davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 43)

“हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं झालं असंच वाटतंय गो….तिकडे त्या घरात कुणी भेटलं असतं तर निदान काहीतरी कळू शकलं असतं…”

“हो ना….आता पुढे काय करायचं प्रश्नच आहे….त्यात त्या ओरिजिनल सुजयचा चॅप्टर आज सायली बंद करतेय ते चांगलं आहे, आता सुजयला त्याची साथ तरी नाही मिळणार …”

————————————————————–

हे सगळं चालू होतं तेव्हा तिकडे सीएसटी स्टेशनमध्ये बाहेरगांवची एक ट्रेन धडधडत येऊन थांबली. भराभर सगळे प्रवासी आपापलं जड सामान बाहेर काढून बाहेर पडले…त्या गर्दीतच सिद्धार्थही उतरला. स्वतःचं सामान सावरत तो पुढे चालायला लागणार तेवढ्यात मागून एका मुलीचा आवाज आला,

“अरे भैय्या, ये कितनी भीड है यहा….”

“तुम मुंबई पेहेली बार आई हो ना…हमने कहा नही था? यहा बहोत भीड रेहेती है…” तिच्या मागून आलेल्या सिध्दार्थच्याच वयाच्या एका मुलाचा आवाज…

सिद्धार्थ गालातल्या गालात हसला. अरे हो, ह्यांना काही आपल्यासारखी मुंबईची सवय नाही, आपण जणू काय हे अगदी सहज एवढ्या गर्दीत आपल्या मागून येतील असं समजून निघालो, पण थोडं थांबून निघावं, गर्दीचा भर ओसरला की…

“वेलकम टू मुंबई…सॉरी मुझे बताना चाहिये था…यहा भीड बहोत रेहेती है..हम लोग पाच मिनीट के लिये वहा खडे रेहेते है फिर निकलेंगे…भीड थोडी कम हो जायेगी ना फिर….”

“और यहांसे कितना दूर भैय्या?”

“यहांसे बस आधा घंटा …टॅक्सी करके जायेंगे…” सिद्धार्थ

*************************** भाग ४२ पासून पुढे ********************

भाग ४२ येथे वाचा <<– https://wp.me/p6JiYc-13t

 

सायलीच्या घरातून बाहेर पडल्यावर एक क्षणभर कुठे जावं हेच सुजयला सुचेना. तिच्याकडे अचानक जाऊन त्या सगळ्यांच्या रिएक्शन्स बघून, त्यांची लग्नाची तयारी खरंच चालली आहे की नाही ह्याचा अंदाज घ्यायचा. आणि तशीच काही गडबड वाटली तर स्वतःबद्दल सगळी खरी माहिती देऊन आपण हे कुठल्या परिस्थितीत केलं ह्याचं चित्र त्यांच्यापुढे उभं करायचं, सायलीच्या आपण कसे आणि किती प्रेमात पडलो आहोत हे पटवून द्यायचं, वगैरे असं त्याने ठरवलं होतं, नव्हे ह्या सगळ्याची काल रात्रीपासून प्रॅक्टिस केली होती त्याने. त्यांना आपल्याबद्दल कळलं नाहीये असं वाटलं तर मग लग्नासाठी मार्ग मोकळा असेल असं समजायला हरकत नव्हती, अचानक गेल्यावर कोण कसं रिएक्ट होतंय त्यावरून ह्याचा अंदाज आलाच असता. आणि जर त्यांना आपल्याबद्दल सगळं कळलेलं असल्यासारखं वाटलं, तर मग ते सगळं नाटक करायचं, त्याने सायलीचं आणि त्याचं लग्न झालं असतं असं नाही, पण निदान लग्नाच्या आधी सगळं सांगितल्यामुळे सायलीच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे करायचा विचार तरी केला नसता, आणि काय माहित, त्याच्या बोलण्यावर त्यांनी सगळ्या परिस्थितीचा फेरविचार करून लग्नाचा निर्णय कायमही ठेवला असता. आता सध्या ह्याशिवाय त्याच्याकडे आणखी चांगला पर्याय नव्हता.

 

पण आता काय करायचं? सायली आणि तिचे आईबाबा भेटणारच नाहीत असा विचार त्याच्या मनात आलाच नव्हता. वेळ निघून जातोय हातातून ह्याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली पण ह्या परिस्थितीत नक्की काय करायचं हे त्याचं अजून ठरत नव्हतं. त्याला एकदम सु.सा. ची आठवण झाली. त्याचे आईबाबा आले असतील यु.एस वरून एव्हाना आणि त्यांच्या कोणत्या मित्राचा नक्की काय प्रॉब्लेम झालाय हेसुद्धा सु.सा.ला आत्तापर्यंत कळलं असेलच. त्याने त्याला फोन लावला. पहिल्या वेळेला फोन उचललाच गेला नाही. दुसऱ्या वेळेला बऱ्याच रिंग्स नंतर फोन उचलला गेला.

हॅलोसु.सा. दबक्या आवाजात बोलत होता.

 

हॅलो, अरे सुजय बोलतोय….”

 

कळलं….काही अर्जंट आहे का? मी बाबांबरोबर बाहेर आलोय जराआत्ता बोलता नाही येणार…”

 

ओकेमला सांगते नक्की का आलेत परत?” सुजयने अधीरपणे विचारलं.

 

अरे काय चाललंय तुझं? एकतर मी तुला सांगितलं होतं मला फोन करू नकोसतसंच काही वाटलं तर मीच तुला फोन करेनआणि काय संबंध आहे त्यांच्या लवकर येण्याचा तुझ्याशी?” सु.सा. च्या आवाजात वैतागल्याचे भाव स्पष्ट ऐकू येत होते.

 

आय नो, अँड आय एम रिअली व्हेरी सॉरी ..तुला त्रास नाही द्यायचाय मलाफक्त तुझ्या आईबाबांना काही कळल्यामुळे ते परत आलेत असं नाही ना, तेवढंच विचारायचं होतं….”सुजय

 

तसं असलं असतं तर मी लगेच कळवलं नसतं का तुला? त्यांच्या मित्राचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झालायया वयात डिव्होर्स होतोय त्यांचानक्की काय झालं ते कळलं नाहीयेत्यांचा फोन आला होता बाबांना यु.एस.ला, खूप निराशावादी बोलत होते म्हणून काळजीने बाबा तातडीने निघून आले इकडे. त्यांच्या घरी आलो तेव्हा कळलं की सकाळी बीपी खूप डाउन झालं म्हणून त्यांना इथल्याच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंयतिथेच आलोय आत्ता..बाबा आत बोलतायत त्यांच्याशी….कळलं ? आपल्याशी संबंधित काहीही नाहीयेपण प्लिज तू सारखा फोन करून असं काहीतरी विचारायला लागलास तर आईबाबांना नक्की संशय येईल….म्हणून सांगतोयमला फोन करू नकोस….”

 

नाही करणार आता…..खरंच सॉरी तुझी पोझिशन कळतेय मलाचल ठेवतो…” सुजय

सु.सा.च्या बोलण्यावरून तरी त्याला तसा कुठलाच धोका जाणवला नव्हतामग हे काय आहे सगळं ? तिकडे ईशा सांगतेय सायली लग्नाच्या खरेदीला गेली आहे, सुजयच्या आईबाबांना काही कळलंय म्हणून ते परत आले नाहीयेत, ते वेगळ्याच कारणासाठी परत आलेत….वरवर सगळं शांत, सुरळीत वाटतंय पण मग आईने सांगितलेलं सगळं? त्याचं काय ? सायली तिकडे घरी गेली होती? तिला मुळात जर खरा सुजय कोण हेच माहित नसेल तर ती माझ्या घरी जाऊन कशी पोहोचली ? योगिताचा उल्लेख कसा केला? म्हणजे सायली खोटं बोलतेय माझ्याशी? पण मग एवढं सगळं कळून ती शांत का बसली असेल? काहीतरी चुकतंय, नक्कीच….आईकडून काही गफलत झाली असेल का? दुसरीच कुणी मुलगी येऊन गेली असेल….खरंच योगिताची मैत्रीण असलेली मुलगी आली असेल, जिला खरंच माझं आणि योगिताचं लग्न व्हावं असं वाटत असेल आणि त्यासाठी प्रयत्न करायला म्हणून ती आईला भेटली असेल….कदाचित आईला तिचा चेहरा नीटसा आठवत नसेल आणि मी सायलीचा फोटो दाखवल्यावर तिला कदाचित चुकून असं वाटलं असेल की हीच मुलगी येऊन गेली होती…..असं असेल ? एका वेळी एवढे योगायोग ? नाही, हे नाही पटतआणि तसं असेल तर मग त्या टेलरची रिसीट जी सायलीची होती ती घरी कशी येईल ? नाही, नक्कीच सायलीच घरी गेली होती. आता प्रश्न आहे तिचं नक्की काय चाललंय?

 

विचार करता करता आणखी एक विचार त्याच्या डोक्यात आला. आधी त्याने ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला होताच, पण आता सायली घरी जाऊन आल्याचं कळलं आणि मग त्याचं डोकं एकाच दिशेने चालायला लागलं. पण आता आधीचे सगळे विचार पुन्हा त्याच्या डोक्यात घोळायला लागले. तो सिद्धार्थ, आता परत आला असेल का? आणि आला असेल तर तो नक्की का आणि कुठे गेला होता हे आता तरी कळू शकतं….त्या माणसांना परत कामाला लावायला हवंसिद्धार्थ परत आलाय का ते बघायला हवं

———————————————————-

कधी येणार यार सायलीमला कंटाळा आलायत्या सुजयच्या घरी काय झालं असेल त्याची उत्सुकता लागली आहे….” ईशा

 

येईल गो बायो, किती उतावीळ होशीलमला मात्र फार कौतुक वाटतं हो पोरीचंएखादी असं सगळं कळल्यावर लग्न मोडून मोकळी झाली असतीही एवढी धडपड करतेय सगळं शोधण्याची त्या सुजयने फसवलं म्हणून रडत बसली नाही पोरगी….” माई आजी

 

हो गंपण मी होते ना तिच्यासोबत थ्रूआऊट..माझ्यासारखी बहीण मिळायला भाग्य लागतं माहित आहे ?.मग? माझं पण कौतुक कर ना थोडं ….” ईशा खोटी खोटी रागावली तशी माई आजी तोंडाचं बोळकं पसरून हसली

 

होय गो ….तुझं कौतुक आहेच तर….तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यात कठीण गोष्ट कुठली होती ठाऊक आहे तुला? अंधारातल्या सावल्यांना सामोरं जाणंसोपं नसतं ते बायो….” माई आजी

 

माई आजीएक मिनिटहे काय अंधारातल्या सावल्या वगैरे म्हणत असतेस तू? लहानपणापासून ऐकतेय मीपण मला अजून नीट कळलंच नाहीये…” ईशा

 

अगो बरं मला सांग काळ्यामिट्ट, खोल अशा अंधारात जिथे एकही दिवा नाही, अशा अंधारात सावली दिसते कधी?” माई आजी

 

एवढ्या अंधारात सावली कशी पडेल माई आजी? सावली पडण्यासाठी थोडा तरी उजेड हवा ना…”

 

होय ना, पण त्या नेहेमीच्या सावल्या गो..दुपारच्या उन्हात आपल्यालाच आपल्या दिसतात त्यापण त्या काळ्यामिट्ट अंधारात सुद्धा सावल्या असतात हो, आपल्या डोळ्यांना न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या…..”

 

अगं म्हणजे काय पण? तेच तर कळत नाही ना….”

 

आता तुला समजावून सांगायचं म्हणजे….तू आणि सायलीने जे काही अनुभव घेतलेत, ते सगळं अंधारातल्या सावल्यांचा भाग होते की नाही? ती बाई तुम्हाला रात्री दिसायची म्हणून नाही, तर ते नैसर्गिक नसावं, तिचा हेतू काय आहे हे कळत नाही, ते सगळं गूढ आहे म्हणून….ते सगळं सकाळच्या लख्ख उजेडासारखं स्पष्ट नाही, तर धूसर आहे, अंधुक आहे पण ते आहे,बरोबर? कारण तुम्ही कधीतरी अनुभवलंय ते सगळं….म्हणून ह्या सगळ्या अंधारातल्या सावल्या गो…..अंधारातून आपल्यावर नजर ठेवणाऱ्या…”

 

माई आजीआय लव्ह यु फॉर धिस….कसं सगळं मस्त सांगतेस तू….म्हणजे आपल्याला नेहेमी जे डोळ्यांना दिसत नाही पण कधीतरी त्याचं अस्तित्व जाणवतं ते म्हणजे अंधारातल्या सावल्याबरोबर ना?”

 

अगो बायो तू तर फारच हुशार निघालीसएका वाक्यात सांगितलंस की मला काय म्हणायचंय तेपण तरी त्यात आणखीही एक गोष्ट आहे हो…..अगो देव तरी दिसतो का आपल्याला डोळ्यांना? पण तरी आपल्यातल्या काहीजणांना कधीतरी त्याचं अस्तिव जाणवल्याची उदाहरणं आहेतच की….आपण सुद्धा तो दिसत नसला तरी त्याचं अस्तिव मानून त्याला पूजतोच की नाही?” माई आजी

 

हो, बरोबरम्हणजे तुला काय म्हणायचंय ? देव सुद्धा अंधारातल्या सावल्यांचा भाग आहे?” ईशा आता गोंधळली.

 

तसं नाहीपण हाच मोठा फरक आहे असं म्हणावं लागेलअगो देव हा जगातल्या सगळ्या पवित्र, निर्मळ गोष्टींचं प्रतीक मानतो ना आपणदेवघरातल्या देवांचे फोटो बघितलेस का कधी नीट? देवाच्या चेहऱ्याभोवती नेहेमी प्रकाशाचं वर्तुळ असतं…..प्रकाश म्हणजे सकारात्मकता, मांगल्य, आशा ,स्वच्छ आणि शुद्ध विचार आणि आचारहीथोडक्यात ते प्रकाशाचं वर्तुळ बघितलं की असेच सगळे भाव येतात ना मनात?…गूढता, भय , विचारांचा गोंधळ ह्या सगळ्याला त्यात थारा नाहीअसं बघतू एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून एकटी चालली आहेस, आजूबाजूला सगळं चिडीचूपबरोबर कोणीच नाहीसमोरच्या अंधाऱ्या वळणावर काहीतरी असल्याची तुला चाहूल लागली आहे, तुझ्या मनात धाकधूक सुरु होतेअशा वेळेला कोणी येऊन तुला सांगितलं की समोर रस्त्यावर देवाचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे….काय होतं मग? हे कळल्यावर बघ आत्ताही तुझ्या मनात एकदम सकारात्मक विचार आले की नाही? समोर देवाचं मंदिर आहे, अंधारात काहीच दिसत नाहीये पण देवाचं मंदिर आहे हे कळल्यावर तुझ्या मनातली भीती, शंका सगळं गायब झालं की नाही? पण हेच, तुला समोरच्या वळणावर नक्की कोण आहे, काय आहे काहीच माहित नाहीसमोर फक्त अंधार दिसतोय तर काय होईल? अर्थातच तू घाबरशील, समोरचं वातावरण एकदम गूढ वाटायला लागेल तुलामग अशा वेळी समोर ज्या गोष्टीची तुला चाहूल लागली आहे, ती गोष्ट म्हणजे अंधारातली सावली….समोर जे आहे ते निरुपद्रवी असेलही पण ते काय आहे ह्याचा नक्की अंदाज येईपर्यंत त्याच्या भोवती गूढतेचं सावट असतंच….कळलं?”

 

सही आहेस तू माई आजी..किती टू द पॉईंट बोलतेस….आत्ता जरा कळलं मला एवढं काय सारखं अंधारातल्या सावल्या, अंधारातल्या सावल्याम्हणत असतेस ते..”

 

कळलं ना? अगो, म्हणूनच तर म्हटलं ना मी….अंधारातल्या सावल्यांना असं सामोरं जाणं सोपं नसतं…”

 

पण तुला कसं कळलं गं हे सगळं? म्हणजे हे बघ, आपण जे बोलतो किंवा इतरांना समजावतो ते आपल्याच आलेल्या अनुभवातून….असं तूच म्हणतेस नाम्हणजे तुलाही ह्या सगळ्याचा अनुभव आलेला आहे आधी? म्हणजे कधीतरी नक्कीच आलेला असणार ना, म्हणून तर तू सारखं असं सांगायचीस आम्हाला अंधारातल्या सावल्यांबद्दल….आणि त्या दिवशीसायली तिथे बेडच्या खाली तुला आठवतंय नात्याच दिवशी तुला हे कळलं सगळं सुजयबद्दल आणि त्या विचित्र प्रकाराबद्दल….त्या दिवशी तू काहीतरी अर्धवट बोललीस आणि मग म्हणालीस की वेळ आली की सांगेन वगैरे….आता सांग मला….काय आठवलं तुला नक्की तेव्हा?”

 

बायो, आत्ता कशाला हवाय तो विषय ? सायली येईलच बघ आत्तामग तिथे काय झालं हे ऐकता येईल ना…”

 

नाही, तू आधी पण अशीच टाळाटाळ केलीस सांगायलाआत्ता सांगायलाच हवं तुला….” ईशा

 

अगो, ऐक ना माझंसायलीसुद्धा असेल ना तेव्हा बोलू हो आपण ह्यावर …”

 

ते तेव्हा बोलू ते बोलूचपण मला सगळं आत्ता ऐकायचंय…” ईशा

 

नकोशा वाटतात गो त्या आठवणी बायो…”

 

मला कळतंय माई आजीपण बघ ना कदाचित तुला ते सगळं परत आठवलं तर आपल्याला त्याचा आत्ता उपयोग होऊ शकतो नाप्लिज माई आजी….सांग ना गं…” ईशा

 

बरंतू काही ऐकायची नाहीसतुम्हा पोरींना नाही म्हणता येत नाही गो मला…..सांगते…”

पुढचा अर्धा तास ईशा माई आजीच्या (साधारण पंचेचाळीस वर्षांपूर्वीची वेणू) गोष्टीत रमून गेली होतीतिचे यजमान बाहेरगावी गेलेले असताना एकटी घरी असलेली वेणू, रस्त्यात भेटलेली आईची वाट बघणारी ती मुलगी, तिला घरी सोडून आल्यानंतर झालेला भासआभासांचा भयंकर खेळ, वेणूला दिसलेली ती बाई, त्यानंतर बरेचदा रस्त्यातून जाताना भेटणारी ती मुलगी आणि ती भेटेल त्या दिवशी भेटलेली ती बाई, नंतर त्या मुलीच्या घराजवळच्या म्हातारीकडून कळलेली त्या मुलीच्या आईची गोष्ट…(रेफरन्स साठी भाग 23 वाचा )

 

माई आजी बोलायची थांबली तशी ईशा म्हणाली,

मग पुढे काय झालं माई आजी? पण तुला एक गोष्ट कळली काम्हणजे बघ ना, हे किती सिमिलर आहे अगंती मुलगी जेव्हा तुला भेटायची तेव्हा तिची आई यायचीआणि आपल्या आत्ताच्या केसमध्ये सुद्धा जेव्हा सायली सुजयला भेटली तेव्हा तेव्हा तीयायचीआणि ती सुद्धा नॉर्मल माणसासारखं दारावर टकटक करून नाही, तर अचानक बंद दरवाज्याच्या आत कधीही यायची…..”

 

बायो, आणि ह्यात आणखी एक साम्य आहे माहित आहे? माझ्या वेळेला काय आणि सायलीच्या वेळेला काय, आम्ही दोघी एकट्याच नव्हतो हे अनुभव आलेल्यात्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्या बाईने मला सांगितलं होतं की असं झालेली मी काही पहिलीच नव्हतेमाझ्या आधीही लोकांना त्या मुलीला मदत केल्यावर आलेल्या त्या सगळ्या अनुभवांचे किस्से होतेच….तसंही आत्ताच्याही केसमध्ये, तुम्ही माहिती मिळवलीत त्याप्रमाणे सायलीच्या आधी त्याचं ज्या दोन मुलींशी लग्न ठरलं, त्या दोघींनी ह्याच कारणासाठी लग्न मोडलं, बरोबर ना?”

 

हो बरोबर, पण माई आजी , मग पुढे काय झालं सांग ना….आजोबा (म्हणजे माई आजीचे यजमान) खूप दिवस बाहेरगावी जाणार होते म्हणून तू तुझ्या बाबांकडे राहायला गेलीस, म्हणजे ती मुलगी तिथे काही तुला भेटली नसणार, म्हणजे ती बाईपण भेटली नसणार ना? मग सगळं बंद झालं ते प्रकरण?”

 

मी माझ्या वडिलांकडे राहायला गेल्यावर ती मुलगी मला भेटणं शक्यच नव्हतं गो, आणि हे मलाही माहीत होतंम्हणूनच तर मी गेले ना माहेरीएक म्हणजे, ती मुलगी कधीही भेटायची आणि मग मागोमाग ती आई, ह्या सगळ्या मानसिक दडपणाखाली मला राहायचं नव्हतं गो, आणि दुसरं म्हणजे, माझ्या वडिलांचा अभ्यास होता ह्या विषयावर, त्यांच्या कानावर घालायचं होतं हो मला हे सगळं, हे का आणि कसं होतं हे जाणून घ्यायचं होतं…”

 

मग? काय म्हणाले ते? ह्या सगळ्यामागे नक्की काय कारण होतं?” ईशा पुढचं ऐकायला उतावीळ झाली होती.

 

कारण म्हटलं तर तिच्या आईची तिच्यावर असलेली वेड्यासारखी माया….त्या मायेपोटीच तर येत होती ना गो ती..”

 

अगं पण ती तर आधीच गेली होती नामी तेच तर विचारतेयअशी गेलेली माणसं परत कशी येऊ शकतात? आपल्याला दिसू कशी शकतात?” ईशा

 

हेच प्रश्न पडले होते बरं मला त्यावेळी….हेच तर मी माझ्या वडिलांशी बोलत होते त्यानंतर बरेच दिवसत्यांनी त्यांचेही अनुभव सांगितले मलाहळूहळू एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ईशेविज्ञानाने सिद्ध करता येणार नाहीत अशा काही गोष्टी आहेत, पण जगासमोर सिद्ध करता आल्या नाहीत म्हणून त्यांचं अस्तिव नाकारता येत नाही आपल्यालाआता पुन्हा तेच उदाहरण देतेयदेवविज्ञानाने कधीतरी देवाचं अस्तिव सिद्ध होतं का? नाही ना….पण तरीही तो आहे, आपल्यातली बरीचशी लोकं असंच मानतात, बरोबर?”

 

पण त्याला कारणंही आहेत की तशीचआपल्याकडे अशी उदाहरणं आहेतच ना, जिथे अशक्य अशा गोष्टी आपल्या अवतार घेतलेल्या देवांनी किंवा संतांनी करून दाखवल्या, म्हणजे चमत्कारम्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्ञानेश्वरइतक्या लोकांसमोर त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतला किंवा चांगदेवांना भेटण्यासाठी म्हणून ती सगळी भावंडं भिंतीवर बसली आणि मग ती भिंतच त्यांना चांगदेवांपर्यंत घेऊन गेलीह्या गोष्टी सायन्स मध्ये कधीच बसणार नाहीत पण तरी हे लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना….जगासमोर सिद्ध झालंच देवाचं मोठेपणआणि अशी खूप उदाहरणं आहेत नाम्हणजे समोर काहीही नसताना आपण देवाला मानतो असंही अगदी म्हणणं चुकीचंच आहे ना माई आजी….” ईशा

 

बोलण्यात हुशार आहेस हो तूबरोबर बोललीसपण मला हे सांगायचंय तुलाकी डोळ्यांना न दिसणाऱ्या आणि विज्ञानाने सिद्ध न होणाऱ्या गोष्टी जगात असतातदेव हे त्याचं एक उदाहरण म्हणू आपणआता त्याच्यातल्या ऊर्जेने आणि शक्तीमुळे तो असे चमत्कार घडवून जगासमोर त्याचं अस्तिव सिद्ध करू शकतोपण सगळ्यांनाच हे शक्य होत नाही, पण म्हणून त्यांचं अस्तित्वच नाकारायला हवं असं नाही…”

 

म्हणजे तू हे भूतपिशाच्च ह्याबद्दल बोलतेयस का ?” ईशा

 

भूत वगैरे असं काही नसतं गोती आपण दिलेली नावं आहेतहा पण माणसाच्याच आतला एक अंश जो माणूस मरण पावला तरीही जिवंत राहतो, तो, असं म्हणूया आपणआता खरं तर असा एखादा अंशच कसा जिवंत राहील? विज्ञान तर हे कधीच मान्य करणार नाहीपण माणसाच्या शरीरापेक्षा त्याचं मन नेहेमीच जास्त प्रभावी असतं बाळा….आपण आयुष्यभर आपलं मन म्हणेल तसं आपल्या शरीराला वापरत असतो, पण जेव्हा शरीरच राहत नाही तेव्हा काय होतं नक्की? खरं तर शरीराबरोबर आपलं मनही संपलं पाहिजे ना, पण बरेचवेळा तसं होत नाही. ज्या शरीरातून प्राण निघून जातात, त्याच्या मनाचं काय? मनातल्या आशा, अपेक्षा, आनंद, दुःख, समाधान, राग, चीड, प्रेम, निराशा ह्या भावना लगेच आटून जात असतील? बाहेरून पाहणाऱ्या माणसाला नक्कीच असंच वाटतं बाळा, की हा माणूस मरण पावलाय आता त्याला कसलं सुख आणि कसलं दुःख….पण प्रत्यक्ष त्या माणसाच्या बाबतीत असं कधीच नसतंआयुष्यभर आपल्या मनाचं ऐकण्याची आपल्या शरीराला इतकी सवय झालेली असते की शरीर थांबलं तरी ह्या सगळ्या वेगवेगळ्या भावना साठवून मन नावाचा त्या देहातला एक अंश बाहेर पडतोच. आपण बरेचवेळा त्याला आत्मा असं म्हणतोपण खरं तर आत्मा म्हणजे त्या मन नावाच्या त्या बाहेर पडलेल्या अंशाचाच एक भाग असतो, किंवा त्यापासूनच तयार होतो असं म्हणूयात…”

थोडं थांबून माई आजी म्हणाली,

आता माणसाचं मन इतकंही प्रभावी नसतं की त्याच्याकडे देवासारखी अशी एखादी शक्ती असेल ज्यायोगे ते आपलं अस्तिव असं एखाद्या चमत्काराने सिद्ध करेल, पण म्हणून हे सगळं अस्तित्वातच नाही, असं आपण गृहीत धरू शकत नाही, हेच सांगायचं होतं मला….”

 

कळलं मला, पण माई आजी आपण मूळ मुद्द्यापासून बाजूला नाही का पडलोय? मी तुला विचारलं की अशी गेलेली माणसं कशी दिसू शकतात.?”

 

मला जितकं कळतंय तेवढं तुला सांगणारच आहे मी बायोपण हे सगळं मी तुला का सांगितलं? तर काही गोष्टी आपण मनातून स्वीकारत नाही तोपर्यंत त्यापुढचं काहीच आपण पाहू शकत नाही होआमचा काळ वेगळा होता, विज्ञान आमच्या इतकं जवळ आलेलं नव्हतं तेव्हा, पण तुमचं तसं नाही ना गो..तुम्ही आमच्यापेक्षा कैकपटींनी जास्त विज्ञान, त्यात लागणारे नवीन शोध, उपकरणं वापरताय. तेव्हा होतं काय, की जे दिसतं तेच खरं ह्यावरचा विश्वास वाढत जातोमनातून कितीही शंका आली की समोर दिसणारी गोष्ट नैसर्गिक, सहज दिसणारी नाही, तरीही आपण आपल्याच मनात येणाऱ्या विचारांशी सहमत होऊ शकत नाही, त्यावर वेगवेगळे तोडगे काढत राहतो जे सर्वमान्य असतील, इतरांना सहज पटू शकतील आणि सिद्ध होऊ शकतीलत्यामुळे ह्याबाबतीत पुढे काहीही बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली पायरी म्हणजे समोर आपल्याला जे दिसतंय, जे जाणवतंय, आपलं मन आपल्याला जे सांगतंय, ते तसंच्या तसं स्वीकारणं. तसं नाही केलं तर सत्य आपल्या समोर कधीच येऊ नाही शकत आणि आपण फक्त भरकटत राहतो..”

 

ओकेम्हणजे सायलीच्या बाबतीत जे झालं, ते असंच काहीतरी आहे, असंच म्हणायचंय ना तुला?” ईशा

 

मला काय म्हणायचंय त्याचा विचार करू नकोससमोर जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवा, त्याला कोणतीही दुसरी नावं देऊ नका, आणि असं कसं होईल?’ असा अविश्वासाचा सूर नकोअसं सांगायचंय हो मलामी माझ्या वडिलांना भेटले आणि त्यांच्याशी हे सगळं बोलले तेव्हा सगळ्यात आधी त्यांनी हेच सांगितलं मलाबरं आता पुढेती बाई मला कशी दिसली आणि का?

मी आता जे सांगतेय ना तुला ईशे, ते मला माझ्या वडिलांनी सांगितलं तेव्हा. कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं  सापडणार नाही हे कदाचित. पण तरीही मला जे अनुभव आले, त्यावरून सांगते, हे असं होतं आणि होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे भूत वगैरे म्हणतो ते तसं काहीही नसतंमी मगाशी म्हटलं तसंआपलं मन ही आपल्याकडे असलेली खूप प्रभावी गोष्ट आहे..शरीर साथ देत नसताना केवळ मनाच्या ईच्छाशक्तीवर असाध्य आजारावर मात केलेल्या कितीतरी लोकांची उदाहरणं आहेत आपल्याकडे. पण मनाच्या ह्याच प्रभावीपणामुळे कधीकधी निसर्गाच्या विरुद्ध जायची शक्तीसुद्धा त्यात येतेमनातली ईच्छा जेवढी प्रबळ तेवढी त्याची शक्ती जास्तआणि मगाशी मी तुला सांगितलं तसं, शरीर थांबलं तरी मनात साठलेल्या असंख्य भावना लगेच लोप पावतात असं नाही, त्यामुळे माणसाच्या शरीरातून प्राण निघून गेले तरी मन जिवंत राहू शकतंअर्थात नेहेमीच असं होईल असं नाहीत्या मनात असलेल्या भावना जितक्या प्रबळ, मनातल्या ईच्छांना पूर्णत्वाला नेण्याची आस जितकी मोठी, तितकं ते मन जिवंत राहण्याची शक्यता मोठी

आता ती बाई का येत होती? ह्याचं उत्तर ह्यातच दडलेलं आहे बायो…..तिची तिच्या मुलीवर असलेली प्रचंड माया, ती या जगातून शरीराने गेली असेल पण तिचं मुलीवर असलेलं प्रेम तिला परत घेऊन आलं होतं, अर्थात पूर्वीसारखं शरीर रूपाने नाही, कारण ते शरीर परत मिळवणं तर शक्य नसतं. तिची मुलगी थोडी वेडसरपणे वागायची, वडिलांचं मुलीकडे लक्ष नाही, वस्तीतल्या आजूबाजूच्या घरांशी चांगला संबंध नाही, अशा परिस्थितीत मुलीला एकटं कोणाच्या जीवावर सोडणार? पुढे ती कशी राहील? तिला मदतीची गरज लागली तर कोण मदत करेल तिला, असंख्य काळज्या डोक्यात ठेवून ती गेली आणि मग तिच्या ह्या चिंताच तिला परत घेऊन आल्या. माझ्यासारखी ज्यांना, ज्यांना ती दिसली त्यांना अर्थात ती भयानक वाटली. पण खरं तर तिच्या येण्याचं कारण फार वेगळं होतं. ज्यांनी ज्यांनी त्या मुलीला पहिल्यांदा मदत केली, त्यांना त्यांना ती भेटली, हे सांगायला की माझ्या मुलीला अशीच मदत करत रहा…”

 

अगं पण मी हेच विचारतेय ना माई आजी….अशी ती दिसली कशी? असं असेल तर अशी कितीतरी लोकं जी आत्ता नाहीयेत पण स्वतःच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी परत आलेत असे दिसतील आपल्याला, नाही का? म्हणजे अगदी रस्त्यावर फिरताना सुद्धा मधेच प्रकट होऊन मधेच गायब होणारी अशी लोकं दिसतील….तू जे मनाचं, त्यातल्या ईच्छांचं ते सगळं लॉजिक सांगितलंस ते पटलंय मला, नक्कीचमुव्ही मध्ये पण नाही का दाखवत एखादं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी गेलेली लोकं परत येतात..माणसाच्या मनात एखादी ईच्छा खूप स्ट्रॉंग असेल तर ती पूर्ण करण्यासाठी तो माणूस मरणानंतरही धडपडत राहील हे अगदीच समजू शकतं, पण अशी माणसं आपल्या डोळ्यांना कशी दिसू शकतात? आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे.. जेव्हा जेव्हा ती मुलगी तुला भेटायची, तेव्हा तेव्हा ती बाई तुला दिसायची ह्याला काय लॉजिक आहे? एकदा तू तिला मदत केलीस म्हटल्यावर ती कायमची मागे का नाही लागली तुझ्या? ”

 

अगदी हेच सगळे प्रश्न मलाही पडले होते बरं….माझ्या वडिलांकडून एकेका गोष्टीबद्दलचं स्पष्टीकरण मिळत गेलं आणि जणू काही एका वेगळ्याच जगाबद्दल कळल्यासारखं वाटलं मला….आपल्या आजूबाजूला, आपल्या नकळत इतक्या गोष्टी घडत असतात पण आपल्याला बरेच वेळा त्याचा गंधही नसतोएखादी गोष्ट डोळ्यांना दिसत नसली तरीही ती जाणवूसुद्धा नये? असं का होतं माहित आहे? त्यालाही कारण आपलं मनच बरं….माझ्या वडिलांनी हे सगळं मला फार छान उदाहरणं देऊन समजावलं होतं बरंआता तेवढं सगळं आठवत नाही मला पण तरी सोप्या शब्दात तुला सांगायचा प्रयत्न करते हो…..

आपलं मन ना ईशे, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्थितीत असतं….म्हणजे आता एखादा माणूस स्वभावाने तुसडा, बाकीच्यांशी फटकून वागणारा असेल म्हणून त्याचं मन नेहेमी तसं वागण्याच्याच स्थितीत असतं असं नाही ना गो, एखाद्या हळव्या क्षणी मन हळवं होतंच की, किंवा कधीतरी नाराज होतं, कधी कणखर होतं, कधी सुनं सुनं होतं, थोडक्यात प्रत्येक क्षणी किंवा प्रसंगानुरूप मनाची स्थिती वेगळी असते ना गो….आता दोन माणसं जरी एकाच वेळी एकाच प्रसंगातून जात असतील तरी त्यांच्या मनाची स्थिती ही वेगवेगळी असू शकते ना गो, म्हणजे असतेचमन दुःखी असेल तर त्याची तीव्रता कमीजास्त असू शकते दोन लोकांच्या बाबतीत…. म्हणूनच आपल्याकडे म्हणतात ना गो व्यक्ती तितक्या प्रकृती‘…

तर हेच कारण आहे हो आपल्याला उठसूट अशी मरण पावलेली लोकं दिसत नाहीत..कारण ती दिसणं हे आपल्या, म्हणजे जिवंत माणसांच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. आता ती माणसं परत कशी येतात? तर खरं तर ती परत येत नाहीतच, पण तो शरीरातला बाहेर पडलेला अंश, जो मनातल्या सगळ्या भावना घेऊन बाहेर पडतो, तो मात्र हवेच्या झोतासारखा फिरत राहतो. तो दिसायला कसा असतो असं विचारलंस तर सांगणं कठीण आहे, कारण शेवटी तो आजूबाजूच्या वातावरणाचा, हवेचाच एक भाग होऊन जातो. हवा डोळ्यांना दिसत नाही, तसा तोसुद्धा दिसत नाही. पण जसजसे दिवस पुढे जातात, तसतशा त्यातल्या काही भावना, ज्यांना आता त्या शरीराचं अस्तिव संपल्यामुळे फारसा अर्थ उरलेला नसतो त्या हळूहळू लोप पावतात….एखादी प्रबळ भावना मनात नसेलच तर काही काळाने शरीरासारखं ते मनही संपून जातं..पण काही अतिशय टोकाला जाणाऱ्या भावना त्या मनात असतील तर त्या मात्र संपून जातीलच असं नाही. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, आईचं लहान बाळावरचं प्रेम, सुडाची भावना, आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी वगैरे. उलट कधीकधी शरीराचं अस्तिव संपल्यावर ह्या भावना हळूहळू जास्त प्रबळ सुद्धा होत जातात. मग आपली सगळी शक्ती पणाला लावून ह्या सगळ्या राहिलेल्या ईच्छा पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होतेअर्थात ह्या काही जिवंत माणसाच्या मनातल्या ईच्छा नाहीत त्यामुळे त्या जागृत व्हायला बरेचवेळा तसंच काहीसं घडावं लागतं..हवेचं कसं असतं? एरव्ही हवा शांतपणे, थंडपणे वाहत असते..पण वातावरणातला एखाद दुसरा बदल त्या हवेचं वादळात रूपांतर करतोमग काही काळाने आपोआप हे वादळ शांत होतंतसंच असतं काहीसं आपल्या ईच्छांच्या बळावर तग धरून राहिलेल्या त्या शेवटच्या अंशाचं….

आता माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर, त्या मुलीची आई ह्यासाठीच मला दिसत होती ना….मुलीची प्रचंड काळजी होती तिलाही काळजी ती स्वतः मरण पावल्यावर कैकपटींनी वाढत गेली. तिच्यातला तो अंश त्यामुळे लोप लावू शकला नाही….पण म्हणून जिवंत असताना ती जशी कायम स्वतःच्या लेकीची काळजी करायची आणि काळजी घ्यायची तसं आता शक्य नव्हतं. तिचं मन जरी जिवंत राहिलं तरी शेवटी हवेच्या लहरीसारखा आणि स्वतःचं असं काहीही रंग,रूप, आकार आणि अस्तिव नसलेला असा तो एक अंशपण जेव्हा, जेव्हा कोणी तिच्या मुलीला पुढे येऊन मदत करताना तिला दिसायचं, तेव्हा तेव्हा तिची मुलीबद्दलची काळजी किंवा आणखी बाकीच्याही भावना, मुलीला मदत करणारं कोणीतरी मिळाल्याचं समाधान हे सगळं एखाद्या वादळासारखं अचानक जागृत व्हायचंएरव्ही ती काळजी असायचीच आणि त्यापोटी तिचं मन कदाचित तिच्या मुलीभोवतीच भरकटत राहायचं. पण जेव्हा मी तिच्या मुलीला मदत केली तेव्हा असंच वादळासारखं काहीसं घडलं असावं, त्या मनाची ती प्रचंड शक्ती जागृत झाली, आणि मग तिने धडपड सुरु केली माझ्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी…म्हणून बरेचवेळा असं घडलं की जेव्हा ती मुलगी मला भेटली, मी तिला मदत केली, तेव्हा तेव्हा तिच्या आईने मला भेटण्यासाठी धडपड केली..”

 

माय गॉड माई आजी….हे असं खरंच असतं? म्हणजे भूत वगैरे आपण जे म्हणतो, ते हे असं असतं?…..अगं ऐकताना एकदम सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऐकल्यासारखं वाटतंय….म्हणजे वैज्ञानिक स्पष्टीकरण….” ईशाने लगेच मराठीत भाषांतर करून सांगितलं

 

इंग्रजी येत नसलं तरी तेवढं कळतं गो मला ईशेमी म्हटलं नव्हतं तुला, माझ्या बाबांनी मला हे सगळं सांगितल्यावर एका वेगळ्याच जगाबद्दल कळल्यासारखं वाटलं होतं मला..भूत हे आपण दिलेलं नाव हो….आणि त्याबरोबर सांगितल्या जाणाऱ्या गोष्टीही आपणच तयार केलेल्यामाझ्या वडिलांनी मला असं कधीच सांगितलं नाही की भूत अशा नावाची काही गोष्ट असते. त्याच्याशी जोडलेल्या प्रत्येक समजुतीला सुद्धा खोडून काढलं हो त्यांनी…”

 

ओके, म्हणजे एक भाग तर कळला की ती माणसं परत कशी येतात. सॉरी म्हणजे शब्दशः माणसं असं नाही, पण त्यांच्यातला तो अंश, का आणि कसा जिवंत राहतो आणि आपल्यापर्यंत कसा येतो हे कळलं. पण माई आजी, अगं पण आपल्याला मग ते दिसतात कसे? म्हणजे वादळाच्या वेळी जशी हवा नुसतीच जोरात वाहताना जाणवते तसं नुसतं काहीतरी जाणवलं पाहिजे ना असं माणूस आपल्या समोर आलं कीपण मला आणि सायलीला आणि तुझ्या बाबतीत तुलाही ती बाई दिसली ना….मग असं कसं झालं?”

 

हम्मह्याकडे येणारच होते मीईशा, वादळाच्या वेळेला हवेचं अस्तिव जाणवतं म्हणजे काय होतं नक्की? हवा वाहण्याचा आवाज येतो, आजूबाजूचा पालापाचोळा उडताना दिसतो, झाडाची पानं सळसळतात, बरोबर? अगं तसंच काहीसं होतं हो, पण ते काय होतं हे त्या तग धरून राहिलेल्या मनापेक्षा आपल्या जिवंत मनावर अवलंबून असतंमला सांग शरीर नसलेल्या मनाकडे एवढी ताकद असते तर आपल्या शरीर असलेल्या मनात किती ताकद असेल बरं? आपल्या मनात असणाऱ्या भावना आपण बोलून दाखवू शकतो किंवा ईच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराची साथ मिळत असते. समोर काहीतरी नेहेमीपेक्षा वेगळं येऊ पाहतंय, ह्याची जाणीव आपल्याही मनाला होतेच.

पण ती जाणीव ज्या क्षणी होते, त्या क्षणी आपल्या मनाची स्थिती काय असेल हे महत्वाचं….बरेचवेळा हे इतकं अनपेक्षित असतं की असं काही आपल्या समोर येणार आहे हे माहीतच नसल्यामुळे एकतर आपण, म्हणजे आपलं मन बेसावध असतं आणि दुसरं म्हणजे समोर जे काही येणार आहे ते तसंच्या तसं स्वीकारायला ते कधीच तयार नसतं, त्यामुळे सगळ्यात आधी ते गोंधळून जातं आणि मग ह्या सगळ्यामुळे थोड्या वेळासाठी का होईना, कमकुवत होतंआणि असा एकाच क्षण पुरेसा असतोअशाच वेळी समोरचं तेच ते आपल्या प्रबळ भावनांच्या जोरावर तग धरून राहिलेलं ते मन आपल्या मनावर भारी पडत जातं. ते आपल्या मनाचा ताबा घेतं असं नाही, पण आपलं मन त्या क्षणी इतकं गोंधळलेलं, बेसावध असतं की असं काही समोर आल्यावर विचार करण्याची किंवा आपलं स्वतःचं ऐकण्याची शक्तीच आपलं मन घालवून बसतंसमोर जे घडतंय, जे कोणी आपल्याशी संवाद साधू बघतंय, जे आवाज आपल्याला ऐकू येतायत त्याला खरं तर काहीच पार्श्वभूमी नसते, पण ती आपणच निर्माण करतो, आपलं मन निर्माण करतं. आणि बरेच वेळा ते नकारात्मक वातावरणच निर्माण करतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुला ती बाई बाथरूम मध्ये दिसली, बरोबर? त्यावेळचं तू अनुभवलेलं सगळं आठवबाथरूमचा दरवाजा धडधड वाजत होता, कडी आपोआप उघडली, तुला आरशात चेहऱ्यावर केस पुढे ओढलेली एक बाई दिसली, वगैरेहे सगळं चित्र तुझ्याच मनाने तयार केलं होतं गो. मला जितकं कळतं त्यावरून सांगते. त्यावेळी प्रत्यक्षात झालं इतकंच होतं की ती जी कुणी बाई आहे, म्हणजे अतृप्त असलेलं तिचं मन हे तुझ्याशी काही संवाद साधू पाहायला तुझ्या, म्हणजे तुझ्या मनाच्या संपर्कात आलं, त्यावेळी ते जे काही आहे ते जसंच्या तसं स्वीकारायला तुझं मन अर्थतच तयार झालं नाही, पुन्हा तेव्हा वीज गेलेली असल्याने अंधाराची पार्श्वभूमी होतीच, त्यातून तुझ्या मनाने ही सगळी पार्श्वभूमी तयार केली. खरं इतकंच झालं होतं की तू हवा तसा प्रतिसाद दिला नाहीस म्हणून ती निघून गेली…पण तुझ्या मनाने उभं केलेलं चित्र तेवढं तुझ्या लक्षात राहिलं…”

 

पण मग तुला तर ती बाई दिसली होती, तू तिचा चेहराही बघितला होतास, जर हे सगळं चित्र तुझंच मन तुझ्यासमोर तयार करत होतं, तर मग तुला तिचा चेहरा कसा दिसला? तू कुठे तिला बघितलं होतंस प्रत्यक्ष?”

 

पण ती मुळात तशीच होती की नाही हे कुठे आपल्याला माहित आहे? मला ती जशी दिसली तशीच माझ्याआधीच्या बाकीच्यांना दिसली असं मी नाही ना म्हणू शकत? तिचं दिसणं, तिचा तो भेसूर आवाज सगळंच माझ्या मनातून आलेलं होतंतिला फक्त जे म्हणायचं होतं ते मला ऐकू येत होतं पण तो आवाज तिचा नव्हता….कळलं?”

माई आजीचं बोलणं संपलं तशी ईशा दोन मिनिटं काहीच बोलली नाही. ती आजपर्यंत आलेले ते सगळे अनुभव मनातल्या मनात आठवून बघत होतीमाई आजीने सांगितलेलं सगळं त्याच्याशी ताडून बघत होती. आता पुन्हा ह्या सगळ्याकडे वळून बघताना एक वेगळी दृष्टी मिळाल्यासारखं वाटत होतं….पण तरीही हा विषयच असा होता की प्रश्नही संपत नव्हते

पण मग माई आजी, नंतर मग सायलीला सुद्धा कधीतरी ती बाई चेहऱ्यावर केस ओढलेली अशी कशी दिसली? ”

 

कारण तू तुझा आधीचा अनुभव तिला सांगितला होतास की नाही? तिच्या मनात ते चित्र आधीच तयार झालं होतं आणि म्हणून जेव्हा ती बाई तिच्या संपर्कात आली, तिच्या मनात तेच चित्र उभं राहिलं…”

 

आणि जेव्हा आम्हाला दोघींना ती एकदम दिसली तेव्हा? असं दोनवेळा झालं होतं माई आजी, एकदा सायलीच्या खोलीत असताना आणि एकदा वरच्या खोलीत मी सायलीच्या मागे गेले होते तिला न सांगता, तेव्हाही..”

 

अगो, मग तेव्हाही तुमच्या मनाने जे चित्र दाखवलं तुम्हाला ते तुम्ही बघितलंत. तुम्ही तुम्हाला काय काय दिसलं ते बोलला असतात एकमेकींशी तर कळलं असतं, दोघींनाही जे दिसलं ते वेगवेगळं होतं  ,जे आवाज ऐकू आले ते खरंच तिचे असतील असं थोडंच आहे? पण ते ऐकू आले..म्हणजे तिला तेच सांगायचं असणारपण प्रत्यक्ष आवाज तिचा असणं शक्यच नाही, कारण तिला आता शरीर नाही म्हणजे आवाजही नाही, बरोबर…?”

 

आणि माई आजी एक शेवटचा प्रश्नत्या लॉकेटचं काय? ते कसं आलं असेल सायलीकडे?”

 

हम्मते सांगता येणं आत्ता जरा अवघड आहे होत्यावेळी माझ्यापुढे जी परिस्थिती होती त्या अनुषंघाने आमचं जे बोलणं झालं, त्यात ह्या अशा गोष्टींचा उलगडा तसा झाला नाही, हा पण एक सांगते ईशें, माझे वडील तेव्हा बोलताबोलता म्हणाले होते, ह्या सगळ्यात माणसाचं मन नावाचा समजायला सगळ्यात क्लिष्ट असा भाग असतो, ज्यावर घडणाऱ्या गोष्टी अवलंबून असतात. दुसऱ्यांना शारीरिक ईजा पोहोचवण्याएवढी ताकद त्यात नसते पण ते सोडलं तर भौतिक जगातल्या गोष्टींवर ताबा मिळवण्याएवढी शक्ती ते स्वतःमध्ये आणू शकतातपण मी म्हटलं तसं, ह्याबद्दल मला नीटसं काही समजावून सांगता येणार नाही हो….कदाचित जेव्हा आपल्याला कळेल की ती येणारी बाई कोण आहे, का येते, तेव्हा ह्या गोष्टीचा उलगडा होईल…”

 

माय गॉड, हे सगळं किती कॉम्प्लिकेटेड आहे, माई आजी….म्हणजे खरं तर तू खूप सोप्पं करून सांगितलंस सगळं….पण तरी एवढे हेवी शब्द ऐकूनच मला दमायला झालं माहित आहे? पण माई आजी, मग तू परत आल्यावर काय केलंस गं? मग परत ती मुलगी भेटली तुला ?”

 

भेटली म्हणण्यापेक्षा मी भेटायला गेले तिलामाझे वडीलही आले होते हो माझ्यासोबत.. काय आहे, ज्या कारणासाठी तिची आई इतके दिवस अशी भटकत होती, ते कारण तरी दूर करायला हवं होतं ना गो..मग माझे वडील माझ्या यजमानांना म्हणजे तुझ्या आजोबांना भेटले, त्यांना थोडक्यात सगळं समजावून सांगितलं आणि त्यावरचा तोडगाही सांगितला. आमच्या बाजूच्याच गावात एक सामाजिक संस्था होती, जी अनाथ मुलांसाठी काम करायची. म्हणजे त्यांना आसरा, शिक्षण, राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय असं सगळं करायचे तेअनाथ मुलांसाठी असल्याने काही पैशांची अपेक्षा नसायची त्यांची..माझे वडील आणि यजमान तिथल्या व्यवस्थापकांना जाऊन भेटले, ह्या मुलीबद्दल, घरी तिची होत असलेली आबाळ ह्याबद्दल सांगितलं. दुसऱ्याच दिवशी जाऊन त्या मुलीच्या वडिलांना भेटलेतो माणूस शुद्धीत कधी नसायचाच मुळी, ना स्वतःच्या मुलीबद्दल काही काळजी, आस्था….त्याला थोडक्यात सगळं समजावून त्याचा अंगठा मिळवला, मुलीला त्या संस्थेच्या हवाली करण्याबद्दल ..त्या संस्थेला मग एक मोठी रक्कम देणगी म्हणूनही दिली आम्ही आणि त्या मुलीला तिथे भरती केलंपुढे त्या गावात होतो तोपर्यंत दर चारसहा महिन्यांनी फेरी मारून ती कशी आहे वगैरे बघायला जायचो..रमली हो ती नंतर तिथे, मैत्रिणीही मिळाल्या होत्या, डोक्यानंही थोडी सुधारली होती, जमेल तसं शिकत होती तिथल्या शाळेत…..नंतर मला कधीही तसले भास झाले नाहीत, त्यावरून माझ्या वडिलांनी सांगितलेलं अगदीच पटलं हो …

 

“आय एम सो प्राऊड ऑफ यु माई आजी …तुला सांगते, आजपर्यंत हा एक किडा खरंच वळवळत होता माझ्या डोक्यातहे सुजयचं सिक्रेट नक्की काय आहे ही एक भुणभुण आहेच डोक्याला पण त्याचा निदान शोध तरी घेता येईल, पण ही गोष्ट नक्की काय आहे हे आम्हाला असं एरव्ही कधीच कळलं नसतं….आता फक्त हे कळायला हवं आम्हाला भेटायला येणारी ती नक्की कोण आहे आणि सुजयशी तिचा नक्की काय संबंध आहे…..”

 

कळेल होलवकरच कळेल…”

तेवढ्यात बेल वाजली

माई आजी, सायली आली बहुतेकआय एम सो एक्सआयटेड टू नो, त्या खऱ्या सुजयच्या घरी नक्की काय झालं ते..”

धावत जाऊन ईशाने दार उघडलंसमोर सिद्धार्थ उभा होता

 

क्रमशः

 

अज्ञाताची चाहूल ही कथा आता शेवटाकडे झुकतेय, त्यानिमित्ताने सर्व वाचकांशी केलेले हे हितगुज

सगळ्यात आधी, कथेच्या ह्या टप्प्यावर ह्या भागात गोष्टी थोड्या वेगळ्या अंगाने जातायत असं काहीजणांना वाटलं असेल. माई आजीची ह्या सगळ्यामागची कारणमीमांसा कदाचित काहीजणांना खटकू शकतेकथेच्या पहिल्या भागापासून हे सगळं खूप रिअल वाटतं आणि वाचताना अगदी आमच्या अवतीभोवती घडल्यासारखं वाटतंअशा रिएक्शन्स मिळत गेल्या….कथा अशीच रिअल वाटत रहावी किंवा कथेचा जो गूढ भाग आहे तो कथेच्या शेवटी खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींशी किंवा माई आजी म्हणते तसं जगाला सहज पटू शकेल अशा स्पष्टीकरणाने संपावा, अशीही अपेक्षा बऱ्याच जणांनी केली असेल .त्यामुळेच ह्या भागातील वर्णन वाचताना कदाचित काहीजणांचा अपेक्षाभंग होऊ शकतो.

माई आजी सांगते तसं खरंच असेल का? प्रत्येकाकडे ह्याचं कदाचित वेगवेगळं उत्तर असेल. हा विषयच असा आहे की ह्यात ज्याने त्याने आपापले अनुभव, विचार, तर्क, समजुती वगैरे ह्यांचा आधार घेऊन मगच मत बनवावं. माझ्यापुरतं बोलायचं झालं, तर जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कुठल्याही शास्त्रात बसत नाहीत, तर्कशुद्ध विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. मृत्यूनंतरचं जीवन हा एक स्वतंत्र हाताळण्याचा विषय आहेपण केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाचे काही पुरावे नाहीत म्हणून ते अस्तित्वातच नाही असं मानणं मला मान्य नाही. ज्याबद्दल भाकडकथा रचल्या जातात, चर्चा केल्या जातात, प्रश्न उठवले जातात त्या गोष्टी अंधुक असतील, स्पष्ट नसतील पण जगाच्या पाठीवर कुठेतरी, काही अंशी तरी त्या अस्तित्वात असतात असं मला वाटतंकथेचा मूळ भाग हा या समजुतीवरच आधारित ठेवलेला आहे

असो, तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. आता विचार केला की गंमत वाटते, अज्ञाताची चाहूल लागून आता २ वर्ष उलटून गेली पण कथानक फक्त एक ते दीड महिनाच पुढे सरकलं आहेबरेच वेळा पुढचा भाग पोस्ट करायला झालेल्या उशिरामुळे असं झालंय, पण तरीही तुमच्या प्रतिक्रियांवरून तुम्ही ह्या प्रवासात सोबत आहात हे कळत होतं..अजून कथेचा शेवट बाकी आहे आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करतेह्यानंतर आणखीही कथा लिहिण्याचा विचार आहे, काही विषयही डोक्यात घोळतायतबघूया कसं जमतंय ते….

सुजय आता नक्की कोणतं पाऊल उचलेल? सिद्धार्थ कोणाला बरोबर घेऊन आलाय? प्रजापती निवास मध्ये सापडलेल्या त्या लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचं गुपित काय असेल? सिद्धार्थच्या मनातल्या भावना सायलीपर्यंत पोहोचतील का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येतेय पुढच्या भागात…..

Advertisements

2 comments on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 43)

 1. Pranjali Borikar
  November 4, 2017

  This part is also good too like other parts and explanation given by Mai Aaji seems logical. Most awaiting for next part.

  Like

 2. Vaishali Agre
  November 8, 2017

  nice…. sunder, mast hota ha bhag … please phudhcha bhag lavkar taka… shubhechya phudhchya bhagasathi

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on November 1, 2017 by in Fiction - Stories and tagged .

Navigation

%d bloggers like this: