीला आता थोडा अर्थबोध होत होता. तो मागून आलेला दबक्या पावलांचा आवाज ईशाचा होता तर. आणि मगाशी सगळी खोली अनोळखी वाटत असताना ओळखीचं असं फक्त हे कपाटच वाटत होतं, ते तिकडे ईशा होती म्हणून ?

 

ती आता पूर्ण भानावर आली होती. वस्तुस्थितीची जाणीव होताच ती अक्षरशः हादरली होती. इतके दिवस ती जे तिच्या मनाचे खेळ, भयानक मुव्ही बघितल्यावर पडणारी वाईट स्वप्न, भास वगैरे समजत होती, त्याहीपेक्षा भयंकर, निसर्गाच्या विरुद्ध असलेलं असं आत्ता खरंच घडलं होतं आणि ईशाही ह्या सगळ्याची साक्षीदार होती. तिने ईशाकडे बघितलं. ती अशी हादरलेली, घाबरलेली वाटत नव्हती. ती अतिशय शांतपणे खिडकीशी उभं राहून काही विचार करत होती.

ईशा, काय असेल हे सगळं? परवा तुला असा अनुभव आला आणि आज मला. काय होतं ते? ती बाई, आपोआप उघडणारीबंद होणारी खिडकी, ती अचानक थंड पडणारी हवा, हे सगळं खूप विचित्र आहे. नॉर्मल नाहीये हे. तुला कळतंय का? “

सायली अचानक जराशी हायपर झाली होती.

ईशा अजूनही खिडकीशी उभं राहून अंधारात एकटक बघत होती.

अगं बोल ना..”

सायली तिच्यापाशी गेली आणि ईशाच्या दंडाला धरून तिने तिला मागे वळायला भाग पाडलं.

एक मिनिट, तुला काहीतरी माहिती आहे का? तू एवढी कशी शांत? आणि ….आणि तू माझ्या मागे का आलीस, आणि ते सुद्धा माझ्या नकळत? “

सायलीला आता हे सगळे प्रश्न असह्य होत होते. ती दिसणारी बाई म्हणजे नक्की काय होतं, कोण होतं, ह्याबद्दल तिच्या मनात आता काही उत्तरं गोळा होऊ लागली होती, पण ते स्वीकारायला ती तयार नव्हती.

कुल डाऊन सायली. मी काही शांत वगैरे नाहीये. भीती वाटतेय मला पण. तुझ्या मनात ज्या शंका येतायत त्याच माझ्या पण मनात येतायत आणि ते सगळं बुद्धीला पटत नाहीये. मला पण प्रश्न पडलेत. आणि मला खात्रीशीर असं काहीच माहीत नाहीये. पण मला अंदाज होता आज असा काहीतरी विचित्र अनुभव येऊ शकतो असा. म्हणून मी तुझ्या मागे आले, तुला न सांगता.” ईशा हे बोलताना नेहेमीपेक्षा खूप वेगळी वाटत होती.

तिला माहीत होतं की आता त्या विचित्र योगायोगाबद्दल सायलीला सांगण्याची वेळ आलेली आहे.

क्रमशः…

—————————————–

‘अज्ञाताची चाहूल’ ला मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! काही जणांनी ब्लॉगवर त्यांचा फिडबॅक/ comments लिहिलेले आहेत तर इतर काही जणांकडून वॉटस अप, फेसबुक, इ-मेल वरून प्रतिक्रिया नोंदवली जाते. जवळचे लोक अर्थात प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवर बोलताना आवर्जून ह्या ब्लॉगचा आणि सध्या चालू असलेल्या अज्ञाताची चाहूल ह्या सिरीज चा उल्लेख करतात आणि सगळ्यांना ही कथा आवडतेय, पुढचा भाग लवकर टाक वगैरे अशी सूचनाही करतात. ही खरंच खूप मोठी दाद आहे.

कथा जसजशी उलगडत जाते, तसतशी त्यातली रंजकता कायम ठेवणं, तोचतोचपणा येऊ न देणं, आधीच्या भागातील घटनांचा पुढच्या भागातील घटनांशी व्यवस्थित ताळमेळ बसवणं, कथेतील कोणताही भाग अनुत्तरीत (किंवा त्याबद्दल प्रश्न पडतील, संदर्भ जुळणार नाहीत असा) न ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चॅलेन्जिन्ग होऊ लागतात. सध्या ही सिरीज लिहिताना ही सगळी मजा मी अनुभवतेय.

“पुढचा भाग जरा अजून लवकर पोस्ट कर. नवीन भाग येईपर्यंत आधीच्या भागाची लिंक तुटते”, असंही बऱ्याच जणांनी मला सांगितलं. माझा तसा प्रयत्न आहेच. पण वेळेचं गणित बघता, ते कितपत शक्य होईल, असा प्रश्न पडतो. मात्र माझ्याकडून मी लवकरात लवकर नवीन भाग पोस्ट करण्याचा निश्चित प्रयत्न करेन.

‘अज्ञाताची चाहूल’ मध्ये आता नवीन पर्व सुरु करतेय. शोध. पुढच्या भागापासून अज्ञाताचा शोध सुरु होईल. तेव्हा अज्ञाताच्या शोधाच्या वाटेवरही तुमचा असाच प्रतिसाद, पाठींबा आणि सूचना असतील अशी आशा करते. सायली आणि ईशा सुजयचं सत्य शोधून काढू शकतील? काय आहे सुजयच्या विचित्र वागण्यामागचं रहस्य? सिद्धार्थ आता नक्की काय स्टॅंड घेईल? ‘ती’ नक्की कोण आहे? ….या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतेय नवीन पर्वातील पुढच्या भागांत…. धन्यवाद.

3 comments on “अज्ञाताची चाहूल (भाग : 7)

 1. purvatarang
  January 7, 2016

  Really nice series… plz keep it up….

  Like

 2. Aditya Patil
  March 20, 2016

  Nice Story

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on January 7, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: