davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 21)

सायली, मध्ये बराच वेळ तुझा फोन लागत नव्हता आणि ईशा फोन उचलत नव्हती, म्हणून मेसेज करतोय. तू कामात असशील तरी सगळी कामं सोडून प्लिज मला फोन कर.किंवा मेसेज कर आणि जमलं तर लगेचच भेट. मला काहीतरी खूप महत्वाचं कळलंय. पण सगळं फोनवर सांगता येण्यासारखं नाही. मला जे कळलंय त्यामुळे आपल्याला आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील….

काय कळलंय सिद्धार्थला? सायलीच्या मनात हा प्रश्न आला तेवढ्यात पुन्हा ईशाचा विचार तिच्या मनात आला. आणि ईशा नक्की कुठे आहे? ती ठीक असेल ना?

 

****************भाग 20 पासून पुढे चालू**************

भाग 20 येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-x8

 

ईशाच्या काळजीने सायलीचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. ती आणखी अर्धा तास तिथे थांबली. पण ईशाचा कुठेही पत्ता नव्हता. तिने तिचा नंबर पुन्हा पुन्हा लावून पहिला. पण फोन उचलला जात नव्हता. तिचा मोबाईल हरवला असेल का? कदाचित स्टेशनवरच्या गर्दीत चोरीलासुद्धा गेलेला असेल. नाहीतर एवढ्या वेळात ईशाने स्वतःहून समोरून तिला फोन केलाच असता. तिला शोधण्यासाठी म्हणून स्टेशनवर जावं का, असाही तिने विचार केला, पण ती गेल्यावर ईशा इथे आली असती तर दोघींची चुकामुक झाली असती. काय करावं तिला सुचेना. शेवटी त्या रेस्टोरंटच्या बाहेर असलेल्या छोट्याशा दुकानात बसलेल्या एक बाईला तिने सांगून ठेवलं, ईशा आली तर तिला तिथेच थांबायला सांगायचं वगैरे. ईशाचा मोबाईलमधला फोटोही तिला दाखवून ठेवला.

 

स्टेशनच्या आजूबाजूचा परिसरही तिने पालथा घातला. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन खात्री करून घेतली. ब्रिजवर बघितलं. ईशा कुठेच नव्हती. पुन्हा त्या रेस्टोरंटच्या इथे येऊन त्या बाईकडे चौकशी केली. ईशा तिथे आलेली नव्हती. सायली पुन्हा एकदा स्टेशनला गेली.पुन्हा सगळीकडे बघितलं. आता मात्र तिचा धीर सुटत चालला होता.

 

घरी जाऊन आईबाबांना आपण काय सांगणार? मावशीला काय उत्तर देणार? काय डोक्यात आलं आपल्या आणि ईशाला त्या काकांच्या मागे जायला सांगितलं आपण. काकांचा नंबरही नाही आपल्याकडे नाहीतर सरळ त्यांना फोन केला असता आणि विचारलं असतं. पण सुजयकडे तर नंबर असणार नक्कीच. पण सुजयची मदत घ्यायची? सायलीचं मनच तयार होत नव्हतं. त्याच्याशी बोलताना चुकून आपण सांगून टाकलं की ईशा काकांचा पाठलाग करायला गेली होती, तर….? पण, आत्ता दुसरा पर्यायच दिसत नव्हता. सुजयला शंका येणार नाही ह्याची काळजी घेत, काकांना सोडायला गेलेली ईशा अजून परत आली नाही हे त्याला सांगायला लागणार होतं. काकांकडे फोन करून चौकशी कर असं सांगायला लागणार होतं. पण पण….त्या सुजयने आणि त्याच्या त्या काकांनीच ईशाला काही केलं नसेल ना? त्यांना कळलं असेल का की ईशा त्यांना फॉलो करणार आहे ते? कदाचित असंच असेल. सुजय रेस्टोरंटच्या बाहेर असताना ते काका फोनवर बोलायला बाहेर गेले आणि मग येताना ते दोघे एकत्र आत आले. बाहेर त्यांचं काहीतरी बोलणं झालंच असणार. मग असं सगळं असेल तर ते मला का सांगतील, ईशा कुठे आहे ते? सायलीची विचार करण्याची शक्तीच हळूहळू कमी होत होती. काहीच सुचत नव्हतं. पुन्हा मनात शंका आली. सुजयला आणि त्या काकांना ह्याबद्दल माहीत नसेल तर? विचारून तर बघायला हवं ना….ईशाला काहीही व्हायला नकोयती सुखरूप असायला हवी आहे. आत्ता या क्षणी बाकी काहीच महत्वाचं नाही.

 

विचार करता करताच तिने मोबाईलवरून सुजयचा नंबर डायल केला.

———————————————

सिद्धार्थ ऑफिसला पोहोचला होता खरा, पण त्याचं कामात लक्षच लागत नव्हतं. तो सायलीच्या रिप्लाय ची वाट बघत होता. त्याने लिहिलेलं कारण वाचल्यावर खरं तर तिने लगेच फोन करायला हवा होता. ती अजून रागावलेलीच होती का? पण नाही, सायलीला तो जेवढा ओळखत होता, त्यावरून त्याला एवढं नक्कीच माहीत होतं, की सायली अजूनही नाराज असली तरी ती इतका वेळ अबोला धरण्याएवढी आणि संवादच बंद करण्याएवढी इम्मच्युअर नक्कीच नव्हती. आणि तेसुद्धा आपल्याला काहीतरी महत्वाचं काहीतरी कळलंय आणि ते तिला लवकरात लवकर कळणं महत्वाचं आहे, ह्याची कल्पना असताना ती केवळ आपल्यावर रागावली आहे म्हणून बोलणं सोडून देणं तर शक्यच नव्हतं.

 

सकाळी त्याने सायलीचा फोन ट्राय केला तर तो लागत नव्हता. म्हणून त्याने तिला मेसेज पाठवला. ती ऑफिसमध्ये बिझी असेल आणि वेळ मिळाला की फोन करेल असं वाटून त्याने तिला परत फोन केला नाही. पण तो ऑफिसमध्ये आल्यावर त्याला कळलं होतं की सायली पुढचे दहा दिवस रजेवर गेली आहे, आणि सगळे म्हणत होते त्याप्रमाणे सुजय यु.एसला जाणार आणि त्याच्याबरोबर वेळ स्पेंड करता यावा म्हणून तिने ही रजा घेतली होती. हे ऐकून तो चक्रावून गेला होता. सायलीला तर सुजयवर संशय आहे मग ती त्याच्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून रजा का घेतेय? आणि सुजय अचानक युएसला का बरं चाललाय? त्याला प्रश्नावर प्रश्न पडत होते. अर्थात सायलीशिवाय त्याची उत्तरं कोणाला माहीत असणार? पण आता एवढा वेळ झाला तरी तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही, तेव्हा त्याला जरा काळजीच वाटायला लागली. ईशाही फोन उचलत नव्हती. त्यांनासुद्धा काही कळलं असेल का सुजयबद्दल? सगळं ठीक असेल ना? पण एवढा विचार करत बसण्यापेक्षा सायलीला पुन्हा फोन ट्राय करूया, असा विचार करून त्याने पुन्हा तिचा नंबर डायल केला पण या वेळी तो बिझी लागला.( सायलीने ह्याच वेळेला सुजयला फोन लावलेला होता).

—————————————-

काय ? ईशा अजून आली नाही? म्हणजे?” सुजय

 

अरे काकांना सोडायला ती स्टेशनवर गेली ना, आपण फिरून आलो आणि मग तुला ऑफिसला जायचं होतं म्हणून तू गेलास. मग नंतर मी त्या रेस्टोरंटच्या बाहेर खूप वेळ वाट बघितली मी, पण ती आलीच…….सॉरी रेस्टोरंटच्या बाहेर नाही….त्या..त्या पार्लरच्या इथे भेटायचं होतं ना आम्हाला….तिथे मी खूप वाट बघितली तिचीपण ती आलीच नाहीआणि तिचा फोनपण नाही लागत….” बोलताबोलता सायलीला रडूच फुटलं.

 

सायली? तू रडतेयस ?..ए प्लिज रडू नकोस……मी..मी येऊ का तिथे? ईशाला काही नाही होणार….” सुजयला आता काय करावं काही सुचेना.

एक मिनिटानंतर सायली जरा शांत झाली. पण त्याही परिस्थितीत ईशाला शोधण्यासाठी आपल्याला सुजयची मदत घ्यावी लागतेय ह्याची तिला रुखरुख लागून राहिली होती. पण तिचाही ईलाज नव्हता.

सॉरी, मला जरा टेन्शन आलं ईशा परत आली नाहीये त्यामुळे…” सायली स्वतःला सावरत म्हणाली.

 

नो प्रॉब्लेम सायली. इट्स अबसोल्यूटली ओके. अगं तू माझ्याशीच शेअर करणार ना असं……..”

 

तू प्लिज काकांना फोन करशील?” त्याला मधेच तोडत सायली म्हणाली.

 

? काय ?” सुजय

 

तू काकांना फोन करून विचारशील का, की त्यांना ईशाने कुठे सोडलं आणि काही बोलली का त्यांना की ती कुठे जातेय वगैरे? किंवा काही बाकी बोलली का? किंवा मला नंबर दे, मी बोलते त्यांच्याशी….” सायली

 

नाही, मी बोलतो ना त्यांच्याशीलगेच फोन करून विचारतो त्यांना आणि मग तुला फोन करतोओके? “

सायलीला काकांचा नंबर देणं सुजयसाठी रिस्कीच होतं आणि त्याने नंबर देणं का टाळलं ह्याचा सायलीलाही अंदाज होता. सुजय खरंच काकांना फोन करेल करून ईशाची चौकशी करेल का आणि त्याने आणि काकांनीच ईशाला काहीतरी केलं असेल तर ते आपल्याला खरं काय ते कळू देतील का ह्या सगळ्याबद्दल सायलीला आत्ता काहीच विचार करायचा नव्हता. सुजयचा ह्या सगळ्याशी काहीच संबंध नसेल आणि काकांकडून काहीतरी माहिती नक्की कळेल असंच ती मनाला बजावत होती.

दहा मिनिट्स होऊन गेली. सायलीच्या मनाची घालमेल वाढत होती. तेवढ्यात तिच्या फोनवर सुजयचा फोन आला.

————————————————

सायलीचा फोन आधी लागत नव्हता. तिला मेसेज केला तर तिचा काही रिप्लाय नव्हता. तिने पुन्हा कॉलही केलेला नव्हता. आणि आता तिचा फोन बिझी लागत होता. तिकडे ईशाचाही काही रिप्लाय नव्हता. सिद्धार्थ गोंधळला होता पण त्याहीपेक्षा जास्त त्याला सायलीची काळजी वाटत होती. काहीतरी गडबड आहे, असं त्याला सारखं वाटत होतं. त्याने ऑफिसमधल्या कलिगकडून सायलीच्या घरचा नंबर घेऊन तिच्या घरीसुद्धा फोन करून पहिला. पण तिच्या बाबांना तिने रजा घेतल्याचं काही माहीतच नाही असं दिसलं. ती ऑफिसला गेली आहे, असं ते सिद्धार्थला म्हणाले. काय केलं म्हणजे सायलीशी कॉन्टॅक्ट होईल हे त्याला कळत नव्हतं. त्याने खूप विचार केला आणि आणखी दहा मिनिटांनी त्याचा निर्णय झालेला होता. तिच्या घरी जाण्याचा.

 

सकाळपासून सायली फोन उचलत नव्हती. आता दुपारचा एक वाजत आला होता. तिच्या आईबाबांना तिने रजा घेतल्याचं माहीतच नव्हतं. त्यांना कल्पना द्यायला हवी होती, की सायली ऑफिसमध्ये नाही आणि सकाळपासून तिच्याशी काही कॉन्टॅक्ट होत नाही. पण आधी त्याला तिच्या घरी जाऊन घरातल्या कोणाला आणखी काही माहिती आहे का ते विचारायला हवं होतं. कदाचित ईशाबद्दल काही कळलं असतं. सायलीच्या घरच्यांना उगीच काही सांगून घाबरवणं बरोबर नव्हतं पण म्हणून त्यांना अंधारात ठेवणंसुद्धा चुकीचंच ठरलं असतं. सायलीच्या घरी जाऊन ती खरंच कुठे आहे हे कोणालाच माहिती नाहीये ही खात्री करूनच मग त्यांना सगळं सांगायचं असं त्याने ठरवलं. अर्थात आत्ता एक खूप महत्वाचे क्लायंट येणार होते आणि सायलीही नव्हती त्यामुळे पुढचा एक तास तरी त्याला ऑफिसमधून बाहेर पडता आलं नसतं. सुदैवाने तेवढया वेळात सायली किंवा ईशाचा फोन आला असता तर मग काळजीचं काहीच कारण नव्हतं, मात्र क्लायंटबरोबरची मिटिंग संपेपर्यंतसुद्धा त्यांच्याबद्दल काहीच कळलं नाही तर मात्र सायलीच्या घरी जायचंच, असं सिद्धार्थने ठरवलं.

————————–

काय झालं सुजय? काका काय म्हणाले? बोलणं झालं ना त्यांच्याशी?” सायलीने फोन उचलता उचलता सुजयवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला.

 

बोलणं झालं सायली, पण ईशाबद्दल तसं काहीच कळलं नाही.” सुजय

 

म्हणजे काय ? काय म्हणाले ते? त्यांना कुठपर्यंत सोडलं ईशाने?” सायली

 

काकांना घेऊन ती स्टेशनपर्यंत गेली पण ब्रिज चढायच्या आधी त्यांना म्हणाली की तिला काहीतरी एक महत्वाचं काम आठवलंय आणि ऑफिसमध्ये काहीतरी महत्वाचा मेल पाठवायचाय आणि ते ऑफिसचं सगळं कामाचं तिच्या लॅपटॉप वर आहे म्हणाली. त्यांना म्हणाली तुम्ही जाल ना नक्की नीट? मला आत्ता लगेच करायला हवंय ते काम, अकरा पर्यंत खरं तर तो मेल पाठवायचा होता, बॉस खूप वैतागतील वगैरे म्हणाली. मग काका तिला म्हणाले की तू काही काळजी करू नकोस, मी जाईन नीट म्हणून. मग ती तिथूनच मागे वळली. म्हणजे खरं तर ती घरी गेलेली असणार. आर यु शुअर ती घरी गेली नाहीये?” सुजय

ईशाने असं का सांगितलं हे सायलीला चांगलंच कळत होतं. हा तर त्यांच्या प्लॅनचा भाग होता. ईशा काहीतरी कारण सांगून त्यांना मधेच सोडून मागे वळणार आणि त्यांच्यावर नजर ठेवणार असं त्यांचं ठरलं होतं आणि ईशाने तेच केलं होतं. पण मग नंतर ती गेली कुठे?

सायली? हॅलो ….आर यु देअर ?” सुजयचा आवाज कानावर आला तशी सायली तिच्या विचारातून बाहेर आली.

 

हो हो सॉरी, मी माझ्याच विचारात होते जरा….काय म्हणालास तू? घरी गेलीये का? नाही अरेघरी नसणार तीनाहीतर मला कळलं असतं ना कोणाकडून तरी….पण काका काही म्हणाले का अजून, म्हणजे वाटेत त्यांना काही म्हणाली असेल किंवा काही अंदाज आहे का त्यांना…?” सायली

 

नाही सायली, मी विचारलं तेही काकांना, पण ते म्हणाले की स्टेशनला जाईपर्यंत ती असं जनरल बोलत होती, तिच्या घरी कोण कोण आहे सांगत होती. माझ्या मावशीची आणि घरातल्या बाकीच्यांची चौकशी करत होतीतिच्या नोकरीबद्दल वगैरे म्हणजे आपण जनरल गप्पा मारतो तसं….” सुजय

 

मग आता काय करू मी..मला काहीच सुचत नाहीये…..तिला न घेता घरी गेले तर काय सांगू घरी? आय होप ती ठीक असेल…”

सायलीचे डोळे पुन्हा एकदा भरून आले. पण तिने कसाबसा भावनांवर ताबा ठेवला. पण सुजयला मात्र तिची परिस्थिती कळत होती. सायली अशी रडताना डोळ्यांसमोर आली आणि त्याला कसंतरीच झालं.

शांत हो सायली. मी येतो तिकडे. तू स्टेशनच्या एरियातच आहेस ना. प्लिज तिकडेच थांब. मी येतो, आणि मग आपण घरी जाऊ. ” सुजय

 

ईशाला न घेता मी घरी जाणार नाहीये…” सायली जवळजवळ ओरडलीच.

 

ओकेमी तिथे येतो तर, मग बोलू. पण प्लिज तिथेच थांब…” सुजय

सुजयबरोबर बोलून झाल्यावर सायली जवळच्याच एक बाकावर बसली. हे काय होऊन बसलंय? ईशा, कुठेयस तू? ठीक आहेस ना, प्लिज माझ्या समोर ये, निदान मला फोन तरी कर ….आत्ता…………मनातल्या मनात आक्रोश चालला होता. हा सुजय तरी खरं बोलतोय का? खरंच त्याला माहीत नसेल ईशाबद्दल काही? आपण घरी जाऊन काय सांगणार आता? आणि ईशातिला काही झालं नसेल ना? सायलीच्या मनात शंभर विचार एकाच वेळी गर्दी करत होते. पण त्यातला कुठलाच विचार दिलासा देणारा नव्हता. तिने पर्समधून मोबाईल काढून बघितला. ईशाचा किंवा कुठल्या अननोन नंबर वरून आलेले कुठलेही कॉल्स नव्हते. सिद्धार्थचे मात्र तीनचार कॉल्स दिसत होते. आत्ताच केलेले होते, सुजयशी बोलत असताना आलेले असावेत. आता तिला पुन्हा सिद्धार्थचा मगाशी वाचलेला मेसेज आठवला. त्याला काहीतरी महत्वाचं कळलंय असं लिहिलं होतं त्याने. काय सांगायचं असेल त्याला? काय कळलं असेल? विचारावं का त्याला?

 

तिने लगेचच मोबाईलवरून त्याला कॉल करण्याचं ठरवलं. पण ती नंबर डायल करणार तेवढ्यात,

सायली …” सुजयचा आवाज.

 

सुजय तू? एवढ्या लगेच कसा आलास? “

सायलीने मोबाईल पर्समध्ये ठेवला. आता सुजयसमोर काहीच बोलता येणार नव्हतं.

मगाशी फोन केलास तू, तेव्हा तुझ्या आवाजातलं टेन्शन जाणवलं आणि सगळी कामं सोडून लगेच निघालो. काकांना गाडीतूनच फोन केला. आणि आत्ता तुला फोन केला तेव्हा मी स्टेशनच्या मागच्या पार्किंगमध्ये गाडी पार्कच करत होतो….” सुजय

 

पण तरी वीसपंचवीस मिनिटं एकूणतुझं ऑफिस इथून दीड तासावर तरी असेल….” सायली

 

हो बरोबर आहे, पण मी ऑफिसमध्ये नव्हतो ना….सकाळी आपण भेटलो आणि मग नंतर म्हटलं की इथे जवळच्याच एरियामध्ये काही कामं होती, एक क्लायंटचं ऑफिसपण इथून जवळ आहे. एरव्ही ऑफिसमधून कोणाला पाठवलं असतं पण म्हटलं आज मी इथेच आहे तर मग सगळी कामं करून दुपारी ऑफिसला जाऊ. पण बरं झालं, मी लगेच येऊ शकलो ना….आर यु ओके नाऊ? ईशाचा काही फोन आला का?” सुजय

 

नाही…” सायली

 

चल आपण घरी जाऊ…” सुजय

 

घरी? कोणाच्या?….” सायली

 

तुमच्या घरी अर्थात. आईबाबा आले असतील तर त्यांना सांगायला नको का ईशा सापडत नाहीये तेकदाचित त्यांना काहीतरी फोन आला असेल तिचाअसं इथे रडत बसून ती सापडणार आहे का? चल निघूया…” सुजय

सायलीकडे हे मान्य करण्यावाचून काही पर्याय नव्हता. ती मुकाट्याने उठली आणि सुजयच्या मागून चालायला लागली.

————————————————–

जवळपास अडीज तासांनंतर सिद्धार्थ सायलीच्या घरापाशी येऊन पोहोचला. अजूनपर्यंत त्याला सायली आणि ईशा कोणाचाच फोन आलेला नव्हता. त्याची काळजी क्षणाक्षणाला वाढत होती. सायलीच्या घराची बेल वाजवताना त्याच्या छातीत धडधडत होतं. तिच्या आईबाबांना ह्या सगळ्याबद्दल कल्पना असेल का? त्यांना सांगण्याची वेळ आली तर नक्की काय सांगायचं? आणखी थोडा वेळ सायलीची वाट बघायला हवी का? त्याला अनेक प्रश्न पडले होते.

 

समोर सायलीच्या बाबांना पाहून त्याने चेहऱ्यावर कसंबसं हसू आणलं.

अरे तू सायलीच्या ऑफिसमधला ना?”

 

हो काका, मी सिद्धार्थ. दुपारी मी फोन केला होता तेव्हा तुम्हीच उचलला होतात.” सिद्धार्थ

 

हो का? माझ्या तेव्हा लक्षात नाही आलं. पण मी म्हटलं सायली ऑफिसला गेली आहे, तेव्हा काही बोलला का नाहीस, म्हणजे तिच्या ऑफिसमधूनच बोलतोय वगैरे.? असो….पण तू आत ये नासॉरी तुला दरवाजातच उभं केलं…” सायलीचे बाबा

 

हो म्हणजे सांगायचं राहिलं..” सिद्धार्थ आत येता येता म्हणाला.

 

पण तुझं काम झालं नसेल ना त्यामुळे?”

 

म्हणजे?” सिद्धार्थ

 

अरे म्हणजे सायली रजेवर होती म्हणून काही कामाचं बोलायलाच फोन केला असशील ना? मग ती फोनवर भेटली नाही त्यामुळे काम राहिलं असेल ना तुझं?” सायलीचे बाबा

 

ओह..अच्छा..तसं होयनाही काका, झालं ते काम नंतर….”

सायलीच्या बाबांना ती रजेवर आहे हे माहीत नव्हतं, मग आता कसं कळलं ह्याचा तो विचार करत होता.

ओकेगुड….हे बघ त्या खोलीत आहेत सगळेनुसता दंगा करतायतजा तू पणआणखी एक मेंबर मिळेल त्यांना…” सायलीचे बाबा

 

काय ? म्हणजे ….सायली पण ? इथेच आहे?” सिद्धार्थ गोंधळला.

 

हो, अर्थात, तू सायलीकडेच आलायस ना…” सायलीचे बाबा हसत हसत म्हणाले.”तिनेच तर आल्यावर सांगितलं मला ती रजेवर आहे ते …”

 

हो, ते बरोबर आहे…”

सिद्धार्थ गोंधळला होता पण सगळं टेन्शन असं एका क्षणात दूर गेल्यामुळे त्याच्याही नकळत त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हसू फुललं होतं.

जा तूहे बघ ह्या पॅसेजमधून आत गेल्यावर डाव्या हाताची खोली. सायलीची आई सगळ्यांसाठी कॉफी आणते आहे. तुला कॉफी चालेल की चहा आणू?”

 

कॉफी आवडते मला काका…” सिद्धार्थ पॅसेजच्या दिशेने आत जात म्हणाला.

डाव्या बाजूच्या खोलीतून हसण्याखिदळण्याचे आवाज येत होते. एक क्षणभर त्याला खूप दुखावलं गेल्यासारखं वाटलं. सायलीच्या काळजीने आपण एवढे धावत आलो पण ती मात्र इथे मजेत आहे. आपल्याला कॉलबॅक न केल्याबद्दल, आपल्या मेसेजला रिप्लाय न केल्याबद्दल तिला काहीच वाटलं नसेल? आपल्याला वाटणारी काळजी तिला जाणवली नसेल का? तिला न भेटताच परत जावं असं एकदम तीव्रतेनं त्याला वाटलं. पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःच्या भावनांना यावर घातला.

 

कुल डाऊन सिद्धार्थ. एवढा हायपर होऊ नकोस. तुझं सायलीवर प्रेम आहे, पण तिचं प्रेम आहे का तुझ्यावर? कुठल्या हक्काने तिच्याकडून अपेक्षा करतोयस? तिला ह्या सगळ्यात मदत करण्याचा, तिची साथ देण्याचा निर्णय तुझा होता. पण मग ते करताना तिच्यात स्वतःला आणखी गुंतू न देण्याची काळजीसुद्धा तुला घ्यावीच लागणार. असेल ती काही कामात बिझी, मेसेज कदाचित बघितलाही नसेल, काहीही असेल पण तिने काय करायला हवं होतं हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. ”

 

सिद्धार्थ असा विचारात असतानाच खोलीचं दार उघडलं. सिद्धार्थने मान उचलून वर पाहिलं. समोर सायली उभी होती. खूप मनापासून हसत होती. तिला इतकं सुंदर हसताना बघून सिद्धार्थ क्षणभर भान हरखून तिच्याकडे बघतच बसला. काल सायली त्याच्यावर रागावून गेली त्यानंतर आज तो तिला भेटत होता. आणि आज ती इतकी गोड हसत त्याच्या समोर आली की ती त्याच्यावर रागावली होती तेच तो विसरला.

सिद्धार्थ? तू इथे ?”

सायलीच्या हाकेने तो एकदम भानावर आला. सायलीच्या मागून ईशाही बाहेर येत होती.

सायली, आणि ईशा तू पण आहेस इथेच? बरं झालं, मला खूप महत्वाचं काहीतरी कळलंय….”

सिद्दार्थ इतका उत्साहाने बोलत होता की त्याला बघून हाताने थांबण्याची खूण करत असलेल्या सायली आणि ईशाकडे त्याचं लक्षच गेलं नाही. त्याला फक्त दिसला तो त्या दोघींच्या मागून उभा राहिलेला सुजय.

तू?” नकळत सिद्धार्थचा स्वर जरा चढला.

 

सिद्धार्थ अरे तू ओळखलं नाहीस का ह्याला? हा सुजय, माझा फियॉन्सी….” सायलीने सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

 

ओहहा, हाओळखलं….” सिद्धार्थला त्याची चूक लगेच लक्षात आली.

 

सुजय, हा सिद्धार्थ. माझा कलीग आहे ऑफिसमधला.” सायली

 

हाय सिद्धार्थ.” सुजय

 

हाय. सॉरी तुमचं सगळ्यांचं काही चाललं होतं आणि मी मधेच आलोय का? ” सिद्धार्थ

 

अरे नाही. माई आजी आलीये ना, तिच्याबरोबर सगळे टाईमपास करत होतो. ये ना आत…” ईशा

आत बेडवर माई आजी बसली होती. गोरीपान, सगळे दात काढलेले त्यामुळे अजूनच गोड दिसत होती. तिच्यात आणि अनिकेतमध्ये काहीतरी जोक झाला असावा, ते दोघे एकमेकांना टाळ्या देऊन मोठमोठ्याने हसत होते.

ही आमची माई आज्जीईशा आजीच्या गळ्यात पडत म्हणाली.

 

माई आजी, हा सिद्धार्थ. माझ्या ऑफिसमध्ये आहे.” सायलीने ओळख करून दिली.

 

नमस्कार करतो आजीसिद्धार्थने खाली वाकत म्हटलं.

 

असुदे बाळा. आमची सायली आहेच अशी लाघवी, बरं का?” माई आजी

 

माई आजी, आता हे मधेच काय ?” सायली

 

अगं, तू एक दिवस ऑफिसला गेली नाहीस तर तुझ्या मित्र मैत्रिणींना तुझी एवढी आठवण आली की ते तुला भेटायला घरी आले. म्हणून म्हटलं हो, आहेसच तू एवढी लाघवी. बघताबघता सगळ्यांना जीव लावतेस. ” माई आजी

सिद्धार्थने चमकून आजीकडे बघितलं. आज्जीला आपल्या मनातल्या सायलीबद्दलच्या भावना कळल्या आहेत की काय, असंच एक क्षणभर त्याला वाटून गेलं.

 

पण सुजयला ते अजिबातच आवडलं नव्हतं. माई आजीचं बोलणंही आणि सिद्धार्थचं तिथे येणंसुद्धा. सिद्धार्थ ईशालासुद्धा ओळखत होता म्हणजे कदाचित तो सायलीच्या घरातल्या सगळ्यांनाच ओळखत होता. माई आजी म्हणाली तसं सायली एक दिवस ऑफिसला गेली नाही म्हणून लगेच तो तिला भेटायला आला होता का? पण मग मगाशी तो आल्या आल्या काय म्हणाला होता, त्याला काहीतरी कळलंय असं काहीतरी. कशाबद्दल बोलत होता तो? कदाचित ऑफिसमधलं काहीतरी कामाचं असू शकतं. पण मग ईशाचा कसा काय संबंध असू शकतो त्याच्याशी? तो म्हणाला की बरं झालं ईशापण आहे, मला काहीतरी कळलंय. नाही, ऑफिसमधलं नक्कीच नसणार. मग काय असेल? काहीही असलं तरी सिद्धार्थच्या येण्यामुळे त्याच्या डोक्यात धोक्याची घंटा किणकिणली होती.

 

एक मिनिटात त्याने विचार केला. सिद्धार्थला पेचात पकडण्यासाठी हा क्षण अगदी योग्य होता.

पण आजी, तो सायलीला भेटायला वगैरे आलाय असं मला नाही वाटत. काहीतरी कामासाठी आलाय बहुतेक. सायलीला काहीतरी सांगायचंय असं म्हणत होता, हो ना सिद्धार्थ? “

हा मुद्दाम आपल्याला प्रश्न विचारून पेचात टाकतोय हे सिद्दार्थला कळत होतं. पण काहीतरी उत्तर द्यावंच लागणार होतं.

हो, म्हणजे तुझंही बरोबर आहे आणि आज्जींचंही. मी सायलीला भेटायला पण आलोय आणि काही कामासाठी पण आलोय.”

मग मात्र पुढचा अर्धा तास सगळेजण पुन्हा पहिल्यासारखे हसतखिदळत गप्पा मारत होते. सुजय मात्र सगळ्यात भाग घेता घेता सिद्धार्थवरही बारीक नजर ठेवून होता. का, कोण जाणे पण सिद्धार्थच्या येण्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता.

———————————-

सायलीच्या घरातून सिद्धार्थ निघाला खरा, पण त्याच्या डोक्यातले विचार मात्र सुजय आणि सायलीभोवतीच होते. सुजय तिथे घरी असल्यामुळे सिद्धार्थ तिथे जाऊन काहीच उपयोग झाला नव्हता. सगळ्यांच्या आणि महत्वाचं म्हणजे सुजयच्या समोर त्याला तिथे सायलीशी एकटीशी बोलणं शक्य नव्हतं. बरं, ऑफिसचं काम आहे म्हणून दुसरीकडे जाऊन बोलणंही शक्य नव्हतं. ऑफिसचं काम सुजयच्या समोर डिस्कस करणं अगदी शक्य होतं, त्यामुळे दुसऱ्या खोलीत जाऊन ऑफिसच्या कामाच्या बाबतीत एवढं काय बोलायचं असेल असा प्रश्न त्याला पडला असताच. ईशा आणि त्याची एवढी चांगली ओळख आहे, हे त्याला सुजयला दाखवायचं नव्हतं. त्यामुळे त्याला ईशाशीही नीट बोलता आलं नव्हतं.तसंही त्याला सिद्धार्थवर थोडा संशय आल्याचं सिद्धार्थला जाणवलं होतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याचा संशय वाढणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी होती. त्याला आणखी शंका येऊ नये, म्हणून सिद्धार्थने ऑफिसमधल्या काही गोष्टी मुद्दामच त्याच्यासमोर सायलीबरोबर डिस्कस केल्या. काही बाबतीत बॉस म्हणून तिचं अप्रूव्हल घेतलं, आणि मग सगळ्यांचा निरोप घेऊन तो निघाला. एखादा ऑफिसचा कलीग जसा आणि जितका वेळ घरी भेटायला आणि कामाचं बोलायला येईल तितकाच वेळ तो सायलीच्या घरी थांबला.

 

पण अर्थात तो जे सांगायला आला होता ते त्याला सायलीला सांगताच आलं नव्हतं. त्याला सायली आणि ईशाला आणखी काय कळलंय हेसुद्धा अजून माहीत नव्हतं, त्याबद्दलही त्याला जाणून घ्यायचं होतं. पुढे काय करायचं, सायलीने रजा कशासाठी घेतली हे सगळंच त्याला तिच्याशी बोलायचं होतं. पण काहीच झालं नव्हतं. काय करावं? निदान, कौस्तुभच्या आईकडून जे कळलं होतं ते तरी सायलीला लवकरात लवकर कळायलाच हवं होतं.

 

तिला फोन करावा आणि थोडक्यात सगळं सांगावं असं त्याच्या मनात आलं. अर्थात, तिला किती बोलता आलं असतं ह्याची खात्री नव्हतीच. कारण सुजय तिच्या आजूबाजूलाच असणार ह्याची त्याला खात्री होती. एकूण सगळ्यांच्या बोलण्यावरून सगळ्यांनी सुजयला रात्री जेवून जाण्याचा आग्रह केलाय हे त्याला जाणवलं होतं. सायलीच्या आईने त्यालाही खूप आग्रह केला होता, पण त्याने काहीतरी कारण सांगून तिथून काढता पाय घेतला होता. सुजयचं सतत आपल्यावर लक्ष आहे, असं त्याला जाणवत होतं. त्यामुळे त्याला संशय येण्यापेक्षा उद्या पुन्हा सायलीला भेटून सगळं सांगावं असा विचार त्याने केला. पण आता घरी जाताना मात्र त्याला सायलीला सगळं सांगता आलं नाही त्याबद्दल वाईट वाटत होतं.

 

थोडासा विचार करून त्याने ईशाचा नंबर डायल केला. ईशाशी तरी बोलणं व्हावं अशी प्रार्थना करतच तो तिने फोन उचलण्याची वाट बघत बसला.

—————————–

बसमध्ये बसायला जागा मिळाल्यावर सिद्धार्थ डोळे मिटून शांत बसला. ईशा आत्ताही फोन उचलत नव्हती. सायलीशी आता पुन्हा उद्याच बोलता येणार कदाचित, असा विचार करून तो पुन्हा आपल्या विचारात मग्न झाला. सुजयबद्दल आपण अंदाज बांधतोय ते बरोबर आहेत ना? एवढी मोठी फसवणूक? सायलीला सांगण्याआधी पुन्हा एकदा खात्री करायला हवी आहे का?

कौस्तुभच्या आईंची काही गडबड नसेल ना होत? नाही, पण त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही….नकळत विचार करताना कौस्तुभच्या आईबरोबर झालेलं त्याचं बोलणं त्याला पुन्हा आठवलं.

—————————-

त्याच वेळेला कौस्तुभच्या घरी ….

फोनची रिंग वाजली. कौस्तुभच्या आईने फोन उचलला.

हॅलो…”

 

हॅलो, आई, मी बोलतोय….” कौस्तुभ

 

कौस्तुभ, अरे मीच फोन करणार होते तुला. सकाळपासून काहीच फोन नाही तुझा?” आई

 

अगं गावात आल्यापासून माझ्या मोबाईलला रेंजच नाही. पब्लिक फोनवरून फोन केलाय. आत्ताच जेवलो आणि जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो तेव्हा वेळ मिळाला. ” कौस्तुभ

 

ते ठीक आहे, पण पोहोचल्याचा एक फोन करायचास ना…” आई

 

सॉरी गं, आल्यापासून सगळी कामं आवरायच्या मागे होतो. ते अंगणातलं सगळं साफ करून घ्यायला गडी बोलावलाय उद्या सकाळी. बरं, ऑफिसमधून काही फोन नव्हता ना, मोबाईल बंद आहे. कदाचित काही कामासाठी कोणाला फोन करायचा तर ते घरच्या फोनवर करतील…” कौस्तुभ

 

नाही, फोन तर नाही आला कोणाचा, पण सकाळी कुणी तुझ्या ऑफिसमधला पराग म्हणून आला होता. तुझी बदली झाली म्हणून भेटायला आला होता.” आई

 

हो, मला फोन आला होता त्याचा. ऑफिसमधला नाहीये गं तो, सांगतो मी नंतर. बरं आणखी काही ?” कौस्तुभ

 

आणखी काही नाही. तुझा बॉस आला होता. बॉस आणि मित्र….” आई

 

कोण ? सान्यांचा सुजय?” कौस्तुभने त्याच्याच आईच्या स्टाईलमध्ये विचारलं

 

माझी थट्टा करतोस ? हो, सान्यांचा सुजयच आला होता. तुला भेटायला. तो पराग गेला आणि सुजय आला आणि सुजय गेल्यावर तो पराग पुन्हा आला, त्याचा पाऊच राहिला होता इथे…..”

—————————–

ट्रॅफिक सुटल्यामुळे तेवढ्यात बसचा वेग वाढला. त्याबरोबर सिद्धार्थच्या विचारांचा वेगही हळूहळू वाढत होता. पाऊच घेण्यासाठी तो परत कौस्तुभच्या घरी गेला तेव्हा त्याचं कौस्तुभच्या आईशी जे बोलणं झालं होतं, ते तो आता पुन्हा आठवून पाहत होता…..

अरे हा काकू, आता तुमच्याकडे कोणी आलं होतं का? म्हणजे तुमच्याकडेच आला होता ना तो? मी कुठेतरी बघितलंय त्याला, पण आठवत नाही नीट. काय नाव त्याचं?” सिद्धार्थ

काकू नवलाने त्याच्याकडे पाहत राहिल्या.

अरे तू कौस्तुभच्या ऑफिसमध्ये काम करतोस ना? आणि मग त्याच्या बॉसला कधी बघितलं नाहीस ऑफिसमध्ये?”

 

बॉस? कोण ….नाही म्हणजे मी दुसऱ्या ठिकाणी काम करतो, कौस्तुभच्या इथे नाहीत्याचा बॉस म्हणजे….”

 

हा काय? हा आत्ता येऊन गेला तो त्याचा बॉस, तसा त्याचा जुना मित्रच आहे तो, फार मोठ्या पोझिशनला आहे कौस्तुभच्या कंपनीमध्ये. त्याचंच नाव विचारलंस ना तू?” कौस्तुभची आई

 

तो कौस्तुभचा बॉस होता?” सिद्धार्थ गोंधळला.

त्याच्या समजुतीप्रमाणे सुजय मार्केटिंग डिपार्टमेंटचा हेड होता आणि कौस्तुभही मार्केटिंगलाच होता. म्हणजे कौस्तुभचा बॉस सुजयच असायला हवा. किंवा त्याचं ड्युएल रिपोर्टींग असेल. हा दुसरा बॉस असेल त्याचा. अच्छा, म्हणजे कौस्तुभचे दोन्ही बॉसेस हे सगळं करतायत तर

अच्छा, कौस्तुभचा बॉस का? तरीच मला बघितल्यासारखं वाटलं त्यालाकाय नाव त्याचं काकू?” सिद्धार्थ

 

त्याचं नाव सुजय साने.”

 

काय ?” सिद्धार्थ इतक्या जोराने ओरडला की काकूही दचकल्या.

हा सुजय साने ? मग सायलीशी साखरपुडा झाला तो सुजय साने कोण आहे?

एवढा दचकलास का तू ?” काकू

 

काही नाही काकू. असंच. नावातलं साम्य. दुसरं काय? माझ्या ओळखीचा पण एक सुजय साने आहे, म्हणून तेच नाव ऐकून एकदम आश्चर्य वाटलं.” सिद्धार्थ

 

हो का? अरे गम्मत सांगते तुला. हा सुजयही त्याच्या एका मित्राला एकदा ऑफिसमध्ये घेऊन आला होता आणि कौस्तुभशी त्याची ओळख झाली. त्या मित्राचं नावही सुजय सानेच होतं. आणि त्याहून गम्मत म्हणजे, त्याला कौस्तुभ मध्ये त्याच्या कुठल्यातरी जुन्या मित्राचा भास झाला . अरे म्हणूनच तर कौस्तुभला त्याने त्याच्या साखरपुड्याला अगदी आवर्जून बोलावलं हो. कौस्तुभ जरासा बुजला होता, हो, एवढी ओळख नाही, एकदाच भेटलेला. त्यात हा सुजय येणार म्हणून त्याने हो सांगितलं, पण ऐनवेळी तो काही आला नाही आणि ह्याला एकट्यालाच जावं लागलं. पण त्या सुजयने अगदी जाणवू दिलं नाही हो त्याला. अगदी जवळच्या मित्रासारखं वागला त्याच्याशी. काही नावांशीच आपलं नातं जुळतं ना, ते हे असं….” काकू अगदी भरभरून बोलत होत्या.

सिद्धार्थ जे शोधत होता, ते किती सहजपणे त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलं होतं

अरे वा, अजब आहे ना, एकाच नावाची दोन दोन माणसं ओळखीची. पण मग आता तो दुसरा सुजय साने कौस्तुभचा चांगला मित्र झाला असेल ना?” सिद्धार्थ

 

ते काही माहीत नाही मला, पण नंतर फारशी भेट झाली नसावी त्यांची. म्हणजे कौस्तुभच्या बोलण्यात काही आलं नाही तसं…..”

रस्त्यावरच्या खड्यामुळे बस ला जोरात धक्का बसला तसं सिद्धार्थने डोळे उघडले आणि जरासा सावरून बसला.

 

सायलीला लवकरात लवकर कळायला हवं हे. म्हणजे काकूंच्या एकूण बोलण्यावरून एवढं कळतंय की ग्लॉस्सीसॉफ्ट मध्ये मार्केटिंगला मोठ्या पोझिशनला असलेला सुजय साने म्हणजे, सायलीशी साखरपुडा झालेला सुजय साने नाही. पण त्या दोघांमध्ये नक्की काय ठरलं असेल आणि कौस्तुभच्या ऑफिसमधला सुजय साने, ह्या सुजयला मदत का करत असेल? का करतायत ते हे सगळं? आणि सायलीशी साखरपुडा झालेला सुजय नक्की आहे तरी कोण?

क्रमशः

2 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 21)

 1. UJVALA
  July 11, 2016

  NICE NEXT PART LAVKAR TAKA

  Like

 2. Anonymous
  July 18, 2016

  Pudhchya bhagat ti yeil bahutek…..

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on July 9, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: