davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 24)

माई आजीने डोळे टिपले आणि तशीच पडून राहिली. तीच जुनी आठवण पुन्हा नको असताना वर येत होती. मगाशी ईशाने हाक मारल्यामुळे माई आजी त्यातून बाहेर आली होती, पण आता पुन्हा सगळीकडे शांतता झालेली होती. झोप तर कधीच दूर पळून गेली होती आणि त्या आठवणी आता पुन्हा पाठलाग करत होत्या…….आता त्यांच्यापासून सुटका नव्हती…….

—————————

वेणूने मेणबत्तीची ज्योत वाऱ्यापासून सावरायला स्वतःच्या हाताचा आडोसा केला आणि वर पाहिलं……मेणबत्तीच्या उजेडामुळे तयार झालेल्या अंधारातल्या त्या वर्तुळात ती स्वप्नात दिसलेली बाई उभी होती, डोळ्यांभोवती मोठी काळी वर्तुळं, केस मोकळे सोडलेले. वेणूची तिच्यावर नजर पडली आणि मग ते विचित्र हास्य….पुढच्या क्षणी वेणूच्या हातून मेणबत्ती गळून पडली आणि खाली पडून विझून गेली, आणि त्याच वेळी देवघरातल्या दिव्यातलं तेल संपलं आणि तो दिवाही विझला आणि सगळीकडेच अंधाराचं साम्राज्य पसरलं.

 

*****************भाग 23 पासून पुढे *************

भाग 23 येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-C8

 

पुढे अर्धा मिनिट तसंच गेलं. शांततेत….ती शांतता, तो एक,एक क्षण जीवघेणा वाटत होता वेणूलापुढे काय होईल, अंधारातून कुणीतरी आपल्यावर हल्ला करेल, ती बाई आपल्यावर नजर रोखून बसलेली असेल, एक ना दोनमनात एकामागोमाग एक भीतीदायक विचार येत होते. आणि अचानक अगदी पुसटसा कुठूनतरी उजेड दिसायला लागला. अगदीच मंद प्रकाश होता तो, एरव्ही तो लक्षातही आला नसता. पण आत्ता मात्र अंधाराच्या या पार्श्वभूमीवर अगदी मिणमिणत्या, अंधुकशा उजेडानेही तिचं लक्ष वेधून घेतलं. पण तो उजेड नेमका कुठून येत होता हे मात्र तिच्या पटकन लक्षातच आलं नाही. तो स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यातून येत होता. त्या उजेडाच्या दिशेने ती आतल्या खोलीत गेली. समोर तीच बाई उभी होती. तिच्या भोवती तो अंधुकसा उजेड दिसत होता. वेणूचा श्वास रोखला गेला. मनाच्या संवेदनाच बधिर झाल्या. आपल्याला या क्षणी काय वाटतंय, काय करायला हवंय तिला काहीच कळत नव्हतं. काहीतरी विचित्र समोर दिसतंय एवढं जाणवत होतं मात्र त्यावर विचार करणंच अशक्य होत होतं. वेणूची आणि तिची नजरानजर होताच ती हसली, भेसूर आणि भकास.

तुलाच भेटायला आले म्या……”

तिचा आवाज खूपच लांबून अगदी कुठल्यातरी डोंगराच्या दुसऱ्या टोकापासून आल्यासारखा वाटत होता. आवाज इतका भसाडा होता की ती काय बोलली हे वेणूला पटकन कळलंसुद्धा नाही. तिचा आवाज तसाच घुमत राहिल्यासारखा वाटला त्या शांततेततेव्हा वेणूला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला.

….को..कोण आ…...हेस तू? ….…..थे कशी आलीस?” वेणूच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले.

 

तुझ्याच मागं आले……” तो आवाज कानाला सहन होत नव्हता

 

का..….कशाला?”

वेणूने हे विचारल्यावर ती नुसतीच हसली…..पण त्या आवाजाला आता भेसूरपणाबरोबरच एक कसलीशी तीक्ष्ण धार होती. त्या बधिर अवस्थेतही तिचं हसणं वेणूच्या पायाखालची जमीन सरकवून गेलं.

 

अचानक हसणं थांबवून तिने एक जोरदार कर्कश्य किंकाळी मारली. तिच्या त्या आवाजाने मात्र वेणू पुरती भानावर आली. समोर हे काय चाललंय, ही बाई, तिचं बोलणं, हसणं सगळंच असह्य होत ती सुद्धा जिवाच्या आकांताने किंचाळली.

वाचवा, वाचवा……मला मदत करा….वाचवा…..”

अशी पाचेक मिनिटं झाली असतील. वेणू घाबरून जोरजोरात किंचाळतच होती. तिला एक क्षणही थांबायचं नव्हतं. आपण ओरडायचे थांबलो आणि मग तिचा तो घाणेरडा आवाज पुन्हा ऐकू आला तर? या भीतीने ती डोळे घट्ट मिटून घेऊन ओरडतच राहिली. शेवटी रडून, ओरडून तिला धाप लागलीतरीही तिने ओरडणं चालूच ठेवलं.

वेणूए वेणू…..दार उघड बाळा….”

एक परिचित आवाज आणि त्यापाठोपाठ दारावर धडधड असा आवाज आला. वेणूने धीर करून डोळे उघडले. ती बाई कुठेच दिसत नव्हती. दिवेही आलेले होते. मग दरवाजावर? तिच्या एकदम लक्षात आलं. सुमती काकू आल्या होत्या….

 

तिने धावतच जाऊन दार उघडलं. सुमती काकू आईसारख्याच भासल्या तेव्हा वेणूला. तिने त्यांना घट्ट मिठी मारली आणि तिला पुन्हा रडायला आलं.

 

त्या रात्री वेणूला शांत झोप लागणं शक्यच नव्हतं. पण सुमतीकाकूंच्या बाजूला, त्यांच्या घरात असल्यामुळे तिला सुरक्षित वाटत होतं.

 

सकाळी पुन्हा घरात पाय ठेवताना काल रात्रीची आठवण होऊन तिच्या छातीत पुन्हा धडधडलं. स्वयंपाकघरात पाय ठेवण्याची तिची हिम्मत होत नव्हती. त्या कोपऱ्यात अजून ती बाई उभी असेल तर, असाच विचार राहून राहून पुन्हा मनात येत होता. पण असं बाहेरच्या खोलीत ताटकळत किती वेळ बसून राहणार? रोजच्या कामांना तर सुरुवात करायलाच हवी. धीर करून तिने स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आणि सगळ्यात आधी त्या कोपऱ्यात नजर टाकली. ती बाई नव्हती, हे पाहून तिला हायसं वाटलं. आपल्या मागे ती नसेल ना, असा विचार करून दचकून तिने मागेही वळून पाहिलं. पण सगळं घर अगदी शांत होतं, नेहेमीसारखं. स्वयंपाकघराची खिडकी उघडल्यावर बाहेरची ताजी हवा आत आली आणि तिला खूप बरं वाटलं. सकाळचं कोवळं ऊन पडलं होतं. बाहेर रस्त्यावर वर्दळ सुरु झाली होती. तिच्या मनातली सगळी भीती अचानक नाहीशी झाली. कालचा सगळा प्रकार खरंच घडला होता की आपल्याला झालेले ते भास होते असा प्रश्न आता तिला पडत होता.

 

आजचा सगळा दिवस नेहेमीसारखाच गेला. तिचे यजमानही ठरलेल्या वेळेच्या बराच वेळ आधी घरी आले. पुढचे दोन दिवस तिला त्या रात्रीचं हे सगळं आठवून भीती वाटत होती खरी, पण पुन्हा तसं काहीच घडलं नाही, त्यामुळे आपल्याला भास झाला होता ह्यावर तिचाही विश्वास बसला.

 

आणखी चारपाच दिवसांनी ती तिच्या यजमानांबरोबर कुणाकडे सत्यनारायणाच्या पूजेला गेली होती. परत येताना यजमानांना कुणी ओळखीचे भेटले आणि ते रस्त्यात त्यांच्याशी बोलण्यात गुंतले. ऊन फार होते म्हणून वेणू जराशी झाडाच्या आडोशाला सावलीत उभी राहिली. झाडाच्या मागून कुणाचा तरी आवाज ऐकू आला म्हणून तिने बघितलं तर परवा जिला घरी सोडलं तीच मुलगी तिथे बसलेली होती. एकटक कुठेतरी बघत होती आणि स्वतःशीच बोलत होती. वेणूने तिला हाक मारताच तिने वळून बघितलं पण वेणूला ओळखलंच नाही. वेणूला जरा नवल वाटलं. पण लहान मुलगी आहे, विसरली असेल म्हणून तिने लक्ष दिलं नाही. तुला घरी सोडू का, आजपण आई कुठेतरी गेलीये का, असं विचारल्यावर आई कुठे आहे काही माहित नाही, असं तिने उत्तर दिलं आणि वर काही खायला मिळेल का असं वेणूला विचारलं. लहान मूल काहीतरी खायला मगतंय हे पाहून वेणूच्या मनात कालवाकालव झाली. हिची आई किंवा बाकीचे घरचे हिला असं एकटं सोडून कसं काय जातात असा विचार तिच्या मनात आला. तिने पटकन जवळच्या पिशवीतून पूजेच्या घरून मिळालेला प्रसादाचा शिरा तिला दिला.

 

ही मुलगी कोण असेल आणि अशी एकटी रस्त्यावर बसून काय करते, हेच विचार घरी जाताना तिच्या मनात येत होते. पुन्हा भेटली तर तिला नक्की विचारायचंच असं तिने ठरवून टाकलं.

 

त्या रात्री तिचे यजमान जरा लवकरच निजायला गेले. वेणूची मात्र स्वयंपाकघरातली आवराआवर संपत नव्हती. उद्यासाठी विरजण लावलं आणि पदराला हात पुसत तिने स्वयंपाकघरातला दिवा मालवला. बाहेरच्या खोलीतले दिवे आधीच बंद केलेले होते. बाजूच्या कोनाड्यात ठेवलेला पाण्याचा तांब्या घेऊन ती बाहेरच्या खोलीत जायला पाय ठेवणार, तेवढ्यात मागे कसलातरी आवाज आला. तिने मागे वळून पाहिलं तर ती त्याच दिवशी दिसलेली बाई तिच्या अगदी मागेच उभी होती. वेणूच्या तोंडातून आवाजच फुटला नाही. ती मात्र तिच्याकडे रोखून बघत भेसूरपणे हसली. “तुलाच भेटायचं व्हतं…..”असं काहीतरी म्हणाली.

 

पुढच्याच क्षणी वेणूच्या हातातून पाण्याचा तांब्या आणि भांडं गळून पडलं. तिचे यजमान दचकून जागे झाले, आणि ती बाई? ती बाई वेणूच्या डोळ्यांदेखत गायब झाली, नाहीशी झाली. वेणूचे हातपायच गळल्यासारखे झाले. तिच्या यजमानांना कितीही समजावून सांगितलं तरी त्यांचा ह्या सगळ्यावर कधीच विश्वास बसला नसता. मुळात असल्या सगळ्या विचित्र आणि गूढपणे घडणाऱ्या गोष्टींवर त्यांचा कधीच विश्वास बसायचा नाही.

 

पुढचे दोन दिवस पुन्हा सगळं सुरळीत चालू होतं. या वेळीही आपल्याला भास झाला, असं वेणू स्वतःला समजावत होती. तिसऱ्या दिवशी ती मुलगी पुन्हा दिसली. देवळाच्या मागे. खेळायला बरोबर कुणी नाही म्हणून रुसली होती. वेणूने तिला हाक मारल्यावर तिने याही वेळी वेणूला ओळखलं नाहीच. पण माझ्याबरोबर खेळ म्हणून गळ मात्र घातली. कित्येक वर्षांनी वेणूने काचापाणी, आट्यापाट्या असले खेळ खेळले. तिच्याबरोबर खेळण्यात वेणूचीही संध्याकाळ अगदी छान निघून गेली. ती खूप आनंदात घरी आली, आज जेवणही चार घास जास्तच गेलं तिला. गादीवर पडताच झोप लागली. पण रात्री एकदा जाग आली आणि समोरच्या कोपऱ्यात पुन्हा तसलाच अंधुक उजेड आणि त्या उजेडातली ती बाई दिसली आणि तिची झोपच उडाली.

 

त्यानंतर ती मुलगी वेणूला कुठे ना कुठे भेटत राहिली. कधी तळ्याकाठी, कधी रस्त्यावर एखाद्या झाडाखाली बसलेली तर कधी आणखी कुठे. हळूहळू एक भयानक सत्य वेणूच्या लक्षात आलं. ज्या दिवशी ही मुलगी तिला भेटायची, त्या दिवशी तिला ती बाई दिसायची, म्हणजे तसले भास व्हायचे. ह्या तिच्या वाटण्याला कुठलाही तर्क नव्हता. हा योगायोगही असेल असं तिने तिच्या मनाला समजावलं. पण मग तिचं मन तिलाच उलट प्रश्न विचारायचं. प्रत्येक वेळी घडतं, तो योगायोग कसा असेल? ह्या सगळ्याची सुरुवातही त्या मुलीच्या भेटण्यापासून, त्या दिवसापासूनच झाली होती. ती बाई? कोण असेल ती? का येत असेल आपल्याला भेटायला? खरंच त्या मुलीचा आणि तिचा काही संबंध असेल? ती डोळ्यांसमोर गायब होते, घराचं दार बंद असतानाही आपल्या घरात येते, तिच्या भोवतीचा तो अंधुकसा उजेड, तिचा घाणेरडा आणि लांबून आल्यासारखा आवाज, हे सगळं काहीतरी विचित्र होतं हे वेणूला जाणवत होतं.

 

काय करावं तिला सुचत नव्हतं. ती बाहेर जाणं थांबवू शकत नव्हती. घरात तरी किती बसून राहणार? बाहेर गेल्यावर ती मुलगी भेटेल की नाही, हे तिच्या हातात राहिलंच नव्हतं मुळी. ती मुलगी कुठेही दिसायची. बाहेर जाताना आताशा वेणूच्या मनात धास्ती असायची. पण हे असं किती वेळ चालणार? हे सगळं तिला कुणाशी बोलताही यायचं नाही. तिच्या यजमानांना तिने काही वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. रात्री काही वेळा खरं तर त्या बाईचा आवाज त्यांनीही ऐकला, पण तरीही त्यांनी विश्वास ठेवला नाही. आजूबाजूला शेजार असा फारसा नव्हताच. एकदा सुमतीकाकूंनाही तिने ह्याबद्दल सांगितलं. पण त्या प्रचंड देवभोळ्या. देवाचं करत राहा, असले भास होणार नाहीत एवढाच सल्ला त्यांनी दिला.

 

दिवसामागून दिवस गेले, शेवटी वेणूने ठरवलं की आता त्या मुलीच्या घरी जाऊन सरळ तिच्या पालकांना भेटायचं आणि सांगायचं. तुमची मुलगी अशी रस्त्यात कुठेही भेटते, तिच्यावर लक्ष ठेवा. त्या बाईचा काही संबंध आहे का, हे सुद्धा जमलं तर बघता येईल, हाही हेतू होताच. एक दिवस दुपारी ती त्या वस्तीत पुन्हा गेली. वस्तीतल्या काही बायका तिथे विहिरीवर पाणी भरत होत्या. वेणूने त्या मुलीबद्दल सांगून आणि तिचं घर दाखवून काही माहिती मिळते का, ते बघायचा प्रयत्न केला. पण तिच्याबद्दल कुणी काही बोलायलाच तयार होईनात. सगळ्याजणी पटापट पाणी भरून आपापल्या वाटेने निघून गेल्या. मागच्याही वेळी वेणूला असाच अनुभव आला होता. आता एकच उपाय होता, तिच्या घरीच जावं लागणार. ती त्या दिशेने वळली, तेवढ्यात मागच्या पारावर बसलेल्या एका म्हाताऱ्या बाईने तिला हाक मारली.

अगो बाय, तिथे जाऊन काय व्हनार न्हाय. काय झाला? त्या पोरीबद्दल काय इचारायचंय तुला?”

वेणूने जाऊन सगळं सांगितलं. अर्थात, ती मुलगी सारखी सारखी भेटते, एवढंच. त्या बाईबद्दल ती काहीच बोलली नाही.

एवढाच? अजून काय नाय? ती बाय भेटायला येत असाल ना तुला? खरं सांग. तू खरं बोलशाल तर म्या सांगेन तुला…”

वेणूने होकारार्थी मान हलवली. त्या बाईबद्दल तिला काहीच बोलायची ईच्छा नव्हती. पण तिच्याबद्दल ह्या म्हातारीला कसं माहित, ह्याची उत्सुकता मात्र तिला लागून राहिली होती.

अगो बाय, तू एकलीच नाय हायअसं सारखंच होतंयया येळी तू, नंतर आनखी कुनी. अगो, तुला दिसते ती बाय त्या पोरीची माय हाय. पोरगी जरा डोक्याने मंद हाय. कुठंपन फिरत बसते. कुनी इचारलं तर सांगते, आई दुकानात गेलीय, म्या वाट बघतीय, नाहीतर आनखी काय सांगते. तिच्या घरी फकस्त बाप आन ती. तो दारू ढोसून पडलेला असतो घरात न्हायतर आनखी कुठं. पोरगी घरला आली की दार मात्र उघडतो. पोरगी कुठं कुठं फिरते, एकलीच. कोण दिसलं त्याच्याकडे मदत मागतीय, कदी म्हनते मला घरला सोड, कदी म्हनते खायला दे, कदी पैसे मागते…..तिच्या डोस्क्यात काय पन लक्षात न्हाय ह्रात. फकस्त बापूस.त्याला वालिखते. सवताचं घर वालिखते. रोज हितून जातेयेते, पर कुनास्नीबी न्हाय वलखत. आय गेल्यापासुन अशी वागतीयपरिनाम झालाय डोस्क्यावर तिच्या. “

म्हातारीच्या दोन शब्दांनी वेणूच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. पायांचे तळवे गार पडल्यासारखे वाटले.

आय गेल्यापासून? म्हणजे?”

 

अगो, तिची आय जाऊन दोन वरीस झालं. तशी ती पन फार चांगली नव्हतीच म्हना. दुष्टच. वस्तीतल्या कुनाचंबी येनाजानं नव्हतं तिच्या घरी. दुसऱ्याच्या पोरांनी काय खोड्या काडल्या, तर हातावर चटके देयला पन मागेफुडें बघायची न्हाय. पर सवताच्या पोरीवर लै जीव. समदी म्हणत्यात मेल्यावर पन हितच घुटमळतेय ती. पोरीवर लक्ष ठिऊन असती. बाप ह्यो असला. पोरगी नंतर येडसर झाली. तिच्या काळजीनं येतंय ती. पोरगी ज्याच्याकडे मदत मागती, त्याच्या मागे लागते आन पोरीची काळजी घे म्हून सांगत ह्राते. किती जनास्नी ह्यो अनुभव आलेत. परत्येक जन हितच येतोय तुझ्यासारखं. त्या पोरीची माहिती काडाया. आता तू ईचारलंस तवा तुज्या मागं ती लागलीय, हे कळलं वस्तीतल्या बायकांस्नी. म्हून त्या बोलाया फुडं येत न्हाईत. समजलं? “

आपल्या भोवतीचं सगळं जग गरगरल्यासारखं वाटलं वेणूला. हे विचित्र आहे, गूढ आहे, हे सगळं तिला माहित नव्हतं का? पण जी बाई आपल्याला दिसते, ती जिवंत नाहीये, हे खूप भयानक सत्य होतं तिच्यासाठी. ते पचवणं इतकं सोपं नव्हतं. शेवटी ती एका चांगले संस्कार असणाऱ्या, देवासारख्या पवित्र आणि निर्मळ गोष्टींचं अस्तित्व मानणाऱ्या घरातून आलेली होती. तिच्या वडिलांचा ह्या सगळ्या विषयावर बराच अभ्यास होता. पण भूत, हडळ ह्या असल्या कल्पना किंवा मेलेली माणसं अशी परत येतात वगैरे असलं कधीही त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं नव्हतं.

 

कशीबशी ती घरी परत आली. त्या म्हातारीचे शब्द कानात घुमत होते. पुढचे तीनचार दिवस ती घराच्या बाहेरच पडली नाही. आता काय केलं म्हणजे हा प्रश्न सुटेल असं तिला झालं होतं. आणि मग तशी संधीच चालून आली तिच्यापुढे. तिच्या यजमानांना पुन्हा एकदा काही कामासाठी बाहेरगावी जावं लागणार होतं. या वेळी मात्र वेणूने घरी एकटं राहायला साफ नकार दिला. त्यापेक्षा मला आठ दिवस माझ्या माहेरी सोडा, असा हट्टच केला तिने त्यांच्याकडे. यामुळे तिचा एकटं राहण्याचा प्रश्नही सुटला असता आणि तिच्या वडिलांशी तिला हे सगळं बोलताही आलं असतं. तिच्या यजमानांनाही ते पटलं. ही तरी बिचारी आठदहा दिवस एकटी काय करणार? तेवढीच माहेरी भेट होईल सगळ्यांशी आणि आपल्यालाही तिची काळजी करत राहायला नको, असा विचार करून ते तयार झाले.

 

त्यावेळी वडिलांना भेटणं झालं नसतं, तर ह्या सगळ्याबाबतीत नक्की पुढे काय घडलं असतं? हे सगळं कुठपर्यंत गेलं असतं? ती मुलगी अशीच भेटत राहिली असती का आणि मग तिच्याबरोबर तिची ती आईसुद्धा? ती मुलगी आता बरी झाली असेल का?

———————————————-

दूरवर कसलातरी कर्कश्य आवाज आला आणि माई आजी तिच्या विचारातून बाहेर आली. बाजूच्या आनिच्या खोलीत घड्याळाचा गजर होत होता.”मी पाच वाजता उठणार आहे अभ्यासालाकाल आनिने मारलेल्या बढाया आठवून माई आजीला हसू आलं. म्हणजे पाच वाजले सुद्धा. रात्र सरलीपण? भूतकाळ पुन्हा उलगडताना कधी हळूच झोप लागली तिचं तिलाही कळलं नव्हतं.

———————————————-

सकाळचे साडेआठ वाजले असतील. घरातले सगळे आपआपल्या कामांना लागलेदेखील होते. माई आजी सुद्धा तिच्या खोलीत तिची देवपूजा, जप ह्यात मग्न होती. सायली आणि ईशा मात्र खोलीतच बसून होत्या. कालचा सगळं प्रकार आठवून त्या सुन्न झाल्या होत्या.

सायले, एक विचारू का? काल तू पलंगाखाली गेलीस ते कशासाठी गेली होतीस? काय होतं खाली?”

सायलीने तिला दिसलं होतं ते सगळं काही सांगितलं. पण पलंगाखाली नंतर काय झालं ते मात्र तिला आठवत नव्हतं.

आठवून बघ ना जरा. आपल्याला कळायला हवं नाबरं सायले, मला आज संध्याकाळपर्यंत निघायला लागेल परतचार दिवस येणार नाही ऑफिसला असं सांगितलं होतं. आता जायला हवं….” ईशा

 

ईशा, ह्या सगळ्यापासून लांब जावंसं वाटतंय म्हणून तर असं म्हणत नाहीयेस ना…?” सायली

 

अगं काहीतरीच काय सायले?” ईशा

 

तू काल म्हणालीस नाआपण ह्याचा नाद सोडून देऊ वगैरे….” सायली

 

हो म्हटलं मी कारण मी खरंच घाबरले होते. तुझी अवस्था बघून खूप काळजी वाटत होतीपण काहीही झालं तरी मी तुला ह्यात अशी मधेच सोडून जाईन का? पण ऑफिसचं काय करू? तुझं बरं आहेतू सुजय यु.एसला जाणार आणि त्याच्याबरोबर वेळ घालवायला म्हणून डायरेक्ट दहा दिवसाची रजा घेतली आहेसवर तू चांगल्या पोझिशनला पण आहेसमाझं काय ? मी तर ट्रेनी आहे अजून….” ईशा

 

सुरुवात ट्रेनी पासूनच होते नाबरं ऐक ना,,,काल मी सिद्धार्थला मेसेज केला होता. नंतर काहीच बोलणं नाही झालं. आधी त्याच्याशी बोलून घेते जरात्याला बोलायचं होतं काहीतरी….” सायली

 

त्याला फोन करायची गरज नाहीये सायले, काल बोलले मी त्याच्याशीत्याच्याकडून जे कळलंय ते खूप धक्कादायक आहे.”ईशा

 

काय कळलंय?” सायलीने धास्तावूनच विचारलं.

————————————————-

सुजयच्या हातात कॉफीचा कप होता. पण तो विचारातच गढलेला होता. सायलीच्या घरी भेटलेला तिचा तो कलीग, सिद्धार्थ , त्याच्याचबद्दल विचार करत होता. तसं त्याला काही माहित आहे किंवा त्याला आपला संशय आलाय असं त्याच्या वागण्यावरून सुजयला अजिबात वाटलं नव्हतं. पण तरी का कुणास ठाऊक, त्याला भेटल्यापासून तो खूप अस्वस्थ झाला होता. नक्की काय खटकलं होतं त्याला? ‘मला काहीतरी कळलंयहे तो जे बोलला होता ते? की सायलीच्या बहिणीलाही चांगला ओळखत होता ते? की सायलीला भेटायला घरी आला होता ते? त्याचं त्यालाच कळत नव्हतं. पण त्याच्यापासून सावध राहायला हवं असं त्याचं मन त्याला सारखा इशारा देत होतं. त्याच्याबद्दल थोडी माहिती मिळाली पाहिजे. पण कशी? आणि माहिती म्हणजे त्याच्याबद्दल नक्की काय जाणून घ्यायचं? सध्यातरी ह्याचं उत्तर नव्हतं त्याच्याकडे. पण लवकरात लवकर शोधून काढायला हवं. कॉफीचा घोट घेत त्याने स्वतःशीच काहीतरी विचार केला पण मग उठून तो अस्वस्थपणे येरझाऱ्या घालायला लागला.

————————————————-

ईशाकडून सुजयबद्दलचं सत्य समजलं आणि सायली सुन्न होऊन गेली. ही एवढी मोठी फसवणूक? आपली? आईबाबांची? त्याने इतक्या सहज खऱ्या सुजय सानेची भूमिका पार पडली आणि आपल्याला कळलंही नाही? त्याने खोटे आईवडील उभे केले, खोटे नातेवाईक , मित्र जमवून आणले हे शोधून काढलं आपण पण मुळात हा माणूसच खोटा होता हे कसं कळलं नाही आपल्याला? त्याच्याबद्दल शंका कशी नाही आली एकदाहीआणि ह्या अशा माणसाशी साखरपुडा झालाय आपलासायलीला स्वतःचाच राग येत होता, स्वतःच्या मूर्खपणाची लाज वाटत होतीसंतापाने डोळ्यातून पाणी यायला लागलंअक्षरशः थरथरत ती खाली बसली. ईशाला तिची ही प्रतिक्रिया अपेक्षितच होती.

मी सोडणार नाहीये त्याला ईशा….मी काय अशी रस्त्यावर पडलेले वाटले का त्यालाकाहीही सांगावं आणि माझ्याशी लग्न करावं..असं? असा संताप येतोय ना मला….जाऊन खाडखाड कानाखाली माराव्यात त्याच्या अशी ईच्छा होतेय….”

 

आय अंडरस्टॅंड सायली. पण एक लक्षात घेसिद्धार्थने ही माहिती मिळवली तिथेच आपण अर्धे जिंकलोय. त्याला अंधारात ठेवून आता असे काही पुरावे गोळा करायचे ना त्याच्या विरुद्धगेला पाहिजे चांगला भरपूर वर्ष खडी फोडायला…” ईशाही चिडली होती.

 

पण ईशामाई आजी बोलली ते बरोबर आहेघरात हे सगळं कळलंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत आईबाबांनी सपोर्ट केलंय मला आत्तापर्यंत, मग यावेळीही त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे ना. त्या मूर्ख सुजयसाठी मी माझ्या आईबाबांशी खोटं का बोलू? हे सगळं सिरीयल आणि मुव्हीज मध्ये होतं. आपलं लाईफ हे मुव्ही नाहीये ना…” सायलीच्या बोलण्यात पुन्हा एकदा आत्मविश्वास डोकावत होता.

 

हो ना, उनके दिल को सदमा पहुचेगा, वक्त आनेपर उनको पता चल जायेगाअसली वाक्य तशीपण तुझ्या तोंडून चांगली नाही वाटणार सायलेतू आपली सरळ काकांच्या समोर उभी राहा आणि त्यांना सगळं सांग….”

ईशा म्हणाली तसं दोघीही खळखळून हसल्या. मागच्या काही दिवसात ह्या असल्या टेन्शन्स ना सामोरं जायची त्यांना सवयच होऊन गेली होती.

जोक्स अपार्ट ईशी, पण हे सगळे डायलॉग्स आपल्या पांढरपेशा, मराठमोळ्या संस्कारी घरात शोभूनही दिसत नाहीत. हो ना?”

ईशाने मान हलवली आणि ती अंघोळीसाठी बाथरुमकडे वळली.

 

ईशा अंघोळ करून परत आली तेव्हा सायली विचारमग्न, स्वतःच्याच जगात असल्यासारखी बसली होती. ईशा बाहेर आल्याचं तिने नोटीसही केलं नाही. सुजयचं खरं रूप कळल्यावर मागच्या सगळ्या घटनांचा पुन्हा एकदा ताळमेळ लावून ती पाहत होती. ईशाने हाक मारल्यावर ती विचारातून बाहेर आली.

काय गं, काय विचार करतेयस एवढा? काकांना कसं सांगायचं ह्याचा?”

 

ईशा, मी आत्तापर्यंतचं सगळं परत आठवून बघत होते. सुजयला जेव्हा जेव्हा भेटले तेव्हाचं त्याचं बोलणं, वागणं, सगळं. एक गोष्ट मला कळत नाहीये. मी आधी न सांगता अचानक त्याच्या घरी गेले होते, माहित आहे नातेव्हा त्याचा नागपूरचा मावस भाऊ राज भेटला मला तिथे. पण मी आत्ता विचार करत होते, की सुजय खोटा आहे, म्हणून त्याने सान्यांचे खरे नातेवाईक समोर न आणता खोटे नातेवाईक समोर आणले. बरोबर? म्हणजे, खऱ्या सुजयला एक मावशी आहे आणि ती नागपूरला राहते म्हणून त्याने एक नागपूरची मावशी उभी केली. बरोबर? मग तसेच बाकीचे नातेवाईक पण. आणि मग तसाच तो राज पण. बरोबर? म्हणजे तो काही नागपूरला राहणारा त्याचा खरा मावसभाऊ नसणार. येसबरोबर…” सायलीने स्वतःच्या या शोधावर समोरच्या टेबलवर स्वतःची मूठ आपटत म्हटलं.

 

माय गॉड, हा विचारच नाही आला डोक्यात. मग तो कोण होता? आणि सुजयला काही माहित नव्हतं तू जाणार आहेस ते. मग त्याने खोटा मावसभाऊ आधीपासूनच आणून का ठेवला होता घरात?” ईशा चक्रावून गेली होती.

पण ईशाच्या एकेका शब्दाबरोबर सायलीच्या मनातला गोंधळ मात्र दूर होत होता.

कारण ओह येस…..कारण तो खरा सुजय साने होता. साखरपुड्याच्या वेळी सुजयला फोन करणारा, कौस्तुभच्या घराच्या बाहेर सिद्धार्थला जो जाऊन आपटला, कौस्तुभचा ऑफिसमधला बॉस, यु.एसला गेलेल्या मिस्टर आणि मिसेस सान्यांचा मुलगा. खरा सुजय साने. “

———————————–

सायली आवरून बाहेर आली तेव्हा बाबा नुकतेच पूजा आटोपून बाहेर आले होते आणि आता पेपर वाचत होते. आई आत दुपारच्या स्वयंपाकाला लागली सुद्धा होती.

सायली, काय गं, तुम्ही दोघी? किती वेळा हाका मारल्या मी ब्रेकफास्ट साठी या म्हणून? आता थोड्या वेळाने जेवण्याची वेळ होईल. रात्री जागत बसला असाल, दुसरं काय? ईशा मगाशी तिची प्लेट घेऊन आत पळाली ती अजून बाहेरच आली नाहीये. काय करतेय काय ती?” आईचा सूर वैतागल्याचाच होता.

 

अगं सॉरी, म्हणजे खरंच जाग्या होतो काल उशिरापर्यंत. आणि माहितीये का, माई आज्जी पण चक्क जागी होती आमच्याबरोबर. आम्ही खूप गप्पा मारल्या…” सायली

 

हो, माहितीये ते. तिला बिचारीला नंतर पण झोप नाही लागली. रात्रभर जागी होती म्हणाली. जाऊदेत, तू खाऊन घे लवकर. आणि जरा भीमाबाईंना फोन करशील का, आज एक तास उशिरा या म्हणावं. आपली जेवणं व्हायला वेळच लागेल जरा. ”

 

हो करते.” सायली तिची खाण्याची प्लेट घेऊन बाबांपाशी आली.

 

बाबा, तुमच्याशी जरा बोलायचंय. ” सायली थोड्या हलक्याच आवाजात कुजबुजली.

 

हा बोल ना मग….”

बाबांचा नेहेमीतल्या पट्टीतला आवाज तिथे किचनमध्ये आईपर्यंत सहज गेला. तिने त्या दोघांकडे मान वळवून पाहिलंसुद्धा. पण तिच्या डोक्यात शंभर कामं होती, त्यापुढे वडीलमुलीमध्ये सहज म्हणून चाललेलं हे संभाषण तिला फार महत्वाचं वाटलं नाही.

श्श…………हळू बोला. मला तुमच्याशीच बोलायचंय आत्ता. ” सायली

बाबांनी गोंधळून तिच्याकडे पाहिलं. आईलाही सांगता येणार नाही असं सायलीला नक्की काय बोलायचं असेल असा त्यांना प्रश्न पडला.

बरं, आमच्या खोलीत ये तू थोड्या वेळाने…” बाबा जरा हळू आवाजात म्हणाले.

 

नको, मी ही खायची प्लेट घेऊन वरच्या खोलीत जाते. तुम्ही पण या लगेच पाचेक मिनिटांनी..” सायली

 

बरं…”

सायलीला जिन्यावरून वर जाताना पाहून बाबा पुन्हा विचारात पडले. हिला नक्की काय सांगायचं असेल, आणि आईला का नाही सांगायचंय? काही सरप्राईझ वगैरे ठरवतेय की आणखी काही? पण सरप्राईझ कसलं असणार? आईचा वाढदिवस, मदर्स डे वगैरे ह्यापैकी आत्ता काहीच नव्हतं. त्यांनी हळूच किचनच्या दिशेने पाहिलं. सायलीच्या आईचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. सुटकेचा निश्वास टाकत बाबाही सायलीच्या मागोमाग वरच्या खोलीच्या दिशेने निघाले.

————————————–

ईशा माई आजीशी गप्पा मारत होती. माई आजीला, सायलीला सोडून संध्याकाळी पुण्याला जायला तिला खरं तर कंटाळाच आला होता. पण इलाज नव्हता.

माई आजी एक विचारू का?”

ईशाने असं बोलून हळूच माई आजीकडे पाहिलं. पण आजीकडून लगेचच काही उत्तर आलं नाही, तसं तिने स्वतःचंच घोडं पुढे दामटवलं.

काल तू जे बघितलंस, त्याच्याबद्दल खरंच आश्चर्य नाही वाटलं का गं तुला? तू म्हणालीस असं काहीतरी की तुला अनुभव आलेत असले. हो ना? काय अनुभव आलेत सांग ना…”

 

काही अनुभव आले होते पूर्वी. पण आता त्या आठवणीही नको वाटतात. ” माई आजी

 

बघ तू परत कालच्यासारखीच तुटक बोलतेयस हा विषय निघाला की. एरव्ही कशी आमच्यातली होऊन भरपूर गप्पा मारतेस आमच्याशी. सांग ना तसंच प्लिज…” ईशा

 

बायो, अगो मी सांगेन हो. पण आत्ता नको. रात्रभर त्या विचारांनी घेरलं होतं नुसतं. पहाट झाली तसं थोडं बरं वाटलं मला. आता पुन्हा नकोत त्या आठवणी आणि ते विचार. आणि तुम्हाला होईल तशी मदत मी करणारच आहे. माझा काही ह्या सगळ्यात अभ्यास नाही,पण माझ्या वडिलांना बरीच माहिती होती ह्यासगळ्याची. अर्थात, म्हणून ते भूतबीत, पिशाच्च, सगळ्या सगळ्या कल्पना मानत होते असं नाही. त्या सगळ्याखाली अंधश्रद्धा पसरावणाऱ्यांना त्यांनी नेहेमी विरोधच केला, त्या काळी सुद्धा.. पण त्यांनी मला एक वेगळी बाजू सांगितली ह्या सगळ्याची. उद्या ह्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तेव्हा मी सांगेनच. पण आत्ता त्यावेळचा विषय नको बाळा.” माई आजी

——————————————-

सायलीचं सगळं बोलून झालं तरी बाबांची काहीच प्रतिक्रिया आली नव्हती. तिने बाबांकडे बघितलं. ते सुन्न होऊन बसले होते. सुजयचं खरं रूप त्यांच्या समोर आलं होतं खरं. पण त्यांना ते मनातून स्वीकारताच येत नव्हतं. त्याचा चेहरा डोळ्यांसमोर आल्यावर हा असं वागू शकेल?’ असाच विचार येत होता त्यांच्या मनात. मुळात सुजयच्या रूपाने त्यांच्या मुलीला एक चांगला जोडीदारच नव्हे, तर नवीन पिढीतला एक अगदी आदर्श मुलगा आपल्यालाही जावई म्हणून मिळालाय, एक अतिशय उमदं, तरुण व्यक्तिमत्व आपल्या घराशी जोडलं जाणार, ह्याचा त्यांना अतिशय अभिमान वाटत होता. आणि आज त्याच्याबद्दल खरं काय ते कळल्यावर ते आतून हादरून गेले.

बाबा …” सायलीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला..

 

मी काय बोलू हेच मला कळत नाहीये सायली….तुला सगळी खात्री आहे ना? अगदी शंभर टक्के?”

 

हो बाबा. खात्री करून घेण्यासाठी तर थांबले होते. नाहीतर आधीच सांगितलं असतं तुम्हाला.” सायली

 

मला एक कळत नाही, मी एवढा कसा चुकलो? त्याच्या ऑफिसमधून, घराजवळून माहिती काढली आणि त्या सगळ्या तिसऱ्या लोकांच्या म्हणण्यावर मी विश्वास ठेवला. मी अजून कुठूनतरी माहिती काढायला हवी होती त्याचीकदाचित त्यामुळे तरी हे खरं कळलं असतं आपल्याला.”

बाबांनी टेन्शनमुळे डोक्याला हात लावला तसं सायली त्यांच्या शेजारी बसली आणि त्यांचा हात कपाळावरून काढून घेतला.

तरीही हीच माहिती मिळाली असती बाबा आपल्याला. कारण आपण ह्यासुजयची माहिती काढतच नव्हतो, तर त्यासुजयची माहिती काढत होतो. आणि तोसुजय खरंच चांगला असणार म्हणूनच आपल्याला सगळ्यांकडून चांगलीच माहिती मिळाली. तुम्ही उगीच त्या माणसासाठी स्वतःला दोष देऊ नका. ”

 

थोडं थांबून काहीतरी विचार करून सायली म्हणाली, “पण एक आहे, माझ्याही आधी लक्षात नाही आलं. आपल्याला बाहेर सगळीकडे आपली आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी फोटोआयडी ची गरज असते. तसं करायला हवं खरं तरआपण माहिती काढताना फोटो पण दाखवून कन्फर्म केलं पाहिजे की जी माहिती मिळतेय ती ह्याच माणसाची मिळतेय की आणखी कोणाची….लग्न जुळवताना स्थळाबद्दलची माहिती काढताना युज्वली असं कोणी करत नाही, त्याचा फायदा झाला त्या सुजयला. आणि ह्याचा अंदाज असल्यामुळेच त्याने एवढी मोठी रिस्क घेतली असणार .त्याचं नावही सुजय सानेच होतं हा बोनस पॉईंट होता त्याच्याकडे. तू सुजय साने नाहीस, असं आपण म्हणूच शकणार नाही कारण तो आहे सुजय साने. पण नाव सोडून त्याने स्वतःची इतर ओळख लपवली. तो खरा कोण आहे, काय करतो, सगळं सगळं मला शोधून काढायचंय

 

शोधून काढायची गरज काय आहे सायली? पोलिसात जाऊ आणि आणू त्याला समोरकबूल करुदेत त्याला, त्याने फसवणूक केली आहे ते..” बाबा

 

पण आपण सांगणार काय पोलिसांना? हा सुजय साने नाही, असं? पण त्याचं नाव तर सुजय सानेच आहे ना? त्या नावाचे त्याचे आयडी प्रुफ्स सुद्धा असणारच. त्याने आपल्याला जी माहिती सांगितली ती दुसऱ्याची सांगितली असं आपण सांगितलं आणि तो म्हणाला की असं मी काहीच सांगितलेलं नाही, तर आपल्याकडे पुरावा काय आहे? आपल्या बाजूचे नातेवाईक? पोलीस का विश्वास ठेवतील आपल्यावर? ” सायलीच्या या बोलण्यावर बाबा विचारात पडले.

 

ज्या विवाह मंडळात त्याचं नाव नोंदवलं होतं तिथे जाऊन पाहिलं तर…..” बाबा स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले.

 

सायली मान हलवत म्हणाली,” काही उपयोग नाही बाबा. तुम्हाला आठवतं, सुजयच्या त्या सो कॉल्ड आईचा फोन आला होता सगळ्यात पहिल्यांदा स्थळाची चौकशी करायला म्हणून, तेव्हा त्यांनी त्याचा प्रोफाईल नंबर दिला होता, ऑनलाईन बघण्यासाठी. सगळी माहिती ही त्यासुजयचीच होती त्यात आणि प्रोफाईल फोटो मात्र अपलोड केला नव्हता. नंतर तुम्ही त्या विवाह मंडळात जाऊन त्याची फाईल सुद्धा चेक करून आलात. तिथेही फोटो नव्हताच. आठवतंय ना….त्याच्या आईला आपण पुन्हा फोन करून विचारलं तर काय म्हणाल्या त्या, आम्ही किती वेळा त्या विवाह मंडळवाल्यांना सांगितलं पण त्यांनी अजून फोटो अपलोड केला नाहीये. मग त्या म्हणाल्या की मी फोटो मेल करते तुम्हाला. फोटो त्यांनी पाठवला आपल्याला, विवाह मंडळातून नाही मिळाला. आपण काय सांगणार कोणाला? “

सायलीच्या एकेका शब्दागणिक बाबा अस्वस्थ होत होते. सुजयबद्दल आलेली चीड, होत असलेला मनस्ताप, स्थळाची चौकशी करताना आपण कुठे कमी पडलो, हे सगळे विचार आणि भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. आत्तापर्यंत मनमोकळे हसणारे बाबा अचानक कुठल्यातरी दडपणाखाली असल्यासारखे वाटले सायलीला. तिने जाऊन बाबांच्या खांद्यावर हात ठेवला.

बाबा, प्लिज टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझं टेन्शन तर अजिबात घेऊ नका. मी स्वतः खंबीर आहे माझं मला सांभाळायला. आणि तुम्ही आहातच ना माझ्याबरोबर, ईशा आहे, माई आजी, सिद्धार्थ सगळे आहेत आपल्याबरोबर. तुम्ही मला नेहेमीसारखे सपोर्ट करणारे हवे आहात ह्या सगळ्यात. आणि आपल्याला जरी त्याच्याविरुद्धचे पुरावे मिळाले तरी त्याची सगळी माहिती मला स्वतःला काढायची आहे. आपण त्याला जाऊन जाब विचारला तर तो सावध होईल. पळून जाईल आणि मग दुसरीकडे जाऊन हेच परत करणार नाही कशावरून? आपल्याला त्याच्याबद्दल कळलं म्हणून आपण वाचलो. एखाद्या मुलीला ह्याबद्दल नाही कळलं आणि ती फसली तर? हेच नकोय मला….” सायली.

 

ते सगळं ठीक आहे. पण काय आहे तुझ्या डोक्यात? आणि आईला हे सगळं सांगायचं नाही, असं म्हणणं आहे का तुझं? आणि सायली एक मिनिट, हे सगळं सांगताना तू त्या कुठल्या बाईबद्दल काय बोलत होतीस ते अगम्य वाटलं हा मला. मला कळलं नाहीये आणि पटलं तर त्याहीपेक्षा नाही. हे असलं काहीतरी होणं कधीच शक्य नसतं सायली.. हे असलं सगळं आपण कधी बोललोही नाहीये आणि आपण कधी मानतही नाही. लक्षात ठेव.” बाबा

 

मला माहित आहे बाबा. पण मला आणि ईशाला आलेत हे अनुभव आधी. आम्ही प्रत्यक्ष बघितलंय, त्यावरून बोलतेय मी. ठीक आहे आपण आत्ता त्याबद्दल नको बोलूया. नंतर सांगेन मी तुम्हाला सविस्तर काय आणि कसं झालं होतं ते. दुसरं म्हणजे आईला आत्ता लगेच नको सांगूया. ती पुढचं काहीच होऊ देणार नाही मग. हे सगळं कळल्यावर तिला प्रचंड मनस्ताप होणारच आहे, पण तिला माझा पुढचा शोध सुरु ठेवण्याचा निर्णय अर्थात पटणार नाही. आणि ती सान्यांकडे फोन करून लग्न मोडल्याचं जाहीर करेल. ती माझ्या काळजीनेच हे सगळं करेल पण त्यामुळे आपल्यापुरता प्रश्न सुटेल. सुजयचं काय? त्याला असंच सोडून द्यायचं? उद्या परत दुसऱ्या कोणाची फसवणूक करायला? म्हणून सध्या आईला नको सांगायला बाबा. प्लिज. ती या बाबतीत तुमचंपण ऐकणार नाही. ”

 

ठीक आहे. आईला नको सांगूया. पण एक लक्षात ठेव सायली. माझ्यापासून आता काहीही लपवायचं नाहीये. आणि आता मला सांग, आता हा जो शोध म्हणतेयस तो नक्की कसा घ्यायचा विचार आहे तुझा? काय आहे डोक्यात?”

 

तुम्ही उद्या किंवा जमलं तर आजच सुजयच्या घरी फोन करून सांगायचं की आम्ही पुढच्या दहापंधरा दिवसात लग्न करायला तयार आहोत…” सायली शांतपणे विचार करून म्हणाली.

 

काय ?” बाबा जोरातच ओरडले. ” मी असलं काहीही सांगणार नाहीये त्यांना. लग्नाचा विषयही काढायचा नाहीये आपण. तुझा शोध तू कसा घेणार आहेस असं विचारलं मी…”

 

बाबा, शोध घेताना त्या सुजयला संशय येणार नाही ह्याची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. काहीतरी आहे, जे तो लपवायला बघतोय आपल्यापासून. उद्या त्याला शंका आली की ह्यांच्याकडून काहीच उत्तर येत नाही म्हणजे ह्यांना काहीतरी कळलेलं असावं, तर तो ते लपवलेलं सत्य आपल्याला कळू देईल का? ” सायली

 

मग आपण त्यांना असं सांगू ना, की आम्हाला लवकर लग्न करण्याचा प्रस्ताव मान्य नाही. आम्ही दोन वर्ष थांबायला तयार आहोत. तुझ्या जॉब मध्ये तुला चांगल्या संधी आहेत आता असं सांगू ना त्याला. आत्ता लग्नाला तयार असल्याचं का दाखवायचं? छे, मला नाही पटत. ” बाबा मान हलवत म्हणाले.

 

पण आपण लवकर लग्नाला तयार आहोत हे कळलं की तो रिलॅक्स होईल ना बाबा. आता सगळं झाल्यातच आहे, असं समजून बेसावध राहील. आणि काहीही झालं तरी मी त्याच्याशी लग्न करणार नाहीये ना. आपल्याला माहिती आहे. मग एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकूया नाप्लिज बाबा. ”

 

पण मी हे सांगितलं तर मग आपल्याला फार कमी दिवस मिळतात सायली. शोध कुठून कसा घ्यायचा? ह्याच्यावर काही विचार केला आहेस?” बाबा

 

आत्तापर्यंत मला हे कळून चुकलंय, आपल्याला जे,जे प्रश्न पडलेत त्याच्या मागे जायचं. उत्तरं लगेच मिळतात आपल्याला. चला मी आता खाली जाऊन अजून इडल्या घेते. आईने चटणी काय मस्त केली आहे. ” सायली उठत म्हणाली , ” तुम्ही कराल ना बाबा फोन सुजयच्या घरी?”

बाबांनी मानेनेच होकार दिला. त्यांना पटलं नसलं तरीही सायलीसाठी हे करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. मगाशी सगळं ऐकून त्यांना जितका मोठा धक्का बसला होता, आता त्याहीपेक्षा जास्त कसलंतरी समाधान वाटत होतं. जिन्यावरून खाली जाणाऱ्या सायलीकडे पाहताना त्यांचा ऊर अभिमानानं भरून येत होता.

माझी एवढीशी परी, धावताना थोडी धडपडली तरी रडत रडत माझ्याकडे यायची. आज एवढी मोठी ठेच लागली तरी स्वतःला सावरून उभी राहिली आहे आणि उलट मलाच धीर देते आहे, माझी काळजी करू नका म्हणून. मोठी झालीस सायली तू. फक्त वयाने नाही, तर विचारांनी आणि कृतीने सुद्धा. या पुढच्या सगळ्या वाटेवर मी तुला साथ देणार. कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी माझी एवढीशी परीच आहेस तू. पुढल्या वेळी अशी ठेच लागूनच देणार नाही तुला. त्या सुजयला तुझ्या आजूबाजूलाही फिरकू देणार नाही मी …”

बाबा अशा विचारात असतानाच सायली पुन्हा वर आली.

बाबा, मला वाटलंच तुम्ही विचार करत असणार ह्यावर. पण आपल्यापुढे अजून बरेच प्रश्न आहेत.आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्यात. कटनीला नक्की काय आहे? ‘तीचा आणि सुजयचा काय संबंध आहे? सुजय नक्की कुठून आलाय, काय करतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खरा सुजय ह्या सुजयला सपोर्ट का करतोय? ह्यातला एक प्रश्न निवडायचा आणि सुरुवात करायची. पुढची वाट आपोआप उलगडत जाईल. “

सायली खाली जाताना बाबा पुन्हा एकदा अभिमानाने आपल्या लेकीकडे पाहत होते.

 

क्रमशः

 

7 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 24)

 1. Sweetali
  August 21, 2016

  Awesome story….always waiting for next part eagerly

  Liked by 1 person

 2. Sweetali
  August 21, 2016

  U r best writter….u knw how to keep stories suspense…..thats the reason always waiting for next part!

  Liked by 1 person

  • rutusara
   August 21, 2016

   Thanks 🙂 best vagaire nahi ga…evdhe mothe great writers aahet aaplyakade..pratyekveli mi improve karnyacha prayatn kartey mazyakadun itkach….tarihi bhavana pohochlya…thanks again 🙂

   Like

 3. shradha kulkarni
  August 22, 2016

  story khupach rangatdar hotiye.. can’t wait for the next part.. pls post it as soon as possible.

  Like

 4. Kiran Kamble
  August 29, 2016

  story khup suspence ne bharleli ahe, manun next part cha aturtene wat pahat ahot, plz lawkarat lawkar next part post kara.

  Like

  • rutusara
   September 4, 2016

   Done …posted the next part !! thank you 🙂

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on August 20, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: