davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 27)

हो मीच योगिता फणसे. पण मी ओळखलं नाही तुम्हाला.”

 

नाही, आपण पहिल्यांदाच भेटतोय. सॉरी मला त्या कमलला तसं सांगावं लागलं. तुम्हाला भेटून खरं म्हणजे माझं काम होईल की नाही मला माहित नाही, म्हणजे तुम्हीच तीयोगिता आहात का, हे मला नाही माहित. पण तरी तुम्हाला थोडी जरी माहिती असली तरी मला सांगा, फार मदत होईल . आता अगदी थोडक्यात सांगायचं तर सुजय साने बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का, हे ……”

पण बोलत असतानाच सायलीला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. ती मागे वळणार तेवढ्यात तिला मागे खेचून तिच्या डोळ्यांवर कुणीतरी हात ठेवले, अगदी घट्ट आणि नंतर दुसऱ्या हाताने त्या व्यक्तीने तिच्या तोंडावर हात ठेवला. त्या हातातला जोर जाणवत होता. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे सायलीचे डोळे बंद झाले पण डोळे बंद व्हायच्या आधी मात्र समोर योगिताच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव सायलीने टिपले.

************************भाग 26 पासून पुढे *************

भाग 26 येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-GF

 

भीतीची एक जोरदार चमक डोक्यापासून पायापर्यंत वाहत गेल्याचं सायलीला जाणवलं. हे नक्की काय होतंय? आपलं तोंड बंद केलंय, डोळे झाकलेत. म्हणजे इथे काहीतरी धोका आहे, होता. आपण सावध का नाही राहिलो? आता काय करतील हे आपल्याला? आणि ही योगिता काही मदत करेल की ती पण ह्यांनाच मिळालेली असेल? डोळे झाकताना तिच्याकडे बघितलं तर तिच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा घाबरल्यासारखेच वाटले. पण मग ती काही करत का नाहीये? कोणी काही बोलत का नाहीये? बाबा, आय नीड हेल्प. तुम्हाला कळेल का हे? कसं कळवू तुम्हाला?

 

एका क्षणार्धात हे असले सगळे विचार तिच्या डोक्यात चमकून गेले. दोन्ही हातांनी तीसुद्धा तोंडावरचा हात काढण्याचा प्रयत्न करत होती. पण मग हळूहळू तिच्या लक्षात आलं. तिच्या आजूबाजूला परफ्युमचा खूप छान सुगंध दरवळत होता. हा वास तिच्या ओळखीचा होता. डोळ्यांवरच्या हाताची पकड आता थोडी सैल झाली होती. ह्या व्यक्तीने फक्त एका हाताने माझे डोळे झाकलेत म्हणजे हाताची बोटं एकदम लांबसडक असणार. आणि मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. लांबसडक बोटं, तो परफ्युम. हो, बरोबर दुसरं कुणी असूच शकत नाही.

 

तिने जोर लावून स्वतःला सोडवून घेतलं आणि ती मागे वळली. बरोबर, ईशाच होती ती.

ईशी?” सायली जोरात ओरडलीच.

 

काय यार, तुला कळलंच ना….आणखी थोडा वेळ तुला घाबरवायला जरा मजा आली असती.” ईशा दात काढत म्हणाली.

 

ईशा, मूर्ख. ही असली मस्करी करतात का? माझ्या डोक्यात काय, काय येऊन गेलं आत्ता 2 मिनिटात माहितीये का? मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तुला, असली घाणेरडी मस्करी करू नकोस. आणि….आणि एक मिनिट, तू इथे कशी काय आलीस?” सायली

 

आय नो, सॉरी. तुला नंतर मला मारायचं असेल ना तरी माझी तयारी आहे. पण आत्ता जरा ज्यासाठी इथे आलोय, ते करूया का?” ईशाने योगिताकडे बोट दाखवत म्हटलं.

ईशाने मधेच येऊन घातलेल्या या गोंधळामुळे ती जराशी विचारात पडली होती. आधी ही जी पहिली मुलगी आली तीच तिच्या ओळखीची नव्हती. त्यात आता ही दुसरी मुलगी येऊन तिचे डोळे झाकते काय, तिची मस्करी करते काय, हे काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं. मात्र सायलीच्या तोंडून निघालेल्या त्या नावामुळे ती जागच्या जागी खिळून राहिली होती.

सॉरी हा, आमच्या गोंधळामुळे तुम्ही गोंधळून गेला असाल. ही माझी कझिन आहे. ईशा. आपण बोलूया का? म्हणजे फार वेळ नाही घेणार तुमचा. दहाच मिनिटं…..”

पण सायलीला पुढे काहीच बोलू न देता योगिताने विचारलं,

तुम्ही मगाशी कुणाचं नाव घेतलंत? सुजय? सुजय साने, बरोबर ना? तुम्ही कोण त्याच्या?”

तिच्या या एका प्रश्नानेच सायलीला मोठा दिलासा मिळाला होता. म्हणजे ही सुजय सानेला ओळखत होती तर.

हो, सुजय साने. मी आत्ता तरी त्याची कोणीच नाहीये. पण आमचं लग्न ठरलंय. साखरपुडा झालाय.” सायली

 

मला विचाराल तर त्याच्याशी लग्न करू नका असं सांगेन मी तुम्हाला.” योगिता

 

का पण?” ईशा

 

एक मिनिट, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं, म्हणून तुम्ही आला होतात ना? काय विचारायचंय? “योगिताने विषयच बदलला.

 

विषय बदलला तरी मुद्दा तोच आहे योगिता. सुजयबद्दल बोलायलाच आम्ही आलोय. तू ओळखतेस का त्याला? ” सायलीने आता तुम्हीवरून तूवर येऊन सुरुवात केली.

 

ओळखत होते. पण आता नाही. मला त्याला भेटायची, त्याच्याबद्दल बोलायची ईच्छा नाही. ” योगिताचा स्वर थोडा कडवट झाला होता.

 

पण का? मला तेच जाणून घ्यायचंय योगिता. त्याच्याबद्दल जेवढी माहिती मिळेल तेवढी हवी आहे मला. प्लिज तू काही सांगितलंस तर मला मदत होईल…” सायली

आता योगिताला जरा आश्चर्य वाटत होतं.

पण तू इथे कशी काय आलीस? आय मीन, सुजयकडून तर तुला माझ्याबद्दल नक्कीच कळलं नसणार. मग तुला त्याची माहिती मिळवायला माझ्याकडे जा, म्हणून कोणी सांगितलं.?”

 

सगळ्याच गोष्टी सांगून पटत नसतात योगिता. पण तरी मी सांगेन तुला सगळं. पण तू सुद्धा मला सांगशील ना, प्लिज? मला खरंच हे कळणं फार महत्वाचं आहे. तुझ्याकडे थोडा वेळ आहे ना?” सायली

 

खरं तर माझं काहीतरी काम होतं दुसरं. पण तुम्ही बोलताय ते ऐकून थांबावंसं वाटतंय. बोलूया आपण. तिथे बसुया का?” बागेतल्या एका बेंचकडे बोट दाखवत योगिताने विचारलं.

तिघीही त्या बेंचच्या दिशेने निघाल्या.

—————————————————————-

तुला काय म्हणायचंय सुजय? ह्या फोटोत कौस्तुभ आणि तो कोण तो सिद्धार्थ बोलतायत म्हणजे, त्यांच्यात तुझ्याबद्दल, म्हणजे आपल्याबद्दल काही बोलणं झालं असेल असं म्हणायचंय का तुला?” सु.सा.

(ह्या कथेतील दोन सुजयपैकी आपल्या पहिल्यापासून ओळखीचा झालेला तो म्हणजे नावाने खरा पण ओळख खोटी सांगणारा सुजय साने. म्हणजे खोटा सुजय साने. अर्थात सवयीने सुजयअसं संबोधल्यावर दोन सुजयपैकी हाच सुजय डोळ्यांसमोर येणार. त्यामुळे दोन सुजयमधले संवाद लिहिताना खोट्या सुजयला सुजयअसं संबोधू आणि खऱ्या सुजयला सु.सा.’ असं शॉर्टफॉर्म मध्ये. वाचताना गोंधळ होऊ नये म्हणून.)

हो, तसंच काहीतरी. ” सुजय

 

अरे पण कौस्तुभची ट्रान्स्फर झाली आहे ना, काल तो आला पण गावाला जाऊन. आज सकाळी निघणार आहे, आय मीन सकाळी निघाला पण असेल आज. मी काल रात्री भेटून आलो ना त्याला. मला तसं काहीच नाही जाणवलं.” सु.सा.

 

त्याला नसेल जाणवलं. नाहीतर त्याने सरळ येऊन तुला विचारलंही असतं ना. तुझा एवढा चांगला मित्र आहे ना तो. पण त्याच्या तोंडून काही उलटसुलट निघून गेलं असेल आणि सिद्धार्थला संशय आला असेल तर?” सुजय

 

एक मिनिट. हा सिद्धार्थ नक्की कोण आहे? आणि तू का घाबरतोयस त्याला एवढा?” सु.सा.

 

त्याच्यापासून धोका आहे, असंच वाटतंय मला त्याला भेटल्यापासून. सायलीच्या ऑफिसमध्ये आहे तो आणि तिला रिपोर्ट करतो. त्याच्या डोक्यात काय चाललंय किंवा त्याला माझ्याबद्दल संशय आलाय का, हे मला कळलं पाहिजे.” सुजय

 

हे बघ, कौस्तुभकडून काही मदत होईल असं नाही वाटत मला. त्याला स्वतःला संशय नाही आलाय. मग त्याची काय मदत होणार आहे? काहीतरी वेगळा विचार कर. सुचेल काहीतरी.” सु.सा.

 

वेगळा विचार तर मी करणारच आहे. पण त्याआधी तुझ्यासाठीपण एक काम आहे. प्लिज लवकरात लवकर कर…” सुजय

 

ओके. सांग “….

———————————————————————

सायली बोलायची थांबली. तिने योगिताला सुजयचा फोटो दाखवून खात्री करून घेतली होती. योगिताला सगळं सांगताना तिने पुढचामागचा कसलाच विचार केला नव्हता. ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवेल की नाही, तिला हे सगळं हास्यापद वाटेल का, तिला हे सगळं सांगून आपल्याला हवी ती माहिती मिळणार आहे का, ह्या सगळ्या शंका बाजूला सारत सायलीने तिला सगळं सांगितलं. अगदी योगिताबद्दल तिला कसं समजलं, तिचा पत्ता कसा शोधला अगदी सगळंच. योगिताबद्दल तिला कसं कळलं हे सांगितलं नसतं तर कदाचित योगिताही पुढचं काही सांगायला तयार झाली नसती. आणि आता, इतकी खटपट करून, इतक्या लांब ह्या योगितापर्यंत येऊन पोहोचल्यावर तिला हात हलवत परत जायचंच नव्हतं. पण योगिताला तिचं बोलणं ऐकू तरी येत होतं की नाही, असं तिला आता वाटायला लागलं. सायली बोलायची थांबली तरी तिची काहीच प्रतिक्रिया आली नाही. सायली आणि ईशाने एकमेकींकडे बघितलं.

योगिता, आय नो, सायली जे काही बोलतेय, ते तुला विचित्र आणि कदाचित खोटं वाटेल पण …”

पण ईशाला मधेच तोडत योगिता म्हणाली,

यु नो व्हॉट? तू हे जे काही सांगितलंस ना, त्याचं मला आश्चर्य नाही वाटलं आजिबात. इन फॅक्ट माझ्याशिवाय दुसरं कोण जास्त चांगलं समजून घेऊ शकेल हे ? काही महिन्यांपूर्वी हे सगळं, असलंच विचित्र आणि भयानक, अनबिलीव्हेबल मी एक्सपीरियन्स केलंय. ”

 

काय?” सायली आणि ईशा दोघी एकदमच ओरडल्या.

 

तू ………म्हणजेतुला कसं असं…” ईशाला तिला नक्की काय विचारावं हे कळेना.

 

हो. कारण चारेक महिन्यांपूर्वी माझं लग्न ठरलं होतं सुजयबरोबर. अरेंज्ड मॅरेज. माझ्याबद्दल कुठेतरी कळलं त्याला, असं म्हणाला तो. म्हणजे कुणाच्यातरी ओळखीतून कळतं ना, तसं. युज्वली आई, बाबा किंवा घरातले कोणीतरी मोठेच फोन करतात ना, पण ह्याने स्वतःच फोन केला होता स्थळासंदर्भात बोलायला. ….

योगिता बोलायला लागली तशी सायली आणि ईशासमोर सुजयचा भूतकाळ उलगडायला लागला. अर्थात, ह्याची त्यांना कितपत मदत होणार होती, हे त्या दोघींनाही माहित नव्हतं. पण आपल्याला माहित नसलेल्या काही गोष्टी तरी योगिताकडून नक्की समोर येतील, अशी आशा तिला वाटत होती.

———————————————————————-

हॅलो…”

 

नमस्कार. मी सुजय साने. योगिताचाच नंबर आहे ना हा…”

 

हो, मी तिची आत्या बोलतेय..पण आपण…..”

 

नमस्कार आत्या. अक्चुअली स्थळाची माहिती विचारायला फोन केलाय.”

 

असं होयहा..हा. बोलाआमच्या योगिताच्या लग्नाचं बघतोय आम्ही. चांगली डबल ग्रॅज्युएट आहे. स्मार्ट आहे. टुरिझम इंडस्ट्री मध्ये आहे. सध्या जॉब करतेय पण पुढेमागे स्वतःचा बिझनेस करायचा डोक्यात आहे तिच्या. पण तुम्हाला तिच्याबद्दल कसं कळलं? तुमचा मुलगा आहे का लग्नाचा?”

 

खरं तर मीच लग्नाचा मुलगा आहे. माझं नाव सुजय साने. तुम्हाला जरा विचित्र वाटेल मीच फोन केलाय म्हणून. पण काय आहे, मला वडील नाहीयेत. बरीच वर्ष झाली त्यांना जाऊन. आईचं ऑपरेशन झालंय आत्ताच. तिला एक महिनाभर बेडरेस्ट सांगितली आहे. बोलायला पण त्रास होतोय अजून तिला. पण तरी माझ्या लग्नाच्या मागे लागली आहे. आत्तापण तिच्याच आग्रहामुळे फोन केलाय मी. चांगलं स्थळ आहे, मी बरी होईपर्यंत कशाला थांबायचंवगैरे सगळं ऐकून विचार केला, तिच्या इच्छेचा मान ठेवायला हवा. मला पण अवघडल्यासारखं होतंय असा फोन करायला. तर माझ्याबद्दल माहिती द्यायची तर योगितासारखा मी पण डबल ग्रॅज्युएट आहे. एका इंजिनीरिंग कंपनीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहे. बाकीची माहिती मी योगिताला ईमेल करतो. चालेल ना?”

 

काही हरकत नाही. मी सांगेन तिला. तिला ईमेल बघायला सांगेन आणि मग ती करेल तुम्हाला फोन.”

 

योगिताचे आईवडील नाहीयेत का घरी?”

 

ती इथे राहते माझ्याबरोबर, पुण्यात. तिचे आईबाबा तिथे यु.एसला असतात. बरीच वर्ष झाली त्यांना तिथे जाऊन. योगिताही काही वर्ष होती. पण तिला इथेच परत यायचं होतं आणि आईबाबांचा पाय तिथे अडकलेला. मग मीच म्हटलं माझ्याकडे राहूंदेत. मलाही कंपनी होईल. तिचं कॉलेजपासूनचं शिक्षण इथेच झालं.”

 

अच्छा. बरं. ठीक आहे आत्या. तुमच्याशी बोलून बरं वाटलं. ठेवतो फोन आता. बाय.”

रात्री घरी आल्यावर योगिताला आत्याकडून सुजयबद्दल कळलं. त्याने स्वतः त्याच्या लग्नासंदर्भात फोन केला होता, हे ऐकून तिला नवल वाटलं. मेल चेक केले तर तिला सुजयकडून मेल आलेला होता, त्याने त्याची सगळी माहिती पाठवली होती. सगळं काही तिच्या अपेक्षांशी मॅच होणारं होतं. फोटोही चांगला होता. दुसऱ्या दिवशी तिने सुजयला फोन केला आणि त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याचं ठरवलं. त्या भेटीनंतर योगिताने त्याला घरी बोलावलं. आत्यालाही त्याला भेटता यावं म्हणून. होणारा नवरा म्हणून तो योगिताला आवडला होता. साखरपुडा लवकरात लवकर करून मग सहा महिन्यांनी लग्न करायचं असं त्यांनी ठरवलं. योगिताच्या आईवडिलांशीही तो फोनवर बोलला आणि त्यांचंही समाधान झालं होतं. आई पूर्ण बरी झाली की मग साखरपुडा करू, असं योगिताच्या घरच्यांनी सांगितलं.

 

पण सुजयला मात्र साखरपुड्याची घाई होती असं दिसलं. लवकरात लवकर साखरपुडा व्हावा, असं आईलाच वाटतंय हे त्याने घरच्यांना पटवून दिलं. योगिताचे आई बाबा लगेचच भारतात आले.आईबाबा, आत्या आणि योगिता त्याच्या आईला जाऊन भेटूनही आले. पुण्याजवळच्या एका गावात त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता, तिथेच राहायच्या त्या. सुजय मात्र नोकरीसाठी पुण्यात राहायचा. त्याने पुण्यात स्वतःचा फ्लॅटही घेतला होता. योगिता भेटायला गेली तेव्हा त्याची आई खरंच आजारी होती. ऑपेरेशन झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. मात्र मला तू आवडली आहेस, आणि तुम्हाला चालणार असेल तर साखरपुडा लगेच आटपून घेऊ, असं म्हणाल्या. एक आठवड्यानंतर साखरपुडा घरच्या घरीच झाला, त्याच वाड्यात.

 

साखरपुडा आटोपून योगिता आणि बाकीचे रात्री उशिरा घरी परत आले. साखरपुडा छानच झाला होता. सुजयने तिच्यासाठी इतकी सुंदर अंगठी घेतली होती की बघणाऱ्याने त्या नाजूक डिझाईनचं कौतुक केल्याशिवाय राहूच नये. शिवाय योगितासाठी कितीतरी गिफ्ट्स घेतली होती त्याने. योगिताला सुखाच्या उच्च शिखरावर असल्यासारखं वाटत होतं. चांगला, समजून घेणारा जोडीदार, चांगली आर्थिक परिस्थिती आणि जुळलेली मनं, ह्याशिवाय आणखी काय हवं असतं एखाद्याला? पण कालपासून ती थोडी अस्वस्थ होती खरी. गेले दोन दिवस एकाच स्वप्न पडत होतं तिला. आणि तेही जरासं गूढ, भयानक वाटेल असं. दोन्ही दिवस एकच स्वप्न कसं पडलं, हा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. झोपायला जाण्यासाठी तिने बेडरूममधला दिवा बंद केला आणि ती पलंगावर आडवी होणार, तेवढ्यात तिच्या बाजूलाच तिला कोणाचीतरी चाहूल लागल्यासारखी वाटली. एकदम दचकून तिने मागे वळून पाहिलं. नाईटलॅम्पच्या उजेडात तिला मागे कसलीतरी काळी सावली झर्रकन इकडून तिकडे गेल्याचं दिसलं. तिने धडपडत जाऊन लाईट्स लावले. पण खोलीत कुणीच नव्हतं. बाहेर आईबाबा आणि आत्या गप्पा मारत होते, म्हणजे त्यांच्यापैकीही खोलीत कुणीच आलेलं नव्हतं. रात्री तिचा नीट डोळाही लागला नाही. खोलीत कुणीतरी आहे, एक काळी सावली फेऱ्या मारतेय, असं सारखं जाणवत होतं तिला.

 

दुसरा दिवस मात्र जरासा चांगला गेला. आईबाबा आणखी चार दिवस राहणार होते, त्यामुळे चार दिवस तुला भेटणार नाही असं तिने सुजयला सांगितलेलं होतं. आईबाबा पुन्हा यु.एसला निघून गेले आणि मग पाचव्या दिवशी योगिताला सरप्राईझ द्यायला म्हणून सुजय अचानक योगिताच्या ऑफिसमध्ये हजर झाला. त्यादिवशी मग तिने हाफडे टाकला, दोघे खूप भटकले, मुव्हीला गेले, रात्री बाहेरून जेवूनच योगिता घरी आली. आजचा दिवस खूपच छान गेला होता, सुजयबरोबर स्वतःचं भविष्य रंगवून पाहताना ती अगदी सुखावून गेली होती. सुजयला गुड नाईट चा मेसेज पाठवून ती झोपायला गेली. झोपही अगदी पुढच्याच मिनिटाला लागली. पण रात्री कुठल्यातरी वेगळ्याच जाणिवेने तिला जाग आली. तिची खोली प्रचंड गार झालेली होती, फ्रिजचं दार उघडून समोर उभं राहावं, इतकं गार. ती थंडीने अक्षरशः कुडकुडत होती. अंगावरचं पांघरूण मानेपर्यंत वर ओढत असताना तिचं समोर लक्ष गेलं, आणि ती ताडकन उठूनच बसली. भेटीने अर्धमेली झाली. नाईटलॅम्प च्या उजेडात दिसलं की समोर अंधारात कुणीतरी उभं होतं, तिच्या दिशेला तोंड करून, कदाचित तिच्याचकडे बघत. काय होतंय तिच्या काही लक्षात आलं नाही. एक क्षण वाटून गेलं की कदाचित आपला भास असेल, नकळत पांघरुणाच्या आत तिने स्वतःच्या मनगटावर एक चिमटा काढला. पण नाही, ती जागी होती आणि समोरचं दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. समोरची अंधारातली आकृती थोडी हलतेय असं जाणवलं आणि मग मात्र ती धीर करून किंचाळली.

 

आत्याला तिने हे सांगितलं पण आत्याने सुजयला ह्यातलं काही सांगू नकोस म्हणून बजावलं. शेवटी त्यांचं अरेंज्ड मॅरेज होतं. त्यांची ओळख काही दिवसांचीच होती. योगिताला कसले विचित्र भास होतायत, तिची मानसिक अवस्था ठीक आहे ना, असं काहीही त्याला वाटू शकलं असतं. काहीतरी हॉरर मुव्ही बघितल्यामुळे किंवा तसलंच कसलंतरी पुस्तक वाचल्यामुळे असले भास होत असावेत, असं त्या दोघींनाही वाटलं. पण खरं तर मागच्या पूर्ण वर्षभरात आपण असला कुठलाच मुव्ही बघितला नाहीये, हे मनाच्या एका कोपऱ्यात योगिताला कुठेतरी माहित होतं. ऑफिसच्या कामात आताशा ती इतकी बिझी असायची की पुस्तक वाचायला काय, उघडायला पण वेळ व्हायचा नाही. अर्थात, त्यावेळी असली कारणं काढून तिने मनाची समजून घातली. पण नंतर असले भास, ती स्वप्न हे खूप वेळा व्हायला लागलं. अगदी आठवड्यातून दोनतीन वेळा.

 

शेवटी ऑफिसमधल्या एका मैत्रिणीला बरोबर घेऊन तिने मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचं ठरवलं. त्यांच्याकडे काही माहिती फॉर्मवर भरायला लागते हे तिला मैत्रिणीने सांगितलं होतं. डॉक्टरकडे जाण्याच्या आदल्या दिवशी काही ठराविक माहिती नीट आठवून लिहून ती बरोबर घेऊन जाऊ, असा तिने विचार केला. त्याप्रमाणे आदल्या दिवशी तिने स्वतःबद्दलची थोडीफार माहिती लिहून काढली. म्हणजे फॅमिली हिस्टरी, कशा प्रकारची स्वप्नं पडतात, किती वेळा पडतात, हे सगळं आठवून लिहून काढलं. डॉक्टर आणखी काय,काय विचारू शकतात असा विचार ती करत होती. हे सगळं कधी पासून सुरु झालं, असं त्यांनी विचारलं तर? मग तिने आठवून लिहून काढलं. साखरपुड्याच्या 2-3 दिवस आधी म्हणजे ….ह्या तारखेला पाहिलं स्वप्न पडलं. बाकीची स्वप्नं कधी पडली, किंवा ते भास कधी झाले , किती दिवसांच्या अंतराने, काही आठवतंय का ? असं डॉक्टरांनी विचारलं तर? हळूहळू मागे जाऊन ती आठवायला लागली, साखरपुड्याच्या दिवशी रात्री पहिला भास झाला. नंतर आईबाबा जाईपर्यंत काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी, म्हणजे सुजयबरोबर फिरायला गेले त्यादिवशी पुन्हा भास झाला. त्यानंतर …..हे आठवता आठवता हळूहळू तिची लिंक लागत गेली. हे समजायला फार विचित्र होतं. हा योगायोग होता, की आणखी काही? ज्या दिवशी ती सुजयला भेटत होती, त्या दिवशी तिला विचित्र स्वप्नं पडायची, किंवा रात्री कुणीतरी दिसायचं, कसलेतरी आवाज यायचे.

 

आणखी काही दिवसांनी तिला खात्रीच पटली की सुजयला भेटल्यावर हे सगळं सुरु होतंय. असं का, हा प्रश्न तिला सतावायला लागला.

 

ण होणारे ते भास, ती दिसणारी आकृती हे सगळं इतकं भयानक होतं की ते सगळं आता तिला सहनच होत नव्हतं आणि सुजयला भेटणं थांबवल्यावरच हे सगळं थांबेल ह्याची तिला आता खात्री पटली होती. शेवटी एक दिवस तिने सुजयला फोन करून लग्नाच्या बाबतीत तिचा वेगळा विचार होतोय, आणि आता पुढे जायला नको, असं सांगितलं. पण तरी सुजयने तिला फोन करायचं सोडलं नाही. एकदा तो तिला भेटायला घरीसुद्धा येऊन गेला, पण आत्याने त्याला तिला भेटूच दिलं नाही. तिच्या ऑफिसमध्येही तो एकदा येऊन गेला, पण त्याला भेटणं टाळायचं म्हणून योगिताला ऑफिसच्या एका कॉन्फरन्स रूम मध्ये अक्षरशः लपून बसावं लागलं. पण असं किती दिवस चालणार? त्याचे एकावर एक फोन, मेसेज येत होते. योगिताने त्याला फोनवर साधारण कल्पना दिली होती, लग्न मोडण्याचं कारण सांगितलं होतं. पण सुजय मात्र त्याच्या परीने तिला भेटण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. कदाचित भेटून तिचं मन वळवता आलं असतं. शेवटी कंटाळून योगिताने त्याला भेटण्यासाठी होकार दिला. पण अर्थात, त्या भेटीत सुजय तिला समजावत राहिला, असं कसं होईल? माझा काहीच संबंध नाही, वगैरे. पण योगिता तिच्या म्हणण्यावर ठाम होती. इतक्या वेळा अनुभवलेलं योगायोग म्हणून विसरता कसं येणार? तिला त्या सगळ्याची इतकी भीती बसली होती की आता कुठली रिस्कच नको, ह्या निर्णयापर्यंत ती आली होती. आणखी थोडे दिवस थांबून बघू, ह्या सुजयच्या म्हणण्यावर आता तिचं एकच म्हणणं होतं. मला आणखी रिस्क घ्यायची नाही, कदाचित तुझा संबंध नसेलही, पण प्रश्न माझ्या जीवाचा आहे मला आता रिस्क घ्यायची नाही.

 

त्या भेटीनंतरही सुजय ह्या ना त्या प्रकारे तिला कॉन्टॅक्ट करतच राहिला. शेवटी तिने निर्णय घेतला, दुसऱ्या शहरात जॉब बघण्याचा. लांब जाऊनच कदाचित हा प्रश्न सुटला असता. पुढच्या दोनतीन आठवड्यात तिला लोणावळ्याला जॉब मिळाला. तिथल्या पोलीस स्टेशनच्या समोरच्याच वळणावर गार्डन हिल रिसॉर्ट होतं, तिथे. तिथे जायच्या आदल्या आठवड्यात तिने सुजयला भेटायला बोलावलं.

 

या वेळी तिने त्याला जवळजवळ धमकीच दिली, मला भेटायला आलास तर पोलीस कम्प्लेंट करेन असं सांगितलं. तिला कुठे जॉब लागलाय हे तो सहज शोधून काढू शकला असता त्यापेक्षा तिने स्वतःच हे त्याला सांगण्याचं ठरवलं. लोणावळ्याला आल्यावर सुद्धा ती जराशी घाबरूनच असायची, सुजय आपल्या मागावर येईल की काय, अशी तिला सतत धास्ती वाटायची. पण तिच्या सुदैवाने सुजयने तिचा नाद सोडला. त्याने तिला पुन्हा कधीही फोन केला नाही की भेटण्याचा प्रयत्न केला नाही .

—————————————————–

योगिताचं बोलणं ऐकताना सायलीला हळूहळू काही गोष्टी समजत होत्या . तिला ऐकू आलेलं ते बोलणं योगिता आणि सुजयच्या शेवटच्या भेटीतलं होतं. फक्त आता काही गोष्टी योगिताला पुन्हा विचारून कन्फर्म करून घ्यायच्या होत्या.

योगिता, तू इतक्या वेळा त्याला भेटलीस, तर तुमच्यात काही बोलणं झालं होतं का? म्हणजे त्याने त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलं असेल तुला कधीतरी, आहे का काही असं? ” सायली

 

हो आम्ही खूप गप्पा मारायचो, पण मोस्ट ऑफ द टाइम्स आम्ही काही फ्युचर प्लॅन्स डिस्कस करायचो. त्याला ऍब्रॉड जायचं होतं आणि माझी तेवढी इच्छा नव्हती. मग त्यावर काय तोडगा काढायचा ते बोलायचो आम्ही बरेच वेळा. अर्थात , एकमेकांच्या आयुष्याबद्दलही शेअर करायचो, पण मला कधी त्याने जे सांगितलं , त्यावर संशय नाही आला.”

 

पण असा कधीच नाही का झालं की त्याने तुला काहीतरी सांगायचं टाळलं वगैरे ?” ईशा

 

हो , एकदा मात्र आम्ही काहीतरी बोलत होतो, म्हणजे एकमेकांच्या फ्रेंड्स ग्रुप बद्दल असाच काहीतरी सांगत होतो, तेव्हा तो उत्साहाच्या भरात काहीतरी सांगत होता, आणि मग एकदम गप्पच बसला. मी त्याला परत विचारलं पण मग त्याने विषयच बदलला. आता उशीर झालाय , पुन्हा कधीतरी बोलू असं म्हणून एकदम उठलाच . पण मला काही संशय वगैरे नाही आला त्यावरून. कारण तेव्हा खरंच उशीर झाला होता. ”

 

सॉरी, म्हणजे तुम्ही काय बोलायचात हे मला विचारायला नकोय खरं तर, पण कदाचित त्याचीच मदत होईल म्हणून विचारतेय, त्यावेळी तुम्ही काय म्हणजे कशाबद्दल बोलत होतात आठवतंय का? ” सायली

 

हो, सगळंच आठवतंय मला. कसं आहे ना सायली, अगं तो थोडा काळ का हॊइना पण मी इमोशनली इन्व्हॉल्व्ह झाले होते त्याच्यात. आणि काही खात्रीदायक कारण समोर नसताना, मी त्याला लग्नाला नकार दिला, ह्याचं गिल्टपण होतं माझ्या मनात. मी आता त्याच्याशिवायही इतकं नॉर्मल जगू शकतेय म्हणजे त्याच्या प्रेमात नक्कीच पडले नव्हते. पण तरी ते थोडे दिवस, जे आम्ही पुढच्या आयुष्याबद्दल काही एकत्र ठरवण्यात घालवले ते फार छान होते अगं. कदाचित म्हणूनच सगळं लक्षात राहिलंय माझ्या. हा, तर तू काय म्हणत होतीस…..हातेव्हा काय बोलणं चाललं होतं, हेच ना? अगं तो आणि त्याचे मित्र खूप भटकायचे, ट्रेकिंगला जायचे असं सगळं सांगत होता. मग मधेच त्याच्या बोलण्यात आलं की मध्य प्रदेशातली एक ट्रिप सगळ्यात मोठी होती, आत्तापर्यंतची.. एवढं म्हणाला आणि मग थांबला. म्हणजे खूप काही बोलण्याच्या मूड मध्ये होता आणि एवढं बोलल्यावर एकदम अचानक थांबला, म्हणून मला थोडं विचित्र वाटलं खरं तरपण मग तो म्हणाला की उशीर होतोय आता निघूया, तर तेही पटलं. ” योगिता

 

पुन्हा कधी त्यावर बोलणं नाही झालं का तुमच्यात?” सायली

 

नाही, माझ्या आठवणीत तरी नाही. ” योगिता

 

आणि त्याची आई……तिला भेटलीस का तू परत? आय मिन, आर यु शुअर ती त्याचीच आई होती ?” ईशा

 

म्हणजे? आणखी कोण असणार ? ” योगिताने गोंधळून विचारलं.

 

नाही….तसं नाही. म्हणजे तू त्याच्या आईला एकदाच भेटलीस का ? कशी वाटली त्याची आई? ” सायली

 

तशी ठीकच वाटली. म्हणजे लग्न मोडताना खरं तर मला त्यांना भेटून ते सांगायची इच्छा होती, हिम्मत नव्हती पण ईच्छा होती. पण तेव्हा सुजयच नको म्हणाला. म्हणाला माझी आई आहे, मी सांगेन. पण साखरपुड्याच्या दिवशी आणि त्याच्या आधी जेव्हा भेटले त्यांना, त्या चांगल्या वाटल्याबोलायला वगैरे…” योगिता

 

तू त्या वाड्याचा पत्ता देऊ शकशील का?” सायली

 

हो देते की. पण एक विचारू का? का करतेयस हे सगळं? तुला त्याच्यावर संशय आलाय तर सरळ सांग ना त्याला लग्न करणार नाहीस म्हणून. अगं हे जे काही होतंय ते पुढे कुठपर्यन्त जाईल ह्याचा विचार केलायस का? पुढे तुझ्या जीवाला धोका निर्माण झाला तर मग काय करणार आहेस?” योगिता

 

मलाही वाटते ती भीती योगिता. खोटं का बोलू? ते भयानक अनुभव येतात, तेव्हा पुढ्यात क्षणी काय होईल, आपण तो क्षण बघायला जिवंत तरी असू की नाही, हा विचार येतोच मनात. पण तरी कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात एक अस्वस्थ करणारी जाणीव असते. आज मला कळलंय, सुजयच्या आजूबाजूला काही गूढतेचं वलय आहे, त्याचा ह्या सगळ्याशी नक्की काहीतरी संबंध आहे, आणि ते काय आहे, हे कळायला नको का? काल तू त्याला लग्नाला नाही म्हणालीस आणि मग त्यानंतर आता तो मला फसवून माझ्याशी लग्न करायला बघतोय. तुझ्याही आधी कदाचित दुसऱ्या मुलीला फसवायचा प्रयत्न केला असेल. पण तिनेही कारण न शोधता सरळ नकार दिला असेल म्हणून तो तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला. मी त्याला नाही म्हटलं तर तो असाच आणखी दुसऱ्या कुठल्यातरी मुलीला फसवायला बघेल. डोक्यातला तो विचार मला स्वस्थ नाही बसू देत. जर मला हे कळलंय, तर मी त्याच्या मुळापर्यंत गेलंच पाहिजे. सॉरी म्हणजे तू काही चुकीचं केलंयस असं नाही म्हणायचंय मला. आपल्याला जे बरोबर वाटतं तेच आपण करतो आणि स्वतःचा विचार करण्यात काहीच चुकीचं नाही. आणि माझ्याबरोबर माझ्या जवळची अशी सगळीच लोकं आहेत. ते मला एकटं नाही पडू देणार…” सायलीने ईशाचा हात पकडत म्हटलं.

 

तुझंही बरोबर आहे. ग्रेट आहेस तू. एवढा धोका पत्करते आहेस….मी एवढा पुढे जाऊन विचार केलाच नाही कारण त्यावेळेला काही सुचलंच नाही आणखी मला. मला फक्त ह्या सगळयातून बाहेर पडायचं होतं, आणि तेव्हा सुजयशी ठरलेलं लग्न मोडणं हा एकाच उपाय सुचला मला. आणि बघ ना, माझा अंदाज बरोबर होता, ज्यादिवशी मी त्याला भेटून लोणावळ्याला जायचा निर्णय सांगून आले आणि लग्न मोडल्याचं सांगितलं, त्यादिवसापासून ते सगळं बंद झालं. ” योगिता

 

नंतर कधीच नाही ते भास झाले तुला? किंवा ती स्वप्नं वगैरे ?” ईशा

 

नाही कधीच नाही. अगदी ज्या दिवशी लग्न मोडलं, त्यादिवशी मी त्याला भेटले होते ना, पण तरी त्यादिवशी असले काही भास झाल्याचं मला तरी आठवत नाही.” योगिता

 

योगिता, खरंच थँक्स. तू खूप माहिती दिलीस. एकच विचारायचं आहे. तू म्हणालीस की तुमच्या साखरपुड्याला अगदी घरातलेच लोक होते. पण मग त्याचे कोणीच नातेवाईक नव्हते का? किंवा गावातले कोणी मित्र वगैरे? म्हणजे अगदी तो आणि त्याची आई, एवढे दोघेच होते?” सायली

 

त्याचे काकाकाकू आले होते. मित्र वगैरे कोणी नव्हतं. काकाकाकूंशी तेवढे जवळचे संबंध राहिले नाहीत आता, त्या वाड्याच्या वारसा हक्कावरून थोडे रुसवेफुगवे चाललेत घरात असं म्हणत होता. पण घरातल्या जवळच्या कार्याला वगैरे आपलं कर्तव्य म्हणून का होईना, आम्ही उपस्थित राहतो, असं म्हणाला. सॉरी मगाशीच सांगायला हवं होतं, आता तू विचारल्यावर आठवलं. पण मला ते काका काकू तसे चांगले वाटले बोलायला. म्हणजे कुठलेतरी वाद चालू असतील त्यांच्यात असं वाटलं नाही. ” योगिता

 

ते कुठे राहतात? ” ईशा

 

ते पुण्याला असतात. कोथरूडच्या जवळ.” योगिता

 

त्यांचं नाव आठवत असेल तर सांगशील ?” सायली

 

हो सांगते ना. मला आठवतंय कारण सुजयच्या आई त्यांना सारखं अगदी नावाप्रमाणेच लक्ष्मी आणि नारायण आहेत माझे दीर आणि जाऊ, असं म्हणाल्या दोन वेळा. सोप्पं आहे ना लक्षात राहायला , लक्ष्मीनारायण …” योगिता

 

“आणि तो ज्या कंपनीमध्ये जॉब करत होता … ”

 

“ते पण देते मी लिहून …”योगिता

योगिताचे पुन्हा एकदा आभार मानून आणि सुजयच्या आईचा पत्ता घेऊन सायली आणि ईशा परतीच्या मार्गाला लागल्या.

—————————————————————–

हा, काय रे सुजय, विचारलंस का कौस्तुभला ? ” सुजय

 

अरे विचारलं मी. एकतर त्याला सिद्धार्थ कोण ते आठवत पण नाहीये, साखरपुड्यात कोणाला तरी त्याचा धक्का लागला होता आणि तो त्याला सॉरी म्हणाला एवढंच कसंबसं आठवलं त्याला, ते पण मी तो फोटो दाखवल्यावर.” सु.सा.

 

अरे पण तो काय बोलला त्या सिद्धार्थला? काही आठवतंय का त्याला?” सुजयने अधीरपणे विचारलं.

 

अरे आता जर त्याला मुळात तो सिद्धार्थ, त्याचा चेहरा इतकं सगळं आठवतच नसेल, तर काय बोलणं झालं हे तो का लक्षात ठेवेल? आणि मी हे आता परत परत विचारलं, तर सिद्धार्थचं माहित नाही, पण कौस्तुभला नक्की संशय येईल आपला. ” सु.सा.

 

हम्म….ते बरोबर आहे. बरं जाऊदेत, मी बघतो काय करायचं ते. ” सुजय

 

ओके….पण सुजय, आय थिंक आता पुरे. आता तुझं लग्न होतंय ना, मलाच सुटल्यासारखं वाटतंय…” सु.सा.

 

का रे बाबा, मी फारच त्रास देतोय का तुला?” सुजय

 

त्रासाचा प्रश्न नाही रे. आपली तेवढी चांगली मैत्री आहे आता. आणि मी तुझी मदत का करतोय हे तुला माहित आहे. पण तू हे सगळं का करतोयस हे मला माहित नाही अजून आणि तरी मी तुला मदत करतोय ..”सु.सा.

 

येस. बरोबर आहे तुझं. मी सांगेन तुला लवकरच. भेटलं पाहिजे त्यासाठी….भेटू लवकरच. चल बाय..” सुजय

 

बाय…”

———————————————————

सायले काय विचार करतेयस?” कॉफीचा घोट घेत ईशाने विचारलं.

सायली दुपारी जेवली नव्हती म्हणून काहीतरी खाण्यासाठी त्या रेस्टॉरंट मध्ये आल्या होत्या.

बरेच प्रश्न पडलेत मला…” सायली

 

कुठले ?” ईशा

 

सगळ्यात पहिला म्हणजे, तू कशी काय आलीस अचानक? आणि तू पुन्हा मूर्खासारखं वागली आहेस ईशात्या दिवशी मी बजावलं होतं ना तुलाअसली मस्करी ….”

 

हो, हो, सॉरी चिडू नकोस ना परत. तू सकाळी पुण्याला यायला बाहेर पडल्यावर तुझ्या बाबांचा फोन आला होता. शहाणे, तू तर मला सांगितलं पण नाहीस हे जे काय डायलॉग्ज ऐकू आले तुला त्याबद्दल. काकांनी सांगितलं. आणि तू पुण्याला येतेयस हे पण सांगितलं. ते बिचारे खूप टेन्शन मध्ये होते. तू एकटी गेलीस म्हणून. मला म्हणाले, तुला शक्य असेल तर तू जा जरा. आणि तू पोस्टऑफिसमध्ये गेलीस, मग त्या योगिताच्या घरीते सगळं काकांना कळवत होतीस ना, ते सगळं मला कळवत होते ते. त्यांनी सकाळी फोन केल्यावर एक तासाभरात मी निघाले. त्यांनी तू योगिताच्या घरी गेल्याचं सांगितलं, आजूबाजूच्या खाणाखुणा सांगितल्या, तूच बोलताबोलता सांगितल्या होत्यास ना त्यांना? त्यावरून मी तिथे आले, तेव्हा ती योगिता बागेत येत होती आणि तू पाठमोरी होतीस म्हणून म्हटलं तुला सरप्राईझ देऊ….म्हणून ….” ईशा

 

आणि जॉबचं काय मॅडम आपल्या ? की तो सोडूनच दिलायस?” सायली

 

आज लकीली बॉस नव्हते गं ऑफिसमध्ये. काहीतरी महत्वाचं काम होतं, पण तसंही बॉस ऑफिसमध्ये नाहीत म्हटल्यावर ते उद्याच दाखवायचंय त्यांना. मग मी ते सगळं पेन ड्राईव्ह वर सेव्ह करून घरी आणलंय. आज रात्री करेन. माझ्या कलिगला म्हटलं काही असेल तर मला फोन कर. तिचा फोन नाही आला म्हणजे सगळं स्मुथली चाललं असणार…” ईशा

 

ईशा, कसली आहेस गं तूनॉट गुड….तू ऑफिसच्या बाबतीत खूप …”

 

सायले, जाऊदे ना, सोड नाहे लास्ट टाईम. प्रॉमिस. मी परत नाही करणार. आणि आज जागून कम्प्लिट करणार आहे ना मी….काकांनी सांगितलं तू एकटी निघालीयेस तर मला पण काळजी वाटली तुझी….बरं ते जाऊदेतकसला विचार करत होतीस?” ईशा

 

सुजयच्या आईचा. म्हणजे कोण असतील त्या नक्की? आपल्याला त्याने जसे खोटे नातेवाईक आणून दाखवले तसे योगिताला पण दाखवले असतील का, की ही त्याची खरी आई असेल?आणि खरे काकाकाकू?” सायली

 

हम्ममला पण कळत नाहीये. आपण त्याच्या आईला भेटायला जाऊया का?” ईशा

 

जायला तर हवंच ईशा. कारण त्याशिवाय अजून कुठलाच क्लू नाहीये आपल्याकडे. फक्त आपण तिथे गेलो हे त्यांनी नंतर सुजयला कळवलं तर? मग काय करायचं?” सायली

 

आपण रात्री बसून ठरवू….चल निघूया का आता ?” ईशा

 

निघूया कुठे ? तू माझ्याबरोबर येतेयस?” सायली

 

नाही तू माझ्या बरोबर येतेयस. उद्या त्या सुजयच्या आईला आणि काकाकाकूंना भेटायला काय ऑल द वे परत येणारेस? ” ईशा

 

अगं काहीतरीच कायआईला सांगितलं पण नाहीयेतिला काय सांगू? मी अचानक उठून पुण्याला का आले असं विचारेल ना ती…” सायली

 

नाही विचारणारकारण मी त्या योगिताकडे येतायेताच मावशीला फोन केला होता. तिला सांगितलं की मी तुला बोलवून घेतलंय. थोडे दिवसांनी तुझं लग्न होणार, मग आम्ही भेटणार नाही. तू रजेवर आहेस म्हणून दोन दिवस ये म्हणून सांगितलं, असं मी मावशीला सांगितलं…” ईशा

 

आणि आईने ऐकलं असं म्हणणं आहे का तुझं? अगं लग्न आठदहा दिवसावर आलेलं असताना ती मला कशी काय जाऊ देईलतिच्या दृष्टीने एवढी भली मोठी खरेदी व्हायची आहे ना…” सायली

 

मी तिला सांगितलं की आम्ही आईबरोबर जाऊन सायलीची थोडीफार खरेदी इथे पुण्यात करू. त्या लोकांना गिफ्ट द्यायला चांगले ऑब्शन्स असतील तर ते पण बघूम्हणून ती कशी बशी तयार झाली…” ईशा

 

धन्य आहेस तू ईशा. तरी मला घरी गेल्यावर आईची बोलणी खायला लागणार आहेतच. चल निघूया..” सायली

 

सायले, आणखी एक विचार करत होते मी….योगिताने तिचं लग्न मोडलं आणि तिला होणारे भास थांबले. म्हणजे ती जी कुणी येते, ती सुजयचं आणि त्या कुठल्याही मुलीचं लग्न मोडण्यासाठी येते, असं असेल का?” ईशा

 

हो गं ईशा, मी हा विचारच नाही केला. माझ्याही बाबतीत, ती मला सारखं सारखं भेटून हे लग्न करू नकोस असं सांगत असेल का ?” सायली

 

किंवा ती तुला असं काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असेल जेणेकरून तुला सुजयबद्दल सगळं कळेल….बघ ना, आत्तापर्यंतचे सगळे क्लूज तिच्याच मुळे मिळालेत आपल्याला. ” ईशा

 

हम्मबरोबर ईशा, उद्याच भेटायला हवं त्या सुजयच्या आईला…” सायली

———————————————————–

हॅलो…”

 

सुजय, कसा आहेस बाळा? आठवडा होऊन गेला, तुझा फोन नाही. काळजी वाटत होती तुझी. तुला बघून पण किती दिवस झाले….बरा आहेस ना?”

 

हो आईठीक आहे मी. अगं खूप काम आहे ना ऑफिसमध्ये, रात्री यायला उशीर होतो. म्हणून वेळ नाही मिळाला फोन करायला. तू कशी आहेस ?”

 

मी बरी आहे. पण तुझी काळजी वाटत राहते. योगिताशी ठरलेलं लग्न मोडलं. दुसऱ्यांदा असं झालं. देव तरी माझ्याच मुलाच्या बाबतीत हे सगळं का करतोय काही कळत नाही. तुला भेटावसं वाटतंयउद्या येशील इथे?”

 

उद्या ? ”

 

अरे तिथीने वाढदिवस ना तुझा उद्या ? विसरलास का ? तुझ्या आवडीचा सगळा बेत करते उद्या. ..”

 

मला खरं तर काम आहे जरा. पण ठीक आहे. येईनच मी. किती दिवस झाले तुझ्या हातचं खाऊन….रजा घेतो उद्याच्या दिवस …”

 

नक्की ये. मी वाट बघतेय. बरं मला सांगबाकीचं सगळं मी ठरवते. पण तुला श्रीखंड करू की गुलाबजाम ?”

 

अर्थात, गुलाबजाम आई….आणि भरपूर करमी खूप खाणार आहेयेतोच उद्या….चल बाय…”

——————————————————-

अर्थात श्रीखंड मावशी. पण तू कशाला एवढं बाहेरून वगैरे आणायचा आटापिटा करतेयस?” सायलीने मावशीच्या गळ्यात हात टाकत म्हटलं. ”

 

आटापिटा कसला ह्यात? लाडकी भाची इतक्या दिवसांनी आलीये. त्यात लग्न होणार आता तुझं. तू येणार आहेस माहित असतं ना, तर सगळं मी स्वतः केलं असतं. पण आता बाहेरून तरी आणूदे मला. बरं उद्या राहणार आहेस ना? म्हणजे राहाच आता.” मावशी

 

हो राहीन गं, पण उद्या जरा थोडं काम आहे, त्यासाठी बाहेर पण जायचंय…” सायली

कदाचित उद्याचा उजाडणारा दिवस मला काहीतरी नवीन दिशा दाखवेल….सुजयच्या आई, तुम्ही सुजयच्या खऱ्या आई आहात की नाही माहित नाही पण तुम्हाला भेटायला येतेय मीखूप प्रश्न घेऊन …..

क्रमशः

 

8 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 27)

 1. M.g
  October 2, 2016

  Masttttttt………

  Like

 2. M.g
  October 14, 2016

  Next part kadhiiiii???????😕

  Like

 3. shradha kulkarni
  October 17, 2016

  aga pudhacha bhag tak na…

  2 weeks zale na

  Liked by 1 person

  • rutusara
   October 17, 2016

   Hi Shradha…I like the way you hv written it…maitrinishi boltana aapan sahaj bolto tasa vatla…sorry yaa veli jara itar kamat busy zalyamule pudhcha bhag post karayla vel lagtoy…pan 2-3 divsat post karen nakki…kaam chalu aahe….:) mala swatahalahee late post karayla avdat nahi..pan yaa veli shakya nahi zala….thanks:)

   Like

 4. M.g
  October 17, 2016

  Plz pudhcha bhag lavkar taka… me roj vat baghte ki aj tari vachayla milel pudhcha bhag

  Liked by 1 person

  • rutusara
   October 17, 2016

   Thank you very much M.G. I am really sorry I got stuck up in some other things this time and next part got delayed. Pls give me 2-3 days and I will post the next part. Thank you again for waiting. mazya kathesathi ti ek compliment ch aahe. sorry and thanks 🙂

   Like

 5. ujvala
  October 19, 2016

  pls next part lavkar taka its too late now pls

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on October 2, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: