davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 12)

ईशाने शांत होऊन विचार केला मग ती म्हणाली,

ह्या वाटेवरून जाताना, ही शक्यता आपण लक्षात घेतली होतीच, नाही का सायली? आपल्या दोघींच्याही मनातली भीती सांगतेय, की तीपरत आली होती. बाकी काहीच उत्तर नाहीये ह्याच्यावर माझ्याकडे. हे बघ, तू सांभाळून रहा, अलर्ट रहा आणि जमलं तर मावशीच्या खोलीत झोपायला जा. आणि आधी शांत हो. आपण बोलूया आत्ता की सकाळी बोलायचं? मला पण काहीतरी सांगायचं आहे तुला…”

बरोबर आहे तुझं. मी जाईन आईच्या खोलीत झोपायला. एवढं सगळं होत असताना इथे एकटी झोपण्याएवढी मी शूरबीर नाहीये. पण ह्या गोष्टीमुळे आत्ता विचलित होऊनही उपयोग नाही. आपण ह्याच्याहून भयानक अनुभव घेतलाय. बोलूया आपण आत्ताच…” सायली

ओकेकाय सांगायचं होतं तुला महत्वाचं?” ईशा

सगळी स्टोरी ऐकण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट ऐक. माझं आणि सुजयचं लग्न सहा महिन्यांनंतर होणार होतं, ते आता पुढच्या १५ दिवसात होणार आहे……” सायली

—————— भाग ११ पासून पुढे चालू ———————

भाग ११ येथे वाचा << — http://wp.me/p6JiYc-i0

 

त्या रात्री सायलीला शांत झोप येणं शक्यच नव्हतं. डोळे मिटून ती शांतपणे पडली होती. बाजूला आई-बाबा झोपले होते. ईशाच्या सांगण्यावरून ती आई-बाबांच्या खोलीत झोपायला आली होती खरी, पण म्हणून मनाची तगमग, घालमेल, अस्वस्थता आणि विचार थोडेच कमी होणार? ईशा आणि ती या वाटेवर जसजशा पुढे जात होत्या, जसजश्या शोध घेत होत्या, तसतसा सुजयबद्दलचा संशय आणखी बळावत होता. पण काही ठोस हाती लागत नव्हतं, आणि हाती लागायच्या आधीच हे एक नवीन संकट पुढच्या वळणावर वाट पाहत होतं. बुद्धिबळाच्या या खेळात समोरचा प्लेयर दिसत नसला तरीही तो खूप विचार करून आपल्याही आधी त्याची चाल खेळतोय हेही जाणवत होतं पण त्याच्या ह्या चालीमागचा नेमका हेतू तिला कळत नव्हता.

 

आपण घेतलाय तो निर्णय योग्य आहे का? कुठल्या वळणावर आलंय आपलं आयुष्य? पंधरा दिवसांपूर्वी चित्र काही वेगळंच होतं. मग सुजय भेटला, मागोमाग विचित्र, गूढ अशा त्या घटना, सुजयचं संशयास्पद वागणं, …… लग्न व्हायला अजून वेळ आहे, त्यामुळे सुजयबद्दल खरं काय ते शोधून काढायला पुरेसा वेळ आहे आणि आपण त्याचा पुरेपूर उपयोग करून घायचा, असा विचार आपण आज ऑफिसमधून येताना करत होतो, पण घरी आल्यावर थोड्याच वेळात हा विचार किती निरुपयोगी होता हे तिच्या लक्षात आलं होतं. सगळं चित्र पुन्हा तिच्या नजरेसमोर येत होतं…

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

(सायली ऑफिसमधून घरी आली आणि बाबांना तिच्याशी काही बोलायचं होतं म्हणून ती त्यांच्यासमोर येउन बसली. तेव्हा रात्रीचे ८ वाजत आले होते. त्यानंतर रात्री पाऊण वाजता तिचं ईशाशी बोलणं झालं आणि तिने ईशाला सांगितलं की तिचं लग्न पुढच्या पंधरा दिवसात होणार आहे. रात्री ८ ते पाऊण ह्या वेळात घडलेल्या घटना, फ्लॅशबॅक मध्ये …..)

“हा बाबा, काय बोलायचंय? ” सायलीने मनातली धाकधूक चेहऱ्यावर येऊ न देता हा प्रश्न विचारला.

 

“सांगतो. आज सकाळीच सुजयच्या बाबांचा फोन आला होता मला. पण अजून पुढे काही सांगायच्या आधीच सांगतो. कोणत्याही दबावाला तू बळी पडू नयेस, असंच आम्हाला वाटतं. पण त्याच बरोबर तुझं आयुष्य, तुझं करियर ह्याचाही सगळ्या दृष्टीने विचार कर आणि तूच निर्णय घायचा आहेस.”

बाबांच्या प्रत्येक शब्दागणिक सायलीचं टेन्शन वाढत होतं. म्हणजे नक्कीच तिच्या आणि सुजयच्या लग्नाच्या बाबतीतलं काहीतरी बोलायचं होतं बाबांना….

“म्हणजे काय ? काय म्हणाले ते..?” सायली

 

“एक चांगली बातमी दिली त्यांनी पण त्या अनुशंघाने जी दुसरी गोष्ट घडणार आहे, ती मात्र ठरवल्यासारखी होणार नाही आणि त्याबद्दलच बोलायला त्यांनी फोन केला होता. सुजयला पुढच्या दोन वर्षांसाठी यु.एस ला जाण्याची संधी मिळतेय. कालच त्याला त्याच्या बॉसनी ह्याबद्दल सांगितलं. ही खूप मोठी संधी आहे त्याच्यासाठी. त्याला यु.एस मधल्या त्यांच्या टॉप मॅनेजमेण्ट बरोबर आणि काही अतिशय महत्वाच्या क्लायेनट्स साठी काम करायला मिळणार आहे. हे तसं एक प्रोजेक्टच असेल त्याच्यासाठी आणि जर ते सक्सेसफुल झालं तर ओन्ली स्काय विल बी द लिमिट फॉर हिम…खूप ब्राईट असणार आहे त्याचं फ्युचर….पण एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला पुढच्या दोन दिवसात निर्णय कळवायचा आहे. आणि जर त्याचा होकार असेल तर मात्र पुढच्या तीन आठवड्यात त्याला निघावं लागेल. आत्ता इथेही तो ऑल इंडिया लेवलला मार्केटिंग डिविजन सांभाळतोय. काही महत्वाचे प्रोजेक्ट्स इथेही लायींड अप आहेत त्याचे. त्यासाठी ते दुसऱ्या कोणाला तरी ट्रेन करून हळूहळू ती पोझिशन टेक-ओव्हर करायला लावतील, पण तो माणूस पूर्णपणे इंडिपेंडंटली ते काम सांभाळत नाही, तो पर्यंत सुजयला तिथून यु.एस. मधून त्यालाही सपोर्ट करावं लागेल. त्याबरोबर त्याच्या नवीन प्रोजेक्ट चं कामसुद्धा सांभाळावं लागेल. आणि तसंही त्याच्या तिथल्या कामाचं स्वरूप बघता त्याला लग्नासाठी रजा वगैरे घेऊन इथे येणं शक्य होणार नाही. अगदी दोन-दिवसाची रजाही घेणं शक्य होईल असं नाही. म्हणजे आत्ता तसं काहीच सांगता येणार नाही. त्याचं लग्न ठरलंय, त्यामुळे त्याच्या बॉसने त्याला काल बोलताना ही कल्पनासुद्धा दिली.

सायलीच्या चेहऱ्यावरचे बदलत चाललेले भाव बाबांच्या नजरेतून सुटले नाहीत. बाबा आत्ता नक्की काय बोलणार आहेत ह्याचा तिला अंदाज येत नव्हता. ह्या सगळ्या प्रकरणामुळे सान्यांनी लग्न पुढे ढकललं असेल का? की सुजयसाठी थांबू नका वगैरे असं सांगितलं असेल त्यांनी? तसं असेल तर बरंच होईल…पण आईबाबांसाठी मात्र तो मोठा धक्का असेल…सान्यांनी कोणताही प्रस्ताव समोर ठेवला असेल तरी त्यात काळजी करण्यासारखं काहीतरी असणारच. हेच सगळे विचार सायलीच्या चेहऱ्यावर टेन्शन म्हणून येउन बसले होते. बाबांना अर्थात त्याची कल्पना होती तरीही त्यांनी त्यांचं बोलणं पुढे चालू ठेवलं.

“आय नो, सायली तुला हे सगळं ऐकून काळजी वाटत असेल…लग्न नक्की कधी होणार ह्याची….पण आता टेन्शन घायची नाही, तर योग्य विचार करून निर्णय घ्यायची वेळ आहे. खरं तर सुजयचीच तशी ईच्छा आहे. काल हे कळल्यावर ते सगळेच विचारात पडले होते. एकदा गेल्यावर दोन वर्ष परत येत येण्याचे चान्सेस दिसत नाहीयेत. प्रोजेक्ट पुढे आणखी एखादं वर्ष एक्स्टेंड होऊच शकतं. बरं, निघायला थोडा अवकाश असता तर तसंही नाही. ह्या बाबतीत त्याने दोन पर्याय सुचवले आहेत. एक म्हणजे, दोन-तीन वर्ष लग्न पुढे ढकलणं, प्रोजेक्ट सुरु होऊन काही काळ गेला की त्याला कामाचा अंदाज येईल, मध्ये एखादा आठवडा रजा घेऊन येता येईल का, ह्याचा अंदाज येईल. पण खात्री नाहीच देता येत. शिवाय हे सुद्धा लगेच नाही होणार, एक-दीड वर्ष तर जाईलच. दुसरा पर्याय म्हणजे तो जाण्याच्या आधी म्हणजे पुढच्या पंधरा दिवसात लग्न करायचं. घाई होईलच, पण त्याचा फायदा म्हणजे लग्न झाल्यावर तू पण व्हिसा अप्लाय करू शकशील आणि तुझी ईच्छा असेल तर त्याच्या सोबत जाऊ शकशील किंवा काही महिने जाऊन राहू शकशील आणि लग्न पुढे ढकलल्याचं टेन्शन, किंवा बाहेर कोणाला काय उत्तरं द्यायची ह्यातून आपण सगळेच बाहेर राहू. अर्थात हा निर्णय त्याने तुझ्यावर सोपवला आहे. तुझं करियर सुद्धा महत्वाचं आहे, जर आधी लग्न केलंत तर तू त्याच्याबरोबर जायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल. तुझ्या जॉबच्या दृष्टीने तुला तिथे जाणं ठीक वाटत नसेल तर तो परत येईपर्यंत तू इथेच राहण्याचा निर्णय घेऊ शकतेस. “

 

“हे एवढं सगळं नक्की कधी घडलं? काल ऑनलाईन भेटला होता तो, काहीच बोलला नाही मला….आणि आज फोन कधी आला ह्याबद्दलचा? हे एवढं सगळं प्लानिंग करण्याआधी माझ्याशी कोणाला काहीच बोलावसं वाटलं नाही का? लग्न काय फक्त तो करतोय ?”

सायलीचा पारा चढत चालला होता. आपण ठरवतो एक, आणि घडतंय भलतंच असं आजकाल तिच्या बाबतीत सारखंच होत होतं.

“सायली, हे बघ, अगं मान्य आहे की आपल्याला प्लान्स थोडे चेंज करावे लागतील. पण हे असं होणार, हे त्याला माहित असतं, तर त्याने लग्न ठरवतानाच सांगितलं नसतं का तसं? त्यांना त्यांचेही प्लान्स बदलावे लागणारच आहेत ना? ” बाबा

 

“पण हे दरवेळी असं काय करतात हे लोक? साखरपुड्याच्या आदल्या दिवशी सांगितलं की त्यांची माणसं येणार नाहीत. आता म्हणतायत की लग्न दोन-तीन वर्षांनी करा किंवा पंधरा दिवसात करा, ह्याला काही अर्थ आहे का? दरवेळी कसं असं आयत्या वेळी बदलतात हे सगळं ? ” अनिकेत पण वैतागला होता.

 

“हे बघ अनि, दोन्ही वेळेला कारणं पण तशीच आहेत ना बदल करायची? त्यांनी व्यवस्थित आपल्याला सांगून केलंय सगळं….ताईच्या बाबतीत असं झालं असतं, तिला अचानक अशी संधी आली असती तर तू असंच बोलला असतास का?असं नसतं बाळा….एकदा नातं जोडायला निघालो की समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून नेहेमी विचार करायचा असतो.” आई

 

“म्हणजे, माझ्यापुढे आत्ता दोनच पर्याय आहेत का, मुलाकडच्यांनी सुचवलेले? ”

सायली ‘मुलाकडच्यांनी’ ह्या शब्दावर जास्त भर देऊन म्हणाली.

“आता काय ते म्हणतायत तसं मी माझं आयुष्य प्लान करायचं? सॉरी प्लान काय करणार म्हणा, ते आयत्या वेळी सगळं सांगणार आणि मी फक्त नातं जपण्यासाठी त्यांनी सुचवलेले पर्याय मान्य करायचे….असंच ना? ” सायली फणकाऱ्याने म्हणाली.

 

“आय डोन्ट बिलिव्ह धिस….सायली तू असं बोलशील असं खरंच मला वाटलं नव्हतं. हे बघ- हे मुलाकडचे, मुलीकडचे वगैरे जरा वेळ बाजूला ठेवू. तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये नेक्स्ट ईयर चा बिझनेस प्लान, गोल्स आणि स्ट्रॅटेजिज हे सगळं सोडून बाकीच्या गोष्टी एवढ्या आधीपासून ठरवून होत असतात का? टॅलेण्ट ओळखलं जातं आणि लगेच त्या टॅलेण्टला आणखी काही नवीन करण्याची संधी दिली जाते. हे तुलाही माहित आहे. मागच्या वर्षी तुमच्या सिंगापूरला झालेल्या कॉन्फरन्स मध्ये तुला १५ दिवसांसाठी जाण्याची संधी मिळाली होती, हे तुला फक्त चार दिवस आधी कळवलं होतं, आठवतंय ना? ती कॉन्फरन्स झाली आणि मग नंतर लगेच तुझं प्रमोशन झालं. त्या चार दिवसात तुझा व्हिसा, शॉपिंग किती किती धावपळ झाली होती, पण शेवटी एक खूप मोठी संधी होती तुझ्यासाठी म्हणून आपण ते सगळं आनंदाने केलंच ना….तसंच बघ ना ह्या सगळ्याकडे….मला वाटलं होतं की तू खूप खुश होशील ही बातमी ऐकून…यु विल फील प्राउड अबाउट सुजय…पण तुझी ही रिएक्शन माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे सायली. आणि हे बघ, तो उलट  सगळे निर्णय घ्यायचे अधिकार तुला देतोय ….अगदी त्याच्या आयुष्याचेही….”

सायलीने चमकून बाबांकडे पाहिलं.

“अशी बघू नकोस, त्याने जेव्हा हे दोन पर्याय सुचवले ना, तेव्हा लगेच त्यापुढे त्याने हेही सांगितलं की त्याच्यासाठी तुझा निर्णय सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळे जर तुला हे दोन्ही पर्याय पटत नसतील किंवा लग्नाबद्दल जे आधी ठरवलंय तसंच व्हावं अशी तुझी ईच्छा असेल, तर तू त्याला तसं मोकळेपणे सांगावस, तो ही हातात असलेली संधी सोडून द्यायला तयार होईल. म्हणजे खरं तर त्याने तुझ्या हातात निर्णय सोपवलाय. लग्न २ किंवा ३ वर्षांनी करायचं, किंवा आत्ता १५-२० दिवसात करायचं किंवा त्याला ही संधीच सोडून द्यायला लावायचं आणि सगळं ठरल्याप्रमाणे होऊ द्यायचं हे तू ठरवायचं आहेस. तू ठरवलेलं सगळं त्याला मान्य असेल असं म्हणाला. “

सायलीसाठी हे सगळं जवळजवळ धक्कादायक होतं. सुजयच्या मनात नक्की काय आहे, ह्याचा थांगच लागत नव्हता. तिची पहिली रिएक्शन आई-बाबांना फारशी आवडलेली नव्हती, हे दिसतच होतं. त्यांच्या बाजूने विचार केला तर त्यांचं बरोबरही होतं. सुजयच्या बाबतीत सगळं नॉर्मल असतं, तर कदाचित सायलीची रिएक्शन उत्साही, आनंदी, त्याच्याबद्दल अभिमान वाटणारी अशीच असली असती. पण आता ते शक्यच नव्हतं. संध्याकाळी घरात येताना आपण काय विचार करत होतो आणि सुजयने आता लग्नाची तारीखच बदलण्याचा प्रस्ताव पुढे ठेवल्यामुळे, तो विचार किती फोल ठरला आहे, ह्या जाणीवेमुळे तिची चिडचिड होत होती. ती आई-बाबांना कशी कळणार? सुजयला नक्की काय हवंय? लग्न लवकर व्हायला हवंय असं म्हटलं तर त्याने दुसरे दोन पर्यायही समोर ठेवलेत आणि निर्णयही माझ्यावर सोपवलाय. काय उत्तर द्यावं आता? ती सैरभैर झाली होती. ईशाशी बोलायला हवं….आत्ताच….

“बाबा, सॉरी मी जरा ओव्हर-रीएक्ट झाले. सुजयला जी अपॉरचुनिटी मिळाली आहे, त्याचा मला पण आनंद आहे. इट्स जस्ट दॅट मला जरा टेन्शन आलं एवढ्या पटकन एवढा मोठा डिसिजन घ्यायचा त्याचं. ”

 

“अगं टेन्शन नको घेउस बाळा…आणि आम्ही आहोतच की सगळे तुझ्याबरोबर…तू फक्त विचार करून योग्य निर्णय घे. आणि हे बघ, सुजयने असं अचानक हे सांगितलं ह्याबद्दल रागावण्याऐवजी त्याने कळल्या-कळल्या निर्णय घ्यायचा अधिकार तुला दिला, हे लक्षात घे. तुझ्या निर्णयावर आता तुमचं दोघांचं करियर अवलंबून आहे. तुला आता तुझा एकटीचा विचार करून चालणार नाही. दोघांच्या दृष्टीने काय बरोबर आहे, त्याचा विचार कर. खरं तर बाबा मला म्हणाले होते की तुझा निर्णय होईपर्यंत आपल्या मनातलं तुला सांगायचं नाही….”

आईने बोलता-बोलता हळूच बाबांकडे बघितलं. बाबा तिच्याकडे बघत नकारार्थी मान हलवत होते.

” पण तरीही मला राहवत नाही, म्हणून सांगते. तू हाच निर्णय घे असं आमचं अजिबात म्हणणं नाही. तू तुला काय हवंय तेच ठरव, पण आमचं म्हणणं आणि त्यामागचा आमचा विचार लक्षात घे. आम्हाला दोघांनाही असं वाटतं की आपण सुजयला या परिस्थितीत साथ दिली पाहिजे. त्याचं फ्युचर अतिशय ब्राईट आहे, हे दिसतंय आपल्याला. फक्त लग्नाच्या तारखेमुळे त्याला ही संधी घेऊ द्यायची नाही, हे बरोबर नाही. आम्हाला असं वाटतं की त्याला यु.एस. ला जाऊदे, तो जायच्या आधी तुमचं लग्न करू आणि तुझाही व्हिसा करून टाकू. तो ज्या व्हिसा वर जातोय त्याची स्पाउस म्हणून तुला जो व्हिसा मिळेल त्या व्हिसा वर वर्क परमिट आहे तुला, असं त्यानेच सांगितलं. तुला आठवतं, दोन वर्षांपूर्वी तुझ्याच एकदा मनात आलं होतं…यु.एस.ला काही अपोर्चुनीटी मिळतेय का ते बघायचं…आता अशा रीतीने चान्स मिळतोय तुला…आणि जरी आता तुला हा जॉब सोडून तिकडे जायचं नसेल तर नको जाऊस…तुला इथे आमच्याबरोबर राहता येईल की नाही? आजकाल किती कपल्स करियर साठी असे वेगळे राहतात…हे बघ, ठरलेलं लग्न लांबणीवर पडलं की बरं नसतं फार..पुन्हा त्याला नाहीच जमलं रजा घेऊन यायला तर काय करणार? दोन-तीन वर्ष खूप मोठा काळ आहे…आम्ही सुचवतोय तो पर्याय तुझ्या आणि त्याच्याही दृष्टीने सगळ्यात चांगला आहे, असं आम्हाला वाटतंय…आता तू विचार कर आणि ठरव…आम्हाला खरंच तू ठरवशील ते सगळं मान्य असेल..आम्ही तुझ्याबरोबर असू…” आईने तिच्या पाठीवरून हात फिरवत सांगितलं.

 

“मी लक्षात ठेवेन नक्की…पण मला जरा शांतपणे विचार करायचाय ह्या सगळ्यावर….मी जरा आत जाते…उद्या सकाळपर्यंत काहीतरी ठरवायलाच हवं.”

सायली आत्तापर्यंत पहिले बसलेल्या त्या धक्क्यातून सावरली होती. आता तिला खरंच तिचा एकटीचा वेळ हवा होता. तिला सगळ्या गोष्टी एकमेकांशी ताडून बघायच्या होत्या. नक्की काय करायचं, हे तिने अजून ठरवलेलं नव्हतं, तरीही त्याची काहीतरी आखणी तिच्या मनात होत होती.

“तू पटकन जेवून घे आणि मग जा. आम्ही कोणी नाही तुला डिस्टर्ब करणार….” आई

 

“भूक नाहीये गं आत्ता…वाटलं तर दूध पिते झोपायच्या आधी…तुम्ही जेऊन घ्या सगळे….”

सायली आत जाता-जाताच मागे वळूनही न बघता म्हणाली. तिच्या डोक्यात आता बाकी कसलेच विचार नव्हते. शाळेत-कॉलेज मध्ये परीक्षेच्या आधी जसे आपण रात्री जागून, ध्यास घेऊन अभ्यास करतो, तसंच काहीसं करायचं तिचा विचार होता.

आज रात्री सुजय नावाचा हा चॅप्टर इतक्या वेळा वाचायचा, की तो नुसता पाठच नाही झाला पाहिजे, तर त्याचा असा अभ्यास झाला पाहिजे की त्याच्यात लिहिलेल्या ओळी वाचताना त्यांचा लपलेला अर्थ आधी समोर आला पाहिजे. बास्स….हा आत्तापर्यंतच्या अभ्यासातला सगळ्यात कठीण चॅप्टर असेल तर तो मी एक चॅलेंज म्हणून स्वीकारेन…या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून दाखवेन मी…

विचारांच्या तंद्रीतच सायली तिच्या खोलीत गेली आणि तिने दार लावून घेतलं…

“अहो, म्हणून मी सांगत होते तुम्हाला, जेवणं होऊदेत आणि मग बोला तिच्याशी…आता ही न जेवता रात्रभर विचार करत बसणार….” मागे आईचा आवाज येत होता.

 

“अगं बाई, मला खरंच वाटलं नव्हतं ती अशी रीएक्ट होईल असं… तुला तिची रिएक्शन विचित्र नाही वाटली? …मला वाटलं होतं, की ती खूप खुश होईल हे ऐकून…आणि लग्न कधी करायचं ह्या प्रश्नापेक्षा जास्त सुजयला मिळालेली संधी ह्याबद्दल ती जास्त बोलेल….लग्नाचं ठरवायला आपण सगळेच आहोत की…शिवाय साने मंडळी कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाही टाकत आहेत आपल्यावर…हिलाच तर सगळं ठरवायचंय….मग ही एवढी चिडली का असेल? तिच्या डोक्यात काही वेगळं चाललं होतं असं वाटलं मला….”

 

“हो असं वाटलं खरं तर मलापण…म्हणजे एरव्ही तिने लगेच त्याला फोन केला असता…अभिनंदन केलं असतं….काय स्वरूपाचं काम आहे वगैरे सगळं विचारलं असतं, लग्न कधी करायचं ह्याचा निर्णय घेण्यात, आपल्या सगळ्यांशी हे डिस्कस करण्यात तिने पुढाकार घेतला असता….पण आत्ता तिच्या डोक्यातही नव्हतं हे…काहीतरी वेगळाच विचार करत होती ती…आत जाताना किती तंद्रीत होती स्वतःच्या ….बघितलंत ना?” आईला आता जरा काळजी वाटायला लागली होती..

 

“हम्म….उद्या बोलूया तिच्याशी…तुला ताईना कळवायचं तर कळव…” बाबा

 

“आत्ता नको…उद्या बोलेन तिच्याशी….सायली काय ठरवते ते पण सांगता येईल ना तिला…तसंही ईशाशी बोलणं होईलच सायलीचं…कदाचित ताईला कळेल तसंपण….चला जेवून घेऊ आता…अनि चल रे…” आई

—————–
आत आल्यावर सायलीने आधी ईशाला फोन लावला. एकदा, दोनदा, तीनदा…पण नुसती रिंग वाजत होती…मग तिला आठवलं…ऑफिसमधून येताना रिक्षात बसल्यावर तिचा मेसेज आला होता. तिने लिहिलं होतं, ती आज बिझी असणार आहे, उशीर होणार आहे, असं. काय करावं आता? तिला सुचत नव्हतं. एखादा सुरा घेऊन सुजयच्या घरी जावं, आणि तो सुरा त्याच्या मानेवर ठेवून त्याच्याकडून खरं काय आहे, ते वदवून घ्यावं, अशी तीव्र ईच्छा तिला होत होती. सुजयबद्दल ठामपणे काही सांगणं खरंच खूप कठीण होतं. आई-बाबांना किंवा इतर कुणालाही ज्यांना त्याची एकच बाजू माहित आहे, त्यांना आयुष्यात कधीही त्याच्याबद्दल संशय येणार नाही. पण आपण आणि ईशा, आपल्याला जे काही कळलंय त्याच्याबद्दल, किंवा जी शंका येतेय, त्यानंतर त्याच्याबद्दल असा सरळ विचार का करावा आपण?

 

डोक्यातले विचार असह्य होऊन ती उठली आणि खिडकीत उभी राहिली. दोन मिनिटं खिडकीत उभी राहिल्यावर ती पुन्हा मागे फिरली. बेडच्या खालून तिने तिची योगा-मॅट बाहेर काढली. त्यावर ध्यानमुद्रेत बसून तिने १० मिनिटं ओमकाराचा जप केला. ही खरं तर हे करण्याची वेळ नव्हती, पण आत्ता काहीही करून तिला शांत होणं आणि डोक्यात विचारांचा गोंधळ होऊ न देणं, हे महत्वाचं होतं. योगासनं आणि प्राणायाम करायची सवय तिला कॉलेज मध्ये असल्यापासून होती. अभ्यास सुरु करण्याआधी ओमकाराचा जप केला की कॉन्सँट्रेशन चांगलं होतं हे तिला अनुभवाने माहित झालेलं होतं.

 

जप झाल्यावर काहीवेळ ती तशीच डोळे मिटून शांत बसली. मग अचानक तिला काहीतरी सुचलं. तिने धावत जाऊन तिच्या डेस्कवर पडलेली वही उचलली. आत्तापर्यंत सुजयबद्दलच्या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या असं तिने ठरवलं. लिहिण्याआधी एक क्षण पुन्हा डोळे मिटले. सुजयबरोबरच्या पहिल्या भेटीपासून ते आजच्या दिवसापर्यंतचे सगळे क्षण डोळ्यांसमोरून गेले. वही उघडून तिने लिहायला सुरुवात केली.

 

सुजय रमेश साने
वय : २८ वर्ष
कंपनी – ग्लॉसिसॉफ्ट, मुंबई ऑफिस
रेसिडेन्स – जुहु, मुंबई

१. पहिल्या भेटीत पसंती कळवली
२. रविवारी भेटलो आणि सोमवारी लग्न ठरलं.
३. लग्न ठरल्यावर दुसऱ्या दिवशी ते स्वप्न पडलं
४ . मध्ये चार-ते पाच दिवस तो अचानक दिल्लीला गेला. नो फोन कॉल्स, नो मेसेजेस
५ . शुक्रवारी फोन करून शनिवारी खरेदीला जायचं ठरवलं.
६ . शनिवारी सान्यांच्या घराबाहेर भेटलेली मोलकरीण – ” आणखी कुणी नसतं तिथे…” असं म्हणाली
७ . खरेदीला आणि डिनरला सुजय आलाच नाही. शेवटी १५-२० मिनिटं आला आणि खूप छान बोलला.
८. त्याच दिवशी रात्री ‘ तो’ चेहरा दिसला.
९ . पुढच्या आठवड्यात शुक्रवारी ऑफिसच्या मीटिंगवरून त्याच्या घरी गेले. घर अस्ताव्यस्त, त्याचा नागपूरचा मावस-भाऊ राज भेटला.
१०. त्याच दिवशी रात्री ईशाला ‘ती’ पहिल्यांदा दिसली

११. बाबांनी सुजयची माहिती काढली – कामत आणि मोहितेकाकांचा जावई ह्यांनी माहिती दिली
१२. दुसऱ्या दिवशी, शनिवारी रात्री सान्यांचा फोन. गावातले जोशीअण्णा गेले, म्हणून साखरपुड्याला येणारे नातेवाईक येणार नाहीत.
१३. साखरपुड्याच्या दिवशी सकाळी घाईघाईत पर्स शोधताना खोलीत कुणीतरी असल्याचा झालेला भास
१४. साखरपुड्यात त्याचा जवळचा मित्र, ‘कौस्तुभ परांजपे’, त्याच्याबद्दल काहीतरी खटकत होतं
१५. अंगठी घालताना काहीतरी चुकीचं करत असल्याची भावना
१६. साखरपुड्याच्या रात्री ‘ती’ दिसली. यावेळी काही आवाजही आले.
१७. सुजयच्या फेसबुक प्रोफाईल पासून शोधाला सुरुवात. फेसबुक मध्ये फोटो टॅगिंग नाही. ठराविकच मित्रांचे मेसेजेस आणि फोटो-कॉमेंट्स, जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१५ हा पावणेदोन वर्षाचा काळ फेसबुकवर काहीच एक्टीव्हीटी नाही. त्याधीचे मित्र वेगळेच. आधीचे बरेचसे मित्र आता त्याच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये नाहीत.
 १८. नागपूरला राहणारे त्याच्या मावशीचे मिस्टर आज इथे भाजी घेताना भांडताना दिसले. ते नक्की मुंबईत कधी आले, ह्याबद्दल सुजयने दिलेली खोटी माहिती.
१९. आज अचानक त्याला मिळत असलेल्या मोठ्या संधीमुळे लग्नाच्या तारखेबद्दल काही वेगळं ठरवण्याचा प्रस्ताव.

एवढं लिहिल्यावर तिने पुन्हा ४- ५ वेळा ईशाला फोन लावून बघितला. पण नुसतीच रिंग वाजत होती. पुन्हा एक क्षण विचार करून तिने वहीमध्ये लिहायला सुरुवात केली.

ईशाला कळलेल्या गोष्टी:

१. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी फोनवर बोलताना सुजयने ईशाबद्दल आधीच माहिती असल्यासारखं ८ महिन्यांपूर्वी पुण्याला जॉबला लागल्याचं सांगितलं. त्यावर विचारल्यावर सारवा-सारव केल्यासारखं उत्तर दिलं
२. साखरपुड्यात सुजयच्या मावशीचे मिस्टर , त्यांचं कौस्तुभ ला ओढत घेऊन जाणं…वरवर फनी वाटली तरी नंतर ही गोष्टही थोडी खटकली.

लिहून झाल्यावर सायलीने पुन्हा एकदा ते सगळं नजरेखालून घातलं. त्यातला सतराव्या – फेसबुकच्या पॉइण्ट च्या पुढे तिने एक छोटा स्टार काढला आणि त्यापुढे नं. १ असं लिहिलं. पॉइण्ट ६ – मोलकरणीचं बोलणं, ह्यापुढे एक स्टार काढून त्यापुढे नं. २ असं लिहिलं. सुजयबद्दलचा जो शोध तिने चालू केला होता, तो आता आणखी वेगात आणि अतिशय पुढचा विचार करून, सुजयच्या पॉइण्ट ऑफ व्हयू ने विचार करून करण्याची गरज होती. उद्या सकाळपर्यंत निर्णय घायचा होता तिला. खरं तर, ती आणखी एखादा दिवस घेऊ शकली असती ह्यासाठी. पण आता तिलाच हे सगळं लवकर संपवायचं होतं.

तिने घड्याळात बघितलं. नऊ वाजून गेले होते. अजून ईशाचा फोन आला नव्हता. ठीक आहे, तिचा फोन येईपर्यंत जमेल तेवढी माहिती, जमेल तसा शोध आपण घेऊ….

लिहून काढलेल्या सगळ्या पॉइण्टस कडे एकवार नजर टाकत तिने स्टार करून नं.१ असं लिहिलेल्या पॉइण्टकडे मोर्चा वळवला.
१६. सुजयच्या फेसबुक प्रोफाईल पासून शोधाला सुरुवात. फेसबुक मध्ये फोटो टॅगिंग नाही. ठराविकच मित्रांचे मेसेजेस आणि फोटो-कॉमेंट्स, जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१५ हा पावणेदोन वर्षाचा काळ फेसबुकवर काहीच एक्टीव्हीटी नाही. त्याधीचे मित्र वेगळेच. आधीचे बरेचसे मित्र आता त्याच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये नाहीत.

हा पॉइण्ट तिने पुन्हा एकदा एका नवीन पानावर लिहून काढला. आज सकाळीच ईशाशी बोलणं झालं, त्यानुसार फेसबुकवरची माहिती खरी वाटावी म्हणून सुजयने त्यात काही बदललंय का ते तपासायला हवं. तिने आणि ईशाने त्यावर वेगवेगळ्या दृष्टीने विचार केलेला होता, आपल्याला आपली माहिती लपवायची असेल तर आपण काय करू, ह्याचा. सायलीने नीट आठवून त्या दोघींचे मुद्देही लिहून काढले.

— (सायली) आत्ताचे माझे फ्रेंड्स, जे माझ्या टाईम–लाईन वर माझ्यासाठी काही मेसेज टाकू शकतात, त्यांना मी आयदर डिलीट करेन…किंवा मग ते पाठवत असलेले मेसेज तरी डिलीट करेन….म्हणजे त्यांनी मेसेज पोस्ट केला की लगेच तो डिलीट करायचा जेणेकरून तो कोणीच बघणार नाही

— (ईशा ) माझ्या खूप जवळच्या मैत्रिणींना माझ्या प्रोफाईलवर कॉमेंट्स आणि पोस्ट्स शेअर करायला सांगेन, जेणेकरून बाहेरच्या कोणालाही माझं प्रोफाईल वरवर बघता बाकी लोकांसारखं नॉर्मल वाटेल किंवा मी स्वतः ३ –४ फेक प्रोफाईल तयार करून त्यावरून माझ्या प्रोफाईल वर मेसेजेस, कॉमेंट्स, पोस्ट्स टाकेन…”

पुढचा पाऊण तास ती पुन्हा सुजयचं प्रोफाईल नीट बघत होती. आत्तापर्यंत ते तिने तिच्या नजरेतून किंवा बाहेरच्या कोणालाही ते जसं दिसेल तसंच बघितलं होतं. आता या वेळी मात्र ती तिने आणि ईशाने सुजयच्या भूमिकेत जाऊन जसा विचार केला होता, तशा नजरेने ते पाहत होती. पुन्हा एकदा तिने प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट नजरेखालून घातली. नजरेखालून घालताना मात्र तिने आणि ईशाने लावलेला अंदाज ती प्रत्येक बाबतीत तपासून बघत होती.

 

फेसबुक वर अगदीच १०-१५ फ्रेंड्स असून चालणार नाही, फ्रेंड्स ची संख्या पण मोठी दिसली पाहिजे, त्यामुळे त्याने सगळ्याच जुन्या फ्रेंड्स ना डिलीट केलं नसणार….त्यामुळे त्याच्या जुन्या फ्रेंड्स पैकी काही जण अजून त्याच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये होते. पूर्वी जवळपास रोज मेसेज टाकणारे हे फ्रेंड्स आता अजिबात कुठेच दिसत नाहीत ह्यात नक्कीच काहीच गडबड होती. ह्याचाच अर्थ कदाचित सुरुवातीला सुजयने त्या फ्रेंड्स चे मेसेजेस, पोस्ट्स सगळं पोस्ट झाल्या झाल्या डिलीट केलं असणार आणि नंतर काही काळाने, हे समजल्यावर त्या फ्रेंड्स नीच मेसेजेस टाकणं हळूहळू बंद केलं असणार.

 

फोटो खालच्या कॉमेंट्स काही ठराविक मित्रांनीच पोस्ट केल्या होत्या आणि सुजयच्या टाईम-लाईन वर पोस्ट होणारे मेसेजेस, शेअर होणाऱ्या पोस्ट्स सुद्धा ह्याच मित्रांच्या होत्या. सुजयने त्याच्या जवळच्या मित्रांना हे करायला सांगितलं असेल का? सायली विचार करत होती. नाही, जर तो त्याच्या जुन्या फ्रेंड्स ना या पद्धतीने ब्लॉक करतोय, तर असे कोणते एवढे जवळचे नवीन फ्रेंड्स असणार जे नंतर त्याच्या लिस्ट मध्ये आले आणि त्यांच्यावर एवढं महत्वाचं काम सोपवलं गेलं? छे…ही शक्यता फार कमी होती. जर असं असेल तर खरंच ईशा म्हणाली त्यातली दुसरी शक्यता…म्हणजे फेक प्रोफाईल्स. म्हणजे सुजयच स्वतः ४-५ फेक प्रोफाईल्स तयार करून त्याच्या स्वतःच्या फोटोज वर कॉमेंट्स टाकत होता, पोस्ट्स शेअर करत होता?

 

हळूहळू चित्र स्पष्ट होत होतं. कोणताही पुरावा नव्हता, मात्र तरीही काही गोष्टींची उत्तरं मिळत होती. सुजयचे जुने आणि नवे फ्रेंड्स वेगळे कसे? काही ठराविकच फ्रेंड्स सतत त्याच्या प्रोफाईल वर काही ना काही पोस्ट का करत राहतात , बाकी कोणीच का नाही? सुजयच्या भूमिकेतून विचार केला तर सगळ्या गोष्टी जुळत होत्या. वरवर पाहता कोणालाही फेसबुक प्रोफाईल नॉर्मल, इतर लोकांसारखंच वाटावं, ह्यासाठी त्याने हे केलं असणार ह्याची हळूहळू सायलीला खात्री पटत होती.

 

आता दोनच प्रश्न होते…
१. सुजयने असं केलं असेल तर ते कोणासाठी? स्वतःच्या बाबतीत सगळं नॉर्मल चाललंय, हे त्याला नक्की कोणाला दाखवायचं होतं? सायलीला की आणखी कुणाला?
२. तो मधला काळ, जेव्हा सुजय फेसबुक पासून लांब होता, त्याबद्दल काय? नक्की काय झालं होतं तेव्हा म्हणून सुजयने त्यानंतर जुन्या फ्रेंड्स शी (निदान )फेसबुकवर (तरी ) नातं तोडलं होतं?

 

आता तरी ईशाशी बोलायलाच हवं. सायलीने पुन्हा तिला ४-५ वेळा कॉल करून बघितले. ईशा फोन उचलत नव्हती. सायलीची अस्वस्थता वाढत होती. लग्नाच्या तारखेबाबत आता ठरवायचंय. आता तरी बाबांच्या कानावर घालायला हवं सगळं, तिला वाटून गेलं. पण हे सुद्धा ईशा शी बोलून ठरवायला हवं.

 

तेवढ्यात आई आत आली. ती सायलीसाठी दूध घेऊन आली होती.

“सायली, हे घे. दूध घे लवकर, जेवली पण नाहीयेस. हे बघ, इथे ठेवतेय. गरम गरम पी हा जरा. “

आई परत जायला वळली पण पुन्हा वळून सायलीकडे आली. सायली खूपच दमलेली वाटत होती. टेन्शन घेतल्यासारखी, प्रश्न पडल्यासारखी दिसत होती.

“काय झालंय सायली? मगाशी बाबा पण म्हणत होते की तू कसल्यातरी विचारात आहेस असं”

 
“काही नाही गं…ऑफिसमध्ये खूप काम आहे गं…प्रोजेक्ट डेड-लाईन जवळ आलीये आणि अजून खूप काम बाकी आहे…त्याचं टेन्शन आहे गं थोडं..” सायली

 

“हे तुझं नेहेमीचंच आहे ना पण? प्रोजेक्ट संपत आला की काम वाढतंच…नेहेमीच…या वेळी काहीतरी वेगळं आहे…नक्कीच सायली …तुझे डोळे, चेहरा कसा दिसतोय बघ ना…काहीतरी चाललंय ना तुझ्या डोक्यात? आम्हाला सांग ना…आम्ही कुठल्यातरी बाबतीत कधी तुम्हाला विरोध केलाय किंवा कशासाठीतरी तुमच्यावर दबाव आणलाय असं कधी झालंय का?” आईच्या आवाजात काळजी होती.

 

“अगं खरंच गं कामाचंच टेन्शन आहे, मगाशी तेच डोक्यात होतं, तेव्हाच तुम्ही सुजयबद्दल सांगितलं आणि आता याही गोष्टीच्यामागे लागावं लागणार याचं टेन्शन आलं मला…म्हणून मी पटकन अशी रीएक्ट झाले. ” सायली

आई तिच्याकडे बघत नकारार्थी मान हलवत होती,

” असुदेत…जाऊदे…चल मी झोपते..जेवणातलं सगळं उरलेलं फ्रीज मध्ये ठेवलंय, ब्रेड पण आहे हवा असेल तर. रात्री भूक लागली तर खा. मला उठव नाहीतर , मी गरम करून देईन…”

आई गेल्यावर सायली पुन्हा विचारात गढून गेली.

” का लपवतेय मी आई-बाबांपासून हे सगळं ? त्यांना माझ्या लग्नाचं टेन्शन येऊ नये, म्हणूनच ना? पण आताही त्यांना टेन्शन देतेच आहे की मी, काहीही न सांगून…”

अचानक सुजयबद्दल तिच्या मनात संतापाची एक तिडीक उमटली.

“तुझ्यामुळे मी, माझे आई-बाबा टेन्शन मध्ये आहोत…तू आयुष्यात आलास आणि तेव्हापासून सगळं विस्कटल्यासारखं झालंय….”

साखरपुडा झाल्या दिवसापासून डोक्यात अखंड चालू असलेले विचार, प्रश्न, भविष्याबद्दलची काळजी आणि अनिश्चितता आणि कसल्यातरी अज्ञात गोष्टीची चाहूल आणि भीती हे आता सायलीला असह्य होऊ लागलं होतं. तिची चिडचिड आणि अस्वस्थता वाढत होती. तिने पुन्हा ईशाला फोन केला. ती फोन उचलत नाही हे बघून सायली आणखी अवस्थ झाली. खिडकीच्या इथे जाऊन ती उभी राहिली. सुजयच्या नुसत्या विचारानेच तिचा संताप संताप व्हायला लागला. शेवटी न राहवून तिने मोबाईल उचलला. फोन लावण्यापूर्वी तिने वेळ बघितली. १२ वाजून गेले होते, आत्ता एवढ्या उशिरा?

“माझी झोप उडवून हा कसा काय झोपू शकतो, बघतेच मी…..”

रागाच्या भरात तिने सुजयला फोन लावला….

क्रमशः

2 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 12)

 1. bagal alok
  March 5, 2016

  Mast pan jara lavkar next part takat ja na madhil gyap mule link lagat nahi

  Like

  • rutusara
   March 7, 2016

   thank you 🙂 pudhcha bhag lavkarat lavkar taknyacha maza prayatn astoch..pan tarihi aapli suchana nakki lakshat theven….dhanyavaad

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on March 5, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: