अज्ञाताची चाहूल : (भाग : 35)

ते करूच आपणपण आता सगळ्यात महत्वाचं सिद्धार्थकडून सगळी स्टोरी ऐकायची आहेआज दिवसभरात काय,काय घडलं आणि त्याला त्या खोलीत काय, काय मिळालं, पुढे जाण्याचा काही क्लू मिळाला का, सगळंच….”

आणि ईशी, आणखी एक….माई आजी….तिच्याशी पण बोलायचंय….खूपशा प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे मिळू शकतात आपल्याला….”

—————————————————

सुजय प्रचंड अस्वस्थ झाला होता. सायली त्याच्या घरी गेली होती का हे आता एकच व्यक्ती कन्फर्म करू शकत होती. त्याने घरी पोहोचल्या पोहोचल्या त्याच्या आईला फोन लावला….फोनची एक एक रिंग वाजत होती तसतशी त्याच्या छातीतली धडधड आणि डोक्यातलं टेन्शन वाढत होतं..

************************* भाग ३४ पासून पुढे ******************

भाग ३४ येथे वाचा<<- – http://wp.me/p6JiYc-RR

 

चारपाच रिंग्ज नंतर फोन उचलला गेला. पण फोनवर त्याचे काका होते.

हॅलो, ….”

 

हा, सुजय….”

 

काका तुम्ही? आई आहे का?”

 

हो अरे, आम्ही अजून घरी गेलेलो नाहीये. झालंय असं, म्हणजे तू टेन्शन घेऊ नकोस हा अजिबात….तू निघालास त्याच्यानंतर दीडेक तासानंतर वहिनींना जरा चक्कर आली एकदम, बाथरूमच्या दारातच खाली पडल्या एकदम….”

 

काय? अरे बापरे….मग….म्हणजे आता कशी आहे ती….ठीक आहे ना…..”

 

हो,…ठीक आहेत तशा….म्हणजे काय झालं, आम्ही पण घरी जायचीच तयारी करत होतो. वाहिनी आग्रह करत होत्या राहण्याचापण त्यांना सांगितलं तुम्हीच चला आमच्याबरोबर….दोन दिवस सगळेच होते आता एकदम घर रिकामं……एकटेपणा जाणवेल ना त्यांना म्हणून म्हटलं….आठवडाभर तिकडे राहा येऊन. फार आग्रह केल्यावर तयार झाल्या, बॅगपण भरली पण मग बाथरूममधून बाहेर येताना त्यांना एकदम चक्करच आली आणि खाली पडल्या त्या. बाकी कुठे लागलं वगैरे नाहीये. डॉक्टरांना बोलावलं आम्ही लगेच. बीपी डाउन झालं म्हणाले त्यांचं. तसं काळजीचं नाही काही पण दोन दिवस स्ट्रिक्टली आराम करा म्हणाले.”

 

अरे बापरेमी आल्यामुळे दोन दिवस तिची धावपळ झालीच, काय करू आणि काय नको असं झालं होतं तिलापण मी येतो काका आता लगेच…”

 

नको, हे बघ तू आत्ताच दोन दिवस रजा टाकून आला होतास नात्यापेक्षा असं करआम्ही आहोतच त्यांच्या बरोबरमी आता घरी जातो आणि आमचं आणखी काही सामान घेऊन येतो. आम्ही राहू त्यांच्याबरोबर आठवडाभरतुला जमलं तर पुढच्या शनिवाररविवारी ये, आणि तेव्हा जमलं तर एखादा दिवस आणखी सुट्टी घे. आता लगेच यायची गरज नाही….”

पुढचा रविवार म्हणजे लग्नाचा दिवस. सुजयच्या मनाची चलबिचल झाली. त्यापेक्षा आजउद्याच जाऊया का….पण सायलीवर, त्या सिद्धार्थवर लक्ष ठेवणंही गरजेचं आहे आणि तिथे घरी जाऊन, तिथे बसून काहीही करता येणार नाही, पुन्हा सायलीच्या आईने खरेदीला बोलावलं तर काय सांगणार?

हॅलोसुजयअरे ऐकतोयस ना तू ?”

 

…? हो, हो….तोच विचार करत होतोचालेल मी येईन मग पुढच्या वीकेंडला. आत्ता लगेच येणं खरंच कठीण आहे. पण काहीही लागलं तर सांगा मला, मी येईन. ”

 

होचालेल..”

 

काका, आत्ता बोलता येईल का मला आईशी? म्हणजे जरा महत्वाचं बोलायचं होतं….”

 

आत्ता झोपल्यात त्या…..मला वाटतं आता सकाळीच उठतील. तू बोल सकाळी

 

ठीक आहे…”

फोन ठेवल्यावर सुजयने हताश होऊन मान हलवली. एक मिनिटानंतर त्याचा त्यालाच प्रश्न पडला. आपल्याला नक्की कशाचं टेन्शन आलंय? आईच्या तब्येतीचं, टेलरच्या रिसीटबद्दल तिच्याशी बोलता आलं नाही ह्याचं की पुढच्या आठवड्यात पुन्हा पुण्याला जायचं त्याचं? खरं तर आत्ता त्याने आईपाशी असायला हवं होतं. तिच्या मनावर कुठलं टेन्शन आहे, सतत ती तिच्या मुलाचा, त्याच्या लग्नाचा, त्याच्या भविष्याचा विचार करत असते, हे त्याला काय माहित नव्हतं का? पण आत्ता कसं जाणार? बऱ्याच गोष्टींचा शांतपणे विचार करायची गरज होती. सायलीला नक्की काय, काय कळलेलं असू शकतं ह्याचा अंदाज येत नव्हता. तिला कळलं असेल तर ती लग्नाला नकार का देत नाहीये, हेही कळत नव्हतं. तिकडे तो सिद्धार्थ नक्की कुठे गेलाय, काय करतोय हा प्रश्न होताच. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याला मुंबईतच असणं गरजेचं होतं.

 

काय करतोयस तू सुजय? कुठल्या वाटेवर चालला आहेस ? कशासाठी? लग्न करण्यासाठी? खरंच एवढी फसवणूक करण्यापेक्षा लग्न नाही झालं, बिनलग्नाचा राहिलो तर चालणार नाही का? आज आईला गरज आहे तुझी, पण तू जाऊ शकत नाहीयेसआणि जिच्याशी लग्न करायचंय तिला तर तू साफ फसवतोयस. उद्या लग्न झाल्यावर सगळं कळेल तेव्हा ती राहील तरी का तुझ्याबरोबर? सायलीसारखी मुलगी माझ्याबरोबर राहणं शक्यच नाही. तिची माफी मागितली, एक संधी देण्यासाठी रिक्वेस्ट केली, तरी ती ऐकणार नाहीच, आणि हे मनात कुठेतरी माहित आहे मलाही. मग का ह्या सगळ्याच्या मागे लागलोय मी? लग्न झाल्यावर सायलीला हे कळेलच आणि मीच सांगणार आहे, पण सगळ्यांना कळल्यावर माझी अवस्था काय होईल हे सुद्धा मला माहित आहेपोलिसात देतील, शिव्याशाप देतील किंवा आणखी काही करतील. आणि मी आणखी काय आणि किती खोटं बोलणार आहे? आत्ता सगळं लपवतोय पण नंतर त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागेलच. आणि तेव्हा मी एकटा असेन, आई, काकाकाकू कोणीही माझी साथ देणार नाहीसाधं, सुखाचं आयुष्य सोडून ह्या मार्गाला कशाला लागायचं?

 

विचारमग्न होत फेऱ्या मारताना समोरच्या टेबलवर त्याचा पाय जोरात आपटला आणि त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास जोरात खाली पडला.

 

आणि तोसुद्धा खाडकन त्याच्या विचारातून बाहेर आला.

 

हा काय विचार करतोय मी? हेच करायचं होतं तर एवढी रिस्क का घेतली मी? पुढे काय व्हायचं असेल ते होऊदेत, सायलीला नंतर कसं समजवायचं ह्याचाही काहीतरी विचार करता येईल. आणि नाहीच तिने ऐकलं तर जाऊदेत तिलाही….पण माझं लग्न झालं एवढं तरी समाधान मिळेल मला….माझं लग्न होऊ देणार नाही कायआता तू पण बघ मी कसं लग्न करतो ते

 

बोलताबोलता नकळत जुनं सगळं आठवायला लागल्यावर तो खरं तर कासावीस झाला होता. आयुष्यातल्या सगळ्यात नकोशा वाटणाऱ्या त्या आठवणी, ती डोळ्यासमोरून कधीच न हलणारी चित्रं, ह्या सगळ्याकडे त्याने आता सवयीने आणि खरं तर स्वतःच्या निगरगट्टपणाने दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. स्वतःला हवं तेच करण्याचा त्याचा स्वभावमागच्या काही महिन्यात त्याच्या ह्या स्वभावाचा कळस झाला होता. दोन वेळा लग्न मोडल्यावर मात्र तो इरेला पेटला आणि आता लग्न करण्याच्या हट्टापायी नकळतच स्वतःला त्याने पार बदलून टाकलं होतं.

 

तेवढ्यात दार वाजलं. समोर सु.सा. (खरा सुजय साने ) उभा होता.

ये. पण तू आत्ता कसा काय आलास? उद्या भेटणार होतो ना आपण..?” सुजय

 

अरे थोडा प्रॉब्लेम झालाय…” सु.सा. खरंच टेन्शनमध्ये दिसत होता.

 

कसला प्रॉब्लेम?” सुजय

 

माझे आईबाबा येतायत परवा रात्री यु.एस. वरून …”

 

काय? पण अजून एखादा महिना होता ना त्यांना यायला …

 

अरे एक महिन्यानंतरच येणार होते, पण आज बाबांचा फोन आला होता. त्यांच्या एका मित्राच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय काहीतरी आणि आम्हाला ताबडतोब परत निघावं लागेल असं म्हणाले. आल्यावर सगळं सांगतो म्हणाले. ते इतके गडबडीत आणि टेन्शन मध्ये होते की मला काहीच विचारता नाही आलं त्यांना.   .तर हे कळल्यावरच आईबाबा तिकीट बघायला लागले होते पण ते मिळालं नाही आजचंउद्या निघून परवा येतील ते रात्री….”

 

पण मग आता तुझे आई-बाबा तिथे तुझ्या घरात असताना सायली किंवा तिच्या घरचे तिथे आले तर? किंवा त्यांना ते कामत भेटले आणि त्यांना कळलं की त्यांच्या मुलाच्या स्थळासंबंधी कोणी चौकशी करत होते तर ? ”

 

मी पण तोच विचार करतोय….मागे एकदा सायली आली होती न कळवता, आठवतंय ना? आणि नेमका मीच तिच्या समोर गेलो होतो. नशिबाने तू तेव्हा आलेला होतास तिकडे. नंतरसुद्धा, सायली आणि ती तिची कोण बहीण त्या दोघी अचानक आल्या होत्या, तेव्हापण तू माझ्याकडे राहिलेला तुझा लॅपटॉप न्यायला आला होतास, पण त्यामुळे संशय नाही ना आला त्यांना. पण आता कोणी अचानक आलं तर घरात आई-बाबा भेटतील त्यांना….हे बघ, आईबाबांना जर कळलं की मी मदत केली आहे तुला ह्या सगळ्यात, तर माझं नावच टाकतील तेम्हणून….प्लिज गैरसमज करून घेऊ नकोसपण आता मला ह्या सगळ्यापासून जरा लांबच ठेवमागे सायली अचानक घरी आली आणि तिने मला बघितलं, पण आता मला ह्या सगळ्यामध्ये कुणाच्याच समोर यायचं नाहीये. आणि थोडेच दिवस आहेत तुमच्या लग्नाला, प्लिज त्यांच्या घरचं कोणीही आमच्याकडे येणार नाही असं बघअसं झालं तर आईबाबांना खूप प्रश्न पडतील, आणि मी आधीच खूप लपवलंय त्यांच्यापासून, पण त्यांनी समोरून मला प्रश्न विचारले तर मला खरं सांगायला लागेल त्यांना आणि मग कधीच त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार मी….”

 

अरे पणअसं काय करतोयस….थोडेच दिवस ना आतालग्न होईपर्यंत तुझी गरज लागणारच ना मला….तुझंच नाव, तुझी ओळख, तुझं घर, तुझे नातेवाईक, सगळं तर तुझ्याच भरवशावर उभं केलंय….आता आयत्या वेळी असं केलंस तर मग काय करू मी? ”

 

हे बघ, तसाही मी तुला समोरून मदत कधीच करत नव्हतो. तू फक्त माझी ओळख वापरत होतास. पण आता फक्त नव्याने माझं नाव कशात येणार नाही एवढं बघ. प्लिज, मला ह्यात अडकवू नकोस. मी फक्त तुझ्या मदतीची परतफेड केली आहे. पण त्यासाठी मीसुद्धा माझ्या प्रिंसिपल्सच्या विरोधात वागलोय…”

 

आय नो दॅटठीक आहे..मी फक्त माझं आत्तापर्यंतचं नाटक पुढे नेतो, तुझं नाव आणखी कशासाठी नाही वापरणार मीओके?”

 

ठीक आहेआणि सायली किंवा तिच्या घरचे तिथे माझ्या घरी येऊन पोहोचणार नाहीत हे बघायला हवं…”

 

हम्म….मी करतो विचार काहीतरी….डोन्ट वरी..”

 

सॉरी सुजयमी अशी अर्धवट साथ सोडून देतोय पण माझा इलाज नाहीये…”

 

ठीक आहे रेआय अंडरस्टॅन्ड…”

 

टेक केअरआता आपल्याला भेटायची गरज नाही पडणारनिदान तुझ्या लग्नापर्यंत तरीआणि सुजय, आणखी एक, आय नो, मी हे खूप वेळा बोललोय तुला आणि मला काहीच माहित नसलं तरी आय एम शुअर तुझा हेतू वाईट नाहीये. पण तरी, शक्य असेल तर बाहेर पड ह्यातूनती चांगली फॅमिली आहे अरे आणि तूसुद्धा चांगल्याच घरातला आहेस….”

 

हो रेकळलंपण आता माघार नाही….”

 

तू नेहेमीसारखंच तुझं खरं करणार….मी काय बोलू आणखी….चल ऑल द बेस्ट…”

सु.सा.ने सुजयच्या खांद्यावर थोपटलं आणि तो तिथून बाहेर पडला.

———————————————————-

काय खुसरफुसर चाललंय गं दोघींचं? जेवणात पण लक्ष नाहीये तुमचं…”

आई जवळ येतेय हे कळल्यावर सायली आणि ईशा बोलायच्या थांबल्या. खरं तर आल्यावर खोलीचं दार बंद करून सिद्धार्थशी बोलण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण आईने त्यांना जेवायला बसायला सांगितलं.

अगं वासंती, जाऊदे गं, मी तरी कुठे तक्रार करतेय? पोरींना येऊन एवढा वेळ झाला पण माईआजीशी बोलायला वेळ कुणाला आहे? पण मी नाही हो रागावले त्यांच्यावर…”

 

अगं माई आजी, असं काय गं म्हणतेस? मी पुण्याला गेल्यावर तुला खूप मिस केलं माहितीये? ” ईशा

 

होय का? मग आल्यावर माझ्याशी बोलायला नाही आलीस ती?”

 

अगं जाऊदे ना, आम्ही रात्री बोलणारच होतो तुझ्याशी. खूप गप्पा मारायच्या आहेत….”सायली

 

जाऊदे तर जाऊदे….मी जरा बसते हॉल मध्येवासंती , काही भाजी असली निवडायची उद्याची तर दे हो, बसल्या बसल्या काही काम तरी करते…”

खुर्चीतून उठून वॉकर हातात घेऊन माई आजी हॉलमध्ये सोफ्याच्या दिशेने जायला निघाली.

सायले, माई आजी, रागावली आहे का गं? बघ ना, काहीच नाही बोलली…” ईशा

 

आपण आल्यावर आपल्याच जगात होतो ना, तिच्या खोलीत तिला भेटायलाही नाही गेलो, चुकलंच गं ….” सायली

 

जेवण आटोपून आधी तिच्याशी बोलूया किंवा तिला आत खोलीतच नेऊया सिद्धार्थशी बोलायच्या आधी…” ईशा

 

चालेल….सिद्धार्थला मेसेज करून ठेवते. पंधरा मिनिटांनी बोलूया असा..” सायली

 

ओके..”

—————————————————-

त्यानंतर अर्ध्या तासाने —-

सायले, ए बाई, काय म्हणाला सिद्धार्थ? दुसऱ्यांदा विचारतेय तुला….त्याच्याशी बोलून झाल्यावर काय एवढी विचारात पडली आहेस? मीच म्हटलं होतं तू एकटीच खोलीत जाऊन फोन कर त्याला, मी आणि माई आजी बाहेरच थांबू, मावशीला संशय नको यायला म्हणून….पण तू काही सांगणारच नाहीस हे मला काय माहित ईशा शेवटी वैतागली.

 

अगो बाय, सांग ना लवकर मला पण उत्सुकता आहे होकाही मिळालंय का त्याला तिथे? ”

 

हो, सॉरी मी खरंच विचारात पडले होते…..सांगते, सगळंच सांगते….दिवसभरात त्याला काय, काय अनुभव आले ते सगळंच….”

माई आजी आणि ईशा सायलीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला लागल्या.

————————————

याआधी साधारण तीन महिन्यांपूर्वी ……….

माथेरानजवळच्या एका रिसॉर्टवर आलेला होता तो. एक दिवस क्लायंट बरोबर मिटिंग आणि दुसऱ्या दिवशी तिथून अर्ध्या तासावर आणखी एक सेमिनार आणि मग मुंबईला परत, असा प्लॅन होता. क्लायंटच्या टीम बरोबर डिनर करून रात्री उशिरा तो रिसॉर्टवर परत निघाला. त्याच्या ड्रायव्हरला त्याने त्याला सोडून परत जायला सांगितलं होतं. रात्रीच्या वेळी माथेरानच्या थंडीत ,त्या शांत रस्त्यावरून एकटंच चालत यायचं होतं त्याला. मुंबईत कुठे मिळतात असे शांत रस्ते, असं चांदण्यात फिरणं. हे असं फिरायला त्याला नेहेमीच आवडायचं, पण मुंबईत राहताना हे सगळं कुठलं नशिबात. त्याने हे सगळं आधीच विचारून ठेवलेलं होतं रिसॉर्टच्या स्टाफला. तो जिथे डिनरला जात होता, ते रेस्टॉरंट त्याच्या रिसॉर्टपासून फक्त वीसेक मिनिटांवर होतं. कारने पाचसात मिनिटांवर.रस्ता तसा आतलाच होता, फार रहदारीचा नव्हता, हे कळल्यावरच त्याने ठरवून टाकलं, आज परत येताना छान शांत रस्त्यावरून एकटंच चालत यायचं. डिनर झाल्यावर त्याच्या क्लायंटच्या मॅनेजरनेसुद्धा त्याला त्याच्या गाडीतून सोडतो, असं सांगितलं. पण आता ह्याचं ठरलं होतं, आता चालतच जायचं.

निघाल्यावर त्याने आईला फोन लावला,

हॅलो…”

 

हा, मी बोलतोयपोहोचलात ना नीट, बाबांचा मेसेज आला होता दुपारी पण वेळ नाही झाला फोन करायला…”

 

“………”

 

हो, झाली मिटिंगआत्ताच परत निघालोय, उद्या दिवसभर सेमिनार आहे, डिनर आहे आणि मग लगेच निघेन घरी जायला. तुम्ही कसे आहात? सिमला काय म्हणतंय? मजा आहे बाबा, आत्ता सिमला ट्रिप नंतर दोन महिन्यांनी काय आणखी मोठी ट्रिप…….”

 

“……….”

 

झालं का परत तुझं सुरु….मला फिरायला जायला बायको कशाला हवी? फिरायला जायचं म्हणून लग्न करू? “

 

“…….”

 

जाऊदेउगीच नको त्या विषयावर बोलतोय आपण….तुम्ही नीट रहाहेक्टिक झाला असेल प्रवास, आता झोपा मस्तआणि हे बघ, उद्या रात्री पोहोचायला उशीर होईल मला. मोस्टली परवाच फोन करेन, उद्याचा दिवस खूप बीझी आहे….”

 

“…………”

 

ओके, उद्या मी बिझी आणि परवा तुम्ही फिरायला जाणार तिथे रेंज नसणार, ठीक आहे मगमेसेज तरी कर जमलं तरपरवा फोन करतो, नाहीच लागला तर नंतर दुसऱ्या दिवशी करेन….”

 

“………”

 

गुड नाईट आई…”

फोन बंद झाल्यावर त्याने आजूबाजूला पाहिलं. तो बोलतबोलत पाच मिनिटं तरी त्या रस्त्यावर पुढे चालत आला होता. रस्त्यावर पुरेसा उजेड होता पण एकही वाहन नव्हतं. त्या रस्त्यावर, आत्ता वाऱ्याने हलणारी झाडं आणि रस्त्यावरून चालणारा तो, ह्याशिवाय काहीच नव्हतं. का कुणास ठाऊक, त्याचा सुरुवातीचा आवेश आता ओसरला होता. ती शांतता नकोशी वाटत होती. हॉटेल स्टाफ म्हणालाच होता की हा रस्ता अगदी शांत असतो, कारण तो आतला रस्ता आहे, आतल्या आत काही घरं, किंवा वस्त्या जोडणारा, ज्यांना इथे आतपर्यंत यायचंच नाही ते इथे गाड्या आणतीलच कशाला ? ते बाहेरच्या बाहेर निघून जातील बाहेरच्या रस्त्याने. आणि आत्ता रात्रीच्या वेळी ह्या आतल्या रस्त्यावर येणाऱ्या गाड्या त्या अशा कितीशा असणार? रस्त्यावरून चालताना स्वतःच्याच पावलांचा आवाज येत होता आणि तो नकोसा वाटत होता. शेवटी तो थांबला. आपण फार तर सातआठ मिनिटं चाललो असू. आणखी पंधरा मिनिटं पुढे जाण्यापेक्षा पुन्हा मागे त्या रेस्टोरंन्टवर जाऊ, रिसॉर्टवर जायची काहीतरी सोय बघू आणि मगच निघू. ही शांतता खरंच अंगावर येतेय आता….

 

असा विचार करून तो वळला आणि तेवढ्यात समोरच्या झाडामागून चेहरा झाकलेली तीनचार दांडगट माणसं बाहेर आली. एकाच्या हातात सुरा होता आणि एकाच्या काठी. काय होतंय हे समजायच्या आतच त्यांनी ह्याच्यावर हल्ला चढवला. तो एकटा किती जणांना पुरे पडणार? त्यातून ते गुंड, हा साधा सरळ मुलगा. पाच मिनिटांनी रक्ताच्या थारोळ्यात त्याला टाकून ते निघून गेले.

 

आणखी पाचदहा मिनिटात तिथे निरव शांतता पसरली.

 

त्यानंतर त्याला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटल मध्ये होता. आधी त्याला कळलंच नाही, पण मग डॉक्टर्स, नर्सेस, औषधं आणि स्वतःच्या अंगावरच्या जखमा, हे सगळं बघितल्यावर त्याला आधीचं सगळं आठवलं आणि हॉस्पिटलमध्ये असण्याबद्दलची लिंकही लागली. कुणीतरी भल्या माणसांनी त्याला इथे आणलं होतं, तो बेशुद्ध असताना. तेवढ्यात एक अनोळखी माणूस त्याच्या बेडजवळ आला. माणूस म्हणजे, जवळपास त्याच्याच वयाचा तरुण.

हॅलो…” तो म्हणाला.

 

हाय…..तुम्ही..?”

 

ओळख होईलच आपली नंतर. मीच आणलं तुम्हाला इथे. खूप वाईट मार लागला होता..”

 

“ओह… थँक यु सो मच…”

 

“नाही…उठताय कशाला ? खरं तर देवालाच थँक्स म्हटलं पाहिजे. त्यानेच मला तिथे जायची बुद्धी दिली.”

 

माझ्या घरच्यांना ….”

 

नाही, खरं तर मी कॉल करू शकलो असतो, तुमच्या बाजूला तुमच्या कंपनीचं आयकार्ड पडलेलं होतं. कंपनीतून माहिती घेऊन घरच्यांना कळवता आलं असतं. पण तुमच्या घरी कोणकोण असतं, काय परिस्थिती आहे मला माहित नाही ना, म्हणजे एखादं म्हातारं माणूस असेल तर त्यांना धक्का बसायचा. डॉक्टर म्हणाले उद्या पहाटेपर्यंत शुद्धीवर याल तुम्ही.. म्हणून म्हटलं आधी तुमच्याशी बोलेन. तुम्हीच ठरवा घरी कोणाशी आणि काय बोलायचं ते. कसं आहे, तुम्ही स्वतः बोललात  तर, त्यांना हे सगळं कळल्यावर धक्का तर बसेलच पण तुमचा आवाज ऐकून तितकंसं टेन्शन नाही घेणार ते…” 

 

मला खरंच कळत नाही, मी काय बोलू ते. माझे आईबाबा कालच सिमल्याला गेले आहेत. एक आठवड्याने परत येणार आहेत. त्यांना हे कळलं असतं तर भयानक धक्का बसला असतं त्यांना. एखाद्याने हॉस्पिटलपर्यंत आणून सोडलं असतं आणि घरी फोन करून कळवून टाकलं असतं. आणि खरंच इतकं केलं असतं तरी खूप होतं. तुम्ही माझ्या घरच्या लोकांचा विचार करून रात्रभर इथे थांबलात, आय रिअली ऍप्रिसिएट दॅट. अशी माणसं नसतात फार जगात.”

 

ठीक आहे. मला जे ठीक वाटलं, ते मी केलं. डॉक्टर म्हणाले एक आठवड्याभरात नेहेमीसारखे हिंडू शकाल, अगदी ऑफिसला सुद्धा जाऊ शकाल. जखमा भरायला मात्र वेळ लागणारच.तुमचे आईबाबा बाहेरगावी असतील तर त्यांना आज फोन करूच नका. सॉरी म्हणजे तुमचा डिसिजन आहे. पण उद्या तुम्ही उठून बसू शकाल, आवाजात जरा आणखी जोर येईल , उद्या त्यांच्याशी बोललात तर त्यांना तेवढं टेन्शन नाही येणार. मी आज आहे इथे. डोन्ट वरी. “

 

ठीक आहे. तसाही दोन दिवस आमचा फोन होणारच नव्हता. आज तर नव्हताच होणार. मी उद्या फोन करेन घरी. ऑफिसला फोन करून कळवतो मात्र. मी कुठे गेलो म्हणून शोधाशोध सुरु झाली असेल. तुमची खरंच खूप मदत झाली आहे. पण तुम्हालाही कामं असतील ना? तुम्ही निघालात तरी चालेलआय एम फाईन नाऊ..तुमचा नंबर मात्र देऊन ठेवा. माझ्याकडे आत्ता पैसे नाहीयेत पण घरी गेल्यावर लगेचच तुम्हाला फोन करून सगळे डिटेल्स घेऊन तुमचे पैसे देऊन टाकेन मी..”

 

मी माझ्या ऑफिसमध्ये कळवलंय आल्रेडी. डोन्ट वरी. पैशांची काही घाई नाही. मी म्हटलं ओळख झाली आहे, आता एक दिवस थांबलो, तर मैत्रीही होईल नाही का?”

 

खरं आहेपण तुम्ही कोण…? आय मिन नाव काय तुमचं? आणि तुम्हाला मी कुठे दिसलो काल? आणि इथे कसं आणलं मला?”

 

बापरेकिती प्रश्न? तुम्हीसॉरी तू म्हणू का आता? चालेल ना?”

 

हो, अर्थात…’तूच ठीक आहे..”

 

हे तुलाही लागू आहे आणिहा तरतू काल जिथे बेशुद्ध होऊन पडला होतास त्या बाजूला आलो होतो मी. टॅक्सीमध्ये होतो. तू दिसल्यावर टॅक्सीवाल्याला म्हटलं, चल आपण ह्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ….तर तो कसला आगाऊ….साधी माणुसकी शिल्लक नाही रे ह्या लोकात….कशाला म्हणे आपण ह्यात पडायचं….निघून गेला सरळ….मग बाहेरच्या रस्त्यावर गेलोकशीबशी एक रिक्षा मिळाली त्याला सांगितलं. तोसुद्धा नाहीच म्हणत होता. पण मग पोलिसांची भीती दाखवली त्याला. म्हणून तयार झाला मगपण झालं काय होतं नक्की? तुझ्यावर हल्ला कोणी केला होता?”

 

मलाही काहीच नाही कळलं….सडनली झाडामागून काही गुंडटाईप माणसं बाहेर आली आणि त्यांनी मला मारायलाच सुरुवात केली.”

 

अरे बापरे……….पण ठीक आहेआता काही काळजी नाहीरात्री पोलिसही येऊन गेलेत्यांनी शोधायला सुरुवात केली आहे कदाचित काय झालं ते विचारायला पुन्हा येतील….”

 

हो, पण हे सगळं तुझ्यामुळे फक्त….नाहीतर रात्रीच्या त्या थंडीत तसाच जखमी होऊन पडून राहिलो असतो तर कोणाला कळलंही नसतं, कदाचित वाच……….”

 

जाऊदे ना…..आता कशाला तो विषय? माझ्यामुळे कोणाचातरी जीव वाचला हे मला समाधान…”

 

नाही….एवढ्यावरच नाही सोडायचंय मला हे सगळं….माझ्यावर कायमचे उपकार राहतील तुझेतुला कधीही कसलीही हेल्प लागली तर मी तयार असेन ती करायला….”

 

अरे कसले उपकार आणि कसलं काय? ही भाषा नको आता….तुझ्याबद्दल सांग काहीतरी……”

 

माझं नाव….”

 

सुजय साने….”

 

?”

 

अरे आ काय? मला माहित आहे, तुझ्या कंपनीच्या आयकार्डवर नव्हतं का….”

 

ओह येस….पण तुझं नाव ?”

 

माझं नाव गौरव दीक्षित…..”

——————————-

रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे गाडीला जोरात धक्का बसला तसा सु.सा. एकदम त्याच्या विचारातून बाहेर आला….सुजय जे करतोय ते त्याला पटत नव्हतंच, तरी त्याला सगळी मदत करण्याचा आपला शब्द आपण पळू शकत नाही आहोत आणि अशी मधेच त्याची साथ सोडतोय ह्याचंही त्याला खूप वाईट वाटत होतं. गौरव दीक्षित अशी स्वतःची ओळख करून देऊन नंतर थोड्याच वेळात काही कामानिमित्त तो बाहेर गेला. त्यावेळी सु.सा.ला माहीतच नव्हतं, ह्या गौरव दीक्षितचं खरं नाव सुजय सानेच आहे ते. पण खरं तर अजूनही आत्ता ह्या क्षणापर्यंत त्याला आणखी बरंच काही माहित नव्हतंत्या रात्रीबद्दल….

——————————-

गुंडांनी सु. सा.वर हल्ला चढवला. आणि त्याला तिथेच तसंच टाकून ते निघून गेले.

जाताना त्याचं पैशांचं पाकीट आणि मोबाईल घेऊन गेले. जाता जाता त्यातल्या एकाने त्याचं पाकीट उघडून पाहिलं, त्यातलं त्याचं ऑफिसचं आयडी बघून तो एकदम थांबला.

अरे ये वो नही है…”

 

क्या ? मतलब?”

 

अरे ये दुसरा कोई है….तेरेको फोटो भेजा था ना वो लडकी के भाई ने…..”

 

हा ….तो….वो….येही है ना भाई….ये देखो फोटो……” त्याने मोबाईल काढून दाखवला.

 

अरे ये नही है…” आता त्यातला आणखी एक जण पहिल्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाला

 

अरे…..एक काम ठीक से नही होता तुझसे….वो लडका लडकी को लेके भाग गया रहेगा अब तक…”

 

अब क्या ?”

 

अब क्या करना है…..इसको पडे रेहेनों दो ऐसेही….एखाद घंटा पडा रहेगा, उसके बाद खेल खलास….सॉरी भाई तेरेसे दुश्मनी नही थी अपनी, तेरा ही टाईम खराब है, चलो रेटाईम वेस्ट हो गया, अब जाके ऊस लडकेको ढुंढो…..”

माणसाच्या वेषातली ती जनावरं आता दुसऱ्या कोणाच्या तरी मागावर गेली. रात्रीच्या त्या अंधारात आता हलणारी झाडं सोडली तर सगळंच निपचित झालं होतं.

 

असा किती वेळ गेला असेल माहित नाही, वेळेचा हिशोब करायला होतंच कोण तिथे? पण कदाचित पाऊण तास उलटून गेला असावा. बाहेरच्या रस्त्यावरून एका गाडीने ह्या आतल्या रस्त्यावर टर्न घेतला. ती एक टॅक्सी होती. टॅक्सीचा ड्रायव्हर आणि मागच्या सीटवर बसलेला एक पॅसेंजर.

, हे बघ, मला जायला उशीर होतोय, पुढे ट्रेन नाही मिळाली तर मग काय करू?”

 

साहेब, अशी कशी नाय मिळणार ट्रेन? अजून खूप वेळ आहे….”

 

आणि हे बघ, हे आतल्या रस्त्यावरून आणतोयस, मी तुझ्या गाडीचा नंबर देऊन ठेवलाय माझ्या घरच्यांना. अंधारात कुठेतरी नेऊन लुटण्याचा तुझा प्लॅन असेल…..”

 

अहो साहेब, तीन वेळा बोललाय तुम्ही ह्ये, मी तसा माणूस नाहीये हो. गाडीत एवढे देवांचे फोटो लावलेत बघा, अहो हे असलं काहीतरी करून माझ्या देवाला काय तोंड दाखवू मीतुमाला म्हंटलं ना, माझा मित्र इथेच राहतो, त्याची एक वस्तू पोहोचवायची आहे. मी गाडीतच ठेवून असतो ते, पण ह्या बाजूला येणारे जास्त कस्टमर नाहीत ना, म्हणून राहते मग….दोन मिनिटात त्याचं घर येईलच बघा आणि त्याला फोन पण केलाय मी तो बाहेरच येऊन थांबेल…”

 

एकएक….मिनिट थांब जरा

 

….काय?”

 

अरे गाडी थांबव जरा….तिथे बघ त्या झाडाच्या जवळ कोणीतरी पडलेलं आहे….”

 

काय? इथे अंधारात? थांबा, गाडी घेतो इथे साईडला….”

दोघे खाली उतरले. समोर तो निपचित पडलेला होता. आधी त्यांना वाटलं कुणीतरी दारू पिऊन पडलेला दिसतोय, पण जवळ गेल्यावर लक्षात आलं, हे काही साधं प्रकरण नाही. त्याला कोणीतरी बेदम मारलेलं होतं, अमानुषपणे. हे बघताच तो टॅक्सीतला कस्टमर तरुण मागे फिरला.

, चल लवकर, हे काहीतरी भलतंच प्रकरण दिसतंय…..”

 

अहो काय बोलताय साहेब, ह्याचा श्वास चालू आहे. तुम्ही जरा त्याचे पाय धरता का? टॅक्सीत घालून हॉस्पिटलमध्ये नेऊ त्याला…”

 

नो वे वेडा आहेस का तू? हा कोण, कुठला माहिती तरी आहे का? उगीच अंगाशी येईल नंतरचल आता ..मला उशीर होतोय….”

 

अहो काय माणुसकी आहे की नाही साहेब…..ह्याचा जीव वाचवायला नको?”

 

हे बघ, मला उशीर होतोय आणि ह्या सगळ्यात मला पडायचं नाही…..जीव वाचवण्यात एवढा इंटरेस्ट असेल तर…तू….तू एक काम करपोलिसांना फोन कर नाते बघून घेतील….”

 

ते आपण सांगूच हो….पण ते येईपर्यंत आणखी वेळ जाईल प्लिज धरता का ह्यालाआपणच नेऊ हॉस्पिटलमध्ये….चला हो साहेब वेळ निघून जाईल नाहीतर….तसंही तुम्हाला आता इथे बाकी काही मिळणार नाही स्टेशनला जायला. माझ्याबरोबर यायचं असलं, तर आधी माझी मदत करावी लागेल तुम्हाला.  “

 

तू आण त्याला टॅक्सीत, मी दरवाजा उघडतो…”

थोडं वैतागूनच तो मागे टॅक्सीकडे जायला वळला. समोर पडलेल्या त्या तरुणाचा जीव आपल्यामुळे वाचू शकतो ही जाणीव त्याला होती, पण त्याच वेळेला आता नको त्या गोष्टीत अडकावं लागणार ह्याची चीडही येत होती.

अहो साहेब, हे बघा इथे काय पडलंय…”

 

काय आहे आता?”

 

हे ह्याचंच काहीतरी पडलेलं दिसतंय, जरा बघता का साहेब, काही माहिती असेल त्याची तर त्याच्या घरी कळवता येईल…”

त्या गुंडांनी तिथेच टाकून दिलेलं त्याचं ते कंपनीचं आयकार्ड त्या तरुणाने जाऊन उचललं. त्याने त्याच्यावर नजर फिरवली आणि एका क्षणार्धात त्याच्या डोक्यात काहीतरी चमकून गेलं.

ओ साहेब , काय बघताय तिथे? गाडीचा दरवाजा उघडताय ना …”

 

हो, होउघडतो, अरे मी ओळखतो ह्याला, चेहऱ्यावरून पटकन आठवलं नाही मला, पण त्याच्या कंपनीचं आयकार्ड बघून कळलं. एकदोन वेळा भेटलोय आम्ही ऑफिसच्या कामासाठी….”

 

बघा साहेब, देवाची कृपा सगळी, आणखी काय? “

 

हो ते आहेच. हे बघ, तू आम्हाला हॉस्पिटलमध्ये सोड, आणि पुढचं माझ्यावर सोड मग. मी त्याच्या घरी पण कळवतो आणि सगळी ट्रीटमेंट होईपर्यंत तिथेच थांबेन……”

 

आणि ते पोलिसांना पण कळवायला लागेल ना….”

 

हो ते पण बघूचल आता.. आण त्याला लवकर….”

तो नक्की काय करणार होता, हे काही त्याचं ठरलं नव्हतं. पण त्याच्या सगळ्या इच्छा आता पुन्हा जाग्या झाल्या होत्या. त्याच्या हातात काहीतरी लागलं होतं, ज्याचा नीट वापर करून तो आता पुढे जाणार होता. बास झालं हे सरळ रस्त्यावर चालणं, किती दिवस असं साधंसरळ राहायचं? कायमसाठी बदलायचं नाहीच, पण आपल्याला जे साध्य करायचंय ते साध्य होईपर्यंत तरी थोडी वाट वाकडी करून चालायला काय हरकत आहे ? एकदा का आपल्याला हवं तसं झालं की मग पुन्हा गुड बॉय व्हायचंबास आता ठरलं. ही संधी हातातून सोडायची नाही.

 

त्याने स्वतःच्या पाकिटातून स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स काढलं. रस्त्यावरच्या दिव्याखाली उभं असल्यामुळे त्यावरची अक्षरं स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या हातात त्याने आत्ता सापडलेलं त्या तरुणाचं कंपनीचं आयकार्ड धरलं. दोन्हीवरचा फोटो वेगळा होता, पण नाव एकच होतं. सुजय साने.

 

आता ह्या सुजयची मदत घायची. कशी, ते माहित नाही. पण बघू, विचार करूच. काय योगायोग होता, मागच्याच आठवड्यात त्या विवाह मंडळाच्या बाहेर त्या म्हाताऱ्या माणसाची टक्कर झाली. त्याच्याकडून ते विवाह मंडळाचं कार्ड मिळालं. आणि मग विवाह मंडळात त्या सायली देशपांडेंचा फोटो. हे सगळं कसं पुढे न्यावं ह्याचा विचार करतच होतो तेवढ्यात हा सुजय साने भेटला. मी आणि हा सुजय साने, धिस कॉम्बिनेशन इज गोइंग टू वर्कयेसआय विल मेक इट वर्क…..”

 

ड्रायव्हरची हाक आली तसा तो लगबगीने टॅक्सीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसला आणि टॅक्सी निघाली.

——————————————-

काय ? म्हणजे सुजयचं लग्न झालेलं आहे ?”

सायलीचं वाक्य पूर्ण होतंय, न होतंय तेवढ्यात ईशा किंचाळलीच.

क्रमशः

8 Comments Add yours

  1. Vaishali Agre says:

    maste ekdum . lavkar pudhacha bhag taka. and all the best for next part

    Like

  2. RENU M GUPTA says:

    Ajun Story rangat challi aahe khup chhan lihta ek number. please pudhacha bhag lavkar taka pudhchya part chi khup aaturte ni vat baghatey.please please lavkar prakashit kara next part.Have a great day……….

    Like

  3. Anonymous says:

    Mast kalpana aahe story bhe

    Like

  4. Sahi !! Vedya sarkhi vaat pahat hoti ya bhagachi ,next bhag lawkar dya !!

    Like

  5. Anjali says:

    2 bhag madhe gaap khoopch vadhat challi ahe
    next part lavkar yeu dya

    Like

    1. rutusara says:

      Sorry…36vya bhagala kharach ushir zalay…:(

      Like

  6. Sweetali says:

    lavkar next part yeu de…waat baghat aahot

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      sorry dear,…I know hya part la far ushir zalay….Gandhar cha spring break suru hota …so…:(

      Like

Leave a comment