davabindu दवबिंदू

विचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही! eveything that life is about….

अज्ञाताची चाहूल (भाग : 6)

तिने शेजारी झोपलेल्या सायलीकडे बघितलं. तिला उठवून तिच्याशीच सगळं बोलावं अशी तिला खूप इच्छा झाली. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला आवरलं.

काय यार सायली, सगळं म्हणजे सगळं तुझ्याशीच शेअर करते. आता काय करू? तुझं बरं आहे. तू त्या सुजयची स्वप्न बघत मस्त झोपलीयेस. पण त्याच सुजयने माझी झोप उडवलीये. तुला त्याला फोन करायला सांगून मला जे चेक करायचं होतं ते मी केलं. आता उद्याही तेच काम करायचंय मला. पण आत्ता मी पुढे काय करू?”

तिने बाजूच्या टेबलवर पाण्याची बाटली उचलण्यासाठी हात पुढे नेला. पण आज झोपायच्या आधी पाणी आणायचंच राहिलं होतं. ती कंटाळून उठली. आता किचन पर्यंत जाऊन पाणी आणावं लागणार. ती पॅस्सेजमधून चालत जाऊन हॉल पर्यंत पोहोचली तेवढ्यात हॉल मधून तिची मावशी आणि काकांचा आवाज तिच्या कानावर पडला ….

—————भाग ५ पासून पुढे चालू …——————

भाग ५ येथे वाचा – http://wp.me/p6JiYc-9x

अहो, काय म्हणाले सुजयचे बाबा आणखी?” मावशी

 

बाकी अजून काहीच नाही गं. ते देखील थोडे दुःखात वाटत होते. साहजिक आहे ते. ते म्हणाले उद्या ११ च्या मुहूर्ताला साखरपुडा पार पडला की जेवून ते थेट गावाला जायलाच निघतील आणि मग आठवडाभर तरी तिकडेच राहू म्हणाले.” काका

 

साखरपुड्याच्या तोंडावर हे असं व्हावं हे काही ठीक वाटत नाही हो. पण काय हो, ते जोशी अण्णा अगदीच जवळचे होते का त्यांना? त्यांनी त्यांच्या गावाकडच्या सगळ्या लोकांबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्याबद्दल साधा उल्लेख कसा नाही केला हो त्यांनी? तुम्हाला आठवतं, मी त्यांना विचारून घेतलं होतं, की तुमच्याकडे सगळ्यांमध्ये मोठं, वयस्कर कोणी असेल तर सांगा, आम्हाला तुमच्याकडच्या वडीलधार्यांसाठी भेट म्हणून काही वस्तू घायची इच्छा आहे.” मावशी

 

तू विचारलं होतंस असं? “काका

 

अहो, काय तुम्ही पण? लक्ष कुठे असतं तुमचं? आपण त्यांच्या जवळच्या नातेवाईकांबद्दल चौकशी केली ना त्यांच्याकडे, साखरपुड्याच्या दिवशी जवळच्या किती आणि कोणत्या लोकांना गिफ्ट्स द्यायची हे कळण्यासाठी. तेव्हाच मी त्यांना म्हटलं होतं, मानपान करणं वगैरे ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. ती हौसेनी करायची गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आमच्याकडच्या अमुक लोकांचं मानपान तुम्ही करा वगैरे ह्या गोष्टी आपण या लग्नात करूया नको. सायलीच तयार होणार नाही असं सगळं करायला.” मावशी

हॉलला लागून असलेल्या पॅस्सेजमध्ये उभी राहून हे सगळं बोलणं ऐकता ऐकता ईशाने मोठी जांभई दिली.

मावशी पण ना, काय गोल गोल बोलतेय. लगेच मुद्द्यावर यायचं तरमी का थांबलेय पण इकडे. मला पाणी आणायचंय ना. पण नको, मधेच गेले तर त्यांची बोलण्यातली लिंक तुटेल आणि बोलणं राहून जाईल. आणि मावशीला काहीतरी प्रश्न नक्कीच पडलाय, त्याबद्दलच बोलतेय तीऐकलं तर कदाचित मलाच आणखी माहिती मिळेल. “

तिकडे काकांनीही मोठी जांभई दिली.

अगं काय बोलतेयस तू? हे कुठे आलं मधेच मानपान वगैरे? तू मगाशी ………… .हाबरोबर …. त्या जोशी अण्णांबद्दल बोलत होतीस..”

 

अहो, तेच सांगतेय ना. तेव्हा त्यांना म्हटलं मी, की आमच्याकडच्या लोकांना काही द्यायचं की नाही हे तुम्हीच ठरवा, आमचं त्यावर काहीच म्हणणं असणार नाही. मग त्याच्या आई म्हणाल्या की आमच्याकडे पण सगळे अशाच मताचे आहेत. त्यावर मी त्यांना म्हटलं होतं की मात्र तुमच्या कडे सगळ्यात मोठं, वडीलधारं असं कोण आहे तेवढं मात्र सांगा आम्हाला. त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे आम्हाला. समारंभात वडिलधाऱ्यांचा योग्य तो मानही ठेवला पाहिजे. शेवटी आपण जो विचार करतो, तसा विचार ते करत नाहीत. या निमित्ताने त्यांचे शुभाशीर्वादच मागत असतो आपण. त्यांना दुखावून कसं चालेल?

त्यावर त्या म्हणाल्या की नाही हो, आमच्याकडे मोठं असं कुणी राहिलेलंच नाही. सुजयच्या बाबांचे मोठे भाऊही काही वर्षांपूर्वी गेले. त्यानंतर सुजयचे बाबाच मोठे.

त्यावर मी त्यांना म्हटलं की, अगदी नात्यात तसं कोणी नसेल पण तरीही जवळच्या नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये सगळ्यात मोठं असं तुमचं कुणी असेल तरी आम्हाला सांगा हो. तुमच्या बाजूचं मोठं माणूस म्हणून त्यांचं योग्य तो मानपान करू आम्ही. पण ह्यावरही त्या आमच्याकडे तसं कोणीच नाही असं म्हणाल्या.” मावशी

 

असं म्हणाल्या त्या? कमाल आहे मग. सान्यांच्या बोलण्यावरून तर वाटत होतं की ते जोशीअण्णा त्यांच्या अगदी वडिलांच्या जागी आहेत म्हणून. साखरपुड्याच्या आणि लग्नाच्या तारखाही त्यांनी त्यांच्याकडून शुभ दिवसम्हणून शिक्कामोर्तब करून आणल्या आणि मगच तयारी सुरु केली म्हणे.” काका

 

इतकं जवळचं नातं असताना, आमच्याकडे मोठं कुणीच नाही असं का सांगितलं त्याच्या आईने ? नवलच आहे.” मावशी

 

ते आहेच. पण तसंही, त्यांचं मानपान करणं आपल्या नशिबात नव्हतं. जाऊदेत गं, कदाचित तू म्हणालीस ना की भेटवस्तू देणार म्हणून अवघडल्यासारखं झालं असेल त्यांना. म्हणून नसेल सांगितलं त्यांनी.”

थोडं थांबून विचार करत काका म्हणाले,

पण खरं आहे, थोडं खटकण्यासारखं आहेच. गावाकडच्या सगळ्या लोकांबद्दल बोलले ते, पण हे जोशी अण्णा वगैरे आजच कळलं आपल्याला. जाऊदेत, चल आता झोपूया. ११ चा मुहूर्त आहे उद्याचा. लवकर उठायला हवं

 

अहो, सायलीचा साखरपुडा होणार उद्या. सहा महिने पण असे बघता बघता जातील, आणि मग…..कसं होणार हो माझं? सायलीशिवाय घर खायला उठेल मलाइतके दिवस तिचं लग्न करायच्या गोष्टी करत होतो आपण..आणि आता लग्न खरोखर करून द्यायची वेळ आलीये तर मन कचरतय हो.” मावशीने पदर डोळ्याला लावला.

मावशीला रडताना पाहून ईशाला कसंतरीच झालं. कोणतीही सिच्युएशन आत्मविश्वासाने हाताळणाऱ्या ईशाला ह्या असल्या घरगुती इमोशनल गोष्टी मात्र झेपायच्याच नाहीत.

अरे यार, मावशी प्लीज इमोशनल नको होऊस, प्लीज प्लीज. मलाच जायला हवं आता.”

पुढे जाता जाता ईशाने स्वतःच्याही नकळत स्वतःच्या डोळ्यांच्या कडा टिपल्या आणि ती हॉल मध्ये शिरली.

अरे तुम्ही अजून जागेच? मावशी काय झालं तुला?”

त्यांचं बोलणं आपण ऐकलंय हे त्यांना कळलं तर आपल्यालाच जास्त शरमल्यासारखं होईल, हे ईशाला माहिती होतं.

अगं, उद्या सायलीचा साखरपुडा होणार, म्हणून जराशी इमोशनल झालीये ती. पण तू अजून जागी आहेस ?” काका

 

झोपतच होते, तेवढ्यात लक्षात आलं की पाणी संपलंय. म्हणून आले.”

ईशा बोलत बोलतच मावशीच्या जवळ गेली आणि तिने तिच्या गळ्यात हात टाकला.

ए मावशी, उगीच रडू बीडू नकोस हां. सायली काय एकदम परदेशी वगैरे चालली नाहीये. अगदी रोजच्या रोजही भेटायला येईल तुला. ती मध्ये मध्ये पंधरापंधरा दिवस जाते ना आऊटऑफस्टेशन ऑफिस च्या कामाला. तेच समज ना तू. ती ऑफिस च्या कामासाठी बाहेरगावी गेलीये असं आपण समजायचं, सिम्पल. आणि तसंही माझ्याकडे एक उपाय आहे, ज्यामुळे तुला सायलीची उणीव जाणवणार नाही.”

ईशा मुद्दाम मावशीचा मूड बरा व्हावा म्हणून लाडात येउन बोलत होती.

तुला नाहीच कळायचं ते. जाऊदे, पण कसला उपाय म्हणत होतीस तू?”मावशी ईशाने गळ्यात टाकलेले हात पकडून म्हणाली.

 

अगं सोप्पं आहे. मी येते ना मुंबईला ट्रान्स्फर घेऊन. इथेच राहीन. म्हणजे तुला सायलीची कमी जाणवणार नाही.” ईशा

 

हो का? नाही, तू आलीस तर मला आनंदच आहे. पण मग माझी बहिण तिकडे तुझ्या आठवणीने रडत बसेल त्याचं काय? ” मावशी.

 

हम्मते आहेच. शी पण किती रडक्या बहिणी आहात गं तुम्ही.. एवढंसं काही झालं की एवढं मोठं रडायचं…”ईशाने मागे काकांकडे बघून डोळे मिचकावले.

 

आम्ही रडक्या कायलहानपणी तू किती रडायचीस माहितेय का? तुझे लहानपणाचे जे ढीगभर फोटो आहेत ना इकडे, त्यातले अर्धे तर रडतानाचेच आहेत. साखरपुडा झाल्यावर दाखवतेच तुला.” मावशी तिच्या हातावर चापटी मारत म्हणाली.

 

बरं चला झोपायचं का आता?” काकांना खरंच झोप आली होती.

मावशी आणि काका झोपायला गेले आणि ईशा किचन मध्ये पाणी आणायला गेली.

चला झोपायच्या आधी निदान मावशीचा मूड ठीक झालानाहीतर रात्रभर विचार करत बसली असती.”

बाटलीत पाणी भरताना ईशाचं विचारचक्र चालू होतं. मग तिच्या विचारांची दिशा मावशीकडून पुन्हा सुजयकडे वळली.

काय करावं, काहीच कळत नाहीये. त्याच्या विषयी मिळालेल्या माहितीवरून त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा तर ज्या गोष्टी खटकल्यात, त्या स्वस्थ बसून देत नाहीत…. आणि त्याच्यावर शंका घ्यावी तर इतकं मोठं काही घडलेलंही नाहीये. डोकंच चालत नाहीये माझं. मावशी म्हणाली तसं, त्या लोकांनी सगळ्या जवळच्या लोकांबद्दल सांगितलेलं होतं आणि मग ते जोशी अण्णा एवढे जवळचे असून त्यांच्याबद्दल आधी साधा उल्लेखही कसा नाही केला?”

पाण्याचा आवाज आल्यामुळे ईशा भानावर आली. बाटली भरली होती आणि पाणी वाहून चाललं होतं. तिने फिल्टर चा नळ बंद केला आणि ती तिथेच ओट्याला टेकून उभी राहिली.

मला नक्की कळत नाहीये मला काय करायला हवंय ते. घरी सांगायला हवं का? मोठी माणसं ह्यात इन्वॉल्व्ड असलेली कधीही चांगलंच. पण मी सांगू काय त्यांना? नाही, आत्ता तरी कोणालाही हे सांगता येणार नाही. आधी मीच ऑब्झरव्ह करेन सगळं. पण ते पुरेसं असेल का? ऑब्झरव्ह तेच करणार आपण, जे आपल्याला दिसतं. त्या पलीकडे काही असलं तर ते मला कसं कळणार? कुठून सुरुवात करू, ते कळत नाहीये. उद्याचा दिवस जाऊदेत. नंतरच कदाचित मला माझ्या संशयाबद्दल खात्री करून घेता येईल.”

मी जसा विचार करतेय तसं खरंच घडलं तर? मग कदाचित मला सायलीशी तरी बोलावंच लागेल. आणि तसं खरंच घडलं तर मात्र सुजयबद्दल आणखी माहिती काढावी लागेल एवढं नक्की. पण कशी? आपण काही डिटेक्टीव्ह नाही आहोत. माहिती काढायची कशी? तेही कुणालाही न कळता??”

विचारांच्या तंद्रीतच ती पाण्याची बाटली घेऊन खोलीत परत आली. झोप लागत होती तेवढ्यात तिला मावशी बरोबरचं संभाषण आठवलं. “तुझे ढीगभर फोटोज आहेत इकडे, आणि त्यातले अर्धे तर रडतानाचेच आहेत“. हे मावशीचं वाक्य आठवलं आणि तिचा चेहरा उजळला.

येस येस येस, थॅंक यु मावशी, यु आर अ डार्लिंग. माझ्या आधी कसं नाही लक्षात आलं? सुजयचे फोटोज, त्याचं प्रोफाईलफेसबुक येस..बरोबरत्याचं फेसबुक अकाउंट नीट बघितलं पाहिजे, त्याचे फोटोज, त्याचे मित्र , मेसेजेस, सगळंचसायलीचं लग्न ठरल्यावर बघितलं होतं..पण फक्त तो मुलगा कसा दिसतो, एवढंच बघितलं होतं. आता कदाचित तो मुलगा कसा आहे हे कळेल त्यातूनथॅंक गॉड मला काहीतरी सुचलंय. आता उद्याची वाट बघायचीमाझ्या अपेक्षेप्रमाणे काही घडलं तरसुजयबाबू तुमची माहिती काढणं सुरु.”

—————————————————-

दुसरा दिवस उजाडला तोच उत्साहात, आनंदात. बाहेरगावाहून आलेले काही पाहुणे पहाटेच घरी पोहोचले. मग त्यांच्या चहा, नाश्ता, अंघोळीची गडबड, घरातल्या लोकांची त्या सगळ्या लोकांना अटेंड करण्याची आणि स्वतःची तयारी करण्याची दुहेरी कसरत, सायलीच्या मैत्रिणींचा चिवचिवाट ह्या सगळ्यात हॉल वर जाण्याची वेळ कधी आली कळलंच नाही.

अरे बापरे !” सायली गाडीत बसतानाच ओरडली.

 

का गं, काय झालं?” आई

 

अगं माझी पर्स राहिली आत. ईशी, ए ईशी …..” सायली परत ओरडली.

 

अगं ईशा गेली पण दुसऱ्या गाडीतूनतू अनि ला सांग ना. तो गेलाय दार लावायला…” बाबा

 

अशी कशी गेली ती पुढे? मी म्हटलं होतं तिला माझ्याबरोबर थांब म्हणूनसायली वैतागली

 

त्या गाडीत जागा होती. आणि सगळ्यांनी उगीच उशीर कशाला करायचा. मीच सांगितलं तिला जायला.” आई

 

आई काय तू पण…..थांबली असती ना ती माझ्याबरोबरसायली

 

अगं तिकडे भेटेलच ना तुलाआत्ता निघूया पण पटकनआपल्याआधी साने मंडळी पोहोचली तर किती वाईट दिसेल.” आई

 

काय वाईट दिसणार आहे त्यात? त्याचा पण साखरपुडा आहेच ना. मग ते आधी आले किंवा आपण आधी गेलो , ह्याने काय फरक पडणार आहे ?”

सायलीला मुलाकडच्या लोकांना दिल्या जाणाऱ्या अकारण महत्वाबद्दल आधीच खूप राग होता आणि आईने ईशाला पुढे पाठवल्याबद्दल ती आईवरही जराशी वैतागालेलीच होती.

हे बघ आत्ता हा वाद घालायची वेळ नाहीये सायली. अनिकेत ला फोन करून सांग तुला काय हवंय ते, निघायला हवंच आता.” बाबा

 

मीच जाते. तो भलतीच पर्स घेऊन आला तर परत वेळ जाईल.” बोलताबोलताच सायली मागे वळून चालायलाही लागली होती.

 

काय करायचं हिचं? इतक्या वेळ आवरत होती, बाकी काही कामं होती का ह्यांना? तरी हे असं कसं होतं? ” आई

 

अगं जाऊदे ना आता. ” बाबा

 

आत्ता जाऊ देतेय मी. आज साखरपुडा आहे. आजच्या दिवशी सगळं माफ आहे. पण नंतर कधीतरी मी बोलणारच आहे सायलीशी. ” आई

इकडे अनि ने दार लावलेलं होतं. सायलीने त्याच्या कडून किल्ली घेतली आणि त्याला गाडी बाहेर काढून ठेवायला सांगितली. ती दार उघडून आत आली. तिच्या खोलीत गेली. सकाळचा सगळ्यांचा कपड्यांचा, दागिन्यांच्या बॉक्सेसचा पसारा पलंगावर तसाच होता.

पर्स गेली कुठे माझी? नवीन आणलीये म्हणून काल रात्री ईशाला काढून दाखवली होती. आणि आज न्यायच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यात भरूनही ठेवल्या होत्या.” सायली स्वतःशीच आठवत होती.

तिने सगळीकडे शोधलं. कपाट, ड्रेसिंग टेबल, कॉम्पुटर टेबल, दाराच्या मागे लावलेले हूक्स, पर्स कुठेच नव्हती. पलंगाच्या खाली असेल म्हणून ती जपून साडी सांभाळत गुडघ्यावर बसून खाली वाकली.

पलंगाखालून नजर फिरवताना तिला तिच्या मागे कुणीतरी उभं असल्याचा भास झाला. एक क्षणभर तिच्या छातीत धडधडलं. तिने ती होती, त्याच पोझिशनमध्ये मागे वळून बघितलं. त्याचक्षणी तिच्या डोळ्यांच्या कोपरातून तिला काहीतरी सटकन इकडून तिकडे गेल्याचं दिसलं. कुठून कुठे ते तिलाही सांगता नसतं आलं. कारण तिला काही ते व्यवस्थित दिसलं नाही. तिची नजर दुसरीकडे होती, मात्र डोळ्यांच्या कोपरातून मात्र आपल्यामागे झालेली ती हालचाल तिला नक्कीच जाणवली होती. ते नक्की काय होतं? काहीतरी काळं, काळं, एखाद्या सावलीसारखं होतं. ती अस्वस्थ होत वर उठली. मागे कुणीच नव्हतं.

भासच झाला असेल आपल्याला.”

क्षणभर तिला ती तिथे कशासाठी आली होती ह्याचा विसरच पडला. मग पुन्हा आठवलं, पर्स. तेवढ्यात बाहेरून अनिची हाक ऐकू आली आणि मग तिला काय करावं काहीच सुचेना. पर्स शोधायला वेळही नव्हता आणि नेमक्या तिच्या महत्वाच्या वस्तू त्यातच होत्या.

दुसऱ्याच क्षणी तिचा निर्णय झालेला होता. आता अजून उशीर करता येणार नव्हता. ईशा, निशा आणि सगळ्या मैत्रिणी तिकडे असणारच होत्या ना.  त्या आणून देतील मला काय लागेल ते. पण आता निघायला हवं. खरंच खूप उशीर होतोय. असा विचार करून ती खोलीच्या बाहेर पडणार, तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. ईशाचा कॉल होता. सायलीने फोन घेताक्षणीच ईशा सुरु झाली.

अगं आहात कुठे तुम्ही? इतका वेळ का लागतोय? आमच्या मागोमागच तुमची गाडी येतेय असं वाटलं आम्हाला? आम्ही पोहोचून पण १० मिनिट्स झाले. अनिचा फोन बिझी लागतोय. अगं गुरुजी पण येतील थोड्या वेळात…”

 

ए बाई, जरा बडबड थांबव. निघतोच आहे आम्ही. १५ मिनिटात पोहोचूच. पण एक प्रॉब्लेम झालाय गं. अगं माझी पर्स मिळत नाहीये.” सायली

 

डोन्ट टेल मी, तू आत्ता या वेळेला पर्स शोधत बसलीयेस. उगीच नाही मावशी ओरडत तुला. बरोबर आहे तिचं. तुझं लक्षच नसतं. निघायच्या आधी तुला हाक मारून मी सांगितलं नाही का, मी तुझं सगळं सामान आणि पर्स पण नेते आहे बरोबर म्हणून. मला वाटलंच होतं, तू घाईघाईत विसरणार आणि मग हॉलवर आल्यावर कोणालातरी कामाला लावणार म्हणून मी माझ्याकडेच ठेवली पर्स आणि मी बोलले पण तुला तसं. तू अशी कशी विसरलीस?” ईशा

 

मूर्ख मुलगीमी इकडे शोधत बसले ना पर्स. जाऊदेत चल मी पळते आता. बाय.” सायली

 

व्वा , छान एवढं सगळं करून मीच मूर्ख. ” ईशा फोनकडे बघत बोलली. ” आज साखरपुडा आहे ना तुझा, म्हणून माफ करतेय तुला. नंतर बघून घेईन.”

ती फोनकडे बघत जोरात ओरडली आणि बॅग उचलून चेंजिंग रूम कडे गेली.

पर्स ईशाकडे असल्याचं कळताच सायलीने सुटकेचा निःश्वास टाकला आणि पटकन एका क्षणासाठी आरशात डोकावून साडी, हेअर स्टाईल सगळं ठीक असल्याची खात्री करून ती भरभर खोलीच्या बाहेर पडली आणि पुढच्याच क्षणी थबकली.

काय दिसलं मला आत्ता आरशात ? “

तिने खरं तर फक्त स्वतःकडेच बघितलं होतं. पण आरशातून आपल्या मागच्या इतर गोष्टीही दिसतातच ना? तिच्या मागे लांब समोरच्या भिंतीपाशी काहीतरी होतं खरं. काय होतं तिकडे? तिला नीट आठवेना. काहीतरी होतं एवढी नोंद तिच्या डोळ्यांनी घेतली होती पण तिचा मेंदू मात्र आरशातील तिच्या रुपाची नोंद ठेवताना आजूबाजूच्या गोष्टी आठवणींच्या कप्प्यात घालायचं विसरला होता.

काय होतं ? नीट आठवत नाहीये पण मला असं का वाटतंय की मगाशी डोळ्यांच्या कोपऱ्यातून जे दिसलं ते, म्हणजे तसंच काहीसं काळ्या सावलीसारखं काहीतरी असावं मागे भिंतीशी? काही वस्तू ठेवली होती का कुणी? की आणखी काही होतं? जाऊन बघुया का परत?”

ती खोलीत परत जायला वळणार तेवढ्यात अनि धावत आत शिरला.

ओ मॅडम, साखरपुडा आहे तुमचा, लक्षात आहे ना? अगं काय करतेयस? आईबाबा वैतागलेत. चल पटकन. तू जा, मी दार लावून येतो.”

ती तशीच परत वळली आणि बाहेर गाडीत येउन बसली.

———————————————-

हॉलवर खूप उत्साहाचं वातावरण होतं. आयत्यावेळी बरीच माणसं कमी झाली म्हणून खरं तर आनंदावर विरजण पडलं होतं पण सायलीच्या मैत्रिणी, अनिकेतचे मित्र सगळे वातावरणात उत्साह आणायला पुरेसे होते. शिवाय सायलीच्या ऑफिस मधले तिचे मॅनेजर आणि तिच्या टीम मधले इतर लोकही होते. साने मंडळी ठरलेल्या वेळी हॉल वर आले. सुजय, त्याचे आईबाबा, बहिण नेहा, मावशी आणि तिचे यजमान एवढेच लोक होते.

साखरपुड्याचे विधी सुरु व्हायच्या आधी थोडा वेळ सायली तिच्या रूम मधून बाहेर येउन तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात बसली. सुजयने तिला बघितलं आणि तो वेड्यासारखा तिच्याकडे पाहत बसला. मरून रंगाच्या डिझायनर साडी मध्ये सायली इतकी अप्रतिम दिसत होती. तिच्या मैत्रिणी तिला सुजयवरून चिडवत होत्या आणि ती हसताना, लाजताना हळूच सुजयकडे बघत होती. तिचं ते हलकंसं, हळुवार हसू तिला इतकं खुलून दिसत होतं. त्याक्षणी तिला बघणारा प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडला असता, नक्कीच.

थोड्याच वेळात साखरपुड्याचे सगळे विधी पार पडले आणि आता फक्त अंगठी घालण्याचा सोहळा बाकी होता.

तेवढ्यात सुजयला मोबाईलवर एक कॉल आला. “बरं झालं ह्याने फोन केला…” असा विचार करून त्याने घाईघाईने फोन उचलला आणि हॉलच्या एका कोपऱ्यात, जिथे आजूबाजूला फारसं कुणी नव्हतं अशा ठिकाणी जाऊन बोलायला सुरुवात केली. तिकडे ईशाची नजर त्याच्यावर होतीच. त्याला फोन आल्याचं बघताच ती उठली. आता तिकडे बसलेल्या पाहुण्यांशी बोलायचं निमित्त काढून त्याच्या आजूबाजूला फिरत राहूया म्हणजे तो फोनवर काय बोलतोय हे कानावर पडू शकेल, एका क्षणात तिने निर्णय घेतला होता. ती त्या दिशेने जाणार, तेवढ्यात तिच्या आईने हाक मारली.

ईशा, जा बघ जरा, गुरुजी हाक मारतायत. त्यांना काय हवंय विचार जरा.”

 

ए मी नाही. तू जा नाईशा सुजयच्या दिशेने बघत बोलली.

 

अगं मी बोलतेय ना आज्जींशी. जा पटकन. ” तिची आई लगेच वळून शेजारी बसलेल्या आज्जींशी बोलण्यात गुंतली.

 

शी. गुरुजींना पण आत्ताच बोलवायचं होतं.” ईशा चरफडत स्टेजच्या दिशेने गेली.

 

येणार आहे ना तो नक्की?” सुजयने काळजीच्या सूरात विचारले.

 

हो, हो येईल ना, मी सकाळीच बोललोय त्याच्याशीपलीकडची व्यक्ती म्हणाली.

समोरून हॉलच्या एनट्रन्स मध्ये येउन गोंधळून उभ्या असलेल्या एका तरुणाकडे सुजयची नजर गेली आणि त्याला हायसं वाटलं.

हा काय आलाच. थॅंक्स यार माझं मोठं काम केलंस. बर चल मी ठेवतो फोन. बाकी कोणी त्याला गाठायच्या आत मी त्याच्याशी बोलतो. “

सुजय जवळजवळ पळतच त्या तरुणापाशी गेला. सुजयला बघितल्यावर गर्दीत ओळखीच्या माणसाला बघितल्यावर वाटतो तसा दिलासा त्याला वाटला. सुजयने एकदम त्याला मिठीच मारली. एखादा जवळचा मित्र असल्यासारखी. आणि त्याला घेऊन तो आत आला आणि त्याने त्याला एका खुर्चीवर बसायला सांगितलं. बरीचशी माणसं पुढच्या रांगेत होती त्यामुळे त्याने मुद्दाम त्याला एकदम मागच्या रिकाम्या रांगेतल्या खुर्चीवर बसायला सांगितलं. तो तरुण अजूनही जरासा गोंधळलेलाच होता. सुजयने स्वतः जाऊन त्याच्यासाठी सरबत आणलं.

 

त्यानंतर लगेचच अंगठी घालण्याचा सोहळा सुरु झाला. सायली आणि सुजय एकमेकांच्या समोरासमोर उभे राहिले. गुरुजी सायली आणि सुजयच्या बाबांशी काही बोलत होते, त्यांचं व्हायचं सगळे वाट बघत होते. काही क्षणातच आपला साखरपुडा संपन्न होणार आहे. लग्न ठरल्याचं सगळ्यांच्या साक्षीने जाहीर होणार. सुजय हरखून गेला होता. पण एक क्षणभरच. तेवढ्यात सायलीच्या मागच्या बाजूला असलेल्या टेबलवर ठेवलेले पाण्याचे ग्लास बघून पाणी पिण्यासाठी तिथे गेलेला तो तरुण त्याला दिसला. सायलीच्या ऑफिस मधलं कुणीतरी त्या बाजूला उभं राहून तो सोहळा बघत होतं. त्याला त्या तरुणाचा धक्का लागला आणि तो तरुण त्याला सॉरी म्हणाला. सुजयचं तिकडे लक्ष जाताच त्याने जवळ उभ्या असलेल्या त्याच्या मावशीच्या मिस्टरांना काहीतरी सांगितलं. ते लगबगीने तिकडे जायला वळले. सायलीच्या बाजूला असलेली ईशा डोळ्यांनी आणि ऐकू येईल तितकं कानांनी सुजयच्या सगळ्या हालचाली टिपत होती.

 

तिकडे तो तरुण सॉरी म्हणताच सायलीच्या ऑफिसमधल्या कलीगने त्याला म्हटलं,

नो, नो इट्स ओके. अक्चुअलि मीच वाटेत उभा आहे. तुम्ही सायलीचे कुणी …..?”

नाही, नाही. मी सुजयचा मित्र आहे.” तो तरुण म्हणाला.

, ओके. म्हणजे ऑफिसमधले वगैरे ……??” सायलीचा कलीग

ह्यावर तो एक क्षण थांबला.आणि हलकसं हसून म्हणाला,

हा म्हणजे तशी आमची ओळख ऑफिसमधेच झाली. ….मागे एकदा ….”

अरे तुम्ही सुजयचे मित्र ना, मग इथे काय करताय, तिकडे अंगठी घालण्याचा सोहळा सुरु झालाय. चला, सुजयने बोलावलंय तुम्हाला …..”

सुजयच्या मावशीचे यजमान तिकडे येउन पोहोचले होते. त्या तरुणाला पुढे काही बोलू न देता, ते त्याला हाताला धरून, जवळजवळ ओढतच स्टेजवर घेऊन गेले.

त्याच्या एक क्षणभरच आधी ईशा सायलीच्या कानात कुजबुजली होती.

मी जरा पाणी पिउन येते.”

अगं, अंगठी घालणार आहे मी त्यालाजरा थांब ना..”

सायलीला जरा विचित्र वाटलं होतं. पण ईशा तिचा बोलणं ऐकायला तिकडे थांबलीच नव्हती.

स्टेजवर जमलेल्या सगळ्यांच्या घोळक्यातून ईशा मागे आली आणि आपल्या मोबाईल मध्ये तिने समोर उभ्या असलेल्या त्या तिघांचा (सायलीचा कलीग, सुजयचा मित्र आणि मावशीचे मिस्टर)  पटकन एक फोटो काढला आणि मग ती परत सायलीच्या इथे परत गेली.

अंगठी घालण्याचा कार्यक्रम पार पडला आणि पाचच मिनिटात सुजयचा तो मित्र सुजयकडे येउन म्हणाला,

सुजय, अक्चुअलि मला निघावं लागणार आहे. जरा ऑफिस मधून फोन आलाय. अर्जंट आहे.”

त्याला तसा फोन येणार ह्याची सुजयला अर्थात कल्पना होतीच. पण त्याने तसं काही दाखवलं नाही.

अरे एवढ्यात कुठे जातोस? जेवला पण नाहीयेस. ५ मिनिट्स थांब. ते बघ बुफे सुरूच होईल आता. तू पटकन जेव आणि जा ना.” सुजय

 

नाही रे, थॅंक्स, पण लगेच निघायला हवं. अँड वन्स अगेन थॅंक्स, साखरपुड्याला बोलावल्याबद्दल. आय मीन आपली ओळख फार थोडे दिवसांचीच आहे त्यामुळे या फंक्शन ला यायला खरं तर मला थोडं ऑकवर्ड होत होतं, त्यात परत एकटा जायचंय असं कळलं …….”

समोरून आपल्या दिशेने येत असलेल्या सायलीला बघून सुजय सावध झाला. ह्याला आणखी काही बोलायला द्यायला नको, हे त्याच्या लक्षात आलं. त्याला मधेच तोडत तो म्हणाला,

अरे ठीक आहे रे. मी चांगला मित्र मानतो तुला.”

तेवढ्यात सायली तिकडे आली आणि ती सुजयला म्हणाली,

सुजय जरा येतोस का? आमच्या ऑफिसमधल्या सगळ्यांशी ओळख करून देते. मग जेवून लगेच निघायचंय सगळ्यांना.”

 

हो हो, पण सायली एक मिनिट जरा. मीट माय फ्रेंड, कौस्तुभ. कौस्तुभ परांजपे. माझा खूप चांगला मित्र आहे. आणि कौस्तुभ, ही सायली.” सुजय

 

हाय कौस्तुभ, नाईस टू मीट यु.” सायली

 

सेम हिअर. बाय द वे, साखरपुडा खूप छान झाला. तुम्ही दोघे एकत्र फार छान दिसता. परफेक्ट जोडी. बरं, मला खरं तर निघायचंय, सुजय निघतो मी, खरंच उशीर होतोयकौस्तुभ

 

जेवून जा ना तुम्ही…” सायली

 

अगं मी पण त्याला तेच सांगतोय, एक तर त्याला यायला पण खूप लेट झाला. आपल्या अंगठी घालण्याच्या आधी २ मिनिट्स पोहोचला असेल आणि आता लगेच निघतोय. कोणाशी ओळखही नाही करून देता आलीपण ठीक आहे, काहीतरी तसंच महत्वाचं असणार. ठीक आहे, निघ तू कौस्तुभ. फोन वर बोलूच नंतर. बाय.” सुजय सायलीबरोबर जाण्यासाठी उठला.

त्याच्या शेवटच्या वाक्यावर कौस्तुभचा चेहरा जरा विचारात पडल्यासारखा झाला आणि मग तो हॉलच्या बाहेर पडला.

त्याला जाताना पाहून मागच्या दोन रांगा सोडून एका खुर्चीत बसलेली एक व्यक्ती उठली. ईशाव्यतिरिक्त या हॉलमध्ये ही अजून एक व्यक्ती अशी होती की जिला सुजयबद्दल शंका आली होती. पण आत्ता त्यांच्या अर्धवट कानावर पडलेल्या संभाषणातून नीटसा अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात सायलीची हाक ऐकू आली त्यामुळे ती व्यक्ती आपल्या विचारातून बाहेर पडून घाईघाईने सायलीच्या दिशेने गेली.

क्रमशः..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Information

This entry was posted on December 27, 2015 by in Fiction - Stories and tagged .
%d bloggers like this: