अज्ञाताची चाहूल : (भाग : 19)

“कळलंय? काय कळलंय तुला?”

ईशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव एकत्र दिसत होते.

तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं इंडीकेशन आलं. ‘टू, टू…टू,टू ‘

“आत्ता एवढ्या रात्री कुणाचा मेसेज? बघ गं ईशा जरा…..”

तेवढ्यात अजून एक मेसेज आला, ‘टू टू, टू,टू ‘

“बघते. पण आधी मला तुला काय कळलंय ते सांग…..”

*********** भाग १८ पासून पुढे चालू *************

भाग १८ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-t3

हम्म….बघितले मेसेजेस ….आता सांग..काय कळलंय तुला ?” ईशा

 

कोणाचा मेसेज आहे एवढ्या रात्री?” सायली

 

दोघे प्रेमवीर तुमचे…” ईशा पलंगावर बसत म्हणाली.

 

काय ? म्हणजे? बघू फोन दे…” सायली तिच्याजवळ येत म्हणाली

मेसेज वाचून झाल्यावर फोन बाजूला ठेवत सायली म्हणाली,

प्रेमवीर वगैरे काय गं, काय तोंडाला येईल ते बोलतेयस?”

 

नाहीयेत का? “ईशा तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.

 

कोण? सुजय आणि तो सिद्धार्थ?” सायली तिरकस स्वरात म्हणाली.

 

सुजय कशासाठी करतोय हे सगळं? तुझ्याशी लग्न करण्यासाठीच ना….तुझ्या प्रेमात आकंठ बुडालेला असणार आहे तोनक्कीचआणि….”

 

ईशा बास ….गप्प बस…..”सायली तिच्यावर जोरात ओरडलीच.

ईशाच्या तोंडून सुजय तुझ्या प्रेमातवगैरे ऐकून सायलीला कसंतरीच झालं. खरं तर तिला सहनच झालं नाही. ईशाने त्याचं नाव आपल्या नावाशी जोडलं तर आपल्याला एवढा त्रास झाला. काही दिवसांपूर्वी आयुष्यभरासाठी नातं जोडण्यासाठी आपण ह्याला होकार दिला आणि आज आपल्या नावाबरोबर ह्याचं नाव नुसतं गम्मत म्हणून ऐकायलाही सहन होत नाहीये, तिच्या मनात येउन गेलं.

ओके, ओकेबरं बाई…..सिद्धार्थ बद्दल बोलूया का?”

ईशाला तिच्या रागाचं कारण कळत होतं. पण तिला सिद्धार्थबद्दल सायलीशी बोलायचंच होतं.

त्याच्याबद्दल काय आता? ईशा उगीच काहीतरी बडबड करत बसू नकोस हासायली वैतागली होती.

 

मी त्याला प्रेमवीर का म्हटलं माहीत आहे का तुला?” ईशा

 

ईशा स्टॉप इट….आपण दुसरं काही बोलूया का प्लीज?”

सायलीला अंदाज येत होता ईशाला तिच्याशी काय बोलायचं होतं त्याचा. सिद्धार्थला आपण आवडतो हे तिलाही माहीत होतं. पण आत्ता त्यावर बोलण्यात तिला वेळ वाया घालवायचा नव्हता. तिला खूप महत्वाचं काहीतरी कळलं होतं आणि ते ईशाशी बोलणं महत्वाचं होतं.

अगं पण….”ईशा

 

ईशा, त्याला मी आवडते असंच सांगायचं आहे ना तुला? मला अंदाज आहे त्याचागीता म्हणाली होती तसं….” सायलीनेच शेवटी हा विषय संपवायचं ठरवलं.

 

नुसती आवडत नाहीस, तो प्रेमात पडलाय तुझ्या. खूप सिरियस आहे तो तुझ्या बाबतीत….”ईशा

 

तुला काय माहीत?” सायलीने ईशाकडे पाठ फिरवली.

ईशाचं बोलणं ऐकून सायलीला उगीच लाजल्यासारखं झालं. आपल्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव ईशाला दिसू नयेत म्हणून सायलीने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला होता. ईशाच्या मात्र ते लक्षात नाही आलं.

काय माहीत म्हणजे? त्याच्याकडे बघितल्यावरच कळतं. तो बाकीच्यांकडे बघताना, बोलताना नॉर्मल असतो पण तुझ्याकडे बघताना मात्र तो वेगळाच वाटतो. तुझ्याशी बोलत असला की तो स्वतःमध्येच हरवल्यासारखा वाटतो. असं वाटतं की त्याला वेगळंच काहीतरी बोलायचंय तुझ्याशी पण सगळ्यांसमोर तो वेगळं बोलतो. आज पण तू कॉफी घेत होतीस तेव्हा खाली बघत होतीस पण तो तुझ्याकडेच बघत होता. त्याची नजरच सांगते अगं….”

 

मला नाही तसं वाटत …” सायलीला विषय वाढवायचा नव्हता.

 

मला माहीत आहे, त्याला तू आवडतेस हे तुला कळल्यावर तू जरा लांबच राहिली असणार त्याच्यापासून. जेवढ्यास तेवढं बोलत असणार, म्हणून तुला हे कळलं नसेल. परवा तुझ्या ऑफिसमध्ये सुजयवर वॉच ठेवत होता ना तो, तेव्हा पटकन काय बोलून गेला माहितीये, समोर सायली असल्यावर हे सगळं प्रकरण मी असंच सोडून देणं शक्यच नाही, असं म्हणाला. तो खरंच प्रेमात पडलाय तुझ्या सायले…..”

सायलीची तिच्याकडे पाठ होती म्हणून ईशाला तिच्या गालावर उमटलेलं मंदसं लाजरं हसू आणि चढलेली गुलाबी छटा दिसली नाही. सायलीच्याही समोर आरसा नव्हता त्यामुळे तिलाही तिच्याही नकळत चेहऱ्यावर उमटलेले भाव कळलेच नाहीत. ईशा जे बोलली होती, ते सायलीला माहीत नव्हतं का? पण तरीही आज ईशाच्या तोंडून हे सगळं ऐकून तिला नक्की काय झालं होतं? ईशा जे बोलत होती, तेच सारखं सारखं ऐकत रहावसं का वाटत होतं? ह्या नवीन जाणीवेत ती तिच्याही नकळत क्षणभर रमून गेली. इतकी की, दोन मिनिटांपूर्वी सुजय तिच्या प्रेमात पडलाय हे ऐकून तिला राग आला होता आणि आता हेच सिद्धार्थच्या बाबतीत ऐकून तिची प्रतिक्रिया एवढी वेगळी होती, हेसुद्धा तिला कळलं नाही.

 

समोर पडलेलं ते लॉकेट ईशाच्या नजरेला पडलं आणि ती सिद्धार्थबद्दल अजून काही बोलायचं विसरूनच गेली. तिने जाऊन ते लॉकेट उचललं.

बऱ्यापैकी जड आहे हे सायले….कोणाचं असेल हे?”

 

? काय…?”

ईशाने अचानक विषय बदलल्यामुळे आणि संदर्भ न लागल्यामुळे सायली गोंधळली. ईशाच्या हातात ते लॉकेट बघून ती आधीच्या सगळ्या भावनांतून बाहेर आली.

अगं हेच तर सगळं सांगायचंय तुलापण तू नको ते विषय काढत बसलीस आत्ता….” सायली

 

काय सांगायचंय ? लवकर सांग….” ईशा

 

हे लॉकेट कुठेतरी बघितल्यासारखं नाही वाटत तुला ?” सायली

 

बघितल्यासार…..नाही….मला नाही आठवत….सायले कोडी काय घालतेयस आत्ता या वेळेला….सांग ना लवकर …” ईशा

 

मी पण शुअर नाहीये. बट इफ आय एम नॉट रॉंग, मी …….यस….मी तिथेच बघितलंय……ईशा एक मिनिट थांब…” सायली

———————————————-

सायलीला मेसेज पाठवल्यानंतर सुजय एक मिनिटभर शांत बसला होता. सायलीचा रिप्लायची वाट बघत होता. थोड्या वेळाने त्याने घड्याळात बघितलं आणि तो स्वतःशीच हसला.

बरोबर आहेतीन वाजत आलेत रात्रीचेसायलीने बघितला तरी असेल का मेसेज? बघितला असेल तरी ती झोपेत असणार..आत्ता तिचा रिप्लाय कसा येईल? आपणही झोपावं आताझोप लागेल का पण? किती छान वाटतंय आज. सायलीचं प्रोफाईल त्या विवाह मंडळात बघितल्यापासून प्रत्येक दिवस नुसता सगळं प्लानिंग करण्यात गेला, विचार करण्यात, टेन्शन घेण्यात. पण आता थोडेच दिवस. माझं मन सांगतंय सायली लवकरात लवकर लग्न करण्यासाठी तयार होणार. आता कुठलाच धोका वाटत नाहीये. फक्त लग्न होईपर्यंत सायलीला कमीत कमी वेळा भेटायला हवं. आणि फार हुरळून जायला नको. आता माझ्याबद्दल सायलीला सांगू शकतील असे फार कमी लोक आहेत. कौस्तुभची ट्रान्स्फर झाली हे एक बरं झालं. सुंठीवाचून खोकला गेला. माझे सो कॉल्ड आईबाबा, त्यांची तर इथे गरज पडेलच. राहता राहिले ते गोष्टीतली माझी मावशी आणि तिचा गोष्टीतला नवरा. त्या मावशीबाई तर त्यांचे पैसे घेऊन लगेच त्यांच्या गावाला रवाना झाल्या होत्या. पण ते काका इथेच आहेत अजून. त्यांचं घर वगैरे तर सायलीच्या घराजवळ किंवा ऑफिसजवळ नाहीये, त्यामुळे त्यांना कुणी इथे बघेल असं नाही. पण उगीच रिस्क कशाला घ्यायची? थोडेच दिवसांचा प्रश्न आहे, त्यांना उद्याच इथून जायला सांगावं. लग्नाच्या वेळेला परत येतील. आणखी एक माणूस आहे अर्थातच हे सगळं माहित असलेला, ..पण त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. ठरलं मग, उद्या सकाळी लवकरच त्या काकांच्या घरी जायला हवं आणि नंतर सायलीला फोन करून तिच्याशी बोलून जरा अंदाज घ्यायचा. “

एक आळस देऊन सुजयने बेडजवळचा लाईट बंद केला. पुढच्या दहा मिनिटातच त्याला शांत झोप लागली.

———————————————-

कुठे दिसतंय ते लॉकेट? अजून तरी नाहीये कुठल्याच फोटोत…”

ईशाचा धीर सुटत चालला होता. सायली समोर लॅपटॉप घेऊन बसली होती आणि त्या दोघी पुन्हा एकदा सुजयच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये घुसल्या होत्या.

जरा पेशन्स ठेव नाबघतेय ना मीमला नक्की आठवतंय..एवढ्या वेळा हे फोटोज बघितलेतनक्की ते मी आधी ह्या फोटोज मध्ये बघितलंय

सायली तिच्यावर वैतागली तशी ईशा गप्प बसली. आणखी दहा मिनिटं गेली. तोपर्यंत सायलीचे आणखी वीस ते पंचवीस फोटोज बघून झाले होते.

आणखी दोन, तीन……. सुजय मित्रांबरोबर ट्रेकिंग करताना, कुठल्याशा कॉन्फरन्सच्या वेळी काढलेला फोटो, कुठल्यातरी पार्टीत काढलेला फोटो, कुठल्यातरी गावात एका देवळाच्या पुढे काढलेला फोटो, नदीचा काठ आणि आजूबाजूचा शांत परिसर,…..इथे सायली थांबली. पुन्हा मागच्या फोटोकडे वळली. देवळापुढे काढलेला फोटो. बास, तिचं काम झालं होतं.

ईशी, लवकर ये इकडे…”

ईशा कंटाळून झोपायला गेली होती ती उठली.

काय झालं?”

 

इकडे ये आधी. हा फोटो बघ. ह्यात सुजयच्या गळ्यात हे लॉकेट आहे बघ.” सायली

 

बघू….” ईशा धावतच आली.

 

माय गॉड, सायले खरंच हेच लॉकेट आहे. ” ईशा आनंदाने किंचाळलीच. “तुझ्या कसं काय इतकं लक्षात होतं?”

 

किती वेळा बघितले होते हे फोटोज आपण ईशा? कुठल्यातरी फोटोत हे बघितलंय असं मला ते लॉकेट पहिल्यापासूनच वाटत होतं. मग विचार केला की सध्या एवढ्यात तरी सुजयचेच फोटो बघितलेत आपण, त्याच्या फेसबुकवरचे. म्हणून ते फोटोज उघडून बसले मी…” सायली पुन्हा त्या फोटोकडे निरखून बघत होती.

सुजय त्या फोटोत ज्या मंदिराच्या पुढे उभा होता, त्या मंदिरामध्ये काहीतरी होतं. कसलातरी बोर्ड. अर्थात ते नीट दिसत नव्हतं. पण तिथे काहीतरी लिहिलेलं दिसत होतं एवढं नक्की. सुजयने मंदिराच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा फोटो काढला होता, म्हणजे कोणाकडून तरी काढून घेतला होता. त्यामुळे त्या फोटोत सुजय आणि त्याच्या मागे ते मंदिर एवढंच होतं. मंदिराच्या आतल्या भिंतींवर देवाचे फोटो लावलेले होते, ते ही अस्पष्ट दिसत होते. त्या फोटोंच्या खाली एक बोर्ड होता.

पण हे लॉकेट सुजयचं असेल तर ते इथे आलं कसं? ” ईशा

 

एक मिनिट ईशा..”

ईशा फोटोकडे बघत होती तेवढ्यात सायलीने लॅपटॉप स्वतःकडे ओढून घेतला.

तिने तो फोटो लॅपटॉपवर सेव्ह केला आणि तिथून पुन्हा ओपन केला. आता तो फोटो झूम इन करणं शक्य होतं. पण छे, झूम करूनही काहीच कळत नव्हतं. फोटोमध्ये तो बोर्ड अंधारात गेला होता, त्याच्यावर बाजूच्या खांबाची सावली पडली होती, त्यामुळे झूम होऊनही काहीच कळत नव्हतं.

काय करतेयस ? सुजयचा फोटो कशाला सेव्ह केलायस?” ईशा

 

“बघतेय जरा, काही करता येतंय का…काही इमेज प्रोसेसिंग टेक्निक वर्क होतंय का बघुया…..”

सायलीने काहीतरी खटपट करून ती इमेज थोडी आणखी क्लिअर केली, ब्राईटनेस ही थोडा वाढवला. आता त्यावरची अक्षरं अस्पष्टशी दिसायला लागली.

काय बघतेयस? फोटोत काही अजून दिसतंय का? ” ईशासुद्धा फोटो निरखून बघायला लागली.

 

हे बघ. त्या देवळात एक बोर्ड आहे. फळा. त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. तेच वाचायचा प्रयत्न करतेय मी. ”

 

नीट दिसत नाहीये गंपहिला शब्द श्री आहे, ते कळतंय, दुसरा शब्द दू आहे की डू आहे….नाही कळत….हा भाग अंधारात गेलाय..त्याच्या पुढचं जरासं दिसतंय, इथे सावली नाही पडलीयेनंतर…. ‘माताअसं असावं आणि मग म....मंदिर….कोणत्यातरी देवीचं मंदिर आहे, सायले.”

 

अगं श्री दुर्गा माता मंदिर असं असणार ते….” सायली

 

आणि खाली काय आहे? श्री ….” ईशा

 

इथलं काहीच कळत नाहीये …..राह मंदिर असं काहीतरी आहे हे…..” सायली

 

राह वरून एंड होणारं कुठलंच देवाचं नाव नाहीये पण….राम असेल ईशा

 

नाही गं , राह च दिसतंय ….एक मिनिट ह्या दुसऱ्या लाईन मध्ये मंदिर च्या पुढे अजून काहीतरी लिहिलंय, ‘की आहे, नीट दिसत नाहीये…”

डोळ्यांवर ताण येईपर्यंत सायली त्या अक्षरांकडे पाहत होती. त्या अक्षरांचा अर्थ लागल्यावर त्यांच्या शोधाला एक वेगळीच दिशा मिळणार होती, हे तिला अजून ठावूक नव्हतं.

———————————————-

सायलीला मेसेज पाठवून झाल्यावर सिद्धार्थ खरं तर लगेच झोपण्यासाठी पलंगावर आडवा पडला. पण झोपच येईना. सारखे सायलीचे शब्द कानात ऐकू येत होते. सकाळी ती त्याच्यावर रागावून निघून गेली ते सारखं सारखं आठवायला लागलं त्याला. खरं तर ती रागवण्यापेक्षा दुखावली गेली होती, हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण खरं तर तिला दुखावण्यासारखं तो काहीच बोलला नव्हता. तिच्या बोलण्यावर जोरात हसला होता फक्त. ते तिने एवढं मनाला का लावून घेतलं असेल, त्याला कळत नव्हतं.

माणसं दुखावली जातात जेव्हा अपेक्षाभंग होतो, किंवा अपमान होतो. तिचा अपमान तर त्याने नक्कीच केला नव्हता. म्हणजे, माझ्या हसण्यामुळे सायलीचा अपेक्षाभंग झालाय का? म्हणजे तिची माझ्याकडून काहीतरी अपेक्षा होती, जी मला कळलीच नाही किंवा जी मी पूर्ण केली नाही, म्हणून ती दुखावली गेली असणार…..

विचार करता करता सिद्धार्थ उठून बसला. सायलीच्या नाराजीचं कारण आता त्याच्या लक्षात येत होतं. तिचं म्हणणं तो समजून घेईल, त्यावर निदान विचार करेल अशी तिची अपेक्षा असणार आणि सिद्धार्थ तिच्या बोलण्यावर हसला होता, त्यामुळे ती दुखावली गेली होती.

ओह आय एम सो सॉरी सायली, मला कळलंच नाही. मी तुला साथ द्यायलाच आलो होतो पण तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. तू तरी अशी का वागलीस? असं फाडफाड बोलून, डोळ्यात पाणी आणून निघून गेलीस? निदान एक संधी तरी द्यायचीस ना मला…..तू अगदी बरोबर बोललीस, तुझ्यासारखी मुलगी ते सगळं म्हणतेय, म्हणून तरी मी विश्वास ठेवायला हवा होता तुझ्यावरआता झालं ते झालंआता या सगळ्यात मी शेवटपर्यंत तुझी साथ देणार…”

तो उठून गॅलरीमध्ये आला आणि त्याने फेऱ्या मारायला सुरुवात केली.

सायलीच्या डायरीत वाचलेलं सगळं त्याने आठवून बघायचं ठरवलं. सायली आणि ईशाला आत्तापर्यंत काय काय कळलंय, इथपर्यंत त्यांचं बोलणं झालंच नव्हतं. सायलीने ते सगळं सांगायला सुरुवात केली आणि सिद्धार्थला ते फारच हास्यास्पद वाटलं होतं. आता तो पुन्हा ते सगळं आठवून त्याच्यावर विचार करायला लागला. सायलीने सांगितलं होतं ते सगळं तसंच्या तसं आठवून त्याने डोळ्यांसमोर आणलं. छे, पण त्याला काही केल्या असं होऊ शकतं, हे पटत नव्हतं. कदाचित म्हणूनच सगळं सांगण्याआधी सायलीने त्याला पॅरानॉर्मल स्टडीजबद्दलचं त्याचं मत विचारलं होतं. कदाचित कुणीतरी ठरवून हे सगळं करत असेल असं त्याच्या मनात येउन गेलं. पण, सायली शेवटी म्हणाली होती की ती जी कुणी होती ती खिडकीतून बाहेर गेली. हे कसं शक्य आहे? सायली आणि ईशाने हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. मग हे सगळं काय असेल?

विचार करून करून तो थकला. पण हे कोडं काही त्याला सुटलं नाही. उद्या सायलीशी जाऊन बोलायचं, तिला सगळ्या गैरसमजुतीबद्दल सॉरी म्हणायचं आणि तिच्या शोधात तिला पुढे साथ द्यायची, असं मनाशी ठरवून तो पुन्हा आत गेला.

———————————————-

ईशा, आपल्या एका कोड्याचं उत्तर मिळालं..” सायली जोरात किंचाळली.

 

म्हणजे? काय ? कुठलं कोडं? कशाचं उत्तर?”

 

तो दुसरा शब्द ….क ट न ई

 
काय अर्थ आहे त्याचा? ” ईशा

 

अगं अर्थ वगैरे माहित नाही, पण हे कुठल्यातरी ठिकाणाचं नाव आहे. कटनी. हे बघ देवळातल्या बोर्डवर दिसतंय. क नीट कळत नव्हता. पण ट आणि नी तर दिसतायत.” सायली

 

बघू…”

ईशाने त्या झूम केलेल्या फोटोकडे बघितलं. ती अक्षरं लावायला तिलाही जरासा वेळ लागलाच. पण हो, सायली म्हणत होती ते बरोबर होतं. तो शब्द कटनी असाच होता.

तीच्या कडून ऐकलेल्या दुसऱ्या शब्दाचाही अर्थ त्यांना कळलेला होता. फक्त आता कळायचे होते ते त्यात दडलेलं गुपित, लपलेले अर्थ आणि संदर्भ.

———————————————-

श्री दुर्गा माता मन्दिर

श्री …….राह मन्दिर , कटनी

यह मन्दिर……प्राचीन …………भगवान ….
देवी ……….राह मन्दिर ……
आशीर्वाद ……….रहे….

सायली तिच्या डायरीत बोर्डवर वाचता आलेलं आणि थोडाफार अर्थ लागलेलं सगळं लिहून ठेवत होती तेव्हा या वेळी ईशा लॅपटॉप घेऊन बसली होती.

काय करतेयस आता?” सायली

 

सायले, हे बघ….हे कटनी असं ठिकाण भारतात कुठे आहे ते गुगल केलं मी. हे बघ, मध्य प्रदेशात कटनी ह्या नावाचा जिल्हाच आहे अगं. त्याला मुद्वारा असं पण म्हणतात. म्हणजे सुजय मध्य प्रदेशातल्या कटनी गावात गेला होता कधीतरी आणि तेव्हा तो फोटो काढलाय. सायले, फोटो कधी अपलोड केला त्याची डेट असेल ना तिथे दिसत?” ईशा

 

डेट आहे पण ती आत्ता एक-दीड महिन्यांपूर्वीची आहे….फार जुनी नाहीये…”सायली

 

म्हणजे तेव्हा सुजय तिथे गेला होता?” ईशा

 

हे बघ, असंच नाही म्हणू शकत आपण. ती फोटो अपलोड केल्याची डेट आहे. खरा फोटो त्याधीही काढला असू शकतो ना….” सायली

 

हम्म….बरोबर आहे. पण सायले, ह्याचा अर्थ आपल्याला आपल्या घरात मिळालेल्या त्या लॉकेटचा, सुजयचा आणि कटनी ह्या ठिकाणाचा काहीतरी संबंध आहे. नक्कीच….” ईशा

 

अर्थातच. पण त्याबरोबर तीचा आणि ती जी कुणी माही आहे तिचाही. कारण माही आणि कटनी ह्या दोन गोष्टी तीकडून कळल्यात आपल्याला.” सायली

 

बापरेहे खूप कॉम्प्लेक्स होत चाललंय….पण आता पुढे शोध कसा घेणार? त्या कटनीला जावं लागेल ना….” ईशा

 

हो ना, आणि मध्य प्रदेशात वगैरे असं एकदम कसं जायचं उठून? आईबाबांना तर ह्यातलं अजून काहीच माहित नाही. थांब, एवढा विचार करण्यापेक्षा सध्या आपण सुजयच्या त्या मावशीच्या नवऱ्याला गाठूया. त्यांच्याकडून काय कळतंय बघू. आईबाबा माई आजीला घेऊन बहुतेक उद्या येतीलच. बाबांना आता सगळं सांगायलाच हवं….” सायली

 

चालेल. उद्या सकाळीच जाऊ त्या भाजीवाल्यांना भेटायला. सायले, मला तर हे सगळं खूप थ्रिलिंग वाटायला लागलंय. असं वाटतंय की आपण नाही मी नाही….तू….तू सिनेमाची हिरोईन, मी…..ओकेमी साईडहिरोईन ह्यापेक्षा खालचा रोल मी नाही घेऊ शकत हा….हा आणि आपण दोघी एकदम हुशार, ब्युटी विथ ब्रेन्स म्हणतात तशा, आपण न घाबरता, चिकाटीने, एकदम धडाडीने आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गूढ गोष्टींचा पाठलाग करतो, एकामागोमाग एक कोडी सोडवत जातो….आणि ह्या सगळ्यामध्ये व्हिलन अर्थातच तुझा सुजय….आणि सिद्धार्थ….सिद्धार्थ कोण गं सायले?”

मिस्कीलीने हसत ईशाने मागे वळून बघितलं पण सायली समोर बेडवर झोपायला पण गेली होती.

झाली तुझी फालतू बडबड सुरु परत? मला आता झोप आलीये..तुला काय सिनेमाची स्टोरी लिहायची आहे, ती तू लिहित बस हा….गुड नाईट….”

सायली गालातल्या गालात हसत दुसऱ्या कुशीवर वळली. ईशाने मागून येउन उशी तिच्या डोक्यावर मारली….

नालायक नेहेमी असंच कर……”

 

ईशा, जरा लाईट्स बंद करतेस? मला झोप नाही ना येत उजेडात….” सायलीने पुन्हा तिला चिडवलं.

सायलीला अजून दोनतीन वेळा उशीने मारून लाईट्स बंद करून ईशा तिच्या बाजूला येउन झोपली.

———————————————-

सकाळी नऊ च्या सुमाराला सायली आणि ईशा मार्केट रोड ला येउन पोहोचल्या. इथे खरं तर पहाटेपासूनच भाजीवाले ताजी भाजी घेऊन विकायला बसायचे. पण रात्री उशिरा झोपून सकाळी इतक्या लवकर इथे येणं काही सायली आणि ईशाला शक्य नव्हतं. सायलीने सगळीकडे नजर फिरवली. पण त्या दिवशी त्या काकांशी भांडणारी भाजीवाली कोणती हे तिला माहीतच नव्हतं.

सगळ्या भाजीवाल्यांचा एकाच कलकलाट होता.

घ्या ताजी गवार, शेपू, टमाटी, भेंडी घ्या…..ओ ताई भेंडी घ्या की, कवळी हाय…”

एका भाजीवालीच्या तार स्वरामुळे सायलीचं तिच्याकडे लक्ष वेधलं. ही तीच भाजीवाली असावी असं तिला वाटलं. पण खात्री होत नव्हती. फक्त लांबून थोडाफार दिसलं होतं त्याप्रमाणे ती बाई मध्यमवयीन आणि जराशी स्थूल असावी असं तिला आठवत होतं.

सायली, हीच आहे का ती बाई?” ईशा

 

अगं, असं सांगणं कठीण आहे. मी बघितलं होतं तिला. पण मुद्दाम हिला लक्षात ठेवायचं अशा दृष्टीने नव्हतं बघितलं. जाडीशी होती एवढं आठवतंय. थांब जरा वेळ इथेच थांबू. कदाचित ते काकाच इथे आले तर बरं होईल…”

सायलीचं वाक्य पूर्ण होतंय न होतंय तोच त्यांच्या मागच्या बाजूने आणखी एक तार स्वरातला आवाज ऐकू आला. हा आवाज आणखी वरच्या पट्टीतला होता. सायलीईशाचंच नव्हे, तर आजूबाजूच्या बाकीच्या माणसांचाही तिकडे लक्ष वेधलं गेलं.

ओ ताई, उगा कुनाचं ऐकून घेन्हार न्हाई….भाजी दिसतेय का तुम्हाला पानी मारलेली? दिसतेय? …..कोनास्निबी इचारा हिकडंगंगीबद्दल कुनाची तक्रार हाय का इचारा…..उगा सकाळ सकाळ हिकडं येउन आमचा दिस खराब कराचा न्हाई….”

तिच्या फटकळ बोलण्यावर ती गिह्राईक बाईपण वैतागली.

फार बोललीस हामाझा पण दिवस खराब जाणार आहे तुझ्यामुळे….एक तर भाज्या सगळ्या भरपूर पाणी मारून ठेवलेल्या आणि वर तोंड असं फटकळकोण घेणार भाजी तुझ्याकडून ?”

बोलत बोलत ती बाई तिथून निघूनही गेली. पण ह्या भाजीवालीचं पित्त खवळलं.

आली मोट्टी शानीकोन भाजी घेनार म्हनंसंध्याकालच्या टायमाला येउन तर बघलाईन लागतीय ताजी भाजी घ्यायला माझ्यासमोर…”

समोर ऐकायला कुणी नव्हतं तरी ती भाजीवाली एकटीच बडबडत राग काढत होती. बाकीच्या भाजीवाल्यांना ह्याची सवय असावी. तिला कुणी काही सांगायला, समजवायला गेलं नाही. दोन मिनिटांनंतर ती स्वतःच बडबड करायची थांबली.

ईशा, अगं हीच आहे ती भाजीवाली. तिचं नाव पण हेच घेतलं होतं त्यादिवशी बाजूच्या भाजीवालीनेगंगीआणि बोलण्याची स्टाईल वगैरे….ही तीच आहेनक्कीच….”

 

पण आता पुढे काय करायचं? ही बाई काही विचारायला गेलं की वसकन अंगावर येईल…” ईशा

सायलीने एक क्षणभर विचार केला.

चल, बोलू तिच्याशी…”

 

अगं पण….” ईशाला पुढे काही बोलू न देता ती म्हणाली, ” तिच्या बाजूने बोलत राहा फक्त….मग ती आपल्यासाठी बोलेलबघू ट्राय तर करूचल…”

भाजीवालीच्या गाडीसमोर उभी राहून सायली ईशाला म्हणाली,

ही बघ आमच्या इथली भाजी ईशा. इतकी ताजी भाजी…..आम्ही ह्यांच्याचकडून भाजी घेतो नेहेमी….नमस्कार मावशी…”

सायलीला बघून आणि तिचं बोलणं ऐकून ती भाजीवाली संभ्रमात पडली. ही काही तिच्या नेहेमीच्या गिह्राईकांमधली तर दिसत नव्हती. पण जाऊदेत, आपल्या भाजीचं कौतुक करतेय तर राहिलं, असा विचार करून ती गप्प बसली.

खरंच गं, आमच्याकडे असली ताजी हिरवीगार भाजी बघितलीच नाहीये कधी. तिथे येईपर्यंत सगळी सुकून गेलेली असते. पालेभाजी तर आणली त्याच दिवशी करावीच लागते, नाहीतर फेकून द्यायची….” ईशा

 

आणि आमच्या मावशीकडची भाजी एकएक आठवडा पण छान राहते. फ्रेश अगदी. रंग पण उतरत नाही अजिबात. आईने आता दुसरीकडून भाजी आणायचीच बंद केली आहे आता. मावशी तुम्ही मला ओळखलं नसेल पण माझ्या आईला चांगलं ओळखता तुम्ही. ती दर एक दिवसाआड येतेच भाजी घ्यायला तुमच्याकडे. ती नाही का, लांब केस , चष्मा….” सायली

 

चष्माहे लांबसडक केस हायत त्या काय, त्या आई हाय काय तुमच्याअसं व्हय…” भाजीवाली पण लबाड होती..”आज तुमी घेन्हार काय भाजी ताई? काय देऊ….”

 

आज आईला बाहेर जायचंय ना….मला ना, फरसबी द्या अर्धा किलो आणि गाजर पाव किलो….काय हो मावशीकोण होती ती बाई? तुमच्याशीच भांडून गेली ना….” सायलीने हळूच विषय काढला.

 

तर तिला काय लागतंय भांडायला….रोजच भांडान करते हितं येउनमाझ्या भाजीवर पानी मारलंय म्हून ताजी दिसते असं म्हनाली बया…”

 

काय बाई आहेत्यासाठी एवढं बोलायचं काकाही माणसं विचित्रच असतात….त्यादिवशी पण मी बघितलं होतं. तो एक माणूस तुमच्याशी खूप भांडत होता. साध्या भाजीवरून एवढी कशी काय भांडतात माणसं काय माहित….बरं झालं तुम्ही त्या माणसाला चांगलं सुनावलंत…..” सायली

 

कोन मानूस? “

सायली तिच्या बाजूने सगळं बोलत असल्यामुळे भाजीवाली आता अगदी मनापासून तिचं बोलणं ऐकत होती. स्वतःचं एवढं कौतुक ऐकून ती प्रचंड खुश झाली होती.

तो नाही का, कोबीच्या भावावरून काहीतरी भांडत होता….. तुम्ही गावावरून आला होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी….म्हणजे काय झालं….मी ऑफिसमधून येत होते आणि आईचा फोन आला की काहीतरी भाजी घेऊन ये म्हणूनम्हणून मी तुमच्या इथे आले होते भाजी घ्यायला..पण तो माणूस तेव्हा तुमच्याशी भांडत होता. काय जोरात भांडत होता, मी विसरूच नाही शकततुम्ही कशा काय विसरलात मावशी?” सायली

 

कोबी? हा….आठवलाव्हय ते तर अजब काम होतं सम्द…..अशी खोड मोडली ना त्याची, परत फिरकला बी न्हाई तो हिकडं….ही घ्या ताई फरसबी

 

गंगे…” इतका वेळ हे सगळं संभाषण कानावर पडत असलेली बाजूची भाजीवाली तेवढ्यात मध्ये बोलली. “तो आला व्हता….काल दुपारी तू घरला गेलीस तवा….तुझ्या भाजीच्या गाडीकडे घाबरून बघत बघत पुढे गेलं बेनं….”

ह्या वाक्यावर त्या दोघीही मनापासून हसल्या. गंगी तर फारच मोठ्याने हसली. सायलीने ईशाकडे बघितलं. आता पुढे विषय कसा वाढवावा हे तिला कळेना. आता ईशा पुढे आली,

कोण माणूस हो मावशी ?”

मावशी काही बोलायच्या आत सायली म्हणाली,

अगं कोण आहे ते त्यांना कसं माहित असेल, तो भाजी घ्यायला येत असेल इकडे. नाव काय, कुठे राहतो, हे त्यांना काय माहित?”

 

अवो ताई, तिलाच काय, हितं समद्यास्नी म्हाईत हाय त्यो त्या गल्लीत राहतुया..मारुतीच्या मंदिरासमोर….थोडेच दिस झालेत हितं येतो तो भाजीला, पर लई परेशान करून सोडलं त्याने समद्यांनाजवा येतो तवा भांडतो….”

बाजूच्या भाजीवालीने तत्परतेने माहिती पुरवली. सायली आणि ईशाचं काम झालं होतं.

अगं सायले, किती वाजले बघितलं काचल लवकर उशीर झालाय….मावशी हे घ्या हा पैसे तुमचे…” ईशा लगबगीने म्हणाली.

 

यावा ताई परत आमच्याकडे भाजीला….”

भाजीवालीने त्यांना आवाज दिला तोपर्यंत दोघी त्या गल्लीच्या दिशेने चालायला लागल्या होत्या.

———————————————-

त्याच वेळेला त्या काकांच्या घरात….

“सुजयदादा, अहो एवढी काय घाई आहे? उद्या जातो ना…असं तडकाफडकी…..”

 

“अहो काका, मी आधीच सांगितलं होतं की नाही, साखरपुडा झाल्यावर लगेच परत जा आणि मी बोलवेन तेव्हाच या म्हणून. तेव्हा तुम्ही म्हणालात की मुंबईमध्ये तुमचं काम आहे आणि आठवडाभरात परत जाईन म्हणून. तुमची राहण्याची सोय झाली म्हणून मग मी पण काही बोललो नाही तेव्हा. पण आता खरंच समजून घ्या. आज-उद्या कधीही सायलीच्या घरून फोन येईल. लग्न पुढच्या दहा-पंधरा दिवसात बहुतेक होईलच. आता थोडक्यासाठी रिस्क नको. तुम्हाला कुणी इथे बघितलं तर ?” सुजय

 

“मी कोणाला काहीही सांगणार नाही पण…..”

 

“तुम्ही सांगाल असं नाही म्हणत मी. पण तुम्ही साखरपुड्याच्या दिवशीच सकाळीच इथे आलात आणि नंतर लगेच नागपूरला परत गेलायत असं सांगितलंय मी. आत्ता तुम्ही इथे कोणाला दिसलात तर त्यांना दहा प्रश्न पडतील आणि मला ते नकोय. जरासाही संशय येईल असं काहीही करायचं नाहीये आपल्याला. आणि तुमची इथली कामं झाली आहेत ना, मग झालं तर …आता प्लीज निघूया….सगळं सामान घेतलंय आपण. मी तुम्हाला बसमध्ये बसवून देतो. “

नाईलाजाने काका उठले. एक बॅग सुजयने उचलली होतीच. तो दरवाजाजवळ जाऊन त्यांची वाटच बघत होता. त्यांनी दुसरी बॅग उचलली आणि ते बाहेर आले.

“सुजयदादा, तुम्ही जर कुलूप लावता काय? मी घरी फोन करून सांगतो मी येतोय ते.”

“बरं…..”

कुलूप लावून सुजय मागे वळला आणि समोर बघताच त्याचा श्वास रोखला गेला. तेवढ्यात काकाही मोबाईल खिशात ठेवत मागे वळले.

“फोन उचलला नाही गेला …चला जाऊ ..नंतर ….”

एक क्षण त्यांचाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पण समोर उभ्या असलेल्या दोन मुलींपैकी एक सायली आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या छातीत धडधडलं. त्यांनी घाबरत घाबरत सुजयकडे बघितलं.  सुजय सायलीकडे बघत होता. तिची त्याच्याकडे रोखलेली नजर त्याला अस्वस्थ करून गेली……

क्रमशः

 

10 Comments Add yours

  1. Mayuri ghoap says:

    Ata kathetil majja aankhinach vadhat challiye.
    Pudhchya bhagachi vat pahtoy

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thanks:) pudhcha bhag lavkarach….:)

      Like

  2. Happy says:

    khup chan..waiting for next part.

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thanks 🙂 next part coming soon..

      Like

  3. Happy says:

    khup chan…. waiting for next part
    mazya comments bahuda post hot nahiyet

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      u cn see ur comments once they get approved …:)

      Like

  4. Shradha K says:

    good going…

    Liked by 1 person

  5. Rajeev says:

    Very interesting story. anxiously waiting for next part.

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thank you 🙂 next part coming soon

      Like

Leave a comment