davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 14)

तिने घड्याळात बघितलं. सकाळचे साडेपाच वाजत आले होते. उद्या कसलं? उजाडलाय पण आजचा दिवस. आजच जाऊन त्या मोलकरणीला भेटलं पाहिजे. सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे खरं तर. ती अटेंड करून मग जाऊ शकतो. पण त्या वेळेला ती मोलकरीण नाही भेटली तर? मागच्या वेळेला ती संध्याकाळी ५-५.३० च्या सुमाराला भेटली होती. कदाचित तीच तिच्या कामाची वेळ असेल. आजही त्याच वेळेला गेलं पाहिजे. पण सुजय नेमका घरी असला आणि त्याने आपल्याला बघितलं तर? त्यासाठी काहीतरी विचार करून ठेवायलाच हवा. आणि ईशाला लगेच कळवायला हवं. सो आज संध्याकाळी पाच वाजता- सुजयच्या बिल्डींग मध्ये. ठरलं.

तिने समोरची खिडकी उघडली. बाहेर उजाडायला सुरुवात झाली होती. हवेत गारवा नसला तरीही एक प्रकारचा ताजेपणा भरून राहिला होता. आणखी एक नवीन दिवस सुरु होत होता, नवीन आव्हानांसोबत आणि  नव्या अत्माविश्वासासोबत…

—————— भाग १३ पासून पुढे चालू—————–

भाग १३ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-lf

 

सिद्धार्थ ऑफिससाठी तयार होत होता खरा, पण त्याच्या डोक्यात कौस्तुभ परांजपेचेच विचार चालू होते. काल सायली मधेच आल्यामुळे कौस्तुभशी बोलणं होता होता राहिलं होतं. आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याला कामातून अजिबात वेळच मिळाला नव्हता. ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता खरं, तरीही निघता निघता त्याने पुन्हा फोन लावून बघितला पण रिसेप्शनवरचाच फोन उचलला गेला नाही. आणि उचलला गेला असता तरी कौस्तुभ ऑफिसमध्ये असला असताच असं नाही. आज ऑफिसच्या कामातून वेळ काढून पुन्हा त्याला फोन करून बघायला हवा. त्याच्याकडून सुजयबद्दल काहीतरी कळलं, की सायलीशी ह्या बाबत बोलता येणार होतं. पण ऑफिसमध्ये सगळे आजूबाजूला असताना त्याच्याशी मोकळेपणाने सगळं बोलताही आलं नसतं. काल सायलीच मध्ये आली, आज दुसरं कुणी आलं असतं. नाही, हे प्रकरण लवकरात लवकर हातावेगळं करायला हवं होतं. नेमका कौस्तुभचा मोबाईल नंबर त्याच्याकडे नव्हता नाहीतर त्याला कोणत्याही वेळेला फोन करता आला असता. पण सध्यातरी त्याला ऑफिसटाईम मध्ये ऑफिसच्याच फोन वर कॉल करता येणार होता. दोन मिनिटं विचार करून त्याने मोबाईल उचलला आणि सायलीला मेसेज टाईप केला,

 

बॉस आय एम नॉट फिलिंग वेल टुडे. आय एम गोइंग टू द डॉक्टर आणि विल बी इन द ऑफिस बाय ११११.३० . होप डॅट्स ओके.

 

पुढच्याच मिनिटाला सायलीचा मेसेज आला.

 

नो प्रॉब सिद्धार्थ. यु टेक केअर अँड टेक रेस्ट. नो नीड टू कम टू द ऑफिस टुडे. आय विल बी इन द ऑफिस टील ३ pm अँड आफ्टर डॅट आय हॅव टू गो आउट फॉर सम पर्सनल वर्क. आय विल गिव्ह यु अ कॉल इन द इविनिंग. बाय.

———————————————

सायली सुद्धा ऑफिसला निघायच्या गडबडीत होती. सिद्धार्थला मेसेज करून झाल्यावर तिने तिच्या महत्वाच्या काही गोष्टी पर्स मध्ये टाकल्या आणि ती ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर आली.

झालं का तुझं आवरून?” तिला बाहेर आलेली बघताच आई किचन मधून बाहेर आली.  ” सायली, रात्रभर झोपली नाहीस का? डोळे असे का दिसतायत तुझे?”

आईच्या आवाजात नेहेमीचीच काळजी होती.

 

बाबा नुकतेच वॉक करून आले होते आणि सोफ्यावर बसून नेहेमीप्रमाणे चहा घेत पेपर वाचत होते. आईने त्यांच्याकडे बघितलं तसं त्यांनी हाताने खूण करून आईला शांत राहायला सांगितलं.

सायली, आज लवकर निघालीस वाटतं? एरव्ही माझा चहा होऊन १५ मिनिटं होऊन गेली तरी तू आत तयार होत असतेस आणि मग धावत धावत येतेस नाश्ता करायला. पण बरं झालं एका अर्थी. आपण आज एकत्र चहा घेऊ.”

बाबा डायनिंग टेबलवर बसत म्हणाले.

आज तुझी फेव्हरेट डिश केलीये. मिक्स डाळींचे डोसे. काल न जेवताच झोपलीस, म्हटलं आज जाताना तरी पोटभर खाऊन जाशील. “

आईने तिच्यासमोर डोसे आणून ठेवले आणि ती पण तिथेच बसली.

 

सायली काहीच न बोलता खायला लागली. कालच्या उपवासामुळे तिला आता खरंच खूप भूक लागली होती. आईबाबांनी पुन्हा एकमेकांकडे बघितलं. सायलीच्या डोक्यात काहीतरी चाललंय हे त्यांना कालच जाणवलं होतं. सुजयला मिळालेल्या संधीबद्दल कळताच सायलीने ज्या प्रकारे रीएक्ट केलं होतं, ते पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं. आज सायली ऑफिसला निघायच्या आधी तिच्याशी बोलायचंच, असं त्यांनी ठरवलं होतं.

अगं, रात्री झोपच लागली नाही नीट. थोडा वेळ तुमच्या खोलीत येउन पण झोपले होते पण नाहीच झोप लागली. सकाळी ५ वाजता वगैरे बाहेर आले होते मी. बिस्किट्स खाल्ली थोडी. तुम्ही झोपला होतात. पण तरी आत्ता खूप भूक लागलीये.”

 

काय झालंय सायली नक्की? कालपासून बघतोय आम्ही, सुजयच्या यु.एस च्या संधी बद्दल कळल्यावर तू फार वेगळी रीएक्ट झालीस आणि तेव्हापासून अस्वस्थ आहेस. म्हणूनच झोप नाही लागली तुला, बरोबर ना? काय चाललंय डोक्यात तुझ्या? काही टेन्शन आहे का? ” आई

“आता अगदीच थोडे दिवस आई. मनातल्या आणखी काही शंकांची उत्तरं मिळाली, की तुम्हाला सगळंच सांगेन. आणखी टेन्शन नाही देणार तुम्हाला.” सायली मनाशीच विचार करत होती.

सायली, अगं आई काहीतरी बोलतेय तुझ्याशी. लक्ष आहे ना तुझं?” बाबा

 

हो. सॉरी. झोप झाली नाहीये ना, डोकं जड झालंय नुसतं. आज ऑफिसला गेले नसते खरं तर, पण एक खूप महत्वाची मीटिंग आहे, जावंच लागेल. आणि आई, तू टेन्शन घेऊ नकोस गं. कालचा दिवस खरंच खूप बिझी गेला आणि एक क्लायन्ट जरा प्रॉब्लेमाटिक आहे. एरव्ही बॉसनीच हॅंडल केलं असतं हे सगळं. पण ते हैदराबादला गेलेत आणि तिकडून मग त्यांना कलकत्त्याला जायचंय पंधरा दिवसांसाठी. त्यामुळे मला ते हॅंडल करायचंय, त्याचं टेन्शन आहे जरासं. हे असले मोठे आणि जुने क्लायनट्स बॉस बघतात. आता ह्या क्लायन्टच्या बाबतीत काही महत्वाचा डिसिजन घायचा झाला, आणि तो चुकला तर काय, असं सारखं वाटतंय मला.

मी काल आले तेव्हाच माझं डोकं खूप दुखत होतं आणि त्यात सुजय, ती यु.एस ची संधी, लग्नाची तारीख वगैरे सगळं कळलं. मी त्याच्याबाजूने विचार करण्याच्या मनस्थितीतच नव्हते गं. एवढा मोठा निर्णय घ्यायचा, तोही लग्नाच्या बाबतीतला, हेच डोक्यात आलं पहिल्यांदा. आय वॉज नॉट प्रीपेअर्ड फॉर धिस काईंड ऑफ सिच्युएशन. म्हणून चिडचिड झाली. मग नंतर शांत होऊन विचार केल्यावर मला स्वतःलाच खूप विचित्र वाटलं, मी अशी रीएक्ट का झाले, म्हणून. नंतर त्याला विश पण केलं मी फोन करून. माझा चॉइस किती परफेक्ट आहे असा विचार करून आता आय एम रिअली फिलिंग प्राऊड अबाउट हिम. “

हे सगळं बोलताना आईबाबांच्या नजरेला नजर मिळवण्याची सायलीची हिम्मतच नव्हती. खाली बघून खाता खाता बोलण्याचं ती नाटक करत होती. आपण मान उचलून वर बघितलं तर आईबाबांना लगेच लक्षात येईल की काहीतरी गडबड आहे, हे तिला माहित होतं.

 

तिचं बोलणं ऐकून आईबाबांचं समाधान झालं की नाही, हे तिला नीटसं कळलं नाही. पण तिने सुजयला फोन करून त्याचं अभिनंदन केलं हे ऐकून, त्या दोघांमध्ये काही तणाव नाही हे लक्षात आल्यावर आईबाबांना बरं वाटल्याचं मात्र तिला जाणवलं.

 

खाऊन झाल्यावर उठताउठता तिला आठवलं की आपण महत्वाचं तर बोललोच नाही आईबाबांशी. आई उठून किचनमध्ये जात होती तिला सायलीने हाताला धरून पुन्हा खुर्चीवर बसायला सांगितलं.

सगळ्यात महत्वाचं मी बोललेच नाही तुमच्याशी. काल रात्रभर हाच विचार करत होते मी, म्हणून झोप नाही लागली. फायनली मी डिसिजन घेतलाय, १५ दिवसात लग्न करण्याचा. आई तू काल म्हणालीस ते पटलंय मला. अर्थात मी लगेच त्याच्याबरोबर नाही जाणार. इथेपण माझ्यासाठी खूप चांगल्या अपॉरचुनिटीज आहेत. म्हणजे या कंपनीत. बाबा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, साखरपुड्याच्या आदल्या आठवड्यातच बॉसनी त्याबद्दल सांगितलं मला. अर्थात नक्की सांगणार नाहीत ते आत्ता पण त्यांनी हिंट दिली. मला वेगळा आणि आणखी वरच्या पोझिशनचा रोल द्यायचं चाललंय, एवढं काहीतरी मला कळलं. म्हणून मला कुठलीच घाई करायची नाहीये. पण एक वर्षानंतर वगैरे विचार करेन मी तिकडे जाऊन तिथे काही चांगल्या संधी मिळतायत का ते बघायचा. असा मी सध्यातरी विचार केलाय. मध्ये व्हेकेशनसाठी जाऊन येईन तिकडे, जमेल तेव्हा. आणि असं केलं तर मला इथे तुमच्याबरोबर पण जास्त राहता येईल ना?

तर बाबा, तुम्ही कळवून टाका सुजयकडे. फक्त एकच गोष्ट, एवढ्या कमी दिवसात लग्न करायचं तर अगदी घरातलेच लोकं असलेले बरे. एवढी मोठी तयारी आता होणं शक्य नाही. उगीच धावपळ होईल, दमछाक होईल आणि हॉल तर आता एवढ्या कमी दिवसात मिळणारही नाही. त्यापेक्षा घरीच करू सगळं असं मला तरी वाटतंय. वाटलं तर, सुजय निघायच्या आदल्या दिवशी वगैरे रिसेप्शन करू आपण. त्यात फार काही करायचं नसतंच. म्हणजे विधींची तयारी काही नाही. फक्त हॉल आणि केटरर बघायला लागेल. ते सुजयच्या बाबांशी बोलून घेता येईल. अर्थात हे माझं म्हणणं झालं. तुम्ही पण बोला आणि काय ते फायनल करा. बरं चला, मी पळते आता. संध्याकाळी बोलू. “

सायली एका दमात हे सगळं बोलली, पाठ केल्यासारखं. आणि ती घराबाहेर पडली सुद्धा. आई आणि बाबा अवाक होऊन तिच्याकडे बघत होते.

अहो, ही हे मनापासून बोलतेय का? मला अंदाजच येत नाहीये तिचा. ” आईला पुन्हा काळजी वाटायला लागली.

 

म्हणून मी म्हणत होतो, आपलं मत तिला आधी सांगायचं नाही. मग तिला निर्णय घेताना त्याचंही टेन्शन येणार. पण तुला सगळं सांगायची घाई झालेली असते. मलाही कळत नाहीये आता. मीच तिला म्हटलं तू निर्णय घे असं. पण ती खरंच मोकळी झाली तिचा निर्णय घेऊन. एरव्ही तिला काय वाटतंय हे तिने आपल्याला सांगितलं असतं, आपलं मत घेतलं असतं, आपण सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा केली असती आणि मग एका निर्णयावर आलो असतो सगळे. पण या वेळी ती असं कसं वागली? तेही एवढं महत्वाचा निर्णय घायचा असताना? अगदी अलिप्तपणे, आता काहीतरी एक ठरवायलाच हवं तर ठरवून मोकळे होऊया, अशी भूमिका वाटली तिची.” बाबा

 

हो ना, आणि पुढचा सगळाच विचार केला तिने. स्वतःचं करियर, जॉब. लग्न कसं करायचं, रिसेप्शन वगैरे. म्हणजे काल ही मुलगी आता या गोष्टीवर निर्णय घ्यायचा म्हणून वैतागली होती. आणि मग एका रात्रीत तिने या सगळ्याबद्दल विचार करून एकटीने निर्णय घेऊनही टाकला? काहीच कळत नाहीये. मला वाटतंय, की आपण संध्याकाळी बोलू पुन्हा तिच्याशी आणि मग कळवू सान्यांकडे. उगीच घाई नको करायला..” आई

 

हो, मलापण तसंच वाटतंय…” बाबा

————————————————–

साडेआठ वाजले तसा सिद्धार्थ नेहेमीप्रमाणे आईला नमस्कार करून ऑफिससाठी बाहेर पडला. पण आज त्याला ९ .१५ पर्यंत ऑफिसला पोहोचायची घाई नव्हती. त्याने सायलीला मेसेज करून त्याला लेट होईल असं कळवलं होतंच. त्याला फक्त कौस्तुभला फोन करून नीट बोलून त्याच्याकडून सुजयबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. तो थेट बिल्डींगच्या गच्चीवर आला. आता काही वेळ तो इथेच थांबणार होता. सकाळच्या गडबडीच्या वेळात गच्चीवर तसं फारसं कुणी फिरकायचं नाही, त्यामुळे इथून निवांतपणे फोन करता आला असता. गच्चीवर एका बाजूला बसण्यासाठी बाकं टाकली होती आणि वर शेड टाकली होती. तिथे बसून त्याने लॅपटॉप उघडला आणि पुढची चाळीसेक मिनिटं त्याने ऑफिसचे काही महत्वाचे मेल्स ड्राफ्ट केले. सव्वा नऊ वाजले तसं त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि मोबाईलवरून ग्लॉसिसॉफ्ट कंपनीचा बोर्ड नंबर डायल केला.

पुढच्याच मिनिटाला कौस्तुभच्या डेस्कवरचा फोन वाजायला लागला.

——————————————————

सायली ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हाही ती विचारातच होती. घरून निघाल्यापासून ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंतचा वेळ कसा गेला तिला कळलंच नव्हतं. संध्याकाळी ती मोलकरीण भेटल्यावर ती काय सांगेल आणि त्यानंतर काय होईल, ह्याबद्दलच ती विचार करत होती. रोज सकाळी तिची तिच्या टीमबरोबर पंधरा मिनिटांची मीटिंग असायची. ती मीटिंग आटोपली आणि त्यानंतरच्या रोजच्या कामात ती बिझी झाली. अकरा वाजता मीटिंग होती, ती लंच टाईम पर्यंत चालणार होती. आणि त्यानंतर दोन तासात तिला ऑफिसमधून निघून सुजयच्या बिल्डींग मध्ये जाण्यासाठी निघायचं होतं. काम बरंच होतं आणि वेळ खूप कमी. पुढचा काही वेळ ती बाकी सगळं विसरून कामात बुडून गेली. सव्वा दहाच्या सुमाराला तिला रिसेप्शनवरून फोन आला.

गुड मॉर्निंग सायली मॅडम. देअर इज समवन हिअर एट द रिसेप्शन टू सी यु. डू यु हॅव एनि अपोईण्टमेन्टस टुडे ?”

 

नो. आय हॅव एन अपोईण्टमेन्ट ओन्ली एट ११ टुडे. हु इज इट?”

 

“वन मोमेंट मॅम……………इट इज……मिस्टर …..सुजय साने.”

—————————————————-

काय?”

सिद्धार्थ फोनवरच जोरात ओरडला. तो होता तिथेच खाली बसला.

सॉरी, नाही म्हणजे माझ्यासाठी हे अगदीच अनएक्स्पेक्टेड आहे, म्हणून असा रीएक्ट झालो मी. कौस्तुभ त्याच्या ट्रान्स्फर बद्दल बोलला होता. पण आजपासून तिकडे जॉइन होणार आहे हे माहित नव्हतं. एनीवेज, थॅंक्स. मला बॅंगलोर ऑफिसचा फोन नंबर मिळू शकेल का? “

ग्लॉस्सीसॉफ्ट च्या बॅंगलोर ऑफिसचा नंबर सिद्धार्थने नोट करून ठेवला. कौस्तुभ बरोबर आजही चुकामुकच झाली होती. त्याची ट्रान्स्फर होणार आहे हे काल माहित असलं असतं तर सायली कितीही चिडली असती तरीही त्याने सगळी कामं बाजूला टाकून कालच त्याला पुन्हा फोन केला असता. पण आता जर, तर ला काय अर्थ होता? कौस्तुभ आजपासून मुंबई ऑफिसला येणार नव्हता. पण म्हणून आज तो लगेच बॅंगलोरला गेला असेल असंही नाही. बॅंगलोर ऑफिसला फोन करून फार उपयोग होईल, असं वाटत नाही. जनरली लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर होऊन गेले की जॉईनिंग पिरीएड घेतातच. त्यामुळे तो लगेच दुसऱ्या दिवशी काही त्या ऑफिसमध्ये जाणार नाही. बहुतेक तो सोमवारपासून बॅंगलोर ऑफिसला जॉईन होईल. काय करावं आता?

 

सिद्धार्थ अस्वस्थपणे उठून फेऱ्या मारायला लागला. त्याने घड्याळात बघितलं, .२५च झाले होते. तो अजून अर्ध्या तासाने ऑफिसला जायला निघाला असता तरी चाललं असतं. अचानक तो थांबला. विचारांची गती जलद झाली होती. कौस्तुभ काल ऑफिसला आला होता. तो दिवसभर ऑफिसमध्ये होता असं धरलं तर आज, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच तो बॅंगलोरला गेला असेलच असं नाही. म्हणजे तो अजून मुंबईतच असणार, बहुतेक तरी. एक मिनिट अजून विचार करून त्याने पुन्हा ग्लॉस्सीसॉफ्टला फोन लावला.

 

आणखी एक मिनिटानंतर सिद्धार्थ फोनवर अगदी काकुळतीला येउन विनवण्या करत होता.

आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रास देतोय. कौस्तुभच्या कलीग ने सांगितलं मला त्याची ट्रान्स्फर झाली ते. मला खरंच माहित नव्हतं हो आजच ट्रान्स्फर होईल ते. मी कालच आलो यु.के वरून आणि मध्ये आमचा काही फोन झाला नाही. कॅन यु डू मी अ फेवर ? प्लीज मला त्यांचा मुंबईतला अड्रेस मिळेल का. म्हणजे आम्ही नेहेमी बाहेर भेटायचो, त्यामुळे प्रॉपर अड्रेस माहित नाही. प्लीज, मला एक खूप महत्वाचं पार्सल द्यायचंय त्याचं. खूप अर्जंट आहे. त्याचा मोबाईल पण लागत नाहीये, तुम्ही प्लीज मला त्याचा अड्रेस किंवा नंबर काहीही दिलंत तरी चालेल. ”

 

आय अंडरस्टॅंड युअर प्रॉब्लेम सर. पण आम्ही कोणत्याही एम्प्लॉईची पर्सनल माहिती देत नाही बाहेरच्या कोणाला, परमिशन असली तरच देऊ शकतो. तुम्ही हवं तर त्यांच्या डिपांर्टमेंट मध्ये फोन करून विचारा. पण आम्ही रिसेप्शनवरून कोणालाही ही माहिती देत नाही. कंपनीचे रुल्स फार स्ट्रीक्ट आहेत. आय होप यु अंडरस्टॅंड. सॉरी सर.”

सिद्धार्थने हताश होऊन फोन ठेवून दिला. पुन्हा त्याच्या डिपांर्टमेंटमध्ये फोन करून त्याला उगीच स्वतःकडे लक्ष ओढवून घायचं नव्हतं. आजचाही दिवस वाया गेल्यागतच होता. साखरपुड्यातलं सुजयचं फोनवरचं संशयास्पद बोलणं त्याला आठवायला लागलं. कौस्तुभ बरोबरचं सुजयचं खोटं खोटं वागणं आठवलं,तो स्वतःचा जवळचा मित्र असल्यासारखं लोकांना वाटावं म्हणून सुजयने केलेली धडपड आठवली. कौस्तुभपर्यंत आणखी कसं पोहोचता येईल, ह्याचा तो विचार करायला लागला. पण काहीच सुचेना. त्याने घड्याळात बघितलं. नऊ चाळीस झाले होते. आता तसंही थांबून काहीच उपयोग नव्हता. बेंचवर पडलेलं त्याचं सगळं सामान त्याने गोळा केलं आणि तो ऑफिसला जायला निघाला निघाला.

————————————————

सिद्धार्थ ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा साडेदहा होत आले होते. रिसेप्शनजवळच्या वेटिंग एरियात बरेच व्हीझीटर्स बसलेले होते पण तिकडे काही त्याचं लक्ष गेलं नाही. रिसेप्शनवर आल्यानंतर उजव्या बाजूच्या दरवाज्यावर त्याने त्याचं आयकार्ड स्कॅन केलं आणि तो दरवाजा उघडला. सिद्धार्थ आत जाणार तेवढ्यात मागून धापा टाकत कुणीतरी पळत आलं. कोण आहे ते बघायला सिद्धार्थ मागे वळला. मागून जोरात पळत येत असलेल्या त्या मुलीने आता आपण याच्या अंगावर जोरात आदळणार आहोत असं लक्षात आल्यावर कसाबसा स्वतःच्या पळण्याचा वेग आटोक्यात आणला. तरीही सिद्धार्थ एका हाताने जे दार पकडून उभा होता त्यावर येउन ती आदळलीच. त्या मुलीला कुठेतरी बघितलंय की काय, असं त्याला वाटून गेलं पण नक्की काही आठवलं नाही.

हे, आर यु ओके?” सिद्धार्थ

 

ओह यस, आय एम फाईन. अक्चुअलि हे असं पळणं आणि आदळणं माझ्यासाठी नेहेमीचंच आहे. तुम्हीच घाबरले असाल माझ्यामुळे. आय एम सॉरी. ”

 

हो मी खरंच घाबरलो. बाय द वे, तुम्ही इथे व्हीझीटर आहात का? तर मग तुम्हाला इथून आत येता येणार नाही. रिसेप्शनवर व्हीझीटर्स चं एन्ट्री कार्ड मिळतं ते घेऊन व्हीझीटर्स साठी वेगळा एन्ट्रन्स आहे, तिथून यावं लागेल तुम्हाला. “

सिद्धार्थ अजूनही तिला कुठे बघितलंय ते आठवण्याचा प्रयत्न करत होता.

हो मला माहित आहे ते. पण तिथून वेटिंग एरिआतुन आत बघत होते तर तुम्ही आत जाताना दिसलात म्हणून तुम्हाला थांबवायला पटकन धावत आले मी तुमच्या मागे …..”

सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिला त्याचा काय गोंधळ उडालाय ते लक्षात आलं.

ओह, सॉरी मी ओळख नाही ना करून दिली माझी. तुम्ही ओळखलं नसेल ना मला, किंवा कुठेतरी बघितलंय पण कुठे ते आठवत नसेल ना? मी सांगते. मी ईशा , सायलीची मावसबहीण. तिच्या साखरपुड्यात तुम्ही बघितलं असेल मला.”

 

ओह यस, मी खरंच विचार करत होतो तुम्हाला कुठे बघितलंय त्याचा. पण तुम्ही इथे कशा? आणि इथे का थांबलायत? सायली आली असेल सकाळीच. ” सिद्धार्थ

 

हो ती आली आहे,पण जागेवर नाहीये. रिसेप्शन वाले फोन करतायत तर डेस्कवरचा फोन ती उचलत नाहीये. मी मोबाईलवर कॉल करतेय पण ती उचलत नाहीये. आणि तिने सांगितल्याशिवाय हे इथले लोक आत नाही सोडणार मलातेवढ्यात तुम्ही दिसलात, म्हणून मी ….धावत मागे आले तुमच्या….म्हटलं निदान आत जाऊन तरी वेट  करता येईल. मी सकाळी लवकर निघालेय हो पुण्याहून, मला चहाकॉफी काहीतरी हवंय.” ईशा

 

हो, हो, नो नीड टू एक्स्प्लेन ऑल धिस. तुम्ही सायलीची बहिण आहात म्हटल्यावर तुम्हाला इथे कसं बसवून ठेवेन मी? सायली बॉस आहे ना माझी, उद्या तिला कळलं तर माझ्या प्रमोशनवर घाला यायचा……” सिद्धार्थ हसत हसत म्हणाला. “फक्त तुमचं कार्ड बनवून घेऊ इथून आणि मग तुम्ही माझ्याबरोबर याच एन्ट्रन्सने या. “

————————————

पण मग तुम्ही इथे आलात ते सायलीला माहित नाहीये वाटतं, नाहीतर तिने तशा इनस्ट्रकशनस दिल्या असत्या. इथे तुम्हाला थांबावं लागलं नसतं, ” सिद्धार्थ आत जाताजाता बोलत होता.

 

खरं तर तिला सरप्राइझ द्यायचं होतं मला. एक मिनिट, प्लीज ‘तुम्ही’ वगैरे म्हणून नका मला, फार फॉरमल वाटतं. आणि मग मलाही उगीच ‘तुम्ही- तुम्ही’ असं म्हणावं लागतं समोरच्याला.” ईशा वैतागून म्हणाली.

तिच्या मोकळेपणाने बोलण्याचं सिद्धार्थला हसू आलं.

ओके, तूबास? बरं मला सांग, तू मला कसं काय ओळखलंस, एवढ्या लांबून. आपण एकदाच भेटलोय तरीपण?”

 

साखरपुड्यातले फोटोज बघितले होते ना मी. म्हणून लक्षात होतं. ” ईशा

 

ओके, हे बघ आलोच आपण. हे आमचं ऑफिस आणि इथे सायली बसते. कुठे गेलीये काय माहित? आज खरं तर एकच मीटिंग होती अकरा वाजता. आत्ता कोण आलंय काय माहित? ए एके, सायली कुठे आहे माहित आहे का?” सिद्धार्थ

 

पता नाही, मै भी अभी आया हू…” एके

 

मी सांगते ना,” एकेच्या पलीकडे बसलेली एक कलीग म्हणाली, “आता सायली मॅडम फक्त आपल्या राहिल्या नाहीयेत ना, आता हळूहळू आपलं महत्व कमीच होणार आणि …………..”

 

काय टाईमपास करतेयस तू? सायली कुठे आहे?” सिद्धार्थ

 

अरे सुजय आलाय तिला भेटायला. ते लोकं आय थिंक कॅफेटीरिया मधेच बसले असतील

 

काय ?” ईशा आणि सिद्धार्थ एकदमच ओरडले.

दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंगच उतरल्यासारखा झाला.

कुल डाऊन सिद्धार्थ. त्यांचं लग्न ठरलंय. ते असे भेटणारच.” सिद्धार्थने स्वतःला समजावलं.

ईशा, तुझ्यासाठी काय सांगू? चहा की कॉफी? “

ईशा तर विचारात गढून गेली होती. कालच रात्री सायलीने लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं तिला सांगितलं होतं. हे कळल्यावर ईशासुद्धा रात्री नीट झोपली नव्हती. आणि पहाटे ५ वाजता सायलीचा मेसेज आला होता, ती आज त्या मोलकरणीला भेटायला जात असल्याचं. हे एवढं सगळं चालू असताना ईशाला तिकडे पुण्याला चैन पडणं शक्यच नव्हतं. काही अर्जंट फॅमिली प्रॉब्लेम हॅंडल करण्यासाठी ३४ दिवस सुट्टी घ्यावी लागतेय, असं मेल बॉसला पाठवून सकाळी ७ वाजताच ती घरातून निघाली. आईला मात्र तिने सांगितलं की ऑफिसच्या काही अर्जंट कामासाठी मुंबईला जावं लागतंय, त्यामुळे मावशीकडे जाऊन ३४ दिवस राहणार आहे. ईशा मुंबईला सायलीकडेच राहणार आहे, हे ऐकून तिच्या आईनेही तिला फार प्रश्न विचारले नाहीत.सायलीसाठी मात्र हे सरप्राईझ ठेवलं तिने, आणि पुण्याहून थेट ती सायलीच्या ऑफिसमध्ये आली. सुजय इथे आलेला असणं तिच्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं. सुजय सायलीला भेटायला का आला असेल, ह्याचाच ती आता विचार करत होती. सुजय आणि सायली कॅफेटीरियामध्ये बसून बोलतायत, असं चित्र तिच्या डोळ्यांसमोर यायला लागलं.

तुला वेळ असला तर मला जरा तुमचा कॅफेटेरिया कुठे आहे ते दाखवशील का प्लीज?” ईशा पर्स घेऊन उठलीच.

 

तिथे जायची गरज नाही अगं, इथे मागवू शकतो मी चहा वगैरे…”

सिद्धार्थला तिच्या अचानक घाई करण्याचं कारण कळत नव्हतं.

ईशाने वैतागून त्याच्याकडे बघितलं.

मला भूक पण लागली आहेकाहीतरी खायचंय …”

ती दरवाज्यापर्यंत पोहोचलीसुद्धा.

ओके, ओकेचल दाखवतो…” सिद्धार्थ.

कॅफेटेरिया मध्ये ते आले तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हतीच. ही ब्रेकफास्ट किंवा लंचची वेळ नसल्यामुळे फार लोक नव्हते. मात्र टी ब्रेक किंवा कॉफी ब्रेक घेऊन १० मिनिटांसाठी तिथे आलेले असे काहीजण होते. आत आल्या आल्याच ईशाने सगळीकडे नजर फिरवून सायली आणि सुजय कुठे दिसतायत ते शोधायला सुरुवात केली. पण स्वतः मात्र कोणाला पटकन दिसणार नाही अशी एका खांबामागे उभी राहिली.

इथे अशी लपल्यासारखी का उभी राहिली आहेस? हे, ती बघ सायली आणि सुजयतुला त्यांच्याच टेबलवर बसायचंय का? चल मग लवकर नाहीतर ते परत जायला निघायचे.”

ईशाप्रमाणेच सिद्धार्थला सुद्धा सुजयवर लपून वॉच ठेवण्यात जास्त इंटरेस्ट होता. पण ईशाला हे सांगता ही येणार नव्हतं. त्यामुळे लवकरात लवकर तिला सायलीच्या टेबलवर पोहोचवून आपण परत जाण्याचं नाटक करायचं, पण तिथेच कुठेतरी लपून सुजयच्या हालचाली बघायच्या, असं त्याच्या डोक्यात होतं. पण ही ईशा इथे अशी लपून का उभी आहे, आणि त्या दोघांकडे अशी का बघतेय, त्याला कळतच नव्हतं. ती सायलीला सरप्राईझ द्यायला आली होती तर सायली दिसल्यावर तिने खरं तर धावत पुढे जायला हवं होतं. पण ती तसं काहीच करत नव्हती.

काय करतेयस तू? तुला भूक लागलीये ना….चल ना मग….” सिद्धार्थ

 

शुओरडू नकोस….किती मोठ्यांदा बोलतोयसहळू जरा….त्यांचं इथेच लक्ष जाईल आणि मग मला काहीच नाही करता येणार….” ईशा

 

तू काय ते उठले की खांबामागुन येउन त्यांना भॉककरणारेस का?” सिद्धार्थला हसायला आलं.

 

तुला काय करायचंय ते? मला कॅफेटेरिया मध्ये सोडायला आलास ना, तुझं काम झालं ना? थॅंक्स अ लॉट. जा तू आता….मला माझं काम करूदेत…..” ईशा वैतागली.

ती इतकी फटकन बोलली की सिद्धार्थला तिचं बोलणं जरासं लागलंच….तो परत जायला वळला

काय आगावू मुलगी आहे, हिला एवढं आत घेऊन आलो, सायलीची बहिण म्हणून हिची एवढी बडदास्त ठेवतोय पण ही वाट्टेल तसं बोलतेय….जाऊदेत झाली एवढी मदत फार झाली….परत जावंआणि…..”

तेवढ्यात त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो तसाच मागे वळला, ईशाच्या एका बाजूला मागे तिचा चेहरा दिसेल असा उभा राहिला. ती नक्की काय करत होती इकडे लपून बसून ? तिची नजर काहीतरी शोधत होती. चेहऱ्यावर कडवट भाव होते. लग्न ठरलेल्यांची आपण चिडवून जशी थट्टा- मस्करी करतो, तसं त्यांना चिडवण्याच्या हेतून ती नक्कीच इथे लपलेली नव्हती. मगाशी सुजय इथे आल्याचं कळल्यावर आपल्याप्रमाणेच तिलाही धक्का बसल्यासारखं वाटला होतं. आश्चर्य, आनंद ह्यापैकी कुठलेही भाव तिच्या चेहऱ्यावर आले नाहीत. पण सुजय इथे असल्याचं कळल्यावर ती एकदम सावध झाल्यासारखी झाली आणि लगेच घाईघाईने इथे यायला म्हणून उठलीच. पण इथे आल्यावर सायलीला न भेटता ती अशी लपून बसलीये. तिची शोधक नजर काहीतरी वेगळंच सांगतेय…..हे काय आहे सगळं?

एक विचारू का ईशा? तू वॉच ठेवतेयस का त्यांच्यावर?”

सिद्धार्थने असं थेट विचारल्यावर ईशा दचकलीच. तिचा चेहरा एकदम पडला.

मी कशाला वॉच ठेवू माझ्या बहिणीवर?” ती सिद्धार्थकडे न बघता म्हणाली.

 

सायलीवर नाही, कदाचित सुजयवर? ” सिद्धार्थ

ईशाला आता त्याच्या आगावूपणाचा राग यायला होता.

तुला एकदा सांगून कळलं नाही का? मला मदत केल्याबद्दल धन्यवाद….पण आता माझ्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. तू जात का नाहीयेस?”

 

कारण मला पण वॉच ठेवायचाय त्या सुजयवर. आय एम शुअर, तू फार कौतुकाने बघत नाहीयेस त्या दोघांकडे. तुलापण काहीतरी शोध घ्यायचाय ना? तुझी नजर तेच सांगतेयआणि आणखी एक सांगतोजर तसं काही नसेल आणि माझा अंदाज खोटा असेल तर प्लीज मी आत्ता जे बोललो ते विसरून जा आणि सायलीला काहीही सांगू नकोस. प्लीज.” सिद्धार्थ

सिद्धार्थ जे बोलला ते ईशासाठी खूपच अनपेक्षित पण तितकंच दिलासा देणारं होतं. अनोळखी लोकांच्या गर्दीत जेव्हा आपण एकटे कुणाशीतरी भांडत असतो आणि अगदी अचानक त्यातलाच एक अनोळखी चेहरा आपल्या बाजूने इतरांशी भांडायला पुढे येतो, तेव्हा जसं वाटेल तसंच वाटलं तिला ……

एक मिनिट, तुझा अंदाज बरोबर आहे. मला सुजयबद्दल संशय आलाय आणि त्याचाच शोध घेतेय मी. पण तुला का वॉच ठेवायचाय त्याच्यावर? ” ईशा

 

काही गोष्टी मलाही खटकल्यात. ते प्रश्न स्वस्थ बसू देत नाहीयेत. आणि असंच सोडून देणं माझ्या स्वभावात नाही. त्यात पुन्हा समोर सायली आहे म्हटल्यावर तर शक्यच नाही…..” सिद्धार्थ

सिद्धार्थच्या शेवटच्या वाक्यावर ईशाने एकदम चमकून मान वर करून त्याच्याकडे बघितलं. सिद्धार्थच्या ते लक्षात आल्यावर त्याला जरा ओशाळल्यासारखं झालं. तेवढ्यात सायली आणि सुजय टेबलवरून उठले. आता मात्र त्यांच्या आधी इथून बाहेर निघून जाणं आवश्यक होता. ईशा आणि सिद्धार्थ लगेच तिथून बाहेर पडले.

आपण एकदा भेटून बोलूया का? कदाचित मला जे माहित आहे ते तुला माहित नसेल आणि तुझ्याकडे जी माहिती आहे ती मला मिळेल. ” सिद्धार्थ

 

हो, नक्कीच. मी आता ३४ दिवस मुंबईमध्ये आहे. तू माझा नंबर घेऊन ठेव. आपण ठरवू नंतर. ” ईशा

 

पण प्लीज सायलीला कळू देऊ नकोस आपण टच मध्ये आहोत ते. तिला संशय येईल.” सिद्धार्थ

 

तिला ऑलरेडी आलाय…” ईशा

 

काय ? तिला अजून कुठे माहितीये आपण भेटलोय ते? ” सिद्धार्थ

 

आपल्याबद्दल नाही….सुजयबद्दल. आम्ही दोघी मिळून हा शोध घेतोय….चल तू आता तुझ्या जागेवर जा. मला मिस्ड कॉल दे. आपण कधी आणि कसं भेटायचं ते ठरवू…..बाय….”

ईशा शांतपणे सायलीच्या डेस्कसमोरच्या खुर्चीत जाऊन बसली आणि सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन ईशाकडे बघत राहिला…….

क्रमशः..

4 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 14)

 1. Sweetali
  April 4, 2016

  mastch…next part madhe ti yenar….Excited to read next Part 😉

  Like

 2. Aditya Patil
  April 15, 2016

  sundar

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on April 2, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: