davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 10)

त्याने घड्याळात बघितलं. रात्रीचा दीड वाजत होता. थोडा उशीर झाला होता खरा, पण चालेल कामही तितकंच महत्वाचं होतं ना. त्याने मोबाईलवर एक नंबर डायल केला. दोनतीन रिंग्स मधेच फोन उचलला गेला, पण समोरून आवाज मात्र झोपाळलेलाच येत होता.

काय रे, ही काय वेळ आहे का फोन करायची, काय झालं?”

सॉरी, आय नो, तुमची झोपमोड झालीये. फक्त एक महत्वाचं काम होतं तेवढं सांगायला फोन केला. तुम्ही मेसेजेस चेक नाही ना करत फारसे, म्हणून फोन केला, खरंच सॉरी…” सुजय

ठीक आहे, बोल, तुझ्यासाठी काहीपण….बोल

उद्या सकाळीच या माझ्याकडे. जरा महत्वाचं बोलायचंय आणि मग नंतर तुम्हाला देशपांड्यांना फोन करायचाय.” सुजय

——————- भाग ९ पासून पुढे चालू ———————

भाग ९ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-fr

बरं येतो, आम्ही दोघेच येऊ की मी एकटाच?”

माई नाही आल्या तरी चालतील, पण आल्या तर मी खुश होईन. त्यांच्या हातचे पोहे खायला मिळतील ना….” सुजय

हा हा बरं येतो तिलाही घेऊन मग चल ठेवतो…”

हो, बाय ..” सुजय

————————————-

दुसऱ्या दिवशी नेहेमीप्रमाणे सायली ऑफिसला गेली. तिला ईशाशी शांतपणे बोलायचं होतं, म्हणून ती ऑफिसटाईम पेक्षा १५ मिनिटं लवकरच आली होती. तिच्या अपेक्षेप्रमाणेच बरीचशी लोकं अजून यायची होती, लवकर आलेले काही जण चहा प्यायला गेले होते. आजूबाजूला फारसं कुणीच नव्हतं. ती तिच्या जागेवर जाऊन बसली आणि तिने ईशाला फोन लावला.

गुड मॉर्निंग सायले,…काय झोप लागली का काल? ”

 

बराच वेळ नाही लागली, पण नंतर लागली. सकाळी डोळे उघडत नव्हते. ,बरं तू गडबडीत आहेस का?” सायली

 

फारशी नाही गं, जस्ट पोहोचतेय ऑफिसमध्ये. स्कुटीच पार्क करतेय. बोल तू.” ईशा

 

ओके. मला रात्री झोपच येत नव्हती गं. सारखा सुजयच्या प्रोफाईलमध्ये काय गूढ आहे, हाच विचार मी करत होते. पूर्वी जे मित्र त्याला मेसेजेस करत होते, ते आता का करत नसावेत? त्यांच्यापैकीच बरेचसे लोक आता त्याच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये का नाहीयेत?” सायली

 

तू परत परत कशाला तोच तोच विचार करतेयस? आपण शोधून काढू नापुढे काय करायचं ते ठरवू आपण लवकरच..” ईशा

 

ते तर ठरवूच गं. पण मग मी ठरवलं की आपणच जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू. काय होतं ना, की आपण नेहेमी आपल्याच व्हयूपॉईन्टनी विचार करतो. किंवा आपल्या बाबतीत एखादी गोष्ट जशी घडते किंवा घडू शकते, तोच निकष आपण बाकीच्यांना लावतो. म्हणजे बघ ना, उद्या तुझ्या प्रोफाईल मध्ये मला असं दिसलं की तुझ्या आधीच्या काही मैत्रिणी तुला पूर्वी पाठवायच्या तसे मेसेजेस पाठवत नाहीयेत, तर माझ्या डोक्यात पहिले हाच विचार येणार की तुमच्यात काहीतरी फिसकटलंय आणि आता त्या तुझ्या तितक्याश्या चांगल्या मैत्रिणी नाहीयेत कदाचित.” सायली

 

तुला काय म्हणायचंय नक्की? मला कळत नाहीये.” ईशा

 

अगं, म्हणजे आपण आपल्या डोक्यात जो विचार पहिले येतो, तोच बरोबर आहे असं धरतो बरेचवेळा, आणि मग पुढे जाऊच शकत नाही आपण. म्हणजे सुजयच्या बाबतीत सुद्धा, आपण हाच विचार केला ना, की आधी मेसेजेस करणारे मित्र आता मेसेज का करत नाहीयेत, म्हणजे कदाचित आता त्यांची मैत्री राहिली नसेलपण आपण या पेक्षा वेगळा विचारही करून बघायला हवा ना. आय डोन्ट नो, तुला कळतंय की नाही मला काय म्हणायचंय ते.” सायली

 

थोडं थोडं कळतंय. पण मग आपण काय केलं पाहिजे असं तुला वाटतंय?”

ईशा जराशी गोंधळली होती.

आपण विचार वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. आपल्या नजरेतून न पाहता, आपल्याला कधीतरी आलेले अनुभव प्रत्येक ठिकाणी लावून न बघता, समोरच्याच्या दृष्टीकोनातून विचार केला, किंवा आपण ज्या हेतूने हे फेसबुक प्रकरण हाती घेतलंय, त्या दृष्टीने विचार केला तर कदाचित वेगळ्या शक्यता समोर येतील.” सायली

 

समोरच्याच्या ….म्हणजे सुजयच्या दृष्टीकोनातून?” ईशा

 

अगं ते डिटेक्टीव्ह मुव्हीज मध्ये नाही का दाखवत, ‘आता आपण तो जो कुणी खुनी आहे, त्याच्या सारखा विचार करायचा, म्हणजे आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल‘. थोडंफार तसंच….” सायली

 

अगं मग हे सांगितलं असतंस तर लवकर कळलं असतं मला….”ईशा

 

हो गं, कळलं….हे बघ आपण असं गृहीत धरलंय ना की सुजय आपल्यापासून काहीतरी लपवतोय. आणि त्याचाच शोध घेतोय ना आपण, तर मग आपलं बेसिक अझंपशन असंच असलं पाहिजे की फेसबुक प्रोफाईलमधूनही तो त्याची खरी माहिती वगैरे लपवण्याचाच प्रयत्न करणार. आणि मग आता त्याच्या सारखा विचार करून बघायचा. म्हणजे, आपल्याला फेसबुकवरची आपली ओळख लपवायची आहे, किंवा सगळं नॉर्मल असल्यासारखं इतरांना वाटायला हवं असेल तर आपण काय करू? ” सायली

 

सायली, एकदम डिटेक्टीव्ह झाल्यासारखं वाटतंय…”ईशा

 

, टाईमपास नको ग करूस….आत्ता आजूबाजूला फारसं कुणी नाहीये म्हणून बोलता येतंय…” सायली

 

हो, हो. सॉरीबघ म्हणजे आता तू म्हणतेयस त्या दृष्टीने विचार केला तरवरवर माझं प्रोफाईल बघणाऱ्यांना माझं प्रोफाईल अगदी नॉर्मल, बाकी सगळ्यांच्या प्रोफाईल सारखं दिसायला हवंय….तर ….मी….काय ….करेन….?”

ईशाला अजून त्या भूमिकेत जाऊन विचार करायला जमत नव्हतं.

मी सांगू, मी काय करेन? एक तर, मी आत्ताचे माझे फ्रेंड्स, जे माझ्या टाईमलाईन वर माझ्यासाठी काही मेसेज टाकू शकतात, त्यांना मी आयदर डिलीट करेनकिंवा मग ते पाठवत असलेले मेसेज तरी डिलीट करेन….म्हणजे त्यांनी मेसेज पोस्ट केला की लगेच तो डिलीट करायचा जेणेकरून तो कोणीच बघणार नाही…..” सायली

 

माय गॉड, सायली तू ह्याही बाबतीत एकदम वरच्या लेवल ची स्कॉलर आहेस यार…” ईशा

 

अगं बाई, मी रात्रभर हाच विचार करत होते, तेव्हा सुचलं हे सगळं. आपण असा उलटा विचार कधी करत नाही नामग अचानक मला मी मगाशी म्हटलं, ते आठवलं..बऱ्याच डिटेक्टीव्ह मुव्हीज मध्ये असतात असली वाक्य. म्हटलं, सुजय जर खरंच काही लपवू पाहत असेल तर, मग कदाचित ह्या स्ट्रॅटेजीचा उपयोग होईल, निदान तसा विचार तरी करून बघूते जाऊदेत, तू पण विचार कर ना जरा ह्यादृष्टीनेबघ ह्या सिचुएशन मध्ये तू काय करशील..” सायली

 

ओके, सांगतेपण जरा विचार करतेसुचलं की लगेच सांगते…”ईशा

 

बरं, चल मी ठेवतेआता जरा कामाचं बघते….”सायली

फोन ठेवून सायली मागे वळली तेवढ्यात तिला सिद्धार्थ येताना दिसला. सायलीला बघून तो थांबला. सकाळी ऑफिसमध्ये येताच सायली दिसली, आता दिवस छान जाणार आपला, असं त्याच्या मनात आलं. क्षणभर तो सायलीकडे बघतच बसला. फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेस मध्ये सायली खूपच सुंदर दिसत होती. सकाळच्या कोवळ्या उन्हासारखी. कोवळं ऊन निरागसतेचंही प्रतिक असतं आणि उत्साहाचं आणि उर्जेचंही. सायली अगदी अशीच होती. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्हीचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसायचं. सकाळचं कोवळं ऊन जसं आपल्याला दिवसभराची उर्जा देऊन जातं, तसं काहीसं सायलीकडे पाहून त्याला वाटायचं. तिच्या सुंदर चेहऱ्यापेक्षाही तिच्यातल्या ह्याच पॉझिटीव्हीटीकडे तो ओढला जायचा. पण आता तिचं लग्न होईल….सुजयशी….सुजयचा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याच्या मनात प्रचंड कालवाकालव झाली.

हॅलोकुठे हरवलायस?”

सायली त्याच्या डोळ्यांपुढे दोन्ही हात हलवत त्याला त्याच्या तंद्रीतून बाहेर काढत होती.

सिद्धार्थ, मला ना खूप संशय येतोय तुझ्यावर…”

काय झालं?”

सायलीला आपण त्या कौस्तुभ प्रकरणाचा शोध घेतोय ते कळलं की काय? सिद्धार्थने एक आवंढा गिळला.

साखरपुड्यात खरंच कुणी भेटली की काय तुला….तू त्या दिवशी पण सैरभैर वाटत होतासकाहीतरी शोधत होतास, विचारात होतास आणि आत्ताही त्याच तंद्रीत आहेस….बात क्या है? ” सायली

 

छे गंकाहीही काय….मला कोण भेटणार….आणि भेटली तरी तिला मी आवडायला हवं नाती तर…….

सिद्धार्थ बोलताबोलता पटकन थांबला, त्याने सायलीकडे बघायचं टाळलं….

काय मूर्ख आहे मी पणनको ते बोलून बसलो असतो आत्ता….”तो पुन्हा मनाशी विचार करायला लागला.

सायलीला पण त्याचं बोलणं ऐकून अवघडल्यासारखं झालं.

काय मूर्ख आहे मी पण नको ते बोलायला गेले आत्ताउगीच तो विषय काढला…….” तीही मनाशी विचार करायला लागली.

पुढचं अर्धा मिनिट दोघेही नुसते अवघडल्यासारखे एकमेकांसमोर उभे होते. एकमेकांशी नजरा नजर झाली आणि ते फक्त हसले.

चल, मी जाते कामाला लागते आताआधीच काल रजा झालीये….” सायली

 

, एक मिनिट, तुला बरं नव्हतं ना कालकाय झालं? आता बरी आहेस का?” सिद्धार्थ

 

तुला सांगायला हरकत नाहीखूप कंटाळा आला होता रे..एक दिवस नुसतं निवांत बसायचं होतं….आणि काही महत्वाचं नव्हतं ना ऑफिस मध्ये ..तशी माझी टीम भारी आहे एकदम ..ते सगळं मॅनेज करतील ह्याची खात्री होती सो आजारी पडले…” सायली डोळे मिचकावत म्हणाली.

 

अरे चलता हैबॉस….तसंही लास्ट विक तुला रात्र रात्र जागून काम करायला लागलं होतंचालतं गंयु नो, आम्ही पण काल पार्टी केली ऑफिसमध्येआमची बॉस नव्हती ना…” सिद्धार्थ

 

हो कापण आता बॉस इज बॅककालची भरपाई करून घेते तुमच्याकडून….”सायली

 

तसं मला आता जास्त छळू शकणार नाहीस तू…”सिद्धार्थ

 

का? मी बॉस आहे तुझीमी छळूच शकते तुला…” सायली

 

पण आता तुझं सिक्रेट कळलंय ना मला, खोटं बोलून रजा घेतलीस ते,…मी ब्लॅकमेल करेन तुला….” सिद्धार्थ

त्याच्या बोलण्यावर सायली खळखळून हसली.

हो, कर तू ब्लॅकमेलपण आत्ता काम कर जराशुक्रवारी जे प्रेझेन्टेशन केलं, त्याची फायनल कॉपी मला मेल कर जरा..अर्जंट आहे….” सायली

 

येस बॉसलगेच करतो…”

सिद्धार्थ त्याच्या जागेवर जायला वळला आणि सायलीही तिच्या जागेवर आली. तिच्या जागेवरून तिला सिद्धार्थच्या सगळ्या हालचाली दिसत होत्या. सिद्धार्थशी बोलताना थोड्या वेळासाठी का होईना, ती सुजयच्या विचारातून बाहेर पडली होती आणि आता तिला खूपच फ्रेश वाटत होतं. सिद्धार्थकडे बघताना तिच्या मनात सहज येउन गेलं,

किती मोकळेपणाने वागतो, बोलतो हाह्याच्या मनात माझ्याबद्दल नक्की काहीतरी आहे, हे जाणवतं मलापण तो ते कधीच मला दाखवत नाही, बोलतही नाहीही इज अ व्हेरी नाईस अँड अ रियल फ्रेंड ऑफ माइनत्याच्याशी बोलू का मी सुजयबद्दल मला काय वाटतंय ते? तो नक्कीच मला हेल्प करेल..”

सिद्धार्थला हे सगळं सांगण्याच्या कल्पनेनीच सायलीला खूप धीर आल्यासारखा वाटला ..

पण नकोकाल साखरपुडा झाला आणि आज ही मुलगी आपल्याला सांगते की सुजयबद्दल संशय आहे आणि मला हेल्प कर, कसं वाटेल ते? तो काय विचार करेल माझ्याबद्दल? नकोच. आधी थोडा शोधच घेऊयाकाही सापडलं तर मात्र नक्कीच सिद्धार्थची मदत घेता येईल.”.

तेवढ्यात सिद्धार्थने मागे वळून बघितलं. सायली कसल्याशा विचारात होती.

सायलीसारख्या मुलीबरोबर काहीही विचित्र, वाईट होता कामा नयेशी डिझर्व्स ऑल द बेस्ट अँड वंडरफुल थिंग्ज़ इन लाइफ…”

एक क्षणभर त्याला वाटून गेलं,

सुजयबद्दल आपल्याला काय वाटतंय ते सांगून टाकूया का सायलीला? निदान ती त्याच्या बाबतीत अलर्ट तरी राहील. पण तिला रागही येऊ शकतो, आणि तिच्या मनात पहिला विचार हाच येणार की मला तिचं लग्न व्हायला नकोय म्हणून मी सुजयबद्दल काहीतरी बोलतोयती का म्हणून माझ्यावर विश्वास ठेवेल? नकोच, आत्ता कितीही वाटत असेल तरीही सायलीला सुजयबद्दल सांगायला नको. आधी थोडी माहिती काढू, काही संशयास्पद असेल तर मात्र तिला लगेच सांगू..”

एकाच वाटेवरून जाणारे ते दोघे अजून एकमेकांच्या ह्या प्रवासाबद्दलच अनभिज्ञ होते…..

—————————————–

त्याच दिवशी दुपारी लंच टाईम मध्ये आजूबाजूला फारसं कुणी नाही असं पाहून सिद्धार्थने त्याच्या डेस्कवरून एक नंबर डायल केला. त्याने घरून निघतानाच कौस्तुभच्या ऑफिसचा बोर्डलाईन नंबर इंटरनेट वरून काढून नोट डाऊन करून ठेवला होता. त्याच्या ऑफिसचा नंबर असल्याने नाईलाजाने तो ऑफिसटाईम मधेच लावायला हवा होता. सकाळपासून आजूबाजूला सगळेच होते, एकदोन मिटींग्ज होत्या, त्यामुळे सिद्धार्थला फोन करण्याची संधीच मिळाली नाही. लंचटाईम झाला आणि मात्र ती तशी संधी त्याला मिळाली. काहीतरी अर्जंट मेल पाठवायचंय, असं कारण त्याने त्याच्या कलिग्जना सांगितलं, आणि त्यांना पुढे जायला सांगितलं.

दोन रिंग्ज मधेच ग्लॉसिसॉफ्ट कंपनीतला फोन उचलला गेला.

हॅलो, ग्लॉसिसॉफ्ट, मुंबई ऑफिस…….”

 

हॅलो, हाय, मे आय स्पीक टू मि. कौस्तुभ परांजपे? ” सिद्धार्थ

 

शुअर सर, विच डिपार्टमेण्ट ?”

 

अक्चुअलि आय डोन्ट नो हिज डिपार्टमेण्ट. कॅन यु प्लीज फाईंड आउट? “सिद्धार्थ

 

ओके, प्लीज होल्ड ऑन फॉर अ मिनिट सर…..”

