अज्ञाताची चाहूल : (भाग : 18)

तिच्या बोलण्यावर सायलीकडून काहीच प्रत्य्युत्तर आलं नाही. ईशाने बघितलं, सायली अजून तशीच विचारमग्न होती. आरशातून कुठेतरी रोखून बघत होती.

सायलेईशाने तिला हलवलं…” काय झालं? कुठे हरवलीयेस?”

 

ईशा मला ना सारखं असं वाटतंय की तिथे काहीतरी आहे….”सायली आरशातून समोरच्या भिंतीकडे बोट दाखवत होती…”कुणीतरी मला सांगत होतं तिथे जाऊन बघ, असं सारखं वाटतंय मला….पण नीट आठवत नाहीये….काल ती आली होती, ती सांगत होती का मला असं? काय असेल तिथे?”

सायलीने दाखवलेल्या दिशेने ईशाने मान वळवून बघितलं..

————— भाग १७ पासून पुढे————

भाग १७ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-rT

 

रेस्टोरेंट मध्ये समोर सिद्धार्थ दिसल्यावर सायली आश्चर्यचकित होऊन ईशाकडे बघायला लागली.

सिद्धार्थ?” तिने दबक्या आवाजात ईशाला विचारलं.

हो, आहे की नाही सरप्राईझ तुझ्यासाठी?”

ईशा पुढे जाणार तेवढ्यात सायलीने तिला दंडाला धरून मागे खेचलं.

ईशा, नसता आगावूपणा करायला कोणी सांगितला होता तुला? काय काय सांगितलं आहेस तू त्याला? अगं माझ्या ऑफिसमध्ये आहे तो. आणखी कुणाला त्याने सांगितलं असेल तर? ” सायली

 

त्याने स्वतःहून मला सांगितलंय, त्याला सुजयचा संशय आलाय म्हणून. आणि म्हणून आपण भेटायला आलोय त्याला. त्याला काय माहिती आहे, त्याला का संशय आलाय ते त्याला विचारुया. जर आपल्याला वाटलं तरच आपल्याकडून सगळं कळेल त्याला. मी काहीही सांगितलेलं नाहीये. पण जर तो जे बोलेल त्यात तथ्य असेल, तर आपण त्याची मदत घेऊ शकतो नाआता चल लवकर….तो बघतोय आपल्याचकडे…..”

शक्य तितक्या दबक्या आवाजात सायलीशी बोलून ईशा सिद्धार्थ बसला होता त्या टेबलपाशी आली. ईशाने सिद्धार्थला भेटायला बोलावलंय, हे सायलीला तितकंसं पटलेलं नव्हतं. काहीही झालं, तरी तिचं लग्न, सुजय ह्या सगळ्या तिच्या आयुष्यातल्या पर्सनल गोष्टी होत्या. त्याबद्दल असं सगळ्यांसमोर बोलणं तिला ठीक वाटत नव्हतं.

 

साखरपुडा झाल्या झाल्या आपण हे असं आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल संशय आल्याचं आपल्या ऑफिसमधल्या कलीगला सांगणार. काय विचार करेल सिद्धार्थ आपल्याबद्दल? त्याला असं वाटेल ना की मला माणसांची पारख नाहीये. सायली तिथेच उभी राहून विचार करत होती, तेवढ्यात ईशाने तिला हाक मारली. तिला नाईलाजाने जावं लागलं.

गुड मॉर्निंग सायली…” सिद्धार्थ.

गुड मॉर्निंग…”

सायली ईशाच्या बाजूला जाऊन बसली.

आपण सगळ्यात आधी काहीतरी खायला मागवूया का? लवकर निघायच्या नादात मी ना नीट नाश्ता नाही केला. आता भूक लागली आहेसो आधी काहीतरी खाऊ आणि मग चहा चालेल? ” सिद्धार्थ

 

ओके. सायली काय घेणार तू ?” ईशा

 

मला काहीच नकोय. आणि आपण प्लीज लवकर निघूया इथून. ऑफिसमध्ये फार उशिरा नाही जाता येणार मला…”

सायली अजूनही थोडी रागावलेलीच होती.

ओके, ओकेनो प्रॉब्लेमबरोबर आहे. ऑफिसला उगीच खूप उशीर होईल. तीन कॉफी मागवतो. चालेल? ” सिद्धार्थ

सायली काहीच बोलली नाही. ईशाने होकारार्थी मान हलवली. दोन मिनिटं सगळेच शांत होते. कुठून सुरुवात करायची हे ईशा आणि सिद्धार्थ दोघांनाही कळत नव्हतं. सायली रागावल्यासारखी वाटत होती त्यामुळे विषय सुरु करणं सिद्धार्थसाठी कठीण होऊन बसलं होतं.

इथे आपण असे गप्प बसायला आलोयत का? ” सायलीनेच सुरुवात केली शेवटी.

 

तू रागावलीयेस ना….चिल यार सायली, सिद्धार्थला भेटायला जायचंय तुला मुद्दाम आधी नाही सांगितलं मी, म्हटलं तुला जर सरप्राईझ देऊ. एवढी काय रागावते आहेस..” ईशा

 

नाही ईशा. तिला ऑकवर्ड वाटणं अगदी स्वाभाविक आहे. तिचं लग्न ठरलंय सुजयशी. आणि त्याच्याबद्दल असं माझ्यासमोर बोलणं तिला ठीक वाटत नसेल. ट्रस्ट मी सायली, मी सुद्धा असाच विचार करून इतके दिवस तुझ्याशी ह्या विषयावर बोलणं टाळत होतं. तुमचं लग्न ठरलंय आणि मी डायरेक्टली येउन असं काहीतरी तुला सांगेन तर तू माझ्याबद्दल काय विचार करशील असाच विचार करून मी गप्प होतो. पण काल ईशा त्याच्यावर वॉच ठेवून होतीते बघितलंआणि ..”

 

एक मिनिट. तुम्ही दोघे कुठे भेटलात, ते आधी सांगा. आणि ईशा मला काहीच का नाही सांगितलं तू? ”

सायलीचा राग हळूहळू निवळत होता. अर्थात त्याचं कारण वेगळं होतं. ईशालाही जे कळलं नव्हतं ते तिच्या नाराजीचं कारण सिद्धार्थला कुणीही न सांगताच बरोबर कळलं होतं. त्याच्या दोन वाक्यांमध्येच सायलीला खात्री पटली की तिचं असं ह्या कारणासाठी भेटायला येणं सिद्धार्थला खटकलं नव्हतं. तो तिच्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेणार नव्हता. तो खूप सहजपणे त्याबद्दल बोलत होता. ह्या विषयावर ईशाशिवाय आणखी कुणाशी बोलण्याची तिची मानसिक तयारी हळूहळू होत होती.

 

ईशाने तिला सगळं सांगितलं. काल सकाळी ती आणि सिद्धार्थ त्यांच्या ऑफिसमध्ये कसे भेटले, तिथपासून ते सिद्धार्थने त्याला सुजयचा संशय आल्याचं सांगितलं ते सगळंच.

शहाणे, काल तुमच्यात बोलणं झालं आणि मला नाही सांगितलंस तू?” सायली

 

अगं बाई आपण वेगळ्या मोहिमेवर होतो काल, कामवाली बाई, आजी….आठवतंय ना? त्यात राहून गेलंआता आपण भांडत बसायचंय का? की ज्यासाठी सिद्धार्थला भेटायला आलो ते काम करुया? ” ईशा

 

हो, हो….कळलं. सिद्धार्थ, तू सांग. तुला काही कळलंय का सुजयबद्दल?” सायली

 

कळलंय असं नाही. पण मला एकूणच खूप संशय आला त्याच्यावर, जेव्हा मी त्याला तुमच्या साखरपुड्यात बघितलं. तो फोनवर कुणाशीतरी बोलताना त्याचं बोलणं अर्धवट ऐकलं. त्याचा तो जो मित्र आला होता, त्याच्याशी पण जरा विचित्र वागत होता तो. त्याचा जवळचा मित्र असल्यासारखा तो बिलकुल वाटत नव्हता. मी नंतर नीट आठवून सांगतो तुम्हाला, मी काय काय ऐकलं ते….. ते सगळं बघून मला संशय आला त्याचा.” सिद्धार्थ

 

हो बरोबर आहे….त्याचा मित्र खूप असा बावचळून गेल्यासारखा वागत होताकाय नाव होतं गं त्याचं सायले?”

 

नाव….” सायली विचारात पडली होती.

 

कौस्तुभ परांजपे.” सिद्धार्थ

 

तुझ्या एवढं लक्षात राहिलं त्याचं नाव? ” ईशा

पुढची पंधरा मिनिट्स सिद्धार्थ त्यांना सगळं समजावून सांगत होता. त्याने कौस्तुभ बॅंगलोर ला जाईपर्यंत कसं त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला ते सगळं सांगितलं.

आता त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं पण?” ईशा

 

तेच कळत नाहीये. कुठूनतरी त्याचा नंबर मिळवायला हवा. किंवा पत्ता तरी…” सिद्धार्थ

 

पण त्याच्या तिथल्या ऑफिसला फोन करून बघितलं तर?” ईशा

 

मी केला होता काल दुपारी. पण त्यांनी सांगितलं की तो दहा दिवसांनी जॉईन होणार आहे. म्हणजे कदाचित तो मुंबईतच असेल अजूनतरी.” सिद्धार्थ

 

किंवा कदाचित तिथे गेलाही असेल किंवा जाईल लवकरच. आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायला हवं.” सायली

 

तुला काही सांगितलं होतं का त्याच्याबद्दल सुजयने?” सिद्धार्थ

 

साखरपुड्याच्या दिवशी सुजयने त्याची ओळख करून दिली, तेव्हा तो म्हणाला होता की तो गिरगावात राहतो. पण आणखी काहीच माहिती नाही.” सायली

 

सायली, तू सुजयकडून नंबर मिळवू शकतेस का? त्याचा मित्र आहे म्हणतो ना तो, मग त्याच्याकडे असेलच ना..? ” सिद्धार्थ

 

अरे पण असं डायरेक्ट कसं विचारणार ती? त्याला संशय आला तर?” ईशा

 

डायरेक्ट नाहीच. कुठल्यातरी कामाकरता हवाय असं सांगायचं….कुठलं काम ते मात्र खूप विचार करून ठरवायला हवं. ” सिद्धार्थ

 

पण त्याला जर थोडा जरी संशय आला, तर …..”

 

आपल्याला कौस्तुभचा नंबर मिळाला तर? असा विचार कर सायली….” तिला मधेच तोडत सिद्धार्थ म्हणाला. ” ऑफिसमध्ये डेडलाईन जवळ आली आणि आम्ही डोक्याला हात लावून बसलो की तूच म्हणतेस ना डेडलाईनच्या आधी आपण हे कम्प्लीट केलं तर नंतर बॉस कडून जे अप्रिसीएशन मिळेल, त्याचा विचार करा आणि कामाला लागा. आता मी सांगतो तुला असं….त्याला संशय येणार नाही ह्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण. कौस्तुभचा नंबर त्याच्याकडून मिळाला तर कौस्तुभकडून त्याच्याबद्दल काय, काय माहिती मिळू शकेल ह्याचा विचार कर.….”

 

ओके. डन. पण आधी नीट काहीतरी ठरवायचं. थोडा वेळ लागला तरी चालेल. नीट प्लॅन करून सगळं करायचंएक मिनिट…”

सायलीच्या डोक्यात तेवढ्यात एक नवीन कल्पना चमकून गेली. एक क्षणभरच तिने विचार केला,

“अरे एवढा सोपा मार्ग आधी का नाही सुचला…? आपल्याला माहित आहे की तो गिरगावात राहतो. आपण तिथल्या पोस्टऑफिसमध्ये जाऊया ना, आपल्याला तिथे त्याचा पत्ता कळेल….सुजयला डायरेक्ट विचारायला नको…” सायली

ईशा आणि सिद्धार्थला ते अर्थातच पटलं.

वा सायले, माझी बहिण शोभतेस तूकधी जाऊया पोस्टऑफिसमध्ये?” ईशा

 

खरंच सायली, इतकी साधी गोष्ट मला कशी नाही सुचली? बरं झालं पण हा मार्ग सापडला ते. सध्या तरी सुजयशी डायरेक्ट बोलायला नको. ……पण तिथे जायचं माझ्यावर सोडा. मी उद्याच जाईन…”सिद्धार्थ.

मध्ये काही वेळ शांततेतच गेला. सायली तिच्या मोबाईलवर तिचे फेसबुक अपडेट्स चेक करत होती. ईशा तिच्याच विचारात होती. खाली मान घालून कॉफीचे दोन घोट घेऊन तिने मान उचलून वर बघितलं, तेव्हा सिद्धार्थ कॉफी घेता घेता सायलीकडे बघत होता. ईशा त्याच्याकडे बघत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो ओशाळला. तिच्याकडे बघून तो कसनुसं हसला. आता पुढे काय बोलावं त्याला सुचेना.

आता पुढे काय करायचं?” ईशा

सायलीने मोबाईलमधून डोकं उचलून वर काढलं.

आत्ता ठरवलं तेच. सिद्धार्थला त्याचा पत्ता मिळाला की मग ठरवू.”

 

पण सायलीघसा खाकरत सिद्धार्थ म्हणाला, “एक गोष्ट मला कळली तर बरं होईल. तू आणि ईशा, म्हणजे तुम्हाला सुजयवर संशय का आहे? म्हणजे ह्या कौस्तुभ प्रकरणामुळेच तुम्हाला त्याच्यावर संशय आलाय की आणखी काही आहे?”

 

बरीच मोठी गोष्ट आहे….मी…”

सायलीने बोलायला सुरुवात केली तशी ईशाने पर्समधून आणलेली सायलीची डायरी बाहेर काढून सिद्धार्थच्या हातात दिली.

हे सगळं सांगत बसलं तर खूप वेळ जाईल. सायलीने ह्या डायरीत आम्हाला त्याच्याबद्दल काय,काय खटकलं ते सगळं लिहून ठेवलंय. आम्हाला काय काय कळलंय ते सुद्धा आहे त्यात.”

 

ईशा?” सायली ओरडलीच. “तू मला न विचारता ही डायरी आणलीस इकडे?”

 

चिल सायले. अगं तू सगळंच इतकं मुद्देशीर लिहून ठेवलं आहेस, की सिद्धार्थला कळायला पण सोपं जाईल आणि आपल्याला आठवून आठवून सगळं सांगायला नको.” ईशा

 

सायली, तुझं काही पर्सनल असं लिहिलं असशील आणि मी वाचायला नको असेल तर राहूदेत. मी नाही वाचत. पण तुम्ही जमेल तसं सगळं सांगण्याचा प्रयत्न करा.” सिद्धार्थ

 

नाही सिद्धार्थ. ठीक आहे. ईशा म्हणते ते बरोबर आहे.” सायलीने डायरी पुढे सरकवली. “आत्ता लगेच वाच तू..”

सिद्धार्थला दहा मिनिटं लागली सगळं नीट वाचायला.

बापरे, सायली, तुम्ही दोघींनी बराच अभ्यास केलाय ह्या विषयाचा. हे फेसबुक वरून जे शोधून काढलंय, ते तर खरंच कौतुक करण्यासारखं आहे. पण हे तेस्वप्न पडलं, ‘तीआली, म्हणजे काय? कशाबद्दल लिहिलंय हे सगळं? आणि ते मोलकरणीचं पुढे काय झालं?आय मीन, काही अजून झालं का त्याचं पुढे? आणि हा आशय कोण? म्हणजे आणखी कुणाला माहित आहे का ह्याबद्दल? ” सिद्धार्थ

तीचा उल्लेख येताच सायली आणि ईशा जरा अस्वस्थच झाल्या. डायरी त्याला वाचायला देताना तीबद्दलही त्याला कळणार, हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं.

 

सायलीने त्याला कालच्या दिवसातलं सगळं सांगितलं. ती आणि ईशा कसं सगळं ठरवून, त्यांची ओळख लपवून सुजयच्या बिल्डींगमध्ये गेल्या, त्या बाजूच्या आजी, त्यांच्याकडून कळलेलं सुजयचे आई-वडील यु.एस ला असल्याचं सत्य….सगळंच.

 

सगळं नीट सांगताना सायलीने मुद्दामच तीबद्दल काहीच उल्लेख केला नाही. हा विषय असा होता, की स्वतःला अनुभव आल्याशिवाय कुणीही त्यावर विश्वासच ठेवला नसता. आणि तसंही सिद्धार्थला आत्ता त्याबद्दल कळून तसा काही उपयोग होणार नव्हता.

तुम्ही दोघी खरंच ग्रेट आहात. त्याचे खरे आईवडील यु.एसला आहेत तर मग तो तसं सांगत का नाहीये? खोटं का बोलतोय? एक मिनिट, म्हणजे साखरपुड्यात होते ते त्याचे खरे आईवडील नव्हते?”

सिद्धार्थला एकावर एक धक्के बसत होते.

ते त्याचे आईवडील नव्हते. आम्ही त्यांच्या शेजारच्या आजींना भेटून खात्री करून घेतली आहे. आणि तो खोटं का बोलतोय हेच तर शोधून काढायचंय आपल्याला…..” ईशा

 

हम्म….बरं आणि हे डायरीमध्ये लिहिलयस ती तीकोण आहे?” सिद्धार्थ

ईशा आणि सायलीने एकमेकींकडे बघितलं.

ते एवढं महत्वाचं नाहीयेआम्हाला ….”

ईशा उत्तर द्यायचं टाळत होती पण पुढे काय बोलायचं ते तिला सुचेना. तिने प्रश्नार्थक नजरेने सायलीकडे बघितलं.

तुला वाटेल आम्ही काहीतरी लपवाछपवी करतोय किंवा आम्हाला सांगायचं नाहीये. पण तसं नाहीये.” सायली

सिद्धार्थचा गैरसमज होण्यापेक्षा त्याला सगळं सांगणं योग्य ठरलं असतं.

मला सांगऑकल्ट (occult) सायन्स किंवा पॅरानॉर्मल स्टडीज बद्दल तुझं काय मत आहे?” सायली

 

वेल, ज्या गोष्टींचा अनुभव आपल्याला नाही, त्याबद्दल आपण काय सांगणार? पण त्याचा काय संबंध आहे इथे?” सिद्धार्थ

 

हे बघ, खरं तर आत्ता हे तुला सांगायला हवंय की नाही माहित नाही. म्हणजे तुला सांगायचंच नाहीये असं नाही. पण आम्ही जे सांगू त्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही. म्हणून आत्ता आपण जे बोललोय तेवढ्यापर्यंतच थांबूया आज. आधी आज आपण बोललोय तो शोध घेऊया. बघू काय कळतं आपल्याला ते.” सायली

 

आणि ते जे मला सांगायचं टाळतेयस, त्याच्याशिवाय हा शोध पूर्ण होणारच नसेल तर? मला माहित असायला नको का?” सिद्धार्थ

ईशा आणि सायली काहीच बोलल्या नाहीत. सिद्धार्थला हे सगळं एक्स्प्लेन करणं खूप कठीण होतं.

सायली…..??” सिद्धार्थ

 

ओकेमी सांगण्याचा प्रयत्न करते तुला.” सायली

सायलीने सगळ्यात आधी तिला पडलेल्या त्या विचित्र स्वप्नाबद्दल सांगितलं. त्यानंतर रात्री आपोआप उघडलेली खिडकी. सिद्धार्थ खूप कुतूहलाने ते सगळं ऐकत होता. ते पाहून सायलीला विश्वास वाटत होता की हे सगळंच तो नीट समजून घेऊ शकेल. त्यानंतर सायलीने साखरपुड्याच्या दोन दिवस आधी, ज्या दिवशी ती अचानक सुजयच्या घरी गेली होती, त्या दिवसाबद्दल सांगायला सुरुवात केली. रात्री मेहंदीचा कार्यक्रम चालू होता आणि अचानक लाईट्स गेले आणि सायली ईशाला नेण्यासाठी आत आली. इथून पुढचं सगळं वर्णन ऐकताना मात्र सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. ‘तीजी कुणी होती ती खिडकीतून बाहेर गेली असावी, ह्या सायलीच्या वाक्यावर मात्र सिद्धार्थला अगदी हसू आवरेना. तो मोठमोठ्याने हसायला लागला. इतका, की हसून हसून त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

 

सायली आणि ईशा शांतपणे त्याच्याकडे बघत राहिल्या. त्याची रिएक्शन त्यांनी अपेक्षा केली होती तशीच होती. हे कुणालाही खरं वाटणं कठीणच होतं. सायली मात्र थोडी दुखावल्यासारखी झाली होती. सिद्धार्थचं सुरुवातीपासूनचं समजूतदार वागणं बघून तिला उगीचच असं वाटलं होतं, की हे सगळं सुद्धा त्याला नीट कळू शकेल. पण असं झालं नव्हतं. तिच्या बोलण्यावर तो हसला होता आणि तिला ते खूपच लागलं होतं.

कम ऑन सायली, तू जे काही सांगतेयस, ते एखाद्या हॉरर फिल्मची स्टोरी वाटू शकते. तू स्वतः कनव्हीन्स्ड आहेस ह्या सगळ्याबद्दल? आय मीन, आय जस्ट डोन्ट अँडरस्टंड. तुझ्यासारखी मुलगी हे सगळं बोलतेय? ” सिद्धार्थ

 

मी सांगत होते तुला आधीच, तुझा नाही विश्वास बसणार. तू म्हणालास म्हणून मी सांगतेय सगळं. आणि माझ्यासारखी मुलगी हे सगळं बोलतेय, ह्याचा अर्थ ह्यात थोडं तरी तथ्य असू शकेल, असा विचार नाही करावासा वाटला तुला? तू हे सगळं ऐकतोयस माझ्याकडून. पण मी आणि ईशाने हे प्रत्यक्ष अनुभवलंय. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि असं म्हणतात ना, की आयुष्यात कधीतरी असा क्षण येतोच ज्यावेळी एखाद्या गोष्टीबद्दल आपली आधीची सगळी मतं, सगळे पूर्वग्रह दूर होतात, किंवा निदान त्या गोष्टीबद्दल नव्याने काही मतं बनवायला आपण तयार होतो. हे मी सगळं बोलतेय कारण माझ्या आयुष्यात असा क्षण तीघेऊन आली आहे. तिच्यामुळे बरेच प्रश्न पडलेत मला. तिच्यामुळे जे दिसतं, फक्त तेवढंच असतंअसा माझा विश्वास डळमळीत झालाय. आपल्याला डोळ्यांना जे दिसतं, त्या पलीकडे काहीतरी आणखी मोठं असू शकतं, ह्याबद्दल मी हळूहळू ठाम होतेय. आणि मी हे जे सगळं बोलतेय, त्यावरून मी किती सिरीयसली बोलतेय हे तुला कळलं असेल. मी इतकी सिरियस आहे ह्याबाबतीत कारण ऑल धिस इज हॅपनिंग इन माय लाईफ. ऑल धिस इज इन सम ऑर द अदर वे रिलेटेड टू द मॅन आय एम गोइंग टू मॅरी इन अ फ्यु डेज. मी इतकी सिरियस आहे ह्याबाबतीत कारण माझं लग्न मोडलं तर माझे आईबाबाही कदाचित मोडून पडतील. तरीही मला ह्या सगळ्याचा शोध घ्यायचाय. “

सायली इतकी संतापाने आणि तावातावाने बोलत होती की ईशा आणि सिद्धार्थ तिच्याकडे नुसतेच बघत बसले होते. तिच्याशी काही बोलण्याची सिद्धार्थची हिम्मतच होत नव्हती. सायलीच्या डोळ्यातून येणारं पाणी ईशाला दिसलं आणि मग मात्र तिला राहवेना. तिने सायलीच्या खांद्यावर हात ठेवला.

सायली…..”

ती सिद्धार्थकडे नजर रोखून बघत होती.

ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहित होतं. त्यावर तू दहा प्रश्न विचारले असतेस तरीही माझं काही म्हणणं नव्हतं. पण तुला माझ्या बोलण्यावर इतकं हसू आलं, तुला त्याच्यात इतकं हास्यास्पद वाटलं, हे बघून मी खूप हर्ट झालेय. हे जे सगळं घडतंय ना माझ्या आयुष्यात, ह्या सगळ्याबद्दल कुणाला तरी इतकं हसू येत असेल, तर त्यातला सिरियसनेस त्याला कळत नाहीये असा त्याचा अर्थ होतो. जमत असेल तर माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ. माझ्यावर आत्ता किती मेंटल प्रेशर आहे तुला अंदाज नसेल कदाचित. ह्या सगळ्याच्या बाबतीत गम्मत करण्याच्या किंवा इतरांना ती गम्मत वाटत असेल तर ते समजून घेण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. तू एवढा कन्सर्न दाखवून कौस्तुभबद्दल आम्हाला सगळं सांगितलंस, त्याबद्दल थॅंक्स. पण आता ह्या वाटेवर तुझी साथ नाही मिळाली तरी मला चालेल. मी आणि माझी बहिण समर्थ आहोत हा शोध घ्यायला…..चल ईशा निघूया आपण…..”

सायली आणि ईशाला बाहेर जाताना बघून सिद्धार्थ तसाच हताशपणे बसून राहिला…..

—————————-

संध्याकाळी सायली घरी आली ती खूपच दमलेली, थकलेली वाटत होती. अनिकेत मित्राकडे गेला होता. ईशा एकटीच घरी होती. चहा घेतानाही दोघी गप्पच होत्या. सकाळच्या प्रसंगावरून सायली अजून अपसेट असेल का ह्याचा ईशाला अंदाज येत नव्हता. पण सध्या दोघींकडेही बोलण्यासाठी काही वेगळा विषय असणं शक्यच नव्हतं. आईबाबा मी आज्जीला घेऊन उद्या कदाचित परतही आले असते. त्यानंतर सायलीकडून लग्नाचा निर्णय कळल्यावर घरी लगबगच सुरु होणार होती. वेळ फार कमी होता आणि आणि अजून काही माहिती मिळवायची बाकी होती. खरं तर सुजयबद्दल अजून किती कळायचं राहिलंय ह्याचा त्यांना अंदाजच येत नव्हता.

सायली, कसा गेला तुझा दिवस? ” ईशा

 

ठीक गेला. काम सगळं नेहेमीचंच असल्यामुळे डोकं दुसरीकडे असलं तरी काम एका बाजूला होत राहतंतू काय केलंस दिवसभर ? अनिकेत तर त्याच्या कुठल्या सबमिशनच्या मागे आहे आता तू काय केलंस एकटीने ?”सायली

 

आपल्याला काम कमी आहे का सायली? मी बराच वेळ त्या कौस्तुभबद्दल काही आणखी कळतंय का ते इंटरनेट वर बघत होते. पण काहीच नाही मिळालं यार. फेसबुकवर तर त्या नावाची बरीच लोकं आहेत. किती वेळ घालवणार त्यात? आणि असं इंटरनेटवरून त्याच्याशी कम्युनिकेट करणं रीस्कीच आहे तसं. ..नंतर मी तुझी डायरी घेऊन बसले होते. सगळं परत वाचून बघितलं त्यातलं. काल आपल्याला जे कळलं, ते माही वगैरे ते लिहून ठेवलं त्याततो दुसरा शब्द क ट न ई‘, त्याचा काही अर्थ लागतोय का ते बघत होते. खूप विचार केला त्यावर पण काहीच नाही कळलं. पुढे आता काय करता येईल त्याचा विचार करत होतेतेवढ्यात तू आलीस….” ईशा

 

हम्मपुढे काय करायचं ते ठरवायला हवंचबघू जरा ती डायरी….” सायली

वाचतावाचता अठराव्या पॉइण्ट पाशी सायली थांबली.

ईशा, हे बघ. हा पॉइण्ट. अठरावा.”

१८. नागपूरला राहणारे त्याच्या मावशीचे मिस्टर आज इथे भाजी घेताना भांडताना दिसले. ते नक्की मुंबईत कधी आले, ह्याबद्दल सुजयने दिलेली खोटी माहिती.

मला वाटतं ईशा, आपण ह्या दिशेने शोध घेऊया आता….” सायली

 

पण करायचं काय नक्की?” ईशा

 

ते सुजयच्या मावशीचे मिस्टर, त्यांच्याबद्दल सगळी माहिती काढूया. कशी ते ठरवायला हवंच. पण ईशी आपण त्या भाजीवाल्यांना जाऊन भेटू शकतो, ते अजूनही तिथे भाजी घ्यायला येत असतील तर कदाचित काहीतरी माहिती मिळू शकते आपल्याला. ..” सायली

 

चालेल, उद्याच जाऊ….सकाळीचआणि मग तू ऑफिसला जा…” ईशा

 

मी रजाच घेतली आहे ईशा….लग्नासाठी……” सायली

 

काय?” ईशा

 

अगं बाई, लग्न करणार नाहीये मीपण त्या नावाखाली रजा तर घेऊ शकते ना….आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि रजा आहेत तेवढ्या माझ्या…” सायली

 

पण……”

ईशाला मधेच तोडून सायली म्हणाली,

मला माहित आहे तू काय म्हणणार आहेस ते….मी पंधरा दिवसात लग्न करणार असं काही ऑफिसमध्ये सांगितलं नाहीये. मी सांगितलंय की सुजयचं यु.एस ला जायचं ठरतंय आणि त्याच्याबरोबर वेळ स्पेंड करायला मिळावा म्हणून मी रजा घेतली आहे….बरं चल आता मी जरा फ्रेश होतेमग बोलू..”

सायली उठून आत जायला निघाली तशी ईशा म्हणाली,

आणखी एक विचारू का सायले? सिद्धार्थशी काही बोलणं झालं का दिवसभरात?”

 

हो झालं ना, पण कामाबद्दलच. आणि तसंही त्याला दुपारी हेड ऑफिसला जावं लागलं काही कामासाठी. ” सायली

 

तुला अजून राग आलाय का त्याचा? सायली त्याची मदत होऊ शकते आपल्यालाआणि आय एम शुअर, तो सुद्धा ह्या बाबतीत आपल्या एवढाच सिरियस आहे….” ईशा

 

तो ज्याप्रकारे हसला त्यावरून तसं वाटलं नाही मला….आणि ईशा, जर त्याला हे तीप्रकरण इतकं हास्यास्पद वाटत असेल, तर तो कसा काय ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणार आणि आपल्याला मदत करणार?” सायली

 

ते मला आत्ता माहित नाहीमला पण त्याचा राग आला होता तो हसला तेव्हा, पण त्याच्या बाजूने विचार केला तर साहजिक आहे ते….”ईशा

 

तुम्ही सांगताय त्यावर माझा विश्वास बसत नाही, असं तो म्हणाला असता तर मी नक्कीच समजू शकले असते. पण त्याच्या हसण्याचं कारण मी समजून घेऊ शकत नाही ईशीएनीवे, मला बोलायचं नाहीये आत्ता ह्या विषयावर”

सायली आत निघून गेली.

——————————-

रात्रीचे अडीज वाजले असतील. ईशाला जाग आली. खोलीत अंधारच होता. सायली तिच्या बाजूला नव्हती. समोर कॉम्प्युटर टेबलच्या खुर्चीवर बसली होती. अशी अंधारात बसून काय करत होती ती?

सायले…”

ईशा धडपडत उठून बसली. तिने जाऊन लाईट्स लावले.

काय करतेयस तू अशी अंधारात बसून? मला किती भीती वाटली माहितीये सायले?” ईशा

सायली हसली.

का ? तुला काय वाटलं? ‘तीआली? “

 

हसतेस काय? अर्थात मला तसंच वाटणार ना, सध्या हेच सगळं घडतंय आजूबाजूला….”

सायली नॉर्मल आहे हे बघून ईशाच्या जीवात जीव आला होता.

हम्मते आहे..” सायली

 

अगं पण काय करतेयस तू अशी अंधारात बसून?” ईशा

 

विचार करतेय गं. आठवण्याचा प्रयत्न करतेय. सकाळी मी तुला म्हणत होते ते डोक्यातून जात नाहीये. सारखं असं वाटतंय की तिथे काहीतरी आहे. कुणीतरी मला सांगितलं होतं, तिथे जाऊन बघ, असं काहीतरीझोपले तरी डोक्यात हेच सगळे विचारम्हणून इथे येउन बसले. यु नो ईशी, अंधारात असं बसल्यावर इतकं शांत वाटतं ना, डोक्यातले सगळे विचार पुसट होतात आणि आपल्याला हव्या त्या गोष्टीवर फोकस करता येतं…”सायली

 

ते सगळं ठीक आहे. पण तू सकाळी हेच म्हणत होतीस आणि आपण तिकडे जाऊन बघितलं ना…काही नाहीये तिकडे सायली. ती भिंत, तिथे कपाट आणि मागे व्हरांडा. व्हरांड्याचं दार उघडायचं तर कपाट सरकवावं लागेल आधी.आणि ते आपल्याला ….:

ईशा बोलत असतानाच सायली उठून समोरच्या दिशेने चालायला लागली. जणू काही तिला ईशाच्या आवाजाऐवजी दुसराच कसला आवाज ऐकू येत होता. तिला काहीतरी सांगत होता. कुणाचा आवाज होता तो? की तिच्याच मनातून आलेला आवाज होता…..?

“सायली कुठे चाललीयेस ?”

सायली कपाटासमोर जाऊन उभी राहिली. ईशा धावत तिच्यापाशी गेली.

काय बघतेयस इथे सायली?”

एक मिनिटभर सायली तशीच शांतपणे समोर बघत उभी राहिली. ईशा तिला हाक मारत होती पण तिला ते ऐकूच जात नसावं. ईशाने तिच्याकडे बघितलं. ती भानावर आहे की नाही, हे तिला कळत नव्हतं. सायलीच्या चेहऱ्यावर जे भाव दिसत होते, ते नक्की कसले होते? तिला आत्ता ती जिथे आहे, त्या जागेची, वेळेची, बाजूला उभ्या असलेल्या ईशाच्या अस्तित्वाची जाणीव तरी होती का?

 

आत्तापर्यंत दोन-तीन वेळा ईशाला असा अनुभव आला होता, तरीही सायलीच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून ईशाच्या मनात भीतीची एक शिरशिरी उठली. पुढे काय दिसणार आहे, काय होणार आहे, काहीच अंदाज येत नव्हता. सायली अशी पुतळ्यासारखी का उभी आहे ? आपल्या हाका तिला ऐकू जातायत का? काय चाललंय तिच्या मनात? आत्ता सायली जशी दिसतेय, ती खरंच सायलीच आहे, की आणखी कुणी?

 

खिडकीवर जोरात थडथड असा आवाज झाला आणि ईशा जोरातच दचकली. इतकी, की ती घाबरून थोडीशी किंचाळलीच. तिच्या किंचाळण्याचाही सायलीवर काहीच परिणाम झाला नव्हता. ईशाने घाबरत घाबरतच मागे वळून बघितलं. खिडकी बंद होती, मग एवढा जोरात आवाज कसला झाला होता?

 

मागे वळून बघतानाच ईशाला तिच्या बाजूला कुणीतरी उभं असल्याचा भास झाला. तिने पुन्हा मान वळवून बघितलं. कुणीच नव्हतं. तेवढ्यात डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला समोरची, आत्ता सायली बसली होती ती खुर्ची पुढे सरकल्याचा भास झाला. तिच्या हृदयाचे ठोके जलद पडायला लागले. नीट पाहिलं तर खुर्ची जागेवर तशीच होती. खोलीत तिच्या आणि सायलीशिवाय कुणीतरी आणखी होतं, नक्कीच. ते अस्तित्व जाणवत होतं. खुर्चीकडे बघत असताना ईशाला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. काहीतरी, कुणीतरी एका झटक्यात पळत एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेल्यासारखं वाटलं. श्वास रोखून ती पुन्हा वळली. तिच्या मागे, त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं. त्याच वेळी सायलीच्या चेहऱ्यावर मात्र मंद हसू फुटलं होतं.
खिडकीवर पुन्हा तसाच, खरं तर त्याहूनही जोरात काहीतरी आदळल्यासारखा आवाज आला आणि ईशा पुन्हा दचकली. पण सायली ….

 

तेवढ्यात सायली पुढे सरकली आणि तिने कपाटाचं दार उघडलं आणि त्यातून सगळं बाहेर काढायला सुरुवात केली.

हे काय करतेयस तू?”

सायलीकडून काहीच प्रत्युत्तर नव्हतं..

 

कपाटातली एकएक वस्तू बाहेर येत होती. कपड्यांच्या ढिगावर त्या दिवशी पलंगाखाली सापडलेली ती वस्तू येउन पडली आणि सायलीचे हात थांबले. त्या वस्तूकडे ती एकटक बघत राहिली. ईशाला तिला नक्की काय होतंय, काय करायचंय काहीच कळत नव्हतं.

ईशा, हे बघ. हेच शोधत होते मी बहुतेक.”

इतक्या वेळानंतर सायलीचा आवाज ऐकून ईशाला बरं वाटलं. आता ती अचानक नेहेमीसारखी बोलायला लागली. एवढा वेळ मी हिला हाक मारत होते, हे हिला आठवतही नाहीये, ईशाच्या मनात येऊन गेलं. 

खोलीतलं वातावरणही अचानक पूर्वीसारखं झाल्यासारखं वाटत होतं. इतकं, की गेला काही वेळ आपण जो विचित्र भास-आभासांचा खेळ अनुभवला, ते सगळं नक्की झालं होतं की आपल्याला काही स्वप्न पडलं होतं, अशी ईशाला शंका यायला लागली.

“ईशा…कुठे हरवली आहेस? हे बघ, आपण जे शोधत होतो ते मिळालंय….” सायली

सायलीने मेटलसारख्या कशापासून तरी बनवलेलं ते लॉकेट हातात घेतलं होतं. बऱ्यापैकी जड होतं ते.

बघू….” ईशाने ते हातात घेतलं, “हे काय आहे? तुझं आहे हे?”

 

माझं नाहीये. त्या दिवशी भीमा बाईंना सापडलं पलंगाखाली….” सायली

 

हो, पण मग त्याचा आपल्याशी काय संबंध आहे? कुणाचंतरी पडलं असेल….” ईशा

 

हे कधी मिळालं माहितीये तुला? साखरपुड्याच्या दोन दिवस आधी जेव्हा तीतुला पहिल्यांदा दिसली आणि इथे खोलीत आली होती आणि मग तू तिला खिडकीतून बाहेर जाताना बघितलंस ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी…..”

सायलीने ते लॉकेट हातात घेऊन निरखून बघायला सुरुवात केली .

त्या दिवशी तर तुझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या, त्यांचं कुणाचं असू शकेल…” ईशा

 

पण इथे आत कोणीच आलं नव्हतं ईशासगळे बाहेरच होते. “

सायली अजूनही लॉकेटकडे बघत होती. कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं तिला ते.

हो पण आपण ……”

 

ईशा….”सायली जोरात ओरडली. “नक्कीच ….यस..मला काहीतरी कळलंय …..मला कळलंय. हे लॉकेटच आपल्याला पुढचा रस्ता दाखवणार आहे आता …”

———————

त्याच वेळेला सुजयही जागा होता. सायलीचे आईबाबा कधी एकदा गावाहून परत येतील आणि कधी एकदा सायलीचा निर्णय आपल्याला कळेल, असं त्याला झालं होतं.

तिच्या बाबांच्या फोनची एवढी वाट बघण्याची गरज आहे का? माझं लग्न ठरलंय तिच्याशी. मी डायरेक्ट तिच्याशी बोलूच शकतो ना, निदान अंदाज तर येईल. तसं काल ऑफिसमध्ये भेटायला गेलो तिला तेव्हा तिच्या बोलण्यावरून ती वेगळा काही निर्णय घेईल असं वाटत तर नाहीपण एकदा प्रत्यक्ष तिच्याकडून काही कळलं तर बघावं..बाकी पुढचं सगळं तिचे बाबा बोलतीलच…..जाऊन भेटावं का तिला? नको शक्यतो भेटणं टाळायलाच हवं. फोन करू उद्या तिला आणि एखादा मेसेज करावा आत्ता….”

त्याने बाजूला पडलेला मोबाईल उचलला आणि मेसेज टाईप केला,

हाय सायली, कशी आहेस? आज खूप बिझी होतो पण त्यातसुद्धा तुझा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. खरं तर खूप बोलायचंय तुझ्याशी पण आत्ता झोपलेली असशील. तू अशी शांत झोपलेली असताना तुला डिस्टर्ब करायचं नाहीये मला. माझी स्वप्न बघतेयस ना ? 🙂 उद्या फोन करेन नक्की….बाय…”

मेसेज सेन्ट

———————————–

त्याच वेळेला सिद्धार्थही त्याच्या घरी जागाच होता. आज शांत झोप येणं शक्यच नव्हतं. सायली सकाळी त्याच्यावर रागवून गेली, त्यानंतर त्याला तिच्याशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. आणि दुपारनंतर हेडऑफिसला जावं लागल्यामुळे त्याला नंतर तिला भेटायलाही जमलं नाही. त्याला तिची माफी मागायची होती आणि तिच्या शोधात तिची साथ द्यायची होती. पण ती आता या सगळ्याबद्दल आपल्याशी बोलेल तरी का याचीही त्याला खात्री वाटत नव्हती. संध्याकाळी तो फोन करू शकला असता खरं तर, पण त्याची हिम्मतच झाली नव्हती. आता मेसेज करून तिची माफी मागावी आणि मग उद्या सकाळी फोन करावा असा त्याने विचार केला आणि मेसेज टाईप करायला सुरुवात केली.

हाय सायली, रागावली आहेस का अजून? आज सगळ्या कामाच्या गडबडीत सुद्धा तुझा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. मी हर्ट केलंय तुला. त्याबद्दल मनापासून सॉरी. मला खूप बोलायचंय तुझ्याशी. पण आता तू  शांत झोपलेली असताना तुला डिस्टर्ब करायचं नाहीये मला. उद्या फोन करेन बाय..”

मेसेज सेन्ट

———————————–

“कळलंय? काय कळलंय तुला?”

ईशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव एकत्र दिसत होते.

तेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं इंडीकेशन आलं. ‘टू, टू…टू,टू ‘

“आत्ता एवढ्या रात्री कुणाचा मेसेज? बघ गं ईशा जरा…..”

तेवढ्यात अजून एक मेसेज आला, ‘टू टू, टू,टू ‘

“बघते. पण आधी मला तुला काय कळलंय ते सांग…..”

 

क्रमशः

4 Comments Add yours

  1. awesome… Pudhacha bhag shakya titkya lavkar taka pls 🙂

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      nakki …tasa prayatn nehemi astoch….dhanyawaad ..

      Like

  2. Sagar says:

    quite interesting story…….plz upload remaining parts ASAP…………

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      sure….uploading the next part soon

      Like

Leave a reply to rutusara Cancel reply