davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 13)

अचानक सुजयबद्दल तिच्या मनात संतापाची एक तिडीक उमटली.

“तुझ्यामुळे मी, माझे आई-बाबा टेन्शन मध्ये आहोत…तू आयुष्यात आलास आणि तेव्हापासून सगळं विस्कटल्यासारखं झालंय….”

साखरपुडा झाल्या दिवसापासून डोक्यात अखंड चालू असलेले विचार, प्रश्न, भविष्याबद्दलची काळजी आणि अनिश्चितता आणि कसल्यातरी अज्ञात गोष्टीची चाहूल आणि भीती हे आता सायलीला असह्य होऊ लागलं होतं. तिची चिडचिड आणि अस्वस्थता वाढत होती. तिने पुन्हा ईशाला फोन केला. ती फोन उचलत नाही हे बघून सायली आणखी अवस्थ झाली. खिडकीच्या इथे जाऊन ती उभी राहिली. सुजयच्या नुसत्या विचारानेच तिचा संताप संताप व्हायला लागला. शेवटी न राहवून तिने मोबाईल उचलला. फोन लावण्यापूर्वी तिने वेळ बघितली. १२ वाजून गेले होते, आत्ता एवढ्या उशिरा?

“माझी झोप उडवून हा कसा काय झोपू शकतो, बघतेच मी…..”

रागाच्या भरात तिने सुजयला फोन लावला….

————भाग १२ पासून पुढे—————————

भाग १२ येथे वाचा <<–  http://wp.me/p6JiYc-i4

( फ्लॅशबॅक पुढे चालू  : रात्री ८ वाजल्यापासून ते रात्री पाऊण या मध्ये घडलेल्या घटना )

पहिल्या वेळेला तर त्याचा फोन उचललाच गेला नाही. तरीही सायली पुन्हा ट्राय करत राहिली. शेवटी बऱ्याच वेळाने सुजयने फोन उचलला.

हॅलो सायली, तू आत्ता एवढ्या उशिरा का फोन केलायस? एव्हरीथिंग ओके? ” सुजय

त्याचा आवाज कानावर पडताच सायलीच्या संतापाची तिडीक मस्तकात गेली. हा छान शांतपणे झोपलेला असल्यासारखा वाटतोय आणि कसा साळसूदपणे विचारतोय एव्हरीथिंग ओके म्हणून

नथिंग इज ओके, मिस्टर सुजय. तुला झोप लागूच कशी शकते रे? ” सायली

सायलीचा स्वर ऐकून सुजयच्या छातीत धडधडलं. त्याने तिची ही रिएक्शन एक्स्पेक्ट केलेली नव्हती. त्याला वाटलं होतं, की त्याच्या यु.एस. अपोर्चुनीटीबद्दल कळल्यावर सायली त्याच्यावर प्रचंड खुश होऊन जाईल आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याला फोन करेल, पण तिच्या आवाजावरून तसं काहीच वाटत नव्हतं.

अगं नाही, मी झोपलो नव्हतो, अगदी ५ मिनिटांपूर्वी डोळा लागला, एवढंच…”

सुजय खूप सावधगिरीने बोलत होता. सायलीने नक्की फोन का केलाय आणि ती एवढी का चिडली आहे, ह्याचा त्याला अंदाज येत नव्हता. आपल्याबद्दल खरं काय ते तिला कळलं असेल का, ह्या विचाराने तो एकीकडे कासावीस होत होता.

तेच म्हणतेय मी, झोप लागूच कशी शकते तुला….बाबांनी मला सांगितल्यापासून माझी झोप उडाली आहे, डोक्यात विचार नाहीयेत दुसरे…. तू सगळं स्वतः ठरवून मोकळा झालास? .”

सायली अजून तेवढीच रागात होती.

पण….काय झालंय? बाबांनी काय सांगितलंय…?”

सुजय अस्वस्थ होत होता.

तुझ्या बाबांनी सांगितलं तेच. तुला घरी हे सगळं सांगण्याच्या आधी मला फोन करून सांगता येत नव्हतं सगळं? आपण काय जुन्या जमान्यातले आहोत काकी घरचे म्हणतील तसंच लग्न करायचंसगळं आधी त्यांना सांगायचं….वगैरे. तू हे जे काही नाटक केलंयस ना माझ्या बाबांसमोर त्याला तोड नाहीत्यांच्या समोर मारे अगदी सायली म्हणेल तसंच करेन आणि सायली काय ठरवेल ते मला मान्य असेल वगैरे म्हणालास, पण मग माझं मत एवढं महत्वाचं आहे तर मग सगळ्यात आधी मला फोन करून का नाही सांगितलंस तू? की आधी बाबांना इम्प्रेस करायचं होतं माझ्या, की तुमचा होणारा जावई कसा अगदी तुमच्या मुलीच्या मताचा आदर करतो वगैरे…..”

सायली रागाच्या भरात बोलत होती पण त्याक्षणी तिला माहित नव्हतं की रागाच्या भरात ती जे काही बोलत होती, कदाचित तेच तिच्या कोड्याचं उत्तर होतं…’सुजयच्या मनात नक्की काय आहे’??

 

जसजसा सायलीचा प्रत्येक शब्द कानावर पडत होता, तसतसा सुजयच्या छातीतली धडधड वाढत होती, सायली जे काही बोलत होती, ते सगळं तर त्याच्या प्लॅनचा भाग होतं.

 

यु.एस ला जाण्याची आलेली संधी हे फक्त नाटक होतं. सुजयला खरं तर लग्न लवकरात लवकर व्हायला हवं होतं. पण असं सायलीच्या घरी कसं सांगणार? असं आधी न ठरवता, काहीही कारण नसताना सायलीच्या घरचेच काय पण सायलीही लग्नाला तयार झाली नसती. त्यामुळे त्याने खूप विचार करून हा पुढचा प्लॅन केला होता. त्याचा आधीचा प्लॅन खूप सोपा होता. त्या प्लॅनप्रमाणे तो सायलीच्या घरी फक्त एवढंच सांगणार होता की त्याला यु.एस मध्ये मोठी संधी मिळते आहे आणि लगेच निघायचं असल्यामुळे सायलीचं आणि त्याचं लग्न अगदी घरातल्या घरात आणि लवकरात लवकर लावून द्यावं.

 

पण तो जेव्हा ह्या प्लॅनचा पुन्हा अभ्यास करायला लागला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की, सायलीचे घरचे तसे तर त्याच्या करियर शी संबंधित कोणत्याही कारणाला बळी पडले असते. होणाऱ्या जावयाच्या करियर च्या आड कोण येणार? आणि तेही तो मुलीला लग्न करून त्याच्याबरोबर नेतो असं म्हणत असताना? पण सायलीला मात्र ह्यात संशय येण्याचा संभव होता. लग्न लगेच का करावं लागेल, यु.एस मधून तो लग्नासाठी का येऊ शकणार नाही, तो कोणत्या व्हिसा वर जातोय, सायलीचा व्हिसा कोणता असेल, त्याच्या प्रोजेक्टचं नक्की काय स्वरूप असेल, तिने शंभर प्रश्न विचारले असते. मग त्याने पूर्ण विचार करून सायलीच्या घरी नक्की काय सांगायचं ते ठरवलं. या नाटकातल्या त्याच्या बाबांना सायलीच्या बाबांशी बोलण्यासाठी बोलवून घेतलं आणि त्यांचं बोलून झाल्यावर तो स्वतः सुद्धा तिच्या बाबांशी बोलला.

 

त्याने सायलीच्या बाबांशी बोलताना सांगितलं की सायली जो निर्णय घेईल तो त्याला मान्य असेल. पंधरा दिवसात लग्न केलं तरीही तिला तिच्या करियरच्या दृष्टीने सगळे निर्णय घेण्याचं म्हणजे यु.एस ला येण्याचं किंवा न येण्याचं स्वातंत्र्य आहे, तिला तिथे वर्क परमिट मिळेल असंही सांगितलं. तिला हवं असेल तर परत आल्यावर लग्न करू असं सांगताना त्याने प्रोजेक्ट कदाचित एक्स्टेंड होऊ शकतो, हे ही सांगून टाकलं. त्याने सांगतानाच आडून आडून पंधरा दिवसात लग्न केल्याचे फायदे आणि २ वर्ष थांबलं तर त्याचे तोटे सांगितले होते. पण सगळं सांगून झाल्यावर सायलीकडे निर्णय घ्यायची जबाबदारी सोपवून त्या एका वाक्यात त्याने त्याचं सायलीवरचं प्रेम, विश्वास, त्याची जोडीदार म्हणून तिला दिलेला अधिकार हे सगळं अधोरेखित केलं होतं. कोणत्याही मुलीच्या पालकांना भावून जाईल अशी गोष्ट. आणि अर्थातच लग्नासाठी २३ वर्ष थांबण्याची रिस्क घेण्यापेक्षा लवकर लग्न करून मुलीने तिच्या संसारात सेटल होण्याचा सल्ला कोणतेही आई-वडील आपल्या मुलीला देणार आणि आई-बाबा म्हणतायत म्हणून किंवा त्यांना आपल्यासाठी कोणतेही टेन्शन नको म्हणून, मुलगी ह्या सगळ्याला थोडी कुरकुरत का होईना, पण तयार होणार, असा अंदाज त्याने बांधला होता. ह्याबाबतीत त्याला हवं तसं सगळं घडून येईल, ह्याचे ९० टक्के चान्सेस त्याला दिसत होते. १० टक्क्याची मात्र त्याने रिस्क घेतली होती. कदाचित सायलीला किंवा तिच्या घरातल्यांना संशय येईल, कदाचित ते त्याची आणखी चौकशी करतील, कदाचित ते दोन-तीन वर्ष थांबायला तयार होतील, कदाचित सायली त्याला म्हणेल की माझ्यासाठी ही संधी सोड आणि ठरल्याप्रमाणे लग्न करू…..रीस्क्स अनेक प्रकारच्या होत्या.

 

पण तो ही काही पहिलीच रिस्क घेत नव्हता. हे असं काही घडलं तर पुढे काय करायचं हे मात्र त्याने ठरवलं नव्हतं. सध्या तरी तो सायली १५ दिवसात लग्नाला तयार होईल असाच विचार करत होता. ती तयार झाल्यावर पुढे काय ह्याचा विचार मात्र त्याने खूप आधीपासूनच करून ठेवला होता. लग्न झाल्यावर तसंही तो तिला सगळंच सांगणार होता, अगदी सगळं…. त्यामुळे हे यु.एस ची आलेली संधी हेसुद्धा ह्या सगळ्या नाटकाचा भाग होतं, हे तिला आपोआपच कळणार होतं. त्यानंतर तिचा राग, गैरसमज दूर करायला मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल ह्याची त्याला कल्पना होती. कदाचित फसवणुकीच्या भावनेने ती पोलिस कम्प्लेंट करायचा विचार करेल, किंवा माहेरी निघून जाईल, घटस्फोटाची भाषा करेल….ह्या सगळ्याची त्याने तयारी ठेवली होती. तिने एकदा का लवकरात लवकर लग्न करण्याला संमती दिली, की ह्या भविष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांबद्दल विचार करायला, त्यावर तोडगा काढायला तो मोकळा होणार होता.

 

पण आत्ताची सायलीची फोनवरची रिएक्शन ऐकून मात्र तो मनातून थोडा घाबरला होता. आपण विचार करत होतो, त्याप्रमाणे हा सगळा प्रकार नव्वद टक्क्यांमध्ये न मोडता, १० टक्के शक्यता असलेल्या रीस्क्स च्या ग्रुप मध्ये जातोय की काय अशी भीती त्याला वाटायला लागली. सायलीला आता काय उत्तर द्यावं, म्हणजे ती कन्विन्स होईल, ह्याचा विचार करतानाच फोनवर पुन्हा सायलीचा आवाज आला. हा सगळा विचार करेपर्यंत एक मिनिट शांततेतच गेलं होतं, त्यामुळे सायलीचा संशय आणखी बळावला.

“हॅलो, अरे बोल ना, उत्तर हवंय मला म्हणून फोन केलाय. तुझ्या मनातलं बोलले म्हणून आता सुचत नाहीये का काय बोलावं ते?” सायली

सुजयने एक आवंढा गिळला. काहीतरी बोलणं भाग होतं.

“मी काय बोलू सायली…तू सगळ्याचा खूप वेगळा अर्थ घेतेयस अगं…तुझी अशी रिएक्शन माझ्यासाठी खूप अनपेक्षित आहे…तुझा नक्की कशामुळे गैरसमज झालाय त्याचाच आत्ता विचार करत होतो.”

सुजय खूप सावधगिरीने एक एक शब्द खूप जपून उच्चारत होता. त्याने स्वतःचा आवाज अतिशय शांत ठेवला होता आणि आपण ही सिच्युएशन अतिशय समजुतदारपणे हाताळत आहोत असा अविर्भाव त्याने त्याच्या आवाजात आणला होता. माणूस कितीही रागाने, मोठ्याने बोलत असला, तरीही समोरच्याचा आवाज जर शांत आणि समजुतीचा असेल तर त्या माणसाचा अर्धा राग तिथेच नाहीसा होतो, असं त्याची आई म्हणायची. त्याच्या ह्या शांतपणे बोलण्याचा सायलीवर सुद्धा काही अंशी परिणाम झालाच. सुजयला कल्पना नसली तरीही सायलीच्या मनात त्याच्याबद्दल संशय होताच आणि आत्ता त्याच्या ह्या लग्न लवकर करण्याच्या प्रस्तावामुळे तिचा संशय खूप वाढला होता. पण राग कमी झाला नाही तरीही सुजयच्या आत्ताच्या समजूतदार बोलण्यामुळे ती थोडी शांत झाली. समोरून सायलीची पुन्हा काही रागीट प्रतिक्रिया आली नाही, त्यामुळे सुजय धीर करून पुन्हा पुढे बोलला.

“प्लीज सायली, थोडी शांत हो. मला सांगशील का, तुला नक्की कशाचा राग आलाय? आय नो, माझ्याकडून काही चुकलं असेलही, पण प्लीज मला सांग स्पष्ट काय ते. “

सायली शांत झाल्यामुळे थोडा विचार करण्याच्या मनस्थितीत होती. मगाशी रागाच्या भरात ती  सुजयला तिला आलेल्या संशयाबद्दल कदाचित बोलून गेली असती. आता मात्र ती तसं करणार नव्हती.

“तू एवढं सगळं झालं, तरीही मला काहीही न सांगता, माझ्या घरी डायरेक्ट का सांगितलंस सगळं? माझे आई-बाबा टेन्शन मध्ये आहेत, आता नक्की काय करायचं हा विचार करून. मला राग नाही का येणार? “

सायलीही आता थोडं शांत झाल्याचं पण अजूनही थोडी रागात असल्याचं नाटक करत होती.

 

सुजयने सुटकेचा निःश्वास टाकला. म्हणजे सायली ह्यामुळे रागावली होती तर …बाकी अजून काहीच कारण नाहीये….आता सावरून घेणं त्याच्यासाठी सोपं होतं.

“ओह…आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सायली. माझ्या हे लक्षातच आलं नाही की त्यांना या गोष्टीचं टेन्शन येऊ शकतं. माझा विचार फक्त एवढाच होता की ते तुझे आई-बाबा आहेत त्यामुळे त्यांना सगळं आधी कळायला हवं. मग तेसुद्धा तुला गाईड करू शकतात काय निर्णय घ्यायचा ह्याबाबतीत. आपण सगळं आधी आपल्या-आपल्यात ठरवून मग त्यांना सांगणं मला ठीक वाटलं नाही. माझ्या करियरमधली ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ती सगळ्यात आधी आपल्या पालकांना सांगावी असं मला वाटलं. आणि मी तुला फोन करणार होतोच. सकाळी मी आणि बाबा तुझ्या बाबांशी बोललो तेव्हा तू ऑफिसला गेली होतीस. आणि मला आज यायला खूप उशीर होणार होता. आपण दोघेही ऑफिसमध्ये खूप बिझी असतो म्हणून मी तुझ्या बाबांना म्हटलं की सायलीला तुम्हीच सांगा. आणि तुला सगळी माहिती लवकरात लवकर कळावी म्हणून सगळे ऑब्स्षन्स आणि व्हिसाची माहिती मी त्यांच्याजवळ सांगितली आणि त्यांना म्हटलं की  मी जमलं तर आज रात्री किंवा उद्या सकाळी सायलीशी नक्कीच बोलेन. खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झालाय पण ट्रस्ट मी, माझ्या मनात तुझ्या बाबांना इम्प्रेस करायचं असं काही नव्हतं. “

सुजय बोलायचा थांबला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्याची एक छोटी लकेर होती. त्याला माहित होतं, तो जे काही बोलला होता, त्यामुळे सायली नक्कीच कन्विन्स होणार होती. त्याच्या मार्गातला हा छोटासा अडथळाही दूर झाल्यागतच होता.

 

त्याच्या शांत बोलण्यामुळे आणि प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मिळाल्यामुळे सायलीसुद्धा थोडी गोंधळून गेली. हा खरंच बोलतोय असं वाटतंय असं तिलाही वाटून गेलं. पण एक क्षणभरच….पुढच्याच क्षणी तिने डायरीमध्ये त्याच्याबद्दल लिहून काढलेले सगळे मुद्दे तिला आठवले. तिच्या आणि ईशाच्या निष्कर्षांनुसार ताडून बघितलेली फेसबुक प्रोफाईलमधली लपवाछपवी आठवली आणि ती पुन्हा एकदा सावध झाली.

“ठीक आहे, आय ट्रस्ट यु. आय एम रिअली सॉरी. आई-बाबांना टेन्शन मध्ये बघितलं, त्यात आल्या-आल्या मला एवढं सगळं काहीतरी कळलं, त्यामुळे माझी चिडचिड झाली. मी विचार करेन आणि उद्या सांगेन तुला माझा निर्णय. आणि कॉग्रज्युलेशन्स फॉर धिस न्यू ओपॉरचुनिटी. यु डेफिनेटली डिझर्व इट.” सायली

 

“थॅंक्स सायली, थॅंक् यु सो मच…तू विश केल्याशिवाय या सगळ्याला तसाही काहीच अर्थ नव्हता. नाऊ आय फील बेटर. आणि प्लीज मला सॉरी म्हणू नकोस. तुझ्याकडून सॉरी ऐकायला पण कसंतरीच वाटतं. तशी माझी पण चूक होतीच या सगळ्यात. टेक युअर टाईम, थिंक अबाउट युअर करियर ऑब्स्षन्स. चल, तू पण दमली असशील. सकाळी बोलू आपण. मी तसाही फोन करणारच होतो तुला सकाळी. गुड नाईट. टेक केअर. ” सुजय

 

“बाय. गुड नाईट.” सायली

फोन ठेवल्या-ठेवल्या सुजय खुशीत येउन गाणं गुणगुणायला लागला. “जाने दिलमे कबसे है तू …..जबसे मै हू तबसे है तू….” त्याच्या प्रभावी बोलण्यामुळे त्याने नव्वद टक्के असलेली शक्यता आता पंच्याण्णव टक्क्यांवर खेचून आणली होती, असं त्याचं मनच त्याला सांगत होतं.

 

सायलीने फोन ठेवला तेव्हा तिच्याही चेहऱ्यावर मंद हसू होतं. आत्तापर्यंत होत असलेली चिडचिड, राग, टेन्शन, अस्वस्थता सगळं कुठल्याकुठे नाहीसं झालं होतं. तिला एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवायला लागला होता. आत्तापर्यंत ज्या गोष्टीचं तिला टेन्शन येत होतं, त्याच गोष्टीमागचं गूढ उकलायची संधी आता तिच्यापासून काही दिवसांवरच लांब आहे, असा विचार तिच्या मनात यायला लागला. आपण उगीच चिडचिड केली, खरं तर आपण खुश असायला हवं की एरव्ही ज्या गोष्टीचा शोध आपण सहा महिन्यांपर्यंत घेत बसलो असतो, तोच शोध आता १५ दिवसांच्या आत पूर्ण होईल, व्हायलाच लागेल. आणि तसंही जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत कसलाच धोका नाहीये. मग कशाला घाबरायचं एवढं?

 

आपण १५ दिवसात लग्न करायला तयार आहोत हे जेव्हा सुजयला कळेल, तेव्हा त्याला खात्रीच पटेल की आपल्याला त्याच्याबद्दल काहीच संशय नाही आणि ह्याच गोष्टीचा फायदा घायचा. तो नक्कीच थोडा बेसावध असणार, ह्या १०-१२ दिवसात आणखी जोरात शोध घेऊ, त्याच्या जवळच्या माणसांपासून सगळ्यांबद्दल शोध घ्यायचा. आपण सावध असू आणि तो बेसावध. त्याचा काही ना काही फायदा आपल्याला नक्कीच होईल. बस्स, केला इतका विचार खूप झाला. आता निर्णय घायचा. १५ दिवसात लग्न करण्याचा. फक्त आई-बाबांना सांगायचं की दिवस कमी असल्यामुळे लग्न घरच्या घरी होईल. म्हणजे बाकी खरेदी, देवाण-घेवाण ह्यापासून सुटका होईल आणि तो वेळ आपल्याला आपला शोध घेण्यासाठी वापरता येईल. पुढचे दोन दिवस ऑफिसला जाऊ आणि मग पुढचे १५ दिवस रजाच घेऊ म्हणजे आणखी वेळ मिळेल.

 

तिचा निर्णय झालेला होता. ती सुजयशी बोलत असताना ईशाचे बरेच कॉल्स येउन गेले होते. आता तिने मनाशी सगळं ठरवल्यामुळे ती खूपच शांत झाली होती. जरा बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारून येऊ आणि मग ईशाला फोन करू असा विचार करून ती उठली. तेवढ्यात समोरची खिडकी जोरात उघडली गेली आणि थंड वारा आत आला. एक क्षणभर तिच्या अंगावर शहारा आला. घु, घु …घु…….. वाऱ्याचा आवाज येत होता. असा थंड वारा आता तिच्या ओळखीचा झाला होता. हा वारा कसलीतरी अस्वस्थ करणारी चाहूल बरोबर घेऊन यायचा. तिने  धावत जाऊन खिडकी बंद केली तसा वारा आणि तो आवाज बंद झाला. सायली बाथरूम मध्ये गेली.

 

बाथरूमचं दार बंद होताच खोली पुन्हा एकदा थंड झाली. सायलीचा मोबाईल तिथेच बेडवर पडला होता. तो ऑन झाला आणि त्यातून एक नंबर डायल झाला. ईशाचा नंबर…..ईशाने समोरून फोन उचलला.

हॅलो काय गं सायली, कुठे आहेस तू? मी किती टेन्शनमध्ये होते माहितीये? मी …मला …मला वाटलं काय झालंय नक्की तुला…तुझा फोन पण एवढा वेळ बिझी लागत होता. ..अगं बोल ना…काय झालंय?”

तिचं बोलणंचालू असतानाच हळूहळू खोलीतले लाईट्स मंदावत गेले. पुढच्याच क्षणी खोलीत पूर्ण काळोख झाला होता. आणि मग जोरात वारा वाहतो, त्यावेळी येतो तसा आवाज येऊ लागला. ईशाला तेच सगळं फोनवर ऐकू येत होतं. सायलीला मात्र बाथरूम मध्ये असल्यामुळे ह्याची काहीच कल्पना नव्हती.

हॅलो, सायली? हॅलो….आर यु देअर? अगं बोल ना…बोलत का नाहीयेस..? सायली? आर यु ओके…? “

खोलीत तो वाऱ्याचा आवाज आता आणखी जोराने यायला लागला.

“घु…घु…झु……झु…….” आणि तेवढ्यात एक भसाडा आवाज त्यात मिसळला गेला… .”म…… आ….. ह………. ह……इ…..”आणि पुन्हा “घु….घु….झु….” आणि मग एक जीवघेणी किंकाळी ……..

ईशाने घाबरून फोन ठेवून दिला. त्यानंतर खोलीतलं वातावरण पूर्ववत व्हायला लागलं. लाईट्स पाहिल्यासारखे ऑन झाले. वाऱ्याचा आवाज कमी कमी होत बंद झाला. खोलीत पसरलेली थंड हवाही आता पुन्हा नॉर्मल झाली. आणि पुढच्याच क्षणी सायली बाथरूममधून बाहेर आली. तिने दोनवेळा ईशाला फोन लावला, पण ती फोन उचलत नाही असं बघून तिला वाटलं की ईशा नक्कीच झोपली असणार. म्हणून तिने तिला मेसेज केला. तिचा मेसेज गेल्या गेल्या मात्र लगेच ईशाचा फोन आला. तेव्हा ईशाने तिच्या फोनवरून आलेल्या त्या विचित्र कॉल बद्दल सांगितलं. आणि तिला आईच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलं.

 

सायलीने ईशाला आधीची सगळी स्टोरी सांगण्याआधी तिचा १५ दिवसात लग्न करण्याचा निर्णय सांगितला आणि ईशा चक्रावूनच गेली. आधी तिला वाटलं की सायली तिची मस्करी करतेय पण नंतर सायलीकडून सगळं काही कळल्यावरही तिला सायलीचा निर्णय पूर्णपणे पटलेला नव्हता. एवढी मोठी रिस्क कशाला घायची आणि पुढच्या १५ दिवसात जर काहीच हाताला लागलं नाही तर मनात असलेले सगळे संशय बाजूला सारून लग्नाला उभं राहायचं का, असा प्रश्न तिने सायलीला केला. पण सायली तिच्या निर्णयावर ठाम होती. तिच्या मते, ती १५ दिवसात लग्न करायला तयार झाल्यामुळे सुजयला स्वप्नातही वाटणार नाही की ती त्याच्या मागे त्याच्याचबद्दल शोध घेतेय. तो गाफीलच असेल आणि त्यामुळे त्याच्या जवळपास जाऊनही शोध घेतला तरीही त्याला संशय येणार नाही. ईशाला हे सगळं पटत असलं तरीही लग्न लवकर करण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठी रिस्क होती. शिवाय १५ दिवसात लग्न म्हणजे घरातले सगळेच त्यात भावनिकदृष्ट्या जास्त अडकणार हे सरळ होतं. घरातल्यांना जो मानसिक त्रास होऊ नये असं सायलीला आधीपासूनच वाटत होतं, तो तर ह्यात जास्तच होणार होता. ह्या सगळ्या शंकाही ईशाने सायलीला बोलून दाखवल्या. त्यावरही थोडाफार विचार सायलीने करून ठेवला होता. एक आठवड्यात ज्या काही घडामोडी होतील, त्या पाहून त्यानंतर सगळं आई-बाबांच्या कानावर घालायचं आणि त्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगायचं असं त्यांचं ठरलं. मात्र काहीही झालं तरी सुजयचा खरा चेहरा समोर आणल्याशिवाय आता ह्यातून माघार घायची नाही, असं त्यांनी ठरवलं.

 

नंतर ईशाकडून सायलीला आणखी एक धक्कादायक माहिती कळली. आशयकडून जे कळलं होतं तेच. सुजयच्या फॅमिलीसारखीच दुसरी एक साने फॅमिली त्याला न्यू जर्सी ला भेटल्याचं. हे ऐकून आता सायली चक्रावून गेली. म्हणजे दोन शक्यता होत्या. एक म्हणजे, या दोन्ही फॅमिलीज वेगवेगळ्या होत्या, पण मग इतकं साम्य कसं? दुसरी शक्यता म्हणजे, न्यू जर्सीला भेटलेले साने सुजयचे खरे आई-बाबा होते. म्हणजे, आत्ता जे आई-बाबा म्हणून वावरत होते, ते खोटे होते?
याबाबतीत लवकरात लवकर आणखी माहिती मिळणं गरजेचं होतं.

 

कदाचित आशयची मदत होऊ शकेल ह्याबाबतीत…सुजयचे आई-बाबा म्हणजे मुंबईत असलेले साने आहेत की २-३ महिन्यांसाठी यु.एसला गेलेले साने, हे आणखी कोणाकडून कन्फर्म होऊ शकतं, ह्याचा विचार करतच सायली आई-बाबांच्या खोलीत झोपायला गेली, तेव्हा रात्रीचे पाऊण वाजून गेले होते. .

———येथे फ्लॅशबॅक संपतो———–

आई बाबांच्या खोलीत झोपायला गेल्यावरही सायलीला शांत अशी झोप लागलीच नाही. रात्री ८ नंतर किती घटना घडल्या होत्या आज….किती धक्कादायक माहिती मिळाली होती. आपला शोध आणखी फोकस्ड असण्याची गरज आहे, हे तिला जाणवायला लागलं. तिने घड्याळात बघितलं. पहाटेचे साडेचार वाजले होते.

 

झोप येत नव्हती म्हणून ती उठून पुन्हा तिच्याच खोलीत आली. रात्रभर सुजयबद्दलचे विचार डोक्यात चालू होते. हे विचार चालू असतानाच तिला जाणवलं की आत्तापर्यंतची माहिती खूप स्कॅटटर्ड होती आणि वेगवेगळ्या लोकांबद्दल, वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांकडून मिळालेली होती. हे सगळं एकत्र आणून एकसंध करायची गरज होती. घटना वेगवेगळ्या घडताना बघितल्यामुळे कदाचित त्यांचा नीट अर्थबोध होत नसेल, पण त्या एकामागोमाग एक लावून त्यांची एक मालिकाच तयार केली तर कदाचित त्यांचा वेगळा अर्थ लागेल आपल्याला, असं तिला वाटलं.

 

तिच्या खोलीत येउन तिने टेबलवर पडलेली मघाचीच वही उचलली. वहीत तिने ईशाकडून कळलेल्या गोष्टींमध्ये तिसरा पॉइण्ट लिहिला.

3.  ईशाला आशयकडून कळलेल्या माहितीनुसार, सुजयच्या फॅमिलीसारखीच एक साने फॅमिली न्यू- जर्सी ला आहे. एक महिन्यापूर्वी ते तिकडे गेले. सुजय, त्याचे आई-बाबा आणि नेहा, सगळ्यांचेच डीटेल्स मॅच होतात. फक्त त्यांच्या मुलाचं नाव सुजय आहे की नाही, हे कन्फर्म झालं नाही.

त्यानंतर तिने आधी लिहिलेल्या सगळ्या मुद्द्यांवर नजर टाकली. फेसबुक च्या मुद्द्याच्या पुढे तिने छोटा स्टार काढून नंबर १ असं लिहिलं होतं. आणि ६ नंबरच्या मोलकरणीच्या मुद्द्यापुढे स्टार काढून नंबर २ असं लिहिलं होतं. फेसबुक प्रकरण तर तिने आधीच हातावेगळं केलं होतं. तिच्या आणि ईशाच्या अंदाजाप्रमाणे बऱ्याच गोष्टी तपासून बघितल्या होत्या आणि त्यात सुजयने नक्कीच काहीतरी लपवा-छपवी केली आहे ह्या निष्कर्षापर्यंत ती आली होती.

आता वेळ होती ती पुढच्या मुद्द्याकडे वळण्याची. हा मुद्दा तिने आधीप्रमाणेच एका नवीन पानावर लिहून काढला.

 शनिवारी सान्यांच्या घराबाहेर भेटलेली मोलकरीण – ” आणखी कुणी नसतं तिथे…” असं म्हणाली

म्हणजे कदाचित तिला म्हणायचं असेल की तिकडे सुजय एकटाच राहतो आणि बाकी कुणीच तिथे नसतं. पण मग असं असेल तर सान्यांनी ते वेगळे राहतात हे आपल्याला का सांगितलं नसेल? तिने एक क्षण विचार केला आणि सुजयच्या घराबद्दलचे सगळे मुद्दे वरील ओळीखाली लिहून काढले.

१) जुहु येथे तीन बेडरूम्सचा मोठा फ्लॅट. दोन वर्षापूर्वी सुजय तिथे त्याच्या फॅमिलीबरोबर राहायला आला. त्याआधी तो इंदौर ला होता.

इंदौरला कुठे राहायचा? – No Information

२) जुहूच्या घराच्या शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध असावेत असं वाटतं. श्री कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, साने फॅमिली श्रीमंत तरीही साधे आहेत. सुजयबद्दलही मत चांगलं.

मग मोलकरीण असं का म्हणाली, ” बाकी कुनी नसतं तिथे ……”?

या सगळ्यावर विचार करताना सायलीला अचानक ईशाला आशयकडून कळलेली न्यू-जर्सीला भेटलेली साने फॅमिली आठवली. आशयच्या म्हणण्यानुसार १ महिन्यापूर्वी ते यु.एस ला आले होते. जर हे सुजयचे खरे आई-बाबा होते, तर मग मागच्या एक महिन्यापासून ते जुहूच्या फ्लॅटवर असणं शक्यच नव्हतं. आणि सायली आणि तिचे आई-बाबा याच दरम्यान तिथे गेले होते आणि तिथे मोलकरीण म्हणाली होती की, तिथे बाकी कुणी नसतं. म्हणजे काही अंशी हे खरं वाटतंय, की निदान त्या काळात तरी सुजयचे आई-बाबा तिथे नव्हते. नंतर ‘खोटे’ आई-बाबा आले आणि बाबा त्यांना त्या मोलकरणीविषयी सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सायलीने बघितलेले होते.

 

पण मग ते कामत तर त्यांच्या कॉम्प्लेक्स मधेच राहतात. बाबांनी त्यांच्याकडे सान्यांची चौकशी केली, तेव्हा ते बोलले कसे नाहीत की साने सध्या यु.एस ला गेलेत म्हणून? त्यांना आश्चर्य नसेल का वाटलं की साने अमेरिकेत आहेत मग आत्ता सुजयचा साखरपुडा कसा होईल याचं? जर खरंच सुजयचे आई-बाबा अमेरिकेला गेले असते तर मग कामतांच्या बोलण्यात तसं यायला हवं होतं ना? ते तिथेच राहतात, त्यांना तर ते यु.एस ला गेल्याचं माहित असणारच ना  ……एक मिनिट…. आय एम मिसिंग समथिंग हिअर…..बाबा म्हणाले होते की कामत गेल्या दोन महिन्यांपासून पनवेलला जाऊन राहिलेत, त्यांच्या मुलीकडे आणि काही काम असेल तेव्हा मध्ये मध्ये मुंबईला येउन जातात. यस, दॅट माईट बी द रिझन. म्हणजे ते दोन महिन्यांपासून मुलीकडे राहतात आणि साने १ महिन्यापूर्वी यु.एस ला गेले हे त्यांना माहीतच नसेल ही शक्यता नक्कीच आहे.

 

म्हणजे आता आपण गृहीत धरू शकतो की, साने १ महिन्यापूर्वी यु.एसला गेले. कामत त्याच्या आधीच पनवेलला जाऊन राहिले होते त्यामुळे त्यांना साने यु.एसला गेल्याचं माहीतच नव्हतं. आणि म्हणूनच ती मोलकरीण असं म्हणाली की तिथे बाकी कोणीच नसतं. फक्त आता हे कन्फर्म करायला हवं. आशयकडून तिकडे भेटलेल्या सान्यांच्या मुलाचं नाव काय ते कळायला हवं. आणि त्या मोलकरणीला पण पुन्हा एकदा भेटायला हवं.

 

यस…ठरलं, ह्या प्रत्येक मुद्दा इतर गोष्टींशी जोडून बघण्याच्या स्ट्रॅटेजीमुळे  सायलीला तिचा पुढचा मार्ग सापडला होता. आता उद्याच सुजयच्या जुहूच्या बिल्डींगमध्ये जाऊन त्या मोलकरणीला भेटलं पाहिजे. आता घरातल्या घरात शोध घेणं बंद. आता बाहेर पडून शोध घेतला पाहिजे.

 

तिने घड्याळात बघितलं. सकाळचे साडेपाच वाजत आले होते. उद्या कसलं? उजाडलाय पण आजचा दिवस. आजच जाऊन त्या मोलकरणीला भेटलं पाहिजे. सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे खरं तर. ती अटेंड करून मग जाऊ शकतो. पण त्या वेळेला ती मोलकरीण नाही भेटली तर? मागच्या वेळेला ती संध्याकाळी ५-५.३० च्या सुमाराला भेटली होती. कदाचित तीच तिच्या कामाची वेळ असेल. आजही त्याच वेळेला गेलं पाहिजे. पण सुजय नेमका घरी असला आणि त्याने आपल्याला बघितलं तर? त्यासाठी काहीतरी विचार करून ठेवायलाच हवा. आणि ईशाला लगेच कळवायला हवं. सो आज संध्याकाळी पाच वाजता- सुजयच्या बिल्डींग मध्ये. ठरलं.

 

तिने समोरची खिडकी उघडली. बाहेर उजाडायला सुरुवात झाली होती. हवेत गारवा नसला तरीही एक प्रकारचा ताजेपणा भरून राहिला होता. आणखी एक नवीन दिवस सुरु होत होता, नवीन आव्हानांसोबत आणि  नव्या अत्माविश्वासासोबत…

क्रमशः

5 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 13)

 1. Aditya Patil
  March 20, 2016

  sundar

  Like

 2. Sweetali
  March 29, 2016

  khup chan lihites tu….as vatat real life madhe ghadat aahe….
  waiting for next part….I know u r busy 😉

  Like

 3. Sweetali
  March 30, 2016

  Real Story vatate vachatana ….khup maja yet…khup chan lihites tu…..next part lavkar yava…..I know u r busy 😉

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on March 18, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: