davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 9)

तिने डोळे उघडले तेव्हा तिचा चेहरा आत्मविश्वास आणि कसल्याशा निश्चयाने फुलून गेला होता. तिला आता एक क्षणही अधिक दवडायची ईच्छा नव्हती. तिने बाजूला पडलेला तिचा लॅपटॉप उचलला आणि ब्राउझर ओपन करून त्यात टाईप केलं http://www.facebook.com

——————————————————————

त्याच वेळेला सिद्धार्थ ऑफिसमध्ये विचार करत बसला होता. सायलीला बरं नाही असा तिचा फोन आला होता आणि ती आज ऑफिसला आली नव्हती. ती आली असती तर तिच्याशी बोलताबोलता तो कौस्तुभचं पूर्ण नाव विचारणार होता, सहज विचारल्यासारखं. पण आता आजचा दिवस वाया जाणार असं दिसत होतं. विचार करता करता त्याने समोरच्या त्याच्या लॅपटॉपमध्ये ब्राउझर ओपन केला आणि गुगल ओपन केलं. सायलीने सुजयच्या कंपनीचं नाव ऑफिसमध्ये सगळ्यांना सांगितलंच होतं आणि कौस्तुभ त्याच्याच ऑफिसमध्ये होता, एवढं तर सिद्धार्थला कळलं होतं. त्याने गुगल च्या साईट वर जाऊन टाईप केलं – ‘kaustubh + Glossisoft Inc ‘

———————————————————–

प्रवास सुरु झाला होता. सुजयच्या नकळत ईशासायली आणि सिद्धार्थने अज्ञाताच्या या वाटेवर पाऊल टाकलं होतं आणि दोघांच्याही वाटा वेगवेगळी वळणं घेऊन सुजयपर्यंत पोहोचत होत्या..

—————-भाग ८ पासून पुढे चालू——————–

भाग ८ येथे वाचा << — http://wp.me/p6JiYc-e6

 

सायलीने तिच्या फेसबुक अकाउंट वर लॉगइन केलं. फ्रेंड्स लिस्ट मध्ये जाऊन तिने सुजयच्या प्रोफाईलवर क्लिक केलं. सुजयचा क्रिकेटची बॅट हातात पकडलेला फोटो त्याचा प्रोफाईल फोटो म्हणून लावलेला होता. सायलीच्या छातीत उगीचच धडधडायला लागलं. सुजयचं हे प्रोफाईल आणि त्याने त्यावर अपलोड केलेले सगळेच फोटोज तिने आधी बरेचदा बघितले होते. पण आत्ता ती हे सगळं बघून त्याच्याबद्दल काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करणार होती. तिने त्याचे सगळे फोटोज पुन्हा, पुन्हा डोळ्याखालून घातले. त्याने पहिल्या भेटीत सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने त्याच्या मित्रांबरोबर केलेल्या वेगवेगळ्या ट्रेक्स चे फोटोज टाकले होते. काही त्याचे क्लोजअप फोटोज होते. आणखी काही वेगवेगळ्या जागी फिरायला गेल्याचे फोटोज होते. पण कुठल्याच फोटोला टायटल दिलेलं नव्हतं. ट्रेकचे फोटोज असावेत हे त्या सगळ्या ग्रुपच्या एकूण पेहेरावावरून वाटत होतं. इतर ठिकाणी फिरायला गेल्याचं आजूबाजूच्या निसर्गावरून वाटत होतं. पण एकूणच फेसबुकवरच्या इतरांच्या फोटोजपेक्षा ह्यात काहीतरी वेगळं होतं, मिसिंग होतं.

 

थोडा विचार करून सायली त्याच्या प्रोफाईलमधून बाहेर पडली आणि तिने तिच्या स्वतःच्या प्रोफाईलमधले तिचे फोटोज ओपन केले. नुकताच काही दिवसांपूर्वी अपलोड केलेला तिचा आणि गीताचा ऑफिसमधला सेल्फी तिने ओपन केला. फोटोला तिने टायटल दिलेलं होतं -‘ कॉफी ब्रेक इन ऑफिसआणि त्यात तिने गीताला टॅग केलेलं असल्यामुळे टायटलच्या बाजूला येत होतं विथ गीता मोहिते राईकर‘. फोटोला १०३ लायीक्स आणि २५ कॉमेंट्स मिळाल्या होत्या. “येस, धिस इज व्हॉट इस मिसिंग स्वतःशीच बोलताबोलता तिने पुन्हा सुजयचं प्रोफाईल ओपन केलं. त्याच्या प्रोफाईलवर एकूण १२७ फोटोज होते. पण इतर मित्रांच्या फोटोत टॅग झालेला असा सुजयचा एकही फोटो नव्हता किंवा त्याच्या १२७ फोटोज पैकी कुठल्याही फोटोत त्याने त्याच्या मित्रांना टॅग केलेलं नव्हतं. त्यामुळे समोर नुसतेच फोटोज होते, त्यात सुजयबरोबर कोणकोण आहे ते मात्र कळत नव्हतं. फोटोज ना लायीक्स आणि कॉमेंट्स होते त्यावरून त्याला ओळखणारे लोक शोधून काढता आले असते, पण ते फारच वेळखाऊ काम होतं.

 

तिने फोटोज वरून आता मोर्चा त्याच्या मेसेजेस/ टाईमलाईन कडे वळवला. तेवढ्यात उजव्या बाजूला एक चॅटिंगची विंडो ओपन झाली. सुजय ऑनलाईन होता, हे तिने बघितलंच नव्हतं.

 

सुजयने तिला लिहिलं होतं,

हाय सायली, काय चाललंय?”

सायली चमकली. मी ह्याचं प्रोफाईल बघतेय ते ह्याला कळलंय की काय? पण दुसऱ्याच क्षणी ती सावरली. असं कसं त्याला कळेल? आणि कळलं तरी काय बिघडलं? आपण सहज म्हणून कोणाचंही प्रोफाईल बघू शकतो ना? आणि आपलं तर लग्न ठरलंय त्याच्याशी. तिने टाईप केलं,

हाय. काही नाही असाच जरा टाईमपास करत होते. जरा बरं वाटत नाहीये म्हणून ऑफिसला गेले नाही आज. पण घरी बसून पण कंटाळा आलाय. “

सायलीने जे कारण सांगून ऑफिसमध्ये रजा घेतली होती, तेच कारण सुजयलाही सांगितलं.

अच्छाकाळजी घे. ताप वगैरे आलाय का?” सुजय

 

नाही आला नाहीये..पण सकाळी जरा फिव्हरिश वाटत होतं. पण तू कसा काय ऑनलाईन आत्ता? आज नेहेमीसारखा बिझी नाहीयेस वाटतं?” सायली

 

आहे ना, ऑफिसमधेच आहे. जरा ब्रेक घेतलाय. आता मिटिंग आहे, त्याआधी जरा रीलॅक्स होण्यासाठी. बरं, चल, मी साईनआउट करतोय. यु टेक केअर. बाय. “सुजय

सायलीनेही त्याला बाय असं टाईप करून चॅटिंगची विंडो बंद करून डोळे मिटून हुश्शकेलं. ती पुन्हा लॅपटॉप कडे वळणार, तेवढ्यात अनि तिच्या खोलीत आला. त्याला बघून तिने पटकन लॉगआउट केलं.

काय गं, मगाशी ऑफिसच्या फोनवर बोलत होतीस, तेव्हा मी ऐकलं, तुला बरं नाहीये? काय झालं?” अनि

 

खरं तर काहीच नाही. पण खूप कंटाळा आला होता रे, आज जायला. एक तर ईशी पण निघणार होती.” सायली

 

म्हणून बरं नाही असं सांगितलंस? वा, वा ताईसाहेब, आपका जवाब नही.” अनि

 

मग काय सांगायला हवं होतं? आज यायचा कंटाळा आलाय असं? की आज माझी मावसबहीण पुण्याला परत जाणार आहे, असं? आणि तसंही खूप अर्जंट आणि महत्वाचं काही नव्हतं आज. अक्चुअलि होती एक मिटिंग आज, खूप महत्वाची. पण ती बुधवारी रीस्केडूल झाल्याचं मेल शनिवारीच आलं होतं मला. आणि तसंही लास्ट विक मध्ये रात्री जागून काम केलंय मी, फ्रायडे ला रजा होती माझी तरी मी ऑफिसच्या मिटींगसाठी गेले होते. सो एवढं चालतंच, कळलं ना?”

सायली एका दमात हे एवढं सगळं बोलली.

मी कुठे काही बोललो पण?” अनि तिला चिडवण्याच्या सूरात बोलला. “बाय द वे, मी दोन दिवस बघतोय, ईशा आणि तुझ्यात कसली खलबतं चालली आहेत? “

हे ऐकल्यावर सायली सावरून बसली.

खलबतं? कसली खलबतं? काय बघतोयस तू दोन दिवस?”

 

हेच काहीतरी शिजतंय अशी मला शंका येतेय. काल रात्री उशिरापर्यंत वरच्या खोलीत काय चाललं होतं तुमचं? मी बघायला आलो, पण तेवढ्यात तुम्ही खाली येताना दिसलात.” अनि

 

तुला काय करायचंय? आहेत आमची काही सिक्रेट्स. कळलं ना…”सायली वैतागून म्हणाली

 

मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये, तुमच्या त्या मुलींच्या गप्पा, गॉसिप्स आणि सिक्रेट्स मध्ये. मला खरंच वाटलं, तुला बरं नाहीये असं म्हणून मी बघायला आलो. आणि मला भूक लागलीये, आई कुठे दिसत नाहीये. मी नुडल्स करून घेतोय. तुला हवंय का, ते पण विचारायचं होतं…” अनि

 

अर्थात. हे काय विचारणं झालं कायु नो, तसा तू बरा आहेस, पण कधी कधी जरा बोअर करतोस…”

सायली बोलतबोलतच अनिच्याही आधी खोलीतून बाहेर पडली.

——————————————–

सिद्धार्थ विचारात पडला होता. Glossisoft ही एक मल्टीनॅशनल कंपनी होती. त्यांच्या फक्त भारतातील सगळ्या ब्रान्चेस मधल्या एकूण इम्प्लोयीजची संख्या पंधरा हजारावर होती. त्यात कितीतरी ‘कौस्तुभ’ असतील. गुगल वर त्याने जे सर्च केलं होतं, त्याचा रिझल्ट म्हणून वेगवेगळ्या लिंक्स समोर आल्या होत्या. कौस्तुभ नावाच्या वेगवेगळ्या लोकांच्या करिअर रिलेटेड माहितीच्या बऱ्याचशा साईट्स होत्या. काही साईट्स वर त्यात्याकौस्तुभ चे फोटोज होते तर काहींवर नव्हते. काही लिंक्स वर Glossisoft कंपनीची माहिती होती.

 

एक मिनिट विचार करून सिद्धार्थने पुन्हा गुगलवर टाईप केलं – “kaustubh + Glossisoft Inc + mumbai branch ”

 

समोर आलेल्या रिझल्ट्स पैकी पुन्हा एकएक लिंक त्याने ओपन करायला सुरुवात केली. चौथ्या लिंकवर एका वृत्तपत्राची इपुरवणी होती. त्यात वेगवेगळ्या कंपनीज कशा वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत, समाजसेवा करत असतात ह्या बद्दलची बातमी होती. सहा महिन्यांपूर्वीची ती बातमी होती. त्यात इतर अजून बऱ्याच कंपनीजची नावं, त्यांच्या इम्प्लोयीजचे कुठल्यातरी सामाजिक प्रकल्पाला हातभार लावतानाचे फोटोज होते. त्यात Glossisoft Inc हेही नाव होतं, त्याखाली Glossisoft च्या काही इम्प्लोयीजचा फोटो होता. त्यात कौस्तुभचा फोटो सिद्धार्थला दिसला. कुठल्यातरी आदिवासी भागाला भेट देऊन त्यांनी कंपनीतर्फे तिथल्या लोकांना मोफत कपडे, औषधं, अन्नपदार्थ, मेडिकलचेक अप वगैरे गोष्टी पुरवल्या होत्या. त्यावेळचा तो फोटो होता. सिद्धार्थने अधीरपणे ती बातमी वाचायला घेतली. बातमीच्या शेवटची ओळ होती, ” Mr kamlesh sharma , Mr Pankaj Sonavane , Mrs Sonali Valunj from Pune branch and Ms Shobha Narkar and Mr Kaustubh Paranjape from Mumbai branch were actively involved in this entire initiative .”

येस, येस, येस …”

सिद्धार्थ जोरात ओरडला तसा त्याच्या मागच्या बाजूला बसलेला त्याचा एक कलीग त्याच्या इथे आला.

काय रे, काय झालं ओरडायला? लास्ट विक पासून जे काम लटकलं होतं, ते झालं वाटतं?”

अरे ते नाही, त्याच्याहून मोठ्ठं काम झालंय….”

सिद्धार्थ खुशीत येउन म्हणाला.

त्याला कौस्तुभ चं पूर्ण नाव कळलं होतं.आता कौस्तुभला शोधणं सोप्पं होणार होतं

कौस्तुभ परांजपे, Glossisoft Inc , मुंबई ब्रांच.”

स्वतःशीच पुन्हा पुन्हा पुटपुटत सिद्धार्थ कॉफी पिण्यासाठी गेला.

—————————————

त्या दिवशी रात्री सायली आणि ईशा ऑनलाईन आल्या. आधी ठरवल्याप्रमाणे फोनवर न बोलता चॅटिंग करायचंच त्यांचं ठरलं होतं.

सायली, काही वेळ मिळाला का गं तुला बघायला? ” ईशा

 

हो. मगाशी लॅपटॉप घेऊन बसले होते मी जरा वेळ. फेसबुकवर लॉगईन केलं होतं. फोनवर नुसते अपडेट्स बघायला ठीक वाटतं गं..नीट काही बघायचं असलं की लॅपटॉपच बरा पडतो…” सायली

 

हम्म….बघितलंस का सुजयचं प्रोफाईल? “ईशा

 

हो. बघितलं. आय मीन, त्याचे फोटोज परत बघितले मी. यु नो ईशा, त्याच्या फेसबुक अकाउंट वर जेवढे फोटोज आहेत ना, ते सगळे त्याने अपलोड केलेले आहेत. म्हणजे, त्याला कोणीही टॅग केलेलं नाही आणि त्यानेही कोणाला टॅग केलेलं नाही.” सायली

 

एक मिनिट, म्हणजे काय? “

ईशाला सायली काय बोलतेय ते कळत होतं, पण त्याचा पक्का अर्थ लागत नव्हता.

हे बघ, म्हणजे फेसबुकवर तू समजा माझ्या प्रोफाईलवर जाऊन बघितलंस, तर तुला मी स्वतः अपलोड केलेले फोटोज तर दिसतीलच पण इतर कुणीही त्यांच्या फोटोत मला टॅग केलं असेल तर ते फोटोज पण माझ्या प्रोफाईल मध्ये तुला दिसतील. तसंच, मी माझ्या फोटोजमध्ये ज्या,ज्या लोकांना टॅग केलं असेल त्यांची नावं मला त्या फोटोच्या टायटलच्या बाजूला दिसतील. बरोबर ना? ” सायली

 

हो बरोबर आहे…” ईशाला आता अर्थ लागत होता.

 

मग सुजयच्या फोटोज मध्ये ह्या दोन्ही गोष्टी नाहीयेत. त्याने फक्त फोटोज अपलोड करून ठेवलेत, त्यात कोणाला टॅग केलेलं नाही की कुठल्या फोटोला टायटल दिलेलं नाही…” सायली

 

अच्छा….फोटो टॅगिंगचं काहीतरी सेटिंग असतं फेसबुकवरकदाचित त्याने ते ऑफ ठेवलं असेल, म्हणून तो टॅग नसेल होत इतर कुणाच्या फोटोत….” ईशा

 

हो, ती शक्यता आहे…”सायली

 

तरीही आपण नोट डाऊन करून ठेऊ हा पॉइण्ट. चल आता मी पण लॉगईन करते फेसबुकवर आणि सुजयचं प्रोफाईल परत बघुया आपण. यु नो, परवा माझ्या डोक्यात आलं ना त्याचं फेसबुक अकौउन्ट चेक करायचं, त्याच दिवशी मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. काहीजण त्यांचे मेसेजेस, टाईमलाईन, फोटोज सगळं फक्त फ्रेंडस बरोबर शेअर करतात, म्हटलं, मी त्याच्या फ्रेंडस लिस्ट मध्ये असलेली बरी…..” ईशा

पुढचा अर्धा तास त्या दोघी सुजयचं प्रोफाईल नीट नजरेखालून घालत होत्या. त्याच्या फ्रेंड्सनी त्याला लिहिलेले मेसेजेस, त्याच्या टाईमलाईन वरून शेअर केलेली प्रत्येक पोस्ट, फोटो, सगळंच. पण काही खटकेल, असं काहीच नव्हतं त्यात.

ईशाचा उत्साह मावळला. तिला टाईप करण्याचाही कंटाळा आला होता.

काहीच मिळत नाहीये यार. मी फोन करू का तुला? टाईप करायला पण कंटाळा आलाय.”

ओके.” सायली

ईशाचा फोन आला तसा सायलीने जाऊन बेडरूमचा दरवाजा लाऊन घेतला. खिडकीही लाऊन घेतली. अनि जागा असेल तर त्याला परत संशय यायला नको, असं तिच्या मनात येउन गेलं.

काय गं, तूच म्हणाली होतीस ना, ऑन लाईनच बोलू. फोन नको. आता काय झालं?” सायली

 

काही नाही. टाईप करून बोअर झालं. आणि सुजयच्या प्रोफाईलमध्ये काही मिळत नाहीये. ” ईशा

 

झालं का? मावशी आरंभशूर म्हणते तुला ते बरोबर आहे. एवढी हुशार, कॉनफिडन्ट, कशालाही न घाबरणारी आहेस, पण ह्यात मार खातेस तू नेहेमी ईशी. एकदाच बघितलंय ना आपण? मग लगेच काही नाही मिळालं तर सोडून पुढे जायचं का? ” सायली

 

ए बाई, तू लेक्चर देणार आहेस का आता मला? “

ईशा वैतागून असं म्हणाली खरं, पण सायली म्हणतेय ते खरं आहे हे तिलाही मनातून पटलेलं होतं. तिचं नेहेमी असं व्हायचं, सुरुवातीला उत्साह असायचा. पण मग मनासारखे रिझल्ट्स मिळाले नाहीत की तिला त्या गोष्टीचा पाठपुरावा करायलाच कंटाळा यायचा.

 

सायलीचं मात्र तसं नव्हतं. ती एखादी गोष्ट पूर्णपणे पटल्याशिवाय मनावर घ्यायचीच नाही मुळी. पण मनावर एकदा का घेतलीकी मात्र त्याचा ध्यास घेतल्यासारखी त्या गोष्टीत स्वतःला गुंतवून घायची. त्या बाबतीत तिची जिद्द आणि चिकाटी खरंच कौतुक करण्यासारखी होती. ईशाला हे माहित होतं, त्यामुळे ती अजून वाद घालायच्या फंदात पडली नाही.

लेक्चर द्यायला मला आवडत नाही आणि तो माझा स्वभावही नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, आत्ता काही मिळालं नसेल. आपण पुन्हा बघू. या वेळी आपण मध्ये मध्ये चॅटिंग करतो ते बंद करू. आपण आपापल्या नजरेने त्याचं प्रोफाईल पुन्हा बघू आणि मग बोलूया. कदाचित आधी लक्ष गेलं नाही अशा काही गोष्टी दिसतील.” सायली

 

ओकेईशा

 

कंटाळा नाही ना आलाय तुला? आणि हे बघ, फोनवर नको बोलायला. तू पिंग कर मला. अनिला आधीच आपल्यावर डाऊट आलाय. मला विचारत होता तो, तुमचं काय चाललंय वगैरे..उगाच त्याला आवाज गेला तर त्याची खात्रीच पटेल आता..” सायली

 

हो, बरं.. चल मी ठेवते फोन. ” ईशा

सायली आणि ईशा दोघीही आपापल्या परीने सुजयच्या फेसबुक प्रोफाईलचा अभ्यासकरायला लागल्या.

 

ईशा पुन्हा एकदा त्याचे फोटोज पाहत होती. या वेळी तिने आपला मोर्चा त्याच्या फोटोजवर आलेल्या कॉमेंट्सकडे वळवला. प्रत्येक फोटोवरची कॉमेंट ती वाचत गेली. असे २०२५ फोटोज झाले असतील. मग एक गोष्ट हळूहळू तिच्या लक्षात येत गेली. ती पुन्हा मागे गेली, पुन्हा पुन्हा त्या कॉमेंट्स वाचल्या. मग तिने त्यानंतरचे फोटोज बघितले. त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचल्या. ज्या गोष्टीची नोंद तिच्या मेंदूने घेतली होती, ती गोष्ट खरंच तितकी महत्वाची होती का? आत्ता या क्षणी तिला ते माहित नव्हतं. पण सुजयच्या प्रोफाईल मधली खटकणारी आणखी एक गोष्ट तिला सापडली होती, फोटोज खालच्या कॉमेंट्स मधून. आता ती सायलीचा मेसेज यायची वाट बघणार होती.

 

सायली पुन्हा एकदा सुजयला त्याच्या टाईमलाईन वर आलेले मेसेजेस, पोस्ट्स वाचत होती. सुजयने शेअर केलेले पोस्ट्स, पोस्ट केलेले बर्थडे मेसेजेस, त्याच्या मित्रांनी त्याच्या टाईमलाईन वर लिहिलेले मेसेजेस वगैरे सगळंच वाचत गेली.

 

हळूहळू ती आणखी मागच्या पोस्ट्स वाचायला लागली. त्यानंतर अजून मागच्या, मग थोडं अजून मागच्या……वाचता वाचता एका क्षणी ती थांबली. इतक्या वेळा त्याचं प्रोफाईल बघूनही एक बारीकशी गोष्ट तिच्या आणि ईशाच्या नजरेतून निसटली होती. तिने पुन्हा पुन्हा वरखाली स्क्रोल केलं. हो, काहीतरी चुकतंय, नक्कीच. दोन मिनिट्स ती त्या गोष्टीवर विचार करत राहिली आणि मग नंतर तिने बाजूची चॅटिंग ची विंडो ओपन करून ईशाला मेसेज टाकला.

यु देअर ?”

ईशा तिच्या मेसेजची वाटच पाहत होती.

येस. मी कुठे जाणार? आणि आता तर मला झोपही येणार नाही कदाचित….” ईशा

 

म्हणजे? काही मिळालं का तुला?” सायली

 

हा म्हणजे, त्यातून काही ठामपणे सांगू नाही शकत आपण, पण खटकण्यासारखी गोष्ट नक्कीच आहे.” ईशा

 

ओके, देन यु टेल मी फर्स्ट. मला पण तुला काहीतरी सांगायचंय. ” सायली

 

ओके. त्याचे फोटोज परत ओपन कर. आणि आता त्याखालचे कॉमेंट्स बघ.” ईशा

 

थांब जरा……………हा केले ओपन फोटोज. आता कॉ…..में…ट् ..” सायली

 

मी काय केलं, प्रत्येक फोटो खालचा प्रत्येक मेसेज पुन्हा पुन्हा वाचला.ऑलमोस्ट सगळ्या फोटोजचे मेसेज वाचले मी. तू नीट बघितलंस तर तुला कळेल, की काही ठराविक ५६ च मित्र त्याला फोटोला कॉमेंट्स टाकतायत. सगळ्या फोटोजमध्ये फक्त आणि फक्त या ५६ लोकांनीच मेसेज टाकलेत.” ईशा

 

एक मिनिट..थांबमी पण बघते.”

सायलीने पटापट १०१२ फोटोज ओपन करून त्याखालचे मेसेजेस वाचले.

ईशाखरंच गंही गोष्ट आपल्या आधी कशी लक्षात नाही आली…” सायली

 

आणि त्या कॉमेंट्स पण नीट वाचकाही ठरावीकच मेसेज लिहिलाय त्यातम्हणजे ऑसम‘,’नाईस क्लिक‘,’नाईस फोटो‘, ‘वंडरफुल‘, ‘सुजय रॉक्स‘, वगैरे आणि आणखी काही शब्द आहेत, पण तेच तेच शब्द वापरलेत सगळ्या कॉमेंट्स मध्ये आलटूनपालटून.” ईशा

 

आपण आधी बघितलं तेव्हा सगळे फोटोज नीट बघितले, काही फोटो खालच्या कॉमेंट्स पण वाचल्या, पण काय आहे, कुणी लिहिलंय, एवढं डिटेलमध्ये नाही बघितलं.” सायली

 

हम्मबर आता तू काय सांगणार होतीस ते सांगईशा

 

हो. त्याच्या टाईमलाईन वर जा आणि त्याचे पोस्ट्स, मेसेजेस सगळं सुरुवातीपासून बघ.” सायली

 

ओके. बघते.” ईशा

 

एक मिनिट, बघ म्हणजे, सगळं वाचत बसू नकोस आत्ता, मी सांगते तुला, मग त्या दृष्टीने बघ.” सायली

 

सांगईशा

 

मी काय केलं, सगळं वरपासून खालपर्यंत वाचत गेले नुसतं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, की मधला काही काळच गायब आहे. आय मीन, आजपासून साधारण महिनाभर आधीपर्यंत त्याच्या प्रोफाईल मध्ये रेग्युलर अपडेट्स आहेत, म्हणजे कोणी काहीतरी शेअर केलंय, त्याला काहीतरी मेसेज लिहिलाय, वगैरे. पण जसजसं मी मागेमागे वाचत गेले, तसं माझ्या लक्षात आलं, की मध्ये दीड ते दोन वर्ष त्याच्या प्रोफाईलवर काहीच हालचाल नाही, कोणाचे मेसेजेस नाहीत, शेअर केलेले पोस्ट्स नाहीत. आणि त्याच्याही आधी ते सगळं आहे.” सायली

 

थांब,थांब, मी बघते.” ईशा

सायली म्हणत होती ते खरंच होतं. आत्ता जानेवारी महिना. जानेवारी २०१६. नोव्हेंबर २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे साधारण दीड, पावणेदोन महिने त्याच्या प्रोफाईल मध्ये सगळं ठीक वाटत होतं, पण त्याआधीची पोस्ट बघायला गेलं तर ती होती, जानेवारी २०१४ ची. आजपासून दोन वर्ष आधीची. आणि त्याच्या २०१५ मधल्या पोस्ट पासून, म्हणजे नोव्हेंबर २०१५ पासून साधारण पावणेदोन वर्ष आधीची. मग मध्ये हे पावणेदोन वर्ष, म्हणजे १ वर्ष १० महिने ( जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१५ ), सुजयचं प्रोफाईल काहीच दाखवत नव्हतं. म्हणजे हा काळ सुजय फेसबुक पासून लांब होता? पण का? ईशा विचार करत होती.

ईशी, मला आणखी एक गोष्ट सापडली.”

सायलीच्या मेसेज मुळे ईशा तिच्या विचारचक्रातून बाहेर आली.

काय?” ईशा

 

तू जे फोटोच्या कॉमेंट्स चं म्हणालीस ना, त्या लोकांची नावं मी बघितली परत, आणि त्याच्या टाईमलाईन वर जाऊन परत बघितलं. तर ईशी आत्ता गेल्या दीड महिन्यात त्याला फक्त ह्याच लोकांकडून मेसेज आलेत, आणि ह्याच लोकांनी त्याच्या टाईमलाईन वर सगळ्या पोस्ट्स टाकल्यात. त्या आधीचे, म्हणजे जानेवारी २०१४ च्या आधीचे त्याचे मेसेजेस अजूनच वेगळ्या फ्रेंड्सनी लिहिलेत, त्यात हे ५६ जण दिसत नाहीत. आणि आत्ताच्या मेसेजेस मध्ये त्याचे आधीचे फ्रेंड्स दिसत नाहीत कळलं का? ” सायली

 

माय गॉड, हे काय आहे सगळं?” ईशा 

 

म्हणजे, सुजयचे तेव्हाचे आणि आत्ताचे मित्र वेगळे आहेत? असं कसं पण? काही कारणाने जुनी मैत्री तुटू शकते, हे खरं आहे..पण आधीच्या एकाही मित्राचा मेसेज, किंवा काहीच कसं नाही?” सायली

 

आणि त्याहून महत्वाचे म्हणजे, मधली पावणेदोन वर्ष तो फेसबुकवर आक्टिव का नव्हता? ” ईशा

 

आपला संशय बरोबर आहे ईशी. काहीतरी नक्कीच गूढ आहे सुजयच्या बाबतीत. वरवर बघितलं तर तसं सगळं ठीक वाटतं, पण नीट विचार केला, एकएक गोष्ट नीट जुळवायला घेतली की लक्षात येतं, काहीतरी गडबड आहे.” सायली

 

हम्मखरं आहे..एकच कळत नाहीयेत्या विचित्र योगायोगाबद्दल विचार केला, त्यानंतर मी त्याचं फोनवरचं बोलणं, साखरपुड्यातलं वागणं सगळं नीट ऑब्झरव्ह केलं. तो काहीतरी लपवाछपवी करतोय किंवा काहीतरी सारवासारव करतोय असं मला सारखं वाटायचं, पण हे खरं असेल तर मग दुसरा प्रश्न असा पुढे येतो की तो हे का करतोय, कशासाठी? नक्की काय लपवायचंय त्याला?” ईशा

 

कळेल, लवकरच कळेलकळायलाच हवं..आणि आपण शोधून काढूच….माझा इतका संतापसंताप होतोय ना इशीकुणीतरी मला फसवतंय, माझ्या आईबाबांना फसवतंय, मला ते कळतंय हळूहळूआणि तरीही मी गप्प आहे…”

सायलीने ज्या प्रकारे हे लिहिलं होतं, त्यावरूनच ईशाला जाणवलं, की ती अतिशय संतापली आहे आणि आत्ता तिच्याशी बोलायची गरज आहे.

तिने सायलीला फोन केला. तिने तिला कसंबसं समजावलं. शांत केलं. मग दोघींनी ठरवलं, की आत्तासाठी इतकंच पुरे. आता पुढे कसं जायचं, आणखी माहिती कशी काढायची हा प्रश्न होताच. पण आत्ताच एवढी घाई करायची गरज नव्हती. अजून लग्नाला ५ महिने होते. पुढचे दोन दिवस आपण आणखी विचार करू आणि पुढचा प्लान तयार करू, असं त्यांनी ठरवलं.

पण तिकडे सुजयच्या मनात काय चाललं होतं, त्याचा कोणता प्लॅन तयार होत होता, त्यांना आता कोणकोणती दिव्यं पार करायची होती, ह्याची त्या दोघींनाही कल्पना नव्हती.

———————————————————-

सुजय बेचैन झाला होता. त्याला पडलेल्या प्रश्नामुळे त्याची झोप उडाली होती. लग्न व्हायला अजून सहा महिने होते. एवढा मोठा पिरिएड. या दरम्यान सायलीला खरंच त्याला ओळखणारी माणसं भेटली तर? ‘तीपुन्हा आली तर? त्याच्या तिच्याशी कमीत कमी बोलण्यामुळे आणि कमीत कमी भेटींमुळे तिला शंका आली तर? त्याने प्रचंड मोठी रिस्क घेतली होती. ही सगळी खटपट करताना त्याने आजपर्यंत फक्त आपला साखरपुडा कसा निर्विघ्न पार पडेल एवढाच विचार केला होता. त्यासाठी सगळी खबरदारी घेतली होती. त्याचा सगळा अभ्यास, सगळं प्लान्निंग केलं होतं. पुढेही बरंच काही जमवायला लागणार आहे, एवढी त्याला कल्पना होती. पण आता ती वेळ येउन ठेपली होती. साखरपुडा त्याने ठरवलं होता, तसा झाला होता. आता लग्नापर्यंत सगळं सुरळीत होऊ द्यायचं, ही महाकठीण गोष्ट होती. पण जीवाचं रान करून तो त्यासाठी प्रयत्न करणार होता.

 

त्याच्या दृष्टीने दोन गोष्टी त्याच्यासाठी, त्याच्या उद्दिष्टासाठी सगळ्यात जास्त धोकादायक होत्या. पहिली म्हणजे सहा महिने थांबणं, ज्यामध्ये सायलीला त्याच्याबद्दल संशय येण्याची आणि तो आलाच, तर त्याबद्दलचा शोध घेण्याची शक्यता खूप मोठी होती आणि दुसरी म्हणजे सायलीला भेटत राहणे. सहा महिन्यात आपण असं काय कारण काढून तिला टाळत राहणार आहोत, हे त्याला कळत नव्हतं. तिला न टाळता भेटत राहणंही धोकादायकच होतं.

 

आता तो असं काहीतरी कारण शोधून काढणार होता, ज्यायोगे त्याला सहा महिने थांबण्याची गरज पडली नसती. किंवा सहा महिने थांबलं तरी सायलीला न भेटण्यासाठी काही कारण द्यावं लागलं नसतं.

 

त्याच्या कोड्याचं उत्तर त्याला लवकरच सुटलं. आता तो यामध्ये पारंगत झाला होता. अशा कोड्याची उत्तरं मिळवणं त्याच्यासाठी फार कठीण नव्हतंच मुळी. खरं चॅलेंज होतं, ते सायलीसारख्या हुशार मुलीला त्याबद्दल पटवून देण्याचं, तिला कोणताही संशय येऊ न देण्याचं.

 

त्याने घड्याळात बघितलं. रात्रीचा दीड वाजत होता. थोडा उशीर झाला होता खरा, पण चालेल कामही तितकंच महत्वाचं होतं ना. त्याने मोबाईलवर एक नंबर डायल केला. दोनतीन रिंग्स मधेच फोन उचलला गेला, पण समोरून आवाज मात्र झोपाळलेलाच येत होता.

काय रे, ही काय वेळ आहे का फोन करायची, काय झालं?”

 

सॉरी, आय नो, तुमची झोपमोड झालीये. फक्त एक महत्वाचं काम होतं तेवढं सांगायला फोन केला. तुम्ही मेसेजेस चेक नाही ना करत फारसे, म्हणून फोन केला, खरंच सॉरी…” सुजय

 

ठीक आहे, बोल, तुझ्यासाठी काहीपण….बोल

 

उद्या सकाळीच या माझ्याकडे. जरा महत्वाचं बोलायचंय आणि मग नंतर तुम्हाला देशपांड्यांना फोन करायचाय.” सुजय

क्रमशः..

Advertisements

2 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 9)

 1. Anonymous
  February 4, 2016

  please phudache bhag yeu dyat

  Like

  • rutusara
   February 5, 2016

   Hi…yes…will be uploading the next part soon..

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on January 28, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: