davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 20)

“सुजयदादा, तुम्ही जर कुलूप लावता काय? मी घरी फोन करून सांगतो मी येतोय ते.”

“बरं…..”

कुलूप लावून सुजय मागे वळला आणि समोर बघताच त्याचा श्वास रोखला गेला. तेवढ्यात काकाही मोबाईल खिशात ठेवत मागे वळले.

“फोन उचलला नाही गेला …चला जाऊ ..नंतर ….”

एक क्षण त्यांचाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पण समोर उभ्या असलेल्या दोन मुलींपैकी एक सायली आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या छातीत धडधडलं. त्यांनी घाबरत घाबरत सुजयकडे बघितलं.  सुजय सायलीकडे बघत होता. तिची त्याच्याकडे रोखलेली नजर त्याला अस्वस्थ करून गेली……

—————-भाग 19 पासून पुढे—————-

भाग 19 येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-vD

 

पोस्ट ऑफिस मधून बाहेर पडल्यावर सिद्धार्थने घड्याळात बघितलं. साडेदहा वाजत आले होते. त्याच्या हातात कौस्तुभच्या घराचा पत्ता होता. त्याचा पत्ता मिळाला हे सायलीला कळवावं का, असं त्याच्या मनात येउन गेलं. पण नंतर त्याने विचार बदलला. सायलीचा राग कमी व्हावा म्हणून तो मुद्दाम काहीतरी कारण काढून तिच्याशी संपर्क साधतोय असं तिला वाटू शकलं असतं. खरं तर ऑफिसमध्ये पोहोचल्यावरच तिच्याशी प्रत्यक्ष भेटून तिचा गैरसमज दूर करणं ठीक झालं असतं. काल हेडऑफिसला जायच्या आधीच त्याने आजच्या हाफडे साठी रिक़्वेस्ट सबमिट केली होती. नंतर संध्याकाळी सायलीने ती अप्रूव्ह केल्याचं ईमेलही बघितलं त्याने. पण त्यावरून त्याला हेही कळलं, की सायली अजून रागावलेलीच होती. एरव्ही तिने आवर्जून त्याला त्याच्या रजेचं किंवा उशिरा येण्याचं कारण विचारलं असतं. एक बॉस म्हणून नाही, तर मैत्रीण म्हणून. त्यामुळे ऑफिसमध्ये गेल्यावर तिला भेटून तिच्याशी बोलणं गरजेचं होतं. अर्थात, सायलीने दहा दिवसांची रजा घेतल्याचं त्याला अजून माहीतच नव्हतं.

 

समोरच्या बस स्टॉपवर जाऊन त्याने तिथे उभ्या असलेल्या लोकांना कौस्तुभच्या घराकडे जाणाऱ्या बसबद्दल विचारलं. पण नंतर त्याने विचार बदलला. बाजूने जाणाऱ्या टॅक्सीला त्याने हात केला आणि त्यात बसून तो कौस्तुभच्या घराच्या दिशेने निघाला..

———————

सायलीच्या रोखून बघण्यामुळे सुजय अस्वस्थ झाला होता. सायलीने अजून काकांकडे बघितलं नव्हतं. पण तिने त्यांच्याकडे पाहिल्यावर ती त्यांना नक्की ओळखेल ह्याची त्याला खात्री होती. आणि तिने त्यांना ओळखलं की ती दहा प्रश्न विचारेल ह्याचाही त्याला अंदाज होता. काका नागपूरला असण्याऐवजी आत्ता इथे कसे, ह्याचं काय एक्स्प्लनेशन द्यायचं आता या विचाराने तो अस्वस्थ होत होता आणि दुसरीकडे सायलीची रोखून पाहणारी नजर पाहून त्याला इतर काही सुचूच शकत नव्हतं. तिच्या नजरेत नक्की काय होतं? प्रश्न, अविश्वास, राग, फसवले गेल्याची भावना, की आणखी काही?

बघितलंस ना ईशा….सुजय इथे आहे. आत्ता या वेळेला? …” सायलीच्या आवाजात राग स्पष्ट डोकावत होता.

ईशाला मात्र ह्यावर काय बोलावं काही कळत नव्हतं. ती गप्पच बसली.

*************

गल्लीतून आत आल्यावरच सुजय आणि काका घराबाहेर पडताना त्यांनी बघितले होते. त्या दोघी अगदी वेळेवर पोहोचल्या होत्या पण सुजय त्यांच्याही आधी पोहोचला होता. आता त्याच्यासमोर काकांना काहीच विचारणं शक्य होणार नव्हतं.

सायले, चल परत जाऊ. सुजयने इथे आपल्याला बघितलं तर त्याला संशय येईल…”

पण सायलीने तिचं ऐकलं नाही. ती पुढे चालतच राहिली. पण तिच्या मनात भराभर काहीतरी आखणी होत होती.

सायली…”ईशा मागून येत म्हणाली.

 

ईशा आपण परत जाण्यासाठी नाही आलोय. मी बोलते काय बोलायचंय ते. तुला काहीच नाही कळलं तर तू गप्प रहा. पण बोलणं कुठल्या दिशेने पुढे न्यायचं हे तुझ्या लक्षात आलं तर बोल नक्की. कळतंय का? आणि मला सांग, हे गल्लीच्या कोपऱ्यावर मोठं ब्युटी पार्लर होतं आत्ता बघितलं ते, त्याचं नाव काय होतं?”

 

नावहासिनोरा ब्युटी सलोन….फ़ेमस आहे तेपण त्याचं काय?” ईशाला काहीच कळत नव्हतं.

 

काही नाहीजाऊदे बोलू नकोस आता…”

बोलता बोलता त्या दोघी त्या काकांच्या घरापाशी येउन पोहोचल्यासुद्धा. दुसऱ्याच मिनिटाला सुजय कुलूप लावून मागे वळला आणि त्यानंतर ते काकासुद्धा मोबाईल खिशात ठेवता ठेवता मागे वळले. सायलीने त्यांच्याकडे मुद्दामच बघितलं नाही. तिला अचानक तिथे आलेलं पाहून सुजयच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव तिला बघायचे होते. तिच्या अपेक्षेप्रमाणे सुजयचा चेहरा आधी धक्का बसल्यासारखा झाला आणि नंतर त्याचा चेहरा उतरलाच. सायलीला पाहून आनंदयुक्त आश्चर्याचे भाव त्यानंतर उमटले.

************************

सुजय अजूनही गोंधळून सायलीकडे बघत होता. तिला नक्की काय म्हणायचंय ते त्याला कळत नव्हतं.

सायलीकाय झालं?”

 

वा, छान..मलाच विचार काय झालं ते. एरव्ही मला भेटायला, माझ्याशी फोनवर बोलायला पण वेळ नसतो ना तुला. आणि आत्ता बरा ऑफिस टाईम मध्ये इथे आलायस फिरायला. आज काम नाही वाटतं? की मला भेटण्याचा विषय आला कीच काम येतं तुला ऑफिसमध्ये? आपली एंगेजमेन्ट होऊन एवढे दिवस झाले तरी मला द्यायला तुला कधीच वेळ नसतो सुजय….”

सुजयला हायसं वाटलं. आपण वेळ देत नाही म्हणून ती रागावली आहे हे लक्षात आल्यावर त्याला बरंच वाटलं. तेवढ्यात सायलीने काकांकडे बघितलं. मगाशी तिने त्यांना बघितलंच होतं, पण आत्ता पहिल्यांदाच बघितल्यासारखं केलं.

अरे, तुम्ही तर नागपूरचे काका ना? हो ना सुजय? तुझ्या मावशीचे मिस्टर, बरोबर ना….” सायली

ईशाला आत्ता थोडं थोडं लक्षात येत होतं. सुजयला विचार करण्यासाठी वेळ मिळू नये म्हणून सायली अशी अचानक त्याच्या समोर आली होती. त्या दोघी तशाच परत फिरल्या असत्या तर हे सुजयचे काका कधीच भेटले नसते. सुजय त्यांची बॅग घेऊन त्यांच्या समोर त्यांना घेऊन गेला असता. ते खरे कोण आहेत, कुठे राहतात त्यांना कधीच कळलं नसतं. अचानक समोर गेल्यामुळे सुजयला विचार करायला वेळ मिळणार नाही, हा सायलीचा त्यामागचा विचार होता.

 

पण सुजय एवढ्याशाने घाबरून, चाचरून जाणारा नव्हता. त्याच्या डोक्यात अतिशय वेगाने विचार चालू होते. सायलीचे पुढचे प्रश्न हे काका आत्ता इथे कसे? हे कोणाचं घर‘…वगैरे असेच असणार, ह्याची त्याला कल्पना होती. नीट विचार करून, तिला त्याबद्दल काही संशय येणार नाही, असं काहीतरी उत्तर द्यायला हवं होतं. पण ते सुचण्यासाठी वेळ हवा होता.

सायली, मी सांगतो सगळं. आय कम्प्लीटली अग्री, मी तुला वेळ देत नाहीये ते. तुला माहित आहे ना, ते यु.एस चं प्रोजेक्ट सुरु झालंय. माझ्या तिकडे जाण्याची वाट बघतायत ते खरं तर. पण काम तर सुरु झालंय. आपण बोलू त्याबद्दल पण बरं झालं, तुम्ही दोघी भेटलात. आम्ही ब्रेकफास्ट नाही केलाय. जाता जाता कुठेतरी काहीतरी खाऊन जाणार होतो. तुम्हीही या दोघी. आपण बसून बोलू.” सुजय

 

पण काका इथे कसे आत्ता? आय मीन, ते नागपूरला परत गेले होते ना. ? आणि हे कोणाचं घर आहे?” सायलीने नेमका प्रश्न केला.

 

सांगतो ना सगळं. आपण बसून बोलूया ना रेस्टोरेंट मध्ये. चला…”

सुजयने विचार करण्यासाठी हवा असलेला वेळ किती सहजपणे मिळवला होता. सायली आणि ईशाने एकमेकींकडे बघितलं.

तुम्ही इथे कशा पण? आणि ईशा तू तर परवा परत जाणार होतीस ना पुण्याला ?”

सुजयने चालताचालता विचारलं. हा प्रश्न तर त्याला सायली आणि ईशा समोर दिसल्यापासून पडला होता. मधल्या ऑफिसच्या दिवशी सकाळी 10 वाजता सायली इथे इथे काय करत होती नक्की? तिचं घरपण ह्या बाजूला नव्हतं. आणि परवा अचानक दोघी घरी आल्या तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, ईशा तिच्या काही ऑफिसच्या कामासाठी मुंबईला आली होती आणि दुसऱ्या दिवशी परत जाणार होती.

ती थांबली चार दिवस रजा घेऊन. कंटाळा आला मॅडमना परत जायचा. तिच्यासाठीच आलो होतो इथे. मी पण दोन दिवस रजा घेतलीये. ती एवढी राहिली आहे. आईबाबा पण चिपळूणला गेलेत. मग ती पण बोअर झाली असती. ” सायली

 

अच्छाम्हणजे इथे मॉर्निंग वॉक करत आला होतात तर….”

सुजयने गमतीत बोलल्यासारखं दाखवलं खरं पण त्याला त्या दोघी इथे कशाला आल्या होत्या हे जाणून घ्यायचंच होतं.

जोक काय करतोयस? इथे सिनोरा म्हणून मोठं ब्युटी सलोन आहे, कोपऱ्यावर. तिथे जायचं होतं आम्हाला. सकाळीच ठरवलं म्हणून अपोइण्टमेंट नाही घेतली. म्हणून लवकरच आलो इथे साडे नऊ वाजता. पण बारा ते एकचाच स्लॉट अवेलेबल आहे आता. म्हणून म्हटलं कुठेतरी टाईमपास करू थोडा वेळ. तेवढ्यात तू दिसलास…..” सायली

 

अच्छा…”

सुजयने मान फिरवून ते पार्लर तिथे असल्याची खात्री करून घेतली. आता त्याचं समाधान झालं होतं.

——————–

कौस्तुभच्या घराची बेल वाजवताना सिद्धार्थला उगीचच ओशाळल्यासारखं होत होतं. असं कुणाच्या नकळत त्याच्याबद्दल दुसऱ्याकडे चौकशी करणं, असलं काही त्याने एरव्ही कधीच केलं नसतं. पण सायलीच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हटल्यावर तिच्यासाठी काहीही करायला तो तयार झालाच असता. हे सगळं त्यापेक्षा फारच कमी होतं.

दोन वेळा बेल वाजवल्यावर एका वयस्कर बाईने दार उघडलं.

कोण पाहिजे?”

सिद्धार्थला आधी कधीही न बघितल्यामुळे हा बहुतेक पत्ता विचारायला येणाऱ्यांपैकी असावा किंवा दारावर काहीतरी विकायला येतात तसला कुणी असावा अशी तिची समजूत झाली असावी.

नमस्कार काकू. कौस्तुभ आहे का घरात?”

 

आपण कोण?”

 

मी त्याचा मित्र. त्याची ट्रान्स्फर झाली आहे बंगलोर ला असं कळलं. म्हणून त्याला भेटायला आलो होतो.”

 

या ना आत…”

 

कौस्तुभ नाहीये का घरात?” सिद्धार्थ आत येता येता म्हणाला.

 

आत्ता अगदी नऊ च्या सुमाराला बाहेर पडला तोगावाकडची काही कामं आटोपून यायचं होतं. एकदा बंगलोर ला गेल्यावर लगेच यायला तसं जमणार पण नाही ना, म्हणून म्हणाला की आत्ताच थोडा वेळ आहे तर आत्ताच मार्गी लावून येतो सगळी कामं. मी पण जाणार होते खरं तर, पण तोच नको म्हणाला.”

 

म्हणजे आत्ता तो गावाला जाण्यासाठी बाहेर गेलाय?”

सिद्धार्थच्या आवाजात कमालीचा हताशपणा होता. कौस्तुभ काही केल्या हातालाच लागत नव्हता. आज पुन्हा थोड्याच वेळासाठी त्यांची चुकामुक झाली होती.

हो. साडेनऊची बस होती त्याची.”

 

अच्छा, म्हणजे आज नाहीच भेटणार का तो?”

 

छे, आज कुठला भेटतोय? परवापर्यंत परत येईल. तो पर्यंत मी शक्य होईल तेवढी सगळी बांधाबांध करून ठेवणार. मग तो म्हणाला की निघू.”

सिद्धार्थ काहीच बोलत नाही असं पाहून कौस्तुभच्या आईने विचारलं,

तुमचं काय नाव? तुम्हाला आधी कधी पाहिलं नाही कौस्तुभच्या मित्रांमध्ये, म्हणून विचारलं

 

मी पराग. “सिद्धार्थने जे नाव तोंडात आलं ते सांगून टाकलं. “ऑफिसमध्येच ओळख झाली आमची…”

पुढचं सगळं तो मोघमच बोलला. कौस्तुभची आई फार चौकशी करणार नाही ह्याची काळजी घेत.

मला जरा कौस्तुभचा नंबर मिळेल का? म्हणजे, काय झालं. माझा मोबाईल बंद पडला होता मागच्या आठवड्यात. नंतर तो सुरू झाला पण त्यातले काही नंबर्स डिलिट झालेत….” सिद्धार्थ

 

हो देते ना….”

त्याची आई लगबगीने आत गेली आणि तिने एका कागदावर त्याचा नंबर लिहून आणून दिला….

थॅंक्सम्हणत आणि तो कागद नीट खिशात ठेवत सिद्धार्थ जागेवरून उठलाच.

 

चहा तरी घ्या तुम्ही….”

 

नाही आत्ता नको काकू….कौस्तुभ भेटला असता तर त्याच्याबरोबर नक्की घेतला असता. जमलं तर दोन दिवसांनी परत चक्कर टाकेन….”

सिद्धार्थ स्वतःच्याच तंद्रीत जिने उतरत होता. कौस्तुभ भेटला नाही पण निदान त्याचा नंबर तरी मिळाला होता. पण तो असा कागदावरकागद चुकून हरवला तर….तो जिन्यातच थांबला आणि त्याने मोबाईल बाहेर काढला. नंतर खिशातला कागद काढून त्यावरचा नंबर वाचून एकदा खात्री करून घेतली. मग लगेच त्याने तो नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला. पण मोबाईलवर नंबर सेव्ह करत असताना समोरून घाईघाईत येत असलेल्या एका तरुणाचा त्याला धक्का लागला आणि हातातला कागद खाली पडला. मोबाईल पण पडणारच होता, पण सिद्धार्थने तो पकडला.

ओहसॉरीचुकून धक्का लागला…..”

त्या तरुणाने तो कागद उचलून सिद्धार्थच्या हातात दिला तेव्हा त्याच्यावर लिहिलेलं नाव त्याला दिसलं. कौस्तुभ परांजपे.

थॅंक्सम्हणत सिद्धार्थ पुढे निघूनही गेला.

दोन मिनिटं तो तरुण तिथेच विचार करत उभा राहिला. त्यानंतर तो कौस्तुभच्या घराकडे निघाला.

————————————–

मला सुजयबरोबर थांबायला सांग आणि तू काकांच्या मागे जा…. सायलीचा मेसेज वाचून ईशा जराशी चक्रावून गेली होती.

कॉफी

समोर वेटरने चार कप कॉफी आणून ठेवली, आधीच्या सगळ्या प्लेट्स उचलल्या आणि तो निघून गेला.

अरे आपण आल्यापासून तू मोबाईलवरच आहेस सायली, आणि ईशा आता तू पण?” सुजय

 

अरे सॉरी, रजेवर आहे तरी कामं संपत नाहीयेत. ऑफिसमधल्या कलीगशी जरा बोलतेय व्हॉट्स अप वर….झालं आताआणि ईशाकडे लक्ष देऊ नकोस, ती तर ऑफिसमध्ये मिटिंग अटेंड करते तेव्हासुद्धा मध्ये मध्ये फेसबुक, व्हॉट्स अप सगळं चालू असतं तिचंअरे पण मगाशी तू सांगितल्यावर विचारायचंच राहिलं आता कशी आहे काकांच्या मित्राची तब्येत?”

काका अचानक इथे मुंबईत का आले आणि ते त्या घरात काय करत होते, त्याचं अर्थातच सगळ्यांना पटेल असं उत्तर सुजयने दिलेलं होतं.

आहे तशीच. फार बरी नाहीये. त्यांचा मुलगा पण इंडियामध्ये नसतो. जवळचे असे आमची मावशी आणि काकाच. काकांच्या मित्राचं ते सामान आता त्यांना नेऊन दिलं आणि त्यांचं इथलं घर वगैरे सगळं व्यवस्थित आहे, हे त्यांना सांगितलं की त्यांची शेवटची ईच्छा पूर्ण केल्याचं समाधान. बाकी काय? तरी काही सामान आम्ही काल पाठवून दिलं नागपूरला. आणि काका म्हणाले की एवढं ते स्वतः घेऊन जातील. ते सामान पोहोचायला उशीर झाला, तर त्यांच्या मित्राला दाखवण्यासाठी काही हवं ना….” सुजय

काका मात्र घाबरून गप्पच बसले होते. मित्राच्या आजारपणामुळे दुःखात असल्यासारखं दाखवत होते. न जाणो आपण तोंड उघडलं आणि काही नको ते बाहेर पडलं तर…? ते वाट बघत होते, कधी हे सगळं संपतंय आणि आपण गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसतोय असं त्यांना झालं होतं.

 

तेवढ्यात सुजयला एक फोन आला. त्यावरचं नाव वाचून तो बोलण्यासाठी म्हणून बाहेर आला.

हा बोल..” सुजय

 

कुठे आहेस?” फ़ोनवरची व्यक्ती

 

जरा बाहेर आहे. काय झालं?” सुजय

 

मी आत्ता त्या कौस्तुभच्या घरी आलो होतो. त्याची ट्रान्स्फर झालीये तर म्हटलं त्याला भेटून जावं. उद्या मी पण काही दिवसांसाठी बाहेर जातोय ना…” फ़ोनवरची व्यक्ती

 

ओके मग?” सुजय

 

अरे मी जायच्या आधी एकजण आला होता इथे. कौस्तुभच्या आईकडून त्याचा नंबर घेऊन गेलाय. तिला सांगितलं की तो त्याच्या ऑफिसमध्ये आहे. नाव ….काय बरं….हा पराग….” फ़ोनवरची व्यक्ती

 

बरं मग?” सुजय

 

अरे मग मग काय करतोयस? पराग म्हणून कोणीच नाहीये ना ऑफिसमध्ये….” फ़ोनवरची व्यक्ती

 

म्हणजे ? मग तो कोण होता?” सुजय

 

काय माहीतमाझ्यावरच आपटला तो येऊनपण मी काही विचारायच्या आत निघून गेला…” फ़ोनवरची व्यक्ती.

 

कोण होता ते कळायला हवं….” सुजय

 

तू काय करायचं ते ठरवचल बाय…”

फोन ठेवल्यावर सुजय शांतपणे दोन मिनिटं विचार करत होता. तो जो कुणी होता तो कौस्तुभला फोन करणार एवढं नक्की .

 

त्याने विचार करून पुन्हा ज्या नंबरवरून फोन आला होता त्या नंबरवर फोन केला.

हा बोल….” फ़ोनवरची व्यक्ती

 

तू कुठे आहेस आत्ता?” सुजय

 

हे काय, कौस्तुभच्या बिल्डिंगमधून बाहेरच पडतोय. काय झालं?” फ़ोनवरची व्यक्ती

 

नीट ऐक. तो जो कुणी आहे, त्याने कौस्तुभचा नंबर कशासाठी घेतलाय माहीत नाही. पण जर माझ्याबद्दल संशय आलाय म्हणून घेतला असेल तर तो त्याला नक्की फोन करणार आणि माझ्याबद्दल बोलणार. “सुजय

 

पण त्याला तुझ्याबद्दल फारशी माहिती कुठे आहे? डोन्ट वरी. काही होत नाही…” फ़ोनवरची व्यक्ती

 

अरे काय बोलतोयस तू? कळतंय का तुला ….”

 

सॉरी सॉरी…”सुजयला अर्धवट तोडून तो म्हणाला…”माझ्या लक्षातच नाही आलंओके बरं काय करायचं आता?”

 

तू त्याला फोन करून सांग की कोणालाही फोनवर माझ्याबद्दल काहीही सांगू नकोस. किंवा तुला काय ठीक वाटेल ते सांग. पण तो काहीही बोलायला नको आणि लगेच फोन कर. ” सुजय

 

सुजय काय बोलतोयस तू? अरे मी असं कसं सांगू त्याला? आय मीन, कारण काय सांगू? त्याला डाऊट येईल….” फोनवरची व्यक्ती

 

“.प्लिज तू सांग ना काहीतरी विचार करून. तुझा मित्र आहे ना तो, ऐकेल तुझं….हे बघ मला आत्ता फार वेळ बोलता नाही येणार. सायली आणि तिची बहीण आहेत माझ्याबरोबर इथे. मी नंतर कॉल करेन तुला. जमेल तेवढ्या लवकर निघेनच इथून….चल बाय …”

सुजयने घाईघाईने फोन ठेवून दिला तसं त्याच्याशी फोनवर बोलणारा तो तरुणसुद्धा मोबाईल खिशात टाकत नाखुशीने मान हलवत बिल्डिंगच्या बाहेर पडला.

 

तो बाहेर पडल्यावर आणि लांब गेलाय अशी खात्री झाल्यावर, त्याचं सुजयशी चाललेलं बोलणं चोरून ऐकत असलेला सिद्धार्थ पुन्हा बिल्डिंगचे जिने चढायला लागला.

****************

कौस्तुभचा नंबर मिळाल्याच्या आनंदात तो त्याचं हातातलं छोटं पाऊच कौस्तुभच्या घरीच विसरला होता. बाहेर पडल्यावर पाच मिनिटातच त्याच्या ते लक्षात आलं आणि तो तसाच परत फिरला. बिल्डिंगच्या एंट्रन्सपाशी पोहोचल्यावर त्याला मगाशी जिन्यात येऊन धडकलेला तो तरुण जिन्यात फोनवर बोलताना दिसला. सिद्धार्थ तसाच पुढे येणार होता पण त्याचं एक वाक्य कानावर पडलं आणि तो थबकला. पटकन बाजूच्या भिंतीआड लपला.

मी यायच्या आधी एकजण आला होता इकडे, कौस्तुभच्या आईकडून त्याचा नंबर घेऊन गेलाय…” तो फोनवर बोलत होता.

दोन मिनिटांनी त्याला पुन्हा फोन आला. यावेळी त्याच्या बोलण्यावरून सुजयचा फोन आला होता हे स्पष्टच होत होतं. कौस्तुभला फोन करून काहीही माहिती न देण्याबद्दल सांगण्याचं त्यांचं काहीतरी ठरलं एवढं त्याला कळलं.

*******************

मग आता मला काय करायला हवं? सिद्धार्थ जसजसा विचार करत होता तसतसा तो गोंधळून जात होता. तो तरुण कौस्तुभला फोन करून काही सांगायच्या आधीच आपण फोन करून त्याच्याकडून सगळं काढून घेऊया, असा विचार करून त्याने मोबाईल बाहेर काढला. पण कौस्तुभचा नंबर डायल करण्याआधी एक दुसरा विचार त्याच्या मनात आला. त्या तरुणाने कौस्तुभला फोन करून आत्तापर्यंत कोणालाही माहिती देऊ नकोस असं सांगितलं असेल तर तसंही कौस्तुभ आपल्याला काही सांगणार नाही, ह्याची त्याला खात्री होती. आणि दुसरं म्हणजे, आपलं कौस्तुभशी बोलणं झाल्यावर जर त्या तरुणाने कौस्तुभला फोन केला, तर कोणीतरी ही सगळी माहिती काढून घेण्यासाठी कौस्तुभला फोन करतंय हे त्या तरुणाला आणि मग सुजयलाही कळणार. आणि कोणत्याही परिस्थितीत सुजयला आपण त्याच्याबद्दल काही शोध घेतोय हे कळायला नकोय.

 

पण आता मी कौस्तुभच्या आईकडून त्याचा नंबर घेतलाय, हे त्यांना कळलंय. पराग नावाचा कोणीही ऑफिसमध्ये नाही, हे पण त्यांना माहीत आहे त्यामुळे त्यांना संशय आलाच असणार

 

सिद्धार्थच्या मनात उलटसुलट विचार येत होते. खरं म्हणजे मगाशी तो जो सुजयशी फोनवर बोलत होता, त्याचा फोटो काढायला हवा होता, पण त्याला ते सुचलंच नव्हतं. तो स्वतःवरच चरफडला. मग पुन्हा विचारात पडला. ‘पण मग म्हणजे आता मी नक्की काय करायला हवंय?’ दोन मिनिटं शांतपणे विचार केल्यावर त्याला उत्तर मिळालं. आता कौस्तुभकडून काहीही कळलं नसतं तरी चालणार होतं. उलट त्याच्याकडून काही कळलं असतं तर त्याबरोबरच सुजयचा संशयही पक्का झाला असता आणि त्याची खात्री पटली असती की कुणीतरी त्याच्या मागावर आहे. पण आता असं कुणीतरी होतं, ज्या व्यक्तीकडून त्याला थोडीफार माहितीही मिळू शकली असती आणि त्याबद्दल सुजयला कळलंही नसतं. कौस्तुभची आई.

 

ज्या अर्थी आपण येऊन गेल्याचं कौस्तुभच्या आईने त्या तरुणाला सांगितलं, त्या अर्थी तो त्याच्या घरी नेहेमी येणारा असावा. सिद्धार्थ विचार करत होता. कौस्तुभच्या घराच्या दिशेने तो वळला आणि पुन्हा थबकला. पण सुजय आणि त्याच्या त्या फोनवाल्या मित्राला थोडातरी संशय आलाच होता आणि तो दूर करायला हवा होता. मनाशी काहीतरी ठरवून सिद्धार्थने मोबाईलवरून एक नंबर डायल केला, कौस्तुभचा.

————-

फोनवरच्या मित्राशी बोलून झाल्यावर सुजय तिथेच थांबला. आत रेस्टोरंट मध्ये सायली आणि ईशा बसल्या होत्या त्यामुळे फार वेळ बाहेर थांबताही आलं नसतं. चांगलं त्या काकांना बसमध्ये बसवून दिलं असतं आणि मग एक काळजी मिटली असती. पण नेमक्या ह्या दोघी कशाला आल्या तिथे? तरी रेस्टोरंट पर्यंत येईपर्यंत त्याच्या सुपीक डोक्यात सगळ्या संभाव्य प्रश्नाची अचूक उत्तरं तयार झाली होती आणि त्यामुळे तो सगळं सांभाळून घेऊ शकला होता. पण आता काका लवकरात लवकर गेले तर बरे, असा विचार करून त्याने काकांना फोन लावला,

हॅलो…”

 

काका, सुजय बोलतोय. जरा फोनवर बोलण्याच्या निमित्ताने बाहेर या…”

 

एक मिनिट हा जरा…” काका उठता उठता म्हणाले, “गावाकडून फोन आलाय…” असं सायलीला सांगून बाहेर आले

ते बाहेर गेल्यावर सायली आणि ईशाला संधीच मिळाली.

ईशा माझा मेसेज वाचलास ना?” सायली

 

हो ग, पण काय मी काय करू त्यांच्या मागे जाऊन?” ईशा

 

हे बघ, सुजय त्यांना सोडायला जाणार आहे नातर त्याला म्हण की तू आणि सायली बाहेर फिरायला जा जरावेळ आणि मी काकांना ट्रेनमध्ये बसवून देते…” सायली

 

तुला काय माहीत ते ट्रेनने जाणार आहेत का ते?” ईशा

 

आपण असं गृहीत धरलंय असं दाखवायचं. नागपूरला जाणारा माणूस बहुतेक करून ट्रेन नेच जाईल ना….पण ते खरे कुठे जातात हे बघायचंयसायली

 

ओके…”

 

पण स्टेशन च्या इथे आल्यावर काहीतरी कारण सांग आणि त्यांना एकट्यांनाच ट्रेन पकडायला जाऊदेतइथून पुढे त्यांच्यावर लक्ष ठेव. कुठे जातायत तेवढं बघ. हे बघ, मी पुढचा एक तास इथेच थांबेन. सुजयला पण काहीतरी कारण सांगून लवकर निघून परत इथेच येईन. तू आलीस की मग घरी जाऊ….कळलं ?” सायली

 

हो कळलं…” ईशा

 

आणि फार आगावूपणा करायला जाऊ नकोस, एवढंच कर आणि…..थांब ते येतायत….”सायली समोर बघत म्हणाली.

सुजय आणि काका येऊन बसले

अरे कुठे होतास एवढा वेळ? कॉफी थंड झाली तुझी…” सायली

 

तू व्हॉट्स अप वर बोलतेस आणि आम्हाला कॉल येतात ऑफिस मधून दुसरं काय…” सुजय हसत हसत म्हणाला. “बरं चला निघूया का उशीर होतोय, काकांना पण निघायचंय….”

 

मी जाऊ का त्यांना सोडायला?” ईशा

 

काय ? तू ?” सुजयच नाही तर काकासुद्धा ओरडले.

 

तुम्ही एकतर भेटत नाही सायलीला. आत्ता भेटले आहात तर अर्धा पाऊण तास फिरून या, गप्पा मारा. काकांना मी सोडते स्टेशनवर….चालेल ना काका?” ईशा

 

स्टेशनवर ?” काकांना घाम फुटला होता.

 

हो स्टेशनवर, बरोबर आहे,” सुजय त्यांच्याकडे बघत म्हणाला. “पण अगं कशाला तुला त्रास उगीच?” ह्यापेक्षा जास्त सुजयला काहीच बोलता येईना.

 

ईशा, काहीतरीच काय? आम्ही नंतर जाऊ कधीतरी…” सायली

 

अगं त्यात काय झालं? मी पुण्याची असले तरी पुण्याएवढीच मुंबईची माहिती आहे मला….डोन्ट वरी मी सोडते काकांनाचला निघूयासायले मी फोन करेन तेव्हा पार्लर मध्ये पोहोच नक्की..” ईशा त्यांची एक बॅग घेऊन उठलीच.

काका आणि सुजय दोघांचाही नाईलाज झाला.

———————-

सॉरी काकू, तुम्हाला परत दार उघडायला यायला लागलं. पण मी माझं पाऊच विसरलो इकडे, ते घ्यायला आलोय.” सिद्दार्थ

 

असं होय….कुठे आहे?”

काकूंनी त्याला आत येण्यासाठी दार पूर्ण उघडलं. सिद्दार्थने आत येऊन टीपॉयवर ठेवलेलं त्याचं पाऊच घेतलं.

मिळालं. थॅंक्स काकू..” सिद्धार्थ दरवाजापर्यंत जाऊन पुन्हा मागे वळला.

 

अरे हा काकू, आता तुमच्याकडे कोणी आलं होतं का? म्हणजे तुमच्याकडेच आला होता ना तो? मी कुठेतरी बघितलंय त्याला, पण आठवत नाही नीट. काय नाव त्याचं?”

———————

कौस्तुभ अजूनही प्रवासातच होता. तेवढ्यात त्याला एक फोन आला, सुजयच्या त्या फोनवाल्या मित्राचा.

“हा बोल ” कौस्तुभ

 

“काय साहेब, मी तुम्हाला भेटायला आलो आणि तुम्ही गावाला पळालात?”

 

“अरे काय करणार? शंभर कामं आहेत बंगलोरला जायच्या आधी. …तू घरी आला होतास का?” कौस्तुभ

 

“हो घरी गेलो होतो. आई होत्या घरी. पण आत्ता मी तुला जरा सावध करायला फोन केलाय….”

 

“का ? काय झालं? आई ठीक आहे ना?” कौस्तुभ

 

“हो रे, आई ठीक आहेत. पण आत्ता मी जायच्या आधी पराग नावाचा कुणीतरी तुझ्या ऑफिसमध्ये आहे असं सांगून त्यांच्याकडून तुझा नंबर घेऊन गेलाय. मी काही बोललो नाही आईंना. त्यांना उगीच टेन्शन नको. पण हे बघ तुला त्याचा फोन आला, तर काहीही माहिती देऊ नकोस. बोलूच नकोस. आजकाल हे फार वाढलंय, काहीतरी माहिती काढून घेतात आपली आणि मग ….”

 

“अरे मला आला होता त्याचा फोन…..” त्याला मधेच तोडत कौस्तुभ म्हणाला. “पण तो तुला वाटलं तसा कुणी नव्हता अरे. म्हणजे तो म्हणाला की दोनेक महिन्यापूर्वी आपल्या कुठल्यातरी क्लायंट च्या ऑफिसमधून काही कामासाठी आला होता तो ऑफिसमध्ये. तेव्हा मला भेटला होता दोन मिनिटासाठी. अगदी घराजवळ राहतो माझ्या. तेव्हा म्हणाला होता, एवढं जवळ राहतो आपण तर एकदा भेटूया असं. खरं तर मला काही आठवत नाही तो भेटल्याचं. पण असेल ना, चांगला होता बोलण्यावरून. त्याला ऑफिसमधूनच कळलं की माझी ट्रांसफर झाली आहे, म्हणून भेटायला आला होता तो. जमलं तर दोन तीन दिवसांनी परत येईन असंही म्हणाला….डोन्ट वरी… तुला वाटलं तसं काही नाही…..”

 

“तुला खात्री आहे ना, मग ठीक आहे…चल मग बाय….”

पुढच्याच मिनिटाला सुजयला त्याच्या फोनवाल्या मित्राकडून मेसेज गेला त्यांचा संशय खोटा असल्याचा.

——————————-

सायली रेस्टोरंटच्या बाहेर थांबली होती. इथेच भेटायचं ठरलं होतं तिचं आणि ईशाचं, नाही का? पण सायलीने तिला एक तासाभरात तिथे यायला सांगितलं होतं, पण आता दोन तास होऊन गेले होते पण ईशाचा पत्ता नव्हता. ती फोनही उचलत नव्हती. सायलीच्या मनात नको नको ते विचार यायला लागले.

उगीच पाठवलं ईशाला त्यांच्या मागे. ती त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे हे त्यांना कळलं नसेल ना? त्यांनी तिला काही केलं नसेल ना?”

ईशाच्या काळजीने सायलीचा जीव वरखाली व्हायला लागला. तेवढ्यात अनिकेतचा फोन आला.

ताई कुठे आहेस तू ?”

 

जरा बाहेर आहे. का काय झालं?”

 

अगं माई आज्जी आलीये. मला आत्ताच फोन आला होता बाबांचा ते पोहोचलेत घरी म्हणून. मी जरा मित्राकडे आलो होतो. पण माई आजी आलीये ना, मी निघालोच आहे. तू पण ये लगेच ईशा आहे ना तुझ्याबरोबर?”

 

? हं….हो, हो ,,,…आहे…”

 

बरं चल मी ठेवतो…..बाय …”

अनिचा कॉल एन्ड करता करता सायलीला तिला आलेले मेसेजेस दिसले. दोन मेसेजेस होते. आधीचा मेसेज बाबांचा होता, एक तासापूर्वी आलेला.

 

सायली, तू ऑफिसमध्ये कामात असशील म्हणून फोन करत नाही. तुला वेळ मिळाला की तूच कर आणि जमलं तर लवकर ये आज. तुमची माई आजी आलीये. सकाळी लवकरच निघालो आम्ही म्हणून अकरा पर्यंत पोहोचलो. ईशाला तुझी आई फोन करत होती पण ती उचलत नाही. तिलासुद्धा मेसेज केलाय. लवकर या. माई आजी वाट बघतेय..

 

सायलीला आता काय करावं हेच सुचेना. ईशाला कसं शोधावं,काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात तिचं लक्ष दुसऱ्या मेसेजकडे गेलं….सिद्धार्थचा हा मेसेज पण जवळपास एक तासापूर्वी आलेला होता. ईशाची वाट बघताना तिचं ह्या मोबाईलवर आलेल्या मेसेजेस कडे लक्षच गेलं नव्हतं.

 

सायली, मध्ये बराच वेळ तुझा फोन लागत नव्हता आणि ईशा फोन उचलत नव्हती, म्हणून मेसेज करतोय. तू कामात असशील तरी सगळी कामं सोडून प्लिज मला फोन कर.किंवा मेसेज कर आणि जमलं तर लगेचच भेट. मला काहीतरी खूप महत्वाचं कळलंय. पण सगळं फोनवर सांगता येण्यासारखं नाही. मला जे कळलंय त्यामुळे आपल्याला आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील….

 

काय कळलंय सिद्धार्थला? सायलीच्या मनात हा प्रश्न आला तेवढ्यात पुन्हा ईशाचा विचार तिच्या मनात आला. आणि ईशा नक्की कुठे आहे? ती ठीक असेल ना?

 

क्रमशः

****************************

‘अज्ञाताची चाहूल’ च्या ला तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !! अज्ञाताच्या शोधाच्या या पर्वातील सगळेच भाग लिहिणं मी मनापासून एंजॉय केलंय, तसंच ते वाचायला तुम्हालाही आवडले असणार अशी आशा आहे.

 

या पुढे या कथानकातील तिसरे आणि शेवटचे पर्व घेऊन येतेय. जे आजपर्यंत अज्ञात होतं, त्याचा उलगडा होणार आहे. कथा जसजशी शेवटाकडे झुकते आहे, तसतसे त्यातील पात्रांचे स्वभाव, एकमेकांसोबतचे नातेसंबंध हे त्याची लेखिका म्हणून मलाही अधिक ठळकपणे समजायला लागले आहेत. कथेतली ही पात्र, माझ्याच विचारातून जन्मलेली असली तरीही त्या प्रत्येकाला त्यांचा असा वेगळा स्वभाव आहे, आवड-निवड आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगात एखादे पात्र कसे रिएक्ट होईल हे रंगवताना मला माझ्या विचारांचा आधार घ्यावा लागत नाही, कथेतील पात्रच त्यांच्या स्वभावानुसार रिएक्ट होऊन कथा पुढे नेतात. त्यामुळे खरं तर ही कथा मी लिहितेय असं म्हणण्यापेक्षा मी फक्त माझ्या कथेतील पात्रांच्या स्वभावाला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या नातेसंबंधांना माझ्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतेय. कथा वाचताना ती आपल्या आजूबाजूला घडतेय असं वाटतं अशा कॉम्प्लिमेंट्स काही जणांनी दिल्या. कदाचित मी वर लिहिलंय, तेच त्याचं कारण असू शकेल.

 

पुढच्या पर्वातील पुढच्या भागात एका रहस्याचा उलगडा होईल, त्यातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण तरीही आणखी काही प्रश्न, काही रहस्य असतीलच. अज्ञाताच्या या शोधात ईशासारख्या आपल्या जिवलगांना सायली गमावून तर बसणार नाही? सायली, ईशा आणि सिद्धार्थच्या शोधात ‘ती’ नक्की त्यांची साथ देतेय की त्यांच्या जीवावर उठलीये? काय आहे सुजयच्या रहस्यमय वागण्यामागचं सत्य? आपल्यामागे आपल्याबद्दल चालू असलेल्या शोधाची सुजयला चाहूल लागेल का? ह्या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत राहा ….’अज्ञाताची चाहूल’.

6 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 20)

 1. Pranjali
  June 26, 2016

  Another wonderful part by u saraja..keep it up

  Liked by 1 person

  • rutusara
   June 27, 2016

   Thank you Pranjali 🙂

   Like

  • Anonymous
   June 29, 2016

   tumhi please lavkar post kara na

   Like

   • rutusara
    June 30, 2016

    sure…nakki prayatn karen..thank you

    Like

 2. UJVALA
  July 5, 2016

  LAVKAR POST TAKA PLZ TUME CHAN LEHTA

  Like

  • rutusara
   July 8, 2016

   thanks 🙂 lavkarat lavkar pudhcha bhag tanyacha nakki prayatn karen

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on June 25, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: