davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 32)

समोरून काहीच आवाज आला नाही तसं सुजयने विचारलं,

हॅलो आई….काय झालं?”

अरे काही नाही. सायलीबद्दल तुला विचारायचं होतं. पण तू पुण्याला आहेस म्हणालास त्यावरून अंदाज आला मला…”

म्हणजे ? काय म्हणायचंय तुम्हाला?” सुजयने सावध होत विचारलं.

********************** भाग ३१ पासून पुढे **************

भाग ३१ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-NY

किल्लीने दरवाजा उघडून सायलीचे बाबा आत घरात आले. घरात सगळे असले तरीही ते बरेच वेळा किल्लीनेच दार उघडून घरात यायचे. बेल वाजवायचे नाहीत. काही कामासाठी ते सकाळीच बाहेर गेले होते आणि आता येईपर्यंत साडेदहा होत आले होते. हुश्श करून त्यांनी आधी समोरच्या डायनिंग टेबलवर ठेवलेलं पाणी प्यायलं आणि ते सोफ्यावर जाऊन बसले.

होहो….आता कळलं ना आपल्यालाकाय मुली आहेतघोर लावला आपल्याला नुसता….” आई फोनवर बोलत होती.

“————”

हो का? अरे वा….चांगलं आहे….”

“———–”

हो चल….ठेवते मी पणकालपासून डोक्याला जो भुंगा लागला होता तो आता गेल्यामुळे फार बरं वाटतंयचल अच्छा…”

आई कोणाशी बोलत होती ते ओळखणं बाबांसाठी फार कठीण नव्हतंच. एखादी मैत्रीण किंवा सायलीची मावशी, नक्कीच.

अहो, तुम्ही कधी आलात? कळलंपण नाही मला. चहा घेणार आहात का तुम्ही?बरं आज खरेदीला जायचंय, आहे ना लक्षात? आणि जरा त्या अनिशी बोलून घ्या. तो लग्नात काय घालणार आहे, त्याची खरेदी कुठे करायची आहे त्याला एकदा विचारून घ्या. आपल्याबरोबर तो काही येणार नाही. कोण मित्र येणार असतील त्यांना घेऊन जा आणि करून टाक म्हणावं खरेदी. आणि गुरुजींशी बोलायचंय. ग्रहमखाच्या तयारीची लिस्ट घ्यायची आहे. ”

 

अगं सगळं करतो मी.” बाबा पेपर वाचता वाचता म्हणाले.

 

अहो कधी पण? तुमच्याकडे बघून तर अजिबात वाटत नाही असं. सायलीचं लग्न आलंय आठनऊ दिवसांवर. तुम्ही इतके थंड कसे हो? आणि ती मुलगी. तिला तर अजिबात काहीच पडलेलं नाहीये. पुण्याला जाऊन बसली आहे. सुधाला म्हटलं मी आत्ता तिला आजच्या आज घरी पाठवून दे आणि तुम्ही सगळेपण या पुढच्या दोन दिवसात म्हटलं.”

 

ते बरंच केलंस. मला पण सायलीशी बोलायचंच आहे. सगळं कुठपर्यंत आलं ते बघायला हवंच ना…..”

काय कुठपर्यंत आलंय?”

आईला बाबांच्या बोलण्याचा अर्थच कळत नव्हता. बाबा मात्र आईच्या प्रश्नामुळे जरा गडबडले. आत्ता नको ते तोंडातून बाहेर पडता पडता राहिलं होतं.

अगं ती तिकडे खरेदी करणार आहे म्हणाली होतीस ना तू….त्याबद्दल म्हणतोय मी….बरं काय बोलणं चाललं होतं ताईंशी ? काय ते कसला डोक्याला भुंगा वगैरे म्हणत होतीस? सायलीबद्दल का काही?”

अहो कालच सांगणार होते तुम्हाला. पण म्हटलं राहूदे. उगीच तुम्हाला पण टेन्शन कशाला. अहो, सुधाचा काल फोन आला होता. ती म्हणत होती, सायली आणि ईशाचं काहीतरी चाललंय. कुठेतरी जात असतात, सारख्या काहीतरी कुजबुजत असतात, काहीतरी गुप्त, सीक्रेट असल्यासारखं. मग म्हटलं सुजयला विचारून बघू…”

काय ?” बाबा जोरात ओरडलेच.

हो,….अहो किती जोरात ओरडताय…”

तुला कोणी सांगितलं होतं पण त्याला फोन करून हे विचारायला? म्हणजे…..त्याचा काहीच संबंध नाहीये ना…”

एवढं वैतागायला काय झालं पण….मी कालच म्हटलं होतं की नाही तुम्हाला, सुजयला फोन करून विचारायला हवं खरेदीचं. म्हणून त्याला फोन केला. आणि कसं आहे, सायली त्याला तर सगळं सांगतच असणार नाम्हटलं त्यालाच विचारू ती नक्की पुण्याला का गेली आहे ते….मुलींनी काही सांगितलं नसतं…”

मग….म्हणजे तुझं झालं का बोलणं त्याच्याशी ?” आईकडून कदाचित नाहीअसं उत्तर मिळेल ह्या अपेक्षेने बाबांनी विचारलं.

हो मगाशीच झालं….”

मगकायकाय म्हणाला तो…..तू काय सांगितलंस त्याला?”

अहो, काय झालंय नक्की? त्याला फोन नको करायला होता का?” आईला आता बाबांचा वैतागल्याचा सूर ऐकून काळजी वाटायला लागली होती.

आता केलायस ना तू फोन? काय बोलणं झालं ते सांग….”

त्याला खरेदीचं वगैरे विचारलं. तर तो म्हणाला की दोन दिवसांसाठी तो जरा कामासाठी बाहेर आलाय. पुण्याला आलोय म्हणाला. तर मी म्हटलं की आता तू पुण्याला आहेस तर सायलीबद्दलचा अंदाज पण आलाय मला..त्याने विचारलं म्हणजे काय….”

मग ? तू काही म्हणालीस का ?” बाबा

मी काय म्हणणार? मला अंदाज तर आला ना, की सायली बहुतेक त्यालाच भेटायला जात असणार. आणि तो पुण्याला गेला म्हणून ह्या मॅडम पण गेल्या असणार नक्कीच. म्हणूनच सुधाला पण खरेदीला नेलं नाही तिनेहे फिरायला गेले असणार त्या वेळेत..होतो पुण्याला आहे हे कळल्यावर मग ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधता आला मला. म्हटलं कशाला स्वतःच्या तोंडाने सांगायचं त्यांना, तुमचं सिक्रेट आम्हाला कळलंय म्हणून. त्याला म्हटलं, काही खास नाही. माझ्यापुरतं जे कळायचं होतं ते कळलंय….आता ठेवते फोन. दोन दिवसात खरेदीचं ठरवून टाकू म्हटलं आणि त्याने आणखी काही विचारायच्या आत फोनच ठेवून दिला…..”

खरंच का?” बाबा

म्हणजे काय? मी काय खोटं बोलतेय का?”

अगं तसं नाहीम्हणजे नक्की एवढंच बोलणं झालं का? सायली पुण्याला गेली आहे हे तू बोलली नाहीस का त्याला?”

अहोमी नाही बोललेपण मी कशाला सांगायला पाहिजे त्याला? ते दोघे तिकडे फिरायला वगैरे पण जातायत, हे मला माहित आहे मग मी कशाला त्याला विचारू सायली पुण्यात आहे, ती कशाला आली आहे वगैरे

आईला बाबांच्या प्रश्नाचा रोख कळत नव्हता पण बाबांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. म्हणजे अजून सायली पुण्यात आली आहे हे सुजयला माहित नव्हतं. अर्थात ती तिथे आहे हे कळलं असतं तरी काहीच बिघडणार नव्हतं. सायलीची मावशी, ईशा पुण्यात असतात त्यामुळे सायली तिथे जाणं सहज शक्य होतं. पण तिच्या संशयास्पद वागण्याबद्दल आईकडून सुजयला काही कळलं असतं तर मात्र त्याला नक्की संशय आला असता. नशिबाने आईने संभाषण आवरतं घेतल्यामुळे हे पुढचं संकट टळलं होतं. अर्थात आता सायलीला फोन करून ही गोष्ट सांगायला हवी होती.

आणखी काय म्हणाल्या ताई मग?”

दोन दिवसात सगळेच येतो म्हणाली. सायलीशी मात्र मलाच बोलायला लागेल. नाही, हे सगळं ठीक आहे. पण लग्न इतक्या तोंडावर आलंय. घरातल्या घरात करायचं म्हटलं तरी सगळं वेळेवर व्हायला नको का? मी आजच परत यायला सांगणार आहे तिला. आत्ताच बोलणार होते पण ती तिकडे सुजयशी बोलत होती….”

सुजयशी? आत्ता ?”

अहो मी सुजयशी फोन करून बोलले हे मी कसं लगेच सुधाला सांगितलं, तसं तो अर्थात सायलीला सांगणार नाही का? सुधाच म्हणाली आत्ताच सुजयचा फोन आलाय असं…”

म्हणजे आईशी बोलल्यावर त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असणार आणि काहीतरी कळेल ह्यासाठी त्याने सायलीला फोन केला असणार….बाबा आता सुजयच्या भूमिकेत जाऊन विचार करत होते.

————————————————

काय म्हणत होता सुजय? सकाळी सकाळी फोन केला त्याने?” ईशा

हम्म….तसं फार काही वेगळं बोलला नाही तो….आईचा फोन आला होता म्हणालाआणखी कशी आहेस आणि बाकी सगळं बोलत होता. पुण्यालाच आलोय म्हणाला….पण असा सहज फोन का केला असेल त्याने? तेपण आईशी बोलून झाल्यावर लगेच? म्हणजे आई असं काहीतरी म्हणाली असेल ज्याबद्दल संशय आला असणार त्याला म्हणून माझ्याकडून काहीतरी माहिती काढायला त्याने फोन केला मला…”

अगं मग मावशीला विचारायचंस ना….” ईशा

काय बावळटासारखी बोलतेयस गं ईशात्याच्याशी फोनवर बोलताना काय सांगू त्याला, आईशी बोलते आधी आणि मग तुझ्याशी बोलतेअसं ? “

हो, हो, सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं ते…..पण मग काय म्हणजे तुमचं काय बोलणं झालं?”

आईचा फोन आला होता म्हणाला तो. लग्नाची खरेदी करण्याबद्दल विचारात होत्या असं म्हणाला आणि थांबला. मी पुढे काय बोलतेय ते त्याला बघायचं असेल. मग मीच विचार केला, आईने त्याला सांगितलंच असणार मी पुण्यात आहे ते. आणि मग मी नाही बोलले तर त्याला संशय येईल म्हणून मीच त्याला म्हटलं, आई म्हणाली असेल ना तुला, मी पुण्यात आहे, ईशाकडे आलेय..”

मग ? काय म्हणाला?”

तो म्हणाला, हो का? नाही आई तसं काही नाही म्हणाल्या.” सायली अजूनही तिच्या विचारात होती..

अगं पण असं कसं? मावशी बोलता बोलता सांगणारच की त्याला….आय मिनतो पुण्यात आहे हे ऐकल्यावर मावशी त्याला बोलणार नाही , असं कसं शक्य आहे?” ईशा

हो, ते आहेचकदाचित त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं असेल….पण सुजयच्या बोलण्यावरून त्याला नक्की संशय आलाय का, ह्याचा अंदाज नाही आला मलामी पुण्यात आहे हे कळल्यावर तो जरा विचारात पडल्यासारखा वाटला मला….काय चाललंय यार आपलं ईशा? नुसते प्रश्न, तर्क ह्याच्यावर चाललंय सगळंठोस उत्तर कधी मिळणार आहे आपल्याला?”

कोडं सोडवतोय ना आपण सायले, कधी ना कधी उत्तर मिळणार……” ईशा

कधी पण ईशी? लग्न आठदहा दिवसांवर आलंय. त्याच्या आत हे कोडं सुटायलाच हवं….” सायली

सायले, तू अशी डेडलाईन का ठरवतेयस? लग्न आठदहा दिवसांवर आलंय. पण आठदहा दिवसात आपल्याला सुजयबद्दल खरं काय ते कळलं नाही तर तू काय लग्न करणार आहेस त्याच्याशी ? यु कॅन बॅक आऊट एनी टाईम माय डिअर….”

अर्थातच. पण ईशा मी आईला अजून काही सांगितलं नाहीये. आईच कशाला, नि, मावशी , निशा, शेजारचे सगळे, नातेवाईक सगळ्यांनाच माहित आहे माझं लग्न ठरलंय ते. ह्या सगळ्यांना मला उत्तर द्यावंच लागेल ना. त्यासाठी जास्त धडपड चाललीये माझी. सुजयला काय मी एक मिनिटात नाही म्हणेन, पण नंतर मला सगळे प्रश्न विचारतील, आणि त्याचं खरं उत्तर माझ्याकडे असायलाच हवं….”

हम्म….ते आहेच..बरं ते जाऊदेत….आता ह्या कोड्याच्या मागे लागूया हात धुवूनकालचे ते सिद्धार्थने पाठवलेले दोन्ही फोटोज….आपल्याला त्या फोटोबद्दल काहीतरी अंदाज आला आणि बेडरूमची खिडकी…..एकदम एवढी जोरात उघडलीआणि मग तो थंड वारा……मी काल बोलले नाही तुला सायले, पण माझे ना हातपायच गळाले होते. मला वाटलं आता पुन्हा तीयेणार….असं ना वेगळंच टेन्शन आलं होतंछातीवर कोणीतरी भलामोठा दगड ठेवावा तसं वाटत होतं….पण मग तसं काहीच झालं नाहीपण तरी आय एम शुअर, ती खिडकी थाड्कन जोरात उघडणं वगैरे हे नॉर्मल नव्हतं…”

सायली ह्यावर काहीच बोलली नाहीती तिच्याच विचारात होती

सायली….…..काय झालं? बोल ना काहीतरी….”

काय बोलणार ह्याच्यावर ईशी? तुला जे वाटलं, जसं वाटलं तसंच सगळं मलाही वाटलं त्याक्षणी….त्या थंड हवेत एक वेगळीच अस्वस्थ करणारी जाणीव असते……रात्री जाग आली तेव्हासुद्धा मला सारखं असं वाटत होतं की रूममध्ये आणखी कोणीतरी आहे. डोळे मिटले की समोरून एखादी सावली सरकत गेल्यासारखी वाटायची आणि दचकून जाग आली की समोर तसं काहीच दिसायचं नाही पण तरीही कोणीतरी अंधारातून आपल्याकडे बघतंय असं सारखं वाटत राहायचं. असं रात्री खूप वेळा झालं. एकदा तर ती सावली माझ्या खूप जवळ आल्यासारखी वाटलीम्हणजे मी अक्चुअली बघितलं नाही, बहुतेक भासच असेल, किंवा अर्धवट झोपेत पडलेलं स्वप्न. ती सावली माझ्या जवळ आली आणि काहीतरी बोलली….इथे थांबू नकोस ….तिथे पुढे रस्ता आहेतो बघ….तिकडे….असं काहीतरीआणि यावेळचा आवाज असा घाणेरडा वगैरे नव्हता, स्पष्ट होता बऱ्यापैकीतो वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजात मिक्स होतच होता पण तरीही मला कळत होता.. मग पहाटे कधीतरी शांत झोपले मीह्या सगळ्यात ह्या गूढ आणि विचित्र, ऍबनॉर्मल गोष्टींचा नक्की काय रोल आहे हे स्पष्ट होत नाहीये अजून…”

बापरे….माझ्या अंगावर आत्तापण काटा आलाय हे सगळं ऐकताना. पण मग सायलेगूढ गोष्टी आपल्याला कळत नसतील पण ज्या गोष्टी समोर आहेत त्याचा तरी विचार करूयाते फोटोजएक सुजयचा आणि दुसरा….”

अगं सायली, ईशा…..

ईशाच्या आईच्या हाकेने ईशाचं बोलणं अर्धवटच राहिलं

अगं काय चाललंय तुमचं एवढा वेळ ?”

 मावशी बोलतबोलतच आत खोलीत आली….समोर बेडवर ठेवलेल्या प्लेटकडे तिचं लक्ष गेलं.

धन्य आहात तुम्ही मुलीअगं सँडविचेस आत आणलेत खायला आणि एकसुद्धा संपलेलं नाहीये. काय चाललंय काय एवढा वेळ तुमचं? सायली, आधी आईला फोन कर बरं. आणि हे बघ एरव्ही काही मी तुला असं सांगितलं नसतं. पण लग्न आहे तुझं सोन्या, तू घरी असायला हवंस आत्ता. सुजयला आत्ताच सांगून ठेव, लग्न झालं की मी माझ्या लाडक्या मावशीकडे भरपूर दिवस राहायला जाणार आहे. पण आत्ता घरी जायला हवं. आई पण मला तेच म्हणत होती. तू आधी फोन कर आणि आईशी बोल बरं. आणि ईशा तुझं काय चाललंय? अकरा वाजत आलेत. तुला बारा पर्यंत पोहोचायचं आहे ना ऑफिसला? अजून काहीही आवरलेलं नाहीये तुझं. आणि काय गंआधीच इतक्या सुट्ट्या होत असतात तुझ्या, त्यात सायलीच्या लग्नाला रजा घ्यावीच लागेल. मावशी तर उद्या परवापासूनच या असं म्हणतेय.आत्ता कशाला हाफ डे वगैरे टाकून रजा वाया घालवतेयस?”

अगं काही वाया नाही घालवत आहे. आज एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये जाऊन मग ऑफिसला जाणार होते म्हणून बॉसला सांगून ठेवलं होतं, बारा पर्यंत येईन म्हणून. पण तुला माहित आहे ना, माझं काम सॉलिड असतं एकदम. त्या क्लायंटच्या ऑफिसमध्ये माझी एक बॅचमेट आहे, ट्रेनी म्हून लागलीये तिकडे. तिच्याच डिपार्टमेंट मधून काही डिटेल्स हवे होते, काही पेपर्सवर सह्या हव्या होत्या. तिने कालच सगळं रेडी करून घेतलं आणि रात्री मला आणून दिलं. काल नाही का मी म्हटलं तुला, जेवल्यावर खाली गेले होते, एक मैत्रीण आली आहे भेटायला म्हटलंतीच आली होतीमग? माझं काम कालच झालंय…”

बरं ठीक आहे. झालंय ना तुझं काम ? चांगलं आहेचल आता आवर पण. …आणि सायली आईला फोन करआणि आधी खाऊन घ्या दोघी….”

मावशी बाहेर गेल्यावर सायली ईशाला म्हणाली,

आता आईला फोन करते आणि सुजयशी काय बोलणं झालं ते पण विचारते. ईशी पण आई आता मला परत बोलावणार. आज जावंच लागेल गं….पुढे काय करायचं, कसं करायचं सगळं ठरवायचं होतं. पण आता तू इथे आणि मी तिथेआणि तो सिद्धार्थ तिथे कटनीलाकाय करायचं आता?”

हो नाते ठरवायला लागेलच..बघते ऑफिसमध्ये काहीतरी झोलझाल करून मला पण येता आलं तर आज तुझ्याबरोबर…” ईशा

काय? कसला झोलझाल ? ईशा हे अति होतंय हा तुझं. ट्रेनी आहेस ना तूअसं सारखं रजा घेतलेल्या कोण खपवून घेईल? काही गरज नाहीये. मी आज जाईन आणि तू ये शनिवारी…”

थांब नाप्लिज उद्या सकाळी जा, किंवा आज संध्याकाळी उशिरा….मी ऑफिसमधून परत येईपर्यंत थांब…”

अगं पण करू काय मी संध्याकाळपर्यंत थांबून? तू ऑफिसला जाणार नामग ? “

सांगेन नंतर. मी येईपर्यंत तू थांबतेयस. कळलं? आता कर मावशीला फोनमी जाते अंघोळीला…” ईशा तिच्या डिशमधलं सँडविच खात म्हणाली.

ओके. थांबते. ईशा पण पुण्यात आणखी काही महत्वाची कामं राहिली, असं नाही ना? म्हणजे बघ हा, सुजयच्या आईला आणि काकांना भेटायला म्हणून मी पुण्यात आले. आईला भेटले पण काकांना भेटायचं राहिलंच गंजाऊन येऊ का आज त्यांच्या घरी?”

तुला वाटतंय का खरंच उपयोग होईल त्याचा? हे बघ, जिथे त्याने त्याच्या आईपासून इतकं सगळं लपवलं आहे, त्याअर्थी काकाकाकूंना सुद्धा काहीच माहित नसणार नाआणि तसंही तो आगाऊ वोचमन म्हणालात होता ना, ते दोन दिवसांसाठी गेलेत म्हणूनते अजून परत आलेले नसणारचजाऊदेतउगीच जिथे हातात काहीच सापडणार नाही अशा गोष्टींच्या मागे का लागायचं? त्यापेक्षा सिद्धार्थशी बोलून बघत्याला इथे बसून काही हेल्प करता येत असेल तर बघआणि अगदीच नाही तर तुमच्या ह्यांच्याबरोबर फिरायला जा….तुझे अहो पुण्यातच आलेत ना सध्या…” ईशा दात काढत म्हणाली

ईशा………आगाऊ…..चल जा आधी इथून….गेट लॉस्ट….”

सायलीच्या धपाट्यांपासून वाचण्यासाठी ईशा पटकन अंघोळीला पळाली. सायली पुन्हा एकदा बेडरूममध्ये येऊन खिडकीपाशी विचार करत उभी राहिली. ईशा म्हणत होती त्यात तथ्य होतं खरं तर. त्याच्या आईलाच जिथे इतक्या गोष्टी माहित नव्हत्या तिथे काकाकाकूंना का सांगेल तो? त्यांना भेटायला जायचं म्हणजे पुन्हा रिस्कच आहे. कुठूनतरी सुजयला कळलं तर? त्याला सुगावा लागला तर….त्यापेक्षा त्याच्या काकाकाकूंना भेटण्याचं कॅन्सलच करावं…..

मेंदूला हा विचार पटत होता तरीही का कोणास ठाऊक मनात कुठेतरी असं वाटत होतंच की त्याच्या काकाकाकूंना भेटलं पाहिजे. अर्थात ते कठीणच होतं. ते जर आणखी दोन दिवसांनी परत येणार असतील तर दोन दिवस इथे पुण्यात थांबणं आलं. आईला काय सांगणार? जाऊदे, पुन्हा विचार नको करायला आता. ठरवलं आहे ना, बास….

ह्या एका निर्णयामुळे हातातोंडाशी आलेला घास आपण स्वतःच्या हाताने दूर लोटतोय ह्याची सायलीला कल्पनाच नव्हती.

———————————————————

बरीच पायपीट केल्यावर सिद्धार्थ दमून एका दुकानासमोरच्या बाकड्यावर बसला. बॅगेतून पाण्याची बाटली काढून पाणी प्यायल्यावर त्याला जरा बरं वाटलं. त्याच्या डोक्यात आत्ता वेगवेगळे विचार होते. काल रात्रीपासून विचित्र घटनांची मालिकाच सुरु झाली होती. त्यातल्या कशाचाच त्याला अर्थ लागत नव्हता. ह्याआधी कधीही त्याला असले अनुभव आलेले नव्हते. आणि इथे कटनीमध्ये पाय ठेवल्यापासून त्याला एकामागोमाग एक गूढ अशा घटनांना सामोरं जावं लागत होतं. त्यात ते दोन फोटोज. त्यांचा काय अर्थ लावायचा हेसुद्धा त्याला कळत नव्हतं. त्यात भरीस भर म्हणून ऑफिसमधून कामासंदर्भात सारखे फोन येत होते.

काल रात्री ते फोटोज बघितल्यावर त्याने मनाशी काही ठरवलं होतं. आज सकाळी ते फोटोज दाखवून पुन्हा एकदा त्या देवळात जायचं, त्या प्रजापती निवास च्या आजूबाजूला चौकशी करायची, वगैरे सगळं ठरवलं होतं. ज्या अर्थी प्रजापती निवास मध्ये ते फोटोज मिळाले होते त्याअर्थी तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना काहीतरी माहिती नक्कीच असेल, असा त्याचा अंदाज होता. अर्थात प्रजापती निवासाच्या आजूबाजूला फारसं तसं कोणी राहत नाही हे त्याने कालच बघितलं होतं. पण आज पुन्हा त्याने एक प्रयत्न करायचं ठरवलं होतं. फोटोबद्दल नाही, तर निदान त्या प्रजापती निवास मध्ये कोण राहत होतं, ह्याची तरी माहिती काढता येईल, असा त्याचा अंदाज होता. हे सगळं मनाशी ठरवता ठरवता रात्री कधी झोप लागली त्याचं त्यालाही कळलं नव्हतं. पण मगनंतर….

*********************************

थोड्याच वेळातखोलीत कसलातरी आवाज आल्यासारखं वाटायला लागलं. एक दोन वेळा त्याने दचकून उठून पाहिलं, पण तसं कोणीच दिसलं नाही त्याला. समोरची खिडकी वाऱ्याने जोरात आपटायला लागली तसं त्याला पुन्हा जाग आली. सारखी सारखी झोपमोड होत असल्यामुळे त्याची आता चिडचिड व्हायला लागली. एक तर अगदीच स्वस्तातलं हॉटेल होतं हे, त्यात रूम्स मध्ये ए.सी. कुठून असणार….फॅनसुद्धा काही जोर नसल्यासारखा फिरत होता, म्हणून सिद्धार्थने मुद्दामच समोरची खिडकी उघडी ठेवली होती. सुरुवातीला खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे त्याला जरा बरं वाटलं होतं. पण मग त्या वाऱ्याचा वेग इतका वाढला की खिडकी सारखीच समोरच्या गजांवर आपटायला लागली. खिडकी उघडी ठेवायच्या कड्याही तुटलेल्या होत्याचरफडत तो उठला. उद्या सकाळी आधी दुसरं चांगलं हॉटेल शोधलं पाहिजे, झोपेतच मनाशी ठरवत त्याने खिडकी बंद करून घेतली आणि तो मागे वळला.

आणि समोरचं दृश्य बघून तो अर्धवट झोपेतून खाडकन जागा झाला पण त्याचे पाय मात्र जमिनीला खिळून राहिले होते. पाऊल मागे टाकण्याचं त्याच्यात त्राण नव्हतं आणि पुढे टाकण्याची हिम्मतही नव्हती.

त्याच्यापासून दोनच हातांवर काहीतरी होतं. कुणीतरी उभं होतं. पाठमोरं. खोलीतला नाईटलॅम्प बंद होता म्हणून त्याने बाथरूममधल्या बेसिनवरचा दिवा चालू ठेवला होता आणि तो उजेड बाहेर यावा म्हणून बाथरूमचं दार थोडंसं उघडं ठेवलं होतं. आता त्याला आठवलं, तो खिडकी बंद करायला म्हणून उठला तेव्हा खोलीत पुरेसा उजेड होता. म्हणजे बाथरूममधला तो लाईट चालू असणार. मग मग….खिडकी बंद करून मागे वेळेपर्यंत तो बंद झाला की काय? आता खोलीत कुठल्याच दिव्याचा उजेड नव्हता. पण खिडकीच्या काचेमुळे बाहेरून दुरून कुठूनतरी येणारा अंधुकसा उजेड होता….त्यामुळे रूममध्ये अगदी काळामिट्ट अंधार नव्हता. समोर कुणी उभं आहे हे तरी निश्चितच कळत होतं. खोलीतली हवा अचानक खूप गार पडल्यासारखी वाटली त्याला. अंग शहारत होतं. एक मिनिटभर तो तसाच स्तब्ध उभा राहिला. समोरची ती सावली किंवा आकृती, पुरुषाची आहे की बाईची, हे काही कळत नव्हतं. अंधारात काहीतरी काळंकाळं, घनं, त्याच्या सामोरं उभं होतं. समोर काहीच हालचाल नव्हती पण मगाशी ऐकलेले आवाज मात्र खोलीत कुठूनतरी येत होते.

एक मिनिटानंतर सिद्धार्थ जरा विचार करण्याच्या स्थितीत आला. त्याने जोरात घसा खाकरला. पण समोर काहीच हालचाल नव्हती किंवा काहीच प्रत्युत्तर नव्हतं.

कोण आहे?” इतक्या वेळच्या शांततेनंतर स्वतःचाच आवाजही सिद्धार्थला भीतीदायक वाटत होता.

समोरून काहीच उत्तर आलं नाही. मात्र, समोर उभी असलेली आकृती थोडी हलल्यासारखी वाटली. सिद्धार्थच्या दिशेने की आणखी कुठे, त्याला काहीच कळलं नाही.

आता काय करावं त्याला सुचेना. खोलीच्या दरवाजाच्या दिशेने जाऊन दार उघडावं का? पण ती सावली, मधेच उभी होती. चेहरा दिसत नव्हताच पण त्यातून रोखलेली भेदक नजर जाणवत होती. आपण पाऊल पुढे टाकलं आणि अंधारातून कोणी आपल्यावर झेप घेतली तर? मगकाय करायचं आता….इतक्या थंड हवेतही स्वतःच्या मानेवरून, हातापायांवरून, पाठीवरून वाहणारे घामाचे ओघळ त्याला स्पष्ट जाणवत होते. कदाचित त्यामुळेच त्याला परिस्थितीचं भान राहिलं असावं. अचानक त्याला आठवलं की तो उभा होता, तिथून उजव्या हाताला एक टेबल होतं आणि त्या टेबलच्या वर भिंतीवर खोलीतल्या दिव्यांचे स्विच होते. निदान दिवे लावायला हवेत. अंधार सहन करण्यापलीकडचा वाटत होता आता

त्याने उजवा हात हळूहळू लांब करून आधी टेबलाला चाचपडून पाहिलं. मग अगदी हळुवार उजवा पाय थोडा त्या दिशेला सरकवला. मान अगदी किंचित उजवीकडे वळवून तो लाईटच्या स्विचचा अंदाज घेत होता, तेवढ्यात समोरची ती आकृती सळसळत आपल्या अगदी जवळ आल्याचं त्याला जाणवलं. त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्याने तसंच काहीसं टिपलं त्याने. एक हळुवार खटकन असा आवाज झाला, आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एका बाजूने येणारा उजेड त्याला जाणवला. त्याने मान दुसऱ्या दिशेला वळवून पाहिलं. समोर बाथरूमच्या अर्धवट उघड्या दारातून आतल्या दिव्याचा उजेड बाहेर येत होता.

छातीतली धडधड कानांना स्पष्ट ऐकू येत होती तरीही त्याने आजूबाजूला वळून पाहिलं. काहीच नव्हतं आजूबाजूला. पण खिडकीकडे लक्ष जाताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आत्ता दोन मिनिटांपूर्वी त्याने स्वतः कड्या लावून बंद केलेली खिडकी आत्ता पूर्ण उघडलेली होती. आणि आता त्याच्या डोळ्यांदेखत ती खिडकी आपोआप बंदही होत नव्हती. तो तसाच धडपडत मागे सरकत बेडवर येऊन बसला आणि त्याने आधी बेडजवळच्या टेबलवर ठेवलेलं पाणी प्यायलं. हे आत्ता त्याने जे अनुभवलं होतं, ते काय होतं नक्की? हे खरंच घडलं होतं की भास झाला होता त्याला? बाथरूममधला तो लाईट काही वेळापुरता बंद झाला होता. म्हणजे नक्की बंद झाला होता ना, की मलाच तसा भास झाला? समोर कोणीतरी उभं होतं. ते नक्की उभं होतं ना? की तो सुद्धा भास होता? आणि आता ही खिडकी ही आपोआप बंद झालीतो सुद्धा भासच होता का? सगळं होऊन गेलं होतं तरीसुद्धा छातीतली धडधड बंद झाली नव्हती. अचानक त्याला सायलीच्या डायरीत लिहिलेलं ते वर्णन आठवलं. ज्यावर तो पोट धरून हसला होता, ते वाक्य सुद्धा ती खिडकीतून बाहेर गेली“. हे आठवल्यावर तो ताडकन उभा राहिला. आणि अस्वस्थपणे फेऱ्या मारायला लागला. म्हणजे नक्कीच आज त्यालासुद्धा तसलाच अनुभव आला होता. हे सगळे भास नव्हते, खरंच घडलं होतं…..

ह्या प्रकारानंतर झोप लागणं शक्यच नव्हतं. रात्र कधी सरते ह्याचीच वाट बघत होता तो. रात्रीची ती शांतता जीवघेणी होती. कुठल्याही क्षणी ती सावली पुन्हा दिसेल ह्या भीतीने त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते, पण कान मात्र नकळत सावध झाले होते. शेवटी पहाटे कधी तरी त्याचा डोळा लागला.

पहाटे गाढ झोपेत असतानाही त्याला स्वप्न पडलं. तो त्या प्रजापती निवासाच्या बाहेर उभा होता. अचानक आतून कोणीतरी त्याला हाक मारल्यासारखी वाटली. तो काहीही विचार न करता कुणीतरी खेचून नेल्यासारखा आत गेला. बाहेरच्या खोलीत कुणीच नव्हतं. तो तसाच आत चालत राहिला. आत, आत अगदी त्या आतल्या खोलीपर्यंत. समोर कुणीच दिसत नव्हतं तरीही कुणीतरी हाक मारतंय असं वाटत होतं. खोलीचं दार नुसतंच लोटलेलं होतं. ते ढकलून तो आत गेला. समोर कोपऱ्यात तीच ती सावली हलत होती……

तिथे बघ….तिथे….’ वाऱ्यावर वरखाली होणारा आवाज कुठूनतरी येत होताती सावली आता सळसळत त्याच्या अगदी जवळ आलीआणि त्या धसक्याने सिद्धार्थला एकदम जाग आली

सकाळचे पावणेसहा होत आले होते. हे सगळं काय चाललंय? त्याला कळत नव्हतं. कटनीला नुसतं आल्यामुळेच एवढं काय घडलं होतं? बराच वेळ विचार करूनही त्याला काहीच सुचलं नाही. शेवटी रात्री आपण जे ठरवलं होतं, तसंच करायचं. आधी ते फोटोज दाखवून काही माहिती मिळतेय का त्याची चौकशी करायची, प्रजापतींबद्दल काही कळतंय का ते बघायचं….आणि ठरल्याप्रमाणे सकाळी आठ वाजेपर्यंत तो निघाला सुद्धापण जवळपास तीन तास वणवण करूनही त्याच्या हाताला फारसं काहीच लागलं नाही….

*******************************

सायलीला फोन करावा का? त्याच्या मनात आलं. पण मग लगेचच त्याने तो विचार मनातून काढून टाकला. सायलीला काय सांगणार? आपल्याला इथे रात्री पुन्हा असले भयानक अनुभव आले असं? आपली मदत घेणं तिला जड जातंय हे तिने न सांगताही त्याला कळत होतं. उगीच असलं सगळं सांगून तिच्यावरचं मानसिक दडपण कशाला वाढवायचं? त्यापेक्षा काहीतरी ठोस माहिती मिळाली की नंतरच कॉल करू तिला.

पण अशी ठोस माहिती मिळणार तरी कधी? आणि कशी? इथे आल्यापासून फक्त ते फोटोज हा एवढाच क्लू मिळाला होता त्याला. बाकी सगळ्या घटनांनी त्याच्या समोर प्रश्नांची आणि गूढ अनुभवांची मालिकाच उभी केली होती. कोडं एका बाजूने सुटत होतं पण दुसऱ्या बाजूने ते दुप्पट वेगाने गुंतागुंत वाढवत होतं. आणि ते फोटोज….त्यांच्याबद्दलही पुढे काय करायचं, त्याला कळत नव्हतं.

तो जितका जास्त विचार करायला लागला तितकं त्याचं डोकं जास्तच भणभणायला लागलं.

रजा घेऊन आलेला होता तरीही त्याला ऑफिसमधून ईमेल्स आणि कॉल्स येताच होते. थोडा बदल तरी होईल म्हणून त्याने काही ईमेल्स चेक केले.

हे लोक पण नाएवढ्या नीट इंस्ट्रक्शन्स देऊन आलोय तरी ह्यांना स्पून फीडिंग करावं लागतं..”

त्यातला एक मेल वाचून तो वैतागला. त्याने ऑफिसला फोन लावला.

अरे काय रे हे….परवा सगळं दाखवलं होतं ना मी तुम्हाला….आता ह्या असल्या फालतू कामासाठी ईमेल करताय तुम्ही? “

“——-” समोरचा माणूस

नाही? नाही कसं म्हणतोस तू? अरे ड्रॉव्हर्स मधेच आहेतिथे बघ ना तिकडे…..”

बोलताबोलता तो स्वतःच थांबला. समोरचं हॅलो, हॅलोऐकून पुन्हा भानावर आला.

हात्या ड्रॉव्हर्स मधेच आहे. तिथून काढून घ्याआणि प्लिज कीप इट रेडी बाय टुडे इव्हिनिंग….चल ठेवतो…”

घाईघाईत फोन ठेवून तो पुन्हा विचारात गढून गेला. आत्ता त्याच्याच तोंडातून निघून गेले ते शब्द…”तिथे बघ …” हे कालच त्याने स्वप्नात ऐकले होते , नाही का?

म्हणजे …..कदाचित त्या घरात, त्या खोलीत…….काहीतरी होतं….कदाचित पुढचा क्लू…..ती सावली, ते जे कुणी होतं, ते काय म्हणालं होतं त्याला….”तिथे बघ….तिथे…” …तिथे म्हणजे कुठे? कदाचित त्याच खोलीत काहीतरी असेल…..पण म्हणजे ते शोधण्यासाठी पुन्हा त्या घरात जावं लागणार….

एक आवंढा गिळून तो उठलाअंगावर भीतीचा शहारा उठला होता, तरी मन पुढे जाण्यासाठी सहमत होत होतं.

बॅगपॅक पाठीवर लटकवली आणि तो तसाच पुढे निघाला

—————————————————–

सुजय अस्वस्थपणे घरात फेऱ्या मारत होता….सायलीची आई सकाळी फोनवर म्हणाली होती, “जे कळायचं होतं ते कळलंयम्हणजे काय? आणि तो पुण्याला गेला आहे त्यावरून त्या असं म्हणाल्या होत्यानंतर सायलीकडून कळलं की ती पुण्याला आहे. मी पुण्यात आहे आणि सायलीही पुण्यात आहे, यावरून तिच्या आईला काय कळलं नक्की?

खूप विचार करूनही त्याला उत्तर मिळत नव्हतं. पण त्यातही सायली पुण्यात आहे, हे सायलीकडूनच कळल्यामुळे तो थोडाफार निर्धास्तही झाला होता. आधी त्याने सायली पुण्यात असण्याचा आणि घरात ती टेलरची रिसीट मिळाल्याचा थोडाफार संबंध जुळवून पहिला. पण बाकी कुठल्याच गोष्टी जुळत नव्हत्या. एकतर असं सगळं असताना सायलीच्या घरचे लग्नाचं पुढे नेणारच नाहीत. कुठल्याही पालकांनी त्याला सगळ्यात आधी जाबच विचारला असता. पण सायलीच्या आईने तर आज लग्नाची खरेदी वगैरे ठरवायला फोन केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे सायलीने स्वतः त्याला सांगितलं होतं ती पुण्यात असल्याचं. म्हणजे तिला ते लपवायचं नव्हतं. मी पुण्यातच आहे, हेसुद्धा तिला आधी माहित नव्हतं असंच वाटलं तिच्या बोलण्यावरून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याच्या खऱ्या घरापर्यंत असं येऊन पोहोचणं सोपं नव्हतं. त्याने असा कुठलाच मार्ग ठेवला नव्हता की खऱ्या सुजयच्या खऱ्या आयुष्यापर्यंत कोणी येऊन पोहोचेल. सगळे मार्ग खोट्या सुजयपाशीच येऊन थांबतील अशीच व्यवस्था केली होती त्याने. सायली एवढ्या पुढेपर्यंत कशी येऊन पोहोचेल? तेसुद्धा त्याला अजिबात चाहूल लागू न देता…..छेशक्यच नाही….

सायलीच्या बाबतीत आलेला संशय त्याने मनातून झटकून टाकला. पण अर्थात त्याचं सगळं लक्ष लागलं होतं ते म्हणजे सिद्धार्थच्या बाबतीत त्याची माणसं काय खबर आणतायत, त्याकडे.

आई आणि काकाकाकू मगाशीच बाहेर गेले होते. त्यालाही खूप गळ घातली त्यांनी त्यांच्याबरोबर बाहेर येण्याची. पण काही ना काही कारण सांगून त्याने ते टाळलं. आता विचार करत करत तो घरभर उगीचच फिरत होता. फिरताफिरता गच्चीवर जाणाऱ्या जिन्याच्या खाली त्याचं लक्ष गेलं. जिन्याखाली वर्षानुवर्षे तसंच पडून राहिलेलं सामान होतं. जुन्या बॅग्ज होत्या. पूर्वी आईला जमेल तसं ती ते सामान बाजूला करून साफसफाई करून घ्यायची. पण सध्या स्वतःची तब्येत आणि आल्यागेल्याचं संभाळण्यापलीकडे तिच्याकडून फारसं काही होत नसे. तरीही ती जागा बऱ्यापैकी साफ दिसत होती, फारशी धूळ नव्हती म्हणजे साधारण महिन्याभरापूर्वी तिने साफ सफाई करून घेतलेली असणार. काय, काय साठवून ठेवलंय आपण ह्या बॅग्ज मध्येलहानपणची काही मोडकी खेळणी, आवडता शर्ट, जुनी पुस्तकंआणि बरंच काही….

एकदम लहानपणच्या सगळ्या आठवणी उफाळून आल्या. इतक्या वर्षात ह्या बॅग्ज उघडूनही बघितल्या नव्हत्या. त्यात ती सगळ्यात खालची लाल बॅग. आईला त्याने बजावून सांगितलेलं होतं, “ह्यात माझा लहानपणचा खजिना आहे, मला विचारल्याशिवाय त्याला हातही लावू नकोस आणि त्यातल्या वस्तू टाकूनही देऊ नकोस…” आता लहानपणचा तो स्वतः त्याच्या डोळ्यांसमोर आला आणि तो स्वतःशीच हसला. भराभर जाऊन त्याने वरचं सगळं सामान, बाकीची अडगळ, बॅग्ज सगळं बाजूला काढलं आणि ती लाल बॅग बाजूला घेतली. त्याला नंबर लॉक होतं. आई त्याच्या नकळत ते सगळं अडगळ म्हणून टाकून देईल ह्या भीतीने त्याने आईलासुद्धा तो नंबर सांगितलेला नव्हता. पण त्याला मात्र तो कायम पाठ होता. बॅग उघडल्यावर मात्र त्याच्या चेहऱ्यावरचं हसू, उत्साह एकदम मावळला.

समोर होत्या त्याच्या आयुष्यातल्या त्याला नकोशा वाटणाऱ्या आठवणीआता त्याच्या लक्षात आलंदीड वर्षांपूर्वी त्याने ही बॅग एकदा उघडली होतीत्याच्या लहानपणचा खजिना बघण्यासाठी नाही, तर काही वस्तू त्यात लपवण्यासाठी. कधी एकदा ते सगळं एखाद्या जुन्या बॅगमध्ये टाकून नजरेआड करतोय असं त्याला झालं होतं. त्यातल्या त्यात ही बॅग सेफ होती. आईला किंवा आणखी कोणाला ती उघडताही आली नसती. म्हणून त्याच्या सगळ्या खजिन्यावर त्याने सगळ्या नको असलेल्या आठवणी टाकून दिल्या आणि बॅग बंद करून टाकली. नकोशा गोष्टी आपण सोईस्कर विसरून जातो, त्याप्रमाणे तो विसरूनही गेला होता हे सगळं. पण आता असं अचानक त्या वस्तूंच्या रूपाने पुन्हा सगळं त्याच्या समोर आलं होतं. समोर काही फोटोज होते एका पाऊच मध्ये. ते त्याने उघडलं. पहिलाच फोटो. जाड भिंगांचा चष्मा, बरेचसे पांढरे झालेले केस आणि लांब दाढी…..बराच वेळ तो त्या फोटोकडे बघत होतात्या फोटोबरोबर बऱ्याच नको असलेल्या आठवणी जाग्या झाल्या होत्या

त्याचा स्वतःचा फोटो …..पण ह्या फोटो च्या तर दोन कॉपीज दिल्या होत्या त्या फोटो स्टुडिओ वाल्यानेएक माझ्याकडे आली ….मग दुसरी कुठे गेली? तो विचार करत राहिला

——————————————-

प्रजापती निवासच्या बाहेर येऊन सिद्धार्थ उभा राहिला. आत जायचं तर होतं पण धाडस होत नव्हतं. त्याने त्याच्या बागेतून ते दोन फोटो बाहेर काढले….एक सुजयचा आणि दुसराही सुजयचाच….काय संबंध असेल सुजयचा ह्या सगळ्याशी? शोधून काढायचं असेल तर आत जायलाच हवं….त्याने ते फोटोज परत आत ठेऊन दिले आणि तो ‘प्रजापती निवास’ च्या दिशेने निघाला….

क्रमशः

14 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 32)

 1. Aarya
  January 10, 2017

  Mast part. Waiting for the next part….

  Liked by 1 person

 2. Vaishali Agre
  January 10, 2017

  mastech…. suspense vadhat chlay…please pudhcha bhag lavkar taka

  Like

 3. Renu m. Gupta
  January 10, 2017

  it’s become more suspense full. more interesting please post anther part of this.
  thank you….. have a great and colorful full life.

  Like

 4. sarika devrukhkar
  January 11, 2017

  ata na khupch suspense vadhat chalay maja yetey pn ek request fakt chotishi request ahe sagale part taka na please please

  Like

 5. sarika devrukhkar
  January 11, 2017

  amhi ter tumchya site ver dole launch basto kadhi tumhi next part taktay ani kadhi amhi vachtoy purn story taka na please

  Like

  • rutusara
   January 11, 2017

   Thanks 🙂 Purn story ashi ekdam nahi takta yenar…mag tumhala barach jasta thambava lagel 🙂

   Like

 6. ujvala varande
  January 16, 2017

  hi kasha aahat tume. khup suspense vadat aahe aata khup maza yete vachyala. pan aata jara lavkar post takat ja khup divas zale.

  Like

 7. Pranjali
  January 16, 2017

  Getting interesting with every part!!!!

  Like

 8. sarika devrukhkar
  January 23, 2017

  HELLO RUTUSARA, PLEASE NEXT PART LAVKAR PRAKASHIT KARA NA

  Like

Leave a Reply to Aarya Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on January 10, 2017 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: