davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 26)

अगं आजी, ह्यातला पहिला आवाज सुजयचा आहे. नक्कीच…….”

खात्री आहे का तुझी? माई आजी

हो गं. ह्या आवाजाने झोप उडवलीये माझी. मी चांगलीच ओळखते हा आवाज. हा सुजयचाच आवाज आहे. पण मग ही योगिता कोण ?”

काही वेळानंतर सायलीच्या सगळंच लक्षात आलं. हे सगळं तिला काल ऐकू आलेलं होतं. पलंगाखाली. बरोबर. अंधार होता. बाजूला बसलेली ती‘. नंतर ऐकू आलेल्या ईशाच्या हाका. पण हे सगळं तिला तिथे पलंगाखाली का आणि कसं ऐकू आलं? तिथे तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. सुजय नव्हता, ती योगिता नव्हती. फक्त तीहोती.

सायलीने मनाशी काही विचार केला आणि मग ती माई आजीला म्हणाली,

मला पुढचा मार्ग मिळालाय, माई आजी. एकदम उठून कटनीला जाणं थोडं कठीण आहे. पण एक दिवसाच्या ट्रीपसाठी म्हणून लोणावळ्याला तर जाऊ शकतोच ना….आता तिथेच जाऊन बघायचं. आणखी किती प्रश्नांची उत्तरं मिळतायत ते..

***********************भाग 25 पासून पुढे चालू*******************

भाग 25 येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-Fh

 

लगेच दुसऱ्या दिवशी लोणावळ्याला जायचं सायलीने नक्की केलं. बाबांची परवानगी घेणं तिला कठीणच गेलं. खरं तर ते तिच्याबरोबर आलेही असते. पण आज नेमकी आई घरी नव्हती. ती तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाची खरेदी करायला म्हणून सकाळीच बाहेर पडली होती. बाहेरगावी असणाऱ्या त्यांच्या आणखी 2 मैत्रिणीही काल रात्रीच त्या मैत्रिणीच्या घरी येऊन दाखल झाल्या होत्या. खरं म्हणजे सायलीच्या लग्नाची गडबड असताना, असं दिवसभर बाहेर जाणं आईला ठीक वाटत नव्हतं. पण एका बाजूला सगळ्या मैत्रिणी आणि दुसरीकडे सायली, माई आजी आणि अनिकेत सगळ्यांनी गळ घातल्यामुळे ती तयार झाली. पण सायली आणि बाबा दिवसभर माई आजीबरोबर राहतील, ह्या अटीवर ती तयार झाली होती. ती तशीही संध्याकाळी उशिराच घरी येणार होती, त्यामुळे तिला काही सांगण्याची वेळच येणार नव्हती. पण आई घरी नसल्यामुळे बाबा मात्र सायलीबरोबर येऊ शकणार नव्हते. माई आजीबरोबर कुणीतरी घरी थांबणं आवश्यकच होतं. आणखी एक दिवस थांब. मग मी तुझ्याबरोबर येतो, असंही बाबांनी सुचवून पाहिलं. पण आणखी एक दिवस वाट बघणं म्हणजे तो दिवस पूर्ण वाया घालवण्यासारखंच आहे, असं सायलीचं म्हणणं होतं. तिने हट्टच केला बाबांपाशी. दर अर्ध्या तासाने फोन करण्याचं प्रॉमिस केलं.

 

आई घरी थांबली असती तर कदाचित बाबांना सायलीसोबत जाणं शक्य झालं असतं. पण दोघे एकत्र कुठे जातायत, असा प्रश्न तिला पडलाच असता आणि त्यावर समाधानकारक उत्तर देणं सायली आणि बाबा दोघांनाही शक्य नव्हतं. आईला खरं सांगून जायचं तर केवळ अशक्य होतं. तिला सुजयबद्दल खरं काय ते कळल्यावर ती काय करेल हे सायलीला अगदी नक्की माहित होतं, त्यामुळे आत्ता तिला काहीच कळायला नको होतं. ती घरात नव्हती, ही खरं तर तिच्याशी खोटं बोलणं टाळण्याची संधी होती सायलीसाठी. खरं लपवायला तर लागणार होतं, पण निदान स्वतःच्या तोंडून खोटं तरी बाहेर पडणार नाही, असा विचार ती करत होती.

 

ईशाला बोलावणं शक्य होतं. पण चार दिवसांच्या रजेवरून ती कालच पुन्हा जॉईन झाली होती. तिने असं सारखं सारखं ऑफिसमधून रजा घेणंही बरोबर नव्हतं. त्यामुळे ईशालाही सांगायचं नाही, असं तिने ठरवलं. सिद्धार्थच्या बाबतीतही तिचं हेच मत होतं. एकतर, सारखी सारखी त्याची मदत घ्यायचं तिला आता ठीक वाटत नव्हतं. तिच्याबरोबर यायचं म्हणजे त्यालाही त्याची सगळी कामं सोडून रजा घेणं भाग होतं. त्याला सांगितलं की तो ऐकणार नाही, त्यामुळे त्याला न सांगितलेलंच बरं असं तिने ठरवलं आणि ह्या दोघांपैकी कोणालाही काही सांगू नका, असं बाबांनाही बजावलं.

 

पण बाबांना मात्र सायलीला असं एकटीलाच कसं जाऊ द्यावं, हे कळत नव्हतं. बाबांची परवानगी घेऊन आणि घाईघाईने खाऊन सायली बाहेर पडली तेव्हा सकाळचे साडेनऊ होऊन गेले होते. पण, तिने कितीही सांगितलं तरी बाबांची काळजी अशी थोडीच कमी होणार होती? सायलीबरोबर न जाऊन आपण काही चूक तर करत नाही ना ? हा प्रश्न सायली घराबाहेर पडल्यापासून त्यांना सतावायला लागला होता. शेवटी न राहवून त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून एक नंबर डायल केला.

———————————————————

जवळपास दोन तासात सायली लोणावळ्याला येऊन पोहोचली. प्रायव्हेट टॅक्सीने कुठेही हॉल्ट न घेता आल्यामुळे ती तशी वेळेतच पोहोचली होती. बाबांना कबूल केल्याप्रमाणे तिने टॅक्सीचा नंबर, ड्रायव्हरचं नाव वगैरे पाठवलं होतंच. पण दर अर्ध्या तासाने फोनही करत होती. तशी लोणावळ्याला काय ती एकटी अशी पहिल्यांदाच येत होती का? कॉलेज मध्ये असताना पिकनिक साठी म्हणून ते अगदी मागच्या वर्षी काहीतरी सेमिनार अटेंड करायला म्हणून ती लोणावळ्याला आली होती. पण यावेळी बाबांना वाटणारी काळजी वेगळी आहे, हे तिला माहित होतं, जाणवत होतं. त्यांना कमीत कमी टेन्शन येईल ह्याची काळजी घ्यायलाच हवी होती.

 

रस्त्यात सगळा वेळ ती त्या काल ऐकू आलेल्या आवाजांचा विचार करत होती. ती योगिता कोण असेल, ह्याचे वेगवेगळे अंदाज बांधत होती. पुढे काय करायचं ह्याचा थोडाफार विचार तिने करून ठेवला होता. एकतर एवढ्या मोठ्या शहरात ह्या योगिता नावाच्या मुलीला शोधायचं म्हणजे फारच कठीण होतं. पण मागे सिद्धार्थने कौस्तुभचा पत्ता ज्या प्रकारे शोधून काढला होता, तेच याही वेळी ट्राय करायचं तिने ठरवलं. पण या वेळी खरंच कठीण होतं, कारण त्या योगिताचं पूर्ण नाव तिच्याकडे नव्हतं.

 

समोर रिक्षा स्टॅन्ड दिसल्यावर तिने लोणावळा पोस्ट ऑफिसकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काय विचारायचं ह्याची तिने तशी काहीच तयारी केली नव्हती. रिक्षात बसल्यावर तिने तिच्या पर्समधून तिची डायरी आणि त्यात ठेवलेला तो कागद बाहेर काढला. काल ऐकू आलेले, सुजय आणि त्या योगितामधले संवाद पुन्हा पुन्हा तिने वाचून पहिले. पोलीस स्टेशन जवळच आहे तिथून, असं ती त्याला म्हणाली होती. ह्याचा कदाचित सायलीला तिचं पत्ता शोधण्यात उपयोग होऊ शकला असता. अर्थात तिथून जवळआहे म्हणजे कुठून जवळ आहे? तिच्या घरापासून की ऑफिसपासून? तिच्या बोलण्यावरून सुजयने तिला भेटू नये म्हणून ती हे सगळं त्याला सांगत असावीम्हणजे कदाचित हे पोलीस स्टेशन वगैरे सगळंच खोटंही असू शकेल, त्याला नुसतंच घाबरवण्यासाठी तिने हे म्हटलेलं असू शकतं. पण जाऊदेअसा विचार करण्यापेक्षा पोलीस स्टेशनच्या जवळपास ती राहत असेल किंवा निदान तिचं ऑफिस असेल असा विचार करूया असं सायलीने ठरवलं.

 

पोस्ट ऑफिसमध्ये तशी फारशी गर्दी नव्हती. काही विंडोज वर थोडी थोडी रांग दिसत होती. तर काही विंडोज अजून बंदच होत्या. दोन पोस्टमन तेवढ्यात आतून बाहेर जाताना दिसले. त्यांना थांबवून सायलीने विचारलं. त्यांनी तीन नंबरच्या विंडोकडे बोट दाखवून तिथे विचाराम्हणून सांगितलं.

 

तीन नंबरच्या विंडोच्या इथे कुणीच उभं नव्हतं आणि पलीकडच्या बाजूला बसलेले मध्यमवयीन गृहस्थ कशावर तरी पोस्टाचे शिक्के मारत बसलेले होते. त्यांना जाऊन सायलीने विचारलं, ही अशी ह्या मुलीबद्दल माहिती कशी मिळेल वगैरे.

अहो मॅडम, नुसत्या पहिल्या नावावरून पत्ता काढून द्यायला आम्ही काय कॉम्प्युटर आहोत काय? कॉम्प्युटर पण ही…..मोठी यादी देईल तुम्हाला नुसत्या ह्या नावावरून. काही आडनाव, मधलं नाव काही असेल का नाही?”

 

काका प्लिज, अहो काहीच माहित नाहीये म्हणून तर मी आले आहे ना पोस्ट ऑफिसात. तुमच्या रेकॉर्ड मध्ये असतील ना योगिता नावाच्या मुलींचे किंवा बायकांचे पत्ते. प्लिज एकदा बघून सांगता का? निदान अशा किती योगिता आहेत, हे तरी कळेल ना…” सायली

 

असं कसं होईल मॅडम? एवढं सगळं कोण बघत बसणार? वेळ कोणाला आहे एवढा? तुम्हाला मदत करायला नाही म्हणत नाही मी. आम्ही लोकांच्या मदतीसाठीच बसलेलो आहोत. पण म्हणून आम्हाला एकदम गृहीत धरल्यासारखंच येता तुम्ही लोक. मधलं नाव,आडनाव माहित नाही, पत्त्यामधली काही महत्वाची खूण माहित नाही.फक्त नावावरून पत्ता कसा शोधणार? आणि समजा शोधलं तुमचं ते काय योगिताका काय ते नाव, आणि दहापंधरा योगिता निघाल्या इथल्या आजूबाजूच्या, तर तुम्ही काय त्या दहापंधरा ठिकाणी त्यांना शोधायला जाणार काय? ” तो माणूस आता जरा वैतागायला लागला होता.

 

प्लिज काका तुम्ही चिडू नका. मला कळतंय फक्त नावावरून पत्ता शोधणं फार कठीण आहे. तिचं घर किंवा तिचं ऑफिस पोलीस स्टेशनच्या जवळच आहे, एवढंच माहित आहे मला. त्याची काही मदत होणार असेल तर….”

 

आता हे काय मधेच? घराच्या किंवा ऑफिसच्या जवळ पोलीस स्टेशन आहे? घराच्या की ऑफिसच्या? अहो एवढी माहिती आहे तर मग तुम्हीच का नाही शोधत? ” आता ते खरंच वैतागले होते.

त्यांचा तिरकस स्वर ऐकून सायलीने शेवटी स्वतःचा प्लिजआणि मला मदत कराचा सूर बंद केला.

अहो, जी गोष्ट तुमच्यासाठी कठीण आहे, ती मला एकटीला शोधून काढणं केवळ अशक्य आहे, नाही का? म्हणून आले मी तुमच्याकडे. आणि खूप लांबून आलेय. मुंबईहून. मला पूर्ण कळतंय की कदाचित थोडा वेळ लागू शकतो, पण तुम्ही मनावर घेतलंत तर निदान अशा किती योगिता आहेत आणि त्यांच्यापैकी कोणी पोलीस स्टेशनच्या जवळ राहतं का एवढं तरी कळेल ना. मग पुढचं मी बघेन. ” सायली

 

तुम्ही पुन्हा तेच बोलताय. मी नाही काही करू शकत ह्यामध्ये…..”

 

काय झालं नाईक? काय नाही करू शकत?” त्यांना मधेच तोंडून कोणीतरी म्हणालं. हा आवाज अगदी भारदस्त होता.

 

अहो साहेब, ह्या मॅडमना एक पत्ता हवाय. पण पूर्ण नाव नाहीये त्यांच्याकडे. नुसतं योगिता‘. आता ह्यावरून शोधणं कठीण आहे साहेब. कामाच्या वेळेत हे कसं काय शोधून देणार ह्यांना?”

ते भारदस्त आवाजवाले ह्या नाईकांचे साहेब दिसतायत, हे सायलीच्या लक्षात आलंच होतं.

प्लिज सर, मी सांगतेय त्यांना की मला पूर्ण कल्पना आहे, हे कठीण आणि वेळखाऊ काम आहे. पण तुमच्याकडे नाही तर कोणाकडे कळेल मला हे? मी मुंबईहून तेवढ्यासाठी आलेय. आणि अगदीच काहीच माहिती नाही असं नाहीये. त्या योगिताचं घर किंवा ऑफिस पोलीस स्टेशनपासून जवळ आहे, एवढं माहित आहे मला. प्लिज सर, मला फक्त जितक्या योगिता पोलीस स्टेशनच्या आजूबाजूच्या एरियामध्ये राहतात, तेवढ्यांचे पत्ते द्या. आय रिक्वेस्ट यु.” सायली

 

ठीक आहे. पत्ते देतो तुम्हाला. पण त्याआधी तुम्हाला ते कशाला हवेत ते सांगा. काय आहे, तुमच्यावर अविश्वास दाखवायचा म्हणून नाही विचारत, पण पोस्ट ऑफिसमधून मिळालेल्या माहितीचा गैरवापर होऊ नये, म्हणून. त्यात तुम्हाला तुमची ती योगिता, तिचं पूर्ण नाव वगैरे माहित असतं, तर विचारलंही नसतं तसं. पण आता हे एवढे सगळे पत्ते तुम्हाला आम्ही देणार, तर तुमचं नक्की काम काय आहे, ते कळलं पाहिजे ना आम्हाला. “

हा विचार तर सायलीने केलाच नव्हता. पण आता पटकन काहीतरी सुचेल ते सांगणं भाग होतं. एक क्षणभर तिने विचार केला. सध्या वाचत असलेल्या एका कादंबरीतला एक प्रसंग पटकन तिच्या डोळ्यासमोर आला. घरचा धाक असल्यामुळे मैत्रिणींकडून आईला खोटं कारण सांगून रात्रीच्या पार्टीला जाणारी मुलगी. अगदी नेहेमी कथा, मालिकांमध्ये दाखवला जाणारा प्रसंग. कॉलेज मधल्या सगळ्या मुलांचं गेटटुगेदर आहे आणि एका महत्वाच्या विषयावर सेमिनार आहे, असं काहीतरी सांगून मैत्रिणींबरोबर पार्टी करायला जाणारी ती मुलगी. आत्ता तीच सायलीच्या मदतीला धावून आली.

हो बरोबरच आहे तुमचं. मी आणि योगिता, आम्ही कॉलेज मध्ये एकत्र होतो. तिचं लग्न झालं तीनेक वर्षांपूर्वी. आणि नंतर तशी ती कोणाच्याच टच मध्ये नाही. तिचं लग्नानंतरचं नाव, पत्ता, फोन नंबर वगैरे कोणाकडेच नाहीये आमच्या ग्रुप मध्ये. आणि आता आमचं गेट टुगेदर ठरतंय आणि तिला पण बोलवायचंय. बाकी सगळे येतायत पण फक्त ती नाहीये. ती लोणावळ्याला असते असं कोणीतरी म्हणालं पण बाकी काहीच माहिती नाही तशी. फेसबुकवर विचारून बघितलं तिला पण बरेच दिवस ती ऍक्टिव्ह पण नाहीये फेसबुक वर. मी तेवढ्यासाठी मुंबईहून खास रजा टाकून आलेय. तिचं पत्ता शोधायचा आणि तिला भेटून गेट टुगेदर मध्ये येण्यासाठी कन्व्हिन्स करायचं काम माझ्यावर सोडलंय सगळ्यांनी. तुम्ही खरंच पत्ता शोधून दिलात तर मोठी हेल्प होईल आम्हाला.”

सायली काहीच विचार न करता घडाघडा बोलत होती. काहीही न ठरवता आपण इतकं सगळं गेटटुगेदर वगैरे अगदी खरंच ठरल्यासारखं कसं काय बोलू शकतोय, ह्याचं एका बाजूला तिला आश्चर्यही वाटत होतं. आजकाल आपलं खोटं बोलणं खूप वाढलंय, एक गोष्ट लपवायला दुसरं खोटं, त्या सुजयसारखं. एका बाजूला त्यांच्याशी बोलताना हाही विचार आला तिच्या डोक्यात. पण मग सुजयचा विचार आला आणि ती एकदम भानावर आली.

ठीक आहे. तुम्ही इथे बसा.” असं म्हणून ते दुसऱ्या दिशेला तोंड करून एकदम ओरडले, “ओ माने, …..जरा इथे या. काम आहे.”

पलीकडच्या मागच्या बाजूच्या टेबलवर बसलेले माने एकदम दचकून उभेच राहिले. एकतर ते काउंटर पाशी बसलेले नव्हते. त्यांचं टेबल आतल्या बाजूला होतं. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना जो अलर्टनेस लागतो तो त्यांच्यात नव्हताच. आपल्याशी कुणी बोलायलाही येणार नाही, आपलं काम बरं आणि आपण बरे, अशा अविर्भावात ते त्यांच्या टेबलवर अगदी त्यांच्याच जगात होते. ती खणखणीत हाकही त्यांच्या कानात जरा उशिराच शिरली. कोणी अशा प्रकारे त्यांना हाक मारत नसावं एरव्ही कधी.

हो, होआलो साहेब.” ते लगबगीने उठून बाहेर आले.

 

जरा पोलीस स्टेशनच्या भागात आपले कोण पोस्टमन असतात ते पहा. ह्या मॅडमना एक पत्ता हवाय पण त्यांच्याकडे फक्त नाव आहे, आडनाव नाही. जरा बघा काही माहिती मिळतेय का. ”

 

कोणतं पोलीस स्टेशन साहेब? नाही, कारण दोन पोलीस स्टेशन आहेत ना इथे, एक ग्रामीण पोलीस स्टेशन आणि दुसरं ते मोठं….” माने

 

हम्मपण ते नाही माहित आपल्याला. त्या दोन्ही पोलीस स्टेशनच्या भागात जाणारे पोस्टमन बघा जरा आणि माहिती घ्या. नाव ह्या मॅडम सांगतील. एक काम करा, तुमचं काय चाललंय आत्ता?”

 

ते बचत पत्राचं बघतोय, त्या सगळ्या नोंदी…..”

 

हाहा….समजलं. एक काम करा. एक तासभर जरा बाजूला ठेवा ते. आणि एक तासात नाहीच झालं काम ह्या मॅडम चं, तर मला सांगा. ठीक आहे. मॅडम तुम्ही ह्यांना सांगा तुम्हाला काय माहिती आहे ते. ते करतील तुम्हाला मदत. ”

 

थँक्स अ लॉट. या आधी पोस्ट ऑफिसचा तितकासा बरा अनुभव नव्हता मला. पण आता माझं मत निश्चितच बदललंय.” सायली

 

पोलिसांसारखंच आहे मॅडम आमचं पण. लोकं आपले नुसते शिव्या घालत असतात पोलिसांना. पण म्हणून सगळेच पोलीस लाचखाऊ, बिनकामाचे नसतात ना, काही प्रामाणिकही असतात. आमचं पण तसंच आहे. लहान वयात अंगावर जबाबदारी पडली आणि पोस्ट खात्यात नोकरी धरली. पुढे शिकायचं होतं पण राहून गेलं. पुढे पोस्ट काही सुटलं नाही. पण एक गोष्ट मात्र ठरवली होती. काहीही झालं तरी अंगात आणि तोंडावर सरकारी खात्याचा तो कंटाळवाणेपणा, लोकांवर उपकार केल्यासारखे भाव, असलं काहीही येऊ द्यायचं नाही. अजून प्रयत्न करतोय झालं. ”

 

आय रिअली ऍप्रिशिएट दॅट. तुमच्यामुळेच माझं पोस्ट ऑफिसबद्दलचं मत बदललंय. थँक्स.”

 

बराय. तुमचं काम नाही झालं तर सांगा मग. बघू काय करता येईल. तसं आजकाल तुमच्या वयाच्या कोणालाच पोस्ट ऑफिसची गरज नाही पडत खरं तर. तुमचं सगळं काम काय ते ईमेल, नाहीतर कुरिअर बरोबर. पण बघू तरी. “

सायलीने मानेंना तिला माहित असलेल्या गोष्टी सांगितल्या. मानेंनी पोलीस स्टेशनच्या जवळच्या एरियामध्ये जाणारे पोस्टमन कोण आहेत ते शोधून काढलं.

—————————

जवळजवळ सव्वा तासाने सायली तिथून बाहेर पडली तेव्हा तिच्या हातात काहीच लागलेलं नव्हतं. त्या योगिताचा पत्ता काही केल्या मिळत नव्हता. फक्त पोलीस स्टेशनच्या आजूबाजूलाच नाही, तर बाकी ठिकाणीही योगिता नावाचं कुणी आहे का, हे सगळं शोधून झालं होतं. पण पोस्ट ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये, त्यांच्या माहितीत असं कोणीच नव्हतं. सायली जवळजवळ निराश झाली होती. आता काय करायचं, तिला सुचत नव्हतं. बाबांना एक फोन करून तिने सगळं सांगितलं. बाबांनी तिला घरी परत येण्याचा सल्ला दिला.

तेवढ्यात तिचं मोबाईल वाजला. अननोन नंबर वरून कॉल होता.

हॅलो,….” सायली

 

मॅडम, अहो तुम्हाला हवी असलेली माहिती अशी समोर होती पण लक्ष नाही गेलं खरं. ”

 

कोण बोलतंय?” सायली

 

ओ सॉरी सॉरी, मी माने बोलतोय. आत्ता पोस्ट ऑफिसला आला होतात ना तुम्ही. तिथूनच बोलतोय. तुम्हाला हवा असलेला पत्ता मिळालाय. ते काय झालं, आपण बसलो होतो तिथे समोरच तो खोका ठेवला होता ना, त्यातली पत्रं बघायला हवी होती. तो बघायचा राहूनच गेला. त्यात एक मासिक आहे कुठलंतरी. ते पोस्टाने कुणीतरी पाठवलंय कुठल्यातरी योगिताला. आता तुम्हाला हवी असलेली योगिता ती हीच आहे की आणखी कुणी, ते माहित नाही. पण ….”

 

मी लगेच येते. थँक्स मानेकाका.”

सायलीने त्यांना पुढे काही बोलूच दिलं नाही.

——————————————-

योगिता फणसे, इथेच राहतात का?”

सायलीने तिला दार उघडलेल्या त्या मुलीला विचारलं. पोस्टातून मिळालेला तो पत्ता शोधून इथे यायला आणखी पाऊण तास तरी गेला होता. तिला हवी असलेली योगिता इथे आहे का, खात्री नव्हतीच. पण तरीही तिचा आतला आवाज तिला सांगत होता की ती तिला भेटणार आहे. त्याला एक कारणही होतं. काहीही आठवत नसताना, जणू काही तिला सगळं आठवायला मदत व्हावी म्हणूनच कदाचित झोपेत तिला हे सगळं ऐकू आलेलं होतं. सगळीकडे शोधून झाल्यावरही समोरच्याच खोक्यात पडलेलं योगिताच्या पत्त्याचं ते पत्र इतकं अलगद आणि अनपेक्षितपणे मानेंच्या मार्फत तिच्या हाताला लागलं होतं. सगळं बघायला गेलं तर सहज घडल्यासारखं, पण तरीही सगळं कुणीतरी घडवून आल्यासारखं.

योगिता? नही, यहा नही रहती कोई योगिता.”

तेवढ्यात तिच्या मागून आणखी एक मुलगी बाहेर आली.

काय झालं? कोण पाहिजे?”

 

योगिता फणसे इथेच राहतात का?” सायली

 

योगिता…..हो इथे एक योगिता राहायची. पण एक महिन्याभरापूर्वी ती इथून गेली आणि आम्ही दोघी आलो. आम्ही तिला नाही ओळखत. पण आमची आणखी एक रूममेट आहे श्वेता, ती ओळखते तिला. साधारण दोनेक महिने ती इथे राहिली असं श्वेता म्हणाल्याचं आठवतं मला.”

 

अच्छा….कुठे गेली काही सांगता येईल का?” सायली

 

सॉरी. माहित नाही. पण काय झालंय? म्हणजे तिचा फोन लागत नाहीये का?”

सायलीने पोस्ट ऑफिसमध्ये जी स्टोरी रचली होती तीच इथे पुन्हा सांगितली.

ओह अच्छा….मी श्वेताला फोन करून बघते. ती तिच्या टच मध्ये असेल तर तिचा पत्ताही माहित असेल तिला. पण ओह हाएक मिनिट….ती योगिता इथे गार्डन हिल रिसॉर्ट आहे, तिथे जॉबला होती. मला वाटतं, हेच रिसॉर्ट म्हणाली होती एकदा श्वेता. मी तरी फोन करून कन्फर्म करून घेते एकदा. तुम्ही आत येता का?”

 

नाही, ठीक आहे.”

सायली एका बाजूला विचार करत होती. आत्ता येताना गार्डन हिल रिसॉर्ट तिने बघितलं होतं. पण नक्की कुठे बघितलं होतं? रिक्षात बसून ती बाहेर बघत असताना ….ओहयेसआठवलं. ..मेंन रोडवरून रिक्षा आत आली आणि मग आणखी एक टर्न होता आणि त्याच वळणावर हे रिसॉर्ट होतं. रस्त्याच्या एका बाजूला ते रिसॉर्ट आणि दुसऱ्या बाजूला ……ओह येसत्या रिसॉर्टच्या समोरच पोलीस स्टेशन होतं. रिक्षातून बाहेरचं दृश्य बघताना तिच्या नजरेने जे टिपलं होतं ते आत्ता तिच्या लक्षात येत होतं. आत्ता लगेच जावं का त्या रिसॉर्टला? पण ही मुलगी तर त्या श्वेताशी बोलतेय. तिचा पत्ताही मिळाला तर चांगलंच होईल.

 

ती मुलगी बाहेर येईपर्यंत सायली त्या दुसऱ्या हिंदी बोलणाऱ्या मुलीशी इकडच्यातिकडच्या गप्पा मारत उभी राहिली. त्या मुली बाहेरगावाहून आलेल्या होत्या. तसं इथे कंपनीज पेक्षा असल्या मोठ्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स मध्ये जॉब ऑपोर्टच्युनिटीज चांगल्या होत्या. त्यामुळे ज्यांना टुरीझम, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात इंटरेस्ट आहे, ते स्टुडंट्स जवळपासच्या भागातले असले तर त्यांना बरेच वेळा इथल्याच रिसॉर्ट्स मध्ये जॉब मिळून जातो, वगैरे ती मुलगी सांगत होती. पण ह्या दोघी मात्र नागपूरच्या जवळच्या भागातून आलेल्या होत्या. आणि ती श्वेताही बाहेरचीच होती.

बोलले मी श्वेताशी.” ती दुसरी मुलगी आतून बाहेर येत म्हणाली. “मी मगाशी म्हटलं त्याच रिसॉर्ट मध्ये आहे ती जॉबला. आणि इथे येताना तुम्ही राईट टर्न घेतलात ना, त्याच्या थोडे पुढे एक लेफ्ट टर्न घ्यायचा. म्हणजे राईट न घेता थोडं पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आणि तिथे समोरच एक दोनमजली घर आहे. “आशीर्वाद नावाचा बंगला आहे तो. तिथे पेयिंगगेस्ट म्हणून राहायला गेलीये ती. आणि श्वेता म्हणत होती की आज तिच्या सुट्टीचा दिवस असतो, म्हणजे विकली ऑफ. ती भेटली तर तिथे घरीच भेटेल म्हणाली. नंबर पण लिहून घेतलाय, हा घ्या..”

 

थँक यु सो मच. तुम्ही खरंच खूप मोठी मदत केलीये मला. आणि श्वेतालाही थँक्स सांगा. ओके, मी निघते, थँक्स अगेन, बाय.”

कधी एकदा त्या योगिताला भेटते असं सायलीला झालेलं होतं. झपझप पावलं टाकत ती चालायला लागली. चालतचालत जायचं असंच तिने ठरवलेलं होतं. तो लेफ्ट टर्न काही फार लांब नव्हता. चालत दहा ते बारा मिनिटांवर असेल. तिने येताना रिक्षातून पाहिलं होतंच. आता जाताना चालत जावं आणि चालताचालता बाबांना फोनही करून घ्यावा आणि कुठे काही खाण्यासाठी रेस्टॉरंट्स असतील तर तेही पाहावं ह्या सगळ्या विचारात ती चालत चालत निघाली सुद्धा. दुपारचे 3 वाजून गेले होते. तिने सकाळी निघाल्यापासून काही खाल्लंही नव्हतं. बाबांनी आठवण केली म्हणून तिने आईने केलेल्या पोळीभाजीचा डबा भरून घेतला होता खरा, पण घाईगडबडीत ती तो घरीच विसरली होती. बाबांशी बोलून घेतलं, आत्तापर्यंतचं सगळं सांगितलं आणि ती पुढे चालत राहिली. पण तिच्या जाण्याच्या वाटेवर तरी कुठलंही रेस्टॉरंट दिसलं नाही. नाही म्हणायला, काही छोटी किराणा मालाची दुकानं दिसली. तिथून तिने बिस्किटाचे पुडे आणि पाण्याची बाटली विकत घेतली. आशीर्वाद बंगल्याजवळ येईपर्यंत जवळची बिस्किट्स खाऊन तिने भूक भागवून घेतली. त्या बंगल्याच्या बाहेर उभी राहून एक क्षणभर ती विचार करत राहिली. ती योगिता असेल का घरात? असली तर तिच्याशी काय बोलायचं? तिने आपण भेटल्याचं सुजयला सांगितलं तर?

 

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हवी असलेली योगिता ही नसेलच तर?

——————————————————

सुजय त्याच्या साखरपुड्याचे फोटोज पाहत बसला होता. सायली आता काही दिवसात लग्न करायला तयार झाली होती आणि त्या आनंदात तो हुरळून नक्कीच गेला होता, पण म्हणून त्याचा मेंदू त्याला इशारा द्यायचा थांबणार होता थोडाच? त्याने पत्करलेला धोका होताच तेवढा मोठा. त्याच्याबद्दलचं सत्य सायलीला कळण्याचे बरेच मार्ग होते. अर्थात त्याला सायली हा सगळा शोध घेतेय हे कळण्याचं कारणच नव्हतं. पण तसे इतरही मार्ग होतेच की. खरा सुजय राहत असलेल्या बिल्डिंग मधली बाकीची लोकं, त्याचं ऑफिस, कुठूनही सायलीला खरं कळू शकलं असतं. त्यामुळे ह्या आनंदाच्या भरात सुद्धा त्याचं डोकं मात्र सगळ्या धोक्याच्या बाजूंची चाचपणी करतच होतं. आणि आनंदाचा तो भर ओसरल्यावर, त्याला पुन्हा एकदा सिद्धार्थची आठवण झाली होती.

 

आज दुपारपासूनच तो ह्या कामाला लागला होता. सायलीची, तिच्या फॅमिलीबद्दलची सगळी माहिती त्याने ज्या प्रकारे मिळवली होती, त्याच प्रकारे सिद्धार्थबद्दलची मोहीम त्याने सुरु केली. तो सायलीच्या ऑफिसमध्येच आहे आणि तिला रिपोर्ट करतो एवढी माहिती त्याला मिळाली होती, म्हणजे त्याने हे कन्फर्म करून घेतलं होतं. आता पुढे आणखी कशी माहिती काढावी हा विचार करत असतानाच त्याला साखरपुड्याच्या फोटोजची आठवण झाली. त्यात काही मिळतंय का ते बघू, म्हणून तो आत्ता लॅपटॉपवर साखरपुड्याचे फोटोज ओपन करून बसला होता.

 

सिद्धार्थ त्यातल्या काही फोटोज मध्ये होता. म्हणजे सायलीच्या ऑफिसचा ग्रुप गप्पा मारताना, जेवताना, सायलीचं अभिनंदन करताना आणि तेवढ्यात एका फोटोने त्याचं लक्ष वेधून घेतलं. सिद्धार्थ कौस्तुभच्या बाजूला उभा होता आणि ते दोघं काहीतरी बोलत असावेत असं वाटत होतं. अर्थात, ते नीट कळत नव्हतं, कारण फोटोग्राफरने आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा फोटो एका कोपऱ्यात उभं राहून काढला होता. आणि त्या सगळ्या गर्दीत एका बाजूच्या टेबलला चिकटून उभं असलेले ते दोघे फोटोत आलेले होते. ते काही बोलत होते का, हे मात्र फोटोत नीटसं कळत नव्हतं. त्याने फोटो झूम करून पहिला. त्या दोघांचे चेहरे तर एकमेकांकडे होते, एकमेकांशी बोलत असताना असतात तसे. आणि सिद्धार्थच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू दिसत होतं. तो फोटो पाहताना सुजयच्या डोक्यात धोक्याची घंटा किणकिणली होती.

 

काय बोलत असतील हे दोघे? त्यांची ओळख वगैरे निघाली नसेल ना? कौस्तुभने हासुजय नाही तर दुसराच एक सुजय माझा बॉस आणि मित्र आहे, असं काही सांगितलं तर नसेल ना त्याला बोलताबोलता?

 

सायलीच्या घरी परवा सिद्धार्थच्या तोंडून मला काहीतरी कळलंय…” हे ऐकल्यावर त्याला ते जे काही कळलंय ते आपल्याबद्दलच असणार, असंच राहून राहून सुजयला वाटत होतं. आणि आता हा फोटो, त्यात एकमेकांशी बोलणारे सिद्धार्थ आणि कौस्तुभ…..ह्याची काही लिंक असेल का पुढे? की आपल्यालाच उगीच असं वाटतंय? आपण अतिसावध आहोत कदाचित म्हणून आपणच असा विचार करतोय. सहज लग्नसमारंभात भेटतात आणि ओळख करून घेतात लोकं. तसंच काहीतरी बोलणं झालं असणार त्यांच्यात. पण आणखी काही बोलणं झालं असेल आणि त्या सिद्धार्थला संशय आला असेल तर? नाही , सुजय. ह्याचा तपास लावला पाहिजे. सिद्धार्थला खरंच काही माहित आहे का, हे शोधून काढायला हवं. लवकरात लवकर. शक्यतो, आजच.

 

थोडा विचार करून त्याने मोबाईलवरून एक नंबर डायल केला.

हॅलो…”

 

हा सुजय, अरे एक काम होतं. आमच्या साखरपुड्यातला एक फोटो पाठवलाय तुला. तो बघ नीट आणि मग मला सांग तुला काय वाटतंय ते. माझ्या डोक्यात काहीतरी आहे, पण ते तुला सांगतो नंतर.” सुजय

 

काय आहे काय पण त्या फोटोत? आणि मला फक्त दहा मिनिटंच वेळ आहे हा. ऑफिसमध्ये आहे मी, मिटिंग सुरु होईल दहापंधरा मिनिटात. ”

 

ओके, फार वेळ नाही घेणार तुझा. तू फोन तर कर. चल बाय.” सुजय

—————————————————————

कोन हवंय?”

एकूण आवाजावरून आणि कपड्यांवरून ती बाई इथे काम करत असावी, सायलीने पटकन अंदाज बांधला.

योगिता फणसे इथेच राहते ना, मी तिला भेटायला आलेय..” सायली

 

कोण आहे गं कमल?” आतून कुठल्यातरी म्हाताऱ्या बाईचा आवाज आला. बहुतेक हा बंगला तिचाच होता.

 

आजी, योगिताकडे कोनतरी आलंय. मी बघतेय. तुमी नका कालजी करू.” कमल

 

योगिताकडे आलाय काय…..अस्सं…..”कमल कंबरेवर हात ठेवून नाटकीपणे म्हणाली.

 

हो, इथेच राहते ना ती….” सायली

 

व्हय. पर तुमाला तिला भेटायला आत जाता येणार न्हाय. आमी असं परक्या माणसाला घरात घेत न्हाय.”

कमलच्या आवाजात सगळ्या घराची सत्ता तिच्या हातात असल्याचा तोरा होता.

निदान तिला सांगाल तरी, की मी आलेय तिला भेटायला? प्लिज ?” सायली

 

पर तुमाला काय नाव गाव असंल का न्हाई? सांगू काय तिला? आणि तसंपन आज तिच्या सुट्टीचा दिस है. ती दिसभर झोपा काढत असनार. ती उठली न्हाई तर मग मला काई म्हाईत न्हाई. मग तुमाला ती उठेपर्यंत थांबावं लागल, आदीच सांगून ठिवतेय.” कमल जरा जास्तच आगाऊ होती.

 

माझं नाव सायली. मुंबईहून आलेय मी. मैत्रीण आहे तिची, म्हणजे फार पूर्वीची. तिला कदाचित आठवणार नाही, पण मला बघितल्यावर ओळखेल ती….सांगता का तिला प्लिज?”

 

सायली काय…..अस्संबरं हाय….सांगत्ये तिला. आलेच…” कमल आत जाता जाता पुन्हा वळली. “पर तवर हिथं दरवाजात उभं राहायचा नाय. हा ….लोकांना फार सवय असती, दुसऱ्याच्या घरात डोकावून बगायची. म्हनजे, तुमाला न्हाई बोलत हाअसंच आपलं….पर तुमी तितं थांबाबागेत….”

सायलीचं आता कुठे लक्ष गेलं. बंगल्याच्या डाव्या बाजूला एक मोठी बाग होती. बाग तशी फारच मोठी होती. सुंदरच होती खरं तर, पण आत्ताचं तिचं रूप तितकंसं सुखावणारं नव्हतं. खालचं गवत खूपच वाढलं होतं. वेल कुठेही कशीही वाढून तिचं जाळंच तयार झालं होतं. बरीच फुलझाडं दिसत होती, पण कशीबशी तग धरून उभी असल्यासारखी होती. त्यावर एकही फुल नव्हतं. बरेच दिवसापासून त्या बागेची निगा राखलीच गेली नव्हती. काही ठिकाणं, काही जागा अशा असतात की त्या बघितल्यावरच काहीतरी खटकतं, त्यांच्या जवळ जावंसं वाटत नाही. त्या बागेत जायची सायलीची तितकीशी ईच्छा होत नव्हती खरं तर. पण त्या आगाऊ कमलने इथेच थांबायला सांगितलं होतं.

 

बागेत येऊन सायलीने सहज सगळीकडे नजर टाकली. तो बंगला. तोही विचित्र, एकाकी वाटत होता इथून. समोरून बघतानाही तितकासा आवडेल असा नव्हताच तो, पण इथून तो अगदीच भकास वाटत होता. रंग उडालेला, कसातरीच. पण जाऊदेत, आपल्याला थोडंच इथे राहायचंय? योगिताला भेटून काही माहिती मिळाली तर घ्यायची आणि मग बॅक टू मुंबई. योगिता येईपर्यंत बाबांना फोन करूया का? एकदा वळून तिने योगिता अजून आली नाहीये ह्याची खात्री करून घेतली. ती फोन लावणार, तेवढ्यात

हायतुम्ही मला भेटायला आलायत का?”

सायलीने समोर बघितलं. साधारण तिच्याच वयाची एक मुलगी समोर उभी होती. तशी दिसायला चांगलीच होती. खांद्याच्या थोडे वर रुळणारे केस, केप्री आणि लॉन्ग टॉप, हातात एक छोटं कुत्र्याचं पिल्लू. योगिता बंगल्याच्या एंट्रन्सच्या दिशेने येण्याऐवजी इथून कशी आली असं पटकन सायलीला वाटून गेलं.

हाय, मी सायली, आपण योगिता फणसे का?”

 

हो मीच योगिता फणसे. पण मी ओळखलं नाही तुम्हाला.”

 

नाही, आपण पहिल्यांदाच भेटतोय. सॉरी मला त्या कमलला तसं सांगावं लागलं. तुम्हाला भेटून खरं म्हणजे माझं काम होईल की नाही मला माहित नाही, म्हणजे तुम्हीच तीयोगिता आहात का, हे मला नाही माहित. पण तरी तुम्हाला थोडी जरी माहिती असली तरी मला सांगा, फार मदत होईल . आता अगदी थोडक्यात सांगायचं तर सुजय साने बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, हे ……”

पण बोलत असतानाच सायलीला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. ती मागे वळणार तेवढ्यात तिला मागे खेचून तिच्या डोळ्यांवर कुणीतरी हात ठेवले, अगदी घट्ट आणि नंतर दुसऱ्या हाताने त्या व्यक्तीने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्या हातातला जोर जाणवत होता. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे सायलीचे डोळे बंद झाले पण डोळे बंद व्हायच्या आधी मात्र समोर योगिताच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सायलीने टिपले.

क्रमशः

2 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 26)

 1. Anonymous
  October 1, 2016

  Pudhcha bhag plz lavkar post kara

  Like

 2. M.g
  October 1, 2016

  Pudhcha bhag plz lavkar post kara

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on September 17, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: