davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 30)

तो दोन पावलं मागे सरकला आणि आणखी मागे सरकणार तोच मागे त्याच्या पाठीला काहीतरी लागलं, कुणीतरी होतं तिथे. जणूकाही तो आणखी मागे जाऊ नये म्हणून तिथे त्याला अडवायला उभं असल्यासारखं…..पण काय होतं तिथे? हा विचार मनात आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सरळ, सरळ आत त्या पॅसेज मध्ये आला होता, तेव्हा पॅसेज मध्ये काहीच नव्हतं. आता तो एक एक पाऊल मागे टाकत होता, तर तेव्हाही तो रस्ता मोकळाच असायला हवा होता खरं तर….मागे काय असेल? बाहेरचा दरवाजा उघडा होता तिथून कोणी आत आलं असेल का? पणपण….आता त्याच्या लक्षात येत होतं. बाहेरच्या खोलीत दरवाजा उघडा असल्यामुळे जो उजेड येत होता, तो आता अचानक नाहीसा झाला होता. त्या उजेडाचा काही अंश का होईना पॅसेज मध्ये येत होता. निदान पॅसेज मधून पाहिल्यावर या बाजूला उजेड दिसतोय, इतकं तरी कळत होतं. पण आता तसं काहीच वाटत नव्हतं. सिद्धार्थला त्या थंड हवेतही दरदरून घाम फुटला होता. इथे आत यायलाच नको होतं….पण आता काय उपयोग होता? त्याच्या मागे कोण आहे, पाठीला कशाचा स्पर्श होतोय, त्याला कळत नव्हतं.

सगळा धीर एकवटून तो मागे वळला……

********************भाग २९ पासून पुढे ************

भाग २९ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-Lg

हॅलो…”

 

वासंती, मी बोलतेय, सुधा…”

(ईशाच्या आईने म्हणजे सायलीच्या मावशीने सायलीच्या आईला फोन केला होता.)

हा गं,बोल काय चाललंय? कशी आहेस काल सायली आल्यापासून म्हणत होते तुझ्याशी एकदा बोलेन म्हणून पण वेळच नाही मिळाला….सायलीचं लग्न व्हायला अजून वेळ आहे असं आम्ही म्हणायचो एकमेकांना आणि आता लग्न अगदी आठ दिवसांवर येऊन ठेपलंय बघ.. आणि अगदी घरचीच लोकं म्हटली तरी शेवटी ते लग्नच नाकाय आणि कुठून तयारी सुरु करू हेच कळत नाहीये मला. …बरं ते जाऊदेतकाय म्हणतेयस, तू कशी आहेस?”

 

मी ठीक आहे गं….” सायलीची मावशी

 

तुझ्याकडे दंगा चालला असेल ना मुलींचा? ए आता तुम्ही सगळेच या बरं इथेच. निशाईशाला म्हणावं बघा रजा घेण्याचं आता आणि लवकर याआणि आजकाल काय रजा नाही मिळाली तरी ते वर्क फ्रॉम होम करता येतंच. तसं तर तसंपण या लवकर, त्याशिवाय लग्नघर वाटणार आहे का आपलं?” सायलीची आई अगदी उत्साहात बोलत होती

 

अगं वासंती, तू जरा थांब नामला बोलायचंय काहीतरी….आणि सायली आणि ईशा आत्ता घरी येतील. मग त्यांच्या समोर बोलताही नाही येणार….”

 

का गं? काय झालं? सगळं ठीकच आहे ना?” सायलीची आई

 

अगं तसं सगळं ठीक आहे गं. पण ना, मला सारखं असं वाटतंय की मुली काहीतरी लपवतायत. म्हणजे काहीतरी चाललंय त्यांचं नक्कीच. मला सांग, सायलीचं इथे पुण्यात काही काम होतं का?” सायलीची मावशी

 

काम ? छे, पुण्यात काय काम असणार तिचं? पण काय झालंय नक्की ? असं का वाटतंय तुला ?” सायलीच्या आईच्या आवाजात आता काळजी डोकवायला लागली होती.

 

आज सकाळी दहाच्या सुमाराला ती बाहेर गेली होती. मला म्हणाली काहीतरी काम आहे. मग दुपारी आली. जेवली पण आजिबात कुठे लक्षच नव्हतं तिचं. निशा आज घरी होती, तिच्याशी गप्पा मारताना पण वेगळ्याच विश्वात असल्यासारखी वाटली ती मला. मी विचारलं तिला तर म्हणाली की असंच थोडं विंडोशॉपिंग केलं. संध्याकाळी ईशासोबत शॉपिंग ला जाणार आहे तर थोडं बघून ठेवलं म्हणे कुठे काय मिळतं वगैरे. असं म्हणाली. ईशाला परस्पर बाहेरच भेटली आत्ताही आणि दोघी गेल्या आहेत कुठे शॉपिंगसाठी.” सायलीची आई

 

काय? दोघीच? धन्य आहे. तरी मी म्हटलं होतं तिला, पुण्याला जाते आहेस तर खरेदीला गेलात तर मावशीला घेऊन जा आणि काय जे चांगलं वाटेल, त्या लोकांना द्यायला गं, ते घेऊन टाका. त्यांच्या आणि आपल्या जवळच्या लोकांना तर देणारच ना आपण गिफ्ट्स. मग त्यातलं कोणाला काय द्यायचं ते आपण नंतर ठरवलं असतं. आता ह्या दोघींना कळणार आहे का, को …..” पण मावशी सायलीच्या आईला मधेच तोडत म्हणाली,

 

झालं का तुझं सुरु परत? अगं मी वेगळंच सांगतेय तुला. काहीतरी शिजतंय त्या दोघींमध्ये. म्हणजे ना, आता लग्न होणार म्हणून ईशाने दोन दिवस वगैरे तिला राहायला बोलावलंय इतकं सरळ नाहीये नक्कीच. काहीतरी ठरवून सायली इथे आली आहे आणि ईशाला ते माहित आहे, नक्कीच. अगं निशाचा आजकाल संध्याकाळी ऑफिसचा कॉल असतो, त्यांचा नवीन क्लायंट यु.एसला असतो ना, तिथल्या वेळेनुसार. त्यामुळे ती तशीही शॉपिंगला येऊ शकली नसतीच. पण मी म्हटलं तिला की मी पण येते शॉपिंगला. तर इतकी वेगवेगळी कारणं दिली माहित आहे सायलीने आणि ईशाने सुद्धा फोनवरून.”

 

अच्छा….म्हणजे तुला काय म्हणायचंय ते लक्षात येतंय माझ्या. पण असं काय ठरवून सायली तिथे आली असेल हे कळत नाहीये. म्हणजे आत्तापर्यंत पुण्याला जायचं म्हणजे मावशीकडे एवढंच माहित आहे तिला. आमचे कोणी बाकी फारसे ओळखीचेही नाहीयेत पुण्यात. बरं, ऑफिसचं काम असलं असतं, तर ती ते सांगून पुण्याला गेली असती किंवा आज बाहेर जाताना तुला तसं सांगून गेली असती, नाही का? मग काय काम असेल तिचं तिथे? आता आणखी एक भुंगा डोक्याला लागणार…..” थोडं थांबून विचार करून सायलीची आई म्हणाली, ” सुधा, तिच्याशी बोलू का मी सरळ? विचारते ना तिला, पुण्याला सहज गेली आहेस की काही काम आहे म्हणून?”

 

अगं पण ती सांगेल का तुला सरळपणे? सांगायचंच असतं तर आधीच सांगून नसती का आली? किंवा आजही ही लपवाछपवी केली नसती.”

 

कदाचित असेल त्यांचं मुलीमुलींचं काहीतरी सिक्रेट. आपल्याला थोडंच सांगणार आहेत त्या……पण….तुला काय वाटतं?” सायलीची आई

 

मला पण एकदा वाटून गेलं, असेल काहीतरी त्यांचं त्यांचं. सायली आणि ईशा तुला माहित आहेत ना? रात्री तीनतीन वाजेपर्यंत काय गप्पा मारत असतात असा प्रश्न पडतो आपल्याला. आता सायलीचं लग्न होणार त्यामुळे त्या दोघींना वाटत असेल भरपूर गप्पा मारून घेऊ, भरपूर भटकू वगैरे. पण तरी मला थोडं वेगळं वाटतंय गं ह्यावेळी. म्हणजे नेहेमीसारख्या अश्या आरामात, रिलॅक्स होवून गप्पा मारताना दिसल्या नाहीत त्या काल. काहीतरी कुजबुज चालू होती पण त्या हसतखिदळत चाललेल्या गप्पा नव्हत्या नक्की. काहीतरी वेगळं आहे, एवढं मी ठामपणे तुला सांगू शकते. ”

 

मग….आता काय करायचं? तूत्या घरी आल्या की जरा लक्ष ठेवशील त्यांच्याकडे? आणि मग रात्री उशिरा मला परत कळव जरा. बघूया, नाहीतर सरळ बोलूच या दोघींशी. खरं सांगू का? सायली अशी अचानक तडकाफडकी पुण्याला निघून आली, हेच मला काल जरा विचित्र वाटलं होतं. बरं ईशाने कळवलं मला हे. सायलीने तर फोनही नाही केला. मला थोडं वेगळं वाटलं पण तिचे बाबा, माई सगळ्यांनी आपली तिचीच बाजू घेतली. मग मी पण विचार केला, की जाऊदेत….ठरलं असेल त्यांचं….पण ….”

 

वासंती, मी ठेवते जराबेल वाजतेय. बहुतेक मुली आल्या असतील….मी कळवते तुला नंतरचल ठेवते…”

————————————————-

संध्याकाळचे सात वाजून गेले असतील. सुजय बाहेरच्या खोलीत फेऱ्या मारत होता. ईशाने मधेच फोन केला त्यामुळे त्याला घरी यायला उशीर झाला होता खरा पण नंतर मात्र आईच्या हातचा चविष्ट स्वयंपाक आणि त्याच्या आवडीचे गुलाबजाम खाऊन तृप्त होऊन दुपारी गाढ झोपल्यावर मात्र त्याला अक्षरशः स्वर्गात असल्यासारखं वाटत होतं. आईच्या हातचं जेवण….त्याला कशाचीच सर नाही. आणि आता मुंबईला गेल्यापासून तर इतकं चविष्ट आणि घरचं जेवण दुर्मिळच झालं होतं. आणि आज तर आईने प्रेमाने आग्रह करून चार घास जास्तच जेवायला लावले होते त्याला. तिला जेवायला बस म्हणाला पण ती तुझं झालं की बसते असं म्हणाली. कसल्याशा विचारात असल्यासारखी वाटत होती. तो इतक्या दिवसांनी आईला भेटायला आला होता, इतक्या दिवसांनी तिला बघत होता. ती खूप बारीक झाल्यासारखी वाटत होती, दमल्यासारखी दिसत होती. आता विचार करताना त्याला जाणवत होतं. तिच्या मनात खूप काही साचलंय पण ती आपल्याशी बोलू शकत नाहीये असं वाटत होतं. क्षणभर त्याला खूप अपराधी वाटलं. खरंच गरज आहे का आपल्याला मुंबईला राहण्याची? इथे पुण्यात आपलं घर आहे, आई आहे, जॉबचं काय ? जॉब तर इथेही चांगला मिळू शकतोपण…..

 

पण मग लग्नाचं काय? असं सरळपणे लग्न होईल आपलं? ज्या मुलीशी लग्न करायचं तिला असले अनुभव येणार असतील आणि ह्या सगळ्याचा माझ्याशी संबंध आहे हे तिला कळत असेल, तर ती कशी करेल लग्न माझ्याशी?……आणि लग्नाशिवाय नाही राहायचं मला. मी काय एकटा राहू का आयुष्यभर? आणि का म्हणून? माझ्या आवडलेल्या मुलीशी लग्न करण्याचा मला हक्क आहे. सरळपणे माझं लग्न होत नसेल तर वाट वाकडी करून त्यावरून जावंच लागणार ना मलाआणि त्यासाठी घरापासून, आईपासून लांब राहिलेलंच चांगलं आहे.

 

हे खूप आधीच केलं असतं तर योगिताशी ठरलेलं लग्नही मोडलं नसतं. तरी तिलाही मी आईपासून, काकाकाकूपासून शक्य तिथल्या लांब ठेवलं होतं, न जाणो, मागच्या वर्षांपासून मी किती बदललोय, मध्य प्रदेशात गेल्यापासून असं सगळं बदललं वगैरे वगैरे गोष्टी तिच्या कानावरही पडू नयेत म्हणून. तिला ह्या सगळ्याचा मागमूसही लागायला नको होता म्हणून. पण तरीही लग्न मोडलंच तिने. नंतर स्वतःचं सगळं डोकं पणाला लावून, सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाजूंनी विचार करून, प्लॅन केला. त्या विवाह मंडळात सायलीचं स्थळ बघितल्यावरच ठरवून टाकलं होतं. हिच्याशीच लग्न करायचं, म्हणून. पण स्वतःचं नाव सांगून पुढे पाय टाकायची हिम्मत होत नव्हती. मागच्या दोन वेळच्या अनुभवांवरून हे नक्की कळलं होतं की जितकं जास्त तिच्या जवळ जाण्याचा, जितकं जास्त तिला भेटण्याचा प्रयत्न करेन तितकं तिला माझ्याबद्दल जास्त संशय येणार, विचित्र अनुभव येणार. मग ती कदाचित लग्न मोडणार किंवा हे अनुभव का येतायत ह्याचा शोध घेणार. ह्या वेळी ह्या दोन्ही रिस्कस मला घ्यायच्या नव्हत्या. जितकं जास्त तिला भेटू, तिच्याशी बोलू , तितक्या वेळा तिला ते अनुभव येणार. त्यामुळे लग्नाच्या आधी शक्य तितक्या कमी वेळा भेटलो तिला. योगिताच्या वेळी केलेली हीच चूक महागात पडली होती मला, रोजच्या रोज तिला भेटण्याची. आणि दुसरी शक्यता, तिने माझ्याबद्दल सगळं काही शोधून काढण्याची, त्यासाठी स्वतःची ओळख लपवली मी.

 

ती जी माहिती काढेल ती दुसऱ्या सुजयबद्दलच असणार. खऱ्या सुजयपर्यंत ती पोहोचणारच नाही. तिला माझ्याबद्दल कळेल ते लग्नानंतर मी तिला सांगेन तेव्हाच. इतकं सगळं जुळवून आणलंय मी. आता थोडक्यासाठी माघार नाही घ्यायची. आईची काळजी घ्यायला नंतर येईनच ना मी पुण्यात. पण आत्ता माझं लग्न सोडून माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये. बाकी काहीही नाही……

 

हेच विचार पुन्हा पुन्हा मनात घोळवत सुजय खिडकीतून बाहेर पाहत बसला होता. गेल्या एकदीड वर्षांपासून त्याचं सगळं जगच बदललं होतं, फक्त स्वतःभोवतीच फिरत होतं त्याचं जग. मी, माझं लग्न, माझं भविष्य, मला हे हवंय, मला ते हवंय, मला असंच हवंय आणि तसंच नकोय. फक्त मीचे विचार आणि मीबद्दलच्याच सगळ्या कृती. ह्या सगळ्यात हळूहळू त्याची आईही त्याच्यासाठी दुय्यम स्थानावर गेली होती. म्हणून तर त्याच्यातल्या मूळ सुजयने हे सगळं सोडून देऊन नॉर्मल आयुष्य जगूया असं सुचवल्यावरही त्याच्यातल्या हट्टी, स्वार्थी सुजयने त्याचं विचार हाणून पाडला होता.

 

बाहेर गेटच्या आवाजामुळे तो त्याच्या विचारातून बाहेर आला. काकाकाकू आत येत होते. हातात बॅग होती म्हणजे कदाचित दोन दिवस राहायलाच आले होते. बरोबर, मी येणार म्हणून आईने त्यांना कळवलं असणार आणि त्यांनाही बोलावलं असणार. पूर्वी काका म्हणजे जणू काही त्याचा मोठा भाऊच होता. अगदी जिवलग मित्रासारखे नसले तरीही त्यांच्यात काकापुतण्यापेक्षा मैत्रीचं नातंच जास्त होतं. पूर्वी सुट्टी असली की तो स्वतःच काकाकाकूंना राहायला बोलवायचा. काका आणि तो रात्री जेवण झाल्यावर फिरायला जायचे, गप्पा मारायचे. पण नंतर सुजय इतका बदलला की त्याचं काकाकाकूबरोबरचं नातंही बदललं. ते एकमेकांच्या घरी आवर्जून जाणं, गप्पा मारणं, सगळंच बंद झालं. आताशा त्याला स्वतःव्यतिरिक्त इतर कोणाचा विचार करायला तसाही वेळच नसायचा.

 

काकाकाकू दरवाजात आले तसं तो उठला. ते आलेत, इतक्या दिवसांनी भेटलेत ह्याचा त्याला आनंद झाला होता की नाही कुणास ठाऊक. कदाचित त्याला काहीच वाटत नसावं. ना आनंद, ना दुःख. पण असा निर्विकार चेहरा करून पुढे जाणं बरं दिसणार नाही ना? त्याने बळेबळेच हसू आणलं चेहऱ्यावर.

अरे काका, काकू ….किती छान सरप्राईझ दिलंत….या ना आत…”

ते आत आल्यावर न विसरता सुजयने त्यांना वाकून नमस्कारही केला.

अरे किती दिवसांनी भेटतोयस नुसता नमस्कार काय करतोयस….” काकांनी प्रेमाने त्याला मिठी मारली.

 

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुजय…” काकू.

 

अगं काकू, तिथीने वाढदिवस आहे …”

 

अरे मग काय? आमच्या वेळी तर तिथीनेच साजरा करायचो आम्ही वाढदिवस …”

 

अगंबाईआलात का तुम्ही? ” सुजयची आई तेवढ्यात बाहेर आली..” लक्ष्मी, ठेव गं बॅग तीमी आत्ता फोनच करणार होते. लेट झाला ना तुम्हाला?”

 

नाहीतर कायकाकूंना काकांवर तोंडसुख घ्यायला पुन्हा चान्स मिळाला, ” अहो वाहिनी तरी सकाळपासून मी सांगून ठेवलं होतं ह्यांना, वेळेवर जायचंय म्हणून. पण ह्यांनी बरोब्बर निघायच्या वेळेला त्या प्लम्बरला बोलवून ठेवलं..”

 

असूदेत गं, जाऊदेत. बसा तुम्ही. मी चहा टाकते…”

 

अहो बसतेय कुठे? चला आत येते मी. स्वयंपाकाचं पण करून टाकू गप्पा मारता मारता…”

आई आणि काकू बोलत बोलत आत गेल्या.

काय मग सुजयशेठ? इतक्या दिवसांनीं आठवण झाली काय घराची? अरे येत जा रे मधेमधे जमेल तसं. पुणंमुंबई काय लांब आहे का? ” काका त्यांचा मोबाईल चार्जिंगला लावता लावता म्हणाले.

 

हो काका, खरं तर यायला हवं होतं पण खूपच अडकलो होतो कामात. म्हणून तर आता आई येम्हणाली तर मग सरळ काहीही विचार न करता दोन दिवसांची सुट्टी घेऊनच आलो. असं नाही केलं तर मग काहीच जमणार नाही. आता येत जाईनच मी मधे मधे….”

 

हम्मते चांगलं केलंसआणि ह्या निमित्ताने आपलीपण भेट झाली. रात्री जाऊ जेवल्यावर चक्कर मारायला, काय ? मागे जायचो नाही का आपण …”

 

हो जाऊ ना….”

 

बरं मी घेतो जरा कपडे बदलून. तोपर्यंत ह्यांचा चहा होईलच. आलोच…”

काका आत गेले तसं सुजयही उठला. त्याने काही लोकांना सिद्धार्थवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, त्यांच्याकडून कालपासून काहीच फोन नव्हता. म्हणजे तसं सगळं शांत असणार. पण उगीच गृहीत धरायला नको. आपणच एकदा फोन करून बघूया, असा विचार करून तो बाहेर व्हरांड्यात जायला निघाला, तेवढ्यात समोरच्या सोफ्याच्या खाली पडलेल्या एका कागदाकडे त्याचं लक्ष गेलं.

 

त्याने जाऊन तो उचलला. कशाचीतरी रिसिट होती ती. त्याने नीट बघितलं, ‘माय फेअर लेडीनावाच्या एका लेडीज टेलरची रिसिट होती ती. खाली कुठल्यातरी दोनतीन ड्रेसेसचे स्टिचिंग चार्जेस लिहिलेले होते. त्याच्याखाली दोन साड्यांचे फॉलबिडिंगचे चार्जेस होते. हा आईचा कागद चुकून पडलेला दिसतोय असं म्हणून त्याने चुरगाळून तो कागद कचऱ्यात टाकून दिला. तसंही त्यावरची तारीख जवळपास दोन महिन्यापूर्वीची होती.

 

पुन्हा फोन करण्यासाठी तो बाहेर आला आणि एकदम त्याच्या डोक्यात चमकून गेलं. आईच्या टेलरच्या रिसिटवर ड्रेसचे चार्जेस कशाला असतील? ती कुठे ड्रेस घालते? आणि हा टेलर …….आई तर बाजूच्या गल्लीत राहणाऱ्या काकूंकडे ब्लाउज, साडी फॉल वगैरे कामं देते…..मग……हा बरोबर ………. काकू आली आत्ता ….तिची असेल ती रिसीट….पण तिने तर पर्स उघडलीही नाही आत्ता एक मिनिट बोलून ती आईबरोबर आतच गेली ना…. मग…. कुणाची असेल ती रिसीट? जाऊदेत काय करायचंय? असेल कुणाचीतरीघरी कोणी ना कोणी येतच असतं, पडली असेल कोणाचीतरी….

 

त्याने सगळे विचार बाजूला सारून त्याला माहिती देणाऱ्या माणसाला फोन लावला. पण तो उचललाच गेला नाही. दोनतीन वेळा फोन लावून पाहिल्यावर त्याने नाद सोडला आणि तो आत येऊन सोफ्यावर बसला. मान मागे टाकून त्याने डोळे मिटले. पुढच्याच क्षणी त्याला जाणवलं की दुपारी छान जेवून मग मस्त झोप काढल्यानंतर त्याला मघापर्यंत जसं रिलॅक्स, निवांत वाटत होतं, ते आता तसं नव्हतंच.

 

आत्ता इतक्यात त्याला अस्वस्थ वाटेल असं काय बरं घडलं होतं? पुढच्याच क्षणी त्याने डोळे उघडले. धावत आत जाऊन त्याने कचऱ्याच्या डब्यात वरच्या वर पडलेली ती रिसीट उचलली. यावेळी त्याने ती नीट बघितली. ड्रेसेसच्या स्टिचिंग चार्जेस शिवाय त्याच्यावर आणखी काहीतरी होतं. name / नाव अशा कॉलमच्या पुढे घाईघाईने काहीतरी लिहिलेलं होतं. आणि माय फेअर लेडी ह्या नावाच्या खाली बारीक अक्षरात पत्ता प्रिंट केलेला होता. ती रिसीट वाचता वाचता सुजयचं मन एका बाजूला त्याला सावध होण्याचा ईशारा देत होतं. कारण तो पत्ता इथला पुण्यातला नव्हताच, मुंबईतला होता. सायलीच्या ऑफिसच्या रोडवर कुठेतरी होतं हे टेलरचं दुकान.त्याने नाव वाचण्याचा प्रयत्न केला. त्या टेलरने तिथे नक्की काय खरडलंय हे कळत नव्हतं. खूप बारकाईने बघितल्यावर सुजयला त्या अक्षरांचा अर्थ लागला…..”देशपांडे“…

 

एक क्षणभर तो तसाच उभा राहिला. त्याचं डोकंही काही वेळानंतर विचार करायला लागलं. देशपांडे ? आणि सायलीच्या ऑफिसच्या रोडवर असलेलं टेलरचं शॉप? देशपांडे म्हणजे सायली देशपांडे असेल की आणखीनच कुणी? पणसायलीच असेल तर तिच्याकडची टेलरची रिसीट इथे कशी येईल? नाही, सायली असणं शक्य नाही. देशपांडे किती आहेत जगातनक्कीच दुसऱ्याच कोणाचीतरी रिसीट पडली आहे ही. पण मुंबईचा टेलर म्हणजे जिची रिसीट आहे ती पण मुंबईला राहणारीच असणार. मग इथे आपल्या घरात असं कोण आलं असेल जे मुंबईला राहतात आणि इथे येऊन गेले आणि इथे रिसीट पडली त्यांची? ….खूप विचार करूनही त्याला काही सुचलं नाही….असं तर कोणीही त्याच्या ओळखीचं नव्हतं. म्हणजे सायलीच ? ती येऊन गेली असेल इथे?

 

पण ती इथे कशी येईल ? तिला माझं घर म्हणून जुहूचा फ्लॅट माहित आहे. हे घर तिला कुठे माहित आहे? पण ही रिसीट ….ही काय भानगड आहे? आईला विचारायला हवं घरी कोणी येऊन गेलं होतं का ते….

 

आईला हाक मारणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. इतका वेळ तो जो नंबर डायल करत होता त्याच नंबरवरून कॉल आला होता.

हॅलो,….अरे काय ? किती वेळा कॉल करायचा तुम्हाला?”

 

सर,….जरा बाहेर होतोम्हणून उचलता नाही आला. पण मी आत्ता करणारच होतो फोन तुम्हाला. जरा बोलायचं होतं…”

 

हम्म….बोल पटकनआणि त्या सिद्धार्थची सगळी माहिती हवी होती मला, त्याचं काय झालं? माहिती म्हणजे नाव,गाव नाही….त्याच्यावर लक्ष ठेवायचंय , कुठे जातो, कोणाला भेटतो वगैरे. आहे ना लक्षात?”

 

हो तेच तर सांगायचंय तुम्हाला. परेशला, म्हणजे माझ्या ग्रुपमधला दुसरा एक, त्याला सांगितलं होतं मी. त्याचा आत्ताच फोन आला होता. तो सांगत होता की तो सिद्धार्थ काल कुठेतरी बाहेरगावी गेला.”

 

बाहेरगावी? म्हणजे नक्की कुठे?”

 

ते काय कळलं नाही त्याला. पण काल रात्री त्याच्या मागे गेला होता तो. स्टेशनवर कुठल्यातरी बाहेरगावच्या ट्रेनमध्ये बसला तो. गोरखपूरला जाणारी ट्रेन होती…”

 

गोरखपूर ? पण मग त्याच्या मागे का नाही गेला तो? आणि हे काल रात्रीचं तुम्ही आत्ता कळवताय मला? ” सुजयचा आवाज चढला.

 

पण मुंबईच्या बाहेर जावं लागेल हे कुठे सांगितलं होतं तुम्ही?”

 

अरे पण मग फोन करून विचारता येत नाही का? आणि सांगितलं का नाही मला कालच ?” त्या माणसाच्या थंडपणावर सुजय आता वैतागायला लागला.

 

मी बोललो सर परेशला. त्याने मला काल रात्री उशिरा मेसेज केला तो मी आज बघितला. सकाळी तुम्हाला फोन ट्राय केला होता तुम्हाला पण तुमचा फोन नॉट रिचेबल होता.”

 

म्हणजे कारणच मिळालं नाही का तुम्हाला सगळ्यांना ? फोन बंद होता सांगितलं की झालं. एक मेसेज करता येत नव्हता का? पुन्हा फोन करायला काय झालं होतं?” सुजय आता चांगलाच संतापला होता.

 

सर ओरडू नका एवढ्या जोरात. आमचा काय हा धंदा नाहीये. नोकरी करतो ते पैसे पुरे पडत नाहीत. बहिणीचं लग्न आहे दोन महिन्यात. म्हणून थोडे पैसे जास्त मिळवायला करतोय एवढं. तुम्ही म्हणालात त्या मुलावर लक्ष ठेव, कुठे जातो, काय करतो सगळं सांग, ते करतोय आम्ही नीट. तुम्ही कुठे सांगितलं होतं तो बाहेरगावी गेला तर त्याच्या मागे जावं लागेल म्हणून? असं एकदम आयत्या वेळेला नाही ठरवता येत सर. घरी काय सांगायचं आम्ही? हे बघा, तुम्हाला पटत नसेल तर मग दुसरं कोणीतरी बघा तुम्ही. आमचे पैसे तेवढे देऊन टाका.”

त्याचा तो सूर ऐकून सुजय थोडा वरमला. हा माणूस नाही म्हणाला तर आता कोणाला शोधणार? त्यालाही हे असं कोणालातरी पैसे देऊन दुसऱ्याची माहिती काढायला लावणं नवीनच होतं. हे काम करणाऱ्या सराईत गुंड कॅटेगरीतल्या लोकांकडे जायची त्याचीही हिम्मत नव्हतीच. त्यामुळे हा माणूस हातातून जायला नको होता.

हे बघ, मी म्हटलं नाही की तुम्ही काम चांगलं करत नाही. मागेपण सायलीबद्दल….म्हणजे, त्या मुलीबद्दलची माहिती सगळी काढून दिली तेव्हा मी म्हटलं होतं तुम्हाला तसं. पण तुझ्या मित्रांना सांगायला हवं तू. हे सगळं मला लवकरात लवकर सांगणं हा पण त्या कामाचा भाग आहे ना?”

 

ठीक आहे. कळलं. काळजी घेऊ आम्ही नेक्स्ट टाईम. आता काय करायचं सांगा. आणि सर, मी परत एकदा विचारतोय तुम्हाला. काही उलटसुलट प्रकरण नाही ना? पोलीस वगैरे मध्ये येणार नाहीत ना? असली कामं कधी केली नाहीत आपण. पैशांची जरा जास्तच चणचण आहे म्हणून करतोयपण कोणाचं वाईट होणार असेल तर मला नाही करायचं..”

 

तसं काही नाहीये. मी आधीही म्हणालो होतो ना तुला तसं. मी फोन करेन उद्या. ठेवतो.”

सिद्धार्थ गोरखपूरच्या ट्रेनमध्ये बसून कुठे गेला असेल? प्रश्नांची घंटा डोक्यात वाजायला लागली तसं सुजयने जाऊन लॅपटॉप सुरु केला. भराभर त्याने इंडियन रेल्वेज ची साईट ओपन करून त्यात रात्री सुटणाऱ्या मुंबईगोरखपूर ट्रेनचा रूट मॅप बघितला. मॅपवरचं एक स्टेशन होतं – ‘कटनी‘. ते नाव वाचून सुजयच्या छातीत धडधडलं.

 

सिद्धार्थ कुठे गेला असेल नक्की? आता त्याला काही सुचेनासं झालं. सायलीच्या ऑफिसची वेबसाईट त्याने बघितली. पण गोरखपूर किंवा त्याच्या आजूबाजूला त्यांची ब्रँच नव्हतीच. म्हणजे सिद्धार्थ कदाचित ऑफिसच्या कामाला गेलेला नसेल. मग तो का गेलाय तिथे?

 

त्याने मगाशी आलेल्या नंबरवर एक मेसेज पाठवला

 

उद्या सकाळी सिद्धार्थ त्या ट्रेनमध्ये बसून कुठे गेलाय आणि का गेलाय, म्हणजे त्याने त्याच्या घरी नक्की काय सांगितलंय हे शोधून काढायचंय. लवकरात लवकर….

 

मेसेज पाठवून झाल्यावर दोन मिनिटं तो विचार करत तसाच बसला होता. एकदा त्याला वाटूनही गेलं, आपण उगीच टेन्शन घेतोय असं. कटनीबद्दल आपल्याला माहित आहे म्हणून आपल्याला सारखं असं वाटतंय की तो तिथेच गेलाय. पण आपला एकूण प्लॅन लक्षात घेता, ह्याची शक्यता फार कमी आहे. त्याला आपला संशय जरी आला तरी त्याला हे कटनी वगैरे सगळं कळणार कसं? फार तर त्याला हे कळू शकतं की मी जी ओळख सांगितली आहे, तो सुजय मी नाही, दुसराच कोणी आहे. पण कटनीपर्यंत तो कसा पोहोचू शकेल?

 

हा विचार मनात आल्यावर त्याला जरा बरं वाटलं. आपण उगीच नको तेवढा विचार करतोय आणि तसंही उद्या पर्यंत कळेलच ना, तो कुठे गेलाय ते….विचार करतानाच त्याला आपल्या हाताच्या मुठीत काहीतरी असल्याची जाणीव झाली. मूठ उघडली. हातात मगाशी बघितलेली ती टेलरची रिसीट होती. देशपांडे नाव असलेली आणि सायलीच्या ऑफिसच्या रोडचा पत्ता असलेली. पुन्हा मनाची घालमेल सुरु झाली. कदाचित सगळं ठीकही असेल पण मग माझं मन का मला सावध राहायला सांगतंय?

 

माझ्या नकळत सायली माझ्या घरापर्यंत आणि सिद्धार्थ कटनीपर्यंत, येऊन पोहोचले तर नसतील ना ?

——————————————————————–

सायले, आता काय करायचं पुढे?”

सायली आणि ईशा, ईशाच्या खोलीत होत्या. निशाची ऑफिसची मिटिंग चालू होती, इंटरनेटवर,तिच्या खोलीत. आणि मावशी कधीच झोपायला गेली होती, म्हणजे असं सायली आणि ईशाला वाटत होतं.

तेच कळत नाहीये. त्याच्या काकाकाकूंना भेटायला हवं ईशा. त्याशिवाय दुसरा काही क्लू पण नाहीये हातात.मला राहून राहून वाटतंय ईशा, आपली थोडक्यात चुकामुक झाली त्यांच्याबरोबर. आपण ज्या रिक्षातून उतरलो, त्यातच ते बसले आणि इफ आय एम नॉट रॉंग, ते सुजयच्या घरी गेलेत.”

 

हो कळलं ग, पण आता करायचं काय पुढे?”

 

तोच विचार करतेय मी पण..”

 

सायले, सिद्धार्थला फोन करून बघूया का गं? म्हणजे बघ ना, हे जे सगळं झालंय, म्हणजे तुला योगिताबद्दल, लोणावळ्याबद्दल कळलं, मग तू तिला भेटलीस, मग आपल्याला सुजयच्या काकाकाकू आणि आईचा पत्ता मिळाला, मग आज तू जाऊन त्याच्या आईलाही भेटून आलीस वगैरे, हे सगळं त्याला माहीतच नाहीये अजून. बघूया ना, त्याला सांगून. कदाचित तो काहीतरी सुचवू शकतो. ”

 

सुचवू शकेल तो, पण ईशा, त्याला ह्यात नको ओढायला. घेतली तेवढी मदत पुरे. आपण आहोत ना? आपण घेतोय ना शोध? बाबा, माईआजी ते पण आहेत. हे बघ, त्याला आपण सांगितलं की तो ह्यात पडणारच. परवा पण मी कटनीला जातोअसं म्हणत होता. मी कसंबसं थोपवलं त्याला. माझ्यासाठी त्याने हे सगळं करावं असं नाही वाटत मला. आय नो, त्याच्या मनात माझ्याबद्दल काय फिलिंग आहेत ते. आणि मला त्याच्या फिलिंग्ज चा गैरफायदा घेतल्यासारखं करायचं नाहीये. किंवा माझ्यासाठी हे कर, ते कर असं सांगून त्याला उगीचच काही सुचवल्यासारखंही करायचं नाहीये. म्हणून म्हणते, प्लिज त्याला ह्यात नको आणूस मध्ये. ”

 

पण तो असा गैरसमज करून न घेताही तुझ्यासाठी तुझ्याबाजूने, म्हणजे आपल्याबाजूने ह्यात उतरणार असेल तर? अगं तो मित्रपण आहे ना तुझामग त्या नात्याने तुला मदत करू शकतोच ना तो? मी सांगतेय तुला ….त्याचे विचार चांगलेच असणार. तुझेच विचार गढूळ झालेत …”

ईशा दात काढत म्हणाली तसं सायलीने तिला एक जोरात धपाटा घातला.

आगाऊ कुठली….माझी बहीण नाहीयेस तू….त्याची चमची आहेसजाऊदेत चल मी झोपतेय ..उद्या ठरवू काय करायचं ते..”

————————————————————

हॅलो सुधा, बोल….”

 

वासंती, मी मगाशी बोलले तसंच काहीतरी असावं असं वाटतंय. अगं मी आत्ता ईशाच्या रूमच्या बाहेर उभी होते. त्यांचं बोलणं मध्ये मध्ये कानावर पडत होतं. नक्की काय ते मला कळलं नाही नीट, पण काहीतरी शोध घ्यायचा, सायली कोणालातरी जाऊन भेटून आली, असं काहीतरी. अगं हसतखिदळत नव्हत्या त्या, काहीतरी सिरीयस विषयावर चाललं होतं बोलणं….”

 

अगं बाई….काय असेल गंकळायला हवं ना? ” सायलीची आई

 

हो कळायला तर हवंच. काय करायचं?” मावशी

 

डायरेक्ट बोलूया का त्यांच्याशी ?” आई

 

तुला वाटतंय का त्या सांगतील? नाहीतर माझ्या डोक्यात काहीतरी आलंय आत्ता …” मावशी

 

मला वाटत नाहीच आहे, मुली सांगतील असं. नक्की काय चाललंय ते कळायला हवं गं. नेहेमीसारखं वाटत नाहीये म्हणून जरा काळजी वाटते गं. पण तू काय म्हणतेयस, काय सुचलं तुला?” आई

 

हे बघ, सायलीचं लग्न ठरलंय आता. आता सगळ्या गोष्टी ती ईशाबरोबर शेअर करते तशी सुजयबरोबर पण करणार नाही का? मग सुजयला फोन करून विचार ना. विचारूया त्याला, सायली पुण्याला का आली आहे नक्की? त्याला नक्की माहित असेल बघ. आणि सायलीची आई विचारतेय म्हटल्यावर तो फार आढेवेढे नाही घेणार…” मावशी

 

हो ….हे बरोबर आहे. मी त्याला फोन करून बघते सकाळी. तसंही लग्नाची त्याच्या कपड्यांची खरेदी कुठे आणि कधी करायची ते विचारायचंच आहे मलाबोलताबोलता हे पण विचारून घेईन …”

 

ठीक आहे. त्याच्याशी बोलून झालं की मग मला पण कळव. ”

 

हो कळवेनच गं. आणि ठरवा तुम्ही सगळे लवकर इथे यायचं. बरीच तयारी आहे करायची. चल बोलू उद्या..”

————————————————-

पाच मिनिटांनी सायलीला झोप लागल्याचं पाहून ईशाने स्वतःचा मोबाईल उचलला.

तू किती नाही म्हणालीस तरी मी फोन करणारच आहे सिद्धार्थला

सायलीकडे बघत तिने सिद्धार्थला फोन लावला.

 

पहिल्या रिंगला फोन उचललाच गेला नाही. तिने घड्याळात पाहिलं. सव्वा अकरा वाजून गेले होते. मागेसुद्धा एवढ्या उशिरा ती बोलली होती सिद्धार्थशी. पण काय माहित? कदाचित आज झोपलाही असेल. ती तिच्याच विचारात असताना तिच्या मोबाईलची रिंग वाजली. सिद्धार्थचा फोन.

हॅलोहाय सिद्धार्थ….”

पण समोरून काहीच प्रत्युत्तर नव्हतं. आणि….मग….पुढच्याच क्षणी ……

 

……..ईशाच्या काळजाचा ठोकाच चुकला. आपले हात थरथरतायत हे तिला जाणवत होतं. पण एक प्रकारचा बधिरपणा आल्यासारखा वाटत होता. फोनवरचा तो आवाज…….सिद्धार्थचा नव्हता. खरं तर कशाचाच नव्हता. पण तरी मागे तिने ऐकला होता हा आवाज. वाहणाऱ्या वाऱ्याचा, पानं सळसळल्यासारखा, मधेच कोणीतरी हुंकारल्यासारखा. एक मिनिटभर ती फोन धरून तशीच उभी होती. कानावर पडत असलेला तो आवाज असह्य होत होता पण तो कॉल बंद करण्याचंही तिला भान नव्हतं.

 

अचानक तिला जाग आल्यासारखी वाटली. तिने कानाला लावलेला फोन कधीच बंद झाला होता. ती थरथरतच खाली बसली. हे काय होतं? हाआवाज…. वाऱ्याचा आवाज….हा आधी ऐकलेला होता तिने. पण आत्ता सिद्धार्थच्या फोनवरून हा आवाज ? सिद्धार्थच मस्करी करत नसेल ना? हो असूही शकतं. त्याला माहित होतं आपल्याला असे आवाज आधी ऐकू आलेत ते. त्यानेच मस्करी केली असेल. त्याला फोन करून चांगलंच झापायला हवं. ही असली मस्करी?

 

संतापून तिने पुन्हा त्याला फोन लावला. पण फोन उचललाच गेला नाही

———————————————–

दुरून कुठूनतरी फोनची रिंग वाजत असल्यासारखा आवाज येत होता. हळूहळू सिद्धार्थ भानावर आला. ही त्याच्याच फोनची रिंग वाजत होती, त्याच्या आत्ता लक्षात आलं. पण कॉल रिसिव्ह करणार तेवढ्यात रिंग वाजून फोन बंद झाला. फोन बंद झाल्यावर आजूबाजूला अंधार झाला, तसा तो पूर्णपणे भानावर आला. आपण नक्की कुठे आहोत, काय करतोय हे तर त्याला आठवत नव्हतंच पण त्याला वेळेचाही अंदाज येत नव्हता. त्याने मोबाईल पुन्हा ऑन केला. रात्रीचे साडेअकरा होत आले होते. त्याने त्या उजेडात आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न केला. समोर एक खिडकी दिसत होती आणि त्यातून बाहेर चंद्र.

 

हळूहळू सिद्धार्थला सगळं आठवलं. ‘प्रजापती निवास‘, तिथे आतल्या खोलीतून आलेले आवाज, तो हलकासा हसण्याचा आवाज, ते आतल्या खोलीचं उघडलेलं दार, पॅसेजमध्ये उभं असताना मागे कुणीतरी असल्याचा भासआणि त्यानंतरचंथोडंसंच….

 

——-मागे काय आहे, कोण आहे ते पाहायला तो मागे वळला. आणि त्याचक्षणी अंधारातून एक काळी सावली, सळसळत त्याच्याबाजूने गेली. ती काळी सावली कुठल्या माणसाची नव्हती, अंधाराचाच भाग होती. तिला चेहरा नव्हता, नसावा. ती बाजूने गेल्यावर तसलाच थंड हवेचा झोत अंगावर आल्यासारखं सिद्धार्थला वाटलं. हवा दिसत नाही पण ती जोरात वाहायला लागली की तिचं अस्तित्व जाणवतं, तसंच काहीसं होतं ह्या सावलीबाबत. अंधारात एखादा पडदा फडफडायला लागतो, तसं काहीतरी दिसलं सिद्दार्थला. पण त्या फडफडणाऱ्या,वाहणाऱ्या गोष्टीला काहीतरी अर्थ होता, तिला अस्तित्व होतं, रोखलेली नजर होती हे लक्षात येत होतं. ती काळी सावली सळसळत समोरच्या उघडलेल्या दाराआड गेली. पुन्हा तसलाच कोणाच्यातरी हलकंच हसण्याचा आवाज आला. दारामागून कुणाच्यातरी कुजबुजण्याचाही आवाज यायला लागला.

 

पुढे जायचं नाहीत्याच्याच आतून त्याला कोणीतरी सांगत होतं, पण तरीही त्या दारामागे गेलेली ती सावली नक्की कोणाची आहे, आत कोण कुजबुजतंय आणि हसतंय, हे त्याला बघावंसं वाटत होतं. ‘ आत जाऊ नकोसपुन्हा आपला आतला आवाज त्याला ऐकू आला, तरीही तो एक एक पाऊल टाकत आत आला, कुणीतरी बोलवून घेतल्यासारखा, कशाच्यातरी ओढीने….

 

आत येऊन दारामागच्या कोपऱ्यात त्याने नजर टाकली. कोपऱ्यात अंधारात कुणीतरी उभं होतं, त्याच्याकडे बघत. मधेच कसलीतरी कुजबुज ऐकू येत होतीकोण आहे काही कळत नव्हतं. एक आकृती होती, पण तिला नीटसा आकार नव्हता, म्हणजे नसावा. ….

 

आणि मग अचानक कुठूनतरी एक जीवघेणी किंचाळी ऐकू आली….त्यामागोमाग काहीतरी जोरात फुटल्यासारखा आवाजमग हळूहळू सगळेच आवाज लांबून आल्यासारखे वाटायला लागले. आणखी कसलेतरी, भसाड्या आवाजातले शब्द ऐकू येत होते पण ते सुद्धा हळूहळू दूर गेल्यासारखे वाटायला लागले——-

 

सगळं आठवल्यावर सिद्धार्थच्या अंगावर शहारा आला. हे सगळं काहीतरी विचित्र होतं. नॉर्मल नव्हतं. तो इथे आला तेव्हा दुपारचे साधारण बारा वाजले असतीलआणि आत्ता रात्रीचे साडेअकरा झाले होते. इतका वेळ तो त्या घरात, त्याच आतल्या खोलीत काय करत होता नक्की.? आता सगळं आठवल्यावर त्याला जाणवलं, इथे थांबणं रिस्की आहे. परत जायला हवं, परत जायला हवंस्वतःशीच बडबडत तो घाईघाईने धडपडत उठला. मोबाईलमधला टॉर्च ऑन केल्यावर त्याच्या आजूबाजूचं थोडंसं त्याला दिसायला लागलं पण प्रकाशाच्या वलयाच्या बाहेरचा अंधार जीवघेणा होता. आता कधी एकदा त्या घरातून बाहेर पडतो असं त्याला झालं. ..

 

त्या पॅसेजमधून बाहेर पडताना मागून कोणी आपल्यावर हल्ला तर करणार नाही, किंवा अचानक खांद्यावर हात तर ठेवणार नाही ना….असले विचार त्याच्या मनात येत होते. पॅसेजमध्ये उजेडाचा एक झरोका येत होता त्यावरून त्याने ओळखलं, बाहेरची खोली ह्याच दिशेला होती. बाहेरच्या खोलीत आल्यावर समोर घराचं मुख्य दार उघडं होतं, त्याने आत येताना ठेवलं होतं तसंच. ते पाहून त्याच्या जीवात जीव आला.

 

घाईघाईत दरवाज्याच्या दिशेने जाताना त्याच्या पायाखाली काहीतरी वस्तू आली. काय आहे ते पाहण्यासाठी त्याने पाय बाजूला केला. मगाशी त्याने कोपऱ्यातल्या टेबलवर एक फोटोफ्रेम पहिली होती. ती खाली पडून फुटली होती आणि त्यातून दोन फोटो बाहेर आले होते. खरं तर ती फ्रेम एका फोटोचीच होती पण कदाचित एकामागे एक असे दोन फोटो त्यात ठेवले असावेत. अंधारात ते फोटो काही नीट दिसत नव्हते. म्हणून तो ते फोटोज घेऊन बाहेर आला.

 

त्यातला एक फोटो एका म्हाताऱ्या माणसाचा होता. आणि दुसरा

 

क्रमशः

13 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 30)

 1. sarika devrukhkar
  December 3, 2016

  Khup Maja yetey vachayla please pudhcha bhag prakashit karana lavkar

  Liked by 1 person

 2. sarika devrukhkar
  December 3, 2016

  Ata full story prakashit kara na please please please

  Like

 3. Vaishali Agre
  December 3, 2016

  please puhdache bhag lavkar taka…mala phar intersting vatey…..mi roz tumchya blog ver yet aahe

  Like

 4. M.g
  December 3, 2016

  Pudhcha bhag lihayla survat kara attach mahnje lavjar amhala vachayla milel

  Liked by 1 person

 5. sarika devrukhkar
  December 5, 2016

  ajun kiti part baki ahet madam ekdum sagale taklat ter lay maja yeil bagha

  Like

 6. Renu gupta
  December 19, 2016

  Hi Rutusara mam aap ki story bahut hi achhi hai isse padhne par hum kho hi jate hai isme aisa lagta hai jaise such me hum vo dekh rahe hai. please aap se request hai iss ke aage ke parts aap jald hi post kare.thank you for lovely story.

  Liked by 1 person

  • rutusara
   December 25, 2016

   hello.. thanks for your feedback…happy to know that you are liking my story. it feels great especially because this feedback comes from a non-marathi reader of mine. I will post the next part soon. Thanks.

   Like

 7. renu gupta
  December 20, 2016

  rutu ji jald post kijie na agala post use ke bina nind nahi aati aage kya saspense hoga.

  Like

 8. M.g
  December 21, 2016

  Plz next part taka

  Like

 9. ujvala
  December 23, 2016

  AJUN KITE USHER LAGAEL NEXT PART LA IM WAITING EVERYDAY PLEASE LAVKAR TAKA ITKA USHER KA HOTOI. TUME THIK AAHAT NA

  Liked by 1 person

  • rutusara
   December 25, 2016

   hello, thanks for your concern. I am fine but was just little busy. I am posting the next part today. Thanks.

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on December 2, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: