अज्ञाताची चाहूल : (भाग : 29)

काय करावं काहीच सुचत नव्हतं सायलीला. ती तशीच उभी राहिली होती. विचार करून फोन करते, असं ईशा म्हणाली होती खरं, पण अजून तिचा फोनही आलेला नव्हता. जावं का निघून असंच, सुजयच्या आईला काहीही न सांगता? खरं तर असं पळून गेल्यासारखं करणं तिला पसंतच नव्हतं. पण आत्ता ईलाज नव्हता. सुजयने तिला इथे बघितल्यावर ती काय सांगणार होती त्याला? तिने कितीही कथा रचून सांगितल्या असत्या तरी सुजयचं विश्वास बसला नसताच. जाऊदे, असं नुसतं विचार करण्यापेक्षा पटकन निघून जावं आणि सुजयच्या आईला नंतर फोन करून सांगावं की आपल्या भेटीबद्दल सुजयला काहीही बोलू नका, हेच ठीक आहे. अर्थात, त्यांनी सुजयला सांगणं, न सांगणं सगळं त्यांच्याच हातात होतं त्यानंतर. पण निदान हा एक उपाय होता. पटकन घरातून निघून जाण्याचा विचार करून ती घाईघाईत दरवाजापाशी गेली. तेवढ्यात बाहेर गेट उघडल्याचा आवाज आला आणि घाबरून ती तिथेच खिळून उभी राहिली.

******************भाग २८ पासून पुढे***********************

भाग २८ येथे वाचा <<– http://wp.me/p6JiYc-Jv

 

पुन्हा दुसऱ्या क्षणी ती सावरली आणि पटकन सोफ्यावर जाऊन बसली. आता सुजयने आपल्याला बघितल्यावर आपण कसं रिऍक्ट व्हायचं? हे त्याचं घर आहे हे आपल्याला माहितीच नाही असं दाखवायचं का? पण मग इथे कशासाठी आलो असं सांगायचं? आणि त्याची रिऍक्शन कशी असेल आपल्याला इथे बघितल्यावर?आता तो आपल्याला बघेल आणि मग हा लपाछपीचा खेळ इथेच थांबेल. आता त्याला सगळं उघड उघड विचारावं लागणार. पण तो खरं सांगणार नाहीच. पोलिसांचा धाक दाखवला तर? पण तो पोलिसांसमोर असं का कबूल करेल ? तो म्हणेल की मीच सुजय साने आहे, तर मग फसवणूक कसली? काय करायचं आता? आपलंच चुकलं. पटापट त्याच्या आईकडून माहिती काढून इथून निघून जायला हवं होतं. पण आता जरतर ला काय अर्थ आहे? तो आलाय आता आणि आता त्याला हेही कळेल की आपल्याला सगळं कळलंय….उलटसुलट विचार प्रचंड वेगाने सायलीच्या डोक्यात उमटतही होते आणि विरूनही जात होते. तिच्या फोनवर एका मागोमाग एक मेसेजेस येत होते, त्याकडेही तिचं लक्ष नव्हतं.

ओ सानेकाकू…..काकू…..”

एका लहान मुलाच्या हाकेने ती तिच्या विचारातून बाहेर आली.

 

एक लहान सातआठ वर्षांचा मुलगा दरवाजातून धावत आत येत सोफ्यापाशी येऊन उभा राहिला. सायलीकडे थोडं गोंधळलेल्या नजरेने बघत त्याने विचारलं,

सानेकाकू कुठ्येत?”

सायलीने आतल्या खोलीच्या दिशेने बोट दाखवलं आणि मान फिरवून दरवाजाकडे एक चोरटा कटाक्ष टाकला. दरवाजात आणखी कुणीही नव्हतं.

ओ सानेकाकू…..”

त्या मुलाने आणखी जोरात हाक मारली तशी काकू लगबगीने बाहेर आल्या.

अगबाई, ओम तू? अरे किती दिवसांनी आलास आमच्याकडे? आणि कशाला हाक मारतोयस एवढ्या जोरात? काही काम आहे का?”

 

काकू, सुजयदादाने निरोप दिलाय. काहीतरी महत्वाचं काम आहे, ते आटोपून येतो म्हणाला. तुम्हाला फोन करत होता पण फोन उचललाच नाही म्हणाला. म्हणून माझ्याकडे निरोप दिला.”

सायलीच्या स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे इतक्या जवळ आलेलं संकट आपल्याला चेहराही न दाखवता परत फिरलं, ह्याबद्दल.

काय?” काकूंसाठी अर्थातच ही चांगली बातमी नव्हती. “अरे असं कसं पण? तुला कुठे भेटला तो ?आत्ता अगदी दोन मिनिटात येतो म्हणाला होता. मागच्याच गल्लीत होती त्याची रिक्षा. मग एकदम काय झालं? आणखी काय म्हणाला तुला? आणि कधीपर्यंत येतोय? आणि गेला कुठे नक्की?”

काकूंच्या प्रश्नांची उत्तरं अर्थात त्याच्याकडे नव्हती.

माहित नाही काकू. इथे गेटपाशी आली रिक्षा. आम्ही खेळत होतो ना, तर त्याने रिक्षातूनच मला हाक मारली आणि म्हणाला की आई , म्हणजे तुम्ही, फोन उचलत नाहीये. तिला सांग, एक काम आहे ते आटोपून येतो. लगेच सांग म्हणाला आणि रिक्षा परत वळली आणि गेली. काकू, मी जाऊ? आम्ही खेळतोय..” तो जाण्यासाठी निघालासुद्धा.

 

हो ठीक आहे……”

काकू त्यांच्याच विचारात होत्या. मग एकदम भानावर येऊन त्यांनी त्याला थांबवलं.

ओम, अरे एक मिनिट. एक तर इतक्या दिवसांनी आलायस. मला सांग, गुलाबजाम आवडतात ना तुला? थांब जरा, मी आणते तुझ्यासाठी. आधी घरी जाऊन आईकडे दे आणि मग जा खेळायला. कळलं का?” काकू आत गेल्या.

तो मुलगा तिथेच उभा राहून खिडकीतून बाहेर बघत त्याच्या मित्रांचा चाललेला खेळ बघायला लागला. सायलीचे विचार पुन्हा सुरु झाले.

 

मगाशी आलेलं टेन्शन तर दूर झालेलं होतं, पण आता इथे जास्त वेळ थांबणं धोक्याचं होतं. सुजय कुठल्या कामासाठी गेला होता आणि तो किती वेळात परत येईल ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता. मगाशी प्रचंड टेन्शनमध्ये असताना काकूंचा लँडलाईन फोन कदाचित वाजत होता, असं तिला वाटलं आता. रिंग वाजली होती पण ती तिच्या विचारात इतकी गुंतली होती की तिने काकूंना फोन घेणयासाठी हाकही नाही मारली. बरोबर, रिक्षा गेटजवळ पोहोचत असतानाच सुजय काकूंना फोन करत असणार. फोन उचलला नाही म्हणून त्याने गेटच्या बाहेर खेळणाऱ्या मुलांपैकी एकाला बोलवून घरी निरोप द्यायला सांगितलं आणि रिक्षा तशीच वळवली. म्हणजे आता अगदी एक मिनिटांपूर्वी सुजय इथे बाहेर गेटपर्यंत आला होता आणि त्याचवेळी आपण इथे त्याच्या घरात. विचार करूनही सायलीला छातीत धडधडल्यासारखं होत होतं. पण मग तो घरापर्यंत येऊन मागे का वळला? काय कारण असेल? त्याला कळलं तर नसेल ना की मी इथे आलेय आणि मला टाळण्यासाठी तो बाहेरच्या बाहेर परत गेला? एवढं काय महत्वाचं काम असेल?

हं, हे घे, नीट घेऊन जा. धडपडू नकोस बरं का?” काकू तेवढ्यात गुलाबजाम घेऊन बाहेर आल्या होत्या.

तेवढ्यात सायलीचा मोबाईल वाजला. मोबाईल हातात घेताच सायलीचे श्वास पुन्हा एकदा जलद पडायला लागले. सुजयचा फोन होता.

नक्कीच ह्याला कळलेलं असणार, म्हणूनच हा माझ्या समोर न येता मला फोन करतोय….फोन घेऊ का? पण काय बोलेल तो नक्की? आपण उत्तर काय देणार? आणि समोर त्याच्या आई…..बोलता तरी येईल का त्यांच्या समोर? त्यापेक्षा फोन न घेतलेलाच बरा…..”

सायली वाजणाऱ्या फोनकडे नुसतीच बघतेय हे पाहून काकू तिच्याकडे वळल्या.

श्वेता…..”

पण सायलीचं लक्षच नव्हतं. श्वेता म्हणून काकू आपल्याला हाक मारतायत हे तिच्या पटकन लक्षातच नाही आलं.

काकूंनी आणखी जवळ जाऊन तिला हाक मारली, यावेळी मात्र त्यांचा आवाज ऐकून सायली तिच्या तंद्रीतून बाहेर आली.

हाकाय ?”

 

अगं फोनकडे नुसतीच पाहत काय बसलीस? घे ना फोन …” काकू ओमला टाटा करत म्हणाल्या.

 

अं…..नाही ….एवढा महत्वाचा फोन नाहीये. मी नंतर करेन फोन. काकू, मी पण आता निघते. उशीर होतोय…”

आता संधी मिळाली होती तर तिथून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं होतं.

अगं चहा तरी घे. आणि थांब जरा गुलाबजाम केलेत आज. सुजयचा वाढदिवस ना म्हणून. ते घेतल्याशिवाय जाऊ नकोस हो. पण एक मिनिट फक्त, मी सुजयला फोन करून घेते आणि मग आणते चालेल ना?”

 

? अं …..हंहोठीक आहे. तुम्ही फोन करून घ्या काकू. खायला खरंच नको मला. आज उपवास असतो ना माझा. पण काकू, सुजयला सांगू नका मी आलेय ते…”

टेन्शनमुळे सायलीचा आवाज कापत होता पण काकूंच्या काही ते लक्षात आलं नाही. कुठल्याही क्षणी सुजय येईल, त्याच्या आत जायला हवं हा विचार सायलीच्या डोक्यात आता घोळत होता.

का ते? बरं…..थांबनंतर बोलू….मी फोन लावते…”

बोलताबोलता त्यांनी फोन लावलासुद्धा.

एकदा दरवाजाकडे नजर टाकत सायलीने फोन हातात घेतला. मगाशी एकामागोमाग एक आलेले मेसेजेस आत्ता तिला दिसले. ईशाचे मेसेजेस—

सायले फोनच करणार होते तेवढ्यात बॉसने आत बोलावलंय.

सुजय लगेच येणार नाही ह्याची व्यवस्था मी केलीये.

तुला आणखी काही माहिती काढायची तर काढ आणि मग मात्र लगेच निघ. तू निघाल्याशिवाय तो घरी येणार नाही , डोन्ट वरी.

आणि सगळ्यात महत्वाचं. त्याचा फोन येईल तो घेऊ नकोस.

तिथून निघालीस की मला मेसेज टाक.

हे काय चाललंय? ईशाने नक्की काय केलंय असं की तो परत वळला?

हो….अरे फोन ना…फोन कुठे जाणार ?…पण व्हॉल्यूम कमी झालाय वाटतं रिंगचा. आणि मी आत होते ना….मला ऐकू नाही आलं ……..हो…..कळलं ….पण काय काम आहे ते……हो रे……पण काही झालंय का….तुझ्या आवाजात टेन्शन……हो…..होय ….ठीक आहे…..नीट ये….लवकर ये….वाट बघतेय रे …..”

सुजयच्या आईंचा फोन झाला तसं त्यांनी आधी पदराने मानेवरचा घाम पुसला आणि त्या सोफ्यावर येऊन बसल्या. मग स्वतःशीच बोलावं तशा बोलत राहिल्या,

काय चाललंय ह्या मुलाचं काही कळतच नाही. इथपर्यंत आला काय. आत न येताच गेला काय. काय एवढं काम आलंय कुणास ठाऊक. काही टेन्शनचं नसूदे म्हणजे झालं. फोनवर तरी नीट बोलेल ? पण ते पण नाही. महत्वाचा फोन करायचाय म्हणे. आल्यावर आता कानच पिरगाळणार आहे….काय……”

पण सायलीच्या मोबाईलच्या रिंगने त्यांचं बोलणं मधेच थांबलं.

सायलीने मोबाईलच्या स्क्रिनवर पाहिलं. सुजयचा फोन.

अगं घे ना फोन. ..मी चहा आणते. बस तू…” काकू उठल्या तशी सायलीसुद्धा उठली.

 

काकू, खरंच नको मला. माझा उपवास असतो आज. मी फारसं काही खातच नाही. आणि मग ऍसिडिटी होते म्हणून चहापण नाही घेत. मी निघते आता. उशीर होतोय. लोणावळ्याला जायचंय. त्याआधी इथून काही खरेदी करायची आहे. आपण बोललो ना, ते सगळं कानावर घालेन मी योगिताच्या. आजउद्या असं लगेच नाही. पण जरा आधी थोडा विचार करते, आणखी माहिती मिळेल का बघते. आणि मग तिला सांगेन. मला वाटतं काकू, तुम्ही म्हणालात ना, मध्य प्रदेशातल्या ट्रिपनंतर तो बदलला, असं? कदाचित त्याचं कुणाशीतरी खूप मोठं भांडण वगैरे झालं असेल तिथे. आणि त्याचाच वचपा कुणीतरी कधीतरी काढतंय त्याच्या लग्नाच्या बाबतीत. मी योगिताला समजावेन. माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. निघू मी?”

 

ठीक आहे. सुजयच्या कानावर घालेन मी….”

 

नाही काकू….” सायली उठत होती ते पुन्हा बसलीच. “सुजयला अजिबात कळू देऊ नका प्लिज. अहो, तो आत्ता कुठे बाहेर पडतोय ह्या सगळ्यातून असं म्हणालात ना….मी योगिताला समजावेन असं त्याला वाटलं तर तो पुन्हा आशेवर राहील उगीच. आणि मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे. पण तुम्हालाही सांगते काकू, माझ्याकडून हे नाही झालं, तर मला माफ करा. तुम्हीही आशा ठेवू नका. कारण जेव्हा आपण चांगल्याची वाट पाहतो आणि ते घडत नाही, तेव्हा अपेक्षाभंग होतो. तुमच्या आणि सुजयच्या दोघांच्याही बाबतीत तो व्हायला नको. त्यामुळे, तुमचं सध्या जे चाललंय, जसं चाललंय तसं चालूदे….योगिताकडून काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल तर मीच कॉल करेन तुम्हाला…..आणि सुजयशी काही विषयही काढू नका किंवा त्यावेळी काय झालं होतं वगैरे पुन्हा त्याला विचारायला जाऊ नका. त्याला त्याचा त्रासच होईल. …..” बोलता बोलता सायली उठून दरवाजापाशी आली.

 

बरं, तू म्हणतेस ते सुद्धा ठीक आहे. काहीच माहित नसताना त्याला तरी कशाला आशेवर ठेऊ मी? ठीक आहे, मी वाट बघेन तुझ्याकडून काही कळण्याची. अगं पण तुझ्याबद्दल काही बोललोच नाही आपण? तू कोण, कुठलीआईबाबा कुठे असतात? आणि तुझा नंबर तरी देऊन ठेवमी फोन करेन तुला कधीतरी….”

त्यांना नंबर देणं सायली टाळू शकत नव्हती. त्यांना संशय येऊ शकला असता त्यामुळे. आधीच तिला ह्या खोटं बोलण्यामुळे खूप गिल्टी वाटत होतं. तिने कितीही सांगितलं तरी सुजयच्या आई आशेवर राहणारच होत्या. योगिताची मैत्रीण तिला समजावेल आणि योगिता सुजयशी लग्न करायला तयार होईल आणि सुजय आधीच्या सगळ्यातुन हळूहळू बाहेर येईलह्या भाबड्या आशेवर त्या राहणार होत्या आणि सायलीला हे जाणवून प्रचंड अपराधी वाटत होतं. आपण असं कोणाला तरी नकळत दुखावतोय ही जाणीव तिला आतून अस्वस्थ करत होती. पण सध्या इलाज नव्हता. तिने पुन्हा चपला काढल्या. घरात जाऊन समोरच्या टेलिफोनच्या डायरीत नंबर लिहिला.

काकू माझ्याबद्दल सांगेनच हो. पण आत्ता खरंच निघते. फोनवर बोलूच ना आपण. कधीही करा तुम्ही फोनइथे नंबर लिहून ठेवलाय….”

तो नंबर कधीच लागणार नव्हता, पण काकूंनी तरीही सायलीला थँक्स म्हटलं.

 

अपराधी भावनेने, मनातून त्यांची शंभरदा माफी मागून आणि त्यांना वाकून नमस्कार करून सायली निघाली तेव्हा त्यांचे आशीर्वादाचे शब्द तिच्या कानात घुमत राहिले…. ” यशस्वी हो….”….

——————————————————-

सायली फोन उचलत नव्हती तसा सुजय अस्वस्थ होत होता. काय करायचं त्याला काहीच सुचत नव्हतं. आईला त्याने निरोप पाठवला होता खरा, काम झाल्यावर येतो असा. पण आता मुंबईला परत जावं लागतंय की काय हे त्याला कळत नव्हतं. परत जावं लागलं असतं तर मग हे सुट्टी घेऊन गावाला येणं कॅन्सलच करायला लागणार होतं.

 

आई वाट बघत असेल हा विचार तर त्याच्या मनात येतच होता पण आता तिथे ईशाही वाट बघत असेल आणि गेलो नाही तरी वाईट दिसेल हाही विचार त्याला बाकी काही सुचूच देत नव्हता.

 

रिक्षावाल्याला त्याने रिक्षा बस स्टॅंडपर्यंत परत न्यायला सांगितली. समोर बस स्टॅन्ड दिसताच पुन्हा एकदा तो विचारात पडला. पण रिक्षा अडवून तर ठेवता येणार नव्हती. त्याने त्याची बॅग उचलली आणि तो खाली उतरला. रिक्षावाल्याला पैसे द्यायला खिशात हात घातला तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. ईशाचा फोन.

 

ईशाशी बोलून झाल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. बॅग पुन्हा रिक्षात टाकली आणि त्याला म्हणाला,

आता पुन्हा मगाशी गेलो होतो तिथेच जायचंय….”

——————————————-

सायलीचा ‘सुजयच्या घरातून निघाले’ असा मेसेज आला आणि लगेच ईशाने सुजयला फोन करून सगळं ठीक असल्याचं सांगितलं. आता कामातून जरा पाच मिनिटं वेळ काढून ती सायलीशी बोलू शकणार होती. तेवढयात सायलीचाच फोन आला.

हॅलो…” ईशा

 

ईशा रिक्षात बसलेय गं…..मगाशी माझी काय वाट लागली होती ते आठवून अजून धडधड होतेय, माहितीये? तू काय केलंस पण नक्की? मी तुला फोन केला तेव्हा तो पुढच्या 1-2 मिनिटात घरी पोहोचणार होता. तू काय केलंस काय नक्की?” सायली

 

मग बघितलंस इथे बसून मी तिथली सिच्युएशन कशी हॅण्डल केली ते?” ईशा स्वतःचच कौतुक करत म्हणाली..

 

हो, कळलं मला. तू ग्रेट आहेस….बास? आता सांगशील का ?” सायली

 

तुला कौतुक नाहीच आहे माझं, जाऊदेत. पण खरं सांगू का?तुझा फोन आल्यावर तिथली सिच्युएशन इमॅजिन करून मलाच इथे धडधडायला लागलं होतं. आणि वेळ पण नव्हता हातात. मी विचार करत होते की आता त्याला येण्यापासून थांबवायचं तर आपण काय करू शकतो? एकच सोल्युशन होतं ह्याच्यावर…. तू….. तुझ्याबद्दल असं काहीतरी सांगायचं की तो तिथून लगेच उलट फिरून तुला भेटायला आला पाहिजे. तुला आठवतं मागे मी वेळेवर परत आले नाही म्हणून तू पॅनिक झालीस आणि त्याला फोन केला होतास? तेच आठवलं मला….मग मी त्याला फोन करून सांगितलं की तू मिळत नाहीयेस आणि फोनपण उचलत नाहीयेस..” ईशा

 

काय ? धन्य आहेस तू ईशा….पण मी त्याला फोन करून बोलावलं ते कारण वेगळं होतं. तू त्या काकांच्या मागे गेली होतीस आणि परत आलीस नव्हतीस. त्या काकांचा त्याला काही फोन आला का, ते विचारायला मी फोन केला होता त्याला. बरं ते जाऊदेत…..काय सांगितलंस नक्की त्याला ?” सायली

 

त्याला सांगितलं की तू मिळत नाहीयेस, फोनपण उचलत नाहीयेस. मला खूप टेन्शन आलंय. मावशी आणि काकांना सांगण्याआधी आपण तिला शोधूया का, असं विचारलं. प्लिज हातातलं काम सोडून लवकर ये, अशी रिक्वेस्ट केली. तो म्हणाला मला, मी जरा बाहेर आहेमी तिला फोन करून बघतो वगैरे पण मी थोडं ठणकावूनच सांगितलं त्याला. तू फोन करायची काहीच गरज नाही म्हणून. ती फोनच उचलत नाहीये. त्यापेक्षा तूच ये. मावशी काका लग्नाच्या तयारीला लागलेत. त्यांना आता ही धावपळ करायला लावायची का, असं म्हटलं त्याला. लग्नाचं नाव ऐकून सगळं सोडून धावत निघाला असेल तो….” ईशा

 

धन्य आहेस ईशा….पण तुला सुचलं नसतं तर आपण पकडले गेलोच असतो आज. तो बाहेर गेटपर्यंत येऊन परत गेला माहितीये? आणि मी घरात अगदी बाहेर हॉल मधेच होते….एनीवे, झालं आता ते. मी निघालेय आता. चाळीसेक मिनिटात पुण्यात येईन. “सायली

 

सायले पण काय झालं त्याच्या घरात? आय मिन, ती त्याचीच आई होती का? आणि काही कळलं का आणखी? एखादा क्लू मिळाला की नाही?” ईशाने अधीरपणे विचारलं.

 

हो गं त्याचंच घर होतं. ती त्याची खरी आई होती, माझी खात्री पटली आहे त्याबाबतीत. पण माहिती म्हणशील तर फार काहीच नाही मिळाली. म्हणजे मध्य प्रदेशातल्या एका ट्रिप नंतर त्याचं वागणं, एकूणच स्वभाव खूप बदलला असं त्या म्हणाल्या. त्यामुळे बहुतेक कटनीला काहीतरी घडलं असणार एवढं नक्की. अर्थात त्यांना कटनी वगैरे एवढं माहित नव्हतं काही. पण हा माझा अंदाज. आणखी एक म्हणजे योगिताशी मोडलेलं हे त्याचं पाहिलंच लग्न नव्हतं. त्या आधीपण एक लग्न ठरलं होतं आणि तेपण असल्याच कारणासाठी मोडलं….” सायली

 

मग ती मुलगी कोण…..ते ….आपण विचारलं तर………” ईशा स्वतःशीच बोलल्यासारखी म्हणाली.

 

तुला वाटतं का त्याचा उपयोग होईल? हे बघ, योगिताच्या थ्रू आपण आता त्याच्या खऱ्या फॅमिली पर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आपल्यापासून जी गोष्ट त्याने लपवली आहे, ती तर आपल्याला कळली आहे आता, त्याची खरी फॅमिली. आधीच्या मुलीकडून फार तर तिला कसले विचित्र अनुभव आले, एवढंच कळू शकतं आपल्याला. सध्या तरी आपण त्या दिशेने न जाता कटनीचा विचार केला पाहिजे….” सायली

 

ओके, मला पटतंय तसं हे. पण सायली, योगिताकडून आपल्याला त्याच्या काकांचं नाव आणि पत्ता मिळाला होता, त्यांना जाऊन भेटलं तर…..” ईशा

 

हम्म….त्यांना भेटायला हवंच. पण जिथे त्याची आईसुद्धा एवढंच सांगू शकली, तिथे त्यांना आणखी काय माहित असेलजरा डाऊटच आहे मला. पण एकदा जाऊन भेटायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते कोथरूडला राहतात एवढंच माहितीये आपल्याला. पत्ता शोधायला लागेल….कुठूनतरी काढायला लागेल….” सायली

 

ते माझ्यावर सोड तू. माझ्या ऑफिसमधले दोन जण कोथरूडला राहतात. मी आजच बोलले त्यांच्याशी. एक नारायण साने आणि त्यांची वाईफ एकाच्या बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहतात. नारायण सानेंच्या बायकोचं नाव त्याला आठवत नव्हतं, पण लक्ष्मी साने आहेत का त्या, असं विचारल्यावर तो म्हणाला की बहुतेक हेच नाव आहे त्यांच्या नेमप्लेटवर. हे तेच आहेत का माहित नाही, पण जाऊन बघू शकतो आपण. मी ऍड्रेस घेतलाय. पण सायले, योगिता म्हणाली होती की त्याचं आणि त्याच्या काकांचं फारसं पटत नाही वगैरे. असं असेल तर ते भेटले तरी काहीच बोलणार नाहीत आपल्याशी….” ईशा

 

हम्म ते आहे….पण मला वाटतं ईशा, की योगिताला त्याने खोटं सांगितलं. त्याचे आणि त्याच्या काकांचे संबंध चांगले असणार. पण त्याच्या बदललेल्या स्वभावाबद्दल किंवा मध्य प्रदेशाच्या ट्रिपबद्दल फारसं कोणाकडून तिच्या कानावर पडायला नको म्हणून त्याने तिला असं सांगितलं. म्हणजे त्याच्या काकाकाकूंच्या वाटेला, त्यांच्याशी फारसं बोलायला ती जाणार नाही, असा विचार केला असेल त्याने. तो कसा विचार करत असेल ह्याचा थोडा, काही अंशी तरी अंदाज यायला लागलाय मला……आजच जाऊया त्याच्या काकांना भेटायला…” सायली

 

संध्याकाळी जाऊया? मी येईन वेळेवरघरी येतच नाहीबाहेरच कुठेतरी भेटून डायरेक्ट जाऊया…” ईशा

 

हम्म….चालेल….मी आता घरी जाते. तू ऑफिसमधून निघालीस की फोन कर. आणि मावशीला काय सांगणार आहेस ? मला पण सांगून ठेव….” सायली

 

मी मेसेज करते तुला सगळं. चल नीट जा तू घरी….बाय….” ईशा

———————————————————–

प्रजापती निवासअसं लिहिलेल्या घराच्या बाहेर सिद्धार्थ उभा राहिला तेव्हा त्याच्या डोक्यात खूप गोंधळ माजला होता. गेटमधून आत आल्यावर त्याला जो भास झाला होता, त्यामुळेच तो अस्वस्थ झाला होता खरं तर. तिथे आजूबाजूला जी शांतता होती, ती कशीतरीच वाटत होती त्याला. आपल्या आजूबाजूला खूप काही घडतंय असं एखाद्याला जाणवतं पण कोणीतरी तोंड दाबून ठेवल्यामुळे हे सगळं आपल्याला आपल्या ओठांपर्यंत येऊनही गप्प रहावं लागतं, पण त्यामुळे आपली चिडचिड, धुसफूसही होते आतल्याआत. असल्या सगळ्या जाणिवा आत्ता आपल्या आजूबाजूला वावरतायत असं वाटलं सिद्धार्थला.

 

त्या घराच्या समोर येऊन तो थांबला. पुढे जाण्याची त्याची ईच्छा होत नव्हती. ईच्छा की हिम्मत? हिम्मत होत नव्हती खरं तर. हे स्वतःशीच मान्य करायलाही त्याला लाज वाटत होती. असल्या गूढ वगैरे गोष्टींना नको तितकं महत्व देऊन त्यांना घाबरण्याचा आपला स्वभाव नाही, हे त्याला माहित होतं. पण एखाद्या परिस्थितीचा बाहेरून विचार करणं वेगळं आणि त्या परिस्थितीमध्ये सापडून मग हा विचार करणं वेगळं….एखाद्या परिस्थितीत भीती वाटू शकते, त्याने स्वतःच्या मनाला समजावलं. पण तरीही पाय पुढे नेण्याची त्याची हिम्मत होईना. असंच मागे जावं का? बाहेर पडून चौकशी करूयाइथे या घरातच विचारलं पाहिजे असं काही नाही. कदाचित…..कदाचित भूक लागलीये आपल्याला म्हणून असं अस्वस्थ वाटतंय….हो बरोबरआता आधी जाऊन खाऊया काहीतरी आणि मग चौकशी सुरु करूया….

 

त्याच्या मनात असले विचार येत होते तेवढ्यात समोरचं प्रजापती निवासाचं दार अर्धवट उघडलं. मागून कोणीतरी बाहेर येईल म्हणून सिद्धार्थ थोडा वाकूनच आत पाहत होता, पण दाराच्या मागे आत कोणीच नव्हतं. दार आपोआप उघडलं असावं, जणू काही बाहेर उभ्या राहिलेल्या सिद्धार्थला आत येण्याचं निमंत्रण द्यायलाच. दार आपोआप उघडलं हे पाहून सिद्धार्थ आणखी दोन पाऊलं मागे सरकला. त्याच्या डोक्यात आता एकामागोमाग एक विचारांची गर्दी व्हायला लागली. मगाशी लांबून बघितलं तेव्हा उजव्या बाजूच्या तीन घरांपैकी मधल्या म्हणजे ह्या घराचं दार उघडं असल्यासारखं वाटलं होतं खरं, पण मग आत्ता गेटपासून आत पुढे येताना तर ते दार बंदच दिसत होतं आणि आत्ता त्याच्या डोळ्यांसमोर ते उघडलं होतं, आपोआप.

 

आत जावं की नको? सिद्धार्थला ठरवता येत नव्हतं. आपल्याला काहीही दिसलेलं नाहीये, काहीही ऐकू आलेलं नाहीये, इथे काही आधी आलोही नाहीये की ह्या जागेबद्दल असलं भीतीदायक माहित असावं….मग तरीही आपण असा बचावाचा पवित्रा का घेतोय? जणू काही आत कोणीतरी आपल्यावर हल्ला करायला बसलेलं असेल असं? त्याच्या मनात नकळत विचार येऊन गेला. खरंच आपण खूप निगेटिव्ह विचार करतोय का? सायलीला ते जे अनुभव आले ते सगळं कुठेतरी डोक्यात बसलंय आपल्या, म्हणून असं होत असावं. नाहीतर एखाद्या नवीन जागेबद्दल अचानक अशी भीती का वाटेल?

 

कुठल्यातरी आवाजाने त्याची तंद्री भंगली. त्याने समोर पाहिलं. त्या घराचं दार आणखी थोडं उघडलं होतं. कशासाठी एवढा विचार करतोय आपण. समोर घराचं दार उघडं आहे. सरळ आत जाऊन बघायचं, कोणी आत असेल तर त्यांच्याकडे आपल्याला हवी ती चौकशी करायची आणि कोणीच नसेल तर सरळ मागे वळून परत निघायचं. मनाशी पक्का विचार करून तो पुढे निघाला. दरवाजापाशी पोहोचल्यावर पुन्हा एकदा त्याच्या मनात चलबिचल झाली खरी, पण आता त्याने निर्णय घेतलेला होता.

 

घराच्या उंबरठ्यावरच उभं राहून त्याने आत नजर फिरवली. घरात थोडंसं जुनं, मोजकं सामान दिसत होतं. समोरच्या कोपऱ्यात दोन खुर्च्या होत्या. त्यांच्या समोरच्या कोपऱ्यात एक टेबल होतं. टेबलवर कसलीशी जुनी बॅग ठेवलेली होती आणि कुणाचातरी फोटो होता. सिद्धार्थ उभा होता तिथेच त्याच बाजूला कोपऱ्यात काही जुने बॉक्सेस टाकलेले होते. आतमध्ये आणखी एक किंवा दोन खोल्या असाव्यात असं वाटत होतं. सिद्धार्थ उंबरठ्यावरून आणखी एक पाऊल आत आला. आणि तेवढ्यात त्याच्या मागे कसलीशी हालचाल जाणवली, त्याच्या अगदी मागे कुणीतरी उभं होतं बहुतेक आणि त्याच्याकडे रोखून बघत होतं मागून. त्याने झटकन मान वळवून खात्री करून घेण्यासाठी मागे पाहिलं. पण नाही, मागे कुणीच नव्हतं. बाहेर वारा मात्र खूप जोराचा सुटला होता. भासच होता तो, त्याने स्वतःला समजावलं. पण खरंच का? इतकं खरं असल्यासारखं वाटलं ते….जणू काही कोणीतरी खरंच उभं होतं त्याच्या मागे.

 

जाऊदे, आपण आपलं काम होत असेल तर करूया आणि जाऊ. फार विचार करत बसण्यात अर्थच नाही. तो आणखी थोडं आत आला आणि त्याने दाराची कडी वाजवून मग हाक मारली,

हॅलो, कोणी आहे का घरात?”

हाक मारल्यावर तो स्वतःशीच हसला. आपण मध्य प्रदेशात आहोत, मराठी कसं चालेल इथे?

कोई है घर में?”

त्याने पुन्हा हाक मारली. पण काहीच उत्तर नव्हतं आतून. तसंही आतल्या जुन्या, धुळकटलेल्या वस्तू पाहून इथे कुणी राहत नसावं असंच वाटत होतं.

 

पुढचं एक मिनिटभर तिथे शांतता होती. ह्याचा अर्थ इथे कोणीच नाहीये, त्यामुळे इथून निघायला हवं असं ठरवून सिद्धार्थ मागे वळला आणि तेवढ्यात आतून कसलातरी आवाज झाला. तो दचकून तिथेच थांबला. त्याने थोडा अंदाज घेतला. आवाज नक्की घरातूनच आलेला होता. पण कसला होता आवाज? कोणाच्यातरी बोलण्याचा होता, हो, नक्कीच.

 

तो हॉलच्या आतपर्यंत चालत आला. बाहेरचा दरवाजा उघडा असल्यामुळे हॉलमध्ये निदान पुरेसा उजेड तरी होता. पण आतल्या खोल्यांच्या खिडक्याही बंद असाव्यात बहुतेक, आत सगळीकडे अंधारच होता. हॉलपासून आत एक पॅसेज गेला होता आणि तो संपतो तिथे एक दार होतं आणि त्या दाराच्या उजव्या बाजूलाही एक दार होतं. कदाचित ह्यातलं एक किचन असेल आणि एक बेडरूम असेल किंवा बाथरूम. तिथे उभं राहून काहीच अंदाज येत नव्हता. कारण पॅसेज आणि आतल्या दोन्ही खोल्या तसं पूर्ण अंधारातच होतं. पण आवाज नक्की इथूनच आला होता. पण कुठल्या खोलीतून नक्की? आणखी आत जाण्यासाठी तो पुढे पाय टाकणार तेवढ्यात त्याच्या मनात पुन्हा एकदा भीतीचं सावट उभं राहिलं.

 

आपल्याला तर माहिती विचारायची आहे, इथे तर कोणी दिसतही नाहीये. का जायचं मग आत? सरळ बाहेर जाऊया आणि बाकी कोणी भेटतंय का ते बघूया. तो मागे वळला आणि पुन्हा एकदा तोच आवाज. तो घाबरून तिथेच थांबला. आतल्या खोलीत कोणीतरी कुजबुजत होतं. शब्द नीट कळत नव्हते पण कोणीतरी होतं नक्की. मनातून एका बाजूने तिथून जावंसं वाटत होतं, तरीही तो त्या अंधारात, त्या पॅसेज मध्ये शिरला. आपण हे काय करतोय, त्या कुठल्यातरी गूढ वाटणाऱ्या अनोळखी घरात असं का शिरतोय हे त्याचं त्यालाही कळत नव्हतं. डोकं थोडं जड झाल्यासारखं वाटत होतं. नीट विचारच करता येत नव्हता. पॅसेजच्या टोकाच्या खोलीच्या बाहेर येऊन तो थांबला. क्षणभर तो आतला आवाजही थांबल्यासारखा त्याला वाटला. पण एकच क्षण….त्यानंतर आतून आलेल्या त्या हसण्याच्या आवाजामुळे तो जागीच खिळून उभा राहिला. कुठल्यातरी बाईचा आवाज होता तो, हलकंच हसल्यासारखा.

 

दरवाजाच्या जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की दरवाजाला बाहेरून कडी लावली होती. पण मग आत कोणी कसं असू शकतं? आणि कोण असेल आत? आपण हाक मारल्यावर ह्या बाईने उत्तर का नाही दिलं? तिच्या एकटीचाच आवाज येतोय म्हणजे आत आणखी कोणीच नाहीये? शंभर प्रश्न पडलेले असतानाच सिद्धार्थने दरवाजाची कडी उघडली.

———————————————————

सायली आणि ईशा कोथरूडच्या त्या पत्त्यावर पोहोचल्या तेव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते. रिक्षावाल्याला पैसे देत असतानाच मागून एक जोडपं आलं. एकमेकांशी भांडतच.

आता थांबवा ही रिक्षा. आधीच उशीर झालाय. तरी तुम्हाला सांगत होते मी, त्या प्लम्बरला आत्ता बोलवत बसू नका.” ती बाई वैतागली होती.

 

अगं हो आता कळलं नाकिती वेळा ऐकवणार आहेस? मला माहित होतं का एवढं काहीतरी मोठं काम निघेल?”

बोलताबोलता ते दोघे सायली आणि ईशा ज्या रिक्षातून उतरले होते तिथे पोहोचले. सायली रिक्षावाल्याने दिलेले सुट्टे पैसे पर्समध्ये ठेवत होती. आणि ईशा मोबाईलमध्ये पाहून आपण बरोबर ऍड्रेसवर आलोय ना ते कन्फर्म करत होती.

सायले, चल आपण बरोबर ऍड्रेसवर आलोत.”

ईशा रस्ता क्रॉस करण्यासाठी सायलीचा हात पकडून जवळजवळ तिला ओढतच घेऊन निघाली.

पण सायलीची नजर मात्र त्या जोडप्यावरच खिळून राहिली होती. रस्ता क्रॉस करतानासुद्धा ती मागे वळून त्यांच्याकडे बघत होती.

अगं लक्ष कुठेय सायली तुझं? रस्ता क्रॉस करतोय आपण ….मागे कुठे बघतेयस?” ईशा वैतागली.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्यावर सायली पुन्हा एकदा त्या दिशेला पाहायला लागली. रिक्षा त्या दोघांना घेऊन निघाली होती….

ए बाईकाय झालं?” ईशा

 

ईशी, त्या माणसाने रिक्षावाल्याला काय सांगितलं तू ऐकलंस का? सुजयचं घर आहे त्या गावाचं नाव सांगितलं त्याने…” सायली

 

मग काय ? बाकी कोणी त्या गावात जाणारी रिक्षा पकडू शकत नाही का? सायले चल गं, आपल्याला मोठं काम करायचंय उशीर झालाय….चल पटकन..”

ईशाने पुन्हा तिचा हात पकडला आणि त्या दोघी त्या सोसायटीच्या गेटपाशी आल्या.

वॉचमन रेडिओवर कुठलीतरी गाणी ऐकण्यात मग्न होता.

ओ दादा, हे नारायण साने आणि लक्ष्मी साने इथेच राहतात का?” ईशा

 

साने काकाकाकू ? हो इथेच राहतात. तिसऱ्या मजल्यावर. ३०२ मध्ये. तुम्ही काय भेटायला आलाय त्यांना ?” वॉचमन

 

होजरा काम होतं त्यांच्याकडे….चल ईशा…” सायली बिल्डिंगकडे बघत म्हणाली.

 

ओ ताई ते नाहीत घरात. हे काय आत्ता तुम्ही यायच्या एक मिनिट आधी बाहेर गेले ना….रिक्षाने कुठेतरी जाणार होते….”

 

काय?” सायली आणि ईशा दोघी एकदम ओरडल्या.

पुढच्याच क्षणी सायलीच्या डोळ्यांसमोर ते जोडपं आलं.

ईशा, मी तुला म्हटलं होतं ना, त्यांनी सुजयच्या गावाचं नाव सांगितलं रिक्षावाल्याला. ते तेच असणार….ओह नो….आपली थोडक्यात चुकामुक झाली….” सायली मान हलवत म्हणाली

 

“झालं परत? तुला काय माहित ते तेच असतील? जरा वेळ थांबू… ते कुठे इथेच गेले असतील सायले, आपल्याला कुठे घाई आहेइथे जवळ मॉल आहे एक. तिथे जाऊन टाईमपास करू आणि आठसाडेआठ पर्यंत परत येऊ…” ईशा

 

ओ मॅडम….ते आज परत येणार नाहीतदोन दिवसांनी येतो म्हणालेघराकडे लक्ष ठेव म्हणाले मलामी विश्वासातला माणूस आहे त्यांच्यातुम्ही कोण पण ? नाही म्हणजे ते आल्यावर मलाच विचारतील ना आमच्याकडे कोण कोण आलं होतं ….म्हणून विचारलं.”

वॉचमन जरा जास्तच आगाऊ होता. तेव्ढ्यातल्या तेवढ्यात त्याने उगीचच स्वतःची पाठ थोपटून घेतली.

नाही आम्ही येऊ पुन्हा त्यांना भेटायलाथँक्सचल ईशा….”

दोघी हताशपणे पुन्हा बाहेर रस्त्यावर जाऊन रिक्षा शोधायला लागल्या.

————————————————————

दरवाजाची कडी उघडताना स्वतःच्याच हृदयाचे ठोके सिद्धार्थला ऐकू येत होते, इतके त्याचे श्वास जलद चालले होते. आत कोण असेल? दार उघडल्यावर समोर काय दिसणार आहे? करकरत दार उघडलं. खरं तर सिद्धार्थने फक्त कडी काढली होती, ते दार ढकललंही नव्हतं. ते आपोआपच उघडल्यासारखं वाटलं त्याला. जणू काही कडी काढल्या काढल्या आतूनच ते कोणीतरी उघडलं होतं.

 

एक क्षण सगळी शांतताच होती. आत खूप अंधार होता. बहुतेक खोलीच्या खिडक्या सगळ्या बंद करून झाकलेल्या असाव्यात. त्याच्या डोळ्यांना फक्त काळा मिट्ट अंधार दिसत होता आणि तो आवाज….तोही आता येत नव्हता. दार उघडल्यावर आतली हवा अंगावर आल्यासारखी त्याला वाटली, अगदी थंड. खूप दिवसांनी ती खोली उघडली गेली असावी, एक विचित्र घुसमटलेपण होतं त्या हवेत. त्याला एकदम बधिर झाल्यासारखं वाटलं. खोलीत काय आहे ते बघायला तो आला होता खरा, पण आता त्याची आत जायची ईच्छाही होत नव्हती आणि हिम्मतही.

 

तो दोन पावलं मागे सरकला आणि आणखी मागे सरकणार तोच मागे त्याच्या पाठीला काहीतरी लागलं, कुणीतरी होतं तिथे. जणूकाही तो आणखी मागे जाऊ नये म्हणून तिथे त्याला अडवायला उभं असल्यासारखं…..पण काय होतं तिथे? हा विचार मनात आला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सरळ, सरळ आत त्या पॅसेज मध्ये आला होता, तेव्हा पॅसेज मध्ये काहीच नव्हतं. आता तो एक एक पाऊल मागे टाकत होता, तर तेव्हाही तो रस्ता मोकळाच असायला हवा होता खरं तर….मागे काय असेल? बाहेरचा दरवाजा उघडा होता तिथून कोणी आत आलं असेल का? पणपण….आता त्याच्या लक्षात येत होतं. बाहेरच्या खोलीत दरवाजा उघडा असल्यामुळे जो उजेड येत होता, तो आता अचानक नाहीसा झाला होता. त्या उजेडाचा काही अंश का होईना पॅसेज मध्ये येत होता. निदान पॅसेज मधून पाहिल्यावर या बाजूला उजेड दिसतोय, इतकं तरी कळत होतं. पण आता तसं काहीच वाटत नव्हतं. सिद्धार्थला त्या थंड हवेतही दरदरून घाम फुटला होता. इथे आत यायलाच नको होतं….पण आता काय उपयोग होता? त्याच्या मागे कोण आहे, पाठीला कशाचा स्पर्श होतोय, त्याला कळत नव्हतं.

 

सगळा धीर एकवटून तो मागे वळला……

क्रमशः

10 Comments Add yours

  1. रुचिरा गुंजाळ says:

    आत्ताच अधशा सारखा वाचून काढला आहे, आणि पुन्हा पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत😱😱😱😱

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      Adhashasarkha vachlat te vachun bara vatla …:) pudhcha bhag lavkar taknyacha prayatn karen..

      Like

  2. Vaishali Agre says:

    best story….please lavker phudache bhag taka..

    Like

    1. rutusara says:

      Thanks 🙂 pudhcha bhag Lavkar taknyacha prayatn karen 🙂

      Like

  3. ujvala says:

    KITI SUSPENSE? LAVKAR SUSPENSE SAMPAVA PLEASE. TUME CHHAN LEHTA NO DOUBT PAN LAVKAR SUSPENSE SAMPAVA. ME KHUP VAT BHAGTE SUSPENSE KADI SAMPANAR TE

    Like

    1. rutusara says:

      Thanks 🙂 suspense lavkar sampla tar story hee sampel naa …aani aasa ghaighait sampavnyat kaay maja….

      Like

  4. M.g says:

    waiting for next part !

    Liked by 1 person

  5. Please next part lavkar prakashit kara story purn zalya shivay zop yenar nahi

    Liked by 1 person

    1. rutusara says:

      done:) thanks:)

      Like

Leave a comment