davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल : (भाग : 45)

दोन दिवसांनी त्याच गावात आमचा साखरपुडा झाला. कटनीहून निघून मला त्या दिवशी आठ दिवस झाले होते. साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथून निघालो आणि संध्याकाळी उशिरा कटनीला पोहोचलो. तिथून निघाल्यावर मी ठरवलं, आता कोमलला फोन करायचाच नाही…एकदम जाऊन, आपल्या साखरपुड्याची न्यूज द्यायची आणि सरप्राईझ द्यायचं असं मी ठरवलं. कधी एकदा कोमलला भेटते असं मला झालं होतं. तिच्याशी इतक्या गप्पा मारायच्या होत्या, अर्जुनबद्दल तिला सांगायचं होतं. घरी पोहोचल्यावर बॅग्स घरात टाकून मी तिच्या घराकडे अक्षरशः धावत सुटले.

पण तिच्या घराला कुलूप होतं. तिला अचानक जाऊन सरप्राईझ द्यायचं आणि साखरपुडा झाल्याचं तिला सांगून आणखी एक सरप्राईझ देऊन तिचा राग घालवायचा असं मी मनात ठरवलं होतं…पण पुढे सगळे आश्चर्याचे धक्के तिच्याकडून मला मिळणार होते हे मला तेव्हा माहित नव्हतं.

फोन हातात घेऊन तिला फोन करायचा विचार केला पण मग नंतर लक्षात आलं, तिला सरप्राईझ द्यायचंय, उगीच फोन नकोच करायला. ती कुठे गेली असेल ह्याचा विचार करत मी परत जायला मागे वळले….

************************ भाग ४४ पासून पुढे ********************

तर समोर तीच उभी होती. तिला मला अचानक आलेलं बघून आश्चर्य वाटलं की नाही, मला माहीत नाही, खरं तर तिला बघितल्यावर मी ते बघायचंच विसरून गेले. कारण तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव दिसले नाहीत मला. मला बघून, आपण ओळखीच्या लोकांना बघून जसं नुसतं स्माईल देतो, तसं नुसतीच हसली ती. हलकेच. मला फार विचित्र वाटलं, मग वाटलं ही माझ्यावर रागावली असणार, काही फोन नाही, बोलणं नाही आणि इतके दिवस मी तिकडे जाऊन राहिले म्हणून.

 

तिने घराचं कुलूप काढलं आणि दार उघडलं. तिच्या मागोमाग मी आत गेले. आत्तापर्यंत दोन वेळा मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण तिने काहीच उत्तर दिलं नाहीआमच्यातली ही शांतता मलाच असह्य होत होती, खरं तर अस्वस्थ करत होती, तिच्या गप्प बसण्यात, बदललेल्या देहबोलीत, हरवलेल्या नजरेत कसलीतरी खंत होती किंवा त्याहीपेक्षा मोठं काहीतरी, मला सांगताही येणार नाही नीट.

 

घरात गेल्यावर तिने दिवे लावले आणि मग मात्र न राहवून मी गेलेच तिच्याशी बोलायला.

कोमल, काय झालंय तुला? अगं बोल ना माझ्याशीमला माहित आहे तू चिडली असशील पण एवढं काय यारमाझं ऐकून तर घेमाझ्याकडे अशी न्यूज आहे जी ऐकल्यावर तुझी ही सगळी नाटकं बंद होतील…”

 

मी नाही चिडले तुझ्यावर…” खाली मान घालूनच ती म्हणाली.

 

हो कामग हे मी आल्यापासून असली नाटकं कशाला करतेयस? बोलत का नाहीयेस? तुला काहीच वाटलं नाही का मी परत आलेय त्याचं? आपण जवळपास दहा दिवसांनी भेटतोय कोमल….”

 

अर्थात अगं, मी खुशच झालेय तुला बघून…”

आणखी पाच मिनिटं तिच्याशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं, ती माझ्या नजरेला नजर द्यायचं टाळत होती.

तू बघत का नाहीयेस माझ्याकडे? काय झालंय कोमल? बास झालं हा हे वरवरचं बोलणं, सांग लवकर मला…” थोडा आवाज चढवूनच मी तिच्याशी बोलायला लागले

तिच्या डोळ्यातून येणाऱ्या पाण्याच्या धारा दिसल्या आणि मग मी हादरलेच. काहीतरी घडलं होतं निश्चित. आणि जे काही घडलं होतं त्याचा तिच्या वागण्यावरून काहीच अंदाज येत नव्हता.

कोमल …” मी पुढे काही बोलणार तेवढ्यात तीच म्हणाली, “अम्माचा ऍक्सिडंट झाला छू, दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी मामांकडून येताना तिच्या बसला समोर येणाऱ्या ट्रकने जोरदार धक्का दिला आणि बस एका खड्ड्यात पडली..”

 

काय?” मी ओरडलेच..

पुढे ती काहीच बोलली नाही, मला काहीच अंदाज येईना

अम्मा कशी आहे कोमल?” शेवटी न राहवून मी घाबरतच विचारलं..

ती काहीच बोलेना, तशी माझ्या छातीतली धडधड वाढली.

कोमल…” मी तिच्या खांद्यावर हात ठेवला

 

अम्मा मला सोडून गेली छूमलासोडून…”

ओक्सबोक्शी रडत मला घट्ट मिठी मारत ती म्हणालीएक क्षणभर मला खरंच वाटेनातिच्या लेकीप्रमाणे माझ्यावरही माया करणारी, सारखी खेकसणारी पण मनातून काळजी करणारी कोमलची अम्मा…..मामाकडे जाताना बसस्टॉप वर आम्ही तिला सोडायला गेलो होतो. तेव्हा कोमल पाणी आणायला गेली, त्यावेळी मला म्हणाली होती,

पहिल्यांदा एवढं आठवडाभर तिला एकटीला सोडून जातेय, पण तू आहेस तर एवढी काळजी नाही तशी, तुझ्या भावाचं लग्न झालं की लगेच परत ये हो, माझी पोरगी एकटीच आहे ना

तिचं आणि माझं झालेलं शेवटचं बोलणं….सारखं सारखं ते आठवायला लागलंजणू काही तिला कळलं होतं ,आपण परत येणार नाही आहोत, आणि म्हणून कोमलची काळजी घ्यायला मला सांगून गेली तीपण मी मात्र ह्या सगळ्या प्रसंगात सुद्धा कोमलच्या बरोबर नव्हतेकाय झालं, कसं झालं हे विचारण्यात आता अर्थच नव्हता आणि आत्ता ते विचारायची वेळही नव्हतीपुढचा अर्धा तास तिला धीर देण्यात गेला माझा. घरी पोहोचल्या पोहोचल्याच माझ्या आई-वडिलांनासुद्धा ही बातमी कळलीच होती, ते सुद्धा लगेच आले कोमलला भेटायला. काही दिवस तिला माझ्याकडेच घेऊन गेले मीतिच्याकडे बघवत नव्हतं मलातिचे बाबूजी गेले तेव्हाही तिची हीच अवस्था झाली होती, पण त्यावेळी अम्मा आणि ती एकमेकींना धीर देत, एकमेकींच्या साथीने कशाबशा त्या सगळ्या दुःखातून बाहेर पडल्या. पण आता मात्र तिला माझ्याशिवाय इतकं जवळचं असं कोणीच राहिलं नाही

 

अम्मा मामांकडे राहायला गेल्यावरच मामांनी तिला बजावलं होतं, आता पंधरा दिवस इथून जायचं नावही काढायचं नाहीकोमलनेच तसं फोनवर सांगितलं होतं मलाआणि मी पण अम्माला राहायला सांगितलंय असं म्हणाली होती..मग असं असताना आठेक दिवसातच अम्मा परत यायला का निघाली, काहीच कळलं नाहीती ज्या बसने परत येत होती, तिला कटनीच्या जवळ आल्यावरच मोठा ऍक्सिडंट झालाबिचाऱ्या कोमलला कळलं तेव्हा तिने एकटीनेच माहिती काढली, शेजारच्यांना घेऊन ते हॉस्पिटल गाठलं, पण ती पोहोचण्याच्या आधीच अम्मा ….हे सगळं मला कोमलकडूनच कळलेलं….नंतर कधीतरी तिच्या शेजारचे काका भेटले त्यांच्याकडून कळलं, ते गेले तेव्हा अम्माला ते भेटले, कोमलही भेटली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अम्मा गेली….मग कोमलने असं का सांगितलं? पण त्यावेळी हे सगळं तिच्याकडे बोलण्याची वेळ नव्हतीपण एकूणच तिच्या सांगण्यातून मला का, कुणास ठाऊक असं वाटत राहिलं की ह्या सगळ्याबद्दल आणखी काही आहे, जे ती सांगत नाहीये..

 

तर मी गावाहून येऊन पंधरा दिवस उलटून गेले. …कोमल आता तिच्या घरी राहायला गेली होती. त्यांचं ते घरही आता एकाकी वाटायला लागलंभेसूरअम्माचा आरडाओरडा नाही आणि कोमलचं खळखळून हसणं नाहीरोज रात्री तिला सोबत म्हणून झोपायला जायचे मी तिच्याकडेएकदा रात्री ३ च्या सुमाराला मला जाग आली, तर ही खिडकीपाशी जाऊन एकटक बाहेर बघत उभी होती

कोमल,…काय झालं? झोप येत नाही का?”

 

नाहीबराच वेळ झाला , मग शेवटी इथे येऊन उभी राहिले…”

 

काय झालं? काय विचार करतेयस?”

 

अम्माची आठवण येते गंलहान असताना कुठल्यातरी गोष्टीत वाचलं होतं, आपल्यापासून दूर गेलेली लोकं तिथे आकाशात ताऱ्यांच्या रूपात आपल्याला दिसतात म्हणेमाझे अम्मा, बाबूजी पण तिथे असतील का गंबघ ना, माझं जग किती शांत, शांत झालंयपूर्वी मला शांतता हवीशी वाटायची, पण आता कळतंय, अम्माच्या आरडाओरडीमुळे मला असं वाटायचंआता बघ ना, मला इतकी शांतता मिळाली आहे, पण ती नकोशी वाटतेय गंअम्माला आतून ओरडून हाक मारावीशी वाटतेय..परत ये गं अम्मा, ओरड माझ्यावरतू परत येणार असलीस ना तर तुझं सगळं मी ऐकायला तयार आहे….प्लिज परत ये…”

किती हेल्पलेस वाटत होतं मला त्यावेळीमाझी जिवलग मैत्रीण असं सगळं हरवून बसलेली आणि मी काहीच करू शकत नव्हते, तिच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याशिवायपण काहीतरी करायलाच हवं होतंतिला असं हरू द्यायचं नाहीएक गोष्ट होती, जिच्या साठी, जिच्या ध्यासाने तरी ती थोडी पूर्वीसारखी झाली असती..

शांत हो कोमलमला सगळं कळतंय गं….हे सगळं विसरता येणं शक्य नसतं, पण त्यातून थोडंसं तरी बाहेर पडून आपल्या कामाबद्दल विचार करायलाच हवा ना….तुला कळतंय ना, मी काय म्हणतेय ते? बाबूजींनी आणि तू बघितलेलं स्वप्न..तुम्ही घेतलेली मेहनत अशीच वाया जाऊ देणार आहेस का तू? आणि ते पूर्ण केलंस तर अम्माची ईच्छा सुद्धा पूर्ण करशील तू..आता ते परत हातात घायला नको का?”

एक क्षण तिने माझ्या डोळ्यात बघितलं आणि मग दुसरीकडे नजर फिरवली

ते बघू गं..पण मला अर्जुनबद्दल सांग नाएवढ्या दिवसात मी तुला काही विचारलं पण नाही…”

 

त्याच्याबद्दल काय सांगायचं? चांगला आहे, आणि मला ज्या कारणासाठी लग्न करायचं नव्हतं, म्हणजे पुढे शिक्षण, नोकरी वगैरे… त्या सगळ्याला खूपच चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतोय तोएकवेळ मी कंटाळा करेन, पण तो मागे लागून माझ्याकडून सगळं करून घेईलदोन महिन्यांनंतर एम.बी.ए साठी अप्लाय करणार आहोत आम्ही दोघं, म्हणजे त्यानेच सजेस्ट केलं हे….एवढ्या कमी दिवसातच चांगला मित्र झालाय गं माझातेव्हा मी हाच विचार केला, म्हटलं नंतर कधीतरी लग्न करणारच ना आणि मग ह्याच्यासारखा मुलगा नाही भेटला तर? पहिल्यांदा भेटलो तेव्हाच त्याच्या विचारांवरून तो वेगळा आहे हे कळलं, आणि घरच्यांना तर आवडलाच तो…”

 

बरोबर आहेछू, ह्या सगळ्यातसुद्धा मनात कुठेतरी समाधान असल्याची भावना आहे…तू योग्य डिसिजन घेतल्याबद्दलआय एम रिएली हॅपी फॉर युआणि घरच्यांच्या संमतीने सगळं होतंय हे फारच चांगलं आहे, आपणच आपले घेतलेले निर्णय चुकू शकतात ना…”

शेवटचं वाक्य ती कुठेतरी हरवल्यासारखं बघत म्हणाली.

आता येणार आहे ना तो मला भेटायला पुढच्या आठवड्यात, तेव्हा भेटेलच तुला त्याला तर तुला भेटायचंच आहे ….तुझ्याशिवाय साखरपुडा झाला माझा, तुला कळवतासुद्धा आलं नाही गं, मला किती विचित्र वाटत होतं माहित आहे?….एनीवे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तूसांग ना, तुझं काम होत आलंय ना ? मग आता पूर्ण कर ना….”

ती नुसतंच खिन्नपणे हसली आणि तिने नकारार्थी मान हलवली

अगं नाही काय म्हणतेस? आता थोडक्यासाठी अर्धवट सोडणार आहेस का तू? बाबूजींना प्रॉमिस केलं होतंस ना, आणि अम्माला सरप्राईझ देणार होतीस, …आता सगळं अर्धवट सोडून देणार?”

 

मला नाही गं अर्धवट सोडायचंय छू….पण मी काय करू? अज्ञाताचा शोध नाहीये माझ्याकडे….”

—————————————————————

एवढं झाल्यावर ईशा आणि सायलीने एकमेकींकडे पाहिलंकोमलच्या अम्माबद्दल ऐकताना नकळत दोघींचेही डोळे पाणावले होते. एका हाताने डोळ्यांच्या कडा पुसत सायली छूला म्हणाली,

एक मिनिट छू, सॉरी तुला मधेच थांबवतेयपण तू आत्ता काय बोलतेयस, म्हणजे कोमलचं काम वगैरे ते काहीच कळत नाहीये आम्हाला, म्हणजे बाबूजींचं स्वप्न वगैरे हे वाचलं होतं आम्ही डायरीमध्ये, पण ते नक्की काय होतं हे माहित नाही आम्हालातिने अम्मापासून कोणतीतरी गोष्ट लपवली होती, ती बहुतेक हीच असणार हा अंदाज येतोय पण नक्की काय होतं ते? हे बघ, आत्तापर्यंत तिच्या डायरीत वाचून जे काही थोडंफार कळलं आम्हाला, त्यावरून आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो की सुजयला तिथल्या कपाटात लाल कापडात गुंडाळलेलं काहीतरी मिळालं..ते काय होतं हे काही डायरीमधून कळू शकलं नाही…नंतर पोलीस स्टेशनला केलेल्या कंप्लेंटवरून एवढं कळलं की लाल कापडात गुंडाळलेलं ते पुस्तक होतं….तिकडे कोमलने सुजयशी लग्न करण्याचा निर्णय घायचा आणि हे सगळं सुजयला सांगायला ती पुन्हा प्रजापती निवासला जायला निघालीबास एवढंच…त्यामुळे तू काय म्हणतेयस ते कोमलचं काम वगैरे ते आम्हाला कळत नाहीये…”

 

ओके. मग तेही सांगतेतुम्हाला नक्की काय माहित आहे, ह्याबद्दल गोंधळ झाला माझा..कोमलची डायरी ही तिचे बाबूजी म्हणायचे त्याप्रमाणे तिच्या मनाचा आरसा होती अगदीती वाचताना तिचं मन वाचल्यासारखं वाटायचं, पण ती वाचणं एवढी सोपी गोष्ट नाहीतुम्ही जर त्या डायरीत लिहिलेल्या गोष्टींचा अर्थ लावून हे सगळं जाणण्याचा प्रयत्न केला नसतात तर कोमलपर्यंत आणि माझ्यापर्यंत पोहोचूच शकला नसतात….आणि आज हे सगळं सांगायला मी इथे येऊ शकले नसतेतर बाबूजींचं स्वप्न, कोमलची ते पूर्ण करण्याची धडपड हेच ह्या सगळ्याचं मूळ आहे, म्हणजे असणार..निदान त्या सुजयच्या खोटारडेपणामागचं कारण तरी नक्की हेच असणार….”

———————————————————–

“सिद्धार्थबरोबर ट्रेनमधून आलेले ते दोघे कोण आहेत हे कळलंच पाहिजे मला…” सुजय फोनवर ओरडलाच.

 

“ओ साहेब, आमच्यावर ओरडायचं काम नाही हा…एका तासात ही माहिती काढून दिली आहे तुम्हाला…आता ते बरोबर आलेले कोण ते काढणं जरा वेळखाऊ आहे, त्यासाठी त्या सिद्धार्थच्या मागेमागे फिरायला लागेल आम्हाला..”

 

“अरे मग काय वाटेल ते करा ना,…मला हे लवकरात लवकर कळलं पाहिजे…”

 

“बरं…बघतो..”

 

“आणि आणखी एक. तो सिद्धार्थ त्या दोघांना घेऊन कुठे गेलाय हे तरी बघितलंय का ?” सुजय

 

“हो, एकजण गेलाय त्याच्या मागे…कळवतो तुम्हाला त्याचा फोन आला की..”

—————————————————

अज्ञाताचा शोध (अग्यात की खोज मे…)…हे होतं कोमलच्या बाबूजींचं स्वप्न….”

एवढं बोलून छू थांबली. तिने समोर बघितलं तर समोर सगळ्यांच्याच चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं

——————————————————

कोमल आणि मी तेव्हा कॉलेज मध्ये होतो….कोमलचं कॉलेज संपल्यावर तिला उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवायची तिच्या अम्माने तयारी सुरु केली, म्हणजे माहिती काढणं, खर्चाचा अंदाज घेणं वगैरेकोमलचे बाबूजी फारसे त्यात कधी पडले नाहीत सुरुवातीला, त्यावरून अम्मा सारखी त्यांच्याशी भांडायला लागली..ते शाळेत आल्यावर शाळेतल्या हेडसरांबरोबर सगळं बोलायचे, दोघांची फार वर्षांपासून मैत्री होतीत्यांनी बाबूजींना ह्या सगळ्याकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली

 

कोमलने परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेतलं तर भविष्यात शाळेतल्या मुलांसाठी ती काय, काय करू शकेलसाता समुद्रापलीकडचं ज्ञान आणि अनुभव तर घेऊन येईलच पण उच्च शिक्षणाच्या बळावर पैशांचं पाठबळही मिळवू शकते, ज्याचा उपयोग शाळेसाठी करता येईल आणि जे ती इथेच राहिली तर करणं कठीण आहेबाबूजींना ते पटलंपण पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न होताच…बँकेकडून लोन घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. ते घेतलं तरीही आणखी बऱ्याच पैशांची तयारी ठेवायला लागली असती….पण हेडसरांनी त्यावर उपाय सुचवला..

 

साहित्य अकादमीतर्फे ऑल इंडिया लेव्हलला एक स्पर्धा व्हायची, लेखकांची स्पर्धाऐकायला जरा विचित्र आहे पण खरंच अशी स्पर्धा होत असते दर तीन वर्षांनीदरवेळी एक वेगळा विषयत्यावर त्या विषयात पारंगत असलेल्या किंवा त्या विषयाचं ज्ञान असलेल्या लेखकांनी त्या विषयावर आणखी रिसर्च करून एक कादंबरी लिहायची….मे किंवा जून महिन्यात त्याचं सबमिशन असायचं आणि मग सहा महिन्यांनी रिझल्ट असतो. तर त्या स्पर्धेत भाग घेण्याविषयी हेडसरांनी बाबूजींना सुचवलंपहिल्या आणि सगळ्यात लक्षवेधी लेखनाला चांगलं भरघोस बक्षीस होतं, काही लाखांचं. आता दीड वर्षांनी ही स्पर्धा होणार होती आणि ही त्या स्पर्धेची दुसरी वेळ. पहिल्यावेळी त्यात वेगवेगळ्या राज्यांमधल्या मोठमोठ्या लेखकांनी भाग घेतला होता आणि त्याचबरोबर नवीन लेखकही भरपूर होते….कादंबरी हिंदीत आणि अप्रकाशित स्वरूपात पण प्रकाशनासाठी संपूर्णपणे तयार अशी असली पाहिजे अशी अट. त्या विषयावर जास्तीत जास्त माहिती आणि जास्त चांगला रिसर्च करणाऱ्या, तसंच एका कथेच्या स्वरूपात, जास्तीत जास्त रंजक करून ही माहिती लोकांसमोर आणणाऱ्या लेखनास प्राधान्य दिले जाणार, असं काहीसं त्या स्पर्धेचं स्वरूप होतंइंग्लिश ऑथोर केन फॉलेट ह्याचे नॉव्हेल्स अशा प्रकारचे असतातसगळं फिक्शन, पण प्रचंड रिसर्च करून माहिती गोळा केलेली आणि त्याच्या कथेत वापरलेली, म्हणजे ती माहिती खरी पण त्याभोवती विणलेली कथा काल्पनिक….मी काही इंग्लिश नॉव्हेल्स वाचत नाही, पण कोमलचं मात्र वाचन अफाट, तिनेच मला सांगितलं हे…..

 

एकापेक्षा एक उत्कृष्ट अशा लेखकांनी अभ्यास करून केलेलं त्या विषयावरचं लिखाण नंतर वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं , कशासाठी ते त्या विषयावर अवलंबून असतं , पण कधी त्यातला थोडा भाग मुलांच्या अभ्यासक्रमात वापरला जातो, कधी त्यावर एखादी डॉक्युमेंट्री बनवली जाईल, किंवा आणखी काहीत्यासाठीच एवढं मोठं बक्षीस ठेवलं होतं

 

हेडसरांना बाबुजींमधल्या लेखकावर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या साध्या, सरळ स्वभावामुळे आत्तापर्यंत ते कधीच लोकांपुढे आले नव्हते. खरं तर त्यादृष्टीने त्यांनी कधी लिहिलेलंही नव्हतं..स्वतः लिहिलेलं बरंच काही ते सहज वाचायला म्हणून लोकांना देऊन टाकायचेआणि मग कधीतरी कटनीमधल्या एखाद्या लोकल मासिकात किंवा वर्तमानपत्रात त्यांचा एखादा लेख वाचायला मिळायचा, पण खाली दुसऱ्याचं नाव असायचं

 

हे कळूनसुद्धा बाबूजींना त्यात कधी काही वाटलं नव्हतं. हेडसरांनी हे स्पर्धेचं सुचवल्यावर त्यांचं पाहिलं उत्तर नाहीअसंच होतं..त्यांनी सांगितलेलं कोमलला परदेशी पाठवण्याचं मात्र त्यांना पटलं होतंकोमल होतीच खूप हुशारह्यात त्यांच्या मुलीची प्रगती तर होणार होतीच, पण त्यांच्या मते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे भविष्यात शाळेला फायदा होणार होता..शिवाय बायकोची इच्छाही पूर्ण केल्याचं समाधान मिळणार होतं.पण त्यासाठी पैसे उभे करण्यासाठी हे स्पर्धेत भाग घेणं त्यांना सुरुवातीला पटलं नाहीस्वतःच्या लेखनाकडे आजपर्यंत ते कला म्हणून बघत होते आणि कला कधीच विकायची नसते, ह्यावर ते ठाम होते….

 

पण हेडसरांनी जिद्द सोडली नाही, रोज रोज बाबुजींशी बोलून त्यांनी ह्यावर त्यांचं ब्रेनवॉशच केलं. स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम स्वतःच्या मुलीसाठी आणि शाळेसाठी उपयोगी होणार आहे आणि त्यात काहीही गैर नाही हे पटवण्यात हेडसरांना यश आलं आणि बाबूजी स्पर्धेसाठी कादंबरी लिहायला तयार झाले. अर्थात एका अटीवरअम्माला ह्यातलं काहीही सांगायचं नाही..जर उत्कृष्ट कथेचं पाहिलं बक्षीस मिळालं, तरच ह्यासगळ्याबद्दल अम्माला सांगायचं असं त्यांचं म्हणणं होतं. एकतर, ती आधीच हे लेखन वगैरेच्या विरोधात होतीतिला आत्ता हे सगळं सांगून उलट तिने त्याबद्दल आरडाओरडच केली असतीआणि दुसरं म्हणजे जर बक्षिस मिळालं नसतं तर तिला उगीचच आशा दाखवल्यासारखं झालं असतं..त्यामुळे कादंबरीचं लिखाण आणि त्यासाठी करायची पूर्वतयारी, संशोधन हे सगळं तिच्या नकळत करावं लागणार होतंह्या सगळ्यात त्यांना साथ देणार होते हेडसर आणि अर्थात कोमल..हीच होती ती गोष्ट जी त्या दोघांनी अम्मापासून लपवली होती..

 

हेडसरांनी अगदी परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं सगळ्या गोष्टींचं..आत्तापर्यंत अम्माने कोमलच्या परदेशी शिकण्याबद्दल काही माहिती मिळवली होती, म्हणजे तिला कोणत्या एंट्रन्स एक्झॅम्स द्याव्या लागतील, व्हिसासाठी काय करावं लागतं, किती खर्च येतो वगैरे. पण अर्थात ती बिचारी एकटी होती ह्या सगळ्यात. तिला जमेल तशी माहिती मिळवली होती तिने. तिला प्रश्न पडले की ती कुठूनतरी त्याची उत्तरं मिळवायचा प्रयत्न करायचीघरात असे बरेच हॅन्डआउट्स, पॅम्प्लेट्स पडले होते तिने कुठून कुठून जमवलेलेह्या सगळ्यात एकसंधता कुठेच नव्हती….पण मग हेडसरांनी ह्या विषयात लक्ष घातलं आणि कोमलच्या परदेशी शिक्षणाविषयीची सगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली. मधल्या काळात तिची कशी तयारी करून घ्यायची, वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती, अशी हळूहळू एकएक गोष्ट ठरवायला घेतली. हेतू हा, की दोन वर्षांनी जर बाबूजींच्या कथेला बक्षीस मिळालं, तर पुढच्या काही महिन्यात तिला पुढच्या शिक्षणासाठी पाठवता येणार होतं.

 

बाबूजींच्या लेखनकलेवर हेडसरांचा पूर्ण विश्वास होताते उद्या जर जगासमोर आले तर मोठमोठ्या लेखकांनाही मागे टाकतील, ह्याचीही त्यांना खात्री होती. ह्या विश्वासावरच त्यांनी ह्या स्पर्धेबद्दल बाबूजींना सांगितलं होतंत्यांच्यातला उत्तम शिक्षक त्यांना ह्यासाठी अभ्यास करण्यात मदत करणार, आणि एक अतिशय सामर्थ्यवान लेखक त्यांच्याकडून तेवढ्याच ताकदीचं लेखन करून घेणार आणि त्या कादंबरीचा स्तर उंच पातळीवर नेऊन ठेवणार….त्यांना खात्री होती. स्पर्धेत जर कादंबरीला पहिला क्रमांक मिळाला तर बक्षिसाच्या रकमेबरोबरच आणखी काही रक्कम आपण उभी करण्याचा प्रयत्न करू, असं वचनही त्यांनी बाबूजींना दिलं.

 

अर्थात, ह्या सगळ्याला सुरुवात करण्याआधी बाबुजींप्रमाणे त्यांचीही एक अट होती. बाबूजींचा स्वभाव अतिशय साधा, सरळकोणी समोरून काही मागितलं की त्यांना ‘नाही ‘ म्हणताच यायचं नाही, आणि त्यांच्यामागे त्यांनी लिहिलेलं कुणी आपल्या फायद्यासाठी वापरत असेल, तरी ते उलटून प्रश्न करायचे नाहीत, सरळ दुर्लक्ष करायचेपण आता ह्याबाबतीत असं होऊन चालणार नव्हतं. त्यासाठी हेडसरांनी सांगितलं, हे सगळं तुम्ही,मी आणि कोमल ह्या तिघांपलीकडे आणखी कोणालाच कळायला नको, म्हणजे ह्या गोष्टीची गावात चर्चा झाली, कुणी त्यांच्या कामाबद्दल चौकशी केली, लिहिलेलं वाचायला मागितलं, नकोच ते. त्याशिवाय कादंबरीची एक प्रत अशी लिहायची जी कुणालाच सहजसहजी वाचता येणार नाही. त्या प्रतीवरून मग शेवटी एक फायनल प्रत तयार करायची स्पर्धेत पाठवण्यासाठी. मधला दीड वर्षांचा काळ हा मोठा काळ होता. ह्या काळात जर ते लिखाण चुकून हरवलंच किंवा चुकीच्या माणसाच्या हाती पडलं, तरी ते नीट अर्थ लावून वाचता न आल्यामुळे त्याचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. आता खरं तर हे सगळं कॉम्प्युटरच्या मदतीने शक्य झालं असतं, पण शाळेत एकच कॉम्प्युटर होता, तोही जुना. स्वतःच्या कामासाठी शाळेचा कॉम्प्युटर वापरणार नाही, हा त्यांचा हट्ट. शिवाय त्यांना कॉम्प्युटरची तोंडओळख होती पण एवढाही हात बसलेला नव्हताजे काम स्वतः हाताने लिहून दुप्पट वेगाने होऊ शकतं, त्यासाठी कॉम्प्युटरची काय गरज असा प्रश्न त्यांनी केला. अर्थात, एवढं सोपं नव्हतं ते. आजकाल कॉम्प्युटर, इंटरनेट शिवाय कुणाचंच पान हलत नाही.

 

शिवाय त्या लिखाणाचा एक बॅक अप सुद्धा असायला हवा होता. मग ते काम कोमलने करायचं ठरवलं. जमेल तेव्हा ती इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन हे काम करत बसायची. अम्माने विचारलं तर सांगायचं छूकडे अभ्यासाला जातेय किंवा लायब्ररीत जातेय. बाहेर कोणी ओळखीच्यांनी विचारलं की सांगायचं कॉलेजच्या प्रोजेक्ट साठी काम करतेयअसं हळूहळू सगळं जमत गेलं..जसजसे दिवस जायला लागले तसं बाबूजी या प्रोजेक्ट मध्ये अधिकाधिक इन्व्हॉल्व्ह होत गेले, इमोशनली जास्तआजपर्यंत त्यांनी इतरांसाठी जमेल तितकं सगळं केलं होतं. आज पहिल्यांदाच ते असं काहीतरी करत होते, ज्यामध्ये त्यांच्या मुलीचंसुद्धा हित होतं, प्रगती होतीशाळेसाठी, मुलांसाठी बरंच काही करायची स्वप्नं त्यांनी बघितली होतीहे सगळं जर ठरवल्याप्रमाणे झालं तर पुढच्या काही वर्षात ती स्वप्नं पूर्ण करता येतील ह्याचा आनंद तर होताचपण स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी केल्याचं समाधानही होतं…..पुढच्या काही महिन्यात बाबूजींनी अगदी झोकून देऊन कादंबरीचं काम झपाट्याने पुढे नेलंपुढच्या आठेक महिन्यात कादंबरीची एक फायनल प्रत स्पर्धेसाठी पाठवायची होती.

 

पण सगळ्यांना वाटलं होतं तसं पुढे सगळं सुरळीत घडणार नव्हतं

 

छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन बाबूजी अचानक गेले. सगळ्यांसाठीच तो मोठा धक्का होता. कोमल आणि अम्माची अवस्था तर बघवेनाशी झाली होती काही दिवस..नंतर कोमलकडून कळलं, जायच्या आदल्या दिवशी बाबूजी तिच्याशी मनातलं बोलले होते, फारसं स्पष्ट नव्हतं ते..पण त्या शेवटच्या घटका मोजत असतानाही त्यांच्या डोळ्यात तीच स्वप्नं होती आणि बोलण्यात सुद्धा ती स्वप्नंच होती

“मी केलेलं काम वाया जाऊ देऊ नकोसमला माहित आहे, तू माझ्याहीपेक्षा जिद्दीने आणि उत्कृष्ट लिहू शकशीलहे कादंबरीचं काम आता तुला पूर्ण करायचंयआणि स्पर्धेतलं बक्षीस जिंकण्यासाठी म्हणून नाही, पण स्वतःबद्दल आत्मविश्वास मिळवण्यासाठी, माझं आणि अम्माचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, शाळेतल्या मुलांसाठी, शाळेसाठी पुढे भविष्यात एक आधार म्हणून बनण्यासाठी ह्यासाठी लिही आणि जिंकण्याच्या जिद्दीने लिही…”

सगळी स्वप्नं तशीच डोळ्यात साठवून बाबूजींनी डोळे मिटले पण कोमलसाठी एक मोठं आव्हान मागे ठेवून गेले, आणि अर्थात तिच्या भविष्याचा पाया रचून गेले

 

ह्या गोष्टींमुळेच बाबूजी गेल्यानंतरही कोमल फार लवकर सावरू शकली स्वतःला….वेळ तसा कमी होता. बाबूजींची कामाची पद्धत तिला आता चांगलीच ठाऊक झाली होती, हेडसर मदतीला होतेचकादंबरीचं लिखाण जसं होत होतं तसंच पुन्हा सुरु झालं….मधल्या काळात हेडसर रिटायर झाले आणि गावाला आपल्या जुन्या घरी कायमचे निघून गेले…त्यांनी कोमलला त्यांचा नंबर देऊन ठेवला होता, ह्या सगळ्याबद्दल कळवत राहा असंही सांगितलं होतं…पण ते इथे असताना त्यांचा फार आधार वाटायचा…कोमलला पुन्हा थोडं एकटं पडल्यासारखं वाटलं पण मी होते तिच्या सोबतीलाहळूहळू कादंबरीचं लिखाण शेवटच्या टप्यात आलंस्पर्धेसाठी ह्या वेळचा विषय होता…’जगाला माहित नसलेल्या, डोळ्यांना न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असलेल्या गोष्टीआणि बाबूजींनी कादंबरीला नाव दिलं होतं…’ अज्ञाताच्या शोधात‘ (अग्यात की खोज में)…..

 

तर हे होतं ते सिक्रेट, बाबूजी आणि कोमलने अम्मापासूनसुद्धा लपवून ठेवलं होतं ते…..

———————————————-

एवढं बोलून छू थांबली. पाणी प्यायला….तिच्याकडून हे सगळं ऐकताना सगळे जणू काही दोन वर्षं मागे गेले होते, कटनीला….अम्मा आणि बाबूजींची एक छबी प्रत्येकाच्या मनात उमटायला लागली होतीगावातली शाळा डोळ्यांसमोर येत होतीकादंबरीचं लिखाण करणारे बाबूजी, त्यांना साथ देणारी कोमल आता जास्त जवळून समजायला लागले होते….

पण मग छू, मगाशी तू म्हणालीस की कोमल तुला असं म्हणाली की अज्ञाताचा शोध तिच्याकडे नाही , म्हणजे काय? म्हणजे ती कादंबरीच ना?” सायली

 

आणि अम्माबद्दल काही कळलं का तुला नंतर? म्हणजे कोमल म्हणाली की ती अम्माला बघायला गेली त्याआधीच अम्मा गेली होती पण शेजारच्यांकडून कळलं त्याप्रमाणे कोमल आणि अम्माची भेट झाली आणि मग दुसऱ्या दिवशी अम्मा गेली….कोमलने तुला असं का सांगितलं? आणि अम्मा आणखी काही दिवस राहणार होती, मग ती आठेक दिवसात परत का आली?” सिद्धार्थ

 

ह्याच दोन्ही गोष्टींची उत्तरं त्या सुजयचं बखोट धरून किंवा त्याच्या दोन सणसणीत कानाखाली लगावून त्याच्याकडूनच मिळवायला मला आवडलं असतं, पण दुर्दैवाने तसं मला करता आलं नाही….” एक उसासा टाकून ती म्हणाली, “थोडक्यात, ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकाच वाटेकडे घेऊन जातातसुजयकडे..”

———————————————

अज्ञाताचा शोध तुझ्याकडे नाही? काय बोलतेयस?”

मला आधी काही कळलंच नाही कोमल असं काय बोलतेय ते

पुन्हा ती गप्पच. मला आता तिचं गप्प बसणं असह्य होत होतंखरं तर तिचा रागच येत होता..

कोमल, मी एक गोष्ट निक्षून सांगतेय तुला, माझ्यापासून काहीही लपवायचं नाही हाबऱ्याच गोष्टीतलं तुझं गप्प बसणं माझ्या लक्षात आलंय. मी इथे नसताना काय, काय झालं ते मला सविस्तर ऐकायचंय तुला कितीही त्रास झाला तरी मला ते ऐकायचंय आत्ताच्या आत्ता…”

 

मी गेले काही दिवस प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे छू….सगळं, सगळं हातातून निसटून गेलंय माझ्यामाझे अम्मा, बाबूजी मला सोडून गेलेत. ज्याच्यावर विश्वास ठेवून पुढच्या आयुष्याची स्वप्नं बघितली, तो आता माझ्याबरोबर नाहीये. माझे बाबूजी जाताना त्यांची स्वप्नं देऊन गेले मलातेसुद्धा सांभाळता नाही आलं मलातुझंही आता लग्न होईल,..तू लांब जाशील माझ्यापासूनमी एकटी पडलेय खूप छू….मी खूप, खूप एकटी पडलेयआत्ता तू माझ्याबरोबर आहेस नातरीही मी एकटीच आहे….परवा अम्मा गेली .मामाजी आले होते पण लगेच त्याच दिवशी संध्याकाळी परत गेले…मला नेत होते त्यांच्याबरोबर पण मीच नाही म्हटलं. त्या संध्याकाळी मी इथे एकटीच अशी बसले होतेकोण कोण येऊन भेटून जात होतं..बाजूच्या काकू येऊन मला जेवायला घेऊन गेल्या घरीमी जेवले की नाही मला माहित नाहीघरी परत कधी आले आठवत नाहीखूप वेळ अशी सुन्न बसून होतेमध्यरात्र सरून गेली असेलमला इतकं एकटं वाटलं ना..पुढच्या क्षणी मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला…”

 

कोमल….”

बोलताना माझा आवाज कापत होता, पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं होतंतिच्या आत्तापर्यंतच्या बोलण्यामुळे डोळ्यात इतकं पाणी साठलं होतं की समोरचं काही दिसतही नव्हतं..

माझ्याकडे बघत खिन्न हसत ती म्हणाली,

घाबरू नकोस गं, आहे ना मी उभी तुझ्यासमोरस्वतःला संपवायला पण फार हिम्मत लागते गं, माझ्यात ती नाहीयेएका क्षणानंतर मला माझीच लाज वाटायला लागलीमाझ्या बाबूजींनी मला आयुष्यावर भरभरून प्रेम करायला शिकवलं, अम्माने प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करायला शिकवले. माझ्या पुढच्या आयुष्याची सुंदर स्वप्नं त्यांनी आयुष्यभर बघितली, त्या माझ्या अम्माबाबूजींच्या संस्कारांचा मी किती अपमान केला होता असा विचार करून, ह्याची जाणीव होऊन स्वतःचीच लाज वाटली मलाघाबरू नकोस गंकितीही एकटी पडले ना तरी असा विचार नाही करणार मी परत, आय प्रॉमिस…”

 

थँक गॉडमी डोळे पुसत म्हटलं…”काय लावलंयस तू हे एकटी पडलीयेस वगैरेमी काही लगेच लग्न करत नाहीयेआणि केलं तरी तुला एकटं पडू देणार नाही, तुला माहितीये….आणि काय म्हणालीस तू? पुढच्या आयुष्याची स्वप्नं बघितलीस तो तुझ्याबरोबर नाही, म्हणजे काय? कोणाबद्दल बोलतेयस? आणि अज्ञाताचा शोध? “

 

सुजयबद्दल बोलतेय मी छू…”

 

कोण सुजय?” 

याआधी सुजयचा उल्लेख मी गावाला असताना कोमलशी फोनवर बोलताना आला होता, त्याला आता जवळपास तीन आठवडे लोटले होतेमाझ्या आधी लक्षातच आलं नाही ती कोणाबद्दल बोलतेय ते

अगं तुला आठवत नाही का …” पण तिने बोलायला सुरु केलं आणि सुजयचा चेहरा झर्रकन माझ्यासमोर आला

 

हा,हा….तो सुजयइंदौरला भेटला तोतोच ना? एक मिनिट, मी गावाला होते तेव्हा तो आला होता ना इथे, तू म्हणाली होतीस. काय झालं पुढे? त्याच्याबद्दल बोललीस तू ?आयुष्याची स्वप्नं बघितली वगैरे….कोमल ….तू मूर्ख आहेस का जरा? मी सांगितलं होतं ना तुला बजावून ….” माझा पारा चढला

एक मिनिटानंतर मी शांत झालेओरडाआरडी करून काहीच फायदा नव्हतात्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध होता ते जाणून घ्यायला हवं होतं

कोमल का नाही ऐकलंस माझं? तू….तू प्रेमात पडलीस का त्याच्या? काय झालं काय नक्की?”

 

तू प्लिज ऐकून घे माझं शांतपणेमला माहित आहे मी मूर्खपणें वागले, तू परत आल्यापासून गेले पंधरा दिवस हाच विचार करतेय हे तुला सांगू कोणत्या तोंडानेतुझ्याशी निदान बोलता तरी येतंयअम्माला तर सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरणही नाही देता आलं मला….जबलपूरला लग्नात सुजय मला भेटला ते मी तुला सांगितलंचत्यानंतर दोनच दिवसांनी तो गावात आला आपल्या…”

———————————————

एक मिनिट छूसॉरी तुला मधेच थांबवतेय…पण पुढे ती त्याच्या कशी प्रेमात पडली वगैरे आम्हाला माहित आहे, म्हणजे तिची डायरी वाचून तिच्या मनातल्या त्यावेळच्या भावना अगदी स्पष्टपणे कळतात अगं…तिच्या मनातली घालमेल, एकदा नकाराचा घेतलेला निर्णय पण मग पुन्हा सुजय भेटल्यावर त्याला परत न भेटण्याच्या कल्पनेने मनात झालेली घालमेल…सगळं कळतंच गं तिची डायरी वाचताना…प्रजापती निवास मध्ये सुजयला ती कादंबरी सापडली हे आता तुझ्या सांगण्यावरून कळलंच आहे आणि त्याच वेळेला कोमल तिथे पोहोचली…मग पुढे काय झालं?”  सायली

 

हो खरंचआणि आणखी एक गोष्टती तक्रार केली होती माही म्हणून कोणीतरीमाही व्यासबरोबर ना सिद्धार्थ ?” ईशा

 

हो, आणि पत्ता कोमलच्या घराचा होता म्हणून तर मी तिथपर्यंत येऊन पोहोचलो …” सिद्धार्थ

 

ही माही कोण आहे नक्की?” ईशा

 

“”हम्म…सांगते..तर पुढे..” …छू

———————————————

ती प्रजापती निवास ला परत गेली, त्यावेळी उत्साहाने, आनंदाने अगदी काय करू आणि काय नको असं झालं होतं तिलाआपण त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करायला तयार आहोत हे सुजयला कळल्यावर तो कसा रिएक्ट होईल हा एकच विचार डोक्यात घोळत होता तिच्या..त्यावेळी तिने ठरवलं होतं ते असंसुजयशी लग्नाला आपण तयार आहोत हे त्याला सांगायचं, म्हणजे तो जे लगेच दुसऱ्या दिवशी गावातून निघून जाणार होता ते निदान आणखी काही दिवस थांबेलत्या दिवसात अम्माला इथे परत बोलवून घ्यायचं आणि तिची आणि सुजयची भेट घालून द्यायचीतिच्या अंदाजाप्रमाणे मी सुद्धा पुढच्या एकदोन दिवसात परत येणारच होते त्यामुळे माझं मत सुद्धा तिला घेता येणार होतंहा सगळा विचार झाल्यावर ती देवळात थांबूच शकली नाही..

ती प्रजापती निवास मध्ये पोहोचल्यावर थेट त्या आतल्या खोलीत पोहोचलीतर सुजय समोर बसून ते लाल कापडात गुंडाळलेली वस्तू निरखून पाहत होतातिच्या छातीत जोरात धडधडलं..त्या लाल कापडात गुंडाळलेली एकावर एक ठेवलेली आणि वरच्या कोपऱ्यात नंबर लिहिलेली पानं वाचण्याचा सुजय प्रयत्न करत होता.तिच्या समोरच त्याने बाजूला ठेवलेलं पाहिलं पान उचललं आणि त्यावरची अक्षरं मोठ्याने वाचली – ‘अग्यात की खोज में‘ ….

सुजय..”

ती जोरात धावतच आत आली..ह्या सगळ्याबद्दल खरं तर त्याला सांगायला काहीच हरकत नव्हतीतो पूर्णपणे एक बाहेरचा, तिसरा माणूस होता ह्या सगळ्यासाठी..पण का, कुणास ठाऊक आजपर्यंत स्वतःबद्दलची प्रत्येक गोष्ट त्याच्याबरोबर शेअर करताना ही गोष्ट मात्र तिने त्याला सांगितली नव्हती..बाबूजी आणि हेडसरांनी ठरवलेल्या सगळ्या गोष्टी अगदी आजपर्यंत तंतोतंत पाळल्या होत्या तिने..ही एक अशी गोष्ट होती जी तिने मी सोडून आणखी कुणाहीबरोबर शेअर केलेली नव्हती..चुकूनसुद्धा

कोमल, तू का परत आलीस? मी येत होतो ना देवळात आणि हे काय आहे, हे अग्यात की खोज मेंवगैरे…”

आता काय सांगायचं ह्याला? सरळ सांगूया का हे मामाजींच्या काहीतरी कामाचं आहे असं काहीतरी?? पण खोटं बोलायचं? सुजयशी? आत्तापर्यंत सगळं इतक्या सहजपणे सांगून टाकलंच की त्याला ….पण ही गोष्ट वेगळी आहेपण काय वेगळी आहे नक्की? मला परदेशी पाठवण्यासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून बाबूजींनी त्या स्पर्धेत भाग घेतला, आता ते नाहीयेत पण त्यांचं स्वप्नं मी पूर्ण करतेय, म्हणजे प्रयत्न करतेयहे कुणापासून लपवून ठेवण्याची खरंच गरज आहे काकितीतरी लोकं अशी धडपडत असतील आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठीत्यात मीसुद्धा एकआणि हेडसरांनी कुणाला न सांगण्याची अट घातली ह्याचं कारण बाबूजींचा साधा सरळ स्वभाव होताकोणी त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन ह्या सगळ्यात व्यत्यय आणू नये म्हणून त्यांनी सांगितलं होतं हे कोणालाही सांगायचं नाही म्हणूनआता बाबूजी नाहीत आणि हेडसर सुद्धा गावाला निघून गेलेतआणि आपण सगळ्या गावाला थोडंच सांगणार आहोतसुजयलाच तर सांगायचंयकाहीही झालं तरी आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून बघतोय आपण त्याच्याकडेउद्या लग्न करायचं ठरलं तर पुढे शिकण्यासाठी परदेशी जाण्याचा आपला विचार तरी त्याला सांगायलाच हवा ना

कोमलकाय विचार करतेयस? आणि तू देवळात थांबणार होतीस ना?”

त्यानेच विषय बदलल्यामुळे तिला थोडं हायसं वाटलं.

तुला काहीतरी सांगायचंय, म्हणून आलेय..”

ती अडखळत बोललीखरं तर हे कादंबरीच्या लेखनाचे सगळे विचार मनात येऊन गेले आणि तेच तिच्या मनात घोळत होते आता

काय?”

?….हामीम्हणजे आत्ता देवळात बसले होते तेव्हा खूप विचार केलामी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे सुजयह्या चारपाच दिवसात तू मला आणि मी तुला जे कळलोय, त्यावरून हे स्पष्ट आहेआपण दोघंवुई आर मेड फॉर इच अदरफक्त फायनल डिसिजन अम्माचा असेल सुजय आणि अर्थात छू इथे नाहीये, ती इथे आल्यावर ती पण तुला भेटेल तोपर्यंत तुला थांबावं लागेलपण माझ्याकडून तरी डिसिजन झालाय..मी आज अम्माला फोन करून सांगणार आहे लवकर यायला….”

ती एका बाजूला हे सगळं बोलत होती खरी पण डोक्यात अजून तेच विचार होते

काय? ओह गॉड….थँक यु सो मचथँक यु.. थँक यु ….”सुजय आनंदाने ओरडलाच….

आणखी काही वेळ ते तिथे थांबले..पुढच्या आयुष्याबद्दल बोलत…..पुन्हा एकदा पावसाने जोर धरला होता आणि आता बाहेर अंधार झाल्यामुळे खोलीतले लाईट्स सुद्धा लावायला लागले होते..आता आणखी उशीर नको म्हणून ते परत जायला म्हणून मागे वळले आणि खोलीत मगाशी पसरलेला कागदांचा तो पसारा पुन्हा एकदा दृष्टीस पडला

अरे ..हे इथेच राहिलंथांब हाठेवतो परत…”

आणि अर्थात ते कागद हाताळताना सुजयने आधीचाच प्रश्न परत विचारला..

हे आहे काय कोमल? ही एवढी पानं ? ती पण हाताने लिहिली आहेतआजकालकोण एवढं लिहितं हाताने?” सुजय

 

तुला हे कुठे मिळालं पण?” कोमल

 

ते मगाशी मी हे वर लिहिलेलं पुसण्यासाठी काहीतरी शोधत होतो तर हे लाल कापड दिसलं मलाम्हणून हे बाहेर काढलं सगळंकाय आहे हे ?” सुजय

कोमल पुन्हा एकदा घुटमळलीखरं सांगायचं की मामाजींच्या कामाचं आहे म्हणून सांगून वेळ मारून न्यायची?

 

नाही, सुजयशी खोटं नको बोलायला, त्याला सांगता येईल ना कुणाला सांगू नकोस म्हणून

 

हा विचार करून तिने त्याला सगळं सांगितलं….एखादी घटना घडून गेली की आपण उगीचच विचार करत बसतो ना की …आपण असं केलं असतं तर किती बरं झालं असतंकिंवा तसंच करायला हवं होतं….आज जवळपास दीड वर्षं झालं ह्या गोष्टीलापण अजून माझ्या मनात विचार येत राहतातकोमलने भावनेच्या भरात हे सगळं त्याला सांगितलंच नसतं तर किती बरं झालं असतंकदाचित तिच्या बाबतीत पुढे जे झालं ते तरी टळलं असतं..

 

त्या रात्री ती झोपूच शकली नाहीसुजयशी जोडल्या गेलेल्या नवीन नात्यामुळे नाहीतर त्याला सांगून टाकलेल्या त्या सिक्रेटमुळेतिला प्रचंड अस्वस्थ वाटत होतं…डायरी लिहायला घेतली पण थोडंसं लिहिल्यावर काही ईच्छाच झाली नाही तिची लिहिण्याची…तसंही डायरीत ती कादंबरीचा उल्लेख करणं टाळायचीच…अम्माने चुकून कधी काही वाचलंच तर उगीच रिस्क नको म्हणून…आत्ताही तिला पुढे लिहवेना…म्हणूनच तुम्हाला डायरी पुढे वाचायला मिळाली नाही..कारण त्यादिवसानंतर कोमलने डायरीच लिहिली नाही कधी. तिला खूप गिल्टी वाटत होतंजी गोष्ट मागचे आठ-दहा महिने आपण सगळ्यांपासून लपवून ठेवली ती अशी एका झटक्यात त्याला कशी सांगून टाकली? अम्माला सुद्धा आपण अंधारात ठेवलंयबाबूजींना प्रॉमिस केलंय..आजपर्यंतचा सगळं प्रवास विसरून आपण कसं सगळं बोललो त्याच्याकडे? आता जी गोष्ट अम्माला माहित नाही, ती त्याला माहित आहेह्या चारपाच दिवसात तो काय अम्मापेक्षाही जवळचा वाटायला लागलाय की काय ….तिला स्वतःचाच राग येत होता आता..

 

पण आता काही करता येणार नव्हतं….तोंडातून शब्द निघून गेले होते..आपण उगीच एवढा विचार करतोय असंही वाटून गेलं तिलात्याच्याशी लग्न करण्याचा विचार करतोय आपणआपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सिक्रेट त्याला कळलं तर बिघडलं कुठे? शिवाय आणखी कोणालाही न सांगायचं प्रॉमिस केलंय ना त्यानेविचार करता करताच तिला झोप लागली

 

दुसऱ्या दिवशी तिने अम्माला फोन केला. खरं तर फोन करण्याचा धीर होतं नव्हता तिलातिला सांगायचं काय नक्की? ती मामांकडे गेल्यावर गावात आलेला एक मुलगा आपल्याला आवडला आणि त्याच्याशी लग्न करायची ईच्छा आहे? किती शॉक बसेल तिलापण मग इकडे लवकर येण्यासाठी आणखी काय सांगणार तिला? शेवटी तिला उत्तर सुचलंपण अम्माशी खोटं बोलायचं? हो, इलाज नव्हता तिचाहे सगळं खरं फोनवर कसं सांगणार तिला? शेवटी तिने फोन केला अम्माला..पण विचार करून फोन करेपर्यंत दुपार होऊन गेली ….तिला आपण आजारी असल्याचं सांगितलंबोलताबोलता छूसुद्धा परत आली नाहीये हे अम्माला कळलं….मी उद्याच परत येते म्हणाली फोन ठेवता ठेवता..

 

संध्याकाळी ती आणि सुजय पुन्हा भेटलेबोलताबोलता कादंबरीचं काम कुठपर्यंत आलंय वगैरे विषय निघाला. आणि सुजयने तिच्याकडे मागणी केली आत्तापर्यंत लिहिलेली कादंबरी वाचायला देण्याची.

 

याही वेळेला तिला ‘नाही’ म्हणता आलं नाहीखरं तर काल रात्री तिला जसं अस्वस्थ वाटत होतं तसं आता मुळीच वाटत नव्हतंसुजय भेटल्यावर पुन्हा एकदा त्याच्याबद्दल विश्वास वाटायला लागला, उलट उगीच काल रात्री आपण एवढा विचार केला असं तिला वाटायला लागलंकादंबरी घ्यायला ते परत प्रजापती निवास मध्ये गेलेलाल कापडात गुंडाळलेली आजपर्यंतची बाबूजींची आणि तिची मेहनत त्याच्या हातात सोपवताना एक क्षणभर परत मनात थोडी चलबिचल झाली, पण थोडाच वेळसुजयच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून म्हणाला,

मॅडम, डोन्ट वरीमी फक्त थोडं वाचून लगेच परत करेन तुला तुझ्यातलं हे टॅलेंट बघायची खूप ईच्छा आहे म्हणून वाचायला मागितली मीडोन्ट वरी,,,आजची रात्र आणि  फार तर फार उद्याचा दिवसनंतर लगेच तुला परत देईन मीआणि काळजी करू नकोस मी खूप सांभाळून नेईन आणि परत आणेनमला माहित आहे तुझी आणि बाबूजींची इतके दिवसांची मेहनत आहे ही….सो ट्रस्ट मी..आणि एकदोन दिवसात वाचून होईल असं वाटत नाही मलातुम्ही किती भव्यदिव्य काम केलंय हे ही पानं बघूनच कळतंयमी फक्त चाळून बघेन ..आणि एकदा फायनल पूर्ण झाली की ती वाचण्यातली मजा काही वेगळीच असेल ना?”

त्याचं हे बोलणं ऐकून ती निर्धास्त झालीम्हणजे तशी तिला शंका नव्हतीच खरं तर पण तरीही त्याचं आत्ताचं बोलणं ऐकून तिला दिलासा मिळाला….

वाचणार कसं तू पण?”

 

म्हणजे काय? हिंदीमध्ये आहे ना ? मला येतं हिंदी वाचता…”

 

अरे तसं नाही ती हसत म्हणाली, “असं घेतलं आणि सरसकट वाचून टाकलं इतकं सोपं नाही तेबघ बरंएकदोन पानं वाचून बघ, म्हणजे कळेल तुला…”

त्याने एक पान वाचून बघितलं आणि तो चक्रावलाच….

हे काय लिहिलंय? हे असंच आहे का सगळ्या पानांवर?”

 

हो..तेच तुला सांगत होतेआमच्या हेडसरांनी एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की अगदी १००% ती जशीच्या तशी प्रत्यक्षात उतरायची ती गोष्टकादंबरीचं असं लिखाण करण्याची कल्पनाही त्यांचीचत्यांना फार भीती वाटायची की बाबूजी त्यांच्या स्वभावावर जाऊन कोणालाही हे वाचायला वगैरे देऊन टाकतील किंवा कोणी मागितलं तर त्यांना नाही म्हणता येणार नाहीआणि स्पर्धेत जाण्याआधी हे कुठे छापून आलं किंवा आणखी कुठे ह्यातल्या गोष्टींचा उल्लेख झाला तर स्पर्धेत जाण्याआधीच बाद होईल ना तेम्हणून हे एवढं सगळं सिक्रेटली केलं आम्हीकोणालाही सांगायचं नाही, आणि लिहिताना इतकी सरमिसळ करायची की कोणाला अर्थ लावून नीट वाचताच येऊ नयेसुरुवातीला कठीण गेलं पण नंतर जमलं एकमेकात अडकून पडलेली वाक्य सोडवून त्याची अर्थपूर्ण सुंदर अशी माळ कशी तयार करायची हे आम्ही आमच्यापुरतं ठरवून घेतलं होतंथांब तुला वाचून दाखवते..”

तिने ज्या सफाईने ती वाक्य एकामागोमाग एक अर्थपूर्ण करून वाचली, ते पाहून तो थक्क झाला..

माय गॉड, अनबिलीव्हेबल….पण एवढी सगळी मेहनत करण्याची काय गरज होती? आय मिन, कॉम्प्युटरवर टाईप करायचं ना, कोणालातरी कामाला लावायचंपासवर्ड देऊन फाईल सेव्ह करायची…”

 

बरोबर आहेमी सुरुवातीला हे सांगून बघितलं होतं बाबूजींनापण त्यांना हे असं करणं जास्त कम्फर्टेबल वाटलं आणि शेवटी ते लिहीत होते ना हे, त्यांना जे सोयीचं असेल तेच करू असं ठरवलं आम्ही…आणि अर्थात त्यांचं लिहून झालं की मी लगेच टाईप करून ठेवत होते ते…त्यामुळे नीट सरळ लिहिलेली अशी सॉफ्ट कॉपी आहेच माझ्याकडे…नंतर मी हे हातात घेतलं तेव्हा बाबूजींची पद्धत चांगलीच माहित झाली होती मला ..त्यामुळे तेवढं कठीण नाही गेलंआणि खरं सांगू का, मी एन्जॉय केलं हे असं स्वतःच्या हाताने एकएक गोष्ट लिहून काढायची तेह्या सगळ्यात आपला असा पर्सनल टच असल्यासारखं वाटतंआपण नाही का म्हणत, मेल्स आणि टेक्स्ट मेसेजेस हाताने लिहिलेल्या पत्राची जागा नाही घेऊ शकत, तसं आहे हेमी, बाबूजींनी खूप जीव ओतून केलंय हेमागचं वर्षभर हे काम म्हणजे ध्यास झालं होतं आमचाह्यातून जे मिळेल त्यापेक्षा हे करताना जे मिळतंय ते एन्जॉय केलंय आम्हीसो प्लिज मला हे लवकरात लवकर परत देबाबूजींचं हे स्वप्नं असं दुसऱ्याच्या हातात सोपवताना मला माझं मन काढून दुसऱ्याच्या हातात दिल्यासारखं वाटतंय…..”

 

तुझं मन आहेच ना मग माझ्याकडे….”

हलकेच हसत तो म्हणालात्यावर तिला लाजल्यासारखंच झालं..तिने मान दुसरीकडे वळवली…..

मला कळतंय कोमलतुला एवढी काळजी वाटत असेल तर नको देऊस मला ही कादंबरीपूर्ण झाली आणि तू स्पर्धेसाठी पाठवलीस की मला दे वाचायला…”

 

अरे तसं नाही…”

 

मला खरंच वाईट नाही वाटणार…”

 

नाही रे..घेऊन जा तू..खरंच…खरं तर तुला माझ्याकडची सॉफ्ट कॉपी दिली असती पण ती छूकडे आहे नेमकी “

 

नक्की घेऊन जाऊ ना?”

 

हो. नक्कीआणि आणखी एकअम्मा येईल उद्या मामांकडूनती भेटायला बोलावेल तुला…”

 

मग? मी तर कधीची वाट बघतोय त्यांचीएकदा का त्यांनी हो म्हटलं की झालं…”

 

झालं? तू तुझ्या आईशी बोललायस का? “

त्यावर तो जरा विचारात पडला.

“हम्म…बघू…माझ्या आईचं नंतर बघू, आधी तुझ्या अम्माला तर हो म्हणूदेत…”

——————————————

दुसऱ्या दिवशी अकराच्या सुमाराला अम्माचा फोन आलाबसमध्ये बसल्याचाम्हणजे साधारण चारच्या सुमाराला कटनीला पोहोचायला हवी अम्मा…आणि कोमलच्या मनात पुन्हा घालमेल सुरु झाली. …तिला कसं फेस करणार आहोत आपण? ती माझ्या पुढच्या शिक्षणाची, करियरची स्वप्नं बघतेय आणि मी तिला लग्नासाठी मी मुलगा पसंत केलंय असं सांगणार….किती धक्का असेल हा तिच्यासाठीअर्थात तिला माहित नाही म्हणा, तिचं आणि माझं ध्येय एकच आहे. बाबूजींचं आणि माझं स्वप्नही एकच आहेमी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे जमा करण्यासाठी धडपड करतेय हे तिला माहीतच नाहीयेत्यामुळे मी माझ्या लग्नाचा विषय काढला तर तिला अजिबातच आवडणार नाही….काय करायचं? अम्माला हे सगळं सांगायचं कसं?

 

मग तिच्या डोक्यात एक विचार चमकून गेलाअम्माला हे सगळंच एकदम सांगायचं..ही स्पर्धा, त्यासाठी चाललेलं कादंबरी लेखन, त्यात लक्षवेधी लेखनाला मिळणारं बक्षीस, त्यामुळे शक्य होऊ शकणारं पुढे परदेशी जाऊन शिकायचं स्वप्नंआणि हे सगळं सांगून झालं की मग सुजय भेटल्याचं सांगायचंआपण आपल्या करियरकडे दुर्लक्ष करतोय असा तिचा गैरसमज नको व्हायलाहा विचार डोक्यात आल्यावर तिला जरा बरं वाटलं

 

पण याही वेळेला सगळं सुरळीत घडणार नव्हतंजे घडणार होतं ते अनपेक्षित होतं, कोमलचं सगळं जग बदलवून टाकणारं होतं

 

साडेतीनच्या सुमाराला कोमलला एक फोन आलासिटी हॉस्पिटल मधूनअम्माच्या बसला ऍक्सीडेन्ट झाला होता..अम्माच्या मोबाईलमध्ये लास्ट डायल्ड नंबर कोमलचा होता म्हणून कोणीतरी तिला फोन करून कळवलं होतं..

 

अम्मा….” हंबरडा फोडत ती मटकन खालीच बसलीखोटं बोलून आपण अम्माला बोलवून घेतल्याचं बोलणं सारखं सारखं तिच्या कानात ऐकू यायला लागलंकाही मिनिटं ती सुन्न होऊन गेलीमीसुद्धा नव्हते तिथे, तिला काय करावं काही सुचेनाशेवटी ती शेजारच्या काकाकाकूंकडे गेलीत्यांना कळल्यावर ते तातडीने तिच्याबरोबर आले सिटी हॉस्पिटल मध्ये..

 

अम्माच्या बरोबरचे काही प्रवासी जागीच दगावले होते, आणि काही गंभीर जखमी झाले होते..पण नशिबाने अम्माला कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हतीपायाला जरा जास्त मार लागला होता आणि डोक्याला थोडं लागलं होतं. वरवर तपासून डॉक्टरांनी सगळं ओके असल्याचं सांगितलंडोक्याला मार लागल्यामुळे एम.आर .आय करून घेऊ असं म्हणाले. पण तसं सगळं ठीक आहे आणि चोवीस तास अंडर ऑबझर्वेशन ठेवून मग डिस्चार्ज देऊ असं म्हणालेसगळं थोडक्यात निभावलं म्हणून कोमलने देवाचे आभार मानले..शेजारचे काका काकूही अम्माची विचारपूस करून निघून गेले

 

कोमल अम्माच्या बाजूला जाऊन बसली आणि तिने तिचा हात हातात घेतला….तिच्या डोळ्यातून घळघळा पाणी यायला लागलं..

बेटा मी ठीक आहे आता, रडतेस कशाला?”

 

मी खूप घाबरले अम्मा….”

 

मी सुद्धा खूप घाबरले….माझ्यासाठी नाहीमला काही झालं तर तू एकटी पडशील म्हणून…”

 

आता असं बोलू नकोस अम्मातू बरी आहेस आणि उद्या घरी जाणार आहोत आपण…”

 

अगं बोलून किंवा न बोलून गोष्टी घडायच्या थांबल्या असत्या तर आणखी काय हवं होतं? तुझे बाबूजी ह्या बाबतीत सुदैवीनिदान जाताना त्यांना तुझ्याविषयी काळजी नव्हतीपण आज मरण इतक्या जवळून बघितलं मी आणि पाहिला तुझा विचार आला मनातमला खरंच अचानक काही झालं तर ?”

 

अम्मा नको ना अशी बोलूसतू ना आरडाओरडा करतानाच चांगली वाटतेस…”

 

बरं ..नाही बोलततू कशी आहेस आता?”

कोमल…” मागून ओळखीचा आवाज आला तशी कोमल दचकलीहा इथे?

कोमल..अम्मा कशी आहे? मला दुकानात कळलं बसला ऍक्सीडेन्ट झाल्याचंतू म्हणाली होतीस ना अम्मा ह्या बसने येणार आहे म्हणूनघरी गेलो तेव्हा कळलं की तू इथे आली आहेस….मी कधीपासून फोन करतोय तुलाफोन का नाही उचलत आहेस तू ? आणि….”

 

सुजय …”त्याचं बोलणं थांबत नाही हे बघून ती मधेच म्हणाली, “अम्मा ठीक आहे …”

 

हा कोण आहे…?”

ह्या प्रश्नाने दोघेही भानावर आलेअम्माला काय सांगणार आता?

अम्माहा गावात आला पाचसहा दिवसांपूर्वीशाळेत आला होता तेव्हा ओळख झाली आमची…”

तिने खाणाखुणा करून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, अम्माला आपल्याबद्दल माहित नाहीये म्हणून..त्याने हळूच हाताने ‘ओके ‘अशी खूण केली..

 

अम्माची विचारपूस करून तो निघून गेला.

अम्मा, तू आराम कर आतामी घरी जाऊन काहीतरी खायला घेऊन येते तुझ्यासाठी..”

 

थांब आधीमला सांग, कोण होता तो ?”

अम्माच्या प्रश्नाने तिची तारांबळ उडाली. हेच सांगण्यासाठी अम्माला बोलवून घेतलं होतं तिने. पण आता अम्मा अशी अपघातामुळे बेडवर झोपून असताना तिला कोणताही मानसिक धक्का द्यायचा नव्हता तिला.

अगं मी म्हटलं ना तुला अम्मा, तो शाळेत आला होता काही कामासाठी. तेव्हा त्याला काही माहिती हवी होती ती मीच दिली म्हणून ओळख झाली माझी..”

 

एवढंच?”

 

म्हणजे काय? आणखी काय असणार अम्मा?”

 

एवढ्याशा ओळखीवर तो इथे आला का धावत, माझा ऍक्सीडेन्ट झाला म्हणून?”

 

अगं म्हणजे, नंतर परत दोन दिवस तो शाळेत येत होता ना, मग रोज बोलणं होतं होतंआज म्हटलं होतं मी त्याला माझी अम्मा येणार आहे म्हणूनआणि मग त्याला कळलं असेल ना बसला अपघात झाला ते, म्हणून आला असेल ना तो…”

 

मग त्या खाणाखुणा कसल्या चालल्या होत्या बरं? “

 

अगं काहीतरी….”

 

हे बघ,” तिला आता आणखी पुढे काही बोलू न देता अम्मा म्हणाली, ” आता ह्यापुढे बोलशील ते खरं खरं असायला हवं….असं नक्की काय होतं जे माझ्यासमोर तुला त्याच्याशी बोलता आलं नाही….मी अम्मा आहे तुझी..जगातल्या इतर कुणाहीपेक्षा तुला जास्त ओळखते. सांग आता …”

अम्माचा हा सूर लागल्यावर कोमलने ओळखलं. आता अम्माला खरं सांगण्यावाचून पर्याय नव्हतापण तरी एक प्रयत्न करून बघायला हवाच.

अम्मा, मी सांगेन तुला सगळं..पण प्लिज एक दिवस थांब. उद्या घरी गेल्यावर…”

 

नाही, मला आत्ताच कळायला हवं…”

शेवटी अम्माच्या नजरेला नजर द्यायचं टाळत तिने सगळं सांगितलंपण तिने ठरवलं होतं तसंचआपण तिच्यापासून आणखी एक गोष्ट लपवली असल्याचं सांगून तिने आधी ती स्पर्धा, बाबूजींनी आणि तिने त्यासाठी सुरु केलेलं कादंबरी लिखाण वगैरे सांगितलं. आणि मग सुजयबद्दलआपल्याला तो आवडलाय, इतकंच.

 

सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. अम्मा तिच्यावर रागावली. तिच्यापासून एवढी मोठी लपवाछपवी केल्यामुळे तिला तिची फसवणूक केल्यासारखं वाटत होतं आणि कोमलने अशा प्रकारे स्वतःच्या लग्नाचा विचार केल्याबद्दल ती दुखावलीसुद्धा गेली होती.

 

बराच वेळ तिने कोमलशी अबोला धरला होता. बरेच वेळा प्रयत्न करून शेवटी कोमल आपला मुद्दा अम्माला थोडाफार तरी पटवून देऊ शकली. मुलीच्या लग्नाचे विचार तिच्याही मनात यायचेच, बाबूजी गेल्यानंतर तर जास्तच. पण म्हणून करियरचा विचार करण्याच्या आधी तिने लग्नाचा विचार केलेलाही तिला नको होता खरं तरकोमलने तिला ती स्वतःच्या करियरचा विचार करतेय असा विश्वास दिला, त्यामुळे तिला थोडाफार दिलासा मिळाला होता, पण त्याचबरोबर टेन्शन दसपटीने वाढलं होतंफक्त पाचसहा दिवसांच्या ओळखीवर ही मुलगी त्याच्या प्रेमात पडली, आणि लग्नाचा विचार करतेय हेच तिच्या टेन्शनचं कारण होतं. पण तू त्याला भेट आणि मग तू ठरव मी त्याच्याशी लग्न करू की नाही ते, कोमलने सांगितलंखरं तर अम्माचा आक्रस्ताळा स्वभाव बघता तिने हे सगळं इतकं शांतपणे कसं ऐकून घेतलं हे मला अजूनही कळलेलं नाही. पण कदाचित ऍक्सीडेन्ट झाल्यावर स्वतःच्या आणि कोमलच्या भविष्याबद्दल तिच्या मनात नकारात्मक विचार यायला लागले असणार, आपल्याला काही झालं तर कोमलसाठी हक्काचं माणूस कोण असणार, हा विचार असणारच तिच्या मनातकदाचित कोमलकडून सुजयबद्दल कळल्यावर तिला तिच्या मनातल्या शंकेचं निरसन झाल्यासारखं वाटलं असेलसगळं चांगलं असेल तर ह्या मुलाला हो म्हणायला काय हरकत आहे, कोमलने तिच्या करियरबद्दल विचार केलाय,…ती प्रयत्न करतेय पुढे परदेशी जाऊन शिकण्यासाठीआणि आता तिचं लग्न ठरणार असेल तर आपल्याला आणखी काय हवं, असेही विचार कदाचित तिच्या मनात येऊन गेले असतीलम्हणजे हा माझा अंदाजपण एरव्ही खमकी असणारी अम्मा, त्यावेळी एवढी मऊ का पडली आणि कोमलने तिला एवढ्या सहजपणे कन्व्हिन्स कसं केलं ह्याचं हे एवढंच उत्तर आत्तातरी मी देऊ शकते.

 

त्या दिवशी रात्री अम्माला आपलं म्हणणं बऱ्यापैकी पटवून दिल्यामुळे कोमल तशी आनंदात होती. उद्या अम्माला डिस्चार्ज मिळणार, मग सुजयला घरी बोलवू. आता अम्माला सगळं सांगितल्यामुळे तिला हलकं वाटत होतंआता कादंबरीचं थोडक्यावर आलेलं काम काही दिवसात पूर्ण करायचंपुढच्या चारेक महिन्यात स्पर्धेची तारीख येतच होतीआता सगळं छान होईल, आणि अम्माची आणि सुजयची सुद्धा ह्या सगळ्यात साथ असेलछू येईल आणि हे सगळं असं झालेलं बघून किती चकित होईल….हे असे वेगवेगळे विचार डोक्यात येत असतानाच तिचा डोळा लागलाअम्मासुद्धा झोपली होतीतिच्या पायाच्या जवळ डोकं ठेवून कोमलही शांतपणे झोपून गेली..

 

दोनेक तास झाले असतील. अम्माच्या कण्हण्यामुळे तिला जाग आली..अम्माचं डोकं दुखत होतं आणि झोपेत ती कण्हत होती. नर्सला बोलावलं. तिने काही औषधं दिली पण फारसा उपयोग झाला नाही. पुढच्या एक तासाभरात अम्माचं डोकं दुखणं चांगलंच वाढलं होतं…हळूहळू तिची सहनशक्ती कमी पडायला लागली….पहाट होऊन गेली..आता तिला उलट्यासुद्धा सुरु झाल्याकोमलची घालमेल क्षणाक्षणाला वाढत होती. दर दहा मिनिटांनी ती मला फोन ट्राय करत होती, माझ्या बाबांना फोन करत होतीपण आमचे फोन लागत नव्हतेअम्माला अशा अवस्थेत बघणं किती कठीण होतं..रात्री काय विचार करत आपण झोपलो आणि आता हे अचानक काय होतंय..बिचारी …तिच्या बरोबर फारसं जवळचं असं कोणी नव्हतंच.

 

काल अम्माचा ऍक्सीडेन्ट झाल्याचं कळल्यावर मामाजी लगेच इकडे यायला निघाले होते, पण नंतर अम्मा ठीक असल्याचं सांगून कोमलनेच त्यांना घाई करून येऊ नका असं सांगितलं होतंबाजूला राहणारे काकाकाकू तसे चांगले होते पण ते नुकतेच तिथे राहायला आले होते, अगदी महिनाभर झाला असेल फक्त….तेच कोमलबरोबर अम्माला बघायला हॉस्पिटलमध्ये आले होते, पण आता असं पहाटेच्या वेळेला त्यांना कसं बोलवून घ्यायचंशाळेतले गुरुजी होते पण त्यांच्या घरी त्यांचीच बायको आजारी होतीआणखी बाकीची ओळखीची लोकं होती पण कोमलला आत्ता ह्या परिस्थितीत आणखी कोणाचं नावच डोळ्यांसमोर येईनाआणि कोणाला बोलवून तरी काय करणार? तिने फोन हातात घेतला, आणि त्यात शेवटी आलेल्या कॉल्समध्ये तिला सुजयचा नंबर दिसला. हो, खरंच, त्याला बोलवून घ्यायचं लक्षातच आलं नव्हतं तिच्या. आता लगेच तिने त्याला फोन केला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं.

 

हळूहळू परिस्थिती स्पष्ट होत गेलीअम्माच्या डोक्याला लागलेला बारीकसा मार, खरं तर वरून थोडीशी जखम दिसत असली तरी आतपर्यंत चांगलाच जोरदार मार लागला होता, आणि आता इतके तास होऊन गेले तरी त्यावर काहीच उपचार झाले नाहीत त्यामुळे आतल्या आत रक्तस्त्राव सुरु झालाडॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अम्मा आता प्रत्येक श्वासागणिक तळमळत होतीकोमल असहाय्य्य होऊन एका कोपऱ्यात बसून डॉक्टरांची सगळी धावपळ नुसती बघत होतीअम्माची इमर्जन्सी सर्जरी करायला लागणार होती आणि ते सर्जन तिथे पोहोचेपर्यंत काहीतरी खटपट करणं गरजेचं होतं….पुढे काय होणार आहे, अम्माशी आपण कधी बोलू शकूकोमलला कसलाच विचार करायचा नव्हता, खरं तर तिचं डोकंच बधीर झालं होतं.

 

काही वेळानंतर ते सर्जन हॉस्पिटलला पोहोचलेऑपरेशनच्या तयारीची लगबग सुरु झालीएक नर्स येऊन कोमलला काही फॉर्मस वर सह्या करण्यासाठी घेऊन गेली.

 

दहा-पंधरा मिनिटं झाली असतील…आता अम्माचं ऑपरेशन होईल आणि ती बरी होईल हळूहळूअसा विचार करतच ती परत आली. अम्माच्या बेडच्या बाजूला नर्सेसची गर्दी होतीआजूबाजूच्या पेशंट्सचे नातेवाईक त्याच दिशेला बघत होतेत्या घोळक्यात दोन डॉक्टर्स लगबगीने काहीतरी करत होतेक्षणभर कोमल होती तिथेच उभी राहिलीघामाचा एक गरम ओघळ तिच्या मानेपासून पायापर्यंत वाहत गेल्याचं तिला जाणवलंअम्मा

 

अम्मा …” असं ओरडतच ती धावली. सगळ्या गर्दीला बाजूला करत अम्मापाशी गेलीअम्मा समोर निपचित पडली होतीडॉक्टरांना तिची नाडी लागत नव्हती. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालले होतेएका क्षणी अम्मा थोडे डोळे उघडून आपल्याकडे बघतेय असं कोमलला वाटलंपण एकच क्षण त्यानंतर तिने डोळे मिटले ते कायमचेच.

 

क्रमशः

अज्ञाताच्या वाटेवरचा हा प्रवास आणखी किती बाकी राहिलाय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल…आता शेवटची काहीच वळणं… आणि त्यानंतर सायलीचा हा प्रवास संपेल. आणि तिच्याबरोबर अर्थात आपलाही…त्यानिमित्ताने केलेलं हे शेवटचं हितगुज…

शेवटच्या भागातली रंजकता आणि उत्सुकता टिकून राहण्यासाठी पुढच्या आठवड्यात दर दोन दिवसांनी एक छोटा भाग पोस्ट करतेय. शनिवारी हा भाग पोस्ट होतोय, त्यामुळे सोमवारी पुढचा भाग घेऊन येतेय. तुमच्या प्रतिक्रिया अशाच चालू राहुदेत..ह्यापुढचे भाग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील आणि एकूणच कथा, कथेचा शेवट आवडेल अशी आशा आहे…भविष्यात दवबिंदूला भेट देत राहाल अशीही आशा करते.

धन्यवाद !!

 

One comment on “अज्ञाताची चाहूल : (भाग : 45)

  1. sarika devrukhkar
    February 27, 2018

    khup chan valan ghetlay story ne shevat kay asel hyachi aturta lagali ahe

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on February 24, 2018 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: