अज्ञाताची चाहूल : (भाग : 36)

आता ह्या सुजयची मदत घायची. कशी, ते माहित नाही. पण बघू, विचार करूच. काय योगायोग होता, मागच्याच आठवड्यात त्या विवाह मंडळाच्या बाहेर त्या म्हाताऱ्या माणसाची टक्कर झाली. त्याच्याकडून ते विवाह मंडळाचं कार्ड मिळालं. आणि मग विवाह मंडळात त्या सायली देशपांडेंचा फोटो. हे सगळं कसं पुढे न्यावं ह्याचा विचार करतच होतो तेवढ्यात हा सुजय साने भेटला. मी आणि हा सुजय साने, धिस कॉम्बिनेशन इज गोइंग टू वर्कयेसआय विल मेक इट वर्क…..”

ड्रायव्हरची हाक आली तसा तो लगबगीने टॅक्सीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसला आणि टॅक्सी निघाली.

——————————————-

काय ? म्हणजे सुजयचं लग्न झालेलं आहे ?”

सायलीचं वाक्य पूर्ण होतंय, न होतंय तेवढ्यात ईशा किंचाळलीच.

 

*************************भाग ३५ पासून पुढे **************************
भाग ३५ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-T0

 

अगं किती जोरात ओरडतेयस? बाहेर ऐकू गेला असेल तुझा आवाज ईशा…” सायली वैतागलीच.

 

हो, सॉरीपण सांग ना सायले, म्हणजे सुजयचं लग्न झालेलं आहे?” ईशाने आवाज खाली आणत पुन्हा तोच प्रश्न विचारला.

 

अगो मुली, आता ती कशी सांगेल हे, सांग बरं मला….तिला जेवढं माहित आहे ते तिने सांगितलं ना..त्या सिद्धार्थला तिथे भिंतीवर काही लिहिलेलं दिसलंआता त्याचं पुढे काय झालं हे आपल्याला शोधायला हवं ना…” माई आजी

 

हो गं, म्हणजे मी तिचं मत विचारतेयतिला काय वाटतं, त्याचं लग्न झालेलं आहे का, असं.” ईशा

 

काही कळत नाही गं ईशा….सिद्धार्थ म्हणाला त्याप्रमाणे तिथे भिंतीवर सुजय वेड्सअसं लिहिलं होतं आणि त्याच्यापुढे एक चेहरा काढलेला होता, एका मुलीचा. कुठल्यातरी रंगीत खडूने लिहिलेलं असावं असं म्हणाला. पण मला एक कळत नाही ईशा, म्हणजे बघ हा, त्याची आई म्हणाली त्यावरून तो फक्त पंधरा दिवसांच्या ट्रीपवर गेला होता. ह्या पंधरा दिवसात त्याला एखादी मुलगी तिथे भेटली, ते प्रेमात पडले आणि मग त्याने लग्नपण केलं? तुला शक्य वाटतंय हे असं तो करेल असं? ते पण एवढ्या कमी दिवसात, बाकीच्या कोणत्याही मित्रांना ह्याबद्दल कळू न देता? छे, मला वाटत नाही असं काही झालं असेल असं….”

 

हो हे बरोबर आहे तुझं. पण मग असं का लिहिलेलं असेल तिथे?”

 

कदाचित, त्याने नुसतं प्रॉमिस केलं असेल लग्नाचं किंवा कदाचित त्याने काहीच केलं नसेल, दुसऱ्याच कोणीतरी ते लिहून ठेवलेलं असेल.” सायली विचार करत म्हणाली.

 

माई आजी, तुला काय वाटतं?” ईशा माई आजीच्या बाजूला पलंगावर बसत म्हणाली.

 

माझा सुद्धा गोंधळच उडालाय गो पोरींनो, पण एक गोष्ट मात्र आहे. कुठेतरी ठिणगी पेटलेली असल्याशिवाय धूर निघत नाही. आता त्याचं लग्न झालंय, की ठरलंय की तिसऱ्याच कोणीतरी ते लिहिलंय हे माहित नाही, पण कुठेतरी काही अंशी त्याचा संबंध असणार, नाहीतरी जगातली एवढी मुलं सोडून त्याचंच नाव कोणी का लिहिलं भिंतीवर?”

 

येस, येस ….माई आजी….तू किती टू द पॉईंट बोलतेस गंआय लव्ह यु फॉर दॅट..” सायली माई आजीच्या गळ्यात पडत म्हणाली.

 

मी पण….” मागोमाग ईशापण आली.

 

अगो काय तुम्ही पोरी, पाडाल ना मला….आणि काय गो, एवढं लव्ह आहे तरी मग पुण्याला गेल्यावर मला विसरलात ना…”

 

आम्ही विसरलो नाही हा माई आजी, तरी मी रोज सकाळ संध्याकाळ तुला फोन लावायला घ्यायचे, पण सायली माझ्या हातातून फोन काढून घ्यायची आणि म्हणायची माई आजीशिवाय आणखी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत…”

 

हो का? थांब दाखवते आता तुला, खूप महत्वाच्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत, त्या आत्ता लगेच करून टाकते….”

 

अगो लहान आहेत का काय आता…” खोलीभर धावणाऱ्या त्या दोघींकडे बघत हसत हसत माई आजी म्हणाली.

 

सायली, आहेस का ?”

खोलीच्या बाहेरून बाबांचा आवाज आला तसं सायली आणि ईशा धावायच्या थांबल्या.

हो आत या ना बाबा….दार नुसतं लोटलेलं आहे..”

 

नाही दाराला कडी नाही ते माहित होतं मला, ” आत येता येताच बाबा म्हणाले, ” पण तुमच्या आरडाओरडीचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. म्हटलं एकदम अचानक जाऊन डिस्टर्ब नको करायला. काय चाललंय काय एवढं?”

 

काही खास नाही हो बाबा. पण बरं झालं, मी तुम्हाला सांगायला येणारच होते. सिद्धार्थशी बोलणं झालं आत्ता थोड्या वेळापूर्वी..”

त्याच्याशी झालेलं बोलणं आणि आत्ता माई आजी आणि ईशाला सांगितलेलं सगळं तिने बाबांना सुद्धा थोडक्यात सांगितलं.

हम्म….म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहेच…..”

बाबा विचार करत म्हणाले. मग एकदम त्यांना काहीतरी आठवलं.

अरे हो, मी पण एक गोष्ट सांगायलाच आलो होतो तुम्हाला. माईंना माहीत आहे. पण तुम्ही पुण्याला होतात तेव्हा मुद्दाम फोनवर हा विषय काढून बोलायला नको म्हणून बोललो नव्हतो. तू त्या योगिताचा शोध घ्यायला लोणावळ्याला गेलीस आणि तिथून ईशाबरोबर पुण्याला. तेव्हापासूनच माझ्या डोक्यात एक विचार येत होता सारखा. मग मी माईंशी बोललो. आणि आम्ही दोघांनी मिळून एक पाऊल उचललंय. आणि माझा अंदाज बरोबर असेल तर आपल्या शोधाला एक दिशा मिळाल्यासारखी होईल…”

 

काय पाऊल उचललंय तुम्ही? म्हणजे काय ठरवलंय?” सायली

 

आम्ही नुसतंच ठरवलं नाहीये, तर जे ठरवलं होतं ते केलं सुद्धा. हे बघ सायली, तू लोणावळ्याला गेलीस त्याच्या आधी आपल्याला हे कळलं होतं की तुझ्याशी लग्न ठरलेला सुजय आपल्याला जो असल्याचं दाखवतोय, ते तो नाहीये. म्हणजे सिद्धार्थने कौस्तुभच्या घरी जाऊन ह्या सगळ्याची खात्री करून घेतली आणि आपल्याला कळवलं, बरोबर? की एकाच नावाचे दोन सुजय साने आहेत. आणि मग तू योगिताचा शोध घ्यायला लोणावळ्याला गेलीस तिथून या सुजयबद्दलचा खरा शोध सुरु झाला, कारण ह्या आधीचं सगळं त्या खऱ्या सुजयबद्दलचं होतं. योगिताला भेटायला गेलीस आणि तेव्हाच माझ्या डोक्यात विचार चमकून गेला. की आता खोट्या सुजयबद्दलचा शोध सुरु होईल, आपण आपल्या परीने शोध घेऊसुद्धा. पण मग त्या खऱ्या सुजयचं काय? ह्या सगळ्यात आपण हा विचार केलाच नाहीये, कळतंय का? “

 

हो म्हणजे बरोबर आहे काका तुमचं. म्हणजे आम्ही एकदोन वेळा बोललो सुद्धा की तो खरा सुजय ह्याला मदत का करत असावा असं. पण त्याच्या मागे लागून त्याबद्दल शोध घ्यावा असं डोक्यात नाही आलं…….पण मग म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला ?”

 

आपल्यापुढे जे पर्याय ओपन आहेत ते सगळेच ट्राय करायला नकोत का? हे लग्न ठरवताना त्या सुजयची आणि त्याच्या घराची आपण माहिती काढली होती, ती आता खरी आपल्या उपयोगी येणार आहे. आता या माहितीवरून आपण इतकं तर नक्कीच सांगू शकतो की साने फॅमिली अतिशय साधे, सरळ लोक आहेत. सगळे लोक त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतात. तसं तर सुजयच्या ऑफिसमधून त्याची माहिती काढली तिथून जे कळलं त्याच्यावरून तोसुद्धा चांगलाच मुलगा असावा. नाहीतर कुठूनतरी काहीतरी निगेटिव्ह कळलं असतं ना, पण तसं नाही झालं. म्हणजे त्याच्या आईबाबांना हे सगळं नक्कीच माहित नसणार. कारण ते ह्या सगळ्याला पाठिंबा देतील असं तर अजिबात नसावं. आणि त्यांच्याशी बोलल्यावर हे कन्फर्म झालं. त्यांना ह्याची काहीच कल्पना नव्हती. ”

 

म्हणजे “? सायली आणि ईशा जोरातच ओरडल्या.

 

अगो, तुझे बाबा बोलले ना तिकडे फोन करून अमेरिकेला.”

 

म्हणजे तुम्ही त्या खऱ्या सान्यांशी, जे यु.एसला गेले आहेत त्यांच्याशी बोललात?” सायलीचा अजूनही विश्वास बसत नव्हता.

 

हो. आणि तुम्ही तिथे पुण्याला वेगळ्या कामाच्या मागे होतात, त्यात आई आणि मावशीला तुमच्यावर संशय आला होता, म्हणून मी तुला सांगायचं टाळलं तेव्हा…” बाबा

 

ते जाऊदेत हो बाबा, पण मग…..काय म्हणाले ते….तुमच्यात काय बोलणं झालं? ” सायली आता सगळं ऐकायला अधीर झाली होती.

 

आणि त्यांचा विश्वास बसला तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर? आणि तुम्हाला त्यांचा नंबर कसा मिळाला?” ईशा

 

सगळं सांगतो. तुम्ही मुलं दिवसभर फेसबुक वापरता, तसं काही आमचं नसतं, पण तरी अनिने मागे लागून लागून माझं फेसबुक प्रोफाईल तयार केलं होतं, त्याचा उपयोग झाला मला. सायली लोणावळ्याला गेली आणि तिची आई मैत्रिणींबरोबर गेली होती. दिवसभर येणार नव्हती. मग घरात मी आणि माईचअनि घरात असतो कुठे? मग माईंशी बोललो हे. म्हटलं, आपण खोट्या सुजयच्या मागे जातोय हे बरोबरच आहे. पण मग खऱ्या सुजयचा ह्यात किती आणि कसा सहभाग आहे हे पण नको का बघायला? त्याची घरची, आईवडिलांची माहिती, त्याची स्वतःची माहिती आणि तो करत असलेलं हे काम, ह्या दोन्ही गोष्टी इतक्या परस्पर विरोधी आहेत. त्याचे आईबाबा एक सव्वा महिन्यापूर्वी यु.एसला गेले, म्हणजे शक्यता अशी आहे की त्यांना हे माहित नसणार. कारण हे असं माहित असताना कोणते चांगल्या घरातले आईवडील मुलाला हे करायला परवानगी देतील? त्याने स्वतःहून पुढे येऊन काही केलेलं नसेल. पण त्याने त्या सुजयला स्वतःची ओळख वापरू दिली हे खरं आहे. आणि सिद्धार्थने कौस्तुभच्या घराबाहेर त्याला खोट्या सुजयशी बोलताना ऐकलंय त्यावरून त्याला आपलं नाव आणि ओळख कशासाठी वापरलं जातंय ह्याची पूर्ण कल्पना आहे. पण त्याच्या आईवडिलांना ह्याबद्दल माहित नसावं. हा सगळा विचार करून आम्ही ठरवलं की आता सरळ त्यांनाच कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना ह्याबद्दल कल्पना द्यायची.

पण प्रश्न होता, त्यांना संपर्क करणार कसा? मग म्हटलं मागे त्या सुजयची माहिती काढण्यासाठी तुम्ही फेसबुक वापरलं होतं, तसं करून बघूया. वेळ खूप गेला मात्र. एका नावाचे किती लोक असतात त्याच्यावर. पण शेवटी त्यांचं प्रोफाईल मिळालं. बाकी माहितीवरून ते तेच आहेत हे कळलं. त्याच्यावर त्यांच्या मित्रांचे मेसेजेस वगैरे होते, तिथले यु.एस.मधले फोटोज होते, त्याच्यावरून एवढं स्पष्ट झालं की ते माझ्यासारखे कधीतरी सहा महिन्यातून एकदा फेसबुकला भेट देणारे नसावेत, रोज एकदातरी फेसबुकवर चक्कर असणार त्यांची…..”

 

फेसबुकवर चक्कर?” ईशा हे ऐकून खोखो हसत सुटली…” हा..हा ….हे चांगलं वाटतंय ऐकायला….फेसबुकवर लॉग इन करण्यापेक्षा फेसबुकवर चक्कर मारायला जायचं….पण काकांकडे स्मार्ट फोन आहे ना, मग तुम्हाला फेसबुकवर दरवेळी लॉग इन करायची काहीच गरज नाही काका….”

 

ईशी, झालं का तुझं? विषय काय चाललाय आपला? ”

 

असुदे गं सायली. माझे शब्द ऐकून तिला मजा वाटली एवढंच. आता आणखी काय म्हणणार? ‘जरा एक चक्कर मारून येतो बाहेरअसं म्हणावं तसं लोक फेसबुक चेक करत असतात, म्हणून तसं म्हटलं. हा, तर मुद्दा हा, की ते रोज फेसबुक चेक करत असावेत. कारण मी त्यांना प्रायव्हेट मेसेज टाकला त्यावर त्यांचा पुढच्या चारपाच तासात रिप्लाय सुद्धा आला. ”

 

तुम्ही काय लिहिलं होतं त्यांना?” सायली

 

मी एवढंच लिहिलं होतं की स्थळासंदर्भात बोलायचं आहे. पण जरा अर्जंट आहे. आणि खरं तर तुमच्या मुलाबद्दल काही गोष्टी सांगायच्या आहेत, विचारायच्या सुद्धा आहेत. त्याला ह्याबद्दल काहीही न सांगता आपण आधी माझ्याशी बोलू शकलात तर फार बरं होईल वगैरे. असं लिहिलं होतं. माझा नंबर सुद्धा दिला होता. त्यांचा रिप्लाय आला आणि त्यांनी तुम्हाला कधी फोन करू शकतो असं विचारलं होतं. शेवटी काल आमचं बोलणं झालं एकदाचं.”

 

काय बोलणं झालं?” ईशा

 

त्यांना सरळ विचारलं, हे असं सगळं आहे, तुम्हाला त्याची कल्पना आहे का? त्यांना धक्काच बसला ऐकून. त्यांचं घर, त्यांचं मुलगामुलगी, त्यांचे नातेवाईक वगैरे सगळं सगळंच मला माहित होतं. एक दुसराच मुलगा त्यांच्या घरात राहून हे स्वतःचं घर असल्याचं दाखवतोय आणि त्यांच्या मुलाची ओळख वापरतोय हे शॉकिंग होतं त्यांच्यासाठी. अर्थात, त्यांच्या मुलाचा ह्यात सहभाग आहे हे त्यांना पटत नव्हतं. ते म्हणाले, डोळे झाकून विश्वास ठेवावा इतका जेन्युईन माणूस आहे तो. आणि हे मी त्याचे वडील म्हणून नाही सांगत आहे, त्याचे मित्र, कलिग्ज, शेजारी, नातेवाईक सगळेच म्हणतात. पण मग त्यांना हेसुद्धा नंतर पटलं की त्याच्या मदतीशिवाय एखादा तिसरा मुलगा घरातही येऊ शकणार नाही, त्याची ओळख वापरू देणं तर फार लांबची गोष्ट आहे. शिवाय मी हेसुद्धा सांगितलं की सायलीने त्या दुसऱ्या सुजयला भेटायला गेली होती तेव्हा तुमच्या मुलालासुद्धा त्या घरात बघितलं होतं, सिद्धार्थने फोनवर त्या दुसऱ्या सुजयशी बोलताना बघितलं होतं. …”

 

पण बाबा……ते तुमच्यावर विश्वास का ठेवतील? आय मिन, शेवटी तुम्ही अनोळखीच ना त्यांच्यासाठी. असं कोणीही अनोळखी माणूस तुमच्या समोर येऊन काहीही बोलायला लागलं तर कोण का विश्वास ठेवेल? उलट त्यांनी हे सगळं त्यांच्या मुलाला सांगितलं तर ? ” सायली

 

अगो बायो, असं नसतं गं. तुझ्या बाबांनी पण त्यांची स्वतःची ओळख दिली ना. कुठे राहतात, कुठे कामाला होते सगळं सांगितलं. ही तिसऱ्या माणसावर विश्वास न ठेवण्याची गोष्ट तू करतेयस ना, ते खरं तर तुमच्या पिढीच्या विचारांशी जुळतंच. त्यात काहीच गैर नाही. पण आधीची पिढी अशी नाही हो. आपल्यासारखी साधी सरळ माणसं जगात आहेत असं मानून तिसऱ्या माणसावर विश्वास टाकणारी लोकं ती. आंधळा विश्वास नाही हो, पण म्हणून उगीच समोरच्याला झिडकारणारही नाहीत. कळलं? अगो, त्याच विश्वासाच्या जोरावर बाबांनी त्यांना फोन केला आणि त्याच विश्वासाने त्यांनी बाबांचं म्हणणं ऐकून घेतलं. बाबांच्या बोलण्यातून, त्यांनी स्वतःची जी काही ओळख सांगितली त्यावरून हा माणूस साधा सरळ आपल्यासारखं सरळमार्गी आयुष्य जगणारा आहे, हा अंदाज त्यांना आला नसेल काय? आता आपल्या मुलाबद्दल काहीतरी सांगतायत म्हणून चिडून त्यांना उलटसुलट बोलून फोन आदळण्याचा विचार आपल्यासारखी चांगला विचार करणारी माणसं करतील का? ”

 

फार चांगलं सांगितलंत माई तुम्ही. खरं आहे एकशेएक टक्के. हा पिढीतल्या विचारांचा फरक समज सायली. तुला तो विचारही करणं धोक्याचं वाटलं पण मला त्यात एक आशा दिसली. मी त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघितलं. उद्या मला कोणाचा फोन आला असा, आपल्या आनिबद्दल काहीतरी सांगितलं, तर मला सुरुवातीला कितीही पटलं नाही, तरीही एक चांगला, आपल्यासारख्याच साध्यासरळ घरातला माणूस मला पोटतिडकीने काहीतरी सांगतोय म्हटल्यावर मी त्यांचं म्हणणंही ऐकून घेणार नाही का? मी ऐकून घेईन कारण एखाद्याचं काहीही न ऐकता त्याचा अपमान करण्याची मला सवय नाही आणि ह्या सगळ्यापेक्षाही मी ऐकून घेईन कारण मला अनिकेतची काळजी आहे. तो चांगल्या मार्गावरून ढळू नये ह्याची काळजी आहे तशीच त्याची चूक नसताना तो एखाद्या गोष्टीत अडकला असेल तर त्याला बाहेर काढणं हे माझं काम आहे म्हणून मी ऐकून घेईन. आणि हा असाच विचार ते सानेसुद्धा करणार नाहीत का? ” बाबा

 

ओकेमला कळलंय आता….पण जरा हेवी होतंय हे. काका तुम्ही पुढे काय झालं ते सांगा ना….” ईशा

 

पुढे काय? त्यांना मी म्हटलं तुमचा माझ्यावर विश्वास बसणं कठीण आहे. पण जमत असेल तर लवकरात लवकर परत या आणि तुमच्या मुलाशी बोला. उलगडा होईल मग. फक्त इथे येईपर्यंत त्याला सांगू नका म्हटलं. ते जरा विचारात पडले होते. मग थोड्या वेळाने त्यांचा पुन्हा फोन आला. त्याच्या आईला सांगितल्यावर तिला धक्काच बसला म्हणाले. आत्ताच्या आत्ता परत यायचं ठरवतोय असं म्हणाले. फोन ठेवताना मात्र म्हणाले, माझ्या मुलाचा मला अतिशय अभिमान आहे, त्याला असं खोटं सांगून परत जाताना फार गिल्टी वाटतंय. पण तुमच्या सांगण्याचासुद्धा मी आदर करतो. त्याने खरंच असं काही केलं असेल तर ते का केलंय, कुणाच्या दबावाखाली आहे का तो, हे सगळं शोधायला हवंय आणि आम्हाला काही माहित नाही असं त्याला वाटत असेल तर ते तसंच वाटलेलं बरं. पण हे असं काहीतरी कळल्यावर आता इथे आणखी राहणं अशक्य आहे आमच्यासाठी. ”

 

म्हणजे ते आता यायला निघालेत?” सायली

 

“होय हो, स्वतःच्या मुलाबद्दल असं काहीतरी कळल्यावर कोण सुखाने बसेल असं दुसरीकडे?” माई आजी

 

सायले एक लक्षात येतंय का तुझ्या? आईबाबा आलेत म्हटल्यावर तो आता ह्या सुजयला फार मदत नाही करू शकणार.”

 

आणि आणखी एक गोष्ट होऊ शकते. त्याच्या आईबाबांनी त्याला विचारल्यावर तो सगळंच सांगेल….कदाचित खोट्या सुजयचं सत्य त्याच्याकडून कळेल आपल्याला…” बाबा

 

वाहे बरं झालं….सॉरी हा बाबा, तुम्ही आधी बोललात तेव्हा मला खरं तर एवढं पटलं नव्हतं पण आता वाटतंय की हेच बरोबर आहे…”

 

हम्मआणि आता ह्या सगळ्याचा उलगडा व्हायला हवाय सायली, नाहीतर आईला तरी सगळं सांगितलं पाहिजे. ती कशी रीएक्ट होईल सगळं माहित आहे, पण मला मी तिला फसवतोय असं वाटतंय सारखं. इतक्या वर्षात एकही गोष्ट तिला न सांगता केली नाही कधी. आणि ती बिचारी तयारी करतेय तुझ्या लग्नाची. आत्ता काय किंवा नंतर काय, तिला धक्का बसणारच आहे ना?” बाबा

 

होय हो. मला पटतंय सायले बाबांचं. “माई आजी

 

ओके. ठीक आहे. आता फक्त त्या मुलीबद्दल सिद्धार्थला काही कळलं की मग लगेच सांगूया आईला..” सायली

 

मला असं वाटतंय की आणखी दोन दिवस फक्त थांबू. ते साने इथे येतील आणि मग सगळंच कळेल आपल्याला. मग लगेच सांगू आईला…” बाबा

 

बरं…”

 

चला मगमी निघतोतुमचा गोंधळ चालू देगुड नाईट…”

बाबा दार बंद करून निघून गेले तरी खोलीत काही पुन्हा गोंधळ सुरु झाला नाही.

सायले, एकाच दिवशी काय काय कळलंय आपल्याला….हे सगळं रिअल लाईफ मध्ये सुरु आहे आपल्या ….मला तर कधी कधी खरंच वाटत नाही…”

 

हो गंपण आपल्याकडून फारसं काहीच करता येत नाही आहे आपल्याला. बघ ना, तो सिद्धार्थ एकटाच तिथे बसून सगळी माहिती काढतोय…”

 

हो पण काय करणार आपण आणखी….त्याला काय मदत लागेल इथून ती करू ना आपण…”

 

मला आणखी एक भीती वाटतेय……”सायली

 

भीती? कोणती ?” ईशा

 

आज पुण्याहून येताना सुजय भेटला म्हणजे आज तीयेईल?” सायली

तो प्रश्न ऐकूनच ईशाच्या मनात धस्स झालं.

मी विसरूनच गेले होते. आता ?”

 

अगो पोरींनो, उगीच नको तो विचार करत नसू नका….झोपा आता…”

 

आता काय झोप लागते माई आजी …” ईशा

 

न लागायला काय झालं? मी झोपते इथे तुमच्या खोलीत….काही होत नाही…..झोपा तुम्ही…”

————————————————————

सिद्धार्थ पाय पसरून पलंगावर बसला होता. समोर लॅपटॉपवर टाईमपास साठी मुव्ही लावला होता पण त्याचं तिथे लक्षच नव्हतं खरं तर. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमाराला सायलीच्या फोनमुळे तो त्या घरात भानावर आला होता. तिथून सगळं सामान गोळा करून तो बाहेर पडला आणि मग त्याला जाणवलं, तो प्रचंड थकला होता आणि तेवढीच प्रचंड भूक लागलेली होती. समोर एक बरं दिसणारं रेस्टॉरंट दिसलं आणि तिथे आत जाऊन त्याने खाऊन घेतलं. मध्ये सायलीला फोन करत होता तो. तिथे दिसलेलं सगळं त्याला सांगायचं होतं सायलीला. मुंबईच्या बसमध्ये बसते आणि मग फोनवर बोलूया असं सायली म्हणाली होती पण आता ती फोनच उचलत नव्हती. दोनवेळा ईशालाही फोन केला पण तिने पण उचलला नाही. मग हॉटेलवर येऊन त्याने पलंगावर अंग टाकलं आणि फक्त पाच सेकंदात त्याला गाढ झोप लागली.

 

मधेच एकदा फोन वाजला. सायलीचा फोन होता. सुजय बरोबर आहे त्यामुळे घरी पोहोचल्यावरच बोलूया असं म्हणाली. खरं तर तो इतका गाढ झोपेत होता की त्याला आता ती नक्की काय म्हणाली ते आठवत सुद्धा नव्हतं. त्याला जाग आली तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. जाग आल्यावर त्याच्या लक्षात आलं, सायलीशी बोलणं झालंच नाही. धडपडत जाऊन तो फ्रेश होऊन आला आणि आधी सायलीला फोन करून तिला सगळं सांगितलं.

 

आता सकाळपासून जे, जे घडलं, त्यावर विचार करत तो शांतपणे बसून राहिला होता. खोलीतली शांतता काहीतरीच वाटत होती म्हणून लॅपटॉप काढून त्यावरचा मुव्ही लावून बसला तो. मग आईला फोन केला. रात्रीच्या जेवणाचीही वेळ टळून गेली होती. पण त्याने इतकं उशिरा खाल्लं होतं की आता भूकही नव्हती. जवळ थोडी फळं आणि बिस्किटं होती, ती लागली तर रात्री खाऊ असा त्याने विचार केला. तसंही तीनेक तास इतकी छान झोप काढली होती त्याने की आता रात्रीचे २३ पर्यंत काही आपला डोळ्याला डोळा लागणार नाही ह्याची खात्री होती.आता विचार करताना त्या घरात जे घडलं त्याचेच विचार डोक्यात येत होते. पण आता तो त्या सगळ्याकडे दुरून पाहिल्यासारखा बघत होता, तटस्थपणे. एकतर, आता त्याला खरंच वाटत नव्हतं हे असलं काहीतरी त्याने अनुभवलं होतं ते. एखादं विचित्र स्वप्न असावं असं वाटत होतं.

 

विचार करता करता त्याचं लक्ष समोरच्या पिशवीकडे गेलं. त्या खोलीत मिळालेलं सगळं सामान गोळा करून आणलेली पिशवी. झोपून उठल्यावर तो त्या पिशवीबद्दल पूर्णपणे विसरून गेला होता. ती पिशवी बघितल्यावर तो ताडकन उठला. त्याने बघितलेलं सगळं खरं होतं, स्वप्न नव्हतं, जणू काही असंच सांगत बोलवत होती ती पिशवी त्याला स्वतःकडे. त्याने ती पिशवी उचलली आणि पुन्हा पलंगावर येऊन बसला. पण पिशवी उघडायचा खरं तर त्याला धीर होत नव्हता. एक तर रात्र झालेली, आदल्याच रात्री जीवघेणा अनुभव आला होता ह्या हॉटेलच्या खोलीत. त्यात आज झालेला सगळा भासआभासांचा खेळ. ह्या पिशवीतलं सामान कोणाचं असेल? ती जी मुलगी आपल्याला दिसली तिचं? आपण असं त्या खोलीतून हे उचलून घेऊन आलो, तिला हे नाही आवडलं तर?

 

मनात असले निगेटिव्ह विचार यायला लागले आणि त्याचा धीरच खचला. नको जाऊदेत, उद्या सकाळी उघडून बघू पिशवी…..पाच मिनिटं तो समोरचा मुव्ही बघण्यात बिझी झालाखरं तर स्वतःचं लक्ष विचलित करण्यासाठी. पण तरी डोक्यात विचार चालूच होते. पण त्यात काहीतरी महत्वाचं असेल तर? आपल्याला असं वेळ घालवून चालणार नाही. आणि कोणत्या मुलीचा विचार करतोय आपण? जी तिकडे खरी नव्हतीच, तिचा? जाऊदे, आपला हेतू तर वाईट नाही, बॅग उघडून बघू. काही महत्वाचं असेल तर सायलीला लगेच कळवता येईल.

 

त्याने ती पिशवी उलटी करून त्यातल्या सगळ्याच वस्तू बाहेर काढल्या. एक लाल कलरची शाल, एक लालपिवळी बांधणीची ओढणी, एक डायरी आणि तो फोटो. तो फोटो बघून त्याला पुन्हा एकदा धस्स झालं. पण मग त्याने त्याचं लक्ष बाकीच्या वस्तूंकडे वळवलं. शाल आणि ओढणी दोन्ही फार वापरल्यासारखं दिसत नव्हतं. अगदी जुनं, विटकं असं नव्हतं पण बराच काळ बंद घरात धुळकटलेल्या अवस्थेत राहिल्यामुळे दोन्हीला धुळीचा चांगलाच वास येत होता.

 

आता त्याने डायरी उघडली. आधी पहिलं आणि शेवटचं पान बघितलं. पहिल्या पानावर एक नाव होतं. ‘कोमल व्यास‘. शेवटच्या पानावर नुसतंच फुलांचं काहीतरी डिझाईन होतं. लाल स्केचपेनने काढलं होतं. डायरीची सुरुवातीची काही पानं कोरी होती. पुढच्या काही पानांवर कसल्यातरी याद्या केल्या होत्या. हिंदीत होत्या. काही शब्द इंग्लिश मध्ये होते. फुल, माला, बुक्स, फल, जुते, असे काही शब्द एकाखाली एक लिहिले होते. हे नक्की काय असावं, ह्याचा तो विचार करायला लागला. कदाचित खरेदीची लिस्ट असेल.

 

पुढची काही पानं पुन्हा कोरीच होती. त्यानंतरच्या पानांवर मात्र काहीतरी लिहिलेलं होतं. त्यातल्या सगळ्यात पहिल्या पानावर लिहिलं होतं, ‘सुजयआणि त्याच्यापुढे एक हसरा चेहरा काढला होता. सुजयचं नाव बघून सिद्धार्थची उत्सुकता शंभर पटींनी वाढली. त्याने लगेच पुढच्या पानांकडे मोर्चा वळवला. दुसऱ्या पानावर लिहिलं होतं, ‘आज फिर वही हुआ…..पता नाही कल क्या होगा…’. पुढची सगळी पानं त्याने अधाशासारखी वाचून काढली. पाचसहा पानांवर तर असली एकएक वाक्यच लिहिली होती

अम्मा को बताना चाहिये …’

कहा हो तुम माय डिअर फ्रेंड, तुम नही तो डाईरी ही सही…..’

ऐसे मे क्या करे कुछ समझ नाही आ रहा…..’

क्या मैं सिर्फ अपने ही बारेमे सोच रही हू?’

क्या उसने ये सब सिर्फ मेरे केहेने पर किया ? ‘

कल से डाईरी बंद….अब तेरी कोई जरुरत ही नही है…’

हे काय आहे सगळं? त्या एकएक वाक्यांवरून सिद्धार्थला काहीच अर्थबोध होत नव्हता. त्या वाक्यांचा एकमेकांशी संबंधही नव्हता. त्या पानांवर तारीखसुद्धा टाकलेली नव्हती त्यामुळे हे सगळं कधी लिहिलं असावं हेच कळत नव्हतं. तशी डायरी तर जुनी होती. १९९७ ची वगैरे. आत्तापर्यंत वाचलेल्या त्या सगळ्या ओळींमध्ये सुजयहे एकच नाव ओळखीचं होतं.

 

पुढची काही पानं पुन्हा कोरीच होती. आणि त्यापुढच्या काही पानांवर मात्र खूप काही लिहिलेलं होतं. सिद्धार्थ अधीरपणे ते वाचायला लागला.

———————————————————————–

सु.सा. (खरा सुजय) आज झोप लागणं शक्यच नव्हतं. इतके दिवस आपण त्या सुजयला मदत करत असल्याची थोडी अपराधीपणाची भावना त्याच्या मनात होती, पण आपण हे आपल्यावर त्याने केलेल्या उपकारांची परतफेड करण्यासाठी करतो आहोत, ह्या विचार मनात आला की त्याचं अपराधीपण थोडं कमीसुद्धा होत होतं. पण आज काही केल्या तसं होत नव्हतं. आईबाबा परत येतायत हे ऐकून त्याला नक्की काय वाटत होतं? खरं तर त्याला स्वतःची लाज वाटत होती. आईबाबांना काही माहित नाहीये तरीही त्यांच्यासमोर जाताना आपण त्यांच्या नजरेला नजर नाही देऊ शकणार, हे त्याला माहित होतं.

 

बाकी कोणत्याही परिस्थितीत तो हे असलं काही करायला कधीच तयार झाला नसता. पण माथेरानला त्या दिवशी रात्री त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यानंतर जर सुजय तिथे आला नसता, रिक्षावाल्याशी भांडून आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेलं नसतं, तर हा विचार करायला आपण जिवंतसुद्धा राहिलो नसतो. (त्याला झोप लागलेली असताना त्याला भेटायला आलेल्या त्या रिक्षावाल्याला त्या गौरव दीक्षितने त्यांची भेट होऊ न देता काहीतरी सांगून तसंच परत पाठवलं होतं, हे त्याला माहीतच नव्हतं.) ह्या उपकारांची परतफेड तो कशी करणार होता. त्याने हॉस्पिटलमध्ये असतानाच हजार वेळा त्या गौरव दीक्षितला पैशांबद्दल विचारलं होतं, हॉस्पिटलचे चार्जेस नाही, तर कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत, एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी लागणारं पैशांचं पाठबळ मी तुझ्यासाठी उभं करेन असं म्हणाला तो त्याला. पण त्याच्यावर गौरव दीक्षित नुसतंच हसला होता. “आपण मित्र आहोत. तुला वाचवणं माझं कर्तव्यच होतं माणूस म्हणून. पण तुला इतकंच वाटत असेल तर ठीक आहे. मला कधीही कसलीही मदत लागली तर मी नक्की येईन तुझ्याकडे, प्रॉमिस करतो….”असं म्हणाला तो. आणि मग नंतर ……..

———————————————–

हॉस्पिटलमधला तिसरा दिवस. कालच आईबाबांना त्याने घडलेला प्रकार सांगितला होता. ते तातडीने परत यायला निघाले. पण आयत्या वेळी यायचं तर तसं लगेच कुठलंच बुकिंग करता येत नव्हतं. ट्रेनचा प्रवास खूप मोठा होता आणि फ्लाईटचं दुसऱ्या दिवशीचं तिकीट मिळत होतं. त्यांना नाईलाजाने एक दिवस थांबावं लागलं. त्याच्या बहिणीला, नेहाला सांगूया असं आईचं म्हणणं होतं, आम्ही नाही तर निदान ती तरी येईल तुझ्या इथे लगेच. पण त्याला मात्र त्याने ठाम नकार दिला आणि तिला कोणीही सांगायचं नाही असं बजावलं. पुढच्या आठवड्यात तिची परीक्षा सुरु होणार होती. आणखी एक दिवसाचा प्रश्न होता मग आईबाबा येणारच होते.

 

आज संध्याकाळी आईबाबा पोहोचतील मग गौरवची सुद्धा ओळख करून देऊ त्यांना, तो विचार करत होता. दोन दिवस त्यांनी अगदी मित्रासारख्या खूप गप्पा मारल्या होत्या. त्याने अगदी स्वतःच्या जवळच्या माणसाचं करावं इतक्या जबाबदारीने सगळं केलं होतं. अशी माणसं आपल्या आयुष्यात यायला भाग्य लागतं, असं सु.सा.चं मत झालं होतं. पण विचार करता करता त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं, दुपारचे बारा वाजत आले होते. काल रात्री तो म्हणाला होता, कुठल्यातरी हॉटेलमध्ये दोन दिवस राहण्याची सोय केली आहे आणि आज भेटायला येतो म्हणाला होता. मग तुझ्या घरच्यांनाही भेटेन असं म्हणाला. पण अजून कसा आला नाही ह्याचाच तो विचार करत होता. दिवसभर तो त्याची वाट बघत बसला. त्याला फोनही केले पण त्याचा फोनच बंद होता.

 

संध्याकाळी आईबाबा आले. त्यांनाही गौरव दीक्षितला भेटायचं होतं. त्याचे आभार मानायचे होते. पण त्यांची भेट काही झाली नाही. आणखी दोन दिवसांनी सु.सा. ला डिस्चार्ज मिळाला. पण तोपर्यंतही गौरव दोक्षित काही आलाच नाही. निघताना त्याची भेट झाली नाही, ह्याचं सु.सा. ला फार वाईट वाटलं. तो असा अचानक कुठे गायब झाला हा प्रश्न होताच पण त्याचे पैसेसुद्धा परत करायचे राहिले होते. त्याच्या कामाचं ठिकाण म्हटलं तर असं काहीच नव्हतं. तो फ्रीलान्सर म्हणूनच काम करायचा, वेगवेगळ्या क्लायंट्स बरोबर. टेक्निकल प्रोजेक्टस वर. पहिल्या दिवशी त्याचं कार्ड त्याच्या जवळ नव्हतं. काल निघताना त्याने त्याचं कार्ड दिलं. पण त्याच्यावर कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये फक्त त्याचा फोन नंबर आणि इमेल आयडी एवढंच होतं. घरी गेल्यावर शक्य तेवढे प्रयत्न करून त्याच्यापर्यंत पोहोचायचंच असं त्याने ठरवलं.

 

दोन महिन्यांनी आईबाबा यु.एसला जाणार होते. आई खरं तर आता तयारच नव्हती जायला. स्वतःच्या मुलावर असला जीवघेणा हल्ला झाला म्हटल्यावर अमेरिकेला जायचं तिला तरी कसं सुचेल? पण मग सुजयने खूप समजावून तिला जाण्यासाठी तयार केलं. घरी आल्यावर पहिल्या पंधरा दिवसातच गौरव दीक्षितपर्यंत पोहोचायचे सगळे प्रयत्न त्याने केले होते,पण त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही.

 

आईबाबा यु.एस.ला गेले आणि त्यानंतरचा विकेंड. सु.सा.सुस्तावून घरात बसला होता. संध्याकाळी त्याचा ऑफिसमधला कलीग आणि मित्र कौस्तुभ घरी येणार होता, ऑफिसचं काही काम करायला. पण सकाळचा वेळ तसं काहीच काम नव्हतं. घर नीटनेटकं ठेवण्याच्या बाबतीत तो तसा आळशीच होता. आईबाबा गेल्यावर स्वतःचे चहाचे कपसुद्धा त्याने उचलून ठेवलेले नव्हते.काल रात्री ऑफिसचं काम काढून बसला होता त्यातले काही पेपर्स सुद्धा अजून तिथेच होते. कंटाळून तो उठला. कौस्तुभ येईल तेव्हा घर जरा तरी ठीकठाक करून ठेवायला हवं, असं म्हणून तो सगळी साफसफाई करायला घेणार तेवढ्यात बेल वाजली.

 

समोर गौरव दीक्षित उभा होता.

———————————————–

दोनतीन पानं वाचून झाली असतील. अजून त्यात सुजयचा उल्लेखही आलेला नव्हता. पण तरी ती एक कथा म्हणून वाचावीशी वाटत होती. त्यातलं वर्णन खूप रिअल वाटत होतं. ही कथा नसणार, हे खरं घडलेलंच असणारसिद्धार्थला वाटत होतं. पुढचं पान उलटून तो वाचायला सुरुवात करणार तेवढ्यात खोलीत काहीतरी सळसळल्यासारखा आवाज आणि त्यापाठोपाठ कुणाच्यातरी अस्पष्टसं हसण्याचा आवाज आला …..आणि तो जागीच थिजला….

 

क्रमशः

8 Comments Add yours

  1. Wow story madhe new climax maja yetey vachayla. pan next part lavkar prakashit kara please

    Like

  2. RENU M GUPTA says:

    EK NUMBER YAAR. BAHUT ACHHA FINALLY AAP NE POST KIYA BAHUT BESABRI SE INTAJAR KAR RAHE THE HUM SAB. AB LAGTA HAI HUM STORY KE END TAK PAHUCHNE VALE HAI. PLEASE POST NEXT PART AS SOON AS POSIBLE.

    Like

  3. Vaishali Agre says:

    wow mastech ekdum bhari aahe. phar ustukata lagali aahe. please lavkar bhag taka phudhcha. ani phudchya bhagasathi all the best. asech bhari lihit raha.

    Like

  4. Kiran Kamble says:

    Hello sir, next part Lawkar post Kara. Eagerly waiting for next part. Daily check karte mi new part upload jhala ka? Hope u understand ur reader problem. Story Khup chhan jat ahe. Asech lihit raha. All the best.

    Like

  5. Ujvala says:

    Next post taka please lavkar

    Like

  6. Kiran Kamble says:

    Hello sir, next part lawkar post Kara. Please. Daily check karte m in new part post jhala ki nahi? So please

    Like

  7. Vaishali Agre says:

    please next part lavkar taka.

    Like

  8. hello! Rutusara, khup time zala next part post kela nahit roj me check karte pan please lavkar next part post kara

    Like

Leave a comment