मधला वेळ सिद्धार्थ नुसताच अधीर होत वाट बघत बसला होता.

हॅलो, सर आर यु देअर? ”

 

येस, येस..” सिद्धार्थ

 

सर, वि हॅव टू एम्प्लॉईज ऑफ धिस नेमवन इज इन मार्केटिंग अँड द अदर वन इज इन कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेण्ट..”

सिद्धार्थने क्षणभर विचार केला. सायलीने सांगितलं होतं, त्याप्रमाणे सुजय मार्केटिंगचा हेड होता आणि कौस्तुभ त्याचा कलीग होता. त्यानुसार अंदाज बांधायचा झाला तर कौस्तुभ सुद्धा मार्केटिंग डिपार्टमेण्टला असण्याची शक्यता जास्त होती.

आय थिंक हि मस्ट बी फ्रॉम मार्केटिंग…” सिद्धार्थ

 

ओके, वन मोमेंट सर, आय विल कनेक्ट यु टू मि. कौस्तुभ परांजपे फ्रॉम मार्केटिंग डिविजन.”

पुढच्या मिनिटाला कौस्तुभच्या डेस्कवर फोनची रिंग वाजायला लागली.

चारपाच रिंग्ज नंतर फोन उचलला गेला.

हॅलो, कौस्तुभ स्पिकिंग….”

 

हॅलो, गुड आफ्टरनून कौस्तुभधिस इज……”

 

सिद्धार्थ …….”

सायलीचा आवाज? सिद्धार्थ एकदम भानावर आला आणि त्याने मागे वळून बघितलं. मागे सायली उभी होती.

सिद्धार्थ, इट्स रिअली अर्जंट. बॉस तिकडे हैदराबादला गेलेत ना कॉन्फरन्ससाठी, तिकडून मि. मेहरांचा फोन आला होता. त्यांच्या लॅपटॉपवरचा सगळा डेटा करप्ट् झालाय. फाईल्स ओपन होत नाहीयेत आणि आता अर्ध्या तासात त्यांचं स्पीच आणि प्रेझेन्टेशन आहे. त्यांनी दुसरा लॅपटॉप अरेंज केलाय. हे बघ, माझ्याकडे प्रेझेन्टेशन रेडी आहे, ते मी मेल करतेय त्यांना. पण काही एक्सेल फाईल्स तुझ्याकडे आहेत आणि काही डेटा रामकडे आहे. ”

 

सायलीएकच मिनिटमी……..जरा फोनवर….”

सिद्धार्थ गोंधळला होता. तिकडे कौस्तुभ फोनवर हॅलो, हॅलो करत होता आणि इथे सायली त्याच्यासमोर उभी होती. तिच्यासमोर तो बोलूही शकत नव्हता.

सिद्धार्थ, डू यु अंडरस्टॅंड द सिचुएशन? मी जेवण टाकून पळत आलेय. ह्यापेक्षा महत्वाचं काही नाहीये दुसरं. दहा मिनिटात आपल्याला सगळा डेटा एकत्र करून त्यांना पाठवायचाय. हे कॉन्फरन्स मधल्या शेवटच्या दिवसाचं शेवटचं प्रेझेन्टेशन आहे आणि डेटा करप्ट झालाय, ह्या फालतू कारणासाठी ते झालं नाही, तर काय होईल तुला माहितीये. प्लीज राम कुठे असेल तिकडून लगेच बोलाव त्याला. आय वॉंट ऑल द डेटा रेडी इन नेक्स्ट 10 मिनीट्स..”

सायली जवळजवळ पळतच तिच्या डेस्क कडे गेली.

एरव्ही तिने असं बॉसिंग केलेलं, पटापट निर्णय घेतलेले, सगळं भान विसरून कंपनीसाठी रात्रंदिवस काम केलेलं आणि टीम मधल्या इतरांनाही करायला लावलेलं, हे सगळं त्याला मनापासून आवडायचं. पण आत्ता? हातातोंडाशी आलेला घास सायली अचानक आल्यामुळे दूर झाला होता. पुढच्या पाच मिनिटात कदाचित कौस्तुभ कडून त्याला सुजयबद्दल, साखरपुड्यातल्या त्याला प्रश्न पडलेल्या त्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीतरी कळलं असतं, किंवा निदान त्याला कुठे बाहेर भेटता येईल का, किंवा त्याचा मोबाईल नंबर, हे तरी विचारता आलं असतं

त्याने फोन कानाला लाऊन बघितलं. कौस्तुभने फोन कधीच ठेवून दिला होता.

हताश होऊन सिद्धार्थने मान नकारार्थी हलवत मोबाईल वरून रामला फोन लावला. मनात मात्र तो म्हणत होता,

कसं सांगू तुला सायली….धिस इस इक्वली ऑर रादर मोअर इंपॉर्टेंटबिकॉज धिस इस रिलेटेड टू यु अँड युअर लाईफ…”

—————————————

त्याच दिवशी सायली संध्याकाळी घरी जायला म्हणून रिक्षात बसली आणि तेवढ्यात तिला एक व्हॉटस अप मेसेज चं इनडिकेशन आलं. ईशाचा मेसेज होता.

सायले सॉरी जरा बिझी आहे, आणि आज यायला पण उशीर होणार आहे म्हणून मेसेज करतेय.”

आपण सकाळी बोललो तेच माझ्या डोक्यात चाललं होतं दिवसभर. बॅक ऑफ द माइंड तेच विचार होते, आणि आत्ता मला त्याचं उत्तर सुचलं.”

मला जर माझ्याबद्दल खरं कळून द्यायचं नसेल किंवा माझ्याबद्दल सगळं नॉर्मल वाटायला हवं असेल तर मी या दोन गोष्टी करेन ..”

. माझ्या खूप जवळच्या मैत्रिणींना माझ्या प्रोफाईलवर कॉमेंट्स आणि पोस्ट्स शेअर करायला सांगेन, जेणेकरून बाहेरच्या कोणालाही माझं प्रोफाईल वरवर बघता बाकी लोकांसारखं नॉर्मल वाटेल.

. मी स्वतः ३ ४ फेक प्रोफाईल तयार करून त्यावरून माझ्या प्रोफाईल वर मेसेजेस, कॉमेंट्स, पोस्ट्स टाकेन…”

चल बोलू नंतर. बाय..”

ईशाचा मेसेज वाचून सायली मनातून हादरून गेली.

फेक प्रोफाईल? फेक प्रोफाईल वापरून इतरांना फसवणारा असा सुजय असेल खरंच? काय वाढून ठेवलंय माझ्या समोर नक्की? माझं आयुष्य आत्तापर्यंत मी ठरवलंय तसंच जगत आलेय मी. नीट ठरवून, विचार करूनसुजय आयुष्यात आल्यापासून मात्र माझं आयुष्य किती वेगळं झालंय….किती विसकटलंय सगळं..समोर कुठलं वळण येईल ह्याचीच धास्ती वाटत राहते आजकाल. सारखा तोच विचार असतो डोक्यात. आत्ता या क्षणी तरी मी सांगू शकते का, की आजपासून पंधरा दिवसांनी आणखी काय समोर येईल माझ्या? लाईफ हॅज़ बीकम सो आनप्रिडिक्टेबलआणि त्याचीच भीती वाटते….”

 

मॅडमरिक्षावाल्याच्या हाकेमुळे ती विचारातून बाहेर आली, “रस्ता बंद आहे समोर..मार्केट रोड नी घेऊ का?”

 

घ्या आता, काय करणार…” सायलीने वैतागून उत्तर दिलं.

मार्केट रोड ला तुफान गर्दी असायची. संध्याकाळच्या वेळी स्टेशनवरून येणाऱ्या लोकांची तर जास्तच. त्यामुळे सायली या बाजूने यायचं नेहेमीच टाळायची. तिचा नेहेमीचा रस्ता जरा लांबचा होता पण तिथून गेल्यावर वेळ कमी लागायचा. रिक्षा मार्केट रोड ला लागली आणि सायलीच्या अपेक्षेप्रमाणेच रस्त्यावरच्या गर्दीमुळे, दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या वाहनांमुळे रिक्षाचा स्पीड खूपच मंदावला. या ट्राफिकला , गर्दीला काही शिस्तच नव्हती. रिक्षावाले त्यांच्या रिक्षा उलटसुलट कशाही घुसवून पळवायला बघत होते, बाईकवाले थोडीशी जागा मिळाली की रस्त्यावरच्या लोकांची पर्वा न करता बाईक चालवत होते आणि त्यातही फोरव्हीलर वालेसुद्धा होते. रस्त्यावरच्या त्या गोंगाटामुळे, लोकांची आरडाओरड, गाड्यांचे हॉर्न्स ह्या सगळ्यामुळे सायलीचं डोकं दुखायला लागलं. सुजयबद्दलचे विचार, आज ऑफिसमध्ये झालेली कामाची धावपळ, ह्या सगळ्यामुळे ती प्रचंड थकली होती. आता घरी जाऊन वर खिडकीत बसून निवांतपणे आईच्या हातचा चहा प्यावा, असा तिने विचार केलेला होता पण आता ट्राफिक मध्ये अडकल्यामुळे ती लवकर घरीही जाऊ शकत नव्हती.

ओ सायेब, उगा कुनाचं ऐकून घेन्हार न्हाईकोनास्नीबी इचारा हिकडेकोबीचा भाव किती त्यो….”

रस्त्यावरच्या त्या भाजीवालीच्या आवाजामुळे सायलीचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. सगळ्या गर्दीचा आवाज एकीकडे, आणि त्या बाईचा आवाज एकीकडे, इतक्या मोठ्या आवाजात ती बोलत होती. कोणत्यातरी गिह्राइकाबरोबर भाजीच्या भावावरून काहीतरी भांडण चाललेलं होतं. अर्थातच सगळ्यांचं लक्ष तिकडेच वेधलं गेलं. काही लोकं तर जिथे होते तिथेच थांबून पुढे काय होणार, ते उत्सुकतेने बघायला लागले आणि काही घाईत असलेले लोकही उत्सुकतेपोटी चालता-चालता मागे वळून वळून तिकडे बघत होते. सायलीची रिक्षा थांबली होती तिकडेच समोरच्या फुटपाथला हे सगळं चाललं होतं. ती भाजीवाली तिला नीट दिसत होती पण ती कुणाशी बोलतेय ते मात्र नीट दिसत नव्हतं. कुणीतरी पुरुषमाणूस आहे, एवढं लक्षात आलं पण त्या माणसाच्या समोरच आणखी काही माणसं उभी होती, त्यात त्याचा चेहरा झाकला गेला होता. तोसुद्धा भांडत असावा पण त्या भाजीवालीचा पवित्रा बघून त्याचा आवाज नरमला होता बहुधा. तो काय बोलला हे सायलीला ऐकूच आलं नाही. त्याच्या बोलण्यावर पुन्हा ती भाजीवाली तावातावाने ओरडली,

आम्ही आलो होतो काय मंग सायेब, आमची भाजी घ्या म्हून सांगाया….”

ह्यावर तो माणूस पुन्हा काहीतरी बोलला.

तुमी असाल मोठं तुमच्या घरीइकडं मिजास दावाची नाय….समजलं ना…”

भाजीवालीच्या ह्या वाक्यावर तिच्या बाजूची भाजीवाली, तसलाच तार स्वरातला आवाज काढून म्हणाली

ए गंगे, कशाला उगीच घसा सुकवितिसतू गावाला गेली व्हतीस म्हून तुला ठाव न्हाई. ह्ये बेनं आठधा दिस झाले हिकडं येतंय रोज भाजी घ्यायाआन समद्यान्शी भांद्तंय बघ. इचार तिकडे त्या म्हातारीला. परवा धा लिंब घेतली तिच्याकडनं आन पाचच लीम्बांचे पैशे दिले आन वर भांडान केलं…”

हे ऐकताच त्या म्हातारीला आणि बाकीच्या भाजीवाल्यांना आयतं कोलीतच मिळालं. सगळ्याजणी एकदम मिळून त्या माणसाच्या अंगावर ओरडायला लागल्या. त्याच वेळी ट्राफिक एकदाचं थोडसं हललं आणि सायलीची रिक्षा थोडी पुढे गेली, अगदी थोडी. पण इथून त्या माणसाचा चेहरा अर्धवट तरी दिसला सायलीला. चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटला तिला. तेवढ्यात त्या माणसाने मान फिरवून रस्त्याकडे एक नजर टाकली. त्या सगळ्या भाजीवाल्यांच्या कचाट्यातून निसटून रस्त्यावर येउन निघून जाता येईल का, असा विचार करत असावा तो बहुधा. त्याच वेळी सायलीला त्याचा चेहरा पूर्ण दिसला आणि तेवढ्यात रिक्षाला थोडा मोकळा रस्ता मिळाल्याने रिक्षाने स्पीड पकडला. सायली रिक्षातून वाकून त्या माणसाचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात…”पी…….पीपी……” समोरून येणारी एक रिक्षा तिच्या डोक्याला जवळपास स्पर्शून गेली. त्या रिक्षाला जर वेग असता तर सायलीच्या जीवावरच बेतलं असतं कदाचित

तिने डोकं आत घेतलं तेव्हा तिच्या छातीत धडधडत होतं. वाहनांनी भरलेल्या रस्त्यावर आपण असं डोकं बाहेर काढण्याचा मूर्खपणा कसा केला, याचाच ती आत्ता विचार करत होती.

ओ मॅडम, काय ते रस्त्यावरचं भांडण बघण्यात एवढा इंटरेस्ट? आत्ता डोक्याला केवढं लागलं असतं तुमच्या माहितीये काय….” रिक्षावाला

 

भांडणात इंटरेस्ट नव्हता हो, तो माणूस ओळखीचा असल्यासारखा वाटला, म्हणून जरा बघत होते….” सायली

कोण होता तो माणूस? आत्ताच, इतक्यातच कुठेतरी बघितलंय त्याला आपण, सायली विचार करत होती. रिक्षा ट्राफिक मधून पूर्ण बाहेर पडून दुसऱ्या रस्त्याला लागली आणि मग एकदम तिला आठवलं,

हे तर सुजयच्या मावशीचे मिस्टर होते. येस, बरोबर तेच होते ते.”

एखादी गोष्ट अगदी पाहिल्यासारखी वाटत असेल आणि तरीही त्याबद्दल आठवत नसेल तर डोक्याला जसा भुंगा लागल्यासारखं होतं, तसंच तिला होत होतं पण आता ते सुजयच्या मावशीचे मिस्टर होते ते आठवल्यावर तो भुंगा जाऊन आता दुसरा भुंगा तिच्या डोक्यात भुणभूणु लागला.

ते तर नागपूर ला असतात, मग ते अजून मुंबईतच आहेत? सुजय म्हणाला होता, की ते साखरपुड्याच्या दिवशी सकाळीच पोहोचले होते पण ती भाजीवाली तर म्हणाली की हा माणूस गेले ८१० दिवस इकडे येतोय. म्हणजे ते एवढ्या आधीपासून मुंबईला आले होते का? म्हणजे इथेही सुजयने खोटं सांगितलं? पण मग सुजय तर तिकडे जुहु ला राहतो, हे इकडे भाजी घायला का येत असावेत? “

प्रश्न, प्रश्न ….सुजयच्या बाबतीत सगळंच प्रश्न पडण्यासारखच होतं, हे पुन्हा तिला जाणवायला लागलं. पण लग्नाला अजून वेळ आहे म्हणून हातावर हात ठेवून बसण्याची ही वेळ नाही, हेही तिच्या लक्षात आलं. लवकरात लवकर काहीतरी ठोस त्याच्याबद्दल कळणं गरजेचं होतं. घरी माहिती असेल तर खरं तर बरेच प्रश्न सुटतील हेही तिला माहित होतं. शेवटी घरच्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान खूप मोठं असतं. कोणत्याही प्रसंगात आपल्याला समजून घेणारे आणि आपली बाजू पटली नाही तरीही आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले पालकच असतात. आईबाबांना धावत जाऊन आत्ताच्या आत्ता सुजयबद्दल आपल्याला कळलेल्या आणि बऱ्याचशा न कळलेल्या गोष्टीही सांगाव्यात अशी तीव्र ईच्छा तिला होत होती. पण तिने स्वतःला आवरलं. बाबांना निदान हे सांगता आलं असतं, पण आई कशी रीएक्ट होईल, ह्याबद्दल तिलाच खात्री नव्हती. साखरपुडा झाल्यावर लग्नाचा फेरविचार करणं, हे सगळ्यांसाठीच कठीण असतं, आईसाठी तर खूपच. सुजयबद्दल आणखी थोडी माहिती कळेल तेव्हा आईला नाहीतर, निदान बाबांना तरी सगळं सांगायचंच, असं तिने ठरवलं. नशिबाने तिच्या हातात सुजयबद्दल सत्य शोधून काढण्यासाठी बऱ्यापैकी वेळ होता. ह्याचाच उपयोग करून घायचा असं तिने ठरवलं. विचार करता करता घर कधी आलं तिला कळलंही नाही.

 

पण हातात असलेल्या वेळेचा उपयोग करून घायचा, हा तिचा विचारही तिला पुढे साथ देऊ शकणार नव्हता, ह्याची तिला अजून कल्पना नव्हती….

क्रमशः

5 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 10)

 1. Anonymous
  February 9, 2016

  👌👍

  Like

 2. Vaishali Agre
  February 9, 2016

  maste aahe..pudhcha bhag lavka yeu dya

  Like

  • rutusara
   February 11, 2016

   Thanks 🙂 sure I will try to post the next part at the earliest….

   Like

 3. Aditya Patil
  March 20, 2016

  mast

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on February 8, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: