अज्ञाताची चाहूल : (भाग : 42)

फक्त कटनीबद्दल तिला नक्की काही कळलंय का, हे जाणून घ्यायला हवं. उद्या सकाळीच तिच्या घरी जाऊया, आधी काहीही न सांगता, अचानक. त्यांच्या रिएक्शन्स पण बघता येतील आणि एकूणच अंदाज येईल ते आपल्याशी कसं वागता-बोलतायत ते बघून….आणि मग सगळं ठीक वाटलं तर हे सगळं बोलताही येईल तिच्याशी…ठरलं तर ….उद्याच सकाळी सायलीच्या घरी जायचं….

————————————————

“ईशी बोलून आलीस का आईशी?” ईशाने आणलेला चिवडा खाता- खाता सायली म्हणाली.

“हो …आता जरा बरं वाटतंय…पण तू कोणाशी बोलत होतीस फोनवर?”

“तेच सांगायचं होतं तुला आणि सगळ्यांनाच….सिद्धार्थचा फोन आला होता…” सायली

“आला फोन त्याचा? बघ तू उगीच टेन्शन घेत होतीस…काय म्हणाला तो?”

“कदाचित आता आपल्याला सगळंच कळेल ईशी….तो कटनीच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता….”

“पोलीस स्टेशनला? का?” ईशा किंचाळलीच.

“सांगते गं….आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे….ती लाल कापडात गुंडाळलेली वस्तू काय होती हे त्याला कळलंय…”

********************भाग ४१ पासून पुढे**************************

भाग ४१ येथे वाचा<<– http://wp.me/p6JiYc-12f

 

आई कसा झालाय चहा? जमलाय का बऱ्यापैकी ?”

सु.सा.चे आईबाबा सकाळीच आले होते. खरं पहाटेच आले असते पण फ्लाईट उशिरा आल्यामुळे त्यांना येईपर्यंत साडेआठ वाजून गेले. आता थोडं फ्रेश होऊन मुलाच्या हातचा चहा घेत ते बोलत बसले होते.

हो चांगला झालायचहा जमतोय तर आतालग्न ठरवायलाच हवं आता तुझंमुलीला सांगता येईल ना, की मुलाला चहा तरी चांगला करता येतो, बाकीचं शिकतोय….”

 

काय आई आल्या आल्या तुझं लग्न वगैरे? तुम्ही कसे आहात? आणि काय झालं अचानक, तुम्ही एकदम निघून आलात असे? ”

 

अरे एक मित्र आहेत माझे देशपांडे म्हणून, त्यांचा जरा प्रॉब्लेम झालायत्यामुळे यावं लागलं..”बाबा

 

अहो मग मला सांगायचं ना बाबा , मी इथेच होतो ना, मी मदत केली असती त्यांना काय हवी ती….पण एक मिनिट……देशपांडे? कोण देशपांडे? तुमचे सगळे जवळचे मित्र मला माहित आहेत चांगले….पण देशपांडे नाहीत त्यात कोणी….”

 

अरे कळेल ना आताभेटूच आपण त्यांना…” बाबा

 

अच्छामग चला जाऊया का? आणि काही घ्यायचंय का बरोबर? आय मिन, पैसे वगैरे त्यांना नक्की कसली मदत हवी आहे पण? काय प्रॉब्लेम झालाय ?”

 

अहो, मी बाजूला आजींकडे जाऊन येतेकधी एकदा त्यांना भेटते असं झालंय…” आई चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाली.

 

नीलिमा, काय तुझं मधेच आता? नंतर जाऊ आपण दोघेहीमलापण भेटायचंय त्यांना…पण ती मंडळी येतच असतील आता …” बाबा

 

कोण येतंय? बाबा काय चाललंय नक्की तुमचं? असं कोड्यात का बोलताय?” सु.सा.ला त्यांच्या वागण्याचा अर्थच लागत नव्हता.

 

अरे तेच देशपांडे मंडळी येतायत आता येतीलच एवढ्यात…” बाबा

 

म्हणजे? ते का येतायत आपल्याकडे? आणि त्यांच्या घरी तर प्रॉब्लेम झालाय ना ? ओहम्हणजे राहण्याचा प्रॉब्लेम झालाय का त्यांचा?” सु.सा.

 

अरे त्यांच्या मुलीचा प्रॉब्लेम झालायतिचं लग्न ठरत नाहीये…” आई

 

मगइथे का येतायत ते? आणि म्हणून तुम्ही यु.एस. वरून घाईघाईने परत आलायत?” सु.सा.

 

अरे तुला अजून कळत नाहीये का? बाबा तुझ्या लग्नाबद्दल म्हणतायत…..काय झालं..तिथे अमेरिकेत बसून सुद्धा आम्ही ऑनलाईन स्थळं बघतच होतो तुझ्यासाठीआणि मग हे स्थळ दिसलं आणि त्यांची माहिती वाचल्यावर कळलं की ते बाबांचे शाळेतले मित्रच होतेआमचा कॉन्टॅक्ट झाला आणि मग हे भेटायचं ठरलं..पण त्यांना जरा घाई होती, उद्यापरवा कुठे बाहेरगावी जाणार आहेत ते महिनाभर आणि मुलीलापण ऑफिसच्या कामासाठी कुठेसं जायचंय…. म्हणून मग आम्हीच म्हटलं की एक महिनाभर तिथे राहून काय करणार, त्यापेक्षा ह्या मोहिमेला लागलेलं बरंम्हणून परत आलो लगेच. तुला सांगितलं असतं तर फोनवरच तू नाही, नाही केलं असतंस म्हणून तुला नाही सांगितलं. ” आईने माहिती पुरवली

 

काय? अगं एवढा काय उशीर झालाय का माझ्या लग्नाला? एक महिन्याने मी काय अगदी घोडनवरा होणार आहे का? त्यासाठी कोणी एवढी मोठी ट्रिप कॅन्सल करतं का? आणि मग मला सांगायचं नामी भेटलो असतो त्यांच्या मुलीला बाहेर कुठेतरी….मला तुमचं लॉजिकच कळत नाही काही….” सु.सा. आता वैतागला..

 

आता झालं ते झालंआता येतायत ना ते….” बाबा

 

अगं पण माझे कपडे…” सु.सा.

 

चांगले आहेत कीआणि त्यांना माहित आहे आम्ही नुकतेच आलो आहोत….आपली गडबड असणार …एवढी तयारी करायची काही….”

पण आईचं वाक्य पूर्ण होतं नाही तेवढ्यात बेल वाजली.

अहोआले वाटतं ते….”

आई-बाबा काहीतरी वेगळं वागतायत असं जाणवत होतं पण सगळं इतकं फास्ट होत होतं की त्याच्यावर विचार करायलाच सु.सा.ला वेळ मिळाला नाही…

बाबांनी जाऊन दार उघडलं.

समोरच्या व्यक्तींकडे हसत बघत हात जोडत ते म्हणाले,

नमस्कारयाआत या…”

एक साधारण साने आईबाबांच्याच वयाचे नवराबायको आत आले.

याबसा ना….” आई

मग आईने जाऊन पाणी आणलं.

हम्मतर सुजय, हे माझे मित्र देशपांडे आणि ह्या त्यांच्या मिसेस. “

बाबांनी ओळख करून दिली. त्या दोघांचा चेहरा कुठेतरी पहिल्यासारखा वाटलं खरा सु.सा.ला, पण नीट काही आठवेना.

आणि हा माझा मुलगा सुज…..” पण बाबांना मधेच तोडत ते गृहस्थ म्हणाले,

 

सुजय रमेश साने. वय अठ्ठावीस वर्ष. नोकरीग्लॉस्सीसॉफ्ट मध्ये ऑल इंडिया हेड -मार्केटिंग.” पुढे सुजयची सगळी माहिती त्यांनी घडाघडा बोलून दाखवली.

 

बापरे, तुम्हाला माझं प्रोफाईल एकदम तोंडपाठच आहे. ” सु.सा.

 

अर्थात, ज्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, तिचा साखरपुडा झालाय, त्याच्याबद्दल हे एवढं तर सगळं माहित असायलाच हवं ना?”

ते गृहस्थ सु.सा.च्या डोळ्यात रोखून बघत म्हणाले. क्षणभर त्यांच्या डोळ्यात बघायची सु.सा.ला भीती वाटली.

 

त्याच्या आता लक्षात येत होतं सगळं. अर्थात, काहीतरी गडबड आहे, गैरसमज झालाय असं वाटलं त्याला. खरी लिंक अजून लागलीच नव्हती.

काय बोलताय काका तुम्ही? बाबा, हे असे काय बोलतायत? माझं कोणाशी लग्न ठरलंय, साखरपुडा वगैरेकाहीही काय?”

 

थांब त्यांच्या मुलीला भेटल्यावर सगळा उलगडा होईलच….” बाबा.

बाबा एवढे शांत कसे ? त्यांच्या समोर हे गृहस्थ काय वाटेल ते सांगतायत आणि बाबा काहीच रीएक्ट होत नाहीयेत?

तुमची मुलगी नाही आली का?” बाबा

 

आली आहे. बाहेर आहे. फोन आला तेवढ्यात तिला म्हणून ती बाहेरच थांबली. एक मिनिट मी बघून येतो….” ते गृहस्थ उठून बाहेर गेले.

 

बाबा, मला खरं खरं सांगाकाय चाललंय नक्की? कोण आहेत हे? आणि एकूणच हे सगळं मला आता खूप नाटकी, बनावट वाटतंयमाझ्या लग्नासाठी तुम्ही धावत इथे आलात, आल्याआल्या पुढच्या एक तासात ही लोकं हजरआणि हे काय म्हणतायतकोण त्यांची मुलगी? मी बघितलं पण नाहीये तिला आणि म्हणे आमचं लग्न ठरलंय….काय चाललंय? हे सगळं नाटक कशासाठी चाललंय?”

 

अरे शांत हो आधी..” बाबा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले, ” बघू ना आपण काय म्हणणं आहे त्यांचं….”

तेवढ्यात ते गृहस्थ आत आले आणि त्यांच्या मागोमाग त्यांची मुलगी सुद्धातिला बघितल्यावर मात्र सु.सा.च्या चेहऱ्याचा रंगच उडाला. सगळ्यांच्या नजरा त्याची रिएक्शन बघण्यासाठी त्याच्याकडे वळल्या होत्या आणि आता आपलं तोंड कुठे लपवावं असं त्याला झालं. सायलीच्या नजरेला नजर द्यायची तर त्याची हिम्मतच होत नव्हती. ते घरी आलेले मुलीचे आईवडील, देशपांडे, म्हणजे सायलीचे आईवडील. आता सगळीच लिंक लागली. सुजयने त्याला साखरपुड्याचे फोटोज दाखवले होते त्यात तिच्या आईवडिलांचे फोटो त्याने बघितले होते म्हणूनच त्यांना आधी बघितलं असल्यासारखं त्याला वाटत होतं. आणि बाबांनी एवढं देशपांडेदेशपांडे सांगून सुद्धा त्याच्या डोक्यात तेव्हा प्रकाश पडला नव्हता.

 

आणि आईबाबांचं आल्यापासून कोड्यात वागणंही त्याला खटकलं होतंच. म्हणजे आईबाबांना सुद्धा सगळं माहित आहे? आता त्याच्या हृदयाचे ठोके जलद पडायला लागले. पण आईबाबांना सगळं कळलं असेल तर ते एवढे शांत कसे?

 

डोक्यात विचारांचा गोंधळ माजलेला होता, सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे असूनसुद्धा तो जागच्या जागी स्तब्ध उभा होता. काय सांगायचं आता, सायलीला काय उत्तर द्यायचं, आईबाबांकडे नजर वर करून कसं बघायचं…. त्याच्याकडे कशाचंच उत्तर नव्हतं.

हाय सुजय…” सायली त्याच्या समोर येत म्हणाली.

सु.सा.ची तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती.

अरे बोल ना, काहीच का बोलत नाहीयेस? आपल्या लग्नाचं शॉपिंग करायला आलोय आम्हीजाऊया ना?” सायली

 

काय बोलतेयस तू ? तुमचं लग्न? काहीतरीच काय?” सगळं माहित असूनसुद्धा सु.सा.ची आई म्हणाली.

 

अहो काहीतरीच नाही बोलत आहे ती. आमच्या मुलीचं लग्न ठरलंय, सुजय रमेश साने, ह्या मुलाशी. मगाशी ह्यांनी बाकी माहिती सांगितलीच ना मुलाची. तुमचाच मुलगा ना तो? अहो मग साखरपुडा झालाय तुमच्या मुलाचा आमच्या मुलीशी….” सायलीची आई

 

अगदी ह्याच घरात येऊनही गेलोय आम्ही, साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी आलो होतो, नाही का वसू?” सायलीचे बाबा

 

हो ना, फक्त एक फरक होता, तो सुजय जरा वेगळा होता दिसायला, आणि त्याचे आईबाबासुद्धा. पण बाकी सगळं सेम बरं का? घर, नोकरी, ऑफिसचा कलीग, अगदी नातेवाईक सुद्धा….आम्ही सुजयच्या मावशी आणि तिच्या मिस्टरांना पण भेटलो की….हा आता ते दिसायला तसेच आहेत की आणखी वेगळे आहेत ते काही माहित नाही आम्हाला….” सायलीची आई

 

पण काय फरक पडतोय? बाकी सगळं तर सेम आहे ना, आता चेहरे बदलले म्हणून काय फरक पडतो एवढाचला ..चला….खरेदी करून टाकू आपण आताअहो घरच्या घरी असलं तरी लग्न म्हटलं की सगळं वेळेवर व्हायला हवंच ना….” सायलीचे बाबा

 

काय बोलताय देशपांडे तुम्ही? अहो आम्ही यु.एस. ला गेलो होतो, आत्ता येतोय. आम्ही नसताना आमचा मुलगा असा परस्पर लग्न कसं ठरवेल स्वतःचं? ” सु.सा.चे बाबा

 

सुजय अरे बोल ना काहीतरी..हे लोक बघ काय म्हणतायत?अहो, आपलं नाव वापरून कोणीतरी असला फाजीलपणा केलाय की काय?” सु. सा.ची आई

 

टाळी एका हाताने वाजत नाही काकू…..”सायली सुजयच्या दिशेने वळत म्हणाली, “सुजयच म्हणू ना तुला की राज हाक मारू? मागच्या वेळेला नाही का, मी आले होते तेव्हा तू मला राज म्हणून भेटला होतास, आठवतंय? तुझाच मावसभाऊ राजेश म्हणून?”

 

सुजय बोलत का नाहीयेस तू?” सु.सा.चे बाबा

सु.सा.तसाच स्तब्ध उभा होता.

हे बघ बाळा, ह्या लोकांना कोणीतरी फसवलंय नक्कीच. पण मला आत्ता एवढंच ऐकायचंय की ह्या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही ना? माझी खात्री आहे, माझा मुलगा असलं चीप काम करणार नाही, पण समोरून कोणीतरी आरोप करतंय बाळा तुझ्यावर, प्लिज सांग ना, तुला ह्यातलं काही माहित नाहीये ना….” सु.सा.ची आई

पुढच्याच क्षणी सु.सा.च्या तोंडून एक मोठा हुंदका बाहेर पडला आणि तो आईच्या खांद्यावर डोकं ठेवून अगदी ओक्सबोक्शी रडायला लागला आणि पुढच्या काही क्षणात स्वतःच्या गुडघ्यावर बसत मान खाली घालून त्याने समोरच्या सगळ्यांसमोर हात जोडले….

 

त्याचं हे रूप सायली आणि तिच्या आईबाबांसाठी अनपेक्षित होतं. हा सुजय वरून अगदी साधा दिसणारा पण पट्टीचा खोटं बोलणारा असेल, आत्ताही स्वतःच्या आईवडिलांसमोर काहीही कबूल न करता तो खोटी कारणं उभी करेल अशी सायलीची समजूत होती. पण स्वतःच्या आईबाबांच्या नजरेला नजरही देऊ न शकणारा, खाली बसून ढसाढसा रडणारा, सायली आणि तिच्या आईबाबांसमोर हात जोडलेला असा सुजय तिच्या समोर होता. एका क्षणात तिचा राग निवळला. ती खरं तर आली होती त्याला जाब विचारायला, ह्या खोटेपणाबद्दल त्याला एक सणसणीत कानशिलात लगावून द्यायलापण आता ते सगळं करायची काहीच गरज नव्हतीआधीच मेलेल्याला आणखी काय मारणार?

 

आणखी पाचेक मिनिटांनी सु.सा.जरा शांत झाला. सायलीच्या बाबांकडे एकवार बघत पुन्हा मान खाली घालत म्हणाला,

तुम्ही खरं तर एक कानाखाली मारली पाहिजे माझ्या, किंवा पोलिसात जाऊन तक्रार केली पाहिजे….तुम्ही केलेले सगळे आरोप मान्य आहेत मला….”

 

सुजयकाय बोलतोयस तू नाही, तुझं हे काहीच न बोलणं, रडणं वगैरे ऐकून लक्षात आलंच होतं माझ्या की तुझा काहीतरी संबंध आहेपण काहीतरी एक्सप्लेनेशन असेल ना तुझ्याकडे? तू असं करणारच नाहीस कधीच, माझा विश्वास आहे ….तुला कोणी धमकी वगैरे दिली का असं करण्यासाठी? नक्की काय आहे ते तू सांगितल्याशिवाय नाही कळणार….” सु.सा.चे बाबा

 

बाबा माझ्याकडे काहीच एक्सप्लेनेशन नाहीये ह्याचं….मला कोणी धमकी दिलेली नाही किंवा माझ्या नकळत कोणी असं केलंय असंही नाहीये….” सु.सा.

त्याची आई सोफ्यावर शांतपणे बसून सुन्न होऊन सगळं ऐकत होती. मधेच डोळ्यांच्या कडा पुसत होती. स्वतःच्या मुलाचा, त्याच्या हुशारीचा, कर्तृत्वाचा किती अभिमान होता तिलाआज हा असा दुसऱ्यांना खोटी माहिती सांगून फसवणारा मुलगा तिच्या ओळखीचाच नव्हता.

अरे मग काहीतरी डोक्यात आलं म्हणून उगीच केलंस का असं? मला सांगह्या मुलीला , सायलीला तू ओळखत होतास का आधीपासून, काही राग होता का तिच्यावर?” सु.सा.चे बाबा

 

सांगतो. थोडक्यात सांगायचं तर माझ्यावर कोणीतरी केलेल्या उपकारांची भरपाई करायला गेलो मी आणि ही गोष्ट चुकीची आहे हे माहित असूनही मनावरच्या त्या ओझ्यामुळे हे करत राहिलो….सगळ्याची सुरुवात झाली ती लोणावळ्याला माझ्यावर झालेल्या त्या हल्ल्यापासून….आई, बाबातुम्ही यु.एस.ला जायच्या एक महिनाभर आधी माझ्यावर हल्ला झाला होता आणि जीवावरच्या त्या संकटातून त्याने मला बाहेर काढलं होतं…”

 

होगौरव दीक्षित….त्याचं नाव आपण आयुष्यभर नाही विसरू शकतपण त्याचं काय इथे?” सु.सा.चे बाबा

 

त्याचं खरं नाव सुजय साने….”

सु.सा.च्या बोलण्याने समोरच्या सगळ्यांच्या मनात आणि चेहऱ्यावर अगदी बोलके भाव आले होते, आधी आश्चर्य, मग कुतूहल

 

मग त्याने सगळं सविस्तर सांगितलं. सुजय त्याला भेटायला घरी आल्यापासून त्याने त्याला काय,काय सांगून हे करण्यासाठी तयार केलं, त्याच्या नातेवाइकांप्रमाणे सगळे नातेवाईक कसे खोटे, खोटे उभे केले अगदी साने आईबाबा सुद्धा हे सुद्धा….सगळंच

पण मला कळतच नाही सुजयत्याने तुला असं कर असं सांगितलं आणि तू केलंस? इतकी कशी बुद्धी गहाण ठेवलीस तू? आणि त्याचा तरी नक्की हेतू काय होता असं करण्याचा? म्हणजे कुठे त्या कटनीला जाऊन तो त्या मुलीच्या प्रेमात पडला त्याचा ह्या सगळ्याशी काय संबंध नक्की?” सु.सा.चे बाबा

 

मी म्हटलं ना बाबा, ती मुलगी त्याला आवडली पण नंतर स्वतःच्या घरचा, आईचा विचार डोक्यात आल्यावर त्याने लग्नाचा विचार बदलला. कारण ती मुलगी, तिची बॅकग्राऊंड, भाषा, संस्कार सगळंच वेगळं होतं आणि त्याच्या आईला हे कधीच चाललं नसतं. आणि खरं तर तिच्याबद्दल तिथल्या लोकांकडूनही फारसं काही बरं ऐकलं नाही त्याने, म्हणजे तिची बरीच प्रकरणं झाली होती वगैरे….हे कळल्यावर तर त्याने त्याचा लग्न न करण्याचा विचार पक्का केला अगदी आणि तसं तिला सांगितलं सुद्धा. पण मग ती मात्र हात धुवून त्याच्या मागे लागली. तिच्या घरचेसुद्धा. तो दाद देत नाही म्हटल्यावर त्यांनी तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवली, खोटी. त्याने तिला फसवलं, तिच्याशी फसवून लग्न केलं, वगैरे वगैरे. कसाबसा तो पुण्याला त्याच्या घरी पळून गेला, म्हणजे असं सहजपणे जाता आलं नसतंच. तिकडे पोलीस स्टेशनला तिथल्या काही स्टाफला पैसे चारून केस बंद करायला लावली त्याने म्हणून परत येऊ शकला तो, कारण त्याच्याकडे स्वतःच्या बाजूने काही पुरावाच नव्हता किंवा साक्षीदारही नव्हते.” सु.सा.

 

हे सगळं तुला कोणी सांगितलं?” सायली

 

अर्थात. त्यानेच. ” सु.सा.

 

पण मग ह्या सगळ्याचा आणि माझ्याशी खोटं बोलून लग्न करण्याचा काय संबंध?” सायली

 

तो तिथून परत आला आणि त्याचं नॉर्मल आयुष्य सुरु झालं. पण खरं तर ते नॉर्मल असं राहिलंच नव्हतं. सतत मनात झालेल्या त्या सगळ्या प्रकारची भीती, टेन्शन, आईपासून सगळं लपवण्याबद्दल अपराधीपणा ह्या सगळ्या दडपणाखाली तो सतत वावरायचा. मग त्याच्या आईने त्याच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. दोन वेळा त्याचं लग्न सुद्धा ठरलं पण मुलीकडच्यांना कसं, कोण जाणे ते पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या कम्प्लेंट बद्दल कळलं आणि दोन्ही वेळा त्याचं लग्न मोडलं. मग त्याच्या लक्षात आलं की आता लग्न करायचं म्हटलं की हे पुन्हा होऊ शकतं. मुलीकडच्यांना खरं सांगितलं तरी अशा कारणासाठी ज्याच्या विरुद्ध कम्प्लेंट केलेली आहे त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार ? तिकडे त्याची आई लग्नासाठी त्याच्या मागे लागली, तिचं मन त्याला मोडता येईना. मग अशा सिच्युएशन मध्ये आम्ही भेटलो लोणावळ्याला आणि आमचं नाव, वय, साधारण डिटेल्स मॅच होतायत असं त्याला कळलं आणि मग हे सगळं त्याच्या डोक्यात आलं. ”

 

पण तू का केलंस हे सगळं? आपण ओळखतही नाही एकमेकांनामग आपण ह्या सगळ्यात त्याची साथ दिली तर ह्या मुलीचं नुकसान होईल असा विचार नाही आला तुझ्या डोक्यात?” सायलीने त्याच्याकडे रोखून बघत त्याला प्रश्न विचारला.

तिच्या नजरेला नजर द्यायचं टाळत तो म्हणाला,

मला माहित आहे मी खूप मोठी चूक केली आहे. पण म्हणून मी ह्या सगळ्याला सरावलेलो आहे असं नाही सायली. त्याने जेव्हा मला ह्याबद्दल विचारलं, तेव्हा मी सुरुवातीला त्याला समजवायचा प्रयत्न केला, मुलीच्या घरच्यांना सरळ सांगत का नाहीस सगळं, हे सुचवून बघितलं. लग्नाचा विचार थोडा बाजूला ठेव, थोडा वेळ जाऊदे, असंही सांगितलं. पण त्याच्याकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती. आणि खरं सांगतोय, मी असं म्हणतोय म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझा राग येईल, पण हे असं करणं मला पटत नसलं तरी ह्यासगळ्यामागचा त्याचा विचार मला पटला. सगळ्या बाजूने कोंडीत सापडल्यासारखा झाला होता तो. मला माहित आहे, कुठल्याही परिस्थितीत हे असं वागणं चूकच. पण तरी मी समजून घेऊ शकलो त्याला. म्हणजे एखादा चांगल्या घरातला, चांगल्या संस्कारातून आलेला मुलगा असं टोकाचं वागतोय म्हटल्यावर त्याच्या मनावर किती दडपण असेल ह्याचा अंदाज त्याच्याकडे बघून येत होता. शिवाय त्याचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, त्याने जीव वाचवलाय माझा. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला नाही म्हणता नाही आलं त्याला…..”

 

पण कशावरून तो बोलत होता ते सगळं खरं होतं? म्हणजे कटनीला जे,जे घडलं ते कशावरून त्याने जसंच्या तसं सांगितलं तुला? कशावरून काही वेगळं घडलं नसेल, त्याच्या हातून काही चूक घडली नसेल, आणि कशावरून स्वतःच्या स्वार्थासाठी तो तुझी ओळख वापरत नसेल इतके दिवस? फक्त त्याने तुझा जीव वाचवला म्हणून तो एक खरा माणूस असेल असं कशावरून ठामपणे म्हणू शकतोस तू?”

 

त्याच्या वागण्यावरून तसं वाटलं नाही मला कधी. खरं तर अजूनही मला तसं वाटत नाहीये. आणि अगदीच आंधळेपणाने त्याच्यावर विश्वास नाही ठेवला मी. त्याने एक नंबर दिला होता, इन्स्पेक्टर नायक म्हणून, कटनीच्या त्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर होते ते. त्यांच्याशी बोललो मी स्वतः. त्यांनीसुद्धा सुजयची स्टोरी सांगितली मला शॉर्ट मध्ये. त्याच्या विरुद्ध खोटी तक्रार नोंदवली गेली होती हे सांगितलं आणि ती मुलगी खरी कशी आहे हेसुद्धा सांगितलं.” सु.सा.

 

खरंच माहित आहे तुला तिची स्टोरी?” सायली

 

तिची, त्या कोमलची ? तिची स्टोरी काय असणार आहे? जसं सुजयला फसवून लग्नाच्या जाळ्यात अडकवू बघत होती तसं आणखी काही मुलांच्या बाबतीत केलेलं असणार तिने….अजून वेगळं काय असणार आहे?” सु.सा.

 

मग तर तुला ऐकवायलाच हवी तिची स्टोरी. पण त्या आधी तुझा गैरसमज आहे, जो त्या सुजयने करून दिलाय, तो आधी दूर करते. एक म्हणजे, कटनी पोलीस स्टेंशनला सुजयची केस नोंदवली गेली तेव्हा कोणीही इन्स्पेक्टर नायक वगैरे नव्हते. शर्मा म्हणून इन्स्पेक्टर होते तेव्हा आणि दुसरं म्हणजे, जी कम्प्लेंट नोंदवली आहे ती सुजयने फसवल्याची किंवा फसवून लग्न केल्याची नाहीच आहे, काहीतरी वस्तू चोरल्याची आहे. आणि तिसरी गोष्ट ती कम्प्लेंट जिने केली तिचं नाव कोमल नाही माही आहे…आणि ही सगळी माहिती माझ्या मित्राने , सिद्धार्थने स्वतः तिकडे जाऊन, तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, भेटून मिळवली आहे.” सायली

 

माही? पण हे नाव मी ऐकलं नाही त्याच्याकडून कधी….” सु.सा.

 

पण मी ऐकलंय…” सायली

 

म्हणजे?” सु.सा.

 

काही नाही…”

त्याला कुठे सांगत बसणार, सुजय आपल्याला भेटायचा त्या दिवशी तीकशी यायची, मग तिचा आवाज कसा ऐकू आला, त्यातून कटनी आणि माही या शब्दांचा शोध आपल्याला कसा लागला….

खरं काय घडलं ते सगळं सांगेन मी तुलापण प्लिज तोपर्यंत त्या सुजयची साथ देऊ नकोस….मला तुझा इतका राग आला होता खरं तर, मी सरळ पोलीस कम्प्लेंट करायला जाणार होते तुझ्याविरुद्धपण माझे बाबा आहेत ना, त्यांचा अजून विश्वास आहे जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवरलग्नासाठी म्हणून माहिती मिळवताना आम्हाला कळलं होतं, एकूणच तुमचं घर, इथली माणसं किती साधी आहेत. तू जे वागला आहेस ना, तसं वागण्याचे संस्कार नाहीयेत तुमच्या घराचे, हे माहित होतं म्हणून माझ्या बाबांनी मला थांबवलं आणि सगळ्यात आधी तुझ्या आईबाबांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विश्वासात घेतलं. तुझ्या आयुष्याचं नुकसान होऊ नये म्हणून…..पण आता तुला ह्या सगळ्याची जाण असेल आणि केलेल्या गोष्टीबद्दल खरंच तुला वाईट वाटत असेल तर ह्या सगळ्याच्या शेवटापर्यंत मी पोहोचेपर्यंत त्या सुजयला कॉन्टॅक्ट करू नकोस….”

थोडं थांबून सायली पुढे म्हणाली,

आणि आणखी एक ..तुला जो सुजय कळलाय आणि मला जो सुजय कळलाय ते दोन्ही खूप वेगळे आहेत. पण तुला जे कळलंय ते त्याच्याच तोंडूनआणि मला तो जो समजलाय तो मी घेतलेल्या शोधामधून….जरा आणखी पुढे जाऊन विचार केलास ना तर तुला कदाचित लक्षात येईल मला काय म्हणायचंय तेमाझी माई आजी आहे ना ती नेहेमी आम्हाला सांगत असते अंधारातल्या सावल्यांबद्दलत्याला थोडी गूढतेची किनार असते..पण मला काय वाटतं माहित आहे का, ही सुजयसारखी लोकं म्हणजे सुद्धा अंधारातल्या सावल्याच असतात….दिवस आपल्यात वावरतात पण रात्री एरव्ही आपण कधीही न बघू शकणाऱ्या सावलीसारखी, गूढ, अदृश्य….म्हणून त्यांच्यापासून सावध राहायला लागतं”

सु.सा.च्या आईबाबांनी सायली आणि तिच्या आईबाबांसमोर अक्षरशः हात जोडले. त्यांना सायलीच्या आईबाबांसमोर आणखी काही बोलायला सु.सा.ने जागाच ठेवली नव्हती. त्याने केलेल्या गोष्टीची आणखी कुठेही वाच्यता न करता, ते घरी येऊन त्यांनी आधी आपल्यासमोर सगळं मांडलं, ह्याबद्दल त्यांचे शंभर वेळा आभार मानले. सु.सा.कडे ह्याच्यावर आणखी काही बोलण्यासारखं नव्हतंच. सायलीच्या बोलण्याने तो मनातल्या मनात गोंधळला होता. आज पहिल्यांदाच त्याला सुजयबद्दल, त्याच्या हेतूबद्दल मनात प्रश्न निर्माण झाले होते. सायली म्हणते त्याप्रमाणे त्या पोलीस स्टेशनमध्ये नायक म्हणून कोणीच इन्स्पेक्टर नव्हते, मग आपण नक्की फोनवर कोणाशी बोललो होतो? ती म्हणाली त्याप्रमाणे सुजयने काहीतरी वस्तू चोरल्याचा आरोप झाला होता त्याच्यावर, पण सुजयने आपल्याला सांगितलं की त्याने त्या कोमलला फसवून तिच्याशी लग्न केलं अशी खोटी कम्प्लेंट तिने नोंदवली होती. सायली म्हणाली ते वाक्य शंभर टक्के खरं होतं. सुजयबद्दल त्याला जे माहित होतं, ते सुजयनेच त्याला सांगितलं होतं,त्याबद्दल खरं खोटं करण्याचा त्याने कधीही विचार केला नव्हता.

सायली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आणि त्याबद्दल तुम्ही सगळे काय शिक्षा द्याल ती मान्य आहे मला, अगदी माझ्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार असाल तरीही मी कोऑपरेट करेनपण आधी माझ्याकडून तुला काही मदत हवी असेल तर सांग, नक्की करेनसुजयबद्दल मी चौकशी करायला हवी होती, मी आंधळेपणाने विश्वास ठेवला त्याच्यावर….पण आता त्याची थोडी तरी भरपाई माझ्याकडून होत असेल तर मी नक्की करेन…..”

 

थँक्समग मला सांगू शकशील का, की त्याचे, म्हणजे तुझे नातेवाईक त्याने कुठून उभे केले?” सायली

 

खरं तर त्याने मला जास्त कधी इन्व्हॉल्व्ह नाही केलं बाकी सगळ्या प्रकारात, आणि मलापण लांबच राहायचं होतं शक्य तितकं सगळ्यापासूनपण तरी थोडंफार माहित आहे तेवढं सांगतोत्याचे आईबाबा, म्हणजे साने आईबाबा, म्हणजे ज्यांना तुम्ही घरी इथे भेटलात पहिल्यांदा ते, त्याच्या कोणत्यातरी जवळच्या मित्राचे आईबाबा आहेत. तो मित्र कोणत्यातरी ऍक्सीडेन्ट मध्ये अचानक गेला आणि तेव्हापासून नंतर सुजयने त्यांची खूप काळजी घेतली अगदी त्यांच्या मुलासारखी….पण म्हणून ह्या सगळ्यात त्याला मदत करायला ते का तयार झाले माहित नाही…”

 

ऍक्सीडेन्ट मध्ये गेला म्हणजे तो संतोष?” सायली

 

हो बरोबर, त्यांच्याशी एकदा भेट झाली होती तेव्हा हेच नाव ऐकलं होतं मी….” सु.सा.

 

आणि बाकीचे लोक?” सायली

 

बाकी लोक म्हणजे नागपूरची मावशी आणि तिचे मिस्टर….ती मावशी त्याने कुठून आणली मला नीटसं माहित नाही, पण बहुतेक तिला थोड्या पैशांची गरज होती, हे सगळं करण्यासाठी त्याने थोडे पैसे दिलेच असणार तिला, आणि ते काका, मूळचे कटनीचे होते. कटनीला असताना हे एकमेव मराठी भेटले त्याला, असं त्यानेच सांगितलं मलामराठी म्हणून त्यांची थोडेच दिवसात छान ओळख पण झाली. पण त्यांना काय सांगून सुजयने हे सगळं करण्यासाठी विचारलं, माहित नाही…” सु.सा.

 

बरोबर, म्हणूनच मागे एकदा ईशाने त्यांचा पाठलाग केला, तेव्हा तिने त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतंदोनतीन दिवसात कटनीला येतो असं म्हणाले होते काहीतरी….” सायली

 

आणि राहिला कौस्तुभ, त्याला मीच कन्व्हिन्स केलं होतं सुजयच्या साखरपुड्याला जायलापण त्याला ह्यातलं काहीच माहित नाहीयेमी साखरपुड्याला येतो असं सांगितलं म्हणून तो तयार झाला आणि मग आयत्या वेळी मी येत नाही असं सांगून त्याला एकट्याला जाण्यासाठी तयार केलं….सॉरी ….” सु.सा.

 

इट्स ओकेसुजय. सारखं सॉरी म्हणू नकोस….पण तू एक चांगला मुलगा आहेस सो प्लिज डोन्ट चेंजथँक्स सगळ्या माहितीबद्दल….मी म्हटलं तसं जमलं तर एकच कर आता, त्याचा फोन आला तर नेहेमीसारखाच बोल त्याच्याशी, हे सगळं डोक्यात ठेवून बोललास तर त्याला संशय येईल….आणि काही सांगण्यासारखं असेल तर प्लिज आम्हाला सांग…”

देशपांडे मंडळी त्यांचा निरोप घेऊन तिथून निघाले. एकीकडे पश्चात्ताप, दडपण, आईबाबांसमोर तोंड वर उचलून बोलायची लाज ह्या सगळ्या भावना होत्याच मनात. पण त्याच बरोबर सायलीचं त्याला कौतुक वाटत होतं. तिचे विचार किती क्लीअर होते, स्पष्ट, त्यात कोणताही गोंधळ नव्हता, स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत हा सगळा फसवाफसवीचा खेळ होऊनसुद्धा ती किती शांत होती, आतल्या आत चीड येतच असणार तिला पण तरीही किती कॉम्पोज्ड होती, स्वतःच्या आईबाबांनाही तिने विश्वासात घेतलं होतं….आपण पण असे ठाम असलो असतो आपल्या विचारांवर, तर कदाचित सुजयला मदत करण्याचा हा चुकीचा निर्णय घेतलाच नसता. चांगलं आणि योग्य वागण्यासाठी नुसतं चांगल्या घरातलं आणि चांगल्या संस्कारात वाढलेलं असणं महत्वाचं नसतं, तर ते संस्कार अप्लाय करणं आणि स्वतःसाठी योग्य मार्ग निवडणंही तेवढंच महत्वाचं असतं…..थँक्स सायली मला चुकीच्या मार्गावर आणखी पुढे जाण्यापासून थांबवल्याबद्दल….

————————————————

काल रात्री ठरवल्याप्रमाणे तो सायलीच्या घरापाशी आला. दोन मिनिटं बाहेर थांबून आत गेल्यावर नक्की काय बोलायचं ह्याची त्याने मनात उजळणी केली. आणि मग जाऊन बेल वाजवली.

दोन मिनिटांनी ईशाने दार उघडलं. सुजयला असं अचानक समोर बघून पटकन कसं रिएक्ट व्हावं हेच तिला कळेना.

सुजय, तू ? आत्ता ?”

 

होका ? तुम्ही झोपलायत की काय अजून सगळे?” खोटं हसत तो म्हणाला.

 

काहीही काय? साडेनऊ होत आलेत….एवढा वेळ कोणी झोपतं का? ” ईशा अजून विचारातच होती..

 

मला बघून फारसं काही बरं वाटलेलं दिसत नाही तुला….बघ ना, अजून घरात पण नाही घेतलंयसआणखीनच खोटं हसत त्याने तक्रार केली

पण मधल्या अर्ध्या मिनिटात ईशाही सावरली होती तो अचानक घरी आल्याच्या धक्क्यातून

अरे सॉरी हाये ना आतआता तर काय हे तुझंही घर होणार नाजावयाला काय बाबा सॉलिड मान देतात आपल्यात..अरे सायली, मावशी आणि काका आत्ता सकाळीच बाहेर पडलेततू यायच्या आधी अर्धा तास वगैरेआता तू नक्कीच सायलीला भेटायला आला असणार नापटकन सायलीला फोन करून परत बोलवू का असा विचार करत होते मी….पण तसा अर्धा तास झालाय अरे त्यांना निघूनपाचदहा मिनिटं झाली असती तर बोलावलंच असतं परत….” ईशा शक्य तितक्या नॉर्मल टोनमध्ये म्हणाली.

 

अरे ..हो का? मी खरंच तिला भेटायला आलो होतो, इथेच काम होतं जवळ माझं, म्हटलं भेटून जाऊया पटकन..”

सायली आणि तिचे आईबाबा घरी नाहीत म्हटल्यावर तो कमालीचा निराश झाला होता खरं तर. आता त्यांच्या रिएक्शन्स कशा कळणार ? किंवा लग्नाची गडबड खरंच चालू आहे का ह्याचा अंदाज कसा येणार? आता ह्या ईशालाच प्रश्न विचारून काढून घेतलं पाहिजेपण सायली एवढ्या सकाळी कुठे गेली असेल नक्की? सुजयचे आईबाबासुद्धा आज सकाळीच येणार होते…..हा विचार मनात आला आणि तो एकदम सावध झाला.

तू बस. मी पाणी आणते हा…”

त्याचे प्रश्न सुरु होण्याआधी ईशा तिथून दोन मिनिटांसाठी का होईना पण निघून गेली.

 

किचनमध्ये आल्यावर तिचं विचारचक्र जोरात सुरु झालं. हा इतक्या सकाळी का आला असेल नक्की? आणि ह्याने आता विचारलं सायली एवढ्या सकाळी कुठे गेली आहे तर काय सांगायचं? हालग्नाच्या शॉपिंग ला गेली आहे सांगूयापण मोठी शॉप्स सगळी दहाच्या पुढे उघडतातएवढ्या सकाळी नऊ वाजता कोण शॉपिंगला बाहेर पडतं? आणि हा म्हणाला की मी दुकानात जाऊन तिला भेटतो तर? पण पाण्याचा ग्लास भरून किचनमधून बाहेर येईपर्यंत तिला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.

हे घे पाणीआणि तू काय घेशील? चहा की कॉफी? सॉरी हा, म्हणजे मी मावशीने करून ठेवलेले पोहे आत्ताच संपवलेआणि मला बाकी स्वयंपाकातलं काही येत नाही..म्हणून चहा, कॉफीच विचारतेय…” ईशा

 

ईशा, मी काय पाहुणा आहे का? अगं अगदी दहा मिनिटांसाठी आलो मीचहा, कॉफी काही नको…” सुजय

 

असं कसं? मावशी आल्यावर तिला कळलं की जावयाला चहा न घेता पाठवलं तर ती मला ओरडेल….थांब मी चहाच करून आणते…” ईशा पुन्हा चहा करण्यासाठी किचनमध्ये जायला सटकणार, तेवढ्यात सुजय म्हणाला.

 

अगं खरंच नको ईशामी चहा घेतला आणि बाहेर पडलोमला सांग, सायलीला यायला किती वेळ लागेल अजून?” सु.सा.

 

तसा अंदाज नाही रे मला….” ईशा

ती काही स्पष्ट बोलत नाही म्हटल्यावर आणखी प्रश्न विचारणं आलं.

पण गेलीये कुठे ती एवढ्या सकाळी?” सुजय

 

अरे लग्नाची खरेदी, आणखी काय असणार आता? लग्न ह्याशिवाय दुसरा विषय नाहीये आता घरात…” ईशा

 

पण एवढ्या सकाळी? म्हणजे नक्की कुठे गेलेत शॉपिंगला? नाही म्हणजे, इथेच कुठे असेल तर मी पण जातोतिथेच भेट होईल सगळ्यांची…” ईशाला अपेक्षित प्रश्न शेवटी आलाच.

 

नक्की कुठे ते मलाही नाही माहितम्हणजे काय आहे, कुठल्या दुकानात असे नाही गेलेत तेकाल रात्री मावशीच्या कुठल्यातरी मैत्रिणीचा फोन आला होता. तिच्या ओळखीचा एक माणूस आहे तो येवल्याच्या पैठण्या इथे आणून विकतो. तर तिने विचारायला फोन केला होता, की घरात लग्न आहे तर पैठण्या घ्यायच्या असतील तर घरी या. तो माणूस सकाळीच येणार होता तिच्याकडेमग म्हणून गेले सगळे. आज तसा आमचा साडी खरेदीचा प्लॅन होताच संध्याकाळी. मग सायली म्हणाली की त्याच्याआधी त्याच्याकडे काही मिळतंय का बघूपण मावशीची मैत्रीण कुठे राहते मला माहित नाहीएक मिनिट सायलीला विचारते फोन करून…” ईशाने मोबाईल शोधायला सुरुवात केली तसा सुजय म्हणाला,

 

नाही मग राहूदे अगंअसं कुणाच्या घरी कसं जाणार ना एकदमपण मग तू नाही का गेलीस? तुम्ही एकत्र खरेदी करणार होतात नाम्हणजे सायलीला मदत झाली असती ना तू चॉईसला असतीस तर….” सुजय

 

संध्याकाळी जाणारच आहे अरे मीआत्तापण सायली मागे लागली होतीचपण एवढ्या सकाळी कोण उठून जाणार? ते पण त्या बोअरिंग पैठण्या बघायला? मला त्या ट्रॅडिशनल साड्यांमधलं काही कळत नाही अरेआणि काल झोपायला उशीर झाला होतासकाळी ते निघाले त्याच्याआधी दहा मिनिटं मी उठले कशीबशी….सायली मला शिव्या देताच गेली माहित आहे?” ईशा दात काढत म्हणाली..

 

आणि बाकीचे कुठे गेले घरातले?”

 

अनि कॉलेजला गेलायआज सबमिशन होतं त्याचंआता मी आणि माई आजीच घरात….ती झोपली आहे…” ईशा

 

अच्छामाझा आज काही योग दिसत नाही मगसायली, आईबाबा, अनिकेत कोणीच भेटेल असं वाटत नाही….चल मग मी निघतो…” सुजय

 

अरे चहा तरी घेऊन जा…” ईशा खोटा आग्रह करत म्हणाली.

 

नको , येतो नंतर कधीतरी….” सुजय आता उठलाच..

 

तुमची खरेदी वगैरे, बाकीची तयारी झाली का?” ईशाने मुद्दाम लग्नाचा विषय काढला.

 

? हो, म्हणजे सगळी नाहीचपण सुरु आहे….” सुजय

 

अच्छा…”ईशा

 

चल मग निघतो मी…”

सुजय बाहेर पडला तसं ईशाने दार लावलं आणि मोठठं हुश्श्य केलं. सायलीला कळवायला हवं म्हणून तिला फोन लावला तर फोन उचललाच नाही गेला….

हम्म….बाईसाहेब तिकडे त्या ओरिजिनल सुजयला झापण्यात बीझी असतील नागुड गोइंग सिस्टर….”

ईशा गालातल्या गालात हसली. तेवढ्यात माई आजीने हाक मारली म्हणून ती आत गेली.

बायो, कुणी आलं होतं काय?”

 

अगं गेस हू? सुजय आला होता…” ईशा

 

तो कशाला आला होता? सायली तिकडे, त्या सुजयच्या घरी गेली आहे हे कळलं की काय त्याला?” माई आजी

 

छे गं, मला नाही वाटत तसं…..पण काहीतरी माहिती काढायला आला होता असं सारखं वाटतंय….सगळ्यांबद्दल विचारत होतापण मी काही दाद लागू दिली नाही त्यालागेला मग तसाच परत….” ईशा

 

गुणाची गं ती माझी पोरकाय गो, पण काल रात्री काय बोलणं चाललं होतं तुमचं? मी झोपले होते ना, पण तुमचे आवाज येत होते कानावर….सकाळी ह्यांची जायची गडबड…” माई आजी

 

मग काय? मी येणार पण होते तुला उठवायलापण मावशीने अडवलं. अगं काल दुपारी सिद्धार्थचा फोन आला होता. ते पण सांगायला आली होती तुला सायली, तेव्हाही तू झोपलेलीच….” ईशा

 

अगो बायो, आता काय करू सांगत्या डॉक्टरने ही पायाच्या दुखण्याची औषधं दिली आहेत ना, त्याने मेली झोपच फार लागते गो…” माई आजी

 

हम्ममाहित आहे….तर सिद्धार्थचा बराच वेळ फोन आला नव्हता कारण तो तिथल्या म्हणजे कटनीच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता…” ईशा

 

पोलीस स्टेशनला?” माई आजी

 

हो काल सकाळी उठल्यावर तो विचार करत बसला होता. कालचाच दिवस राहिला होता ना कटनीमधलाएक दिवसात आता काय करता येईल ह्याचा तो विचार करत होता. मग त्याच्या डोक्यात आलं, की सुजयने काहीतरी केलंय म्हणून त्याच्या मागे हे सगळं लागलंय, बरोबर? त्या कोमलचा आणि त्याचा एकमेकांशी लग्न करण्याचा विचार झाला होता एवढं आपल्याला कळलं होतं. मग त्यावरून पुढचा अंदाज बांधला तर कदाचित त्याने तिला फसवलं असेल किंवा गैरफायदा घेतला असेल किंवा त्या घरात त्याला ती लाल कपड्यातली वस्तू मिळाली ती घेऊन तो पळून गेला असेल….तर कदाचित त्या मुलीने ह्या सगळ्याची तक्रार पोलिसात केलेली असू शकतेअसा विचार त्याने केलासायली त्याला सुचवणार होती आपण विचार केला होता तो..म्हणजे ह्या गोष्टीतल्या पात्रांना जाऊन भेटायचं, शाळेतले गुरुजी, किंवा ती कोमल, किंवा तिची आई, छू , असं कोणालातरीपण एकतर त्या कोमलचा पत्ता नव्हता आपल्याकडे …मग खूप वेळ लागला असताआणि त्यात सायलीने त्याला हे सुचवायच्या आधीच तो पोलीस स्टेशनला गेला होता…”

 

अस्सं….मग काय झालं तिथे?” माई आजी

 

त्याला कसंतरी पटवावं लागलं त्या पोलीस स्टेशनमधल्या काही लोकांना. एकतर सामान्य माणूस येऊन असली चौकशी करतोय म्हटल्यावर त्याला कोण दाद देणार? तो ना कुठल्या पॉलिटिकल पार्टीचा, ना कोणी पत्रकार, ना त्याची तिथे कोणाशी ओळखत्यांच्या प्रोसिजर प्रमाणे त्यांनीच ह्याची चौकशी केली, सगळी माहिती विचारली, कोण, कुठला, माहिती कशासाठी हवीये वगैरेएकदोन ठिकाणी फोन करून त्याच्याबद्दल चौकशीसुद्धा केली..पण हे सगळं होण्यासाठी सुद्धा पैसे चारावेच लागले त्याला तिथल्या दोघांनामग ती चौकशीची फॉर्मॅलिटी झाल्यावर त्यांनी मागचे दीड वर्षापूर्वीचे रेकॉर्डस् काढलेआणि त्यात सुजयविरुद्ध एका मुलीने तक्रार केल्याचे रेकॉर्डस् मिळालेअर्थात पोलिसांनी त्याबद्दल फार काही केलं असेल असं नाही, म्हणून तर तो मोकाट फिरत असली कामं करतोयपण ते जाऊदेत….सिद्धार्थने सांगितलं हे सगळं, त्यात दोन गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत माई आजी….”

 

कुठल्या त्या?”

 

एक म्हणजे, ती तक्रार त्या कोमलने नाही केलीये, जिने तक्रार केली आहे, तिचं नाव आहे माही व्यास….तुला आठवतंय का माई आजी, सायलीला तीच्या त्या घाणेरड्या आवाजात काही अगम्य अक्षरं ऐकू आली होती, मग आम्ही त्याचा अर्थ लावला, तर कटनीआणि माहीअसे दोन शब्द मिळाले होते…..त्यातली ही माही आत्ता समोर आली, पण ती नक्की कोण असावी? त्या कोमलचं आडनाव पण व्यास होतं, म्हणजे तिच्या डायरीमध्ये तसंच लिहिलेलं आहे, आणि ही माही व्यासम्हणजे तिची बहीण असावी कदाचितपण तिच्या डायरीमध्ये त्याबद्दल कोणताच उल्लेख नाही…..म्हणजे पुन्हा कोडं आहेच आपल्यासाठी….”

 

अगो, कोडी पडतायत ती पुढच्या गोष्टी उलगडण्यासाठीच ना….बरं मग आणखी दुसरी गोष्ट कोणती कळली त्याला?” माई आजी

 

तिच्या डायरीतून सायलीने अर्थ लावून लावून सगळं वाचलं होतं, त्यात शेवटच्या पानावर एका लाल कापडात गुंडाळलेल्या वस्तूचा उल्लेख आला होताती कोमल देवळात गेली आणि सुजय त्या घरातच थांबला होता आणि मग भिंतीवर लिहिलेलं पुसण्यासाठी काहीतरी शोधत असताना त्याच्या हातात ती लाल कापडात गुंडाळलेली काहीतरी वस्तू लागलीमाई आजी, पोलीस कंप्लेंटमध्ये जे लिहिलेलं होतं त्याच्याप्रमाणे सुजयने तिची एक अत्यंत महत्वाची वस्तू तिला फसवून, न सांगता पळवून नेली आणि त्या चोरलेल्या वस्तूच्या वर्णनात लिहिलं होतं, ते एक लाल कापडात गुंडाळलेलं भलंमोठं पुस्तक होतं….”

 

अगो बाई….आता हे काय असेल आणखी नवीन …?” माई आजी

 

बघ ना, मला ना, हे सगळं खरं घडतंय असं वाटतच नाहीयेतो सिद्धार्थ तिकडे गेला काय, तिकडे त्याला कसलेतरी भलतेसलते अनुभव आले काय, मग ती डायरी, विचित्रपणे लिहिलेली, त्यातून उलगडत गेलेली स्टोरी, आणि आता हे सगळं….अगं हे सगळंच एक स्टोरीच आहे असं वाटतंयकिंवा एखादा दर पाच मिनिटांनी नवीन धक्के देणारा किंवा एकामागोमाग एक रहस्य उलगडणारा मुव्ही असतो ना, तो बघितल्यासारखं वाटतंय….”

 

खरंय गोमग काय झालं पुढे?”

 

पुढे फार काही नाही तसंसिद्धार्थची रात्रीची ट्रेन होती, पण मध्ये थोडा वेळ होता….मग सायलीने आणि त्याने ठरवलं की त्या माही व्यास च्या घरी, म्हणजे पोलीस कंप्लेंट मध्ये तिचा पत्ता मिळाला ना, तर तिच्या घरी त्या पत्त्यावर जाऊन बघायचं ती किंवा ती कोमल किंवा ती अम्मा कोणी भेटतंय का तेमग तो गेला पण होता पण ते घर तर बंदच होतंआजूबाजूलासुद्धा तसं कोणी भेटलं नाहीच त्याला….बाजूच्या घरात थोडी चौकशी केली त्याने पण ते नुकतेच राहायला आले होते, बाजूच्या घरात जाऊन येऊन कोणीतरी असतं असं म्हणाले, पण कोणी राहत नाही तिकडे असं कळलं त्याला….मग काय आणखी कुठे जाऊन विचारायला वेळच नव्हता, स्टेशन लांब होतं तिथूनआता सकाळी पोहोचेल सिद्धार्थ मुंबईमध्ये….”

 

हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं झालं असंच वाटतंय गो….तिकडे त्या घरात कुणी भेटलं असतं तर निदान काहीतरी कळू शकलं असतं…”

 

हो ना….आता पुढे काय करायचं प्रश्नच आहे….त्यात त्या ओरिजिनल सुजयचा चॅप्टर आज सायली बंद करतेय ते चांगलं आहे, आता सुजयला त्याची साथ तरी नाही मिळणार …”

————————————————————–

हे सगळं चालू होतं तेव्हा तिकडे सीएसटी स्टेशनमध्ये बाहेरगांवची एक ट्रेन धडधडत येऊन थांबली. भराभर सगळे प्रवासी आपापलं जड सामान बाहेर काढून बाहेर पडलेत्या गर्दीतच सिद्धार्थही उतरला. स्वतःचं सामान सावरत तो पुढे चालायला लागणार तेवढ्यात मागून एका मुलीचा आवाज आला,

अरे भैय्या, ये कितनी भीड है यहा….”

 

तुम मुंबई पेहेली बार आई हो नाहमने कहा नही था? यहा बहोत भीड रेहेती है…” तिच्या मागून आलेल्या सिध्दार्थच्याच वयाच्या एका मुलाचा आवाज

सिद्धार्थ गालातल्या गालात हसला. अरे हो, ह्यांना काही आपल्यासारखी मुंबईची सवय नाही, आपण जणू काय हे अगदी सहज एवढ्या गर्दीत आपल्या मागून येतील असं समजून निघालो, पण थोडं थांबून निघावं, गर्दीचा भर ओसरला की

वेलकम टू मुंबईसॉरी मुझे बताना चाहिये थायहा भीड बहोत रेहेती है..हम लोग पाच मिनीट के लिये वहा खडे रेहेते है फिर निकलेंगेभीड थोडी कम हो जायेगी ना फिर….”

 

और यहांसे कितना दूर भैय्या?”

 

यहांसे बस आधा घंटा टॅक्सी करके जायेंगे…” सिद्धार्थ

 

क्रमशः

Leave a comment