davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 41)

पण मग सगळ्यात महत्वाचं…जर सायलीला संशय आलाय तर ती लग्न का करतेय? मला सरळ प्रश्न का विचारत नाहीये? पुण्याहून येताना तिचं आणि ईशाचं एकूण वागणं, हावभाव सगळं विचित्र संशयास्पद वाटलं होतं…आणि आधीसुद्धा आपल्या मनात हा विचार येऊन गेला होताच ना, की लग्न ठरलं असूनसुद्धा सायली स्वतःहून फार वेळा फोन करत नाही किंवा फार फॉर्मल, तुटक बोलते….पण तेव्हा आपणच असा विचार केला की आधीच्या मुलींना जे अनुभव आले ते सायलीला येऊन माझ्याबद्दल संशय येऊ नये, म्हणून आपणच फार वेळा तिला भेटण्याचं टाळलं, मग ती तरी कशी एकदम मोकळेपणाने बोलेल..थोडा वेळ लागेलच तिला….पण म्हणजे हे कारण नसेल का तिच्या तुटक वागण्याचं…जेवढ्यास तेव्हढं बोलण्याचं? नक्की काय चाललंय तिच्या मनात ? आणि आधीच्या मुलींना जे अनुभव आले ते तिला आले असतील का?

 

प्रश्न खूप होते आणि उत्तरं कशाचीच नव्हती….विचार करून करून तो थकला तसा त्याचा डोळा लागला आणि तो सोफ्यावरच आडवा झाला…..

******************************भाग ४० पासून पुढे ********************

भाग ४० येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-11f

 

सायले, अगं सांग ना पुढचं…..” ईशा

 

पुढे काहीच नाहीये डायरीमध्ये….” सायली काहीसा विचार करत म्हणाली.

 

काय ? काहीतरीच काय ? बघू….दे इकडे मला…..” ईशा

 

अगं बाईहे मी लिहून काढलंय डायरी वाचून, त्यातले संदर्भ लावून…..तेच तुम्हाला सांगत होतेतू परत काय वाचणार आहेस त्यात? मी पुढचं काहीच नाही लिहू शकले कारण डायरीमध्येच एवढंच लिहिलेलं आहे…” सायली वैतागून म्हणाली

 

“बघू त्या डायरीच्या पानांची कॉपी आहे ना ती बघते मी……..” ईशा समोरच्या टेबलच्या दिशेने जात म्हणाली.

त्यातली पानं थोडीफार चाळून झाल्यावर वैतागून तिने ती बाजूला ठेवली.

ह्यात तर तसंही काहीच कळत नाहीयेसुरुवातीला आपण जे वाचलं होतं फक्त तेवढंच कळलं होतं…..सायली तुला ही आत्तापर्यंतची स्टोरी कुठे सापडली ह्याच्यात?”

 

आता ते महत्वाचं आहे का? आता पुढे काय झालं होतं ते कसं कळणार ह्याचा विचार करतेय मी…”

 

तो करूच अगं आपणपण सांग ना तू कशी वाचलीस ही डायरी?”

 

त्यात पुढची जी सातआठ पानं लिहिली आहेत ना, त्यात आहे ही मी सांगितलेली स्टोरी….अर्थात वरवर वाचून कोणालाच कळणार नाही ती….पण नीट एका जागी बसून शांतपणे वाचून बघ….एका वाक्याचा दुसऱ्याशी किंवा अगदी एका शब्दाचा दुसऱ्याशी सुद्धा काहीच अर्थ लागणार नाही, सगळं उलटसुलट लिहिलेलं आहे….आपण लहान असताना असली कोडी नाही का सोडवायचे ईशी? उलटसुलट केलेले शब्द सरळ करायचे किंवा वाक्य किंवा प्रसंग एकामागोमाग एक लावून त्यातून अर्थपूर्ण स्टोरी तयार करायची….तसलंच आहे हे अगं पण एवढी जास्त पानं म्हणून थोडं जास्त कॉम्प्लिकेटेड. कळलं? ”

 

ओह…..खरंच? सायले, ग्रेट आहेस तू…”

 

अगं ग्रेट काय त्यातमी फक्त एक तासभर शांतपणे बसले. विचार केला, की असं असंबद्ध कोणी कशाला लिहील? जे लिहिलंय त्यात नक्की काहीतरी अर्थ असणार. प्रयत्न तर करूया, म्हणून मी एका वेळेला एका पानावर काँसंट्रेट केलं. त्यातली प्रत्येक ओळ न ओळ वेगळी करून वाचली, म्हणजे आधीच्या वाक्याशी त्याचा काहीही संबंध नाही असंच गृहीत धरून वाचली. मग हळूहळू लक्षात आलं, की एका पानावर एका घटनेतली किंवा एकमेकांशी रिलेटेड अशी वाक्य साधारण पाचसहा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली गेली होती. मग मी अंदाज लावत सॉर्ट करत गेले. पहिले एका पानावरचे चार पॅराग्राफ्स तयार झाले, म्हणजे चार वेगवेगळे प्रसंग किंवा एकमेकांशी रिलेटेड अशी वाक्य….मग दुसरं पान वाचलं, त्याच्यातून आणखी दोन पॅराग्राफ्स तयार झाले….सगळ्या पानांचं असं सॉर्टींग करून झाल्यावर मग मला त्यातून ही एकसंध स्टोरी लिहायला सोपं गेलंते पॅराग्राफ्स सुद्धा क्रमाने एका मागोमाग एक असे नव्हतेच, पण घटनांचा क्रम लावता येण्यासारखा होता….”

 

माय गॉडखूप विचित्र आहे सगळं…..पण असं उलटसुलट का लिहिलं असेल तिने? आय मिन, वाचताना आपल्याला इतका त्रास झाला, लिहिणाऱ्याला तर आणखीनच डोकं लावायला लागलं असणार ना…..”

 

हो ना, मला पण तेच कळत नाहीयेआणि दुसरं म्हणजे, ही काही एक दिवसाची डायरी नाहीयेसुजय त्या शहरात आल्यापासून पुढे साधारण आठदहा दिवस तरी तिथे असेल ना, त्या दिवसांचं वर्णन आहेआता जनरली लोक डायरी त्यात्या दिवसाची लिहितात, बरोबर? मग ह्या मुलीने आठदहा दिवसांचं हे वर्णन असं उलटसुलट कसं लिहिलं असेल? एकाएका दिवसाचं असं लिहिलं असेल तर ठीक आहे….म्हणजे तिने कदाचित सगळ्या दिवसांचं एकदम लिहिलं असेल नाही का? ”

 

हो असेलही तसं कदाचित…” ईशा विचार करत म्हणाली.

 

पण प्रश्न असा आहे की ह्याच्यापुढे झालं काय नक्की? सुजय त्या प्रजापती निवास मध्ये होता आणि त्याला तिथे कापडात गुंडाळलेली काहीतरी वस्तू सापडली, आणि त्याच वेळी कोमल त्याला लग्नाला तयार असल्याचं सांगायला तिथे यायला निघाली होती…..मग नंतर काय झालं? ती तिथे गेली की नाही? आणि ती कापडात गुंडाळलेली वस्तू काय होती ?” सायली

 

हो यार….सगळे प्रश्नच प्रश्न आहेत….आपण ज्या स्पीडने पुढे जातोय ना, ते बघून मला वाटतंय की तुझं आणि सुजयचं लग्न झाल्यावर एक वर्षभराने वगैरे हे कोडं कदाचित सुटेल….” ईशा

 

गप गकाहीही बोलू नकोस…..माई आजीतू का गप्प आहेस पण? बोल ना काहीतरी ….तुला काय वाटतंय?” सायली

माई आजी आत्तापर्यंत चाललेलं सगळं बोलणं ऐकत शांतपणे बसून होती.

अगो काय बोलणार सायले….पुढे काय झालं असणार तोच विचार करतेय हो मी….त्या सिद्धार्थशी बोलणं झालं काय तुझं परत?”

 

त्याला मी थोडक्यात सांगितलं हे डायरीमधलं मला जे,जे काही कळलंय ते….तो डायरी चाळून बघतो म्हणाला आणखी काही मिळतं का ते….” सायली

 

खरं तर ना सायले, हे असे तर्कवितर्क लावण्यापेक्षा ह्या गोष्टीतल्या पात्रांना भेटण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं हो….ही डायरी सापडली म्हणून एवढं तरी आपल्याला कळू शकलं….पण आता पुढचा मार्ग आपल्याला शोधून काढायला हवाय हो….” माई आजी

 

हो….माई आजी म्हणते ते बरोबर आहेबघ ना सायली, आता आपले सगळे मार्ग बंद झालेतआपल्याकडे क्लू होते ते म्हणजे कटनी, विष्णूवराह मंदिर, ते फोटोमधलं आणि नंतर आपल्याला घरात सापडलं ते लॉकेट, प्रजापती निवास, सुजयचा म्हाताऱ्या वेषातला फोटो, भिंतीवर लिहिलेली सुजय वेड्सअशी अक्षरं आणि सगळ्यात शेवटी प्रजापती निवास मध्ये मिळालेली ही डायरी आणि त्यातून कळलेली ही सगळी स्टोरी….कोड्याचे हे सगळे तुकडे आपण जुळवलेत एकमेकात पण आता हे सगळे क्लू सुद्धा वापरून झालेत आपले…..अर्थात ते लॉकेट बद्दल काहीच कळलेलं नाही आपल्याला, ते कुठून आलं सुजयकडे आणि ते नक्की कोणाचं होतं वगैरे….पण म्हणजे माई आजी म्हणते तसं आपले सगळे रस्ते बंद झालेत आता…” ईशा

 

हो खरं आहेआणि सिद्धार्थ आधीच जाऊन आलाय दोन वेळा त्या प्रजापती निवास मध्ये , त्यामुळे आता तिथे आणखी काही मिळेल असं वाटत नाही.” सायली

 

तेच म्हणतेय मी सायले, त्या डायरीमध्ये लिहिल्याप्रमाणे ती कोमल, तिची ती मैत्रीण, कोमलची ती अम्मा, झालंच तर तिचे मामाजी, अशी जी कुणी माणसं आहेत ना ह्या सगळ्यात ह्यांनाच शोधायला हवं नात्याशिवाय आता दुसरा मार्ग नाही हो….” माई आजी

 

पण माई आजी, ती बाईम्हणजे तीनक्की कोण असेल? भूतच असणार ना? मग नक्की कोणाचं ? आणि मग सिद्धार्थला त्या प्रजापती निवास मध्ये ती जी मुलगी दिसली ती कोमलच होती की आणखी कुणी?” ईशा

 

ईशी थांब गंएवढे प्रश्नावर प्रश्न विचारून आपणच जास्त कन्फ्युज होऊ…..सध्या माई आजी म्हणतेय तसं करूया. सिद्धार्थशी बोलते मी….तो आजचा दिवस तिथे आहे ना, त्याला सांगते की ती कोमल किंवा तिच्या जवळचे कोणी लोकं, त्यांना भेटण्याचा प्रयत्न कर….अर्थात ती कुठे राहते हे माहित नाही म्हणा, पण बघू त्याला काही क्लू मिळतोय का ते….” सायली

 

हो हो लगेच फोन कर त्यालाआणखी वेळ घालवण्यात अर्थ नाही….” ईशा

 

आणि वासंतीला कसं समजवायचं ते सुद्धा बघायला हवं हो….”

 

डोन्ट वरी माई आजी….हातातोंडाशी आलेला घास असा इझिली जाऊ द्यायचाच नाहीये आपण….बघ तूसिद्धार्थला काहीतरी लीड मिळेल नक्की आणि आई पण कन्व्हिन्स होईल……”

आतापर्यंत विचारात गढून गेलेली आणि आईच्या रिएक्शनमुळे काहीशी काळजीत वाटणारी सायली आता एकदम कॉन्फिडन्टली विचार करत होती.

हॅलो सिद्धार्थ …” एक मिनिटानंतर ती सिद्धार्थशी बोलत होती.

 

सायली, मी तुला एक मिनिटात फोन करतो…” त्याने घाईघाईने फोन ठेवून दिला.

 

अरे..पण…” पण फोन आधीच ठेवून दिलेला होता.

काय करत असेल हा नक्की? कुठे असेल? विचार करूनही काहीच सुचेना तसं तिने तो नाद सोडून दिला. जाऊदे, त्याचा फोन आल्यावर कळेलच काय ते….आता आईला कसं समजवायचं ह्याचा विचार केला पाहिजे

—————————————

तिकडे सुजयची आई अस्वस्थ झाली होती. सुजयने तिच्याकडून त्या सेल्सगर्ल बद्दल सगळं विचारून तर घेतलं होतं. पण आता तिला कळत नव्हतं, तिने सगळं सांगून बरोबर तर केलं ना….का कुणास ठाऊक पण त्या मुलीवर विश्वास ठेवावासा वाटत होता. तिचा हेतू वाईट नाही, असं मन सांगत होतं….किती गम्मत आहे ना, तिच्या मनात येऊन गेलं. आपला सख्खा मुलगा आपल्याला सांगतोय की त्या अनोळखी मुलीवर विश्वास ठेवू नकोस, माझ्याबद्दल माहिती मिळवून मग माझं लग्न ठरलं की त्यात अडथळा आणण्यासाठी ती हे करत असणार, तरी त्याच्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. मागच्या दीड वर्षात तो इतका बदलून गेलाय की त्याचं वागणं खूप वरवरचं वाटतं. त्याच्या मनात काहीतरी सतत चालू आहे हे जाणवतं. पण ते काढून घेता येत नाही. आत्ताही फोनवर तिने त्याला विचारलं होतं की अरे पण एक अनोळखी मुलगी तुझ्या वाईटावर का असेल? तर त्याने त्याचं उत्तर दिलंच नव्हतं. पण त्या दिवशी त्या मुलीने जे सांगितलं, योगिताबद्दलत्यांचं दोघांचं लग्न जमेल ह्यासाठी ती करत असलेले प्रयत्न सगळं किती पटण्यासारखं आहे….तरीही आपल्या मुलाने समोरून असं सरळ विचारल्यावर आपण खोटं नाही बोलू शकलो त्याच्याशी. शेवटी पोटचा मुलगा तो., त्याच्याशी खोटं कसं बोलायचं? पण आता मात्र मन खात होतं. एक परकी मुलगी आपल्या मुलाच्या भल्यासाठी एवढी प्रयत्न करतेय आणि आपण तिची साथ नाही देऊ शकत आहोत ह्याचं वाईट वाटत होतं.

 

पण आता काय करणार? सुजयला सगळं खरं सांगितलंय आपण त्या मुलीचा फोटो ओळखला, ती योगिताची मैत्रीण आहे हे सांगितलं. तिला आपण काय, काय सांगितलं हे सुजयला सांगितलं. आता त्याला सगळंच कळलंय, हे तिला माहित असायला हवं….अचानक तिच्या लक्षात आलं, त्या दिवशी त्या मुलीने तिचा नंबर लिहून ठेवला होता डायरीमध्ये

 

ती लगबगीने उठली आणि डायरीमध्ये लिहिलेला तो नंबर शोधून काढला आणि लगेच डायलही केला. “द नंबर यु हॅव्ह डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट…..” हताश होऊन तिने फोन ठेवून दिला. सुजयला तिच्या येण्याबद्दल सगळं कळलंय हे आता त्या मुलीला कधीच कळवता येणार नव्हतं.

———————————————–

अर्ध्या तासाने सायली आईच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा तिच्या डोक्यावरचं अर्धं टेन्शन कमी झालं होतं. आईची समजूत काढण्यात ती यशस्वी झाली होती. शेवटी माई आजी म्हणाली ते काही खोटं नव्हतं. सायली तिची मुलगी होती म्हणूनच तिच्या पोटात शिरून ती तिची समजूत काढू शकली होती.

 

आईने तिला फक्त तीन अटी घातल्या होत्या. एक म्हणजे, ह्यापुढे ह्यासगळ्या बाबतीत जे,जे काही होईल ते सगळं काहीही न लपवता तिच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. थोडक्यात, ती आता ह्या सगळ्यात सायलीच्या बरोबरीने सहभागी होणार होती. आणि दुसरी अट, सायली स्वतःहून सुजयला भेटणार नाही. आणि त्याने भेटायला बोलावलं तर घरात सगळ्यांना सांगून आणि घरातल्या कोणालातरी बरोबर घेऊनच जाईलआणि तिसरी अट, ह्या सगळ्याचा शोध घेणं कितीही महत्वाचं असलं तरीही सिद्धार्थ तिथे त्या नवीन शहरात आणि त्या भयानक अनुभवांना एकटा सामोरा गेला होता आणि आता ह्यापुढे त्याला असं एकट्याला तिथे राहून काहीही करायला सांगायचं नाही, जे काही करायचं, जी माहिती मिळवायची ती सगळ्यांनी मिळून पण इथे घरी बसून. कशी, ते सगळ्यांनी मिळून ठरवायचं…… अर्थात आईने सगळं ऍक्सेप्ट करून ताबडतोब लग्न मोडण्याची तिची अट मागे घेतली होती ह्या पुढे तिच्या ह्या नवीन अटी काहीच नव्हत्या. सायलीने लगेचच तिचं म्हणणं ऐकण्याचं तिला प्रॉमिस करून टाकलं होतं. एकच प्रॉब्लेम होता ह्यात, सिद्धार्थला आज रात्रीच्याच गाडीने पर्याय यायला सांगायला लागणार होतं. अर्थात ते आधीही तसंच ठरलेलं होतं पण आता आईची तशी अटच होती. आजचा जवळपास अर्धा दिवस शिल्लक होता. तेवढ्या वेळात तो काय करू शकणार? आणि पुढे नक्की काय करायचं हे त्यांचं अजून ठरलेलंही नव्हतं. पण ठीक आहे, बघू विचार करू , काहीतरी मार्ग नक्की निघेल ….त्याच्याशी एकदा बोलून आता सगळं नीट ठरवूया….अरे पण तो आहे कुठे? मगाशी म्हणाला होता की एक मिनिटात फोन करतो आणि अर्धा तास होऊन गेला तरी अजून त्याचा फोन आलेलाच नव्हता, सायलीच्या आता लक्षात आलं.

 

काय करत असेल तो नक्की? आणि फोन का नाही आला त्याचा? आय होप ही इज फाईन…..पुन्हा त्या प्रजापती निवासमध्ये तर गेला नसेल ना….

 

शेवटचा विचार मनात आला आणि तिचा धीर सुटला….तिने त्याला फोन लावला. पण या वेळी फोन आऊट ऑफ कव्हरेज होता. आता तिच्या मनात उलटसुलट विचारांची गर्दी व्हायला लागली…..व्हाट्स ऍप वरून त्याला मेसेज केला…’सिद्धार्थ, व्हेअर आर यु? प्लिज कॉल मी….’ पण तो मेसेजही डिलिव्हर होत नव्हता. त्याच्या फोनची वाट बघण्यापलीकडे आता काहीच पर्याय नव्हता.

——————————————————————

सु.सा. आज घरीच होता. उद्या पहाटेच आईबाबा येणार. आज घर स्वच्छ करून घायला हवं होतं. आईला असा पसारा पडलेला, किचन अस्ताव्यस्त पसरलेलं, नीट साफसफाई केलेली नाही असं अजिबात आवडायचं नाही. फोनवर त्याच्याशी बोलतानाही तिच्या अर्ध्या सूचना ह्याबद्दलच्याच असायच्या. आणि तो मात्र अगदी विरुद्ध स्वभावाचा. ऑफिसमध्ये तो अगदी स्टार परफॉर्मर असला तरी ह्या सगळ्या गोष्टीत तो शून्य होता. एखादं काम करताना आजूबाजूला त्याच्या नकळतच तो खूप पसारा करून ठेवायचा आणि नंतर ते सगळं आवरायचं त्याच्या अगदी जीवावर यायचं. मग आठवडाभर तो पसारा तसाच. तिथेच सगळं आजूबाजूला सरकवून स्वतःला बसायला म्हणून जागा करून घेणार पण ते आवरायचं काही मनावर घेणार नाही. आता इतके दिवस ते नाहीत म्हटल्यावर घराची फारच वाईट अवस्था झाली होती. कामवाली बाई येऊन जायची पण घरात लक्ष ठेवणारं कोणी नाही म्हटल्यावर ती तितपतच काम करायची. घरात येणारंजाणारं बाकी कुणी नव्हतंच. मध्ये मध्ये यायचा तो सुजयच. आणि कधीतरी ऑफिसचं काम करण्यासाठी कौस्तुभ (कौस्तुभ परांजपे). तो घराची अवस्था बघून त्याला थोडं नीट राहत जा वगैरे सांगायचा पण आता त्याची बदली झाली होती त्यामुळे तो सुद्धा काही दिवसात आलेला नव्हता.

 

आईबाबा येणार म्हटल्यावर आता सु.सा.ची तारांबळ उडाली. घरात पाय ठेवल्यावर हे असलं आईने बघितलं तर आपलं काही खरं नाही, त्याला माहित होतं. आज त्याने सरळ सुट्टी घेतली. सकाळी उठल्यापासून घर आवरण्याची मोहीम हातात घेतली. आधी किचन आवरायला घेतलं. फ्रिज साफ केला, कामवाल्या बाईसाठी घासण्याची भांडी काढून ठेवली. मग बेडरूम्स, आणि मग बाहेरची खोली….बाहेरच्या खोलीत तर गेल्या चार दिवसांचे चहाचे कप तसेच पडले होते. ऑफिसचे कामाचे पेपर्स सगळीकडे पसरले होते. मध्ये कधीतरी वाण्याकडून आणलेलं सामानसुद्धा अजून तिथेच पडलेलं होतं. ते बघून त्याला आठवलं, अरे हो, काय काय सामान संपलंय ते बघून आणून ठेवायला हवं.

 

बाहेरून आणण्याच्या सामानाची लिस्ट त्याने करायला घेतली तेवढ्यात त्याचा फोन वाजला. सुजयचा फोन.

ह्याला एवढं सांगितलं होतं, आईबाबा येतायत, आता माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवू नकोसतरी ह्याचे अजून फोन चालूच आहेत….जाऊदेवाजत राहूदे फोनमी घेतच नाही आता….”

फोन वाजून बंद झाला. दोन मिनिटांनी पुन्हा वाजायला लागला. असं तीन वेळा झालं. शेवटी वैतागून सु.सा. ने फोन उचलला.

हॅलो

 

हाय….काय म्हणतोयस?” सुजय

 

काही नाही रे. जरा कामात आहेतू फोन का केलायस?” सु.सा.

 

कामाचंच बोलायचंय रे….तुझे आईबाबा कधी येणार आहेत?” सुजय

 

उद्या पहाटेच येतील तेका? काय झालं पण? आणि सुजय प्लिज डोन्ट मिसअनडरस्टँड मी पण मी म्हटलं ना तुला परवा, आता मला ह्या सगळ्यात तुझी साथ नाही देता येणार….सो प्लिज डोन्ट कॉल मी…”

 

सॉरी, खरंच माझ्या लक्षात होतं रे तेपण तुझ्याही इतकीच मलाही काळजी वाटतेय रे….तुझ्या आईबाबांना काही कळायला नको ह्याचीम्हणून खरं तर न राहवून फोन केलाते आल्यावर मग उगाच फोन नको ना करायला…”

 

म्हणजे ? काय म्हणायचंय तुला? आईबाबांना काही कळलं असेल असं?” सु.सा. च्या आवाजात आता टेन्शन डोकावायला लागलं.

 

अरे नाहीतसं नाहीमी तुला परत एकदा विचारून खात्री करून घ्यायला फोन केलाय..” सुजय

 

अरे नीट सांग बाबामला कळत नाहीये…” सु.सा.

 

अरे मला तुला विचारायचंय की तुला असं वाटतंय का की त्यांना काही कळलं असेल?” सुजय

 

मला? नाही …..असं तर नाही वाटत मला….तू असं का विचारतोयस पण ?” सु.सा.

 

ते परत येतायत हे त्यांनी तुला सांगितलं तेव्हा काय सांगितलं नक्की?” सुजय

 

अरे म्हटलं ना मी तुला परवाच, त्यांच्या जवळच्या मित्राच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं म्हणाले, म्हणून निघालेत परत यायला…”

 

हो पण कोणता मित्र, काय प्रॉब्लेम झालाय असं काही म्हणाले का? किंवा अजून काही सांगितलं का त्यांनी?” सुजय

 

अरे परवा त्यांनी हे कळवायला फोन केला तेव्हा ते फारच गडबडीत होतेआल्यावर सांगतो म्हणालेकाय आहे, एक महिन्यानंतर येणार होते पण एकदम अचानक यायचं ठरवायचं म्हटलं तर गडबड होणारच ना. तरी साठे काकांनी, म्हणजे ज्यांच्याकडे ते गेले होते त्यांनी पटकन तिकीट बुक करून दिलं त्यांना. पण बाकी तयारी करायची होती. आणि नंतर मग डायरेक्ट एअरपोर्टवरून फोन केला होता फ्लाईट बोर्ड करायच्या आधी. ”

 

मग तेव्हा काही म्हणाले का?”

 

नाही रेगडबडीत बॅग उचलताना त्यांच्या पाठीत उसण भरली. आयत्या वेळी व्हाईलचेअर पण मिळत नव्हती. कशीबशी मिळाली….वगैरे असलंच बोलणं झालं. एकतर फ्लाईट टेक ऑफ ची वेळ होत आली होती. त्यांना पाच मिनिटं होती म्हणून त्यांनी फोन केला, पण अचानक असं निघून येण्यासारखं काय झालं हे तेव्हा कुठे बोलणार? आता ते आले की कळेलच.”

 

तुला खात्री आहे का की त्यांना काहीही कळलं नसेल? ”

 

तुला असं का वाटतंय ? मला तरी असं काहीच जाणवलं नाही…तसं काही असलं असतं तर बाबांनी मला डायरेक्ट विचारलं असतं ना…” सु.सा.

 

हम्म….”

 

एक मिनिटकाही झालंय का? तुला आज अचानक असं का वाटलं की माझ्या आईबाबांना ह्या सगळ्यातलं काही कळलंय म्हणून ते परत येतायत?” सु.सा.

 

???”

सुजय एक मिनिट गोंधळला. सायली आपल्या घरी येऊन गेल्याचं ह्याला सांगावं की नाही? पण नाही, नकोच. तो घाबरून उगीच स्वतःहून सांगायचा त्याच्या आईबाबांना. त्यांना काही कळलं असेल असं वाटत नाही असं म्हणतोय ना तो, मग कदाचित तसंच असेलह्याच्यापर्यंत हे सगळं गेलं तर त्याची मदत तर नाहीच होणार पण तो हवालदिल होऊन कुठेतरी बोलून बसेल उगीच….”

अरे सांग ना…”

 

??? अरे नाही रे असं काहीही झालेलं नाही….पण आपणच सावध असायला हवं नाम्हणून म्हटलं एकदा तुला विचारून खात्री करून घेऊयाआता थोडक्यासाठी गोंधळ नको ना…” सुजय

 

बरंजाऊदेआता जास्त विचार करू नकोसमला पण जरा घर वगैरे आवरायचंय आणि प्लिज सुजय, आता ह्यापुढे फोन नको करुस….” सु.सा.

 

होचल ठेवतोपण ते आल्यावर तुला वाटलं की त्यांना काही कळलंय, तर सगळ्यात आधी प्लिज मला सांग…..त्यांच्याशी काहीही बोलायच्या आधी..ओके?”

 

हो कळलंतसं काही असेल तर तुला फोन करेन चल ठेवतो आता…” सुजय

—————————————–

काय करायचं आता सायले?” ईशा

 

माहित नाही गं….मगाशी त्याने फोन उचलला होता त्याला चाळीसेक मिनिट्स होऊन गेली असतील….आणखी थोडा वेळ वाट बघूया….पण ईशी, मनात नको नको ते विचार येतायत अगंतो ठीक असेल ना?” सायली

 

निगेटिव्ह विचार करूयाच नको गं….त्या स्टोरी चं पुढे काय झालं असेल ते बघूयाथोड्या वेळात येईल सिद्धार्थचा फोन …” ईशा

 

हम्म….स्टोरी चं काय पण? पुढे काय झालं ते कसं कळणार?” सायली

 

सुजयला त्या घरात, त्या खोलीत काहीतरी मिळालंलाल कापडात गुंडाळलेलंकाय असेल ते? आणि सायले, आपण तिची डायरी वाचतोय ना, मग ती तिथून गेल्यावर सुजयने तिथे काय, काय केलं हे तिने डायरीमध्ये कसं लिहिलं असेल?” ईशा

 

एकतर, तिने ते असं डायरेक्ट लिहिलेलंच नाहीयेतिच्या बाकीच्या लिखाणातून जसं एक एक वाक्य लावून मी सगळं वाचलं ना, तसं त्या लाल कापडात गुंडाळलेल्या त्या वस्तूचा उल्लेख त्यात आला होता, त्यावरून मी तो अंदाज बांधलाय….एक मिनिटही त्या डायरीच्या पानांची कॉपी….एक मिनिट मला शोधूदेहे मला कुठे मिळालं ते…”

डायरीमध्ये इतक्या सफाईने सगळं एकमेकात सरमिसळ केलेलं होतं की ते पुन्हा शोधून काढायलाही सायलीला पाच मिनिटं लागली

हा. हे बघ ईशी….मिळालं….हे बघ इथे मधेच ही ओळ लिहिली आहे…..”

वक्त कैसे गुजर गया पता ही नही चला…. जिससे मन की सारी बाते बोल सकू, जो मुझे इतने अच्छेसे समझ सके ऐसा आज आया है कोई जिंदगी मैं….बारिश बहोत ज्यादा हैबाहर घुमने तो नही जा सकतेमामाजीके घर जायेंगे….’प्रजापती निवास‘….शायद वो दिवार पर लिखा सब कुछ मिटाना चाहता था..तभी उसके हाथ लाल कपडे मैं लपेटी हुई वो चीझ मिली….

ईशाने मोठ्याने हे वाक्य वाचलं.

सायले, मग नंतर काय झालं असेल? ती कोमल प्रजापती निवासमध्ये परत गेली तेव्हा सुजयच्या हातात ती वस्तू दिसली असेल का तिला? ”

 

ईशी, ह्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे, ती वस्तू नक्की काय होती हे कळायला हवं. कदाचित तिच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असू शकते….आणि….आणिकदाचित असं झालं असेल की काहीतरी खूप किमती वस्तू असेल आणि ती वस्तू बघून सुजयची बुद्धी फिरली आणि ती यायच्या आत तो ती वस्तू घेऊन तिथून पळून गेला. आणि तिच्यासाठी ही वस्तू इतकी महत्वाची असणार की त्या धक्क्याने तिने डायरी लिहिणं सुद्धा बंद केलं.”

तिचं बोलणं ऐकून ईशाला हसू आवरेना.

ए शहाणे, एवढं हसायला काय झालं?”

 

सायले, तुझ्यावर ना जुन्या हिंदी मुव्हीज चा फारच प्रभाव आहेतो तिची काहीतरी वस्तू घेऊन पळून गेला. तिला त्याचा प्रचंड धक्का बसला, आणि त्यासोबत प्रेमभंग पण….हे प्रेमभंग हे माझ्या व्हर्जन मधलं ऍड केलंय हा….हातर त्या सदम्यामुळे ती देवदासीण झाली आणि तिने डायरीसुद्धा लिहिणं बंद केलं….आणि हे सगळं सांगताना जुन्या मुव्हीज मध्ये असतं ते करुण म्युझिक बॅकग्राऊंड ला…..ये……व्वा….सायले आपण एक अवॉर्ड विनिंग शॉट लिहिलाय एका गूढ मुव्ही चा….” बोलताबोलता ईशा पुन्हा हसायला लागली

सायली तिच्यावर प्रचंड वैतागली.

तू ना हसतच बसतेवढंच येतं तुलाआपल्याला ती वस्तू कोणती होती हे माहित नाहीकोमल आणि सुजयच्या बाबतीत पुढे काय झालं हे माहित नाहीम्हणून जे माहित आहे त्याच्या आधारावर मी माझा अंदाज बांधतेयकदाचित त्यानेच काहीतरी क्लू मिळणार असेलजाऊदे तुला काय त्याचं? तू हसतच बसमी जाते बाहेर…”

 

अगं बाई सॉरी ग….पण तू आत्ता असलं फिल्मी बोललीस ना की मला पण राहवलं नाही…”

 

फिल्मी असेल पण असं झालं नसेल कशावरून? त्या मुलीने डायरी लिहिणं एकदम बंद का केलं असेल? हा विचार करत होते मी, तिच्या बाजूने विचार केला तर असं असूही शकतं ना, की ह्या असल्या धक्क्यांमुळेच तिने डायरी सुद्धा लिहिली नाही नंतर…” सायली

 

किंवा असंही असू शकतं ना की त्यानंतर डायरी लिहिण्यासाठी ती जिवंतच राहिली नसेल ?” ईशाचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सायली ओरडली

 

ईशा, काहीही काय बोलतेयस…?”

 

अगं अंदाजच बांधायचे तर सगळ्या बाजूंनी बांधायला हवेत नाती कोमल अजून जिवंत असेल का? आपल्याला माहित नाही….सिद्धार्थला त्या घरात जे दिसलं, जी मुलगी दिसली ती खरीच तिथे होती का? तीच ही कोमल असेल तर शक्यता हीच आहे की शी इज नो मोअर. मग कदाचित त्या वेळेला असंही झालेलं असेल की सुजय तिची कोणतीतरी महत्वाची वस्तू घेऊन पळून जात होता त्यावेळी ती मध्ये आली. म्हणून त्याने तिला मारलं आणि तो पळून गेला. म्हणूनच ती सिद्धार्थला त्या घरात दिसली आणि म्हणूनच आपल्यालाही दिसली, आपल्याला सावध करायला आली होती की हे सगळं सत्य शोधून काढा…..हे सगळं असंही असू शकतं ना…”

 

हम्म…..” सायली स्वतःच्याच विचारात होती.

 

सायले, ऐक ना….मावशी ठीक आहे ना गं आता? ”

 

हो गं काय झालं? ”

 

मला जाऊन सॉरी म्हणायचंय तिला…” ईशा

 

कशाला?”

 

अगं, मला खूप गिल्टी वाटतंयशेवटी हे सगळं आपण दोघींनी मिळून सुरु केलं ना.. मावशीपासून मी पण लपवलंच आहे सगळंतिला हे कळल्यापासून तिच्या समोर जाता येत नाहीये मला, सकाळी ती इतकी चिडली होती की हिम्मतही नाही झाली माझी म्हणून म्हटलं मी तिचा राग आता गेला असेल तर मी बोलते तिच्याशी…”

 

आता ठीक आहे ती ….आणि तशीही लाडक्या भाचीवर अजिबात रागावणार नाही ती….आणि तू चक्क तिला घाबरतेयस? ”

 

अगं तेच ना, एरव्ही न रागावणारे लोकं असे रागावले ना की खूप भीती वाटते….बरं मी मावशीशी बोलते जरा…”

 

हो..”

ईशा खोलीतून गेल्यावर सायली तिच्या विचार चक्रात पुन्हा अडकली. ईशाच्या मगाचच्या बोलण्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. ती मुलगी जिवंत नसेल? गेले दोन दिवस सुजयच्या ह्या सगळ्या स्टोरीचा पाठपुरावा करताना ती ह्या सगळ्यात मनानेच खूप अडकली होती. ती मुलगी कुणीतरी खूप जवळची, ओळखीची आहे असंच वाटायला लागलं होतं. हा सगळा गुंता सोडवताना कधीतरी आपली प्रत्यक्ष भेट होईल असाच तिने विचार केला होता आत्तापर्यंत….तिच्या लिखाणातून, विचारातून जितकी ती तिला समजली होती, त्यावरून ती खूप मनस्वी असणार, हळवी असली तरी जिद्दी असणार हे जाणवत होतं. जगात फार थोडी माणसं अशी असतात जी स्वतःची स्वप्नं, इच्छा पूर्ण करतानासुद्धा दुसऱ्यांचा आधी विचार करतात, आपल्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये ह्याची त्यांना सतत काळजी असते, तशी असणार ही मुलगी. जिच्याबद्दल कोणी कधीच वाईट विचार करू शकणार नाही अशी, जिचं वाईट व्हावं अशी ईच्छा असणारं जगात कोणीच नसेल अशी, जिचं नाव काढल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर कायम एक छानसं स्माईल येईल, अशी. गेल्या दोन दिवसात तिच्याशी काहीतरी नातं जोडलं गेल्यासारखं झालं होतं. तिच्याबद्दल असा काहीतरी विचार करायलाही मन धजावत नव्हतं. पण जर त्या सुजयमुळे खरंच काही बरंवाईट झालं असेल ना इतक्या गोड मुलीचं….तर त्याला सोडणार नाही मी…..चांगला धडा शिकवेन….

 

सुजयच्या विचार येताच तिचा चेहरा रागाने लाल झाला, नकळत मुठी आवळल्या गेल्या…..तेवढ्यात फोनच्या रिंगमुळे ती एकदम भानावर आली….धावत जाऊन तिने फोन बघितला. सिद्धार्थचा फोन….

फायनली…..”

ती जोरात ओरडली आणि तिने फोन कानाला लावला.

—————————————–

सुजयचं डोकं वेगाने काम करत होतं. सु.सा.शी बोलून त्याचं फारसं समाधान झालेलं नव्हतं. त्याचे आईबाबा असे तडकाफडकी परत का येतायत हे अजून नीटसं कळलेलंच नव्हतं. त्यांच्या बोलण्यातून असं काही जाणवलं नाही असं सु.सा. त्याला म्हणाला होता खरा, पण त्याच्यावर ह्याबाबतीत विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता. एकतर तो खूप सरळ विचार करणारा होता. नाकासमोर चालणारा. हे असं कोणाच्या बोलण्यातून त्याच्यावर संशय घेणं किंवा समोरच्याच्या मनात काय असेल ह्याचा अंदाज घेऊन मग त्याप्रमाणे संवाद साधणं वगैरे त्याच्या स्वभावातच नव्हतं. पण सुजय आता ह्या खेळात मुरलेला होता. परवा सु.सा.ने त्याला त्याचे आईबाबा परत येत असल्याचं सांगितलं तेव्हासुद्धा त्याला थोडं विचित्र वाटलं होतं पण आता सायली आपल्या घरी येऊन गेल्याचं कळल्यावर तर सु.सा.चे आईबाबा परत येणं हे त्याला आणखीनच संशयास्पद वाटत होतं. हे सगळं कुठेतरी एकमेकांशी जोडलेलं आहे असं वाटत होतं.

 

हे सगळं आता कुठल्या दिशेला जाऊ शकतं ह्याचा तो विचार करत होता. सायलीला खोटी ओळख सांगून तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्याच्यावर होऊ शकला असता. पण त्याला तिच्याच बाजूचे, साखरपुड्याला आलेले नातेवाईक हजर होते. त्यांची साक्ष ग्राह्य धरली जाईल का ह्याची खात्री नव्हती. त्याच्या बाजूचे लोक तर त्यानेच उभे केले होते. राहता राहिले ते म्हणजे कौस्तुभ आणि सु.सा. अर्थात सुजयने खोटी ओळख सांगून सायलीशी साखरपुडा केलाय हे कौस्तुभला माहित असण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणजे राहिला सु.सा. त्याने मात्र जर सुजयला ह्या सगळ्यात मदत केल्याचं कबूल केलं तर मात्र सुजय अडकला असता.

 

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यासाठी त्याने हा सगळं घाट घातला होता, प्रचंड प्लॅनिंग करून हे सगळं नाटक ज्यासाठी रचलं होतं, त्याचं लग्न, ते होणारच नव्हतं.

 

एक क्षणभर त्याला स्वतःचाच राग आला. इतके कसे आपण बेसावध राहिलो? सायली आपल्या घरापर्यंत जाऊन पोहोचली, तिने योगिताचा उल्लेख केला म्हणजे नक्कीच ती योगिताला भेटली असणार किंवा तिच्याबद्दल तिला सगळं काही माहित असणार. ह्याचाच अर्थ ती माझ्याबद्दल सगळं काही शोधून काढण्याच्या मागे होती. आणि आपण मात्र समजत राहिलो की आता आठपंधरा दिवसात लग्न होईल.

 

आता काय स्टॅन्ड घ्यायचा ह्याचा तो विचार करत होता. सायलीच्या घरून अजून लग्न करणार नाही असा फोन तर आला नव्हता. कटनीला जे घडलं ते सगळं तिला कळलं असेल का? तसं असेल तर ती नक्कीच लग्नाला नकारच देणार पण तसं नसेल तर अजून थोडी आशा आहे. तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या नावाने खोटी कंप्लेंट केलेली आहे आणि त्यामुळे आधी ठरलेली लग्नं मोडली आणि म्हणून ह्या वेळेला लग्नासाठी हे खोटं नाटक करावं लागलं, हे तिला कळलं तर तिला पटेल कदाचित माझी बाजू….आईचं मन राखायला म्हणून लग्न करायचं होतं आणि मग सायली चं प्रोफाईल आणि फोटो बघितल्यावर ती कशी आवडली हेही सांगता येईलच ना तिला….इतके दिवस तिच्याशी मनमोकळेपणाने बोलायचं टाळलं पण आता मोकळेपणाने बोलायचीच वेळ आली आहे, तरच कदाचित तिला पटेल….

 

फक्त कटनीबद्दल तिला नक्की काही कळलंय का, हे जाणून घ्यायला हवं. उद्या सकाळीच तिच्या घरी जाऊया, आधी काहीही न सांगता, अचानक. त्यांच्या रिएक्शन्स पण बघता येतील आणि एकूणच अंदाज येईल ते आपल्याशी कसं वागताबोलतायत ते बघून….आणि मग सगळं ठीक वाटलं तर हे सगळं बोलताही येईल तिच्याशीठरलं तर ….उद्याच सकाळी सायलीच्या घरी जायचं….

————————————————

ईशी बोलून आलीस का आईशी?” ईशाने आणलेला चिवडा खाताखाता सायली म्हणाली.

 

हो आता जरा बरं वाटतंयपण तू कोणाशी बोलत होतीस फोनवर?”

 

तेच सांगायचं होतं तुला आणि सगळ्यांनाच….सिद्धार्थचा फोन आला होता…” सायली

 

आला फोन त्याचा? बघ तू उगीच टेन्शन घेत होतीसकाय म्हणाला तो?”

 

कदाचित आता आपल्याला सगळंच कळेल ईशी….तो कटनीच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता….”

 

पोलीस स्टेशनला? का?” ईशा किंचाळलीच.

 

सांगते गं….आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे….ती लाल कापडात गुंडाळलेली वस्तू काय होती हे त्याला कळलंय…”

 

क्रमशः

7 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 41)

 1. Ranjita
  September 12, 2017

  खुप छान लिहिताय, पण मध्ये खुप वेळ लागतोय पोस्ट करायला त्यामुळे लिंक राहत नाही .

  Like

 2. Shradha
  September 12, 2017

  Ohh God… amazing… pan punha khup vat pahayala lagnar pudhachya bhagachi… Pls lavkar post kara

  Like

 3. Anjali
  September 12, 2017

  ho na. Khooooooooooooooop vel gela madhe
  nest post lagech taka . not after 1 month

  Like

 4. sarika devrukhkar
  September 12, 2017

  please jast vel lau naka post karayla link tutate mag

  Like

 5. Ujvala
  October 4, 2017

  Please late naka karu jaste vat bhagun intrest kami hoto

  Like

 6. Anonymous
  October 7, 2017

  Pls post next part… Diwali aadhi…nantar chakkar marayala vel nahi honar… 🙂

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on September 11, 2017 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: