davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)

एक मिनिट, तुला काहीतरी माहिती आहे का? तू एवढी कशी शांत? आणि ….आणि तू माझ्या मागे का आलीस, आणि ते सुद्धा माझ्या नकळत? “

सायलीला आता हे सगळे प्रश्न असह्य होत होते. ती दिसणारी बाई म्हणजे नक्की काय होतं, कोण होतं, ह्याबद्दल तिच्या मनात आता काही उत्तरं गोळा होऊ लागली होती, पण ते स्वीकारायला ती तयार नव्हती.

कुल डाऊन सायली. मी काही शांत वगैरे नाहीये. भीती वाटतेय मला पण. तुझ्या मनात ज्या शंका येतायत त्याच माझ्या पण मनात येतायत आणि ते सगळं बुद्धीला पटत नाहीये. मला पण प्रश्न पडलेत. आणि मला खात्रीशीर असं काहीच माहीत नाहीये. पण मला अंदाज होता आज असा काहीतरी विचित्र अनुभव येऊ शकतो असा. म्हणून मी तुझ्या मागे आले, तुला न सांगता.” ईशा हे बोलताना नेहेमीपेक्षा खूप वेगळी वाटत होती.

तिला माहीत होतं की आता त्या विचित्र योगायोगाबद्दल सायलीला सांगण्याची वेळ आलेली आहे.

——————भाग ७ पासून पुढे चालू………………….

भाग ७ येथे वाचा —   http://wp.me/p6JiYc-cv

 

म्हणजे काय? मला कळत नाहीये. तुला अंदाज कसा होतं आधीपासूनच? ” सायली

 

सांगते. तू त्या दिवशी जेव्हा सगळं मला सांगितलंस ना…” ईशाने सायलीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं.

 

अगं म्हणजे, सुजयबद्दल सगळं, त्याचं विचित्र, निरसपणे वागणं, आणि तुला आलेले ते सगळे विचित्र अनुभव, वगैरे वगैरे. ते सगळं ऐकल्यावरच हा विचार माझ्या डोक्यात घोळत होता. ह्या सगळ्यात एक विचित्र योगायोग आहे. तू त्याबद्दल विचार केलायस की नाही माहीत नाही. पण माझ्या डोक्यात तेव्हापासूनच हा किडा वळवळतोय.” ईशा

 

कसला योगायोग?” सायलीने तिला मधेच तोडत विचारलं.

 

मला अशी शंका आहे, की हे जे काही विचित्र बघितलं आपण, म्हणजे तू, आत्ता आलेला तो भयानक अनुभव – त्याचा आणि सुजयचा नक्कीच काहीतरी संबंध आहे.”

 

काय ? काहीतरीच काय बोलतेयस इशी? ” सायली

 

सॉरी म्हणजे आय नो, तुझं त्याच्याशी लग्न ठरलंय. मी असं एकदम त्याच्याबद्दल काहीतरी बोलतेय ….तुला आवडणार नाही कदाचितकदाचित पटणारही नाही माझं……”

ईशाला पुढे काय, कसं बोलावं ते कळत नव्हतं. सायली कशी रीएक्ट होईल ह्याचा तिला अंदाज येत नव्हता.

सायली मान हलवत म्हणाली,

असं नाहीये गं बाई. तो फक्त पंधरा दिवसांपूर्वी भेटलाय मला. मी अर्थात तुझ्यावर विश्वास ठेवणार ना? त्याला काय वाटेल ह्यापेक्षा तुला काय वाटतं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. पण त्याचा काय संबंध आहे ह्या सगळ्याशी? ”

 

हे बघ. हा माझा फक्त अंदाज आहे. पण तू नीट आठवून बघ. हे सगळं नक्की कधी पासून सुरु झालं? सगळ्यात आधी ते विचित्र स्वप्न पडलं आणि तिथून सुरुवात झाली. बरोबर? तुमचं लग्न ठरलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे सुरु झालं. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यानंतर ज्या, ज्या वेळी तू सुजयला भेटलीस त्या त्या दिवशी तुला असले भयानक अनुभव आले. म्हणजे, साखरपुड्याच्या खरेदीच्या दिवशी तो तुला भेटला आणि तुला त्याच दिवशी रात्री तो चेहरा दिसला. तू शुक्रवारी ऑफिसच्या मीटिंगवरून त्याच्या घरी गेलीस आणि त्या दिवशी रात्री तीपुन्हा आली. अर्थात ती तुला दिसली नाही, मलाच दिसली, पण त्याच दिवशी तो अनुभव आला आपल्याला. आज साखरपुड्यात तुम्ही दोघे परत भेटलात आणि आज ‘ती’ परत आली.

आणि गम्मत म्हणजे, जेव्हा तू नुसतीच फोनवर बोललीस त्याच्याशी तेव्हा ह्यातलं काहीच झालं नाही. पण जेव्हा जेव्हा तू त्याला भेटलीस तेव्हा तेव्हा असले अनुभव आले तुला.”

ईशा बोलायची थांबली. सायलीच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले होते.

ईशा बोलतेय ते बरोबर आहे. माझ्या कसं नाही लक्षात आलं हे? पण हा योगायोग पण असू शकतो ना, सुजयचा काय संबंध ह्याच्याशी? “

सायली मनाशीच विचार करत होती

मला माहित आहे तू काय विचार करतेयस ते. हा योगायोग असला तरी खूप विचित्र आहे, नाही का? मला पण हेच बघायचं होतं सायली, की हा खरंच योगायोग आहे का. म्हणून मी काल मुद्दाम सुजयला फोन केला आणि तुला बोलायला लावलं. तू फोनवर बोललीस पण तसं काहीच झालं नाही काल. आणि आज साखरपुड्यात तू त्याला भेटलीस आणि आत्ता पुन्हा ते सगळं घडलं. विचित्र योगायोग.

पण आपण त्याला योगायोगच का समजायचं? एका क्षणासाठी मी असा विचार केला, की हा योगायोग नसून ते सगळं खरंच सुजयशी रिलेटेड असेल तर?

आपण हा चान्स नाही घेऊ शकत सायली. तुझं लग्न होणार आहे त्याच्याशी. योगायोग एखाद्या वेळेला होऊ शकतो. पण तीन वेळा? योगायोग म्हणून असंच सोडून द्यायचं? पुन्हा त्याचं ते तुझ्याशी तुटकपणे बोलणं, फोन न करणं, त्यांचे नातेवाईक साखरपुड्याला न येणं, तुला त्याच्याबद्दल खटकलेल्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यामुळे त्याच्या भोवती काहीतरी गूढतेचं वलय असल्यासारखं वाटतंय. आज साखरपुड्यात मी खूप नजर ठेवून होते त्याच्यावर. काही गोष्टी ऐकू आल्या नाहीत तरी डोळ्यांना खटकत होत्या. काल मी फोनवर बोलले त्याच्याशी, तेव्हाही एक गोष्ट खटकली मला. मी सांगते तुला नंतर. मला नीट विचार करून सांग. तुझा सिक्स्थ सेन्स तुला काय सांगतोय? “

ईशाच्या प्रत्येक शब्दाबरोबर सायलीच्या मनातली भीती कमी होत होती. तिला आता ह्या सगळ्यातला गंभीरपणा लक्षात आला होता. ह्या आधी तिलाही सुजयचं वागणं विचित्र वाटलं होतंच की. पण तिला होणाऱ्या त्या भासांचा, त्या स्वप्नाचा आणि सुजयचा काही संबंध असेल, असू शकेल असा विचारही तिच्या मनात कधी आला नाही. ईशा ह्याबद्दल बोलली नसती तर तिने सांगितलेल्या हा विचित्र योगायोग आपल्या लक्षात कधी तरी आला असता का, असा विचार तिच्या मनात येउन गेला. ईशा बरोबरच बोलत होती. कदाचित सुजयचं आपल्या आयुष्यात येणं आणि त्यानंतर हे सगळं सुरु होणं, ज्या ज्या दिवशी तो आपल्याला भेटला, त्या त्या दिवशी काहीतरी भयानक गोष्टी आपल्यासमोर येणं हा सगळाच योगायोग असेलही कदाचित, पण आपण तसंच मानून पुढे जायचं नाही. हे सगळं नक्की काय आहे, हे शोधून काढायलाच हवं.

काय गं, काय विचार करतेयस ?,”

ईशाच्या आवाजामुळे सायली तिच्या विचारातून बाहेर आली.

तुझं बरोबर आहे ईशा. खरं तर ह्या आधीही त्याच्याबद्दल बरेच प्रश्न पडले होते. पण आता मात्र त्याची उत्तरं शोधून काढायलाच हवीत.”

सायलीच्या आवाजात आता आत्मविश्वास आला होता. इतके दिवस आपल्याला आतून असंच वाटत होतं, पण ते विचार, ती भीडभीती बाहेर आल्यामुळे तिला खूप मोकळं वाटत होतं.

नुसतं लग्न ठरल्यानंतर आपण किती सहज स्वीकारायला लागतो होणाऱ्या जोडीदाराला. गोष्टी खटकतात, तरीही आपण हसून सोडून देतो, त्यावर विचारही करत नाही. आपल्या वागण्यावर, विचार करण्यावर तिथपासूनच बंधनं यायला लागतात. आपलं लग्न होणार आहे त्याच्याशी, अशा छोट्या छोट्या गोष्टी कशाला मोठ्या करायच्या उगीच? त्याच्याबद्दल असा विचार का करायचा? असं आपलं मन किती नकळत ठरवून टाकतं अगदी आपल्यासारख्या शिकलेल्या, मॉडर्न विचारांच्या, शहरात राहणाऱ्या मुलीनेही असं वागावं? नकळत पण तरीही..? खरं तर तिच्या स्वभावाप्रमाणे एरव्ही तिला न पटलेल्या, न आवडलेल्या, प्रश्न पडलेल्या गोष्टी ती समोरच्या माणसाशी बेधडक बोलून, त्यावर तोडगा काढून मोकळी झाली असती. पण या वेळी मात्र असं घडलं नव्हतं कारण या वेळी समोर तिचं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं, तो मुलगा होता. तिने पूर्ण विचार करून पसंत केलेला.

पण सुरुवात कुठून करायची ? आणि आईबाबांना सांगायचं का हे सगळं? ” सायली

 

हे बघ, जो पर्यंत आपला फक्त अंदाज आहे, तो पर्यंत घरी नको सांगुया. मावशी किती पॅनीक होईल तुला माहितीये. आणि त्यांना आधीच टेन्शन असतं गं, हे मुलीचं लग्न, वगैरे. त्यांनी त्यांच्या परीने सगळं केलंय गं, सुजयची माहिती पण काढलीये. पण आता आपल्याला प्रॉब्लेम आहे त्याच्यापासून, आपल्याला खटकतायत गोष्टी. तर आपण आपल्या लेवल ला त्याची माहिती काढू आता. आणि काही वेगळं समोर आलं, आणि आपली खात्री पटली की लगेच सांगू त्यांना. तोपर्यंत उगीच त्यांना टेन्शन नको ना…” ईशा

 

हम्म ते बरोबरच आहे. यु नो ईशा, मी माझ्या लग्नाबद्दल, माझ्या जोडीदाराबद्दल पहिली नसतील इतकी स्वप्न त्यांनी पहिली आहेत माझ्या लग्नाबद्दल. मी हे सगळं लग्न, नवरा ह्या बाबतीत स्वप्नाळू कधीच नव्हते अगं. म्हणजे मी, माझं ऑफिस, माझं करिअर, माझ्या मैत्रिणी, आईबाबा, तू, अनि, एव्हढंच माझं जग होतं. मनात कुठेतरी माहित होतं की कधीतरी लग्न पण होणार. पण ते योग्य वेळी सगळ्यांचं होतं तसं माझं पण होईल, असाच विचार करायचे मी. कधीतरी मनात यायचं, माझा नवरा असा असेल, तसा असेल वगैरे, पण ते तेवढंच. पण आईबाबांचं तसं नसतं ना गं. त्यांना जितकं माझं करिअर महत्वाचं वाटतं, तितकंच माझं लग्नही. नकोच सांगुया इतक्यात त्यांना. कदाचित ते पॅनीक होतील, टेन्शन घेतील, ठरलेलं लग्न मोडेल की काय ह्याचं प्रचंड दडपण येईल त्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्यांना आपलं म्हणणं पटलं नाही तर ते आपल्यालाही ह्या सगळ्यातून मागे खेचतील. आणि मला ते नकोय. मला आता सुजयबद्दल स्वतः खात्री करून घायची आहे.”

सायली आज खूप दिवसांनंतर सुजयच्या बाबतीत तिच्या स्वभावानुसार वागत होती, विचार करत होती.

हम्ममला बरं वाटलं सायली, तू इतक्या पॉझिटीव्हली घेते आहेस सगळं, ते पाहून. आता आपल्याला पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. माझ्या डोक्यात काही गोष्टी आहेत. पण तू सांग. तुला काय वाटतं? कुठून करायची सुरुवात?” ईशा

 

आत्ता तरी मला माझ्या स्वभावाप्रमाणे वागायची फार ईच्छा होतेय. ही असली अडून अडून केलेली कामं, इज नॉट माय वे ऑफ हॅंड्लिंग थिंग्ज़. एरव्ही मी त्याच्या समोर जावून त्याला सरळ सांगितलं असतंकी ह्या, ह्या, ह्या गोष्टींचं मला स्पष्टीकरण हवंय, कारण त्या गोष्टी मला खटकल्यात. पण मी असं करणार नाहीये. कारण खरंच जर त्याने आपल्यापासून काही गोष्टी लपवल्या असतील, तर तो उघड उघड कशाला कबूल करेल ना, आपल्यासमोर. आणि दुसरं म्हणजे, त्याचा खोटं बोलण्यामागचा हेतू. ह्या दोन गोष्टींवर आपण सध्या शोध घ्यायचा प्रयत्न करूया. तो खरंच खोटं बोलतोय का आणि असेलच तर ते का, कशासाठी?” सायली

 

डन.” ह्या सगळ्यात आता सायलीच स्वतः इन्वॉल्व झाली होती त्यामुळे ईशालाही बळ मिळाल्यासारखं वाटत होतं.

 

पण आत्ता तरी माझ्या डोक्यात काही नाहीये. जरा रात्रभर विचार करते. सुचेल काहीतरी.” सायली पुढे म्हणाली.” तू काय म्हणत होतीस? तू काही विचार करून ठेवलायस का? ”

 

मी विचार करत होते, की सुजयचं फेसबुक वरचं प्रोफाईल पुन्हा नीट बघायचं. म्हणजे त्याचे फोटोज, त्याचे मित्र, त्याला आलेले मेसेजेस, वगैरे. सध्या तरी पुढे जाण्यासारखा आणि आपल्या लेवल ला करू शकू असा तोच एक मार्ग आहे.त्यातून काही नाही मिळालं तर मग पुढे काय करायचं ते नंतर बघूईशा

सायलीला ते पटलं. दुसरं काहीच सुचत नव्हतं आणि हे दुसऱ्या कोणाचीही मदत न घेता त्या दोघीही करू शकल्या असत्या. अर्थात उद्या दुपारीच मावशी आणि ईशा, निशा पुण्याला परत जाणार होत्या. पण नंतर फोन वर बोलून पुढचं काय ते ठरवू, असं त्यांनी ठरवलं.

