दिव्यत्वाची प्रचिती

on

रात्रीचे दिड-दोन वाजले असतील. पण आज तिचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. झोप लागत नाही म्हणून ती उठली. बेडरूममधून हलक्या पावलांनी बाहेर आली. अगदी आवाज न करता किचनमध्ये येऊन तिने ग्लासभर पाणी प्यायलं. तहान लागल्यामुळे नाही खरं तर…उगीचच. झोप का बरं लागत नाहीये आज?

विचार करत ती हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसली. खरं तर हे असं शांततेत इथे येऊन बसणं तिला नेहेमीच आवडायचं. पण दिवसभरात अशी शांतता कुठे मिळतेय. विकेंड सुरु झाला की असं रात्री उशिरा पर्यंत जागत बसायला काही वाटायचं नाही. पण आज? असं आठवड्याच्या मधल्या दिवशी? उद्या लवकर उठायचं आहे आणि त्यासाठी आत्ता शांत झोप लागायला हवी. का बरं असं होतंय ? तिला आठवलं की मागच्याही आठवड्यात दोन रात्री तरी ती शांतपणे झोपू शकली नव्हती. अशी उठून बसली नव्हती ती, पण अंथरुणात लोळत कितीतरी वेळ जागी होती. का होतंय असं?

अलीकडे कुठल्यातरी गोष्टीने आपण अस्वस्थ आहोत हे तिला जाणवत होतं. दिवसभरात कामाच्या व्यापात सुद्धा अलीकडे कसलीशी खंत कायम तिच्या मनाच्या कोपऱ्यात असायची. पण त्यावर विचार करायलाही वेळ मिळत नव्हता तिला. हाताच्या एखाद्या बोटाला झालेली अगदी छोटीशी जखम जशी आपण काम करताना दुर्लक्षित राहते आणि नंतर तर आपण तिला विसरूनच जातो, तसं काहीसं झालं होतं ह्याबाबतीत तिचं. मनात खुपणारं, सलणारं असं होतं काहीतरी, पण त्याकडे बघायला तिला वेळच नव्हता. कदाचित त्यामुळेच झोप लागत नसेल, तिला वाटून गेलं. आता वेळ आहे आणि विचार करायला शांतताही आहे. कदाचित आत्ता कळू शकेल आपल्याला. तिने खूप विचार करून पहिला, मागच्या काही दिवसात घडलेले प्रसंग आठवून पहिले. घरातल्या, घराबाहेर असताना घडलेल्या गोष्टी डोळ्यांसमोर आणून पहिल्या. पण नक्की मनात काय सलत होतं, हे काही कळलं नाही.

थोडा वेळ गेल्यावर हातात मोबाईल नसल्याची तिला जाणीव झाली. मोबाईल वर बेडरूममध्येच राहिला होता. आता पुन्हा वर जाऊन तो आणण्याची तिला ईच्छा नव्हती. समोर ठेवलेला लॅपटॉप उघडून तिने तिचे आवडीचे काही ब्लॉग्स वाचायला घेतले. पुढचे काही मिनिट्स ती वाचनात रमून गेली होती. असं शांतपणे वाचत बसायलाही कुठे वेळ मिळतो आपल्याला? असंच रात्रभर वाचत बसू शकतो आपण, तिला वाटून गेलं. ती शांतता, निवांतपणा, स्वतःसाठी स्वतःचा असलेला वेळ सगळं इतकं हवंहवंसं होतं, सुखावणारं होतं. हळूच स्वतःचं मन तिने चाचपून बघितलं. कदाचित हा स्वतःसाठीचा वेळ मिळत नव्हता आपल्याला इतके दिवस, म्हणून अस्वस्थ होतो आपण. पण नाही, खुपणारी ती गोष्ट होतीच अजून मनात…आणि पुन्हा तिला ती अस्वथ करत होती. तिने नेहेमीसारखं दुर्लक्ष करायचं ठरवलं. उगीच विचार करत अस्वस्थ होत का बसायचं? छान वेळ मिळाला आहे वाचायला तर त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

पुढचा थोडा वेळ ती वाचनात दंग होऊन गेली. “माझंही लिखाण चालू राहिलं असतं, तर कदाचित आज माझाच ब्लॉग असा निवांतपणे वाचत बसले असते.” हा विचार डोक्यात येताच ती पुन्हा अस्वस्थ झाली.

काही विषय असे असतात की आपण त्यांच्यासमोर हरलेलो असतो. अर्थात म्हणून ते विषय नावडते असतात असं नाही. कधी कधी आपल्या अत्यंत आवडीच्या गोष्टींशी जोडलेली नाळ अचानक सैल होते, त्यांच्या हातात दिलेला आपला हात काही काळासाठी सुटून जातो. मग हळूहळू त्या गोष्टीची आपल्या आयुष्यातली उणीव जाणवायला लागते. ती उणीव भरून काढण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न थकतात, पण ती गोष्ट पुन्हा आपल्या आयुष्यात काही येत नाही. मन विचार करून भरून येतं पण ते रितं कसं करावं हे आपल्याला कळत नाही. मग हळूहळू त्या गोष्टीचा विचार मनात नुसता डोकावला तरी आपण अस्वस्थ होतो. तो विचारही आपली हरण्याची भावना आणखी प्रबळ करतो.

तिचं लिखाण आणि तिचा ब्लॉग हा असाच विषय होता तिच्यासाठी.

तीन वर्षं होऊन गेली आता ब्लॉगवर शेवटचं लिहून. मधे खरं तर असं सांगण्यासारखं काहीच घडलं नव्हतं, पण तरीही तिचं लिहिणं बंद झालं होतं. धाकट्याचा जन्म, मग तो मोठा होऊ लागल्यावर मिळेनासा झालेला वेळ, पँडेमिक नंतर घरात मुलांमध्ये बीझी होणं, ही अशी सगळी कारणं होतीच. पण त्याही पलीकडे आणखी एक कारण होतं.

या मागच्या तीन वर्षांमध्ये जेव्हा थोडी उसंत मिळायची, तेव्हा ती मोठ्या उत्साहाने लिहायला बसत होती. पण चांगलं काही सुचणंच बंद झालं होतं. लिहायला बसलं की विचार केंद्रित न होता चार दिशांना उधळायचे. कधी मनात विचार तरळून जायचे पण त्यांना शब्दरूप देणंच शक्य व्हायचं नाही. चांगले विषय, चांगले विचार, वेगळे विचार, विचारांना व्यक्त करणारे शब्द सगळं हळूहळू तिच्यापासून दूर जात होतं. सुरुवातीला तिने इतकं काही मनावर घेतलंही नाही, पण हे पुन्हा पुन्हा व्हायला लागलं तेव्हा तिला एक अनामिक हुरहूर वाटायला लागली आणि तिच्या नकळतच ती हुरहूर तिच्या अस्वस्थतेमधे बदलली.

इतके दिवस अवस्थ व्हायला होतंय, झोप लागत नाहीये ते ह्या गोष्टीमुळे! तिच्या आत्ता कुठे लक्षात आलं.

नकळत तिने स्वतःच्या ब्लॉगकडे मोर्चा वळवला.

तिच्याच ब्लॉगवरच्या काही वर्षांपूर्वीच्या पोस्ट्स. ती भान हरपून वाचत राहिली. या आधी वाचलं होतंच की तिने. पण आज हरवलेलं काही पुन्हा गवसल्यासारखं वाटत होतं. हे लिहिलेलं किती चांगलं आहे किंवा ते बरं जमलंय की नाही, हे इतरांनी ठरवायचं. आपण स्वतः फक्त व्यक्त होण्यासाठी लिहायचं. भावनांच्या हिंदोळ्यावर उंच आकाशात झेपावू बघणाऱ्या किंवा काल्पनिक जगात मुक्तपणे वावरणाऱ्या विचारांना आणि स्वतःच्याच नादात डोलत आपल्याभोवती भिरभिरणाऱ्या शब्दांना अलगद स्वतःच्या मनात विसावू द्यायचं आणि मग हळुवारपणे त्यांची मैत्री होऊ द्यायची. विचार आणि शब्दांची मैत्री झाली ना, की त्यातून तयार होते मनाची भाषा. मग त्यात आपले रंग, आपली शैली भरून तिला मोहक बनवायची आणि मग ती भाषाच कागदावर उतरवायची. कागदावर जे उतरतं ते आपलं लिखाण. आपल्या मनाशी, त्यात विसावलेल्या विचारांशी आणि शब्दांशी आपण केलेलं हितगुज….

ती डोळे भरून, मन भरून स्वतःच्याच लेखणीतून उतरलेल्या त्या शब्दांचा वेध घेत होती बराच वेळ. भानावर आली तेव्हा तिला वाटलं, हे आज स्वप्नवत वाटतंय पण हे स्वप्न मला जगायचंय पुन्हा एकदा…मला लिहायचंय… हरवलेल्या त्या विचारांना आणि शब्दांना पुन्हा मनात साठवायचंय आणि त्यातून अलगद अशी उलगडणारी माझ्या मनाची भाषा मलाच वाचायची आहे…मला व्यक्त व्हायचंय…मला पुन्हा लिहायचंय….

पण कसं? तिला मागच्या तीन वर्षात मागे पडलेलं तिचं लिखाण आठवलं, त्यासाठी केलेले प्रयत्न आठवले, मनाच्या पाटीवर न उमटणारे शब्द आठवले, विचारांचं भरकटणं आठवलं, निःशब्द जाणिवा आणि आविष्काराच्या प्रतीक्षेत असलेल्या भावना, हे सगळं सगळं आठवलं. एका बाजूला मागे पडलेलं एक स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मनाने घेतलेली उभारी आणि दुसरीकडे, ते स्वप्न जगायचं कसं ह्याबद्दल त्याच मनाच्या कोपऱ्यात दडलेले प्रश्न आणि शंका, अशा कात्रीत अडकली ती.

पुन्हा मन विचारांमध्ये गुरफटायला लागलं, तसं तिने ठरवलं. सरळ जाऊन आता झोपायचं. लिहिणं आता जमेल की नाही माहीत नाही, पण तेच विचार करत बसलं की पुन्हा अस्वस्थ व्हायला होईल. तरीही विचार कसले संपतायत? ते चालूच असतात…विचारांच्या नादातच ती वर आली.

समोरच्या खोलीतून येणाऱ्या मंद प्रकाशाने नकळत तिचे पाय त्या दिशेने ओढले गेले.

समोर ती तेजस्वी मूर्ती होती, आणि तिच्या बाजूला अजूनपर्यंत मंद तेवत राहिलेली समई. क्षणभर त्या मूर्तीकडे पाहताना तिचं भान हरपलं. मागे कधीतरी शिरीष पै ** यांचा एक खूप सुंदर लेख वाचनात आला होता तिच्या, त्यातल्या काही ओळी लगेचच आठवल्या तिला. इतक्या समर्पक होत्या आत्ता तिच्यासमोर असलेल्या त्या दृश्याला. “रहस्य देवात नाही, देवापुढच्या दिव्यात आहे”.

Photo by https://unsplash.com/photos/ac3W2sGLxf4

देवापुढच्या दिव्यामुळे आपल्याला देवामधल्या देवत्वाची जाणीव होत असते. तो मंद प्रकाशही आपल्याला त्या तेजाची आणि ऊर्जेची साक्ष देण्यास पुरेसा असतो. खरंच खूप सुंदर विचार. तिथून हलेनासंच वाटेना तिला. जिथे तिची श्रद्धा आणि भक्ती एकवटलेली होती ती समोरची मूर्ती समईच्या प्रकाशात अधिकच तेजस्वी दिसत होती.

मूर्तीकडे पाहताना नकळत तिचे डोळे भरून आले, हात नकळत जोडले गेले. त्या क्षणी त्या मूर्तीच्या आजूबाजूला जाणवणाऱ्या विलक्षण ऊर्जेची तिला ओळख पटत होती. तिथे असलेल्या प्रचंड सकारात्मकतेमध्ये कुठलंही वादळ शांत करू शकण्याचं सामर्थ्य होतं, हे तिला जाणवत होतं. तिथल्या त्या शांततेला एक वेगळाच, दैवी सुगंध होता, तोही जाणवला तिला. कितीतरी वेळ ती तिथेच, तशीच बसून होती. काहीही न मागता, काहीही न विचारता.. मनात अजूनही प्रश्न होते. पण आता उत्तराची आस नव्हती. मन विचलित करणारा अस्वस्थपणा नव्हता….

नंतर कधीतरी भानावर येऊन ती झोपायला गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या गडबडीत तिला अचानक वाटलं, काहीतरी लिहूया का? एरव्ही ह्या अशा कामाच्या व्यापांमध्ये अशी ईच्छा झाली तरी तिने ती मागे सारलेली. पण आज मात्र सगळी कामं बाजूला ठेवून ती लिहायला बसली.आणि आकाशातून पाऊसधारा कोसळाव्यात, तसं काहीसं झालं. कितीतरी दिवस, वर्षं ती ह्या क्षणाची वाट बघत होती. मन पुन्हा एकदा विचार आणि जाणिवांनी भिजून जाऊ लागलं. अगदी ओलंचिंब झालं पण तो कोसळणारा पाऊस तरीही चालूच होता. ती लिहीतच गेली. सगळं मन, सगळ्या कल्पना, सगळे विचार आणि सगळे शब्द…सगळं सगळं रितं झाल्यावरच ती थांबली.

स्वप्नवत वाटणारं ते, स्वप्न नव्हतं तर…सुखावणारं सत्य होतं.डोळे मिटून एक मोकळा श्वास घेतला तिने.

पण हे कसं झालं ? विचार करता करता तिला कालचं तिचं मूर्तीसमोर हरवून जाणं आठवलं.काल रात्री काहीतरी घडलं होतं नक्कीच. काहीतरी कल्पनेच्या पलीकडचं….तिच्या विचारांची झेप तिथपर्यंत पोहोचत नव्हती पण ते जाणवत होतं. डोक्यावरील आशीर्वादाचा तो अदृश्य हात जाणवत होता. त्या सगुणरूपाशी आंतरिक नातं जोडलं जात असताना निर्गुणाचीही ओळख पटली होती, हे आता कुठे तिच्या लक्षात येत होतं. ती शक्ती, ती प्रचंड ऊर्जा, ती आश्वासकता आता तिला तिच्या आजूबाजूला सगळीकडेच जाणवत होती.धावतच ती वर गेली.

अजून पूजा केलेली नव्हती त्यामुळे आत्ता समई तेवत नव्हती. पण बाजूची ती मूर्ती मात्र आजही तेवढीच तेजाळलेली होती. आता तिला ह्याच मूर्तीशी नव्याने ओळख झाल्यासारखी वाटली…इतके दिवस हे गुरु-शिष्याचं नातं होतं, श्रद्धा होती, भक्ती होती, सेवाही होती. पण आंतरिक नातं नव्हतं, अनौपचारिकता नव्हती. काल तू त्याचीही सुरुवात करून दिलीस. काय म्हणू तुला? ऊर्जा, शक्ती, चैतन्य की तेज? तू तर हे सगळंच आहेस.

आता तुझं स्थान माझ्या हृदयात.. मला मात्र कायम तुझ्या पायांपाशी जागा हवी…

समईचा प्रकाश नव्हता पण आज दिव्यत्वाच्या ह्या प्रचितीची साक्ष देण्यासाठी तिला आणखी कशाचीही गरज नव्हती.

**********************************

ही कथा माझीच…कथेतील छोटं कथानक हाही माझाच अनुभव…जसाच्या तसा नाही, पण बराचसा…कथेची नायिका मात्र मी नाही…

ज्यांच्या आशीर्वादामुळे माझं लिखाण पुन्हा सुरु झालंय, त्या माझ्या गुरुमाऊलींच्या श्री गजानन महाराजांच्या चरणी हा लेख अर्पण करतेय. ह्या लेखामागील, त्यातील प्रत्येक शब्दामागील प्रेरणा तेच आणि ह्या कथेचे नायकही तेच.

गुरु हाच आधार, गुरु हीच शक्ती
गुरु हीच माउली अन तेजाची निर्मिती

आपल्या प्रत्येकालाच गुरु असतो, असावा. हे माझं मत..अर्थात सगळ्यांनीच त्याच्याशी सहमत व्हावं असं नाही. ज्यांना हे वाचताना त्यांच्या गुरूंची मूर्ती डोळ्यांसमोर आली, अवघड वळणांवर त्यांनी दिलेली साथ आठवली, त्यांनी मनात जागविलेला विश्वास आठवला, त्यांनी हा लेख गुरूंनी दिलेला एक दिव्य अनुभव म्हणूनच वाचावा. तसं नसेल तर एक काल्पनिक कथा म्हणून वाचावा. अर्थात दोन्ही बाबतीत तुमचे अभिप्राय वाचायला नक्कीच आवडतील.

** रहस्य देवात नाही, देवापुढच्या दिव्यात आहे, हे वाक्य शिरीषताई पै यांचं आहे असं मी म्हटलंय. अर्थात हे फार पूर्वी कधीतरी वाचलं होतं त्यामुळे ते त्यांनी लिहिलेलं नसून आणखी कुणी लिहिलेलं असल्यास चुकीच्या माहितीबद्दल आधीच माफी मागते.

2 Comments Add yours

  1. दिपक says:

    खुपच संवेदनशील लेख शारजा. मनातील विचारांना लेखणीत उतरवणे हे फार कमी जणांना जमते. यू आर अ ब्लेस्ड वन! माऊलींच्या क्रुपाद्रुष्टीत तू सुंदर विचार मांडत जा! गुड लक…

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thank you Deepak dada 🙂

      Like

Leave a comment