davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 11)

प्रश्न, प्रश्न ….सुजयच्या बाबतीत सगळंच प्रश्न पडण्यासारखच होतं, हे पुन्हा तिला जाणवायला लागलं. पण लग्नाला अजून वेळ आहे म्हणून हातावर हात ठेवून बसण्याची ही वेळ नाही, हेही तिच्या लक्षात आलं. लवकरात लवकर काहीतरी ठोस त्याच्याबद्दल कळणं गरजेचं होतं. घरी माहिती असेल तर खरं तर बरेच प्रश्न सुटतील हेही तिला माहित होतं. शेवटी घरच्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान खूप मोठं असतं. कोणत्याही प्रसंगात आपल्याला समजून घेणारे आणि आपली बाजू पटली नाही तरीही आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले पालकच असतात. आईबाबांना धावत जाऊन आत्ताच्या आत्ता सुजयबद्दल आपल्याला कळलेल्या आणि बऱ्याचशा न कळलेल्या गोष्टीही सांगाव्यात अशी तीव्र ईच्छा तिला होत होती. पण तिने स्वतःला आवरलं. बाबांना निदान हे सांगता आलं असतं, पण आई कशी रीएक्ट होईल, ह्याबद्दल तिलाच खात्री नव्हती. साखरपुडा झाल्यावर लग्नाचा फेरविचार करणं, हे सगळ्यांसाठीच कठीण असतं, आईसाठी तर खूपच. सुजयबद्दल आणखी थोडी माहिती कळेल तेव्हा आईला नाहीतर, निदान बाबांना तरी सगळं सांगायचंच, असं तिने ठरवलं. नशिबाने तिच्या हातात सुजयबद्दल सत्य शोधून काढण्यासाठी बऱ्यापैकी वेळ होता. ह्याचाच उपयोग करून घायचा असं तिने ठरवलं. विचार करता करता घर कधी आलं तिला कळलंही नाही.

पण हातात असलेल्या वेळेचा उपयोग करून घायचा, हा तिचा विचारही तिला पुढे साथ देऊ शकणार नव्हता, ह्याची तिला अजून कल्पना नव्हती….

——————— भाग १० पासून पुढे चालू —————–

भाग १० येथे वाचा <<  http://wp.me/p6JiYc-gS

 

ती घरात आली तेव्हा आईबाबांचं काहीतरी बोलणं चालू होतं. अनिसुद्धा तिथेच होता. पण ती आत येताच ते एकदम गप्प झाल्यासारखे वाटले.

काय एवढी शांतता घरात? बाबा, आज काही न्यूज वगैरे नाही लावल्या का….”

सायली चपला काढताकाढताच म्हणाली.

दमली असशील ना बाळा, आज उशीर का झाला तुला? अनि ताईला जरा पाणी आणून देआई

 

अगं, नेहेमीचा रस्ता बंद होता. म्हणून मार्केट रोडने यावं लागलं. खूप ट्राफिक होतं..” सायली

 

बरं, चहा घेणार आहेस का? की जेवणार आहेसजेवण तयारच आहे, १५२० मिनिटात पानं घेते…” आई

 

चहा खरंच हवा होता, पण जेवायचं तयार असेल तर डायरेक्ट जेवूच आपण. चहा पीत बसले तर उगीच जेवायला उशीर होईल…” सायली

 

तू असं कर, चहा करच. मी पण घेईन थोडा. पावणेआठ वाजलेत. एवढा काही उशीर होत नाही..सायली जा तू आवरून ये. मला जरा बोलायचंय तुझ्याशी ..”बाबा

 

अहो, जेवण झाल्यावर बोलू ना आपण.” आई

 

काय बोलायचंय बाबा? सगळं ओके आहे ना? ” सायलीला घरात आल्यापासूनच काहीतरी ताण जाणवत होता.

 

हो गं, सगळं ठीक आहे. पण बोलायचंय जरा. जा तू ये आवरून लवकर.” बाबा

सायली तिच्या खोलीत आली.

काय बोलायचं असेल बाबांना? ईशाला आणि मला सुजयबद्दल संशय आलाय, तसाच संशय त्यांनाही आला असेल का? बिच्चारेकाही दाखवत नव्हते पण आत्ताच माझ्याशी बोलायचंय म्हणजे काहीतरी तसंच महत्वाचं बोलायचं असणारकाय कळलं असेल त्यांना? ह्या सगळ्यात त्यांना कोणताही मानसिक त्रास होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. चार वर्षापूर्वी सीमाताई च्या बाबतीत असं झालं तेव्हा काकाकाकूंना किती त्रास झाला होता….”

देशपांड्यांच्या बाजूलाच आपटे कुटुंब राहायचे. चार वर्षापूर्वी त्यांच्या सीमाचं ठरलेलं लग्न अगदी तोंडावर आलेलं असताना मोडलं. लग्नाला काही दिवस राहिलेले असतानाच आपटे काकांना एकदा रात्री उशिरा घरी येताना त्यांचा होणारा जावई कुठल्यातरी बार मधून नशेत धुंद होऊन बाहेर येताना दिसला. ते त्याला जाब विचारायला गेले तेव्हा त्याने त्यांनाच शिवीगाळ सुरु केली. हे सगळं कळल्यावर सीमाने अर्थातच लग्नाला नकार दिला. लग्न मोडल्यामुळे तिचं भलंच झालं होतं. पुढच्या दोन वर्षात तिचं एका चांगल्या, उच्चशिक्षित मुलाबरोबर लग्न झालं. आता ती तिच्या नवऱ्याबरोबर लंडन ला राहत होती. लग्न मोडल्यामुळे खरं तर तिचं भविष्यात उध्वस्थ होणारं आयुष्य वेळीच सावरलं होतं. पण तरीही एकुलत्या एका मुलीचं लग्न एवढ्या तोंडावर आलेलं असताना मोडणं, हे काकाकाकूंसाठी खूप दुःखद आणि धक्कादायक होतं. आजकाल लोकांना काही फरक पडत नाही, हे जरी खरं असलं तरी मुलीच्या काळजीमुळे तिच्या पालकांना मात्र खूप फरक पडतो. कितीतरी रात्र काकू काळजीने जागून काढायच्या. त्यांना कधीही भेटायला गेलं तरी त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्यासारख्याच दिसायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा ते दोघे धसका घ्यायला लागले. सहा महिन्यात त्यांच्या तब्येतीही खूप खालावल्या होत्या.

आपल्याही बाबतीत असंच झालं तर? आईबाबा नक्की काय बोलणार असतील? त्यांना सुजयबद्दल काय कळलं असेल? मला आईबाबांना असा धक्का बसू द्यायचा नाहीये. काकाकाकूंना जो त्रास झाला तसा त्रास आईबाबांना होताना मी नाही बघू शकत. सुजयबद्दल मला काही कळलं तर मी आधी माझा निर्णय घेईन आणि आईबाबांना नीट समजावून सगळं सांगेन. त्रास होईलच, पण जरा कमी धक्का बसेल त्यांना. पण आज त्यांना आधीच काही कळलं असेल तर? ओ गॉड, हे माझ्याच बाबतीत का होतंय सगळं…………….”

पाणावलेल्या डोळ्यांमुळे सायलीला समोरचं काहीच दिसेनासं झालं. अनि समोर येउन उभा राहिला तरी तिचं लक्षच नव्हतं.

ए काय झालं तुला? तू रडतेयस?” अनि

 

अनि…?” सायली दचकली पण एकदम सावरून घेत म्हणाली, “रडेन कशाला? साबण गेला माझ्या डोळ्यात आत्ता तोंड धुताना….” तिने डोळे पुसले.

 

चल मग, बाबा बोलावतायत…” अनि

 

अनि, एक मिनिट, काय सांगायचंय बाबांना मला? तुला माहित असेल ना…” सायली

 

छे, मी तुझ्या दोन मिनिटं आधी घरात आलो, तेव्हापण त्यांची काहीतरी चर्चा चालूच होती. मला नीट काही कळलं नाही, पण लग्नाबद्दल काहीतरी बोलत होते. मी विचारणार होतो, तेवढ्यात तू आलीस. चल आता लवकर…” अनि

 

चल..”

मनावर आलेलं प्रचंड दडपण चेहऱ्यावर आणू न देण्याचा प्रयत्न करत सायली हॉल मध्ये आली.

हा बाबा, सांगाकाय बोलायचंय?”

———————————————–

ईशाला घरी यायला रात्रीचे जवळपास साडेअकरा वाजून गेले होते. रात्री ८.१५ पासून सायलीचे पन्नासेक तरी कॉल्स येउन गेले होते. पण कामाच्या गडबडीत तिला अजिबात वेळच मिळाला नव्हता. तुला वेळ मिळाला की अर्जंटली कॉल कर असा तिचा मेसेज वाचून ईशाच्या मनात वेगवेगळ्या शंका येत होत्या. दुसऱ्या दिवशी बेल्जिअम च्या ऑफिसमधून काही महत्वाची लोकं येणार होती. त्यांना नेक्स्ट इयर चा सगळा बिझनेस प्लान प्रेझेंट करायचा होता. त्यासाठी लागणारा डेटा, प्रेझेन्टेशन करण्याची जबाबदारी ईशाच्या बॉसवर होती. सगळा दिवस त्यांच्या टीम मधले सगळे एका कॉन्फरन्स रूम मध्ये एकत्र बसून मान मोडून काम करत होते. सगळं संपायला ११ वाजले. उशीर झाला होता, त्यामुळे ईशाने तिची स्कुटी काढली नाही. तिचा एक कलीग तिला घरापर्यंत सोडायला आला होता, त्यामुळे तिला येतायेताही सायलीला फोन करायची सोय नव्हती.

काय गं ईशा, किती उशीर ? फोन पण उचलला नाहीस तोमी किती वेळा कॉल करत होते…” तिची आई दार उघडता उघडताच म्हणाली.

 

अगं मी ताईला मेसेज केला होता ना…” ईशा

 

हो म्हणून कळलं तरी तुला उशीर होणार आहे ते, नाहीतर ती पण काळजी लागली असती…” आई

 

ती पण काळजी लागली असती, म्हणजे? तू कॉल का करत होतीस मला?” ईशा

 

अगं म्हणजे तसं काळजीचं नाहीये फार. निशाला ताप आलाय. दुपारीच ऑफिसमधून घरी आली ती. चांगलाच ताप आला होता. लगेच डॉक्टरकडे नेलं तिला. त्यांनी काही औषधं लिहून दिलीयेत. ती आपल्या इथल्या मेडिकलमध्ये मिळाली नाहीत. तुला येताना ते २४*७ मेडिकल लागतं ना, तिकडून आण म्हणून सांगायचं होतं…” आई

 

अरे बापरे, आता बरी आहे का ती? काय म्हणाले डॉक्टर? ” ईशा

 

बरी आहे आता, पण ताप अजून आहे थोडा. आत्ताच झोप लागलीये. कुलकर्णीकाका त्याच बाजूला जात होते, त्यांनी औषध आणून दिलं, नाहीतर तुला मेसेज करणारच होतेबरं तू जेवलीयेस ना? काही कॉफी वगैरे करू का?” आई

 

नको, मी पण झोपते आता. आणि तू पण झोप.” ईशा

ईशा खोलीत आली. निशा गाढ झोपेत होती. फ्रेश होऊन ईशा सायलीला फोन करणारच होती, तेवढ्यात निशाचा फोन वाजला. एवढ्या रात्री कोण फोन करतंय निशाला? फोनच्या रिंगने निशा जागी होईल, म्हणून ईशाने पटकन तिचा फोन उचलून बाहेर आणला. आशयचा (निशाचा होणारा नवरा) फोन होता….

“हॅलो, हाय आशय…” ईशा

 

कोण ईशा वाटतं? हाय ईशाअगं मी कधीपासून निशाचा फोन ट्राय करतोय, ती काय करतेय..? आय मीन तू फोन कसा उचललास आत्ता?” आशय

 

अरे एवढं टेन्शन घेऊ नकोस तू, तिला जरा ताप आलाय, झोपलीये ती. गाढ झोप लागलीये तिला. मी उद्या सकाळी सांगते तिला तुझा फोन येउन गेला ते. ” ईशा

 

ओ अच्छाती सकाळी म्हणाली होतीच मला, थोडं अंग दुखतंय असं म्हणत होती. बरी आहे ना पणकाळजीचं काही नाही ना? “आशय

 

नाही रे, ताप कमी आहे आता. डॉक्टर कडे पण नेउन आणलं. बरं तू सांग ना, तू कसा आहेस? काय बाबा तू तर, इकडे होतास तेव्हा रोज सासरच्यांना इम्प्रेस करायला घरी येउन जायचास. आता यु.एस ला गेल्यापासून फक्त आमच्या ताईशी बोलतोस हा तू. तू तिकडे गेल्यापासून पहिल्यांदाच बोलतोय आपणसो टेल मी, हाऊ इज यु.एस? सेटल झालास का तिकडे आता?”

 

सेटल काय ..लगेच झालो अगंएक महिना पटकन निघून पण गेला. आणि आल्या आल्या काम सुरूच झालं ना, सेटल होण्यासाठी काही वेगळं करावंच लागलं नाही. आपोआप झालो सेटल …” आशय हसत हसत सांगत होता.

 

हम्मआता ओळखी पण झाल्या असतील ना रे थोड्याफार ? इंडियन लोकं भेटतात का रे? ” ईशा

 

ओळखी म्हणशील तर फार नाही, मी सकाळी जातो ते रात्री येतो. इथे तसं रात्री उशिरा पर्यंत कोणी थांबत नाही ऑफिसमध्येसंध्याकाळी सगळे घरी पळतातखूप काम असेल तरी जनरली लोक घरी जाऊन काम करतात..ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबणारी फार कमी लोक असतात. त्यामुळे ऑफिसमधल्या ओळखी आहेत तेवढ्याच गं..मी राहतो त्या सिटी मध्ये तसेही इंडियन्स नाहीच आहेत. नाही म्हणायला ऑफिसमध्ये एक साउथ इंडियन माणूस आहे, मिडलएज्ड आहे. तो खूप लांब राहतो, त्यामुळे आठवड्यातून एक दिवस येतो ऑफिसला फक्त. बाकीचे दिवस वर्क फ्रॉम होम. लास्ट विक बोलावलं होतं त्याने डिनरला. इतकं बरं वाटलं ना, एक महिन्याने इंडियन माणूस भेटला, भरपूर बडबड करून घेतली मी त्यांच्याबरोबर..चांगली फॅमिली आहे ..” आशय

 

बापरे, इथे भर पुण्यात मध्यवर्ती राहून आजूबाजूला एकही मराठी माणूस नाही, हे इमॅजिन करणं पण कठीण आहे, माहितीये?” ईशा

 

हो ना, जाम आठवण येते यार पुण्याची. पण तुला माहितीये, आत्ता काही दिवसांपूर्वी ह्यांच्या न्यूजर्सी च्या ऑफिसमध्ये ट्रेनिंग होतं, तीन दिवस . तिथे मात्र चिक्कार इंडियन्स आणि इव्हन मराठी लोक पण होते.”

 

अरे वा…” सायली

 

हो ना, मस्त लोक आहेत तिथलेतीन दिवसात जवळपास विसेक इंडियन्स भेटले आणि त्यात १२ जण मराठी. सगळे कंपनीतलेच. अर्थात त्यातले काहीजण माझ्यासाखे दुसऱ्या लोकेशनला पोस्ट झालेले पण होते. पण तीन दिवसासाठी सगळे एकत्र होते. काश यारमला ते ऑफिस द्यायला हवं होतंत्या ऑफिसचे मॅनेजर पण मराठी आहेतजोशी म्हणून. त्यांनी शेवटच्या दिवशी सगळ्या मराठी कलीग्जना घरी डिनर साठी बोलावलं होतं, त्यांचे बाकीचे जवळचे मराठी फ्रेंड्स आणि त्यांच्या फॅमिलीज पण होत्या. साळवी, माने, काळे, नगरकर, साने, दिघे, बापट….बापरेपुण्यात आल्यासारखंच वाटलं मला माहितीये? “आशय

 

साने? साने तिकडेही भेटले वाटतं तुला..वा छान…”

ईशाच्या आवाजात नकळतपणे एक कडवटपणा आला होता.

म्हणजे काय?” आशय

 

काही नाही अरे. आमची मावसबहीण आहे ना, सायली, तिचं लग्न ठरलंय, त्या मुलाचं आडनाव पण साने आहे, म्हणून पटकन आलं तोंडातमुंबईचे आहेत ते..” ईशा

 

हो,हो, निशा म्हणाली होती मला. इथे भेटलेले साने पण मुंबईचेच होते, जुहूचे. चांगली होती फॅमिली. जोशींकडेच आले होते ते, दीडदोन महिने राहणार होते. त्यांचे एकदम जवळचे मित्र ते. नवराबायको दोघेही एकदम हायलीक्वालीफायीड. त्यांचा मुलगा पण ग्लॉसीसॉफ्ट मध्ये एकदम मोठ्या पोझिशनला आहे. अगं निशा म्हणाली होती, सायलीचा तो कोण आहे तो पण ग्लॉसीसॉफ्ट मधेच आहे. बरोबर ना? मला वाटलं की हा त्यांचाच मुलगा असणार, न्यू जर्सी ला मला भेटले त्यांचा. पण नाही हा वेगळा आहे. त्याचे आईवडील मुंबईमधेच आहेत ना….पण किती साम्य आहे बघ ना, नाव साने, जुहुचेच दोघेही आणि कंपनी पण सेम. ” आशय

आशयचं बोलणं ऐकताना ईशाचा श्वास रोखल्यासारखा झाला होता.

नाव ………...काय?” ईशा

 

कोणाचं?” आशय

 

त्यांच्या मुलाचं?” ईशा

 

माहित नाही. अगं बरीच लोकं होती त्यांच्याकडे त्यादिवशी. प्रत्येकाशी खूप वेळ मिळाला नाही बोलायला. पण हे साने लक्षात राहिले मात्र. खूप कल्चर्ड, रिच आणि तरीही साधे होते दोघेही….” आशय

 

अच्छा…”

ईशा मनातल्या मनात आशयवर चरफडत होती. “एवढा बडबड करतो हा जिथेतिथे जाऊन. त्यांच्या मुलाचं नाव तरी विचारायचं होतं..अर्थात त्याला तरी कशाला बोलायचं म्हणा, त्याच्यामुळे निदान एवढं तरी कळलं. ”

“हॅलो….ईशा ?? काय झालं? ” आशय

 

काही नाही रे. तुला कधी भेटले रे ते साने? “ईशा

 

अगं मागच्याच्या मागच्या वीक मध्ये बुधवार ते शुक्रवार ते ट्रेनिंग होतं, आणि शुक्रवारी त्या डिनर पार्टी ला ते भेटले…” आशय

 

ओके….”

ईशा बोलताबोलताच एका बाजूला विचार करत होती, “मागच्याच्या मागचा आठवडा म्हणजे सायलीच्या साखरपुड्याच्या आधीचा आठवडातेव्हा तर सुजयचे आईबाबा मुंबईतच होते. त्याच आठवड्यात सोमवारी लग्न ठरलं आणि मग त्याच आठवड्यातल्या शुक्रवारी ते न्यूजर्सीला कसे जातील? हे नक्कीच वेगळे असतीलपण तरीही आशयला आणखी काही माहिती विचारली पाहिजे….”

ईशा..काय गंतू का विचारतेयस त्यांच्याबद्दल एवढं? “आशय

 

अरे सहजउत्सुकताबघ ना ….दोन वेगवेगळे साने आणि त्यांच्याबद्दल तीन कॉमन गोष्टी आपल्याला कळल्याततर अजून काय काय कॉमन असेल त्याची उत्सुकता लागलीये, म्हणून विचारलं. पण आणखी काय बोलणं झालं तुमच्यात? ” ईशा

 

ह्म्म्म……?? अजून तसं काही खास नाही….ते सांगत होते, दोन वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा इंदौरला होता, नंतर त्याची ट्रान्स्फर झाली मुंबईला, तेव्हा ते आले मुंबईत. पण इंदौरचं आणि आमचं काही वेगळंच नातं जुळलं होतं म्हणाले. आणिआणि हात्यांना एक मुलगी पण आहे, ती इंजिनीरिंग करतेय, नाशिकला असतेते एक महिन्यापूर्वीच आले होते यु एस ला. जोशींनी फार आग्रह केला म्हणून,…आता दीडदोन महिने राहून परत जाऊ असं म्हणाले…” आशय

हे सगळं ऐकताना ईशाच्या छातीत धडधडायला लागलं होतं. दोन फॅमिलीजमध्ये इतकं साम्य कसं असू शकतं?

ईशा? आर यु देअर?” आशय

 

हो रे ऐकतेय ना मीमला वाटलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल आतामग आपण डिटेक्टीव्हसारखा शोध घेऊदोन साने कुटुंबांमध्ये एवढं साम्य कसं ह्याबद्दलपण काय यारतुझे शेवटचे दोन्ही बार फुसके निघाले, त्याबाबतीत काहीच जुळत नाहीये दोन साने फॅमीलीजमध्ये. जाऊदेत….जरा टाईम पास झाला आपला…..”

ईशाने आशयला खोटंच सांगितलं. इतकं सगळं साम्य बघून त्यालाही संशय येऊ शकला असता किंवा तो हे सगळं निशाच्या कानावरही घालू शकला असता. आणि मग कदाचित हे सगळं आई, मावशी, काका ह्यांच्यापर्यंत पोहोचलं असतं, कदाचित सुजय त्यामुळे सावध झाला असता. त्यामुळे ह्या साने विषयात काही दम नाही असं वाटून आशयने त्याकडे दुर्लक्षच करायला हवं होतं.

आशय मात्र तिचं बोलणं ऐकून खोखो हसत होता,

काय यार तुम्ही बहिणी दोन टोक आहात दोघीमी जरा रात्री उशिरा जागतोय असं निशाला वाटलं की हिचं लेक्चर चालू. ती स्वतः पण फार जागत नाही जास्तऑफिसचं काम असेल तेव्हाच…आणि तू ….इट्स अल्मोस्ट १२.१५ इन द नाईट आणि तू टाईम पास करतेयस? सही आहे…..” आशय

 

हो ते आहेपण काय रेमी मगाशी बोलले ते तू फार मनावर घेतलास वाटतं? आत्ता ऑफिस टाईम आहे ना तुमच्या इथे? मग एवढा वेळ फोनवर बोलतोस तेह्या बाबतीत तर तू नक्कीच ताईचं ओरडा खाशील. तिला आवडत नाही हा ऑफिसच्या वेळात गप्पा मारलेल्या….जेवढ्यास तेवढं बोलावं ना माणसाने ऑफिसच्या वेळात फोनवर….” ईशा

 

हो का? एक तर तूच मला प्रश्न विचारलेस, तूच टाईमपास करत होतीस, आणि वर हे? तसं मी पण ऑफिसच्या वेळेत फार बोलत नाही फोनवर पण आज चालेलआज मी वर्क फ्रॉम होम करतोय…” आशय

 

अरे वा, अमेरिकेचे वारे लागले वाटतं? छानबरं चल मी ठेवते आताझोप आलीये छान वाटलं बोलून एवढ्या दिवसांनीमी ताईला सांगते हा सकाळी…” ईशा

 

सेम हियर ईशायु नो व्हॉट? मी कधी बोललो नव्हतो, पण निशाला मी ह्यासाठी मनातल्या मनात हजारदा थान्क्स म्हटलंय. मला एक धाकटी बहिण असावी असं नेहेमी वाटायचं, बडबडी, माझ्याशी मोकळेपणाने बोलणारी, यु नो , चुलबुली टायीप्स….”आशय

 

अरे वा, मग आता माझा दुहेरी हक्क आहे तुझ्यावर, जीजू म्हणून पण आणि दादा म्हणून पण. ओह ,डॅट रिमाइंड्स मी, माझं भाऊबिजेचं आणि राखीचं गिफ्ट घेऊन ये हा येताना…” ईशा

 

हाहा शुअरचल बायगुड नाईट .” आशय

 

हॅव अ नाईस डे. बाय…”ईशा

पुढची काही मिनिट्स ईशा आशयने सांगितलेल्या गोष्टीवर विचार करण्यात बुडून गेली. हा कसला योगायोग आहे? ते जर खरेच सुजयचेच आई-बाबा असतील, तर मग काय म्हणायचं ह्याला? आपण सुजयबद्दल शोध सुरु केलाय आणि आज अगदी सहज म्हणून आशयशी गप्पा मारल्या काय आणि त्यानेही अगदी सहज म्हणून तिथे भेटलेल्या साने कुटुंबाबद्दल मला सांगितलं काय…जग खूप छोटं आहे असं म्हणतात… म्हणून तर लोकं अशी दुसऱ्या देशात गेल्यावरही भेटतात एकमेकांना…सहज भेटल्यासारखी…पण त्यामागेपण किती योजना असतात हे वेळ आल्यावर कळतं….

 

त्याला न्यूजर्सीला भेटलेले ते साने आणि सुजयची फॅमिली ह्यांच्यात किती साम्य होतं. खरं तर आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल कळलेल्या सगळ्याच गोष्टी मॅच होत होत्या. जर त्या वेगळ्या फॅमिलीज असतील तर त्यांच्यातलं साम्य न पटणारं होतं. आणि जर न्यूजर्सी ला भेटलेली साने फॅमिली हेच सुजयचे आईबाबा असतील तर मग आधीचा आणि आत्ताचा कुठलाच संदर्भ लागत नव्हता. दोन आठवड्यांपूर्वी सुजयचे आईबाबा त्यांच्या मुलाचा साखरपुडा ठरलेला असताना यु.एस ला का जातील? आणि लगेच शनिवारी सायलीच्या आईबाबांबरोबर खरेदीला कसे जाऊ शकतील? काहीतरी सॉलिड घोळ आहे. सायलीला हे सांगायला हवं, आत्ताच. सायलीचा विचार डोक्यात आला आणि मग ईशाला एकदम आठवलं, सायलीला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. तिचे कितीतरी कॉल्स येउन गेले होते. आशयचा फोन आला आणि नंतर त्याच्याशी बोलताना ती हे सगळं विसरूनच गेली होती.

 

तिने घड्याळाकडे पाहीलंघड्याळाचा काटा १२.० वरून पुढे सरकला होता. करू का मी फोन आत्ता सायलीला? ती झोपली असणार एव्हानापण तिला काय बोलायचं होतं, ते कळल्याशिवाय आता मला तरी झोप लागेल का? शिवाय आशयकडून हे जे काही कळलंय, ते तिला सांगायलाच हवं. जाऊदे, एवढा विचार करण्यापेक्षा आत्ताच फोन केलेला बरा

 

तिने घाईघाईने लास्ट कॉल्स च्या लिस्ट मधून सायलीचा नंबर डायल केला. पण सायलीचा फोन एंगेज्ड लागत होता. तिने पुन्हा, पुन्हा दोन तीन वेळा सायलीला कॉल केला पण तिचा नंबर बिझीच होता. आत्ता एवढ्या रात्री सायली कोणाशी बोलत असेल? ईशाला तिची काळजीच वाटायला लागली.

 

पुढची पंधरा मिनिट्स ईशा अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होती फक्त. पंधरा मिनिटात तिने जवळपास २५३० वेळा सायलीला फोन केला होता. मेसेजपण पाठवले होते. पण तिचा फोन अजून एंगेज्डच होता. कुणाशी बोलतेय ही एवढा वेळ? काही झालं असेल का? एरव्ही लग्न ठरलेल्या मुलीमुलं रात्री जागून फोनवर उशिरा पर्यंत गप्पा मारत असतात, त्यात काहीच नवीन नव्हतं. पण सायली सुजयबरोबर असं रात्री जागून रोमॅंटिक गप्पा वगैरे मारेल असं त्यांच्याबाबतीत होणं शक्य नव्हतं. ईशाचा धीर सुटत चालला होता. घरी काही इमर्जन्सी नसेल ना आली? मावशी, काका सगळे ठीक असतील ना? विचार करून करून ईशाला जास्तच टेन्शन यायला लागलं. अनिला फोन करून बघूया का असाही विचार तिच्या डोक्यात हजारदा येउन गेला. पण त्यासाठी मात्र तिने मनाला आवर घातला होता. सुदैवाने तसं काही घडलं नसेल, सायली खरंच तिच्या कामासाठी कोणाशीतरी बोलत असेल तर उगीच एवढ्या रात्री अनिला उठवलं असं होईल, त्यापेक्षा पुढची पाच मिनिटं वाट बघू, सायलीचा फोन नाही आला तर अनिला फोन लाऊन बघूया असं तिने ठरवलं.

 

पुढची पाच मिनिटही तिला वाट बघवेना. पुढच्या तिसऱ्याच मिनिटाला तिने अधीरपणे मोबाईल हातात घेतला. अनिला कॉल लावणार तेवढ्यात तिचाच फोन वाजला. सायलीचा फोन….

हॅलो काय गं सायली, कुठे आहेस तू? मी किती टेन्शनमध्ये होते माहितीये? मी मला मला वाटलं काय झालंय नक्की तुलातुझा फोन पण एवढा वेळ बिझी लागत होता. ..अगं बोल नाकाय झालंय?”

ईशाला बोलताबोलताच धाप लागली होती. तिचं आत्तापर्यंतचं सगळं फ्रस्ट्रेशन बोलण्यातून बाहेर पडलं होतं….पुढच्याच क्षणी तिला कळलं की समोरून काहीच प्रत्युत्तर नव्हतं. एक विचित्र आवाज येत होता फक्त. वारा जोरात वाहतो तसा. तोही अगदी लक्ष देऊन ऐकल्यावरच कळत होता.

हॅलो, सायली? हॅलो….आर यु देअर? अगं बोल नाबोलत का नाहीयेस..? सायली? आर यु ओके…? “

ईशाला काय करावं काहीच सुचत नव्हतं. समोरून सायलीचा फोन आला होता पण ती बोलतच नव्हती. कसलातरी विचित्र आवाज येत होता फोनवर….

घुघुझु……झु…….” आणि तेवढ्यात एक भसाडा आवाज त्यात मिसळला गेला… .”…… ….. ………. ………..”आणि पुन्हा घु….घु….झु….” आणि मग एक जीवघेणी किंकाळी ……..

ईशाने घाबरून फोन ठेवूनच दिला. हे काय होतं नक्की? सायली अशी काय बोलत होती? नक्की सायलीच होती नाकी अनि होता आणि त्याने गम्मत केली माझी? नाही, त्याला असलं केलेलं आवडत नाहीमागे किती चिडला होता आपल्यावरतो नसेल तर मग कोण असेल?

 

विचार करताकरताच ती थरथरत खाली बसली. म्हणजे ही तीहोती? हो….’तीच असणार सायलीला पण त्यादिवशी असंच काहीतरी ऐकू आलं होतंवाऱ्याचा आवाज, मग तो घाणेरडा आवाज………आणिआणि आत्ताची ती किंकाळी? अजून तिच्या कानात ते आवाज घुमत होते….

 

तेवढ्यात फोन परत वाजला…..सायलीचाच फोन ..ईशाने फोनकडे बघत एक आवंढा गिळला. तिची हिम्मतच होत नव्हती तो आवाज पुन्हा ऐकण्याची. काही रिंग्ज वाजून फोन बंद झाला. अर्ध्या मिनिटाने पुन्हा फोन वाजला. ईशाने याही वेळी फोन उचलला नाही. त्यानंतर एक मिनिटाने एक मेसेज आला. तो मात्र ईशाने धीर करून वाचला

ईशी, आज आपली चुकामुकच चाललीये. आत्ता उठवत नाही तुला, पण सकाळीसकाळी पहिले मला कॉल करइट्स रिअली इंपॉर्टेंट बाय…”

तो मेसेज वाचून सगळा धीर एकवटून ईशाने सायलीला कॉल लावला.

हॅलो…” ईशाच्या छातीत धडधडत होतं.

 

ईशी तू जागी आहेस? तू फोन उचलला नाहीस तर मला वाटलं की झोपली असशील…” सायलीचा आवाज

ईशाच्या जीवात जीव आला.

सायले, आत्ता तूच फोन केला होतास का?” ईशा

 

हो, दोन वेळा केला पण तू उचलला नाहीस ना, मला वाटलं झोपली…..”

सायलीला मधेच तोडत ईशाने विचारले

ते नाही गं बाई, त्याच्याही आधी …”

 

त्याच्या आधी माझाच फोन चालू होतामी….एक मिनिट,,काय झालंय ईशा? तुझा आवाज असा टेन्शनमध्ये का येतोय? ” सायली

 

अगं कारण ह्याच्या आधी मला तुझ्या फोनवरून कॉल आला होताविचित्र आवाज येत होता त्यातकोणाचातरी घाणेरडा, भसाडा आवाज ऐकू येत होताआणि मग शेवटी एक विचित्र किंकाळी ऐकू आली….तू केला नव्हतास तर मग मला तुझ्या फोनवरून कॉल कसा आला? ” ईशा

 

अगं काहीही काय बोलतेयस? मी फोनवर बोलून झाल्यावर जरा डोकं शांत होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलेथंड पाणी जरा दोनचार वेळा तोंडावर मारलं आणि मग परत आले आणि लगेच तुला कॉल केला. मध्ये वेळ कुठे होता मला तुला कॉल करायला?” सायली

 

मला सांग, तू फोन बाथरूम मध्ये नेला होतास?” ईशा

 

नाही गं , इथेच बेडवर होताजाऊदेत गंएवढा काय विचार करतेयस? कोणीतरी गम्मत केली असेल तुझी….” सायली

 

अगं तुझ्याच फोनवरून कॉल आला होतामी काय वेडी आहे का उगीच तुला विचारायला?” ईशा

 

ओके, सॉरी….”

ईशाचा चिडलेला आवाज ऐकून सायलीला त्यातलं गांभीर्य लक्षात आलं.

अनि ….अनि आला असेल का तू बाथरूम मध्ये असताना..?” ईशा

 

शक्यच नाही गं, खोलीचा दरवाजा मी बंद केलाय आतून….”आता सायलीलासुद्धा भीती वाटायला लागली होती, “ईशी, मग माझ्या फोनवरूनतुला कॉल…. कसा आला?”

ईशाने शांत होऊन विचार केला मग ती म्हणाली,

ह्या वाटेवरून जाताना, ही शक्यता आपण लक्षात घेतली होतीच, नाही का सायली? आपल्या दोघींच्याही मनातली भीती सांगतेय, की तीपरत आली होती. बाकी काहीच उत्तर नाहीये ह्याच्यावर माझ्याकडे. हे बघ, तू सांभाळून रहा, अलर्ट रहा आणि जमलं तर मावशीच्या खोलीत झोपायला जा. आणि आधी शांत हो. आपण बोलूया आत्ता की सकाळी बोलायचं? मला पण काहीतरी सांगायचं आहे तुला…”

 

बरोबर आहे तुझं. मी जाईन आईच्या खोलीत झोपायला. एवढं सगळं होत असताना इथे एकटी झोपण्याएवढी मी शूरबीर नाहीये. पण ह्या गोष्टीमुळे आत्ता विचलित होऊनही उपयोग नाही. आपण ह्याच्याहून भयानक अनुभव घेतलाय. बोलूया आपण आत्ताच…” सायली

 

ओकेकाय सांगायचं होतं तुला महत्वाचं?” ईशा

 

सगळी स्टोरी ऐकण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट ऐक. माझं आणि सुजयचं लग्न सहा महिन्यांनंतर होणार होतं, ते आता पुढच्या १५ दिवसात होणार आहे……” सायली

क्रमशः

2 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 11)

 1. Sweetali
  February 22, 2016

  story mast interesting hot chalali aahe….waiting for next part 🙂

  Like

  • rutusara
   February 23, 2016

   Thanks Sweetali 🙂 next part …lavkarach !!

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on February 21, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: