davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 31)

घाईघाईत दरवाज्याच्या दिशेने जाताना त्याच्या पायाखाली काहीतरी वस्तू आली. काय आहे ते पाहण्यासाठी त्याने पाय बाजूला केला. मगाशी त्याने कोपऱ्यातल्या टेबलवर एक फोटोफ्रेम पहिली होती. ती खाली पडून फुटली होती आणि त्यातून दोन फोटो बाहेर आले होते. खरं तर ती फ्रेम एका फोटोचीच होती पण कदाचित एकामागे एक असे दोन फोटो त्यात ठेवले असावेत. अंधारात ते फोटो काही नीट दिसत नव्हते. म्हणून तो ते फोटोज घेऊन बाहेर आला.

 

त्यातला एक फोटो एका म्हाताऱ्या माणसाचा होता. आणि दुसरा

****************भाग ३० पासून पुढे ***********

 

सिद्धार्थ आता फोन उचलत नाही म्हटल्यावर ईशाचा पारा आणखीनच चढला. तिने सायलीला हाक मारली.

सायले, ए सायली…….उठ जरा…..”

 

काय गंझोपूया ना आता. दिवसभर फिरून फिरून दमलेय मी. उद्या बोलू ..” सायली दुसऱ्या कुशीवर वळत म्हणाली.

 

नाही. उठ. मला आत्ताच बोलायचंय. मी सिद्धार्थला फोन केला होता आत्ता. ”

 

काय?” सायली ताडकन उठूनच बसली. “ईशी मी सांगितलं होतं तुला बजावून. त्याला ह्यात नाही ओढायचं म्हणून..तू….तू कशाला केलास फोन त्याला?”

 

तू ऐकणार आहेस का पुढे मी काय सांगतेय ते. मी त्याला फोन केला. फोन उचलला गेला नाही. पण दुसऱ्या मिनिटाला त्याचाच फोन आला. पण तो बोलतच नव्हता. अगं, तुला आठवतं का मागे मी तुला फोन केला होता आणि तुझ्या फोनवरून मला तीचा तो भसाडा आणि घाणेरडा आवाज ऐकू आला होता. एक किंकाळी ऐकू आली होती. ”

 

हो….हो आठवतंय मला. परत परत आठवण पण नको वाटतेय त्याची. अपसेट व्हायला होतं. त्याचं काय ईशी? ” सायली पुन्हा एकदा झोपण्याच्या तयारीत म्हणाली.

 

अगं तेच परत झालं म्हणून तर सांगतेय तुला. सिद्धार्थच्या फोनवरून मला तसलेच आवाज आले.”

 

काय? तुला त्या दिवशी ऐकू आलेला आवाज ऐकू आला? आर यु शुअर?”

 

“हो ग बाई . मला एकदम फ्रिझच व्हायला झालं गं. काही सुचतच नव्हतं. नंतर कळलं मला. सायले, सिद्धार्थ दिसतो तेवढा साधा नाहीये हा. बघ ना, हे सगळं फक्त त्यालाच माहित होतं, आणि म्हणूनच त्याने असली मस्करी केली. मला इतका राग आला ना त्याचा, मी त्याला परत फोन केला होता, चांगलं सुनावणार होते. पण घेतला नाही त्याने फोन. नंतर हिम्मत झाली नसणार त्याची.”

 

पण ईशा, मग तसं असेल तर काहीतरी गडबड आहे गं नक्कीच. मी ओळखते सिद्धार्थला. तो असली मस्करी नाही करणार…”

 

कशावरून ? पहिल्यांदा हे सगळं कळल्यावर तो किती हसला होता आठवतंय ना? कदाचित अजून त्याने हे सगळं सिरियसली घेतलं नसेल…” ईशा तिचा मुद्दा सोडायला तयार नव्हती.

 

अगं मी सांगतेय ना, आणि त्याने नंतर मला सॉरी पण म्हटलं होतं. आणि आपल्यावर विश्वास ठेवणार असंही म्हणाला होता. ओकेआपण दोन्ही शक्यता बघूया. म्हणजे त्याने मस्करी केली असेल तर त्याला तू ऐकवच. मी पण सुनावेन तुझ्याबरोबर. पण जर त्याने मस्करी केली नसेल तर……?”

 

तर….त्याने मस्करी केली नसेल तर ….मग….तो आवाज….” ईशा

 

ही दुसरी पॉसिबिलीटी जर खरी असेल तर मग काहीतरी गडबड आहे ईशा….मग तो आवाज तीचा असणार. पण मग सिद्धार्थच्या फोनवरून कसा?”

 

आय थिंक आपण पुन्हा फोन लावूया….एक मिनिट…” ईशाने तिचा मोबाईल हातात घेतला.

 

हम्म…..”

—————————————-

सिद्धार्थ फोनवर आईशी बोलत होता. त्याच्या फोनवर आईचे बरेच मिस्ड कॉल्स होते. आणखीही काही कॉल्स, मेसेजेस येऊन गेले होते. आपल्याला त्या आवाजामुळे जाग कशी आली नाही ह्याचं त्याला नवल वाटत होतं.

 

बाहेर आल्यावर फोन चेक केल्यावर आधी त्याने आईला फोन लावला. अजून तो त्या घराबाहेरच उभा होता. आता कुठे जायचं आणि काय करायचं ह्याचा विचार करण्याआधी आईशी बोलणं आणि तिची काळजी दूर करणं जास्त महत्वाचं होतं. बोलताबोलता मागे वळून त्याने त्या घराकडे नजर टाकली. काही मिनिटांपूर्वी आपण त्या घरात होतो आणि आयुष्यात कधीच खरं वाटणार नाही अशा अनुभवातून गेलो ह्यावर आता त्याचा विश्वास बसत नव्हता.

 

आईशी बोलत असताना ईशाचा फोन येत असल्याचं त्याला दिसलं. आधीही ईशाचा फोन येऊन गेला होता. खरं तर तिचा फोन आला आणि त्याला त्या घरात जाग आली होती. आणि आता पुन्हा तिचा फोन. इतक्या रात्री. तिला काही महत्वाचं बोलायचं नसेल ना? सायलीबद्दल तर नसेल ना? शेवटच्या एका विचाराने त्याची काळजी शंभरपट वाढली. तसंही त्याला त्या दोघींशी बोलायचंच होतं. सायलीने एवढं बजावूनही तो कटनीला आला होता. त्यामुळे ती आधी त्याच्यावर वैतागणार हे त्याला माहित होतं. पण ईशाशी बोलायला काहीच हरकत नव्हती. अर्थात सायली आणि ईशा एकत्रच आहेत हे त्याला अजून माहीतच नव्हतं.

 

एकदा किती वाजलेत ते पाहून त्याने ईशाला फोन लावला…..

———————————————————————

सिद्धार्थचा फोन बिझी लागतोय म्हणून ईशा पुन्हा चिडचिड करायला सुरु करण्याच्या बेतात होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. सिद्धार्थचा फोन.

ईशा, आधी दहा प्रश्न विचारू नकोस त्याला. मगाशी जो आवाज ऐकला, ती मस्करी नसेलही कदाचित. आधी त्याला विचार सगळं. कळलं का?” सायलीच्या सूचना संपत नव्हत्या.

 

घेमग तूच बोलतेयस का? एवढ्या सूचना करण्यापेक्षा तूच बोल ना….” ईशा वैतागली तसं सायलीने हातानेच तिला शांत राहण्याची आणि फोन घेण्याची खूण केली.

 

हॅलो…” ईशाचा फोनवरचा सूर नाराजीचाच होता.

 

ईशा, सिद्धार्थ बोलतोय…”

 

हो कळलं ते. बोल…”

 

अगं तुझा दोन वेळा फोन येऊन गेला, मला वाटलं काहीतरी अर्जंट असावं म्हणून इतक्या उशिरा फोन केला. तू सहज फोन करत होतीस ना…”

 

मी काय मॅड आहे एवढ्या रात्री सहज फोन करायला? काहीतरी काम असणार म्हणूनच फोन करत होते नापण तुला त्यातला सिरीयसनेस कळेल अशी अपेक्षाही नाही म्हणा….”

 

म्हणजे? काय झालं?” सिद्धार्थ बुचकळ्यात पडला होता.

 

तुला माहित नाही का? कशाला नाटक करतोयस?”

 

ईशा….” मागून सायली तिला गप्प बसायला सांगत होती..

 

कोण आहे तुझ्याबरोबर ? सायली आहे का ? मला आवाज आला तिचा…..” सिद्धार्थ

 

आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे…” आता सायलीने ईशाच्या हातातून मोबाईल खेचून घेतला..

 

काय बोलतेयस तू ? मला खरंच कळत नाहीये. हे बघ, काही महत्वाचं नसेल तर जाऊदे ना ते सगळं. मला खूप महत्वाचं सांगायचंय…”

 

सिद्धार्थ, मी बोलतेय, सायलीकाय झालं? काय सांगायचंय? पण थांब एक मिनिट, आधी तू मला सांग, की तू ह्या आधी ईशाला कॉलबॅक केला होतास?”

 

ह्या आधी ? नाही, मी आत्ताच कॉल केला तिला….काय झालंय पण ? माझ्या फोनवरून चुकून कॉल वगैरे लागला होता का ?”

 

नाही…..” एकदा मागे वळून ईशाकडे पाहत सायली म्हणाली, “जाऊदे फारसं महत्वाचं नाहीये ते. तुला काय सांगायचंय म्हणत होतास?”

 

मी आत्ता कटनीला आहे..”

कटनीचं नाव ऐकून एक क्षण सायलीच्या अंगावर काटाच उभा राहिला

काय? तू……मी सांगितलं होतं तुला कटनीला जाऊ नकोसतू मला विचारलं पण नाहीस?”

 

होम्हणजे सॉरी सायली. तुला सांगायला हवं होतं. पण तुला सांगितलं असतं तर तू परत जाऊ नकोसअसंच सांगितलं असतंस ना?”

 

हो कारण तू माझ्यासाठी कुठलीतरी रिस्क घ्यावीस, घरी खोटं बोलावंस असं मला नाही वाटत…” सायलीने पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

 

पण माझं मला वाटलं म्हणून मी येऊच शकतो ना? प्लिज सायली, हे सगळं नंतर बोलूया का आपण? हवं तेवढं भांडूया आपण नंतर ह्यावरून. मी आत्ता काय सांगतोय ते ऐकशील का जरा?”

 

ठीक आहे. सांग. काय झालं?”

पुढची दहा मिनिटं ती आणि सिद्धार्थ झालेल्या गोष्टीवर चर्चा करत होते. सायलीचे आश्चर्याचे, भीतीचे सूर ऐकून ईशाला थोडाफार अर्थबोध होत होता, पण आता कधी एकदा आपल्याला सगळं कळतंय असं तिला झालं होतं….

तेवढ्यात सायलीने सिद्धार्थला बाय करून फोन ठेवला..

झाली का चर्चा तुमची ? फोन स्पीकरवर ठेवायला काय झालं होतं? मला पण कळलं असतं ना…”

 

आपल्याला फार राग आला होता ना मॅडम….किती पटकन चिडतेस गं ईशा….बरं आता ऐकणार आहेस का ?”

 

सांग…” ईशा पटकन सायलीच्या पुढे बसत म्हणाली.

 

शॉर्ट मध्ये सांगते. सिद्धार्थ कटनीला गेला आज सकाळी. त्या फोटोतल्या विष्णूवराह मंदिरात गेला, पण तिथे काही माहिती मिळाली नाही. मग तिथे समोरच काही घरं होती, तिथे चौकशी करायला गेला. तिथे प्रजापती निवासअसं नाव असलेलं एक घर होतं, त्या घरात कोणीही नव्हतं. पण तरी दुपारपासून आत्तापर्यंत तो त्या घरात होता आणि त्याला तो इतका वेळ काय करत होता हे आठवत नाहीये….”

 

काय?”

 

हो, आणि त्याला त्या घरात खूप विचित्र आणि भयानक अनुभव आले असं म्हणाला तो. तुम्हाला जे अनुभव आले तसलेच, असं म्हणाला. ती विचित्र थंड हवा, कोणीतरी रोखून बघत असल्याची जाणीव, कोणीतरी बोलावतंय असं वाटणं वगैरे. ईशा म्हणूनच तुला फोनवर ते विचित्र आवाज आले….”

 

हो बरोबरपण म्हणजे आणखी काही कळलं का त्याला? काही क्लू…..”

 

हो खरं महत्वाचं तर पुढेच आहे….त्याला तिथे एका फोटोफ्रेम मध्ये एकामागोमाग एक असे ठेवलेले दोन फोटो मिळाले. पुढचा फोटो एका म्हाताऱ्या माणसाचा होता आणि त्याच्यामागचा …….सुजयचा.”

————————————–

सुजय, अरे जागा आहेस अजून? कसला एवढा विचार करतोयस मघापासून …..नीट जेवलाही नाहीयेसदुपारी इतका खुश होतास आणि मग एकदम काय झालं? ”

 

अगं कुठे काय आई ? तुला उगीचच असं वाटत असतं. मी जरा नुसता बसून राहिलो की विचार करत बसलोय वगैरे…”

 

हो का ? मलाच नाही वाटत फक्त असं. मगाशी काकूसुद्धा म्हणत होती. आणि काय रे, काका एवढे म्हणत होते तर जरा जायचंस ना एक चक्कर मारायला. किती दिवसांनी भेटलात तुम्ही. त्यांचा फार जीव आहे रे तुझ्यावर….”

 

खूप कंटाळा आला होता आई बाहेर पडायला….बरं आई, तुझ्याशी जरा बोलायचं होतं…”एकदा आत नजर टाकून तो म्हणाला, ” काकाकाकू झोपले का?”

 

हो आत्ताच गेलेत झोपायलाकाय बोलायचंय ?”

 

मी मगाशी इथे फिरत होतो ना, तर मला एक टेलरची रिसीट मिळालीथांब दाखवतोत्याने खिशातून ती रिसीट काढून आईच्या पुढे धरली…”ही बघ. कोणाची आहे ही? ”

 

बघूआईने ती रिसीट हातात घेतली.

 

मुंबईचा टेलर आहे आणि आपल्या घरात रिसीट कशी आली? आय मिन कोणी आलं होतं का बाहेरचं?”

त्याचा प्रश्न ऐकल्यावर आईच्या डोळ्यासमोर दुपारी आलेली श्वेता उभी राहिली. बहुतेक तिच्याच पर्समधून पडली होती ही रिसीट. पण ती तर लोणावळ्याची. अर्थात म्हणून काही मुंबईच्या टेलरची रिसीट तिच्या पर्समध्ये नसायला हवी असं काही नाही म्हणा. कोणी मैत्रीण असेल तिची मुंबईलापण आता सुजयला काय सांगायचं? त्याला पुन्हा एकदा योगिताच्या विचारात गुरफ़टलेलं बघायचं नव्हतं त्यांना..

आईअगं त्या रिसीटकडे काय बघतेयस एवढं?”

 

अरे नाही, हे देशपांडे म्हणून कोणी ओळखीचं आहे का ते आठवत होते….अरे पण मग काकूला विचारलंस कातिच्या पर्समधून पडलं असेल….” त्याला पटेल असं काय कारण सांगावं ह्याचा त्या अजून विचार करत होत्या..

 

नाही, काकू यायच्या आधीपासून पडली होती ती रिसीट. आणि काकूने तर आल्यावर तिची पर्स उघडली पण नाही. तुझ्याबरोबर आतच नाही का गेली ती लगेच….”

 

अरे हा बरोबर….एक मुलगी आली होती दारावर काही विकायला. तिला थोडं आत बसवून जरा खायला दिलं मी. तिच्या पर्समधून पडली असणार नक्कीच…”

 

काय ? दारावर काहीतरी विकायला आलेल्या मुलीला तू आत बोलावलंस…..?”

 

अरे चांगली होती मुलगी. शिकताशिकता असलं सेल्सगर्ल चं काम करून पैसे मिळवते थोडे फार. आणि आज गुलाबजाम केले होते ना, मग मला राहवलं नाही, तिला आत बोलवून बसायला सांगितलं, पाणी दिलं आणि गुलाबजाम पण दिले खायला…..तर तिच्या पर्समधून पडली असेल. असेल तिची नाहीतर तिच्या कोणी मैत्रिणीची वगैरेआणखी कोणीच आलं नव्हतं. …झालं का आता समाधान? ह्याचा विचार करत होतास एवढा वेळ ?”

 

छे, ह्याचा कशाला विचार करेन मी ….सहज मिळालं म्हणून म्हटलं विचारावं…”

 

बरं पण झोप आता. काकू म्हणत होती की उद्या सगळेजण पुण्यात कुठेतरी फिरायला जाऊया. कुठे जायचं ते सकाळी ठरवू. चल झोपते मी पणआणि बाहेरच्या खोलीतले दिवे बंद कर रे नंतर…..”

आई आत गेली तरी सुजय तिथेच बसून राहिला. आईच्या बोलण्यावर विचार करत राहिला. म्हणजे त्यात विचार करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणा. घरी काही चांगलं, गोडधोड केलं आणि दरवाजावर कोणी आलेलं त्याची चव घेतल्याशिवाय गेलं असं फार कमी वेळा व्हायचं. आजूबाजूच्या मुलांनाही आई स्वतः हाका मारून बोलवून घ्यायची खाऊ देण्यासाठी कधी कधी. त्यामुळे दारावर काहीतरी विकायला आलेल्या मुलीला तिने आत बोलवून काही खायला दिलं ह्यात त्याच्या दृष्टीने नवीन काहीच नव्हतं. पण तरी आईच्या सांगण्यातली एक गोष्ट त्याला खटकली होतीच. म्हणजे आई खोटं बोलतेय असा संशय त्याला अजिबात आला नाही, पण तरी कुठेतरी काहीतरी चुकतंय असं त्याला राहून राहून वाटत होतं. ती रिसीट त्याने पुन्हा निरखून बघितली. आणि तो आत जाण्यासाठी उठला. हॉलमधले लाईट्स बंद करून आतल्या आपल्या खोलीत जाताना तो थांबला. खिशातून ती रिसीट काढून समोर कचऱ्याच्या डब्यात टाकून देण्यासाठी. पण मग पुन्हा तो थांबला. बाहेर काढलेली रिसीट काहीसा विचार करून त्याने पुन्हा खिशात टाकली. आणि तो आत झोपायला गेला.

——————————————-

सायली वर छताकडे बघत जागीच होती. मधेच तिने मोबाईल चेक करून वेळ पहिली. पावणेचार होत आले होते. बाजूला ईशाही चुळबुळ करत होती. सायलीकडे वळून बघितलं तर ती सुद्धा जागीच होती.

सायले, जागीच आहेस तू पण?”

 

शक्यच नाही झोप लागणं ईशा, हे कोडं सुटल्याशिवाय झोप लागणंच शक्य नाही…” सायली

 

हो गं, मला पण झोप नाही येत आहेडोक्याला भुंगा लागलाय नुसताकाय करायचं पुढे, काहीच कळत नाहीये..” ईशा

 

हम्म….आपण ना चक्रव्यूहात सापडल्यासारखं वाटतंय ईशा….हे कोडं जितकं सुटतंय तितकंच पुढे आणखी वाढत जातंययोगिताला भेटले तेव्हा वाटलं, आता सगळं समजेलपण तिथेही पुढे फाटे फुटतच गेलेत्याच्या आईला भेटले तेव्हा वाटलं आता कळेल सगळं, पण तिथेपण काहीच हाताला लागलं नाही….आता सिद्धार्थकडून हे कळलंय, पण तिथेही फुलस्टॉप नाहीच आहेआता एक नवीन कोडंसुजयचा फोटो तिथे कसा? ते घर कुणाचं असेल? दुसऱ्या फोटोतला तो म्हातारा माणूस कोण असेल? त्या घरात काय आहे असं, ज्यामुळे सिद्धार्थला तिथे विचित्र अनुभव आले? ”

 

हो गं, मलापण असंच वाटतंयभिरभिरल्यासारखं झालंय..आपण सगळ्या लिंक्स बरोबर जुळवल्यात ना सायले? ” ईशा

 

आत्तापर्यंत तरी असंच वाटत होतं. पण आताआय एम नॉट शुअर…..पहिल्यापासून एक एक सगळं आठवून बघूया? कदाचित मागे काही गोष्टी हाताला लागल्या असतील पण त्यांचा संदर्भ तेव्हा लागला नसेल…”

 

हम्मचालेल …” ईशा

 

थांबबोलू नकोस ईशी. मनातल्या मनात आठवून बघूअशा कुठल्या गोष्टी आहेत का, ज्यावरून आपण पुढे शोध घेऊ शकतो किंवा आपण चुकून सोडून दिल्या असतील, त्याचा विचार करूया….”

 

ओके….”

ईशा विचार करता करता फेऱ्या मारायला लागली आणि सायली बेडवर पाय सोडून मागे भिंतीला डोकं टेकवून डोळे मिटून बसली आणि तिने आतापर्यंतचं सगळं आठवायला सुरुवात केली

सायले…” पाच मिनिटांनी ईशाच्या हाकेमुळे ती तिच्या विचारातून बाहेर आली. “अगं सुजयच्या मावशीचे मिस्टर. त्यांचं काय झालं पुढे? त्यांचा मी त्यादिवशी पाठलाग केला आणि ते स्टेशनवरून बस डेपो मध्ये गेले आणि मिरजला जाणाऱ्या बसमध्ये बसले. त्यांना कोणाचातरी फोन आला तेव्हा ते दोन दिवसात कटनीला येतो असं म्हणाले होते….”

 

हो गं खरंच….आपण नंतर काहीच विचार नाही केला त्यावरअर्थात ते कुठे गेले असतील हे कळणं अवघड आहे, पण कटनीला त्यांचं जाणंयेणं असणार एवढं नक्की. ईशी, म्हणजे कदाचित सुजयची आणि त्यांची ओळख कटनीमधलीच असणार. माझ्या अंदाजाप्रमाणे सुजय दीड वर्षांपूर्वी मित्रांबरोबर मध्यप्रदेशात गेला होता, तेव्हा तो कटनीला तर गेलाच असणार, कदाचित तेव्हा त्यांची ओळख झाली असेल. सुजयची आई म्हणाली त्याप्रमाणे, लग्न जबलपूरला होतं. पण मग सुजय कटनीला का गेला असेल नक्की? ”

 

कटनीच्या त्या देवळासमोर त्याने फोटो काढलाय म्हणजे कदाचित फिरायला म्हणूनच गेला असेल तो…” ईशा

 

किंवा कदाचित एखाद्या वेगळ्या कामासाठी गेला असेल आणि तेव्हा सहज देवळाच्या समोर फोटो काढला असेल…..असं कुठलं वेगळं कारण असू शकतं?” सायली

 

खूप उत्तरं असू शकतात ह्याची सायले…” ईशा

 

हो , म्हणजे अशा प्रश्नांचा आपल्याला उपयोग नाही. ज्या प्रश्नांमुळे एकच स्पेसिफिक उत्तर मिळेल असे प्रश्न विचारायला हवेत…..त्यामुळे दिशा मिळेल आपल्याला …” सायली

पुढचा काही वेळ दोघी पुन्हा विचारातच गढून गेल्या. पाच मिनिटांनी सायली ईशाला म्हणाली,

ईशा, आपल्याला आत्ता हे स्पेसिफिक उत्तर देणारा प्रश्न आत्ता नाही मिळणार लगेच. एक मात्र खरं, ज्या दिवशी असा प्रश्न विचारण्याएवढी माहिती आपल्याकडे असेल ना, त्या दिवशी आपल्याला ते स्पेसिफिक उत्तर मिळणार आणि त्यातून सगळं स्पष्ट होणार. त्यादिवशी असे पुढे फाटे फुटणार नाहीत आणि समोर फक्त एकच वाट दिसेल…”

 

वा….कसलं फिल्मी बोलतेयस….पण आणखी एक गोष्ट लक्षात घे…..तू…” ईशा

 

म्हणजे? कोणती गोष्ट?” सायली

 

सिद्धार्थची मदत. सायले, सिद्धार्थची मदत घ्यावी लागणार आपल्याला. आत्ता या क्षणी त्याच्याकडून जी माहिती मिळू शकते ती इथे बसून आपल्याला मिळणार आहे का? ह्या सगळ्याचं मूळ कटनीला आहे, आणि सध्या तो कटनीला आहे. पुढच्या दोन दिवसात आपल्याला आणखी काही कळू शकतं नक्की. पण तू मध्ये मोडता घालू नकोस प्लिज. त्याला परत यायला लावू नकोस….तो आत्ता परत आला तर आपल्याला पुढची उत्तरं कशी मिळणार? ”

 

ईशा, बरोबर आहे तुझं. पण तिथे तो एकटा आहे अगं. आज त्याला तो भयानक अनुभव आला. जीवावर बेतलं असतं तर? ”

 

आपण टच मध्ये राहू ना त्याच्या. काही नाही होणार. ” ईशा

 

त्यापेक्षा आपण जाऊया का तिथे?” सायली म्हणाली खरी पण ती स्वतःच त्याबद्दल कन्व्हिन्स्ड नव्हती.

 

तिथे ? कटनीला ? आणि घरी काय सांगणार आहेस ? खोटं कारण सांगून जायचं म्हटलं तरी काय सांगणार? लग्न आठदहा दिवसांवर आलंय. इतक्या सहजपणे जाऊ शकणार आहेस का तू? ” ईशा

 

मग काय करायचं?” सायली

 

आता एकच करू शकतो आपण सायले. सिद्धार्थला जमेल तसं इथून सपोर्ट करत राहायचं. सकाळी फोन करू त्याला आणि पुढे काय करायचं ते ठरवू….” ईशा

नाईलाजाने सायलीने मान हलवली. पण मनातून ती खूप अस्वस्थ झाली होती. सिद्धार्थ तिथे एकटा….उद्या आणखी पुढे शोध घ्यायला जाईल. त्या वाटेवर काय वाढून ठेवलं असेल? काहीच माहित नाही….त्याला भीती नसेल वाटली त्या घरात एकटा होता तेव्हा? आपलं पुढे काय होईल, असा विचार नसेल आला त्याच्या डोक्यात? किंवा आता यापुढे तिथे राहून हा शोध घेताना असा अनुभव पुन्हा येईल ह्याचं टेन्शन नसेल आलं? पुढे आणखी कसले अनुभव येणार आहेत त्याचा अंदाज त्यालाही नसणार, मग एवढा धोका तो का पत्करतोय?

 

ह्याचं उत्तर अर्थातच तिला माहित होतं. तिच्यासाठी. मी तुला हवी ती सगळी मदत करेन, असं समोरासमोर बोलणं खूप सोपं होतं. पण हा असला धोका पत्करून, पुढे काहीही होऊ शकतं हे माहित असताना त्या वाटेवर पुढे जाणं त्याने निवडलं होतं, तिच्यासाठी. ह्याचा अर्थ तो तिच्याबाबतीत खूपच सिरीयस होता, नक्कीच.

———————————————

पलंगावर पडल्यापडल्या सिद्धार्थही विचार करत होता. त्या घरात आलेला तो अनुभव आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही असाच होता. सायलीशी बोलून झाल्यावर तो तिथून निघाला. भूक खूप लागली होती. अर्थात एवढ्या उशिरा कुठलं चांगलं रेस्टोरंट चालू असण्याची शक्यताच नव्हती. पुढे गल्लीत काही हातगाडीवाले काहीसं खायचं विकत होते ते त्याने खाऊन घेतलं. आणखी थोडी पायपीट केल्यावर त्याला राहण्यासाठी हॉटेलही सापडलं. अर्थात फार चांगलं नव्हतं. पण एवढ्या रात्रीचं आणखी कुठे जाणार? उद्या पाहू, म्हणून त्याने तिथे राहायचं ठरवलं.

 

आता पुढे काय करायचं हे ठरवायला तर हवंच होतं. सुजयचा फोटो त्या घरात कसा? म्हणजे सुजय तिथे आधी येऊन गेलेला असणार. कधी आणि का? आणि तो दुसऱ्या म्हाताऱ्या माणसाचा फोटो ….कोण असेल तो माणूस? गेटवर लिहिलेली ती पाटी – ‘ प्रजापती निवास‘. म्हणजे त्या माणसाचं आडनाव प्रजापती असेल का? सुजयचा आणि त्या माणसाचा काय संबंध असेल? आणि अंधारात दिसलेली ती आकृती? ती कोणाची असेल? सायली आणि ईशा म्हणतात तसं तीअसेल का ती? म्हणजे भूत किंवा तसलंच काही? छे, पटत नाहीये मनाला

 

आता उद्या काय करायचं मग? आधी त्या प्रजापती निवासच्या आजूबाजूला फिरून त्या म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडी माहिती काढली पाहिजे. त्यावरूनच काहीतरी कळेल. निदान त्या घरात कोण राहत होतं, ते लोक आता कुठे आहेत वगैरे.

 

अर्धवट उठून त्याने समोरच्या टेबलवर ठेवलेली स्वतःची बॅकपॅक उचलून त्यातले फोटोज काढले. सगळ्यात आधी त्याच्या मोबाईलवरून ते फोटोज सायलीला पाठवले. मग त्यातला म्हाताऱ्या माणसाचा फोटो नीट निरखून पहिला. मगाशी पाहिला तेव्हा आजूबाजूला पुरेसा उजेड नव्हता. आता व्यवस्थित बघितला. तो जाड भिंगांचा चष्मा, बरेचसे पांढरे झालेले केस आणि लांब दाढी…….

 

आणखी काही वेळ सिद्धार्थ त्या फोटोकडे बघत होता. फोटोवरून काही क्लू मिळतोय का ते बघत होता. पण तसं काहीच कळत नव्हतं. पण जसजसा तो त्या फोटोला आणखी निरखायला लागला, तसतसं त्याला काहीतरी खटकायला लागलं. काहीतरी होतं त्या फोटोत, काय ते नक्की त्याला कळत नव्हतं. त्या म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्माईल होतं. ती स्माईल करण्याची पद्धत…..ती जरा खटकत होतीकुठेतरी बघितल्यासारखी वाटत होती.

 

थोडा वेळ आणखी बारकाईने पाहिल्यावर त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. स्वतःशीच समाधानाने हसत त्याने बाजूला पडलेला सुजयचा फोटो उचलला. आता त्या फोटोतून काय सापडतंय ते त्याला शोधायचं होतं. नंतर आणखी एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. दोन्ही फोटोज साधारण एकाच ठिकाणी किंवा एकाच बॅकग्राउंडला काढल्यासारखे वाटत होते. दोन्ही फोटोजमध्ये मागच्या बाजूला फुलांच्या माळा सोडल्यासारख्या दिसत होत्या.

 

उद्या आपला शोध कुठून सुरु करायचा ह्याचा थोडाफार अंदाज आता सिद्धार्थला आला होता. दिवसभराच्या थकव्यामुळे पुढच्या दोन मिनिटात त्याला गाढ झोप लागली. इतकी गाढ की त्याच्या पायाच्या दिशेने जी खिडकी होती ती हळूहळू उघडत होती आणि त्यातून बाहेरचं काहीतरी आत येत होतं, हेही त्याला कळलं नाही.

——————————————————–

ईशी हे बघ, सिद्धार्थने ते फोटोज पाठवलेत….” सायली आणि ईशाचं बोलणं सुरूच होतं तेवढ्यात सिद्धार्थचा मेसेज आला.

 

बघू….”

 

हा म्हातारा माणूस कोण असेल ईशी?” सायली ते फोटो न्याहाळत म्हणाली

 

काही अंदाज येत नाहीये….पण काहीतरी वेगळं वाटतंय…” ईशा विचार करत म्हणाली.

 

हम्म….वेगळं आहे नक्कीच..पण काय काहीतरी खटकतंय ह्याच्यातकाहीतरी आहे नक्कीच पण पटकन लक्षात येत नाहीये….”

तेवढ्यात जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बेडरूमची खिडकी थाड्कन उघडली आणि सायली आणि ईशा दचकून जागीच खिळून राहिल्या.

————————————————

सायलीची आई पदराला हात पुसत बाहेर आली आणि तिने घड्याळात बघितलं. सकाळचे दहा वाजून गेले होते. कामं कधीच संपत नसतात पण आता आधी ठरवलेलं काम करायला हवं.

 

तिने तिच्या मोबाईलवरून सुजयला फोन लावला. सुजय आणि त्याचे काका त्यावेळी घरात गप्पा मारत बसले होते. आई आत पूजा करत होती. काकूही पोथी वाचत होती. सायलीच्या घरून फोन आलाय हे पाहून तो उठला. जरा ऑफिसचा कामाचा फोन आहे असं काकांना सांगून तो बाहेर आला.

हॅलो…”

 

हॅलो सुजय. मी बोलतेय. सायलीची आई. कसा आहेस तू ?”

 

मी ठीक आहे आई. तुम्ही कशा आहात? आणि घरी सगळे?” सुजय

 

सगळे ठीक आहेत. आता लग्नाच्या तयारीला लागलोय. आता फारच कमी दिवस आहेत, नाही का?” आई

 

हो ना, आमच्याकडेही जोरात तयारी सुरु आहेपण तुम्ही मला कसा काय फोन केलात आज? म्हणजे तसा आईशी फोन होतो ना तुमचा नेहेमी…” सुजय

 

हो रे. पण म्हटलं, जावयाला फोन करू आणि डायरेक्ट बोलू. अरे लग्नात काय घालणार आहेस तू ठरवलं आहेस का? म्हणजे खरेदी कशी करायची? तुला कधी वेळ आहे? ते म्हटलं तुलाच विचारून घेऊ. ”

 

मी संध्याकाळपर्यंत फोन करून सांगू का? काय आहे, मी जरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर आलोय दोन दिवस. तर दोन दिवसतरी मला नाही जमणार..” सुजय सावधपणे बोलायला लागला.

 

अच्छाम्हणजे मुंबईच्या बाहेर का?”

एक क्षण तो थांबला. पण त्यांना सांगायला काहीच हरकत नव्हती.

हो, पण फार लांब नाही. पुण्याला आलोय मी…..”

सायलीच्या आईला मावशीचं बोलणं आठवलं. सायली आणि ईशाचं बाहेर जाणं, दोघींनीच खरेदी करायला जाणं, वगैरे. म्हणजे, हे कारण असणार नक्कीच. सुजय तिथेच आहे, म्हणून ह्या मॅडम त्याला भेटायला तिथे गेल्यात. आणि मध्ये मध्ये त्याला भेटायला जात असणार. मग लपवायची काय गरज आहे? आम्ही काही नाही म्हणालो नसतो तिला होणाऱ्या नवऱ्याला भेटायला.

 

समोरून काहीच आवाज आला नाही तसं सुजयने विचारलं,

हॅलो आई….काय झालं?”

 

अरे काही नाही. सायलीबद्दल तुला विचारायचं होतं. पण तू पुण्याला आहेस म्हणालास त्यावरून अंदाज आला मला…”

 

म्हणजे ? काय म्हणायचंय तुम्हाला?” सुजयने सावध होत विचारलं.

क्रमशः

12 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 31)

 1. Sarika Devrukhkar
  December 27, 2016

  Hello Rutusara khup chhan vatate tumchi story vachtana ase watate pratyaksh anubhavtoy apan thanks for a lovely story please next part lavkar prakashit kara

  Like

 2. Renu gupta
  December 27, 2016

  Hi… Thanks for posting this page. But can you post next part as earlier as possible. story become more interesting & suspense full. so please it’s my request please post next part. Thank You Again For lovely Story.

  Like

 3. Vaishali Agre
  December 28, 2016

  hi…
  please lavkar pudhacha bhag taka. naka agadi ante baghu aamchyasarkhya vachnaraych.

  Liked by 1 person

  • rutusara
   December 28, 2016

   hello….kharach sorry…asa anta baghnyacha maza kharach hetu nasto …pudhche bhag lavkar taknyacha prataynn aselach

   Like

 4. renu gupta
  January 2, 2017

  please post next part.wish you happy new year.

  Like

  • rutusara
   January 9, 2017

   Thanks 🙂 happy new year to you and your family

   Like

 5. sarika devrukhkar
  January 2, 2017

  नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,

  आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!

  नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,

  सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

  नववर्षाभिनंदन

  Liked by 1 person

  • rutusara
   January 9, 2017

   dhanyavaad !! happy new year to you and your family

   Like

 6. Anonymous
  March 18, 2017

  बकवास कथा.मी 3 भागात लिहुन संपवली असती.

  Like

  • rutusara
   April 4, 2017

   Kathevar aaleli pahili negative comment…so tyachahee swagatach aahe !! 3 bhagat lihun sampavali asti he lihinyasathi tumhi 31 bhag thamblat tyabaddal dhanyavaad !! Katha lokanna avadana kimva n avadana hi tyanchi pratikriya asuch shakte …pan lavkar sampavali nahi mhanun ti katha bakvas tharte asa mala watat nahi….tasa tar saglyach katha 2-3 bhagat sampanarya astat…lokanchi utsukata kayam thevat katha pudhe kashi vadhavata yeil hyat khara kaushalya asta…mazyakade te aahe asa mhanana nahi pan tasa prayatn kartey…anyways…pratikriyebaddal dhanyavaad pan katha n avadanyacha karan patla nahi…

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on December 26, 2016 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: