davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 23)

घाईघाईने फोन ठेवून ईशा सायलीला शोधायला खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात ती थांबली.

 

एवढं पॅनिक व्हायची खरंच गरज आहे का, असं तिच्या मनात आलं. सिद्धार्थ म्हणाला तसं खरंच ती गेली असेल घरात कुठे, कदाचित पाणी आणायला गेली असेल…तिने सगळीकडे मान वळवून बघितलं. बेडच्या साईड-टेबलवर नेहेमीच्या जागी पाण्याची बाटली नव्हती, हे पाहून तिला बरं वाटलं. नक्कीच, पाणी आणायला गेली असेल ही….उगीच घाबरते आहे मी…मी इथेच होते खोलीत, आणि तिला कसं काही होईल? जाऊदेत, येईल ती, तोपर्यंत सिद्धार्थला त्या डायरीमधल्या पानांचे फोटोज काढून पाठवून देऊ… असा तिने विचार केला.

 

सायलीची डायरी तिच्या कॉम्प्युटर टेबलवर होती, तिथे ती गेली. त्या डायरीमध्ये सुजयबद्दल लिहिलेलं पाहिलं पान उघडून ती त्याचा फोटो काढणार तेवढ्यात खाली जमिनीवर तिचं लक्ष गेलं

**************** भाग 22 पासून पुढे चालू ***************

भाग 22 येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-Aj

 

समोरचं दृश्य बघून तिला इतका धक्का बसला की तिच्या हातातून ती डायरी खालीच पडली. तिचे हातपायच गळाल्यासारखे झाले. खाली जमिनीवर पलंगाच्या खालून आलेले सायलीचे पाय तिला दिसत होते. तिचं बाकीचं शरीर पलंगाखालीच होतं, फक्त पाय बाहेर आलेले होते. ईशाच्या पायाखालची जमीनच सरकली. हे नक्की काय होतं? हे काहीतरी विचित्र आहे, हे तिला लगेच कळून चुकलं. सायली इथे खाली आहे? पण मी तिला एवढ्या हाका मारल्या त्या तिला इतक्या जवळ असून ऐकू गेल्या नाहीत? आणि नक्की काय करतेय ती खाली? आणि मुळात ती खाली गेली कशासाठी? माझी गम्मत नसेल ना करत ही, सकाळचा बदला घेण्यासाठी वगैरे? खरं तर हे समोर जे आहे ते नॉर्मल नक्कीच नाही, असं ईशाचं एक मन ओरडून सांगत होतं, पण तरीही दुसरीकडे ह्या नेहेमीच्याच शंका आणि प्रश्न तिला दुसऱ्या बाजूने विचार करण्यासाठीही प्रवृत्त करत होते.

 

धीर करून ती गुडघ्यावर खाली बसली. सायलीच्या पायांना हात लावण्यासाठी तिने हात पुढे नेला पण तो तसाच मागे आणला. तिला हात लावण्याची ईशाची हिम्मतच होत नव्हती. कपड्यांवरून तर ते सायलीचेच पाय वाटत होते. मगाशी सायलीने हाच नाईटड्रेस घातला होता, पण तरीही आत्ता बेडखाली आहे ती नक्की सायलीच असेल?

 

सायली……” तिला हाक मारताना यावेळी ईशाचा आवाजच फुटला नाही. तिचा आवाज घशातल्या घशातच राहिला. थोडा घसा खाकरून आणि सगळा जोर एकवटून तिने पुन्हा सायलीला हाक मारली. पण समोरून काहीच प्रत्त्युत्तर नव्हतं. ईशाच्या हाकेमुळे त्या पायांची किंचितही हालचाल झाली नाही.

 

आता मात्र काय करावं ईशाला सुचेना. जाऊन अनिला किंवा मावशीला उठवून आणावं का, असा विचार तिच्या डोक्यात आला. पण सायली अशी पलंगाखाली निपचित पडलेली पाहून मावशीकाकांची काय अवस्था होईल, असंही तिच्या मनात आलं. नाही, काहीही झालं, तरी एकदा आपल्याला प्रत्यक्ष काय आहे ते बघायलाच हवं. तिने पुन्हा एकदा सायलीला हाक मारून पहिली.

 

पण या वेळी तिच्या हाकेनंतर कसलासा आवाज आला. अगदी हळूच. पण आता त्या खोलीतलं वातावरणच इतकं भयाण होतं की, त्या इतक्याशा आवाजानेही ईशा जोरातच दचकली. कुठून आला होता तो आवाज? कुणी बोलत होतं की कसलातरी वेगळाच आवाज होता तो? वाऱ्याचा की पानं सळसळण्याचा की कुणाच्या हलकंसं हसण्याचा? तो आवाज म्हणजे तिच्या हाकेला दिलेलं प्रत्युत्तर होतं का? ईशाच्या कपाळावर घामाचे थेंब जमा होऊ लागले. हा आवाज नक्कीच बाहेरून आलेला नव्हता. इथेच तिच्या जवळपासच कुठूनतरी आला होता. जवळपास म्हणजे? पलंगाखालून? कोण असेल तिथे? सायली की आणखी कुणी? पण म्हणजे ह्या खोलीत आणखीही कुणीतरी आहे. हा शेवटचा विचार मनात आला आणि मग मात्र ईशाचा धीर सुटला. आता घरात कुणालातरी बोलवायलाच हवं, असा विचार करून ती उठली आणि दरवाज्याच्या दिशेने पुढे निघाली. तेवढ्यात मागे पुन्हा तसलाच आवाज आला. या वेळी जरा मोठ्याने आला. घोगऱ्या आवाजात कुणीतरी हसल्याचा आवाज. तो आवाज इतका घोगरा होता की त्यात वाऱ्यामुळे काहीतरी सळसळतं, तसलाच आवाज जास्त होता पण तरीही त्यात कुणीतरी हसल्याचा आवाजही होता, हेही नीट कळत होतं. ईशाच्या अंगावर शहारा आला. मागे वळून बघायचं तिचं धाडस झालं नाही. तिने दरवाज्याच्या दिशेने आणखी दोन पावलं पुढे टाकली.

 

पण तिच्या डोक्यात सायलीचा विचार आला आणि ती तिथेच थांबली. सायलीला असंच सोडून दुसऱ्या खोलीत जायचं? आणि बाकीच्यांना उठवून इथे परत येईपर्यंत सायली इकडे एकटीच असणार. तिला काही झालं तर……..? नाही, तिला एकटीला सोडायला नको.

 

अनिकेतला फोन केला तर? ही कल्पना मनात आल्यावर तिला जरा बरं वाटलं. पण मोबाईल घ्यायचा तर पुन्हा पलंगाजवळच्या कॉम्प्युटर टेबलजवळ जायला हवं. खूप धीर करून ती मागे वळली आणि टेबलच्या दिशेने चालायला लागली. मगाशी ऐकलेला आवाज पुन्हा आला नव्हता आणि आता पुन्हा खोलीत जीवघेणी शांतता पसरली होती.

 

ईशाने मोबाईल उचलला पण तेवढ्यात तिच्या पायांपाशी काहीतरी हालचाल जाणवली. तिने दचकून खाली जमिनीवर पाहिलं, पण खाली तर कुणीच नव्हतं. पणआत्ता एक मिनिटांपूर्वी दिसलेले पलंगाखालचे ते दोन पायही आता तिथे नव्हते. आता हळूहळू कसलेतरी आवाज यायला लागले. कसले, कोणाचेईशाला काहीच कळत नव्हतं. मधेच मगाशी ऐकलेला हसण्याचा आवाजही येत होता. हळूहळू स्पष्ट होत होतं. हा आवाज पलंगाखालूनच येत होता.

 

काय आहे पलंगाखाली, बघावं का? ईशाच्या मनात मागच्या काही क्षणात पन्नास वेळा हा विचार आला होता. पण तिची हिंमतच झाली नव्हती. पण आता मात्र तिने सगळा धीर एकवटला आणि ठरवलं की पलंगाच्या खाली काय आहे, ते बघायचंच. कदाचित सायलीच आपली मस्करी करत असेल किंवा कदाचित काहीच नसेल पलंगाखाली. हे बाहेरून येणारे आवाज असतील बहुतेक. तसंही सायलीची खोली रस्त्याच्या बाजूला येते, एवढी शांतता इथे कधी नसतेच. हे आवाज नक्कीच रस्त्यावरून आलेत बाहेरच्या. असा विचार मनात आल्यावर ईशाला जरा बरं वाटलं. छातीतली धडधड स्पष्टपणे जाणवत होती तरीही ती गुडघ्यावर खाली बसली आणि बेडवरुन खाली आलेली चादर वर करून तिने बेडच्या खाली नजर टाकली. सुरुवातीला तिला काहीच दिसलं नाही. खाली कुणीच नाहीये, असं समजून ती डोकं बाहेर घेणार तेवढ्यात पुन्हा तसाच घोगरा, वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजासारखा तो हसण्याचा आवाज आला, अगदी तिच्या शेजारीच. त्या दिशेला मान फिरवून बघण्याचीही तिची हिम्मत झाली नाही. तिने भीत भीत डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिथे पाहिलं. ज्या बाजूने बेड भिंतीला टेकला होता, त्या कोपऱ्यात तीबसली होती. मान खाली घालून, अंगाचं मुटकुळं करून. चेहऱ्यावर नेहेमीप्रमाणेच केस आलेले होते. ईशाने तिच्याकडे पाहताच खाली घेतलेली तिची मान हळूहळू वर झाली. ईशा जीवाच्या आकांताने किंचाळली आणि धडपडत कशीबशी पलंगापासून लांब सरकली.

ईशा…”

आत्तापर्यंत घोगरा येणारा तो आवाज आता अचानक नॉर्मल येतोय हेसुद्धा ईशाला जरा उशीराच कळलं. तिच्या खांद्यावर कुणाचातरी स्पर्श झाला तशी ती पुन्हा किंचाळली आणि घाबरतच तिने मागे वळून बघितलं. मागे माई आजी उभी होती. वॉकर घेऊन चालत आली होती.

माई आजी….”

ईशाला आजीला बघून इतकं बरं वाटलं की तिने उठून एकदम तिला मिठीच मारली.

काय गं, किंचाळलीस का आत्ता? आणि घाबरलीस का? सायली कुठेय? ” माई आजी

 

सायली….सासायली ….अगं माई आजी, सायली तिकडे पलंगाखाली गेली होती. पण नंतर मी बघितलं तेव्हा नव्हतीआणि मग..”

ईशा बोलत असतानाच पुन्हा एकदा तोच घोगरा हसण्याचा आवाज आला.

कोणाचा आवाज आला गं ईशे?” माई आजी

 

आवाज? कुठे आला ?” आता माई आजीला काय सांगायचं ह्या विचाराने ईशा गोंधळली.

 

अगं आला ना आत्तामला अजून नीट ऐकू येतं, तुला आला नाही आत्ता आवाज?” माई आजी

 

हं हं….”

 

हं हं काय ईशा? अगं बाळा, अशी काय वागतेयस? एवढी घाबरली का आहेस? आणि सायली कुठे आहे? काही झालंय का? मी खोलीत आले तेव्हा तू किंचाळलीस जोरात. मला वाटलं मला बघून दचकलीस, पण तू तर तिथे पलंगापाशी काही बघत होतीस….”

माई आजीचे प्रश्नावर प्रश्न सुरु होते आणि आधीच गोंधळल्यामुळे ईशाला आणखीनच काही सुचेनासं झालं होतं.

सायली मगाशी पलंगाखाली होती….पण नंतर ती तिथे नव्हती आणि मग मी बेडखाली वाकून बघितलं तर ….तिथेतिथे कोपऱ्यात तीबसली होती…..”

तिने शेवटी पटकन सांगून टाकलं आणि आजीकडे बघितलं. पण आजीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह तसंच होतं.

म्हणजे? आत्ता या वेळी लपाछपी खेळताय की काय? अगो काय लहान आहात काय आता? आणि दिसली ना ती तुला पलंगाखालीमग बाहेर बोलाव तिला आणि चला आता झोपायला….तुम्ही येणार झोपायला म्हणून वासंती (सायलीची आई) सांगून गेली मला. मी वाट बघत होते, म्हटलं किती दिवसांनी माझ्या पोरी आणि मी छान गप्पा मारूपण तुम्ही कसल्या दोघी? विसरलात ना मलाशेवटी वॉकर घेतला आणि मीच आले….” माई आजीचं संपता संपत नव्हतं.

 

अगं जरा थांब नासायली नाहीये पलंगाखाली आणि आम्ही खेळत पण नव्हतोमाई आजी कोणाला माहीत नाहीये हेऐकायला जरा विचित्र वाटेलपण मी आता म्हटलं ना पलंगाखाली तीहोती, ती म्हणजे सायली नाही….ती कोण आहे आम्हाला पण नाही माहीत…भूत, आत्माअसलंच काहीतरी आहेम्हणजे असावं ते…”

 

अगो काय बोलतेयस बाई….भूत…..गंमत करतेयस माझी? अगो…..”

माई आजी पुढे काही बोलणार तेवढ्यात ईशाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.

माई आजी, थांब जरा. आपण बोलू नंतर. मी सांगते तुला सगळं. मी जरा पुन्हा पलंगाखाली जाऊन बघते….”

माई आजीच्या बोलण्याची वाट न पाहता ईशाने खाली गुडघ्यावर बसून पलंगाखाली बघितलं सुद्धा. एक तर माई आजी बरोबर असल्याने तिला आता आधीसारखी भीती वाटत नव्हती. आणि आत्ता माई आजीला सांगत असताना तिला मगाशी पलंगाखाली बघितलेली तीआठवली आणि मग तिच्या सगळं लक्षात आलं. खाली वाकून तिने पलंगाखालच्या मगाशी तीबसली होती त्या कोपऱ्यात पाहिलं. चेहऱ्यावर केस पुढे ओढून सायली तिथे अंगाचं मुटकुळं करून बसली होती.

सायले….”

ईशा जोरात ओरडली. सायलीला असं पलंगाच्या खाली बसलेलं पाहून तिला वाटलेली तिची भीती, काळजी आणि त्याचबरोबर ती सापडल्याचा आनंद असं सगळं तिच्या त्या ओरडण्यात सामावलेलं होतं. पण सायलीला तिच्या हाकेने काहीच फरक पडला नाही. तिने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही.

ईशा….काय झालं ….सायली आहे का तिथे?” ईशाच्या ओरडण्यावरून माई आजीला अंदाज आलाच होता.

 

अगं आजी, सायली आहे इथेपण कशी बसलीये बघ ना….उत्तरच देत नाहीये….” ईशा

 

तूतू ..तिला आधी बाहेर काढ….मी बोलते तिच्याशी…..”

काहीतरी विचित्र आहे हे आजीलाही जाणवत होतं. केवळ दोनच मिनिटात या परिस्थितीचं इतकं दडपण तिच्यावर आलं की तिला धापच लागल्यासारखी झाली. ती मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागली. ईशा धावत आली आणि तिने आजीला धरून पलंगावर बसवलं.

आजी, काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का? थांब मी मावशीला बोलावते….नाही, मी….मी पाणी देते तुला…”

पाणी प्यायल्यावर लागलेली धाप जराशी कमी झाली.

माई आजी, ठीक आहेस का? हे काय चाललंय सगळं? मला खूप गोंधळल्यासारखं झालंय. तू बसमी मावशीला बोलवून आणते….”

ईशा उठली तशी आजीने तिला थांबवलं.

मी ठीक आहे बायो….अगो सगळ्याचं टेन्शन आलं ना मला एकदमकाय आहे हे सगळंमला आधी सांग वासंतीला सांगायचं की नाही ते नंतर ठरवू. थांबआधी ते सगळं जाऊदेत. सायलीला आधी तिथून बाहेर काढ. काय झालंय तिला बघायलाच हवं.”

आणखी पाच मिनिटांनंतर सायली पलंगावर झोपली होती. खरं तर तिचे डोळे उघडे होते, पण ती नेहेमीसारखीच शून्यात नजर लावून बसली होती. माई आजी तिच्या शेजारी बसून तिच्या पाठीवरून हात फिरवत होती आणि ईशा थकून समोरच्या खुर्चीत बसली होती.

ईशा, सांगशील का आता मला? काय आहे हे सगळं? सायलीला पलंगाखालून बाहेर काढल्यावर तिची अवस्था बघून मला धक्काच बसला. हे सहज, नैसर्गिक नाहीये. कळतंय का तुला?” माई आजी

 

अगं हो, नाहीच आहे हे सगळं सरळ आणि नैसर्गिक. मी सांगते. पण आम्ही अजून हे घरात कोणालाच सांगितलेलं नाहीये.” ईशा

 

ते बघू आपण. तू सांग आता लवकर…..” माई आजी.

ईशाने सगळं सांगायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीपासून. सुजयबद्दलही आणि तीबद्दलही. ती जसजशी सांगत गेली, तसतसे माई आजीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. एक खोलवर दडलेली, नकोशी वाटणारी, जुनी आठवण पुन्हा समोर आली.

———————-

आजपासून जवळपास पंचेचाळीस- पन्नास वर्षांपूर्वी….माई आजी (वेणू) तेव्हा तिशीत असेल….

———————-

अहो, याल ना उद्यापर्यंत नक्की?” वेणू

 

अहो, किती वेळा विचाराल? उद्या येणार नक्कीपण मध्यरात्र उलटून जाईल कदाचिततुम्ही मात्र काळजी घ्या आणि काही लागलं तर शेजारी सुमतीकाकू आहेतच….” माई आजीचे यजमानही तिला अहोजाहोच करत असत.

काही महत्वाच्या कामासाठी त्यांना तालुक्याच्या गावी जायचं होतंवेणू खरं तर तेव्हा एकटं राहायला खूप घाबरायची. चोरदरेडोखोरांची भीती तिला कधीच वाटायची नाही. तशी ती खमकी होती. मात्र लहानपणापासूनच तिला अंधाराची भीती वाटायची. अंधारात नेहेमी कुणीतरी आपल्यावर दबा धरून उभं आहे, नजर रोखून आपल्याकडे पाहतंय असं तिला वाटायचं. आपण रात्री झोपल्यावर अंधारातल्या त्या सावल्या जिवंत होतात असं ती म्हणायची. अंधारातल्या सावल्या म्हणजे काय, असं तिचे यजमान नेहेमी तिला विचारायचे. तिची चेष्टा करायचे. त्याचं उत्तर मात्र तिच्याकडेही नसायचं. तिच्या डोक्यात ह्या कल्पना अगदी लहानपणापासूनच रुजल्या होत्या. कशामुळे, का, कधीपासून हे तिलाही माहित नव्हतं. कदाचित लहानपणी ऐकलेली एखादी गोष्ट, मैत्रिणीकडून ऐकलेला एखादा किस्सा, एखादं विचित्र स्वप्न….काहीही असू शकतं. पण ती ह्या सगळ्याला खूप घाबरायची हे मात्र खरं होतं. आजही त्यांच्याबरोबर तालुक्याला यायचा हट्ट तिने केलाच होता. पण ज्या ठिकाणी त्यांचं काम होतं, त्या कचेरीच्या आजूबाजूची वस्ती बायकांनी येण्यासारखी नाही, असं ते म्हणाले होते. राहण्याची सोयही यथातथाच झालेली होती. त्यामुळे वेणू त्यांच्याबरोबर जाऊही शकत नव्हती. आजचा पूर्ण दिवस, आजची रात्र आणि उद्या मध्यरात्रीपर्यंतचा सगळा वेळ तिला एकटीलाच काढायचा होता.

 

दुपारी थोडा वेळ एक झोप काढून नंतर तयार होऊन ती देवळात गेली. तिथून येताना बाजाराचा रस्ता लागला तसं घरातलं काय काय सामान संपत आलंय त्याची मनातल्या मनात पटकन यादी करून तिने थोडीशी खरेदी केली. हातातल्या पिशव्या सांभाळत आता ती झपझप घराच्या दिशेने निघाली. अंधार पडत चालला होता आणि तिला लवकर घरी पोहोचायचं होतं. आपल्याच नादात ती चालली होती. एका वळणावर एका लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. मुलगी खाली झाडापाशी बसली होती. खाली मान घालून रडत होती.

काय गं बाळा, काय झालं? रस्ता चुकलीयेस का?”

तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाहीवेणू तिच्या जवळ गेली आणि तिच्या केसातून हात फिरवला. स्वतःला मूलबाळ नसल्याने ती आधीच लहान मुलांच्या बाबतीत हळवी होती.

काय झालं? तुला घरी सोडू का मी? कुणाची वाट बघतेयस का?”

 

आईची वाट बघतेय. मला म्हणाली इथेच थांब आणि दुकानातून काहीतरी आणायला गेलीये. पण खूप वेळ झालायआलीच नाही….” ती रडत रडत म्हणाली.

 

किती वेळ झाला आईला जाऊन?”

 

खूप वेळ झाला.” खूप म्हणजे किती हे तिलाही सांगता येईना.

 

अगं आता अंधार पडलाय. तू किती वेळ इथे वाट पाहणार आईची? तिला वाटलं असेल की तू घरी गेली असशील म्हणून ती पण घरी गेली असेल. चल, असं अंधारात बसणं चांगलं नाही. मी तुला घरी सोडते. कुठे राहतेस तू?”

त्या मुलीने बोट दाखवलं त्या दिशेने वेणू तिला घेऊन निघाली. पंधरावीस मिनिटं चालल्यावर एक कुणबी लोकांची वस्ती लागलीत्या वस्तीच्या मागच्या बाजूला थोडं लांब तिचं घर होतं.

 

तिथे वस्तीतल्या बायका दिसल्यावर वेणूने त्या मुलीचं घर कुठलं वगैरे चौकशी केली. ही मुलगी रस्त्यावर रडत बसली होती वगैरे सांगितलं, पण त्या बायकांना त्या मुलीबद्दल विशेष सहानुभूती असल्यासारखं वाटलं नाही. त्यांनी फक्त हात एका दिशेला वळवून बोटानेच ते घर दाखवलं आणि सगळ्याजणी आपापल्या घराकडे वळल्या. वेणूला जरा नवल वाटलं. पण तिलाही घरी जायला उशीर होत होता. आता लवकर ह्या मुलीला घरी सोडूया आणि आपण निघू असा विचार करून ती वळली तर ती मुलगी तिच्या शेजारी नव्हतीच. मान इकडेतिकडे वळवून बघितल्यावर वेणूला दिसलं की ती आधीच तिच्या घरापाशी जाऊन थांबली होती. तिच्या घरातल्यांना सांगून मग निघू असा विचार करून ती तिच्या घराच्या दिशेने निघाली. पण तेवढ्यातच तिच्या घराचं दार उघडून कुणीतरी तिला आत घेतलं आणि दार लावून घेतलंवेणू तिथेच उभी राहिली. पण दार काही उघडलं गेलं नाही. शेवटी ती वळली आणि परत निघाली. तिला घरी सोडून तर झालं होतं. तिच्या आईबाबांना भेटून एकदा त्यांची मुलगी त्यांच्या ताब्यात दिली ह्याची खात्री झाली असती तर बरं झालं असतं असंही तिला वाटत होतं. पण तसं काळजीचं काही कारण नव्हतं. ती मुलगी स्वतःहून स्वतःच्या घराकडे गेली होती. दार उघडल्यावर स्वतःच आत गेली होती.

 

पुन्हा अशाच सगळ्या विचारात आपल्याच तंद्रीत चालत असताना तिला अचानक आपल्या बाजूने कोणीतरी चालत असल्याची चाहूल लागली. दचकून ती थांबली. थोडंसं घाबरतच तिने मान वळवून बाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. आता चांगलंच अंधारून आलं होतं. दिवेलागणीची वेळही होऊन गेली होती. रस्त्यावर चालणारी फारशी माणसंही दिसत नव्हती. तिने मनातली अंधाराची भीती कशीबशी दाबून ठेवली आणि ती अतिशय भराभर, जवळजवळ पळतच घराकडे निघाली. जसजशी ती धावत होती, तसतशी तिची खात्रीच पटत होती की तिच्या बाजूने, तिच्याबरोबर कुणीतरी धावतंय. दोन वेळा थोडं थांबून आणि धीर करून तिने बाजूला बघितलंही, पण कोणीच दिसलं नाही. कसंबसं ती घरापर्यंत आली. कुणीतरी असल्याचा भास अजून कायमच होता. शेवटी न राहवून ती ओरडली, “कोण आहे?” पण रस्त्यावरच्या त्या शांततेत तिचे शब्द तसेच वाऱ्यावर विरून गेले. त्यांच्या गल्लीत आता तशी तीनच राहती घरं होती. बाकी सगळीच घरं इतकी जुनी आणि पडकी झाली होती की तिथे राहणं धोकादायकच होतं. हळूहळू सगळेच नवीन ठिकाणी राहायला गेले आणि फक्त ही तीन घरं उरली. एक तिचंच, बाजूला सुमती काकू आणि गल्लीतलं शेवटचं घर हळबे गुरुजींचं.

 

वेणूच्या घरात तर अंधारच होता. सुमती काकूंच्या आणि हळब्यांच्या घरातून थोडासा उजेड येत होता. पण त्या उजेडात तरी वेणूला कोणीच दिसलं नाही. पण तरी तिच्या जवळ कोणीतरी उभं होतं नक्कीच. कसाबसा धीर एकवटून ती घरासमोरच्या दोनतीन पायऱ्या चढून दरवाजापाशी आली. पण मागून कोणीतरी आपल्यावर झडप तर घालणार नाही ना, असेच विचार मनात येत होते. कुलुपात किल्ली घालणार तेवढ्यात मागून कोणाचातरी हलकेच हसण्याचा आवाज आला. वेणूच्या हातातून किल्लीच गाळून पडली. मागोमाग खांद्यावर झालेला तो पुसटसा स्पर्श.

अगं वेणू….”

सुमतीकाकूंचा आवाजवेणू धीर करून मागे वळली. हो, सुमती काकूच होत्या. त्यांनीच हाक मारताना वेणूच्या खांद्याला स्पर्श केला होता. माई आजीला त्या अक्षरशः देवासारख्या वाटल्या तेव्हा.

सुमती काकू..तुम्ही आत्ता मला हाक मारायच्या आधी थोड्याशा हसलात का हो?”

 

नाही गं, मी कशाला हसू उगीच? अगं आता खिडकीतून तुला येताना पाहिलं म्हणून आले हो बाहेर….बराच उशीर झाला हो तुला यायला….अगं मी खरं तर वसंताला (त्यांचा मुलगा) म्हटलं होतं, म्हटलं नारायण बाहेरगावी गेलाय तर आज मी जाते हो पोरीसोबत झोपायलारात्रीची घाबरतेस ना तू….पण काय झालंय की यमूला (त्यांची नात) ताप भरलाय गं संध्याकाळपासूनमग मला थांबायला हवं हो तिच्यापाशी….तू असं करतेस का, तुझी आवराआवर झाली की तूच ये आमच्या इथे निजायला. यमीमुळे थोडी झोपमोड होईल तुझी पण सोबत होईल तुला, नाही का?”

काकू रात्री झोपायला येणार हे ऐकून वेणूला खूपच बरं वाटलं होतं पण पुढचं सगळं ऐकून मात्र तिचा विरस झाला. अर्थात, काकूंना यमीजवळ थांबणं भाग होतं. यमीची आई म्हणजे त्यांची सून दोन वर्षांपूर्वीच काही आजाराचं निमित्त होऊन देवाघरी गेली, तेव्हापासून त्याच तिचं सगळं करायच्या. त्यांच्याकडे झोपण्यापुरतं जावं का, असंही वेणूला वाटलं पण त्यांचा मुलगा वसंताही घरी होता, त्यामुळे त्यांच्याकडे जाणंही प्रशस्त वाटत नव्हतं.

काकू ठीक आहे हो, मी राहीन एकटी. आणि काही लागलं तर तुम्ही आहातच की बाजूला. तुम्हालाही कसलीही मदत हवी असेल, अगदी नुसतं यमीपाशी बसायचं असेल तरीपण सांगा हो. मी येईन….”

तिचं निरोप घेऊन काकूंनी त्यांच्या घरात जाऊन दरवाजा लावून घेतला तेव्हा त्यांच्या घरी जायला हवं होतं का असं पुन्हा एकदा तिला वाटून गेलं.

 

घरात येऊन दिवे लावले, देवापाशी येऊन दिवा लावला आणि देवाला नमस्कार केला तेव्हा तिला जरा बरं वाटलं. काकू भेटून गेल्यापासून मगाशी झालेला तो भासही पुन्हा झालेला नव्हता. कदाचित तो भासच असेल. आणि म्हणतात ना, भित्यापाठी ब्रह्मराक्षस. तसलीच आपली गत झाली बहुधा मगाशी. आता तो विचार करून तिला आपल्या स्वतःवरच हसू येत होतं. रेडिओ सुरु करून त्यावरची गाणी ऐकत ऐकत तिने स्वतःपुरता स्वयंपाक केला. एकटीपुरतं करायला किती वेळ लागणार? पुढच्या अर्ध्या तासाने तिने जेवूनही घेतलं. स्वयंपाकघरात सगळी झाकपाक करून ती बाहेर येऊन पलंगावर बसली. अजून झोपायला बराच वेळ होता. तिने तिचं आवडतं पुस्तक वाचायला हातात घेतलं. वाचताना थोड्या वेळाने पाठीला रग लागली म्हणून हळूहळू पलंगावर आडवी झाली आणि आणखी दहा मिनिटांनी तिचा डोळाच लागला.

 

तिला खूपच गाढ झोप लागली आणि तिला एक स्वप्न पडलं. स्वप्नात ती झपझप चालत कुठेतरी जात होती आणि तिचं सहज तिच्या बाजूला लक्ष गेलं तर बाजूला एक दुसरीच बाई तिच्याबरोबर चालली होती. तिने केस मोकळे सोडलेले होते आणि डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळं इतकी गडद होती की तिचे डोळे पटकन दिसतच नव्हते, असं वाटत होतं की त्या जागी नुसत्या डोळ्यांच्या खोबणीच आहेत. वेणूने तिच्याकडे पाहिल्यावर तिनेही वेणूकडे पाहिलं. डोळ्यात काहीही भाव नव्हते पण तिचं हसणंते मात्र फार विचित्र होतं. वेणूकडे बघून ती फिसकन हसली. तो आवाज खूप भेसूर होतावेणू आता आणखी जोरात चालायला लागली तशी ती बाईसुद्धा. वेणूने धावत घरात येऊन दिवे लावले तशी ती बाई गायब झाली. आणि एकदम वेणू स्वप्नातून जागी झाली.

 

आजूबाजूला सगळा अंधार झाला होता. आधी तिला काही लक्षातच आलं नाही. आपण कुठे आहोत, अंधार का झालायमग एकदम लक्षात आलं, आपण पुस्तक वाचता वाचता झोपून गेलो. पण मग दिवे तर चालू होते, अंधार कसा झाला? तिला भीती वाटायला लागली. तिने तसंच चाचपडत दिवे लावायचा प्रयत्न केला, पण दिवे गेले होते हे तिच्या काही वेळाने लक्षात आलं. आजूबाजूचा अंधार सहन होत नव्हता. मगाशी झालेले भास, ते पडलेलं स्वप्न सगळंच सारखं सारखं आठवायला लागलं. स्वयंपाकघरातून थोडासा उजेड येत होता. मगाशी देवापुढे लावलेला दिवा अजून तेवत होता, त्याचा तिला कितीतरी मोठा आधार वाटत होता आत्ता. तिने स्वयंपाकघरात येऊन मेणबत्ती काढली आणि ती लावून बाहेरच्या खोलीत घेऊन आली. बाहेरच्या खोलीत आल्यावर कुठूनतरी वाऱ्याचा एक मोठा झोत आला. ज्योत विझू नये म्हणून एक हात मेणबत्तीच्या ज्योतीच्या बाजूने धरत तिने वर पाहिलं आणि समोर……

————————————–

अगं माई आजी…..” ईशाच्या हाकेने माई आजी एकदम भानावर आली.

 

हाहो..हो….”

 

अगं हो, हो काय? मी एवढं सगळं सांगितलं तुलातू ऐकलं तरी आहेस का सगळं? स्वतःच्याच विचारात होतीस आत्ता आणि मी वेड्यासारखी बडबडत बसले. ”

 

नाही गं बाळा, मी ऐकलंकळलं मला सगळं…..असंच आपलं जुनं काहीतरी आठवलं त्याच विचारात होते. …”

 

काय आठवलं? मला पण सांग ना….”

ईशाचं वाक्य पूर्ण होतंय न होतंय तेवढ्यात सायली दुसऱ्या कुशीवर वळली आणि मग उठून बसली.

ईशा आणि माई आजी, काय करताय तुम्ही इतक्या रात्री इकडे? झोपला नाहीत का?”

सायलीचा आवाज इतका नॉर्मल होता की जणू काही काहीच घडलं नव्हतं.

सायले, तुला काहीच आठवत नाहीये का?” ईशा

 

ईशा, जरा थांब. तिला जरा पाणी तरी दे….” माई आजी

 

मला पाणी नकोयकाय आठवत नाहीये मला?” सायली

 

सायले, बस करूया आता हे सगळंसुजयला सरळ जाऊन विचारूया की हा सगळाच काय प्रकार आहे. हे सगळं आता आपल्याला झेपणार नाही. अगं, ‘तीहळूहळू तुझ्यावर कब्जा करायला लागलीये….कळतंय का तुला? तूच विचार करमागच्या दोनतीन वेळेला हे असं झालेलं आहे. दर वेळी तुझा स्वतःवरचा ताबा गेलेला असतो, आजूबाजूचं भान गेलेलं असतं, दर वेळेला मला भीती वाटते, या वेळी सायली ह्यातून बाहेर पडेल ना? पुन्हा आपण भेटू शकू ना?” बोलताबोलता ईशाला रडूच फुटलं.

ईशा हे सगळं माई आजीच्या समोर बोलतेय हे लक्षात आल्यावर सायली एकदम भानावर आली.

आपण नंतर बोलूया का ईशा? तू शांत हो बरं आधी…”

 

मी सांगितलंय माई आजीला सगळं…..” ईशा हुंदके देत म्हणाली.

 

काय? तू…..का पण ? म्हणजे माई आजी आम्हाला कोणापासून काही लपवायचं नव्हतं, पण घरातल्यांना टेन्शन नको म्हणून आम्ही,….”

 

अगो पण घरातली माणसं आपलं टेन्शन वाटून घ्यायला पण असतात ना बायो….” तिला मधेच अडवत माई आजी म्हणाली.

 

आणि तुला माहिती तरी आहे का, इथे काय झालं आत्ता? मी एकटी होते, माई आजी आली तेव्हा मला किती बरं वाटलं माहितीये? सायली, खरंच पुरे झालं आता….आपल्याला माहित आहे हे सगळं नॉर्मल नाहीये. उगीच विषाची परीक्षा का घ्यायची? आपण धडधाकट राहिलो पाहिजे तर मगच आपण ….”

ईशाची ही भाषा सायलीच्या ओळखीचीच नव्हती.

हे असलं तू बोलतेयस ईशा? आय रिअली डोन्ट बिलिव्ह….”

 

मला आवडत नाहीये हे बोलायलापण तुला सांगितलं ना आत्ता काय झालं होतं तर तुलाही पटेल की तीआता जास्त सहज आणि जास्त वेळ यायला लागलीये ….तुला माहित आहे का की मी मगाशी आईशी बोलत होते तेव्हा तू इथे बेडच्या खाली गेली होतीस?”

 

काय?” सायली किंचाळलीच.

दोन मिनिटांनी शांत झाल्यावर तिला ते सगळंच आठवलं. पायांना झालेला स्पर्श, पलंगाखालून आलेले ते दोन पांढरेफटक हात आणि त्याच्या मागोमाग पलंगाखाली गेलेली ती. पुढचं मात्र काहीतरी धूसरसं दिसत होतं.

हे असं होणारच….”

माई आजी हे बोलली तेव्हा ईशा आणि सायली दोघीही अविश्वासाने तिच्याकडे बघत बसल्या.

म्हणजे काय आजी? तुला काय माहित ह्या सगळ्याबद्दल ? तुला तर आत्ता कळलंय ना हे?” सायली

 

हो गं बाळा, मी त्याबद्दल नव्हते बोलत. जाऊदेत. आता खूप रात्र झाली आहे. आपण झोपूया आता. आणि बरं का सायले, घरच्यांपासून काय लपवून ठेवायचं हे समजण्याएवढी तू नक्कीच मोठी झाली आहेस. एकच सांगते, ज्या गोष्टी आपल्या आणि आपल्या माणसांच्या आयुष्यात खूप काही बदल घडवून आणू शकतात त्या बाबतीत कधीच लपवाछपवी करू नये. मोकळेपणा असावा. आता तुमच्या मुलीमुलींच्या काही गप्पा असतील, काही गमतीजमती असतील तर त्या असूदेतत्या मलाही नाही सांगितल्या तरी चालतीलपण ज्याच्याशी लग्न होणार तो मुलगा आणि त्याच्याशी संबंधित सगळं हे गम्मत नाही ना बाळा?”

 

हो गं आजी..कळलं….मी बाबांना सांगणारच होते अगंखरंचपण उद्या नक्की सांगेन….प्रॉमिस…” सायली

 

आणि तुझ्या आईला नाही सांगणार वाटतं?” माई आजी मिश्कीलपणे म्हणाली

 

ती खूप टेन्शन घेते गं. हे बघ आजी, आम्हाला ना शोध घ्यायचाय. सुजयला विचारलं तर तो असं सरळ सांगणार नाही. उद्या असं बाकीच्या मुलींनाही तो फसवू शकेल. म्हणून आमचं आम्हाला सगळं शोधून काढायचं आहे, त्याला कळू न देताआई तो शोध नाही घेऊ देणार, मला खात्री आहे. ती इथेच थांबायला लावेल आम्हाला. आणि आम्ही आत्तापर्यंत बऱ्यापैकी काही शोध घेतलाय. आणि ही तीआहे ना, तिचा ह्या सगळ्यातला रोल आम्हाला नीट कळत नाहीये. म्हणजे मागच्या काही गोष्टींची लिंक किंवा क्लूज तिच्यामुळे मिळाले. पण तरीही ती ह्या सगळ्यात आमच्या बाजूने आहे की नाही, हे कळलं नाहीये अजून. ” सायली

 

माई आजीईशा आजीच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, ” तुला आश्चर्य नाही वाटलं का गं, हे सगळं ऐकून….बाकी कुणी हसण्यावारी नेईल हे सगळं….तुला का खरं वाटलं?”

 

तुझ्यापेक्षा तीन पटीने जास्त वय आहे बायो माझं…..काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभव आल्याखेरीज कधीही पटत नाहीत, पण म्हणून त्या नसतातच असं नाही….हो ना?”

 

म्हणजे काय?” ईशाला माई आजीचं कोड्यात बोलणं कळलंच नाही.

 

माई आजी, तुला आलेत असले अनुभव आधी? असंच म्हणायचंय ना तुला ….” सायली

 

नकोत बाळा त्या आठवणी….सध्या आपल्यासमोरचा प्रश्न मोठा आहे….”

 

माई आजी, मगाशी तुला तेच सगळं आठवत होतं….बरोबर ना? प्लिज सांग ना….”ईशा

 

अगं बाळा सांगून फक्त आठवणी जाग्या होतात आणि आपल्याला त्रास होतो. पण ह्या सगळ्यातून जेवढं काही आपल्याला कळलंय तेवढं आपण कायम लक्षात ठेवायचं आणि आपल्याला गरज पडेल तिथे ते वापरायचं. त्या आठवणी कटू असतात, त्या वर नाही आणायच्या, पण त्यातून आलेला अनुभव, तो मात्र कायम लक्षात ठेवायचा….” माई आजी

 

एवढं काय झालं होतं आजी? एवढा वाईट अनुभव? एवढा त्रास होण्याएवढं होतं ते सगळं?” सायली

 

मला एक सांगा, आणखी काही वर्षांनी तुम्हाला हे सगळं, म्हणजे ईशा हे आज जे घडलं, तुला जे आवाज वगैरे आले, किंवा ते बाथरूममध्ये घडलेलं सगळं आठवायला तुला आवडेल?” माई आजी

 

नाही ….कधीच नाहीती जाणीवच अस्वस्थ करणारी आहे खूप….आणि ती कायम तशीच राहील….” ईशा

 

तेच म्हणतेय मी..म्हणून कटू आठवणी मागे टाकायच्या पण त्यातून आलेला अनुभव घेऊन पुढे जायचं….तो कायम साथ करतो आपली….” माई आजी

सायली आणि ईशा काहीच बोलल्या नाहीत. नक्की काय घडलं होतं ह्याची उत्सुकता दोघींनाही होती. पण माई आजीला त्याचा त्रास होणार हेही त्यांना कळत होतं.

 

आणखी एक तासभर तिघीजणी सगळं काही विसरून गप्पांमध्ये रंगून गेल्या. थोड्या वेळाने, पलंगावर माई आजीच्या बाजूलाच जागा मिळेल तशी दोघी झोपूनही गेल्या. पण माई आज्जी मात्र जागीच होती. अंधारातल्या त्या सावल्या आज पुन्हा जाग्या होताना तिने पहिल्या होत्या. एक अस्वस्थ करणारी चाहूल कुठेतरी खोलवर उठली होती. तिने सायली आणि ईशाच्या डोक्यावरून आपला खरखरीत हात फिरवला.

“अनुभव चांगले असोत की वाईट, पण बाळांनो, ह्या अनुभवातून मिळालेली शिकवण आणि ज्ञान हे मात्र कुठे ना कुठे उपयोगी पडत असतं आपल्या आयुष्यात. कुणास ठाऊक, माझ्या या ज्ञानाचा कदाचित तुमच्या या शोधात कुठेतरी उपयोग व्हायचा असेल म्हणून आज मला मी ह्या सगळ्यात इतक्या सहजपणे आणि अलगद येऊन पोहोचलेय.

 

पण पोरींनो, तुम्ही मात्र धीराच्या आहात गं बाई, आवाजाची दिशा माहित नसतानाही त्याचा पाठलाग करायला निघाला आहात. सांभाळा गं स्वतःला….तुम्ही दोघी निदान एकमेकींसाठी आहातखूप बरं वाटतंयमाझ्यासाठी मात्र कुणीच नव्हतं तेव्हा….आज इतक्या वर्षांनी ते सगळं पुन्हा एकदा जवळून पाहिल्यासारखं वाटतंय…..”

माई आजीने डोळे टिपले आणि तशीच पडून राहिली. तीच जुनी आठवण पुन्हा नको असताना वर येत होती. मगाशी ईशाने हाक मारल्यामुळे माई आजी त्यातून बाहेर आली होती, पण आता पुन्हा सगळीकडे शांतता झालेली होती. झोप तर कधीच दूर पळून गेली होती आणि त्या आठवणी आता पुन्हा पाठलाग करत होत्या…….आता त्यांच्यापासून सुटका नव्हती…….

—————————

वेणूने मेणबत्तीची ज्योत वाऱ्यापासून सावरायला स्वतःच्या हाताचा आडोसा केला आणि वर पाहिलं……मेणबत्तीच्या उजेडामुळे तयार झालेल्या अंधारातल्या त्या वर्तुळात ती स्वप्नात दिसलेली बाई उभी होती, डोळ्यांभोवती मोठी काळी वर्तुळं, केस मोकळे सोडलेले. वेणूची तिच्यावर नजर पडली आणि मग ते विचित्र हास्य….पुढच्या क्षणी वेणूच्या हातून मेणबत्ती गळून पडली आणि खाली पडून विझून गेली, आणि त्याच वेळी देवघरातल्या दिव्यातलं तेल संपलं आणि तो दिवाही विझला आणि सगळीकडेच अंधाराचं साम्राज्य पसरलं.

 

क्रमशः

6 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 23)

 1. Pranjali Borikar
  August 16, 2016

  Thriller part till now

  Liked by 1 person

 2. KIRAN KAMBLE
  August 16, 2016

  VERY VERY INTERESTING STORY, NOW WAITING FOR NEXT PART..

  Liked by 1 person

 3. ujvala varande
  August 20, 2016

  chhan lehta pan suspense lavkar sampava ani part lavakar takat ja

  Like

  • rutusara
   August 20, 2016

   Thanks 🙂 suspense sampla ki story pan sampel naa….:) katha ashi ulgadtana vachnyat ji maja aahe ti ekdam sagla suspense sampavnyat kashi asel ?

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on August 6, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: