davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 34)

तिथे बघ….तिकडे ….”वरखाली होणारा आवाज…..’खसर ….खसर …….’सरपटल्याचा आवाज…….पण सिद्धार्थ तिकडे बघणार नव्हता…..तो दरवाज्याच्या दिशेने आणखी पुढे जाणार तर समोर दरवाजाच नाही मुळी…..असं कसं झालं? दरवाजा तर इथेच होता, आपल्या समोर…..तो गोंधळलाआपण फोटो उचलायला वाकलो ते कदाचित मागे वळून मग वाकलो असू….म्हणजे दरवाजा मागे असेलतो मागे वळलापण समोर काहीच नव्हतं….पण त्याच्या डाव्या हाताला त्या अंधाऱ्या कोपऱ्यात मात्र आता त्याला एक दार दिसत होतं….इथे आहे होय खोलीचं दार एव्हढा गोंधळ कसा झाला आपला? जाऊदे ….आता मात्र कशाकडेही लक्ष द्यायचं नाही

 

समोर दरवाजा दिसत असलेल्या त्या अंधाऱ्या कोपऱ्याच्या दिशेने तो वळलातिथे समोर चालत गेलातो दरवाजा त्याने उघडला आणि विजेचा झटका बसावा तसा मागे गेला….समोर एक मुलगी बसली होती, वर छताकडे बघत….त्याने भीतभीत स्वतःच्या हातातल्या फोटोकडे बघितलं…..तीच मुलगी….. आणि मग किनऱ्या आवाजातला तो हसण्याचा आवाज …….तो आवाज तिचाच आहेसिद्धार्थने स्वतःला सांगितलं….पण ती हसताना तर दिसत नव्हती…..ती वर छताकडे ज्या दिशेने बघत होती, त्या दिशेने त्याने वर पाहिलं….

************************ भाग ३३ पासून पुढे **********************

भाग ३३ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-QY

 

वर काहीच दिसत नव्हतं.

कोण आहेस तू?”

सिद्धार्थने तिच्याकडे बघत विचारलं….पण त्या मुलीची नजर जराही हलली नाही, ती तशीच टक लावून वर बघत होती.

 

मगाशी त्याचा जो गोंधळ झाला होता, तो आता हळूहळू दूर होत होता. आता तो पुन्हा भानावर येत होता. पण आता त्याच्या जे लक्षात येत होतं, ते समजण्याच्या पलिकडचं होतं. त्याला तिथे मिळालेला तो फोटो…. त्याने पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहिलं आणि मग समोरच्या मुलीकडे. नक्कीच तीच मुलगी होती. कोण आहे पण ही? अंधारात काय करत असेल? आणि ह्या दरवाज्याच्या मागे का बसली असेल? आणि हा दरवाजा मगाशी इतक्या वेळा ह्या कोपऱ्यात टॉर्च मारूनसुद्धा का नाही दिसला? आपण ज्या दरवाजातून आत, ह्या खोलीत आलो, तो का नाही दिसला आपल्याला?

 

त्याने आजूबाजूला वळून पाहिलं. सगळीकडे काळामिट्ट अंधार होता. काहीही दिसत नव्हतं. मोबाईलचा टॉर्च वापरून त्याने पुन्हा बघितलं. पण अंधार इतका गडद होता की त्या टॉर्चचा उजेडही त्याला भेदू शकत नव्हता.

 

तिथे बघ…..तिथे ….” सळसळता आज कानावर आला. त्याने दचकून समोर त्या मुलीकडे पाहिलं. हा तिचाच आवाज असावा, त्याचं मन सांगत होतं. पण ती तर एखाद्या पुतळ्यासारखी वर टक लावून बसली होती. सिद्धार्थने तिच्याकडे निरखून पाहिलं. फारतर दीड हात लांब असेल तो तिच्यापासून, तरीसुद्धा ती त्याच्यापासून किती तरी लांब वाटत होती. दुर्बीण घेऊन एखादी गोष्ट बघावी, तर ती जशी दिसेल तशी काहीशी दिसत होती ती….डोळे वर बघताना दिसत असले तरीही ते आपल्यावरही रोखलेले आहेत असंही जाणवत होतं आणि रोखलेले असले तरीही त्यात काहीच भाव नाहीत, हेही मनातल्या मनात त्याला कळत होतं. पण असं सगळं आपल्याला का वाटतंय? आपल्याला फक्त ती त्या दरवाज्यात बसून वर बघताना दिसतेय….

 

काय करावं आता? हे जे काही दिसतंय, ते थोडं वेगळं आहे, नॉर्मल नाहीये हे त्याला जाणवत होतं. हिचा फोटो इथे मिळाला, आणि ही इथे अंधारात बसलीये….काय आहे हे सगळं? ही जिवंत तरी असेल का आत्ता? जिवंत माणसासारखी तर दिसत नाहीये….हा विचार डोक्यात आला आणि त्याच्या छातीत विलक्षण जोरात धडधड व्हायला लागली, हाताचे तळवे ओलसर व्हायला लागले

 

त्याच्याही नकळत तो एक एक पाऊल मागे जायला लागला. मागच्या दाट अंधारातून एक अस्पष्ट आवाजातली किंचाळी ऐकू आली आणि तो जागच्या जागीच गारठला. समोरचं दृश्य डोळ्यांसमोरून विरळ विरळ होतंय की काय असं वाटायला लागलं. आणखी कसलातरी आवाज येत होता, कसला पण? कुठलातरी ओळखीचाच आवाज होता, पण कुठला ते आठवत नव्हतंखोलीतला अंधाराचा गडदपणा जरा कमी झालाय की काय….विचार करतानाच समोर लक्ष गेलंतो दरवाजा, ती मुलगी….कुठे होतं सगळं?

 

क्षणभर त्याला बावचळल्यासारखंच झालं….आत्ता काही क्षणांपूर्वी जे बघितलं ते खरं होतं की आत्ता जे घडतंय ते खरं आहे? की दोन्ही माझे भासच आहेत……

 

मागून तो आवाज सारखाच यायला लागला…..हळूहळू त्याच्या लक्षात आलं….त्याच्या मोबाईलची रिंग वाजत होती.

 

सायलीचा फोन. स्क्रीनवर बघून तो जोरात ओरडलाच. तिचा कॉल आल्याचं बघून त्याला आनंदाचा इतका मोठा धक्का बसला होता की त्या आनंदाच्या भरात तो हे सुद्धा विसरून गेला की आजूबाजूचा अंधार इतक्या झपाट्याने कमी होत चालला होता की फोनवर सायलीचा नंबरसुद्धा त्याने सहज वाचला होतापण कॉल रिसिव्ह करून त्याने फोन कानाला लावला आणि मग लगेचच त्याच्या ही गोष्ट लक्षात आली….

हॅलो…..सायली…..”

 

सिद्धार्थ….?  ओह थँक गॉड सिद्धार्थ, मी किती वेळ फोन लावतेय तुला….आर यु ओके? तू ठीक आहेस ना ?”

सायलीचा आवाज मध्ये मध्ये तुटत होता पण त्याला कळेल इतपत क्लीअरसुद्धा होता.

येसआय एम ओके सायली……आणि….आणि माझ्या आत्ताच लक्षात आलंय, सायली….खोलीत आता अंधार वाटत नाहीये अजिबात….”

 

म्हणजे? म्हणजे काय नक्की ? तू तिथेच आहेस का अजून ?”

 

हो….मी इथेच आहे अगं….आणि अगदी आत्ता आतापर्यंत डोळ्यांना काहीच दिसणार नाही एवढा अंधार होतामोबाईलचा टॉर्चसुद्धा कमी पडत होता अगंआणि आता अचानक, म्हणजे हळूहळू अंधार कमी होऊन खोलीत उजेड कधी आला मला लक्षातसुद्धा आलं नाही…”

 

तू इतका वेळ त्या खोलीत आहेस? काय करत होतास एवढा वेळ?” सायली जोरात किंचाळलीच

 

अगं एवढी काय ओरडतेयस? मला जे शोधायचं होतं, ते शोधायला, आता काहीच नाही तर खोलीचे चार कोपरे तपासायला मला १५२० मिनिट्स तरी लागणारच ना……”

 

१५२० मिनिट्स? सिद्धार्थ, संध्याकाळचे पाच वाजून गेलेत….कळतंय का? तू किती वाजता आत आला होतास? साडेबाराला बरोबर? एवढे चारपाच तास काय करतोयस तिकडे? म्हणजे तुला खरंच माहित नाहीये का संध्याकाळ झाली आहे ते…..?”

 

पाच वाजून गेलेत??…”

सिद्धार्थने कानाचा फोन बाजूला करून वेळ बघितली. खरंच सव्वापाच होत आले होते….

सिद्धार्थ…..सिद्धार्थ, माझं ऐक तू….आधी तिथून बाहेर पड आता. एक मिनिटही थांबू नकोस ….आत्ताच्या आत्ता बाहेर पड आणि मग मला कॉल करप्लिज आता एवढं ऐक….”

सिद्धार्थ गोंधळला होता खरं तर, पण आधी सायलीला शांत करणं महत्वाचं होतं

सायली, ऐक तर….अगं मी खरंच ठीक आहे, हा म्हणजे थोडा वेळेचा गोंधळ झाला खरा माझा, पण बाकी मी ठीक आहे. आणि खरं सांगू का….इथे या खोलीत अंधार जाऊन उजेड आला तेव्हापासून इथे तसं नॉर्मलच वाटतंयम्हणजे बाकीच्या खिडक्यांतून येतो तसा बाहेरचा उजेड आत येतोय. आता मला खोलीतलं सगळं दिसतंय. तू एवढी पॅनिक होऊ नकोस, मी पूर्ण शुद्धीत आहे आता….असा तडकाफडकी कसा बाहेर पडू? माझं काही बघायचं राहिलंय का, ते बघतो, आणि मग लगेच निघतो. पाचच मिनिट्स फक्त. घाईघाईत बाहेर पडलो आणि काहीतरी महत्वाचं इथे मागे राहिलं असं नको व्हायला…..पुन्हा उद्या इथे येण्याची हिम्मत नाही माझ्यात…”

 

म्हणजेतुला काही वेगळं असं दि…”

 

सायली ऐक ना…” ती काय विचारणार हे कळल्यावर तिला मधेच तोडत सिद्धार्थ म्हणाला, ” आपण बोलू सगळं नंतर. मी आता आधी इथे पुन्हा एकदा सगळं नीट बघतो, पाचव्या मिनिटाला बाहेर पडतो आणि लगेच फोन करतो तुला….कळलं?”

 

ठीक आहे, पण काळजी घे. तिथे रेंगाळू नकोस….पाच मिनिटात तुझा फोन नाही आला तर मी कॉल करते पुन्हाटेक केअरबाय…”

 

बाय…”

सायलीशी बोलून झाल्यावर सिद्धार्थ आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवून बघायला लागला. पण काही केल्या त्याला गेलेल्या वेळेचा हिशोबच लागत नव्हता. मगाशी अंधाराचं साम्राज्य असलेली ही खोली आणि आत्ताची अंधाराचा मागमूसही नसलेली खोली,….आपण एवढा वेळ नक्की इथेच होतो ना अशी शंका त्याला यायला लागली. आपण आत आलो साडेबारा वाजता आणि आता वाजलेत सव्वापाच. आपल्याला आठवतंय त्याप्रमाणे,आपण आधी हे समोरचे दोन कोपरे बघितले, अंधारामुळे त्याला कदाचित जरा जास्त वेळ लागला असेल, पण तरी किती? १० मिनिटांच्या ऐवजी २० मिनिट्स. त्यानंतर ह्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात बघितलं. तिथे टेबलाचा ड्रॉवर उघडायला जरा वेळ गेला, जास्तीत जास्त १० मिनिट्स असेल, तरी एकूण अर्धा तास….त्याच्यानंतर आपल्याला खोलीचा दरवाजाच मिळाला नाही, पण मग नंतर इथे समोर दरवाजा दिसला, अंधारात आपण धडपडत तिथे गेलो, त्या सगळ्यात दहा मिनिटं मोडली असतील. म्हणजे चाळीस मिनिटं एकूण. आणि नंतर तो दरवाजा उघडल्यावर ती मुलगी समोर दिसली, ती वर बघत होती, आपल्याला काही आवाजही येत होते आजूबाजूला आणि आपण तिच्याकडे बघत होतो….किती वेळ? पाच मिनिटं? नाही, थोडं जास्त असेल१५ मिनिटं ……………पण….नाही ….कदाचित अजून जास्त….

 

तो जसजसा ह्यावर विचार करत होता, तसा तो आणखीनच गोंधळून जात होता. ती मुलगी,…..आपण तिच्याकडे बघत होतो हे खरं आहेपण किती वेळ? त्याला अंदाजच येत नव्हता. म्हणजे, इतका वेळ आपण इथे असे उभे राहून त्या मुलीकडे बघत होतो? आपल्याला कळलंही नाही आपण इतका वेळ समोर एकटक बघत नुसते उभे आहोत ते? आणि ती मुलगी, ते दार कुठे आहे सगळं? ह्याच भिंतीत होतं ते दार….त्याने पुढे जाऊन भिंतीला हात लावून बघितला, न जाणो, भिंतीसारखंच दिसणारं दार कुठेतरी असायचं….पण नाही….तिथे फक्त भिंतच होती.

 

आत्तापर्यंत बघितलेलं ते सगळं दृश्य त्याच्या डोळ्यांसमोरून तरळून गेलं आणि त्याच्या हृदयाचे ठोके एकदम जलद पडायला लागले…..

 

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला कुणाकडेही जायची त्याला आता गरज नव्हती. त्याच्या आतला आवाज ओरडून त्याला काहीतरी सांगत होता आणि आता मात्र ते सगळं मान्य करण्यावाचून त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

 

मोबाईलची रिंग वाजली तसा तो जोरातच दचकला. सायलीचा फोन.

सिद्धार्थ, बाहेर पडलायस का तू तिथून?”

 

..??”

 

अरे आ ..काय ? कुठे आहेस ? बाहेर पडलायस ना त्या घरातून?”

 

नाही…..म्हणजे जस्ट बाहेरच निघतोय आतामी….मी करतो फोन सायलीगिव्ह मी टू मिनिट्स….”

 

ओके…”

आता त्याने भराभर पुन्हा खोलीतलं सगळं तपासायला घेतलं. पहिल्या कोपऱ्यात मिळालेल्या हातातल्या पिशव्या उघडून बघितल्या. त्यात लाल रंगाची एक शाल होती आणि लालपिवळी बांधणीची ओढणी….थोडा विचार करून त्याने ती पिशवी बरोबर घ्यायचं ठरवलं. हातातली डायरी आणि फोटोसुद्धा त्याच पिशवीत ठेवून समोरचा टेबल असलेला कोपरा चेक केला. खोलीत आणखी काहीही नव्हतं. खोलीचा दरवाजा उघडून तो बाहेर पडणारच होता तेवढ्यात ते शब्द त्याला पुन्हा आठवले,…”तिकडे बघ …” आणि नकळतच त्याची नजर वर भिंतीकडे गेली, जिथे ती मुलगी टक लावून बघत होती…..

————————————————-

सिद्धार्थ, आलायस ना तू त्या घरातून बाहेर आता…..?” सायली

 

? ..हो…..आलोय….पण तिथे…..” सिद्धार्थच्या डोळ्यासमोरून ते भिंतीवर पाहिलेलं हलतच नव्हतं..

 

थँक गॉड….आता माझ्या जीवात जीव आलाय माहितीये? बरं एक काम करूया का? मी आत्ता बस स्टॉप वर पोहोचतेच आहे, रिक्षात आहे आत्ता. ईशा भेटणार आहे मला मग आम्ही एकत्रच जाऊ घरीबसमध्ये बसले की खूप वेळ मिळेल मग सगळं नीट सांग ओके? ”

 

? अगं पण…..”

 

आणि तू दिवसभर तिथे आत होतासकाही खाल्लं पण नसशील ना? आधी जाऊन खाऊन घे काहीतरी मग बोलू आपणचल ठेवते हा मीआता उतरावं लागेल रिक्षातूनबाय…”

त्याला काहीच बोलण्याची संधीच न देता सायलीने फोन ठेवून दिला.

———————————————

सायली बसस्टॉपवर पोहोचली तेव्हा ईशा अजून यायची होती. सिद्धार्थ त्या घरातून सुखरूप बाहेर पडला हे कळल्यामुळे सायली आता निश्चिन्त झाली होती. आता फक्त बसमध्ये बसल्यावर सिद्धार्थशी बोलायचं होतं, खूप प्रश्न होते, त्याची उत्तरं एकत्र मिळून शोधायची होती. सिद्धार्थ इतका वेळ त्या घरात होता म्हणजे त्याला काहीतरी नक्कीच मिळालं असणार तिथे. आता तिला एक प्रकारचा उत्साह वाटत होता. शी, पण ही ईशा कुठे राहिली एवढा वेळ? मगाशीच निघाली होती ऑफिसमधून….हे पुण्यातलं ट्रॅफिक पण ना…..विचार करताकरताच तिने हातातल्या मोबाईलवरून ईशाचा नंबरही डायल करायला घेतला, तेवढ्यात

हाय सायली ….”

त्या आवाजाने सायलीचा सगळा उत्साह एकदम मावळला आणि ती एकदम सावध झाली. हा इथे कसा, योगायोग की आपला पाठलाग करतोय, हजार प्रश्न एकदम तिच्या डोक्यात सुरु झाले.

सायली…” सुजय आता तोंडभर हसत तिच्या समोरच आला.” अगं लक्ष कुठेय तुझं? दुसऱ्यांदा हाक मारतोय तुला…”

 

सुजय? तू? ” आता आनंद आणि आश्चर्य एकत्र चेहऱ्यावर दाखवणं सायलीला भाग होतं.” सॉरी, म्हणजे आत्ता मी तुझी हाक ऐकली पण तू इथे कसा असशील असा विचार करून मी दुर्लक्ष केलं. पण तू इथे? आय मिन,…..अचानक?”

पुढे आणखी काय बोलावं तिला सुचेना. आपण आणखी प्रश्न विचारले तर ह्याला संशय येईल की काय असं तिला वाटायला लागलं.

अगं असंचम्हटलं सरप्राईझ देऊया तुला….मी पण आज घरी परत जायला निघणार होतो. काही वेळापूर्वी फोन करून तुझ्या आईला विचारून घेतलं, तू कधी निघणार आहेस वगैरे. मग त्यांनी सांगितलं की आता थोड्या वेळात तू आणि ईशा निघणार आहात. मग मी त्यांना तुमचा जवळचा बसस्टॉप कोणता वगैरे सगळं विचारून घेतलं आणि मग इथेच आलो. मला वाटलं तेवढंच थोडा वेळ आपल्याला गप्पा मारता येतील. मी पण दोन दिवस पुण्यात आहे पण आपल्याला भेटायला पण नाही झालं. मी तर बिझीच होतो पण मला वाटलं होतं तुझा तरी फोन येईल किंवा तू तरी फिरायला जाण्याचं ठरवशीलपण काहीच नाही, म्हणून म्हटलं आता असंच भेटूया….”

त्याच्या बोलण्यातून सायलीला त्याची नाराजी जाणवली. त्याच्या दृष्टीने हे संशयास्पद असूच शकत होतं. लग्न इतक्या तोंडावर आलेलं असताना तिने त्याला भेटायला येण्यासाठी, फोन करण्यासाठीही पुढाकार घेऊ नये ह्यात त्याला संशय येण्यासारखं बरंच काही होतं…..आता काहीतरी करून सावरून घ्यायला हवं होतं.

आय नो सुजय तू चिडला असशीलमी फोन पण नाही केला तुला. पण खरं तर ईशा मुळे झालंय हे सगळं. मी काल संध्याकाळी तुला भेटायला यायचं ठरवलं होतं. पण मॅडमने मला काही प्लॅनच करू दिलं नाही. म्हणाली की तू माझ्यासाठी आली आहेस आणि आता सुजय आल्याचं कळल्यावर इथे पण त्यालाच भेटायला जाणारसो सॉरीआय नो, तू कन्व्हिन्स झाला नसशील पण खरंच ईशाचं मन मोडायचं नाही म्हणून मी टाळलं तुला भेटायचं. आणि तिने सगळं प्लॅन केलं होतं ना, दोन दिवस नुसत्या भटकलोय आम्ही, मुव्ही, शॉपिंग…..म्हटलं आम्हाला तरी असा मोकळा वेळ नंतर मिळेल की नाही काय माहित…”

 

अगं हो, हो….तू तर कारणांची लिस्टच देतेयस. एवढा काही मी चिडलेलो नाहीये….थोडं वाटलं फक्त पण तुझं बरोबर आहे. तुमचे प्लॅन्स कॅन्सल झाले असते तर ईशाचा पण मूड ऑफ झाला असता. ”

 

हम्म….बाकी? तुझं पुण्यातलं काम झालं? रजा कधीपासून घेणार आहेस?”

 

काम…..हो झालं तसं…..आणि रजेचं म्हणशील तर मी म्हणेन तेव्हापासून रजेवर जाऊ शकतो मीपण ही असली कामं सुरूच राहणार तरीही….म्हणून विचार केला की लग्नाच्या आधी २ दिवस रजा घेईन आणि मग नंतर  चारपाच दिवस मिळतील यु.एसला जायच्या आधी…”

 

आणि व्हिसाचं कधी करणार आहेस? ”

 

व्हिसा,…..अं…..हो….पुढच्या आठवड्यात जायचंय व्हिसासाठी……”

सायली आणि सुजय समोरासमोर उभे राहून बोलत होते तेवढ्यात ईशा आली, तिला फक्त सायली पाठमोरी दिसलीसुजय तिथे असेल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं.

सायले…..” तिने जाऊन सायलीला मिठीच मारली. “अगं सॉरी ट्रॅफिक लागलं यार खूपअसा वैताग आला होता ना…..बरं ते सगळं जाऊदेत….मला सांग सिद्धार्थचा काही फोन आला? काही कळलं का त्याला पुढे?”

तिची शेवटची वाक्य ऐकून सुजय मात्र एकदम सावध झाला. ईशाने अचानक तिथे येऊन नकळत केलेल्या नको त्या बडबडीमुळे सायलीसुद्धा अवाक होऊन तिच्याकडे बघतच राहिली. आता सगळं कसं सावरून घ्यायचं हे तिला कळत नव्हतं. पण काहीतरी बोलणं आणि तिला सुजय तिथे असल्याची जाणीव करून देणं तर गरजेचंच होतं.

अगं सोड ना ते कामाचं सगळं ईशा….इथे बघ तुझ्यासाठी काय सरप्राईझ आहे ते….”

तिने हातानेच ईशाला गर्रकन मागे वळवलं. समोर सुजयला बघून ईशाचीही विचित्र अवस्था झाली. तो तिथे असणं हे तिच्यासाठी अनपेक्षित होतं, आणि आत्ता नकळत आपण काय बोलून गेलोय हे तिला आठवलं आणि मग मात्र तिला काय बोलावं हेच सुचेना….ती प्रचंड गोंधळून गेली….तिच्या चेहऱ्यावरचे भाव अर्थात सुजयच्या नजरेतून सुटले नाहीतच..

सायली, मला नाही वाटत ती फार प्लेझन्टली सरप्राईझ झालीये असं. बघ ना, माझ्याकडे बघून हसली पण नाहीये तीते सोडसाधं हाय तरी?”

सुजयने वरवर जरी तो ईशाची मस्करी करत असल्याचं दाखवलं असलं तरी मनातून तो ह्या प्रश्नाचं उत्तर खरोखरीच शोधण्याचा विचार करायला लागला होता. ईशाने येऊन सिद्धार्थबद्दल बोलल्यावर सायलीच्या चेहऱ्यावर झालेले बारीकसारीक बदलही त्याने टिपले होतेच आणि आता तो समोर आहे हे कळल्यावर ईशाच्या चेहऱ्यावरचे भावही पुरेसे बोलके होते.

ईशा, सोड ना आतादोन दिवस आपण इतकी मजा केली ना..आता आज आपण तिघं मिळून एन्जॉय करू नासुजय मला भेटायला आलाय गंमला सरप्राईझ द्यायलातुझं ऐकलं ना मी दोन दिवस? केला का त्याला फोन तरी साधा? आता माझं एक ना….त्याच्यावर चिडू नकोसअगं हाय तरी कर त्यालात्याला वाटेल आपल्याकडचे सगळे लोकं असेच खडूस आहेत की काय…”

सायली ईशाला समजावण्याचं नाटक करत होती खरी, पण ईशाला हे जे काही चाललंय ते सगळं कळतंय तरी का आणि सुजयला नक्की संशय आलाय का, ह्या दोन्ही गोष्टींबद्दल तिला खात्री नव्हती.

ईशाला हळूहळू इथे काय चाललंय आणि सायली काय म्हणतेय ते कळत होतं….

सायले, तू नेहेमीच असं करतेस….सॉरी जीजूतुम्हाला रूड वाटेल माझं वागणंपण तुमचं आता लग्न होणार आहे ना सायलीशीमग काही मी येणार नाही तुमच्यात रोजथोडे दिवस आम्हाला द्या की सायली बरोबरसॉरी म्हणजे खरंच तुम्हाला बघून माझा मूड ऑफ झाला. आम्हाला खूप गप्पा मारायच्या होत्या आता पुणंमुंबई प्रवासातआता …”

 

ईशा….लहान आहेस का तू ? हाऊ रूड…” सायली

 

नाही आय कॅन अंडरस्टॅंड सायलीपण एक सांगू का ईशाअगं मी तर लगेच यु.एसला जाणार आहे लग्न झाल्यावरसायली इथे तुमच्याबरोबरच राहणार आहे….चिलबरं तू एवढी रागावणार असलीस तर मी जातो मग माझा माझा…..चालेल?”

 

नाही, नको. सॉरी….मी खरंच खूप वेड्यासारखी वागले….आपण जाऊ एकत्र नो प्रॉब्लेम

सायली आणि ईशाच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत हलकंच हसत सुजय म्हणाला,

ओकेथँक यु ईशा मॅडम…”

———————————————

बसमध्ये बसल्या बसल्या सुजयचं डोकं भन्नाट वेगाने पुढे धावत होतं. सायली आणि ईशा त्याच्या पुढच्याच सीटवर बसल्या होत्या. त्याने हुशारी करून त्या दोघींना एकत्र बसायला सांगून ईशाचं मन राखल्याचं नाटकही केलं होतं आणि स्वतः मात्र त्यांच्या मागची जागा मिळवली होती. म्हणजे सायली आणि ईशाला तो दिसत नव्हता. पण त्याला मात्र त्या दोघींवरही लक्ष ठेवता येणार होतं. अगदी थोडं डोकं उंच करून पाहिलं तर त्यांच्या मोबाईलवर कोणाचे कॉल्स येतायत हेसुद्धा त्याला दिसू शकलं असतं.

 

काहीतरी शिजत होतं त्यांच्यात एवढा अंदाज त्याला एव्हाना आलाच होता. एक तर, तो पुण्यात असल्याचं कळल्यावरही सायलीने त्याला भेटण्याचीही इच्छा दाखवली नव्हती. तो स्वतः तिच्यापासून शक्य तेवढ्या लांब का राहत होता, हे त्याला स्वतःला चांगलंच माहित होतं. तिला भेटण्याची तीव्र इच्छा होत असूनही त्याने मनाला आवर घातला होता. पण सायलीचं काय? कदाचित ईशामुळे तिने भेटण्याचं टाळलं असेलही. पण एखादा फोनही करू नये? तिचं आपल्याबरोबरचं वागणं जरा तुटकच असतं असं राहून राहून मनात येत असतानाही, आपणच तिला टाळतोय, ह्या विचाराने तो सायलीच्या तुटक वागण्याचंही समर्थन करायचा. पण तरीही या वेळी तिने त्याला फोन न करणं त्याला खटकलं होतं.म्हणून तर त्याने असं अचानक येऊन तिला भेटण्याचं ठरवलं होतं…त्यात नेहेमीच्या रिस्क्स होत्या, पण आज थोडी रिस्क घेऊन सायलीला भेटून तिच्या डोक्यात नक्की काय चाललंय ह्याचा अंदाज घ्यायचाच होता त्याला.

 

त्यात ईशा आली तेव्हा जे बोलली होती ते तर विसरणं शक्यच नव्हतं. सिद्धार्थचा फोन आला का, काही कळलंय का त्यालाअसं म्हणाली होती ती. सिद्धार्थ मित्राच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता, तर तिथून सायलीला फोन का करेल आणि त्याला असं काय कळणार होतं ज्याची त्या दोघी इतक्या आतुरतेने वाट बघत होत्या….त्यात नंतर त्याला पाहून ईशाचा पडलेला चेहरासायलीने तेवढ्यात कारण सांगून त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. पण तरीही सुजयला त्या दोघींचं सगळंच वागणं खूप संशयास्पद वाटलं होतं. आणि आता तो जसजसा विचार करत होता, तसतसा त्याचा संशय बळावत चालला होता. मागेही तो सिद्धार्थ सायलीकडे आल्यावर असलंच काहीतरी बोलला होता आणि सुजय समोर आल्यावर सगळेच गप्प बसले होते, आणि आज अगदी तसंच झालं होतं. सायली, ईशा आणि तो सिद्धार्थ ह्यांच्यात नक्की काहीतरी शिजतंय, पण आता ते शोधून कसं काढायचं ह्याचा तो विचार करत होता.

 

विचार करता करता अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी चमकून गेलं. त्याने स्वतःजवळ नीट जपून ठेवलेली ती टेलरची रिसीट बाहेर काढली.

 

ह्या रिसीटचा वापर कसा करायचा ह्याचाच आता विचार करायचा होता.

——————————————————

सायली आणि ईशाची अवस्था फारच विचित्र झाली होती. सुजयला दाखवायला म्हणून त्या दोघी हसतखिदळत काहीतरी गप्पा मारत होत्या, मधेच त्याच्याशीही काहीतरी बोलत होत्या पण दोघींचंही ह्या सगळ्यात अजिबात लक्ष नव्हतं. सिद्धार्थचे दोन वेळा फोन येऊन गेले होते, हे कळूनही सायलीला त्याच्याशी बोलता येत नव्हतं. त्यात मगाशी बसस्टॉपवर घडलेल्या सगळ्या प्रकारामुळे सुजयला थोडाफार संशय आला असेल, ह्या विचारानेही तिचं डोकं भणभणत होतं.

 

फूड प्लाझाला बस थांबली तेव्हा त्या दोघींना रेस्टरूमला जायच्या निमित्ताने बोलण्याची संधी मिळाली. तेवढ्या वेळात त्यांनी सिद्धार्थला फोन करून फक्त सगळ्या गोष्टींची कल्पना दिली आणि रात्री बोलूया असंही सांगितलं. बाहेर पडल्यावर सुजय त्यांची वाटच बघत होता. थोडं खाणं आणि चहा वगैरे झाल्यावर बसकडे परत जाताना सुजयने खिशातून ती रिसीट बाहेर काढली.

सायली….”

ईशाबरोबर पुढे जाणारी सायली थांबली. मागे वळून तिने विचारलं,

काय ?”

 

अगं ही रिसीट तुझी आहे का?”

 

रिसीट ? बघू बरं…”

 

ही घे….. आत्ता चहा घेतल्यावर तिथून निघताना दिसली मला, म्हणजे तू उभी होतीस ना तिथे मध्ये एकदोन वेळा पर्स उघडली होतीस ना, तेव्हा पडली असेल कदाचित…..नाव कळत नाहीये त्याच्यावरचंतुलाच कळेल कदाचित तुझी असेल तर…..”

सायलीने ती रिसीट हातात घेतल्यावरच ओळखलं, ही तिच्याच नेहेमीच्या टेलरची रिसीट होती

ओहकाय काय कचरा असतो ना पर्समध्ये….माझीच आहे रे ही रिसीटटेलरची आहेपण दोन महिन्यापूर्वीची आहेतू फेकून दिली असतीस तरी चाललं असतं….”

बोलताबोलता बाजूच्या कचऱ्याच्या डब्यात तिने ती रिसीट फेकून दिली.

 

बोलतबोलत ती आणि ईशा पुढे निघून गेल्या. पण सुजय मात्र जागच्या जागीच खिळून उभा राहिला. मनातल्या शंका बाजूला व्हाव्यात म्हणून फक्त त्याने ती रिसीट दाखवून खात्री करून घ्यायचं ठरवलं होतं पण खरं तर सायलीला एवढं सगळं कळणं शक्य नाही ह्याबद्दल मनातल्या मनात त्याला खात्री होती. पण आता काहीतरी वेगळंच समोर येत होतं. ही टेलरची रिसीट त्याला त्याच्या घरी मिळाली होती, ह्याचा अर्थ सायली त्याच्या घरी गेली होती??

 

बाजूच्या बसच्या हॉर्नने तो भानावर आला. आणि तसाच स्वतःच्या तंद्रीत चालत आत बसमध्ये आला. आता त्याच्या डोक्यात सगळ्या आधी घडलेल्या घटना घोळत होत्या. त्याच्या घरात सापडलेली रिसीट जर सायलीची असेल तर ह्याचा अर्थ ती माझ्या घरी येऊन गेलेली आहे. तिला आपल्याबद्दल सगळंच कळलेलं असू शकतं. किंवा खरा सुजय मी नाहीये, एवढं तरी. पण ते कळलं तरी माझ्या खऱ्या घरापर्यंत ती कशी येऊन पोहोचली? मी कुठलाच धागा सोडलेला नाहीये ह्या सगळ्यात माझ्या खऱ्या आयुष्याबद्दलचा. तिला कुठून कळलं असेल हे सगळं? आणि म्हणजे, कटनीला जे काही घडलं, ते सुद्धा…? नाही आता सावधच असायला हवं. सगळ्यात आधी तर ती खरंच घरी गेली होती का हे शोधायला हवं. ह्याचं उत्तर एकच माणूस देऊ शकत होतं. त्याची आई.

——————————————–

सुटलो एकदाचे सायले…..” रिक्षात बसल्यावर ईशा सायलीला म्हणाली.

 

काय माहीत ईशा…..” सायली जरा विचारात होती.

 

काय माहित म्हणजे काय? अगं आता गेला ना तो सुजय त्याच्या वाटेनेबरं झालं तू घरी सोडायला त्याला ठामपणे नाही म्हणालीस ते…..”

 

हम्म….”

 

अगं हम्मकाय नुसतंच? काय विचार करतेयस एवढी?”

 

ईशा, त्याला संशय आला असेल का गं आपला?”

 

तुला असं वाटलं का त्याच्या बोलण्यावरून? ”

 

असं वाटलं असं नाही गं,….पण बघ ना, तू अचानक येऊन सिद्धार्थबद्दल बोललीस, मग सुजयला बघून एवढा चेहरा पाडलासअगं तो तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे, पुढच्या काही दिवसात लग्न होणार आहे, असं असताना एखादी मेव्हणी त्या दोघांची मजामस्करी करेल की असं रागवून बसेल ? म्हणजे त्याच्या दृष्टीने विचार केला तर त्याला थोडं विचित्रच वाटलं असेल नाही का हे सगळं?”

 

अगं सॉरी यारतो त्या वेळी तिथे असणं माझ्यासाठी एकदम अनएक्सपेक्टेड होतं…”

 

आय नो,…मी तुला दोष देत नाहीयेतू यायच्या आधी त्याचा आवाज ऐकून माझीपण तीच अवस्था झाली होती. फक्त मी पाठमोरी होते त्याला म्हणून मी थोडे एक्सप्रेशन्स चेहऱ्यावर आणून मग त्याच्या समोर आले….”

 

जाऊदे ना, काय एवढा विचार करतेयस तू आता मग….त्याला संशय आला असेल की आपल्याला त्याच्याबद्दल सगळं कळलंय किंवा आपण त्याच्याबद्दल शोध घेतोय असं? अगं मग येउदेत ना संशय त्याला….हे बघ आपण त्याच्याबद्दल शोध घेतोय हे त्याला कळलं तरी अल्टिमेटली ही इज आनसरेबल टू अस….आपण का टेन्शन घ्यायचं मग? आपल्या बाजूने आपण सेफ आहोत, लग्न करायचं की नाही हे तुझ्या हातात आहे, आपण फसवणूक केलेली नाही कोणाची मग आपण का टेन्शन घ्यायचं?”

 

अगं ते सगळं बरोबरच आहे ईशा, पण मग तो असं काहीतरी करूच शकतो ना ज्यामुळे आपल्याला पुढे काहीच कळू शकणार नाहीतिथे कटनीला नक्की काय आहे हे त्याला माहित आहे, त्याने आता सावध होऊन आपल्याला तिथलं काहीच कळणार नाही अशी व्यवस्था केली तर?”

 

म्हणजे, त्याला आपल्यावर संशय आणि आपल्याला त्याच्यावरअसं? दोघांनाही माहित आहे की दुसरा आपल्यापासून काहीतरी लपवतोय….पण मग सायले, असा कॅटमाऊस चा गेम कशाला खेळायचा मग? सरळ उघड उघड विचारू ना त्याला…”

 

आणि तेच करायचं नव्हतं म्हणून तर एवढा सगळा घाट घातला आहे ना ईशी? एक म्हणजे, तो सरळ सगळं सांगेल असं नाही, कदाचित आणखी लपवाछपवी करेल आणि दुसरं आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं तो जसा मला गाफील ठेवून माझ्याशी लग्न करायला बघत होता, तसंच त्याला गाफील ठेवून हे लग्न मोडायचंय मलात्याला काय वाटलं? अशी फसवणूक फक्त तोच करू शकतो?”

 

सायले, हे बघमला कळतोय तुझा रागपण आपण आपल्या हातात आहे ते सगळं करतोय ना? त्याला संशय येऊ नये ह्याची पूर्ण काळजी घेतोयत्यातून त्याला संशय आलाच तर आपण काहीच नाही करू शकतवी शुड बी प्रिपेअर्ड फॉर इटहे बघसरळ विचार करायचात्याला संशय आला नसेल असं गृहीत धरून आपण आपला शोध सुरु ठेवायचाफार तर काय होईलतो अडथळा आणेल आणि इन दॅट केस, आपल्याला त्याला सरळ विचारावं लागेल….ठीक आहे ना….खरं जे आहे ते आपल्यासमोर येणं महत्वाचं आहे सायले, आपण शोध घेऊन काय किंवा त्याला विचारून काय….आणि यु नेव्हर नो, कदाचित आपला शोध आता इतका पुढे गेलाही असेल की त्यानंतर सुजयला खरं काय ते डायरेक्ट विचारलं तर त्याला सांगावंच लागेल आपल्याला….हे मुव्हीत वगैरे डायलॉग्ज असतात ना, त्याचा दोर आता आपल्या हातात आहे, वगैरे तसलंच….असूही शकतं ना असं? मग? उगीच नको तो विचार करू नकोस….”

 

हम्म….बरोबर आहेपण ईशा खरंच वी शुड बी प्रिपेअर्डत्याला संशय आला असेल तर तो आता काय,काय करू शकतो ह्याचा विचार करून ठेवायला हवा…”

 

ते करूच आपणपण आता सगळ्यात महत्वाचं सिद्धार्थकडून सगळी स्टोरी ऐकायची आहेआज दिवसभरात काय,काय घडलं आणि त्याला त्या खोलीत काय, काय मिळालं, पुढे जाण्याचा काही क्लू मिळाला का, सगळंच….”

 

आणि ईशी, आणखी एक….माई आजी….तिच्याशी पण बोलायचंय….खूपशा प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे मिळू शकतात आपल्याला….”

—————————————————

सुजय प्रचंड अस्वस्थ झाला होता. सायली त्याच्या घरी गेली होती का हे आता एकच व्यक्ती कन्फर्म करू शकत होती. त्याने घरी पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या आईला फोन लावला….फोनची एक एक रिंग वाजत होती तसतशी त्याच्या छातीतली धडधड आणि डोक्यातलं टेन्शन वाढत होतं..

क्रमशः

5 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 34)

 1. sarika devrukhkar
  February 20, 2017

  khup must interesting zali ahe story. please update next part as soon as possible

  Like

 2. RENU GUPTA
  February 20, 2017

  must ek number maja aa gaya story our suspensiv ho gai kya hua aage janane ke lie betabi our bad rahi hai.please post next part as soon as possible waiting for your next post.

  Like

 3. Vaishali Agre
  February 21, 2017

  atishay dokyala shot denara bhag hota. please puhdcha bhag lavkar taka.

  Like

 4. sarika devrukhkar
  February 27, 2017

  hello!… Rutusar please next part lavkar prakashit kara na ti vachaychi maja nighun jate

  Like

 5. Anjali
  March 10, 2017

  please submit next part.

  kiti vaat bhaghaychi yaar……………………..

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on February 19, 2017 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: