अज्ञाताची चाहूल (भाग : 3 )

तेवढ्यात तिचा मोबाईल तिच्या हातातून गळून पडला आणि २ सेकंदांनी त्याचा लाईट बंद झाला. खोलीत पूर्ण अंधार पसरला. लाईट बंद झाल्यावर सायली भानावर आली, जोरात किंचाळली आणि पांघरूण डोक्यावर घेऊन जोरजोरात ओरडत राहिली. खोलीचं दार समोरच होतं आणि लाईट्स चे स्विचही दाराजवळच होते, पण तिला आता अंधार सहनच होत नव्हता. अंधारात चालत जावून खोलीचं दार उघडण्याची तिच्यात हिम्मतच नव्हती. तिने जे काही बघितलं होतं, जे अनुभवलं होतं ते तिच्या आकलनाच्या बाहेरचं होतं. पांघरूणाच्या आत जाऊन ती हंबरडा फोड्ल्यासारखी जोरजोरात रडत होती. “आई , ये ना गं लवकर, मला भीती वाटतेय…बाबा तुम्ही तरी या ”

——————-(भाग २ पासून पुढे….)————————–

(भाग २ येथे वाचा …http://wp.me/p6JiYc-२त)

“सायली, बाळा बरं वाटतंय का आता?”

सायली हळू हळू डोळे उघडत होती. तिचं डोकं आईच्या मांडीवर होतं. बाबा आणि अनि समोर उभे होते.

“म…मला काय झालंय?”

“अगं काय झालंय तेच तर आम्हाला कळलं नाही. तू जोरजोरात ओरडत होतीस, किती घाबरून रडत होतीस, आम्हाला हाक मारत होतीस. आवाज आला तसे लगेच आलो आम्ही धावत. तुझ्या अंगावरचं पांघरूण काढलं तरी तू डोळे घट्ट मिटून घेतले होतेस. डोळे उघडायलाच तयार नव्हतीस तू. आणि तेवढ्यात ओरडता ओरडता एकदम शुद्ध हरपल्यासारखी झाली तुझी… बाबा तर लगेच जोशी डॉक्टरांना फोन करायला निघालेच होते तेवढ्यात मी तुझ्या चेहेऱ्यावर पाणी मारलं तेव्हा जागी झालीस तू …काय झालं तुला बाळा? बरं वाटत नसेल तर खरंच बोलावू या डॉक्टरांना. नाहीतर सकाळी तरी तू जाऊनच ये….”

आईच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. पण तिच्या बोलण्याकडे मात्र सायलीचं अजिबात लक्ष नव्हतं. जे घडलं होतं ते इच्छा नसूनही पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर दिसायला लागलं होतं.

“अगं, तिला बोलू दे ना जरा. सायली , काय झालं तुला?” बाबा.

“मला अंधारात काहीतरी भयानक दिसलं. कसलातरी आवाज आला म्हणून जाग आली आणि थोड्या वेळानंतर एक चेहरा एकदम समोर आला माझ्या, नुसता चेहराच होता तो, पण एकदम पांढराफटक. अंगातलं रक्त काढून घेतल्यावर आपली स्किन कशी पांढरी पांढरी दिसेल ना, तसंच वाटत होतं तो चेहरा बघितल्यावर.आणि…..आणि त्या नजरेत काहीच भाव नव्हते तरीही एकदम रोखल्यासारखे माझ्याकडे बघत होते ते डोळे…”

“ए ताई, म्हणून मी तुला सांगत होतो ना, ती सिरिअल नको बघूस, मला माहितीये तू घाबरतेस. अगं आई, जेवण झाल्यावर तुम्ही दोघे फिरायला गेलात ना, तेव्हा आम्ही एक इंग्लिश सिरिअल लावली होती, भुताची….त्यात असलंच सगळं होतं…नक्कीच ताईला स्वप्नात तेच दिसलं आणि ती घाबरली….”

“अगं भीती वाटतेच तर कशाला बघायच्या असल्या घाणेरड्या सिरिअल्स?” आई.

“ए घाणेरड्या काय गं, ही घाबरते म्हणून काय सिरिअल घाणेरडी? वीस वर्षांपूर्वीची सिरिअल आहे ती, त्यातले काही चांगले एपिसोड्स परत दाखवतायत आता. तू पण बघ ना कधीतरी..” अनि.

“मला नाही हा ते तसलं बघायला आवडत, ते रंगवलेले चेहरे, पिंजारलेले केस, किळसवाण सगळं….जाऊदेत झोपा आता..सायली मी जाऊ का की झोपू इथेच तुझ्या बाजूला?” आई.

नंतर मात्र सायली एखाद्या लहान मुलीसारखी आईच्या कुशीत जाऊन झोपून गेली. मात्र झोप लागायच्या आधी पुन्हा तो चेहरा तिच्या डोळ्यांसमोर आला.

“खरंच मला स्वप्न पडलं का? पण मला चांगलं आठवतंय तो आवाज ऐकून मी दचकून जागी होऊन उठून बसले होते. हवा पण किती विचित्रपणे अचानक थंड पडली होती…नको ..नकोच ते आठवायला पुन्हा..आईच्या कुशीत किती छान वाटतंय, लहान होऊन पुन्हा त्या सुरक्षित जगात गेल्यासारखं वाटतंय…उबदार…”

नकळत तिने आईचा बाजूला गेलेला हात आपल्या पाठीवर आणून ठेवला आणि तिला हळूहळू झोप लागली.

खोलीतले दिवे बंद केल्यामुळे पुन्हा एकदा सगळीकडे अंधाराचं साम्राज्य होतं. मध्ये एकदा सायलीला पुन्हा अर्धवट जाग आली. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना अर्धवट डोळे उघडले गेले तसं तिला अंधारात पुसटशी अशी एक आकृती दिसली.

“अगं आई, लाईट लाव ना, अंधारात धडपडशील कुठे …” बोलता बोलताच तिला परत झोप लागली.

पुढच्याच क्षणी खोलीतली खिडकी हळूहळू उघडत होती. त्यापुढच्या दोन क्षणातच ती आपोआप बंदही झाली, अगदी घट्ट, नीट लावून घेतल्यासारखी….सायली आणि तिची आई मात्र शांत झोपी गेलेल्या होत्या….

—————————————————————————

पुढचे दोन दिवस सायलीच्या डोळ्यांसमोरून ती चित्रं हलतच नव्हती. रात्रीसुद्धा ती आईच्या बाजूलाच झोपत होती. पुढच्या आठवड्यात रविवारी साखरपुडा. शनिवारी सुट्टीच होती आणि शुक्रवारची रजा घेतलेली होती. त्यामुळे कामही जरा जास्त होतं. शुक्रवारी सिनिअर मॅनेज्मेंट टीम बरोबर एक खूप महत्वाची मिटिंग होती खरं तर त्यामुळे त्यासाठी तरी थोडा वेळ का होईना पण जावंच लागणार होतं. पण त्या मिटींगसाठी सगळी तयारी, सगळे रिपोर्ट्स, प्रेझेन्टेशनस करायची जबाबदारी सायलीवरच होती त्यामुळे पुढचे तीन-चार दिवस सायलीला दुहेरी कसरत करायची होती. थोडं काम रात्री घरी बसूनही करावं लागणार होतं.

कामाच्या गडबडीत ती हळू हळू मागच्या आठवड्यातला तो प्रसंग विसरून गेली. नाही, विसरण्यासारखं नव्हतंच ते, पण निदान काही काळापुरता तरी त्यावर पडदा पडला होता. सुजयकडून मात्र अजूनही तसाच थंड प्रतिसाद होता, खरं तर प्रतीसादच नव्हता. कितीही बिझी असलो तरी रोज एक फोन तरी नक्कीच करेन असं त्याने सांगितलेलं होतं पण रविवारी भेटल्यानंतर त्याचा ना मेसेज आला, ना फोन. वाट बघून, कंटाळून शेवटी बुधवारी रात्री सायलीने त्याला फोन लावला. तीही लॅपटॉप घेऊन कामच करत होती म्हणून त्याला कॉल लावून तिने फोन स्पीकर मोड वर टाकला. खूप वेळ फोन वाजल्यावर शेवटी सुजयने फोन उचलला,

गाढ झोपेतून उठल्यावर येतो तसा आवाज येत होता सुजयचा.

“हाय सायली, हाऊ आर यु?”
“मी ठीक आहे. झोपला होतास का?”
“अं??…हो …नाही म्हणजे अगं काम करत होतो तर जरा झोप लागली. खूप काम आहे गं, मागचे दोन दिवस रात्री ३-३ वाजेपर्यंत काम करतोय. तुला फोन करायचं खरंच डोक्यात होतं गं, पण अजिबात एक मिनिटही वेळ नाही मिळाला…खरंच सॉरी….”
“हमम….ठीक आहे.कशी चालली आहे तयारी?”
“कसली ? ओ..हा…साखरपुड्याची ना? चालली आहे…आई आणि नेहाची तर फारच जोरात चालू आहे. खरेदी संपतच नाहीये त्यांची…”
“ए नेहा आली आहे? नाशिकहून? मला सांगायचं होतंस ना..तुला वेळ कुठेय म्हणा माझ्याशी बोलायला…पण मी भेटले नाहीये ना तिला…”
“अगं थांब जरा,…आय मीन ती आली आहे पण उद्या सकाळी परत जाईल ती. कॉलेज मध्ये काहीतरी महत्वाची एक्स्ट्रा लेक्चर्स आहेत म्हणून जातेय परत. पण साखरपुड्याला येईल ना ती, तेव्हा भेट तू, ओके?

सायलीच्या मनात आलं, की मी खरंच भेटायला येईन की काय असा वाटून हा मला काहीतरी कारणं सांगतोय का? जरा गडबडल्यासारखा वाटला नेहा ला भेटायचंय म्हटल्यावर…

रात्री झोपताना तिच्या मनात आलं,

“मी हा लग्नाचा निर्णय बरोबर घेतलाय ना? मी आतून पूर्ण समाधानी का नाहीये? मागचं वर्षभर मी स्थळं बघतेय…बहुतेकांना मीच नकार दिला. बरेच वेळा आई-बाबांना माझा निर्णय पटायचाही नाही. मी सुद्धा प्रत्येक वेळेला त्यांना कारणं नाही सांगू शकले नकाराची. मला माहीत आहे या सो कॉल्ड मॅरेज मार्केट मध्ये माझ्यासारख्या मुलीला सगळ्यांना जो अगदी परफेक्ट असा मुलगा वाटतो अशीच स्थळं येणार. दिसायला सुंदर, वागण्यात कॉन्फिडन्ट, हायली क्वालिफाइड, चांगला जॉब, चांगली फॅमिली वगैरे असंच म्हणाली होती ना गीता माझ्याबद्दल…तुझ्याशी कोणताही मुलगा हसत हसत लग्नाला तयार होईल, असं म्हणाली होती…तशीच मी भेटलेली सगळी मुलं एक स्थळ म्हणून उत्तमच होती पण ते आतून असं वाटायला हवं ना की हाच तो….माय मॅन…असं कोणाहीबद्दल वाटलं नाही..आई-बाबांना हे कसं समजावणार? एकदा आईला सांगितलं होतं पण तिला काही ते पटलं नाहीच. सुजयमध्ये काय वेगळं आहे मग? मी त्याला का हो म्हटलं ? …पहिल्यांदा बघितल्यावर खूप आवडला नव्हताच पण त्याच्याशी बोलल्यावर कुठेतरी त्याच्यातलं वेगळेपण जाणवलं…कुठलं वेगळेपण? मलाही नाही सांगता येणार…पण माझ्या आतल्या आवाजाने त्याच्या बाजूने कौल दिला हे खरं आहे…पण मग माझ्या मनासारखा मुलगा जोडीदार म्हणून मिळाल्यावरही मी खुश का नाही? मनातून समाधानी का नाही…का ते माहित नाही पण सुजयभोवती काहीतरी गूढ वलय आहे असं वाटतं…तो भेटला तेव्हा, फोन वर बोलताना खूप छान बोलतो पण मी समोर नसताना माझा विचार करत असेल तो? ”

असा एकदम निगेटिव्ह विचार नको करायला पण त्याच्याबद्दल. फक्त तीन वेळा भेटलेय त्याला. काही माणसं असतात अशी वर्कोहोलिक ..कामापुढे काहीच सुचत नाही त्यांना..सुजय पण असाच असेल कदाचित. नंतर बदलेलही तो …”

उलटसुलट विचार करतानाच तिचा डोळा लागला.

————————————————————

शुक्रवारी तिच्या ऑफिस ची मिटिंग होती. एका मोठ्या हॉटेल मध्ये कॉन्फरन्स रूम बुक केली होती, लंचसुद्धा होतंमिटिंग संपल्यावर सायली घरी जायलाच निघाली होती तेवढ्यात गीता आली.

काय मॅडम, घरी निघालात का?”

हो अगं, म्हणजे काय, आज संध्याकाळी मेहंदी काढायला येणार आहे ना माझी ब्युटीपार्लरवाली, त्याआधी बाकीची कामं आवरायची आहेत, पळायला हवं..”

मला वाटलं इतक्या जवळ आहेस सुजयच्या घरापासून तर तुमचा भेटण्याचा प्लॅन असणार. पण तुम्ही कसले बोअरिंग आहात यार…”

ए हो गं, दोन दिवस कामाच्या पसाऱ्यात मला हेपण कळलं नाही की मी जवळच्याच एरियामध्ये जातेय…इथून टॅक्सीने फक्त १० मिनिटांवर असेल त्याचं घर …पण जाऊदेत गं..उशीर होईल ..आधी लक्षात आलं असतं तर तसं प्लॅन केलं असतं..”

हम्मबरं चल मी पळते..”

साखरपुड्याला दोघांनी यायचं आहे म्हटलं, विनीतला सांगितलं आहेस ना?”

अर्थात, येणारच आम्ही, मी घरीच येईन थोडी लवकर आणि तो हॉल वर येईल ..”

ओके, बाय

सायली घरी जाण्यासाठी टॅक्सी शोधत होती, तेव्हा तिच्या मनात आलं,

खरंच जाऊया का सुजयच्या घरी? एवढं जवळ आलोय तर जाऊन येऊ अर्धा तास. चालेल का असं अचानक गेलं तर ? पण त्यात काय आहे, त्याच्या आईला तर आवडेलच..सुजय असेल का माहीत नाही पण असला तर तो पण भेटेल ना…”

पुढच्या पंधरा मिनिटात सायली सुजयच्या मोठ्या हायफाय कॉम्प्लेक्स मध्ये येउन पोहोचली होती. लिफ्ट मध्ये येउन १० व्या मजल्याचं बटन दाबल्यावर आपण अचानक आल्यावर घरातले सगळे कसे रिएॅक्ट होतील या विचारात गढून गेली.

सुजयच्या घराची बेल वाजवून बराच वेळ झाला तरी दार उघडलं नाही.

शी, उगीच आले मी. माझा पण वेळ गेला वाया. हे लोक बाहेर गेलेले दिसतायत. निदान फोन तरी करून यायला हवं होतं मी…”

ती परत जायला लिफ्ट च्या दिशेने वळली तेवढ्यात मागे दार उघडल्याचा आवाज आला.

येस, कोण पाहिजे आपल्याला ?”

समोरच्या माणसाला बघून ती गोंधळली. सुजय किंवा त्याचे बाबा नव्हते. एक वेगळाच माणूस होता. तिशीतला. चेहऱ्यावर कंटाळलेले भाव, कपडे चुरगळलेले….

त्याला बघून दोन क्षण सायली बुचकळ्यात पडली. “मी चुकून दुसऱ्याच फ्लॅटची बेल वाजवली की कायपण बाजूला बघितलं तर नेमप्लेट तर तीच होती. दारावर लावलेली गणपतीची छोटी मुर्तीही मागच्यावेळी पाहिल्याचं आठवत होतं तिला.

हाय, मी सायली. सुजय आहे का घरात?”

पुढचे काही क्षण त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं पण त्यानंतर लगेच काहीतरी आठवल्याचे भाव उमटले.

ओ हाय, सॉरी मला पटकन लक्षात नाही आलं. आत या ना तुम्ही, सुजय आहे आत, मी बोलावतो त्याला.”

सायली घरात आली आणि आतलं दृश्य पाहून दारातच थबकली. घरात सगळीकडे पसाराच पसारा होता. पेपर्स सगळीकडे विखुरलेले होते. डायनिंग टेबल सुद्धा सगळं अस्ताव्यस्त होतं. दोन्ही फ्लॉवरपॉटस आडवे पडले होते. सोफ्यावर अर्धवट घडी करून ठेवलेले कपडे होते. किचन मधलं खाण्याचं थोडं सामान, काही बिस्किटाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या असं सगळं सेंटर टेबल वर पसरलेलं होतं. सायलीला मागच्यावेळी बघितलेलं दृश्य डोळ्यांसमोर आलं. सुंदर सजवलेलं, नीट लावलेलं, स्वच्छ घर. आईने सुजयच्या आईचं किती कौतुक केलं होतं नुसतं घर बघूनच. त्याचे बाबा पण एकदम प्राऊडली सांगत होते, “आमच्या हिला घर अगदी हे आत्ता दिसतंय तसं लागतं, नेहेमी. हां, आता आमचे कधी कधी हाल होतात त्या हट्टापायी, पण ठीक आहे. सगळं नीटनेटकं ठेवण्याची सवय कधीही चांगलीच, नाही का?”

हाय सायली, तू अशी अचानक?” सुजयचा नेहेमीचा हसरा चेहरा. ” अगं म्हणजे तुझंच घर आहे, तू कधीही ये. पण तू रजेवर होतीस ना

हो, पण मी म्हटलं होतं ना तुला एक महत्वाची इंटर्नल मिटिंग होती ते, ती इकडेच होती जवळच. वेळेवर आटोपली म्हणून म्हटलं जाऊन येऊ. सॉरी म्हणजे नं कळवता आले.”

अगं ठीक आहे एवढं काय त्यात?”

आई नाहीये का?”

सायली घरातल्या पसाऱ्याकडे पाहत सूचक बोलली. सुजयचा चेहरा खाडकन पडला पण सायलीचं तिकडे लक्ष नव्हतं.

आई?….ओह हांआई आई ना तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेलीये. तुला म्हटलं ना, प्रचंड खरेदी चालू आहे घरात. आत्तापण ती खरेदीच करायला गेली आहे. आत्ताच एवढी खरेदी केलीये तर लग्नाच्यावेळी तर नवीन घरच घ्यावं लागेल एवढी खरेदी होईल…..”

सायली ह्यावर मनापासून हसली.

खरेदी हा सगळ्याच बायकांचा विक– पॉइण्ट असतो. कळेलच तुला नंतर…”

बापरे म्हणजे तू पण त्याच टोळीतली आहेस तर मग लग्नानंतर माझं काहीच खरं नाही…”

सायलीला हसू आवरेना. “टोळी काय रे….”

आज पहिल्यांदाच ते दोघेही त्यांचं लग्न ह्या विषयाबद्दल बोलत होते, थट्टा करत होते. त्यांच्यातली औपचारिकता ह्या दोन वाक्यांमधेच गळून पडल्यासारखी वाटत होती.

आणि तुम्ही पुरुष म्हणजे तुम्ही सगळे घरात पसारा घालणाऱ्या टोळीतले असं म्हणायचं का आम्ही?”

आं?”

अरे आं कायआई घरात नाहीये तर तू केवढा पसारा घालून ठेवलायस….लहान मुलं घालतात तसा ?”

सुजयचा चेहरा पुन्हा थोडासा पडला. काय उत्तर द्यावं हे त्याला सुचत नव्हतं. या वेळी त्याचा चेहरा पडलेला सायलीच्या लक्षात आला.

नाही, ह्यातलं बरचसं सामान माझं आहे.”

सायलीने समोर बघितलं. मगाशी ज्याने दार उघडलं तो तरुण बाहेर आला होता.

सुजय, अरे माझी ओळख तरी करून दे.”

सुजयचा चेहरा ब्लॅंक झाला होता. सायली वळून सुजयकडे बघणार तोच तो घाईघाईने म्हणाला,

मीच सांगतो. मी राज. म्हणजे माझं खरं नाव राजन पण सगळेच मला ‘राज’ च म्हणतात. मी सुजयचा मावसभाऊ. नागपूरला असतो. तुमच्या साखरपुड्यासाठी आलोय खास रजा टाकून. आईने मावशीला द्यायला काही वस्तू दिल्या होत्या त्या म्हटलं आधी बाहेर काढाव्यात, नंतर विसरायला होतं. म्हणून सगळी बॅगच उलटी केली आधी. सॉरी म्हणजे माझं काम हे असंच आहे. ते नीट ठेवणं वगैरे फारसं जमत नाही आम्हाला. तुमचा सुजय पण जवळपास असाच आहे बरं का. हा बाकीचा पसारा त्याचाच आहे. घरी बसून ऑफिसचं काम करतो, आणि एखादा पेपर मिळत नाही म्हणून घरात कुठे म्हणजे कुठेही शोधत बसतो. आता मावशी येईपर्यंत आवरायला हवं नाहीतर काही खरं नाही ….”

नाईस टू मीट यु….साखरपुड्याच्या दिवशी परत भेट होईलच.”

हो, हो…” त्याच्या आवाजात फार उत्साह नव्हता.

मी मदत करू का आवरायला?”

अहो नको नकोआम्ही करूच आता. सुजय अरे तू त्यांना बसायलाही नाही सांगितलस का ? पाणी तरी विचारलंस की नाही ?”

नाही, ठीक आहे मी पण निघते आतातुझी आई पण नाहीये नाहीतर जरा वेळ थांबले असते.”

सायली, खरंच अगं बसायलाही नाही सांगितलं मी तुला. थांबतेस का जरा वेळ? आई तर नाहीच आहे, बाबा पण बाहेर गेलेत नेमके, त्यांची तरी भेट झाली असती नाहीतर ..”

जाऊदेत रे, मीच फोन करायला हवा होताचल बाय

बाय, नीट जा

सुजय खाली टॅक्सीपर्यंत तरी येईल असं तिला वाटलं होतं. पण तिची लिफ्ट आल्याचं बघताच त्याने पुन्हा तिला बाय करून दरवाजा लाऊनही घेतला.

हा त्याच्या कामामध्ये असेल अगदी प्रोफेशनल पण पर्सनल लाईफ मध्ये पण काही एटीकेट्स पाळावे लागतात, जवळच्या माणसांच्या बाबतीत थोडं भावनिकही व्हावं लागतं हे ह्याला शिकवावं लागणार बहुतेक…” सायली टॅक्सीत बसल्यावर विचार करत होती

त्याच वेळी शेजारच्या घरात कामाला म्हणून जायला तीच कामवाली बाई लिफ्ट मधून बाहेर पडत होती. तिला सान्यांच्या घरात कोणाचातरी आवाज आला. “या वेळेला तर सुजयदादा घरी नसतात कधी ….”नवल वाटून तिने दाराला आपले कान लावले

नशीब, तू होतास म्हणून नाहीतर काय झालं असतं? मी काय सांगितलं असतं तिला?”

हो ना, थोडक्यात वाचलो, ही अशी नं कळवता यायला लागली तर गडबड होईल रे..”

“गडबड तर होईलच..पण तुला काय ..तू जाशील तुझ्या घरी निघून मी अडकेन फुकटचा

ती काळजी नाहीये रे, मी सांभाळून घेतलंय ते सगळंमला वेगळीच काळजी आहे…”

कोणती?”

जाऊदेबोलू नंतरकॉफी घेणार का तू ?”

कोण आहे काय माहीत, कामवाल्या बाईने तो नाद सोडला आणि ती शेजारच्या घराकडे वळली.

————————————————————

त्या दिवशीची संध्याकाळ खूपच छान होती. सायलीच्या चार अगदी जवळच्या मैत्रिणी मेहंदी साठी घरी आल्या होत्या. तिची मावशी आणि मावस बहिणी पुण्याहून आल्या होत्या. आईने अगदी हक्काने तिच्या एकुलत्या एका बहिणीला दोन दिवस आधीच बोलावलं होतं.

सायलीचं घर खूप मोठं होतं. सणासुदीला, लग्नकार्याला म्हणून मुंबईबाहेरून येणारे नातलग बरेच वेळा त्यांच्याकडेच उतरत असत. देशपांड्यांचा बंगला त्या भागात अगदी प्रसिद्धच होता. मुंबईमध्ये इतका मोठा बैठा बंगला हे आत्ताच्या उंच बिल्डींग्स आणि फ्लॅट्स च्या काळात लोकांच्या कौतुकाचा विषय असणारच. देशपांड्यांनी म्हणजे सायलीच्या बाबांनी मोठ्या हौसेने त्यांच्या आजोबांनी त्यांच्या जवळची सगळी कमाई ओतून बांधलेल्या ह्या बंगल्याचं जतन केलं होतं. आजूबाजूच्या इतर बंगल्याचं रीडेवलपमेंट होऊनही बरीच वर्षे उलटून गेली तरी देशपांड्यांनी तो हव्यास कधीच धरला नाही. तो बंगला म्हणजे सगळ्या देशपांड्यांचा अभिमानाचा विषय होता. वास्तू जुनी असली तरी सायलीच्या बाबांनी त्यात वेळोवेळी पैसे खर्च करून तिला नवीन, आधुनिक रूप दिलेलं होतं. घरातल्या प्रत्येकाला स्वतःची खोली होती. देवघरासाठी वेगळी खोली होती. गेस्ट-रूम होती. बंगला म्हणायला बैठा असला तरी त्याला वर एक मजला होता पण वर एकच मोठी खोली होती आणि त्याला एक खूप मोठी खिडकी होती. सायलीला त्या खिडकीत बसून खाली रस्त्यावरून जाणारी वाहनं, माणसं पाहायला खूप आवडायचं, अगदी लहानपणापासून. संध्याकाळी वेळ असला की ती चहा घेत खिडकीत तासनतास बसून राहायची. बाबा त्यांचं लिखाण, वाचन करायला याच खोलीत यायचे. ही खोली तशी कुणाचीच नव्हती, तरीही सगळ्यांची होती. प्रत्येक खोली इतकी मोठी होती की त्यात चार लोक एकत्र येउन दंगा करायला लागली तरीही बाहेरच्या खोलीत कुणालाही त्याचा त्रास होत नसे.

त्या दिवशीही असाच दंगा चालला होता. आई मावशीला सगळी खरेदी दाखवत होती. आपल्या वेळी साखरपुडा कसा अगदी छोटा कार्यक्रम होता आता मात्र साखरपुडा म्हणजे मिनी लग्नच झालाय वगैरे असं आईकाकूछाप बोलणं चाललं होतं. सायलीच्या मैत्रिणी जेवूनच जाणार होत्या म्हणजे घरातला सगळा गोंधळ रात्री पर्यंत चालणार होता. सायलीची मेहंदी काढून झाल्यावर तिच्या बहिणींनी लगेच तिच्या हातांचा फोटो काढून सायलीचं न ऐकता तिच्याच फोन वरून तो सुजयला पाठवला देखील.

अगं बाई, काही उपयोग नाही. त्याला ह्या बायकांच्या गोष्टीं मधलं काहीही कळत नाही, काही रिप्लाय पण नाही येणार बघ त्याचा…” सायली.

अरे बापरे एवढी ओळखायला पण लागलीस का त्याला? तुमचं नक्की अरेंज्ड मॅरेजच आहे ना….हम्म ?” इशा सायलीची मावस बहिण.

त्याला फोटो पाठवल्यावर पहिली १० मिनिटं सायली मनातून खरं तर आतुरतेने वाट पाहत होती त्याच्या रिप्लायची. आत्तापर्यंत तो जेवढा तिला कळला होता, त्यावरून तिला त्याचा रिप्लाय येईल असं वाटतच नव्हतं. तरीही ती वाट बघत होती. मग कंटाळून तिने तो नाद सोडून दिला आणि गप्पागोष्टीत भाग घेतला.

रात्रीचे साधारण ९ वाजले असतील. सायलीबरोबर बाकी हौशी लोकांच्याही मेहन्द्या काढून झाल्या होत्या. तरीही गाणी गोष्टी, गप्पा चालूच होत्या. मावशीने आत पोळ्या करायला घेतल्या होत्या आणि आई आणि निशा ईशाची मोठी बहिण जेवणाची तयारी घेत होते. सायली आणि मैत्रिणींच्या गप्पा आणि सेल्फी काही संपतच नव्हते. तेवढ्यात लाईट्स गेले.

अरे देवा काय हे, आत्ताच लाईट्स जायचे होते….अनि जरा टॉर्च आण रे ..” आई.

थांब जरा शोधावा लागेल…” अनि.

म्हणून ओरडत असते मी सगळ्या वस्तू जागेवर ठेवा म्हणूनअहो, जरा त्या शेवटच्या ड्रॉवर मध्ये मेणबत्त्या आहेत का बघा.” आई

अगं किती ओरडते आहेस? एवढं काही होत नाही लाईट्स गेले तरआज कॅण्डललाईट डिनर करू आपण.” सायली.

अरे कोणीतरी बाथरूमच्या जवळ जाता का टॉर्च घेऊन? इशा गेलीये आत…” मावशी किचन मधून ओरडली.

थांब मी जाते, मोबाईलचा टॉर्च ऑन ठेवते.” सायली.

अगं पण तुझी मेहंदी…?” तिची एक मैत्रीण

अगं माझीच सगळ्यात पहिले काढली ना मेहंदी? आता वाळली आहे पूर्ण. तुम्ही जाऊ नका ..धडपडाल अंधारात…”

हळू जा गं. आणि इशाला सांग तू बाहेर उभी आहेस ते…” आई .

सायली मोबाईल चा लाईट ऑन ठेवून आत गेली. बाथरूम चं दार बंद होतं.

इशी, मी आहे गं बाहेर उभी…”

२ मिनिट्स झाली. आतून काही आवाज पण येत नव्हता.

इशाआहेस ना आत?”

शेवटी सायली दार वाजवायला गेली पण दरवाजा उघडाच होता. नुसताच लोटून घेतलेला होता.

म्हणजे इशा बाथरूम मधून बाहेर आलीये तरपण मग गेली कुठे..”.

आत तर सगळीकडे खूप अंधार होता. बाहेरच्या खोलीला समोर किचन होतं त्यामुळे गॅस चालू असल्यावर थोडा तरी उजेड येत होता. पण हॉल मधून एका दिशेला आत पॅस्सेज होता त्याला एका बाजूला बाथरूम आणि दुसऱ्या बाजूला सायली आणि अनि च्या खोल्या होत्या, एक गेस्ट बेडरूम पण होती. हॉल मधला उजेड इथे पोहोचण्याची शक्यताच नव्हती. आईबाबांची रूम आणि देवघर असलेल्या रूम्स हॉलच्या दुसऱ्या बाजूला होत्या.

इशा बाहेरच्या खोलीत तर आली नाही, मग इकडे काय करतेय अंधारात? तिने बाहेर आल्यावर टॉर्च आणण्यासाठी हाकही नाही मारली कुणाला…”

विचार करतच सायली अनिच्या रूम मध्ये शिरली.

इशा …..” पण कोणीच नव्हतं.

सायली पटकन बाहेर आली. ती खरं म्हणजे घाबरली होती. गेल्या आठवड्यातला तो विचित्र भयानक अनुभव तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. आत्ताही आजूबाजूला अंधारच होता. बाहेरच्या खोलीत चाललेली दंगामस्ती आता लाईट गेल्यामुळे मंदावली होती. सगळे कंटाळून बसले होते.रस्त्यावरचे गाड्यांचे आवाज आणि बाहेरच्या खोलीतले थोडे आवाज सोडले तर बाकी कसले आवाजही नव्हते फार. सायलीला भीती वाटली. जाऊदेत, हाक मारू कोणाला तरी. ती बाबांना हाक मारण्यासाठी म्हणून वळली. तेवढ्यात काहीतरी लक्षात आल्यासारखी पुन्हा थांबली.

अनिच्या रूम मध्ये नाहीये म्हणजे नक्कीच माझ्याच रूम मध्ये असणार ती….गेस्ट बेडरूमला तर कडी आहे बाहेरून.”

तिने पुन्हा ईशाला हाक मारली तिच्या खोलीचं दार उघडच होतं. मोबाईल चा लाईट ही चालू होता. सायली तिच्या खोलीत शिरली.

इशा, अगं आहेस का…” पण काहीच प्रत्युत्तर नव्हतं.

तेवढ्यात मोबाईल च्या प्रकाशात काहीतरी दिसलंसायली भीतीने दारातच खिळून राहिली……

ईशा समोरच तिच्या बेडवर बसली होती..पाठमोरी

मी इतक्या हाका मारतेय तरी ही उत्तर का देत नाहीये? आणि अशी अंधारात काय करतेय?”

सायली हळूहळू तिच्या दिशेने पुढे जाताना विचार करत होती

(क्रमशः)

भाग ४ येथे वाचा –http://wp.me/p6JiYc-4V

—————————————————————

 

6 Comments Add yours

  1. balkak says:

    goshta rangat aahe.

    Like

  2. purvatarang says:

    Very interesting story, please post next parts soon…
    But at few places it is Suyog instead of Sujay.. is it purposefully or by mistake…

    Like

    1. rutusara says:

      Thank you …:) I will be posting the next part soon…The name is supposed to be Sujay only ..thanks for letting me know. I will correct it right away..:)

      Like

  3. Story is evolving and interesting, waiting for next part !

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Thanks Yeshasvi. I will be posting the next part very soon. 🙂

      Like

Leave a comment