खाली झोपायला जाणार तेवढ्यात सायलीने ईशाला थांबवलं.

इशी, मगाशी इथे जे घडलं, ते नक्की काय होतं पण? ‘तीकोण होती? भूत होतं का ते, आत्मा होता की अजून काही होतं? हे सुजयची माहिती काढणं वगैरे ठीक आहे, पण ह्या सगळ्याचं काय करायचं? ते सगळं नक्कीच काहीतरी भयंकर आहे, अमानवी आहे. खिडकी आपोआप उघडणं, बंद होणं, मनात विचित्र विचार येणं, तो कानात आलेला घाणेरडा आवाज, ‘तीचं अचानक कुठूनतरी समोर येणं आणि गायब होणं, ‘तीची ती रोखलेली नजर हे सगळं काय असेल नेमकं? आपण कधीच ह्या सगळ्यावर विश्वास ठेवत नाही पण आता आपण दोघींनी हे सगळं होताना बघितलंय.मनात ह्या सगळ्याबद्दल खूप विचित्र विचार येतायत पण ते काही केल्या बुद्धीला पटत नाहीयेत, पण ईशी बुद्धीच्या जोरावर ह्या प्रश्नाचं उत्तरही मिळत नाहीये अगं…    आणि कधीतरी सुजयची पुन्हा भेट होईलच, मग म्हणजे….म्हणजे त्या दिवशी पुन्हा मला असलंच सगळं दिसणार….मी काय करू इशी? “

आत्तापर्यंत आत्मविश्वासाने बोलणारी सायली आता मात्र पुन्हा अस्वस्थ होऊ लागली होती. ईशाकडे अर्थात ह्या सगळ्याची उत्तरं नव्हती. ती सुद्धा गोंधळून गेली होती.

ती उठली. सायलीच्या खांद्यावर तिने हलकेच थोपटलं.

सुजयच्या फेसबुक प्रोफाईलपासून उद्या सुरुवात करू. सगळे प्रश्न सुटतील हळूहळू. डोन्ट वरी.”

——————————————————

त्याच रात्री इकडे सुजय शांतपणे डोळे मिटून बसला होता. उशीर झाला होता पण झोपच येत नव्हती. तो उठला. पाणी प्यायला म्हणून किचनमध्ये गेला. त्याला दिवे लावण्याचाही कंटाळा आला होता. तो तसाच अंधारात चालत होता. आता हे घर त्याच्याही सवयीचं झालं होतं, म्हणजे अगदी अंधारात न धडपडता दुसऱ्या खोलीत चालत जाण्यापर्यंत.

किचन मध्ये जाऊन तो अगदी ग्लासभरून थंड पाणी प्यायला. बेडरूम मध्ये नेण्यासाठी त्याने एक छोटी बाटली पाण्याने भरून घेतली आणि तो जाण्यासाठी मागे वळणार, तेवढ्यात खिडकीतून थंड हवेचा एक झोत आला. “आज खूप थंडी आहे, जाड रजईच काढली पाहिजे आतून..” असा विचार करतच तो हॉलमध्ये आला आणि तिथेच थबकला.

समोर अंधारातून एक आकृती पुढे आल्यासारखी वाटत होती. काळी सावली, अंधाराचाच एक भाग असलेली. हे दृश्य त्याने आधी कधीतरी, कुठेतरी बघितलं होतं. त्याने आजूबाजूला बघितलं. बाहेरून येणाऱ्या उजेडात हॉल मधलं फर्निचर अस्पष्टसं दिसत होतं. पण त्याच्या डोळ्यांसमोर ते अस्पष्ट दिसणारं फर्निचर आता हळूहळू विरून जात होतं आणि त्याच्या जागी दुसऱ्याच गोष्टी आकार घेत होत्या. सोफ्याच्या जागी हळूहळू गर्द झाडी आणि एका रांगेत उभी असलेली झाडं दिसत होती. दुसऱ्या बाजूला शोकेस आणि टीव्ही युनिटच्या जागी हळूहळू एक घर दिसायला लागलं होतं. आणि त्याच्या मागे एक मोठं घर आणखी अंधुक दिसत होतं. तो जिथे उभा होता, तिथे एक लांबच लांब रस्ता झाला होता. रस्त्याच्या एका बाजूला ती दाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला ती घरं दिसत होती. ती काळी सावली मात्र समोरून जवळजवळ येतच होती.वेळ रात्रीचीच असावी. सुजयने मागे वळून बघितलं. किचन नव्हतंच, तिथेही तो काळा, डांबरी रस्ता गेला होता, लांबच लांब पसरला होता आणि त्याच्या बाजूने ती गर्द झाडी.

तो गोंधळला. इतक्यात त्या गर्द झाडीच्या मागे त्याला काहीतरी हालचाल जाणवली. तो त्या दिशेने गेला. तो ज्या काळ्या, डांबरी रस्त्यावर आत्ता उभा होता, तसाच रस्ता त्या गर्द झाडीच्या मागेही होता. समांतर जाणारे दोन रस्ते, फक्त त्या झाडीमुळे दुभागले गेले होते. तो त्या झाडीच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. पण पलीकडच्या रस्त्यावर कोण आहे, ते अजून दिसत नव्हतं. विचार करत करत तो आणखी आत शिरला, त्या गर्द झाडीच्या आत. आता त्याला दुसऱ्या बाजूचं सगळं दिसत होतं. त्याने हळूच पानं बाजूला सारत समोर बघितलं. समोर सायली उभी होती. गोंधळलेली, घाबरलेली. हातातली पर्स ती पुन्हा, पुन्हा बघत होती, पण बहुतेक ती रिकामी असावी. तिच्या चेहऱ्यावरून तिला काय करायचं ते सुचत नव्हतं बहुतेक. तेवढ्यात सुजयच्या हालचालीमुळे बाजूच्या झाडीत झालेली सळसळ तिच्या कानांनी टिपली, त्यापाठोपाठ एक गारेगार हवेचा झोत स्पर्शून गेला. तिला त्या झाडीत कोणीतरी लपल्याची जाणीव झाली आणि ती तिथून घाबरून अक्षरशः पळत सुटली. सुजयला तिला हाक मारावीशी वाटत होती, पण त्याचा आवाजच फुटत नव्हता. तिच्या मागे धावत जाऊन तिला थांबवावं असं त्याला वाटत होतं, पण तरीही तो जागचा हलत नव्हता. थोड्या वेळाने सायली पुन्हा परत आली. सुजय उभा होता, त्याच झुडूपापाशी आली. कदाचित तिला आता बघायचं होतं, मागे कुणी आहे का ते. तिने हाताने झाडाची पाने मागे सारली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सुजयसुद्धा गोंधळून गेला होता. तिने आपल्याला बघितलं तर? काय सांगणार आपण? तो उत्तराची जुळवाजुळव करत होता ……तोच……

त्याच्या खांद्यावर एक हात पडला, थंडगार पण जबरदस्त पकड असलेला…….

…………………………………………………………………………………

घामाघूम होतच सुजय स्वप्नातून जागा झाला. हे असलं विचित्र स्वप्न? सायलीने आपल्याला बघितलं की नाही ते कळलंच नव्हतं त्याला. त्याने उठून लाईट्स लावले. पाणी पिऊन तो खिडकीपाशी येऊन उभा राहिला.

कसलं भलतं स्वप्न पडलं मला? विचित्र आणि भयानक. मला एवढं अस्वस्थ का वाटतंय? की घाबरलोय मी? स्वप्नात सायलीने मला बघितलं की काय ह्या विचाराने मी अस्वस्थ आहे की आणखी कशामुळे? आणि ती अंधारातून पुढे येणारी आकृती? ती एकामागे एक अशी असलेली दोन घरं, तो रस्ता, सगळं मी बघितल्यासारखं वाटतंय आधी कुठेतरी. मी जाऊन आलोय का आधी अशा ठिकाणी? ते दृश्य बघितल्यामुळे मी अस्वस्थ झालोय का?”

त्याच्याच मनातले प्रश्न त्याला असह्य होत होते. त्याने घड्याळात बघितलं, रात्रीचे २.४० वाजले होते. आता झोप येणं शक्यच नव्हतं. कॉफी करून घेऊया, म्हणून तो किचन च्या दिशेने निघाला पण मध्ये हॉलमध्ये येताच पुन्हा थबकला. स्वप्नातलं ते दृश्य त्याला आठवलं. त्याने सगळीकडे नजर फिरवली. सगळं फर्निचर, वस्तू जागच्या जागी तशाच होत्या. स्वप्नंच होतं ते. तरीही अंधार नकोसा वाटत होता आता. त्याने जाऊन आधी लाईट्स लावले.

कॉफी घेत टीव्ही बघावा म्हणून त्याने टीव्ही लावला. पण खरं तर तो विचारात बुडाला होता.

“आत्ता जे घडलं, त्याचा काय अर्थ होता? ‘तीपरत आलीये का? याही वेळी? सायलीशी शक्य तितक्या तुटकपणे वागून, शक्य तितक्या कमी वेळा तिला भेटून मी काळजी घेतली आहे. पण प्रत्येक वेळेला तिला टाळणं पण शक्य नव्हतं. पहिलीदुसरी भेट तर अर्थात आवश्यकच असते, लग्न ठरवण्यासाठी. खरेदीच्या वेळेला मी गेलोच नसतो तर तिला नक्कीच शंका आली असती. पण तरीही अगदी शेवटी फक्त १५ मिनिटांसाठी भेटलो तिला. त्यानंतर तीच अचानक घरी आली,ऑफिस च्या मिटिंग वरून. तिला भेटण्यावाचून पर्याय नव्हता. आणि आज साखरपुड्यात आम्ही पुन्हा भेटलो. ज्या ज्या दिवशी आम्ही भेटलो, त्या त्या दिवशी तीदिसली असेल का सायलीला? दिसली असेल तरी तिला माझा काही संबंध आहे, हे दुरदुरपर्यंत जाणवणार नाही, आय मीन जाणवायला नकोय. म्हणून तर इतक्या कमी वेळा भेटलो मी तिला. तिला सारखं भेटलो असतो आणि ती‘ पुन्हा-पुन्हा आली असती तर कदाचित हा योगायोग म्हणून तरी तिच्या समोर आला असता आणि कदाचित त्यानंतर तिने मला जाब तरी विचारला असता किंवा शोध तरी घायचा प्रयत्न केला असता. मागे हीच चूक झाली माझी. पण आता परत नाही. खबरदारी म्हणून फोनवर पण जास्त वेळा नाही बोललो तिच्याशी.”

दुसऱ्या क्षणी तो सावरून, ताठ बसला.

“बी पॉझिटिव्ह सुजय असलं काहीही होणार नाही. सगळं ठरवून, नीट आखून खेळतोयस तू. आणि ह्या वेळेला तुला जिंकायचंच आहे.”

त्याने एक क्षण हातातल्या कॉफीकडे बघितलं आणि दुसऱ्या क्षणी तो हळवा झाला होता.

काय चाललंय माझ्या आयुष्यात? कुणाला खरं तरी वाटेल का हे सगळं? मलाही वाटलं नसतं, जर माझ्या आयुष्यातच ते घडलं नसतं. लहानपणी भूत, आत्मा, हडळ, जखिण असल्या कसल्या कसल्या गोष्टी ऐकून घाबरून रात्री पांघरुणात शिरूनही जागे राहायचो, पण तेव्हाही मनात कुठेतरी माहित असायचं, की हे असलं काही नसतं. पण आता काय समजाऊ मनाला? मला प्रत्यक्ष काही दिसत नसलं तरी बाकीच्यांना येणारे अनुभव खोटे नक्कीच नाहीत ना. काय करतोय मी हे? कशासाठी? लग्न करण्यासाठी? खोटं बोलून?

नाही केलं लग्न तर काय बिघडणार आहे? कुठल्या मार्गाने जातोय मी? किती वेगळा होतो मीकुठे गेली माझी स्वतःची फ्युचर घडवण्याची ईच्छा, ती पॅशन, महत्वाकांक्षा? खरंच, सोडून देऊ का हे सगळं? सुखाने आयुष्य जगता येईल मलाही. ते टेन्शन, सतत खोटं बोलणं, खोटं वागणं, ह्यातलं काहीच नसेल मगसायलीला सरळ सांगून टाकावं, मला लग्न करायचं नाही म्हणून……”

दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

नाही, असले इमोशनल विचार करून चालणारच नाही. मला जिंकायचंय. बासमला इतकंच माहिती आहे…. मी का म्हणून एकटा राहू? ती ही माझी तशी ईच्छा नसताना? हे माझं लाईफ आहे आणि इतर कोणीही ते कंट्रोल करू शकत नाही. मला सायली आवडली आहे आणि तिलाही मी आवडलोय, तर आमचं लग्न होणारच. इतके दिवस खोटं बोललो, आता आणखी थोडं. एकदा लग्न झालं कि तीपरत येणार नाही. आम्ही आमचं आयुष्य जगायला मोकळे……”

————————————————————————————————–

त्या रात्री सिद्धार्थही जागाच होता. सुजयच्या संशयास्पद बोलण्यामुळे, वागण्यामुळे त्याची झोपच उडाली होती. त्याला आता आपण पुढे काय करायचं ते सुचत नव्हतं. सायलीच्या कानावर घातलं, तर तिला कदाचित ते आवडलं नसतं. उलट, तिच्या मनात सुजयबद्दल गैरसमज निर्माण करू पाहून तो तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय असा तिला वाटू शकलं असतं. आणि तसं काही झालं तर ती आपली मैत्रीणही राहणार नाही, ह्याची सिद्धार्थला खात्री होती. पण हे सगळं असंच सोडून द्यावं असंही त्याला वाटत नव्हतं. सायली आपली एवढी चांगली, जुनी मैत्रीण आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल काही विचित्र कळलं तर ते तिला सांगण्याची, निदान ते खरं आहे की खोटं ते तरी तपासून बघण्याची जबाबदारी आपल्यावर आहेच, असं त्याला वाटत होतं. सायलीच्या बाबतीत काहीच चुकीचं, भलतं घडू नये अशी त्याची मनापासून ईच्छा होती.

त्याने पुन्हा, पुन्हा साखरपुड्यात झालेला तो सगळं प्रकार आठवून बघितला. पुढे काय करावं, कोणाला सांगावं, सुजयबद्दल माहिती कशी काढावी ह्या सगळ्या प्रश्नांनी तो कासावीस झाला. विचार करत करत तो येरझाऱ्या घालू लागला. फेऱ्या मारता मारता त्याची नजर सहज कोपऱ्यातल्या टेबलवरच्या वहीकडे गेली.

शेजारचा प्रथमेश आठवड्यातून दोन वेळा त्याच्या आईकडे मराठी शिकायला यायचा. ७ वी का ८ वीत होता तो. इंग्लिश मिडीयम मध्ये शिकताना मुलाचं मराठी मागे पडू नये म्हणून त्याची आई त्याला सिद्धार्थच्या आईकडे मराठी भाषा शिकायला पाठवायची. सिद्धार्थची आई काही शिक्षिका वगैरे नव्हती पण त्यांना शिकवायची आवड होती. सध्या त्यांचा मराठी म्हणी हा विषय चालला होता. प्रथमेशने त्याला शिकवलेल्या काही सोप्या म्हणी आणि त्याचे अर्थ एकेका पानावर लिहिलेले होते.

ती वही बघून सिद्धार्थ तिथेच थांबला. वही उघडी होती आणि वाऱ्यामुळे त्याची पाने फडफड उडत होती. त्यातलंच उघडं असलेलं पान आता सिद्धार्थच्या समोर होतं. त्यावर लिहिलेली म्हण होती, “काखेत कळसा, गावाला वळसा.” आणि त्याच्या खाली अर्थ लिहिला होता , ” एखादी गोष्ट आपल्या समोर किंवा आपल्याकडेच असूनही ती इतर सगळीकडे शोधत बसणे.”

सिद्धार्थला एकदम त्याचे शाळेतले दिवस आठवले. ही म्हण त्याची सगळ्यात आवडती होती. कसली कमाल म्हण आहे, चार शब्दात मनुष्यस्वभावाबद्दलचं आणि विनोदी सवयीचं एक सत्य किती छान सांगितलंय त्यात. ओठातल्या ओठात हसत त्याने वही बंद केली. मनात मात्र एका ऱ्हीदम मध्ये ती ओळ म्हणणं चालूच होतं. “काखेत कळसा, गावाला वळसा. काखेत कळसा, गावाला वळसा.” एक मिनिटानंतर मात्र त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा साखरपुड्याचे ते सगळे प्रसंग यायला लागले. पण तोंडी मात्र तेच घोळत होतं, “काखेत कळसा, गावाला वळसा“. आणि त्याच्या पुढच्याच क्षणी त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. त्या त्याच्या आवडत्या म्हणीनेच त्याचं काम केलं होतं. ते सगळे प्रसंग डोळ्यांसमोर आल्यावर, एखादी गोष्ट समोर आहे पण आपल्या लक्षात येत नाही आणि आपण इतरत्र ती शोधत राहतो, हेही त्याच्या मनात येउन गेलं. दोन्ही विचारांची जणू सांगडच घातली गेली आणि एका क्षणात त्याला त्याचा मार्ग सापडला.

ओह गॉड, हाऊ कुड आय फरगेट….मी एवढा वेळ विचार करतोय, पण माझ्या लक्षातच नाही आलं, की ज्याच्यामुळे आज हे कोडं पडलंय, तोच ह्या कोड्याचं उत्तरही असणार. कौस्तुभ ….यस….कौस्तुभ काय ते खरं सांगू शकेल. त्याला जाऊन भेटलं पाहिजे. कधी, कसं, सगळं ठरवायला हवं. थॅंक गॉड, फॉर शोयिंग मी माय वे. अँड लॉट्स ऑफ थॅंक्स टू यु, माय डियर फ्रेंड प्रथमेश.”

पुढच्या १५ मिनिटातच त्याला शांत झोप लागली.

——————————————

दुसऱ्या दिवशी खाणंपिणं झाल्यावर मावशी आणि ईशा निशा जायला निघाले. दोनतीन दिवस घरात सगळे असल्यामुळे घर किती भरल्यासारखं वाटत होतं. सायलीला आता एकटेपणा नकोसाच व्हायला लागला होता. ईशा होती त्यामुळे तिच्याशी सगळंच बोलता येत होतं. आपल्या आयुष्यात आता काय होणार आहे नक्की, तिचं तिलाच कळत नव्हतं. ती रात्रभर विचार करत होती, उलटसुलट. एकदोन वेळा तर, जाऊदेत, सुजय कसाही असुदेत, आपण लग्न मोडून टाकूया, ही रिस्कच नको, असंही तिच्या मनात येउन गेलं. पण नंतर शांत झाल्यावर त्यातलं फोलपण तिलाच जाणवलं. साखरपुडा होऊन गेल्यावर सगळ्या गोष्टी आता इतक्या सोप्या राहिल्या नव्हत्या. साखरपुडा झाल्यावरही पटापटा मोडणारी लग्नं, हे टीव्ही सिरिअल मध्ये बघायला ठीक असतं. खऱ्या आयुष्यात असं वागताना शंभरदा विचार करावा लागतो. सुजयला विचारावं, तर तो खोटं बोलणार नाही, ह्याची ग्यारेंटी नव्हती. ह्या सगळ्या परिस्थितीत सुजयला कळू न देता, त्याची जमेल तितकी माहिती काढून ती तपासून बघणं हाच मार्ग होता.

निघताना ईशा सायलीला म्हणाली,

टेक केअर सायली. काहीही वाटलं तरी फोन कर. मी विकेंड ला येतेच इकडे.”

 

तू इथे होतीस ते खूप बरं होतं गं. आता आपल्याला असं समोरासमोर बसून बोलता येणार नाही. सगळं काही मला एकटीलाच हॅंडल करायचंय असं वाटून जरा टेन्शन येतंय मला. ” सायलीला खरंच सगळ्याचं दडपण आल्यासारखं वाटत होतं.

 

अगं बाई, मी आहेच ना पण तुझ्याबरोबर. आता प्रत्येक विकेंड ला भेटू आपण. फोनाफोनी तर होतंच राहील. आणि एवढं टेन्शन काय घायचं त्यात? आता ठरवलं आहे ना, मग मागे फिरायचं नाही, काय ? बरं ऐक, मी आज रात्री आई आणि ताई झोपल्या की आरामात इंटरनेट ऑन करून आपली शोधमोहीम सुरु करणार आहे. तुला जमत असेल तर तू पण ऑनलाईन राहा तेव्हा. फोन वर बोलताना कुणी ऐकलं, असं नको व्हायला. आपण चॅटिंगच करुया. ओके?” ईशा

 

ओके. तू पण काळजी घे. ” सायली

 

अगं ईशा, झालं का तुमचं? निघायचं का?” मावशीची हाक आली तशा दोघीही बाहेर गेल्या.

——————————————–

त्याच दिवशी दुपारी सुजय लॅपटॉप वर गेम खेळताखेळता विचार करत होता,

साखरपुडा तर नीट पार पडला. आता लग्नासाठी सहा महिने थांबायचं तर मोठी रिस्क आहे. सहा महिन्यात मी जेव्हा जेव्हा सायलीला भेटेन तेव्हा तेव्हा तीजर तिला भेटणार असेल तर ह्या योगायोगावर सायली निश्चित विचार करेल. आणि तिला भेटणं मी टाळलं, तरी तिला संशय येणार. आता पुढे असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आम्ही मधले काही महिने भेटूच शकणार नाही किंवा असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे आमचं लग्न पुढच्या पंधरा दिवस ते एक महिन्यात होईल. थिंक सुजय….यु हॅव अ लॉट टू थिंक अँड टू डू अहेड….”

——————————————

इकडे त्याच वेळी ईशा गेल्यावर सायली घरात उगीचच सगळीकडे फिरून आली. आई शेजारी गेली होती जरा गप्पा मारायला. बाबा जरा पडले होते, त्यांचा डोळा लागला होता. अनिकेत त्याच्या सबमिशन चं काहीतरी पूर्ण करत बसला होता. सगळीकडे फिरून सायली तिच्या खोलीत आली. बेडवर शांतपणे बसली. भिंतीला टेकून तिने डोळे मिटले. आत्तापर्यंतच्या सगळ्या घटना ती नजरेसमोरून घालत होती. ती जसजसं सगळं चित्र पुन्हा पुन्हा पाहत होती, तसतसं सुजयच्या भोवती असलेलं गुढतेचं वलय अजूनच गडद होत होतं. काहीतरी नक्कीच होतं, जे तिच्यासाठी अज्ञात होतं. त्याच अज्ञाताची आता चाहूल लागली होती. त्या चाहुलीने ती एकीकडे अस्वस्थ होत होती तर दुसरीकडे सगळं सत्य शोधून काढण्याची तिची ईच्छा आणखी प्रबळ होत होती.

तिने डोळे उघडले तेव्हा तिचा चेहरा आत्मविश्वास आणि कसल्याशा निश्चयाने फुलून गेला होता. तिला आता एक क्षणही अधिक दवडायची ईच्छा नव्हती. तिने बाजूला पडलेला तिचा लॅपटॉप उचलला आणि ब्राउझर ओपन करून त्यात टाईप केलं http://www.facebook.com

——————————————————————

त्याच वेळेला सिद्धार्थ ऑफिसमध्ये विचार करत बसला होता. सायलीला बरं नाही असा तिचा फोन आला होता आणि ती आज ऑफिसला आली नव्हती. ती आली असती तर तिच्याशी बोलताबोलता तो कौस्तुभचं पूर्ण नाव विचारणार होता, सहज विचारल्यासारखं. पण आता आजचा दिवस वाया जाणार असं दिसत होतं. विचार करता करता त्याने समोरच्या त्याच्या लॅपटॉपमध्ये ब्राउझर ओपन केला आणि गुगल ओपन केलं. सायलीने सुजयच्या कंपनीचं नाव ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितलंच होतं आणि कौस्तुभ त्याच्याच ऑफिसमध्ये होता, एवढं तर सिद्धार्थला कळलं होतं. त्याने गुगल च्या साईट वर जाऊन टाईप केलं – ‘kaustubh + Glossisoft Inc ‘

———————————————————–

प्रवास सुरु झाला होता. सुजयच्या नकळत ईशासायली आणि सिद्धार्थने अज्ञाताच्या या वाटेवर पाऊल टाकलं होतं आणि दोघांच्याही वाटा वेगवेगळी वळणं घेऊन सुजयपर्यंत पोहोचत होत्या..

क्रमशः

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on January 18, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: