davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 25)

बाबा अशा विचारात असतानाच सायली पुन्हा वर आली.

बाबा, मला वाटलंच तुम्ही विचार करत असणार ह्यावर. पण आपल्यापुढे अजून बरेच प्रश्न आहेत.आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी कळायच्यात. कटनीला नक्की काय आहे? ‘तीचा आणि सुजयचा काय संबंध आहे? सुजय नक्की कुठून आलाय, काय करतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो खरा सुजय ह्या सुजयला सपोर्ट का करतोय? ह्यातला एक प्रश्न निवडायचा आणि सुरुवात करायची. पुढची वाट आपोआप उलगडत जाईल. “

सायली खाली जाताना बाबा पुन्हा एकदा अभिमानाने आपल्या लेकीकडे पाहत होते.

 

************* भाग 24 पासून पुढे ********************

भाग 24 येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-E0

 

खिडकीतून बाहेर पाहत सुजय काहीतरी विचार करत बसला होता. तेवढ्यात मोबाईल वाजला तसा तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आला.

हॅलो, हा बोला.” सुजय

 

अभिनंदन सुजय. शेवटी बाजी मारलीस तू.” सुजयचे बाबा‘.

 

काय? म्हणजे काय?” सुजय

 

अरे बाबासायलीच्या घरून फोन आला होता आत्ता. तिच्या बाबांचा. सुजय यु.एसला जायच्या आधी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय असं म्हणाले.”

 

कोणी?” सुजयने सावध होत विचारलं.

 

अरे दुसरं कोण? सायलीने असा निर्णय घेतलाय आणि आमच्याशीही ती बोलली आहे, आणि आम्हाला सुद्धा मान्य आहे असं म्हणाले ते..”

 

खरंच ?” आता मात्र खुश होत सुजयने खुर्चीतून जवळजवळ उडीच मारत विचारलं.

 

हो, ते म्हणाले की आमचे गुरुजी नेमके चार दिवस गावाला गेलेत. त्यांना निरोप देणार आहोत पण तुमचे कोण नेहेमीचे गुरुजी असतील तर चांगला दिवस बघून तुम्हीच आम्हाला कळवा.”

 

अरे वा, चांगलंच आहे. आपल्यालाच ठरवता येईल. फक्त आता पुन्हा एकदा आपल्याकडची फक्त जवळची लोकं येणार, हे काहीतरी कारण काढून त्यांच्या गळी उतरवायला लागणार.” सुजयने लगेचच पुढचा विचार सुरु केला.

 

त्याची पण काळजी नाहीये सुजय. या वेळी सगळं आपल्याला हवं तसं जुळून आलंय. आता जास्त वेळ नाहीये त्यामुळे त्यांनाही हा समारंभ छोट्याच प्रमाणावर करायचाय. सगळ्यांची निमंत्रणं, हॉल, खरेदी, एवढं सगळं करायला वेळच नाहीये म्हणाले. त्यामुळे सायलीच असं म्हणाली की लग्न अगदी घरच्या लोकांना घेऊन करू. ”

तिच्या बाबांचं असं म्हणणं होतं की त्यांना तरी एक छोटं रिसेप्शन करायचं आहे. एखादा बँक्वेट हॉल बुक करणार आहेत लग्नाच्या दुसऱ्या दिवशी. तुमच्या लोकांनाही बोलवा असं म्हणाले. ” काका पुढे म्हणाले.

 

ते बघू नंतर. लग्न झालं की मी सायलीला तसंही सगळं सांगणारच आहे. तिच्यापासून आणखी काहीच लपवून ठेवायचं नाहीये मला. ” सुजय

 

ते तू काय ठरवशील तसं अर्थात.” काका

 

काका, पण नक्की असंच झालं ना बोलणं? म्हणजे तुम्ही काहीतरी भलतंच ऐकलं असं नाही ना?” सुजयने पुन्हा एकदा खात्री करून घेण्याच्या उद्देशाने विचारलं.

 

अरे हो रे बाबा. अगदी हेच. बरं आता काय करायचं मग?”

 

आता काय? सामान उचला तुमचं आणि या इकडे. आणि हो, माझ्या आईला पण कळवा. “

सुजय आई ह्या शब्दावर जोर देऊन म्हणाला तसं ते सुजयचे बाबामनापासून हसले.

हो त्यांना कळवतो. चल ठेऊ मग? आमचं मुंबईला यायचं बघ रे मग जरा कसं ते.”

त्यांचा फोन झाल्यावर सुजय एक मिनिटभर तसाच बसून राहिला. इतक्या दिवसांपासून चाललेलं, लग्न ह्या गोष्टीभोवती फिरणारं त्याचं सगळं प्लांनिंग आता कुठे सफल होताना त्याला दिसत होतं. काही महिन्यांपूर्वी आपलं लग्न आता कधीच होऊ शकणार नाही असं वाटून तो इतका निराश झाला होता.

————————-

एक दिवस असाच स्वतःच्या विचारात तो रस्त्याने चालला होता. त्याच्या बाजूने चालणाऱ्या वयस्कर गृहस्थांचा तेवढ्यात जरासा तोल गेल्यासारखा झाला आणि त्यांनी पटकन बाजूने चालणाऱ्या सुजयच्या हाताचा आधार घेतला. सुजयने त्यांची विचारपूस केली. खिशातला रुमाल काढून त्यांनी घाम पुसला. फार ऊन आहे, वगैरे काहीतरी म्हणत होते. सुजयचे आभार मानून ते पुढे गेले आणि सुजयला खाली पडलेलं कसलंसं कार्ड मिळालं. तिथल्याच मागच्या गल्लीत असलेल्या विवाह मंडळाचं कार्ड होतं ते. विवाह मंडळात नाव नोंदवलेल्या सगळ्यांकडे असली कार्ड्स देतात आणि ते जवळ असल्याशिवाय त्यांना त्या विवाह मंडळातल्या स्थळांची माहिती मिळू शकत नाही, हे सुजयला माहित होतं. त्या काकांनी कदाचित त्यांच्या मुलीचं किंवा मुलाचं नाव तिथे नोंदवलेलं असणार. रुमाल काढताना त्यांच्या खिशातून ते बाहेर पडलं असावं. सुजयने ते कार्ड उचलून समोर पाहिलं. ते काका रिक्षात बसत होते. त्यांना हाक मारून ते कार्ड त्याला परत करता आलं असतं. पण ते कार्ड पाहून त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू झाले होते. त्याने शांतपणे ते कार्ड स्वतःच्या खिशात ठेवलं. रिक्षा पुढे निघून गेली तशी त्याने पुन्हा ते बाहेर काढलं.

 

ते कार्ड हातात धरल्यावर मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली होती. तो तसाच त्या विवाह मंडळाच्या ऑफिसमध्ये शिरला. स्थळांच्या यादीची वही उघडली आणि समोर सायलीचा फोटो दिसला. दोन क्षण तो वेड्यासारखा तिच्या फोटोकडे पाहत होता. सायलीच्या फोटोने त्याच्यावर काय जादू केली, हे त्याचं त्यालाही कळलं नाही. पण त्या दिवशी तिथल्या तिथे त्याचा निर्णय झाला होता, ह्याच मुलीशी लग्न करण्याचा. अर्थात मागच्या दोन वेळी आलेल्या अनुभवांवरून हे एक दिव्यच असणार होतं. पण यावेळी माघार घ्यायची नाही असं त्याने ठरवलं. खोट्याचा आधार घ्यायला लागणार हे उघडच होतं. त्यावेळी मात्र नक्की काय आणि कसं करायचं हे काही त्याचं ठरलं नव्हतं. पण त्यानंतर पुढच्या दोनच दिवसात त्यासुजयशी त्याची भेट झाली. सगळं कसं अगदी जणू काही त्याच्यासाठीच घडवून आणल्यासारखं. त्याच्याशी भेट झाली तेव्हाच हा सगळा प्लॅन त्याच्या डोक्यात शिजू लागला. अर्थात, तो अगदीच कच्चा प्लॅन होता. त्याला सगळ्याबाजूंनी विचार करून, बरीच माहिती काढून एक पक्का प्लॅन तयार करावा लागला.

———————————-

आणि आज त्या सगळ्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं त्याला. पुढच्या काही दिवसात सायलीशी त्याचं लग्न होणार होतं. त्याला त्याच्या आयुष्याची जोडीदार मिळणार होती.

त्या आनंदाच्या भरातच तो उठला आणि आरशापाशी जाऊन उभा राहिला. समोरच्या आपल्या प्रतिबिंबाकडे पाहून हसला.

काँग्रॅज्युलेशन्स मिस्टर सुजय साने. यु आर गेटिंग मॅरीड.”

—————————————————————-

सायली तिच्या खोलीत विचार करत बसली होती. ईशा पुण्याला परत गेली होती, त्यामुळे तिला खूप एकटं पडल्यासारखं वाटत होतं. बाबांना ती म्हणाली होती खरी, की कुठलातरी एक प्रश्न घेऊन त्यावर आणखी खोलात जाऊन विचार करायचा म्हणजे पुढचा मार्ग आपोआप मिळेल. पण खरंच एवढं सोपं होतं का ते? तिच्यासमोर कितीतरी प्रश्न होते. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं कटनीला गेल्याशिवाय मिळणार नव्हती. काय करावं, काही सुचत नव्हतं. शेवटी तिने तिची डायरी उघडली. त्यात लिहिलेले सगळे पॉईंट्स वाचले तर काहीतरी सुचेल असा विचार करून ती पुन्हा एकदा ते सगळे पॉईंट्स वाचायला लागली.

 

पण नाही, या वेळी तिला काहीच सुचत नव्हतं. पुढचा मार्गच दिसत नव्हता. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. सिद्धार्थचा फोन होता.

हाय सायली, कशी आहेस?” सिद्धार्थ

 

ठीक आहे सिद्धार्थ. तू कसा आहेस ?” सायली

 

मी पण ओके. मला जरा बोलायचंय तुझ्याशीम्हणजेतू….”

त्याला अर्धवट तोडत सायली म्हणाली

बिफोर दॅट, आय वॉन्ट टू थँक यु सिद्धार्थ. सुजयबद्दल इतकी महत्वाची माहिती दिलीस तू. त्याचे नातेवाईक खोटे आहेत, एवढं आम्हाला कळलं होतं पण आपण समजतोय तो सुजय हा नाही, असा विचारही कधी आला नाही डोक्यात. तू हे सगळं शोधलंस म्हणून, नाहीतर आमची दिशाच चुकली असती.” सायली

 

अगं एवढं काय फॉर्मल बोलतेयस? मलाही त्याचा संशय आलाच होता, मी ह्या सगळ्याचा शोध घ्यायचा असं ठरवलंच होतं.  फक्त आता आपण एकाच वाटेने जातोय हे कळल्यावर, मला जे कळलंय ते तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटलं.” सिद्धार्थ

 

आय एम रिअली सॉरी सिद्धार्थ. मी तुला वाट्टेल तशी बोलले त्या रेस्टोरंट मध्ये. मला काय झालं होतं, एवढा राग का आला, मला नाही माहित..” सायली

 

अगं परत तसंच फॉर्मल बोलतेयस तू सायली. तू तेव्हा का रागावलीस हे मला खरंच तेव्हा कळलं नव्हतं पण नंतर जेव्हा तुझ्या बाजूने विचार केला, तेव्हा जाणवलं तू किती मानसिक तणावाखाली असशील ते….बरं आता हे थँक्स आणि सॉरी झालं असेल तर पुढचं बोलूया का?” सिद्धार्थ

 

हो सांग, का फोन केलायस तू?” सायली

 

मला ईशाने ते डायरीतल्या पानांचे फोटोज काढून पाठवले. वाचलं मी ते सगळं लिहिलेलं. गोष्टी पटत नाहीत काही, पण आता मी विश्वास ठेवायचा ठरवलंय. ईशाने पण पुण्याच्या बसमध्ये बसल्यावर फोन केला होता आणि सगळं सांगितलं मला नीट. शिवाय काल रात्री घडलेलं सुद्धा सगळं सांगितलं. काय आहे हे सगळं, तुला काय वाटतं?” सिद्धार्थ

 

मला नीटसं कळलेलं नाहीये सिद्धार्थ, पण सुजय….. आणि ती‘ …..काहीतरी संबंध आहे नक्कीच, पण काय आहे ते असं कळणार नाही. तुला ईशाने ह्या सगळ्यात कटनीबद्दल सांगितलं असेल ना? मला वाटतं सगळी कोडी तिथे जाऊनच सुटतील. पण तिथे जायचं कसं, घरी आईला काय सांगायचं? तिच्याशी खोटं बोलून जाणं मनाला पटत नाही रे. …आणि शिवाय बाबांना आता हे सगळं माहित असलं तरी ते असली रिस्क नाही घेऊ देणार मला. ” सायली

 

ते पुढचं काय करायचं ते माझ्यावर सोड तू. मी जायचं ठरवलं आहे कटनीला. ” सिद्धार्थ

 

काय? तू ? नाही….काहीतरीच काय? तू कशाला पडतोयस ह्यात सिद्धार्थ ? तू आत्तापर्यंत खरंच खूप मदत केली आहेस. पण आता तुला त्रास नाही द्यायचाय मला. मी शोधेन पुढचा मार्ग….” सायली.

सिद्धार्थने आपल्यासाठी तिथे कटनीला एकट्याने जाऊन शोध घ्यावा अशी तिची अजिबात ईच्छा नव्हती. सुजयला कळलं तर आणि तो सिद्धार्थच्या मागे तिकडे गेला तर ?. आणि तसंही, जर ती तिच्या आईशी खोटं बोलून तिथे जायला तयार नव्हती तर सिद्धार्थने तरी तसं का करावं ? तसं पाहायला गेलं तर त्याचा ह्या सगळ्याशी काहीच संबंध नव्हता.

प्लिज सायली तू पुन्हा पुन्हा असं फॉर्मल का बोलतेयस? वी आर गुड फ्रेंड्स. हे काय त्रास वगैरे? ” सिद्धार्थ

 

अरे, बाकी कुठल्याही बाबतीत मी तुला असं म्हटलं नसतं. पण कटनीला? मध्य प्रदेशातल्या कुठल्यातरी एका ठिकाणी तुला असंच उठून जायला कसं सांगू मी? तिथे काय आहे, काही रिस्क आहे का, आपल्याला काहीच माहित नाही. आणि दुसरं म्हणजे, तूसुद्धा तुझ्या आईशी खोटं बोलूनच जाणार ना? मग ते बरोबर नाही ना.” सायली

 

आईला काय सांगायचं त्याचा विचार करतोय मी. खोटं नाही बोलणार मी तिच्याशी. आणि बाकी काळजी मी घेईन, डोन्ट वरी अबाऊट इट. फक्त मला जायचं असेल तर ऑफिसमधून रजा घ्यावी लागेल सायली.” सिद्धार्थ

 

तुझी बॉस म्हणून तुझी रजा अप्रूव्हच करणार नाही मी. एकतर माझ्या कामासाठी रजा घेतोयस, त्यामुळे अजिबातच नाही. हे बघ, आपण थांबू आणखी एखादा दिवस. बघू आणखी काही मार्ग सुचतोय का ते. नाहीच तर मग ठरवू कटनीला जाण्याचं वगैरेओके?” सायली

 

आपल्याकडे वेळ कमी आहे सायली. तुझ्या बाबांनी लग्नाचा विषय काढलाय ना सुजयकडे? त्यांनी जर अगदीच लवकरची तारीख दिली तर मग आपल्या हातात काहीच वेळ राहणार नाही. ” सिद्धार्थ

त्याच्या घाई करण्याचं सायलीला हसू आलं पण त्यातही त्याचं आपल्याकडेआणि त्याच्या घाई करण्यामागचं कारण तिला थोडंसं सूखावूनही गेलं.

अरे पण मी कुठे लग्न करणार आहे त्याच्याशी? ” बोलतानाही तिला हसू आवरत नव्हतं.

सायलीचं बोलणं ऐकून सिद्धार्थला ओशाळल्यासारखं झालं. आपण तिच्याबद्दल फारच विचार करतोय असं तर तिला वाटलं नसेल ना?

हो ते माहित आहे. पण मला म्हणायचं होतं की उगीच वेळ नको घालवायला. मी जातो ना कटनीला.” सिद्धार्थने कसंतरी सावरून घेतलं.

 

एक दिवस तरी थांब. जरा विचार तर करून बघू, काहीच नाही सुचलं तर मग हा विचारपण करावाच लागेल.”

सिद्धार्थशी बोलून झाल्यावर सायली पुन्हा एकदा विचारात गढून गेली. यावेळी सगळे मार्ग बंद झाल्यासारखेच वाटत होते तिला. ईशाही समोर नव्हती नाहीतर तिच्याशी बोलता बोलता तरी बरेचवेळा पुढचा मार्ग दिसायचा. काय करावं, तिला काहीच सुचत नव्हतं. शेवटी कंटाळून ती उठली. माई आजीशी जाऊन जरा गप्पा माराव्यात म्हणून तिच्या खोलीत गेली. माई आजीचा नुकताच डोळा लागला होता. सायली तिथेच तिच्या उशाशी बसून राहिली. पण माई आजी उठण्याची काही चिन्ह दिसेनात. नुसतं बसून सायलीलाही झोप यायला लागली. खोलीत जाऊन स्वतःची उशी घेऊन यावी आणि इथेच झोपावं असा विचार करून ती उठली तेवढ्यात माई आजीने तिला हाक मारली.

आजी, अगं मला वाटलं तू झोपली आहेस.” सायली

 

डोळा लागला ग जरासा. काहीही ना करता नुसतं बसून राहिलं तरी थकवा येतो हो या वयात. तुला नाही झोप आली ?”

 

झोप? आत्ता कुठे साडेदहा होतायत. ही मुंबई आहे आजी. अकरा साडेअकराशिवाय इथे कोणी झोपत नसतं. मला असाच कंटाळा आला होता गं. ईशा पण नाहीये बडबड करायला. जाम बोअर होतंय म्हणून तुझ्याशी गप्पा मारायला आले होते.” सायली माईआजीच्या बाजूला बसत म्हणाली.

 

असं होय? मग आत्ता गप्पा मारूया की. झोपतेस माझ्या मांडीवर डोकं ठेवून जरासं? केसातून हलका हात फिरवला की बरं वाटेल हो तुला…”

सायलीने माईआजीच्या मांडीवर डोकं ठेवलं. माई आजीचे सुरकुतलेले, खरखरीत हात तिच्या केसातून अलगद फिरायला लागले तसं तिला खरंच खूप बरं वाटलं.

एक विचारू का सायले? मिळालं की नाही तुझ्या कोड्याचं उत्तर तुला?” माई आजी

माई आजीच्या प्रश्नाचा रोख सायलीला लगेच कळला.

कुठे गं आजी? डोक्यात सगळा गोंधळ झालाय. असं वाटतंय की पझलचे वेगवेगळे पिसेस माझ्यासमोर आहेत. त्यावरून थोडासा अर्थबोध होतोय मला, पण त्या सगळ्या पिसेसना जोडणारा मुख्य पीसच गायब आहे. तो मिळाला तर मग ते सगळे पिसेस एकमेकात व्यवस्थित बसतील आणि मग सगळ्याचाच अर्थ लागेल आणि कोडं सुटेल. पण त्या मधल्या मेन पीस चं काय करू? तो कुठे आणि कसा शोधू?” सायली

 

मला काय वाटतं माहित आहे का, बघ हा म्हणजे तुला पटतंय का. काल जे तुझ्या खोलीत झालं, ती जी कोणी बाई तुम्हाला दिसते, तुझ्या भाषेत सांगायचं तर तुमच्या त्या पझल का काय, त्याचा मुख्य तुकडा त्या बाईशी संबंधित असणार नक्कीच. कारण इथे त्या तुमच्या पझलचा मुख्य तुकडा गायब आहे आणि तिथे त्या बाईबद्दलची कुठलीही माहिती तुम्हाला नाही. म्हणजे ती बाईच तुमचा पुढचा मार्ग असणार, नाही का?” माई आजी

माईआजीचं बोलणं ऐकता ऐकता सायली उठून बसली होती.

माय गॉड आजी, यु आर अ जिनियस. आय मीन, ‘तीबद्दल आम्हाला माहिती नाही, एवढंच सारखं डोक्यात यायचं. माझ्या मनातलंच सांगितलंस तू आत्ता. पण तू किती क्लीअर होतीस तुझ्या विचारात. पझलचा मेन पीस मिळत नाही म्हणजे असं काहीतरी ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.आणि ते म्हणजेच ती‘. तिच्यापर्यंत जायचा प्रयत्न केला, तो मार्ग शोधला की कदाचित हे पिसेस एकमेकात जुळतील. फक्त आता हे कसं करायचं, ह्याचा विचार करायला हवा.”

 

कर विचार बाळा. तू हुशार आहेस. तुला उत्तर सापडेलच. फक्त जे कराल ते जपून. आपली वाट नेहेमीची नाही आणि त्यावरून जे सामोरं येणार आहे, तेसुद्धा नेहेमीचं नसणार. काळजी घ्या. काही लागलं तर मी आहेच.” आपले खरखरीत हात सायलीच्या डोक्यावरून आणि मग चेहऱ्यावरून फिरवत आजी म्हणाली.

तिच्या बोलण्याचा अर्थ सायलीला कळत होता. पण माई आजीला काहीतरी माहित आहे आणि ती सांगायचं टाळतेय असंही तिला वाटत होतं.

माई आजी, तू कोड्यात बोलतेयस जरा. तुला असंच म्हणायचंय ना की हे सगळं गूढ आणि विचित्र असणार आहे म्हणून सांभाळून राहा, असंच ना?” सायली

 

फक्त तेवढंच नाही बाळा. काल बोलताना एक शब्द वापरला ना आपण, अमानवी, अनैसर्गिक. तसं म्हणायचंय मला. थोडं स्पष्ट सांगते आता. कारण तुला ह्या सगळ्याची कल्पना असायला हवी आहे. अर्थात, तुला ती असणारच. पण तरी काही गोष्टी आपलं मन सहजासहजी मान्य करत नाही.पण ते मान्य केलं तर आपला पुढचा मार्ग सोपा होतो. आपल्या मनाची तयारी होते.”

 

कसली कल्पना असायला हवी आहे मला? ” सायली

 

सांगते. पण त्याआधी तू पुन्हा एकदा विचार करावास असं मला वाटतं. ह्या वाटेवर जाण्यापेक्षा सुजयला सरळ विचारत का नाहीस तू? किंवा सरळ सांगत का नाहीस त्याला, लग्न करायचं नाही म्हणून. “

सायली त्यावर काही बोलायला जाणार तेवढ्यात माईआजी तिला हाताने थांबवत पुढे म्हणाली,

तो दुसऱ्या मुलींना फसवू शकेल, वगैरे सगळं ठीक आहे बायो, पण तुझा विचार पण कर तू, असं मला वाटतं. ‘तीबाई का भेटते तुम्हाला, त्यामागचं कारण तुम्हाला मदत करणं आहे की आणखी काही? आपल्याला माहित नाही. ह्या मार्गाने जाण्यात काही धोका असला तर? ती पुन्हा पुन्हा तुला का दिसतेय? तुझ्या आयुष्यात तिचा शिरकाव झालाय आणि आता ती सहजपणे यायला लागली आहे, असं आहे का? हे सगळं कुठपर्यंत जाईल आपल्याला माहित नाही बाळा. जगाचा विचार कर पण त्याआधी स्वतःचा विचार कर. हे सगळं टाळता येईल तुला. लग्न नाहीच करायचं ना, मग आत्ताच सांगून टाक त्याला आणि मोकळी हो. आणि हे माझं मत आहे असं समजू नकोस. मी फक्त तुला सगळ्या बाजूंनी विचार करायला सांगतेय, ह्या वाटेवर पुढे जाण्याआधी. तू विचार करून सांग. मग मी सांगेन, तुला कसली कल्पना असायला हवी आहे ते.”

 

माई आजी, माझा विचार झालाय. मी काही त्या साहसकथांमधल्या हिरोहिरॉईनचा आदर्श ठेवलाय आणि त्यामुळे असं वागतेय असं नाहीये. पण मला खरंच ह्या सगळ्याच्या खोलात जायची ईच्छा आहे. मला शोधून काढायचंय. आय नो, रिस्क आहेच ह्यात. पण त्या सुजयने काही कमी रिस्क घेतली आहे का? मग तो एवढ्या सगळ्या खोट्याची रिस्क घेऊन माझ्याशी लग्न करू का पाहतोय? हे शोधून काढायचंय मला. मी काही कुणी मोठी लावण्यवती वगैरे नाही की माझ्यासाठी तो अगदी वेडा व्हावा, किंवा आपण काही खूप गर्भश्रीमंत नाही की माझ्या पैशांकडे पाहून त्याला माझ्याशी लग्न करावंसं वाटेल. काही दिवसांपूर्वी आम्ही पहिल्यांदा भेटलो एकमेकांना. मग का एवढं खोटं बोलून हे लग्न करायचंच आहे त्याला? कशासाठी? तो जसं मला बेसावध ठेवून, खोटं बोलून माझ्याशी लग्न करणार होता ना, तसंच आता त्याला बेसावध ठेवून, खऱ्याचा शोध घेऊन हे लग्न मोडायचंय मला. सगळं त्याच्याच स्टाईलने करायचंय. आणि ट्रस्ट मी आजी, मी पूर्ण विचार केलाय. जेव्हा मला वाटेल की आता हे सगळं अतिशय रिस्की होतंय, आणि मला आता पुढे आणखी धोका घ्यायचा नाही, तेव्हा मी स्वतःहून माघार घेईन. “

सायलीचं बोलणं ऐकून माई आजीला समाधान वाटलं. किती स्वच्छ, सरळ विचार करतेय पोरगी. एखादी रडत बसली असती, घाबरली असती. पण ही माझी सायली आहे. मनाने, विचाराने, कृतीने सरळ आणि म्हणूनच तिचं बोलणं ऐकलं की तिच्यातली शक्ती जाणवते.

ठीक आहे. तुला पुढे जाण्याआधी एक स्पष्ट कल्पना द्यायला हवी आहे. मगाशी आपण बोललो, की हे सगळं अनैसर्गिक किंवा अमानवी आहे, ……” आजीला मधेच तोडत सायली म्हणाली,

 

हो आजी, मला कल्पना आहे त्याची. मी अनुभवलंय ना ते सगळंइतकं विचित्र, गूढ …..” यावेळी माईआजी ने तिला मधेच तोडलं,

 

ती जी कुणी आहे, ती जिवंत नाहीये हे माहित आहे ना तुला?”

आजीचे ते शब्द कानात घुसल्यावर अंगावर जळता निखारा पडावा तसं वाटलं सायलीला. क्षणभर आजूबाजूचं सगळं गरगरतंय की काय असं वाटलं तिला. तिच्याही मनात नकळत असं आलं नव्हतं का कधी? विचित्र, गूढ, अमानवी वगैरे ही सगळी तिने दिलेली नावं होती. पण आज माईआजीच्या तोंडून ऐकताना ते सत्य भयानक वाटलं होतं. ती बाई जिवंत नाही, आणि तरीही आपल्याला दिसते, इतका नेमका विचार आज सायली पहिल्यांदाच करत होती.

सायली शांत झालेली पाहून माई आजीला तिच्या मनातली घालमेल समजली.

ह्याबद्दलच कल्पना द्यायची होती बाळा. आपल्यासाठी हे फार नवीन आहे, आपण ह्या सगळ्यावर कधी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे इतका सरळ विचार करायला आपल्याला जमत नाही बरेचवेळा. पण मग त्या गोष्टीला वेगवेगळी नावं देऊन आपण ती गोष्ट स्वीकारण्याचं टाळत राहतो. पण असं न करता, ती गोष्ट आहे तशी स्वीकारली की पुढचा मार्ग सोपा होतो, आपण सावध असतो आणि आपल्या मनात काहीही गोंधळ नसतो. म्हणून तुला हे इतकं स्पष्ट सांगायचं होतं मला. ह्या वाटेवर चालायचं ठरवलेलंच आहेस, तर त्यावरचे सगळे काटेकुटे, खड्डे आणि अंधारातल्या सावल्या, सगळ्याबद्दल तुला माहित असलेलं चांगलंच, नाही का? ”

 

तुझं बरोबर आहे आजी. जिवंत नसणारी बाई मला दिसते, हा इतका सरळ विचार करणं कठीण होतं माझ्यासाठी. माझ्या डोळ्यांनी मी हे सगळं बघितलंय, पण तरीही ते पटणं खूप कठीण आहे. हे असं नसतं. मला माहित आहे, असं कधीच होत नसतं. पण मग हे असे अनुभव का येतायत मला? असं कसं होऊ शकतं? ”

 

कसं होऊ शकतं त्याआधी का होतंय हे शोधायला नकोय का? हे सगळं का होतंय हे शोधायला हवंय सायलीकसं होतंय हा प्रश्नही महत्वाचा आहेच, पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. ” आजी

 

तुला खूप काहीतरी माहित आहे असं मला सारखं वाटतंय आजी….सांगत का नाहीस तू?” सायली

 

अगो बायो, सांगेन म्हटलं नाआत्ता नको. थकवा आलाय गं जरा. झोपूया का आपण? तू येते आहेस ना इथेच झोपायला?”

माई आजीने विषय बदलला तसं सायलीनेही तिला पुन्हा विचारण्याचा विचार केला नाही. तसंही त्या शांततेत, ह्या सगळ्याबद्दल बोलायलाही भीती वाटत होती.

हो, पण माझी उशी आणते. मला त्याच्याशिवाय झोप येत नाही. मगाशीच आणायला जाणार होते, पण तेवढ्यात तू उठलीस. आलेच…”

—————————————-

त्या रात्री त्या संभाषणानंतर सायलीला शांत झोप लागणं शक्यच नव्हतं. ती आपली या कुशीवरून, त्या कुशीवर चुळबुळ करत होती. डोक्यातले विचार संपत नव्हते मग झोप तरी कुठून लागणार? शेवटी तिने तिची आवडीची जुनी गाणी ऐकायचं ठरवलं. आधी रफी, मग तलत असं करत ती हळूहळू नव्या गाण्यांकडे वळली. शानचं एक खूप सुंदर गाणं ऐकत ती माईआजीच्या बाजूलाच पलंगावर बसली होती. ते गाणं ऐकताना हळूहळू तिचं भानच हरपल्यासारखं झालं. पण हळूहळू गाण्यातले शब्दही अस्पष्ट ऐकू यायला लागले. तो आवाज कमी कमी होत गेल्यासारखा वाटला. आणि मग जवळजवळ बंदच झाला. त्या शांततेतून आता पुन्हा आवाज यायला लागला आणि तो हळूहळू मोठा होत गेला. पण हा आवाज तर त्या गाण्याचा नव्हता, वेगळाच होता. कुणीतरी बोलत होतं. आवाज मोठा असला तरी खूपच लांबून आल्यासारखा वाटत होता. बोलणारं माणूस काय बोलत होतं ते नीट कळतही नव्हतं. मग आणखी एक आवाज आला. हा आवाजही अस्पष्ट होता. दोन आवाज एकमेकांशी बोलतायत असं काहीसं वाटत होतं पण नीट काहीच कळत नव्हतं. हळूहळू सायलीला स्वतःच्याही अस्तित्वाची जाणीव झाली. पण ती आत्ता पलंगावर बसली नव्हती. कुठल्यातरी अंधाऱ्या जागेत होती. आजूबाजूला फारशी जागाही नव्हती.

 

बाजूला कुणीतरी बसलं होतं तिच्या पण अंधारामुळे तिला काही कळतही नव्हतं. कुणीतरी बोलावलं म्हणून ती इथे आली होती एवढं तिला आठवत होतं पण बाकी कशाचाच अर्थ लागत नव्हता. हळूहळू ते आवाज मोठे होते गेले. वाऱ्याच्या लहरींमुळे त्यातले सगळे स्वर वरखाली होतायत असंच वाटत होतं. त्यामुळे त्यातले शब्द नीटसे कळतही नव्हते.

….….का…..….……..…….……हह …..…..…….………..?”

आवाजाबरोबर वारा वाहताना येतो तोसुद्धा जोरदार आवाज होता…..

…….…..……………..………………………….…..…….…….…… ………. .…. …….….……..……….”

हा आवाज जरा वेगळाच होता. बारीक असल्यासारखा.

…………….……..…….…….. …….. …… ……. ……… ………….. ………”

हळूहळू त्या वाहणाऱ्या वाऱ्याची कानांना सवय झाली तसे सायलीला ते सगळं जास्त स्पष्ट ऐकू यायला लागलं. अर्थात, स्वर वरखाली होतच होते पण तरीही आधी होता तसा गोंधळ होत नव्हता. हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा का वाटत होता?

….…..……..…..……………..…………………..…..…….…..…… ………..………………” पुन्हा तो बारीक आवाज…..

 

…..……..……….……..…..…….…….…….…….………….……………. …..…………………………..…..…….……..…….………………………………… ..….….…………….…..…………..………………..…..…….प…..ओ…….ल

…..ल…इ……स…..स……ट…….ए…..स……श…..अ…..न…..अ…….ज….अ……व…..अ…..ळ….अ….

च….अ….आ….ह…ह….ए…..त……ई…….त….थ……उ…….न…अ……..…..…….…………..

………….…………..…………..………..…….….. …..………….…….” बारीक आवाज……

मग सगळीच शांतता पसरली. कुणीतरी शेजारी बसलं होतं आधी ते आता तिथे नव्हतं. आता सायलीला हे आत्ता ऐकलेले सगळे आवाज पुन्हा पुन्हा ऐकू यायला लागले. एकदा, दोन वेळा, तीन वेळा…….किती वेळा तिने ते पुन्हा ऐकले तिलाही कळलं नाही.

सायले…..”

ईशाचा आवाज..ईशाचा आवाज कुठून येतोय?

सायली, कुठे आहेस ?”

पुन्हा ईशाचा आवाज….सायलीला तिला हाक मारून सांगायचं होतं की ती इथेच आहे जवळ. पण तिला ते शक्य होत नव्हतं. तोंड उघडायचा प्रयत्न केला तरी आवाजच बाहेर पडत नव्हता. शेवटी खूप जोर लावून सायलीने ईशाला हाक मारली.

ईशा….…..ईशा…….ईईईशा…..मीइथेच आहे अगं

————————————————-

सायली, ए बाळा, सायली…..अगं काय झालं? स्वप्न पडलं की काय? उठ….”

माई आजी तिला हलवत होती.

 

सायलीच्या ईशाला मारलेल्या हाका ऐकून माई आजी जागी झाली. सायलीही आता उठली. काय झालं, आत्ता आपण कुठे होतो आणि आता एकदम इथे बेडरूम मध्ये पलंगावर कसे काय आलो, हे लक्षात यायलाही तिला काही वेळ लागला.

स्वप्नच पडलं ग आजी. पण खूप रिअल वाटत होतं. ऍज इफ मी आधी बघितलंय, ऐकलंय हे सगळं. …..एक….मिनिट हा आजी…..थांब जरा….”

सायली बोलता बोलता एकदम किंचाळलीच आणि तिने समोरच्या ड्रॉवर मधून लिहिण्यासाठी कागद आणि पेन काढलं.

आजी थांब हा , मी सांगते तुला नंतर. आधी माझ्या लक्षात आहे ते सगळं लिहून काढते.”

सायलीने ती सगळी अगम्य अक्षरं लिहून काढली. ते कुणा दोघांमधलं संभाषण होतं हे त्यातल्या दोन वेगवेगळ्या आवाजांवरून लक्षात येत होतं. सायलीला हे पुन्हा, पुन्हा असं इतक्या वेळा ऐकू आलं होतं की ते शब्द तिच्या डोक्यात अगदी कोरलेच गेले होते जणू. अर्थात म्हणून काही तिला सगळंच आठवलं नाही, पण बरंचसं आठवलं.आणि तेवढं त्या शब्दांचा अर्थ लावण्यासाठी पुरेसं होतं. मागे तिने आणि ईशाने अशाच काही अगम्य शब्दांचा अर्थ लावून माही आणि कटनी बद्दल शोधून काढलं होतं. त्या वेळचा अनुभव या वेळी उपयोगी पडत होता. जवळपास वीसेक मिनिटं सायली त्या शब्दांचा अर्थ लावण्यात हरवून गेली होती. काहीतरी लिहीतही होती.

हम्म….माई आजी आता हे ऐक…..”

तिने ती वही समोर धरून त्यावरचं वाचायला सुरुवात केली.

काय झालं?” पहिला आवाज

 

मला नाही जायचंय पुढे.” दुसरा आवाज

 

योगिता, का पण?” पहिला आवाज

 

मी सांगितलंय ते तुला आधी. मी लोणावळ्याचा जॉब घेतलाय. मला आता भेटू नकोस. पुन्हा माझ्या समोरही येऊ नकोस …नाहीतर…पोलीस स्टेशनला जावं लागेल मला ….  पोलीस स्टेशन जवळच आहे तिथून…..सांगून ठेवतेय. ” दुसरा आवाज.

हे काय आहे सगळं? हे आवाज कोणाचे आहेत? हा पहिला आवाज इतका ओळखीचा का वाटतोय? एक मिनिटानंतर विचार करता करता सायलीने एकदम खुर्चीतून उठून उडीच मारली.

अगं आजी, ह्यातला पहिला आवाज सुजयचा आहे. नक्कीच…….”

 

खात्री आहे का तुझी? माई आजी

 

हो गं. ह्या आवाजाने झोप उडवलीये माझी. मी चांगलीच ओळखते हा आवाज. हा सुजयचाच आवाज आहे. पण मग ही योगिता कोण ?”

काही वेळानंतर सायलीच्या सगळंच लक्षात आलं. हे सगळं तिला काल ऐकू आलेलं होतं. पलंगाखाली. बरोबर. अंधार होता. बाजूला बसलेली ती‘. नंतर ऐकू आलेल्या ईशाच्या हाका. पण हे सगळं तिला तिथे पलंगाखाली का आणि कसं ऐकू आलं? तिथे तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. सुजय नव्हता, ती योगिता नव्हती. फक्त तीहोती.

 

सायलीने मनाशी काही विचार केला आणि मग ती माई आजीला म्हणाली,

मला पुढचा मार्ग मिळालाय, माई आजी. एकदम उठून कटनीला जाणं थोडं कठीण आहे. पण एक दिवसाच्या ट्रीपसाठी म्हणून लोणावळ्याला तर जाऊ शकतोच ना….आता तिथेच जाऊन बघायचं. आणखी किती प्रश्नांची उत्तरं मिळतायत ते…”

क्रमशः

Advertisements

2 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 25)

  1. M.g
    September 8, 2016

    Khupch mast…..pudhchya bhag lavkar taka.. vat pahtoy next part chi……..katha akdam rangatdar challiye

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on September 4, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: