davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 33)

त्याचा स्वतःचा फोटो …..पण ह्या फोटो च्या तर दोन कॉपीज दिल्या होत्या त्या फोटो स्टुडिओ वाल्यानेएक माझ्याकडे आली ….मग दुसरी कुठे गेली? तो विचार करत राहिला

——————————————-

प्रजापती निवासच्या बाहेर येऊन सिद्धार्थ उभा राहिला. आत जायचं तर होतं पण धाडस होत नव्हतं. त्याने त्याच्या बागेतून ते दोन फोटो बाहेर काढले….एक सुजयचा आणि दुसराही सुजयचाच….काय संबंध असेल सुजयचा ह्या सगळ्याशी? शोधून काढायचं असेल तर आत जायलाच हवं….त्याने ते फोटोज परत आत ठेऊन दिले आणि तो ‘प्रजापती निवास’ च्या दिशेने निघाला….

**********************भाग ३२ पासून पुढे*************

भाग ३२ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-OZ

 

घराच्या दरवाजापाशी येऊन तो पुन्हा थबकला. ह्या घरात काल तो एक जीवघेणा अनुभव घेऊन परत गेलेला होता. रात्री स्वप्नातही त्याला हे घर जसंच्या तसं दिसलं होतं. जणू काही तो प्रत्यक्ष येऊन गेलेला असावा, असं. आणि आत्ता परतकाय होईल ह्या वेळी? पुन्हा तसलंच सगळं दिसेल का? आत्ता कितीही धीर एकवटला, तरीही नंतर हात पाय गळणारच आहेतत्या वेळी स्वतःला कसं सावरायचं? तेवढ्यात घराचं दार उघडलंदिसताना ते जोराच्या वाऱ्याने उघडल्यासारखं दिसलं, पण त्याला माहित होतं. हे त्याला आत येण्यासाठी दिलेलं निमंत्रण होतं.

 

आत्ता कोणीतरी बरोबर असतं तर किती बरं झालं असतं…..निदान वाटणारी भीती तरी थोडी कमी झाली असती….. इथे पुढे आपलं काही बरंवाईट झालं तर बाहेर कोणाला कळणार तरी आहे का? हा विचार मनात आला आणि त्याचं आत जाण्यासाठी पुढे उचललेलं पाऊल आपोआप मागे गेलं. खरंचहा विचार आपल्या मनात आधी कसा नाही आला? आपण इथे आत ह्या घरात जातोय, हे कोणालाच माहित नाहीये. आपण इथून कधीच बाहेर नाही आलो तर? जिवंतच नाही राहिलो तर? आईचं काय होईल? तिला कळणारही नाही माझं काय झालं ते………

 

मनात असले विचार यायला लागले आणि तो पटकन मागेच फिरला. ‘प्रजापती निवासच्या गेटमधून बाहेर आला आणि तिथेच बाहेर एका झाडाला टेकून उभा राहिला.

 

काय करायचं आता? आत जावं की नको? गेलो नाही, तर हे रहस्य कधीच कळणार नाही….आणि मग सायलीला जी साथ द्यायची ठरवली आहे, ती देता येणार नाही….पण आत गेलो आणि काही बरंवाईट झालं तर? आईचं काय? तिला कोण सांभाळणार? पण असा निगेटिव्ह विचार का करतोय आपण? आपला हेतू वाईट नाहीये, मग असं भलतंसलतं कसं होईल? आत्ता दोन्ही वेळेलाही आपण सही सलामत बाहेर पडलो ह्यातूनतेवढ्या वेळेपुरतं आपल्याला ते सगळं दिसलं, पण शारीरिक ईजा कुठे झाली? हा आता, पहिल्या वेळेला थोडं भान हरपल्यासारखं झालं हे खरं आहे, रात्री उशिरापर्यंत तिथे आपण काय करत होतो, हे आपल्यालाही सांगता नाही येणार…..पण ….पण तरी बाहेर आलो ना काहीही न होताईशाचा फोन आला आणि जाग आली त्यावेळी…….एक्झॅक्ट्ली…. म्हणजे तिने जागं केलं आपल्याला….. कोणीतरी बरोबर असणं ह्यासाठी गरजेचं आहे की आपल्याला ते भानावर आणू शकतात….किंवा असंही असू शकतं की कोणालातरी सोबत घेऊन आत गेलं तर कदाचित हे सगळं दिसणारही नाही आपल्याला….आत्ता दोन्ही वेळा आपण अगदी एकटे होतो, आधी ह्या घरात आणि नंतर हॉटेलच्या रूममध्ये….त्यामुळे आपलंही लक्ष तिकडेच जास्त वेधलं गेलंह्या दोन्ही वेळेला कोणीतरी आपल्या सोबत असलं असतं, तर कदाचित …..जे दिसलं, जे अनुभवलं….ते तसं नसलं असतं

 

पण मग आत्ता कोण कसं सोबत करणार? त्यासाठी कोणालातरी इथे कटनीला बोलवावं लागणारनाहीते शक्यही नाहीये आत्ता आणि त्यात खूप वेळही जाईल.पण सोबतीसाठी कोणीतरी फिज़िकली इथे असण्याची गरजच नाहीये मुळी…..कोणालातरी फोन करायचा आणि बोलतबोलत आत जायचंम्हणजे कुणीतरी बरोबर असल्यासारखंही वाटेल आणि आपलं लक्षही दुसरीकडे राहील

 

बरोबर….त्याने स्वतःच्याच विचारांशी सहमत झाल्यावर मान हलवली. पण फोन कोणाला करणार? आईला फोन करायचा तर आत्ता ती घरी नसणार नक्कीच, त्याने घड्याळात पाहत म्हटलं. बाजूला काकूंकडे गेली असणार. आणि तिच्याशी बोलायचं म्हणजे दहा प्रश्नांची उत्तरं तयार करून ठेवावी लागणार, नकोच ते…..मग त्याने त्याच्या दोनचार मित्रांना फोन करून पहिले. पण दोघांचे फोनच उचलले गेले नाहीत. आणि दुसऱ्या दोघांनी थोड्या वेळाने फोन करतोम्हणून घाईघाईत फोन ठेवून दिला….त्यांची तरी काय चूक म्हणा, आज वर्किंग डे होता. तेसुद्धा गडबडीतच असणार….अर्थात आता सायली किंवा ईशाला फोन करण्यावाचून पर्याय नव्हता…..

 

आधी ईशाला फोन करूया म्हणून त्याने मोबाईलवर लास्ट डायल्ड नंबर्स मध्ये तिचा नंबर शोधायला सुरुवात केली. पुढच्याच क्षणी त्याला स्वतःवरच हसायला आलं. काय चाललंय आपलं? आपल्याला खरं तर बोलायचंय सायलीशी….हे आपल्याला पक्कं माहित आहेबाकी सगळ्यांशी फोनवर बोलणं होऊ शकलं नाही तेव्हा मनातून खरं तर बरं वाटलं आपल्याला कारण आता त्या निमित्ताने सायलीला फोन करता येईल….काय मूर्ख आहे मी पण? इथे मी एकटाच आहे मग एवढा देखावा करायची काय गरज आहे? इथे कोणीतरी सोबत असतं तर किती बरं झालं असतं हा विचार मगाशी मनात आला, पण त्याच बरोबर ते कुणीतरीम्हणजे सायलीच होती हे माझं मला माहित होतं, तरी हा खटाटॊप, बाकी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करण्याचं नाटक….हे कशासाठी केलं मी? हे म्हणजे जणू काही आतला सिद्धार्थ बाहेरच्या सिद्धार्थपासून लपवून, खोटं बोलून काहीतरी करायला बघतोय आणि आतल्या सिद्धार्थला सायलीशी बोलायचंय हे जणू काही आपल्याला बाहेरच्या सिद्धार्थला कळू द्यायचं नाहीये, अशातला प्रकार झाला….आता त्याला स्वतःवरच खूप हसू यायला लागलं….ते सीरिअल्स, मुव्हीज मध्ये डायलॉग्ज असतात ना, ‘तुम अपने आप से भाग नही सकतेवगैरे तेच झालं आत्ता आपल्या बाबतीत….

 

हसत हसत त्याने सायलीला फोन लावला सुद्धा….पहिल्याच रिंगला फोन उचलला गेला तेव्हा मात्र तो दचकलासायलीला नक्की काय सांगायचंय हे त्याने ठरवलंच नव्हतंतिच्यासाठी तो रिस्क घेतोय हे तिला आवडत नाही हे त्याला माहित होतं

हॅलो…..सिद्धार्थ….”

तिने पुन्हा फोनवर हाक मारली तसा तो त्याच्या तंद्रीतून बाहेर आला..

हा……हॅलो…..”

 

काय रे ? तू बरा आहेस ना सिद्धार्थ? असा काय तू ? आत्ता मी फोन उचलला तेव्हा तू हसत होतास ना? म्हणजे मला तसंच वाटलं.. आणि मग काही आवाजच नाही तुझा….इज एव्हरीथिंग ओके?” तिच्या आवाजात काळजी होती.

 

हो, हो….मी ठीक आहे गंतू इतक्या पटकन फोन उचललास की मी एकदम गडबडूनच गेलो अगं….”

तिच्याशी काय बोलावं त्याला आता सुचेना

अरे मी तुलाच फोन करायला फोन हातात घेतला होता, म्हणून लगेच उचलला मी फोन…”

 

अच्छाका सहजच ना?”

 

हो रे तसं सहजचम्हणजे खरं तर ईशा ऑफिसला गेली आहे आणि आज संध्याकाळी मी घरी परत जाणार आहे. आत्ता अशीच बसले होते तर म्हटलं तुला विचारूया काही कळलं का पुढे? तू चौकशी केलीस का कुठे? आणि तुला काही हेल्प लागली तर मला सांग प्लिज….म्हणजे इथून जी काही मदत होऊ शकते ती मी नक्कीच करेन…..”

 

हम्म….तसं काही खास कळलं नाही अजून…..”सायलीला किती आणि काय सांगायचं ह्याचा विचार करत तो म्हणाला

 

पण मग ….म्हणजे आता काय करायचं?”

 

मी विचार करतोय की त्या प्रजापती निवासमध्ये पुन्हा जाऊन येईन….…”

 

काय ?” त्याला मधेच तोडत सायली जोरात किंचाळलीच.

सिद्धार्थकडून लगेचच काही उत्तर आलं नाही तशी ती थोडी शांत झाली. त्यापुढच्याच क्षणाला तिच्या आवाजावर आणि मनातल्या भीतीवर कसाबसा ताबा ठेवत तिने विचारलं,

सिद्धार्थ, तुला माहित आहे. त्या घरात काहीतरी विचित्र आहे, काल एकदा अनुभव घेऊन झालाय तुझा. ते फोटोज त्याच घरात मिळाले, म्हणजे नक्की त्या घराचा ह्या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे…..आता पुन्हा तसंच काहीतरी झालं तर? कशाला उगाच विषाची परीक्षा घेतोयस?”

 

एक्झॅक्ट्ली सायली….तूच म्हणालीस ना, ह्या घराचा काहीतरी संबंध आहे, असं? मी पण हाच विचार केला अगं, ह्या घराचाच संबंध आहे, तर मग इथेच काहीतरी क्लू पण मिळाला पाहिजे ना….” सिद्धार्थ.

 

पण तुला असं का वाटलं की इथे काहीतरी मिळेल?”

खरं तर काल पडलेलं ते स्वप्न, ते स्वप्नात पुन्हा दिसलेलं हेच घर, आतल्या खोलीत कुणाचातरी आवाज, ‘तिथे बघहे शब्द…….ह्या सगळ्या गोष्टींची बॅकग्राऊंड होती सिद्धार्थच्या पुन्हा इथे येण्यालापण सायलीला हे सांगायचं की नाही हे त्याला अजून कळत नव्हतं. आपल्याला इथे आपल्यापासून सारखेच असे अनुभव येतायत, हे तिला नकोच कळायला, पण तसंच सांगायची वेळ आली तर मात्र तिला सांगायला हवंच

काय विचारतेय मी सिद्धार्थ?” सिद्धार्थकडून काहीच उत्तर आलं नाही तसं सायलीनेच पुन्हा विचारलं. ” हे बघ सिद्धार्थ, ह्यात खूप रिस्क आहे….ह्या आधी आपल्याला, म्हणजे तुला माहित नव्हतं, त्या घरात तू गेलास तेव्हा तिथे असं काहीतरी असू शकतं. पण आता तुला नक्की माहित आहे, तर का स्वतःहून चालत जातोयस त्या घरात? एक तर, तुला काही झालं, काही हेल्प लागली तर आम्ही इथे, एवढ्या लांब आहोत, लगेच येऊही शकणार नाहीतिथे आणखी कोणी आपल्या ओळखीचंही नाही. प्लिज तू हा विचारच काढून टाक डोक्यातून. देअर मस्ट बी सम अदर वे अँड वुई विल फाईंड इट आऊट….”

 

सायली, प्लिज जरा ऐकून घेतेयस का माझं? मी इथे सगळीकडे चौकशी केली अगं. मी ते फोटोज घेऊन सगळीकडे विचारलं. त्या प्रजापतींबद्दलही विचारलं. कुठूनही काहीच धड माहिती मिळाली नाही. फार पूर्वीच ते घर रिकामं झालंय बहुतेक, इथे आजूबाजूला फारसं कुणी राहतच नाही. बाजूला सगळी पडकी घरं, आय मिन, अगदी मोडकळीला आलेली जुनी घरं आहेत, राहणारी लोकं आधीच जागा सोडून गेले असावेतघरांच्या एका बाजूला एक रस्ता आणि त्या रस्त्याच्या पलीकडे एक एकदम चार उंच बिल्डिंग्जसचं एक मोठं कॉम्प्लेक्स आहे. पण ते साधारण वर्षांपूर्वीच उभं राहिलंय. त्यात राहणारी सगळी लोकं अलीकडेच राहायला आली आहेत….काही फ्लॅट तर अजून रिकामेच आहेत. आता ह्या घरांच्या समोर मी म्हटलं तसं मैदान आहे आणि मैदानाच्या त्याकोपऱ्यात ते मंदिर आहेते सुजयच्या फोटोतलं मंदिर. त्यातला पुजारीपण नवीन आहे. सकाळी चौकशी करायला गेलो होतो तेव्हा एक मिडल एज्ड कपल भेटलंआत्तापर्यंत मी भेटलेल्यांपैकी पूर्वीपासून असे तेच राहत आहेत इथेसहा वर्षांपूर्वी ते इथे आले, तेव्हापासून समोरची ती घरं अशीच आहेत म्हणाले. अगदी एवढी मोडकळीला आलेली नव्हती तेव्हा, आणि काही घरात लोकं पण राहत होती, असं म्हणाले. पण बाकी त्यांना काहीच माहित नाही. “

थोडं थांबून एक दीर्घ श्वास घेऊन सिद्धार्थ पुढे म्हणाला,

मी अजून प्रयत्न करतोय सायली. प्रजापतींबद्दल काही कळण्याचे सगळे मार्ग बंद झालेत असं मी म्हणणार नाही, पण ते एवढं सोपं नाहीये….जर समोरच्या, आजूबाजूच्या कोणालाही त्यांच्याबद्दल माहित नसेल तर मग आणखी कोणाला विचारायचं? आणि म्हणून मी त्या घरात जाऊन शोधण्याचा विचार करतोयकारण सध्या काही क्लू मिळाला तर तो तिथेच मिळेल, आणखी कुठेही नाही अँड आय एम शुअर अबाऊट इट….काल मी इथे कोणत्या परिस्थितीत होतो तुला माहित आहे, तिथे घरात आजूबाजूला आणखी काही आहे का हे बघण्याचं मला सुचूही शकलं नसतं. नंतर विचार केल्यावर मला असं वाटलं, तिथे काहीतरी असू शकेल ना आणखीआणखी एखादा फोटो, किंवा एखादा कागद, …काहीतरी मिळेल….”

 

मला तुझं पटत नाहीये असं नाहीये सिद्धार्थ. पण जीवावरचा धोका पत्करायची खरंच गरज आहे का? आणखी वेळ लागणार असेल तर लागुदेत ….”

 

पण आणखी वेळ घालवूनही काहीच हातात मिळणार नसेल तर? त्या घरातच काही सापडायचं असेल तर? मला, तू म्हणतेयस ते कळतंय. म्हणून त्याच्यावर एक सोल्युशन पण शोधलंय मी….नॉट शुअर इफ इट विल वर्क पण बघूया…”

आणखी पाच मिनिटांनी सायलीशी फोनवर बोलत सिद्धार्थने प्रजापती निवासचं दार ढकलून आत पाय टाकला.

———————————————-

मित्राचं काम? कोणता मित्र?”

सुजय त्याला माहिती पुरवणाऱ्या माणसाशी बोलत होता.

ऑफिसमधल्या कोणत्यातरी मित्राचं काम आहे, आणि त्याला सोबत करण्यासाठी तो सिद्धार्थ गेलाय असं कळलं आम्हाला…”

 

अरे हो, पण कोणता मित्र? त्याला काही नाव असेल ना? त्याची चौकशी केलीत का?” सुजय

 

मित्राचं नाव नाही कळलं सरत्याने त्याच्या आईला असंच सांगितलंय की ऑफिसमधला एक मित्र आहे, त्याच्याबरोबर तो जातोय. आमच्या माहितीप्रमाणे कोण मित्र ते त्याने त्याच्या आईला सांगितलेलं नाहीये, म्हणजे त्याच्या नेहेमीच्या मित्रांपैकी कोणी असला असता तर तो आईला तसं नाव सांगून गेला असता ना…..म्हणजे खरंच ऑफिसमधला असणार कोणीतरी…”

 

असं एकदम कन्क्लुजन वर उतरू नका….एक काम कर….ऑफिसमध्ये चौकशी करा आताती कशी करायची तुमची तुम्ही बघा. ऑफिसमधले त्याचे कोण मित्र आहेत ते बघा आधी आणि त्यांच्यापैकी कोणी त्याच्याबरोबर गेलाय का ते बघा..”

 

पण तो एकटाच ट्रेन मध्ये गेला असं कळलं होतं आम्हाला….”

 

म्हणजे तो एकटाच गेलाय असं होत नाही ना? त्याचा मित्र त्याच्या बाजूलाच उभा असेल तरी तुम्ही त्याला ओळखाल का? नाही ना? मग? तो एकटाच आहे असंच वाटणार तुम्हाला….आणि असंही असू शकतं की त्याचा जो कोणी मित्र आहे, तो आधीच्या किंवा नंतरच्या स्टेशनवर चढला असेलकिंवा खरंच तो एकटाच गेला असेल ….काहीही असू शकतं पण जे काय आहे ते मला लवकरात लवकर कळायला हवं…”

 

चालेल….जमेल तेवढ्या लवकर माहिती मिळवून सांगतो तुम्हाला….ठेवतो सर….”

फोन ठेवला तसं सुजयच्या डोक्यात पुन्हा विचारांचं चक्र सुरु झालं. सिद्धार्थ खरंच मित्राच्या कामासाठी गेला असेल? तसं असेल तर काहीच प्रश्न नाही. पण तसं नसेल तर ? खोटं बोलून जाण्याएवढं काय महत्वाचं काम असेल त्याचं? आणि सगळ्यात महत्वाचंतो नक्की कोणत्या स्टेशनवर उतरला असेल?

सुजय….अरे बाबा चहा हवाय म्हणून मागे लागला होतास नाआता कधीची हाका मारतेय, चहा थंड झाला आता…” आई शेवटी त्याला बोलवायला बाहेर आली होती.

 

हो झालंच माझं. चल आलोच….”

 

एक मिनिट थांब, आत काकाकाकूंच्या समोर बोलता येणार नाही मला…..काय चाललंय तुझं सुजय? ते आल्यापासून दहा मिनिटं तरी शांतपणे बसून बोलला आहेस का त्यांच्याशी? तुला भेटायला म्हणून आलेत तेतुझ्याबद्दल फार वाटतं त्यांना….काय चाललं असतं तुझं मोबाईलवर सारखं? कोणाचे फोन येतात तुला? आणि काल काका गमतीने म्हणाले पण, सुजयला कोणी भेटली की काय मुंबईलासारखा फोनवरच आहे आल्यापासूनआमच्याशी पण बोल म्हणावं थोडा वेळ….सुजय, असं खरंच काही नाहीये ना? ”

 

काय…..आई काहीतरीच काय बोलतेयस? योगिताबरोबर लग्न मोडल्यापासून ह्या सगळ्यापासून लांब पळायचा प्रयत्न करतोय मी, माहित आहे ना तुला ? आणि अगं, मी म्हटलं नाही का तुला, रजेवर असलो तरी कामाचे फोन चालूच असतात गंआणि मी सांगून आलोय की काही अर्जंट असेल तर फोन करा. मग अटेंड नको करायला फोन? ”

 

बरं कळलं…..आणि तू लग्नाचा विचार करत असशील तर आम्हाला काय नको आहे का? करच तू, पण आम्हाला सांग हो सगळं. मागच्या दोन्ही वेळी असं झालं, काळजी वाटते रे म्हणून …”

 

अगं पण तसं काही नाहीये, मी म्हटलं ना….”

 

कळलं….राहूदेत..मी आधी म्हटलं त्याचा तरी विचार करशील? काकांना बोलायचंय तुझ्याशी….”

 

होबोलतोआणि जेवल्यावर फिरायला पण जाऊठीक आहे?”

———————————————————–

एवढं सगळं नीट समजावून आलोय मी, तरी ऑफिसमधून सारखे फोन येतायत, …वैताग आला नुसता….”

फोनवर बोलताबोलता सिद्धार्थची नजर घरभर फिरत होती. तरी मुद्दाम सायली आणि तो वेगळ्या विषयावर बोलत होते. लक्ष थोडं दुसरीकडे राहण्यासाठी…..त्यांनी तसंच ठरवलं होतं..

आता काय करणार सिद्धार्थ? लोकांना जबाबदारी घ्यायची नसते. तुम्ही पुढे व्हा, इंस्ट्रक्शन्स द्या, आम्ही तेवढं फॉलो करतोउद्या काही चूक झाली तर जबाबदारी आमची नाहीआणि म्हणूनच असे लोक फारसे पुढे जात नाहीतत्यांना स्वतः डिसिजन्स घ्यायचे नसतात, रिस्क घ्यायची नसते….”

सायली वेगळ्या विषयावर बोलून सिद्धार्थला साथ देत होती खरी पण खरं तर तिचं सगळं लक्ष लागलं होतं, सिद्धार्थला त्या घरात काय सापडतंय आणि कधी तो त्या घरातून एकदाचा बाहेर पडतोय, ह्याकडे.

ते झालंच….”

बोलताबोलता बाहेरची खोली तपासून झाली होती. खरं तर आतली ती खोलीच बघायची असं त्याच्या डोक्यात होतं आधी. पण नंतर त्याने विचार केला की एवढं आत जातोच आहोत तर सगळं घरच एकदा तपासून बघूयाबाहेरच्या खोलीत कोपऱ्यातलं टेबल आणि काही रिकामे बॉक्सेस सोडले तर तसं काही नव्हतंचकुठे कानाकोपऱ्यात काही आहे का ते त्याने बघितलं, पण तसं काहीच नव्हतंआता तो आत पॅसेज मध्ये जायला वळला.

आणि मला सांग, आपल्या कंपनीमध्ये किती कमी रिस्ट्रिक्शन्स आहेत, लोकांना हवं तसं काम करण्याची परवानगी आहे, बऱ्याच बाबतीत फ्लेक्सिबिलिटी दिलेली आहे, तरी लोकं स्वतःचे डिसिजन्स घ्यायला घाबरतात….आपल्यामध्ये ती कुवत आहे हे माहित असून परिणामांचा विचार करून आधीच घाबरतात आणि मग हे असं प्रत्येक गोष्टीत अप्रूव्हल घ्यायला बघतात….”

सायली बोलत होती खरी पण सिद्धार्थचं तिच्या बोलण्याकडे लक्ष असेलच ह्याची तिला खात्री नव्हती. पण म्हणून बोलणं थांबवून चालणार नव्हतं. समोरून सिद्धार्थचा काहीच प्रतिसाद आला नाही तसं तिने पुन्हा त्याला विचारलं,

हॅलो….सिद्धार्थ….ऐकतोयस ना तू…..”

 

हो, हो……ऐकतोय अगंइथे आत पॅसेज मध्ये अंधार आहे ना,…लाईटचं बटन शोधत होतो….हामिळालंमागे आलो होतो तेव्हा आपोआप खेचला गेल्यासारखा इथे आलो होतो, अंधार होता ते कळत होतं पण लाईट्स लावायला हवेत हे सुचलंही नाही तेव्हा…..”

सिद्धार्थ पुन्हा त्या विषयाकडे वळतोय म्हटल्यावर सायली अस्वस्थ झाली.

सिद्धार्थ, तो विषय नको आत्ता…..लाईट्स लागलेत का?”

 

नाही….लाईट्स बंद आहेतअगं इलेक्ट्रिसिटी नसणार ह्या घरात इतक्या दिवसांपासून बंद आहे….”

 

मग आता?”

सायलीने विचारलेला प्रश्न सिद्धार्थला ऐकू गेला होता की नाही, कुणास ठाऊक……त्याच्या डोक्यात आत्ता वेगळेच विचार सुरु झाले होते….हे आपल्याला आधी का नाही लक्षात आलं? जरा वेगळंच आहे हे….

सिद्धार्थ…..” सायलीच्या हाकेने तो पुन्हा भानावर आला

 

हा….काय…..सॉरी माझ्या डोक्यात आत्ता काहीतरी वेगळंच आलं सायली….मागच्या वेळेला बाकी सगळ्या आलेल्या हॉरर अनुभवांमुळे ही गोष्ट लक्षात नाही आली माझ्या, पण आत्ता इथे लाईट्स लावताना लक्षात आलं. सायली, आत्ता किती वाजलेत सांग बरं….दुपारचे साडेबारा वगैरे होत आलेत बरोबर? मग ह्या अशा वेळी एखाद्या घरात इतका अंधार कसा असू शकतो, की आतली वाटही दिसू नये? लाईट्सची गरज पडावी, इतका? खोलीच्या खिडक्या बंद असतील पण तरी बाहेर एवढा लक्ख उजेड असताना कुठल्याही खिडकीच्या काचेतून, फटीतून तो अगदी अजिबात आत येऊ नये? जरासं विचित्र नाही वाटत का हे? आधीसुद्धा मी आलो होतो तेव्हा ह्या पॅसेज मध्ये आणि आत खोलीत काळामिट्ट अंधार होता आणि बाहेरच्या खोलीतल्या उजेडाचा झरोका पॅसेजमध्ये येत होता म्हणून मला थोडं दिसत होतं. आत्ताही तसाच अंधार आहे इथे, म्हणजे बाहेरची खोली पूर्ण उजेडात आणि इथे पूर्ण अंधार, जणू काही घराचे हे दोन्ही भाग एकमेकांना जोडलेले नाहीच आहेत, इथे पॅसेजपासून आत अंधाराचं एवढं साम्राज्य का? हे म्हणजे असं ना की जणू काही इथे आत राहणारी माणसं वेगळ्याच जगात राहणारी असावीत….”

सिद्धार्थच्या तोंडून ते सगळं ऐकताना सायलीच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला

सिद्धार्थ, हॅलो….तू ….असं काय बोलतोयस….कोण इथे राहणारी माणसं? तू….आर यु ओके सिद्धार्थ?”

 

हो….हो सायली डोन्ट पॅनिक आय एम ओके….अगं मी माझं म्हणणं तुला कळावं म्हणून बोललो तसंआणि मला थोडी भीती वाटत होती म्हणून तुला फोन केला तर आता तूच घाबरतेयसइथे अंधारात तर मी उभा आहे…”

 

सॉरीसॉरी पण मला वाटलं की तू अचानक असंबद्ध बोलायला लागलायस म्हणून जरा घाबरले मीपण तुझं म्हणणं कळलं मलाखरंच आधी माझ्याही लक्षात आला नाही हा पॉईंट….विचित्र आहे फारपण आपण एक करू शकतो सिद्धार्थ आपण व्हॉट्स अँप विडिओ कॉल करूया का?”

 

अगं पण करून काय उपयोग? एवढ्या अंधारात काय दिसणार आहे तुला…”

 

हो तेपण आहेच….मग आता?”

 

आहे तसंच चालू ठेऊया….तू , म्हणजे आपण बोलत राहूमी मोबाईलमधून टॉर्च ऑन ठेवतो आणि आत जातो..”

 

ओके, चालेल…..पण सिद्धार्थ काहीही वाटलं तरी मला फोनवर सांगायचं. मी तिथे नसले तरी इथून जमेल तशी सगळी मदत करेन तुला….फक्त बोल जे काय दिसतंय ते…”

 

हो चालेलएक मिनिट मी मोबाईलचा टॉर्च ऑन करतो….तू बोलत राहा सायलीमला इथे आणखी दुसरा कुठला विषय डोक्यात येणं केवळ अशक्य आहे….”

 

हम्म……तर मगाशी आपण काय बोलत होतो ते अर्धवटच राहिलंबरं ते जाऊदेत सिद्धार्थ, मला सांग मी रजेवर जायच्या आधी एच.आर मधून शॉर्टलिस्टेड सी.व्हीज आले होते, ते तुला आणि रामला मी फॉरवर्ड केले होते. मी बॉसना म्हटलं होतं, तुम्ही हॅण्डल कराल आणि एक वीक मध्ये एच.आर.ला रिप्लाय कराल. काही केलं की नाही तुम्ही लोकांनी….”

 

हो, त्यातले काही सीव्हीज मी बघितले सायली, सॉरी सगळे बघायला वेळ झाला नाही, बाकी वर्कलोड पण खूप होतंरामपण बघणार होता….पण नंतर आमचं त्याच्याबद्दल काही बोलणं झालं नाही….पण…..”

बोलताबोलता सिद्धार्थ एकदम थांबला. पुढे काही क्षण त्याचा आवाजच सायलीला आला नाही.

सिद्धार्थ, आर यु देअर?” सायलीने सावध होत विचारलं

पण समोरून काहीच आवाज नव्हता. सायली कासावीस व्हायला लागली.

सिद्धार्थ, ऐकतोयस का तू?”

सायलीने जरा जोरात ओरडून विचारलं. कानाचा फोन काढून स्क्रीनवर बघितलं. पण कॉल तर सुरु होता.

सिद्धार्थ…..”

ती पुन्हा ओरडली….कॉल डिस्कनेक्ट करून पुन्हा कॉल करावा का? पण नको, त्याने फोन उचलला नाही तर नंतर बोलणंच होणार नाही त्याच्याशी

तेवढ्यात फोनवर काहीतरी खरखर ऐकू यायला लागली आणि त्यापाठोपाठ सिद्धार्थचा मध्ये मध्ये ब्रेक होणारा आवाज….

सायली……इथे आत नेटवर्क नाहीये वाटतं. तुझा आवाज येत नाहीये नीट…..”

 

हो, ठीक आहे त्याचा आवाज ऐकून सायलीचा जीव भांड्यात पडला. “पण तू बोलत राहा सिद्धार्थ. मला सांग आत पोहोचलास का तू….”

 

“…………………”

 

सिद्धार्थ…….सिद्धार्थ…………”

 

सायली ऐकू येतंय का तुला? मी आतल्या खोलीत आलोय आणि इथे रेंज नाहीये…..मी तुला करतो फोन. कदाचित नीट बोलता येईल ….”

त्याचा आवाज क्लिअर येतच नव्हता, सायली कसातरी अर्थ लावत होती

अरे नाही, नाही……नको सिद्धार्थ….फोन कट करू नकोपरत लागलाच नाही तर….हॅलो …..हॅलो…. सिद्धार्थ…. ” पण सिद्धार्थने कॉल आधीच डिस्कनेक्ट केला होता.

सायलीने घाईघाईने पुन्हा त्याला त्याला कॉल केला. पण तिची शंका खरी ठरली. सिद्धार्थचा फोन नॉट रिचेबललागत होता.

ओह नो….आता काय करू मी?” सायलीला आता काय करावं ते सुचेना. “सिद्धार्थ त्या घरात आहे आणि तिथे काय चाललंय हे कळण्याचा काहीच मार्ग नाहीये ….काय करायचं?”

————————————————

सिद्धार्थसुद्धा सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करत होताच. सायली फोनवर बोलत होती तोपर्यंत आजूबाजूच्या वातावरणातला बदल त्याला फारसा जाणवला नव्हता. आता मात्र सायलीचा आवाज बंद झाला आणि आजूबाजूची शांतता एकदम अंगावर आली त्याच्या. ते विचित्र घुसमटलेपण, आजूबाजूला कोणीतरी असल्याची जाणीव, रोखून बघणारी नजर आणि त्या भयाण शांततेतून कधी कुठला आवाज ऐकू येईल ह्याचा धसका. आपल्या मागे सतत कोणीतरी आहे असं जाणवायला लागलं त्याला. एकदा तर अगदी कोणाचातरी स्पर्श झाल्यासारखं वाटलं, दचकून त्याने वळून बघितलं, पण पूर्ण काळोखाशिवाय आजूबाजूला काहीच नव्हतं.

 

मोबाईलमधून उजेड येत होता, तो ह्या अंधारासाठी पुरेसा नव्हताच. त्या एवढ्याशा उजेडामुळे त्याला समोरचं जे काही दृश्य दिसत होतं, ते त्या उजेडाच्या बाहेरच्या अंधारामुळे आणखीनच भीतीदायक वाटत होतं. पण एक मात्र खरं की आज सिद्धार्थ भानावर होता. मागच्या वेळी आला होता तसा आपोआप खेचल्यासारखा आला नव्हता, पूर्ण शुद्धीत स्वतः ठरवून आलेला होता. अर्थात, पूर्ण भानावर असल्यामुळे भीतीसुद्धा तितकीच वाटत होती. इथे पुढे काय होणार, काय समोर येणार आहे, हा पुन्हा पुन्हा डोक्यात येणारा विचार त्याने कसाबसा बाजूला ठेवला होता. इथून आपल्याला जे हवंय, ते शोधून लवकरात लवकर बाहेर जायचं, बाकी कसलाही विचार करायचा नाही, असं ठरवून त्याने सगळ्या खोलीभर मोबाईलचा टॉर्च फिरवायला सुरुवात केली. आपण इतकं ठरवून आलो, इथे अंधार आहे हे माहित होतं तरीही एक चांगला, भरपूर उजेडाचा टॉर्च आणायचा हे कसं काय सुचलं नाही आपल्यालास्वतःवरच चरफडत त्याने समोर कोपऱ्यात टाकलेलं सामान शोधायला सुरुवात केली. सामानात नक्की काय, काय होतं, हे नक्की त्यालाही कळत नव्हतं. पण त्यात दोन जुन्या हॅन्डबॅग्स होत्या, आणि काही प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या. हॅन्डबॅग्स रिकाम्याच होत्या, तरी त्याने दोन दोन वेळा त्याचे सगळे कप्पे तपासले. प्लास्टिक च्या पिशव्यांमध्ये मात्र काहीतरी असल्यासारखं वाटत होतं. पिशव्यांची गाठ सोडून त्याने आत हात लावून चाचपून पाहिलं. कपड्यांसारखं काहीतरी असावं असं वाटत होतं

 

पण नक्की काय असावं काहीच कळत नव्हतं, त्यामुळे त्या प्लास्टिकच्या पिशव्या त्याने आपल्याबरोबर बाहेर न्यायच्या ठरवल्या. पिशव्या हातात घेऊन दुसऱ्या हाताने मोबाईलचा टॉर्च खोलीभर फिरवत तो दुसऱ्या कोपऱ्यात आला, पण इथे तर तसं काहीच नव्हतं. खाली कचऱ्यासारखे काही फाडलेले कागद पडलेले होते. त्याने ते उचलून पहिले, पण त्यावर तसं काहीच लिहिलेलं त्याला दिसलं नाहीआता तो चालत समोर आला….खोलीच्या चार कोपऱ्यांपैकी दोन त्याचे तपासून झाले होते. खोलीचं दार दोन कोपऱ्यांच्या मध्ये होतं. दार उघडून आत आल्यावर समोर जे दोन कोपरे दिसतात ते त्याने आत्ताच पहिले होते….

 

आता खोलीच्या दाराच्या समांतर दिशेत डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे दोन कोपरे बघायचे होते….खोली बाकी तशी रिकामीच होती. खोलीत मध्ये अधे, वर भिंतीवर वगैरे असं आणखी काहीही नव्हतं, कुठलाही कपाट वगैरे नव्हतं. आता हे एवढे दोन कोपरे चेक केले की झालं….तो चालत साधारण खोलीच्या मध्यावर आला असेल आणि त्याने डाव्या बाजूच्या कोपऱ्यात टॉर्च मारून बघायचा प्रयत्न केला, पण काहीच दिसलं नाही….इथे ह्या कोपऱ्यातला अंधार एवढा गडद कसा? निदान काही सामान पडलेलं आहे का, एवढं तरी दिसायला हवं होतं एवढ्या उजेडातपण समोर अंधाराची काळी भिंत होती, त्याने थोडं आणखी पुढे जाऊन पाहिलं, पण तरीही काहीच दिसलं नाही.

 

इथे नंतर पाहूया, म्हणून त्याने उजव्या कोपऱ्याच्या दिशेने मोर्चा वळवलाइथे एक मोडकं टेबल ठेवलं होतंबाकी काहीच नव्हतंत्याने त्या टेबलच्या जवळ जाऊन पाहिलं, त्याला एक ड्रॉवर होता….त्याने तो उघडायचा प्रयत्न केलापण तो फारच घट्ट बसला होता….ड्रॉवर उघडायची खटपट करतानाच अचानक त्याला आठवलं, मागच्या वेळी ह्याच कोपऱ्यात कुणीतरी असल्याचा भास झाला होता, तेव्हा मात्र हे टेबल इथे बघितलं होतं की नाही, त्याला आठवेचना.

 

मागे खसरखसर …’ असला काहीतरी सरपटल्यासारखा आवाज आला आणि तो जोरातच दचकला. एवढ्या वेळात त्या खोलीत फक्त त्याला अपेक्षित असेच आवाज येत होते, त्याने प्लॅस्टिकच्या पिशव्या उघडल्या, तो आवाज, बॅग्ज उघडल्या तो आवाज…..त्यामुळे कशीबशी त्याने त्याच्यातल्या भीतीवर मात केली होती आणि कुठलेही निगेटिव्ह विचार मनात न आणता तो त्याचं शोध घ्यायचं काम करत होता. पण हा आवाज..? तोही त्याच्या मागून आलेला….आजूबाजूची हवा थंड पडत चालल्याचं त्याला जाणवलं आणि त्याचा धीर सुटायला लागला….काहीतरी घडणार होतं निश्चित….आपल्यामागे काहीतरी हालचाल होतेय असं जाणवून तो पुन्हा एकदा दचकला. धीर करून मागे वळून त्याने समोर अंधारात टॉर्च मारलापण काहीच दिसलं नाही….आता आपल्याला पटापट इथून बाहेर पडायला हवंत्याने एकदाचा खूप जोर लावून तो ड्रॉवर उघडला….आत एक डायरी होती आणि त्याच्यावर एक फोटो ठेवलेला होता….

 

मागून येणारा तो आवाज आता जरा जास्तच जोरात येतोय असं त्याला जाणवलं…..

मिळालं का ?”

वाऱ्यावर सळसळणारा आवाज आला….पाठोपाठ कुणाच्यातरी किनऱ्या आवाजातलं हसणं…..तो थिजल्यासारखा त्या डायरी आणि फोटोकडे बघत उभा राहिला…..पुढच्या क्षणी त्याच्या लक्षात आलं, हे घेऊन आता इथून निघायला हवं पण मागे काय आहे ते अजिबात बघायचं नाही….

 

ज्या हातात त्या प्लास्टिकच्या पिशव्या होत्या, त्याच हातात त्याने ती डायरी आणि फोटो घेतला..फोटो कुणाचा आहे, कसला आहे हे बघण्याचीही त्याला संधी मिळाली नव्हती….सगळं हातात धरून तो दरवाज्याच्या दिशेने जायला वळला,तेवढ्यात हातातून तो फोटो खाली पडला.

 

फोटो घ्यायला तो वाकला तेव्हा टॉर्चच्या उजेडात त्याला फोटोवरचा तो चेहरा दिसला….एका मुलीचा फोटो होता तो..फोटो उचलून तो उठलादरवाज्याच्या दिशेने पाय टाकणार तेवढ्यात….

 

तिथे बघ….तिकडे ….”वरखाली होणारा आवाज…..’खसर ….खसर …….’सरपटल्याचा आवाज…….पण सिद्धार्थ तिकडे बघणार नव्हता…..तो दरवाज्याच्या दिशेने आणखी पुढे जाणार तर समोर दरवाजाच नाही मुळी…..असं कसं झालं? दरवाजा तर इथेच होता, आपल्या समोर…..तो गोंधळलाआपण फोटो उचलायला वाकलो ते कदाचित मागे वळून मग वाकलो असू….म्हणजे दरवाजा मागे असेलतो मागे वळलापण समोर काहीच नव्हतं….पण त्याच्या डाव्या हाताला त्या अंधाऱ्या कोपऱ्यात मात्र आता त्याला एक दार दिसत होतं….इथे आहे होय खोलीचं दार एव्हढा गोंधळ कसा झाला आपला? जाऊदे ….आता मात्र कशाकडेही लक्ष द्यायचं नाही

 

समोर दरवाजा दिसत असलेल्या त्या अंधाऱ्या कोपऱ्याच्या दिशेने तो वळलातिथे समोर चालत गेलातो दरवाजा त्याने उघडला आणि विजेचा झटका बसावा तसा मागे गेला….समोर एक मुलगी बसली होती, वर छताकडे बघत….त्याने भीतभीत स्वतःच्या हातातल्या फोटोकडे बघितलं…..तीच मुलगी….. आणि मग किनऱ्या आवाजातला तो हसण्याचा आवाज …….तो आवाज तिचाच आहेसिद्धार्थने स्वतःला सांगितलं….पण ती हसताना तर दिसत नव्हती…..ती वर छताकडे ज्या दिशेने बघत होती, त्या दिशेने त्याने वर पाहिलं….

 

क्रमशः

7 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 33)

 1. RENU M GUPTA
  January 30, 2017

  ARE YAAR YE TO OUR SUSPENSIV HOTA JA RAHA HAI OUR DARAVNA BHI. MAJA AA GAYA. PLEASE POST NEXT PART AS SOON AS POSSIBLE. YOU ARE GREAT WRITER.

  Like

  • rutusara
   January 30, 2017

   thank you Renu ji….I have seen non-marathi people watching marathi shows on TV but never thought my story wld be read and liked by someone who comes from non-marathi background…aapke comments isiliye special hein mere liye…..:)

   Like

 2. Anonymous
  January 30, 2017

  SUSPENSE VADHAT CHALAY. PLEASE LAVKAR PHUDACHA BHAG TAKA

  Liked by 1 person

  • rutusara
   January 30, 2017

   dhanyavaad 🙂 pudhcha bhag lavkarat lavkar

   Like

 3. Pranjali
  February 4, 2017

  Mast….waa! Maja aali!!!

  Like

 4. RENU M GUPTA
  February 4, 2017

  Thanks Rutusara ji mere lie to yehi kafi hai ki aap mere comment ka reply karti ho. our such me aap ki story bahut achhi hai.bas ab aage ke parts kab aayenge uska intjar hai. please is bar thoda jald post kijiega next part.

  Like

 5. sarika devrukhkar
  February 15, 2017

  please madam next part update kara na

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on January 30, 2017 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: