अज्ञाताची चाहूल (भाग : 2 )

“आपण आज इतके विचारात होतो की कदाचित विसरलो असू. आणि जर लावली असती तर मग आपोआप खिडकी उघडेलच कशी?”

शेवटचा विचार मनात येताच ती पुन्हा घाबरली. पुन्हा ते स्वप्न आठवलं, तो चेहरा, ती थंड वार्‍याची झुळुक, ती शांतता, तो निर्जन रस्ता..तिच्या अंगावर सरसरुन काटा आला. ती तशीच भराभर तिच्या खोलीच्या बाहेर पडली. आता एक क्षणही तिला तिच्या खोलीत राहायच नव्हतं. अनि ची खोली तिच्या खोलीला लागूनच होती. तिने हळूच त्याच्या खोलीच दार उघडलं. आत अंधार होता.

“अनि झोपलाय वाटतं. आता काय करू?” ती तशीच विचार करत उभी राहिली. “आई-बाबा पण झोपलेले दिसतायत.”

तोच तिला मागे कुणाची तरी चाहूल लागली. कुणीतरी होतं तिच्या मागे. एक हळूच विचित्र असा आवाज आला आणि तेवद्यात एक तसाच थंड हवेचा झोत तिच्या मानेवर आला. ती भीतीने अर्धमेली झाली. अनिला हाक मारायला पाहिजे. पण तिच्या तोंडून शब्दच फुटेना. धीर करून ती मागे वळली. तिकडे अंधारात….

———————-(भाग १ पासून पुढे— )————
(भाग १ येथे वाचा – http://wp.me/p6JiYc-2r )

अंधारात अनि उभा होता. हातात एक छोटं मशीन घेऊन. खूपच खुश वाटत होता.

“थॅंक गॉड. तू तरी जागी आहेस. हे माझं नवीन इन्वेन्शन बघायला कोणीतरी आहे जागं…वा, व्वा ,व्वा ….”

“काय..म्ह…म्हणजे?” सायलीने अजून श्वास रोखून धरला होता.

“अगं हे बघ ना मी काय बनवलंय. एक छोटा, फोल्डेबल,पोर्टेबल एयर कुलर…हे बघ” त्याने हातातील मशीन पुढे केले.

“हे बघ, हा इकडचा नॉब डावीकडून उजवीकडे वळवला आणि ह्याचा हा मेटल सारखा दिसणारा भाग खाली ओढला की कुलर ओपन होतो. आता मी आधीच सुरु केलाय त्यामुळे ओपनच आहे हा. आणि नंतरचं सगळं आपल्या नॉर्मल कुलर सारखं. म्हणजे इथे थंड पाणी टाकायचं आणि मग स्विच ऑन केला की कुलर सुरु. थंड हवा सुरु. हे पण हा नॉर्मल कुलर पेक्षा आकाराला आणि वजनाला खूप कमी आहे हा …पण पर्फ़ोर्मन्स सेम देतो..”

अनिच्या आवाजातून उत्साह ओसंडून वाहत होता.

म्हणजे तो आवाज कुलर ऑन केल्याचा होता आणि ती थंड हवा अर्थात कुलर मुळे आलेली होती. सायलीने सुटकेचा निश्वास टाकला.

” वा, सही आहे रे. तू एकट्याने केलंस? पण तू तिकडून कसा आलास? मला वाटलं की रूम मध्ये अंधार आहे म्हणजे तू झोपला असशील.”

“केबल वर ‘हेराफेरी’ लागला होता ना, तो बघता बघता हे करत होतो, म्हणून हॉल मध्ये होतो. पण आपलं काय? अशी अंधारात भुतासारखी उभी राहून काय करत होतीस ? ”

“अरे माझ्या रूमचा एसी बिघडलाय. चालूच होत नाहीये. जाम गरम होतंय. मी आज तुझ्या रूम मध्ये झोपते हां.”

“बिघडलाय? काय झालं? चल बघतो मी.”

“अरे आत्ता कुठे? किती उशीर झालाय. मला झोप आलीये. नंतर उद्या बघ तू. चल आता झोपायला.”

अनिकेत च्या खोलीत झोपायला गेल्यावर मात्र सायलीला स्वतःवरच हसू येत होतं.

“काय झालं होतं मधेच मला? एका स्वप्नामुळे एवढी घाबरले? आणि खिडकीचं एवढं काय टेन्शन घेतलं मी? आज डोकंच जागेवर नव्हतं माझं, मी खिडकी लावलेलीच नसणार नक्कीच.”

थोड्या वेळात तिला शांत झोप लागली.

——————————————————–

” अगं सायली, नीट खाउन तरी जा बाई. आत्ता मी आहे तुझ्या मागे लागायला. लग्नानंतर तुझं तुलाच लक्षात ठेवून सगळं करायचं आहे.”

दुसऱ्या दिवशी सकाळच्या गडबडीत सायली आदल्या दिवशीचं सगळं विसरूनही गेलेली होती आणि आता ती कसा-बसा ब्रेकफास्ट उरकून पळण्याच्या तयारीत होती, तोच आई च्या तावडीत सापडली.

“ए आई, प्लीज आत्ता नको गं ते लग्नाचं लेक्चर. मी निघते आता. गेल्या गेल्या मीटिंग आहे माझी.”

“मी काहीच बोलत नाही आता. बघावं तेव्हा तुम्हाला घाई असते. अनि ला कधीपासून सांगतेय मी की येउन आधी खाउन घे, पण त्याला आत्ताच एसी उघडून बसायचं आहे.”

“कुठला एसी? ”

“दुसरा कुठला? तुझ्याच खोलीतला. बिघडला म्हणून अनि च्या खोलीत झोपलीस ना रात्री ? पण लक्षात ठेवून खिडकी बंद करून मग एसी ऑन केला असतास तर नसता बंद पडला कदाचित.”

“काहीही काय आई? थोडा वेळ खिडकी उघडी राहिली तर लगेच एसी बंद पडेल का? जाऊदेत, चल निघते मी”

“ते तुमचं तुम्हाला माहीत. थोडं डोकं ताळ्यावर ठेवलं की नाही असं होत. काल तू झोपल्यावर आले होते मी तुझ्या खोलीत. तर खिडकी उघडीच. आणि एसी चालू ”

“अगं आता किती वेळा ऐकवणार आहेस? चुकून उघडी राहिली ना खिडकी…”

“अगं खिडकी बद्दल नाही बोलत मी…जनरल बोलतेय…नेहेमीच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून पण वेळेवर कराव्या लागतात. आता मीच होते म्हणून मी आपलं समजून घेतलं आणि खिडकी लावून घेतली …”

आईचं शेवटचं वाक्य ऐकून सायली दारातच थबकली. कालची अर्धवट उघडी खिडकी तिच्या डोळ्यांसमोर आली.

” तू लावून घेतलीस खिडकी?”

“मग काय ? एक तर एसी चालू होता. परत तुझी खोली रस्त्याच्या बाजूला येते मग तुला गाड्यांचे आवाज येत राहतात. म्हणून तूच सुरु केलंस ना खिडकी लावायला? वरच्या खालच्या दोन्ही कड्या पण लावल्या. काल वारा पण खूप होता ना …म्हटलं परत उघडायला नको ..”

“कड्या लावून घट्ट बंद केलेली खिडकी परत आपोआप उघडेलच कशी? आणि घरातलं तरी कोण माझ्या खोलीत येउन खिडकी उघडेल ? आणि कशासाठी? “

दोन क्षण सायली विचारात गढून गेली. मग तिने ठरवलं की असे काहीही निगेटिव्ह विचार डोक्यात आणायचेच नाहीत. घाईघाईत ती ऑफिसला जाण्यासाठी निघून गेली.

पुढचे तीन चार दिवस सायली ऑफिस च्या कामातच खूप बिझी होती. गीता पण रजेवर होती त्यामुळे सुजयचा विषयही निघण्याचा प्रश्न नव्हता. लग्न ठरल्यापासून चार दिवस झाले तरीही अजून सुजयचा फोन आलाच नव्हता. सायलीने पहिल्या दोन दिवसातच त्याला व्हॉटस ऎप वर ढीगभर मेसेजेस पाठवले होते. त्यातल्या फक्त एका मेसेजला सुजय कडून “हाय, आय एम फाईन. हाऊ आर यु? जरा बिझी आहे. वेळ मिळाला की कॉल करेन” असं कोरडं उत्तर आलं होतं.

“तू बिझी आहेस तर मी काय रिकामीच बसलेय का ? जाऊदेत , आता मी पण फोन, मेसेज काहीच नाही करणार. मला बघायचंच आहे हा कधी कॉल करतो ते.” सायलीने काही काळापुरता त्याचा विचार बाजूला ठेवला.

——————————-

रात्रीचे साडे-अकरा वाजले असतील. सायली झोपायलाच जाणार तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. सुजयचा फोन होता. पहिल्या दिवशी आतुरतेने त्याच्या फोनची वाट बघणारी सायली आत्तापर्यंत त्या सगळ्या भावनांमधून बाहेर पडली होती.

काहीश्या अलीप्ततेनेच तिने फोन उचलला.

“हाय सायली, कशी आहेस?”

“बरी आहे.”

“मी आजच आलो दिल्ली वरून. आई म्हणाली की तू फोन केला होतास.”

“हो केला होता. मग एक फॉर्मल कॉल-बॅक करतो तसा फोन केला आहेस तर, आई च्या सांगण्यावरून?”

” अगं चिडू नकोस प्लीज. मी बिझी होतो तिकडे. अजिबात वेळ नाही मिळाला मला.”

“वेळ कुणालाच नसतो रे…सगळेच बिझी असतात आपापल्या कामात. वेळ काढावा लागतो…”

” आय नो सायली, पण प्लीज चिडू नकोस. अगं, मी गेल्या पासून इतका बिझी झालो होतो , सारख्या कॉन्फरन्सेस, मिटींग्स, डिसकशन्स, ह्यातच अडकलो होतो. कसा-बसा झोपायला हॉटेल रूम वर जायचो, तेव्हढाच ब्रेक मिळायचा..”

सायलीला अजून त्याचं म्हणणं पूर्ण पटलेलं नव्हतं. खरंच कोणी इतकं बिझी असतं का की चोवीस तासातली पाच मिनीटही काढता येऊ नयेत? जेवताना, झोपायला गेल्यावर, कधीच वेळ काढता येऊ नये? काहीच नाही तर निदान एक मेसेज तरी? लग्न ठरल्यावरही अशी ओढ वाटू नये? तिने विचार केला आपण ह्याच्या जागी असतो आणि असेच प्रचंड कामात असतो, तरी आपण काही ना काही करून, कसाही वेळ काढून दिवसातून १ तरी फोन केलाच असता ह्याला. तिला त्याचं म्हणणं पटत नव्हतं. पण आत्ताच लग्न ठरलंय. आपण खूप ताणून धरलं तर ही आत्तापासूनच हक्क सांगतेय आपल्यावर असं वाटेल त्याला. आणि आपल्याला तरी कुठे माहीत आहे अजून तो नक्की कसा आहे ते ? आता तो मुंबईत आलाय ना, आता भेटणं होईल बरेचदा….

“चिडत नाहीये मी. पण हे बघ, आपण एकदाच भेटलो आणि आपलं लग्न ठरलं. नेक्स्ट विकेंड ला एंगेजमेंट आहे. आपण भेटायला हवं ना, बोलायला हवं, तेव्हाच एकमेकांबरोबर कम्फरटेबल होऊ शकू ना…मला वाटलं होतं, लग्न ठरलं त्याच दिवशी रात्री मला फोन करशील, मग आपण खूप गप्पा मारू. वेळ मिळेल तेव्हा बोलत जाऊ. पण असं काहीच झालं नाही अरे. म्हणून थोडी डिस्टर्ब झाले होते. बट नाऊ आय एम ओके.”

“अगं तेच सांगायला फोन केलाय तुला. उद्या शनिवार आहे. आई म्हणत होती की उद्या तुम्ही सगळे आमच्याकडे या. आपण शॉपिंग करून टाकू. म्हणजे तुझी साडी, आपल्या अंगठ्या वगैरे. मग ते झाल्यावर आपण फिरायला जाऊ कुठेतरी आणि मग डिनर ला, व्हॉट से? आई तुझ्या आईला फोन करेल उद्या सकाळी…”

थोड्या वेळाने फोन ठेवताना सायलीचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. उद्या एकदाचे आपण भेटणार तर…उद्या कोणता ड्रेस घालायचा, कुठे फिरायला जायचं आणि त्याच्याशी काय काय बोलायचं ह्याचा विचार करता करताच तिला झोप लागली.

——————-

ठरल्याप्रमाणे शनिवारी संध्याकाळी सायलीचे आई-बाबा आणि सायली सान्यांकडे पोहोचले. पण बराच वेळ बेल वाजवूनही कुणी दार उघडेनात. सायलीचे बाबा मिस्टर सान्यांना फोन लावणार तेवढ्यात बाजूच्या फ्लॅट मधून एक बाई बाहेर पडली. तिच्या कपड्यांवरून ती तिथली मोलकरीण असावी हे कळतच होतं.

“सान्यांकडे आला होतं व्हय? पर या टायमाला सुजय दादा तर घरात नसतात ना….थोडं थांबावं लागनार तुम्हास्नी.”

बोलत बोलतच ती लिफ्ट मध्ये शिरली.

“अहो नाही, बाकीचे सगळे असतीलच ना घरात. ” सायलीची आई म्हणाली.

“बाकी कुनी नसतं तिथे…..” लिफ्ट चा दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट खालच्या मजल्यावर गेली.

“काय म्हणाली ही बाई ? बाकी कोणी नसतं ….म्हणजे ? “सायली.

तेवढ्यात दुसऱ्या बाजूच्या लिफ्ट चा आवाज झाला. लिफ्ट चं दार उघडलं आणि श्री आणि सौ साने बाहेर आले. बाहेर सायली आणि तिच्या आई-बाबांना पाहून जरा दचकलेच. श्री साने त्यांच्या सौं ना हसत हसत म्हणाले,

“बघ मी म्हटलं होतं ना तुला, आपल्याला उशीर होतोय. अहो, थोडी नेहेमीची खरेदी करायला गेलो होतो, पण थोडं थोडं म्हणता म्हणता हीने जवळपास सगळं मार्केटच खरेदी केलंय. सॉरी हा, त्या गडबडीत उशीरच झाला जरासा..”

“अहो, काय तुम्ही पण. त्यांना अजून बाहेर उभं ठेवायचंय का? दार उघडा ना…” सौं साने .

“पण तुमची खरेदी कुठेय? आय मीन, सामान खाली आहे का? मी मदत करू का आणायला? ” सायली.

“अगं नको गं, सामान सगळं गाडीत ठेवलंय. नंतर शांताबाई किंवा तो वॉचमन कोणालातरी सांगेन. तू आत ये ना.” सौं साने.

“अहो, आत्ता एक कामवाली बाई दिसली. बाजूच्या घरातली असेल. ती म्हणत होती की इथे सुजय सोडून बाकी कोणी नसतं. आम्ही जरा बुचकळ्यात पडलो. पण तेवढ्यात ती निघून गेली काही विचारायच्या आत..” सायलीचे बाबा.

शेवटचे वाक्य ऐकताच एक हलकीशी समाधानाची छटा सुजय च्या बाबांच्या चेहऱ्यावर उमटली. बाकी कुणाच्या ते लक्षातही नाही आलं. पण सायली त्यांच्याकडेच पहात होती. तिला मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचे ते बदललेले भाव जरा विचित्र वाटले.

सान्यांकडे चहापाणी झाल्यावर सगळे खरेदी करायला बाहेर पडले. सुजय बाहेरच भेटणार होता. साडी खरेदी करायला ते दुकानात शिरले तेव्हाच त्याच्या आईचा फोन वाजला. थोडा वेळ फोन वर बोलून त्या सायलीकडे वळून म्हणाल्या,

“आता मात्र धन्य आहे हो या मुलाची. अगं थोडा उशीर होतोय त्याला. तो म्हणाला तुम्ही खरेदी प्रकार आटपून घ्या. तो थोड्या वेळात निघतोच आहे. तो आला की जा तुम्ही फिरायला आणि आम्ही चौघं आमचे-आमचे जाऊ डिनर ला, काय ? आम्ही नाही येणार हो तुमच्यामध्ये…”

खरेदी करून झाली तरी सुजय आलाच नव्हता. आता तर त्याचा फोनही लागत नव्हता. सायली अस्वस्थ होत होती. आजही तो आधीसारखाच वागत होता.

“सायली, आय नो तुझा मूड ऑफ झाला असेल. साहजिक आहे ते. पण मी तुला त्या दिवशी म्हटलं होतं ना, तो असाच आहे अगं, तू सुधार त्याला नंतर. आत्ता मूड घालवू नकोस. आपण सगळे मस्त डिनर ला जाऊया , काय ?” सुजयची आई.

डिनर झाल्यावर सगळे रेस्टॉरन्ट मधून बाहेर पडत होते तेवढ्यात रेस्टॉरन्टच्या बाहेरच सुजय भेटला.

“सॉरी,सॉरी , खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. सोमवारी आमचा जर्मनीतला एक महत्वाचा क्लायंट येणार आहे. आज दुपारीच कन्फर्म झालं. सो बरीच तयारी करायची होती मिटींग्स ची. त्यामुळे नाही येऊ शकलो. ”

“तू सायलीला सांग काय ते. “- सुजयची आई

“नाही अहो ठीक आहे, आय नो, कामाचं प्रेशर असलं की असं होतं.” सायली.

सायलीला सगळ्यांसमोर असं त्याच्यावर रागावणं ठीक वाटत नव्हतं. त्याच्या आईला एकदम “अहो आई ” अशी हाक मारायलाही तिला कससंच होत होतं.

“तुम्ही असं करा दोघे, तिकडे पुढच्या इंटरसेक्शन ला एक मोठं आईस-क्रीम शॉप आहे. मगाशीच बघितलं मी. तिकडे जाऊन आपल्या सगळ्यांसाठी आईस-क्रीम घेऊन या. आम्ही इकडेच बसतो बाहेर. रेस्टॉरन्ट ला हे लॉन छान आहे. बसायला पण आहे. जाऊन या तुम्ही दोघे. पण लवकर या हां….” – सायलीचे बाबा.

दोघे तिथून बाहेर पडले. काय बोलावं हे दोघांनाही सुचत नव्हतं. सुजयनेच सुरुवात केली.

“मी खरंच माती खाल्लीये, मला माहित आहे. खरंच सॉरी अगं. तुला वाटत असेल हा कसला बोरिंग माणूस आहे. पण खरंच तसं नाहीये. मला मनापासून यायचं होतं, एकत्र शॉपिंग करायचं होतं, पण ऑफीस मधून निघायच्या फक्त १ तास आधी ते सगळं कन्फर्म झालं आणि मला हलताच नाही आलं.”

तो खरंच खूप बडबडा होता. त्या २०-२५ मिनिटात तोच खूप बडबड करत होता. ऑफीस बद्दल सांगत होता, तिच्या कामाबद्दल विचारत होता, बरंच काही बोलत होता. सायली त्याची कंपनी मनापासून एन्जॉय करत होती. तिला वाटलं “आपण उगीच चिडलो ह्याच्यावर. ह्याच्या डोक्यात फक्त काम असतं म्हणून तो तसं वागतो . पण आता भेटल्यावर किती छान बोलतोय , खूप जुन्या मित्राला भेटावं तसं वाटतंय.”

सायली घरी जाताना अगदी खुश होती. सुजय खरेदीला आला नाही, ठरल्याप्रमाणे आपण फिरायला पण गेलो नाही ह्याबद्दल वाटणारी खंत बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. निघताना तिला त्याने उद्या रविवार असूनही घरी बसून काम करावं लागेल आणि त्यामुळे उद्याही कसं भेटता येणार नाही वगैरे सांगितलं होतं, त्यामुळे थोडा मूड ऑफ झाला होता खरं तर, पण तिला तरी कुठे वेळ होता? साखरपुड्याची तयारी होतीच, घरातल्यांची खरेदी करायची होती…शिवाय लग्न ठरल्याचं कळल्यावर सगळ्या मैत्रिणी भेटायला येतील नक्कीच….उद्याचा दिवस तर खरंच बिझी होता…सायलीला एक प्रकारचा उत्साह आल्यासारखं वाटत होतं. रात्री झोपायला गेल्यावरही आजची संध्याकाळ सारखी सारखी आठवत होती तिला. आपल्या साखरपुड्याची खरेदी…किती वेगळं वाटतंय ऐकताना…सुजयच्या घरी गेल्यापासून पुढचं सगळं आठवून त्यातच पुन्हा पुन्हा रमून जावसं वाटत होतं. पण मग सुजयच्या घराच्या बाहेरचा तो प्रसंग डोळ्यांसमोर आला…

“असं काय म्हणाली ती बाई…इथे बाकी कोणी नसतं? म्हणजे ? कधीतरी सुजयला विचारायला हवं…आणि बाबांनी विषय काढल्यावर त्याच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव किती बदलले होते…का बरं? जाऊदेत बाकी तर सगळं नीट वाटलं त्यांच्याकडे…त्याचे आई-बाबा पण किती मोकळेपणाने वागतात…उगीच नको त्या गोष्टीचा विचार करत बसायला नको…”

विचार करता करताच तिला झोप लागली.

——————-

“स्स…………स्स……………खस…………”

कसलातरी वेगळाच आवाज होता तो ….झोपेत ऐकू आल्यावर सायलीला अर्धवट जाग आली. पण आजूबाजूला तर पूर्ण शांतता होती….ती दुसऱ्या कुशीवर वळली.

“स्स……स्स………खस ………….स्स……….”

आत्ता आलेला आवाज जरा मोठा होता. सायली दचकून बेडवर उठून बसली. खोलीत पूर्ण अंधार होता. ती नाईट-लॅंप लावायचीच नाही मुळी. थोड्याशा उजेडानेही तिची झोपमोड होत असे. आणि तसंही एक आठवड्यापासून तिच्या बेडजवळचा नाईट-लॅंप बंदच पडला होता. सायलीने जवळच पडलेला तिचा मोबाईल उचलला. रात्रीचे २.४० वाजले होते.

“कसला आवाज होता तो? की भास झाला मला? नाही, आवाज नक्की आलाच होता. दोन वेळा ऐकला आपण ….”

“स्स…..खस…..स्स………..” यावेळी आवाज तिच्या मागच्या बाजूने आला होता, तिच्या अगदी जवळून..

सायलीने झटकन मान वळवून मागे पहिले. अंधार होता पण मोबाईल मुळे अगदी थोडासा उजेड होता.

मागे बघितल्यावर तो आवाज बंद झाला आणि त्याचक्षणी तिला जाणवलं की आपल्या आजूबाजूची हवा एकदम गार पडली आहे , बर्फासारखी गार , गोठवून टाकणारी….सायलीला भीतीने काही सुचेनासं झालं होतं…इथे आजूबाजूला नक्की काहीतरी आहे, कुणीतरी आहे, मी एकटी नाहीये खोलीत , नक्कीच…. .अंधाराच्या भीतीने ती मोबाईल चं बटन सारखं दाबून ठेवत होती जेणेकरून त्याचा तरी लाईट ऑन रहावा. मागे काहीच नसल्यामुळे हळूहळू तिने मान समोर वळवली. अंधारात काही दिसतंय का ह्याचा अंदाज घेऊ लागली…आणि तोच…अंधारातून खाडकन एक चेहरा तिच्यासमोर आला…पांढराफटक, खोल गेलेले, रोखलेले डोळे , डोळे रोखलेले असले तरीही त्या नजरेत कसलेच भाव नव्हते, तो चेहरा पुरुषाचा होता की बाईचा हेही कळत नव्हतं… ..फक्त क्षणभरच…    katha-part2

तेवढ्यात तिचा मोबाईल तिच्या हातातून गळून पडला आणि २ सेकंदांनी त्याचा लाईट बंद झाला. खोलीत पूर्ण अंधार पसरला. लाईट बंद झाल्यावर सायली भानावर आली, जोरात किंचाळली आणि पांघरूण डोक्यावर घेऊन जोरजोरात ओरडत राहिली. खोलीचं दार समोरच होतं आणि लाईट्स चे स्विचही दाराजवळच होते, पण तिला आता अंधार सहनच होत नव्हता. अंधारात चालत जावून खोलीचं दार उघडण्याची तिच्यात हिम्मतच नव्हती. तिने जे काही बघितलं होतं, जे अनुभवलं होतं ते तिच्या आकलनाच्या बाहेरचं होतं. पांघरूणाच्या आत जाऊन ती हंबरडा फोड्ल्यासारखी जोरजोरात रडत होती. “आई , ये ना गं लवकर, मला भीती वाटतेय…बाबा तुम्ही तरी या ”

(क्रमशः….)

(भाग ३ येथे वाचा — http://wp.me/p6JiYc-2w )

————————————————————————————————————————

Leave a comment