अज्ञाताची चाहूल : (भाग : 46)

“अम्मा …” असं ओरडतच ती धावली. सगळ्या गर्दीला बाजूला करत अम्मापाशी गेली…अम्मा समोर निपचित पडली होती…डॉक्टरांना तिची नाडी लागत नव्हती. त्यांचे शर्थीचे प्रयत्न चालले होते…एका क्षणी अम्मा थोडे डोळे उघडून आपल्याकडे बघतेय असं कोमलला वाटलं…पण एकच क्षण …त्यानंतर तिने डोळे मिटले ते कायमचेच.

—————————-ह्यानंतर पुढे———————-

 

सुन्न होऊन ती किती वेळ तिथेच बसून होती, तिला कळलंही नाही. हॉस्पिटलची एक नर्स तिच्यासाठी चहा घेऊन आली..तिला धीर द्यायला म्हणून काहीतरी बोललीघरी आणखी कोणी आहे का, कोणाला कळवायचं आहे का असं काहीतरी विचारत होती. ज्या कंपनीच्या ट्रकने बसला धडक दिली, त्या कंपनीने अपघाताची सगळी जबाबदारी घेतली आहे आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या लोकांचा खर्च करण्याची तयारी असल्याचं सांगितलंय त्यामुळे बिल भरण्याची काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर, संध्याकाळी हा बेड नवीन पेशंटसाठी तयार करायचाय, अम्माचं सामान गोळा कर म्हणालीती तरी बिचारी आणखी काय करणार, त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हतं..

 

अम्माची ती गावाला नेलेली बॅग, तिचा चष्मा, अंगावरची शालसगळं गोळा करून कोमल तिथून जायला निघाली. बाजूचे पेशंट्स आणि नातेवाईक सहानुभूतीने तिच्याकडे बघत होते..एका पेशंटच्या म्हाताऱ्या आईने तिच्या समोर जाऊन, तिच्या डोक्यावरून हात फिरवला

काळजी करू नकोस बेटा, तो बघतोय…” वर हात करत ती म्हणाली तो सगळं ठीक करेलतुझ्या अम्माबद्दल मात्र मनापासून वाईट वाटतंयबिचारी त्या शेवटच्या घटका मोजत असतानाही तिला तुझ्या लग्नाबद्दल असं काही कळावं? माफ कर हा, आत्ता हे बोलायची वेळ नाही खरं तरपण राहवत नाही अगदीच म्हणून..त्या मुलाचा हेतू चांगला नाही वाटला मला.. माझा मुलगा असा हॉस्पिटलमध्ये पडून राहिलाय, रात्र रात्र झोप लागत नाही बघ मला…जागीच होते मी तो इथे आला होता तेव्हा…….काल रात्री तू तुझ्या अम्माला सगळं सांगत होतीस ना, ऐकलं मी सगळं…पण मग तो काहीतरी वेगळंच बोलत होता फोन वर, आणि तुझ्या अम्माला ते कळलं गं बहुतेक…सगळी शक्ती लावून तुझ्या अम्माने फोडलेला हंबरडा अजून कानातून जात नाही गं, म्हणून सांगतेय तुला …”

त्या बाईचं बोलणं ऐकून कोमल चमकली. काय बोलतायत ह्या? त्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर जे कळलं, ते अम्माच्या जाण्याइतकंच अनपेक्षित होतं तिच्यासाठीत्या बाईच्या बोलण्यावरून, ती नर्सबरोबर पेपर्सवर सह्या करायला गेली त्यावेळी नक्की काय झालं असेल ह्याचं चित्रच तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं.

**************************

अम्माची तब्येत बिघडायला लागली तेव्हा सुजयची आठवण झाल्यावर कोमलने त्याला फोन केलातो झोपेत होता..कोमलने अम्माच्या तब्येतीबद्दल सांगितलं तेव्हा आधी तो म्हणाला,

डोन्ट वरी, काही होणार नाहीमला सकाळी फोन करून कळव अम्माची तब्येतमी येतो सकाळी

मग कोमलने त्याला विचारलं, तुला आत्ता यायला नाही का जमणारथोडे आढेवेढे घेत तो तयार झाला. कोमल त्यावेळी प्रचंड टेन्शनमध्ये होती त्यामुळे सुजय फोनवर काय बोलतोय, कसा बोलतोय, तिच्या मेंदूने ह्या गोष्टींची दखलही घेतली नाही. मात्र आता सगळं आठवताना मात्र तिला त्याच्या बोलण्यातला तुटकपणा जाणवलाअसं का बोलला तो माझ्याशी? तो विझिटिंग अवर्समध्ये येणार नव्हता म्हणून नंतर तिने हॉस्पिटलच्या बाहेरच्या गार्डला सांगून त्याला आत येऊ देतील अशी व्यवस्था ही केली..

 

नंतर अम्माची तब्येत आणखीनच नाजूक झाली. डॉक्टर्सची धावपळ सुरु झाली, ह्या सगळ्यात सुजय कुठे होता? आपल्याला साथ द्यायला सुद्धा तो आला नाही? हे सुद्धा तिच्या आत्ता मनात येत होतंत्यावेळी, त्या सगळ्या गडबडीत त्याला फोन केला होता आणि तो येतोअसं म्हणाला होता हे सुद्धा ती विसरून गेली होती

 

कोमल नर्सबरोबर गेली, तिला परत यायला पंधरा मिनिट्स तरी लागले असतीलबरोबर ह्याच वेळी सुजय तिथे आला. अम्मा बेडवर झोपलेली, विव्हळत होती, मधेच ओरडत होतीआजूबाजूचं भान थोडं कमी झालं असावं तिचं..एक नर्स तेवढ्यात तिचं बीपी चेक करून गेली… सुजय बहुतेक कोमलच्या येण्याची वाट बघत असावा. तो अवघडल्यासारखा अम्माच्या समोर उभा राहिला होता. त्या अवस्थेतही त्याला बघून तिने त्याला ओळखलं असावंकदाचित आपल्या बिघडलेल्या तब्येतीवरून पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज तिला आला असणारकोमल, तिचं भविष्य, तिचा एकटेपणा ह्या काळज्या मनात परत सुरु झाल्या असणारसुजय समोर दिसल्यावर तिने एक हात पुढे केला..त्याचा हात हातात घेण्यासाठी..

 

पण सुजय एकही पाऊल पुढे झाला नाही, काही बोललाही नाही

 

अम्माचा जीव जणू काही त्याला आणि कोमलला भेटण्यासाठी घुटमळला होता. पुन्हा एकदा तिने त्याच्या दिशेने हात पुढे केला. कदाचित त्याच्याकडून कोमलला साथ देण्याचं प्रॉमिस हवं होतं तिलापण याही वेळी तो थोडं लांबच उभा राहिला.

 

तू…..” अम्मा आता जे बोलायचा प्रयत्न करत होती, ते समजण्यापलीकडचं होतं. तेवढ्यात सुजयचा फोन वाजला. अम्माची परिस्थिती पाहून त्याला एकूण पुढे काय होणार त्याचा अंदाज आलाच होता. आजूबाजूला एकूणच शांतता होती…आधी त्याने फोन पटकन कट केला…दोन मिनिटांनी पुन्हा फोन वाजला. ह्यावेळी वैतागून त्याने फोन उचलला आणि अम्माकडे आणि आजूबाजूला एक नजर टाकून थोडं दबक्या आवाजात बोलायला लागला.

काय रेआता काय परत प्रशांत?”

 

“……”

 

“हिंदीतून? कशाला…..बरं …बोलतो..”

(पुढचं हिंदीतून झालेलं संभाषण आपल्या सोयीसाठी मराठीतून …)

“फोनची बॅटरी डाऊन आहे तर मग एवढं काय अर्जंट आहे बोलण्यासारखं?”

 

 

“हा मग ठीक आहे…तू फोन चार्जिंगला लावून स्पीकरवर बोलणार असशील तर हिंदीतूनच बोललेलं बरं…आत्ता तुझ्या घरात सगळे झोपले असतील पण चुकून आपलं बोलणं ऐकू आलं तर तू दुसऱ्या कोणाशी बोलतोयस असं तरी वाटेल नाहीतर माझ्याशी बोलतोयस ते लगेच कळेल त्यांना. ..पण काय आहे काय एवढं अर्जंट ? “

 

“…..”

 

हो रे बाबा, पोहोचलोय मी हॉस्पिटल मध्ये….तू म्हणालास म्हणून आलोय इथे….मला खरंच कळत नाही तुझंएकीकडे मगाशी तुला फोन करून कोमलबद्दल सांगितल्यावर तू मला इथूनच मागे फिर असं म्हणालास आणि मग नंतर तिचा हॉस्पिटलमधून फोन येऊन गेल्याचं कळल्यावर तिला इथे हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट असंही म्हणतोस….”

 

“…….”

 

मला माहित आहे त्यांना गरज असेल आत्ता….पण मी अडकत जाईन ना मग…तुझं म्हणणं पटलंय मला…तिचं आणि माझं जमणं कठीण आहे, आई तर कधीच तयार नाही होणार…मी कसा वाहवत गेलो मला कळलंचं नाही…मग जर मला पुढे जायचंच नाही तर मी आत्ता ह्या सगळ्यात कशाला अडकू? मी उद्याच तिला सांगणार होतो पण मगाशी तिचा फोन आला अम्माची तब्येत बिघडली म्हणून….आत्तापासूनच त्यांच्या सगळ्या भानगडीत अडकायला लागलोय मी असं वाटतंय मलात्यात आता हे तिच्या आईचं असंती बरी झाली किंवा नाही झाली झाली तरी डोक्यावर माझ्याच येणार त्या दोघींचं बघायला नकोच त्यात पडायला… “

 

“…….”

 

अरे मी म्हटलं ना मी वाहवत गेलोती त्या लग्नात भेटल्यावर आवडली होती रे मलाम्हणून तिच्या मागे मागे ह्या गावात आलोपण जाऊदेत आता तेइथून कशाला सगळं बोलायला लावतोयस मला? आता आधी तिला भेटून सांगून टाकतो, मी लग्न करू शकत नाही म्हणून….”

 

“…….”

 

 

मग काय म्हणणं आहे आता तुझं?”

 

“…….”

 

अरे मला हेच कळत नाही तुझं……जर मला लग्न करायचंच नाहीये तर मग हे नसतं दुखणं मी कशाला गळ्यात मारून घेऊ?”

 

“…..”

 

मला खरंच कळत नाही तुझंतिची अम्मा आत्ताच तिचा हात माझ्या दिशेने पुढे करून काही सांगायला बघत होतीबहुतेक कोमलने तिला आमच्याबद्दल सांगितलेलं असणारआता तिच्या अम्माला काय मी प्रॉमिस करू का तिच्या मुलीला सुखात ठेवेन वगैरेआत्ताच सांगितलं नाही तर प्रॉब्लेम होईल….”

 

“…..”

 

अरे कशाला माझं डोकं खातोयस प्रशांत? तू मला पुढचा विचार करून तिच्यात न गुंतण्याचा सल्ला दिलास त्याबद्दल थँक्सपण आता मला ठीक वाटेक तेच मी करणार आहेहवं तर आधी तिला आणि तिच्या अम्माला स्पष्ट कल्पना देऊन मग त्यांना काही मदत लागली तर करेन ना मी…..चल ठेवतो आतानंतर बोलतो…”

———————————————

हा प्रशांत म्हणजे तोच ना काका, सुजयचा मित्र, ज्याने तुम्हाला तिथे काय झालं ह्याची थोडीफार कल्पना दिली होती आणि मग तो ऍक्सीडेन्ट मध्ये गेला?” सायलीने सुजयच्या काकांकडे (नारायण साने) बघत विचारलं.

 

हो..तोच असणार..कारण एखादी मुलगी आवडली किंवा तिच्याशी लग्न करायचंय वगैरे ह्या असल्या गोष्टी त्याच्याशिवाय आणखी कोणाकडे शेअर करणार नाही, म्हणजे त्याच्या इतका जवळचा दुसरा कोणी मित्र मला तरी माहित नाही….पण मला एका गोष्टीचं नवल वाटतंयसुजय मध्य प्रदेशावरून परत आल्यानंतर काही दिवसांनी प्रशांतने हे माझ्या कानावर घातलंआणि सुजयला खोदून खोदून विचारलं असं म्हणालापण आता हे ऐकल्यावर जे कळतंय त्या प्रमाणे, सुजयने तिच्याशी लग्न करण्याचा विचार सगळ्यात आधी त्याला सांगितला होता, तो सुद्धा तो कटनीला असतानाआणि त्याचंच ऐकून त्याने लग्न न करण्याचं ठरवलं. मग प्रशांतने मला हे आधीच का नाही सांगितलं?”

 

मिस्टर साने, हा प्रशांत कसा मुलगा होता?” सायलीचे बाबा

 

फार चांगला. असा मित्र असणं म्हणजे सुजयचं खरंच भाग्य. कधीही त्याला चुकीचा सल्ला देणार नाही, असा. म्हणजे खरं तर त्याने त्या वेळीही त्याला योग्य तोच सल्ला दिला असं माझं मत झालंयआमच्या वाहिनी खरंच तयार झाल्या नसत्या त्यांच्या लग्नालाआणि फक्त पाचसहा दिवसांच्या ओळखीवर असा लग्नाचा निर्णय घेतलेला चुकू शकतोच…हा सगळा विचार प्रशांतने केला असेल…मग त्याने मला तेव्हाच का नाही सांगितलं हे मला कळत नाहीये….” सुजयचे काका

 

“मला वाटतं, त्याचा मित्र म्हणून त्याचं सिक्रेट जपणं महत्वाचं वाटलं असणार त्याला त्यावेळी…पण कदाचित सुजय परत आला त्यावेळी त्याच्या बदललेल्या स्वभावावरून त्याला हे सगळं घरातले मोठे म्हणून तुमच्या कानावर घालणं महत्वाचं वाटलं असणार…म्हणून तर तो तुम्हाला आणखी काही सांगायला येणार होता…कदाचित त्याला हे आधीपासून माहित होतं हेच सांगायचं असेल त्याला, पण संधी नाही मिळाली…” सायली

 

छूमग पुढे काय झालं?” ईशा

———————————————-

अम्माच्या बाजूच्या बेडवर असलेल्या पेशंटच्या त्या म्हाताऱ्या आई पहाटेच्या त्या वेळी जाग्याच होत्यासुजयचं फोनवरचं बोलणं त्यांच्या कानावर पडत होतंचार-पाच तासांपूर्वी त्यांनी कोमल आणि अम्माचं बोलणंही ऐकलं होतंकोमल सुजयबद्दल अम्माला कन्व्हिन्स करत होतीआणि आता हा मुलगा येऊन लग्न करणार नाही असं फोनवर सांगतोयबेडवर पडून असंबद्ध विव्हळणाऱ्या अम्माबद्दल तिला कसंतरीच वाटत होतं. नकळत ती सुजयचं फोनवरचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला लागली

 

प्रशांतचा फोन झाला आणि लगेचच पुन्हा त्याचा फोन वाजला.

 

वैतागून त्याने फोनकडे नजर टाकली. कदाचित प्रशांतनेच उपदेश द्यायला पुन्हा फोन केला असणार असं समजून त्याचा चेहरा आधी त्रासला होता..पण स्क्रिनवरचं नाव वाचलं आणि त्याने घाईघाईने फोन उचलला.

(संभाषण पुन्हा हिंदीत, आपल्यासाठी मराठीत)

हॅलो….तू? या वेळेला?”

 

“……..”

 

अरे नाही….सॉरी कायमीच म्हटलं होतं तुझं वाचून झालं की फोन कर म्हणून खरं तर वाट बघत होतो मीकाय मत आहे तुझं?”

 

“……….”

 

“हो ओके आहे रे….जरा बाहेर आहे म्हणून हळू आवाजात बोलतोय…तू सांग ना पण..”

 

“…………”

 

खरंच? अरे वा….मला वाटलं नव्हतं….”

 

“……”

 

मगम्हणजे तुला काय वाटतं, उपयोग होईल ? आणि कुठे?”

 

“….”

 

हे बघ, मी म्हटलं ना माझ्या फ्रेंड ने लिहिलंयकुठल्या त्या साहित्य अकादमीच्या स्पर्धेसाठी….पण एकूण ते बघूनच मला अंदाज आला, हे काही साधं नाही, ह्यातून आणखी काहीतरी मोठं निर्माण होणार…म्हणून तर तुला थोडी पानं पाठवली मी. तुझ्याशिवाय आणखी परफेक्ट माणूस असूच नाही शकत हे सांगण्यासाठी…”

 

“…….”

 

अरे पण असं कसं देऊ तुलाते माझ्या फ्रेंडचं आहे. तिला म्हटलंय मीउद्या परत देतो असं..”

 

“……”

 

नाही यारहे चोरी केल्यासारखं होईल……”

 

“…….”

पुढे बराच वेळ तो नुसतंच फोनवरून बोलणाऱ्या माणसाचं बोलणं ऐकत होता.

मी करतो तुला फोन नंतरहे सगळं इथून नाही बोलता येणारमी आत्ता बाहेर आहे…”

 

“…..”

 

फ्रेंड म्हणजे फ्रेंड अशी नाहीमी एक आठवडाभर इथे कटनीला आलो होतो, मध्य प्रदेशात. तिथे ओळख झालीतिने लिहिलंय ते सगळंमी सहज म्हणून वाचायला मागितलं. आणि नक्की त्याचा दर्जा काय आहे, हे लिहिलेलं कुठे वापरता येऊ शकतं हे विचारायला तुला पाठवली काही पानं..शेवटी तुम्ही प्रोफेशनल माणसंतू सांगशील ते पर्याय मी तिला सांगणार होतोआता तू मला हे वेगळंच काहीतरी सांगतोयस…”

 

“…….”

 

ओकेमी नाही देत तिला परत लगेचमी घेऊन येतो मुंबईलाआपण बघू मग…”

 

“….”

 

हो मी म्हणूनच तर तुला सांगितलं होतं ते कसं वाचायचं त्याची ट्रीक….पण आपल्याला ते तंत्र जमायला वेळ लागेलशिवाय माणसं कामाला लावून ते सगळं नीट लिहून काढावं लागेल…”

 

“…….”

 

हो, त्याची एक सॉफ्ट कॉपी आहे असं म्हणत होतीहाताने लिहीत असताना एका बाजूला तिने कॉम्पुटरवर एक बॅकअप करून ठेवलाय, पण ते तिच्या मैत्रिणीकडे आहे आणि ती नाहीये इथे आत्ता ते मिळालं
असतं तर फारच सोपं झालं असतं. “

 

“…..”

 

ओके बॉस…..”

 

“…..”

 

नाव ?काय बरं….हा…’अग्यात की खोज में…'”

फोन ठेवून त्याने एकदा वेळेकडे नजर टाकली…कधी येतेय ही कोमल काय माहित? शेजारच्या पेशंटच्या बरोबर असलेली म्हातारी बाई जागीच होती, त्याच्याचकडे बघत होती….आपलं बोलणं तिने ऐकलं असेल का? जाऊदेतिला काय माहित आपण कशाबद्दल बोलत होतो

 

पण त्या बाईव्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीने त्याचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतंआधी प्रशांतशी झालेलं बोलणं आणि मग हा दुसरा फोन ..आणि योगायोगाने दोन्ही फोनवर झालेलं संभाषण हिंदीत होतंप्रशांत आणि तो ठरवून हिंदीतून बोलले होते, आणि दुसरा फोन ज्याचा होता, तो त्याचा मित्र हिंदीच बोलायचात्यामुळे हे सगळं संभाषण त्या व्यक्तीला समजतही होतं….शरीर साथ देत नव्हतं तरी कानात प्राण आणून जिने त्याचं बोलणं ऐकलं होतंती..अम्मा..

 

क्रमशः

*************************

पुढचा भाग बुधवारी….

Leave a comment