davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 16)

बोलता-बोलता सायलीने बेल वाजवली देखील. एक मिनिट श्वास रोखून त्या दोघी दाराकडे बघत होत्या. दार उघडलं गेलं नाही.

“म्हणजे जेव्हा आम्हाला घरी यायचं निमंत्रण देतात, तेव्हाच ते खोटे आई-बाबा इथे येतात. म्हणूनच मागच्यावेळी मी आधी न कळवता आले, तेव्हा ते इकडे नव्हते. आणि म्हणूनच तेव्हा घर पण नीट आवरलेलं नव्हतं.” सायली नीट आठवत म्हणाली.

 

“बरं, आपण बोलू ते नंतर. लिफ्ट येईल आता. तू ओढणी घे तोंडावरून….”

सायली ओढणीने तोंड झाकत होती, तेवढ्यात लिफ्ट आलीच. लिफ्टचं दार उघडलं आणि समोरच्या व्यक्तीला पाहून सायली आणि ईशा जागच्याजागी खिळून राहिल्या.

समोर सुजय होता.

———————– भाग १५ पासून पुढे चालू ———————–

भाग १५ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-oi

सायली, तू इथे? आणि ….हीईशा बरोबर ना?”

सुजय लिफ्टमधून बाहेर पडतापडताच बोलत होता. सायली अचानक समोर आली होती तरीही त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा आनंद दिसत नव्हता. सायली आणि ईशा तिथे अचानक आलेल्या होत्या, तो नसण्याच्या वेळेला त्या इथे आलेल्या होत्या, लिफ्टचं दार उघडलं तेव्हा त्याला समोरच सायली दिसली होती, तिचा चेहरा झाकताना. ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यासाठी संशयास्पद होत्या. समोर सायलीला बघताच त्याच्या डोक्यात धोक्याची घंटा किणकिणली होती. पण पुढच्याच मिनिटाला त्याला त्याची चूक लक्षात आली. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू दिसायला लागलं. चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आले. मनात आलेली धास्ती त्याला चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती. सायली मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे बदलणारे भाव टिपत होती. आता तिला हळूहळू त्याचा चेहरा वाचता येत होता.

सुजयला अचानक समोर बघितल्यावर त्या दोघीही हादरून गेल्या होत्या. पण एक क्षणभरच.

ओह माय गॉड, सुजय तू आत्ता एवढ्या लवकर आलायस आज? आम्हाला वाटलंच नव्हतं तू भेटशील आत्ता असं. सकाळी ऑफिसला आला होतास तेव्हापण तू म्हणाला होतास ना की खूप काम आहे. आज पण रात्री अकरा शिवाय घरी जाईन असं वाटत नाही…”

सायलीने तिच्या चेहऱ्यावर सुजय अचानक तिथे भेटल्यामुळे तिला झालेल्या आनंदयुक्त आश्चर्याचे भाव अगदी व्यवस्थित आणले होते आणि त्याच वेळेला तो लवकर घरी कसा आला असा छुपा सवालही त्याला केला होता.

हो गं, मी म्हणालो होतो तसं….पण ….”

सुजयच्या विचार करून बोलण्यामागचं कारण आता सायलीला सहज कळत होतं. ती आत्ता इथे त्याच्या घराच्या बाहेर असेल अशी कल्पनाच सुजयने केलेली नसणार त्यामुळे तिच्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच त्याच्याकडे तयार नव्हतं.

अगं ऑफिसमध्ये पॉवर फेल्युअर झालं आणि ते रीस्टोअर झालं आणि मग नेटवर्कच डाऊन झालं. इंटरनेट, मेल्स सगळंच बंद ना. आणि दोनतीन तास तरी लागणार होते सगळं चालू व्हायला. म्हणून मग म्हटलं घरी जाऊन काम करू. पण तुम्ही दोघी इथे कशा?”

सुजयने काहीबाही सांगून वेळ मारून नेली पण खरं तर त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. ह्या दोघी इथे का आल्या आहेत, हा विचार त्याला अस्वस्थ करत होता.

जीजू, तुम्हाला नक्की आम्ही आल्याचा आनंद झालाय, टेन्शन आलंय की आम्ही का आलोय असा प्रश्न पडलाय?”

ईशाच्या आवाजात निरागसपणा होता.

इशी, फटके खाशील हा तू, सुजयला टोमणे मारलेस तर….”

सायलीने ईशाच्या पाठीत एक धपाटा घातला.

हो हो बाई, सॉरी हा, तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला काही बोलणार नाही हा आता मीए सायले पण तूच बघ ना जीजू किती कन्फ्युझ्ड वाटतायत चेहऱ्यावरून….आपल्याला आत पण बोलवत नाहीयेत….”

ईशा नाटकीपणे म्हणाली….

तिचं वाक्य संपताक्षणीच सायली म्हणाली,

सुजय तिच्याकडे लक्ष नको हा देउस, ती अशीच फिल्मीपणा करत असते जिथेतिथे. पण खरंच आत जाऊन बोलूया का? आम्ही बेल वाजवली. पण कोणीच नाहीये वाटतं.”

सायली बोलताबोलता सुजयच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होती. घरात कोणीच का नाही याबद्दल त्याला पुन्हा काहीतरी विचार करून सांगावं लागणार होतं.

हो गं, आईबाबा नाटकाला जाणार होते चार वाजता आज. आपण बाहेर कुठेतरी जाऊन बोलूया का? म्हणजे, आई पण नाहीये घरात. मला काही फार चांगला चहा पण येत नाही. बाहेरच जाऊ कुठेतरीचहा घेऊ आणि काहीतरी खाऊ मस्तचालेल का? ” सुजय

तो घरात जायला टाळाटाळ करतोय हे त्या दोघींच्याही लक्षात आलं.

नको जीजू, आधीच आम्ही खूप फिरलोय, आणि मी घर पण नाही ना बघितलंय आमच्या सायलीचं….म्हणजे तुमचं.. आणि तसंही आम्ही पाच मिनिटात निघूच. म्हणजे मी तरी निघेन, सायलीला थांबायचं तर ती थांबेल…”

सुजयचा नाईलाज झाला. त्याने किल्ली लाऊन घराचं दार उघडलं.

घरात सगळं सामान तसंच पसरलेलं होतं. सोफा, टेबल, खुर्च्या सगळ्यावर काही ना काही विखुरलेलं होतं. पेपर्स, कपडे वगैरे. सुजयच्या मागोमाग सायली आणि ईशा घरात शिरल्या आणि तिथेच थांबल्या. सुजयची त्यांच्याकडे पाठ होती त्यामुळे त्याचा चेहरा वाचता येणं कठीण होतं. ईशाने सायलीला खूण केली आणि ती दबक्या आवाजात पण सुजयला ऐकू जाईल, असं म्हणाली….

सायले, केवढा पसारा आहे……”

त्यावर सायलीनेसुद्धा तशाच दबक्या आवाजात तिला शूगप्प बस….”म्हणून दटावलं, अर्थात सुजयला ऐकू जाईल एवढ्याच दबक्या आवाजात.

सुजयच्या लक्षात आलं, आई एवढा पसारा घरात टाकून बाहेर कशी गेली, हा प्रश्न ह्यांना पडलाच असणार. त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला अनुत्तरीत ठेवणं त्याच्यासाठी धोक्याचं होतं. त्याने क्षणभरच विचार केला आणि तो मागे वळला.

सॉरी खूप पसारा आहे घरात. अक्चुअलि, बेडरुममध्ये थोडं रंगाचं काम केलं काल. तर थोडं वरचं सामान इथे आणून ठेवलं होतं. आणि आमची कामवाली बाई येत नाहीये ना दोन दिवस. आणि मागच्या आठवड्यापासून आईची पाठ दुखतेय. डॉक्टरकडे जाऊन चेक करून घेतलं आणि औषध आणलं, इतका साधा प्रकार आमच्याकडे नाही ना. आठवडाभर घरगुती औषधं चालू आहेत. पण आज सकाळी जाताना मी अगदी बजावून गेलो होतो तिला, म्हटलं सगळा पसारा तसाच राहूदेत. तू फक्त किचनमध्ये उभी राहून काय थोडंफार करायचं ते कर. वाकून काहीही करू नकोस. मी आल्यावर सगळं आवरतो, असं सांगितलं होतं तिला.”

 

अरे बापरे, डॉक्टरकडे जायला हवं मग.” सायली

 

हो मला माहित नव्हतं ना, आज मी लवकर येईन ते, नाहीतर आजच नेलं असतं तिला. पण उद्या वेळ काढून नेईनच. तिच्यावर सोडलं तर ती जाणारच नाही.” सुजय

सायली आणि ईशा सगळ्या पसाऱ्यातून वाट काढून सोफ्यावर जाऊन बसल्या. सुजयने आतून त्यांना पाणी आणून दिलं.

पण तुम्ही दोघी इथे कशा अचानक, म्हणजे तू सकाळी काही बोलली नव्हतीस ना, म्हणून….”सुजयने पुन्हा विचारून बघितलं.

 

अरे चुकून आलो आम्ही इकडे….”.सायली

 

काय ? चुकून? “

सुजयला ती काय म्हणतेय तेच कळत नव्हतं.

अरे ईशा ऑफिसच्या कामासंदर्भात मुंबईला आली होती तिच्या बॉस बरोबर. सकाळीच आली ती. त्यांच्या क्लायंटच्या ऑफिसमध्ये प्रेझेन्टेशन होतं. ते झालं आणि तिचे बॉस पुण्याला परत गेले. आणि ही हाफ डे घेऊन घरी गेली…..म्हणजे माझ्या घरी गेली. आणि मग तिला तिच्या बॉसचा फोन आला की काही महत्वाच्या पेपर्सवर सह्या घायच्या राहिल्या. ते तिला उद्या ऑफिसमध्ये घेऊन जायचेत. त्या सह्या घेण्यासाठी तिला इथे जवळच्याच एरियामध्ये यायचं होतं. आणि तिला इथली काही माहिती नाहीये ना, म्हणून तिने मला फोन केला तिच्याबरोबर येण्यासाठी. ते क्लायन्ट तसे ओळखीचे आहेत, पण असं एकदम कोणाच्या घरी जाणं ठीक वाटत नाही ना. म्हणून मी यायचं ठरवलं. मग आम्ही रिक्षाने इथे आलो, पण रिक्षावाल्याने गोंधळ घातला. त्याने आम्हाला सिल्वर हाईट्स च्या ऐवजी सिल्वर मिस्ट ला सोडलं. तुमच्या बाजूच्या कॉम्प्लेक्समध्ये. इथे उतरल्यावर कळलं की त्याने इस्ट ऐवजी वेस्टला आणून सोडलं आम्हाला. मला पण इथली एवढी माहिती नाहीये, पण तुमचं कॉम्प्लेक्स बघितल्यावर मला कळलं की त्याने चुकीच्या पत्त्यावर आणून सोडलंय. ”

 

थांब, थांब, पुढचं मी सांगते.”

ईशा मधेच सायलीला तोडत म्हणाली.

आणि मग मला कळलं की तुम्ही इथे राहता. म्हणून मीच सायलीला आग्रह केला की, आलोच आहोत तर जाऊन येऊ. ती नकोच म्हणत होती. सुजय अजून आला नसेल, वगैरे. पण मीच खेचून आणलं तिला. म्हटलं, एवढं काय फॉरमल वागायचं? आता हे तिचंच घर होणार नाही का, आता थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे. आणि आम्हाला वाटलं की काकाकाकू असतीलच घरी. म्हणून मग आलो. पण इथे आलो आणि बेल वाजवूनही दार कुणीच उघडेनात मग परत जायला निघालो तेवढ्यात तुम्ही आलात. खरं तर तुम्ही दोघांनी मला थॅंक्स म्हटलं पाहिजे. माझ्यामुळे तुमची भेट झाली….”

ह्यावर सुजय मनापासून हसला. अर्थात थोड्याच दिवसांचा प्रश्न आहेवगैरे ऐकून सुजय मनातून सुखावला होताच. म्हणजे बहुतेक सायलीकडून लवकर लग्न करण्याबाबत काहीतरी निर्णय घेतला जातोय एवढं तरी त्याला कळलं होतं.

पण मग सायली तू अशी ओढणी वगैरे का तोंडावर ओढून घेतलीयेस?” सुजयला पुन्हा शंका आली.

 

अरे दुपारी तीनसाडेतीन वाजता बाहेर पडले मी. सकाळपर्यंत ठीक होते अगदी. आपण भेटलो पण नाही का सकाळी. नंतर रिक्षा मिळेपर्यंत थोडं उन्हात चालावं लागलं. कदाचित म्हणूनच एकदम मळमळल्यासारखं व्हायला लागलं. अचानक शिंका पण सुरु झाल्या. ईशा भेटल्यावर आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि मग ठीक वाटलं पण नंतर मात्र पूर्ण अशी तोंड झाकूनच आले मी. मला एरवी उन्हाचा नाही, पण पोल्युशन चा मात्र खूप त्रास होतो. लगेच शिंका सुरु होतात. म्हणून आत्ता पण लिफ्टमध्ये घुसायच्या आधी तीच सगळी तयारी करत होते. ”

 

अच्छा…”

सुजयला आता थोडं हलकं वाटत होतं.

बरं, सायले निघू का मीमेहतांना वेळ दिलीये. फार लेट नको. तुम्ही गप्पा मारा. मी जाते.” ईशा एकदम उठलीच.

 

अगं, गप्पा काय मारा? तुझ्याबरोबर यायला म्हणून आले ना मी. सुजय समजून घेईल. आणि तसंही तो पण काम करायला आलाय घरी. सुजय खरंच सॉरी. पण आत्ता हिला एकटीला नाही सोडू शकत मी. आम्ही निघतो. भेटू नंतर. बाबा फोन करतील.”

त्या दोघी जायची तयारी करतायत हे बघूनच सुजयला हायसं वाटलं होतं.

मी तुम्हाला फार आग्रह करत नाही कारण आत्ता पंधरा मिनिटात एक मिटिंग अटेंड करायचीये मला. लॉगइन करावंच लागेल आत्ता. पण निदान चहा तरी घ्या. मी फार छान नाही करत पण तरीही…..” सुजय

 

खरंच नको आत्ता. आम्ही तसंही अगदी ५१० मिनिटांसाठीच आलो होतो. आता पुन्हा रिक्षा बघावी लागेल त्यात वेळ जाईल. परत येईन ईशाला घेऊन. आईबाबांना सांग. आजपण आमची चुकामुकच झाली. “

सायली आणि ईशा परत जायला म्हणून उठल्याच.

बाय द वे, ईशा मला पत्ता सांगशील का? कदाचित मी नीट सांगू शकेन तुम्हाला.”

त्या दोघी दाराशी पोहोचल्या तेवढ्यात पुन्हा एकदा खात्री करून घेण्याच्या हेतूने सुजयने विचारलं.

ईशा आणि सायलीने एकमेकींकडे बघितलं.

हो आहे ना. एक मिनिट हा…”

पर्स उघडून ईशाने त्यात टाकलेला एक कागद सुजयच्या हातात दिला.

त्यावरचे मेहता, सिल्वर हाईट्स वगैरे शब्द वाचून त्याची खात्री झाली.

हो रिक्षावाल्याने अगदीच चुकीच्या बाजूला आणलं तुम्हाला. म्हणजे सॉरी नक्की कसं जायचं ते मलाही नाही सांगता येणार. पण हवं तर त्या मेहतांनाच फोन करून लँडमार्क विचारून घ्या. बहुतेक सिल्वर हाईट्स आणि सिल्वर मिस्ट ह्यामुळे रिक्षावाला कन्फ्युज झाला असणार. ” सुजय

 

हो आता खाली उतरताउतरता फोन करतेच त्यांना….” ईशा

———————————-

बसमधून घरी जाताना सायली गप्पगप्पच होती. तिच्या मनात काय वादळ उठलं असेल ह्याची ईशाला कल्पना येत होती. आत्तापर्यंतचा सुजयबद्दलचा सगळा संशय खरा ठरत होता. ईशाने सायलीच्या हातावर हात ठेवला. सायलीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.

सायले, रडतेयस का तू? एक मिनिट, हे बघ त्या नालायक मुलामुळे तू रडायचं नाहीयेस. कळलं ना? तुझ्या नशिबात तुझ्यावर खूप प्रेम करणारा कुणीतरी राजकुमारच आहे. नक्कीच….ह्या फालतू सुजयसाठी रडायचं?”

 

बावळट आहेस का तू? त्याच्यासाठी मी का रडू? मी कधीच त्याच्यात इमोशनली इंवोल्व्ह नाही झाले. सुरुवातीला तो तुटक वागायचा म्हणून आणि नंतर आपल्याला त्याच्याबद्दल संशय आला म्हणून. हे सगळं आईबाबांना सांगितल्यावर त्यांना काय वाटेल, किती धक्का बसेल ह्याचा विचार करतेय मी.”

 

ह्यापेक्षा आता त्या सुजयला आणि त्याच्या त्या आईवडिलांना काय धक्का द्यायचा ते ठरव. मावशीकाकांची रिएक्शन तुझ्यावर अवलंबून असणार आहे. कळलं ना? एवढी मोठी फसवणूक झाली आणि ठरलेलं लग्न मोडलं म्हणून तू रडत बसलीयेस असं त्यांना दिसलं तर ते जास्त दुःखी होतील. पण तू ह्या लोकांच्या बाबतीत योग्य काय तो निर्णय घेतलास आणि एकटीने हा शोध घेतलास हे कळल्यावर त्यांचं दुःखही फार काळ नाही टिकणार. आपण स्ट्रॉंग राहायचं, बस.”

 

हो गं, खरं आहे तू बोलतेयस ते. तुला काय वाटतं ईशा, आता काय करायचं आपण? म्हणजे, हे जे काही कळलंय आपल्याला त्याचा डायरेक्ट त्याला जाब विचारायचा, की आपलं आपणच शोधून काढायचं तो असं का करतोय ते?”

 

यु नो सायली, राहून राहून मला असं वाटतंय की आपल्याला हे जे काही कळलंय त्यापेक्षा मोठं, बरंच काहीतरी मोठं अजून कळायचंय. उगीचच कोणीतरी आपली माहिती का लपवेल? मागचं सगळं आठवून बघ. त्याचं साखरपुड्यातलं थोडं विचित्र वागणं, तुझ्याशी तुटक वागणं, आणि सगळ्यात महत्वाचं – ‘तीचं येणं. काय वाटतं तुला हे सगळं आठवून? स्वतःची खरी माहिती किंवा काहीतरी कमी बाजू लपवून लग्न केल्याची अगदी बरीच उदाहरणं असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, खोटा पगार सांगितला, किंवा खोटी जात सांगितली किंवा स्वतःच्या नावावर एखादा फ्लॅट आहे असं खोटं सांगितलं, असं सगळं घडत असतं. पण सुजयबद्दल विचार केला तर तुला पटतं का की तो एवढंच काहीतरी लपवायचा प्रयत्न करतोय? मला नाही वाटत असं सायली. काहीतरी नक्कीच आहे ह्यापेक्षा मोठं.”

 

हम्म ….आणि त्याचं फेसबुक प्रोफाईल सांगतंय की हे जे काहीतरी आहे, त्याचा संबंध कदाचित त्याच्या भूतकाळाशी असावा….आठवतंय? जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१५ ह्या पिरिएड मध्ये फेसबुक प्रोफाईल मध्ये काहीच हालचाल नाहीये त्याच्या.” सायली

 

हम्म….काय करायचं आता पुढे?” ईशा

 

शोध सुरु ठेवायचा. तो नक्की का करतोय हे सगळं, हे कळायलाच हवं. आपण आत्ता त्याला जाब विचारायला गेलो की तुझे खरे आईवडील अमेरिकेत आहेत ते आम्हाला कळलंय, असं तर तो त्याबद्दलही काहीतरी थापा मारेल. ती आजी वेडसर आहे, वगैरे काहीही बोलेल. आणि मुख्य म्हणजे तो सावध होईल आणि पुढचा शोध घेणं फार कठीण होईल. माहिती लपवली ह्या कारणाने आपण लग्न मोडू शकू. पण उद्या तो दुसऱ्या मुलींनाही फसवू शकतोच नानाही, आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी कळलंय हे त्याला आत्ताच कळता कामा नये….”

 

आईबाबांना सांगायचं काय ठरवलं आहेस?”

 

आईला एवढ्यात नाही सांगणार, ती खूपच टेन्शन घेते सगळ्याचं. किंवा तिला सांगायचं की नाही ते बाबांना ठरवूदेत. पण बाबांना मी आजच सांगणार. मी ठरवलंच होतं तसं. फक्त आई आजूबाजूला नसली की लगेच सांगेनच त्यांना.”

 

ए पण आपल्या पूर्ण तयारी करून जाण्याच्या स्ट्रॅटेजीचा किती फायदा झाला बघितलंस ना? आपण तिथे का गेलो, कसं गेलो, तोंडावर ओढणी का घेतली सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार होती आपली. अगदी मेहतांचा पत्ता लिहिलेला कागद सुध्दा. नाहीतर पकडले गेलो असतो. त्या तुझ्या सुजयने अगदी सगळं विचारून खात्री करून घेतली स्वतःची.”

 

हो ईशा बाई, त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद…”

सायली तिला कोपरापासून हात जोडून म्हणाली आणि बऱ्याच वेळानंतर दोघी मनमोकळ्या हसल्या.

—————————————–

त्या दोघी घरी आल्या तेव्हा आईबाबा कुठेतरी जायची तयारी करत होते. तयारी झालीच होती खरं तर. एक छोटी बॅग घेऊन ते तयारच होते आणि सायलीच्याच येण्याची वाट बघत होते.

आईबाबा, हे काय तुम्ही कुठे निघालात?”

 

अगं, चिपळूणहून फोन आला होता, आत्ता एक तासापूर्वी. माई आजी कुठलातरी दरवाजा लावायला गेली आणि तोल जाऊन पडली….” बाबा

 

काय ?” सायली किंचाळलीच.

माई आजी हा त्या सगळ्याच भावंडांचा विकपॉइण्ट होता. सायली, अनिकेत , ईशा आणि निशा सगळ्यांनाच वडील आणि आईकडून आजीआजोबा असे कोणीच नव्हते. माई आजी म्हणजे सायली आणि ईशाच्या आईची मावशी होती. चिपळूणला एकटी राहायची. वय पंच्याऐंशी च्या पुढे असेल. तिलाही तिची मुलं नातवंड अशी कुणीच नव्हती. सायली आणि बाकी भावंडं हीच तिची नातवंड होती. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आई आणि मावशी सगळ्या मुलांना घेऊन माईमावशीकडे जायच्या. नंतर मुलं मोठी झाली तशी नेहेमी जाणं जमेनासं झालं. तरीही प्रत्येकजण वेळ काढून जमेल तसं तिला भेटायला जाऊन यायचा. गेल्या सहा महिन्यांपासून तशी ती बऱ्यापैकी अंथरूणालाच खिळलेली होती. अगदी गरजेपुरतं कशीबशी जागेवरून उठायची. आई आणि मावशी दोघीही तिला त्यांच्याकडे येउन राहण्यासाठी खूप आग्रह करायच्या. पण ती काही तयार व्हायची नाही.

अगं तसं काळजीचं काही नाहीये फार. थोडा पाय दुखतोय, बाकी तसं काही झालं नाही तिला. शेजारच्या दाते काकांचाच फोन आला होता. ते लोक बाकी फार काळजी घेतात हो माईची. सारखं येउनजाऊन बघत असतात माईकडे. स्वयंपाकाची बाई नाही आली तर जेवण वगैरेसुद्धा सगळं बघतात. माई पडली हे अगदी कळवलंच नाही असं व्हायला नको, म्हणून त्यांनी फोन केला खरं तर. पण आज त्यांचा फोन आल्यावर म्हटलं, की आता बास झालं. आता माईला इकडे घेऊन यायचंच. तुझ्या साखरपुड्याला सुद्धा तिला यायला काही जमलं नाही. ती अगदी झोपूनच होती म्हणून मीपण फार आग्रह धरला नाही. पण आता लग्नाला तरी हवीच ना ती इथे. ” आई

 

हो ना, आणि तसंही आता आल्या की त्यांना इथेच राहायला सांगायचा विचार करतोय आम्ही. त्या तयार झाल्या तर चांगलंच आहे, पण आम्ही त्यांना आग्रह करणार आहोत. बरं सायली, माईना डॉक्टर कडे एकदा नेउन आणू. कदाचित यायला दोन दिवसपण लागतील. मी मगाशी सान्यांकडे फोन करून सांगितलं की दोनतीन दिवसात आपण निर्णय घेऊ असं. आम्ही जातोय ते पण सांगितलं त्यांना. तुझ्याशी बोलायचं होतं त्या विषयावर एकदा त्यांना कळवायच्या आधी पण आता आल्यावरच बोलणं होईल. तू पुन्हा नीट विचार करून ठेव या एकदोन दिवसात. आणि कुठलंच टेन्शन घेऊ नकोस. माईआजीचं तर अजिबात नाही. त्यांना घेऊन येणारच आहोत आम्ही. तिकडे पोहोचलो की फोन करतो.”

 

काका, फोन नक्की करा हा. माई आज्जीशी बोलायचंय…” ईशा

 

हो बेटा, आणि तुम्ही तिघे नीट राहा…” बाबा

 

आणि सायली, पूनमला निरोप दिलाय. ती येउन पोळीभाजी करेल. बाकीचं तुम्ही सांभाळा जरा. अनि, रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरत बसू नकोस. “

आईच्या सूचना संपता संपत नव्हत्या.

————————————————–

आईबाबा गेल्यावर थोडा वेळ अनि, ईशा आणि सायली कंटाळा आल्यासारखे तसेच बसले होते. मधेच ईशा लहान मुलीसारखी उडी मारून सोफ्यावरून उभी राहिली.

हे गाईज, आपण असं काय बसून राहिलोत? मोठी माणसं नाहीयेत घरी….सायले लेट्स पार्टी. एरव्ही फक्त आपण असं कधीच नसतो ना….मस्त काहीतरी बाहेरून ऑर्डर करू आणि मुव्हीज बघू रात्रभर बॅक टू बॅक. व्हॉट से?”

अनिमध्ये पण उत्साह संचारला.

हो,हो….चालेल..पण घरी ऑर्डर करण्यापेक्षा बाहेर जाऊया का डिनरला ?”

 

, प्लीज मी खूप दमलेय हा. एकतर काल रात्रभर झोपले नाहीये मी. आणि आजपण खूप दमछाक झालीये. मला आज लवकर झोपायचंय. आपण काहीतरी घरीच ऑर्डर करू. मग खाऊन मी झोपून जाणार. तुम्हाला मुव्हीज बघायचे तर बघा त्याच्यानंतर….” सायली

 

रात्रभर झोपली का नाहीस?” अनि

 

ऑफिसच्या कामाचं काहीतरी टेन्शन असेलहो ना गं सायली?” ईशा लगेच सांभाळून घेत म्हणाली.

 

हम्ममी जरा फ्रेश होऊन येते. तुम्ही दोघं ऑर्डर करा काहीतरी. मला काहीही चालेल….” सायली आत जाता जाता म्हणाली.

—————————————–

जेवण झाल्यावर सायली लगेच झोपायला आत आली. दहाच वाजत होते खरं तर, पण ती पाठ टेकताच कोणत्याही क्षणी झोपू शकेल अशा अवस्थेत होती. पण डोळ्यांवर इतकी झोप कोसळलेली असतानाही सुजयबद्दलचे विचार डोक्यातून जात नव्हते. खरं तर बाबांना सगळं सांगायचं ठरवलं होतं, पण ते अगदी बॅग घेऊन निघालेलेच असल्यामुळे तिला त्यांना सांगणंही शक्य झालं नव्हतं. आता त्यांना सांगण्यासाठीच दोन दिवस थांबायला लागणार होतं. त्यांच्याशी फोनवर बोलूया का, असाही विचार तिच्या डोक्यात येउन गेला. पण आत्ता या क्षणी तरी ती ते नक्कीच करणार नव्हती. या विषयावर आत्ता तरी ती कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. उद्या सकाळी बघू, वाटलं तर बाबांशी बोलू, असा विचार करून तिने लाईट्स बंद केले आणि ती बेडवर जाऊन पडली. पुढच्याच मिनिटाला तिला शांत झोप लागलेली होती.

——————————————–

थोड्या वेळाने ईशा आत आली. बराच वेळ भांडून शेवटी ती आणि अनि कोणता मुव्ही बघायचा त्या निर्णयावर आलेले होते. तिला मारामारी, फायटिंग बघायला आवडायची नाही. पण सस्पेन्स, थ्रिल बघायला मात्र आवडायचं. रोमॅंटिक मुव्हीज पण आवडायचे. अनिला मात्र फायटिंग, एक्शन, कॉमेडी असलंच बघायचं असायचं. शेवटी आधी ईशाच्या आवडीचा एक आणि नंतर अनिच्या आवडीचा एक मुव्ही बघायचा असं त्यांचं ठरलं. टीव्ही च्या वेगवेगळ्या चॅनेल्सवर वेगवेगळे मुव्हीज होतेच.

त्यांनी मुव्हीला सुरुवात केली आणि ईशाला आठवलं की तिचा मोबाईल आत सायलीच्या बेडरूम मध्ये राहिला होता. मोबाईल घ्यायला ती आत आली. सायली गाढ झोपलेली होती. लाईट लावले की ती लगेच जागी होईल, हे ईशाला माहित होतं. म्हणून ती तशी अंधारात उभी राहून मोबाईल कुठे ठेवलाय ते आठवण्याचा प्रयत्न करायला लागली. एक मिनिटानंतर तिला आठवलं, हो बरोबर….सायलीच्या कॉम्प्युटर टेबलवर….ती आणखी आत आली आणि कॉम्प्युटर टेबलवर हात फिरवून अंदाज घ्यायला लागली. टेबलवर ठेवलेलं काहीतरी तेवढ्यात खाली पडलं आणि सायली जागी झाली.

ईशी ? काय करतेयस तू इकडे?”

 

अगं माझा मोबाईल राहिला आत. तोच घ्यायला आले होते.” ईशा

 

मग लाईट लावायचास ना…” सायली एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळता वळता म्हणाली.

 

तू जागी होशील म्हणून नाही लावला. ए पण सायले, ऐक ना…..” ईशाला तेवढ्यात तिचा मोबाईल हाताला लागला.

सायली तोपर्यंत पुन्हा झोपली होती.

ए सायले, ऐक ना…” ईशा तिला हलवत म्हणाली

 

काय आहे गंझोपुदेत ना…” सायली वैतागली

 

अगं आता अनायसे जागी झाली आहेस तर चल ना मुव्ही बघायला….प्लीज प्लीजआपण किती दिवस असं जागून वगैरे मुव्ही नाही बघितलाय. ” ईशा

 

नो वे, जा तू , मला झोपायचंयआणि आहेस ना तू अजून दोनतीन दिवसउद्या बघूनक्की जा आताप्लीज….”

 

ओके…” ईशा हिरमुसली ..” तूच बघ उद्या मी असं तुला जायला सांगेन थांब …”

पाठोपाठ दार लावल्याचा आवाज आला.

————————————-

एक मिनिटानंतर सायलीला जाग आली. ईशा अजूनही खोलीत होती बहुतेक. काही बोलत नव्हती, पण खोलीत ती असल्यासारखं वाटत होतं. अर्धवट झोपेत सायलीने ईशा चिडून काहीतरी बोलल्याचं ऐकलं होतं. तिला हसायला आलं.

ईशी, ए ईशी….” सायलीने तिला हाक मारली.

पण ईशाचं काहीच उत्तर नव्हतं.

अगं जा ना तू, मुव्ही बघताय ना तुम्ही..?” सायली

तरीही तिचं काहीच उत्तर नव्हतं.

झोपेमुळे सायलीचे डोळे मिटत होते. नीटसा अर्थबोध होत नव्हता. पण ईशा खोलीत आहे एवढं मात्र तिला कळत होतं.

अगं एवढी काय चिडतेस? खूप झोप येतेय गं मलाडोकं जड झालंय. प्लीज, उद्या रात्री नक्की बघू मुव्ही आपण. जा तू आत्ता…..अनि थांबला असेल ना

ईशाकडून उत्तर तर काहीच नव्हतं फक्त काहीतरी सळसळल्यासारखा, काहीतरी धुस्फुस्ल्यासारखा आवाज आला.

मॅडम फारच रागावल्यात.”

डोक्यात एका बाजूला विचार येत होते आणि मग नंतर ते विरूनही जात होते. सायलीला पुन्हा शांत झोप लागली.

पण काहीच मिनिटं….पुन्हा कसल्यातरी चाहूलीने सायलीला जाग आली. ती दुसऱ्या कुशीवर वळली आणि तिने डोळे उघडले. ईशा अजूनही खोलीतच होती बहुतेक. पण ती काय करत होती नक्की? ते पण अंधारात? ती दिसत नव्हती पण ती आहे, हे सायलीला जाणवत होतं. ती पुन्हा इकडून तिकडे वळली आणि एकदम दचकली. ईशा तिच्या समोरच बसली होती. तिच्या बेडवरच. तिच्या पायाशी. अंधारच होता सगळीकडे, पण ईशा असल्याचं मात्र कळत होतं. सायलीला एकदम गरगरल्यासारखं वाटायला लागलं. ईशा अशी विचित्र का वागतेय, असा प्रश्न एकीकडे पडत होता, पण त्यावर विचार करता येत नव्हता. कदाचित खूपच झोप असेल माझ्या डोळ्यांवर, सायलीला वाटून गेलं. ईशा पाठमोरी बसली होती. तिचे केस खूप लांब असल्यासारखे वाटत होते. पणपण? ईशाचे केस तर एवढे मोठे नाहीयेत….मग..मगअसं का दिसतंय? जाऊदेत आपल्याला खूप झोप आलीये, आपण झोपूनच जाऊया. ईशाला बसुदेत नाहीतर जायचं असेल तर जाऊदेत…..

तिने पुन्हा डोळे मिटून घेतले आणि झोपता झोपता ती ईशाला म्हणाली,

ईशी, तूला इथे थांबायचं तर थांब. प्लीज जरा खिडकी उघडी राहिली आहे का बघ ना. थंडी वाजतेय. किंवा जरा एसी बंद कर….”

पुढच्याच मिनिटाला खिडकी बंद झाल्याचा आवाज आला. ही रागावलीये तरी ऐकतेय माझं. पण एवढा उकाडा आहे सध्या, खिडकी उघडी ठेवली म्हणून गार हवा थोडीच आत येणार आहे? नक्कीच एसीच जास्त असणार, म्हणून थंडी वाजत होती, सायलीचं एक मन अजून आतल्या आत बोलत होतं.

पण ईशा अशी का वागतेय? जरा वेगळीच वाटतेय…..”

ईशा, ईशा, ईशा ..सायलीचे सगळे विचार फक्त ईशा भोवतीच केंद्रित होत होते आता.

ईशा आता येतेय माझ्याजवळ,” सायलीचं एक मन तिला सांगत होतं, “कदाचित झोप आली असणार तिलाही….”

 

ईशा, झोप आली असेल तर झोप इथे माझ्या बाजूला….”

————————————————

बाहेर अनि सोफ्यावर पाय पसरून बसला होता. मुव्हीमध्ये कमर्शिअल ब्रेक सुरु झाला तसा तो आळस देत उठून बसला.

ही ईशा करतेय काय आतमध्ये एवढा वेळ ?” त्याला कळत नव्हतं.

ओ मॅडम, झाली की नाही कॉफी? किती वेळ झाला, आक्ख्या गावाला द्यायला कॉफी करतेयस की काय?”

तो आत किचनमध्ये आला. ईशा कॉफी कपमध्ये ओततच होती.

जरा धीर धरायचा असतो भाऊराया, ” ईशा नाटकीपणे म्हणाली. “एखादी गोष्ट चांगली व्हायला हवी असेल तर थोडा वेळ हा द्यावाच लागतो

तिने त्याच्या हातात कप दिला आणि दोघे परत बाहेर आले.

तुझ्या आवडीचा सस्पेन्स, थ्रिलर मुव्ही लावला तर तू घाबरून आत कॉफी करायला गेलीस? ” अनि सोफ्यावर बसता बसता म्हणाला. “आणि तू गेलीस, म्हणून मी तो बोरिंग मुव्ही बंद करून माझ्या आवडीचा एक दुसरा मुव्ही लावलाय….”

 

काय ? तुला कोणी सांगितलेलं हा शहाणपणा करायला? आपलं ठरलं होतं ना अनि आधी तो मुव्ही बघायचा आणि मग तू म्हणशील तो? धिस इज चीटिंग. ” ईशा वैतागली.

 

अगं तू हा बघ तरी. इंग्लिश मुव्ही आहे, एक्शनपॅक्डयु विल लाईक इट….तुझ्या त्या सस्पेन्स मध्ये काही दम नव्हता…”

 

जाऊदेत तसंही, सायली नाहीये तर मला एकूणच बोअर झालंय. ती असती तर आम्ही मध्ये मध्ये बडबड तरी केली असती. तू तर त्या जाहिराती पण गप्प बसून बघतोस….लाव काय लावायचं ते….” ईशा खरंच कंटाळली होती.

कपभर कॉफी पिऊनसुद्धा ती अनिचा तो एक्शन पॅक्डमुव्ही बघताना इतकी कंटाळली की तिथे सोफ्यावरच ती आडवी झाली आणि पुढच्या अर्ध्या तासात गाढ झोपूनही गेली. झोपेत मात्र तिला कसलीकसली स्वप्न पडत होती. खरं तर आज दिवसभरात काय काय घडलं तेच थोडं थोडं दिसत होतं तिला. सकाळी सायलीच्या ऑफिसमध्ये भेटलेला सिद्धार्थ, सुजयची बिल्डींग, ती आजी, सुजयचे आईबाबा, सुजय. सुजयचे आईबाबा आज घरी असते तर? छे ते तर यु.एसला गेल्याचं कळलंय आपल्याला. पण अजून बरंच काही कळायचंय. झोपेत ईशाच्या मनात असे उलटसुलट विचार येत होते. कदाचित तिला आधी मनात येउन गेलेलेच हे विचार असावेत पण आता झोपेत तिचं मन पुन्हा त्याच गोष्टींवर विचार करत होतं. सुजयबद्दल आणखी बराच शोध घ्यायला हवा. सिद्धार्थला पण भेटायला हवं. त्याला सुजायचा संशय का आला ते विचारायला हवं. पण मग तो पण विचारेल ना की तुम्हाला का संशय आला त्याचा. मग काय सांगायचं? त्याला सांगितलं की सायली जेव्हा जेव्हा सुजयला भेटते, तेव्हा तीयेते तर तो हसत सुटेल आपल्यावर, तोच काय कोणालाही खरं वाटणार नाही….पण आपल्याला माहित आहे ना, ‘तीयेते,,……’तीच्याबद्दल आपण कधीच काहीच का विचार केला नाही? कोण असेल तीनक्की? सुजयचा आणि तिचा काय संबंध असेल नक्की? आज पण सुजय भेटला म्हणजे आजपण ….???

ईशाने डोळे उघडले. अनिच्या त्या मुव्ही मधले कोणतेच आवाज आता तिच्या कानात शिरत नव्हते. तिच्या मनात झोपेत आत्ता जो विचार आला होता, त्याने ती खडबडून जागी झाली होती.

आपण कसं काय विसरलो? सायलीच्या पण कसं नाही लक्षात आलं? आज आपण सुजयला भेटलो. सायली दोन वेळा भेटली त्याला आजच्या दिवसात. म्हम्हणजे आज खरंच तीपुन्हा येईल ? हो, कदाचित येईलच. मागेसुद्धा सुजयला सायली भेटली त्या दिवशी तीआली होतीच. आपण विसरायला नको होतं …. सायलीसायली तिकडे एकटी आहे तिच्या खोलीत, बराच वेळ झाला. ती दहा वाजता झोपायला गेली होती. आता साडेबारापाऊण वाजत आलेत. मगाशी मी मोबाईल घायला गेले होते तेव्हा तर तसं काही वाटलं नाही. पण आता त्यालापण दोन तास होऊन गेलेत. सायली एकटी आहे. मला जायला हवं. तिला एकटीला सोडायला नको होतं…..”

ती ताडकन उठली तसा अनिकेत दचकला.

काय गं, अशी काय उभी राहिलीस एकदम? झोपली होतीस ना? स्वप्न पडलं की काय?”

 

मला झोप येतेय. मी सायलीच्या खोलीत जाते झोपायला. गुड नाईट….”

ईशा बोलताबोलताच आत आली सुद्धा. पॅस्सेजमध्ये पूर्ण अंधारच होता. तिथेच ती क्षणभर थबकली. “सायली ठीक असेल ना?” हा विचार तिला पोखरून टाकत होता. तिने आधी पॅस्सेजमधला दिवा लावला. आणि मग ती सायलीच्या खोलीपाशी आली. दार उघडणार तेवढ्यात आतून आवाज ऐकू आला, सायलीचा.

ईशा तू काय बोलतेयस? काय अर्थ आहे? मला काहीच कळत नाहीये…..तू अजून रागावली आहेस का? ईशा, ए ईशा?”

बाहेर उभी असलेली ईशा हे ऐकून भीतीने जागीच खिळून राहिली.

सायली झोपेत बडबड करतेय, की खरंच समोर कुणी आहे तिच्या? ती ईशाअसं का म्हणाली आत्ता?”

मनात असे विचार येत असतानाच तिने दार उघडलं सुद्धा. आत खोली खूप विचित्रपणे थंड झालेली होती.

म्हणजे काय ईशा? असं काय बोलतेयस तू?”

सायलीचा आवाज त्या अंधारात आणि त्या शांततेत खूप भयाण वाटत होता.

ईशाने आत येउन लाईट लावले. सगळ्या खोलीभर नजर फिरवली. सायली कुठेच दिसत नव्हती. मग तिचा आवाज कुठून येत होता? आणि ती नक्की कुणाशी बोलत होती?

क्रमशः

4 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 16)

 1. Shradha K
  May 10, 2016

  pudhacha bhaag lavkar taka pls.

  Like

  • rutusara
   May 10, 2016

   lavkarat lavkar tatnyacha prayatna aahech….dhanyavaad !! 🙂

   Like

 2. Archana
  May 12, 2016

  Please post the next part as early as possible.

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on April 30, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: