अज्ञाताची चाहूल : (भाग : 28)

आटापिटा कसला ह्यात? लाडकी भाची इतक्या दिवसांनी आलीये. त्यात लग्न होणार आता तुझं. तू येणार आहेस माहित असतं ना, तर सगळं मी स्वतः केलं असतं. पण आता बाहेरून तरी आणूदे मला. बरं उद्या राहणार आहेस ना? म्हणजे राहाच आता.” मावशी

हो राहीन गं, पण उद्या जरा थोडं काम आहे, त्यासाठी बाहेर पण जायचंय…” सायली

कदाचित उद्याचा उजाडणारा दिवस मला काहीतरी नवीन दिशा दाखवेल….सुजयच्या आई, तुम्ही सुजयच्या खऱ्या आई आहात की नाही माहित नाही पण तुम्हाला भेटायला येतेय मीखूप प्रश्न घेऊन …..

**************** भाग 27 पासून पुढे *********************

भाग 27 येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-HZ

किती वाजता निघणार आहेस सायले?” ईशा

 

तोच विचार करतेय. सकाळीच जाऊन येते, नाही का? ” सायली

 

सकाळीच जाणार असलीस तर मी पण येते ना बरोबर, ऑफिसला थोडी उशिरा जाईन …” ईशा

 

नो वे, ईशा. उद्या तू नेहेमीच्या वेळेला ऑफिसला जाणार आहेस आणि नेहेमीच्या वेळेला तिथून निघणार आहेस. मी बघेन किती वाजता निघायचं ते. ” सायली

 

अगं पण माझं लक्ष तरी लागणार आहे का? तू इथे एवढी आपल्या मोहिमेवर, आणि मी ऑफिसमध्ये, कसं वाटतं यार…” ईशा

 

काही कसं वाटत नाही. आणि मी कळवेन ना फोन करून. ओके? बरं आता तुझं सुपीक डोकं वापरून काहीतरी सूचव मला. उद्या काय बोलू त्या सुजयच्या त्या आईकडे?” सायली

 

थांब विचार करुदे मला….” ईशा

सायलीसुद्धा दुसऱ्या कुशीवर वळून विचार करायला लागली. दोन मिनिटं तिला काहीच सुचलं नाही. पण काही वेळानंतर योगिताचा चेहरा डोळ्यांसमोर आला आणि ती जरा नव्याने विचार करायला लागली. आणखी एका मिनिटानंतर ती ईशाला म्हणाली.

मला सुचलंय ईशा. सुजयच्या आईशी काय बोलायचं ते…”

———————————————————————————

सायली त्या वाड्याच्या समोर येऊन उभी राहिली तेव्हा साधारण अकरा वाजत आलेले होते. एक क्षण तिथे थांबून तिने त्या वाड्यावर नजर टाकली. वाडा फारच छान होता. जुन्या काळातला दिसत होता पण त्याला बरंचसं आधुनिक रूप दिलेलं होतंचांगली तीनचार कुटुंबं एकत्र राहू शकतील, इतक्या खोल्या असतील ह्या वाड्यात, सायलीच्या मनात येऊन गेलं.

 

तिने मोठ्या दरवाजातून आत पाऊल टाकलं. समोरच मोठा हॉल होता. हॉल मोठा असला तरी फर्निचर तसं बेताचंच होतं. एक बाई पाठमोरी उभी राहून टेबलावरची धूळ झटकत होती. सायलीची चाहूल लागली तशी ती वळली. घरात कामाला आलेली बाई होती ती. सुजयच्या आईंबद्दल विचारल्यावर ती त्यांना बोलवायला आत पळाली.

 

सायली तिथेच उभी राहून घराचं निरीक्षण करायला लागली. टेबलवर फोटोफ्रेम्स मध्ये दोन-तीन फोटो होते. सायलीने जवळ जाऊन बघितलं. सुजय, त्याची आई आणि बाबा असा एक फोटो होता. फोटो अर्थात जुना होता. दहा- बारा वर्षांपूर्वीचा असेल. सुजयही आत्तापेक्षा फार वेगळा दिसत होता. पण तो सुजयच होता, एवढं मात्र नीट कळत होतं. वडिलांना जाऊन बरीच वर्षं झाली असं तो योगिताच्या आत्याला म्हणाला होता. म्हणूनच हा वडिलांबरोबरचा फोटो जुना होता. बाजूला सुजयचा एकट्याचाही फोटो होता, तो मात्र जरा अलीकडचा वाटत होता. सुजयकडे आपण न कळवता आलोय आणि इथे त्याचा फोटो आहे, म्हणजे हेच त्याचं खरं घर असावं. आणि हे फोटोतले त्याचे खरे आई-बाबा.

कोण आपण ?”

एका थोड्या खोलवर गेलेल्या आवाजाने सायलीची तंद्री भंग पावली.

नमस्कार. सुजय सानेंचं घर हेच आहे ना?”

पूर्ण खात्री करून घेण्यासाठी सायलीने मुद्दामच सुजयचं पूर्ण नाव घेतलं.

हो. मी सुजयची आई. पण आपण कोण?”

 

मी श्वेता , योगिताची मैत्रीण.”

लोणावळ्याच्या पहिल्या पत्त्यावर फोनवरून जिच्याकडून योगिताचा पत्ता मिळाला होता, तिचं नाव वापरण्याचं सायलीने ठरवलं)

योगिता, म्हणजे योगिता फणसे?”

सुजयच्या आईंना वाटलेलं आश्चर्य आणि योगिताविषयीचा नाराजीचा स्वर दोन्हीही त्यांच्या आवाजात जाणवत होतं.

हो, म्हणजे, सॉरी मी अशी न कळवता आले. पण मला राहवलं नाही, म्हणून आले मी. तुम्हाला वेळ असेल तर बोलायचं होतं जरा. चालेल का?”

सायली सावधगिरीने बोलत होती. चुकून काहीतरी वेगळंच तोंडातून निघून जायला नको, ह्याची काळजी घेत होती.

“एक मिनिट. योगिताविषयी काही बोलायचं असेल तर प्लिज तुम्ही परत जा. मला तिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये.”

 

“पण…एक मिनिट आपण बोललो असतो तर…म्हणजे प्लिज ….”

त्यांनी असं सरळ जायला सांगितल्यावर काय बोलावं हेच सायलीला सुचेना.

” मी म्हटलं ना, तू योगिताची मैत्रीण म्हणजे तिच्याबद्दलच काहीतरी बोलायला आली असशील. हो ना? आणि मला त्या मुलीचं नावही घ्यायची ईच्छा नाही. म्हणून म्हटलं, तू परत जा. वाईट वाटून घेऊ नकोस. पण माझाही इलाज नाहीये.”

हातातोंडाशी आलेला घास दूर जाताना सायलीला दिसत होता पण ती काहीच करू शकत नव्हती.

“इट्स ओके. आय अंडरस्टॅंड. अक्चुअली मी फक्त तिच्याविषयी बोलायला आले नव्हते. पण असुदे. तुमची ईच्छा नसेल तर मी काय करू थांबून? निघते मी. परत सॉरी मी अचानक आले अशी त्याबद्दल…”

सायलीला परत जाताना पाहून त्यांच्या मनात थोडी चलबिचल झाली. तिला काय बोलायचंय ते ऐकून घ्यायला हवं होतं, असं तीव्रतेने वाटलं त्यांना. त्यांनी सायलीला हाक मारली.

“एक मिनिट. तुझं नाव काय म्हणालीस? श्वेता ना? थांब जरा. असं बोलणं न ऐकता, पाणीसुद्धा न विचारता कोणाला परत पाठवणं पद्धत नाही खरं तर या घरची. बोलूया आपण. पण कशाबद्दल बोलायचंय त्यावर ठरवेन मी बोलेन की नाही ते. योगिताचा विषय निघाला तरी मला त्रास होतो खूप..”

सुजयच्या आई समोरच्या सोफ्यावर बसत आणि सायलीला हाताने बसण्याची खूण करत म्हणाल्या. समोरच्या तांब्यातलं पाणी त्यांनी सायलीला दिलं.

साहजिक आहे ते. मी समजू शकते.” सायली

 

पण मी तुला नाही ओळखलं. म्हणजे साखरपुड्याला योगिताबरोबर तिच्या जवळच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या, पण तू नव्हतीस त्यात.” सुजयच्या आई

 

नाही, तिच्या साखरपुड्याच्या वेळी तिची आणि माझी ओळखही नव्हती. ती लोणावळ्याला आल्यावर आमची ओळख झाली. रूममेट्स होतो आम्ही. खूप चांगली मैत्री झाली आणि मग नंतर तिच्याकडून कळलं मला, तिचं ठरलेलं लग्न मोडल्याचं. मला खरंच खूप वाईट वाटलं. तिची अशी काही कारणं होती त्या सगळ्यासाठी. अर्थात, माझ्या मते, एक माणूस म्हणून ती फार चांगली आहे. तिने असं तडकाफडकी लग्न मोडलं हे मलाही तितकंसं पटलं नाही. मी माझ्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. अजून आपण मागे फिरू शकतो वगैरे सांगितलं. पण ती तिच्या निर्णयावर अजूनही ठाम आहे. आणि मग नंतर शांतपणे विचार केल्यावर मलाही वाटलं की तिच्यासारखी समजूतदार मुलगी असं वागते, त्या अर्थी कुठेतरी, काही अंशी तरी तिचं म्हणणं खरं असू शकतं…..” सायली

 

म्हणजे काय? आपलं संभाषण पुन्हा तिथेच जाणार असेल तर मला तुझ्याशी बोलायचं नाही. मी आत्ताच म्हणाले होते तुला तसं.आता तू सुद्धा माझ्या मुलावर नको ते आरोप करतेयस…..तुला काय म्हणायचंय? माझ्या मुलामध्ये असं काहीतरी आहे, ज्यामुळे त्या योगिताला कसलेतरी भास झाले, असंच ना?”

सुजयच्या आईंचा आता धीर सुटत चालला होता.

प्लिज तुम्ही शांत व्हा. आणि रागावू नका. मी कोण आहे सुजयबद्दल असं बोलणारी? योगिता आणि सुजयचं लग्न मोडायला नको होतं, असं मनापासून वाटलं मला म्हणून आलेय मी. आज काही कामासाठी पुण्यात आले होते, तर म्हटलं तुमच्याशी त्या विषयावर बोलता आलं तर पाहावं….सॉरी म्हणजे मी खरं तर अगदीच बाहेरची आहे, लहान आहे तुमच्याहून. ह्या सगळ्या तुमच्या घरगुती गोष्टी आहेत खरं तर. पण तरी राहवलं नाही म्हणून आले….”

सायली त्यांना शांत करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. त्यांनी रागावून तिला जायला सांगितलं असतं, तर मग सगळ्यावर पाणी फिरलं असतं.

नाही, रागावले नाही तशी मी. माझा स्वभावही नाही तसा. पण योगिताने नकार दिल्यामुळे सुजय खूप निराश झाला होता. मुंबईला नोकरीसाठी गेला म्हणून थोडा सावरला. या मुलीने असं का करावं बरं? बरं कारण काय सांगितलं, तर असलं भलतंच काहीतरीमाझा मुलगा काय दगडाचा बनलाय का? एकदा नाही, दोनदा असं झालंय त्याच्या आयुष्यात. दोघेही खचलोच बघ आम्ही. लग्न ठरतं ठरतं, आणि मग अचानक असल्या विचित्र कारणांसाठी मोडतं, हे काय आहे? त्याची आधीची दोन लग्न मोडली आहेत, हे कळलं तर कोण मुलगी देईल त्याला? त्याच्यातच काही खोट आहे, असंच वाटणार ना लोकांना?”

बोलताबोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

 

सायलीला आता पुढे काय बोलावं काही सुचत नव्हतं. सुजयचं लग्न दुसऱ्यांदा मोडलंय, हे ऐकून आणखी एक धक्का बसला होता आणि त्याचक्षणी काही नवीन प्रश्न मनात गोळा झाले होते. पहिल्यांदा जिच्याशी लग्न ठरलं ती मुलगी कोण असेल? ते लग्न का मोडलं असेल? एक ना दोनआणि त्यात सुजयच्या आई अशा डोळ्यांना पदर लावून बसलेल्या.

काकूम्हणजे….सुजयच्या आई……तुम्ही रडू नका प्लिज.”

सायली त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. एक क्षणभर रडणाऱ्या सुजयच्या आईच्या जागी तिला तिचीच आई दिसली. मुलीचं लग्न मोडलं म्हणून रडणारी. तिला कसंतरीच झालं. पण मग तिच्यातलं कणखर मनही जागं झालं. आत्ता हा विषय पुढे वाढवला नाही, तर हाताला काहीच लागणार नाही, तिने तिच्या मनाला कसंबसं समजावलं.

मी खरं तर तेच जाणून घ्यायला आले होते. म्हणजे योगिताने सुजयचं जे वर्णन केलं, त्यावरून माझी खात्रीच पटली की सुजय अतिशय चांगला मुलगा आहे. आणि योगिताही चांगली मुलगी आहे, अशी उठून एकदम तोंडाला येईल ते बोलणार नाही. मग नक्की काय गडबड आहे, ते जाणून घ्यायला मी आले. सॉरी म्हणजे मी कदाचित जास्त बोलत असेन, पण मगाशी तुम्हीच म्हणालात ना, की असल्याच कारणासाठी दोन वेळा लग्न मोडलं म्हणून? मग नक्की काय प्रॉब्लेम आहे, हे बघायला हवं ना, तेच मला तुमच्याशी बोलून जाणून घायचंय. आणि कदाचित आपण ते शोधलं तर योगिताही परत येईल, कारण सुजयशी लग्न न करण्यामागे बाकी काहीच कारण नाहीये तिच्याकडे. त्या दोघांची जोडी तुटू नये असं मला मनापासून वाटतं. ”

 

अगं बघायचं काय पण त्यात? आपण आजच्या काळात हे सगळं मानतही नाही. सुजयला काय विचारू त्याबद्दल?तुझ्यावर कोणी करणी केलीये की तूच लोकांवर करणी करतोयस, असं? ” त्या पुन्हा वैतागायला लागल्या.

 

नाही, हे असलं काहीही नसतंच काकू. पण आपण निदान ह्याचा अंदाज घेऊ शकतो की तो काही लपवतोय का आपल्यापासून, किंवा आधी काही घडलंय का? तुम्ही काही चोवीस तास त्याच्याबरोबर राहू शकत नाही ना? म्हणजे कोणाशी काही शत्रुत्व वगैरे आहे का त्याचं, आणि त्याचा बदला घ्यायला कोणी बघतंय असं काहीही असू शकतं ना? त्याच्या वाईटावर कुणी आहे, आणि त्याचं लग्न मोडण्यासाठी असं काही करतंय, किंवा योगिताला आणि त्या आधीच्या मुलीला काही उलटसुलट सांगितलंय, काहीही असू शकतं….बरोबर ना? तुम्हाला काही आठवतंय का, असं काही वेगळं झाल्याचं, त्याचं पाहिलं लग्न ठरायच्या आधी?” सायली

 

हो, असा विचार मी केला नव्हता कधी. तसा तो फार साधा मुलगा आहे गं, पण तुझं म्हणण्यात तथ्य असावं कदाचित. जवळपास दीड वर्षांपासून सुजयचा स्वभाव खूप बदललाय. नक्की कधीपासून ते मलाही नाही कळलं. पण हळूहळू जाणवायला लागलं होतं मला. मग एक वर्षांपूर्वी लग्न ठरलं आणि ते मोडलं. तीनचार महिन्यापूर्वी योगिताशी लग्न ठरलं आणि तेही मोडलं. ह्या सगळ्यातून त्याला बाहेर काढता काढता बाकी सगळं विसरलेच मी.”

 

तो काही बोलला नव्हता का, काय झालं वगैरे? म्हणजे कुणाशी भांडण वगैरे, किंवा आणखी काही?” सायली

 

माझ्या हे हळूहळू लक्षात आलं, त्यामुळे नक्की कधी पासून तो जरा वेगळं वागायला लागला, मला खरंच आठवत नाही. पण असं मोकळेपणाने बोललाही नाही कधी. मी आठवून पाहिलं बरेचवेळा, की घरी काही घडलं का, किंवा आजूबाजूला, तर तसं काही माझ्या आठवणीत तरी नाही. ऑफिसचं तसं काही नसावं, कारण तिथे काही झालं की तो सांगायचाच मला. मला राहून राहून नेहेमी असं वाटतं की दीडेक वर्षांपूर्वी मित्रांबरोबर ट्रीपला गेला होता, मध्यप्रदेशात कुठल्यातरी गावात. तिथून ट्रेकला पण जाणार होते ते. त्या ट्रीपपासून ह्याचं काहीतरी बिनसलं. कारण त्याच्या आधीचं आठवलं, तर तेव्हाचा सुजय स्वभावाने अगदी वेगळा होता. त्या ट्रिपनंतरच हळूहळू त्याचे मित्रही यायचे बंद झाले. मला अगदी शंभर टक्के खात्री नाही. पण बरेचवेळा त्याच्या काळजीत रात्री जागून काढल्यात मी. तेव्हा हेच आठवायचा प्रयत्न करायचे की नक्की कधी पासून असं झालं असावं. तर जितकं मी मागे मागे जाऊन आठवून पहाते, तितकी माझी खात्रीच पटते, की नक्कीच. त्या ट्रिपनंतर काहीतरी बिनसलं.”

मधेच त्यांनी थोडं थांबून पाणी प्यायलं. कदाचित एकदम एवढं सगळं बोलल्यामुळे त्यांना जरा दमल्यासारखं झालं असावं. योगिताच्या बोलण्यात आलं होतं त्यांचं ऑपरेशन झाल्याचं आणि त्यांना बोलायला त्रास होत असल्याचं, सायलीला आठवलं.

त्या पुढे म्हणाल्या,

“हे अगदी दुसऱ्या दिवसापासून लक्षात नाही आलं माझ्या. पण हळूहळू एक महिन्याभरानंतर त्याच्यातले बदल जाणवायला लागले. एकदोन वेळा मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला काहीही झालं नाहीयेम्हणून विषय तिथेच बंद केला. त्याच्या दोन अगदी जवळच्या मित्रांनाही फोन केले मी. पण त्यांनीच सुजय आता आमच्याशी पूर्वीसारखा बोलत नाही, म्हणून तक्रार केली. त्याचा अगदी लहानपणापासूनचा मित्र – प्रशांत, तो काही त्या ट्रीपला गेला नव्हता, पण ट्रीपवरून आल्यानंतर सुजय त्याला भेटायला गेला होता. त्याला नक्कीच काहीतरी बोलला असणार तो. त्याला एक दिवस निरोप पाठवला मी भेटायला ये असा. दोन दिवसांनी येतो असा त्याचा निरोप आला…..”

बोलता-बोलता सुजयच्या आई एकदम गप्पच बसल्या.

——————————————————-

कटनी

स्टेशनच्या नावाचा बोर्ड दिसला आणि गेल्या सोळासतरा तासांचा प्रवासाचा शीण एकदम नाहीसा झाल्यासारखा वाटला सिद्धार्थला. ट्रेन अपेक्षेप्रमाणेच दीड तास तरी लेट झाली होती.

 

सायलीने कटनीला न जाण्याबद्दल त्याला बजावलं होतं तरीही तो कटनीला येऊन दाखल झाला होता. काल सकाळी उठून जी ट्रेन मिळेल तिचं बुकिंग त्याने करून टाकलं होतं. दोन दिवसांची बॅग भरली. मित्राचं काही काम आहे म्हणून जातोय असं आईला सांगितलं आणि तो तडक निघाला. सायलीने जरी त्याला ह्या सगळ्यापासून लांब ठेवायचं ठरवलेलं असलं तरीही तो लांब राहू शकतच नव्हता ह्या सगळ्यापासून. सायली त्याला मनापासून आवडत होती. तिच्यात तो स्वतःची लाईफ-पार्टनर शोधत होता. आणि ह्या अशा वेळी तिची साथ न देता फक्त तिचा विचारच करत बसणं त्याला शक्यच नव्हतं.

 

कटनीला येण्याचं त्याने ठरवलं खरं. पण तिथे जाऊन काय करायचं हे मात्र त्याला ठरवताच येत नव्हतं. सायलीच्या डायरीतल्या पानांचा फोटो ईशाने त्याला पाठवला होता. त्यात कटनीबद्दल फारसं काहीच नव्हतं. एक ते मंदिर हा एकच क्लू होता सध्यातरी. त्या मंदिराच्या बॅकग्राउंडवर सुजयने फोटो काढला होता आणि त्यातल्या बोर्डवरची अक्षरं सायली आणि ईशाने शोधून काढली होती. त्या मंदिराचं नाव फक्त त्याच्याकडे होतं. आधी तिथेच जाऊन बघू, असं त्याने ठरवलं.

———————————————————

“काय झालं मग काकू? प्रशांतकडून काही कळलं का तुम्हाला?”

सायली ऐकायला अधीर झाली होती. काकू अचानक गप्प का झाल्या, हे तिला कळत नव्हतं.

“अगं कसलं काय…येणार होता त्याच्या आदल्याच दिवशी ऍक्सिडंट झाला त्याचा. पुढे खूप दिवस कोमात होता. शेवटी व्हायचं तेच झालं. माझ्या डोळ्यांसमोर मोठा झाला होता गं, सुजयसारखाच होता माझ्यासाठी. आणि मग त्याच्याबरोबर त्याने जे काही सांगितलं असतं मला, तेही गेलं. सुजयमध्ये, त्याच्या स्वभावात झालेले हे बदल माझ्यासाठी अजूनही कोडंच आहे बघ. त्यातल्या त्यात, लोकांची मुलं व्यसनी होतात, आपल्या बाबतीत तसलं काहीही झालं नाही, ह्याबद्दल त्याला थँक्स म्हणतेय…” वर हात दाखवत त्या म्हणाल्या.

 

“अरे बापरे…खरंच भयानक आहे हे. पण मग बदल झाले त्याच्यात म्हणजे नक्की काय झालं? कारण योगिता म्हणाली त्याप्रमाणे फारच चांगला आणि समजूतदार मुलगा वाटला मला तो. म्हणजे ह्याआधी तो तसा नव्हता का?” सायली

 

फार स्वच्छंदी होता गं. स्वतःच्या जगात असायचा. म्हणजे भरपूर मित्र आजूबाजूला आणि हा त्यांच्यात अगदी राजा असल्यासारखा. मित्रांमध्ये असताना घरी वेळेवर जायला हवं, हेपण विसरायचा कधी कधी. मुद्दाम नाही करायचा तो, पण घरची जबाबदारी हळूहळू घ्यायला हवी हे त्याच्या गावीही नसायचं. स्वतःला हवं तेच करायचा. म्हणजे दुसऱ्याचं वाईट करून नाही, पण स्वतःच्या ईच्छांना मुरडही नाही घालायचा कधी. तडजोड कधीच नाही आवडायची त्याला. मग हळूहळू अचानक घरात लक्ष घालायला लागला. घरातलं काही सामान संपलंय का विचारायचा. माझ्याबरोबर डॉक्टरकडे यायचा. त्याचा समजूतदारपणा हळूहळू वाढायला लागला. सुरुवातीला मला वाटलं की बरोबरीच्या मित्रांची लग्न जमायला लागली तसं ह्यालाही आपलं लग्न आता व्हावं, असं वाटत असेल. कदाचित त्यातूनच हा समजूतदारपणा येत असावा. मी हळूहळू त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. पण एका बाजूला त्याचा मित्रांचा गोतावळा सुटत गेला, तसतशी मला काळजी वाटायला लागली. त्याच्या स्वभावात हळूहळू झालेले हे बदल प्रकर्षाने जाणवायला लागले. पण नंतर काही महिन्यांनी त्याचं लग्न ठरलं, मग आणखी दीड महिन्यात ते मोडलं, मग त्याला सावरण्यात हे आधीचं सगळं बाजूलाच पडलं.”

सुजयच्या आई जसजसं बोलत होत्या, तसतशी सायलीची खात्रीच पटत होती, की मध्य प्रदेशातलं ठिकाण म्हणजे नक्कीच कटनी ह्या गावाचा ह्या सगळ्याशी काहीतरी संबंध असणार. पण काहीतरी विचारून खात्री करून घेतली पाहिजे.

काकू, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून, मध्य प्रदेशातल्या ट्रीपच्या वेळी काहीतरी झालं असावं नक्कीच. तो नक्की कुठे गेला होता काही आठवतंय का? म्हणजे माझी एक मैत्रीण राहते तिथे कटनी नावाच्या एका शहरात. पण तिची नक्की काय मदत होऊ शकेल ह्या सगळ्यात ते कळत नाहीये मला.” सायली

 

कटनी? मी ऐकलंय हे नाव….पण मला नक्की सांगता नाही येणार सुजय इथे गेला होता की नाही ते. ते सगळे इंदौरला गेले होते. खरं तर त्याच्या एका मित्राच्या नातेवाईकांपैकी कुणाचंतरी लग्न होतं तिथून जवळ कुठल्यातरी शहरात, तो त्या लग्नासाठी जायचा होता. मला वाटतं, जबलपूरला होतं लग्न. तर ह्याच्या सगळ्या ग्रुपनेच जायचं ठरवलं, ट्रिप म्हणून. आणि मग शेवटचे दोन दिवस ट्रेक, असं ठरलं होतं त्यांचं. जवळपास तीन आठवड्यांची ट्रिप होती त्यांची. अर्थात सुजय दोन दिवस लवकरच घरी आला, आधी काहीही न कळवता. मी विचारलं तर म्हणाला की सगळेच परत आलेत. ट्रेक लवकर झाला, असं म्हणाला.”

 

पण नंतर तो काहीच बोलला नाही का तुमच्याशी ? म्हणजे तिथे काय झालं, कोण कोण भेटलं वगैरे?” सायली

 

तिथे काय काय झालं ते एका अक्षरानेही बोलला नाही तो. आणि आल्यावर दुसऱ्या दिवसापासून त्याचं ऑफिसचं काम इतकं वाढलं की रात्री उशिरा नुसतं झोपण्यापुरता घरी यायचा तो. ट्रिप चांगली झाली एवढंच तुटक म्हणाला. पण कधीतरी रात्री झोपेत काहीतरी बोलताना ऐकायचे मी त्याला. पण काय बोलतोय ते मात्र काही कळायचं नाही. मंदिर आणि नदी हेच सारखासारखा बोलत राहायचा. मी विचारलंही एकदा सकाळी त्याला, पण त्याला काही आठवत नव्हतं. ”

 

मंदिर आणि नदी? म्हणजे काय? “

सायलीचा हा प्रश्न सुजयच्या आईच्या ऐवजी स्वतःलाच जास्त होता. सुजयच्या आईकडून जी काही बारीकसारीक माहिती मिळत होती त्यावरून ती काहीतरी धागा मिळतोय का, ह्या कोड्याचे तुकडे एकमेकात जोडले जातायत का, हाच विचार करत होती.

तेच तर ना. काय डोक्यात होतं तेव्हा त्याच्या, मला अजिबात थांग लागू दिला नाही त्याने. पण आता मला सांग, आता ह्या सगळ्या माहितीवरून तू नक्की काय निष्कर्ष काढणार आहेस आणि योगिताला जाऊन काय सांगणार आहेस? तशी ती फार आवडली होती मला सुजयसाठी. लाघवी आहे मुलगी. पण तिने अशा काही कारणावरून लग्न मोडलं की पार मनातूनच उतरली माझ्या. बरं तिच्या आईवडिलांनी तरी समजवावं की नाही तिला? लग्न काय खेळ आहे का? मनात आलं की ठरवलं आणि मनातून उतरलं की मोडलं असं करायला. पण नाही तिचे आईबाबा जाऊन बसलेत तिकडे यु.एसला. मला फक्त एक फोन करून माफी मागितली त्यांनी….पण माझा मुलगा तिच्यात गुंतत चालला होता, त्याचं काय? “

सुजयच्या आईंना काय सांगून समजवावं हेच सायलीला कळेना. त्यांची बाजूही बरोबर होती. पण योगिताची बाजू मात्र त्यांना माहित नव्हती. खरं तर स्वतःच्या मुलाचं खरं रूपही त्यांना अजून माहित नसावं.

शांत व्हा काकू तुम्ही. मला कळतंय तुमच्या मनात काय घालमेल चालली आहे ती. सुजयच्या बाबतीत काही गोष्टी नॉर्मल नाहीयेत, असं माझंही म्हणणं नाही. पण योगिता माझी खूप चांगली मैत्रीण झाली आहे. आणि ती मनात येईल ते बोलतेय असंही मला वाटत नाही. तिने जेव्हा सुजयचं वर्णन केलं तेव्हा मला खूप तीव्रतेनं वाटलं की सुजयच्या शिवाय आणखी परफेक्ट स्थळ तिच्यासाठी आणखी कुठलंच नसेल. म्हणून तर मी ही सगळी माहिती काढून बघायचं ठरवलं. आता ह्याचा आपल्याला काय उपयोग होईल हे आत्ता तरी मला नाही माहित. मी विचार करते घरी जाऊन. पण मला सांगा काकू, सुजय आत्ता काय करतो? म्हणजे कुठे काम करतो? कुठे राहतो? तुम्ही गेला आहेत त्याच्याबरोबर मुंबईला राहायला?”

काकूंना सुजय आत्ता काय करतोय हे माहित नसावं असा सायलीचा अंदाज होता आणि त्यांच्या पुढच्या उत्तरावरून तो बरोबरच ठरला. आणि दुसऱ्या बाजूने सुजय मुंबईमध्ये आत्ता नक्की काय करतो, कुठे राहतो ह्याचं उत्तर सायलीला मिळालं.

मला कुठला नेतोय तो? तिथे फार बिझी लाईफ आहे म्हणे, तू एकटी कंटाळशील असं म्हणतो. एका इंजिनीरिंग कंपनी मध्ये आहे. पूर्वी बिझनेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये होता, इथे असताना. पण आता टेक्निकल साईडला आहे. मला वाटतं क्वालिटी कंट्रोल मध्ये आहे. मी सांगते तुला नावजरा डायरीमध्ये बघावं लागेल. लक्षात नाही राहत गं माझ्या ती नावं. “

त्या डायरी शोधायला उठल्या तसं सायलीने त्यांना थांबवलं

राहूदे काकू, नंतर द्या. मला आणखी एक विचारायचं होतं तुम्हालाम्हणजे त्याच्या लग्नाचा काही विचार करताय का तुम्ही? म्हणजे जर योगिता पुन्हा तयार झाली तर तुम्ही …….म्हणजे…..तुमची तयारी असेल का?”

 

अगं माझं काय? संसार त्यांना करायचायसुजय दुखावला तर गेला आहेच. पण तो पुन्हा विचार करायला तयार असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. मात्र, या वेळी तिने ठाम निर्णय घ्यावा हे मात्र माझं म्हणणं आहेच. आणि अगं त्याचं लग्न जुळवण्याबद्दल म्हणत असशील तर वेळ हवा ना त्याला? त्याने स्वतःला इतकं कामात बुडवून घेतलंय की त्याला वेळच नाही ह्या सगळ्याबद्दल बोलायला. मी विषय काढत राहते त्याच्याकडे, आणि तो टाळत राहतो….”

काकू बोलतच राहिल्या. कदाचित नातेवाईक आणि शेजाऱ्यांपेक्षा असं काहीही संबंध नसलेल्या तिसऱ्याच माणसाशी आपल्या मनातलं शेअर करणं त्यांना सोपं वाटत असावं.

सायलीही तिच्याच विचारात होती. ह्यांच्या मुलाचा ज्या मुलीशी साखरपुडा झालाय, जिच्याशी तो आता काही दिवसात लग्न करणार आहे, ती मुलगी ह्यांच्या समोर बसली आहे आणि ह्यांना माहिती नाही. का करतोय सुजय हे सगळं? कशासाठी? आमचीच नाही, तर स्वतःच्या आईचीही फसवणूक ?

त्यांच्या पुढच्या वाक्याने मात्र सायली एकदम भानावर आली. तिच्या पायाखालची जमिनच सरकली खरं तर.

तू आता आली आहेस तर मग सुजयला भेटूनच जा. तो येणार आहे आज. खरं तर कधीही पोहोचेल आता एवढ्यात. थांब हा. मी फोन करून बघते कुठे पोहोचलाय ते. ”

 

काय ?”

ती इतक्या जोरात ओरडली की फोन करायला म्हणून उठलेल्या सुजयच्या आई एकदम दचकून थांबल्याच. ते पाहून सायलीने स्वतःला सावरलं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्यांना संशय येऊ शकला असता.

सॉरी मी जरा जोरात ओरडले. पण तुम्ही मघापासून काहीच बोलला नाहीत ना, तो येणार आहे, अचानक कळलं, म्हणून अशी रिऍक्ट झाले मी. पण ….म्हणजेएवढ्यात येईलच का तोकिती वाजता येणार आहे?”

सायलीचं बोलणं ऐकता ऐकता त्यांनी सुजयला फोन लावलेलाही होता.

अगं एवढ्यातच यायला पाहिजे. बस तर पोहोचलीच असेल त्याचीरिक्षात असेल आ….हॅलो ..हॅलोहा..सुजय मी बोलतेयअरे कुठे पोहोचलायस? ………………………….बरं बरं ये लवकर….चल ठेवते….”

 

बघ मी म्हटलं ना, अगं रिक्षात आहे तो. मागच्याच वळणावर आहे. दोन मिनिटात पोहोचेलच गं….थांबच तू आता….”

मुलगा येणार म्हणून त्यांची आता लगबग सुरु झाली….

अगं बाई, एवढ्या वेळ तू बसली आहेस पण तुला चहा पण नाही विचारला मी. थांब मी बाईंना चहा टाकायला सांगते. सुजयलाही लागेलच आता…”

 

पण….एक मिनिट….काकू..जरा…”

पण सायलीचं काहीही न ऐकता त्या आत गेल्या.

काय करावं आता? पटकन निघून जावं का? पण सुजय बाहेरच भेटला तर? आणि निघून गेले तर त्याच्या आईला संशय येईल आणि त्या सुजयकडे आपण आल्याचं सुद्धा बोलतील. काय करावं? काहीच सुचत नाहीये….तिने पटकन आतल्या खोलीकडे आणि बाहेरच्या दरवाजाकडे एक नजर टाकली आणि ईशाचा नंबर डायल केला.

काय मॅडम…..कशी चाललीये शोध मोहीम ? तू मला न घेता गेलीस ना, म्हणून फोन उचलणारच नव्ह…”

पण तिला पुढे काहीच बोलू न देता सायली म्हणाली.

ईशा, एक प्रॉब्लेम झालाय. अगं मी सुजयच्या घरी आहे आणि सुजय येणार आहे आज इथे. अच्युअली आलाय. एक मिनिटात त्याची रिक्षा येईल दरवाजावर.”

 

काय ? अगं मग माझ्याशी काय बोलतेयस? पळ ना तिथून….” ईशा किंचाळलीच.

 

त्याच्या आईला संशय येईल आणि त्या त्याला सांगतील माझं वर्णन करून ही अशी मुलगी आली होती म्हणून. मग काय करू? आणि बाहेर पडले आणि तो दरवाजात भेटला तर?” सायली

 

मी….मी काय करू आता….मला सुचत नाहीये. ….मी जरा विचार करते आणि तुला फोन करते. ओके?” ईशा

 

अगं वेळ आहे का तेवढा? ईशा, मला त्याच्या समोर जायला लागणारकदाचित बाहेर आला पण असेल तो..त्याला सगळं कळल्यावर तो खरं सांगेल का आपल्याला? आणखी खोटं बोलेल तोकाय करायचं आता?”

 

मी….मी ठेवते फोनजरा विचार करते….चल बाय….”

ईशाने फोन ठेवला आणि डोक्याला हात मारत ती ऑफिसमध्ये येरझाऱ्या घालायला लागली. ऑफिसमधले सगळे तिच्याकडे कुतूहलाने बघत होते, ह्याकडेही तिचं लक्ष नव्हतं.

———————————————-

त्याच वेळेला कोथरूडच्या घरात सुजयच्या काकांच्या घरात

लक्ष्मी, अगं ती कोरान्नेबाईंनी दिलेली पत्रिका आणि फोटो कुठे ठेवलायस? जरा बघायचाय…” सुजयचे काका

 

ते काय गोदरेजच्या कपाटात समोरच आहे ते पाकीटत्यात आहेकाय बघायचंय पण तुम्हाला?” काकू

 

अगं सुजयसाठी एवढी स्थळं बघताना आता बारीक सारीक माहिती झाली आहे, म्हणजे नक्षत्र कुठलं चांगलं, कुठली रास त्याला चालत नाही वगैरे. ते बघून घेतो आणि ठीक असेल सगळं तर उद्याच वहिनींना नेऊन देऊ पत्रिकाकाय?” काका

 

उद्या कशाला? आज संध्याकाळी जायचंय नाविसरलात का ? वहिनींचा फोन आला होता काल रात्री, मी म्हटलं होतं तुम्हाला. सुजयचा तिथीने वाढदिवस ना आज, तो येणार आहे म्हणाल्या. दुपारीच बोलवत होत्या खरं तर. पण मी म्हटलं तो राहणार आहे तर मग रात्री जाऊ जेवायला आणि तिथेच राहू. भावोजींना जरा सुजयशी बोलायला सांग म्हणाल्या. लग्नाबद्दल काही ठरवलंय का त्याने, वगैरे. मला काही थांग लागू द्यायचा नाही म्हणाल्या.” काकू

 

हम्मत्याच्याशी बोलायला तर हवंच आहे. त्याचं पुढचं आयुष्य मार्गी लावायला वहिनींना आपणच मदत करायला हवी. त्या तरी आणखी कोणाकडून अपेक्षा करणार? पण त्यांच्यासाठी निदान अज्ञानात सुख तरी आहे. त्यांना काहीच माहित नाहीये. पण आपलं तसं नाही. प्रशांतकडून आपल्याला जे कळलंय ते फार विचित्र आहे. असं व्हायला नको होतं. म्हणजे मी असं म्हणत नाही, की त्याची मागची दोन्ही लग्न ह्या कारणासाठी मोडली. पण त्या दोन्ही मुलींनी दिलेली कारणं? त्यात इतकं साम्य कसं असू शकतं? त्यांना होणारे भास, ऐकू येणारे विचित्र आवाज, काय असेल ते सगळं? तिथे कटनीला जे झालं, त्या मुळे हे होत असेल असं म्हणायचं नाही मला. पण मग ह्या दोन्ही मुलींची लग्न मोडण्याची कारणं ऐकून मनात येतंच, की हे सगळं त्यामुळे तर होत नसेल? परिणाम काहीही असोत, ते जे झालं ते व्हायला नको होतं….” काका

 

अहो, काय अर्थ आहे बोलून सगळं? मलाही बरेच प्रश्न पडतात. पण कोणाला विचारणार? सुजयला ह्याबद्दल काहीही विचारू किंवा सांगू नका, असं प्रशांतने बजावलं होतं. बिचारा तो तर गेला. त्याला एकट्यालाच माहित होतं काय झालं ते. नंतर एवढे प्रश्न मागे ठेवून गेलाय, त्याची उत्तरं मागणार कोणाकडे? दीड वर्ष होऊन गेलं तरी आजही हा विषय निघाला की मला फार अस्वस्थ व्हायला होतं. असं वाटतं, की सरळ सुजयकडे जाऊन बोलावं की आम्हाला कळलं आहे. आता तरी आम्हाला सगळं सांग. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. पण मग ह्या सगळ्यानंतर त्याच्यात जो बदल झालाय, तो इतका स्वतःच्या जगात, स्वतःपुरतं जगायला लागलाय, की त्याच्याशी ह्या विषयावर बोलायची हिम्मत पण होत नाही. पूर्वीसारखा आता त्याच्याशी संवादच नाही राहिलाय. त्याची कधी कधी भीतीच वाटते मला. माझं ऐका, आपण ह्या सगळ्यात नको पडूया. वहिनींना काहीच माहित नाही, हे चांगलंच आहे. आणि सुजयलाही काही कळू नको द्यायला. आपण फक्त आपलं काकाकाकूचं कर्तव्य पार पाडायचं. त्याच्यासाठी चांगली स्थळं बघू. एकदा लग्न झालं त्याचं की सुधारेल तो….” काकू

 

तू म्हणतेयस ते अगदी सगळं पटतंय मला. पण लग्न झालंच नाही तर? पुन्हा तिसऱ्यांदा असाच अनुभव आला तर ?” काका

 

अहो, मी म्हटलं ना, विचार करू नका. आपल्या हातात काही नाहीये. प्रशांतकडून सगळं कळल्यावर तुम्ही त्या प्रजापतींच्या नातेवाईकांनाकोण ते ..मामा त्यांचे, त्यांच्याशी फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला होतात ना? कसाबसा त्यांचा नंबर मिळवला होता. पण सुजयचं नाव ऐकून त्यांनीच सुनावलं आपल्याला. नक्की काय झालं हे बोलणं बाजूलाच राहिलंआपण शक्य तेवढं सगळं केलंय हो आपल्याकडून. आता आणखी काय करणार?” काकू

 

तेही आहेच म्हणा. मी तुला बोललो नव्हतो, पण एकदा तू घरी नसताना पुन्हा प्रजापतींचा नंबर फिरवून बघितला होता मी. पण पुन्हा तेच झालं…..मग नाद सोडला मी…” काका

 

जाऊदे. आता ते कटनी, प्रशांत, सुजय, प्रजापती सगळे विषय बंद. संध्याकाळी जायचंय वहिनींकडे. मी जरा कामं आवरते माझी, नाहीतर उशीर व्हायचा….” काकू आत जाता जाता म्हणाल्या.

——————————————————–

रिक्षातून उतरल्यावर सिद्धार्थने समोर पाहिलं. विष्णूवराह मंदिर असं लिहिलेली पाटी समोर दिसली. त्याने मोबाईलवरून सुजयच्या फेसबुक अकाऊंटमधून त्या मंदिरापुढच्या त्याच्या फोटोवर एकदा नजर टाकली. मंदिर तर हेच होतं. सायली आणि ईशाने विचार करून शोधून काढलेली हिंदीमध्ये लिहिलेली ती सूचना सुद्धा त्याला त्या पाटीवर खाली दिसली.

 

मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर तो बाहेर आला आणि त्याने आजूबाजूच्या परिसरावर एक नजर टाकली. मंदिराच्या बाहेर एक जुनी विहीर होती. काही बायका तिथे पाणी भरण्यासाठी आलेल्या होत्या. समोर एक छोटं मैदान आणि मैदानाच्या समोर काही जुन्या पद्धतीची घरं होती. आजूबाजूला दुकानं वगैरे फारशी दिसत नव्हती. देवळातल्या पुजाऱ्याकडे त्याने इथे बाहेरगावाहून पर्यटक वगैरे येतात का, वगैरे चौकशी केली. पण तो काही दिवसापूर्वीच तिथे आलेला होता. सिद्धार्थसारखंच त्यालाही हे गाव, आजूबाजूचा परिसर सगळं नवीनच होतं. त्याच्याकडून काही माहिती मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचंच होतं. त्याने मैदानाच्या समोरच्या घरांकडे मोर्चा वळवला.

 

तिथे एकमेकांना लागून अशी चारपाच घरं होती. तशी लहानच होती आणि जुनीसुद्धा झालेली होती. डाव्या बाजूच्या दोन्ही घरांकडे बघून तिथे कोणी राहत असेल असं वाटतच नव्हतं. इतकी ती मोडकळीला आल्यासारखी होती. बाकीची तीन घरं त्यातल्या त्यात जरा बऱ्या स्थितीत होती. पण त्यातल्या एका घराला कुलूप होतं. मधल्या घराचं दार उघडं असल्यासारखं दिसत होतं. त्याच्या छोट्या फाटकावरची पाटीकडे नजर टाकून सिद्धार्थ आत शिरला. त्याने आत शिरून फाटक बंद केल्यावर मोडकळीला आलेली ती पाटी एका बाजूने निखळली आणि एकाच खिळ्यावर त्या फाटकाला लोम्बकळायला लागली.

 

ह्या धक्क्याने त्या पाटीवर लावलेली लाकडी अक्षरंही निखळली आणि खाली जमिनीवर पडली. त्या आवाजाने सिद्धार्थ पुन्हा मागे वळला. जमिनीवर पडलेले ते लाकडी अक्षरांचे तुकडे त्याने बघितले. खाली बसून त्याने एखादं पझल सोडवावं तशी ती उलटसुलट झालेली अक्षरं विचार करून एकापुढे एक लावली.

 

प्रजापती निवास‘.

मान वर उचलून पुन्हा एकदा त्या घराकडे पाहत सिद्धार्थने ती अक्षरं तिथेच बाजूच्या एका दगडावर ठेवली आणि तो आत घराच्या दिशेने जाण्यासाठी वळला. आत जाणाऱ्या प्रत्येक पावलासोबत का कुणास ठाऊक, एक अस्वस्थ करणारी जाणीव जागी होत होती. रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज, लांब कुठेतरी खेळणाऱ्या मुलांचे आवाज, येणाऱ्याजाणाऱ्याने वाजवलेली देवळातली घंटा हे सगळं कानावर पडत असूनही अचानक त्याला आजूबाजूला एक विचित्र नीरव शांतता जाणवायला लागली. वाळक्या पानांवर पाय पडल्यावर जसा आवाज येईल तसलाच आवाज आला आणि तो थांबला. त्याने स्वतःच्या पायाकडे बघितलं. खालची जमीन तर अगदी स्वच्छ होती. पानं किंवा आणखी कसलाच कचरा दिसत नव्हता. पाठीमागून अचानक थंड हवा आल्यासारखी वाटली आणि तो गारठून गेल्यासारखा तिथेच उभा राहिला. एवढ्या कडक उन्हात, घामाच्या धारा वाहत असताना अशी थंड हवा अचानक कुठून आली हा प्रश्न तर होताच, पण आत्ता हवेच्या झोतानंतर त्याला जो भास झाला होता, त्याचं काय? मागे कुणीतरी उभं असल्याचा भास. हलक्या आवाजात कुणीतरी बोलल्याचा भास. त्याने झटकन मान फिरवून मागे वळून पाहिलं. पण मागे कोणीच नव्हतं. मनातली अस्वस्थता बाजूला सारत तो घराच्या दिशेने पुढे निघाला.

———————————————————-

काय करावं काहीच सुचत नव्हतं सायलीला. ती तशीच उभी राहिली होती. विचार करून फोन करते, असं ईशा म्हणाली होती खरं, पण अजून तिचा फोनही आलेला नव्हता. जावं का निघून असंच, सुजयच्या आईला काहीही न सांगता? खरं तर असं पळून गेल्यासारखं करणं तिला पसंतच नव्हतं. पण आत्ता ईलाज नव्हता. सुजयने तिला इथे बघितल्यावर ती काय सांगणार होती त्याला? तिने कितीही कथा रचून सांगितल्या असत्या तरी सुजयचं विश्वास बसला नसताच. जाऊदे, असं नुसतं विचार करण्यापेक्षा पटकन निघून जावं आणि सुजयच्या आईला नंतर फोन करून सांगावं की आपल्या भेटीबद्दल सुजयला काहीही बोलू नका, हेच ठीक आहे. अर्थात, त्यांनी सुजयला सांगणं, न सांगणं सगळं त्यांच्याच हातात होतं त्यानंतर. पण निदान हा एक उपाय होता. पटकन घरातून निघून जाण्याचा विचार करून ती घाईघाईत दरवाजापाशी गेली. तेवढ्यात बाहेर गेट उघडल्याचा आवाज आला आणि घाबरून ती तिथेच खिळून उभी राहिली.

क्रमशः

 

 

15 Comments Add yours

  1. M.g says:

    खिळवुन ठेवले अगदी.
    Ha bhag pan mastch hota….pudheche bhag lavkar yeudet….

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Dhanyavaad !! pudhchya bhagavar kaam chalu aahe….matr ankhi kahi divas 🙂

      Like

  2. Sweetali says:

    Khupach chan….ajun kiti parts aahet….excited to know the end 😛

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thanks Sweetali …ankhi kiti bhag aahet he malahee nahi sangta yenar ….thodi vat baghavi lagel end sathi 🙂

      Like

  3. Khup intersting hot challliy katha …..

    Liked by 1 person

  4. Pranjali says:

    Each n every part is so interested……eagerly waiting for next part

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thanks Pranjali 🙂

      Like

  5. Sweetali says:

    kadhi yet aahe next part? waiting for it…

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Aankhi kahi divas 🙂 kaam suru aahe ..

      Like

  6. M.g says:

    Kevva yeil next part

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      aankhi kahi divas…:) kaam suru aahe

      Like

  7. M.g says:

    Next part barach motha vattoy… khup divas zale kam suru ahe😉😛

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      diwali chi sutti hoti naa …:)

      Like

  8. ujvala says:

    khup chan lehtai suspense pan chhan aahe pan please next part lavkar taka khup usher zala

    Like

Leave a reply to happydayskavitapankaj Cancel reply