अज्ञाताची चाहूल : (भाग : 22)

रस्त्यावरच्या खड्यामुळे बस ला जोरात धक्का बसला तसं सिद्धार्थने डोळे उघडले आणि जरासा सावरून बसला.

सायलीला लवकरात लवकर कळायला हवं हे. म्हणजे काकूंच्या एकूण बोलण्यावरून एवढं कळतंय की ग्लॉस्सीसॉफ्ट मध्ये मार्केटिंगला मोठ्या पोझिशनला असलेला सुजय साने म्हणजे, सायलीशी साखरपुडा झालेला सुजय साने नाही. पण त्या दोघांमध्ये नक्की काय ठरलं असेल आणि कौस्तुभच्या ऑफिसमधला सुजय साने, ह्या सुजयला मदत का करत असेल? का करतायत ते हे सगळं? आणि सायलीशी साखरपुडा झालेला सुजय नक्की आहे तरी कोण?

*********************भाग 21 पासून पुढे चालू***************

भाग 21 येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-yU

सुजयला सायलीच्या घरून जेवून निघायला साडेदहा वाजले. आजचा जवळपास सगळाच दिवस तो सायलीबरोबर होता. सकाळी काकांना भेटायला गेल्यावर सायली अनपेक्षित भेटली. त्यानंतर ते रेस्टोरंटमध्ये गेले, त्यानंतर तो आणि सायली फिरायला गेले. मग नंतर पुन्हा थोडा वेळाने ईशा सापडत नाही म्हणून सायलीचा फोन आला आणि तो पुन्हा सायलीला भेटला. त्यानंतर त्याने तिला घरी सोडलं. तेव्हापासून तो सायलीच्या घरीच होता. खूप छान वाटत होतं त्याला.

आता थोड्याच दिवसात सायलीशी लग्न होईल, आणि मग काहीच लपवाछपवी करावी लागणार नाही, त्याच्या मनात आलं. त्यालाही सारखं खोटं बोलण्याचा, सगळं लपवण्याचा, प्रत्येक वेळेला नीट विचार करून बोलण्याचा कंटाळा आला होता. सायलीचे बाबा आज बोलताना म्हणाले होते की दोन दिवस त्यांना गावाला जायला लागल्यामुळे लग्न लवकर करावं की नाही ह्याबद्दल सायलीशी त्यांचं काहीच बोलणं झालं नव्हतं. पण उद्यापर्यंत सायलीचा आणि आमचा जो काय निर्णय होईल तो कळवतो, असं म्हणाले. त्यापुढे असंही म्हणाले की काळजी करू नकोस, तुझ्या मनात आहे तसंच होईल. त्यामुळे त्यांचा निर्णय जवळपास झालेला आहे, हे त्यालाही जाणवलं होतं. फक्त आता त्याच्याकडून येणाऱ्या त्या फोनची वाट बघत बसायचं होतं. एकदा सायली लवकरात लवकर लग्न करायला तयार झाली की काही टेन्शन नाही, त्याच्या मनात आलं.

टेन्शन नाही, असं एवढ्या ठामपणे म्हणू शकतो आपण? तो जो सायलीच्या ऑफिसमधून आला होता, सिद्धार्थ, त्याला भेटल्यापासून एवढं अस्वस्थ का वाटतंय? तो असं का म्हणाला असेल, की मला काहीतरी महत्वाचं कळलंय असंतो जे बोलला त्याचा ऑफिसच्या कामाशी नक्कीच काही संबंध नव्हता. अर्थात त्याने सायलीबरोबर काहीतरी कामाचं डिस्कस पण केलं नंतर. पण तरी तो काहीतरी वेगळं सांगायला आला होता, एवढं नक्की. आणि ईशाला सुद्धा ते कळणं गरजेचं होतं, म्हणजे ते काय असेल नक्की? त्याला माझ्याबद्दल काही बोलायचं नसेल असं ठामपणे नाही म्हणू शकत मी. मी घेतलेली रिस्क एवढी मोठी आहे, की सायलीला थोडा जरी संशय आला तरी ती सहज शोधून काढू शकते, की तिला वाटतोय तो सुजय साने मी नाहीये. नावाने मी पण सुजय सानेच असलो तरीही मी ओळख त्याची वापरली आहे.

पण हे सायलीला कसं कळेल ? कोण सांगणार तिला? खऱ्या सुजयचे आईबाबा तर यु.एस ला आहेत, त्यामुळे ते कोणाला भेटायचा प्रश्नच नाही. सुजय स्वतः तर कधीच सांगणार नाही, कारण मग तो सुद्धा अडकेल ह्यात. माझे ह्या नाटकातले आईवडील म्हणजे सायलीच्या दृष्टीने मिस्टर आणि मिसेस साने, हे तर आधीच त्यांच्या-त्यांच्या घरी परत गेलेत. नाटकातली माझी नागपूरची मावशी साखरपुडा झाल्यावर लगेच तिच्या गावाला निघून गेली. राहता राहिले तिचे मिस्टर झालेले हे काका, त्यांनाही मी आज त्यांच्या घरी जायला लावलंय. नाटकातली माझी बहीण नेहा ही तर नाशिकला असते ह्या नावाखाली कोणाच्याच संपर्कात नाही.

आता खऱ्या सुजयची ही सगळी नाती मी फक्त माझ्या सोयीसाठी वापरली आहेत. उद्या सायलीच्या घरच्यांना कोणी सांगितलं की सुजयला एक मावशी आहे आणि ती नागपूर ला राहते, तर ती मावशी फक्त मी उभी केली. पण म्हणून नागपूरला असलेल्या खऱ्या मावशींना हे सगळं थोडंच कळणार आहे? सुजयच्या बहिणीचंही तसंच. तिला कुठे कळणार आहे की तिच्या नावाने एक वेगळ्याच मुलीला सुजयची बहीण म्हणून आम्ही उभं केलंय. आणि तसंही हा खरा सुजय यु.एसला असलेल्या त्याच्या आईबाबांशी, नाशिकला असलेल्या बहिणीशी आणि बाकी सगळ्या नातेवाईकांशी संपर्कात आहेच, स्वतःची खुशालीही मध्ये मध्ये कळवत असतो त्यांना. त्यामुळे आत्ता त्यांच्यापैकी कोणीही मुंबईत येऊन त्याला भेटायचा वगैरे प्रयत्न करणार नाही, एवढं नक्की.

त्यांच्या बिल्डिंग मधले कामत, सध्या पनवेलला असतात त्यामुळे त्यांना साने यु.एसला गेल्याचं माहितीच नाही. आता बिल्डिंगमधल्या इतर कोणाकडून साने यु.एसला गेल्याचं त्यांना कळलंही असेल, पण म्हणून त्यांना सुजयच्या चौकशीसाठी आलेल्या फोनचा संशय यायचं काहीच कारण नाही. फार तर साने अमेरिकेला जाऊन, तिथे बसून मुलाचं लग्न जुळवतायत ह्याचं नवल वाटेल त्यांना. कामतांकडून आणि ऑफिसमधूनही माझ्याबद्दल चांगलीच माहिती मिळणार ह्याची मला खात्रीच होती, कारण ती माहिती खऱ्या सुजयबद्दलची होती.

एवढी सगळी काळजी घेतली आहे मी, एवढं सगळं सांभाळून घेतलंय, सायली किंवा तिच्या घरच्यांना संशय येण्याचा प्रश्नच नाही. सायलीच्या बोलण्यात असा संशय कधी दिसला नाही. पण ती वागताना, बोलताना जरा तुटक वागते , थोडं अंतर ठेवूनच वागते असं मात्र वाटतं कधीतरी. अर्थात मीच तिला भेटायला हवंय, तरच ती कम्फर्टेबल होईल ना माझ्याबरोबर. पण तिला सारखं सारखं भेटलं आणि मग तिला काही विचित्र अनुभव आले तर अर्थातच तिला संशय येणार. त्यामुळे तिला जास्त न भेटणंच चांगलं. ह्या सिद्धार्थवर मात्र नजर ठेवायला हवी. थोडं सावध राहायला हवं त्याच्यापासून………

गाडी सिग्नलला थांबली होती तेव्हा असे सगळे विचार सुजयच्या मनात येत होते, पण तेवढ्यात समोरचा सिग्नल ग्रीन झाला आणि थांबलेल्या सगळ्या गाड्या पुढे निघाल्या, तसं सुजयनेही सिद्धार्थचं पुढे काय करायचं, हा विचार काही वेळापुरता बाजूला ठेवला आणि तोसुद्धा पुढे निघाला.

——————————————–

सायले, बोल ना गं माझ्याशी, आत्तापर्यंत पन्नास वेळा सॉरी म्हटलंय तुला. आता परत म्हणते, आय एम सॉरी. परत अशी गम्मत चुकूनही करणार नाही…..बोल ना गं….”

ईशा अगदी काकुळतीला आली होती. पण सायलीने तिचा हात झटकून टाकला आणि पुन्हा पुस्तकात डोकं घुसवलं. तसं ईशालाही राग आला.

जाऊदे, एवढाच राग आलाय, तर बस तो कुरवाळत. एवढ्याशा गोष्टीसाठी एवढी रागावून बसली आहेस. मी फक्त गम्मत करत होते, किती वेळा सांगू? पण तुला समजूनच घ्यायचं नसेल तर राहूदेत. मला काय करायचंय? मी जाते माई आजीच्या खोलीत झोपायला. ….”

ईशा खोलीचं दार उघडून जायला निघाली तसं सायलीने हातातलं पुस्तक खाली आपटलं.

एक मिनिट, काय म्हणालीस तू आत्ता? एवढीशी गोष्ट? तुला हे सगळं म्हणजे एवढीशी गोष्ट वाटते का? ईशा, गम्मत, मस्करी करायचं पण ना एक लिमिट असतं. तुला माहीत आहे का, तुझी वाट बघत असताना माझ्या मनात काय, काय विचार आले ते. तू त्या काकांच्या मागे गेलीस हे त्यांना कळलं की काय, आणि त्यांनीच काही केलं असेल की काय, असंही वाटायला लागलं मला. तुझ्यासाठी त्या, त्या सुजयला फोन करावा लागला मला….”

पण तुला त्याला फोन करायची काय गरज होती?” ईशा बेडवर बसत म्हणाली

ईशा तुला कधीच सिरीयस होता नाही येत का गं? हे सगळं फक्त आपल्या दोघींना माहीत आहे. आईबाबांना काहीच माहीत नाहीये. तुला काही झालं असतं तर सगळी जबाबदारी माझी होती. मी जवळपास तीन तास तुझी वाट बघितलीतीन तास….जोक वाटला का तुला? त्या वेळेला सुजयला फोन करण्याशिवाय काहीच ऑब्शन नव्हतं माझ्याकडे. तू काकांना सोडून कुठे गेलीस हे कदाचित काकांनाच माहीत असेल असं वाटलं मला. आणि त्यांचा नंबर नव्हता माझ्याकडे. म्हणून सुजयला फोन करावा लागला. आणि इतकी धडपड करून, आई बाबांना काय सांगायचं ह्याची मनात अक्षरशः उजळणी करत मी घरी आले, तर तू काय सांगतेस मला, की माई आजी घरी आल्याचा बाबांचा मेसेज आला तुला आणि माझ्या आधी तुला तिला भेटता यावं म्हणून तू घरी आलीस? माझा विचार नाही आला का गं, की मी वाट बघत असेन तुझी. माई आजीला भेटून झाल्यावर तरी मला फोन करून सांगायचंस, पण ते पण नाही. माझे कॉल्स तर काय उचलतच नव्हतीस तू….माझ्या जागी येऊन मग विचार कर माझी काय अवस्था झाली होती ते……”सायली

सॉरी, खरंच सॉरी. आय मीन इट. अगं आपण आधी मे महिन्याच्या सुट्टीत चिपळूणला जायचो तेव्हा नाही का त्या मैदानात जायचो संध्याकाळी खेळायला. आणि खेळून झालं की घरी जाताना आपल्यात स्पर्धा लागायची कोण सगळ्यात आधी घरी पोहोचणार आणि माई आजीला भेटणार. आज काकांचा मेसेज आला आणि मला तीच आठवण झाली एकदम. म्हटलं आज तुझ्या आधी मी भेटणार तिला, आणि मग तू पण आलीस की आपण त्या सगळ्या आठवणी काढून खूप हसू. पण तुला एवढा वेळ वाट बघत ठेवायचं नव्हतं मला. मी आल्यावर मावशी म्हणाली की तुला पण मेसेज केलाय माई आजी आल्याचा. मला वाटलं की त्यांनी मी घरी आल्याचं पण कळवलंय तुला, म्हणून मी लगेच फोन नाही केला तुला. फोन पर्समध्येच राहिला आणि माई आजीला भेटण्याच्या आणि तिच्याशी गप्पा मारण्याच्या नादात मी पूर्ण विसरून गेले गं. पण नंतर आणखी थोड्या वेळानी काकांच्या बोलण्यात आलं की तू ऑफिसला गेली आहेस वगैरे. त्यांना माहीतच नव्हतं तू रजेवर आहेस आणि आपण एकत्र बाहेर गेलो होतो ते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हणजे त्यांनी तुला फक्त माई आजी घरी आल्याचं कळवलंय. मी घरी आल्याचं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्याकडून जरा गडबड झालीये, आणि मी तुला फोन करायला जाणारच होते, तेवढ्यात तू आणि सुजय घरी आलात. ”

थोडी गडबड नाही, ही खूप मोठी गडबड होती ईशा…” सायलीचा राग थोडा शांत झाला होता.

आय नो, त्याबद्दल उद्या तुला माझ्याकडून ट्रीट. ओके?” ईशा

अर्थात, त्याशिवाय सोडणार नाहीच आहे मी तुला. जेवढे पैसे आहेत तुझ्या पर्समध्ये, ते सगळे संपेपर्यंत तुझ्याकडून वसूल करणार आहे मी, कळलं ना…”सायली

कळलं. पण मॅडम अजून बरंच महत्वाचं बोलायचं राहिलंय आपलं, कळलं ना?” ईशा

काय?” सायली

अगं? विसरलीस का? त्या काकांच्या मागे मी का गेले होते?” ईशा

तू गेली होतीस ते नक्की कुठे जातात ते बघायला, पण माई आजी आली हे कळल्यावर आलीस ना सगळं अर्धवट टाकून ?” सायली

हेच, तू अजून मला कुठे ओळखलंयस? मी हातातलं काम कधीच अर्धवट सोडत नाही, आणि महत्वाचं असेल तर नाहीच नाहीईशा नाटकीपणे म्हणाली.

म्हणजे? तू केलास त्यांचा पाठलाग? कुठे गेले ते?” सायली अधीरपणे म्हणाली.

सांगते. काकांचा- म्हणजे तुझ्या बाबांचा मेसेज आला, तेव्हा आम्ही स्टेशनच्या जवळ आलेलो होतो. पण म्हटलं, आधी हे कुठे जातायत ते बघायचं आणि मगच घरी जायचंआधी लगीन कोंढयाण्याचं, आणि मग….”

ईशा, नाटकीपणा पुरे झाला. मुद्द्याचं बोल….” सायली

तुला कौतुक नाहीच आहे माझंजाऊदेतहा तरमी त्यांना सांगितलं की ऑफिसचं काहीतरी काम मी विसरले होते, अकरा पर्यंत एक महत्वाचा ईमेल करायचा होता, आणि आता घरी जाऊन लगेच ते करावं लागेल, असं सांगितलं. त्यांना असं सांगून मी मागे वळले आणि चालायला लागले. एकदोन वेळा मागे वळून बघितलं, तर ते माझ्याचकडे बघत होते. मी दिसेनाशी होईपर्यंत माझ्याकडे बघत असावेत. त्यांच्या नजरेआड झाल्यावर मी पण तिथूनच लपून त्यांच्या हालचाली बघत होते. मी नजरेआड गेल्यावर ते एकदम वळले आणि दुसऱ्या साईडने स्टेशनचा ब्रिज उतरायला लागले. मी पण त्या दिशेला गेले पण गर्दीतल्या लोकांमध्ये लपत लपत त्यांच्यावर नजर ठेवून होते. दुसऱ्या बाजूने तो ब्रिज शेवटच्या प्लॅटफॉर्मवर उतरत होता. तिथून बाहेर पडून रस्ता क्रॉस करून ते बसडेपो मध्ये गेले. म्हणजे एका बाजूला सगळ्या बेस्टच्या बसेस उभ्या असतात, आणि दुसऱ्या बाजूला बाहेरगावी जाणाऱ्या सगळ्या एस.टीज लागलेल्या असतात. तर ते बाहेरगावी जाणाऱ्या एस.टी डेपो मध्ये शिरले.”

ओके मग …?” सायली

जवळपास पंधरा मिनिटं ते बसची वाट बघत होते. तेवढ्यात तिथे चारपाच बसेस लागल्या होत्या. त्यातल्या मिरजला जाणाऱ्या बसमध्ये ते बसले. आणखी दहा मिनिटांनी ती बस सुटली, आणि मग मी पण निघाले.” ईशा

अच्छाम्हणजे मिरजेला राहतात का ते? नाही, पण असं नाही म्हणता येणार, ते मध्ये कुठेही उतरू शकतात ना…” सायली

ह्म्म….पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कुठली माहीत आहे का?” ईशा

काय सायली

ते बसची वाट बघत उभे होते ना, तेव्हा त्यांना एक फोन आला होता. ते तेव्हा तिकडच्या एका छोट्या स्टॉल वर काहीतरी मासिकं, पुस्तकं घेत होते, बसमध्ये वाचण्यासाठी असेल. त्याच दुकानाच्या मागे मी लपले होते. म्हणून मला ऐकू आलं. आणि आजूबाजूला एवढा आवाज होता, बस येत-जात होत्या, माणसांचे आवाज, फेरीवाले वगैरे. पलीकडून जे कोणी बोलत होते, त्यांना ह्यांचा आवाज जात नव्हता नीट बहुतेक. म्हणून हे एकदम मोठमोठ्याने बोलत होते. फोनवर म्हणाले, की मुंबईमधलं काम झाल्यातच आहे. आज गावाला जायला निघालोय. आणि मग पुढच्या दोनतीन दिवसात कटनीला येतो असं म्हणाले….”

काय ? कटनीला?” सायली किंचाळलीच.

होमी नीट ऐकलंकटनीलाच म्हणाले ते..” ईशा

ईशी, कटनीला नक्की काय आहे? हे सगळं जे चाललंय ना, त्या सगळ्याचं मूळ कटनीला असणार. आपल्याला शोधायला हवं…..” सायली

अगं पण कसं शोधणार? तिथे जायला लागेल ना त्यासाठी? आणि आपण दोघीच, कोणालाही न सांगता….छेशक्य नाहीये…” ईशा मान हलवत म्हणाली.

आपण दोघी नाही तर दुसरं कुणीतरी? सिद्धार्थला सांगूया का?” सायली

वा, हे बरं आहे हा सायली. काल तो नुसता थोडासा हसला तर इतकं बोललीस त्याला. चिडली होतीसआणि आता स्वतःला गरज आहे म्हणून त्याची मदत घ्यायची? हाऊ मीन….” ईशा

मीन वगैरे नाही गंमी पण विचार केला पुन्हा त्याच्यावर. मी खरंच जरा जास्तच चिडले त्याच्यावर. आज फोन करून सॉरी बोलणार होते त्याला, पण तू हा सगळा घोळ घालून ठेवलास, त्यात बराच वेळ गेला आणि नंतर मी पण विसरले. पण तोच आहे, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो.”

ईशा काहीतरी बोलायला जाणार होती तेवढ्यात सायलीच पुन्हा बोलली,

, दॅट रिमाइण्डस मी….हाऊ कूड आय फर्गेट? अगं दुपारी त्याचा मेसेज आला होता, 12 च्या सुमाराला..त्याला काहीतरी महत्वाचं कळलंय असं लिहिलंय त्यानेआणि आज घरी आला होता ते तेच सांगायला आला होता, नक्कीच. कारण तो म्हणालाही ना तसं…..पण सुजय होता म्हणून त्याला सांगता नाही आलं….ओ नो, काय सांगायचं असेल त्याला?”

“12 वाजता मेसेज आला? मग एवढा वेळ काय झोपली होतीस? आधीच विचारायला हवं होतंस त्याला….” ईशा

हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय ईशातू गायब झालीस आणि तुझ्या टेन्शनमध्ये मी सिद्धार्थचा मेसेज पण इग्नोअर केला. आणि नंतर काय तो सुजय होता बरोबर….” सायली

अच्छा, म्हणजे तो ते सांगायला घरी आला होता तर, मला वाटलं की माई आजी म्हणाली तसं तू एक दिवस ऑफिसला गेली नाहीस तर त्याने खूपच मिस केलं असणार तुला , म्हणून….”

सायलीने तिला उशी फेकून मारली.

गप्प बसथांब मी लगेच त्याला फोन करून विचारते. काय सांगायचं होतं त्याला ते आत्ताच कळायला हवं. ” सायलीने मोबाईल हातात घेतला.

सायले, खूप उशीर झालाय, 12 वाजत आलेत…” ईशा

मग काय करू?मेसेज करून विचारते….चालेल?” सायली

बघजागा आहे का विचार आधी …” ईशा

सायली मेसेज करणार तेवढ्यात दार उघडून आई खोलीत आली.

अगं हे काय, तुम्ही दोघी अजून जाग्याच? मला वाटलं, झोपल्याही असाल….”

मावशी, आम्ही दोघी कधी एवढ्या लवकर झोपतो का? तुला तर माहितीच आहे ना, रात्री दोनतीन वाजेपर्यंत तरी आमच्या गप्पा संपत नाहीत….” ईशा

हो गं बाई, पण ईशा अगं आई काळजी करतेय ना तिकडे, तू दिवसभर फोन उचलला नाहीस तिचा, शेवटी मला फोन केला तिने. मगाशीच आला होता तिचा फोन. पण सुजय जेवायला थांबला होता ना आज, त्या गडबडीत राहून गेलं सांगायचं. असं वाट बघत ठेवू नकोस गं आईला, काळजी वाटते मग….”

ईशाने जीभ चावली.

सॉरी गं, दुपारपासून मोबाईल पर्समधेच राहिलाय आणि आता नक्की डिस्चार्ज झालाय. मी करते फोन आत्ता लगेच करतेअजून जागी असेल ती कदाचित…”

आणि तुमच्या दोघींपैकी कोणीतरी माई आजीच्या खोलीत झोपेल ना? मला वाटलं तुम्ही झोपलात, म्हणून मी जाणार होते तिच्या खोलीत झोपायला. पण तुम्ही अजून जाग्या आहात तर तुम्हीच झोपा, कोणी जायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. तुम्हाला माई आजी कायम इथे राहायला हवी होती ना, आता आली आहे ती, तर तुमच्यावरच आहे तिची जबाबदारी. तसं घर नवीन आहे ना तिच्यासाठी. रात्री काही लागलं तर कुणीतरी हवं ना तिच्याजवळ….”

मी झोपणार …” ईशाने शाळेत हजेरी लावतात तसा हात वर केला.

मी पण….” सायलीनेही तिची कॉपी केली आणि मग दोघी हसल्या.

मावशी, तुझा मोबाईल देतेस? माझा मोबाईल चार्ज करावा लागेल…”

हो देते की. राहूदेत तुझ्याकडेच. सकाळी दे. अगं नाहीतर सायलीचा घे ना…”

नको तिला मेसेज करायचाय, मग फोन येईल कदाचित आत्ता….आणि मग….” ईशाने जीभ चावली.

आत्ता एवढ्या रात्री? कोणाचा? आणि कोणाला मेसेज करणार?”

सायलीने ईशाकडे बघून दात ओठ खाल्ल्याची ऍक्शन केली. ईशाने त्याकडे दुर्लक्ष केलं.

अगं मावशी, अशी काय तू? शी बाबा, तुम्हाला सगळंच समजावून सांगायला लागतं. अगं सुजयला मेसेज करणार आहे ती आणि मग त्याचा फोन येईल ….कळलं का?”

ईशा …”

सायली जोरात ओरडली आणि तिने पुन्हा ईशाला उशी फेकून मारली.

ईशा सायलीला सुजयवरून चिडवतेय असं वाटून आईही हसली. दोन दिवसांपासून वाटणारी सायलीची काळजी आत्ता थोडी कमी होत होती.

बरं बरं, चालूदे तुमचं, ईशा हा घे माझा मोबाईलमी जाते मग. लवकर जा हो माईच्या खोलीत, गप्पा मारत बसू नका. ईशा आईला फोन कर लवकर. आणि सायली लग्नाबद्दल उद्या काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. आधीच थांबलेत ते लोकंउद्या बोलू ..चला झोपा लवकर….”

खोलीचं दार लावून आई निघून गेली, तसं सायलीने ईशाकडे बघितलं. लग्नाच्या विषयामुळे ती अस्वस्थ झाली होती. ईशाला तिच्या मनातली घालमेल समजली, तिने तिच्या खांद्यावर थोपटलं आणि मग ती उठून आईला फोन करायला म्हणून खिडकीपाशी गेली.

ईशा आईशी बोलायला लागली तसं सायलीनेही सिद्धार्थला मेसेज करायला मोबाईल हातात घेतला.

————————————————

अहो, जागे आहात ना…?” सायलीची आई

हो, बोल ना..” बाबा

अहो उद्या सान्यांकडे फोन करून लग्नाबद्दल काय ते कळवायला हवंय…” आई

हो गं, आहे माझ्या लक्षात. सायलीशी बोलायचंय ना, आणि माई आल्यात आता, त्यांचंही मत घेतलं पाहिजे. मोठ्या आहेत त्या घरातल्या. ”

सायलीशी आणि माईशी उद्या बोलूच हो, पण मला मात्र असं वाटतं हो, की सायलीचा निर्णय झालाय. ती तयार असणार बघा आत्ता काही दिवसात लग्न करायला. ” आई

ती तयार आहे, हे ती आपण चिपळूणला जायच्या आधी म्हणाली होतीच ना. पण तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आपल्याला काळजी वाटत होती. पुन्हा सुजयच्या त्या अमेरिकेच्या प्रोजेक्टबद्दल कळल्यावर कशी रिएक्ट झाली होती आठवतंय ना…” बाबा

हो बोलायला हवंच तिच्याशीपण मी मला वाटलं ते सांगितलं तुम्हालाबघा ना, आज रजा घेऊन सुजयबरोबर फिरायला गेली होती बाहेर. त्याला घरी पण घेऊन आली नंतर. आणि आत्ता ईशा मला सांगत होती की आता ते दोघे फोनवर बोलणार आहेत. म्हणजे लग्न ठरल्यापासून तिला इतकं सुजयच्या अवतीभोवती पाहिलंच नव्हतं कधी. रजा का घेतलीये तिने हे काही बोलायला वेळ नाही झालाय आज, उद्या विचारूच. पण मला वाटतंय की आता लवकर लग्न करायचं म्हणूनच घेतली असावी. अगदी आयत्यावेळी तिलापण कठीण होईल ना रजा घ्यायला…” आई

ह्म्मती मनापासून तयार झाली असेल तर चांगलंच आहे….बरं वाटलं हे ऐकूनउद्या बोलू तिच्याशी सविस्तर आणि मग सान्यांकडे कळवून टाकूचला झोपूया आता..12 वाजून गेलेत…”बाबा

—————————————–

ईशाने फोन संपवून मागे वळून बघितलं, तेव्हा सायली समोर नव्हती. ती घरातच कुठेतरी असणार असा विचार डोक्यात येऊनही ईशाने तिला सगळ्या खोलीभर शोधलं. ती फारतर चार किंवा पाचच मिनिटं आईशी बोलली होती. तेवढ्यात सायली नक्की गेली कुठे होती? आता तर घरातही सगळे झोपले असतील. आणि ती सिद्धार्थला मेसेज करणार होती. ते सोडून अचानक कशासाठी गेली असेल , असे सगळे विचार तिच्या डोक्यात गोळा व्हायला लागले. एका बाजूला आज घरात सगळेजण असल्यामुळे तिला तशी भीती वाटत नव्हती पण तरीही दुसरीकडे ‘ती’ आली असेल का हा विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हता.

सायली …”

तिला चौथ्यांदा हाक मारली तेव्हा ईशाच्या छातीत खरंच धडधडलं.. पुन्हा परवाची आठवण झाली.

सायली कुठे गेली असेल? आत्ता चारपाच मिनिटांपूर्वी मी आईला फोन लावला तेव्हा इथेच बसलेली होती. अचानक काही न सांगता बाहेर का गेली असेल? आणि ती गेल्याचं मला कसं नाही कळलं? मला काहीच आवाज कसा नाही आला….’तीआली असेल का? हो, ‘ती आज येणार हे लक्षातही होतं माझ्या. सायलीला माझ्याबरोबर माईआजीच्या खोलीत झोपायला मी सांगणारच होते. पण ही कुठे गेली त्याच्या आधीच? कदाचित आधीच गेली असेल माई आजीच्या खोलीतमला जाऊन बघायला हवं. सकाळी मी तिची गंमत केली आता ती माझी करत असेल कदाचित….”

ईशा माई आजीच्या खोलीत जायला दरवाज्याच्या दिशेने वळली. तेवढ्यात सायलीचा बेडवर पडलेला मोबाईल वाजायला लागला.

ही मोबाईल पण इथेच टाकून गेली आहे….”

ईशाने मोबाईल हातात घेऊन बघितलं तर सिद्धार्थचा कॉल होता.

हॅलो, …”

कोण ईशा का?” फोनवर वेगळा आवाज आला, त्यावरून सिद्धार्थने लगेच ओळखलं.

हो, ईशा बोलतेय, तू आत्ता कसा काय फोन केलास?”

अगं सायलीचा मेसेज आला मला आत्ता अगदी 4-5 मिनिटांपूर्वी. जागा आहेस का म्हणून. मी जागाच होतो. मला पण तिला किंवा तुला फोन करून तुमच्याशी बोलायचंच होतं, पण मला वाटलं तुम्ही झोपला असाल. ..बरं झालं सायलीने मेसेज केला. मी आत्ता बघितला म्हणून लगेच फोन केला. आहे का ती?” सिद्धार्थ

म्हणजे सायलीने त्याला मेसेज केला तर…पण मग ती मोबाईल टाकून कुठे गेली?

ती आत्ता इथेच होती. पण एवढ्यात कुठे गेली कुणास ठाऊक….” ईशाला त्याच्याशी काय बोलावं काही सुचत नव्हतं.

म्हणजे? घरीच आहात ना तुम्ही?” सिद्धार्थ

हो रे. एवढ्या उशिरा कुठे जाणार? मी जरा नंतर फोन करू का तुला?” ईशा

तुम्ही घरी आहात मग काही काळजी नाही. सायली असेल गं, कुठे दुसऱ्या खोलीत वगैरे गेली असेल, केवढं मोठं घर आहे तिचं, ऑफिसमध्ये नेहमी चर्चा असायची तिच्या घरावरूनमी आज बघितलंबरं ईशा, तुला वेळ असेल तर तुझ्याशी बोलू का जरा? मला जे कळलंय, ते तुम्हाला लवकरात लवकर कळायलाच हवं….” सिद्धार्थ

सायलीची काळजी का वाटतेय, हे सांगायला जाणार तेवढ्यात तिला रेस्टोरंट मधलं तीबद्दल कळल्यावर सिद्धार्थचं जोरजोराने हसणं आठवलं, आणि तिने ते त्याला सांगायचं टाळलं.

हो म्हणजे, आहे वेळ …..बोल….” तिने थोडे आढेवेढे घेत सांगितलं.

————————————

सायली खरंच कुठे गेली होती?

ईशा आईशी बोलायला लागली तसं सायलीनेही सिद्धार्थला मेसेज करून विचारलं. तो जागा असेल आणि त्याने लगेच रिप्लाय केला तर बरं होईल, आत्ता लगेच त्याच्याशी बोलणं झालं तर चांगलंच. मेसेज करून तिने मोबाईल बेडवरच बाजूला ठेवला आणि मान वर केली तर……तिच्या छातीत एकदम धडकीच भरली.

तिच्या खोलीच्या दरवाजातून कुणीतरी किंवा काहीतरी आत तिच्याकडे वाकून पाहत होतं. तिचं लक्ष जाताच ते एकदम मागे सरकलं.

कोण असेल तिकडे? सायलीने मान वाळवून ईशाकडे बघितलं पण ईशा तर तिथेच खिडकीपाशी उभी होती, फोनवर बोलत होती. ईशा नाहीतर आणखी कोण असेल? आई तर अगदी आत्ताच गेली खोलीतून, ती परत का येईल? आणि आली तरी अशी बाहेरून वाकून का बघेल आपल्याकडे? सरळ आत नाही का येणार? जाऊदे, एवढा विचार करण्यापेक्षा सरळ जाऊन बघूयाअनिकेत असेल कदाचित….विचार करत करतच ती खोलीच्या बाहेर पडलीसुद्धापण बाहेर कोणीच नव्हतं.

ती पुन्हा आत आली. ईशा अजूनही आईशीच बोलत होती. का, कोण जाणे पण एकाच खोलीत असूनही सायलीला तिचं फोनवरचं बोलणं मात्र काहीच ऐकू येत नव्हतं. ती तशीच तिच्या तंद्रीतच येऊन पुन्हा बेडवर बसली. आणखी एखादं मिनिट गेलं असेल,…

अचानक सायलीला जाणवलं की बेडवरुन खाली सोडलेले तिचे पाय कुणीतरी घट्ट धरलेत. तो स्पर्श अगदी थंडगार वाटत होता. तिने तसंच बसल्याबसल्या खाली वाकून बघितलं पण तिचे पाय कुणीच पकडलेले नव्हते. तरीही तो स्पर्श झाला होता, नक्कीच. तिच्या अंगावर सरसरून काटा आला होता. मनातून कुठेतरी वाटत होतं की ईशाला हाक मारायला पाहिजे, पण ती तसं करत नव्हती. खोलीत ती नेहेमीसारखीच थंड हवा वाहायला लागली होती. आजूबाजूचे कुठलेच आवाज येत नव्हते, भयाण शांतता खायला उठत होती. …

पण त्या शांततेतले आवाजही आता तिला ऐकू यायला लागले… स्पष्ट नव्हते, अगदी पुसटसे, खूप लांबून आल्यासारखे आणि हवेच्या लहरीबरोबर वरखाली होणारे…… हे कोणाचे आवाज आहेत, काय चाललंय हे, ….सायली त्या आवाजांकडे लक्ष देऊन ऐकणार तेवढयात कसल्याशा हालचालीने तिचं लक्ष पुन्हा ती बसलेल्या बेडच्या एका बाजूला गेलं. त्या बाजूने खोलीची भिंत जवळ होती. भिंतीला टेकून तिचं कॉम्प्युटर टेबल होतं आणि त्याला सोडून काही अंतरावर तिचा बेड होता. आत्ता त्या टेबल आणि बेडच्या मधल्या जागेकडे सायली टक लावून बघत होती. तिथेच कसलीतरी हालचाल बघितल्यासारखी तिला वाटली होती.आता ती पुन्हा तिथे बघत असतानाच बेडच्या खालून हळूहळू दोन हात वर आले. अगदी कोपरापर्यंत वर आले. पांढरेफटक हात.

तिला त्यादिवशी अचानक समोर आलेला तो चेहरा आठवला, असाच पांढराफाटक चेहरा होता तो. ते हात हळूहळू हलायला लागले, तिला कसलीतरी खूण करायला लागले. सायली तशीच बसून एकटक रोखून त्या हातांकडे बघत होती. मग ते हात हलायचे थांबले. आणि पुन्हा हळूहळू बेडच्या खाली गेले. पुढच्याच क्षणी सायली उठली आणि त्या हातांच्या मागे स्वतःच्या पोटावर सरपटत बेडच्या खाली गेली………

——————————————————–

काय?”

सिद्धार्थने थोडक्यात म्हणून जे काही सुजयबद्दल सांगितलं, त्यामुळे ईशाला धक्काच बसला.

आय नो, तुला धक्का बसला असेल. मलापण हे सगळं कळल्यावर असंच वाटलं होतं….” सिद्धार्थ

अरे पण….., आय मीन…. आर यु शुअर ? ही एवढी मोठी फसवणूक? एवढी मोठी रिस्क कोण कशाला घेईल? आपण समजतोय तो सुजय साने हा नाही, दुसराच कोणी आहे, हे कुठूनही आपल्याला कळलं असतं, त्याच्या ऑफिसमधून तर अगदी सहज कळलं असतं आणि हे त्यालापण माहीत असणार. मग तो स्वतःची खोटी ओळख सांगण्याएवढी रिस्क का घेईल?” ईशा

तो हे सगळं का करतोय, हेच तर शोधून काढायचंय ना आपल्यालाआणि आपल्याला कुठूनही कळलं असतं पण एवढे दिवस तरी ते कळलं नाही, हेच खरं आहे ना ईशा? आणि आय एम शुअर, त्याने एवढा सगळा मोठा प्लॅन केला, तर त्याच्याकडे एखादा बॅकअप प्लॅन पण रेडी असणार. म्हणजे आपल्याला त्याच्या खोट्या ओळखीबद्दल कळलं तर आपल्याला काय सांगायचं वगैरे. …” सिद्धार्थ

ते पण बरोबरच आहे. पण तू शंभर टक्के कन्व्हिन्स्ड आहेस ना, की ह्या सुजयने नक्की दुसऱ्या सुजय सानेची ओळख वापरली आहे?” ईशाने पुन्हा एकदा खात्री करून घेण्याच्या हेतूने विचारलं.

एकशे दहा टक्के. मी पण खूप विचार केला ईशा. पण साखरपुड्याच्या वेळी त्याचं वागणं असं संशयास्पद का होतं ते ह्यामुळे कळलं मला, माझ्या सगळ्या शंका मिटल्या. एखादं पझल त्याचे सगळे पिसेस एकमेकात बसवून जुळले गेले की कम्प्लिट होतं, माझ्यासाठी हे एक तरी कोडं सुटलंय. तो असा वागत होता कारण तो कौस्तुभला एकदाच भेटला होता, अगदी थोड्याच वेळा साठी आणि त्याच्याचबरोबर त्याला त्याचा जवळचा मित्र असल्याचं नाटक करावं लागणार होतं. आणि कौस्तुभला हे सांगताही येत नव्हतं, त्यामुळे हे नाटक त्याच्याकडून एकतर्फीच होतं…”

ह्म्मसायलीला कळेल तेव्हा तिला धक्का तर बसणारच आहे, पण त्याहीपेक्षा तिला फार वाईट वाटणार आहेएवढी मोठी फसवणूक झाली असती तिची….” ईशा

ईशा, सायलीला हे तूच सांग…..आणि माझ्याकडून तिची माफी माग. मी बोलेन उद्या तिच्याशी. पुढे काय करायचं ते लवकरात लवकर ठरवायला हवं. आणि आणखी एक रिक्वेस्ट करू का? काल सायली रागावून गेली त्यामुळे तुमच्याकडून पुढचं सगळंच ऐकायचं राहून गेलं. मला सांगशील का प्लिज सगळं….आय मीन, हे तीप्रकरण वगैरे ….?” सिद्धार्थ

सिद्धार्थचं शेवटचं वाक्य ऐकल्यावर ईशाला एकदम आठवलं, सायली कुठेतरी गायब झाली आहे, ते. आता तिला फोन ठेवण्याची एकदम घाई झाली.

होमी एक काम करते, सायलीच्या डायरीमधल्या त्या पानांचा फोटो काढून त्या इमेजेस पाठवते तुला. त्यात सगळंच आहेचालेल ना? चल मी ठेवते आता…”

घाईघाईने फोन ठेवून ईशा सायलीला शोधायला खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात ती थांबली.

एवढं पॅनिक व्हायची खरंच गरज आहे का, असं तिच्या मनात आलं. सिद्धार्थ म्हणाला तसं खरंच ती गेली असेल घरात कुठे, कदाचित पाणी आणायला गेली असेल…तिने सगळीकडे मान वळवून बघितलं. बेडच्या साईड-टेबलवर नेहेमीच्या जागी पाण्याची बाटली नव्हती, हे पाहून तिला बरं वाटलं. नक्कीच, पाणी आणायला गेली असेल ही….उगीच घाबरते आहे मी…मी इथेच होते खोलीत, आणि तिला कसं काही होईल? जाऊदेत, येईल ती, तोपर्यंत सिद्धार्थला त्या डायरीमधल्या पानांचे फोटोज काढून पाठवून देऊ… असा तिने विचार केला.

सायलीची डायरी तिच्या कॉम्प्युटर टेबलवर होती, तिथे ती गेली. त्या डायरीमध्ये सुजयबद्दल लिहिलेलं पाहिलं पान उघडून ती त्याचा फोटो काढणार तेवढ्यात खाली जमिनीवर तिचं लक्ष गेलं

क्रमशः

2 Comments Add yours

  1. Pranjali Borikar says:

    Most awaiting for the next part

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Next part coming soon Pranjali :)….Thanks.

      Like

Leave a comment